श्री अरविंद लिमये

विविधा 
☆ तो आणि मी…! – भाग ५० ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- माझ्या आयुष्यांत त्या त्या क्षणी मला अतीव दुःख देऊन गेलेल्या, माझे बाबा आणि समीर यांच्या अतिशय क्लेशकारक मृत्यूंशीच निगडित असणाऱ्या या सगळ्याच पुढील काळांत घडलेल्या घटना माझं उर्वरित जगणं शांत, समाधानी आणि अर्थपूर्ण करणारे ठरलेल्या आहेत. ‘त्या’चा कृपालोभ यापेक्षा वेगळा तो काय असणार?
हे सगळं त्या त्या क्षणी पूर्ण समाधान देणारं वाटलं तरी तो पूर्णविराम नव्हता. पुढील आयुष्यांत असे अनेक कसोटी पहाणारे क्षण माझी वाट पहात आहेत याची मला कल्पना नव्हती एवढंच!)
तीस वर्षांपूर्वीची ही एक घटना त्यापैकीच एक. आजही ती नुकतीच घडून गेलीय असंच वाटतंय मला. कारण ती घटना अतिशय खोलवर ठसे उमटवणारीच होती!
ही घटना आहे माझ्या दोन नंबरच्या बहिणीच्या संदर्भातली. जशी तिची कसोटी पहाणारी तशीच सासर आणि माहेर अशा दोन्हीकडच्या तिच्या कुटुंबियांचीही!
दोन मोठ्या बहिणींच्या पाठचे आम्ही तिघे भाऊ. या दोघींपैकी दोन नंबरच्या बहिणीची ही गोष्ट. ती माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी. पण मला ती तशी कधी वाटायचीच नाही. ताईपणाचा, मोठेपणाचा आब आणि धाक तसाही माझ्या या दोन्ही बहिणींच्या स्वभावात नव्हताच. तरीही या बहिणीचा विशेष हा कीं आमच्याबरोबर खेळताना ती आमच्याच वयाची होऊन जात असे. त्यामुळे ती मला माझी ‘ताई’ कधी वाटायचीच नाही. माझ्या बरोबरीची मैत्रिणच वाटायची. तिने आम्हा तिघा भावांचे खूप लाड केले. माझ्यावर तर तिचा विशेष लोभ असे. म्हणूनच कदाचित माझ्या त्या अजाण, अल्लड वयात मी केलेल्या सगळ्या खोड्याही ती न चिडता, संतापता सहन करायची. जेव्हा अती व्हायचं, तेव्हा आईच मधे पडायची. मला रागवायची. पण तेव्हा आईने माझ्यावर हात उगारला की ही ताईच मला पाठीशी घालत आईच्या तावडीतून माझी सुटका करायची. “राहू दे.. मारु नकोस गं त्याला.. ” म्हणत मला आईपासून दूर खेचायची न् ‘जाs.. पळ.. ‘ म्हणत बाहेर पिटाळायची.
मोठ्या बहिणीच्या पाठोपाठ हिचंही लग्न झालं, तेव्हा मी नुकतंच काॅलेज जॉईन केलं होतं. ती सासरी गेली तेव्हा आपलं हक्काचं, जीवाभावाचं, हवंहवंसं कांहीतरी आपण हरवून बसलोय असंच मला वाटायचं आणि मन उदास व्हायचं!
तुटपुंज्या उत्पन्नातलं काटकसर आणि ओढाताण यात मुरलेलं आमचं बालपण. ओढाताण आणि काटकसर ताईच्या सासरीही थोड्या प्रमाणात कां होईना होतीच. पण तिला ते नवीन नव्हतं. मुख्य म्हणजे तिने ते मनापासून स्वीकारलेलं होतं. ती मुळातच अतिशय शांत स्वभावाची आणि सोशिक होती. केशवराव, माझे मेव्हणे, हे सुद्धा मनानं उमदे आणि समजूतदार होते. अजित आणि सुजितसारखी दोन गोड मुलं. कधीही पहावं, ते घर आनंदानं भरलेलंच असायचं. असं असूनही तिच्या बाबतीत मी खूप पझेसिव्ह असल्यामुळेच असेल तिच्यातली मैत्रीण तिच्या लग्नानंतर मला त्या रूपात पुन्हा आता कधीच भेटणार नाही असं आपलं उगीचच वाटत राहिलेलं. ती अनेक वाटेकर्यांत वाटली गेली आहे असंच मला वाटायचं. केशवराव, अजित, सुजित हे तिघेही खरंतर प्राधान्य क्रमानुसार हक्काचेच वाटेकरी. त्याबद्दल तक्रार कसली? पण माझ्या मनाला मात्र ते पटत नसे. तिचा सर्वात जास्त वाटा त्यांनाच मिळतोय अशा चमत्कारिक भावनेने मन उदास असायचं आणि मग व्यक्त न करता येणारी अस्वस्थता मनात भरून रहायची.
ताईचं मॅट्रिकनंतर लगेच लग्न झालं न् तिचं शिक्षण तिथंच थांबलं. लग्नानंतर तिनेही त्या दिशेने पुढे कांही केल्याचं माझ्या ऐकिवात तरी नव्हतंच. केशवराव आर. एम. एस. मधे साॅर्टर होते. आठवड्यातले किमान चार दिवस तरी ते बेळगाव-पुणे रेल्वेच्या पोस्टाच्या टपाल डब्यांतल्या साॅर्टींगसाठी फिरतीवर असायचे. बिऱ्हाड अर्थातच बेळगावला.
मी मोठा झालो. स्वतःच्या पायावर उभा राहिलो. माझं लग्न होऊन माझा संसार सुरू झाला. ती जबाबदारी पेलताना मनात मात्र सतत विचार असायचा तो ताईचाच. केशवरावांच्या एकट्याच्या पगारांत चार माणसांचा संसार वाढत्या महागाईत ताई कसा निभावत असेल या विचाराने घरातला गोड घासही माझ्या घशात उतरत नसे. आम्ही इतर भावंडं परिस्थितीशी झुंजत यश आणि ऐश्वर्याच्या एक एक पायऱ्या वर चढून जात असताना ताई मात्र अजून पहिल्याच पायरीवर ताटकळत उभी आहे अशी एक विचित्र भावना मनात येऊन मला वाईट वाटायचं.
मनातली ती नाराजी मग घरी कधी विषय निघाला की नकळत का होईना बाहेर पडायचीच. पण ती कुणीच समजून घ्यायचं नाही.
“हे बघ, प्रत्येकजण आपापला संसार आपापल्या पद्धतीनेच करणार ना? त्याबद्दल ती कधी बोलते कां कांही? कुणाकडे काही मागते कां? नाही ना? छान आनंदात आहे ती. तू उगीच खंतावतोयस ” आई म्हणायची.
“ताई सतत हे नाही ते नाही असं रडगाणं गात बसणाऱ्या नाहीत” असं म्हणत आरतीही तिचं कौतुकच करायची. “त्या समाधानानंच नाही तर स्वाभिमानानंही जगतायत ” असं ती म्हणायची.
मला मनोमन ते पटायचं पण त्याचाच मला त्रासही व्हायचा. कारण ताईचा ‘स्वाभिमान’ मला कधी कधी अगदी टोकाचा वाटायचा. ती स्वतःहून कुणाकडेच कधीच कांही मागायची नाही. व्यवस्थित नियोजन करून जमेल तशी एक एक वस्तू घेऊन ती तिचा संसार मनासारखा सजवत राहिली. हौसमौजही केली पण जाणीवपूर्वक स्वत:ची चौकट आखून घेऊन त्या मर्यादेतच! इतर सगळ्यांना हे कौतुकास्पद वाटायचं, पण मला मात्र व्यक्त करता न येणारं असं कांहीतरी खटकत रहायचंच. कारण स्वतःहून कधीच कुणाकडे कांही मागितलं नाही तरीही कुणी कारणपरत्वे प्रेमानं कांही दिलं तर ते नाकारायची नाही तसंच स्वीकारायचीही नाही. दिलेलं सगळं हसतमुखाने घ्यायची, कौतुक करायची आणि त्यांत कणभर कां होईना भर घालून अशा पद्धतीने परत करायची की तिने ते परत केलंय हे देणाऱ्याच्या खूप उशीरा लक्षात यायचं. अगदी आम्ही भाऊ दरवर्षी तिला घालत असलेली भाऊबीजही याला अपवाद नसायची!
‘दुसऱ्याला ओझं वाटावं असं देणाऱ्यानं द्यावं कशाला?’ असं म्हणत आरती तिचीच बाजू घ्यायची, आणि ‘हा स्वभाव असतो ज्याचा त्याचा. आपण तो समजून घ्यावा आणि त्याचा मान राखावा’ असं म्हणून आई ताईचंच समर्थन करायची.
त्या दोघींनी माझ्या ताईला छान समजून घेतलेलं होतं. मला मात्र हे जेव्हा हळूहळू समजत गेलं, तसं माझ्या गरीब वाटणाऱ्या ताईच्या घरच्या श्रीमंतीचं मला खरंच खूप अप्रूप वाटू लागलं. माझ्याकडे अमुक एक गोष्ट नाही असं माझ्या ताईच्या तोंडून कधीच ऐकायला मिळायचं नाही. सगळं कांही असूनसुद्धा कांहीतरी नसल्याची खंत अगदी भरलेल्या घरांमधेही अस्तित्वात असलेली अनेक घरं जेव्हा आजूबाजूला माझ्या पहाण्यात येत गेली तसं माझ्या ताईचं घर मला खूप वेगळं वाटू लागलं. लौकिकदृष्ट्या कुणाच्या नजरेत भरावं असं तिथं कांही नसूनसुद्धा सगळं कांही उदंड असल्याचा भाव ताईच्याच नव्हे तर त्या घरातल्या सर्वांच्याच चेहऱ्यावर मला नव्याने लख्ख जाणवू लागला आणि माझ्या ताईचं ते घर मला घर नव्हे तर ‘आनंदाचं झाड’ च वाटू लागलं! त्या झाडाच्या सावलीत क्षणभर कां होईना विसावण्यासाठी माझं मन तिकडं ओढ घेऊ लागलं. पण मुद्दाम सवड काढून तिकडं जावं अशी इच्छा मनात असूनही तेवढी उसंत मात्र मला मिळत नव्हतीच.
पण म्हणूनच दरवर्षी भाऊबीजेला मात्र मी आवर्जून बेळगावला जायचोच. कोल्हापूरला मोठ्या बहिणीकडे आदल्या दिवशी रात्री मुक्कामाला. तिथे पहाटेची अंघोळ आणि फराळ करुन, दुपारचं जेवण बेळगावला ताईकडं, हे ठरूनच गेलं होतं. जेवणानंतर ओवाळून झालं की मला लगेच परतावं लागायचं. पण मनात रूखरूख नसायची. कारण माझ्या धावत्या भेटीतल्या त्या आनंदाच्या झाडाच्या सावलीतली क्षणभर विश्रांतीही मला पुढे खूप दिवस पुरून उरेल एवढी ऊर्जा देत असे.
बेंगलोरजवळच्या बनारगट्टाला आमच्या बँकेचं स्टाफ ट्रेनिंग सेंटर आहे. एक दोन वर्षातून एकदा तरी मला दोन-तीन आठवड्यांच्या वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्रॅम्ससाठी तिथे जायची संधी मिळायची. एकदा असंच सोमवारपासून माझा दहा दिवसांचा ट्रेनिंग प्रोग्रॅम सुरू होणार होता. कोल्हापूरहून रविवारी रात्री निघूनही मी सोमवारी सकाळी बेंगलोरला सहज पोचू शकलो असतो, पण ताईला सरप्राईज द्यावं असा विचार मनात आला आणि रविवारी पहाटेच मी बेळगावला जाण्यासाठी कोल्हापूर सोडलं. तिथून रात्री बसने पुढं जायचं असं ठरवलं. सकाळी दहाच्या सुमारास बेळगावला गेलो. ताईच्या घराच्या दारांत उभा राहिलो. दार उघडंच होतं. पण मी हाक मारली तरी कुणाचीच चाहूल लागली नाही. केशवराव ड्युटीवर आणि मुलं बहुतेक खेळायला गेलेली असणार असं वाटलं पण मग ताई? तिचं काय?.. मी आत जाऊन बॅग ठेवली. शूज काढले. स्वैपाकघरांत डोकावून पाहिलं तर तिथे छोट्याशा देवघरासमोर ताई पोथी वाचत बसली होती. खुणेनेच मला ‘बैस’ म्हणाली. मी तिच्या घरी असा अनपेक्षित
आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर पुसटसा दिसला खरा, पण मी हातपाय धुवून आलो तरी ती आपली अजून तिथंच पोथी वाचत बसलेलीच. मला तिचा थोडा रागच आला.
“किती वेळ चालणार आहे गं तुझं पोथीवाचन अजून?” मी त्याच तिरीमिरीत तिला विचारलं आणि बाहेर येऊन धुमसत बसून राहिलो. पाच एक मिनिटांत अतिशय प्रसन्नपणे हसत ताई हातात तांब्याभांडं घेऊन बाहेर आली.
“अचानक कसा रे एकदम? आधी कळवायचंस तरी.. ” पाण्याचं भांडं माझ्यापुढे धरत ती म्हणाली.
“तुला सरप्राईज द्यावं म्हणून न कळवता आलोय. पण तुला काय त्याचं? तुझं आपलं पोथीपुराण सुरूच. “
“ते थोडाच वेळ, पण रोज असतंच. आणि तसंही, मला कुठं माहित होतं तू येणारायस ते? कळवलं असतंस तर आधीच सगळं आवरून तुझी वाट पहात बसले असते. चल आता आत. चहा करते आधी तोवर खाऊन घे थोडं. “
माझा राग कुठल्या कुठे निघून गेला. मी तिच्यापाठोपाठ आत गेलो. भिंतीलगत पाट ठेवून ती ‘बैस’ म्हणाली आणि तिने स्टोव्ह पेटवायला घेतला.
“कुठली पोथी वाचतेय गं?” मी आपलं विचारायचं म्हणून विचारलं. कारण दत्तसेवेचं वातावरण असलेल्या माहेरी लहानाची मोठी झालेली ताई दत्त महाराजांचं महात्म्य सांगणारंच कांहीतरी वाचत असणार हे गृहीत असूनही मी उत्सुकतेपोटी विचारलं.
“आई बोलली असेलच की़ कधीतरी. माहित नसल्यासारखं काय विचारतोस रे? ” ती हसून म्हणाली.
“खरंच माहित नाही. सांग ना, कसली पोथी?”
“गजानन महाराजांची. “
मला आश्चर्यच वाटलं. कारण तेव्हा गजानन महाराजांचं नाव मला फक्त ओझरतं ऐकूनच माहिती होतं. ‘दत्तसेवा सोडून हिचं हे कांहीतरी भलतंच काय.. ?’ हाच विचार तेव्हा मनात आला.
“कोण गं हे गजानन महाराज?” मी तीक्ष्ण स्वरांत विचारलं. माझ्या आवाजाची धार तिलाही जाणवली असावी.
“कोण काय रे?” ती नाराजीने म्हणाली.
“कोण म्हणजे कुठले?कुणाचे अवतार आहेत ते?”
माझ्याही नकळत मला तिचं ते सगळं विचित्रच वाटलं होतं. तिला मात्र मी अधिकारवाणीने तिची उलट तपासणी घेतोय असंच वाटलं असणार. पण चिडणं, तोडून बोलणं तिच्या स्वभावातच नव्हतं. तिने कांहीशा नाराजीने माझ्याकडे रोखून पाहिलं, आणि शक्य तितक्या सौम्य स्वरांत म्हणाली, ” तू स्वतःच एकदा मुद्दाम वेळ काढून ही पोथी वाच. तरच तुला सगळं छान समजेल. ” आणि मग तिनं तो विषयच बदलला.
ही घटना म्हणजे दत्तसेवेबद्दलची नकळत माझ्या मनावर चढू पहाणारी सूक्ष्मशा अहंकाराची पुटं खरवडून काढण्याची सुरुवात होती हे त्याक्षणी मला जाणवलं नव्हतंच. पण आम्हा सगळ्यांचंच भावविश्व उध्वस्त करणाऱ्या पुढच्या सगळ्या घटनाक्रमांची पाळंमुळं माझ्या ताईच्या श्रद्धेची कसोटी पहाणारं ठरणार होतं एवढं खरं! त्या कसोटीला ताई अखेर खरी उतरली, पण त्यासाठीही तिने पणाला लावला होता तो स्वतःचा प्राणपणाने जपलेला स्वाभिमानच!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈