मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चालणे म्हणजे दुसरे हृदय… ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ चालणे म्हणजे दुसरे हृदय… ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले 

आपल्या पायाच्या पोटरीच्या स्नायूंना जर आपले ” दुसरे हृदय ” म्हटले तर ती अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही.

सर्वांना हृदयाचे कार्य काय असते ते ठाऊक असेलच….. हृदय म्हणजे शरीरातील एक पंप आहे. हा पंप रक्ताला पुढे पुढे ढकलत राहतो आणि त्यामुळे रक्त शरीरात धमण्या आणि नीला याच्यातून गोल गोल फिरत राहते, ते एका ठिकाणी साचून राहत नाही.

पण शरीरात आणखीही एक पंप कार्यरत असतो. होय. खर आहे. आपले पोटरीचे स्नायू हेच आपले दुसरे हृदय आहे… हृदयाचे काम काय तर रक्त वाहिन्यांच्या जाळ्यातून सतत वाहते ठेवणे. यालाच रक्ताभिसरण असे म्हणतात. रक्त असे गोल गोल सतत वाहत ठेवणे अत्यंत जरुरी आहे. तसे न झाल्यास आणि जर रक्त एकाच ठिकाणी साचून राहिले, तर शरीरातील अवयवांना रक्त पुरवठा होणार नाही आणि रक्ताच्या गुठळ्या बनून त्या प्राणघातक ठरू शकतात. हृदयाला शरीरात रक्त फिरते ठेवण्यास पायाच्या पोटरीचे स्नायू मदत करतात. जेव्हा आपण चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात आणि स्नायूतील रक्तवाहिन्यांमध्ये असलेले रक्त हृदयाच्या दिशेने ढकलून दिले जाते. निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच तशी केलेली आहे.

पायाच्या पोटरीमधील रक्त वाहिन्या ( नीला ) या एका प्रकारे रक्ताचा साठा करण्याचे काम करतात.

त्यांना ” मसल विनस सायनस असे ” म्हणतात. ज्यावेळी पायाचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी पायात साठलेले रक्त नीलांमधून वर, म्हणजे हृदयाच्या दिशेने ढकलले जाते. या पायांच्या रक्त वाहिन्यामध्ये विशेष प्रकारच्या झडपा असतात. या झडपा रक्त वाहण्याची दिशा ठरवितात. या झडपा, रक्ताला पायाकडून हृदयाकडे जाऊ देतात, परंतु हृदयाकडून पायाकडे जाऊ देत नाहीत. आपण उभे असताना गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे रक्त हे खालच्या दिशेनेच जाण्याचा प्रयत्न करणार हे साहजिकच आहे. या झडपा, गुरुत्वाकर्षणामुळे रक्त पायात साचू देत नाहीत आणि रक्ताला हृदयाच्या दिशेने जाण्यास भाग पाडतात. आपण जेव्हा चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात व हृदयास रक्ताभिसरण करण्यास मदत करतात.

घोट्याखालचा जो पाय असतो त्यात देखिल काही प्रमाणात रक्ताचा साठा केला जातो. आपण ज्यावेळी चालतो, त्यावेळी सर्वप्रथम तळपायातील स्नायू आकुंचन पावल्याने तेथील रक्त वर हृदयाच्या दिशेने ढकलले जाते, नंतर जेव्हा पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी सर्व रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने आणखी  पुढे ढकलले जाते आणि हृदयापर्यत पोहोचते. रक्त वाहिण्यातील झडपा रक्ताला खाली येण्यापासून रोकतात. आपण एकाच ठिकाणी खूप वेळ स्तब्ध बसून राहिलो ( विमानात, कारमध्ये, खुर्चीत   बरेच तास ) तर पोटरीचे स्नायू आकुंचन पावू शकत नाहीत. रक्त पायातच साचून राहते आणि रक्ताच्या गुठळ्या (DVT, Deep Vein Thrombosis) होण्याची शक्यता वाढते. म्हणून चालणे व पळणे किती महत्त्वाचे आहे ते कळते. 

एखादा रुग्ण खूप दिवस अंथरुणात खिळून राहिला तर त्याला DVT होऊ शकते. याचा अर्थ त्याच्या पायाच्या रक्त वाहिन्यामध्ये रक्ताच्या गाठी होतात. त्यामुळे पायाच्या पोटऱ्या दुखतात, तसेच सूज देखिल येते. अश्या प्रकारच्या रक्ताच्या गाठी पायातून निसटून फुप्फुसात जाऊन फसू शकतात, ज्याने जीवाला धोका उद्भवू शकतो.

जर पोटरीतील झडपा कोणत्याही कारणाने खराब झाल्या तरी देखील पाय दुखू शकतात. झडपा खराब झाल्या की रक्त पायात साचून राहते. पाय जड होणे, थकवा, पाय ठसठसणे, घोट्यात सूज, फुगलेल्या पायाच्या नसा, पायात अचानक चमक येवून दुखणे, खाज येणे, चमडीचा रंग बदलणे, पायात बरी न होणारी जखम होणे, इत्यादी त्रास होऊ शकतो.

थोडक्यात काय –- हे सगळे त्रास टाळायचे असतील तर …. चालत रहा, शक्य असल्यास धावत रहा.

निरोगी आणि सुदृढ रहा.

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈