(आज प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी की गुरूपौर्णिमा पर विशेष चारोळी लेखन। )
☆ गुरुपौर्णिमा . . . ! ☆
*गुरूपौर्णिमा विशेष चारोळी लेखन*
1
माता, पिता, मानू
दोघे आद्य गुरू
नाम संकीर्तन
जीवनात स्मरू.. .
2
गुरु विना आहे
जीवनाचा माठ
जैसा निरर्थक
जलाविना काठ. . . . !
3
गुरू आहे साद
संस्कारांची वात
अंतरी निनाद
तेजाळली दाट. . . . !
4
आदर्शाची ठेव
गुरूभाव दुजा
तिच्या पुढे कुणी
ठरू नये खुजा. . . !
5
शिष्याचे जीवन
गुरु एक नाम
आळसाने कधी
गाठू नये धाम. . . . !
6
गुरू आहे पारा
अंतरी मतीचा
दाखवी चेहरा
नैतिक नितीचा.. . . !
7
ज्ञान देण्या येई
जीवनी शिक्षक
देई अनुभव
तोच परिक्षक. . . . !
8
मौज मजेतही
नाही कुणा रजा
मित्र होता गुरु
वेळ काळी सजा.. . !
9
ज्ञानदाता आहे
गुरूचेच रूप.
ठेवावे सोबत
त्याचे निजरूप. . . . !
10
आज्जी,मामी,काकी
गुरू दृष्टी क्षेप
मायेमध्ये दडे
लेकराची झेप. . . !
11
नावे कोणाला
कोणी गुरूजन
घेणार्याने घ्यावे
दात्यानेच मन .. . . !
12
कला,क्रिडे मध्ये
हवा अविष्कार
अनुभवी व्यक्ती
गुरू जाणकार. . . . . !
13
दिल्यानेच मिळे
केल्यानेच होई
ज्ञान, गुण, किर्ती
गुरूपदा नेई .. . . !
14
परिसाच्या संगे
लोह आकारते
गुरू कांचनाने
देह साकारते. . . . !
15
नसावा विवेक
असावा विचार
गुरू नाम घेता
नसावा विकार. . . . !
16
गुरु माझी आई
गुरू माझा बाप
ओळखला ईश
हरे भवताप . . . . !
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798.