मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “No” म्हणजे… भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “No” म्हणजे… भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
November महिना सरला… !
संपुर्ण 12 महिन्यात एव्हढा एकच महिना आहे जो “No” ने सुरू होतो… !
पण हा, “No” दरवेळी नकारात्मकता घेऊन येतो असं नाही…. !
“No” चा बोर्ड, जरासा फिरवला तर तो “On” होतो…
No म्हणजे… No worries..
No म्हणजे… No Guilt
No म्हणजे… No Hate
No म्हणजे… No Expectations
No म्हणजे… No Selfishness
No म्हणजे… No hard feelings !
असो ….
परवा एका जुन्या मित्राचा फोन येऊन गेला सहज बोलताना तो म्हणाला की नुकताच त्याचा वाढदिवस झाला… सगळे विचारतात तोच कॉमन प्रश्न मी त्याला विचारला आता तुझं वय किती झालं ?
त्याने वय सांगितलं… !
मनात आलं, आपण जन्माला आल्यानंतर आजपर्यंत जे काही जगलो, त्याला वय म्हणून आपण गृहीत धरतो; परंतु त्या अगोदरचे आईच्या सहवासातले नऊ महिने कोणीच का गृहीत धरत नाहीत ?
आकड्यात सांगायचं झालं, तर जन्मानंतर आपण आजपर्यंत जे जगलो, ते अधिक नऊ महिने हे आपलं आकड्यातलं वय… !
खरंतर वय वाढल्याने माणूस मोठा होतच नाही, तो मोठा होतो मॅच्युरिटी वाढल्याने… !!!
– – दुसऱ्याची प्रगती पाहतानाही आनंद होणं म्हणजे मॅच्युरिटी…
– –ज्याचा काल संध्याकाळी अस्त झाला आहे, त्याचा आज सकाळी उदय पाहणे यात आनंद वाटणे म्हणजे मॅच्युरिटी… !
– – स्वतःला वेदना झाल्यानंतर तर सगळेच रडतात; परंतु दुसऱ्याची वेदना पाहून आपल्या डोळ्यात पाणी येणं म्हणजे संवेदना… वेदना आणि संवेदने मधला फरक कळणं म्हणजे मॅच्युरिटी…
जन्माला येताना निसर्गतः शरीरात 270 हाडं असतात… माणसाचं वय वाढलं की हीच हाडं आतल्या आत जुळून 206 होतात…
– – अगदी याचप्रमाणे वाढत्या वयाबरोबर अपेक्षांची संख्या सुद्धा आपण हळूहळू कमी करायला हवी… थोडं आपणही, हाडांप्रमाणेच जुळवुन घ्यायला शिकायला हवं… हेच तर निसर्गाला सांगायचं नसेल यातून ?
.. आपण जिवंत असताना सोबत घेऊन चालतो ते आपलं आस्तित्व… !
.. आयुष्य जगत असताना; दुसऱ्याला आपण किती दिलं आणि दुसऱ्याकडून किती घेतलं याच्या बेरीज आणि वजाबाकी करून; मृत्यूनंतर जे शिल्लक राहतं, ते आपलं व्यक्तिमत्व… !!
…. फरक फक्त दृष्टिकोनाचा !
शाळेच्या चार भिंतीत काटकोन, त्रिकोण, लघुकोन आणि चौकोन सर्व कोन शिकवतात…
पण दृष्टिकोन शिकण्यासाठी आयुष्यातल्या बिन भिंतीच्या शाळेत अनुभवच घ्यावे लागतात… !
शेवटी अनुभव म्हणजे तरी काय ?
बरोबर येण्यासाठी, आपण सतत केलेल्या चुकांना दिलेलं गोंडस नाव, म्हणजे अनुभव… !!!
असो.. या महिन्यातल्या चुका – अनुभव, कोन – दृष्टिकोन, वेदना – संवेदना, अस्तित्व – व्यक्तिमत्व या सर्व शब्दांचा अनुभव पुन्हा एकदा या महिन्यात आपल्यामुळे घेता आला.
वेदना – संवेदना
रस्त्यावर लहान मुलीसोबत राहणारी एक ताई. कधी फुगे विकून कधी भीक मागून गुजराण करायची.
एका गुरुवारी शंकर महाराज मठाकडे गेलो, तेव्हा कळलं, मुलीच्या आईला एका चार चाकी गाडीने उडवलं आणि तिचा जागीच अंत झाला. खूप हळहळ वाटली आणि बारा तेरा वर्षाच्या या मुलीचं आता कसं होणार ? अशी चिंता वाटली.
तिथं मागायला बसणाऱ्या आज्या आणि मावश्यांकडे मी ही चिंता व्यक्त केली. त्यातली एक प्रौढ मावशी पुढे आली आणि म्हणाली, ‘ काई काळजी करू नगा डाक्टर, या पोरीला समजायला लागल्यापासनं ती मला मावशी म्हंती… आता हीजी आई मेली, मावशी म्हणून काय हीला उगड्यावर ठीवू का ? मी जिवंत हाय तवर हीचां सांबाळ मीच करणार… ! ‘
या प्रौढ मावशीला आपण फुलं विकण्याचा व्यवसाय सुरू करून दिला आहे. हिलासुद्धा कोणीही नाही. खूप वर्षांपूर्वी नवऱ्याचा अंत झाला… एक मूल होतं, ते कसल्याशा आजाराने लहानपणीच गेलं…
– –मी तिला म्हणालो, “ अग पण फुलांच्या व्यवसायात थोडेफार पैसे मिळतात… त्यात अजून एका व्यक्तीचा भार तुला झेपेल का ? “
“ काय डाक्टर… आईला लेकरांचा भार वाटला आस्ता तर, कोंच्याच आईनं लेकराला नऊ म्हैने पोटात घिवून मिरवलं नसतं… एकांदा घास मी कमी खाईन, त्यात काय ? आनी कमी जास्तीला तुम्ही हाईतच की… माझ्या पाठीत धपाटा घालत ती हसत बोलली… ! “
“ तसं नाही गं, कुठल्यातरी संस्थेत मी मुलीची व्यवस्था केली असती…”
“ डाक्टर आविष्यात एकदा आई झाले, तवा पोरगं देवानं न्हेलं… आता पुन्ना आई व्हायची येळ आली, तवा पोरगी तुम्ही न्हेनार… मंजी मी फकस्त “बाई” म्हनून जगायचं… मला बी मी मरायच्या आदी एकदा तरी “आई” हुंद्या की…! “
… माझ्या डोळ्यात खरोखर पाणी तरळलं…!
आपण खड्ड्यातून बाहेर आल्यावर दुसऱ्याला सुद्धा बाहेर येण्यासाठी हात द्यायचा… हे सतत मी माझ्या लोकांवर बिंबवत असतो… आज या माऊलीने हा विचार खरोखर अंमलात आणला.
आईच्या पदराला खिसा नसतो, पण आई द्यायची कधीच थांबत नाही…. ती कधीच कुठेही दूर जात नाही…
मनातल्या तळ कप्प्यात… ती कुठेतरी, “आभाळ” म्हणून भरून राहत असते.. हो आभाळच… !!!
कवयित्री शांताबाई शेळके म्हणतात, ‘ ज्या ढगांमध्ये पाणी भरलेलं असतं ते “आभाळ”… आणि ज्यात पाणी नसतं… कोरडं असतं ते “आकाश”… ! ‘
आभाळ आणि आकाश यामध्ये फरक असतो… !!!
विज्ञान सांगतं, माणूस जगतो श्वासावर… रक्तावर…. पाण्यावर… लेकरांचे श्वास, रक्त आणि पाणी, स्वतःच्या नसानसात भरून आई “आभाळ” होते, कायम लेकरांसाठी “धड-पड” करत असते…
छातीच्या डाव्या बाजूला नेहमी “धड – धड” होत असते… विज्ञान त्याला हृदय म्हणतं… !
डॉक्टर असूनही, छाती ठोकून सांगतो माऊली, ही “धड – धड”… त्या हृदयाची नसतेच… ही “धड – पड” असते, त्या आभाळाची… “आई” नावाच्या हृदयाची… !!!
“ काका, मावशीनं मला चिमटा काडला, तीला सांगा ना …” पोरीनं खांद्याला हलवून मला भानावर आणलं… !
…. आता ती मुलगी; त्या मावशीसह थट्टा मस्करी करण्यात मश्गुल होती… !
मुलीला कसं सांगू ? तुला पदरात घेऊन…. तुझी आई होऊन… स्वतःला ती आयुष्यभर चिमटा काढत राहणार आहे… !
” एका प्रौढ महिलेने, दिला बारा वर्षाच्या मुलीला जन्म… !!! ” ही “डिलिव्हरी” नॉर्मल नव्हती… सिझेरियन सुद्धा नव्हतं… हा होता फक्त मातृत्वाचा सोहळा !!!
लोक तिला याचक म्हणतात….. आज बघता बघता ती आई म्हणून “आभाळच” होऊन गेली…
घेता हात, आज देता झाला… तिचे हेच हात, मी माझ्या कपाळाला लावले आणि त्यानंतर माझं कपाळ तिच्या पायावर टेकवलं… नतमस्तक झालो…
…. माझ्यासारखा एक कफल्लक, आईला दुसरं देऊच काय शकतो… ???
(त्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी तुम्हा सर्वांच्या साक्षीने आपण घेत आहोत)
प्रसंग दोन :
याच महिन्यात एका भीक मागणाऱ्या मुलाला छोटासा व्यवसाय टाकून दिला….
व्यवसाय म्हणजे काय तर, ज्या मंदिराच्या बाहेर तो भीक मागतो, त्याच मंदिराच्या बाहेर भक्तांच्या कपाळावर त्याने आखीव रेखीव असा मस्त उभा – आडवा गंध / ओम / त्रिशूळ काढायचा… त्यांना आरसा दाखवायचा… भक्त मग खुश होऊन 2 /5 /10 /20 /50 रूपये त्यांना जसे जमेल तसे पैसे देतील…!
हा खूप साधा सोपा व्यवसाय मी माझ्या अनेक याचकांना टाकून दिला आहे…
यात माझी इन्वेस्टमेंट किती ? फार तर 200 ते 300 रुपयांची…. अष्टगंध आणि काळा बुक्का विकत घेणे…
तो ठेवण्यासाठी एक चांगला कप्पा असलेला स्टीलचा डब्बा देणे…
यात पैशाची इन्व्हेस्टमेंट जास्त नसते.. !.. पण ‘ भीक मागू नका रे… हे साधं सोपं काम करा रे आणि सन्मानाने जगा रे ‘.. हे सांगायला मला साधारण माझ्या आयुष्यातले बारा ते पंधरा महिने द्यावे लागतात…
ही मात्र माझी इन्वेस्टमेंट… !
मी काही कुठला जहागीरदार नाही, संस्थानाचा संस्थानिक नाही, कारखानदार नाही, कंपनीचा मालक नाही, हातात कसलीही सत्ता नाही… मी तरी नोकऱ्या कुठून निर्माण करू ?
– – आणि म्हणून मी लोकांच्या अंगात असलेले अंगभूत कौशल्य, समाजातल्या रूढी – परंपरा, पारंपारिक सण आणि श्रद्धा यांचा वापर चांगल्या कामासाठी करून व्यवसाय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे !
– क्रमशः भाग पहिला
डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈