श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

सहा वर्षांनी रवी मुंबईतच नाही तर भारतात परत येत होता.  रवी सूर्यकांत घरवारे. घरवारे शिपिंग अँड क्लीअरिंग कॉर्पोरेशनचा पुढच्या पिढीचा वारसदार. लहानपणी उष्टावण सोन्याच्या चमच्याने झाले असल्याने पुढचा प्रवासही श्रीमंतीतच झाला. बंगल्यात त्याची वाढ झाली असली तरी त्याच्या डोक्यात श्रीमंती कधीच शिरली नाही. दहावी झाल्यावर पुढील पदवी अभ्यासासाठी त्याला अमेरिकेत पाठविण्यात आले आणि तो आज सहा वर्षांनी बिझनेस मॅनेजमेंटचे यशस्वी शिक्षण घेऊन भारतात परत आला होता. गेल्या सहा वर्षातला मुबईतला फरक त्याला जाणवत होता. स्वच्छतेबद्दल लोकांच्यात झालेली जागरूकता त्याला दिसत होती.

आता दोन आठवडे जरा आराम करून त्याला त्याच्या फॅमिली बिझनेस मध्ये सामील केले जाणार होते . तशी त्यांच्या प्रमुख ऑफिसमध्ये त्याच्यासाठी एक प्रशस्त अशी केबीन तयार करून ठेवली होती आणि ह्याची जाणीव रवीलाही देण्यात आली होती. लहानपणीपासून एक साचेबंद आयुष्य, ते पण भावनिक संबंधाला थारा न देता काढलेल्या रवीला  अमेरिकेत शिकायला गेल्यावर स्वतःच्या विचारांची प्रगल्भता वाढवायला पुरेसा वेळ मिळाला. श्रीमंत गरीब, जात पात ह्याच्या पुढचा विचार करून माणसांना माणूस म्हणून पहिले बघितले पाहिजे ह्याची त्याला जाणीव झाली होती आणि त्यामुळेच मुंबईत आल्यावर दोन दिवसानी असे काही घडले की त्याचे पुढचे सगळे आयुष्यच त्यामुळे बदलले.

विमानाचा लांबचा प्रवास करून आल्याने रवीचे  झोपायचे शेड्युल जरा बिघडले होते. रात्री उशिरा झोप आल्याने आज तो जरा जास्तच वेळ झोपला होता. घरातले सगळे म्हणजेच रवीचे आई वडील आणि मोठा भाऊ सगळे त्यांच्या नेहमीच्या वेळेत त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते. रामूकाका जे खूप वर्षांपासून घरवारे फॅमिलीकडे कामाला होते तेच आता घरात होते. त्यांनाही बाहेरून भाजी आणण्यासाठी बाहेर जायचे होते पण रवी झोपला होता म्हणून ते ही खोळंबले होते. खूप वेळ वाट बघून रवी उठत नाही म्हणून ते दरवाजा बाहेरून ओढून घेऊन भाजीपाला आणायला मार्केटला गेले. त्याच वेळेमध्ये दरवाज्याशी कोणीतरी आले आणि दरवाजा उघडण्यासाठी बेल मारली. घरात रवी एकटाच होता पण तो झोपला असल्याने त्यालाही त्याच्या बेडरूममध्ये बेल ऐकू आली नाही. जेंव्हा  तिसऱ्यांदा बेल वाजली तेंव्हा रवीची झोपमोड झाली. डोळे चोळतच रवी बाहेर आला.  तो रामूकाकाना बघू लागला. पण ते न दिसल्याने तो दरवाज्यापाशी गेला. डोळे किलकिले करतच त्याने दरवाजा उघडला आणि समोर बघितल्यावर  त्याची नजर एकदम स्थिर झाली. कोणीतरी त्याच्यावर मोहिनी केल्यासारखा तो समोर एकटक नुसता बघतच राहिला. त्याच्या समोर एक त्याच्यापेक्षा दोन ते तीन वर्षांनी लहान असलेली, पंजाबी ड्रेस घातलेली, सुंदर मुलगी उभी होती. तिने चेहऱ्यावर काहीही लावले नव्हते तरी तिच्या चेहऱ्यावरील तेज ओसंडून वहात होते. समोर रवीला बघून तिच्या चेहऱ्यावरही जरा वेगळ्या छटा  उमटल्या.

“रामूकाका नाहीत का ? कचऱ्याचा डबा देता का ? “

तिने रवीला विचारले.

” कचऱ्याचा डबा ? का ? तुम्हाला का कचऱ्याचा डबा द्यायचा? आमचा कचरेवाला येतो रोज कचरा न्यायला  “

” तसे नाही साहेब. मी तुमचा कचरा न्यायला आले आहे. मी तुमच्याकडे येणाऱ्या कचरेवाल्याची मुलगी. माझ्या वडिलांना काल ब्लड प्रेशरचा त्रास झाल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितले आहे. त्यामुळे काही दिवस मीच येत जाईन कचरा न्यायला. ” तिने रवीला सगळे उलगडून सांगितले. रवी परत घरात गेला आणि किचनमध्ये असलेला कचऱ्याचा डबा  घेऊन बाहेर आला. तिने तो डबा तिच्याकडे असलेल्या मोठ्या डब्यात उलटा केला आणि दोनवेळा तो डबा त्या मोठ्या डब्यावर आपटून रवीला परत दिला आणि थँक्स म्हणून ती उलटी फिरली. रवी ती दिशेनासी होईपर्यंत बघतच राहिला. जे काही आत्ता त्याच्यासमोर घडले होते ते त्याच्यासाठी खूप वेगळे होते. कोण एक टापटीप असणारी सुंदर मुलगी येते काय आणि घरचा कचरा घेऊन जाते काय आणि जातांना वर त्यालाच थॅंक्सही म्हणून जातेकाय? तो पूर्ण दिवस रवीच्या डोळ्यांसमोरून तिचा तो सुदंर चेहरा काही जात नव्हता.

क्रमश:….

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments