सुश्री ज्योति हसबनीस
आशिर्वादाचं पाकिट
(e-abhivyakti welcomes Mrs. Jyoti Hasabnis who is a renowned Marathi Author/Poetess. Her articles are being published in Sakal Nagpur Edition.)
कपाट आवरता आवरता एक रिकामं पाकिट दिसलं . जसं जपून ठेवलंय अगदी ! मनात विचार येतोय , रिकामं पाकिट कशासाठी जागा अडवून बसलंय फेकायला हवंय तेवढ्यात त्याच्या अक्षराने लक्ष वेधलं , बारीक बारीक डोळ्यांनी त्यावरचा मजकूर वाचला , चष्मा डोळ्यावर चढवला , पुन्हा पुन्हा वाचलं , हळूवार हात फिरवला त्यावर …आईच्या सुरेख हस्ताक्षरांतलं तोंड भरून आशिर्वाद देणारं पाकिट होतं ते ! होतंच ते जपून ठेवण्यासारखं ! ते पाहिलं आणि मन जाऊन पोहोचलं माहेरच्या अंगणात ! आठवणींचे लक्षावधी फुटवेच फुटले मनात !
माहेरचं वारं काही वेगळंच असतं का ?
अधिकच मंदशीतल , गंधभरलं ! घराच्या कट्ट्यावरच्या रंगलेल्या तिच्याबरोबरच्या गप्पा अजूनही मनात ठाण मांडून आहेत अगदी बकुळफुलांच्या गंधासारख्या ! मुलांच्या धबडग्यात जो संध्याकाळचा वेळ मिळायचा तो असा खास दोघींचा ! संध्याकाळचं भणाण वारं अंगावर घेत जिव्हाळ्याच्या विषयांना कुरवाळत, कधी दिवेलागण व्हायची कळायचं देखील नाही !
माहेरचं आभाळ काही वेगळंच असतं का ? त्या आभाळाच्या छताखाली ना एक अन्नपूर्णा असायची ! आभाळाएवढे अमाप लाड पुरवणारी , लाडाकोडाने खाऊ घालणारी , सुगरण हातांची ! आईचा हात जादूचा असतो का ? तशीच आमटी मी पण करते पण आईच्या आमटीची सर तिला कधीच नसते , तसाच मसालेभात मी पण करते पण मसालेभात असावा तर अस्साच असं तिच्या मसालेभाताचा पहिला घास घेताक्षणी प्रकर्षाने जाणवायचं ! आणि सांजा …तो तर खास तिच्याच हातचा , त्याची सजावट तर तिनेच करावी ! खरंच तिच्या हातात जादूच होती !
माहेरचं घड्याळ खुप फास्ट असतं का ? , कॅलेंडर मधल्या तारखांना पुढे पुढे जायची खुप घाई झालेली असते का ?आत्ताच तर आलो आणि निघायचा दिवसही आला , इतक्या लवकर हे असं कसं झालं हे एक न सुटलेलं कोडंच !
ओट्यापाशी आई असणार पण तिचं चित्त स्वैंपाकात नसणार , नजर सतत माझ्या हालचालीवर , मध्येच ,अगं कॉफी घेते का , ह्या प्रश्नाने मी चमकणार , कॉफी आणि ह्या वेळी ..? आता उमगतेय ह्या प्रश्नामागची तिची मन:स्थिती .. तिची घालमेल !
माहेरचं प्रेम इतकं हळवं असतं का ?
दरच वेळी निरोप घेतांना तिच्या डोळ्यात दाटलेली आभाळमाया वाटभर माझ्या सोबत असायची ! आतल्या आत हुंदके जिरवणारी ती माऊली मला जवळ घेत हळूच तिचं ते आशिर्वादाचं पाकिट माझ्या हातात सरकवायची ! आणि …तिचं सुंदर हस्ताक्षरातलं , खुप छान प्रेमाचे चार बोल लिहीलेलं पाकिट घेतांना मला काय वाटायचं ते शब्दांतच व्यक्त नाही करू शकणार मी ! गाडीत देखील सारखा अधून मघून त्या पाकिटावरून हात फिरत असायचा माझा ! मुलं निरागसपणे विचारायची , आई आजीने किती पैसे दिले , त्यांना काय माहित ..माझ्यासाठी ते पैशाचं पाकिट नव्हतं , माझ्या आईचा आशिर्वाद होता तो तिच्या प्रेमळ शब्दातून कायम माझ्याजवळ असणारा !
आज ते रिकामं पाकिट दिसलं , तिचं सुरेख अक्षर , प्रेमळ शब्द बघितले , आणि असं आठवणींचं मोहोळ उठलं …
आई किती व्यापून असते ना आपल्याला कितीही काळ लोटला तरी !
© ज्योति हसबनीस