सौ. प्रांजली लाळे
जीवनरंग
☆ भिक्षा… ☆ सौ. प्रांजली लाळे ☆
आजही त्याला आठवतोय तो दिवस.. अगदी लख्खपणे.. गावातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या गेटपाशी झोळी घेऊन उभा राहिलेला तो.. भिक्षा घेण्यासाठी झोळी पसरवलेला, आतुरतेने साठे काकूंची वाट पहात होता..
काकूही त्याची वाट पहायच्या. त्याचं गोजिरवाणे रुप अगदी मनाला स्पर्शून जायचं. खुप कमी वयात पोरका झालेला श्रीधर पाचवीच्या वर्गात शिकत होता. गावातील एका मराठी शाळेत शिकताना मास्तरांचा खरपूस मार खाणंही त्याला गोड वाटे. घरी रागावणारं आपलं असं कोणी नव्हतंच. कोकणातील एका छोट्या गावात त्याचं घर होतं.. डोक्यावर छत होतं.. पण स्वयंपाक रांधायला कोणी नव्हतं. घरातील साफसफाई करायचा.. गावात ज्याला मदत लागेल तशी कामंही करुन द्यायचा. जिथे कमी तिथे श्रीधर. गावातील माणसंही प्रेमळ होती. पण कोणी जास्त श्रीमंत तर कोणी खुप गरीब.
साठेकाकू म्हणजे गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या सुविद्य पत्नी होत्या.
भिक्षा मागून जगणाऱ्या श्रीधर बद्दल अपार माया दाटून येई त्यांच्या मनात. घरात आर्थिक सुबत्ता होती. मुलंही शहरातील चांगल्या महाविद्यालयात शिक्षण घेत होती. कशाचीच कमी नव्हती. माहेरी गरीबी होती. तरीही त्या काळात काकूंनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. पण त्याकाळी पुरुषी अहंकारापुढे स्त्रियांना नतमस्तक व्हावे लागे. ‘काय कमी आहे आपल्याला? सगळं काही तर आहे.. ‘ असे म्हणून घरातील चार भिंतींमध्ये कोंडले गेलेले जीवन होते साठे काकूंचे.. घरातील कामं आवरली की पुस्तकं, वर्तमानपत्रं वाचण्यात वेळ घालवायच्या. पण पुढे शिकण्याची मनातील सुप्त इच्छा कधी कधी उफाळून यायची..
एक दिवस श्रीधर दारात आला. भिक्षांदेही म्हणत.. घरातील भाजी पोळी देण्यासाठी दरवाजा उघडला.. मग विचारपूस केल्यावर समजलं की त्यालाही शिकण्याची प्रचंड आवड आहे. खूप छान वाटले काकूंना. पण तरीही त्यांनी दटावले.. “हे बघ बाळा, तुला जर मोठा साहेब व्हायचे असेल तर कष्ट करावे लागतील.. आजपासून तुला मी भिक्षेऐवजी पुस्तकं वाचायला देईल.. तुझी पोटाची भुक तर भागेल पण बुद्धीच्या भुकेचे काय?” दरवेळी काकूंकडून नवनवीन पुस्तके वाचायला मिळू लागली, कधी शाळेची फी तर कधी वह्या-पुस्तके तर कधी गणवेषही!!
श्रीधर अनाथ असला तरी मेहनती होता. अभ्यासात हुशार होता. पण पोटात काही नसले की काही सुचायचे नाही त्याला. सहावी सातवीपर्यंत भिक्षा मागून त्याचे पोट भरत असे.. तो गावातील सर्व काकूंचा खरंच ऋणी होता.. पण साठे काकूंकडून मिळालेली पुस्तकरुपी भिक्षा त्याला आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.. दहावीला श्रीधर तालुक्यातून पहिला आला.. हा आनंद कोणाला सांगावा, असं त्याचं आपलं कोण होतं त्याला !!
साठे काकूंना बाहेरुनच आवाज दिला.. ”काकू’.. आज मला भिक्षा नको.. फक्त तुमचे आशीर्वाद हवेत.. “
काकूंनी आतून आवाज दिला.. “श्रीधर बाळ” क्षीण आवाज आला आतून.. श्रीधर आत गेल्यावर त्यानं काकूंना तापाने फणफणलेलं पाहिलं.. पटकन मीठ-पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेऊ लागला.. एक तासानं काकूंना थोडंफार बरं वाटू लागलं.. आताशा त्याला स्वयंपाकही छान करता येऊ लागला होता. काकूंना त्यानं कणकेची पेज बनवून खाऊ घातली.
तेवढ्यात साठे काका आले..
अतिशय अहंकारी माणूस. श्रीधर सारखा गरीब मुलगा, तोही घरात बघून खूपच संतापले व त्याला घराबाहेर होण्यास सांगितले.. श्रीमंत गरीबांमधली दरी कधी मिटणार होती कुणास ठाऊक. असो..
श्रीधरचं पुढील शिक्षण स्कॉलरशिपवर पुर्ण झालं. म्हणतात नं लोखंडाचे सोने व्हायला परीसस्पर्शाची गरज असते.. तसेच काही तरी साठे काकूंनी झालेलं होतं.
श्रीधरनं महाविद्यालयात शिकतांना एका दुकानात नोकरी धरली.. ‘कमवा व शिका’ ह्या प्रेरणेतून तो द्विपदवीधर झाला. तिथेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. यु. पी. एस. सी. ही पास झाला. लवकरच याच जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाला.
सुखाचे दिवस आले. पण गावातील ते जुने दिवस तो कधीच विसरू शकत नव्हता. जीवनाच्या ज्या वळणावर तो येऊन ठेपला होता ते वळण अतिशय सुंदर होते. अनेक हालअपेष्टा, अवहेलना, कष्ट.. वेळी खाण्यास काहीच न मिळाल्याने पाणी पिऊन झोपणे सर्व काही आठवून त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं.. साठे काकूंची ती भिक्षा खुप महत्वाची ठरली त्याला आत्मनिर्भर होण्यासाठी !!
आज त्याची पावलं आपल्या गावाकडे वळली.. गावातलं घर तसंच उभं होतं त्याची वाट पहात. घरातील धूळ झटकली.. घर डोळे भरुन पाहून घेतलं.. गावात फेरफटका मारताना साठे काकूंना आवर्जून भेटला.. त्याच्या आयुष्याच्या महासागरातील दिपस्तंभ होत्या त्या. काळ पुढे सरकला होता.. पण त्या तिथेच होत्या, स्थितप्रज्ञं..
साठे काकांना जाऊन दोन वर्षे लोटली होती.. काकू एकट्याच रहात होत्या. दोन्ही मुलं अधुनमधून यायची.. पण बाकी अशा एकट्याच रहायच्या तिथे त्या.. श्रीधरनं वाड्याच्या दरवाजाची कडी वाजवली. थोड्या वेळाने दरवाजा उघडला..
काकूंनी प्रथम ओळखलंच नाही.. उंच, रुबाबदार, सुटबुटातला साहेब माणूस.. काकूंसमोर नतमस्तक झाला. श्रीधर काकूंच्या पदस्पर्शाने कृतकृत्य झाला. काकूंचे थकलेले हात डोक्यावरुन फिरले आणि श्रीधरच्या डोळ्यातील अश्रुंना वाट मिळाली, “काकू आज मी तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जायला आलोय. तुम्ही नाही म्हणणार नाहीत ही आशा आहे. ”
“नाही रे बाळा, मी ह्या वाड्यातच ठिक आहे.. आपली स्वप्नपुर्ती इथेच तर झाली. सवयीचं आहे हे घर.. “
“पण आता मला तुमच्या मार्गदर्शनाची खरोखर गरज आहे. तुम्ही केलेल्या भिक्षारुपी मदतीची परतफेड करायची आहे. “
खुप आग्रहानंतर साठे काकू शहराकडे निघाल्या.. ‘तिथे शहरातही तुम्ही आजुबाजुच्या झोपडपट्टीतील मुलांना असंच मार्गदर्शन करणार आहात.. ‘ असं श्रीधरनं म्हणताच काकूंना कोण आनंद झाला, माहिती आहे.. ? त्यांची पावलं आपोआपच शहराकडे वळाली..
© सुश्री प्रांजली लाळे
मो न. ९७६२६२९७३१
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈