मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रकाशक – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ प्रकाशक – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
जयंतरावांचा पाचवा स्मृतीदिन जवळ आला तसा साहित्यिक विश्वात त्यांच्याविषयी लिहून यायला लागलं. जयंतरावांचे फॅन्स सर्वत्र, मुंबई, पुण्यात जास्त. पुण्याच्या साहित्य जीवन या गृपने मला प्रमुख म्हणून आमंत्रित केलं. तसे दरवर्षी मला कुठे ना कुठे बोलावलं जातंच. पण यंदा पुण्याच्या गृपने एक महिना आधी माझा होकार मिळविला. मी जयंताचा प्रकाशक.. त्यापेक्षा जवळचा मित्र म्हणून मला जास्त मागणी.
गेले महीनाभर जयंताच्या आठवणी पिंगा घालत अवतीभवती फिरत होत्या. नेहमी प्रमाणे त्याच्या कवितासंग्रहाच्या आणि कथा पुस्तकांच्या आवृत्या माझ्या प्रकाशन संस्थेमार्फत काढल्या. या सुमारास त्याची पुस्तके खपतात हा अनुभव. प्रत्येक आवृत्तीची छपाई झाली की त्यातील एक पुस्तक माझ्याकडे येत होते.
प्रत्येक पुस्तक म्हणजे जयंताच्या आठवणींची एक लाट. लाट अंगावर येवून मला चिंब भिजवत होती.
पुण्याच्या कार्यक्रमासाठी मी आधल्या दिवशी पुण्यात पोहचलो. सकाळी नऊ वाजता कार्यक्रम सुरू झाला.
व्यासपीठावर जयंताचा मोठा फोटो लावला होता. टेबल, चार खुर्च्या आणि समोर जयंताच्या साहित्याचे चाहते. त्यामुळे हॉल त्याच्या चाहत्यांनी भरला होता. सुरूवातीस स्वागत झाले. माझ्या हस्ते जयंताच्या फोटोस हार घातला गेला आणि माझ्या भाषणाऐवजी जयंताच्या आठवणीसाठी माझी मुलाखत घेण्यासाठी दोन मुली समोर येवून बसल्या. आणि प्रश्नोत्तरे सुरू झाली….
प्रश्न- “सर, जयंतराव हे तुमचे मित्र आणि लेखक सुद्धा. तुम्ही त्यांचे चार कविता संग्रह आणि तीन कथा संग्रह प्रकाशित केलेत, मग तुमचे जास्त जवळचे नाते काय? मित्र की लेखक ? “
मी – मैत्री पहिली. आम्ही दोघे मुंबईच्या एलफिस्टन कॉलेजमध्ये शिकत होतो. लेखन, वाचन, नाटक, संगीत या आवडीने जवळ आलो.
प्रश्न – मग तुम्ही प्रकाशन व्यवसायात कसे आलात ?
मी – प्रकाशन हा माझ्या कुटुंबाचा व्यवसाय. त्या वेळी आमची मुंबईत दोन पुस्तकांची दुकाने होती, आता सहा आहेत.
प्रश्न – जयंतराव केव्हापासून लिहू लागले? कॉलेजमध्ये असताना की नंतर ?
मी – तो कॉलेजमध्ये असताना कविता करायचा. आम्हाला कॉलेजमध्ये शिकवायला प्रसिद्ध लेखक, कवी होते. त्यांचे पण संस्कार त्याच्यावर झाले. कॉलेजनंतर तो म्युनिसिपालटीमधे नोकरीला लागला. लेखन सुरूच होते.
प्रश्न- जयंतरावांना संगीताची पण समज होती असं म्हणतात.
मी- समज होती नाही.. तो उत्तम गायचा, आमची खरी मैत्री गाण्यामुळे झाली.
प्रश्न – सर, जयंतरावांची पत्नी ही तुमची वर्गमैत्रीण ना? त्यांना अनेक कलांची देणगी होती असे म्हणतात.
मी – ती उत्तम अभिनेत्री, लेखिका, गायिका होती
प्रश्न – सर, कॉलेज मध्ये असताना तुम्हा तिघांचा गृप होता असे म्हणतात हे खरे आहे काय?
मी – हे खरे आहे, मी, जयंता आणि अनघा नेहमी एकत्र असायचो. तिघांच्या आवडीनिवडी सारख्या, त्यामुळे आमचं मस्त जमायचं.
प्रश्न – त्या काळात तुम्ही नाटके पण फार बघायचात ?
मी – होय. आम्ही विजया मेहतांच्या रंगायन गृपमध्ये होतो. विजया मेहता अल्काझींच्या विद्यार्थीनी. त्यांनी मराठी नाटकात नाविन्य आणले. लहान हॉलमध्ये नाटके व्हायची, आम्ही लहान-लहान भूमिका करायचो, तसं नाटकाचं सारच करायचो, नेपथ्य लावायचो, लाईट जोडायचो, मेकअप करायचो, सतत बाईंच्या बरोबर असायचो.
प्रश्न – आणि तुमचा व्यवसाय?
मी – व्यवसाय सांभाळायचोच, कॉलेजमध्ये असतानाच मी पुस्तक प्रकाशन व्यवसायात आलो.
माझ्यापेक्षा तिप्पट, चौपट वयांच्या लेखकांची पुस्तके मी प्रकाशित करत होतो.
प्रश्न – तुम्ही जयंतरावांची पण पुस्तके प्रकाशित केलीत?
मी – त्याचे कवितासंग्रह, कथासंग्रह मीच प्रकाशित केले.
प्रश्न – आणि त्यांची नाटके? विशेषत: त्यांचे प्रसिद्ध नाटक अलेक्झांडर?
मी – त्याची नाटके दुसर्या प्रकाशकाने प्रसिध्द केली
प्रश्न – तुम्ही एवढे जवळचे मित्र असताना ती पुस्तके दुसर्यांकडे का गेली ?
मी- ते आता मला तुम्हाला सविस्तर सांगावे लागेल. कॉलेज काळात मी, जयंता आणि अनघा कायम बरोबर असायचो. जयंता मध्यमवर्गीय गिरगावातला मुलगा, दहा बाय दहाच्या जागेत आठ जण राहायचे, अनघा ही फायझरच्या ऑफिसरची मुलगी. त्या काळी वडीलांची गाडी वगैरे असलेली. मी ग्रॅन्टरोड भागातील उच्च मध्यम वर्गीय. आमचे कुटुंब पुस्तक व्यवसायात. अनघा मला आवडत होती. विजयाबाईंच्या रंगायनमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करायचो, नाटकाच्या तालमीला जाताना अनघा आपली गाडी घेऊन यायची, माझ्या घराजवळ येवून मला गाडीत घ्यायची, पुढे जयंताला ठाकूरव्दारच्या कोपर्यावर घ्यायची. तालमी संपवून येताना आम्ही तिघे गिरगाव चौपाटीवर बसायचो. जयंता त्याच्या कविता म्हणायचा, अनघा त्याला चाल लावायची आणि गाणं म्हणायची. अनघा जयंताला म्हणायची – “चांगल्या इंग्लीश नाटकांची भाषांतरे कर, तू कवि मनाचा आहेस, आपण बाईंना सांगू नाटक बसवायला. ” अनघाने ब्रिटीश लायब्ररीमधून सात -आठ इंग्लीश नाटके आणून दिली. जयंताने मनापासून त्यांची रूपांतरे केली. अलेक्झांडर त्यातील एक, बाईंनी अनघाला हे नाटक बसवायला सांगितले. नव्या जुन्या कलाकारांना घेवून अनघाने हे नाटक बसविले. त्याचा प्रयोग मी पाहीला. आणि जयंताला म्हटले- ” हे नाटक मी छापणार”. , त्यावर जयंता म्हणाला – ” तूच छाप, तूझ्याशिवाय दुसरं कुणाला देणार ?” त्या नाटकाचा बराच बोलबाला झाला, जयंताचे खूप कौतुक झाले. अनघाने नाटक बसवले म्हणून तीचे कौतुक झाले. पुस्तक मी प्रकाशित करणार या आनंदात होतो. सहा महीने झाले तरी जयंताने त्या पुस्तकांची हस्तलिखीते दिली नाहीत, अचानक मला समजले की ही पुस्तके पुण्याचा एक प्रकाशक छापत आहे. मी आश्चर्यचकित झालो. आणि जयंताच्या घरी गेलो.
“जयंता, तुझी नाटकाची पुस्तके पुण्याचा प्रकाशक छापतो आहे हे खरे काय”?
”होय, हे खरे आहे”
”पण मी तुला तुझी सर्व नाटके छापणार हे सांगितलं होतं. आणि मी हस्तलिखीते मागत होतो ”.
“अनघाने या प्रकाशकाला माझ्याकडे आणले. ”
“अनघाने? मग तिने मला कां नाही सांगितले”?
“अनघाचे म्हणणे तू जे माझे कवितासंग्रह छापलेस, त्याचे मानधन फारच कमी दिलेस, त्याच्या डबल पैसे मिळायला हवे होते. ”
“अरे, पैशांचा व्यवहार माझा मोठा भाऊ पाहतो, मी नाही आणि मला जर हे अनघा बोलली असती तर मी भावाकडे बोललो असतो”.
“अनघा म्हणते, तू जी पुस्तके छापलीस त्याची क्वॉलीटी चांगली नव्हती. इतर प्रकाशक पुस्तके छापतात त्या मानाने काहीच नाही. “
“हा आरोप मला मान्य नाही. मी तुझी पुस्तके मुंबईतील सर्वोत्तम प्रेसमधून छापून घेतलीत आणि अनघा म्हणते….. हे काय आहे.. तुझे काय मत आहे? तुझी पुस्तके खराब केली असे तुला म्हणायचे आहे काय”?
”होय’ !
त्याच क्षणी मी रागाने जयंताच्या घराबाहेर पडलो
– क्रमशः भाग पहिला
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈