श्री सुहास रघुनाथ पंडित
जीवनरंग
☆ “गोष्ट तशी जुनीच…” – भाग – २ – लेखिका : डॉ. तारा भवाळकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
(ही बहिणही रडत भेकत माहेरी आली. तर सगळे तिला म्हणाले, ” हे बघ, एकदा नीट पाहून तुझे आम्ही लग्न लावून दिलं होतं. आता तू आणि तुझं नशीब. ” ) – इथून पुढे —
” असं कसं, असं कसं ? आता तिच एकटीचच नशीब कस?
त्या नव-याचही नशीब नाही का ?आणि तिची सासू आमच्या
मरून गेलेल्या आईचा काय म्हणून उद्धार करते ? मोठ्या ताईला आणि दुस-या माईला दोन दोन मुलगे कसे झाले मग आधी ? त्या नाहीत का याच आईच्या लेकी. “
” पुरे ग, तुझी अक्कल नको पाजळू. प्रसंग काय, ही बोलतीय काय ? “
” काय चुकीचं बोलले ? अं, खरं तर हे तुम्ही तिच्या सासरच्या माणसांना ठणकावून सांगायला हवं होतं. आणि तिचा नवरा एवढा शिकला सवरलेला हिला काडीमोड न देताच असं कसं दुसरं लग्न करतो ? बेकायदेशीर नाही का ते ? ही आपली रडत भेकत इथं आली. तिथं नव-याला आणि सासूला नाही का जाब विचारायचा. लग्नाच्या आधी माहित होतं ना त्यांना आम्ही चौघी बहिणीच आहोत म्हणून. “
“अग पण तुला विचारलय का कुणी ? अं? आम्ही मोठी माणसं आहोत ना ? तिला त्यांनी घटस्फोट दिला आणि उद्या ही पोरींच्या सकट माहेरी पाठवून दिली तर सांभाळणार कोण त्यांना ? “
” मग काय त्याच घरात राहणार काय ही सवती बरोबर ? “
” काय करणार मग? त्याच्याशी बोलणं झालंय आमचं. तो हिलाही नांदवायला तयार आहे. हा मोठेपणाच की त्याचा. “
” डोंबलाचा मोठेपणा. मुलगा किंवा मुलगी होण्यात बाईचा काहीच दोष नसतो, असला तर पुरुषाचाच असतो हे शास्त्रानं सिद्ध झालय. तुम्हालाही हे माहित आहे आणि त्यालाही हे माहीत आहे. “
” अग पण त्यांच्या वंशाला मुलगा हवा असला तर त्यांना ? “
” कशाला पण ? मुलगी नाही का वंशाचं नाव मोठं करीत ? आणि मुलगा व्यसनी, मठ्ठ, गुन्हेगार झाला आणि एकुलता एक म्हटलं की हमखास अती लाडानी तो तसाच होतो, तर मग त्या वंशाचं नाव काय कोळश्यानं लिहीणार आहेत का हे लोक ? “
” अग बाई, काय तोंडाला हाड आहे का नाही तुझ्या ? जरा शुभ बोलायला काय होतं तुला ? “
” तुम्ही सगळी करणी अशुभ करा. “
” जाऊ दे, मरु दे. आता हिचचं एकदा लग्न करून द्या. मग हिची चुरुचुरू बोलणारी जीभ काय करते ते दिसेल “
अखेर वडीलच म्हणाले
” हिने आजवर माझं काहीच ऐकलं नाही. ” ते ही थकले होते आता.
” काॅलेजला जाऊ नको म्हटलं, गेली. मैदानावर मुलांच्या बरोबर खेळू नको म्हटलं तर अर्धी चड्डी घालून उंडारतीय. तोंड सुटल्यासारखी कुठे कुठे भाषण करतीय. कोण हिच्याशी लग्न करणार? सज्जन घरात तर हिचा निभाव लागणं कठीण! “
” कुणी सांगितलं तुम्हाला माझं लग्न करा म्हणून. आणि यांना सगळ्यांना जी सज्जन घरं पाहून दिली होती त्यांनी काय दिवे लावलेत ? “
खरंतर तिचं म्हणणं सगळ्यांना मनातून पटत होतं. पण कबूल करवत नव्हत. घरातला विरोधही दिवसेंदिवस बोथट होत गेला होता.
तिला जे जे करावसं वाटत होतं ते ते ती करतच होती. पण वडिलांच्या कडून पैसे घेणे तिने कधीच बंद केलं होतं. हायस्कूल मध्ये ती सतत वरच्या वर्गात होती. त्यामुळे तिला फी पडत नव्हती. शिवाय किरकोळ खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळत होती. सतत कुठल्या ना कुठल्या स्पर्धेत तिला बक्षीस मिळत होती. इतकं करून कॉलेजला इतर मुलींच्या सारखे तिचे नखरे नव्हते. नटण्या मुरडण्याची, दाग दागिन्यांची तिला आवड नव्हती. मोजके पण व्यवस्थित कपडे आणि नीटनेटकी स्वच्छ रहाणी. तरी अशी काय भणंगासारखी राहते ? मुलीच्या जातीला शोभेसं राहू नये का? बांगड्या नाहीत, गळ्यात नाही. काही नाही. घराण्याची अब्रू काढते नुसती. अशा कुरबुरींच्याकडे तिने कधीच लक्ष दिल नाही. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षापासूनच तिने एका कारखान्यात अर्धवेळ नोकरी धरली होती. एक श्रीमंत सेवाभावी गृहस्थानी केवळ बायकांना स्वावलंबी होता यावं म्हणून हा कारखाना सुरू केला. तिचं कामातलं कौशल्य, लोकसंपर्क साधण्याची कला, कष्टाळूपणा, प्रामाणिकपणा याची नोंद वरिष्ठांनी कधीच घेतली होती. तिचं काॅलेजच पदवीचं वर्ष संपलं आणि मालकांनी तिला मुद्दाम बोलावून घेतल.
“आता काय करणार आहेस ?”
“तसं काही ठरवलं नाही. पण काहीतरी कायमची नोकरी, कामधंदा करायचा आहे हे निश्चित. “
” आहे हेच काम वाढवायला आवडेल तुला?”
” म्हणजे ?”
“एक नवीन युनिट सुरू करायचय. खास ग्रामीण महिलांसाठी. इथं कोणती
उत्पादन करायची, महिलांना प्रशिक्षण कसं द्यायचं, दर्जा कसा वाढवायचा, बाजारातला खप कसा वाढवायचा अशा सर्वांगीण जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीच्या शोधात मी आहे. तुझी इच्छा असेल तर ही जबाबदारी घेण्यासाठी मी तुला निमंत्रण देतोय असं समज. “
क्षणभर ती गोंधळली. पण दुस-याच क्षणी तिच्या नजरेत आणि अविर्भावात असा भाव होता की हे असच व्हायला हवं होतं. मला प्रथम विचारलं याच्यात काहीच आश्चर्य नाही. तरी मृदूपणाने ती म्हणाली
” तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. “
आणि आता ? आता ती कारखानामय झाली. घरात राहणं जवळजवळ संपलं. आवश्यक कामासाठीही घरी जायला वेळ मिळेना. अखेर मालकांनीच कारखान्याजवळ तिच्या निवासाची चांगली व्यवस्था केली. एक दिवस शिपाई काम करणारी तिची सहकारी बाई सांगत आली, “बाहेर दोघीजणी तुम्हाला भेटण्यासाठी केव्हाच्या थांबल्या आहेत. तुम्ही मिटींग मधे होतात म्हणून सांगितल, “थांबा”. पण तरीही त्या थांबूनच राहिल्या. आता यातही तिला नवीन काहीच नव्हतं. तिची आणि तिच्या कारखान्याची कीर्ती, व्याप वाढतच होता. कोणी कोणी माणसं अखंड तिच्या भेटीसाठी खोळंबून असत. कधी व्यापारी, छोटे उद्योजक, कधी कुठल्या संस्थेच्या
कार्यक्रमासाठी तिला पाहुणे म्हणून निमंत्रण करणारे आणि कधी कधी काम मागणारे. आता केवळ स्त्रियांसाठी यापेक्षा गरजू आणि पात्र कामगारांसाठी मग त्या स्त्रिया असोत की पुरुष. तिचा कारखाना चालू होता. त्यातून तरुण तरुणी नवनवीन कल्पना घेऊन ताज्या उत्साहाने तिच्या कारखान्यात काम करत होते. माणसातल्या कष्टाळूपणाला आणि प्रामाणिकपणाला तिथे जास्त किंमत होती. दिखाऊ दिमाख त्यांना वर्ज्य होता.
“बाईसाहेब, पाठवू का त्या दोघींना आत ? “
खरंतर आता तिला थोडी शांतता हवी होती. खूप वेळ कामात राहिल्याने शीण आला होता. तरी ती म्हणाली “हो पाठव ”
दोन ओढलेल्या प्रौढा समोर खालमानेने उभ्या होत्या. फाईल मध्ये पाहतच, अंदाज घेत तिने विचारलं “हं, काय काम होतं ?”
त्रयस्थ स्वर ऐकून त्या आणखीनच काव-या बाव-या झाल्या. तिची मान अजून फाईलमध्येच होती.
” काम हवं होतं. “
हे ही नेहमीचचं.
कसलं काम? काय करायची तयारी आहे ? “
” काहीही “
” कधीपासून येणार? “
” अगदी आजपासूनही. फार गरज आहे हो. “
सलग दोन वाक्य कानावर पडली तेव्हा ती काहीशी चमकली. हळूच नजरेच्या कोपऱ्यातून दोघींच्याकडे तिने पाहिलं. अंदाज खरा होता. क्षणभर ती विमनस्क झाली. आपल्याला वाईट वाटतंय की संताप येतोय हे तिचं तिलाच कळेना. पण आपल्या भावनांच्या वर नियंत्रण ठेवणं आता तिचा स्वभाव झाला होता. त्याखेरीज हा एवढा मोठा व्याप जबाबदारीने सांभाळणं शक्य नव्हतं.
पुन्हा त्यांच्याकडे पाहिलं न पाहिलंस करुन तिनं शिपाई बाईला तिच्या हाताखालच्या व्यवस्थापकांच्याकडे न्यायला सांगितलं आणि त्या बाहेर पडताच व्यवस्थापकांना फोनवरून आवश्यक त्या सूचना दिल्या. दोन महिने गेले. दोन-तीन दिवस कारखान्याला दिवाळीची सुट्टी होती. रितीप्रमाणे सर्वांना दिवाळी भेट दिली गेली.
कारखाना आता शांत वाटत होता.
त्या दोघींच्याकडं तिचं नकळत लक्ष होतं. आता त्या रुळल्या होत्या. बुजरेपणा कमी झाला होता. सुरुवातीला संध्याकाळी थकल्यासारख्या दिसायच्या. आता उत्साही दिसत. दिवाळीची भेटवस्तू घेऊन जाताना आज त्या ताठ मानेने ब
बाहेर गेल्या. दिवाळीची सकाळ. तिने निरोप दिल्याप्रमाणे ठरल्यावेळी त्या दोघी तिच्या घरी गेल्या. आज तीच काहीशी कावरी बावरी झाली होती. आपण केलं ते बरं की वाईट तिचं तिलाच ठरवता येत नव्हतं. तरी समाधान होतच. दारातून प्रसन्नपणे तिने दोघींना हात धरुन आत आणलं. कोचावर बसवत म्हणाली, ” या, ताई, माई. खूप बरं वाटलं. “
” तुम्ही ओळखलतं? “
“तूच म्हणा. मी प्रथमच तुम्हाला ओळखलं होतं. तुमची परिस्थिती माझ्या कानावर येत होती. पण मी जाणीवपूर्वक घराकडे पाठ फिरवली होती. आपली विश्वं एकमेकांच्या पासून फार दूर होती. रोज खाणाखाणी करत एकमेकांना घायाळ करत जगण्यातनं काय निष्पन्न होणार होत? तुमची पिढ्यान पिढ्यांची चाकोरी, विशेषतः मनांची, माझ्या बोलण्या वागण्याने बदलणार नाव्हती. उलट कटूता वाढणार होती. म्हणून मी शांतपणे घर सोडलं. पण तेव्हाही मला माहीत होतं, एक दिवस नक्की तुम्ही माझ्याकडे येणार आहात. “
” मग आम्ही आलो त्यावेळी ओळख का नाही दिलीसं?”
” फार अवघड गेल मला तेव्हा दुरावा दाखवणं. पण तुमची तुम्हाला नीट ओळख व्हावी म्हणून दूर राहणं मला गरजेचं वाटलं. “
“नाही, खरं आहे. त्यावेळी तू ओळख दाखवली असतीस तर आम्ही परत ऐदीपणानं तुझ्याकडूनच मदतीची अपेक्षा करत राहिलो असतो. त्याचा सर्वांनाच त्रास झाला असता. “
“मुख्य म्हणजे तू म्हणतेस तशी आमची आम्हाला ओळखच पटली नसती. खऱ्या अर्थाने तुझी ही ओळख झाली नव्हती. कामातला आणि स्वावलंबनातला आनंद या दोन महिन्यांनी दिला. महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ कळला. बळ कळलं. हो, नाहीतर पूर्वीसारखच म्हणत राहिलो असतो, स्वातंत्र्याच्या नावावर ही भरकटतीय. खरंतर केवढी मोठी जबाबदारी तू पेलतीयेस. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. त्यात बळही आहे. आनंदही आहे. वेगळ्या नशिबाची गरजच काय. “
कितीतरी वर्षांनी सगळ्या बहिणी खऱ्या अर्थाने मायेने जवळ आल्या होत्या. सगळे तपशील त्यात वाहून गेले होते.
— समाप्त —
लेखिका : डाॅ. तारा भवाळकर
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈