हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 202 ☆ # “विदाई समारोह में…” # ☆ श्री श्याम खापर्डे ☆

श्री श्याम खापर्डे

(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता विदाई समारोह में…”।

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 201 ☆

☆ # “विदाई समारोह में…” # ☆

(कई बार विदाई समारोहों में भी इस प्रकार का संवेदनशील साहित्य हृदय से निकल कर पंक्तिबद्ध हो जाता है।)

मैडम, आपको भुलाने की

हर कोशिश व्यर्थ जायेगी

हम सबको आपकी

बहुत बहुत याद आयेगी

 

आप कितनी सहज सरल हैं 

आपमें नहीं कोई छल है

आपका स्नेह, आपका दुलार

जैसे हिमालय से निकला गंगाजल है

 

आपने हमको चलना सिखाया

एक दूसरे से मिलना सिखाया

ठोकर लगेंतो संभलना सिखाया

मनमुटाव छोड़कर पिघलना सिखाया

 

आपने अपनी हमें ममता दी है

कठिनाइयों से लड़ने की क्षमता दी है

सहेली बनकर सहज राह दिखाई

लक्ष्य हासिल करने की निपुणता दी है

 

आपने स्त्री शक्ति का पाठ पढ़ाया

हममें योग्यता है यह समझाया

कुछ भी असम्भव नहीं है जग में

हम सब पर विश्वास जताया

 

परिवार है तो सम्मान है

मां-बाप, सास-ससुर

एक समान है

जो करते हैं इनकी सेवा

जग में होता उनका गुणगान है

 

आपसे विदाई बहुत कठिन  है

रोती यह आंखें रात-दिन है

आप तो मां से भी बढ़कर है

ममता अधूरी आपके बिन है

 

आप सदा मुस्कुराते रहिए

अपना प्यार लुटाते रहिए

हम सब तो है आपकी बेटीयां

हमसे मिलने आते रहिए /

© श्याम खापर्डे 

फ्लेट न – 402, मैत्री अपार्टमेंट, फेज – बी, रिसाली, दुर्ग ( छत्तीसगढ़) मो  9425592588

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈




सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – अभिनंदन – सुश्री दीप्ती कुलकर्णी – आणि त्यांची एक कविता ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

 

सुश्री दीप्ती कुलकर्णी

☆ 💐 अभिनंदन 💐 सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी – आणि त्यांची एक कविता. ☆

दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील “कवी-कट्टा” साठी आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री सुश्री दीप्ती कुलकर्णी यांच्या कवितेची निवड झाली असून, २२ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी या ‘ कवि-कट्टा ‘ मध्ये कविता-सादरीकरणासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

माझी माय मराठी“ ही त्यांची कविता त्यासाठी निवडली गेली आहे. विशेष सांगायचे म्हणजे  कविता – सादरीकरणाच्या या खास कार्यक्रमासाठी एकूण १३४६ कविता प्राप्त झाल्या होत्या व त्यापैकी फक्त ३०० कवितांची निवड करण्यात आली आहे, आणि त्यात दीप्तीताईंची ही कविता आहे.  ही त्यांच्यासाठी आणि आपल्या समूहासाठीही अतिशय आनंदाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. 

 आपल्या सर्वांतर्फे दीप्तीताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि या विशेष सादरीकरणासाठी असंख्य शुभेच्छा. आणखी एक विशेष बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता सादर करण्याची अशी संधी त्यांना तिसऱ्यांदा मिळते आहे… या ‘हॅटट्रिक’ साठीही त्यांचे खूप अभिनंदन. 

 आजच्या अंकात वाचू या त्यांची ही विशेष कविता… 

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

☆ माझी माय मराठी ☆

माझी माय मराठी 

अभिमाने येते ओठी ||धृ ||

 *

कवितेसह हर्षे येते

भारुड,गवळण गाते

पोवाड्यांतुनी ही रमते

ओव्यामधुनी ती सजते ||१||

 *

विश्वात कथेच्या फुलते

शब्दालंकारे खुलते

तेजोन्मेषे नि पांडित्ये

मोहिनी जणू घालिते ||२||

 *

कधी कादंबरी ही बनते

अन शब्दांसह डोलते

भेदक ,वेधक ती ठरते

सकलांना काबिज करते ||३||

 *

लालित्ये ही मांडते

संवादानी उलगडते

नाट्यातुनी ही प्रगटते

नवरसातुनी दर्शविते ||४||

 *

सारस्वतांसी जी स्फुरते

विश्वाला स्पर्शही करते ||

 कवयित्री : दीप्ती कोदंड कुलकर्णी, हैदराबाद. 

 Mobile No-9552448461.

💐 ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे सुश्री दीप्ती कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 💐

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्मरण… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ स्मरण ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

प्रेमात गुंतलेले मन भावनेत न्हाले

तेव्हाच लेखणीच्या ओठात शब्द आले

अलवार चिंतनाचे हळवे विचार सारे

सांगून टाकताना तन मोहरून गेले

*

हव्यास फक्त होता नव्हती कुठेच सत्ता

भलत्याच आठवानी जगणेच व्यापलेले

गुंत्यात गुंतताना जडल्या अनेक चिंता

उरलेत भास हाती स्वप्नात पाहिलेले

*

आशाळभूत जगणे शिणले कधीच नाही

तारूण्य सर्व अंती झगडून शांत झाले

लटके भविष्य होते फसवून खूप गेले

दिसले कधीच नाही आयुष्य चिंतलेले

*

निर्भिड वागण्याचा उतरून नूर गेला

चुकले अनेक रस्ते चकव्यात गुंतलेले

छळले गती मतीने फाजील धाडसाला

घेरून संकटांनी बेजार खूप केले

*

भोगून भोग सारे जगणे सुरूच आहे

आहे भविष्य त्यांचे काळास बांधलेले

झाले भले बुरे ते आहे घडून गेले

उरले तसेच आहे स्मरणात गोठलेले

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रारब्ध… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रारब्ध… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

वैशाखाच्या फांदीवर

तुझे विषण्ण पाखरु

आतुरले मन माझे

आले वादळांनी भरु

*

वैशाखाच्या फांदीवर

मी ही, जशी तू नि: शब्द

अबोधच राहिलेले

दुःख.. दुर्दैव.. प्रारब्ध*

*

वैशाखाच्या फांदीवर

तुझी भेट अनाहूत

चैत्र ओसरुन माझा

झाली ग्रीष्मा सुरवात

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ एका ‘ जोकर ‘ च्या जन्मशताब्दी निमित्त… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ एका ‘ जोकर ‘ च्या जन्मशताब्दी निमित्त ☆ सौ कल्याणी केळकर बापट

चित्रपट बघायला वेळ,पैसा ह्यापेक्षाही जास्त त्याची आवड असावी लागते. आणि काही विशिष्ट चित्रपटप्रेमी चोखंदळ प्रेक्षक वर्ग हा तर अतिशय बारकाईने, आवडीने दर्जेदार चित्रपट हे हुडकून काढून बघतो. दर्जेदार चित्रपट हुडकतांना त्या चित्रपटाचे कथानक, दिग्दर्शन, काम करणारे कलाकार ह्यांचा प्रामुख्याने ह्या निवडीत विचार केला जातो.

अशाच एका ह्या क्षेत्रात सर्वगुणसंपन्न असलेल्या अवलियाचा १४ डिसेंबर  हा जन्मदिवस . निळ्या डोळ्यांचा,भावूक,निरागस चेहऱ्याचा, सहजसुंदर अभिनय करणाऱ्या कलावंताचा, व ह्या सर्वांवर कडी करणाऱ्या दिग्दर्शकाचा ठसा हा एकाच व्यक्ती बघायला मिळणं म्हणजे खरोखरच दुर्गम्य बाब. परंतु ह्या सगळ्या बाबी “राजकपूर” ह्यांच्यात सामावलेल्या होत्या.

चित्रपटनगरी म्हणजे एक अफलातून वेगळीच दुनिया. उगाचच नाही तिला मायानगरी म्हणतं. चित्रपट म्हणजे एक अख्ख भलमोठं कुटूंबच असत जणू. कुटूंबाप्रमाणेच सगळी कामं ही वेगवेगळ्या लोकांनी वाटून घेतलेली असतात. ह्या क्षेत्राचे कायम आपल्या सामान्य जनतेला आकर्षण, उत्सुकता वाटत असते.

ह्या नगरीने आपल्याला खूप वेगवेगळे दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते दिलेत .पण ह्या सगळ्या गोष्टी एकाच व्यक्तीत आढळतील. अगदी आपल्या भाषेत बोलायचं तर ह्या क्षेत्रातील आँलराउंडर असलेली व्यक्ती म्हंटलं की चटकन प्रतिभावंत राजकपूर ह्यांच नाव नजरेसमोर येतं. १४ डिसेंबर,  राजकपूर ह्यांचा जन्मदिन.त्या निमित्ताने….

हाडाचा कलाकार, दर्जेदार, पट्टीचा अभिनेता  असलेल्या पृथ्वीराज कपूर ह्यांचे राजकपूर हे सुपुत्र. जणू जन्माला येतांनाच ह्या चित्रपट क्षेत्रातील बाळकडू घेऊनच आले होते. त्यांच्या सौंदर्याला एक वेगळीच निरागसतेची झालर होती. ते एक उत्कृष्ट, यशस्वी, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता होते.

त्यांनी अनेक उत्कृष्ट, तिकीटबारीवर धूम करणारे,लोकप्रिय चित्रपट दिलेतं.त्यापैकी संगम,श्री 420,मेरा नाम जोकर, बाँबी,आवारा, हे सुपरडुपर हीट सिनेमे. संगम हा त्यांचा खूप गाजलेला, दिग्गज कलाकारांच प्रेमाचं त्रिकुट असलेला एक लोकप्रिय चित्रपट म्हणून गाजला “मेरा नाम जोकर  हा एक कारुण्यमय छान दर्जेदार चित्रपट.हा चित्रपट बघून माणसाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेम मिळणं,आपलं माणूस मिळणं हे किती आवश्यक असतं ह्याची प्रकर्षाने जाणीव होते. प्रेमात अयशस्वी झालेल्या व्यक्तीच्या स्वभावाला आपोआपच एक कारुण्याची झालर असते, हे ह्यातून ठळकपणे जाणवतं.ती व्यक्ती वरकरणी कितीही हसतं असली तरी आत किती दुःख, वेदना खोलवर दाबून ठेवलेली असते हे लक्षात येतं. राजकपूर ह्यांच्या बहुतेक सगळ्या चित्रपटांचा आत्मा म्हणजे उत्कृष्ट संगीत, गाणी,कसलेले कलाकार, आणि आशयपूर्ण पटकथा.

संगम चित्रपट लक्षात राहतो तो एक से एक अफलातून मस्त गाण्यांमुळे. राजकपूर ह्यांच्या निरागस,भाबड्या उत्कट प्रेमाच्या अभिनयामुळे अतिशय प्रेमरसानं ओथंबलेलं, भावपूर्ण गाणं “ये मेरा प्रेमपत्र पढकर”आणि अतिशय मिस्कील पणे गायलेलं”क्या करुँ राम मुझे बुढ्ढा मिल गया” ही गाणी म्हणजे ‘संगम’ च्या जमेच्या बाजू. संगम चित्रपटात वैजयंतीमाला,राजेंद्रकुमार आणि राजकपूर ह्या तिघांचही प्रेम अतिशय उत्कट. पण ते प्रेम दर्शविण्याच्या त-हा,पद्धती मात्र निरनिराळ्या. राजकपूर चे अतिशय मनापासून केलेले जगजाहीर उत्कट प्रेम, राजेंद्रकुमार चे अलवार, नाजूक, मनातल्या मनात केलेले प्रेम, आणि वैजयंतीमालाचे त्यागमय प्रेम खरचं अगदी लक्षात राहण्या सारखे. राजकपूर ह्यांच्या चित्रपटाबद्दल लिहायचं तर खरं पुस्तकही कमी पडेल.

राज कपूर हे हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते.  त्यांना बॉलीवूडमधील शोमॅन म्हणून ओळखले जाते.  राज कपूर ह्यांच्या चित्रपटाच्या मनोरंजना आड काहीतरी संदेश असायचा.   आजही त्यांचे चित्रपट देशविदेशातील विविध चित्रपट महोत्सवांत दाखविले जातात, याचे कारण हेच आहे. राज यांच्या चित्रपटातील नायक हा सामान्य माणूस असायचा. फुटपाथ वर राहणारे, फेरीवाले, चहा विकणारे त्यांच्या चित्रपटात सर्रास आढळायचे.

राज कपूर यांना इ.स.१९८७ मेध्ये दादा साहेब फाळके पुरस्कार प्रदान केला गेला.

फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक पुरस्कार प्रेम रोग,  मेरा नाम जोकर ,संगम, तसेच सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार जिस देश मे गंगा बहती है,अनाडी ह्या चित्रपटांसाठी मिळाला.

राजकपूर ह्यांच्या अभिनयात डोळ्यांची भाषा बोलली जायची.  तो रूपेरी पडद्यावर आला की सगळा पडदा आपल्या असण्याने व्यापून टाकायचा.

राज कपूर यांनी 1948 मध्ये आग या सिनेमातून  त्यांचं दिग्दर्शीय पदार्पण केलं. तर त्याआधी 1947 ला आलेला नील कमल हा नायक म्हणून त्यांचा पहिला सिनेमा होता. ते हयात असेपर्यंत हिंदी सिनेसृष्टीचं बॉलिवूड असं नामकरण झालेलं नव्हतं. त्या काळात नंबर वन, नंबर टू अशा स्पर्धाही नव्हत्या. दिलीप कुमार, देवआनंद, राज कपूर ही त्रयी 50, 60 आणि 70 चं दशक गाजवणारी ठरली. बाकी त्यांच्यावेळी जॉय मुखर्जी, प्रेमनाथ, राजेंद्र कुमार असे हिरोही होतेच. पण सगळ्यांना भुरळ पडली होती ती या त्रयीची. राज कपूर यांनी अभिनय करत असतानाच दिग्दर्शक म्हणूनही ते काम करत होते.1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. त्यावेळी राज कपूर यांनी देशाच्या सिनेसृष्टीत योगदान देण्यास सुरूवात केली होती. सामाजिक आशय जपणारे अनेक सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केले त्यात कामही केलं. आवारा, आह, बूट पॉलिश, श्री 420, जागते रहो या सगळ्या सिनेमांची जादू आजही कायम आहे.

राज कपूर यांच्या अभिनयावर काही प्रमाणात चार्ली चॅप्लिनचा प्रभाव होता. त्यांचा पेहराव, त्यांची टोपी, त्यांची हसण्याची पद्धत. निरागस चेहरा, फास्ट फॉर्वर्डमध्ये सिनेमातले काही सीन चित्रित करण्याची पद्धत हे सगळं काही चार्ली चॅप्लिनच्या शैलीशी मिळतंजुळतं होतं. मात्र ते सगळं आपण हसत हसत स्वीकारलं. कारण अभिनय, दिग्दर्शन आणि सिनेमा हे सगळं हा माणूस जगतो आहे हे आपल्याला ठाऊक होतं.

त्यांच्या काळातले ते सर्वात तरूण दिग्दर्शक होते.  संगम या सिनेमात राजेंद्र कुमार, वैजयंती माला आणि राज कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. रूंजी घालणारं संगीत, मोहून टाकणारी गाणी आणि लोकेशन्स हे या सिनेमाचं वैशिष्ट्य. हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा, बोल राधा बोल संगम होगा के नहीं, मै क्या करूँ राम मुझे बुढ्ढा मिल गया, ये मेरा प्रेम पत्र पढकर, दोस्त दोस्त ना रहा अशी सगळी गाणी हिट ठरली. दोन मध्यंतर असलेला हा सिनेमा होता. 1964 मध्ये आलेल्या या सिनेमाने रेकॉर्ड मोडले होतं असं म्हणतात.

त्यांच्या यशस्वी सिनेमामध्ये बाँबी ह्याचा उल्लेख प्रामुख्याने होतो.बॉबीच्या यशानंतर राज कपूर यांनी सत्यम शिवम सुंदरम, प्रेम रोग, राम तेरी गंगा मैली हो गयी हे एका पाठ़ोपाठचे यशस्वी चित्रपट. बोल्डनेस हा त्यांच्या चित्रपटां मधला महत्त्वाचा भाग होता.

..

एकापेक्षा एक सरस चित्रपट, एकाहून एक सुमधुर गाणी आणि मनोरंजनाचा अखंड तेवत राहणारा वारसा ठेवून हा शोमन अनंताच्या प्रवासाला केव्हाच निघून गेला आहे. मात्र तो आपल्या मनात अजूनही जिवंत आहे त्याच्या नटखट, अवखळ डोळ्यांनी आपल्याला आपलंसं करत, मुकेशचा आवाज आपल्या हृदयात स्वतःचा म्हणून भिनवत..किमया करणारा… एखाद्या परीकथेतल्या राजकुमारासारखा! त्यामुळेच त्याच्या गाण्याच्या ओळी आठवतात.. त्याच्या मनात असण्याची साक्ष पटवतात…

कल खेल में हम हों न हों

गर्दिश में तारे रहेंगे सदा भूलोगे तुम,

भूलेंगे वो पर हम तुम्हारे रहेंगे सदा!

राजकपूर ह्यांच्या यशस्वी चित्रपटांची, सुमधुर गाण्यांची प्रकर्षाने आठवण होते हे खरे.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन आणि दोन बावीस… – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील ☆

सुश्री सुजाता पाटील

? जीवनरंग ?

☆ दोन आणि दोन बावीस… – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील 

डॉ हंसा दीप

(अचानक मला जाणीव झाली की हे घर कोणा दुसऱ्याचं आहे, अशा अवस्थेत पाहून मला कोणीतरी ठार वेडी समजतील. माझ्या  वजनदार कपड्यांना पाहून कोणीतरी मला चोर किंवा डाकू  समजलं तर नवल नाही. मी  जरा भानावर आले.) – इथून पुढे —- 

जरा बुद्धीने  काम केले पाहिजे.  नेमकं काय करू, कागदावर फोन नंबर लिहून इथे तो ठेवून जाते.  पण माझ्याजवळ ना कागद होता ना पेन.  अशा बेचैनीच्या अवस्थेत पाय लटपटत होते.  काही हरकत नाही, घरी परत जाऊन कागद आणि पेन घेऊन यायचा  होता.  कित्येक वेळा बर्फात  पडता- पडता, वाचता – वाचता  कशीबशी मी घरी परत आले.   कागद पेन आणला त्यावर मेसेज लिहिला, कुरिअर कंपनीची चूक सांगितली  आणि माझा फोन नंबर दिला.  त्यांच्या दरवाजाच्या  कडीवर तो कागद फोल्ड करून ठेवून दिला आणि आपल्या घरी परत आले. 

घरी आल्यानंतर  दर दहा मिनिटांनी फोन चेक करत राहिले,  दरवाजा टक जरी वाजला तरी कान टवकारून ऐकत राहिले. संपूर्ण दिवस हयाच गोंधळात  गेला. माझ्या त्या चिट्ठीचं उत्तर संध्याकाळपर्यंत देखील मिळालं नाही.  ना माझा फोन वाजला ना कोणी दरवाजा वाजवला.  डोळे आणि कान  पुरते व्याकुळ झाले होते. माहित नाही काय झालं  होतं. साधारणतः  पाच वाजेपर्यंत  प्रत्येकजण कामावरून घरी येतो.  त्या घरातील लोकं पण आली असतील. कदाचित जेवण जेवत असतील,  जेवण जेवू  देत त्यानंतर जाते. 

वेळेच मोजमाप करता त्यांच्या जेवणाचा  व मेल चेक करण्यापर्यंतचा  वेळ जोडल्यानंतर  २ एवेन्यू रोडवरची माझी तिसरी चक्कर मारण्यासाठी मी ‌साडेसात  वाजता घरातून  निघाले.  ह्या वेळेस खूप आशेने बेल वाजवली परंतु आता पण काही उत्तर आलं नाही!  निराश होऊन परत निघणारच होते तेवढ्यात वरच्या खिडकीत ‌लाईट दिसून आली.  ह्याचा अर्थ घरात कोणीतरी आहे. आशेच्या ह्या किरणांनी माझ्या चेहऱ्यावर  एक वेगळीच चमक पसरली.. आता मला माझी पुस्तके मिळूनच जाणार. 

पुन्हा बेल वाजवली. काहीच उत्तर नाही.  इकडून तिकडून  फिरून यायचे.. बेल वाजवायचे आणि जोरात दरवाजा  ठोठवायचे.  साहजिकच आता माझा धीर सुटत चालला होता.  सभ्यपणाचा बुरखा फेकून माझ्या ज्या हरकती चालल्या होत्या त्या आजूबाजूचे दोन शेजारी खिडकीतून पहात होते. 

मोठालं  जॅकेट आणि कानटोपीमधून कोणीच ओळखू शकत नव्हते की ह्या पेहरावात स्त्री आहे की पुरुष,  एक चोर आहे की एक कादंबरीकार (लेखक)! आता मी उड्या मारून मारून वरती  घरात  कोणी  माणूस  किंवा माणसाची  सावली तरी दिसते  का ते पहाण्याचा प्रयत्न करत होते.  तीन मिनिटे पण झाली नसतील… पी.. पी… पी.. असा सायरन वाजत पोलिसांची गाडी येऊन थांबली. तेच झालं  ज्याची शंका होती.  त्या  घरातील  लोकांनी मला चोर-डाकू समजून पोलिसांना फोन केला होता. ह्या आकस्मिक घडणाऱ्या बदलामुळे मी अजिबात घाबरले नाही, उलट ह्या गोष्टीचा आनंद झाला की आता तरी हे लोक दरवाजा उघडतील आणि मला माझे पॅकेज देतील.  हा माझा हक्क होता.  त्या पॅकेजमध्ये जी पुस्तके  आहेत , त्यांची मी मालकीण आहे, तोच आत्मविश्वास माझ्या चेहऱ्यावर झळकत होता. 

पोलिस आॅफीसर माझ्या जवळ आला….” “काय प्रॉब्लेम आहे मॅडम,  मी असं ऐकलं आहे की, तुम्ही इथे वारंवार आला आहात. मला सांगाल कशासाठी?”

मी एकदम आरामात…”हॅलो सर ”  म्हणून त्यांना घटित घटना सांगू लागले….” सर, मी ह्याच गल्लीत २२ नंबरच्या घरात राहते.  माझं एक पॅकेज चुकून यांच्या घरी डिलीवर केलं गेलं आहे.  मला फक्त माझं पॅकेज घ्यायच आहे. हे लोक घरात आहेत तरीही दरवाजा उघडत नाहीत.  जर यांच्या घरी माझं  पॅकेज आलं नसेल तर तसं त्यांनी मला सांगावं. मी लगेच निघून जाईन. “

मी एका दमात माझी दयनीय अवस्था पोलिसांना सांगितली. पोलिस हसायला लागला.  त्याचं  हास्य खूप बालिश होतं..  जसं की बाॅम्ब फुटण्याची बातमी मिळावी ‌आणि  माहित पडावं की  छोट्या मोठ्या फटाकड्या पेटवून लोक आपला सण साजरा करत आहेत.

त्याचवेळी आतून एक सभ्य गृहस्थ आले. मी त्याला अशी टवकारून  बघू लागले जणू कोणत्या तरी भित्र्या माणसाला चांगलाच धडा शिकवण्याचा प्रयत्न  मी  केला आहे.  एवढा धडधाकट माणूस आतमध्ये होता आणि माझ्याशी बोलायची हिम्मत नाही केली ! घाबरट कुठचा ! विनाकारण पोलिसांना बोलावलं. ह्याच्यापेक्षा तर मी चांगली आहे जी  धाडसाने इथे उभी आहे. अचानक माझ्या पायामध्ये स्थिरतेचा आभास होत होता आणि अनायास चेहऱ्यावरचा रुबाब वाढला होता. 

पोलिसांनी त्याला विचारलं…” मॅडमचं एखादे पॅकेज तुमच्या घरी आले आहे का जरा बघाल.? “

तो लगेचच आत गेला आणि पाच -सात मिनिटांनी एक पॅकेज घेऊन आला आणि पोलिसांना दिलं. पोलिसाने पॅकेजला मागून -पुढून, खाली – वर पाहून मला विचारलं…” काय ह्या तुम्ही आहात”  त्यावर माझ नाव लिहिलं होतं. मी म्हटलं….” हो सर, ही माझी पुस्तके आहेत. हे बघा माझं ड्राईव्हिंग लायन्सेस.”

पोलिसाने ड्राईव्हिंग लायन्सेस आणि पॅकेजवरील नाव चेक केलं आणि माझ्या हाती सोपवलं. 

“खुप खुप धन्यवाद सर”  असं म्हणत मी त्या पॅकेजला छातीशी कवटाळलं व पोलिसांचे असे काही आभार मानले जसंकाही  कुठल्या तरी आईचं हरवलेलं  मूल मिळवण्यासाठी  त्यांनी मदत करावी.  हे असे अचानक पोलिसांच्या येण्याने आजूबाजूच्या घरातील खिडक्यामध्ये हालचाली दिसू लागल्या होत्या. 

पोलिस आपली गाडी स्टार्ट करून निघून गेले.  मी पण माझी पावलं तेजगतीने चालवत तिथून निघाले.  घरात येऊन मी पुस्तके उघडली, त्यांना आलटून पालटून पाहिलं आणि कपाटात रीतसर ठेवून दिली.  एक संपूर्ण दिवस एका वेगळ्याच त्रासात निघून गेला होता. तणाव, बेचैनी – घालमेल आणि  अविश्वासात. 

ह्या घटनेला पूर्ण एक वर्ष झालं. कपाटात ठेवलेल्या त्या दोन्ही पुस्तकांना उघडून पाहण्याची  पण वेळ आली नाही. पण ज्या दिवशी ह्या पुस्तकांना प्राप्त करण्यासाठी एवढी प्रयत्नांची शिकस्त केली होती की त्याची आठवण आजही तेवढीच डोळ्यासमोर जिवंत  होती. आज पुन्हा त्या दोन्ही पुस्तकांवर सहजच नजर पडली तेव्हा चेहऱ्यावर आपोआप हास्य झळकलं….तेच  परिचित  हास्य जे त्या दिवशी पोलिसाच्या व माझ्या चेहऱ्यावर आणि आठवणीत कैद होतं. 

दोन आणि दोन बावीसच्या मध्ये  माझ्या घरापासून ते त्या घरापर्यंत  चक्कर मारणं म्हणजे कोणा मोठ्या यात्रेपेक्षा कमी नव्हतं. बावीसच दोन मध्ये रूपांतरित होणं किती सोप्पं होतं..  परंतु दोनाचे  बावीस होणं किती कठीण !  साधं – सोप्प गणित,  आयुष्यभराचं ज्ञान किंवा एक नवीन कोडं. 

पुस्तकांना  स्पर्श  करताना  निरंतर  मोजमाप करत ; भाषा आणि अंकामध्ये  समाविष्ट  असलेल्या जीवनातील  एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंतचं अंतर, जे मृगजळाप्रमाणे  आयुष्यभर  पळवत राहतं आणि प्रथमा पासून अंतापर्यंताच्या  मध्यावर  झुलवत  ठेवतं. 

– समाप्त – 

मूळ हिंदी कथा : दो और दो बाईस

मूळ हिंदी लेखिका : डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी अनुवाद : सुश्री सुजाता पाटील

अणुशक्ती नगर मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दिसामाजी काहीतरी ते करावे …” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “दिसामाजी काहीतरी ते करावे …” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मध्ये काही दिवस गंमत म्हणून एक प्रयोग केला.  माझ्याच  रोजच्या रोज  वागण्याचा पेपर रात्री तपासून पाहिला…… बोलण्याच्या स्तराला  सगळ्यात जास्त मार्ग ठरवले. कुणाशी ,काय, कसं बोलले, किती वेळ, याचा नीट अभ्यास केला… कुठे कशा चुका होतात हे हळुहळु  समजते आहे…

एका  वाक्यातली उत्तरं   वरवर सोपी पण कस बघणारी होती. कारण अगदी कमी शब्दात एका वाक्यात उत्तर देणं काही प्रश्नांना फार अवघड गेलं…. मोठी प्रश्नोत्तरे सविस्तर लिहायची होती .कधी कधी त्यांची उत्तरे बरी आली, कधी  थोडक्यात चुकली. तरी तिथे चांगले मार्क देता आले.

उघड न बोलता मनातल्या मनात बोललेल्या…. गाळलेल्या जागा भरा  हा पण पेपरातला भाग होता .त्याचेही गुण तपासले…… मौन राहण्याचा प्रश्न सगळ्यात कठीण गेला. हळूहळू अभ्यासाने ते पण साध्य होईल… काही प्रश्नांची उत्तरं ऐनवेळी न आठवता नंतर आठवली.

कोण कोणास म्हणाले ….हे उमगायला बराच वेळ गेला. त्यांची उत्तरे नंतर कळल्याने त्याचा उपयोग  होत  नाही.

संदर्भासहित स्पष्टीकरण …तर ऑप्शनलाच टाकायचे ठरवले.  त्यासाठी दुसरा अभ्यास फार करावा लागतो हे  समजले .आणि इतकं  करूनही उत्तर समाधानकारक देता येत नाही हे समजले.

गणिताचा पेपर फारच अवघड… हातचे धरले ते  धरायला नको होते… त्यामुळे गणित चुकले हे नंतर समजले…. बेरीज कशाची करायची आणि वजा काय करायचे हळूहळू आता कळते आहे .त्यातही बरीच गडबड होते आहे. गुणाकार कशाचा करायचा हा संभ्रम आहेच…..

 

अध्यात्माचा अभ्यास करण्यात  “समाधान “आहे… हे उमगले आहे.

 तिथे मार्कांची भानगडच नाही. आत्मानंद मात्र अपार आहे. त्यामुळे त्यात आनंद वाटतो आहे. नुसते  पाठांतर  न करता अर्थ  समजून…उमजून… ते कशाचे करायचे हे आता समजले आहे.

त्यामुळे ते आता जरा जरा जमायला लागले आहे.

 

हल्लीच नवीन सुरू झालेला विषय  ‘ मूल्य शिक्षण ‘ …  तो  पेपर संस्कारांमुळे त्यामानाने सोपा गेला .

 

मोबाईलचे आधुनिक तंत्रज्ञान यासाठी जाणत्यांची ..  म्हणजे नातवंडांची शिकवणी लावली आहे. वेळ त्यांच्या सोयीनुसार ..त्यामुळे त्या विषयाचा आनंद आहे .भीती नाही.

 

असं सगळं चालू असताना….. 

….  कधी जेमतेम पस्तीस  मार्कांनी काठावर पास झाले.

….  कधी फर्स्ट क्लास तर कधी डिस्टिंक्शन  पण मिळाली ….

… बरं ही कायमची नाहीत  हे लक्षात आलं  आहे. अभ्यास कमी पडला तर परत आपण मागे पडणार हे पण समजले आहे.

…. गुणवत्ता यादीत यायचं तर अजून अभ्यास हवा आहे हे उमगले आहे.

 

ही जगण्याची गुणवत्ता आपली आपण काढून त्याला मार्क द्यायचे.

… इथे कॉपी करता येत नाही हे लक्षात आले .

आपला पेपर आपणच तपासायचा… प्रत्येकाने मनाने सिलॅबस ठरवायचे.. आपला पेपर आणि आपणच परीक्षक…..कठोरपणे पेपर तपासायचा हे ठरवले आहे …. तरच चुका सुधारून प्रगती होईल हे आता नीट समजले  आहे .

 

नुसती प्रगती नको तर त्याबरोबर अंतरिम मनःशांती हवी आहे .. आणि त्याच्या अभ्यासासाठी संत साहित्याची पुस्तकं हातात आहेत.

 

एक मजा मात्र झाली आहे…..  रात्री रिझल्ट चांगला येण्यासाठी दिवसभर सतर्क राहावं लागत आहे.

 

अजून एक म्हणजे…काही दिवस परीक्षांचेच असतात.तेव्हा अभ्यास कसून करावा लागतो.

 

वय वाढत जाईल तसे …पुढे पुढे पेपर अजून अवघड असणार आहेत हे पण माहित आहे…

आता कसून  सराव चालू आहे…बघू काय होते…

 

तुम्ही पण बघा ना हा प्रयोग करून….

फार अवघड नाहीये ते…

 … आता लेख पूर्ण करते … आजचा माझा होमवर्क संपला.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भारतीय अर्वाचीन गणिती : भास्कराचार्य आणि रामानुजन” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ “भारतीय अर्वाचीन गणिती : भास्कराचार्य आणि रामानुजन☆ श्री जगदीश काबरे ☆

गणिताच्या क्षेत्रातील भारतीय गणितज्ञांचा इतिहास मागे वळून पाहिला तर थोर भारतीय गणिततज्ञांची मालिकाच डोळ्यांसमोर येते. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, महावीर, माधवाचार्य, नीलकंठ सोमया, इ. या मालिकेत आपला ठसा जगावर उमटवणारे जेष्ठ व श्रेष्ठ गणितज्ञ ‘भास्कराचार्य द्वितीय’ यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. 

भास्काराचार्यांचा जन्म इ.स. १११४ मध्ये उज्जैन जवळील ‘विज्जलविड’ येथे झाला. भास्कराचार्यांचे ज्योतिषशास्त्रातील (त्या काळात खगोलशास्त्र ही संज्ञा अस्तित्वात नव्हती. म्हणून आकाशातल्या ज्योतींचा अभ्यास करणारे ते ज्योतिषी, असे सगळ्या खगोलशास्त्रींना म्हटले जायचे.) त्यांच्या घराण्यात पूर्वीच्या सहा पिढ्या गणिताच्या अभ्यास करणाऱ्या होत्या. त्यापैकीच ‘ब्रम्हगुप्त’ हे एक होते. भास्कराचार्य हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते. त्याचे शिक्षण त्याच्या वडिलांजवळ झाले असे त्यांनी खालील बीजगणितांतल्या श्लोकात गुंफले आहे.

आसीत् महेश्वर इति प्रथितः पृथिव्याम् । 

आचार्यवर्यपदवीं विदुषां प्रपन्नः ।। 

लब्धावबोधकलिकां तत एव चक्रे । 

तज्जेन बीजगणितं लघु भास्करेण ।।

या श्लोकावरून त्यांचे वडील महेश्वर हे त्यांचे गुरु होत. त्यांच्यापाशीच भास्कराचार्यांनी बीजगणिताचे पाठ घेतल्याचे ते सांगतात. 

त्यांचा काव्य, व्याकरण, गणित, ज्योतिष वगैरे विषयांचा व्यासंग सर्वांग परिपूर्ण होता. पूर्वकाळी आचार्य पदवी मिळविण्यास किती ग्रंथांचे अध्ययन करावे लागत असे हे २६१ व्या श्लोकावरून समजून येते. गणेश दैवज्ञाने आपल्या टीकेत त्यांना ‘गणकचक्रचूडामणि’ ही पदवी अर्पण केली आहे. गणित व ज्योतिष हे विषय शिकविण्यांत ते निष्णात होते. त्याकाळची विद्वान मंडळी भास्कराचार्याच्या शिष्यांशीं वादविवाद करण्यास कचरत असत हे ताम्रपटांतील श्लोकांवरून दिसून येतें. भास्कराचार्याचा ‘सिद्धांत शिरोमणी’ हा गणितावरील प्रमुख ग्रंथ आहे. हा ग्रंथ त्यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी लिहून पुरा केला. या ग्रंथाचे लिलावती, बीजगणित, ग्रहगणिताध्याय, गोलाध्याय असे चार खंड आहेत. 

ज्याप्रमाणें ‘लीलावती’ हा अंकगणितावरील उत्कृष्ट ग्रंथ आहे, त्याचप्रमाणें ‘बीजगणित’ हे अव्यक्त गणितावरचे उत्कृष्ट पुस्तक आहे. या पुस्तकावरही अनेक टीकाग्रंथ झाले. जगांतील प्रमुख भाषांतून लीलावती व बीजगणित यांची भाषांतरे झालेलीं आढळतात. बीजगणिताचे फारसी भाषांतर शहाजहानच्या कारकीर्दीत अताउल्ला रसीदी या ज्योतिषाने इ. स. १६३४ मध्ये केले. स्ट्राची या इंग्रज लेखकाने १८१३ साली इंग्रजी भाषांतर केले. ग्रहगणिताध्यायांत चंद्रसूर्यांच्या गति, भ्रमणें, ग्रहणें वगैरे गहन व क्लिष्ट विषय आलेले आहेत. याशिवाय भास्कराचार्याचे अनेक ग्रंथ आहेत. ते म्हणजे ‘करणकुतूहल’, ‘सर्वतोभद्रयंत्र’ ‘वसिष्ठतुल्य’ व ‘विवाहपटल’ हे होत. या सर्व ग्रंथाच्या मूळ हस्तलिखित प्रती आज आपल्याच अनास्थेमुळे कुठेच उपलब्ध नाहीत. प्राचीन वस्तूंचे जतन कसे करावे ही कला आम्हा महाराष्ट्रीयांना ठाऊक नाही. तथापि लीलावतीची सटीक हस्तलिखिते अजून उपलब्ध आहेत हेही नसे थोडके.

पायथागोरसच्या प्रमेयाची काटकोन त्रिकोणासंबंधीची एक सिद्धताही त्यांनी मांडली होती. ही सिद्धता कांही गणित तज्ञांच्या मते पायथागोरसच्या मूळ सिद्धतेशी वरीच मिळती जुळती आहे. गणितातील अनंत या संकल्पनेचा सर्वात पहिला सदर्भ त्यांच्या ‘सिद्धांत शिरोमणी’ या ग्रंथातील बीजगणित ह्या खंडात आलेला आहे. पुढे सिद्धांत शिरोमणी या ग्रंथाची फार्सी, इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड, तामीळ भाषांत भाषांतरे झाली आहेत.

लीलावतीतील श्लोकांतून भास्कराचार्यांनी अनेक प्रकारचे कौशल्य दाखविले आहे. धर्म, वेद, पुराणे, महाकाव्ये यांची जाताजाता विद्यार्थ्यांना माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश असल्यामुळे त्यांनी गणिताच्या प्रश्नात या सर्व गोष्टींचा वापर केलेला आहे. ‘पार्थकर्णवधाय’ हा श्लोक रथासंबंधीं सर्व माहिती देण्यास उपयुक्त आहे. अर्जुनाचा कर्ण हा भाऊ असला तरी प्रामुख्यानें वैरी होता, ही गोष्ट विद्यार्थ्याच्या निदर्शनास आणली गेली आहे. पण याहीपेक्षा ह्या श्लोकांत प्रत्यक्ष लढाईचा देखावा वाचकांपुढे ठेवला आहे. कालिदासाच्या शाकुंतलांतील ‘ग्रीवाभंगाभिरामम्’ या श्लोकाशी वरील श्लोकाची तुलना होऊ शकेल. हंसांच्या समूहाचे वर्णन किंवा हत्तींच्या कळपाचे वर्णन, भुंग्यांच्या कळपाची संख्या, पाळलेल्या मोराचे सापावर तुटून पडणे, कमळ वाऱ्याच्या झोताने पाण्यात बुडणे इत्यादि सर्व गोष्टी विद्यार्थ्यांस निसर्ग सान्निध्यांत घेऊन जातात व विषय कंटाळवाणा होत नाही. 

भास्कराचार्यांनी कोठेच सूत्रसिद्धि दिलेली नाही, याचे कारण काय असेल? अर्थात् पूर्वीचे आचार्य सूत्रसिद्धि देत नव्हते. कारण ते सूत्रे काव्यामध्ये गुंफत होते. म्हणून त्यांना सूत्रसिद्धि आवश्यक वाटत नव्हती. भास्कराचार्यांनी पूर्वसूरींच्या पावलावर पाऊल ठेवून सूत्रसिद्धि दिली नाहीं, पण उदाहरणे मात्र भरपूर दिलेली आहेत. आर्यभट्ट ते भास्कराचार्य या ७०० वर्षाच्या काळात शास्त्रीय ग्रंथ कविता रूपात लिहिले जात व सिद्धांताचे स्पष्टीकरण किंवा सिद्धता देण्याच्या खटाटोपात कोणीच पडत नसे, याला भास्कराचार्यही अपवाद नव्हता. पण त्यामुळे भारतीय गणितशास्त्राचे केवढे नुकसान झाले आहे हे आता आपल्या लक्षात येत आहे. कारण सैद्धांतिक उपपत्ती लिहून तिचे दस्तऐवजीकरण करण्याची कमतरता पाश्चात्य शास्त्रज्ञांनी भरून काढल्यामुळे ते आज विज्ञानात अग्रेसर ठरले आहेत.

भास्कराचार्य हे दृकप्रत्ययवादी ज्योतिषी होते. ग्रहणे, युत्या, वगैरे अंतरिक्ष चमत्कार पंचांगांत दिलेल्या वेळेवर होत नसतील तर पंचांगे सुधारली पाहिजेत असे त्याचे मत होते. सनातनी लोक पुष्कळदा काही चुकीच्या कल्पना उराशी बाळगीत. त्यात राहू व केतु हे चंद्र व सूर्य यांना ग्रहणकाली गिळतात अशी एक खुळी कल्पना लोकांत दीर्घकाल रूढ होती. वास्तविक चंद्रग्रहणसमयी चंद्र पृथ्वीच्या छायेत गेल्यामुळे अदृश्य होतो. भास्कराचार्याला ही गोष्ट ठाऊक असूनही लोकांना ती पटविणे कठीण होते. ते लोकांना सांगत की, ‘ मंडळींनो, राहू-केतू नावाचे राक्षस नाहीत. पृथ्वीची छायाच चंद्राचा ग्रास करते. पण तुम्हांला राहू हवाच असेल तर असे म्हणा की, राहूने पृथ्वीच्या छायेत शिरून चंद्राचा ग्रास केला.’ अशा रीतीने जुन्या-नव्याचा समन्वय ते करीत असत. ते सुधारणावादी व्यवहारी शास्त्री होते. असे असले तरी तत्त्वाला मुरड घालण्यास ते तयार नसत. गणितासारख्या अमूर्त आणि गहन विषय मनोरंजनात्मक व काव्यामय पद्धतीने शिकविणारे ते आद्य पंडित होते. अशा या थोर गणितीने जे संशोधन केले त्याला इतिहासात तोड नाही. 

भास्कराचार्यानंतर महाराष्ट्रांत तरी विद्वान व प्रसिद्ध असे गणिती फारसे झालेच नाहीत. त्यांच्याच ग्रंथाची घोकंपट्टी करणारे बरेच होते, पण नवीन संशोधन करणारे असे विद्वान १७ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत थोडेच झाले. त्यांत नाव घेण्यासारखे दोन-चारच असतील. त्यातील एकोणिसाव्या शतकातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे रामानुजन.

रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ ला त्यावेळच्या मद्रास प्रांतातील तंजावर येथे झाला. रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. 

१९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजननी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत. त्यांच्या गणितातील भरीव कार्याचा गौरव म्हणून भारतात २२ डिसेंबर हा दिवस “गणित दिन” म्हणून पाळण्यात येतो.

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आनंदाचा निर्देशांक !” – लेखक : श्री अभय भंडारी ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “आनंदाचा निर्देशांक !” – लेखक : श्री अभय भंडारी ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

आनंदाचा निर्देशांक ! अर्थात् “ Happiness Index.” 

       ….. हा नेमका काय प्रकार आहे ?

सकाळी कितीही लवकर उठून मुलाला/मुलीला कामासाठी बाहेर जायचं असेल, तर त्याचे प्रातर्विधी,स्नान होवून तो तयार होईपर्यंत आई त्याला गरम गरम स्वादिष्ट पोहे करून देते, त्याला तो नको म्हणत असताना बसून खायला लावते, शिवाय थोडे एका डब्यात भरून त्याच्या हातात ठेवते.तुला जेवायला उशीर झाला, तर हे पोहे खा,पोटाला थोडा आधार होईल.

 

असं म्हणणा-या आईच्या या प्रेमळपणाचं आयुष्यात कितीतरी वर्षांनी स्मरण होतं, डोळे आणि हृदय दोन्हीही तिच्या आठवणीने भरून येतात.या आठवणीने मनात आनंदाचे तरंग उठतात,या प्रत्यक्ष अनुभवाला येणा-या आनंदाचा निर्देशांक कसा मोजायचा ?

 

हिवाळ्यात कडक थंडीतल्या सकाळी वडिलांना त्यांच्या कंपनीच्या बस स्टॉपपर्यंत स्कूटरने रोज सोडायला जाणा-या प्रेमळ मुलाच्या कपाळावर ओठ टेकवून ,त्याच्या डोक्यावर कृतज्ञतेने, प्रेमाने हात फिरवून नंतर बसमध्ये बसल्यावरही खिडकीतून बराच वेळ हात हालवत भरलेल्या डोळ्यांनी त्याचा निरोप घेणा-या वडिलांनी आणि त्या मुलाने जो प्रेमाचा स्पर्श अनुभवला,तो पुढेही कित्येक वर्षे स्मृतींच्या रुपात पुनः पुन्हा साथ संगत करतो.हा निर्मळ आनंद कसा मोजता येईल ?

 

खिशात पैसे नसलेल्या एका जीवलग मित्राच्या हातावर त्याची मैत्रीण थोडे पैसे ठेवताना तिला त्याच्या डोळ्यात दिसणारी अगतिकता पहात त्याचा हात प्रेमाने हातात घेऊन नुसत्या डोळ्यांनी,त्या हळव्या स्पर्शाने एक शब्दही न बोलता ” हे ही दिवस निघून जातील रे ! चांगला काळ येईल अशी सांत्वना देते त्या क्षणी आणि नंतर कित्येक वर्षे तो क्षण कृतज्ञतेने आठवताना मनात ज्या आनंदाच्या लहरी उसळतात,त्या आनंदाचे मोजमाप कसे करायचे ?

 

इंटरव्ह्यूला जाणा-या भावाला धीर देणारी, त्याच्या कपड्यांना चांगली इस्त्री करून, ‘ तू आज हा ड्रेस घालून जा, आणि छान आत्मविश्वासाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दे, तुझा जॉब पक्का ! ‘ असं म्हणणा-या, लहान असूनही पोक्तपणाने वागणा-या बहिणीच्या आठवणीने ती तिच्या सासरी अगदी सुखी आहे,रमली आहे हे माहित असूनही जेव्हा पुनः पुन्हा ते जुने क्षण, तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारे प्रेम आपण अनुभवतो, तेव्हा या अश्रू भरल्या आनंदाची मात्रा कशी मोजायची ?

 

वृद्धापकाळी रात्री तीन चार वेळा उठाव्या लागणा-या आजोबांची चाहूल लागताच ताडकन् उठून बसत त्यांचा हात धरून त्यांना टॉयलेटपर्यंत नेणारा लाडका नातू नोकरीसाठी दूर जाताना त्यांचा निरोप घेतो, तेव्हा त्याच्या डोक्यावरून, चेहऱ्यावरून आपले थरथरते हात फिरवत नंतर त्याचे हात घट्ट धरून ठेवत, हा वियोग त्यांच्यासाठी किती अवघड आहे,याची न बोलता जाणीव करून देतात, हे मनात दाटून येणारे भावनांचे कढ कोणत्या परिमाणात मोजता येतील ?

 

आनंद आहेच ! तो क्षणाक्षणाला अनुभवाला येतो.

.. तो स्पर्शाने अनुभवता येतो… शब्दांनी अनुभवता येतो… नि:शब्द शांततेत शब्दाविना होणाऱ्या मूक संवादातून अनुभवता येतो… प्रेमळ माणसांच्या सहवासात अनुभवता येतो… या सहवासाच्या स्मृतींनीही जन्मभर अनुभवता येतो.

 

सत् चित् आनंद याचा अर्थ आनंदच सत्य आहे, आणि त्याचं वास्तव्य सतत तुमच्या चित्तातच असतं !

तुम्ही आनंदी असता किंवा नसता ! आनंदाचं मोजमाप करता येईल, असं उपकरण खरोखरच विज्ञानाला कधी शोधता येईल ?

… अमर्याद जिज्ञासा आणि शोधक बुध्दी ज्यांच्याकडे आहे, त्यांना खुशाल शोध घेऊ द्या … आनंदाच्या नेमक्या निर्देशांकाचा. …. आपण निरंतर आनंदात डुंबत राहू या.

 

आनंद आहेच ! दुःखाला कारण लागतं !! ती कशाला शोधायची ? 

आनंदाचे डोही आनंद तरंग !!!! 

 

लेखक : श्री अभय भंडारी

 पुणे

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ताल थांबला .. तबला रडला .. कवी : श्री सुधीर विट्ठल मुळे  ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ताल थांबला .. तबला रडला .. कवी : श्री सुधीर विट्ठल मुळे  ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

ताल थांबला तबला रडला

कवी: श्री.सुधीर विठ्ठल मुळे

प्रस्तुती: सौ. स्मिता पंडित

*

ॐकारातून ध्वनी प्रकटले

अवघे ब्रह्मांड गजबजले

मृदुंग तबला ढोल वाजले

जणू शिवाने तांडव केले

*

तिरकीट धा  तिरकीट धा

कडकडून वाजला तबला

अवघे श्रोते थरारून गेले

टाळ्यांचा कडकडाट झाला

*

उ. झाकीरभाई गोड हसले

रसिकांना अभिवादन केले

पुन्हा भेटण्याचे कबूल केले

सहज शांतपणे निघून गेले

*

आयुष्यभर तालात राहिले

तालासाठी सारे सोडले

ध्यास एक घेऊनी जगले

तालसुरांशी नाते जोडले

*

तालशास्त्र रोशन केले

तबल्याचे महत्त्व वाढवले

किती विद्यार्थी  शिकवले

आयुष्याचे सार्थक केले

*

झाकीरभाई –

का जाण्याची घाई केली

श्रोतेगण सारे दु:खी झाले

तबला डग्गा पारखे झाले

सूर ताल सारे अवघडले

*

जगात इतुके नाव झाले

तरी पाय जमिनीवर राहिले

विनम्रभाव सदैव दिसले

हेच आम्हा शिकवून गेले

कवी: श्री सुधीर विठ्ठल मुळे

प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈