सुश्री ज्योति हसबनीस
डिजिटल माळा
(प्रस्तुत है सुश्री ज्योति हसबनीस जी का अप्रतिम आलेख “डिजिटल माळा ” ।)
गेले कित्येक दिवस घोकत होते एक काम हातावेगळं करण्याचं. निवांतपणाच मिळत नव्हता म्हणा किंवा मुहूर्त लागत नव्हता म्हणा, सततच त्या कामाची चालढकल होत होती. पण आज अगदी चंगच बांधला त्याचा पुरता फडशा पाडण्याचा. कपाटं आवरणं, जुन्या नको असलेल्या सामानाची विल्हेवाट लावणं, विल्हेवाट लावलेल्या सामानाला घरी घेऊन जाणाऱ्या घरच्या मदतनीस मंडळींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मनात आलेला अपराधी आवंढा शिताफीने आणि मोठ्या समाधानाने गिळणं हे तर अंगवळणीच पडलं होतं पण मनात जी साफ सफाई योजली होती ती होती ‘डिजिटल माळ्याची’ ! आणि तिला मात्र प्रचंड वेळ लागणार होता. साफसफाईची ती प्रक्रिया म्हणजे प्रचंड गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असणार होती. असंख्य फोटोजने खचाखच भरलेली गॅलरी रिती करणं म्हणजे महा कठीण काम!
फुलाभोवती भिरभिरणाऱ्या फुलपाखराशी मन रेंगाळणार होतं, असंख्य पक्ष्यांची आकाशीची नयनरम्य झेप मोहात पाडणार होती, डोळ्यांत न मावणारा फुलांचा बहर पुन: पुन: डोळ्यांत साठवला जाणार होता, ऋतूनुसार कात टाकून अधिकच देखणी झालेली बाग क्षणोक्षणी खिळवून ठेवणार होती, मैत्रिणींबरोबर घालवलेले असंख्य आनंदाचे क्षण, त्यांचे फुलून आलेले लकाकते चेहरे पुन: ते क्षण जिवंत करणार होते, उगवत्या रविबिंबाच्या, त्याच्या रंगोत्सवाच्या विविध छटांनी नटलेली अगणित दृष्य बघत पुन: एकदा विधात्यापुढे नतमस्तक व्हायला होणार होतं, उजाडणारा प्रत्येक दिवस अधिकाधिक रंजक करणारी आणि रात्र उत्तरोत्तर रंगवत जाणारी अप्रतिम शब्द चित्रं परत एकदा त्यांच्या प्रेमात पाडणार होती, जिवलगाबरोबर काढलेले सेल्फीज, त्याच्याबरोबर सैर केलेल्या असंख्य जागा तिथल्या सौंदर्याची भुरळ पाडत परत तिथेच खेचून नेणार होत्या, गोजिरवाण्या नातींचे लडिवाळ, खट्याळ भाव ल्यालेले गोंडस चेहरे तिथेच खिळवून ठेवणार होते, एक ना अनेक असंख्य गोष्टी, सगळ्याच अगदी जिवापेक्षा जास्त ! टाकणार काय, ठेवणार काय, खरंच मी नेमकं काय करणार असा प्रश्न पडला मला! . Digital माळा कसला …तो तर माझा SAFE DEPOSIT VAULT होता! सारा माझा खजिना जपून ठेवला होता मी तिथे, आणि त्याची कसली साफ सफाई? आपल्या साऱ्या मौल्यवान गोष्टी कशा आपण डोळे भरून बघतो, आणि त्या त्या मधुर क्षणांच्या आठवणीत रमत परत नीटनेटक्या ठेवून देतो, अगदी तस्संच मी केलं. मधुर स्मृतींच्या हिंदोळ्यावर मजेने झुलत झुलत माझी DIGITAL साफसफाई तशी झाली …विस्मृतीचा धुरळा साफ करून …आणि सारा माळा लखलखीत करून …! भूतकाळातल्या साऱ्या सुंदर क्षणांनी पुनश्च आनंदाने माझ्याभोवती फेर धरला आणि एका वेगळ्याच जगात मी हरवून गेले! तो माळा नव्हताच मुळी …माझा TREASURE BOX होता! अक्षरश: कुबेराचा FEEL घेऊन निवांssssत झाले मी अगदी!
© ज्योति हसबनीस