मराठी साहित्य – कविता **पडघम** श्रीअशोक श्रीपाद भांबुरे
तुझा हा रेशमी मुखडा, वाटतो चंद्रमा चमचम
तुझे हे पाय चंदेरी, हृदयभर छेडती सरगम
कधी ना माळला गजरा, लावली ना कधी लाली
तरी प्रेमात का वेडी, सूरमय शाम झालेली ?
गुलाबी पाकळ्या ओठी, लागला सूर हा पंचम
तुझे हे पाय चंदेरी, हृदयभर छेडती सरगम
अशी ही भरजरी वस्त्रे, अंगभर तू जरी ल्याली
नशा ही सांडते अवखळ, तप्त ओठात उरलेली
ऋतुंना ठाव लागेना, कोणता हा तुझा मोसम
तुझे हे पाय चंदेरी, हृदयभर छेडती सरगम
वयाला बंधने आली, जाणती आज तू झाली
तुझ्यावर रोखती नजरा, होय हा जीव वरखाली
मनाला शांतता कोठे?, अंतरी वाजती पडघम
तुझे हे पाय चंदेरी, हृदयभर छेडती सरगम
सुखाला अंत ना उरला, पाहिला स्वार घोड्यावर
सरसरे अंगभर काटा, स्तब्ध हा देहही पळभर
फुलवण्या बाग ही आता, हात हे आपुले सक्षम
तुझे हे पाय चंदेरी, हृदयभर छेडती सरगम