भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये सर्वांच्या आवडीचा, खमंग,चटकदार आणि प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात अगदी मानाने विराजमान झालेला पदार्थ म्हणजे ‘थालीपीठ’. इतकचं काय तर हाँटेल,टपरी,अगदी पंचतारांकित हाँटेल मध्ये सुध्दा हे थालीपीठ स्पेशल डिश म्हणून आपल्यासमोर येते.नुसत नाव जरी घेतल तरी तोंडाला पाणी सुटणारा हा पदार्थ.थालीपीठ कुणाला आवडत नाही असा माणूसच विरळा.अगदी राजेशाही थाटापासून ते झोपडीपर्यंत आणि आयत्या वेळी पटकन करुन खाण्याजोगा हा पदार्थ. संध्याकाळच्या वेळी संपुर्ण स्वैपाकाचा कंटाळा आला तर ” चला,चार थालीपीठ लावते ” असे म्हणून वेळ मारुन नेणारा ग्रुहिणींचा पक्का दोस्त.
पण तरीसुध्दा ही इतकीच महती नाही बरं का या थालीपिठाची कारण साग्रसंगीत, व्यवस्थित डावं,उजवं सोबत घेऊन पानात येणारा हा खमंग, चविष्ट पदार्थ आहे.त्यामुळेच तो सर्वांच्या आवडीचा आहे.
मंडळी,अहो पुराणातही या थालीपीठाचा उल्लेख आढळतो बरं का.यमुनेच्या तीरावर क्रुष्णाच्या सवंगड्यांनी सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करुन केलेल्या काल्यामध्ये या थालीपीठाचाही समावेश होता.क्रुष्णासह सारे सवंगडी याचा आस्वाद घेत होते तेव्हा क्रुष्णाच्या पानात आलेला पेंद्याच्या घरचा थालीपीठाचा तुकडा अगदी आवडीने,चवीने क्रुष्णाने खाल्ला होता म्हणे.
पु. ल. देशपांडे यांच्या ‘ असा मी असामी ‘ या पुस्तकात पु. ल.म्हणतात ” संसारातील रोजच्या कटकटींना कंटाळून कधी कधी संसार सोडून जावेसे वाटते पण त्याच दिवशी सौ. ने कांद्याचे थालीपीठ केलेले असते. “पहा मंडळी, एका मोडणाऱ्या संसाराला वाचवायचं काम हे थालीपीठ करतं अस म्हणता येईल. तर, ‘जाऊबाई जोरात’ या नाटकामध्ये महिलांच्या बसमध्ये दरोडेखोर येतात आणि सामानाची झडती घेताना त्याच्या हाती एक डबा लागतो तेव्हा त्यातील पदार्थाच्या वासाने तो मोहून जातो आणि यात काय आहे असे एका महिलेला विचारतो. तेव्हा त्यात थालीपीठ आहे असे सांगितल्यावर म्हणजे काय असे तो विचारतो त्यावेळी त्या थालीपीठाच्या रेसिपीचे वर्णन त्या नायिकेने (निर्मिती सावंत) इतके अफलातून केले आहे कि बस्.
म्हणजे पुराणापासून चालत आलेल हा पदार्थ आजही प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात अढळ स्थान मिळवून आहे.
आता हे थालीपीठ बनते कसे? तर ज्वारी,बाजरी,गहू,चणाडाळ, तांदूळ या धान्याच्या एकत्रीकरण केलेल्या पीठापासून.अगदी खास पध्दतीने करायचे असेल तर ही धान्ये भाजून घेऊन त्याचे पीठ करुन त्यात कांदा,मिरची,कोथिंबीर, हळद,हिंग,तीळ,जीरे,मीठ असे सर्व साहित्य घालून मळून पोळपाटावर पातळ फडक्यावर भाकरीसारखे थापून तव्यावर तेल सोडून खमंगपणे दोन्ही बाजू भाजून घेतल्या जातात.अशा पध्दतीने थालीपीठ बनवताना आपल्या आवडीनुसार यात काही भाज्यासुध्दा घातल्या जातात.
घरी, प्रवासात, डबापार्टी, भिशीपार्टी, डोहाळजेवण असा कुठेही चालणारा आणि चवीने खाल्ला जाणारा हा पदार्थ. पंजाबी,चायनीज,गुजराती,बंगाली, इटालियन अशा विविध पदार्थांची कितीही रेलचेल असली तरी लोणी,दही,लसणाची चटणी,लोणचं असं सार सोबत घेऊन ताटात येणारे हे थालीपीठ म्हणजे सर्वांची आवडती महाराष्ट्रीयन परिपुर्ण थाळीच. महाराष्ट्रात श्रावणात,नागपंचमीच्या आदल्या दिवशी असे थालीपीठ बनविण्याची पध्दत आहे.ग्रामीण भागात याला ‘ धपाटे ‘असेही म्हणतात.म्हणजे तसं तर धपाटे हा थालीपीठाचा जुळा भाऊ म्हटलं तरी वावग ठरणार नाही. म्हणजे सणावारीसुध्दा थालीपीठ बनविण्याची पध्दत आहे.अगदी नवरात्रीच्या नवू दिवसांच्या उपवासातही बदल म्हणून शाबूदाणा,वरी,बटाटा यापासून थालीपीठ बनविले जाते.
मंडळी,भारतीय खाद्यसंस्कृती अनेकविध पदार्थांनी परिपुर्ण तर आहेच पण या थालीपीठाचीसुध्दा चांगलीच महती आहे म्हणूनच अलिकडे गावागावातील प्रत्येक खाऊगल्लीमध्ये भेळ,आईस्क्रीम, पिझ्झा,बर्गरच्या जोडीला दही,खर्डा थालीपीठाच्याडिशने मानाचे स्थान मिळवले आहे.
☆ ‘शुद्ध भाषा व भाषाशुद्धी’ – श्री दिवाकर बुरसे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
मराठी मातृभाषादिनाच्या निमित्ताने…..
फेसबुक, व्हाॕटस् अॕपच्या विविध समूहावर मराठी, काही हिंदी, तर काही इंग्रजी भाषेतील टपाले पाठविली जातात. ती स्वलिखित असतात किंवा अग्रेषित असतात. वाचनात येणाऱ्या अशा लेखनात अनेक दोष आढळतात.
स्वलिखित वा अग्रेषित कोणचीही लेखने असोत, त्यातली बरीच अशुद्ध असतात असे सामान्य निरीक्षण आहे.
आतपुढ (आले तसे पुढे ढकलले) ही व्हाॕटस् अॕप संस्कृती असल्यामुळे असे सदोष लेख या समूहावरून त्या समूहावर आणि जगभर फिरत असतात.
आपण पाठविलेले लिखाण शुद्ध असावे असे ते टपालणाऱ्याला वाटत नाही का? येवढेच काय, आपण अशुद्ध लिहितो हेही काहींना कळत नसेल तर हे दुर्दैव म्हणायचे.
आपली भाषा अशुद्ध, अपरिपक्व आहे याची जाण व खंतही कोणाला वाटत असल्याचे दिसत नाही. माझ्याप्रमाणे ज्या कोणाला हे जाणवत असेल, त्यांना याविषयी बोलण्याचा संकोच वाटतो म्हणून कोणीच बोलत नसावे.
त्याने होतेय काय, दोष तसेच राहतायत. सदोष लेखन तसेच चालू रहाते, फिरत रहाते. ‘उगाच वाईटपणा नको’ म्हणून जे व जसे येते ते तसेच स्वीकारलेही जाते. पुढे पुढे ‘आहे तेच योग्य आहे’ असे समजण्यापर्यंत मजल जाते !
याला काय करायचे ! आपण अशुद्ध भाषा स्वीकारायची की आपली भाषा, मग हिंदी असो, इंग्रजी असो, वा मराठी, ती शुद्ध लिहायची ते आपणच ठरवा.
लेखकाने मांडलेला विचार चांगला असूनही त्याची अशुद्ध भाषा खटकते. सुवासिक केशरी भातात अचानक दाताखाली खडा लागून भोजनाचा रसभंग व्हावा तसेच काहीसे वाटते !
समूहातील सर्वच सभासद लेखकांनी या विषयाकडे जरा गंभीरपणे ध्यान द्यावे असे सुचवावेसे वाटते. साहित्य अग्रेषित असले तरी ‘काॕपी-कट-पेस्ट’ सुविधा वापरून ते अचूक, निर्दोष करून मग पुढे पाठवावे.
लेख लिहिताना, ‘घाईघाईत टंकित करताना एखादी चुकीची कळ दाबली जाते, एखादे अक्षर राहून जाते’ इ. कारणे सांगून वेळ मारून नेणे, ‘वाचकांनी समजून घ्यावे, सांभाळून घ्यावे’ असे म्हणणे, आपले आहे तेच पुढे दामटणे, हे अयोग्य आहे. मला सांगा, वाचकांनी नेहमीच का अशुद्ध वाचावे? का तुम्हाला सांभाळून घ्यावे? आपण लेख पाठवण्यापूर्वी तो काळजीकाट्याने तपासायला नको का? त्याला कितीसा वेळ लागतो? त्यासाठी थोडे कष्ट पडतील, पण ते घ्यावेत. भाषा निर्दोष करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.
‘कळतंय ना मला काय म्हणायचंय ते, मग झालं तर’, ‘उसमे क्या है’, ‘उससे क्या फरक पडता है’, ‘चलता है याsर’, ‘टेक इट ईझी’ ही वृत्ती घातक आहे. हा दुर्गुण आहे. या वृत्तीमुळेच जागतिक स्तरावरही इतर राष्ट्रांच्या तुलनेत आपण भारतीय अनेक क्षेत्रात खूप मागे राहिलो आहोत. गुणवत्तेचा, परिपूर्णतेचा, अचूकतेचा, निर्दोषतेचा, नेमकेपणाचा ध्यास असावा. ‘फर्स्ट शाॕट ओके’, ‘झीरो मिस्टेक’ हे आपले उद्दिष्ट असायला हवे, हा आपला ध्यास असावा. ते कठीण असले, सहजसाध्य नसले तरी अशक्य नाहीये, निश्चित प्रयत्नसाध्य आहे.
अर्थात त्यासाठी मुळात स्वतःला पुरेसे भाषाज्ञान असले पाहिजे. आणि केवळ भाषेविषयीच नव्हे तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात या मूल्यांचा आग्रह असायला हवा. ‘क्वालिटी लाईफ’साठी त्याची नितांत अवश्यकता आहे.
मराठी तर आपली मातृभाषा आणि हिंदी राष्ट्रभाषा (?). त्यांच्या उपयोजनेतही किती परकीय शब्द, किती ऊर्दू , किती इंग्रजी शब्द!
इंग्रजीचे म्हणाल तर ती परकी भाषा. पण व्यवहारासाठी आवश्यक. आम्हाला तीही धड येत नाही. तिथेही गोंधळ. सदोष वाक्यरचना, सदोष शब्दप्रयोग आणि शब्दांची चुकीची स्पेलिंगे. संगणकीय व्यवहारात अनेक शब्दांची रूपे बदलली गेली आहेत. तिथे ते क्षम्य आहे. पण ती रूपे लेखनात का आणायची? उदा. And ऐवजी नुसताच ‘n’ , please ऐवजी ‘plz’ वगैरे. आपल्याला एक तरी भाषा शुद्ध यावी असे का वाटू नये? भाषेकडे येवढे दुर्लक्ष का व्हावे? भाषांविषयी येवढी अनास्था का असावी?
आपली दैनंदिन विचारविनिमयाची भाषा लालित्यपूर्ण नसली तरी निदान शुद्ध असावी व नेमकी असावी, येवढी तरी अपेक्षा ठेवायला काय प्रत्यवाय आहे?
एका हिंदी लेखातील अवतरण…
… ‘हम प्रतिदिन अगणित उर्दू, अंग्रेजी शब्द प्रयोगमें लेते हैं। भाषा बचाइये, संस्कृति बचाइये। जांच करें कि आप कितने उर्दू या अंग्रेजीके शब्द बोलते है। हर हिंदीप्रेमी इस लेखको पढ़नेके बाद अपने मित्रोंके साथ साझा अवश्य करे। ‘
अवतरण समाप्त
आपण मराठीतही अनेक उर्दू व इंग्रजी शब्द उपयोगात आणतो. या इंग्रजी, उर्दू, फारसी शब्दांना आपल्या मराठी, हिंदीत काही पर्यायी शब्द नाहीत का? नसलेच तर आपण ते निर्माण करू शकत नाही का? आपल्या भारतीय भाषा विशेषतः आपली मराठी मातृभाषा इतकी दरिद्री आहे का, की त्यात पर्यायी शब्दनिर्मिती अशक्य वाटावी? तेव्हा मराठी भाषिकांनीही अवश्य विचार करावा, ह्या सूचनेचा.
अखेर आपली भाषा शुद्ध, सुसंस्कृत, प्रगल्भ असावी, असे ती बोलणाऱ्या वा लिहिणाऱ्या व्यक्तीला स्वतःलाच वाटायला हवे. त्याला मातृभाषेविषयी प्रेम, आस्था, अभिमान वाटायला हवा. अर्थात हे मी एकट्याने म्हणून काय उपयोग?
समूहावर येणाऱ्या लेखांच्या भाषेविषयीची ही माझी अतिसामान्य निरीक्षणे व विचार मी चिंतनासाठी वाचकांसमोर ठेवून आता इथेच थांबणे उचित समजतो.
व्याकरणाविषयी म्हणजे -हस्व-दीर्घ, ‘न’ आणि ‘ण’ मधील भेद किंवा घोळ, ‘स’, ‘श’, आणि ‘ष’ यातील भेद, काळ, लिंग, विभक्ति, वचने, शब्दप्रयोग, म्हणी आणि वाक्प्रचार, शब्दसंग्रह इ. विषयांवर आवश्यकतेनुसार स्वतंत्रपणे बोलू. तेही ते समजून घेण्याची, वाचण्याची, आपली भाषा शुद्ध असावी अशी कुणाची इच्छा असली, कुणाला त्याची आवश्यकता वाटली तर ! तो पर्यंत नमस्कार !!
लेखक:- दिवाकर बुरसे, पुणे
व्हाॕटस् अॕपः ९२८४३००१२५
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ म्हातारपण, श्रवणयंत्र व ऐकू न येणे… लेखक – श्री अतुल मुळे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
— हे प्रॉब्लेम आम्ही आमच्या आईचे कसे सोडवले? याचा स्वानुभव.
आमच्या आईसाठी केवळ घ्यायचे म्हणून तीन श्रवणयंत्रे ती जाईपर्यंत घेतली. साधारण ₹ ४५ हजार खर्च झाला. साधारण ₹ १५ हजार श्रवणयंत्राची किंमत असते. त्या श्रवणयंत्राचा, आई फक्त कुठे प्रोग्रामला गेली तर एक दागिना येवढाच उपयोग झाला. ते ॲडजस्ट करणे, सांभाळून वापरणे, म्हातारपणी त्रास असतो. प्रॅक्टिकली वापर फार कमी केला जातो व खराब होतात. पेशंटला फक्त समाधान असते की आपल्या प्रॉब्लेमवर मुलांनी खर्च केला. दुर्लक्ष केले नाही.
यावर प्रॅक्टिकल उपाय काय? हा प्रश्न अनेक नातेवाईकांना असतो.
यावर अनुभवातून सापडलेले उपाय सांगतो……
१)श्रवणयंत्रापेक्षा खूप चांगला नोकियाचा साधा एक फोन या लोकांना द्यावा. टीव्हीला एक लोकल एफ एम ट्रान्समीटर लावावा. आम्ही असे १५ वर्षे आमच्या घरात आईसाठी केले होते. त्या एफ एम ट्रान्समीटरची रेंज घरापुरतीच असते. त्याची फ्रिक्वेन्सी मोबाईलवरील एफ एम रेडिओवर छान कॅच होते. टीव्ही इतका सुंदर ऐकू येतो की बहिरे लोक फारच खूश होतात व ते लोक टीव्ही बघताना बाहेर मोठा आवाज नसल्याने घरात शांतता राहते. —–अशा प्रकारे टीव्हीचा प्रॉब्लेम सोडवावा.
२) इतर वेळेस अशा घरातील पेशंटबरोबर बोलताना अनलिमिटेड टॉकटाईम पॅक मोबाईलवर टाकावे व या लोकांशी मोबाईलवरूनच संपर्क साधावा.
मोबाईलला हेडफोन्स लावून या लोकांना टीव्ही ऐकणे व इतर संभाषण करणे या प्रकारे सोपे जाते. नोकियाचे साधे हजार रूपयाचे फोन दहा वर्षे खराब होत नाहीत. कायम गळ्यात फोन लटकवायची सवय होते.
मी माझ्या आईची शेवटची १५ वर्षे अशीच मॅनेज केली व त्याचे मला व घरातील सर्वांनाच समाधान आहे.
शेवटपर्यंत तिने टीव्ही ऐकला. फोनवर नातेवाईक लोकांशी संवाद साधला.
त्या काळात अनलिमिटेड टॉक टाईम पॅक सेवा फोनसाठी नसायची. म्हणून कधी कधी मोठ्याने बोलावे लागायचे. पण आता तो प्रश्न शिल्लक नाही. सर्वत्र वायफाय वगैरे असते. फोनवरही अनलिमिटेड डाटा टाकता येतो. व्हॉटस ॲप कॉलही छान होतात.
श्रवणयंत्रापेक्षा, वृद्ध व कमी ऐकू येणारे बहि-या लोकांसाठी ‘ स्वस्त मोबाईल फोन सेवा ‘ अशी पद्धत सरकारनेच स्वस्तात द्यायची गरज आहे. ते फार सोईस्कर आहे. ही कल्पना संबंधितांपर्यंत पोहोचवा.
॥ शुभम् भवतु ॥
संग्राहक : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈