मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 181 ☆ जाण… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 181 ?

💥 जाण… 💥 सुश्री प्रभा सोनवणे ☆

आपण खूप  हाका माराव्यात,

पण ओ देणारेच कोणी नसावे,

आपल्याला वेगळेच सांगायचे असावे

आणि समोरच्याने

भलतेच अर्थ लावावेत,

असे दु:ख तुमच्या वाट्याला,

कधी आले आहे का?

माणसांच्या कीर्र ऽऽ जंगलातून

वाट काढताना,

कुणीच भेटू नये आपले ?

जाणिवांचे ओझे आता

सोडून द्यावे समुद्रात,

तर समुद्रही दिसेना कुठे !

मला जाण येऊ लागली

आणि सारेच जाणते हद्दपार

या जंगलातून!

आता गेंड्याचे कातडे तरी

कसे पांघरायचे

सा-याच संवेदना जागृत झाल्यावर

आणि झोपेचे सोंग तरी

कसे घ्यायचे टक्क जागेपणी !

मी हाका मारणेही

सोडून देत नाही

आणि व्यक्त होणे ही …..

निदान एखादा प्रतिध्वनी तरी

कधी काळी येईलच ना माझ्यापाशी !

अनिकेत मधून… १९९७ नोव्हेंबर

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आभास… ☆ सौ.वर्षा सुभाष शिंदे ☆

सौ. वर्षा सुभाष शिंदे

अल्प परिचय  

शिक्षण – B.A.,B,Ed

29 वर्षांपासून प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. लेखन,वाचन,अभिवाचनाची आवड. गायनाची आवड आहे.

? कवितेचा उत्सव ?

☆ आभास… ☆ सौ.वर्षा सुभाष शिंदे ☆

तलम रेशमी तरल मखमली

पटल अलगद दूर सारूनी

स्वप्नात प्रिये गं विहरावे

धुक्याची पहाट तू होऊन यावे

 

तनुवरी तव दिसती खुलूनी

अलंकार दवबिंदुंचे रमणी

चंद्रवदन अन् आले फुलूनी

प्राचीच्या कोमल किरणांनी

 

नाजूक सुंदर अधरांमधूनी

कुंदकळ्या डोकावती

गौर गुलाबी गालांवरती

गुलाब लाल उमलून येती

 

कुंतलामधे काळ्या कुरळ्या

चांदण्या नभीच्या माळल्या

गाली हसता गोडशा खळ्या

सडा मोतियांचा पडला

 

छंद लागला तुझा जीवाला

जाहलो प्रेमात वेडा खुळा

आभास तुझा प्रिये मधुबाला

जीवनास व्यापूनिया उरला

 

© सौ. वर्षा सुभाष शिंदे

कोथरूड.

०९/११/२०२२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ संत एकनाथांची गौळण : एक भावानुभव! ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆

 🌸 विविधा 🌸

☆  संत एकनाथांची गौळण : एक भावानुभव! ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆ 

संत एकनाथांची गौळण : एक भावानुभव! 🙏🏻 

असा कसा देवाचा देव बाई ठकडा       

देव एका पायाने लंगडा!                         शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो           

करी दह्या दुधाचा रबडा!                        वाळवंटी जातो किर्तन करितो               

घेतो साधुसंतांसी झगडा!                        एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई             

देव एकनाथाचा बछडा!!

*****

मराठी भाषेचे पहिले संपादक संत म्हणजे…संत एकनाथ! भागवत धर्माचे जे चार बळकट खांब आहेत ; त्यांपैकी एक…भागवत ग्रंथ प्रदान करणारे संत एकनाथ! मानवी जीवनातील उच्च मूल्यांची ओळख करून देणारे…एक उत्तम साधक, कथा-कथक, ज्ञान प्रसारक!एक उत्कृष्ट कीर्तनकार!!त्यांनी अमृताहुनी गोड अशा मराठी भाषेला लोकभाषा बनवली. साधी सोपी सर्वांना समजेल अशी, निरूपणातील भाषेपेक्षा , प्रबोधन करणारी, सामान्यांना कळेल अशी भाषा वापरून  गौळण हा काव्यप्रकार समाज मनात रूढ केला रूजवला. सुंदर अशा काव्य वैभवाने नटलेला हा काव्यप्रकार श्रोत्यांची गानसमाधी लावणारा, भक्ती चे अमृतपान करविणारा ठरला. श्रोते तन्मयतेने डोलू लागले. अशाच एका प्रसिद्ध गौळणीचा आनंद लुटू यात…  शब्द वैभव, शब्द योजनेतली चतुराई, नादमाधुर्य आणि कानांत रुंजी घालत रहाणारे शब्द… या सगळ्याच शब्द गुंफणीचा अनोखा अनुभव देणारी ही गौळण!!                     

एकनाथांनी लोकांना समजेल अशी साधी सोपी सुलभ भाषाशैली वापरत    लोकव्यवहारातील शब्द वापरलेली ही गौळण….देवाबरोबर सलगी साधत, लटक्या तक्रारीच्या सुरात एकनाथ सांगताहेत… 

” आश्चर्य च नाही कां हे??? अहो, हा रांगणारा बाळकृष्ण लंगडा म्हणवला जात असला तरी मोठा  ठकडा आहे. लब्बाड आहे.भुरळ घालून कधी डोळ्यात धूळ घालून… फसवून गोपींच्या घरी जाऊन… शिंकं तोडून, मडकं फोडून,दही-दूध सांडून त्याचा रबडा करतो..पत्ताच लागत नाही.  एकनाथांनी कृष्णाच्या बाललीलांचं वर्णन करतांना लोकव्यवहारातील  ठकडा हा शब्द प्रयोग करत..यमक चा प्रभाव साधत… काव्यात गेयता तर आणलीच आहे… पण जोडीला जो एक ठसका जाणवतोयं ना त्यात त्यामुळे साधलेली परिणाम कारकता  आणि मना-मनांची घेतलेली पकड.. .शब्दातीत!!  मधुरा भक्ती चा अननूभूत असा अविष्कार आहे ही गौळण! ही भक्ती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून च एकनाथांनी लोकभाषा आणि बोली भाषेतील शब्द प्रयोग केला आहे.                

संस्कृत भाषेतील ज्ञानामृत सर्वसामान्यांना मिळावे यासाठी एकनाथ विद्वत्जनांचा विरोध सहन करत…वाळवंटी जाऊन किर्तन करीत. एकनाथ आपल्या कवनांत आपल्या गुरूदेवांचा  नेहमीच उल्लेख करत… एका जनार्दनी!!!!🙏🏻 ही त्यांची नाममुद्रा च आहे! या गौळणीत शेवटी एकनाथांनी त्यांच्या लाडक्या देवाशी… त्याला बछडा असं संबोधत… फक्त साहचर्य च नाही तर एकरूपत्व. …तद् रूपत्व लाभावे अशी भिक्षा मागत कृपादृष्टी चं दान पदरात द्यावं अशी याचना ही केलीयं! प्रपंच आणि परमार्थ यांचा मेळ घालत  लोकभाषेतील शब्द बद्ध असा हा गीत प्रकार समाजात त्यातल्या सहजता आणि सुलभता, गेयता या रचनावैशिष्ठ्यांमुळे जास्त रूजला, बहरला, कीर्तन-भजनात म्हंटला जाऊ लागला. वरील गौळण आजही मोठ्या ठसक्यात आणि तिच्या शब्दालंकार युक्त लावण्या चा आस्वाद देत श्रोत्यांच्या मनात ठसते हे वेगळं सांगायला नको ना??                

© प्रा. भारती जोगी

पुणे.                            

९४२३९४१०२४.📚📖🖋️

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित लघुकथा ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆

☆ तीन अनुवादित लघुकथा ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

(1) अतिसामान्य तडफड – श्री संतोष सुपेकर (2) सन्मानास कारण की — सुश्री मीरा जैन (3) पुन्हा कधीतरी — श्री भगवान वैद्य ‘प्रखर’

☆ अतिसामान्य तडफड – श्री संतोष सुपेकर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

नुकतंच त्याचं कॉलेज शिक्षण पूर्ण झालं होतं, आणि एक नवा ‘ सामान्य ‘ माणूस म्हणून तो या जगात प्रत्यक्ष पाय टाकू पहात होता. 

एक दिवस तो एका जगप्रसिद्ध मंदिरात गेला.. ‘ नवं आयुष्य सुरु करण्यापूर्वी देवाच्या पाया पडावं आणि त्याचे आशिर्वाद घ्यावेत  ‘ असं त्याला मनापासून वाटलं होतं. पण आत जाताच तिथे लागलेली लांबलचक रांग पाहून तो चक्रावूनच गेला – “ बाप रे … इतकी मोठी रांग ? “ तो नकळत म्हणाला. 

“ हो रे भावा.. अशी खूप मोठी रांग लागणं हे रोजचंच आहे इथे.. “ शेजारी उभे असलेले एक गृहस्थ आपणहून त्याला म्हणाले. 

“ अशाने तर देवाचं दर्शन होईपर्यंत संध्याकाळ होईल इथेच .. “ घड्याळ बघत तो वैतागून म्हणाला. 

“ अरे बाबा, संध्याकाळ कसली.. रात्र जरी झाली तरी त्यात विशेष काही नाही. “ 

“ आणि ती रांग? तिथे काय आहे ? “….. या रांगेला समांतर, पण जराशी अंतरावर असलेली तशीच एक रांग पाहून त्याला आश्चर्य वाटलं .. “ त्या रांगेतले लोक जरा जास्त शिकले-सवरलेले आणि श्रीमंत असावेत असं वाटतंय मला . “

 .. ‘ आता या मुलाला वास्तव कळायलाच हवे ‘ या हेतूने, त्याच्याहून वयस्क असणारे ते गृहस्थ शांतपणे त्याला म्हणाले … “ असतीलही त्या रांगेतली माणसं थोडी श्रीमंत… पण बाळा, ही रांग नावाची गोष्ट आहे ना ती प्रत्येक माणसाला त्याचे स्थान … किंवा योग्यता म्हणू या … दाखवून देतेच . तीही एक रांगच आहे

— फक्त  “paid line “…. 

“paid line ? – पण ती रांगही या रांगेइतकीच लांब आहे की.. मग तरी अशी वेगळी का ? “

“ ते … ते काय आहे ना बाळा… या सामान्य.. म्हणजे general रांगेत उभं रहावं लागू नये ना, एवढ्याचसाठी लावलेली आहे ती वेगळी ‘स्पेशल’ रांग…. फक्त तेवढ्याचसाठी ही धडपड …पैसे देऊन …. बाकी काही नाही . पण शेवटी उभं रहावं लागतं आहे रांगेतच “ …… 

मूळ हिंदी कथा – ‘आम छटपटाहट’ – कथाकार – श्री संतोष सुपेकर

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ सन्मानास कारण की (अनुवादित लघुकथा) — सुश्री मीरा जैन ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

“ वृद्धाश्रमाचे सर्वश्रेष्ठ संचालक “ हा एक मानाचा समजला जाणारा सामाजिक सन्मान यावर्षी कुणाला मिळणार हे त्या कार्यक्रमात घोषित करण्यात येणार होते. त्यासाठी उत्सुक असणाऱ्यांची आणि अर्थातच त्यांच्या आप्तांची बरीच गर्दी तिथे जमलेली होती. 

अखेर एकदाचा तो क्षण आला. निर्णायक मंडळाने या सन्मानाचे मानकरी म्हणून श्री. गौतम यांच्या नावाची घोषणा केली —– आणि —- आणि तिथे उपस्थित असलेल्या इतर संचालकांमध्ये अस्वस्थ कुजबुज सुरु झाली. ज्या एका संचालकांना स्वतःलाच हा सन्मान मिळणार याची पुरेपूर खात्री वाटत होती, त्यांचा राग तर अनावर व्हायला लागला होता….. “ काय ? त्या गौतमला हा सन्मान मिळतो आहे ? – हे कसं शक्य आहे ? – माझा वृध्दाश्रम तर इतका स्वच्छ असतो कायम, आणि इतरही खूप सोयी-सुविधा आहेत तिथे. एवढंच नाही, तर मी जेव्हापासून त्या आश्रमाचा कारभार सांभाळायला लागलो आहे तेव्हापासून तिथल्या व्यवस्थेत सातत्याने काही ना काही सुधारणा होताहेत. म्हणूनच आधी जिथे फक्त दहा वृद्ध होते, तिथे आता पन्नास वृद्ध रहाताहेत. आणि या गौतमचा आश्रम — तिथे एकूण व्यवस्था कशी काय आहे कोण जाणे , कारण मी कधीच तिथे गेलेलो नाही. पण आकडे मात्र असं सांगताहेत की गौतम जेव्हापासून तिथला कारभार पाहतोय, तेव्हापासून वृद्धांची संख्या सतत रोडावत चालली आहे. आता तर फक्त वीस वृद्ध उरलेत म्हणे तिथे….. नक्कीच काहीतरी गडबड असणार तिथे, ज्यामुळे ही संख्या सारखी कमीच व्हायला लागली आहे. तरी त्याचा सन्मान ???? नक्कीच काहीतरी चमचेगिरी केलेली असणार …. नाहीतर त्या गौतमने निर्णायक मंडळाचे खिसे गरम केलेले असणार …. दुसरं काय ? “ 

तेवढ्यात ट्रॉफी घेण्यासाठी श्री. गौतम मंचावर आले. निर्णायक मंडळाच्या अध्यक्षांनी त्यांचे अगदी मनापासून भरभरून कौतुक करतांना सांगितले की — “ आम्ही तुम्हा सर्वांच्या संस्थांचे निरीक्षण केले. प्रत्येक ठिकाणी वृद्धांची व्यवस्था अगदी उत्तम ठेवली जाते हे आम्ही पाहिले. पण या सन्मानासाठी गौतमजी यांचं नाव  निवडलं जाण्याचं कारण हे आहे की,, आज त्यांच्या संस्थेत फक्त निपुत्रिक वृद्ध तेवढे रहात आहेत. बाकीच्यांना त्यांच्या मुलाबाळांबरोबर राहता यावे म्हणून त्यांनी स्वतः अथक प्रयत्न केले आहेत – करत आहेत, आणि त्यांना परत स्वतःच्या घरी पाठवण्यात त्यांनी अभूतपूर्व असे यशही मिळवलेले आहे. आणि हे त्यांचं काम मुळातच खूप मोठं आणि अद्वितीय, अद्भुत म्हणावं असंच आहे. “ —

मूळ हिंदी कथा – ‘सन्मानकी वजह’ – कथाकार – सुश्री मीरा जैन

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ पुन्हा कधीतरी (अनुवादित लघुकथा) — श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

‘‘साधारण किती पैसे मिळतील?” अयोध्या प्रसाद, ऊर्फ ए.पी.च्या बायकोने विचारलं. पगार वाढ होणार अशी घोषणा झाली होती, आपल्याला किती ॲरिअर्स मिळतील याचा ते दोघे हिशोब करत बसले होते. 

‘‘मिळतील बहुतेक चोवीस-पंचवीस हजार…”

‘‘फक्त एवढेच?” त्याच्या हातात चहाचा कप देत तिने विचारलं. 

‘‘हो, टॅक्सही कापला जाईल ना गं.”

‘‘हो तर, तुम्हा लोकांचा एक पैसाही लपून रहात नाही. सगळ्यात आधी, आणि तुम्हाला न विचारताच टॅक्स कापून घेतात.”

शेजारीच अभ्यास करत बसलेल्या पम्मीचं लक्ष बहुतेक त्या दोघांच्या बोलण्याकडेच होतं… ‘‘बाबा, आता तरी मला सायकल आणता येईल ना?” तिने मध्येच विचारलं. 

‘‘हो बाळा, नक्की आणता येईल.”

‘‘पण मी गिअरवाली सायकलच घेणार हं!”

‘‘नको, आत्ता साधीच घे बाळा. गियरवाल्या सायकलची किंमत किती जास्त सांगताहेत, ऐकलंस ना? फार महाग आहे ती. दहा हजारांपेक्षाही जास्त किंमतीची.”

‘‘आई, घ्यायची असली तर गियरवालीच घ्यायची. मला साधी सायकल नकोय. माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे गिअरवाली सायकल आहे, मग फक्त माझ्याकडेच का नाही?”

‘‘ठीक आहे. गियरवालीच घेऊ या. पण या वर्षीही तुला ‘ए’ ग्रेडच मिळाली पाहिजे… तरच…” ए.पीं.नी तिला अट घातली. 

‘‘तुम्ही गियरवाली सायकल घेऊन दिलीत ना, तर नक्कीच मिळेल यावर्षीही ‘ए’ ग्रेड.’’

‘‘तुम्ही तर काय हो? विनाकारण डोक्यावर बसवताय तिला…”

‘‘अगं एकतर मुलगी आहे आपली. आणि सायकलने जायला लागली, तर बसचे पैसेही वाचतील ना,” ए.पीं.नी हळूच बायकोला म्हटलं. 

‘‘बरं, मी काय म्हणत होते… यावेळी आईंना ‘गुजरात दर्शन’ सहलीला पाठवायचं का? गेल्या तीन वर्षांपासून म्हणताहेत त्या. पण दरवेळी काही ना काही सबब सांगून मी त्यांचं म्हणणं टाळते आहे.”

‘‘एकूण किती खर्च सांगताहेत?”

‘‘आठ हजारात होईल सगळं धरून, आणि मुख्य म्हणजे यावेळी त्यांच्या दोन मैत्रिणी चालल्यात या ट्रीपला. दोघी येऊन सांगून गेल्या तसं. आई म्हणत होत्या की त्या दोघींची सोबत असली, तर काळजी करण्याचं काही कारणच असणार नाही.”

‘‘कधीपर्यंत करावं लागेल बुकींग?”

‘‘अजून दोन आठवड्यांची मुदत आहे. तोपर्यंत ॲरिअर्स मिळतीलच ना? आणि समजा नाही मिळाले, तरी ते गजानन-ट्रॅव्हल्सवाले आपल्या ओळखीचे आहेत. थोडा जास्त वेळ देतील ते आपल्याला.” 

‘‘ठीक आहे. तूच त्यांच्याशी बोल, आणि बुकींग करून टाक.”

‘‘आणि हो… शक्य असेल तर आणखी एक छोटंसं काम करून घ्यायचं आहे.” 

‘‘कोणतं काम?”

‘‘माझं मंगळसूत्र तुटलंय्. गेल्या दिवाळीत दुरूस्त केलं होतं, पण आता परत तुटलंय्. खरं तर त्याची चेन बरीच झिजून गेली आहे. सोनार म्हणत होता की आणखी एक-दोन ग्रॅम सोनं घातलं, तर ती पक्की होईल.” 

‘‘म्हणजे ६-७ हजार तर नक्कीच लागतील.”

‘‘हो, हल्ली सोन्याचा भाव किती वाढलाय. मी नुसती काळी पोत वापरते आहे आता. पण कुठे बाहेर जायचं असेल, तर ते बरं नाही वाटत.”

‘‘घे मग करून तसं,” ए.पी. म्हणाले, आणि त्यांनी हिशोबाचा कागद बाजूला ठेवून दिला.

चहाचे कप उचलून बायको आत निघून गेली. पम्मी पुन्हा अभ्यास करायला लागली. ए.पी. गुपचुप आतल्या खोलीत गेले… ‘आता हे कपडे वापरायचे नाहीत’ असं ठरवून, कपड्यांचं जे एक गाठोडं त्यांनी बांधून बाजूला काढून ठेवलं होतं, ते उचलून घेऊन त्यांनी उघडलं. एवढ्यातच त्यात टाकलेल्या दोन पॅंटस् काढून, त्या उजेडात नेऊन त्यांनी नीट पाहिल्या… चांगल्या दोन-चारदा झटकल्या… आणि ‘आता तुमचा नंबर पुन्हा केव्हातरी’, असं मनातच म्हणत, इस्त्रीला द्यायच्या कपड्यांच्या बॅगेत त्या नेऊन ठेवल्या. 

मूळ हिंदी कथा – ‘फिर कभी’ – कथाकार – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ 

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “देहाची कॅपिटल व्हॅल्यू” ☆ श्री राजेंद्र  वैशंपायन ☆

??

☆ “देहाची कॅपिटल व्हॅल्यू” ☆ श्री राजेंद्र  वैशंपायन 

नुकतीच एक गमतीशीर बातमी वाचली. अमेरिकेमध्ये दर वर्षी एक कोटी पन्नास लाख (१,५०,००,०००) इतक्या दातांच्या रूट कॅनालच्या केसेस होतात. प्रत्येक रूट कॅनाल चा सरासरी खर्च ८०० डॉलर्स इतका असतो. म्हणजे दरवर्षी अमेरिकेमध्ये १२ अब्ज डॉलर्स  (१२,००,००,००,०००) इतका खर्च केवळ दातांच्या रूट कॅनाल वर होतो. या सरासरी अंदाजित संख्या जरी धरल्या तरी १० अब्ज डॉलर तरी केवळ दातांच्या इलाजासाठी खर्च होतात असं नक्कीच म्हणता येईल. मी चक्रावलोच. रूट कॅनाल सारख्या साधारणतः सोप्या समजल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेचा जर हा खर्च असेल तर बाकीच्या अवयवांच्या त्या मानाने अधिक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा खर्च तर माझ्या विचार करण्यापलीकडे गेला. म्हणजे अगदी पायांच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत प्रत्येक अवयवाची किंमत काढायचं ठरवलं तर एक मनुष्यदेह किती किमतीचा असेल? माझं कुतूहल अधिक चाळवलं गेलं आणि जरा अधिक माहितीसाठी गुगल महाराजांना विचारलं की केसाचं ट्रान्सप्लांट होतं त्यावेळा एक केस ट्रान्सप्लांट करण्याचा काय खर्च आहे? उत्तर आलं एका केसाला ३ डॉलर ते ९ डॉलर. त्याची सरासरी धरली तर उत्तर ६ डॉलर.  सामान्यपणे माणसाच्या डोक्यावर सरासरी दीड लाख(१,५०,०००) इतके केस असतात. म्हणजे याचाच अर्थ माणसाच्या डोक्यावरच्या केसांचीच किंमत साधारणपणे ९ लाख डॉलर इतकी आहे. मी अधिकच चक्रावलो. या संख्या डोळ्यासमोर आल्या आणि एकंदर मनुष्यदेहाची किंमत किती येईल हे गणितही माझ्याच्याने पूर्ण होईना.  

विचार करताना शरीराची सगळी आकृती समोर उभी राहिली.  हात, पाय, त्यांची बोटं, डोळे, कान, नाक, श्वासनलिका, अन्ननलिका, फुफुस, हाडांचा सापळा, हृदय, यकृत, प्लिहा, लहान आतडं मोठं आतडं, जननेंद्रिय, रक्त, इतर एन्झाइम्स आणि सर्वात महत्वाचा मेंदू… काय चमत्कार आहे शरीर म्हणजे. मी एका ठिकाणी वाचलं होतं की माणसाच्या शरीरात चालणाऱ्या ज्या सगळ्या व्यवस्था आहेत, यांची शरीरात चालणाऱ्या अचूकतेने प्रतिकृती करायची म्हटली तर कमीत कमी पाच एकर इतका मोठा आणि अतिशय क्लिष्ट यंत्रांनी बनलेला कारखाना निर्माण करावा लागेल. आणि हेच काम निसर्गाने म्हणा, ईश्वराने म्हणा सहा फूट लांब दीड फूट रुंद अशा मानवी देहात करून दाखवलं आहे. एका तज्ज्ञाने सांगितलेलं मी ऐकलं आहे की शरीरातील अवयव हे साधारणपणे 150 ते 200 वर्ष पर्यंतसुद्धा सक्षमपणे काम करू शकतात आणि म्हणूनच एका शरीरातून दान केलेले अवयव दुसऱ्या शरीरात पुन्हा व्यवस्थित आयुष्यभर काम करतात. माणसाच्या देहाची ही शक्ती आहे,  हा चमत्कारच नाही का? चमत्कार म्हणजे वेगळा अजून काय असू शकतो? 

मनात आलं, फुकट मिळाला म्हणून कसा देह वापरतो आपण. देहाचा प्रत्येक अवयव संपूर्ण आयुष्यभर माणसाने केलेल्या अत्याचाराचा भडीमार सहन करत करत शक्य होईल तितकी साथ देण्याचा प्रयत्न करतो आणि माणूस देहाला पायपोस असल्यासारखं का वागवतो? काहीही खातो, कधीही खातो, काहीही पितो कधीही पितो, कधीही झोपतो, कधीही उठतो. व्यसनं करतो आणि काय काय. का असं? ज्या परमेश्वराने हा चमत्कार प्रयेक मनुष्याला बहाल केला आहे त्याची किंमत आहे का आपल्याला? आपण ३००० रुपयाचा साधा चस्मा, त्याची किती काळजी घेतो त्याला नीट केसमध्ये ठेवतो पण तशी डोळ्यांची काळजी घेतो का? कॉन्टॅक्ट लेन्सेस अगदी काळजीपूर्वक दररोज रात्री सोलुशनमध्ये बुडवून ठेवतो पण डोळ्यांसाठी दिवसातून एकदातरी नेत्रस्नान करतो का? जसं डोळ्याचं तसंच इतर अवयवांचं. आपल्या संस्कृतीत अष्टांगयोग आणि आयुर्वेद हे दोन अमृतकुंभ या देह नावाच्या चमत्काराचा सांभाळ करण्यासाठीच दिले आहेत. शरीरात बिघाड होऊच नये म्हणून अष्टांगयोग आणि काही कारणांनी झालाच तर पुन्हा पूर्ववत शरीर करण्यासाठी आयुर्वेद. या दोघांचा किती सुंदर मेळ आपल्या संस्कृतीत घालून दिलेला आहे. किती भाग्यवान आहोत आपण की आयुष्यातील प्रत्येक गोष्ट अनुभवण्यासाठी शरीर नावाची सुंदर भेट आपल्याला ईश्वराने दिलेली आहे. त्याचा निदान योग्य तो सांभाळ करण्याची जबाबदारी आपली नाही का? 

मी लहानपणी एक प्रार्थना शिकलो की जी मी दररोज रात्री निजण्याअगोदर म्हणतो. ती प्रार्थना अशी; 

डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कानी, पदी चालतो ।

जिव्हेने रस चाखतो, मधुरसे वाचे आम्ही बोलतो।

हाताने बहुसाळ काम करितो, विश्रांतीही घ्यावया ।

घेतो झोप सुखे, फिरोन उठतो, ही ईश्वराची दया ।।

मी ही प्रार्थना हात जोडून म्हणतो. पण मला वाटतं या प्रार्थनेचं अधिक महत्व पटण्यासाठी आणि मनावर याचा गांभीर्याने परिणाम होण्यासाठी मी ही प्रार्थना खिशात हात घालून म्हटली पाहिजे. कारण तरच दररोज आठवण राहील की या देहाची एकूण कॅपिटल व्हॅल्यू किती! किती अमूल्य आहे हा देह. आणि खिशात हात घालून प्रार्थना केल्यामुळे याचीही आठवण राहील की माझ्या शरीराची मीच जर काळजी नाही घेतली तर त्याच खिशातून एकेक केस परत मिळवण्यासाठी सहा डॉलर बाहेर काढायला लागतील कधीतरी… 

© श्री राजेंद्र वैशंपायन 

मो. +91 93232 27277

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “असं का होत ? …” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ “असं का होत ? …” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

असं का होतं?

(Subconscious Mind)

– असं का होतं की ज्या गोष्टीची भीती वाटत असते, नेमकी तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणून हजर होते.”

– एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्याच विषयात का बरं नापास होतो?

– पैसे नाहीत, पैसे नाहीत, असे घोकणारा दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल का बरं होतो?

– आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसला तरी आर्थिक  फटका बसतोच बसतो,

– कष्ट नकोत, कष्ट नकोत, असं घोकणार्‍याच्या नशिबातच श्रम आणि राबणं असतं. असं का बरं असतं?

– का बरं एखादीला नको असलेलं गावचं ‘सासर’ म्हणून पदरात पडतं?

– का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतात? 

— तर ह्या सगळ्यांसाठी एकच कारण आहे, आणि ते कारण आहे. —- 

आकर्षणाचा सिद्धांत.— लॉ ऑफ अट्रॅक्शन

तुम्हाला माहिती आहे का ?… जगातील फक्त चार टक्के लोकांकडे एकूण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा केवळ योगायोग नाही मित्रांनो, हा आकर्षणाचा सिध्दांत नियम आहे. काय सांगतो हा नियम?—- 

तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट, घटना ही कळत नकळत तुमच्या विचारांनीच  आकर्षित केलेली  असते. जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तिक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं…सगळं….. जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खूप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालून जाईल ना?

…. अगदी तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थिती वास्तव बनून तुमच्या जीवनात समोर येते.

उदा. — माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस केवळ आणि केवळ कर्जावर जातो आणि त्यामुळे  तुमचं कर्ज वाढतं. 

— माझं वजन वाढतंय, वजन वाढतंय म्हटलं की वजन अजूनच वाढतं.

— माझे केस गळतायत म्हटलं की अजूनच जास्त केस गळतात.

— माझं लग्न जमत नाही म्हटलं की लग्न जमायला अजूनच उशीर होतो.

— कर्ज माझा जीव घेणार म्हटलं की अजून आर्थिक अडचणी निर्माण होतात….. वगैरे वगैरे…

ज्या गोष्टीवर मन अधिक लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट आपल्या Subconscious Mind म्हणजेच सुप्त मनाद्वारे अंमलात आणली जाते.

— म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळालंय अशी त्याच्या रंग, चव, आकार, गंध याच्यासह कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर दृढ विश्वास ठेवला, की हवं ते आपल्याला मिळतंच मिळतं.—- फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवून देता यायला हवं– म्हणजेच त्याप्रकारच्या संवेदना तयार करुन त्यात रंग भरून कल्पना करावी.  यालाच Creative Visualization अशी संज्ञा आहे.

— अगदी मरणाच्या दारात पोहोचलेली, डॉक्टरांनी आशा सोडून दिलेली, पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन, सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर दृढ विश्वास ठेवून पुन्हा ठणठणीत बरी झाली आहेत.

विश्वातील सर्वच थोर माणसांनी हा आकर्षणाचा सिद्धांत जाणला होता. आणि त्याची अंमलबजावणी केली, म्हणून तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.

तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान हवं असल्यास, दररोज ठराविक वेळी, ठराविक स्थळी शांतचित्ताने प्राणायाम करुन चेहर्‍यावर समाधानाचे भाव ठेवून मनात ही वाक्ये पूर्ण संवेदना आणि भावनेसह म्हणा:…. 

१ )  स्वस्थ आणि आरोग्यपूर्ण जीवन मी जगत आहे.

–  ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

२ )  मी सुंदर आहे, तेजस्वी आहे, मी चिरतरूण आहे.

 – ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

३ ) मी धैर्यवान, बलवान, सुज्ञ आणि विवेकी आहे.

– ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

४ ) मी समृद्ध, समाधानी आणि आनंदी जीवन जगत आहे.

 – ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

५ ) माझ्या मनात प्रेम आणि परोपकार उत्पन्न होत आहे.

– ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

६ )  मला सर्वत्र अनुकूल परिस्थिती प्राप्त होत आहे.

– ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

७ ) तुझी माझ्यावर अखंड कृपा आहे. तुझ्या प्रेमाचा माझ्यावर अखंड वर्षांव होतो आहे.

– ईश्वरा मी तुझा खूप खूप आभारी आहे.

याला पॉझीटीव्ह अफर्मेशन्स म्हणजेच सकारात्मक स्वयंसूचना– Auto  Suggestions असे म्हणतात. यामुळे तुमच्या मानसिकतेत बदल होऊन दिवसभर एक आगळीवेगळी ऊर्जा तुमच्यामध्ये संचार करेल.

तुम्ही हे जर मनापासून, आणि तशाच संवेदना निर्माण करुन वारंवार  बोललात, आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत म्हणजेच Subconscious Mind पर्यंत पोहोचलं, तर मित्रांनो तुमच्या नकळत ते तुमच्या सार्‍या आज्ञा पाळेल आणि खर्‍याही करुन दाखवेल.

यात अट एकच असेल ती म्हणजे तुम्ही घेत असलेल्या स्वयंसूचना या तुमच्या किंवा जगाच्या कल्याणासाठी असाव्यात. इतरांना नुकसान पोहोचविणारी स्वयंसूचना बुमरॅंगसारखी तुमचेच अपरिमित नुकसान करणारी ठरते.

— म्हणूनच आपल्या मनात उत्पन्न होणा-या प्रत्येक विचाराविषयी सजग रहा. कधीकधी वरवर सकारात्मक वाटणारा विचार नकारात्मक अर्थ निघणारा असतो. त्यामुळे विचारांची काळजी घेणं फार महत्त्वाचे असते.

— उदाहरणार्थ “मी कधीच आजारी पडणार नाही.” हे वाक्य वरकरणी सकारात्मक वाटत असले तरी त्या वाक्यात आजार हा नकारात्मक शब्द आहे. त्याच्या वारंवार उच्चाराने तशीच भावना मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी “मी आरोग्यपूर्ण जीवन जगत आहे” हे वाक्य अधिक सकारात्मक आहे.

इतक्या सूक्ष्म स्तरावर आपण आपल्या मनात निर्माण होणा-या विचारांची छाननी करणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे आपण आपल्या विचारांची छाननी केली की आपल्या मनात निर्माण होणारा प्रत्येक नकारात्मक शब्द आणि विचार हळूहळू कमी होतील आणि नव्यानेच आयुष्याचा अर्थ उमजेल, अनुभव येईल.

आपणही आपल्या आयुष्यात ही शुभ सुरुवात करावी आणि आपलं आयुष्य समृद्ध करावं ही शुभेच्छा !

— आणि हीच एका दृष्टीने “लॉ ऑफ अट्रॅक्शन” ची खरीखुरी सुरुवात असेल !

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवाशी संवाद … ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ देवाशी संवाद  ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆ 

माणूस :  देवा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारु का ?

देव :  विचार ना .

माणूस :  देवा , माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास . असं का केलंस तू देवा ?

देव :  अरे काय झालं पण ?

माणूस :  सकाळी अलार्म वाजलाच नाही . मला उठायला खूप उशीर झाला .

देव :  बरं मग ?

माणूस :  मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती . कशीबशी रिक्षा  मिळाली .

देव :  मग ?

माणूस  :  आज कँटीन पण बंद . बाहेर सँडविच खाल्लं . ते पण  बेकार होतं .

देव :  (नुसताच हसला )

माणूस :  मला एक महत्त्वाचा फोन आला होता . त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला .

देव :  बरं मग

माणूस  :  संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती . मी इतका थकलो होतो की ए . सी . लावून       झोपणार होतो . का तू असं केलंस देवा माझ्या बरोबर ?

 देव :  आता नीट ऐक —- आज तुझा मृत्यूयोग होता . मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला . त्या गडबडीत अलार्म पण थांबला .तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरला अपघात होणार होता .कँटीनच्या जेवणातून तुला विषबाधा होणार होती . ते  सँडविच वर निभावलं .तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता .संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्टसर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली .

माणूस :  देवा मला क्षमा कर .

देव :  क्षमा मागू नकोस . फक्त विश्वास ठेव . माझ्या योजनांविषयी कधीच शंका घेऊ नकोस . आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं त्याचा अर्थ फार उशीरा लागतो आपल्याला 

— आपण खरंच देवावर श्रद्धा आहे असं म्हणतो . मग श्रवणाच्या वेळी डुलक्या का येतात ? – तीन तासाच्या पिक्चरमध्ये जराही झोप येत नाही . …

— आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि  नको ते मेसेज फॉरवर्ड करतो …..

—  देवाशीच संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं

माणूस हा सवडीनुसार वागत असतो …! चहात माशी पडली तर चहा फेकून देतो , पण साजूक तूपात माशी पडली तर तो माशी फेकून देतो ..  तूप नाही .. अगदी तसच …आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो, पण जर नावडत्याने केली तर आकांडतांडव करून बोभाटा करतो.  

—  ‘ माझं ‘ म्हणून नाही ” आपलं ” म्हणून जगता आलं पाहिजे …

—  जग खूप ‘ चांगलं ‘ आहे, फक्त चांगलं ” वागता ” आलं पाहिजे …

– सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।

— समुद्र आणि वाळवंट कितीही आथांग असले, तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही 

… देह सर्वांचा सारखाच।

           …… फरक फक्त विचारांचा।

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ विज्ञान बिंदू… प्रा. मोहन  पुजारी  ☆ परिचय – सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

 

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ विज्ञान बिंदू… प्रा. मोहन  पुजारी  ☆ परिचय – सौ. दीपा नारायण पुजारी ☆

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नांव – विज्ञानबिंदू

लेखक – प्रा. मोहन पुजारी, इचलकरंजी

श्री. मोहन पुजारी यांचा हा पहिलाच लेख संग्रह. वैज्ञानिक व शैक्षणिक लेखांचा संग्रह असलेल्या या पुस्तकाचं नाव मोठं आकर्षक आहे. तसंच ते विषयाला साजेसं आहे. इचलकरंजी शहरात एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून सरांचा लौकिक आहे. विज्ञान – जीवशास्त्र या विषयाचं अध्यापन, विद्यार्थी व पालकांचा संपर्क आणि त्यांचं सामाजिक भान यातून त्यांच्यातला लेखक घडला आहे. त्यामुळे या पुस्तकात तीनही दृष्टीने लिहिलेले लेख वाचायला मिळतात. हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

पुस्तकातील पहिल्याच ” मुलांमधील संवेदनशीलता”या लेखात सध्या पालकांच्या समोर असलेल्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा केली आहे. संवेदनशीलता म्हणजे काय हे सांगून,ती बोथट का झाली आहे याचे विवेचन केले आहे. एवढेच नाही तर त्यावरील उपाय देखील सांगितले आहेत. त्यामुळे विषयाला न्याय मिळाला आहे.

बहुपयोगी बांबू या लेखात बांबू या वनस्पतीची शास्त्रीय माहिती त्यांनी दिली आहे. बांबू सारख्या वनस्पतीचे विविध उपयोग वाचून मन थक्क होते.सामान्य माणसांना या माहितीचा नक्कीच फायदा होईल. शिक्षणातून संस्कार या लेखात विज्ञान विषयाची सांगड संस्कांराशी कशी घालावी याची मोठी रंजक माहिती मिळते. उदा.  न्यूटनच्या सप्तरंगी तबकडीत त्यांना भारतीयांची एकात्मता आढळते.जीवशास्र आपल्याला निसर्गाचं मानवी आयुष्यातलं महत्त्व सांगतो. रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणं बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचं महत्त्व विषद करतात. अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी रसायनशास्त्रातील पदार्थांच्या गुणधर्माचा उपयोग करून पटवून देण्याचा प्रयत्न ते करतात. एक संवेदनशील विचारी शिक्षक या लेखकाच्या मनात दडलेला दिसतो.निसर्गाशी नाते जोडूया या लेखात वनस्पतींवर झालेल्या प्रयोगाचे उदाहरण दिले आहे. वनस्पतींना भावना असतात. निसर्ग व माणूस यातला जिव्हाळा त्यांच्या वाढीसाठी महत्त्वाचा ठरतो या एका वेगळ्या मुद्द्याचा उल्लेख या लेखात केलेला दिसतो. निसर्गातून घेण्याच्या गोष्टीही त्यांनी सांगितल्या आहेत. जसं की; सिंहाचा रुबाबदारपणा,हरणाचा चपळपणा, फुलपाखराचे सौंदर्य,मधमाशीकडून समाजसेवा, मुंगीची शिस्त इ. यांत्रिकीकरणामुळे मिळालेला वेळ आणि रिकामे हात निसर्ग संवर्धनासाठी वापरा हा संदेश या लेखात दिला आहे.

जलसंवर्धन – काळाची गरज – या लेखात त्यांचा या विषयाचा अभ्यास लक्षात येतो. या लेखात आणि एकूणच पुस्तकातील माहितीपर लेखात क्रमांक घालून मुद्दे,उपमुद्दे गुंतागुंत व क्लिष्टता टाळली गेली आहे.वाचकाला विषय समजणं सोपं झालं आहे. लिखाणाच्या याच वैशिष्टपूर्ण पद्धतीमुळं टेस्ट ट्यूब वनस्पती हा लेख वाचनीय झाला आहे.

नयनरम्य प्रवाळे हा लेख या पुस्तकाचा आकर्षण बिंदू आहे. प्रवाळ म्हणजे काय, प्रवाळांची वैशिष्ट्ये,त्यांचे प्रकार, उपयोग, अनुकूलन अशा सर्व गोष्टींचा उहापोह त्यांनी केला आहे.त्यांचे रक्षण करणे किती गरजेचे आहे हे वाचकांच्या सहज लक्षात येते. समुद्रातील अतिशय सुंदर पर्यावरणसंस्थेची माहिती वैज्ञानिक भाषेची क्लिष्टता टाळून लिहिण्यात ते यशस्वी झाले आहेत. प्रवाळांच्या फोटोमुळे लेख वाचताना कुतूहल निर्माण होते आणि लेख आकर्षक ठरतो.

घर,शाळा आणि आरोग्य, सार्वजनिक उत्सवांचे बदलते स्वरूप, व्यसनाधीनता,सुखावह वृद्धत्व अशा लेखांमधून लेखकाचे सामाजिक भान लक्षात येते. थकलेली शारीरिक अवस्था व कमकुवत ज्ञानेंद्रिये,परावलंबन आणि परिणामी आलेली मानसिक अस्वस्थता यांचा तोल साधत वृद्धत्व सुखावह कसे करावे हे छानशा भाषेत सांगितले आहे. लेखक स्वतः जबाबदार ज्येष्ठ नागरिक असल्यानं या विषयाची हाताळणी संवेदनशील मनानं झाली आहे.

व्यसनाधिनता- एक सामाजिक समस्या या लेखात व्यसनाधिनतेची कारणे, त्यावरील उपाय वाचायला मिळतात.या लेखाच्या शेवटी पालकांना सल्ला देताना ते एक जीवनमंत्र देतात.मुलांना मुठीत न ठेवता मिठीत ठेवा हाच तो मंत्र! मुलांना वाचनाचे आणि अभ्यासाचे व्यसन लागू दे अशा शुभेच्छा देखील ते देतात.

वनस्पतींचा आरोग्याशी असलेला संबंध, महाराष्ट्रातील सण -उत्सव आणि वनस्पती, वनौषधी आणि स्री सौंदर्य, तसेच उतू नका,मातू नका, फळांच्या साली टाकू नका अशा सारख्या लेखांमधून वनस्पतींचं महत्त्व साध्या,सोप्या भाषेत सांगितले आहे. संपूर्ण पुस्तकात असलेली साधी, सोपी सहज भाषा; पुस्तक वाचनाची ओढ निर्माण करते. ‘ ज्याप्रमाणे थर्मामीटर मधील पारा वर- खाली होतो, पण बाहेर पडू शकत नाही ‘ किंवा आपले घड्याळ आपल्या मानगुटीवर बसले आहे.’

वरवर बघता साधी वाटणारी अशी वाक्ये लेखकाचे मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि विचारशक्ती दाखवतात.

वैज्ञानिक लेखांच्या या लहानशा पुस्तकाला कुतुहल निर्माण करणारे आकर्षक मुखपृष्ठ लाभले आहे. विषयाची सोप्या पद्धतीने हाताळणी, मुद्देसूद मांडणी, वैज्ञानिक संज्ञा न वापरता सामान्य माणसाला समजेल अशी भाषा, प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास ही या पुस्तकाची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

फोन नं : 9665669148 ईमेल : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 02 – गये चाटने पत्तल जूठी… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – गये चाटने पत्तल जूठी।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 02 – गये चाटने पत्तल जूठी… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

बाजारों के आकर्षण में

     लोगों ने सर्वस्व लुटाया

 

बढ़ी विश्व के बाजारों में

चकाचोंध नकली सोने की

जितनी, धन पाने की लिप्सा

उतनी आशंका खोने की

जलाशयों के विज्ञापन ने

     मृग मरीचिका सा भटकाया

 

संस्कारों की सारी दौलत

नग्न सभ्यताओं ने लूटी

सात्विक व्यंजन को ठुकराकर

गये चाटने पत्तल जूठी

वैभव पाने की चाहत ने

     घर छानी-छप्पर बिकवाया

 

करती रही छलावा हमसे

अर्थव्यवस्था पूँजीवादी

प्रतिभाओं का हुआ पलायन

वाट जोहते दादा-दादी

रंग-रूप के सम्मोहन ने

     भ्रामक इन्द्रजाल फैलाया

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 77 – सजल – आँखों के तारे थे सबके… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है  एक भावप्रवण रचना “आँखों के तारे थे सबके…”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 77 – आँखों के तारे थे सबके…

आँखों के तारे थे सबके, क्यों हो गए पराए।

स्वारथ के चूल्हे बटते ही, बर्तन हैं टकराए ।।

 

दुखियारी माता रोती है, मौन पड़ी परछी में,

बँटवारे में वह भी बँट गइ, बाप गए धकियाए।।

 

बहुओं ने अब कमर कसी है,उँगली खड़ी दिखाई,

भेदभाव का लांछन देकर,जन-बच्चे गुर्राए।

 

परिपाटी जबसे यह आई, बढ़ती गईं दरारें,

दुहराएगी हर पीढ़ी ही, कौन उन्हें समझाए।

 

कंटकपथ पर चलना क्यों है, अपने पग घायल हों,

राह बुहारें करें सफाई, फिर हम क्यों भरमाए।

 

जीवन को कर दिया समर्पित, तुरपाई कर-कर के

बदले में हम क्या दे पाते, जाने पर पछताए।

 

चलो सहेजें परिवारों को, स्वर्णिम इसे बनाएँ,

ऐसी संस्कृति कहाँ मिलेगी,कोई तो बतलाए।

 ©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares