हा फोटो एका टोमॅटोच्या झाडाचा आहे. कदाचित एखाद्या प्रवासी यात्रेकरूने टोमॅटोचे बी धावत्या रेल्वेतून फेकली असेल. हे झाड मातीशिवाय, काळ्या पाषाणात रुजले आणि वाढले. लहान असताना शताब्दी किंवा राजधानी एक्सप्रेससारख्या जलद गाड्या याच्या अगदी जवळून जात असतील, कर्कश आवाज याला हादरवत असतील. अस्तित्व संपण्याची भिती होती, पण झाडाने संघर्ष करत स्वतःला जिवंत ठेवले.
ना पाणी, ना खत, ना माती, ना संगोपन… असल्या प्रतिकूल परिस्थितीतही या झाडाने फळ धरले. त्याचा उद्देश एकच होता, वंश सातत्य टिकवणे. या संघर्षात झाडाने तो उद्देश पूर्ण केला.
समाजात बऱ्याच जणांना वाटते की, आपण अपयशी ठरलो, आपले जीवन निरर्थक झाले. परंतु त्यांनी या टोमॅटोच्या झाडापासून शिकायला हवे. परिस्थिती कितीही कठीण असो, संघर्ष करत राहणे आणि ध्येय गाठणे हेच जीवनाचे खरे यश आहे.
म्हणून साथींनो, परिस्थिती प्रतिकूल असली तरी निराश होऊ नका, संघर्ष करा. कारण यश तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुमची वाट पाहत आहे. जिद्द, चिकाटी आणि विश्वास, हाच असतो माणसाचा यशाकडे जाण्याचा प्रवास.
☆ व्रतोपासना – ९. पशू पक्षी यांचा आदर करावा ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
आपण ज्या पृथ्वीवर रहातो तेथे मानव एकटाच नसतो. पृथ्वीवर जी जीवसृष्टी आहे त्यातील माणूस हा एक प्राणी आहे. माणूस बुध्दीने सर्वश्रेष्ठ असल्याने सर्वांच्या वरचढ ठरला आहे. तसे पाहिले तर इतर प्राण्यांच्या कडे जे आहे त्यातील काहीच माणसाकडे नाही. पण आपल्या बुद्धीच्या बळावर तो सर्वांना ताब्यात ठेवू शकतो. प्राण्यांच्या ठायी असलेल्या शक्ती मशिन द्वारे प्राप्त करतो. खरे तर सर्व पशू पक्षी निसर्गात महत्वाचे असतात. ते निसर्गाचा समतोल राखतात. त्यांच्या मुळे निसर्गाचे संवर्धन होते. या मुळे आपले जीवन समृध्द होते. निसर्गाचे चक्र अव्याहत चालू रहायचे असेल तर हे पशू, पक्षी, कीटक, वृक्ष, नद्या, डोंगर आवश्यक आहेत. परंतू हे लक्षात न घेता माणसाने आपल्या बुद्धीचा स्वार्थी व बेबंद वापर केला तर माणसाचीच सर्वात जास्त हानी होणार आहे. ज्या जीवसृष्टीच्या आधारे माणूस सुखात जगत असतो, ज्यांच्या आधाराने जगत असतो त्यांचे आपण ऋणी असले पाहिजे. ही साधी माणुसकी आहे.
या विषयी भारतीय संस्कृतीने उच्च आदर्श जपला आहे. श्राद्ध या कृतज्ञता विधीमध्ये धर्मपिंड दिले जाते. ते सर्व पशू, पक्षी, वृक्ष, नद्या, पर्वत ज्या सर्वांनी आपल्याला पोसले त्या सर्वांना हे धर्मपिंड असते.
कोणीही कितीही श्रेष्ठ असेल, बुद्धिवादी असेल तरी कोणालाही क्षुद्र म्हणून हिणवू नये, निंदा करू नये, लाथाडू नये. या निसर्गा पुढे नम्र व्हावे. आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी.
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१६ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
लग्न पहावं करून-
जोगेश्वरी परिसर म्हणजे अगदी मोक्याची जागा. आत्ताचा गजबजलेला लक्ष्मी रोड तेव्हां अस्तित्वातच नव्हता. तो रस्ता नागमोडी आणि कच्चा होता. काही अंतराने फक्त चार-पाच देवळे होती. गणपतीची मिरवणूक, लग्नाची वरात, भिक्षावळ, पालखी श्रीजोगेश्वरी रस्त्यावरून पुढे जायची ही वर्दळीची जागा म्हणून जोगेश्वरी जवळच श्री. शंकर राव कुलकर्णी ह्यांनी गाळा विकत घेतला होता. त्यामुळे छकडा किंवा बैलगाडीतून सायकली दुरुस्त करायला आणायला त्यांना सोईचं पडायच. मंदिरात ओटा आणि दगडी फरशी होती. शुभ कार्य निघाले की जोगेश्वरी परिसरात शिरल्यावर लग्न कार्यवाहक, सगळीच काम करून समाधानाचा निश्वास सोडून अगदी निर्धास्तपणे तिथून बाहेर पडायचे. कारण सगळ्या वस्तू जोगेश्वरी परिसरांतच मिळायच्या. ‘घर पहाव बांधून आणि लग्न पहावं करून ‘ इतकं शुभ कार्य करणे अवघड होत. वधूपिता प्रथम वळायचा पत्रिकेच्या कारखान्यात. शामसिंग रामसिंग परदेशी उत्तम पत्रिका छापायचे. त्यांची इतकी तत्पर सेवा होती की ‘शाम प्रिंटिंग प्रेस’ मध्ये पन्नास हजार पत्रिका तयार असायच्या, सगळा मसुदा एकदम रेडी. श्रीगणेश प्रसन्न. श्रीजोगेश्वरी प्र. वधू वर, वडील मंडळी, वधू-वर पिता सगळे छापलेले रकाने अगदी तयार असायचे. नंतर फक्त नांव विचारून फायनल करून प्रिंट करायची. की झालं काम. चला! महत्वाचं शुभमुहूर्ताचे पहिलं कार्य असं पार पडून पत्रिकांचे गठ्ठे 2 तासात लग्न घरी वेळेवर व्यवस्थित पोहोचायचे. अशा तऱ्हेने कार्याचा पहिला आणि महत्त्वाचा गड, ‘सर’ केला जायचा. काही हौशी पुणेकर पत्रिकेवर वधूवरांचे फोटो छापून घ्यायचे. आत्ताच्या अवजड, भरभरून, डेकोरेट केलेल्या अल्बम पत्रिका, वाचतानाच वाचणारा वाकतो. पण काही म्हणा हं!त्या वेळच्या ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीची सर नाही येणार आत्ताच्या लग्न पत्रिकेला. मंडळी कार्याला वाजंत्री, सनई, चौघडा हवाच हो नां? ती चौकडी पण याच परिसरांत भेटायची. दूध भट्टी गॅस बत्तीवाले, दारू गोळे, भुईनळे वाले आमंत्रणाची वाटच बघत बसलेले असायचे. राजीवडेकरांच्या प्रसिद्ध दुकानात धोतर, कोटटोपी जॅकीट, पगडी घेऊन हौशी पुरुष मंडळी बाहेर पडायची, तर शालूकरांच्या दुकानातून शालू घ्यायला बायका अधिर व्हायच्या. मनासारखा शालू मिळाल्यावर नवरीची कळी खुलायची. देण्या घेण्यासाठी हलकी, भारी नऊवारी निवडायला वडीलधाऱ्या बायका खण आळीकडे लगबगीने वळायच्या. वाटेत अचारी अड्डा लागल्यावर अनुभवी वडीलधारी, मजुरी, मेनू, माणसांची संख्या सारं काही भाव कमी जास्त करून, व्यवहार पक्का करून मोकळी व्हायची. चला! जेवणावळीचं मुख्य काम संपलss. ढोल, ताशा, मिरवणूक, वाजंत्री ई. व्यवहार खुंटा बळकट करून पक्का झाला. आता राह्यला अत्यंत आवडीचा, हौसेचा व्यवहार म्हणजे सोननाणं, दागिने खरेदीचा, त्यावेळी रु. 250 /- तोळा सोन्याचा भाव होता. गरीबा घरचे वधू पिते मणी मंगळसूत्र, जोडवी विरोदी, खरेदी करायचे तर हौशी श्रीमंत वधूपिते लाडक्या लेकीसाठी पेशवाई थाटाचे दागिने सोनाराला काढायला लावून, पसंत करायचे, घोंगडे आळीतल्या घोंगड्यांची पण तेव्हां चलती होती. सगळ्या साईजच्या घोंगड्यांनी शरीराला मस्त उब मिळायची. ज्ञानविलास प्रसिद्ध कारखाना पण इथेचं होता. लग्नात नवरा सायकल, घड्याळ्या साठी आणि भारी शूज करता रुसून बसायला नको, म्हणून ओरिएंटल मध्ये लेटेस्ट बुटाची खरेदी व्हायची. नवी कोरी सायकल घ्यायला कुलकर्णी अँड सन्स तिथे सज्ज होतेच, आणि हो अजुनही आहेत बरं का! मिलन, कला विकास फोटो स्टुडिओ पण सेवेला हजर असायचे. सारं काही श्रीजोगेश्वरीच्या सानिध्यातच, मिळाल्यामुळे वरमायपिता वधूमायपिता धन्य धन्य होऊन मानाच्या कसबा गणपतीला पान सुपारी, अक्षत, विडा, शकुनाचे पांच लाडू आणि पत्रिका द्यायला नटून थटून बाहेर पडायचे. आणि म्हणायचे ‘गणेशा आमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे रे देवा ‘
फ्लेमिंगो पक्षी दरवर्षी हिवाळ्यामध्ये सायबेरिया आणि युरोपातील इतर थंड प्रदेशांमधून काही काळासाठी भारतातील अनेक ठिकाणी येतात. कारण या काळामध्ये त्या देशांपेक्षा भारतातील वातावरण जास्त उबदार असते.
अशीच असंख्य पाखरे दरवर्षी भारतातील आपल्या उबदार कुटुंबात काही काळासाठी येऊन विसावतात. आपल्या कुटुंबातील ही पाखरं आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी दुसऱ्या देशांमध्ये गेलेली असतात. ही पाखरं म्हणजे आपली मुलं आणि मुली.
आज मला हे आठवायचे कारण म्हणजे सकाळी च माझ्या सिंधू ताई चा आलेला फोन. तिला माझी चकल्यांची रेसिपी हवी होती. परवा तिचा लाडका लेक संदीप, सून सारिका आणि नातू सौमिल सह दोन आठवडय़ांसाठी भारतात येणार होता. तसा तो अगदी
दरवर्षी नाही जमलं तरी २/३ वर्षातून एकदा आपल्या सारिकाआणि सौमिल ला कुटुंबाची ऊब मिळावी म्हणून धडपडत येतोच…..
मग काय… ह्या दिवसात सिंधू ताई कडे “मुलेबाळे येती घरा तोचि दिवाळी दसरा” असेच वातावरण असते.
ही पाखरे इथे Land होण्याच्या आधीच त्यांच्या मिनीटामिनिटाचा कार्यक्रम ठरलेला असतो. पहिले काही तास, फार तर एक दिवस jet lag घालवण्यात जातो. मग त्यांना जास्तीत जास्त सगळ्याच नातेवाईकांना भेटायचं असतं.
शाळा-काॅलेजातील मित्रमंडळींना तर भेटलच पाहिजे याऽऽऽर…. इति संदिप आणि सारिकाही…
मधे च दोघांना ही आठवतात नव्वदी पार केलेल्या कुसुममामी आणि सुशाआज्जी… ह्याना तर भेटलच पाहिजे…. ना जाणो पुढच्या वेळी येऊ तेव्हा……
त्यातच येतात दोन लग्न समारंभ… त्या निमित्ताने सगळे च एकत्र भेटतील…. धम्माल येईल….
अरे पण….
मुंबईत आल्यावर रस्त्यावर उभं राहून गाडीवरचा वडापाव, कांदाभजी खायलाच पाहिजे. आणि भैयाने हाताने कालवलेली तिखट ओली भेळ, झालंच तर मडक्यात हात घालून काढलेली पाणीपुरी व्हायलाच हवी. ताजीताजी गरम जिलेबीने मग तोंडाचा तिखटपणा घालवायचा. हे सारे आधीच ठरलेलं आहे हं…. सौमिलचा हट्ट..
यातलं कांहीही राहिलं तर शेवटच्या दिवशी रात्री २ वाजता विमानात बसताना चुटपुट लागते. “पुढच्या वेळेस नक्की” असं स्वतःचं स्वतःच समाधान करून घ्यायचं……. हे ही ठरल्यासारखेच..
मराठी नाटक हा मराठी माणसाचा weak point. परदेशात मराठी नाटकवाले दौरे करतात. पण इथे येऊन शिवाजी मंदिर अथवा रविंद्र ला नाटक न बघता परत जाणं म्हणजे पंढरीला जाऊन विठोबाचं दर्शन न घेता परत येणं. किंवा शिर्डीला जाऊन साईबांबांचं दर्शन न घेता……
… अरे हो, ह्यावेळी ताईच्या मनात होते सगळ्याना घेऊन शिर्डीला जाऊन यायचे आणि मग तिथून येवला किती लांब राहिलं? सुनेला एक छानशी तिच्या गोर्यापान रंगाला खुलून दिसेलशी
पैठणी घ्यायची. परदेशात असली तरी सारे सणवार अगदी हौसेने करते ती… तेव्हा तीला उपयोगी पडेल ती.
सर्वांनी भारताबाहेरील अनेक देश बघितलेले असतात. पण आपल्या मुलांना ताजमहाल, उदयपूर, जयपूरचे महाल दाखवणं हा अभिमानाचा भाग. किंवा ताडोबा अभयारण्य, जिम काॅर्बेट जमलं तर पर्वणीच. गेला बाजार खंडाळा लोणावळा तर पाहिजेच. हे सगळे संदीप – सायली ने केलेले बेत मनातले मांडे च ठरतात.
काही साध्यासुध्या गोष्टींची खरेदी, जसं बूट, नाईट ड्रेस वगैरे, ही दिवसाचे महत्त्वाचे कार्यक्रम झाल्यावर करण्याची गोष्ट. पण must या यादीतील असते.
मुलांना आवडणा-या पदार्थांची यादी ताई अधूनमधून परत परत बघतच असते. राहिलेले पदार्थ कधी करूया याचं planning ही चालू असतं तीचं. सारिका ला आवडणारा शेपू मिळतंच नाही. संदीप ला आवडणारं माझ्या हातचं वालाचं बिरढं कधी करूया?
तळलेले बोंबील, चिंबोरीचं कालवण यात सोमवार गुरुवार वगैरे वार आडवे आलेत…. सोम्याच्या आवडीचे अहळीवाचे लाडू आणि भाजाणीची चकली राहिलीच की….. ताई सतत ह्या गहन विचारात…
आणि एक गोष्ट राहिलीच की. ह्या मुलांना अगदी पूर्ण सक्तीची विश्रांती घ्यायला लावायची. तिकडे अठरा अठरा तास कामात बुडलेली असतात..
पण अजून काही ते साध्य झालेलं नाही…. थोडीशी विश्रांती घेणं…. अर्थात त्यांच्या लेखी ते काही must नसतं. “ते विमानात करू” असं मनानं ठरलवलेलंच असतं त्यांनी… इथल्या प्रत्येक क्षणी आपले आईबाबा आणि बहीण भाऊ यांचा सहवास मिळावा ही सुप्त इच्छा मनात दबलेली/ दडलेली असतेच.
समुला फक्त आजी आजोबा हवे असतात. परदेशी रहात असून ही तो इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा अस्खलित बोलतो इतकच नव्हे तर त्याने रामरक्षा / अथर्वशीर्ष ही फारच सुंदर म्हटलं….. ह्याचे क्रेडिट मात्र संदिप सारिका च्या संस्कारांना च जातं… इति ताई- भावजी
हळूहळू परतण्याचा दिवस उजाडतो. दमलेली शरीरं. ताटातुटीच्या कल्पनेने दु:खी मनं.
घरची गाडी असली तरी नेहमीची भाड्याची गाडी ठरवली जाते. कितीला निघायचं ही गणितं होतात. “तासभर लवकरच निघा”. ताई भावोजींचा भरून येणारे डोळे पुसत सल्ला….
मग ती वेळ तो क्षण येतो. डोळे ओले होऊ देणं हल्लीच्या संस्कृतीत बसत नाही. पण मनं व्याकुळ असतात….
“६ महिन्यांनी तुम्ही तिकडे या” “नक्की ” असा करार होऊन गाडी हलते.
पाखरं परत आपल्या अभयारण्यात पोचतात.
तिथलं आणि इथलं चाकोरीतलं जीवन पूर्वीसारख सुरू होतं.
“पुढच्या वर्षी येतील नं तेंव्हा…. ” मनातल्या मनात योजना आकार घेऊ लागतात. आणि मनाला उभारी देऊ लागतात.
वर्षानुवर्षे चाललेलं हे चक्र आणखी एक फेरी घ्यायला सुरूवात करतं.
☆ ‘चो-ला’ ची चकमक… – लेखक : जयंत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆
सिक्कीममधे १९६५ सालातील सप्टेंबर महिन्यात ७/११ ग्रेनेडियर्स (गुरखा रायफल्स) च्या बटालियनला हुश्शार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. कारण होते चिनी सैन्याने आपल्या काही भूभागावर हक्क सांगून तेथील चौक्या हटवायचा निर्वाणीचा दिलेला इशारा.
७/११ ग्रे. आणि १० जम्मू-काश्मिर रायफल्सच्या एका बटालियनने ४७२० मीटर उंचीवर मोर्चा संभाळला होता. दोन वर्षे असेच चालले होते. किरकोळ कुरबूरींशिवाय काही घडले नाही.
अचानक ११ सप्टेंबर १९६७ रोजी नथूला खिंडीचे प्रकरण झाले. गंगटोकच्या रस्त्यांचे संरक्षण करण्यासाठी ७/११ ने रातोरात योग्य जागा बघून आपल्या चौक्या उभ्या केल्या. नथूलाच्या चकमकी थांबल्या आणि ७/११ च्या वाढदिवसानिमीत्त त्यांची जागा १० जे-के रायफल्सला देण्याचे आदेश आले.
२८ तारखेला आपली संदेशवहनाची सामूग्री, तोफा इ. घेऊन १०-जेके ने आपली जागा सोडली व आघाडीचा रस्ता पकडला. संदेशवहनाची यंत्रणा, चो खिंडीच्या पश्चिम-दक्षिण दिशेला दोन झोपड्या होत्या, त्या ठिकाणी उभी करायची योजना होती.
चो खिंडीत एक तोफ, तर दोन पलटणींनी १५१८१ नंबर ची चौकी गाठायची आणि तेथील ११-ग्रेनेडस् च्या सैनिकांना परत पाठवायचे, असे ठरले होते.
डी. कंपनीच्या दोन पलटणींनी १५४५० नंबरची चौकी, जी पश्चिमेला होती, तेथे संरक्षणाची जबाबदारी स्विकारली होती. उरलेल्या दोन पलटणींपैकी एक रायगाप येथे, तर एक ताम्झेच्या पिछाडीला अशी कामाची वाटणी झाली. या पलटणीबरोबर एक उखळी तोफांची तुकडी ठेवण्यात आली.
एक दिवस अगोदर १० जेकेच्या काही शिख जवानांची चिनी सैनिकांशी एका छोट्या जमिनीच्या तुकड्यावरून बाचाबाची झाली होती. किती मोठा तुकडा असेल हा ? फक्त अंदाजे ५ मीटर लांबीचा हा तुकडा होता.
सीमेवर वातावरण हे असे असते आणि ते तसेच ठेवावे लागते. ‘अरे’ ला ‘कारे’ विचारल्याशिवाय शत्रूही आपला आब राखत नाही. ते जगच वेगळे असते. आपल्याला येथे वाचून त्याची खरीखुरी कल्पना यायची नाही.
तर या तुकड्यावर एक खडक होता आणि त्यावरून त्यांची जुंपली होती. हा तुकडा ना त्यांच्या हद्दीत होता ना आपल्या. या तुकड्याच्या मध्यभागी एक पांढरी रेषा अस्पष्टशी दिसत होती.
या खडकाच्या दोन्ही बाजूला दोन्ही देशाचे तीन तीन सैनिक पहारा देत उभे रहात असत. या सैनिकांमध्ये साधारणत: दोन एक मीटर अंतर राखले जाते. कारण नुसता एकामेकांचा धक्का जरी चुकून लागला तरी १०-१५ जणांचे प्राण सहज जाऊ शकतात. विस्तवाशीच खेळ ! कारण बंदूकीच्या चापावर कायमच बोट आवळलेले असते.
या भांडणात जी वादावादी झाली त्यात एका चिनी सैनिकाला मारण्यात आले आणि त्याच्या कोटाचे बटण तुटले. हे झाल्यावर ते चिनी सैनिक परत गेले आणि दैनंदिन कार्यक्रम परत चालू झाला.
हे झाले पण याची खबरबात मेजर जोशी, जे या कंपनीचे प्रमुख होते, त्यांना फार उशिरा कळवण्यात आली. ३० सप्टेंबरला त्या दोन झोपड्यांच्या तळावर पोहोचल्यावर मेजर जोशींनी त्यांच्या दोन कंपन्यांनी आघाडीवर चौक्या प्रस्थापित केल्या आणि ते १५४५० कडे निघाले.
लेफ्टनंट राठोड यांना त्यांनी तशी कल्पना दिली की ते साधारणत: दुसर्या दिवशी, म्हणजे १ ऑक्टोबरला सकाळी साडेनऊला तेथे पोहोचतील.
मेजर जोशी मधे वाटेत लागणार्या राईगापला पोहोचले. या येथून १५५४० ची चौकी दिसत होती. वरून त्या दिशेला पहात असताना त्यांना दिसले की चिनी सैनिकांच्य़ा एका तुकडीने त्या चौकीला घेरण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत आणि एक तुकडी डी कंपनी जेथे तैनात होती, त्या दिशेला जाताना दिसली.
मेजर जोशींनी लेफ्टनंट राठोड यांना त्वरित त्यांनी जे बघितले त्याची माहिती दिली. लेफ्टनंट राठोड यांनी लगेचच ‘त्या खडकावर चिनी अधिकारी हक्क सांगत आहेत व त्यांच्या बरोबर त्यांचा एक राजकीय अधिकारीही आला आहे’ ही माहीती दिली व काय झाले ते सांगितले.
नायब सुभेदार ग्यान बहादूर लिंबू हे चिनी सैनिकांशी वाद घालत होते आणि वादावादीच्या दरम्यान त्या खडकावर त्यांनी आपला उजवा पाय ठेवला. त्याबरोबर एका चिनी सैनिकाने त्यांच्या पायाला लाथ मारली आणि तो त्या खडकावरून बाजूला सारला ‘आमच्या हद्दीत पाय ठेवायचा नाही इ. इ…. ‘
सुभेदारांनी आपला तोच पाय परत त्याच ठिकाणी ठेवला आणि त्या सैनिकांना आव्हान दिले. वातावरण फारच तापत चालले होते.
हे होत असताना उरलेल्या चिनी सैनिकांनी पटापट त्यांच्या जागा घेतल्या आणि आपल्या बंदूका सरसावल्या. बहुदा हे प्रकरण चिघळवायचे हे त्यांचे अगोदरच ठरलेले असावे.
इकडे त्या चिनी सैनिकाने आपली संगीन सुभेदारांवर चालवली. त्याचा घाव बसला त्यांच्या हातावर.
पुढे काय झाले ते सिनेमातल्या सारखे होते. ज्या सैनिकांने हा हल्ला केला त्याचे दोन्ही हात कुकरीने धडावेगळे झालेले त्यालाच कळले नाही.
हे बघताच जागा घेतलेल्या चिनी सैनिकांनी बंदूका चालवायला सुरुवात केली. दोन्ही बाजूने गोळीबार चालू झाला आणि लान्स नाईक कृष्णा बहादूर यांनी आपले सैनिक घेऊन हल्ल्यासाठी एकत्रीत होणार्या चिन्यांवर हल्ला चढवला.
त्यांच्या मागेच “आयो गुरखाली” ही युद्ध गर्जना देत देवी प्रसाद हा जवान त्वेषाने चिन्यांवर तुटून पडला. पहिल्याच झटक्यात त्याने आपल्या कुकरीने पाच चिन्यांची डोकी उडवली.
सुभेदार लिंबू यांना छातीत लागलेल्या एका गोळीने वीरगती प्राप्त झाली. त्यांना, या दाखवलेल्या धैर्याबद्दल आणि पराक्रमाबद्दल मरणोत्तर वीरचक्र देण्यात आले.
लान्स नाईक कृष्ण बहादूर यांचे शव नंतर चिनी सैनिकांनी लष्करी इतमामाने परत केले. ते परत करायला जो चिनी अधिकारी आला होता त्याला इंग्रजी येत होते आणि त्याने कबूली दिली की “भारतीय सैनिक वाघांसारखे लढले.”
या घटनेचे महत्व १९६२ सालच्या युद्धात झालेल्या मानहानी नंतर प्रचंड होते. चिनी सैनिकांच्या मनातल्या भारतीय सैनिकांबद्दलच्या कल्पनांना जोरदार धक्का बसला.
इकडे नं १५४० वर लेफ्टनंट राठोड यांना गोळी लागून ते जखमी झाले.
हालचाल दिसताच चिनी सैनिकांनी आकाशात प्रकाश फेकणारे फ्लेअर्स उडवले तेव्हा त्यांना उमगले की त्यांच्या तिन्ही बाजूला गुरखा सैनिक आहेत आणि पुढून हल्ला होणार आहे. त्यांनी एकही गोळी न उडवता सन्मानाने माघार घेतली.
त्याच संध्याकाळी ज्या खडकावरून हे सगळे घडले त्या खडकावर मेजर जोशींनी परत आपला बूट ठेवला आणि त्यांना कोणीही हटकले नाही………….
वाचकहो, त्या निर्जन भागात त्या पाच मिटर जमिनीच्या तुकड्यावर असलेल्या त्या खडकाची किंमत काय, हे तहात जे हरतात, किंवा जे आपल्या ताब्यातला भुभाग शत्रूला सहज देऊन टाकतात, त्यांना कशी कळावी….?
या आणि नथू खिंडीत झालेल्या चकमकींमुळे चिनी सैन्याचा जो दबदबा उगिचच आपल्या सामान्य सैनिकांमधे पसरला होता तो कायमचा नष्ट झाला……… त्याचे उदा. आपण आत्ताच पाहिले.
लेखक : श्री जयंत कुलकर्णी
प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
विदर्भातील व्यक्ती बेशुद्ध पडल्यास त्याला चमचाभर तर्रीचा वास दिला तरी तो तात्काळ शुध्दीवर येतो अशी आख्यायिका आहे. तर्रीचा कर्ता, करविता आणि चाहता व्हायचं असेल तर जन्म विदर्भातच व्हायला हवा. वैदर्भिय माणसाचे रक्त लाल असण्यामागे केवळ हिमोग्लोबिन नसून लाल आणि तिखट तर्रीही तितकीच जबाबदार आहे. कानातून घाम निघणे हेच तर्री पावल्याचे जीवंत लक्षण आहे. तर्री हा तरल स्थितीतील पदार्थ असुन याचा रंग लालच असतो. एक लालसर रंगाचा चमकणारा आणि खव्वैय्याला खुणावणारा पातळसा तैलीय पदार्थ हाच तर्रीचा आत्मा आहे. तर्रीचा जन्म जरी पोह्याचा स्वाद वाढवण्याकरता झाला असला तरी कोणत्याही तीखट पदार्थाबरोबर जुळवुन घेण्याची नवरदेवी कला याला अवगत असते. पोह्यावर तर्री पडताच, आपसूक पोह्यात विलीन होते, मग उगाच तर्रीतील दोन चार हरभरे, ‘आपण नाही बुवा त्यातले’ सांगुन पोह्यावर उभे राहुन आपलं वेगळेपण सिद्ध करायचा प्रयत्न करतात.
तर्री हा पदार्थ कालच खाल्ला याची आठवण ठेवायची अजिबात आवश्यकता नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी तर्री स्वत:, तर्री खाल्लयाची आठवण करून देते, आणि आठवण करून न दिल्यास हा पुन्हा दुसऱ्या दिवशी तर्री खाण्यास मोकळा.
व्यवस्थित तर्री बनवणं हे काही खायचं काम नाही, जरी बनवलेली तर्री हे खायचं काम असेल तरी. ज्याप्रमाणे कुशल गाडीवानच गाडी उत्तम रितीने चालवु शकतो त्याचप्रमाणे तर्री छान बनवायला कुशल तर्रीवानच हवा. एकदा का यांच्या तर्रीने अंघोळ करून पदार्थ शुचिर्भूत झाला की कोणीही पदार्थाची मूळ चव काय? हा प्रश्न उपस्थित करत नाही. अगदी गंगास्नान झाल्यावर जसा माणूस पापमुक्त होतो त्याचप्रमाणे तर्रीस्नान झाल्यावर मूळ पदार्थ हा चवमुक्त होतो आणि मग चर्चा उरते ती केवळ तर्रीची. तर्रीबाज पदार्थ खाणारा तर्रीबाज नव्हे तर “थोडी तर्री और डालो” म्हणणाराच पट्टीचा तर्रीबाज.
एखाद्या तर्रीबाजाने आठ पंधरा दिवस तर्री न खाता काढलेच तर त्या तर्रीपरायण व्यक्तीच्या मेंदुला तर्रीचे दर्शन व पुरवठा न झाल्याने तरतरी कमी होऊ शकते.
तर्री कशाची आहे (मटर की हरभरा) हे महत्त्वाचे नाही. तर्री हे स्वत:च एक परिपूर्ण पॅकेज आहे. वांग्याच्या भाजीवर असलेल्या तेलाच्या तवंगाला तर्री म्हणून, तर्रीचा अपमान करू नये. अस्सल तर्रीबाज हे फुलपाखराप्रमाणे तर्रीच्या सुगंधाकडे ओढले जातात. केवडा, मोगरा गुलाब या सारख्या सुगंधी अत्तराच्या बाटल्या आल्यात पण अजून तरी कोणीही हा तर्रीगंध बाटलीबंद स्वरूपात आणला नाही. आणल्यास, साध्या पाण्यात मिसळून परदेशस्थ भाऊबंदांना तर्रीचा आनंद मिळु शकतो. काही लोक, तर्रीला तेलाचा तवंग एवढंच समजतात, अशा लोकांना तर्री खाल्ल्यावर विशेष त्रास होण्याची शक्यता असते.
कोकणातील माणसाने तर्री करण्याचा प्रयत्न केला तर त्यात चिंच, गुळ, ओले खोबरे घातल्याने, तसेच दक्षिण महाराष्ट्रीय माणसाने शेंगदाणे घातल्याने, तर्रीची धार बोथट होते. त्यामुळे उगीच काहीतरी, तर्री म्हणून खाण्याऐवजी अस्सल ठसकेबाज तर्री खाण्यातच धन्यता बाळगावी. इतरांना पाण्यात पाहण्याऐवजी, तर्रीत पहायचा प्रयत्न केला तरी माणसाचे जीवन सुसह्य होईल यात शंका नाही.
सर्व तर्रीखाॅऺं साहेबांना हा तर्रीतराणा समर्पित.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈