मैफल सांगतेकडे आलेली. रात्र रात्र गायन वादनानी भारलेला मांडव…. स्वरांचंच साम्राज्यच पसरलेलं…. आताही रंगमंचावर ते चार तानपुरे… सारेच आत्यंतिक सुरेल… दोन काळे.. खूप साऱ्या नक्षीनं, मीनाकारीनं सजलेले… दोन अगदी नीतळ, साधे… पण चौघांची भाषा एकंच… गुंजारव ही तोच…. “सा”… “षडज्”…. फक्त तोच मांडवभर पसरलेला… कानाकोपऱ्यात… कनातीच्या रंगीत झुलत्या कापडात… मंदशा अगणित दिव्यांच्या प्रकाशात…. फक्त “सा”…. अजून गाणं सुरूच नाही झालेलं…. पण ते जुळलेले तानपुरे, तो षड्जाचा गुंजारवही अनुभूती देतो वेगळीच…. ते जव्हारदार, घुमारदार, मधुर, निषादात बोलणारे तानपुरे भारावून टाकतात…. उमटतं राहतात षड्जाची आवर्तनं…. लाटा… ती पहाट वेळा… कोवळी किरणं अजून क्षितीजाच्या किनाऱ्याकडे…. मंडपाजवळच्या मंदिरातून काकड आरतीची अस्पष्ट घंटा… तरंगत येणारा उदबत्तीचा मंद दरवळ…. आणि मांडवात फक्त “सा” भरुन राहिलेला… आधार स्वर… साऱ्या स्वरांचं मूळ.. उगमस्थान.. सा.. “साधार “…. तो “साकार”करतो राग चित्र… तो “सामर्थ्य” सप्तकाचं… तो सारांश.. स्वरार्थ… संगीतार्थ
“सा” महत्वाचाच…. इथूनच निर्माण होणार प्रत्येक स्वरांचा आत्मा.. या “सा” चं सर्व स्वरांशी घट्ट नातं, दृढ भावनिक मैत्री…. आणि साऱ्या स्वरांनाही याचीच ओढ.. साऱ्या श्रुती, स्वर… साऱ्यांचे इथेच समर्पण…. आणि त्या अथांग स्वरसागराला सामावून घेणारा “सा”…. शांत…. मंद्र, मध्य, तार सगळीकडे तसाच….
“सा” ला माहिती आहे प्रत्येक स्वर कुठे आहे… कसा आहे… किती आहे… कधी भेटणार आहे…. ते सारे स्वर एकमेकांच्या संगतीनं सजतात.. राग घडतो.. फुलतो… सजतो…
दरवळतो…. सारं सतत “सा “मधे विलीन होत राहतं… खरंतर हा अचल… योग्यासारखा… मास्टर दिनानाथ म्हणंत तसे साधुपुरूष… स्थिर आपल्या जागी… तो मूलभूत आधार संगीताचा… ठाम… निश्चल…
पण तो स्वरांचा, रागांचा भाव जाणतो. प्रत्येक रागाच्या स्वरांना हवं असेल तसा वागतो. ना तो कोमल.. ना तो तीव्र… पण तो कधी हळवा होतो कधी लख्ख ठाम…. राग रूपाच्या भावनेत, रागाच्या लयीत, स्वरवाक्यांच्या वजनात अगदी एकरूप होत राहतो. आपलं अटल स्थान राखंत स्वरांचा सन्मान करतो. रागरुप जपत मंद्र, मध्य, तार सर्व सप्तकात राहतो.
“सा” सात स्वरांचा जनक… पु ल म्हणतात शारदेचं वस्त्र धवल आहे ते रंगहीन म्हणून नाही तर सात रंगांचा मिलाफ होऊन होणारा शुभ्र आहे तो. एका थेंबातून सात रंगांचे किरण फुटतात आणि परत धवल रंगात विलीन होतात… तसंच आहे ना सप्तकाचं…. सा आधार सप्तकाचा… स्वरनिर्माता.. पण त्याला अहं नाही. तो असणारच असतो पण सतत समोर येऊन दाखवत रहात नाही… स्वरांना सजू देतो… रमू देतो.. रंगू देतो कारण त्याला माहिती आहे ते सारे त्याच्यापाशीच परत येणार आहेत. तो त्यांच्या सहज सोबत असतो अदृश्यपणे…. कोमल, शुद्ध, तीव्र साऱ्यांच्या भावनांसोबत असतोच तो… कधी कधी तर राग रचनेत, चालीत कुणी स्वर वर्ज्यही असतात… पण म्हणून नातं तुटतं नाही. सुटत नाही “सा” चं… ते तेवढ्यापुरते दुरावतात आणि दुसऱ्या वेळी प्रधानही होतात. हे सारं “सा” मनात जाणतो. ते सोबत असोत नसोत हा सदैव संगतीला असतोच… ते नसले तरी इतर स्वरांची नाती जपतो…. “सा” शांतपणे सारं ऐकतो, पाहतो, जपतो, सांभाळतो… त्याला दृढ विश्वास आहे सारे भाव, रस, रंग, श्रुती कितीही सजले तरी त्यांना ओढ आहे त्या अचल “सा” ची…. जिथून प्रवास सुरू तिथेच समर्पण आहे… तो समजुतदार “सा” सर्वांना आपल्या मायेच्या दुलईत घेतो….
प्रत्येक स्वर वेगवेगळे भाव भेटवतो… राग सजवतो… “सा” आपल्या जागेवरून सारं न्याहाळतो…. कल्याणच्या गंधार तीव्र म निषादाची मैत्री.. बिहागच्या दोन मध्यमांचं अद्वैत आणि गंधाराचा सुवास… बागेश्रीच्या कोमल गंधार निषादावर धैवताची मध्यमाची सत्ता, त्याच कोमल निषादाशी रागेश्रीतलं शुद्ध ग चं जुळलेलं सूत… रात्रीकडे अलगद पाऊल टाकणारा मारव्याचा कोमल रिषभ पहाटे भैरवाच्या सूर्याला अर्ध्य देतो. करूण रहात नाही तर उदात्त होतो… ऊन्ह तापतात… माध्यान्हीला शुद्ध सारंगचा चढा पण काहिसा करूण तीव्र म शुद्ध मध्यमाच्या प्रभावात वावरतो…. तिलककामोदचे स्वर गंधाराची आर्जवं करतात… जणू काही ग जवळ भेटू असं ठरलंय सगळ्यांचं… अगदी “सां प”ही मींड देखील… किती रागांचे किती खेळ… काही स्वरांना खूप महत्व… तर काही फक्त रागात असतात. ते नसून चालंत नाही आणि आहेत म्हणून फार सन्मान ही नाही. पंचम किंवा मध्यम तर काही वेळा हात सोडून दूर जातात. साsssरं “सा” पाहतो. पण तो सर्व रागरूपात समयचक्रात, सदैव, सतत असतोच. तो आहे म्हणून तर स्वर निवांत रंगतात, खेळतात आणि या आनंदाच्या घरी परततात… समाधानानं
… तृप्तीनं…
“सा” चा आग्रहंच नाही की मी पाया… मूळ स्वर… आधार… सतत माझा सन्मान करा… पण तो अटळ… आहेच… असणारच आहे…. सजणाऱ्या सर्व रंगांबरोबर… रसांबरोबर…
श्रुतींबरोबर…. “सा” सगळं जाणतो.. अगदी सहज स्वतःचा पोतही बदलतो… कधी स्पष्ट कधी लख्ख कधी अंधुक होतो. पण प्रत्येक “कहन ” चा तो “पूर्णविराम” असतो. शांत, तृप्त… त्याला माहिती आहे स्वर कितीही सप्तकात हिंडले, कितीही लयीत खेळले तरी अखेर “सा ” च्या तेजाशीच एकरूप होणार.. मिसळून जाणार… समर्पित होणार… तेच तर त्यांचं मूळ, कूळ, गोत्र…. आणि तिथे ते छान एकरूप झाले तरंच हे पक्कं होईल की ते काही तरी चांगलं, अचूक, सुरेल, रंगवून, सजवून आलेत. स्वर, लय, शब्द सारी अंग… घराणं, राग, ताल कोणतंही असो…. लोकगीत, भावगीत, दादरा, ठुमरी, नाट्य, चित्रपट कोणती का गायकी असेना हा सर्वत्र……
अचल!! अटल!! ठाम!!
तो भारदस्त, अचूक, स्थिर, गोल, गोड, भावपूर्ण असा लागला तरंच रंग भरणार…. आनंदाचं घर रस भावानी लयदार सजणार. बेहेलावे, मुरकी, खटका, मींडची तोरणं डोलणार…. राग, स्वर, शब्दांच्या रंगभऱ्या रांगोळ्या सजणार…… अशा सुंदर गायकीचा पत्ता सांगू?…..
आनंदाचं घर🏡
कुटुंब प्रमुख “सा”🎼
कुटुंबातले सदस्य “१२”🎼
आणि महत्वाची सहज सापडणारी खूण म्हणजे.. सभोवती अगणित स्वर, भाव, रंग गंधांची फुललेली फुलबाग…
नवीकोरी सायकल घेऊन पार्वती रिक्षातून खाली उतरली तशी दुर खेळत असलेली सायली धावतच तिच्या जवळ आली. “माझी नवी सायकल, माझी नवी सायकल” सायकलवरुन हात फिरवता फिरवता सायली उद्गारली.
नवी सायकल पाहून तिचा छोटासा चेहरा आनंदाने एकदम फुलून आला होता. समोर जो दिसेल त्याला ती सायकल दाखवू लागली. पार्वती आपल्या लेकीकडे कौतुकाने पहात होती. लोकांची धुणीभांडी करुन साठवलेल्या रकमेतून तिनं लेकीचा हट्ट पुरवला होता. दोन वर्षांपूर्वी एका ट्रकवर क्लिनरचं काम करणारा तिचा नवरा अपघातात वारल्यानंतर मुलीसाठी तिनं काहीच केलं नव्हतं. सायलीनेही कधी हट्ट धरला नव्हता.
दुसऱ्या दिवसापासून पार्वती नाही नाही म्हणत असतांना सायली सायकल घेऊन शाळेत गेली. अर्थात सायकल घरी ठेवूनही तिचा काहीच उपयोग नव्हता. सात दिवस सगळं व्यवस्थित सुरु होतं. आठव्या दिवशी सायली रडत रडत घरी आली. पार्वतीने विचारल्यावर तिनं सायकल चोरीला गेल्याचं सागितलं. पार्वतीच्या काळजात धस्स झालं. पोटाला चिमटे देऊन साठवलेल्या पैशातून घेतलेल्या सायकलचं असं व्हावं या कल्पनेने तिला रडू कोसळलं. शेजारच्या मुलांना घेऊन तिनं शाळेत आणि इतरत्रही तिचा शोध घेतला पण सायकल काही मिळाली नाही.
कुणीतरी तिला सुचवलं म्हणून अखेरीस ती शेजारच्या बाईला सोबत घेऊन पोलिस स्टेशनमध्ये गेली. “साहेब सायकल चोरीला गेली त्याची कंम्प्लेंट द्यायची होती” ड्युटीवरच्या पोलिसासमोर उभं राहून भितभितच ती बोलली. त्याने एकदा खालपासून वरपर्यंत तिला पाहीलं आणि जोरात खेकसून तो म्हणाला “कशाची चोरी झालीये?”
त्याच्या खेकसण्याने सोबत असलेली सायली आईला बिलगली आणि मुळूमुळू रडू लागली.
“सायकल साहेब. सायकलची चोरी झाली”
“खरेदीची पावती आहे का?”
तिनं पावती दिली. त्याने एक रजिस्टर काढलं. “व्यवस्थित शोधली का सगळीकडे? खोटी कंप्लेंट चालणार नाही” त्याने दरडावून विचारलं.
“हो साहेब. सगळीकडे शोधली. पण नाही सापडली”
“ठिक आहे. सांगा आता. “
पार्वतीनं सायकलीचं आणि कधी, कुठून ती चोरीला गेली याचं सविस्तर वर्णन त्याला सागितलं. त्यानं लिहून घेतलं. तिचा पत्ता, मोबाईल नंबर घेतला. सही घेतली.
“जा आता घरी. सायकल मिळाली की कळवू तुम्हाला” तो म्हणाला आणि हातात तंबाखू घेऊन चोळू लागला.
त्याचा रुक्षपणा पाहून पार्वती स्तब्ध झाली. तीच्यासोबत आलेली बाई तिच्या कानात कुजबुजली. “ताई आपण साहेबांना भेटू. हा मेला काहीच करणार नाही. ”
पार्वतीलाही ते पटलं. धीर धरुन ती त्या पोलिसाला म्हणाली, “साहेब आम्हांला मोठ्या साहेबाला भेटायचंय. “
त्यानं एकदम डोळे मोठे केले. जोराने ओरडून तो म्हणाला, “ए चल. निघ इथून. साहेबाला भेटायचं म्हणे. साहेब भेटणार नाही. साहेब बिझी आहेत. लिहीली ना कंप्लेंट? जा आता घरी. ”
तेवढ्यात एक रुबाबदार तरुण पोलिस बाहेर आला. बहूतेक तोच साहेब असावा. “काय आरडाओरड चालवलीय पाटील. काय झालं?”
“साहेब ते…. ” पाटील तंबाखू लपवू लागला. तेवढ्यात साहेबाची नजर पार्वती आणि सायलीवर पडली. तो काय समजायचं ते समजला असावा. “या बाई तुम्ही आतमध्ये. ” तिघीही भितभित चेंबरमध्ये शिरल्या.
“हं, सांगा आता काय झालं ते!”
पार्वती परत एकदा सांगू लागली. तेवढ्यात साहेबाचा फोन वाजला. फोनवर बोलता बोलता साहेब पार्वती आणि सायलीकडे बघत होता. सायलीच्या डोळ्यातून अजूनही अश्रू येतच होते. फोनवर बोलणं झाल्यावर त्यानं पार्वतीकडे पाहून विचारलं. “तुम्ही काय करता?”
“साहेब मी लोकांची धुणीभांडी करते. त्यातुन मिळालेल्या पैशातूनच ती सायकल घेतली होती.. “
“आणि तू गं मुली? तू शाळेत जातेस का?” पार्वतीचं बोलणं पुर्ण होऊ न देताच साहेबाने सायलीला विचारलं.
सायलीने मान हलवली.
“कितवीत आहेस?”
“पाचवीत “हलक्या आवाजात तिनं सांगितलं. तेवढ्यात फोन वाजला आणि साहेब परत बोलण्यात गढून गेला. पार्वतीला आता उभं राहून अवघडल्यासारखं होऊ लागलं. बराच वेळाने साहेबाचं बोलणं संपलं. त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला. “ठिक आहे. या तुम्ही. मी बघतो काय करायचं ते. “
“पण साहेब…. ” ती काही बोलण्याच्या आतच दोन तीन माणसं चेंबरमध्ये घुसली आणि काही न बोलता तिला बाहेर यावं लागलं. इथं येण्याचा काहीच उपयोग झाला नाही हे तिच्या लक्षात आलं आणि दुःखाने तिचं मन भरुन आलं.
घरी येऊन ती सायलीला जवळ घेऊन खुप रडली. एकुलती एक पोर. खुप समजदार होती. आपण गरीब आहोत आणि आपल्याला वडिल नाहीत याची तिला पक्की जाण होती. तिनं कधी हट्ट केला नाही पण तिच्या मैत्रिणीने सायकल घेतली म्हणून तीही आईच्या मागे लागली होती. पार्वतीचं ती सर्वस्व होती त्यामुळे परिस्थिती नसतांनाही तिनं पोरीचं मन राखण्यासाठी सायकल घेतली होती.
दुसऱ्या दिवशी पोरीला शाळेत परत एकदा पायी जातांना बघून पार्वती च्या काळजाला असंख्य भोकं पडली. चार हजाराची सायकल तर गेलीच होती पण आनंदी झालेली पोरगी परत दुःखी झाली होती याचं पार्वतीला मनोमन वाईट वाटत होतं. पुन्हा पैसे साठवून सायकल विकत घ्यायला वर्ष दोन वर्ष सहज लागणार होती. आणि त्याच विचारांनी पार्वतीचे डोळे वारंवार भरुन येत होते.
पोलिस कंप्लेंट करुन एक आठवडा उलटला पण सायकलचा तपास काही लागला नाही. पार्वती जो भेटेल त्याला सायकलचं वर्णन सांगून शोध घेण्याची विनंती करत होती पण बाईक आणि कारच्या जमान्यात तिच्या सायकलचं कुणालाही सोयरसुतक नव्हतं. ती दोनतीन वेळा शाळेत जाऊन हेडमास्तरांनाही भेटून आली. शाळेच्या सायकल स्टँडवर आपली सायकल दिसतेय का याचाही तिने शोध घेतला. पण सायकल कुठेच सापडत नव्हती.
पोलिस तक्रार करुन पंधरा दिवसही उलटूनही जेव्हा काहीच झालं नाही तेव्हा पार्वती समजून चुकली की आता सायकल मिळणं शक्य नाही. आजुबाजुचे शेजारीही तिला तेच समजावत होते. पण मन मोठं वेडं असतं. कधीतरी कुणीतरी येईल आणि म्हणेल, “ताई तुमची सायकल सापडली” असं तिला वाटत रहायचं.
विसाव्या दिवशी तिच्या खोलीचं दार वाजलं. तिनं उघडलं. बाहेर एक पोलिस उभा होता. “पार्वताबाई तुम्हीच का?”
“हो. “
“या बाहेर. ”
तिचं ह्रदय जोरजोरात धडधडू लागलं. बाहेर पोलिसांची व्हँन उभी होती. व्हँन पाहून शेजारपाजारचे जमा झाले. पोलिस व्हॅनमध्ये शिरला आणि एक नवी कोरी सायकल घेऊन बाहेर आला.
“ही घ्या तुमची सायकल. “
“साहेब पण ही आमची सायकल नाही. “
“ते मला माहीत नाही. साहेबांनी पाठवलीये. तुम्ही साहेबांना भेटा. त्यांनी बोलावलंय तुम्हाला. “
व्हॅन निघून गेली. पार्वतीभोवती गर्दी जमा झाली. ही सायकल तिच्या चोरी गेलेल्या सायकलीपेक्षा सुंदर आणि आधुनिक दिसत होती. सात-आठ हजाराची असावी. बरेच जण तिच्याकडे असूयेने बघत होते. सायलीची तर नजर हटत नव्हती. ती सारखी सायकलवरुन हात फिरवत होती. “आई, ही सायकल आपल्याला दिली?”
“बेटा आपली सायकल नाहीये ती. उद्या जाऊन साहेबाला विचारु आपण. “
जमलेल्या बायका वेगवेगळे तर्क लढवत होत्या. एका बाईने तर हद्द केली. पार्वतीवर साहेबाची वाईट नजर असेल म्हणून तर त्याने एवढी महागडी सायकल पाठवली असेल म्हणे. ती सायकल साहेबाला परत करावी असं बऱ्याच जणींचं म्हणणं पडलं. ते ऐकून पार्वती अस्वस्थ झाली. सायकल आणि सायलीला घेऊन ती खोलीत शिरली. रात्रभर तिला साहेब तिची छेड काढतोय अशी स्वप्नं पडत होती.
दुसऱ्या दिवशी ती कामं आटोपून सायलीला घेऊन पोलिस स्टेशनला गेली. नशिबाने साहेब एकटाच चेंबरमध्ये फुरसतीत बसला होता. “या ताई, बसा” मनमोकळेपणाने हसत त्याने पार्वतीचं स्वागत केलं. त्याच्या ताई म्हणण्याने तिच्या मनातलं किल्मिश बरंच कमी झालं.
“साहेब तुम्ही जी सायकल पाठवलीत ती आमची नाहीये. ” तिनं विषयाला हात घातला.
“हो. बरोबर. मला कल्पना आहे. तुमच्या सायकलचा आम्ही बराच शोध घेतला, पण ती मिळाली नाही. आणि ती मिळणारही नव्हती. चोरणाऱ्याने तिचे पार्ट्स वेगवेगळे करुन एका तासात विकूनही टाकले असतील. “
“पण मग साहेब, ही नवी सायकल….. “
“कळलं मला तुम्हाला काय म्हणायचं ते! पोलिसांना काय गरज पडलीये चोरी झालेल्या सायकलच्या बदल्यात नवी सायकल द्यायची? असंच ना? ही सायकल मी माझ्यातर्फे दिलीय. आणि ती का दिली आहे ते पण सांगतो. ”
टेबलावरची बेल वाजवून त्याने शिपायाला बोलावलं, “या ताईंकरीता एक चहा आणि या मुलीकरता एक कॅडबरी घेऊन ये. तर ताई त्या दिवशी तुम्ही आलात. तुमच्या मुलीला पाहून मला माझ्या भाचीची आठवण आली. ती माझ्यामागे सायकल घेऊन देण्याकरीता हट्ट करायची, पण तिचं घर हायवे जवळ असल्याने रिस्क नको म्हणून मी तिला टाळत होतो. दुर्दैव बघा, ज्या रिक्षातून ती घरी येत होती त्या रिक्षालाच अपघात झाला आणि त्यातच तिचा मृत्यु झाला. सायकल वापरली असती तर कदाचित ती वाचली असती, कदाचित नाही. पण तिच्या मृत्युनंतर मी स्वतःला अपराधी मानू लागलो.
तुमची केस ऐकली आणि मला माझ्या भाचीची आठवण झाली. तुम्हांला मदत केली तर या अपराधातून माझी सुटका होईल असं वाटलं. भाचीची इच्छा पुर्ण करु नाही शकलो. कमीतकमी तुमच्या मुलीची सायकल मिळवून द्यावी या हेतूने मी हे सगळं केलं. खुप मोकळं वाटतंय आता. ”
एक श्वास सोडून त्याने सायलीला जवळ बोलावलं. तिला जवळ घेऊन म्हणाला, “बेटा, ती सायकल माझ्याकडून तुला गिफ्ट. आणि हो, कधी काही अडचण आली तर या मामाला सांगायचं बरं का!”
“साहेब तुमचे आभार…. “
“नाही ताई, आभार नका मानू. मीही गरीबीतूनच वर आलोय. गरीबाचं नुकसान काय असतं ते मी चांगलं समजू शकतो. माझ्या आईनं मोलमजूरी करुनच मला मोठं केलंय. तुम्हीही तुमच्या मुलीला खुप शिकवा. मोठं करा. “
राजाचे मन, कंजुषाचे धन, दुर्जनाचे मनोरथ, स्त्रीचे चरित्र आणि पुरुषाचे भाग्य हे दैवाला सुद्धा जाणता आले नाही ते सामान्य मनुष्याला कसे काय उमगणार?
खरं आहे! एक सामान्य बुद्धीची व्यक्ती म्हणून मी जेव्हां जेव्हां रामायण, महाभारत आणि इतर अनेक ऐकलेल्या दंतकथांबद्दल विचार करते तेव्हा माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. तेव्हाही राहत होते आणि आजही तेच तेच प्रश्न मला पुन्हा पुन्हा पडतात.
अशा अनेक स्त्रिया ज्या मनावर स्वार आहेत..
आंधळ्या पतीसाठी आयुष्यभर डोळस असूनही डोळ्यावर पट्टी बांधून जगणारी गांधारी… हिला पतिव्रता म्हणायचं की जर ही धृतराष्ट्राचे डोळे बनून जगली असती तर वेगळे महाभारत घडू शकले असते का? पांडव आणि कौरवातले केवळ राज्यपदासाठीचे वैर मिटवता आले असतते का? कुरुक्षेत्रावरचं ते भयाण युद्ध टळलं असतं का?असा विचार करायचा?
द्रौपदीने पाच पांडवांचं पत्नीपद कसं निभवलं असेल? नक्की कुणाशी ती मनोमन बांधली गेली होती? युधीष्ठीराबद्दल तिच्या मनात नक्कीच वैषम्य असणार आणि भीमाबद्दल आस्था. समान भावनेने पंचपतींचा तिने मनोमन स्विकार केला असेल का?
वृषालीने मनोमन कर्णावरच प्रेम केले. त्यावेळेच्या परिस्थितीनुसार कर्णाला दुसऱ्या स्त्रीशी विवाह करावा लागला तरीही वृषालीने पती म्हणून फक्त कर्णाचाच विचार मनात बाळगला.
अहिल्याचा कोणता दोष होता की, गौतमी ऋषीने केवळ त्यांच्या कुटीच्या वाटेवरून जाताना इंद्राला पाहिले आणि अहल्यावर व्यभिचाराचा आरोप ठेवून तिचे शापवाणीने पाषाणात रूपांतर केले आणि त्याच अहल्येचा कालांतराने रामाने उद्धार केला.
.. मीरा, राधा यांना आपण नक्की कोणत्या रूपात पाहतो? प्रेमिका की भक्तिणी की समर्पिता?
.. रामाबरोबर वनवासात गेलेल्या सीतेला एखाद्या सामान्य स्त्री सारखा कांचन मृगाचा लोभ का व्हावा?
.. रावणासारख्या असुराची पत्नी मंदोदरीसाठी आपल्या मनात नक्कीच एक हळवा कोपरा आहे.
.. वालीची पत्नी तारा ही सुद्धा एक राजकारणी चतुर स्त्री म्हणूनच आपल्या मनात का राहते?
। अहल्या द्रौपदी तारा कुंती मंदोदरी
पंचकन्या स्मरेत नित्यम | महापातक नाशनम्।।
…. हा श्लोक म्हणताना खरोखरच जाणवते की कोणत्याही कारणामुळे असेल, त्या त्या काळाच्या परिस्थितीमुळे असेल पण कुठला ना कुठला कलंक चारित्र्यावर घेऊन जगणाऱ्या या स्त्रियांना काळानेच दैवत्व कसे दिले?
हे सगळे प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत. आणि म्हणूनच स्त्रीच्या चारित्र्याविषयी नेमकं काही ठरवताना जिथे देवही दुर्बल ठरले तिथे आपल्यासारख्यांचं काय?
पुरुषस्य भाग्यम् हा सुद्धा असाच प्रश्न उभा करणारा विषय आहे.
— रघुकुलोत्पन्न, सच्छील, मर्यादा पुरुष, एकपत्नीव्रती पितृवचनी, बंधुप्रेमी, कर्तव्यपरायण रामाला चौदा वर्षे वनवास का घडावा?
— राजा हरिश्चंद्रासारख्या सत्यप्रिय, वचनबद्ध, राज्यकर्त्याचे समस्त राज्य जाऊन त्याची दैना का व्हावी?
— भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्यांसारख्या महारथींना दुर्योधनासारख्या अधर्मी व्यक्तीला कोणत्या लाचारीला बळी पडून साथ द्यावी लागली?
— आणि कौंतेय? सूर्यपुत्र, प्रचंड बलशाली, कवच कुंडल घेऊन जन्माला आलेल्या या कर्णाला सुतपुत्र म्हणून का जगावे लागले? परशुरामाचा शाप, इंद्राची चालाखी आणि अपात्र व्यक्तीशी मैत्रीच्या वचनात अडकलेल्या कर्णाचे भाग्य कसे भरकटत गेले हा केवळ जर— तरचाच प्रश्न उरतो.
— अर्जुनासारख्या धनुर्धराला बृहन्नडा बनून स्रीवेषात वावरावे लागले.
— भीमाला गदेऐवजी हातात झारा घ्यावा लागला.. बल्लवाचार्याची भूमिका करावी लागली.
— आणि वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी होतो हे सत्य केवळ कल्पनेच्या पलीकडचं नाही का?
अर्थात हे सर्व पुराणातलं आहे. पिढ्यानुपिढ्या ते आतापर्यंत आपल्याकडे जसंच्या तसं वाहत आलेलं आहे. पण या सर्व घटनांचा संदर्भ मानवाच्या सध्याच्या जीवनाशी आजही आहे. कुठे ना कुठे त्यांचे पडसाद आताच्या काळातही उमटलेले जाणवतात.
फूलन देवी पासून ते नरेंद्र मोदी इथपर्यंत ते उलगडता येतील.
जन्मतःच कुठलाही माणूस चांगला किंवा वाईट नसतोच. तो घडत जातो. एखाद्या व्यक्तीचे पूर्ण रूप जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा त्यामागे अनेक घटकांचा प्रभाव असतो. संस्कार, नितीअनितीच्या ठोस आणि नंतर विस्कटत गेलेल्या कल्पना, भोवतालची परिस्थिती, त्यातून निर्माण झालेली अगतिकता, अपरिहार्यता किंवा ढळलेला जीवनपथ अशी अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे कुणाच्या चारित्र्याबद्दल अथवा भाग्याबद्दल जजमेंटल होणं हे नक्की चुकीचं ठरू शकत.
रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा एखादा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो किंवा केवळ गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेली एखादी स्त्री नव्याने शुचिर्भूत होऊन पिडीतांसाठी देवासमान ठरू शकते.
कुणाचं भाग्य कसं घडतं याविषयी मला एक सहज वाचलेली कथा आठवली ती थोडक्यात सांगते.
— दोन भाऊ असतात. त्यांचे वडील दारुडे व्यसनी असतात. दोन्ही भावांवर झालेले कौटुंबिक संस्कार हे तसे हीनच असतात. कालांतराने वडील मरतात. दोघे भाऊ आपापले जीवन वेगवेगळ्या मार्गावर जगू लागतात. एक भाऊ अट्टल गुन्हेगार आणि बापासारखा व्यसनी बनतो. मात्र दुसरा भाऊ स्वतःच्या सुशील वागण्याने समाजात प्रतिष्ठा मिळवतो. हे कसे? त्यावर उत्तर देताना व्यसनी भाऊ म्हणतो, ” आयुष्यभर वडिलांना नशेतच पाहिलं त्याचाच हा परिणाम. ”
पण दुसरा भाऊ म्हणतो, ” वडिलांना आयुष्यभर नशेतच पाहिलं आणि तेव्हांच ठरवलं हे असं जीवन आपण जगायचं नाही. याच्या विरुद्ध मार्गावर जायचा प्रयत्न करायचा आणि ते जमलं ”
म्हणूनच भाग्य ठरवताना कुळ, गोत्र खानदान, संपत्ती, शिक्षण अगदी सुसंस्कार हे सारे घटक बेगडी आहेत. विचारधारा महत्त्वाची आणि त्यावरच चारित्र्य आणि भाग्य ठरलेले आहे. मात्र कुणी कसा विचार करावा हे ना कुणाच्या हातात ना कोणाच्या आवाक्यात. बुद्धिपलीकडच्याच या गोष्टी आहेत
या श्लोकाचा उहापोह करताना मी शेवटी इतकेच म्हणेन की,
* दैव जाणिले कुणी
लवांकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मिकी मुनी…।।
— तेव्हा जजमेंटल कधीच होऊ नका. काही निष्कर्ष काढण्याआधी वेट अँड वॉच.
अहो जे देवालाही समजले नाही ते तुम्हा आम्हाला कसे कळेल?
☆ ब्रह्मघोटाळा… कवी : आचार्य अत्रे ☆ माहिती संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆
“ब्रह्मघोटाळा” या सिनेमासाठी १९४९ साली आचार्य अत्रे यांनी एका हास्यस्फोटक अंगाईगीताची रचना केली होती. ते गाणं तुम्ही कधी वाचलं किंवा ऐकलं आहे कां? नसल्यास वाचा आणि ऐका.
☘️ निज रे निज बाळा… – गीतकार – आचार्य अत्रे ☘️
संगीत : दादा चांदेकर
गायक : वसंत एरिक
☘️
निज रे निज बाळा, मिट डोळा,
सांगु तुला किती वेळा
निज रे निज बाळा
झोके देऊनि रे, बघ आला
हाताला मम गोळा
वाजवु कां आता, हाडांचा
माझ्या घुंगुरवाळा
वाजुनि तोंड असे, कां रडसी
अक्राळा विक्राळा
तुझिया रडण्याने, बघ झाली
आळी सारी गोळा
रडसि कशास बरे, मिळे आता
स्वातंत्र्यहि देशाला
काही उणे नसता, होशिल तू
मंत्री बडा कळिकाळा
लाल संकटाचे, रशियाचे
वाटे का भय तुजला
देऊ पाठिंबा, आपण रे
नेहरू सरकाराला
काळ्या बाजारी, बागुल तो
काळा काळा बसला
थांबव हा चाळा, ना तर मी
घेऊन येईन त्याला
तुझिया रडण्याचे, हे गाणे
नेऊ का यूनोला
अमेरिकेमधुनी, येऊ कां
घेऊन ॲटम गोळा
😀
☆
कवी : आचार्य अत्रे
माहिती संग्राहक : श्री सुहास सोहोनी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “जगणे, अनुभवणे, आणि विचार करणे…” – लेखक : श्री यशवंत सुमंत ☆ श्री जगदीश काबरे ☆
जगण्याशिवाय अनुभवांना सामोरे जाता येत नाही. अनुभवाशिवाय विचार संभवत नाही. आणि विचारांशिवाय जगणे उमगत नाही. जगणे अनुभवणे आणि विचार हे असे अन्योन्याश्रयी आहेत. सोयीसाठी आपण कधी कधी त्यांची फारकत करतो. पण या फारकतीचा अतिरेक झाला की ‘विचारांपेक्षा अनुभव श्रेष्ठ’ किंवा अनुभव व्यक्तिसापेक्ष म्हणून मर्यादित तर विचार सार्वत्रिक म्हणून व्यापक यांसारख्या दर्पोक्ती ऐकू येऊ लागतात. अनुभव व विचार यांच्यातील सहकार्य धूसर होत जाऊन अनुभववादी विरुद्ध विचारवादी असे द्वंद्व सुरू होते. या द्वंद्वयुद्धाची नशा योद्ध्यांना धुंद बनवते.
सामान्य माणूस मात्र या द्वंद्वाला काही काळानंतर कंटाळतो. या कंटाळण्यातून त्याचे तीन प्रतिसाद संभवतात.
1) तो विचारांबाबत ‘सिनिक’ – तुच्छतावादी बनतो
2) तो आपले व्यक्तिगत अनुभवच निव्वळ कवटाळून ते सार्वत्रिक सत्य म्हणून सांगू लागतो व स्वतः बंदिस्त होतो
3) तो स्वतःचे अनुभव नाकारता नाकारता स्वतःलाही नाकारू लागतो. हे व्यक्तित्वाचे खच्चीकरण असते.
आपण बंदिस्त होण्याचे कारण नाही. तुच्छतावादीही असता कामा नये आणि स्वतः च्या अनुभवांचा अकारण धिक्कारही करता कामा नये. स्वतःलाच पुसून टाकण्याइतके किंवा नाकारण्याइतके आपले आणि कोणाचेही आयुष्य कवडीमोलाचे नसते. दुःख, अपमान, संकट, जीवन उद्ध्वस्त करणारे अनुभव प्रत्येकाच्या वाट्याला कमीअधिक प्रमाणात येतातच. त्यांना चिवटपणे सामोरे जायला हवे. हे सामोरे जाण्याचे बळ शेवटी विचारच आपल्याला देतात. कारण विचार हा आपण आपल्याशी केलेला तर्कशुद्ध आणि विश्वसनीय संवाद असतो. इतर विचारांची सोबत व मार्गदर्शन हा संवाद अधिक प्रगल्भ बनवते. म्हणूनच माणसाला विचारदर्शनाची गरज लागते.
एकदा आपण आपली ही गरज ओळखली की मग आपल्याला भेडसाविणारे अनेक स्वतः संबंधीचे व समाजासंबंधीचे प्रश्न समजू लागतात. त्यांच्या नजरेला नजर देण्याची ताकद आपल्याला लाभते. विचारांचा व विचारदर्शनांचा आदरपूर्वक स्वीकार वा त्यांना विधायक नकार देण्याची ऋजुता आपल्यापाशी येते. ही ऋजुता आपल्याला स्वतःच्या व इतरांच्याही जीवनाचा आदर करायला शिकवते. या आदरभावातून आपण विनम्र होतो. ही विनम्रता आपल्याला स्वागतशील बनवते.
स्त्रीवादी काय किंवा अन्य आधुनिक विचारदर्शनांची ओळख का करून घ्यायची, तर आपल्या जगण्याचे संदर्भ आपल्या लक्षात यावेत म्हणून. विचारांचे जगण्याशी असलेले नाते असते ते हेच. हे नाते जे नाकारतात ते एका परीने जीवनच नाकारित असतात. वाढत्या आत्मनिवेदनाच्या व आत्याविष्काराच्या या जमान्यात वास्तविक विचारांचे श्रद्धेने उत्तरोत्तर स्वागत व्हायला हवे. त्यांचा उत्सव साजरा व्हायला हवा. पण असे न होता विचारांबाबतची तुच्छता का वाढावी, विचारांच्या अंताची भाषा का बोलली जावी, माहितीच्या स्फोटाने कर्णबधिरता व संवेदनशून्यता का यावी हे प्रश्न विचारल्याशिवाय आधुनिक विचारदर्शनांशी संवाद होणार नाही.
लेखक : श्री यशवंत सुमंत
प्रस्तुती : श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “समज आणि उमज…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
एकदा एका पासष्टी ओलांडलेल्या आणि सत्तरीच्या वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले, “मित्रा, तुझ्यात काय बदललंय असे तुला वाटतंय?” त्यानंतर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतलं तर प्रत्येकांसाठी आपले आयुष्य सुसह्य होईल हे निश्चित! त्याने जे उत्तर दिले ते असे…
१.आजवर मी माझ्या आईवडिलांवर, भावंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकाऱ्यांवर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली. पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलोय, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केलीय.
२.मला याची जाणीव झालीय की, आता मी शारिरीक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही की कुणीही यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे.
३.आता मी भाजीवाल्याशी, फळविक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायचं सोडून दिलंय. उलट आता मला असं वाटतं की माझ्या काही पैश्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरीबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना!
४.आता मी माझ्या जीवन संघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचं आणि सल्ले देण्याचं बंद केलंय. कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आता कदाचित कालबाह्य झाल्या आहेत. माझ्या त्या संदर्भांचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझे मलाच माहीत नाही.
५.आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याच्या किंवा काय बरोबर आणि काय चुकीचे हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही हे मला कळून चुकलंय. आता मला इतरांच्या परफेक्शनपेक्षा माझी शांतता अधिक महत्वाची वाटते.
६.आता मी समोरच्याच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याला निखळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला शिकलोय. त्याने समोरच्याला बरे वाटते, तो सुखावून जातो.
७.आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगाळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप फरक पडत नाही. जे लोक मला अंतर्बाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्वाचा नाही हे मला कळून चुकलंय.
८.ज्यांना माझी किंमत नाही अशांना मी आता दुर्लक्षित करतो. कारण त्यांना माहित नसली तरी मला माझी किंमत चांगली माहिती आहे.
९.आता माझं वय कुरघोड्या करण्याचं राहिलेलं नाही.
१०.आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही. भावना असणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आता हसावंसं वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावंसं वाटलं की रडून घ्यायचं. भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमटत रहायचं नाही.
११.आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो. प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एकवेळ तडजोड करतो, पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून! कारण नाते टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असूच शकत नाही.
१२.आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न करतो. मला जे करावसं वाटत ते मी करतो. फक्त एवढंच की, माझ्या स्वछंदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो.
१३.मला माहित आहे की, जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चात्ताप करत बसत, ना भविष्यकाळात जाऊन चिंता करत बसत
आता निख्खळ आणि निख्खळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा
आता माझं उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.
खरंच, वर दिलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना?
आत्ता कळले जीवन सुंदर आहे. पण ते सरळमार्गाने जगणाऱ्या व्यक्तीचे आहे.
आपण आपल्या लोकांसाठी कितीही सम्पत्ती जमविली तरी एक वेळ अशी येते की तीच घरची लोक आपल्याला कंटाळून जातात, कटू आहे पण सत्य आहे कारण
आपली मुले आपल्या पोटी जन्माला आली आहे पण आपल्यासाठी जन्माला आलेली नाही ते, आपण त्यांना लावलेल्या मजबूत पंखानी स्वतःचे नवीन घरटे बांधायला व आकाशात उडायला आलेली आहेत हे लक्षात ठेवावे व अपेक्षा रहित जीवन जगावे म्हणजे त्रास कमी होईल
🌹खूप खूप शुभेच्छा (७०) सत्तरीच्या, वाटेवर असणाऱ्या मित्रांना, स्वतःची काळजी घ्या, व आपल्या अर्धांगिनीची ची काळजी करा l🌹 ☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर