☆ “आकाशातला ‘नीत’ळ स्वर…” ☆ सुश्री वैशाली पंडित ☆
कधीकधी आपल्याला लाभलेलं मैत्र फारच अकल्पित असतं. माझ्या मैत्रीच्या वर्तुळात अशीच एक सहेली माझ्या हातात हात गुंफून गेली चाळीस वर्षे उभी आहे.
तिची माझी ओळख रत्नागिरी आकाशवाणीच्या केंद्रात झाली. तेव्हा मी खारेपाटणला वास्तव्याला होते. माझे पती श्रीनिवास तिथल्या शेठ म. ग. हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक होते. त्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. शरद काळे हे सत्यकथा या गाजलेल्या मासिकाचे लेखक होते. त्यांचे अनेक कार्यक्रम रत्नागिरी आकाशवाणीवर होते. त्यांनी माझ्यातला होतकरू लेखक ओळखला होता. अशाच एका आकाशवाणी फेरीत त्यांनी माझं नाव तिथे सुचवलं.
“पंडितबाई, तुम्हाला आकाशवाणीवरून कार्यक्रमासाठी आमंत्रण येईल हं. कवितेचे विषय तेच देतील. “असा निरोप त्यांनी आणला आणि मी उत्कंठतेने त्या निमंत्रणाची वाट पाहू लागले.
खरंच एक दिवस तो लिफाफा आला. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. कवितेचा विषय होता, ‘कुटुंबनियोजन’. तेव्हा तर मी नवखीच होते. दे दणादण सुचवल्या घरी सुखी राहण्यासाठी कविता ‘बनवल्या’. काव्यवाचनाची जोरदार प्रॕक्टीस वगैरे करत नवऱ्याला जेरीस आणलं. आणि अखेर तो दिवस आला.
रत्नागिरी आकाशवाणीच्या त्या इमारतीत पाऊल टाकलं. पहिल्यांदाच आकाशवाणीची इमारत बघत होते. गेटवर व्हिजिटर्स रजिस्टर भरणं वगेरे नवीनच होतं. आत गेले. कार्यक्रम विभागात माझं पत्र दाखवलं.
“वैशाली पंडित ना ? ये ये. मीच रेकाॕर्डिंग करणार आहे. घरकुल कार्यक्रम मीच घेते. “असं म्हणत एक प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या स्त्रीने माझं स्वागत केलं.
‘…याच त्या ‘नीता गद्रे. ‘
प्रथमदर्शनीच मला त्या खूप आवडल्या. त्यांचा आवाज किंचित बसका तरीही आत्मविश्वास दाखवणारा होता. व्यक्तिमत्वात ठामपणा आणि आपलेपणा यांचं मजेदार रसायन होतं. कुरळ्या केसांची महिरप गोऱ्यापान चेह-यावर खुलत होती. वेषभूषेतली रंगसंगती त्यांची अभिरूची दाखवत होती.
माझ्या हातातलं स्क्रीप्ट घेऊन त्यांनी वाचलं.
“छान समजून घेतलायस विषय. मस्त झाल्यात कविता. सरकारी विषय तू सोपेपणाने कवितेत मांडलायस. “अशी दाद त्यांनी दिल्यावर मला जो काय आनंद झालाय तो झालाय.
त्या सफाईनं रेकाॕर्डींग रूमकडे निघाल्या. त्या चालण्यात डौल होता. त्यांच्या हालचाली फार सहज पण पाॕलिश्ड होत्या. मला रेकाॕर्डींग रूम, तिथलं टेबल, तिथला माईक सगळं नवीन होतं. आधी स्वतः त्या माझ्याबरोबर आत आल्या. कागद कसे धरायचे, कागदांचा उलटताना आवाज कसा होऊ द्यायचा नाही याचं मला ट्रेनिंग दिलं.
“आता वाचायचं बरं का बिनधास्त. काळजी करू नकोस. छानच होईल रेकाॕर्डींग. “असा धीर त्यांनी दिला.
जाड काचेच्या पलिकडून उभ्या राहून नीता गद्रेंनी मला सुरू कर अशी खूण केली.
एक दोन रिटेक झाले तरी न चिडता मला प्रोत्साहन देत त्यांनी रेकाॕर्डींग संपवलं.
… ती नीता गद्रेंशी माझी पहिली भेट.
नंतर मी आकाशवाणीच्या निमंत्रणाची वाट बघायला लागले ती फक्त नीता गद्रेंशी भेट व्हावी म्हणून.
नंतरच्या सगळ्या भेटीत नीताताईंमधलं साहित्यरसिकत्व मला खूप समजत गेलं. या बाई केवळ आकाशवाणीच्या औपचारिक अधिकारी नाहीत. स्वतःला साहित्याची उत्तम जाण आहे. श्रोत्यांना सकस कार्यक्रम ऐकवण्याचं भान आहे. ती आपली जबाबदारी आहे, तीही सरकारी चौकटीत राहून पूर्ण करायचं आव्हान आहे हे त्या जाणून होत्या. करियरवर मनापासून प्रेम करणा-या नीताताईंनी माझ्या मनात खास जागा निर्माण केली.
त्यांचा ‘तांनापिहि’ हा कथासंग्रह माझ्या वाचनात आला आणि मी त्यांची फॕनच झाले. विशेषतः त्यातली ‘ओझं’ही कथा तर मला बेहद्द आवडली होती. गृहिणीला मध्यवर्ती व्यक्तिरेखा करून लिहिलेली ही कथा मला स्पर्श करून गेली. मी लगेचच त्या पुस्तकावर अभिप्राय लिहिणारं पत्र त्यांना पाठवलं.
लगोलग त्याचं उत्तरही नीताताईंकडून आलं. त्यात त्यांनी, ‘तुला मी माझ्या आणखीही काही पुस्तकांची नावं देते तीही वाच. (भोग आपल्या कर्माची फळं )’ असं मिश्किलपणे लिहिलं होतं. ते मला जामच आवडलं होतं. नंतर खरोखरच ती फळं मी चाखली.
त्यांचं ‘एका श्वासाचं अंतर’ हे पुस्तक तर एका जीवघेण्या आजारावर मात केलेल्या जिद्दीची कहाणी आहे. ते पुस्तक मी माझ्या परिचयातील काही डाॕक्टर्सनाही वाचायला दिलं होतं. एका प्रसिद्ध रूग्णालयात पेशंटला किती हिडीसफिडीस केलं जातं, अक्षम्य अशी बेफिकीरी दाखवली जाते याचा पर्दाफाश त्यांनी निर्भीडपणे केला होता. नंतर त्या रूग्णालयाच्या व्यवस्थापनाने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त केली होती, आणि यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची जाहीर हमी दिली होती असं ही समजलं.
नीताताई रत्नागिरी केंद्रावर तेरा वर्षे होत्या. नंतर सांगली, कोल्हापूर आणि मुंबई अशा सेवा करत त्या निवृत्त झाल्या. मध्यंतरी आमची गाठभेट बरीच वर्ष नव्हती. पुन्हा एकदा मुंबई आकाशवाणीवर त्या असताना त्यांनी मला माझ्या एका कवितेसाठी खास संधी दिली. परत आम्ही जुन्या उमाळ्याने भेटलो.
आता त्या निवृत्त जीवनात स्वतःचे दिवस अनुभवत आहेत. नभोनाट्य, ब्लाॕग्ज, लेखन, वाचन, प्रवास यांत सुरूवातीची वर्षे आनंदात गेली. आता शारीरिक थकव्याने मर्यादा आल्यात. आमचा फोनसंपर्क वाढला आहे. निवृत्तपणाच्या इयत्तेत मी त्यांच्याहून आठदहा वर्ष मागेच असले तरी आम्ही अगं तुगं करू लागलो आहोत. एकमेकींची हालहवाल जाणून घेत आहोत. चॕनेलवरच्या मालिकांवर यथेच्छ टीका टीप्पणी करून खिदळतो आहोत, राजकारणातल्या सद्य स्थितीवर फुकटच्या चिंता वहातो आहोत, जीव कासावीस करून घेत आहोत. मतदान केल्याच्या काळ्या शाईच्या मोबदल्यात इतकं तरी करतोच आहोत.
… एक मैत्रकमळ असं पाकळी पाकळीने फुलत गेल्याचा आनंद दोघीही अनुभवतो आहोत !
© सुश्री वैशाली पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈