☆ ‘जग’ ‘जग’…☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆
शीर्षक वाचल्यावर वाचकांना एक प्रश्न नक्कीच पडला असेल की कोणाला ‘जग’ ‘जग’ म्हणून सांगितले जातेय. अहो, आपल्यालाच. आता दुसरा प्रश्न पडला असेल की आम्ही जगतोय आहोत मग आणखी कसे जगायचे ? हा प्रश्न मात्र अधिक खरा आणि आपल्या विषयाशी निगडित आहे असे मला वाटते. या जगात अनेक जीवजंतू, पशुपक्षी, प्राणी, वनस्पती आणि स्वाभाविक मनुष्य जगत असतात. यातील मनुष्य वगळता इतर सर्व योनीतील जीव प्रारब्धक्रमाने लाभलेला जीवनक्रम नैसर्गिकरित्या जगत असतात. मनुष्य मात्र या सर्वांस अपवाद आहे. त्यालाही प्रारब्धक्रमाने लाभलेला जीवनक्रम असतोच परंतु मनुष्याला बुद्धीचे/ विचार करण्याचे विशेष वरदान लाभल्यामुळे मनुष्य कधी सुखी तर कधी दुःखी होताना आपण पाहतो.
हे जग (सृष्टि) भगवंताने निर्माण केली आहे असे आपण मानतो. जर ती भगवंताने निर्माण केली असेल तर ती नक्कीच आनंददायी असली पाहिजे. पण दैनंदिन जीवनात मनुष्य आनंदी असल्याचे आपल्या दृष्टीस पडतेच असे नाही. असे का होत असावे ? आपल्याला कोणी विचारले की तुम्हाला सुखात जगायला आवडेल की दुःखात ? तर माझ्यामते येथील प्रत्येक जण सुखात जगायला आवडेल असेच सांगेल. मग तरीही बरीचशी माणसे दुःखात असल्याचे आपल्या निदर्शनास येते, असे का व्हावे ? जग भगवंताने निर्माण केलेले असूनही बरीचशी माणसे दुःखात आहेत याचा अर्थ कोणीतरी नक्की चुकत असलेच पाहिजे. एकतर भगवंत किंवा मनुष्य. भगवंत चुकणे शक्यच नाही म्हणजे जर चुकी असेलच तर ती फक्त मनुष्याची असली पाहिजे.
शिर्षकातील पहिला ‘जग’ हा सृष्टी (जगाचा) दर्शक आहे. म्हणून आपण त्या ‘जगा’बद्दल चिंतन करू. दैनंदिन जीवनात ‘जग काय म्हणेल’?, जगाची चिंता करू नये ? अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न एकतर आपल्याला पडतात किंवा कोणीतरी असे प्रश्न विचारेल याची आपल्याला सतत भीती वाटत असते. आणि विशेष म्हणजे आपल्या कसोटीच्या क्षणी, आपल्या पडत्या काळात या ‘जगा’तील फार थोडी मंडळी आपल्याला मदत करायला पुढे येतात आणि तरीही मनुष्याला ‘जग काय म्हणेल याची चिंता असते हे नवल नव्हे काय ?
‘जिवो जीवस्य जीवनम्’ असा निसर्गाचा नियम आहे आणि तो स्वाभाविकपणे प्रत्येक मनुष्यास लागू पडतो. याचा सरळ अर्थ असा आहे की या जगातील प्रत्येक प्राणी कोणत्या न कोणत्या स्वरूपात एकमेकांवर अवलंबून आहे. बाकीच्या प्राण्यांचे सोडून दिले आणि आपण फक्त मनुष्याचा विचार केला तरी मनुष्य ‘सामाजिक’ प्राणी असल्यामुळे तो एकटा राहू शकत नाही. त्यामुळे जगण्यासाठी त्याला अनेकांची मदत घ्यावी लागते. आदिम काळापासून तो समूहानेच राहत आलेला आहे.
आधी सांगितल्याप्रमाणे मनुष्याला ‘विचार’ करण्याची विशेष देणगी प्राप्त आहे. त्यामुळे मनुष्याने आपली सर्वच क्षेत्रात प्रगती करून घेतली आहे आणि स्वतःची सर्वांगीण उन्नत्ती करून घेतली आहे. समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रात मनुष्याने उत्तुंग आदर्श निर्माण करून ठेवले आहेत. इतके सारे असूनही मनुष्य खऱ्या अर्थाने ने आनंदी झाला, ‘जगायला’ शिकला असे मात्र आपण छातीठोकपणे म्हणू शकत नाही. आता ‘जगणे’ आणि ‘जगणे’ यात काय फरक असा प्रश्न आपल्याला पडू शकतो.
एकदा शांत बसून मनाला प्रश्न विचारला की आपण आज खरंच जगलो की नाईलाजाने दिवस ढकलला ? उत्तर आपल्यापाशीच आहे. सर्वसामान्य मनुष्य रोजच्या धकाधकीमुळे गांजून गेला आहे असे आपल्याला जाणवेल. श्रीराम
☆ हसण्याचे वरदान…… – भाग ४ – मूळ कथा लेखक : पर्ल बक ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ☆
(हे खरोखरच खुळचटपणाचंच होतं की ! ही तरुण मुलगी त्यांच्याशी बोलत होती हेच ! “मी तसं म्हंटलं तरीही तू मला बरंच काही सांगितलं आहेस, ” त्या म्हणाल्या.) – इथून पुढे —
तेवढ्यात दार उघडून हेन्री आत आला. समोरचं दृश्य बघून त्याचे डोळे एकदम विस्फारले. आणि मिसेस बार्टनना त्या मुलीची आणि आपली जवळीक त्याला दिसली या गोष्टीने ओशाळल्यासारखे झाले. त्याच्याकडे धारदार नजरेने पहात त्यांनी विचारले, “काय पाहिजे हेन्री?”
“जेवण, मॅडम, ” तो म्हणाला. “टर्की सुकून चालली आहे. ”
ती तरुण मुलगी ताडकन उठली. “आता मला निघालंच पाहिजे, ” ती म्हणाली.
“थांब, ” मिसेस बार्टननी आज्ञेच्या स्वरात तिला विचारले, “तू तुझं ख्रिसमसचं जेवण कुठे घेणार आहेस?”
“ओह, ‘चाइल्ड्स’ मधे, बहुतेक, ” ती मुलगी कणखरपणे म्हणाली. “तिथे एका डॉलरमधे मस्त ख्रिसमसचं जेवण देतात. माझ्याकडे एक डॉलर आहे. मी त्यासाठीच वाचवून ठेवलाय!”
“तुला कोणी नातेवाईक नाहीत?” मिसेस बार्टननी विचारलं.
त्या मुलीने नकारार्थी मान हलवली. “अनाथ आहे मी, ” ती उत्साहाने म्हणाली, “मी एका अनाथालयात मोठी झाले. मला वाटतं, म्हणूनच मी म्हणते, की मला लग्नानंतर दहा मुलं झाली पाहिजेत. भरपूर माणसं असल्याशिवाय ते घर वाटणारच नाही मला. ”
“आता तू रहात नाहीस ना, अनाथालयात?” मिसेस बार्टननी चौकशी केली.
“नाही, नाही, ” ती मुलगी म्हणाली. “सतरा वर्षांचे झाल्यावर ते मुलांना बाहेर पाठवतात. अर्थात ते नोकरी वगैरे मिळवून देतात, मला त्यांनी मिळवून दिलेली नोकरी आवडली नाही, म्हणून मी दुसरी शोधून काढली. पण ते त्यांच्याकडून जितकी जास्त मदत होईल, तेवढी करतात. ”
“हेन्री, ” मिसेस बार्टन म्हणाल्या, “आणखी एक ताट मांडायला सांग टेबलवर. मिस—नाव काय तुझं?”
“होय, मॅडम, ” हेन्री दार लावून जाताना म्हणाला, पण त्याच्या आवाजातलं आश्चर्य त्यांना जाणवलं.
“होल्ट हे तुझं खरं आडनाव आहे?” मिसेस बार्टननी विचारलं.
तिने आपली मान हलवली. “ते H मधलं पुढचं नाव होतं, ” ती म्हणाली. “हॅरीसन, होम्स, होल्ट, हटन इ. इ. ”
“म्हणजे, मूळची तू कोण आहेस, याची काहीच कल्पना नाही तुला?” मिसेस बार्टननी विचारलं.
जेनी हसली, आणि परत तिने मान हलवली. “पायरीवर सोडून दिलेलं बाळ!” ती अगदी मजेत बोलली.
मिसेस बार्टन एक क्षणभर जरा विचारात पडल्या. “हं, ” त्यांनी एक उसासा सोडला. “आश्चर्यकारक आहे! बापरे!”
पण मग त्या उठल्या आणि तिला घेऊन वरच्या मजल्यावर निघाल्या. वर गेल्यावर खरं तर त्या तिला पाहुण्यांच्या खोलीत थांबायला सांगणार होत्या, पण एकदम कुठल्या प्रेरणेने कोणजाणे, पण त्यांनी तिला रॅनीच्या खोलीकडे बोट करत सांगितलं, “ही त्याची खोली आहे, तुला हात पाय धुवून फ्रेश व्हायचं असेल तर तिथे जाऊ शकतेस आणि तुला तुझी हॅट काढून ठेवायची असेल तर तिथे ठेऊ शकतेस. ”
“ओह! थॅन्क्यू” जेनी म्हणाली.
त्या आपल्या खोलीत गेल्या आणि दार बंद करून पलंगावर बसून राहिल्या. मग त्यांना वाटलं, की फोटोतल्या रॅनीचे डोळे हळुवार झाले आहेत आणि त्या हॉलीच्या फांदीआडून आपल्याकडे प्रेमाने बघत आहेत.
स्वार्थी, त्यांच्या मनात आलं. होय, मला वाटतं, तो स्वार्थीपणाच होता— तुझ्याशिवाय रहाण्याच्या भितीमागे. ते तरुण डोळे जिवंत असल्यासारखे भासले त्यांना आणि त्यांचे डोळे भरून आले. “ही माझी चूक मी कशी दुरुस्त करू?” त्या पुटपुटल्या. एक दीर्घ क्षण ते डोळे त्यांच्याकडे बघून हसत राहिले. “अर्थातच, मी करू शकते, ”अर्थातच मी करीन. ”
— पण म्हाताऱ्या हेन्रीसमोर काही बोलता येत नव्हतं आणि औपचारिकता पाळण्याच्या गरजेमुळे जेनी थोडीशी वेड्यासारखी आणखी आनंदी बडबड करत होती. या बदामी रंगाच्या डोळ्यातला तो लहान मुलांसारखा मिश्कीलपणा आणि आनंद याला प्रतिसाद न देता रहाणं शक्यच नव्हतं! मिसेस बार्टनना स्वतःच्या हसण्याचं आणि आणि तिच्या बोलण्यावर आपण केलेल्या टिप्पण्यांचं स्वतःलाच आश्चर्य वाटत होतं. आणि म्हाता-या हेन्रीला तर हे काय चाललंय हेच कळत नव्हतं. त्यांना त्याच्या डोळ्यातला गोंधळ आणि घाबरटपणा बघून आणखी हसू येत होतं. हेन्री जेंव्हा खोलीतून बाहेर गेला, तेंव्हा जेनीने आपलं छोटासा सावळा हात पुढे करून मिसेस बार्टनच्या हिऱ्याची अंगठी घातलेल्या हातावर थोपटलं.
“टिगरने तुमच्यावर अन्याय केलाय असं वाटतंय मला, ” ती अगदी प्रेमाने म्हणाली. “खरं तर त्याला तुम्ही कळलाच नाहीयेत, आणि मी त्याला हे सांगणार आहे. ”
मिसेस बार्टन हे ऐकून गंभीर झाल्या, आणि म्हणाल्या, “म्हणजे, काय म्हणायचं आहे तुला?”
“टिगर कायम म्हणायचा, की तुम्ही फार नाजूक आणि थोड्याशा कठोर आहात, ” जेनी समजून सांगू लागली, “खरं तर तो घाबरतो तुम्हाला. ”
“तो घाबरतो मला?” मिसेस बार्टन म्हणाल्या.
“होय, खरंच घाबरतो तो तुम्हाला, ” जेनी प्रामाणिकपणे म्हणाली. “पण तुम्ही तर छानच आहात, खरंच! मिसेस बार्टन, तुमची विनोदबुद्धी अद्भुत आहे! मला तुमची अजिबात भीति वाटत नाही. ”
मिसेस बार्टननी हातातला चमचा खाली ठेवला आणि त्या एक क्षणभर शांत बसल्या. मग त्यांनी पुढे वाकून जेनीच्या गालावर थोपटलं.
“माझ्या––माझ्या लाडक्या मुली, तू माझ्या मुलाला नक्की सांग, की त्यानं मला घाबरायची गरज नाही!”
त्याचं क्षणी हेन्री प्लम पुडिंग घेऊन आत आला. वर टाकलेली व्होडका पेटवल्यामुळे ते पुडिंग नुसतं झगमगत होतं. त्याच्या वर ठेवलेली हॉलीची छोटी डहाळी पण पेटली होती आणि त्यामुळे पुडिंग वर टाकलेल्या बेरी रत्नांसारख्या झगमगत होत्या.
“ओह!” जेनी अत्यानंदाने म्हणाली, “माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी असं पूर्ण आणि पेटवलेलं प्लम पुडिंग बघते आहे!” तिने दोन वेळा पुडिंगचे मोठे तुकडे घेऊन चवीने खाल्ले, आणि त्याच्यावरचं हार्ड सॉस तिला क्रीमइतकं मऊ लागलं.
नंतर, लायब्ररीच्या खोलीत फायरप्लेस समोर बसून कॉफी घेताना अचानकपणे मिसेस बार्टनना कित्येक दिवसात वाटलेलं नव्हतं, इतकं शांत आणि आरामशीर वाटायला लागलं. त्यांनी आजचं सुग्रास जेवण अगदी भरपेट खाल्लं होतं, नेहमीपेक्षा खूपच जास्त जेवल्या होत्या त्या, पण त्यांना ते सगळं आपण व्यवस्थित पचवू शकू याची खात्री वाटत होती.
“एक सांगू का तुला?” त्या जेनीला म्हणाल्या, “रॅनी युद्धावर गेल्यापासून मी हसलेच नव्हते. हसण्याजोगी एकही गोष्ट घडली नव्हती, की दिसली नव्हती. ”
त्यांनी त्या चमकदार बदामी डोळ्यांकडे पाहिलं, ते डोळे नेहमीच हसण्याने काठोकाठ भरलेले असायचे. ते बघून परत त्यांना हसू आलं. त्यांनी आपले डोळे रुमालाने पुसले आणि म्हणाल्या, “मी का हसते आहे, कोणजाणे, पण हसल्याने छान वाटतं आहे! युद्ध चालू असलं तरी रॅनी जिवंत आहे! तुलाही असंच वाटतंय ना?”
“मला माहित आहे, तो आहेच!” जेनी ठामपणे म्हणाली.
“पण तुला कसं माहित आहे?” मिसेस बार्टन कुजबुजल्या.
“जर त्याचं काही बरं-वाईट झालं—तर—त्याच क्षणी मला ते कळेल, ” जेनी म्हणाली.
मिसेस बार्टन पुढे झुकल्या. “तू प्रेम करतेस त्याच्यावर, ” त्या म्हणाल्या.
जेनीने होकारार्थी मान हलवली. “माझ्या हृदयाच्या गाभ्यातून, ” ती साधेपणाने म्हणाली.
मिसेस बार्टननी तिच्या हातावर आपलं हात ठेवला आणि विचारलं, “मग, माझ्या लाडक्या मुली, तू त्याच्याशी लग्न करायला नाही का म्हणतेस?”
जेनीचे डोळे भरून आले. “कारण —लग्न करायची भीति वाटते मला, ” ती म्हणाली.
“जेनी, प्लीज!” मिसेस बार्टन म्हणाल्या. “जर तो तुझ्यावर सर्वाधिक प्रेम करणार असेल तर? जर मला वाटत असेल की त्यानं तुझ्यावर सर्वाधिक प्रेम करावं, तर?”
त्या दोघी एकमेकींकडे अत्यंत गांभि-याने बघत होत्या.
“माझ्या मुलाशी तू लग्न करावंस असं मी तुला सांगते आहे!” मिसेस बार्टन हळुवारपणे म्हणाल्या.
“रॅनीएवढ्याच जवळपास तुम्हीही एखाद्याला पटवण्यात पटाईत आहात!” जेनी म्हणाली.
अचानकपणे त्या दोघीही एकदम हसायला लागल्या आणि जेनी उडी मारून उठली आणि तिने मिसेस बार्टनना मिठी मारली. “तुम्ही खरंच मला मोहात पाडलंय!” ती म्हणाली. “मी रॅनीला अगदी सहजपणे नाही म्हणाले होते, पण तुम्हाला नाही म्हणणं अवघड आहे! तुम्ही माझी आई होणार हे मला फार छान वाटतंय. ओह! माझी किती इच्छा होती, मला आई मिळावी अशी! अनाथालयात सगळे माझ्याशी चांगले वागायचे, पण आपली स्वतःची आई असणं ही गोष्टच वेगळी आहे!”
मिसेस बार्टननी आपले हात तिच्याभोवती वेढून तिला जवळ घेतलं, आणि म्हणाल्या, “मग, मला तुझी आई होऊ देशील ना?”
जेनी थोडी मागे सरकली, आणि त्यांच्या डोळ्यात बघत म्हणाली, “खरंच वाटतंय का तुम्हाला असं?”
“अगदी हृदयाच्या तळापासून सांगतोय आम्ही, मी आणि रॅनी. लाडक्या मुली, आता येऊन इथेच माझ्या बरोबर रहा आणि रॅनीसाठी छान घर बनव हे!”
जेनीने त्यांच्या गालावर ओठ टेकवले. आणि मग त्यांच्या मिठीतून दूर होऊन आपले हात गालावर ठेऊन बघत राहिली. तिचे गाल गुलाबी झाले होते आणि डोळे चमकत होते.
“पण मी माझी नोकरी चालू ठेवीन हं, मिसेस बार्टन—तो परत येईपर्यंत. ”
“खुशाल चालू ठेव तुझी नोकरी!” मिसेस बार्टन म्हणाल्या.
जेनी ताठ उभी राहिली आणि म्हणाली, “मी रहाण्याचे आणि जेवणाचे पैसे देणार पण!”
“अर्थातच, ” तिच्या स्वाभिमानी वृत्तीचा आदर ठेवत त्या म्हणाल्या.
मग जराशा अनिश्चिततेत ती मागे सरकली आणि मागच्या मोठ्या कोरीव टेबलाला टेकत म्हणाली, “मिसेस बार्टन, मी आता –तुम्ही सांगता का– माझी आणि टिगरची एंगेजमेंट झाली असं समजू शकते का मी?”
त्या खोलीतलं वातावारणच एकदम बदलून गेलं. ते मिसेस बार्टनना आधी जाणवलं, कारण जेनीमधला बदल त्यांना दिसत होता. एक प्रकारचं तेज जाणवत होतं तिच्यात. जेनीच्या डोळ्यातून जणू एक प्रकारचा प्रकाश बाहेर पडत होता, आणि संगीतही होतं, शेजारच्या घरातून घन्टांमधून ख्रिसमस कॅरोल्स वाजताना ऐकू येत होत्या. ते संगीत स्वर्गीय वाटत होतं.
“आपण रॅनीला एक तार पाठवायला हवी. ” मिसेस बार्टन हळुवार स्वरात बोलल्या. “अर्थातच आपल्याला ती युद्ध विभागाकडे पाठवायला लागेल, पण त्या तारेत काय आहे ते पाहिल्यावर बहुदा ते ती पुढे त्याला पाठवतील. काय लिहायचं त्यात जेनी?”
“त्याला सांगूया–, ” जेनी अस्पष्ट आवाजात म्हणाली. “त्याला सांगा—“ तिने मान हलवली आणि मग तिला काय बोलावे, ते न सुचल्याने ती गप्पच झाली.
मिसेस बार्टन हसल्या. “मी लिहिते, की तुझं ख्रिसमस प्रेझेंट मिळालं आणि आवडलं. ”
जेनीने होकारार्थी मान हलवली.
“आणखी काय लिहायचं?” मिसेस बार्टननी विचारलं.
बराच विचार करून जेनी म्हणाली, “लिहा की त्याचं लग्न ठरलंय, आणि त्या खाली तुमची सही करा, आणि टिग्रेस लिहा, त्याला समजेल मग. ”
मिसेस बार्टन परत हसल्या. त्यांना असं जाणवत होतं, की इथून पुढे त्यांचं आयुष्य हसण्याने भरून जाणार होतं. त्यांनी खरोखरच रॅनीबाबत केलेली चूक पूर्णतः सुधारली होती!
” नीता तुझ्याशी जरा महत्वाचे बोलायचे आहे. माझ्याकडे येशील का?” पाटणकर आजींचा फोन.
” येईन की… हल्ली तुमचे पाय दुखतात म्हणून तुम्ही फिरायला येत नाही. त्यामुळे बरेच दिवसात आपली भेटही झालेली नाही. येते मग उद्या. तुमच्याकडे “
तेवढ्यात त्या घाईघाईने म्हणाल्या,
” पण एक कर.. सकाळी साडेसातला हे फिरायला जातात ना तेव्हाच ये.. यांच्यासमोर बोलता येणार नाही. “
” का बरं ?
“ अग अस फोनवर सांगता येणार नाही… घरी ये मग उद्या सांगते “
“बरं बरं “
असं म्हणून मी फोन ठेवला. काय झालं कळेना… आजोबांसमोर न सांगण्यासारख एवढं काय असेल?
दुसरे दिवशी गेले. आजी वाटच पहात होत्या. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. म्हणजे मामला जरा गंभीरच होता तर….. त्या सांगायला लागल्या…
” अगं काय आणि कसं सांगू काही कळत नाही बघ…. यांच्या माघारी असं यांच्या तक्रारी करणं प्रशस्त वाटत नाही. पण सांगते…. हल्ली यांना निरनिराळे घरचे पदार्थ खावेसे वाटत आहेत”
” अहो मग त्यात काय झालं ?”
“तसं नाही ग.. कसं सांगू ?
“म्हणजे खूप खातात का ?”
“नाही ग.. मोजकचं खातात. पण रोज नवीन फर्माईश असते. सकाळचे सकाळी… रात्री परत वेगळं करायला सांगतात. घारगे कर, डाळ फळं कर, परवा तर मोठा नारळ आणला आणि म्हणाले आज ओल्या नारळाच्या करंज्या कर. मग दोन दिवसांनी उकडीचे मोदक करायला लावले…. “
” हो का?” मलाही जरा आश्चर्यच वाटलं.
“अग विशेष म्हणजे हल्ली घरी मदत पण करत नाहीत. कधी कधी तर चादरीची घडी पण करत नाहीत.
हे ऐकून मात्र मी चाटच पडले. कारण आजोबा घरात सतत काहीतरी काम करत असायचे.
“नीता तुला एक आतलं सांगु का? मला असा संशय येतो की हे काही डॉक्टरांना दाखवण्यासारखे वाटत नाही. हे काहीतरी वेगळेच….. मनाचे दुखणे यांना झाले आहे असे मला वाटते. तुझा आनंद सायकॉलॉजिस्ट आहे तर त्याला विचारशील का?”
” हो हो चालेल चालेल… त्यालाच विचारू तुम्ही म्हणताय तसच मला पण वाटतय… बोलते मी आनंदशी “
“आणि खरंच एक मात्र सांगते बाई… कोणाला काही सांगू नकोस. “
“नाही नाही… आजी नाही कुठे बोलणार नाही. “
“अग.. तू काही कोणाला सांगणार नाहीस हे मला माहित आहे. म्हणून तर तुझ्याशी मनमोकळे बोलले ग.. यांना काय झालं असेल याची मनाला फार चिंता लागुन राहिली आहे बघ.. ”
” घाबरू नका असेल काहीतरी उपाय”
आजींना कराव्या लागणाऱ्या कामापेक्षा आजोबांची काळजी वाटत होती. त्यांचे डोळे भरून आले होते…. अगदी रडवेला झाला होता त्यांचा स्वर…..
आजींचा निरोप घेऊन घरी आले.
नंतर विचार केला आणि ठरवलं की आधी आजोबांशी बोलावे. दुसरे दिवशी सकाळीच बागेत फिरायला गेले पण ते आलेच नव्हते.
तिसऱ्या दिवशी पण आले नाहीत. मग त्यांच्या ग्रुप मधल्या लोकांना विचारलं तर ते म्हणाले…
” आजोबा आज लवकर घरी गेले. साने डेअरीत चिकाच दूध आणायला जायचं आहे असं म्हणत होते. “
– – म्हणजे आज आजोबांना खरवस खावासा वाटत होता… म्हणजे आजी सांगत होत्या ते खरंच होतं तर…
आजींचा सकाळी फोन आला.
” अगं नीता आनंदशी बोलणं झालं का?”
“नाही हो तो जरा गडबडीतच आहे. जरा शांतपणे बोलायला हव…. म्हणून… आज उद्या बोलते”
” बरं बरं असू दे असू दे… अग यांनी काल गुळाचा खरवस करायला सांगितला. दोन मोठ्या कैऱ्या आणल्या आहेत. गोड आणि तिखट लोणचं करायला सांगितलेलं आहे. तुला बोलले ना तसं अजून चालूच आहे बघ… “
” हो का ? बोलते आनंदशी. बघू तो काय म्हणतो.. “
“हो चालेल.. जसं जमेल तसा कर फोन “त्या म्हणाल्या.
सहज विचारलं..
“आजोबा कुठे आहेत?”
” आता हे रोजच्यासारखे फिरायला गेले आहेत. ” त्या म्हणाल्या.
मग मी पटकन आजोबांना भेटायला बागेत गेले. ते होतेच तिथे.
म्हणाले ” काय म्हणतेस नीता ? कशी आहेस ?”
“आजोबा आज तुमच्याशीच बोलायला आले आहे. या बसू इथे बाकावर. “
आणि मग सरळ सरळ त्यांना आजींनी जे सांगितलं ते सांगायला लागले. तसं ठरवूनच गेले होते.
ऐकताना आजोबा गंभीर झाले. शांत आवाजात म्हणाले…
” सांगतो तुला… तिने सांगितलेलं सगळं खरं आहे. “
” खरं…. अस वागताय तुम्ही आजींशी ? आणि हे नवीन पदार्थ रोज करायला सांगताय त्याचे काय?”
मी विचारलं.
” हो…. मला वाटलच होत ती तुझ्याशी बोलेल… अग ऐक… झालंय काय तिचे हातपाय हल्ली दुखतात. तिचं फिरणं बंद झालं आहे. त्यामुळे संपर्क कमी. नुसती घरी बसून कंटाळायला लागली आहे. फोन तरी किती करणार ? कुणाला करणार? मग मी ही युक्ती केली. अॅण्ड् इट्स वर्क्स… “
“म्हणजे काय?”
“आता रोज असं नवीन काही काही बनवायला सांगितलं की तिची भरपूर हालचाल होते. भूक लागते. डॉक्टर म्हणाले व्यायाम करू दे. पण ह्या वयात कसं जमणार तिला? आजपर्यंत तिने कधी काही व्यायाम केलाच नाही…. “
” हो तुम्ही म्हणताय ते पटलं मला. अचानक व्यायाम करणे कठीणच असते. “
” म्हणूनच…. नाहीतर मी तिच्याशी असं वागेन का कधी ? पण हे काही तिला सांगु नकोस “
असं म्हणेपर्यंत त्यांचे डोळे भरूनच आले होते.
खोलवर मुरलेले स्वाभाविक, निर्मळ, प्रगल्भ, बायकोचे अंतरंग जाणणारे निर्व्याज्य प्रेम त्यांच्या डोळ्यात मला दिसत होते. दोघेही या वयात एकमेकांची मनं सांभाळत होते. एकमेकांना समजून घेत होते.
आजोबांचा निरोप घेऊन निघाले.
शांतपणे विचार केला. खरंतर अशावेळी मला फार विचार करावा लागत नाही. पण ही नाजूक अशी गोष्ट होती.
दूसरे दिवशी सकाळीच आजींकडे गेले. मला बघताच त्या म्हणाल्या..
“अग ये ये “
म्हटलं,
“आनंदशी बोलले “
त्यांनी अगदी उत्सुकतेने विचारले..
“मग तो काय म्हणाला ग ?काय सांगितलं आनंदनी?”
” आधी शांतपणे बसा इथं. सगळं सांगते.. “
मग त्यांना सांगितलं…
” तो म्हणाला हे विशेष काळजी करण्यासारखं काही नाही. माणसांना या वयात जुनं फार आठवतं. अगदी पदार्थ सुद्धा आणि ते खावेसे वाटतात म्हणजे उलट आजोबा ठणठणीत आहेत. “
” खरंच असं म्हणाला आनंद ?”
” हो… खूप वर्ष काम केले शरीर दमलं की आता थोडा आराम करावा असं वाटतं शरीराला… करू दे त्यांना आराम. “
” हो ग.. खरचं.. घरची परिस्थिती यथातथाच होती. वडिलांची साधी नोकरी त्यात दोन बहिणी… त्यांची लग्नं… फार लहानपणापासूनच नोकरीला लागले हे. शिवाय संध्याकाळी एका ऑफिसात हिशोब लिहायला जायचे “
” आनंदनी असं सुचवलं आहे की तुम्ही कामासाठी कोणाची वाटलं तर मदत घ्या. तुम्हाला त्रास होत असेल तर काही कामं बाईकडून करून घ्या. तुम्ही स्वतः घरी न करता काही गोष्टी विकत आणा. “
आजींनी पटकन माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या..
“अग ह्यांना विशेष काही झालं नाही. हे कळलं आता मला चिंता नाही. मी करीन उठत बसत काम. त्यात काय ग आपल्याला सवयच असते… “
आजींचा चेहरा खुलला होता.
“नीता माझ फार मोठं काम केलस बघ. माझ्या जीवाला फार घोरं लागला होता ग…. “
“आता आजोबांची काही काळजी करू नका.. आणि मस्त काहीतरी त्यांच्यासाठी बनवा.. खुष होतील… “
आजी खुद्कन हसल्या..
” बैस ग… आता आधी आपल्या दोघींसाठी कॉफी करून आणते”
अस म्हणून आजी आत गेल्या…
त्यांचा चेहरा एकदम बदलला होता.
खरं सांगू ?….
असा निरपेक्ष निर्मळ आनंद कुणाच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला की मला फार फार समाधान होते.
आता या वयात जगायला यासारखं दुसरं काही नको….
आजींना म्हटलं होतं कोणाला सांगणार नाही पण मुद्दाम हा लेख लिहिला… आपणही शिकू आजी आजोबांकडुन…. प्रेम कसंही करता येतं ते……
… अर्थात कोणतीही व्यक्ती (पूर्णांशाने) अयोग्य नसतेच. फक्त त्या व्यक्तीचा योग्य त्या कार्यात उपयोग करणारे दुर्लभ असतात. हे आठवायचं कारण म्हणजे अशा एका योजक व्यक्तीचं तसं अकाली निघून जाणं होय. कदाचित या योजकाची जगाच्या योजकाला आवश्यकता काहीशी तातडीने भासली असावी. अन्यथा धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सेवा कार्यात अग्रेसर राहून अगणित लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण करीत पूजनीय स्थान प्राप्त करण्याच्या मार्गावर खूप पुढे गेलेल्या माणसाचं, अर्थात संतोष नरहर काळे गुरुजी यांचे वयाच्या पासष्टीमध्ये निधन होणं मनाला पटणारं नाही. त्याचं जाणं अकाली म्हणता येत नसलं तरी अशा माणसाची समाजाला आणखी गरज होती, हे मात्र त्या दिवशी अंत्यसंस्काराला उपस्थित असलेला विविध क्षेत्रांमधील समुदाय पाहून दिसले. असो.
पुण्याच्या जवळच्या निगडीच्या काहीशा ओबडधोबड माळरानामध्ये प्राधिकरण नावाची एक सुनियोजित वस्ती उभारण्यात आली. नियोजनानुसार ही वस्ती चहूबाजूंनी फुलली सुद्धा. येथे समान शील… सख्यम न्यायाने एकसमान विचारधारेची माणसं एकत्रित येणंही साहजिकच आणि त्यांच्या नेतृत्वाची गरजही तितकीच नैसर्गिक.
नेमक्या याच पोकळीत बी. एस्सी. पदवी प्राप्त एक तरुण, अक्षरश: हरहुन्नरी कार्यकर्ता येऊन स्थिरावला आणि त्याने माणसं जमवायला सुरुवात केली. नोकरी हा त्याच्या पत्रिकेत अजिबात नसलेला ग्रह. त्यामुळे नोकरीच्या फंदात सहसा न पडता त्याने आपला बराचसा वेळ ज्योतिषाचा अभ्यास, गड-किल्ल्यांचा अभ्यास, पोवाडे गायन, इतिहास संशोधन आणि या क्षेत्रातील दिग्गज मंडळींच्या सहवासात आणि चौफेर भ्रमंती यात व्यतीत करायला आरंभ केला आणि हाच क्रम शेवटपर्यंत राहिला. नाही म्हणायला दहावीपर्यंतचे गणित-शास्राच्या शिकवण्या घेणे, किल्ल्यांची स्वत: काढलेली छायाचित्रे ग्रीटींग कार्ड स्वरुपात छापून त्यांची विक्री करणे, वैशिष्ट्यपूर्ण दैनंदिनी छापून घेणे, मसाला-लोणची घाऊक विक्री अशा अनेक उद्योगांतून त्याने पैसे वगळता अनेक गोष्टी कमावल्या! यातील अनेक उद्योग तर त्याने संपर्कातील तरुणांना चांगल्या अर्थाने ‘चांगलेच कामाला’ लावण्यासाठीच केले असावेत!
पण यातील शिकवणी घेणे या एका गृहोद्योगातून त्याच्या प्रभावक्षेत्रात कित्येक युवक युवती आले. मग हीच लहान मोठी मुले-मुली त्याच्यासोबत किल्यावर बागडताना दिसू लागली. काहीजण त्याच्या सोबत पोवाड्यात साथ करायला जाऊ लागली. हे कार्य करता करता अनेक मुलांच्यात असलेला कार्यकर्ता तो विकसित करूही शकला.
छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळी मुक्कामी राहून तेथे त्यांचा पोवाडा सादर करण्याची कल्पनाही त्याचीच. त्या कार्यक्रमासाठी साठी दरवेळी नवनवीन मुलांना तेथे घेऊन जाणे याकडे त्याचा कटाक्ष असे.
आपल्या भाग्यात काय लिहिले आहे किंबहुना आपल्या भाग्यरेषा आपल्या जीवनाला कुठे घेऊन जाताहेत, हे समजून घेण्याची सामान्यजणांची ओढ आणि निकड त्याने खूप आधी ओळखली होती. पत्रिका दाखवायला आलेल्या माणसांच्या पत्रिकेत समाजसेवेचा अगदी सामान्यातला सामान्य ग्रह जरी याला दिसला… की त्या माणसाच्या सामाजिक पत्रिकेतील भाग्यस्थानी एखादा तरी चांगला कर्मग्रह अलगद येऊन बसायचा. व्यक्तीची एकूण सर्वसाधारण मनोवृत्ती लक्षात घेऊन, त्या व्यक्तीला बिलकुल घाबरवून न ठेवता त्याचे भविष्य तो अचूक वर्तवायाचा. त्यामुळे त्याच्या घरी विद्यार्थ्यांचा, पालकांचा, राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा सतत राबता असायचा. जोडीला अनेक व्याधींवरील देशी उपचार ज्ञात असलेल्या या माणसाकडे औषधीविषयक सल्लाही उत्तम मिळायचा!
निगडी प्राधिकरणात महामार्ग ते रेल्वे रूळ असा श्री संत ज्ञानेश्वर महाराज चौक असा एक भाळा मोठा, रुंद रस्ता आहे. या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आहेत. या दुभाजकाच्या मधल्या जागेत कचरा टाकावा असे कुणाला कधी सांगावे लागले नाही. ही समस्या लक्षात घेऊन आपल्या या लेख नायकाने या जागेत शोभेची झाडे, वनस्पती लावाव्यात अशी कल्पना मांडली. ज्यांनी या कल्पनेला अनुमोदन दिले ते लोक ही बाब काही गांभीर्याने घेत बसले नाहीत. पण या महाशयांनी मात्र संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करीत राहून ते काम सुरु होईल असे पाहिले. आणि आरंभी स्वत: त्या कामाचा ठेका घेतला… अर्थात केवळ ठेका. अर्थप्राप्ती आणि हा माणूस यांत आधीपासून होता तो दुभाजक कायमच राहिला. आज हा दोन तीन किलोमीटर्सचा रस्ता वाहतुकीतला एक प्रेक्षणीय भाग आहे.
हा माणूस बहुदा जन्मत:च ज्येष्ठ वगैरे असावा. कारण तो तरुण कधी दिसलाच नाही, पण कायम तरुणांमध्ये दिसला, लहान मुलांमध्ये दिसला. पोरांना किल्ले दाखवायचे आणि मग ते दिवाळीत करायला लावायचे त्याला जमायचे. लहान मुलांचा काका व्हायला तर त्याने अजिबात वेळ लावला नाही. इतरांसाठी दादा तर तो होताच पण त्याच्यापेक्षा वयाने बरीच लहान पोरं त्याला एकेरीत सुद्धा हाक मारू शकायची, यातच त्यांचं सामाजिक यश सामावलेलं होतं.
डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा. त्यातून दिसणारे चमकदार डोळे. आणि त्या डोळ्यांतून त्याचं ते माणसांकडे पाहणे… एकदम स्पष्ट असे. बोलता बोलता उजवा हात नाकावरून घासत थेट कपाळापर्यंत नेणे, ही लकब. आणि हसणं अगदी खळखळून. सर्व वयाच्या लोकांसाठी त्याच्याकडे स्वतंत्र किस्से आणि विनोद होते.
त्याचे बाबा सुद्धा अगदी लहान मुलांची इंग्लिशची शिकवणी घेत असत. त्यामुळे हे लहानगेच पुढे बढती मिळून याचे विद्यार्थी बनत.
ज्योतिषाचा पसारा वाढत गेल्यावर हे मग गुरुजी म्हणून जास्त ओळखले जाऊ लागले. पत्रिका दाखवायला येणारा माणूस सुरुवातीला क्लाएन्ट असायचा आणि थोड्याच वेळात त्याचे स्नेह्यात रुपांतर व्हायचे.
एक अफाट उपक्रम काळे गुरुजींनी हाती आणि डोक्यात घेतला होता. आणि तो म्हणजे वेदअध्ययन आणि अध्यापन. त्यासाठी या आधुनिक काळात किती साधना करावी लागत असेल याची कल्पना आपल्यासारख्या सामान्य लोकांना येणार नाही.
पुण्याजवळच्या ग्रामीण भागात त्यांनी एक रीतसर आश्रमसुद्धा उभारला होता. यासाठीची आर्थिक तरतूद ही केवळ त्यांचे समाजाशी असलेले आणि जोपासलेले वैय्यक्तिक संबंध आणि प्रामाणिक हेतू यांमुळेच होत असावी. अन्यथा अर्थप्राप्तीचा कुठलाही मोठा स्रोत नसताना अशी मोठी कामे उभी राहणे, केवळ अशक्य. आणि एवढं सगळं होत असताना संसारिक माणूस सुख-दुखा:चे, वैद्यकीय समस्यांचे प्रसंग जे अपरिहार्यपणे भोगतो… ते त्यांनाही चुकले नाहीत. पण एक मोठा माणूस होण्याच्या त्यांच्या अखंड प्रवासात हे भोग त्यांनी शांतपणे पचवले! त्यांच्या निधनाची वार्ता कानी येताच त्यांच्या घराकडे लागलेली रीघ पाहून सौर्हादाची श्रीमंती कमावलेला मनुष्य समाजाने गमावला आहे, ही जाणीव गडद होत होती!
पण गेली काही वर्षे ते त्यांच्या संपर्कात येणा-या प्रत्येकाला एक स्वप्नवत योजना सांगत असतच… भव्य चौसष्ठ योगिनी मंदिर! या मंदिराची सर्व योजना, आराखडा, रेखाटने त्यांच्या खिशात कायम असत. या कामासाठी त्यांनी अनेक माणसं योजून ठेवली होती. ही भव्य योजना ऐकून ही योजना यशस्वी होईल किंवा कशी होईल, अशी काळजी ऐकणा-याच्या चेहर-यावर दिसू लागली की काळे त्याच्याकडे पाहून फक्त गूढ हसत… जणू म्हणत…. बरंचसं काम झालंय रे… तू फक्त तुझा वाटा उचल! आणि खरोखरच मागील काही दिवसांत चौसष्ठ योगिनीच्या मूर्ती तयार झाल्याही होत्या. आता योजनेचा पुढील अध्याय सुरु व्हायचा होता… पण संतोष काळे गुरुजींच्या श्वासांचा अध्याय समाप्त झाला !
☆ “व्योम व्यथांचे व्यापक” – (कवितासंग्रह) – कवी : श्री शरद कुलकर्णी ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : व्योम व्यथांचे व्यापक (कविता संग्रह)
कवी : शरद कुलकर्णी. मिरज
9673737044
प्रकाशक : प्रतिभा पब्लिकेशन, इस्लामपूर.
7588586676
मूल्य : रु. 200/_
सुखदुःखाचा ताळेबंद मांडणारे “ व्योम व्यथांचे व्यापक – — जगण्याच्या स्पर्धेत धावाधाव करताना आपल्याला स्वतःकडे पहायलाही वेळ असत नाही. अशा धकाधकीच्या जीवनात अंतर्मुख होऊन, स्वतःच्याच आयुष्याकडे तटस्थपणे पाहून, कविमनाच्या रसिकतेला धक्का न लावता, मनातील विचारघनांतून शब्दांचा शिडकावा करत व्यथांचे व्यापक असे व्योमही सुसह्य करणा-या कविता सादर करुन कवी श्री. शरद कुलकर्णी यांनी आपल्या सर्वांच्याच जगण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अलिकडेच त्यांचा ‘ व्योम व्यथांचे व्यापक ‘ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्या कविता पुस्तक रुपाने वाचकांसमोर आणून त्यांनी आपले मनच उघडे केले आहे. सुखदुःखाबरोबरच प्रेम, निसर्ग, आत्मचिंतन करणा-या कविता त्यांनी आपल्यासमोर आणल्या आहेत. आत्मसंवाद आणि आत्मानुभवाच्या या कविता वाचकालाही विचार करायला लावणा-या आहेत.
कलावंताला व्यक्त होण्यासाठी त्याच्या कलेचे माध्यम उपयुक्त ठरते. याठिकाणी कविने आपली कविता हेच माध्यम वापरुन आपल्या मनाचे पदर उलगडले आहेत. बहुना कवितेने कविला ‘आत्मज्ञाना’चा मार्ग दाखवला आहे असे वाटते. आयुष्यात आपल्याला नेमकं काय हवं आहे याचं ज्ञान आपल्याला व्हावं एवढच कवीचं मागणं आहे. म्हणून कवी म्हणतो,
“भूक समजावी माझी
आणि कळावी तहान
नाही आणिक मागणे
व्हावे इतुकेची ज्ञान “
…. कवितेनेही कवीचे मागणे मान्य केले आहे याचे प्रत्यंतर पुढच्या अनेक कविता वाचताना येतो.
जीवनातील सत्य काव्यात्म पद्धतीने समजावताना कवी म्हणतो,
“झाडांचे वैभव सरता
पाखरे उडून जाती
जखडून जायबंदी मी
शोधतो नव्याने नाती “
वैभव सरत असतानाही नवी नाती शोधण्याची कवीची वृत्ती जीवनावरील प्रेमाचे द्योतक आहे. त्याच वेळेला अंतीम क्षणाची जाणीव व्यक्त करताना कवी आपल्या आयुष्याकडे किती तटस्थपणे पाहू शकतो हे अनुभवायला मिळते. कवी लिहीतो आहे,
“नाही आक्रोश आकांत
नाही अश्रूंचे प्रपात
नेणिवेच्या पलीकडे
सारे अवकाश शांत “
कदाचित या तटस्थपणामुळेच कवी म्हणून शकतो की,
” सांभाळीत सर्व किनारे
मी व्रतस्थ कालसरिता
दैनंदिनीत जरी बंदिस्त
बंधमुक्त मी कविता “
अध्यात्माशी जवळीक साधल्यामुळेच अशी तटस्थ वृत्ती त्यांच्या अन्य कवितांमधूनही दिसून येते.
” कधी कधी चष्मा काढून
थोडेफार डोळेही पुसावे
तुका म्हणे उगी राहावे
एवढे तरी अध्यात्म जमावे “
किंवा
” आता प्रयोजन जगण्याचे,
आयुष्यालाच विचारावे
प्रत्येक ऋतू समजून घेत,
समजूतदार व्हावे “
या काव्यपंक्ती हेच दर्शवतात. या वृत्तीमुळेच कवी सहजपणे म्हणू शकतो,
” साफल्य, वैफल्य
दोन्हीही सापेक्ष
निरपेक्ष मन
असो द्यावे. “
तर कधी त्याला वाटते – –
” देह मानवाचा जरी व्यथा ईश्वरी भोगाव्या
डोळे संतांचे असावे, ठेवा दुःखाचा जपावा “
पण असे असले तरी कविलाही सामान्य माणसाप्रमाणे सुखदुःखे भोगावी लागतातच. मुळे त्यातून येणारे अनुभव कवितेतून शब्दबद्ध होत जातात. व्यावहारिक जगात पदोपदी येणारा खोटेपणाचा अनुभव मन उद्विग्न करुन टाकणारा असतो. त्यामुळे हे सगळं जगच खोटेपणाने भरुन राहिले आहे की काय अशी मनाची भावना होऊ लागते. सत्याचा क्वचित प्रसंगी येणारा अनुभवही असत्य वाटू लागतो. मनाला वाटते,
“स्वप्न खोटे, वास्तव खोटे
ऐहिकाचे ज्ञान खोटे
जिंकणारे वचनात अंतिम
सत्यही झूट खोटे “
पण याला पर्याय नाही हे जाणून घेऊन, जनरीतीचा आधार मदतीला घेऊन,
” तरी टेकविला माथा
केली तडजोड
सर्वत्र बिघाड
मान्य केला “
का ? तर दुसरे मन हेही बजावत असते की चुकली तरी ही माणसं आपलीच आहेत. सोसलं पाहिजे. हे भिन्न प्रवाह आपणच जोडले पाहिजेत. आपणच व्हावं,
” कधी सुजाण संयमी
कधी पूल समजूत
दोन विभिन्न मतांचा
पूल एक शांतिदूत “
…… पण ही शिकवण तरी कुठून मिळते ? डोळे उघडे ठेवून समजून घ्यायचा प्रयत्न केला तर सहज समजते की निसर्गच आपल्याला कितीतरी गोष्टी शिकवत असतो.
“कधी असावे तटस्थ
कधी राहून व्रतस्थ
अध्यात्म जगावे
तरुवत “
किंवा
” कधी चिमणी होऊन
घर मेणाचे बांधावे
क्षेमकुशल ठेवावे
अबाधित “
मग निसर्गही आपला वाटू लागतो. जवळचा वाटू लागतो. आपल्या मनाच्या विविध अवस्था या निसर्गाशी निगडीत आहेत असे वाटू लागते. एक पाऊसच मनाला चिंब करुन टाकत असतो आणि त्याची विविध रुपे ही जणू मनाचीच विविध रुपं असतात. कवी या पावसाशी इतका एकरुप होतो की शेवटी त्याला जाणवते की,
“पाऊस थेंब थेंबांचा पाऊस एक सरिता
निःशब्द करुन ठरली नीरव शांत कविता “
निसर्गाशी एकरूप झाल्यामुळेच कविच्या प्रेमकाव्यातही निसर्ग भरुन राहिलेला दिसतो. ‘ती’ कधी श्रावणाची बरसात होते तर कधी तिच्यात कधी तरुचा धुंद बहर दिसू लागतो. कधी ती गंधयुक्त शीतल झुळूक असते तर कधी शांत सरिता बनते. कधी ती आठवणींचा सैलाब बनते. तर कधी सुखाची सावली होऊन रिझवत असते.
या सर्व कवितांच्या अर्थ व्यापकपणे समजून घेण्यासाठी संपूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. पण याशिवाय अन्य काही कवितांचा उल्लेख करणे उचित ठरेल.
‘यार होतो मी नवा ‘ ही कविता खूप वेगळी वाटते. कारण या कवितेत कविने मराठी, हिंदी आणि उर्दू शब्दांच्या चपखलपणे केलेल्या वापरामुळे शेरोशायरी गझल आठवल्याशिवाय रहात नाही. ‘नुसतंच’ या कवितेतून कवितेच्या निर्मिती अवस्थेत कविच्या मनाची होणारी अवस्था व्यक्त झाली आहे. पावसाची विविध रुपे विविध अर्थांनी व्यक्त करणारी कविता म्हणजे ‘ आर्त पाऊस ‘
तर ‘ यश ‘ ही कविता एक उत्तम उपहासात्मक प्रेमकाव्य म्हणावे लागेल. ‘ प्रश्न ‘ हे गझलसदृश काव्य त्यातील शेरांमुळे उठावदार झाले आहे. ‘ महाकवी मी बाजारी ‘ या कवितेतून कविने काळाबरोबर होणारी फरफट योग्य शब्दात व्यक्त केली आहे. तर ‘ प्रारब्ध ‘ या कवितेतून कविने जणूकाही अपयशाची प्रामाणिक कबुलीच दिली आहे. परिस्थितीला सामोरे जाताना जी भूमिका घ्यावी लागते, मग ती आपल्याला पटो न पटो, त्याचे चित्रण ‘ लिपीत मौनाच्या ‘ या अतिशय छोट्या कवितेत केलेले दिसते.
कविचे मागणे तरी काय आहे ? ‘ येवो मरण कधीही ‘ या कवितेत कवी म्हणतो कवितेशी, शब्दांशी इमान राहो, बाकी मरणाची फिकीर नाहीच. केव्हाही येवो. आणि त्या पश्चात ओळख राहणार असेल तर कवी म्हणून ओळख रहावी. अशी ही प्राणप्रिय कविता कशी अंकुरते याचे रहस्य ‘ आतल्याआत ‘ या कवितेत कविने उलगडले आहे. ‘आतून ‘ आल्याशिवाय कविता अंकुरत नाही हे सांगताना कविने दिलेले दाखले कविमनालाच समजू शकतात.
‘ चिमणी ‘ ही आणखी एक, चिमणीसारखी छोटी कविता, पण खूप मोठा आशय घेऊन आलेली. थोड्याश्या यशाने हुरळून जाणे, भ्रमात जगणे व्यर्थ आहे हे शिकवणारी ही चिमणी. संध्याकाळ नेमकी कशी असते हे चित्रमय शब्दात रंगवणारी कविता म्हणजे ‘ संध्याकाळी ‘. कातरवेळेचे नेमके चित्र डोळ्यासमोर उभे रहावे अशी कविता ! तर भूतकाळात रमणारी ‘ भातुकली ‘ ही कविता, आठवणींचे बोट धरुन हरवलेल्या गावात जाणारी.
अशा किती कविता सांगू ? कवीची काही दैवते आहेत. त्यांच्यावरही कविने काव्य केले आहे. मी दुःखाचा कवी असे म्हणणारे कवी ग्रेस, स्वरांचे चांदणे पसरणा-या किशोरी अमोणकर , स्वतःच्या हस्तस्पर्शाने वाद्यांतून मनमोहक स्वर उमटवणारे संगीतकार मदन मोहन
आणि चंदेरी सूरांच्या तलम वस्त्राने मनाला वेढून टाकणारे तलत मेहमूद यांच्याविषयी प्रेम, आदर आणि त्यांच्यातील दिव्यत्वाचे दर्शन घडवणा-या कविता अत्यंत मोजक्या शब्दात त्यांचे व्यक्तिमत्त्व उजळून टाकतात.
‘व्योम व्यथांचे व्यापक ‘ या शीर्षक कवितेत कवी मनाच्या एकटेपणाची जाणीव होऊन परिस्थितीला सामोरे जाताना दिसतो. कवीच्या मनाचे घनाशी असलेले नाते, कधी निरभ्र आकाश तर कधी घुसमटलेले, मेघांचे मायावी रंग, निसर्गातील प्रतीके हे सारे समवेत असले तरी हे विसरता येत नाही की व्यथाही व्यापक आहेत. अवघे आकाश व्यथांनी व्यापून टाकले आहे. त्यातून कुणाचीही सुटका नाही. अवघ्या आयुष्याकडे पहायचे म्हणजे सुख-दुःखाचा ताळेबंद मांडायचा. आणि असा हिशेब मांडतानाही
कविला, ” अव्यक्ताला व्यक्त करत, कवितेच्या वाटेवरुन नियोजित ठिकाणी पोहोचायचं आहे. ” हा प्रवास कविनेच म्हटल्याप्रमाणे शब्दांशी इमान राखून आणि आपली काव्यमुद्रा उमटवून पूर्ण करायचा आहे.
‘पथ्य ‘ सांभाळून चालू असलेल्या या ‘उपचारांना’ नक्कीच यश येईल व अशीच सशक्त कविता कवीच्या लेखणीतून पाझरत राहील याविषयी शंकाच नाही.
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆.आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – बढ़ें अपन तूफानों में…।)
श्री हेमन्त तारे जी भारतीय स्टेट बैंक से वर्ष 2014 में सहायक महाप्रबंधक के पद से सेवानिवृत्ति उपरान्त अपने उर्दू भाषा से प्रेम को जी रहे हैं। विगत 10 वर्षों से उर्दू अदब की ख़िदमत आपका प्रिय शग़ल है। यदा- कदा हिन्दी भाषा की अतुकांत कविता के माध्यम से भी अपनी संवेदनाएँ व्यक्त किया करते हैं। “जो सीखा अब तक, चंद कविताएं चंद अशआर” शीर्षक से आपका एक काव्य संग्रह प्रकाशित हो चुका है। आज प्रस्तुत है आपकी एक ग़ज़ल – दिल को सुकूँ मिले…।)