मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुचते मनात कविता… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

सुचते मनात कविता… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

 सुचते मनात कविता

 फुलते मनात कविता

 खुपते मनात कविता

 सलते मनात कविता

*

 रुजते मनात कविता

 भिजते मनात कविता

 भिडते मनात कविता

 रुसते मनात कविता

*

 पण भाग्य थोर माझे

 ना विझते मनात कविता

 ना विझते कधीच कविता

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #266 ☆ वय झाडाचे लावणी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 265 ?

☆ वय झाडाचे लावणी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

वय झाडाचं झालं सोळा

पक्षी भवती झालेत गोळा

डोम कावळाही बघतोय काळा

हिरवंगार झाड आलंय भरून

आणि इथं, मालक मरतोय झुरून

*

कुणीही मारतंय खडा झाडाला

मजबुती आली या खोडाला

कैऱ्याही आल्या व्हत्या पाडाला

झाकू कसं, झाड हे सांगा वरून

*

पानाखालती पिवळा आंबा

केसरी होऊद्या थोडं थांबा

पहात होता दुरून सांबा

मोहळ हे, छानक्षच दिसतंय दुरून

*

काल अचानक वादळ आलं

झाड भयाणं वाकून गेलं

आणि लुटारू मालामाल झालं

किती, किती, ध्यान ठेवावं घरून

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आले आले ढग… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

श्री मुबारक उमराणी

? कवितेचा उत्सव ?

☆ आले आले ढग… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

आले आले ढग ढग

रानी पेरीत काजळ

झाडे आनंदात दंग

धारा वाहे खळ खळ

 *

अवखळ पोरे खेळी

रानोमाळ सूरपाट्या

संगतीला फुलबाळे

गंध देत वाट्या वाट्या

 *

पावसाचे येता थेंब

धूळ होई थेंब धार

पान पान शहारता

झाड होई गार गार

 *

माती गंधाळ गंधाळ

रात सुगंधात दंग

हर्ष उल्हासी होऊन

वारा वाजवी मृदंग

*

थेंब स्पर्श होताक्षणी

माती होई ओली ओली

रात माऊली होऊन

गीत अंगाई ती बोली

© श्री मुबारक उमराणी

राजर्षी शाहू काॅलनी, शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ “माझ्या डायरीतून…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 विविधा 🌸

☆ माझ्या डायरीतून… ☆ प्रा. भरत खैरकर 

यशस्वी होणे याचा अर्थ कधीही अपयश न येणे असा नसून अंतिम ध्येय गाठा असा आहे. बहुतेक लोक क्षमता आणि बुद्धिमत्ता यांच्या अभावामुळे अयशस्वी होतात असे नाही तर ईच्छा, दिशा, समर्पण आणि शिस्त यांच्या अभावामुळे ते अयशस्वी होतात. आपल्या अंतरंगात जे काही असते त्यामुळे आपण उंचीवर जातो. म्हणजे आपला दृष्टिकोन महत्त्वाचा असतो.

आपल्या दृष्टीकोनात बदल करून माणूस आपले आयुष्य बदलू शकतो. प्रामाणिक असणं जास्त महत्त्वाच आहे. तुम्ही प्रथम चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपोआपच तुम्हांला सद्बुद्धी लाभेल.

मनाने इतके कणखर व्हा की कुठलाही आघात तुमची मनःशांती ढळू देणार नाही. भूतकाळातील चुका विसरून भविष्यातील यशाचा विचार करा. स्वयम् सुधारणेसाठी इतका वेळ द्या की दुसऱ्यावर टीका करायची वेळच उरणार नाही!

काम उद्यावर टाकण्याच्या सवयीमुळे नकारात्मकता वाढीस लागते. बौद्धिक शिक्षणाचा प्रभाव विचारशक्तीवर पडतो तर मूल्य शिक्षणाचा प्रभाव हृदयावर पडतो.

प्रत्येक विद्यार्थ्याची विशिष्ट विषयातील गती किंवा क्षमता ओळखून जीवन जगण्यासाठीची सर्वांगीण तयारी करून घेणारे शिक्षण म्हणजे खरे शिक्षण!!

अर्धवट ज्ञान धोकादायक असते अज्ञान हे भीती हटवादीपणा, पूर्वग्रह अशा दोषांना जन्म देते. आपल्या बलस्थानांची जोपासना करणे, शिकण्याची उत्कट इच्छा बाळगणे, अत्यंत गरजेचे आहे.

सकाळची सुरवात सकारात्मक वाचनाने केली पाहिजे. आपण जर आपल्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नातून समर्थ होण्यासाठी धडपडू दिले नाही तर त्यांचेच नुकसान करतो आहोत. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही,शिड कसं लावायचं हे आपण ठरवू शकतो ! माणसाच्या मनामध्ये जे रुजतं किंवा माणूस मनात जे आणतो आणि त्यावर विश्वास ठेवतो ती गोष्ट तो माणूस साध्य करू शकतो.

जास्त कष्ट कराल तितके तुम्ही जास्त नशिबवान असाल. सामान्य माणूस आपल्या शक्तीच्या आणि क्षमतेच्या फक्त एक चतुर्थांश काम करतो. जी माणसं आपल्या क्षमतेच्या निम्म्याहून अधिक क्षमतेने काम करतात त्यांना जग सलाम करते. आणि मोजकीच माणसं शंभर टक्के काम करतात त्यांना जग डोक्यावर घेतं.

कोणत्याही गोष्टीतील कौशल्य नशिबाने मिळत नाही त्यासाठी भरपूर कष्ट आणि सराव करावा लागतो. कठोर परिश्रम आणि अखंड सराव त्यामुळे माणसाच्या कामात सफाईदारपणा येतो. एक म्हण आहे “हातोड्याच्या घावाने काचेचे तुकडे होतात परंतु पोलाद घडविल्या जाते”.

एखादी गोष्ट आपल्या मनात येईल तेव्हा व तशी करणे ह्यापेक्षा जशी आणि जेव्हा करणे गरजेचे आहे त्यासाठी मनाची शिस्त असावी लागते. भावनांवर आपण मात केली पाहिजे आणि आपला आत्मविश्वास परत मिळविला पाहिजे. नकारात्मक विचाराचे लोक धोकादायक असतात. बहुसंख्य लोक आपल्या संपूर्ण आयुष्याची आखणी करण्यापेक्षा मौजमजेच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात अधिक वेळ घालवतात. सामान्य असणं जेवढं सोपं आहे त्यापेक्षा उत्तम असणं कितीतरी कठीण!!

माणसाचं व्यक्तिमत्त्व हे त्याचं चालणं, बोलणं, त्याच्या आवाजातील मार्दव, आणि आत्मविश्वास यामधून जाणवतं. माणसाचा दृष्टीकोन, वर्तणूक आणि त्यातून व्यक्त होणारा भाव यांचा मिलाफ म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्व. चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव आपल्या कपड्या पेक्षा अधिक प्रभाव कारक असतो!

तुम्ही जेव्हा इतरांशी चांगलं वागत असता तेव्हा तुम्ही स्वत:शीही उत्तम वागत असता. चांगुलपणा नेहमी तुमच्याकडे परत येत असतो. हा जगाचा नियमच आहे. ‘जग आहे असं आपल्याला दिसत नाही तर आपण जसे आहो तसं ते दिसतं ‘. आपली चूक आपण तात्काळ आणि सहजतेने स्वीकारली पाहिजे. हे यशस्वी जगण्याचं तत्वज्ञान आहे. ‘स्वतःला एक प्रामाणिक माणूस बनवा म्हणजे जगातील एक लबाड माणूस कमी झाला!’ त्याबद्दल तुम्ही निश्चिंत व्हाल.

मित्रांनो, ह्या काही नोंदी किंवा ते टिपणं आहेत माझ्या डायरीतील, तुमच्याशी त्या शेअर कराव्या वाटल्या म्हणून हा प्रपंच!!

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ किरण… – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ किरण… – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे

” नमस्कार, आजच्या आपल्या स्वस्थ भारत कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. विविध आजार व त्यावरील उपचार मार्गदर्शन आपण या कार्यक्रमातून जाणून घेत असतो. योग्य वेळी, योग्य मार्गदर्शन औषधोपचार. झाले की आजार बऱ्यापैकी नियंत्रणात येतो. कॅन्सर एक जीवघेणा आजार. साक्षात मृत्यूदंडाची शिक्षा विधात्याने दिलीय असे वाटते. परंतु आजकाल विविध संशोधित औषधे. केमोथेरेपी, रेडिएशन, ऑपरेशन, स्टेमसेलद्वारे केले जाणारे उपचार, बर्‍याच प्रमाणात विकसित झालेलं आधुनिक तंत्रज्ञान. यामुळे हा आजार. बर्‍याच प्रमाणात नियंत्रणात आला आहे. आणि कॅन्सर हाही एक आजार आहे. मृत्यूदंड नाही. हे आपण म्हणू शकतो. या विषयावर सविस्तर बोलण्यासाठी. आज आमच्या भेटीला आल्या आहेत, प्रेमाताई. प्रेमाताई कोणी डॉक्टर किंवा कॅन्सर तज्ज्ञ नाहीत. त्या स्वतःच या जीवघेण्या आजारातून गेलेल्या आहेत. तर आपण स्वागत करुया प्रेमाताईंचं.

प्रेमाताई नमस्कार. “स्वस्थ भारत”च्या आजच्या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत.

“नमस्कार माधुरीताई आणि सर्व श्रोतुवर्गाला”

प्रेमाताई आज आपण कॅन्सरविषयी बोलणार आहोत. आपण कशा काय या सामाजिक कार्याकडे वळलात, आणि आपण कशाप्रकारे कार्य करतात हे आमच्या श्रोत्यांना जाणून घ्यायचं आहे.

माधुरीताई, कॅन्सरचे निदान झाले म्हणजे भल्याभल्या लोकांची भीतीने गाळण उडते. मला कॅन्सर झालाच नाही? मला कॅन्सर होईलच कसा? मला कॅन्सर होऊच शकत नाही. ? हीच प्रतिक्रिया सर्वसामान्य रुग्णांची असते. सत्य पचवणं कोणालाही सहजी शक्य होत नाही. या जीवघेण्या आजाराचे निदान झाले की रुग्ण चिंतेने,साक्षात मृत्यू समोर पाहून ग्रस्त होतो. “माझं सगळं संपलंय. काय करावं मी?” ही त्याची धारणा होऊन बसते. रुग्ण शरीराने तर थकतोच पण त्याहीपेक्षा तो मनाने थकतो. अशा स्थितीत रुग्णांना सर्व समजावून सांगणं त्यानुसार त्यांची मनोभूमिका तयार करणं गरजेचं असतं. आजकालच्या वाढत्या शहरीकरणातील प्रत्येकाचं जीवनाचं घाईगडबडीचं झालंय. रुग्णांना डॉक्टर पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे रुग्ण हतबल होतो. मात्र मनात अनेक प्रश्नांचं जाळं पसरलेलं असतं आणि त्याचं मन त्या जाळ्यात अधिकाधिक गुरफटत जातं. अशावेळी त्याला गरज असते धैर्याची, प्रेमाची, मायेच्या ओलाव्याची आणि त्या आजाराविषयी जाणून घेऊन त्याचे मनोधैर्य वाढवण्याची, जेणेकरून या आजाराचा सामना तर रुग्ण करेलच व गरजेनुसार सगळ्या औषधोपचार व अन्य थेरेपीसाठी तो तयार होईल. आणि या उदात्त हेतूने “कॅन्सरशी लढा विजयाकडे एक पाऊल” या संस्थेचा उदय झाला.

माधुरीताई, मी स्वतः या कॅन्सरशी लढा दिला आहे. आणि माझ्यासारख्या अनेक भगिनी आणि बंधूं देखील ज्यांनी कॅन्सरशी लढा देऊन विजयी मात केली आहे. त्या सगळ्यांच्या सहकार्यातून या संस्थेची निर्मिती झालीय.

अगदी छान प्रेमाताई. संस्थेची स्थापना आणि कार्य, माहित झाले. पण तुमच्या कामाचे स्वरूप आपल्या प्रेक्षकांना जरा समजावून सांगाल का?

होय माधुरीताई. पहिल्यांदाच मी स्पष्ट करू इच्छिते की या संस्थेचे कार्यकारिणी नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सदस्य असे पदाधिकारीही नाही. संस्थेला येणारी प्रत्येक व्यक्ती संस्थेत. समसमान असेल तिच्या कार्याचे स्वरूपही समान असेल. विशेषता त्या व्यक्तीने कॅन्सरशी दिलेला लढा आणि त्याचा सामना करून मिळालेला विजय, या दरम्यानचे त्या व्यक्तीचे कटु-गोड अनुभव जे दुसर्‍यांना प्रेरणादायी ठरतात यांचा समावेश असतो.

डॉक्टर रुग्ण यांच्यात पाहिजेत तसा संवाद होत नाही. रुग्णांच्या प्रत्येक प्रश्नांचं समाधानकारक उत्तर मिळेल याची अपेक्षा नसणं आणि एकंदरीतच भांबावलेला, हवालदिल झालेला, नैराश्यानं ग्रासलेला, रुग्ण शेवटी काय होणार माझं? कसं होणार ? किती दिवसाचं आयुष्य शिल्लक आहे माझं ? अशा अनेकविध प्रश्नांनी चिंतीत होतो, पण उत्तर शून्य. अशा रुग्णांचं काउंसिलिंग आम्ही करतो. त्यांचे मनोधैर्य वाढवतो, कॅन्सर हा जीवघेणा नसून तो पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो हे आम्ही त्याला पटवून देतो. तशी त्याची मनोभूमिका तयार करतो जेणेकरून ती व्यक्ती या आजाराचा धैर्याने सामना करून त्यात यशस्वी होईल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो.

प्रेमाताई कॅन्सर पूर्णपणे बरा होतो असं विधान आपण केलंत, ते कितपत शक्य आहे ?

माधुरीताई, कॅन्सरचे लवकर निदान होणं यासाठी फार गरजेचं असतं. साधारणतः पहिल्या आणि दुसऱ्या ग्रेडच्या कॅन्सरमध्ये हे शक्य होतं. तिसऱ्या ग्रेडच्या कॅन्सरमध्ये चॅन्सेस सर्व साधारणपणे 50:50 होतात. आणि चौथी शेवटची ग्रेड मात्र जीवघेणी ठरू शकते. म्हणूनच कॅन्सरचं निदान लवकर होणं फार गरजेचं आहे. पण होतं काय की रुग्णाला काही त्रास न होता, हा रोग शरीरात छुप्या पद्धतीने आगमन करून आपलं साम्राज्य हळूहळू फैलावत राहतो. जेव्हा रुग्णाला त्रास होऊ लागतो, वेदना जाणवू लागतात तोपर्यंत या आजाराने बरीच पुढची मजल गाठलेली असते. आणि आपले निदान उशिरा झाले अशी पेशंटची धारणा होते.

यासाठी मी एवढंच सांगू इच्छिते की वयाच्या चाळिशीनंतर प्रत्येक स्त्री पुरुषाने वर्षातून किंवा दोन वर्षातून एकदा तरी आपली संपूर्ण शारीरिक तपासणी करून घ्यावी जरी काही त्रास होत नसला तरी. विशेषतः आमच्या भगिनी की ज्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते त्या मात्र प्रकृतीची हेळसांड करतात. दुखणे अंगावरच काढत राहतात. अनेकदा गर्भाशय,स्तन कॅन्सरशी संबंधित आजार लज्जेपोटीही लपविले जातात आणि जेव्हा तीव्र स्वरूपाचा त्रास होऊ लागतो तेव्हा आजाराने डोके बरेच वर काढलेले असते की त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसते. म्हणून “कॅन्सरचे जितक्या लवकर निदान तितकं त्यावर नियंत्रण मिळवणं सोपं” म्हणता येईल. इतकंच नव्हे तर कॅन्सरला रुग्णाच्या शरीरातून हद्दपार करण्यात यश येऊ शकते; आणि रुग्ण पुन्हा आपले नव जीवन आनंदानं जगू शकतो. आयुष्याच्या हा बोनस त्याचा आनंद द्विगणित करीत असतो. बोनसचा आनंद आपणा सर्वांना जसा मिळतो तसा हा जीवनाचा बोनस त्या व्यक्तीच्या जीवनी नवी पहाट, नवी उमेद,नवी आशेची किरणे, एक नवं संजीवनी बनून येत असतो.

खूपच छान प्रेमा ताई तुम्ही सविस्तर विश्लेषण करून प्रेक्षकांना पटवून दिलेले आहे. आमचे सूज्ञ प्रेक्षक याचा नक्कीच विचार करतील. प्रेमाताई “अहमदनगरहून शोभा कानडे चा फोन येतोय आपण हा फोन कॉल घेऊ या”, “अवश्य”

“नमस्कार” 

“नमस्कार- तुमचा प्रश्न विचारा” “नमस्कार शोभाताई तुमचा आवाज पोहोचतोय आमच्यापर्यंत तुमचा प्रश्न विचारा. ” “ताई मला तापाची बारीक कणकण वाटते भूक मंदावली आहे. शारीरिक थकवा जाणवतोय आणि थोड्या प्रमाणात रक्तस्त्रावही होतोय. “

“शोभाताई, तुम्ही स्त्रीरोग तज्ञांची मदत घ्या. तुम्ही सांगितलेली लक्षणे सर्वसाधारण आजाराची ही असू शकतात. पण रक्तस्त्रावासाठी स्त्री रोग तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या आणि त्यातून काही निष्पन्न झाल्यास आपला इलाज अवश्य करून घ्या”.

क्रमशः भाग पहिला

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈



मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आता केवळ… अविश्रांत नाद… – लेखिका : सौ. नीलकांती पाटेकर ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ. भारती माटे

??

☆ आता केवळ… अविश्रांत नाद… – लेखिका : सौ. नीलकांती पाटेकर 

सौ. नीलकांती पाटेकर

कुकरच्या शिट्ट्या…

वरणाला दिलेली लसणाची फोडणी…

परतलेल्या बटाट्याच्या भाजीचा खमंग दरवळ…

…… मल्हारच्या खोलीचा दरवाजा वाजला… म्हटलं आला हा …

… पावलं झपझप …कधी नव्हे ते हात न धूताच ताटावर …

…. झाकीर भाई गेले…

का sss य…

Heart चा problem…

तेव्हढ्यात फोन वाजला…

मल्हार… San Francisco ला होते…

 

इथं आणणार का??? त्याच्या डोळ्यातून … अवरोधलेलं पाणी…खळखळा…न दिसणारं…

माझं मन वहायला लागलं…

आणणार असतील…तर सांगशील…आणतीलही …

नक्की आणतील… अब्बाजींच्या शेजारी …मी पुटपुटले…माझ्याच मनात…

 

८० च्या दशकाची अखेर… माझं एज्युकेशनल प्रोजेक्ट…

मुंबईचे asst commissioner… ‘ एक खाजगी महफिल आहे… झाकीर आणि अब्बाजी…जुगलबंदी…

याल का???’ 

‘ नक्की !!! ‘

 

भारतीय बैठक… लॉन वर!!!. वाळकेश्र्वर… तो १ ला प्रोग्राम मी पाहिलेला… त्याचा..

जेमतेम ७-८ फूट दुरीवर…  अब्बाजींच्या डोळ्यात कौतुक… अमाप…

 

नंतरच्या कॉफीपानामध्ये… अब्बाजींचे छोटे छोटे शिष्य… मला कौतुक वाटलं…

पार्काच्या समोर…म्युनिसिपल swimming pool आहे ना…तिथं शिकवतात… अब्बाजी … 

दर रविवारी… सकाळी 9 ला…

…. खरं वाटेना… रविवारी गेले…दुरूनच बघितलं… छोटी छोटी मुलं… अर्धगोलाकार बसलेली…

आणि अब्बाजी…  मध्ये…अब्बाजींची दोन मुलं… त्यात एक झाकिर…थोडं अंतर राखून …अदबशीर बैठक…

 

केव्हातरी तेव्हा… रुपारेल ला प्रोग्राम… हाकेच्या अंतरावर … एकटीच गेले होते…शेजारीच तर आहे… असं म्हणत…

वाह उस्ताद… गाजत होतं… चण लहानखुरी … नाजूक चेहरेपट्टी… Decent पेहेराव…झब्बा.  … तुमान…

वर शाल… मनसोक्त वाजवलं…तब्येत बरी नसावी… 

अचानक ट्रॅक बदलून… वेगवेगळे इफेक्ट्स… तबल्यावर…

आश्चर्य वाटण्याऐवजी… हे काय मधेच … असं झालं…  तार तुटल्यासम… नाही जचलं…

अरे…. तुझ्या तबल्याच्या नाद काय… टणत्कार काय…

मी एकटक बघत हेच बोलतेय… मनात… पापणी लवेना… पडदा पडायला सुरुवात झाली…

उठलेच… स्टेजच्या मागे गेले…गर्दी व्हायची होती त्याच्या भवताल… तरी…त्याच्या जापनीज शिष्या… चिवचिव… तो अस्खलित जापनीज मध्ये सांगत होता…. 

 

मी लांब… विंगेपाशी… ये sss स …

“ आप…” 

मी काही पावलं पुढं… अंतर राखून … पावलं आपच थबकली…माझी …

“ कहिये…” 

… काय सांगणार…आवडलं नाही… जे इफेक्ट्स वाजवले ते…वाजवले चांगले… पण हे अपेक्षित नाही …

“ कुछ अच्छा नहीं लगा… “ … 

 

एक शब्द फुटेना…

“ जी… “  शब्द फुटला…एकच.. कसाबसा…’ Diversion  Effects ??? ‘

जी… शब्द सापडेनातच…खुर्चीपासून विंगेपर्यंत…केवढी बडबडत आले होते…मनातल्या मनात…

आणि अचानक…काय बोलणार…असं झालं…

 

आपका सोलो …कहीं और था मन…अचानक…ये इफेक्ट्स… 

You have a class…

Masses के लिये…

 …. एव्हाना तो चार सहा पावलं चालत पुढं आला होता …सहज हातावर हात ठेवत … 

“ अच्छा लगा…आपको जो जंचा नहीं…आपने साफ बताया…”

 

माझ्यातली अस्वस्थता… विरघळली…

अशी कोण मी…ना त्यानं विचारलं…ना मी सांगितलं…महत्वाचं नव्हतंच… ते…

जे होतं… ती जाण…

 

माझे हात जुळले… त्याचेही… दोन पावलं … तशीच मागे जात… मी वळणार…

“ येत रहा…” अस्खलित मराठी…

माझा हात माझ्या मनाजवळ… ओठ म्हणत होते…  अस्फुट…” येईन… की… नक्की…”

 

त्यानंतरही प्रोग्रॅम्सना गेले…पण कधी विंगेत नाही गेले… गरजच नाही पडली…

 

एक अश्रांत कलावंत…

….. आता केवळ…

    ……. अविश्रांत नाद..

लेखिका : सौ. नीलकांती पाटेकर

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणीतले झाकीरजी…  ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ आठवणीतले झाकीरजी… ☆ सुश्री शीला पतकी 

तबलानवाझ पद्मविभूषण झाकीर हुसेनजी यांच्या मृत्यूची बातमी वाचली… टीव्हीवर ऐकली …. खूप वाईट वाटलं. आणि मनातल्या त्यांच्या आठवणी उफाळून आल्या. त्यातल्या काही अनमोल आठवणी व्यक्त केल्याशिवाय आज खरंच रहावत नाहीये…  

१९८३ साली सेवासदन संस्थेचा ६0 वा वर्धापनदिन होता… म्हणजे हिरक महोत्सव. या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातला सर्वाधिक संस्मरणीय ठरलेला कार्यक्रम होता शास्त्रीय संगीताचा. या कार्यक्रमात फार मोठे कलाकार सहभागी झाले होते. हे कलाकार एवढे दिग्गज होते की, मुळात एवढे मोठे कलाकार सोलापुरात आणि सेवासदनच्या कार्यक्रमात यायला कबूल कसे झाले असा प्रश्न सर्वांना पडला. पण तो प्रायोजित कार्यक्रम होता. इंडियन टोबॅको कंपनीने हा तीन दिवसांचा कार्यक्रम प्रायोजित केला होता. तीन दिवसांच्या या कार्यक्रमाला आय. टी. सी. संगीत संमेलन असे नाव होते. त्यात सहभागी झालेले कलाकार जागतिक कीर्तीचे होते.

प्रतिमा बेदी यांचे नृत्य, झाकीर हुसेन यांची तबल्याची साथ आणि स्वतंत्र तबला वादन, व्ही जी जोग  यांचे व्हायोलीन वादन, डॉ. किचलू यांचे गायन अशी कलाकारांची मांदियाळी सांगितली तरी या कार्यक्रमाची उंची लक्षात येईल. कार्यक्रमाची तयारीही तशीच केलेली होती. मंडप टाकला होता. तिकिटे लावली होती.  सर्वात पुढचे तिकिट १00 रुपयांचे होते. आता १00 रुपयांचे काही वाटणार नाही पण मी १९८३ चे दर सांगत आहे. तेव्हा १00 रुपये ही मोठी रक्कम होती. मात्र कलाकार सर्व दर्जेदार असल्यामुळे तरीही तिकिट विक्री अल्पावधीतच पूर्ण झाली होती.

कार्यक्रम जानेवारी महिन्यात होता. या काळात पाऊस पडेल असे ध्यानी मनी स्वप्नीसुद्धा वाटले नव्हते.  पण व्ही. जी. जोग यांचे व्हायोलीन वादन आणि झाकीर हुसेन यांचा तबला यांची जुगलबंदी होणार होती त्या दिवशी अचानकच पावसाला सुरुवात झाली. काय करावे असा प्रश्न पडला. मग ताबडतोब निर्णय घेतला आणि कार्यक्रमाचे स्थळ बदलून रंगभवन असे केले. तिकिट विक्री थांबवावी लागली कारण रंगभवन सभागृहाची क्षमता मंडपाएवढी नव्हती.  कसे का असेना पण तिथे ही जुगलबंदी सुरू झाली.

 या विलक्षण रंगलेल्या जुगलबंदीची आठवण अजूनही मला आहे. ती संपली तेव्हा पं. विष्णुपंत जोग यांनी  शेवटी टिंग असा आवाज केला तर झाकीर हुसेन यांनी हातातला हातोडा तबल्यावर आपटून ठप्प असा आवाज केला. जुगलबंदीचा शेवट टाळ्या घेऊन गेला.  ही जुगलबंदी संपून पुढचा गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. पण पंडितजी म्हणजे जोग यांनी आता विश्रांतीची गरज आहे असे म्हटल्यामुळे त्यांना त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी नेऊन सोडावे लागले. 

सारे कलाकार राजधानी हॉटेलवर उतरले होते. मी आणि तडवळकर सर गाडी घेऊन त्यांना सोडायला निघालो. सभागृहाच्या दारात आलो पण पंडितजींच्या चपलाच सापडेनात. खूप शोधाशोध केली पण चपलेचा पत्ता लागला नाही. शेवटी पंडितजी म्हणाले, “चलो हमे आज यहाँसे नंगे पाव जाना पडेगा.” असे म्हणून आम्ही बाहेर पडलो. सभागृहाच्या बाहेर नंगे पाँव पंडितजी आणि आम्ही गाडीत बसण्याच्या तयारीत असतानाच झाकीर हुसेन तिथे धावत धावत आले.

….. ते ओरडले, “ पंडितजी रुकिये, आपकी चप्पल मिल गयी है. “ आणि असे ओरडतच ते ती चप्पल आपल्या छातीशी धरून घेऊन आले. चप्पल खाली टाकली आणि त्यांच्या पायाशी बसून त्यांना ते चप्पल घालण्याची विनंती करायला लागले. पंडितजींच्या डोळ्यातून तर अश्रूंच्या धारा कोसळायला लागल्या. ते म्हणाले, “ आपने मेरी चप्पल सीनेसे लगायी  है !”  त्यावर झाकीर हुसेन म्हणाले, “ तो क्या हुआ ? मला तुमची चप्पल उराशी लावता आली हे माझे नशीब आहे. “

खरा कलाकार किती नम्र असतो याचे ते दर्शन घडून आम्हालाही गहिंवरून आले. आमच्या समोर एक अविस्मरणीय घटना घडत होती. तिचे साक्षी आम्हीच होतो. याचे वाईटही वाटले. कलाकाराच्या विनयशीलतेचा हा प्रसंग जगाला दिसायला हवा होता असे वाटले कारण झाकीर हुसेनच काय पण कोणा सामान्य माणसालाही अशी कोणा कलाकाराची चप्पल हृदयाशी धरण्यात कमीपणाच वाटला असता. ती सापडल्यावर कोणाकडून तरी ती पाठवून दिली असती. 

हा प्रसंग घडताना स्वच्छ चांदणे पडले होते आणि साक्षात चंद्र या घटनेचा साक्षीदार होता. कोणीही  व्यक्ती दिसते कशी आणि कपडे कशी घालते याचा तर प्रभाव पडतोच पण, तो चिरकाल टिकत नाही. मात्र कोणीही माणूस आपल्या वर्तनातून व्यक्त होतो तेव्हा त्याचा खरा आणि दीर्घकाळ टिकणारा प्रभाव पडत असतो.

तो क्षण मी आजही विसरू शकत नाही. 

कमालीचा कलावंत … भारतीयांचा अभिमान …  विलक्षण नम्र माणूस … असा माणूस आपल्यातून गेला आहे.  असा तबलापटू होणे नाही ..  त्यांच्या वागण्यातील  सुसंस्कृतपणा, बोलण्यातील मार्दव भारावून टाकणारे होते.  सेवासदनमधील आम्ही भाग्यवंत माणसं … आमचा त्यांच्याशी जवळून परिचय झाला … बोलता आलं … पाहता आलं … ऐकता आलं…!

अशा ह्या महान कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली !!!!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

वहिनी

बंडू आणि बेबीची वहिनी म्हणून गल्लीतले सारेच त्यांना वहिनीच म्हणायचे.  आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात अनेक स्त्रिया माझ्या जीवनात आल्या. नात्यातल्या,  शेजारपाजारच्या,  काही सहज ओळखीच्या झालेल्या,  काही शिक्षिका,  काही मैत्रिणी,  लग्ना आधीच्या,  लग्नानंतरच्या,  एका संस्थेच्या माध्यमातून काम करण्याच्या निमित्ताने भेटलेल्या तळागाळातल्या स्त्रिया, घरातल्या मदतनीस,  ठिकठिकाणच्या प्रवासात ओळख झालेल्या, निराळ्या धर्माच्या,संस्कृतीच्या,  सहज भेटलेल्या अशा कितीतरी सबल,  दुर्बल,  नीटनेटक्या,  गबाळ्या,  हुशार,  स्वावलंबी,  अगतिक,  असहाय्य, परावलंबी,  जिद्दी,  महत्त्वाकांक्षी तर कुठलंच ध्येय नसलेल्या वारा वाहेल तशा वाहत जाणाऱ्या स्त्रिया मला ठिकठिकाणी भेटल्या पण लहानपणीच्या वहिनींना मात्र माझ्या मनात आजही एक वेगळाच कोपरा मी सांभाळून ठेवलेला आहे.  त्यावेळी वहिनींच्या व्यक्तिमत्त्वातलं जे जाणवलं नाही त्याचा विचार आता आयुष्य भरपूर अनुभवलेल्या माझ्या मनाला जाणवतं आणि नकळत त्या व्यक्तिमत्त्वासमोर माझे हात जुळतात.

विस्तृत कुटुंबाचा भार वहिनींनी पेलला होता.  त्यांचं माहेर सातार्‍याचं. तसा माहेरचाही  बहीण भावंडांचा गोतावळा काही कमी नव्हता पण सातारचे बापूसाहेब ही एक नावलौकिक कमावलेली असामी होती.  साहित्यप्रेमी, नाट्यप्रेमी म्हणून सातारकरांना त्यांची ओळख होती आणि त्यांची ही लाडकी कन्या म्हणजे आम्ही हाक मारत असू त्या वहिनी.  वहिनींनाही बापूसाहेबांचा फार अभिमान होता.  पित्यावर त्यांचं निस्सीम प्रेम होतं.  उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलाबाळांना घेऊन त्या माहेरपणाला सातारी जात आणि परत येत तेव्हा त्यांच्यासोबत धान्य,  कपडे, फळे, भाज्या, मिठाया विशेषत: कंदी पेढे यांची बरीचशी गाठोडी असत. वहिनींचा चेहरा फुललेला असे आणि त्यांच्या मुलांकडून म्हणजेच आमच्या सवंगड्यांकडून आम्हाला साताऱ्याच्या खास गमतीजमती ऐकायलाही मजा यायची.

अशी ही लाडकी बापूसाहेब सातारकर यांची  कन्या सासरी मात्र गणगोताच्या गराड्यात पार जुंपलेली असायची.

आमचं कुटुंब स्वतंत्र होतं. आई-वडील, आजी आणि आम्ही बहिणी. मुळातच वडील एकटेच असल्यामुळे आम्हाला फारशी नातीच नव्हती, विस्तारित नात्यांच्या एकत्र कुटुंबात राहण्याचा आम्हाला अनुभवच नव्हता. त्या पार्श्वभूमीवर या मुल्हेरकरांचे कुटुंब नक्कीच मोठं होतं.  बाबासाहेब आणि वहिनी या कुटुंबाचे बळकट  खांब होते. आर्थिक बाजू सांभाळण्याचं कर्तव्य बाबांचं आणि घर सांभाळण्याची जबाबदारी वहिनींची.  घरात सासरे, नवऱ्याची म्हातारी आजारी आत्या, दीर, नणंद आणि त्यांची पाच मुलं.  धोबी गल्लीतलं त्यांचं घर वडिलोपार्जित असावं.  बाबासाहेबांनी त्यावर वरचा मजला बांधून घेतला होता.  वहिनींच्या आयुष्यात स्वत:चं घर हा एकच हातचा मौलिक असावा. 

त्यावेळी दोनशे रुपये महिन्याची कमाई म्हणजे खूप होती का?  बाबासाहेब आरटीओत होते.  त्यांचाही स्वभाव हसरा, खेळकर, विनोदी आणि परिस्थितीला टक्कर देणारा होता. बाबासाहेब आणि वहिनींच्यात  त्याकाळी घरगुती कारणांमुळे धुसफुस  होतही असेल पण तसं त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि त्याच सामर्थ्यावर वहिनी अनंत छिद्रे असलेला संसार नेटाने शिवत राहिल्या.  काहीच नव्हतं त्यांच्या घरात. झोपायला गाद्या नव्हत्या,  कपड्याचं कपाट नव्हतं,  एका जुनाट पत्र्याच्या पेटीत सगळ्यांचे कपडे ठेवलेले असत. म्हातारी आजारी आत्या— जिला “बाई” म्हणायचे.. त्या दिवसभर खोकायच्या. सासरे नानाही तसे विचित्रच वागायचे पण बंडू बेबी आणि बाबासाहेबा या भावंडांचं मात्र  एकमेकांवर खूप प्रेम होतं.  बेबीला तर कितीतरी लहान वयात जबाबदारीची जाणीव झाली असावी.  ती शाळा, अभ्यास सांभाळून वहिनींना घर कामात अगदी तळमळीने मदत करायची. खरं म्हणजे तिच्या आणि माझ्या वयात फारसं अंतरही नव्हतं पण मला ज्या गोष्टी त्यावेळी येत नव्हत्या त्या ती अतिशय सफाईदारपणे तेव्हा करायची. त्यामुळे बेबी सुद्धा माझ्यासाठी एक कौतुकाची व्यक्ती होती.  शिवाय त्यांच्या घरी सतत पाहुणेही असायचे.  त्यांच्या नात्यातलीच माणसं असत.  काहींची मुलं तर शिक्षणासाठी अथवा परीक्षेचं केंद्र आहे म्हणून त्यांच्या घरी मुक्कामी सुद्धा असायची.  प्रत्येक सण त्यांच्याकडे पारंपारिक पद्धतीने,  साग्रसंगीत साजरा व्हायचा.  दिवाळी आणि गणपती उत्सवाचंच तर फारच सुरेख साजरीकरण  असायचं.  खरं सांगू ? लहानपणी बाह्य गोष्टींचा पगडा मनावर नसतोच.  भले चार बोडक्या भिंतीच असतील  पण त्या भिंतीच्या मधलं जे वातावरण असायचं ना त्याचं आम्हाला खूप आकर्षण होतं आणि या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रस्थानी वहिनी होत्या. 

किती सुंदर होत्या वहिनी!  लहानसाच पण मोहक चेहरा,  नाकीडोळी नीटस,  डोळ्यात सदैव हसरे आणि प्रेमळ भाव,  लांब सडक केस, ठेंगणा पण लवचिक बांधा,  बोलणं तर इतकं मधुर असायचं …! संसाराची दिवस रात्रीची टोकं सांभाळताना दमछाक झाली होती त्या सौंदर्याची.

अचानक कुणी पाहुणा दारी आला की पटकन त्या लांब सडक केसांची कशीतरी  गाठ बांधायच्या, घरातलंच गुंडाळलेलं लुगडं,  सैल झंपर सावरत अनवाणीच लगबगीने वाण्याकडे जायच्या. उधार उसनवारी करून वाणसामान आणायच्या आणि आलेल्या पाहुण्यांना पोटभर जेवायला घालून त्याने दिलेल्या तृप्तीच्या ढेकरानेच त्या समाधानी व्हायच्या. वहिनी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा. साधं  “लिंबाचं सरबत सुद्धा”  अमृतासारखं असायचं.  त्यांच्या हातच्या फोडणीच्या भाताची चव तर मी आजही विसरलेली नाही.  अनेक खाद्यपदार्थांच्या चवीत त्यांच्या हाताची चव मिसळलेली असायची.  मला आजही आठवतं सकाळचे उरलेले जेवण लहान लहान भांड्यातून एका मोठ्या परातीत पाणी घालून त्यात ठेवलेलं असायचं,  त्यावर झाकण म्हणून एखादा फडका असायचा. शाळा सुटल्यानंतर घरी आल्यावर मी कित्येकदा चित्रा, बेबी बरोबर त्या परातीतलं सकाळचं जेवण जेवलेली आहे. साधंच तर असायचं.   पोळी, कधी आंबट वरण, उसळ, नाहीतर वालाचं बिरडं, किंवा माशाचं कालवण  पण त्या स्वादिष्ट जेवणाने खरोखरच आत्म्याची तृप्ती व्हायची. त्या आठवणीने आजही माझ्या तोंडाला पाणी सुटतं!  लहानपणी कुठे कळत होतं कुणाची आर्थिक चणचण, संसारातली ओढाताण, काळज्या,  चिंता.  एका चपातीचीही वाटणी करणे किती मुश्कील असतं हा विचार बालमनाला कधीच शिवला नाही. घरात जशी आई असते ना तशीच या समोरच्या घरातली ही वहिनी होती. आम्हाला कधीच जाणवलं नाही की वहिनींच्या गोऱ्यापान,  सुरेख, घाटदार मनगटावर गोठ पाटल्या नव्हत्या.  होत्या त्या दोन काचेच्या बांगड्या.  त्यांच्या गळ्यात काळ्या  मण्याची सुतात ओवलेली पोतही आम्हाला सुंदर वाटायची.  त्यांच्या पायात वाहणा होत्या की नव्हत्या हे आम्ही कधीच पाहिले नाही.  आम्हाला आठवते ते सणासुदीच्या दिवशी खोलीभर पसरून ठेवलेला सुगंधित, खमंगपणा दरवळणारा केवढा तरी  चुलीवर  शिजवलेला स्वयंपाक आणि पाहुण्यांनी भरगच्च भरलेलं ते घर आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद लुटणाऱ्या त्या पंगती आणि हसतमुखाने आग्रह कर करून वाढणाऱ्या वहिनी.  हे सगळं त्यांना कसं जमत होतं हा विचार आता मनात येतो. 

मला टायफॉईड झाला होता.तोंडाची चव पार गेली होती. वहिनी रोजच माझ्याजवळ येऊन बसायच्या. एकदिवस मी त्यांना म्हटलं, “शेवळाची कणी नाही का केली?” दुसर्‍या दिवशी त्या माझ्यासाठी वाटीभर “शेवळाची कणी” घेउन आल्या. अत्यंत किचकट पण स्वादीष्ट पदार्थ.पण वहिनी झटपट बनवायच्या. 

काळ थांबत नाही.  काळा बरोबर जीवन सरकतं  नाना—बाई स्वर्गस्थ झाले. बाबासाहेबांनी यथाशक्ती बहीण भावाला  त्यांना पायावर उभे राहण्यापुरतं शिक्षण दिलं.  बेबी च्या लग्नात आईच्या मायेने वहिनींनी तिची पाठवणी केली. आयुष्याच्या वाटेवर नणंद भावजयीत वाद झाले असतील पण काळाच्या ओघात ते वाहून गेलं.  एक अलौकिक मायलेकीचं घट्ट नातं त्यांच्यात टिकून राहिलं.  माहेरचा उंबरठा ओलांडताना दोघींच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या.  विलक्षण वात्सल्याचं ते दृश्य होतं. बेबी आजही म्हणते!” मी माझी आई पाहिली नाही.  मला माझी आई आठवत नाही पण वहिनीच माझी आई होती.”

 धन, संपत्ती, श्रीमंती म्हणजे काय असतं हो?  शब्द, भावनांमधून जे आत्म्याला बिलगतं त्याहून मौल्यवान काहीच नसतं.

बाबा वहिनींची मुलंही मार्गी लागली, चतुर्भुज झाली.  जुनं मागे टाकून वहिनींचा संसार असा नव्याने पुन्हा फुलून गेला.  पण वहिनी त्याच होत्या. तेव्हाही आणि आताही. 

बाबासाहेब निवृत्त झाले तेव्हा काही फंडांचे पैसे त्यांना मिळाले. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. तेव्हा ते म्हणाले,” सहजीवनात मी तृप्त आहे. मला अशी सहचारिणी मिळाली की जिने माझ्या डगमगत्या जीवन नौकेतून हसतमुखाने  सोबत केली.  माझ्या नौकेची  वल्ही  तीच होती.  मी तिच्यासाठी काहीच केलं नाही.  तिचं डोंगराएवढं ॠण मी काही फेडू शकणार नाही पण आज मी तिच्या भुंड्या मनगटावर स्वतःच्या हाताने हे सोन्याचे बिलवर घालणार आहे. “ .. त्यावेळचे  वहिनींच्या चेहऱ्यावरचे भाव मी कोणत्या शब्दात टिपू?  पण त्या क्षणी त्यांच्या परसदारीचा सोनचाफ्याचा वृक्ष अंगोपांगी फुलला होता आणि त्या कांचन वृक्षाचा दरवळ असमंतात पसरला होता. तो सुवर्ण वृक्ष म्हणजे वहिनींच्या जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार होता आणि तोही जणू काही अंतर्यामी आनंदला होता.

अशोक (त्यांचा लेक)  एअर इंडियात असताना त्याने वहिनी आणि बाबासाहेबांसाठी लंडनची सहल आयोजित केली. विमानाची तिकिटे तर विना शुल्क होती. बाकीचा खर्च त्यांनी केला असावा.  वहिनींना मुळीच जायचं नव्हतं पण सगळ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी अखेर जाण्याचे मान्य केले. वहिनींच्या आयुष्यात असा क्षण येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते पण त्याचवेळी त्यांच्या प्रियजनांचा आनंदही खूप मोठा होता. त्या जेव्हा लंडनून परत आल्या तेव्हा मी त्यांना भेटायला गेले होते. धोबी गल्ली ते लंडन— वहिनींच्या आयुष्यातला अकल्पित टप्पा होता तो!  मी त्यांना विचारलं,” कसा वाटला राणीचा देश ?”

तेव्हा त्या हात झटकून म्हणाल्या,” काय की बाई, एक मिनिटंही मी बाबासाहेबांचा हात सोडला नाही.  कधी घरी जाते असं झालं होतं मला! “

 .. .. .. त्यावेळी मात्र वहिनींकडे पाहताना “इथेच माझे पंढरपुर”  म्हणणारी ती वारकरीणच मला आठवली.

“ ते जाऊदे ग!  हे बघ सकाळी थोडी तळलेली कलेजी केली होती. खातेस का?”

 .. .. त्या क्षणी मला आठवलं ते मोठ्या परातीत पाणी घालून झाकून ठेवलेलं सकाळचं उरलेलं चविष्ट जेवण!

 या क्षणी माझ्याजवळ होती ती तीच अन्नपूर्णा वहिनी.  प्रेमाने खाऊ घालणारी माऊली…

 आज वहिनी नाहीत पण जेव्हा जेव्हा मी काटेरी फांदीवर उमललेलं टवटवीत गुलाबाचे फुल पाहते तेव्हा मला वहिनींचीच आठवण येते..

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ त्याचं असं झालं… भाग-१- लेखक – डॉ. श्रीनिवास नाटेकर ☆ परिचय – डॉ. संदीप श्रोत्री ☆

डॉ. संदीप श्रोत्री

परिचय

शिक्षण – MBBS.MS. FIAGES. (लॅप्रास्कोपी व जी आय एंडोस्कोपी सर्जन.सातारा.)

फाउंडर सेक्रेटरी, सातारा सर्जिकल सोसायटी, फाउंडर सेक्रेटरी,असोसिएशन ऑफ हाॅस्पिटल ओनर्स, वैद्यकीय क्षेत्रातील अनेक संस्थांचे पदाधिकारी. तसेच या क्षेत्रातून सामाजिक सेवेचे उपक्रम यशस्वी रित्या राबवले आहेत.

कार्य व सन्मान:

  • संस्थापक, रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ, सातारा
  • दुर्ग साहित्य संमेलनांचे आयोजन व सक्रीय सहभाग
  • वन्य लोकसंस्कृती व जैव विविधता यांच्या संवर्धनासाठी अनेक प्रकारे जनजागृती
  • डोंगर पठारावरील वनस्पतीत व पक्षी यांचा विशेष अभ्यास
  • हिमालय ट्रेकिंग मोहिम… सहभाग व लेखन
  • पक्षीनिरीक्षण, आकाशदर्शन, वृक्षारोपण, जलसंधारण यावर व्याख्याने,स्लाईड शो, वृत्तपत्रीय लेखन
  • वसंत व्याख्यानमाला, पुणे
  • निमंत्रित विख्यात :  इंडिया क्लब, दुबई येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त व्याख्यान… “माझी भटकंती” इत्यादी
  • अध्यक्ष, तिसरे ‘ शिवार ‘ साहित्य संमेलन. इत्यादी

पुरस्कार

वसुंधरा पर्यावरण पुरस्कार, किर्लोस्कर वसुंधरा सन्मान, कोयना निसर्ग मित्र पुरस्कार, द. महाराष्ट्र साहित्य पुरस्कार, मुंबई मराठी प्रवासी संघटना पुरस्कार, गिरिमित्र सन्मान पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी(कासवाचे बेट),  वसुंधरा रत्न राज्यस्तरीय पुरस्कार (कासवाचे बेट),  श्री स्थानक ठाणे मराठी ग्रंथालय पुरस्कार (उत्कृष्ट प्रवास वर्णन), धन्वंतरी पुरस्कार, महाराष्ट्र. राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ यांचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार (कासवाचे बेट)

प्रकाशित साहित्य

एव्हरेस्टच्या पायथ्याशी, पुष्पपठार कास, मार्क इंग्लिस, साद अन्नपूर्णेची, काटेरी केनियाची मुलायम सफर, दुर्ग महाराष्ट्रातील, कासवांचे बेट, मनू राष्ट्रीय अरण्य, इंकांची देवनगरी, रहस्यमय पेरु, निसर्ग गुपिते भाग १, सातशे पेक्षा जास्त लेखांचे विविध माध्यमातून प्रकाशन

? इंद्रधनुष्य ?

☆ त्याचं असं झालं… भाग-१ – लेखक – डॉ. श्रीनिवास नाटेकर ☆ परिचय – डॉ. संदीप श्रोत्री ☆

(एक आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा आगळा वेगळा परिचय)  

पुस्तक : त्या चं असं झालं

लेखक : डॉ. श्रीनिवास नाटेकर   

प्रकाशक : चतुरंग प्रकाशन 

पृष्ठ : 264 

किंमत :  रु. 150

त्याचं असं झालं, .. मी एकदा दुपारी सांगली मधील क्लिनिकमध्ये बसलो होतो, मला मिरज येथील प्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॉ डी के गोसावी यांच्याकडून फक्त ‘एक व्ही आय पी रुग्ण’ येणार आहे, इतकेच माहिती होते, आणि त्या मागील दराने आत येतील. बरोबर साडे तीन वाजता मागील दारात एक गाडी थांबली, गाडीतून पांढरीशुभ्र साडी नेसलेली एक शालीन, डोक्यावरून पदर घेतलेली, नम्र स्त्री उतरली, तिने तिच्या जगप्रसिद्ध खळाळत्या हास्यमय आवाजात सांगितले, ‘नमस्कार डॉक्टर साहेब, माझाच छातीचा एक्स रे काढायचा आहे!’ अंदाजे तासभर ती माझ्या क्लिनिक मध्ये होती. एकूण आठ एक्सरे मला काढायला लागले. त्या दरम्यान माझ्या गाण्याच्या आवडीमुळे आमच्या गप्पा चांगल्या रंगल्या, इतक्या कि ‘सैंया’ चित्रपटातील ‘काली काली रात रे, बडा सताये, तेरी याद में..’ हे गाणे आठवून आम्ही दोघांनी मिळून एकसुरात गुणगुणलो! ती होती गान कोकिळा, स्वरशारदा लता मंगेशकर !

त्याचं असं झालं, .. दुपारी डॉ डी के गोसावी यांचा फोन आला, त्यांच्या मिरज येथील फार्म हाउस वर गप्पा मारायला संध्याकाळी बोलावले होते. मी वेळेवर गेलो, टेबलावर स्कॉच आणि तीन ग्लास ठेवलेले होते, एक अस्ताव्यस्त केस वाढवलेला गोरापान लहान चणीचा माणूस बसला होता. डॉक्टरांनी ओळख करून दिली, हे कविवर्य बा भ बोरकर!

त्याचं असं झालं, .. ती व्यक्ती दोन वेळा माझ्या घरी राहिली होती, तोंडात पान सतत असल्यामुळे ओठाचा चंबू, चणीने लहान, बुटके, गोल चेहरा, गोबरे गाल. त्यांचा एक्स रे छातीचा मी बघितला आणि म्हणले, ‘एक फुफ्फुस अर्ध्यापेक्षा जास्त निकामी, दुसरे देखील हवेचे फुगे झाल्यामुळे (एम्फिझिमा) लवकरच कामातून बाद होणार! तरिही ते गात होते, तासंतास! त्यांचे नाव पंडित कुमार गंधर्व ! 

त्याचं असं झालं, .. मिरज रेल्वे स्टेशनवर मित्राला सोडायला गेलो होतो, खूप गर्दीमध्ये पाठीवर थाप पडली, मागे वळून बघितले तर दोन मित्र होते, त्यांना मुंबईला जायचे होते. इथे रेल्वे बदलावी लागायची, महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये त्यांना जागा मिळत नव्हती. रिझर्वेशन केले नव्हते, अगदी काकुळतीला येऊन त्यांनी मदतीसाठी विचारले. त्याचवेळी माझा मित्र असलेला आमदार विक्रम घाटगे भेटला, त्यांने दोन बर्थ मिळवून दिले, त्या दोघांपैकी एक होता माझा खास मित्र मुकुंद जोशी आणि दुसरा होता आमचा मित्र सुनील गावस्कर!

त्याचं असं झालं, ..  एकदा सांगली सिव्हील हॉस्पिटलसाठी एकस रे मशीन खरेदी करण्यासाठी मुंबईमध्ये गेलो होतो, कामे आटोपून सचिवालयाजवळ फिरत असताना समोर स्टेट बँकेची इमारत होती, नुकताच आपल्या क्रिकेट टीमने इंग्लंडमध्ये जाऊन त्यांच्यावर विजय मिळविला होता. सहज म्हणून वर गेलो. केबिनबाहेरील सेक्रेटरीकडे ‘ओल्ड फ्रेंड’ म्हणले आणि स्वतःचे नाव न लिहिता चिठ्ठी दिली, आतून ती व्यक्ती स्वतः बाहेर आली, दार उघडल्याक्षणी मला मिठी मारून विचारले, ‘काय श्री, काय म्हणतोस?’ ती व्यक्ती होती, भारताचा यशस्वी कर्णधार अजित वाडेकर ! 

त्याचं असं झालं, .. सांगलीच्या पोलीस सांस्कृतिक भवनाच्या हॉलमध्ये माडीवर व्हरांड्यात मोडकळीस आलेल्या दोन खुर्च्या हाताने साफ करून दोन व्यक्ती बसल्या होत्या, एका पोलिसाने आणलेल्या मळकट किटलीमधून दोन कप चहाचे भरले, ते कप देखील कळकट आणि टवके उडालेले होते, चहा आणि बिस्कीट खात गप्पा मारत बसलेल्या त्या दोन व्यक्तिपैकी एक म्हणजे मी होतो, आणि दुसरी व्यक्ती होती भारताचे माजी  पंतप्रधान चौधरी चरणसिंग!

त्याचं असं झालं, ..  एकदा सकाळी माझे मित्र माधवराव आपटे यांचा फोन आला, लगेच विलिंग्डन क्लब वर ये, आम्ही तिघे आहोत, चौथा पार्टनर हवा आहे. मी गेलो. हातात रॅकेट, पायात महागडे बूट घालून माझी वाट पाहणारे ते होते प्रसिद्ध उद्योगपती  श्री आदित्य बिर्ला! 

त्याचं असं झालं, ..  सांगलीमध्ये एकदा १९९४ साली प्रभाताई कुलकर्णी यांच्या एका कारखान्याचा उद्घाटन समारंभ होता. सूत्रसंचालन मी करणार होतो, माझ्या इंग्रजी संभाषण कलेमुळे कारखाना दाखवण्याची जबाबदारी देखील माझीच होती. पाहुणे आले. समारंभ छान पार पडला, शेवटी पाहुण्यांनी माझी ओळख झाल्यावर एकाच वाक्य म्हणले, ‘नेव्हर इमाजिंन्ड यु आर अ मेडिकल डॉक्टर!’ ती व्यक्ती होती,  श्री रतन टाटा!

त्याचं असं झालं, ..  घरीच संध्याकाळी गप्पा रंगात आल्या होत्या, समोरची व्यक्ती सांगत होती, ‘आमच्या वाटेला हिरॉईन कधी येत नाही, येतात त्या मर्कटचेष्टा करणाऱ्या बारबाला, स्कॉच बाटलीमधील कोरा काळा कडू चहा आम्हाला प्यावा लागतो आणि झिंगावे लागते खोटे खोटे ! आम्ही पडलो व्हिलन, आमच्या गोळीबारात कधी कुणी मारत नाही, उलट हिरोच्या मात्र प्रत्येक गोळीने एकेक मुडदा पडतो.’ ती व्यक्ती होती सदाशिव अमरापूरकर!

त्याचं असं झालं, ..  माझा मित्र डॉ आडिगा याचा फोन आला, आज रात्री साडेसात वाजता घरी जेवायला यायचे आहे. मी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी पोहोचलो. तिसर्या मजल्यावरील खोलीत तीन खुर्च्या होत्या, टेबलावर ‘जॉनी वॉकर’ होती, समोरच्या खुर्चीत एक वृद्ध सद्गृहस्थ बसले होते, गोरेपान, तुळतुळीत टक्कल, भुरभुरणारे किरकोळ पांढरे केस, सोनेरी काडीचा चष्मा, झब्बा आणि त्यावर असणारी सोनेरी बटणे.  ते होते ओंकारप्रसाद उर्फ ओ पी नय्यर! 

त्याचं असं झालं, ..  घरी ‘काका’ आले होते, गप्पांना सुरुवात होणार, तितक्यात लेदर बॅगमध्ये हात घालता घालता काका म्हणाले, ‘चला संध्येची वेळ झाली’, मी म्हणले, ‘काका तुम्ही माझ्या घरी आहात, तेंव्हा व्हिस्की माझी!’  गप्पा रंगात येत असताना मध्येच काका ओरडून माझ्या बायकोला सांगतात, ‘सुधाताई, आमचं अमृतप्राशन झाल ग, आता वाढ!’ मला वाटले, काका स्वतःच्या कवितेतील अनुभूती आणि त्यांचा जन्म उलगडून सांगत होते, त्यावेळी त्या ग्लासमध्ये जे काही असते, ती दारू नसतीच, ते असते अमृत! आणि काका म्हणजे साक्षात कविवर्य ‘मंगेश पाडगावकर’!

त्याचं असं झालं, ..  बंगल्याच्या दारात एक मर्सिडीज गाडी उभी होती, पांढरीशुभ्र लुंगी आणि नुकतीच अंघोळ केलेला उघडाबंब तुकतुकीत देह सांभाळत ती व्यक्ती मनापासून गाडी धूत आणि पुसत बसली होती. मीही त्यांच्याबरोबर हातात फडके घेतले आणि ती गाडी पुसायला लागलो. सकाळची वेळ, त्या वेळी दूरदर्शनवर रामायण मालिका सुरु होती. आमच्या घरात आणि आसपासच्या बंगल्यातदेखील त्याचा आवाज मोठा असल्यामुळे आमच्यापर्यंत येत होता. रविंद्र जैन यांचे संगीत रामायण मालिकेमध्ये भरपूर आहे. विविध प्रसंगात विविध रागांचा वापर केल्यामुळे मालिकेमध्ये रंगत आली आहे. तिकडे तो राग ऐकला कि गाडी धुता धुता इकडे ती व्यक्ती त्या रागांचे विस्तारण करून, विडंबन करत गंमतजमत करून गात होती. तिकडे रामायण संपले, इकडे गाडी स्वच्छ धुवून झाली, मी ऐकत होतो आणि गाणारी व्यक्ती होती, ‘पंडित भीमसेन जोशी !’ 

  – क्रमशः भाग पहिला 

© डॉ. संदीप गजानन श्रोत्री,

सातारा 

मो 9822058583

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आनंद… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

आनंद… कवी अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

मी पेपर उघडला,

त्यात  मीच दिलेली

जाहिरात होती

 

हरवला आहे ..आनंद

पत्ता विसरण्याचा त्याला आहे छंद …

 

रंग … दिसेल तो

उंची ..भासेल ती

 

कपडे सुखाचे

बटण  दुःखाचे

 

कुणाला न सांगता घरातून गेला आहे निघून

थकलो आहोत सगळीकडे शोधून

 

आनंदा , परत ये

कुणीही तुझ्यावर रागवणार नाही

तुझ्यावर  कसलीही सक्ती करणार नाही

 

घरातले सगळे आसुसून बघताहेत तुझी वाट

दार उघडं ठेवलंय वाढून ठेवलंय आशेचं  ताट

 

शोधून आणणाऱ्याला दिलं  जाईल इनाम

 

मग म्हटलं आपणच करावं हे  काम

काय आश्चर्य! सापडला की गुलाम

 

जुन्या पुस्तकाआड

जुन्या गाण्याच्या अर्थाच्या पल्याड

 

आठवणींच्या मोरपिसात

अगरबत्तीच्या मंद वासात

 

हवेच्या थंडगार झुळूकेत

लाटांच्या हळुवार स्पर्शात

 

अवेळी येणाऱ्या पावसात

प्राण्यांच्या  मखमली स्पर्शात

 

त्यानेच मारला पाठीत धप्पा

जुन्या मित्र मैत्रिणींशी मारताना गप्पा

 

मी म्हटलं अरे ,

इथेच होतास ?

उगाच दिली  मी जाहिरात

तो म्हणाला,’वेडी असता तुम्ही माणसं

बाहेर शोधता

मी असतो तुमच्याच मनात

☆   

 लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈