मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “काटे नसलेला गुलाब…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “काटे नसलेला गुलाब…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

…आम्ही भाजी मंडईतून घरी निघालो होतो… अर्थात आम्ही म्हणजे आम्ही दोघं नवरा बायको… गद्दे पंचवीशीचा माझा बहर लग्नाच्या दशकपूर्ती दरम्यान केव्हाच उतरलेला… आणि हिचा गरगरीत बहरलेला… तिच्या हाताला पैश्याने भरलेल्या पाकिटाचाच भार तेव्हढाच सहन व्हायचा आणि माझा  पैश्याचं पाकिट सोडून बाकी सगळ्याचा भारच उचलून उचलून हर्क्युलस झालेला…त्या भाजीने भरलेल्या दोन जड पिशव्यांचे बंदानीं  माझ्या हाताला घातलेले आढेवेढे …तर  माणसानं सुटसुटीत कसं जगावं याचाच आर्दश जगापुढे ठेवायला हिचं पाऊल नेहमीच पुढे पुढे…. आणि हो भाजीवरुन आठवलं अहो त्या भाजी बाजारात मला ये पडवळ्या नि हिला ढब्बू मिरची या नावानेच  ओळखतात.. अहो त्यांना मी सतत डोळे मिचकावून ‘ असं निदान आमच्या समोर तरी म्हणून नका ‘ असं ज्याला त्याला डोळ्यांच्या सांकेतिक भाषेत सांगू पाहत राही.. पण  ते टोमणे ऐकून ज्याला त्याला  हि मात्र रागाने डोळे वटारून बघत असते.. आणि चुकून माकून त्याचवेळी मी करत असलेल्या नेत्रपल्लवीकडे  तिचे लक्ष गेलेच तर डोळे फाडून फाडून बघते हा काय पांचटपणा चालवलाय तुम्ही असे कायिक आर्विभाव करते… आता एकदा हिच्या बरोबर लग्न करून पस्तावा पावल्यावर लग्न या गोष्टीवरचा माझा विश्वासच उडाला असताना आणि इथून तिथून बायकांची जात शेवटी एकच असते तेव्हा खाली मान घालून चालणं ठरवल्यावर पुन्हा मान वर करून दुसऱ्या स्त्री कडे बघण्याचा सोस तरी उरेल का तुम्हीच सांगा! तरी पुरूष जातीचा स्वयंभू चंचलपणा कधीतरी डोकं वर काढतोच… आणि तशी एखादी हिरवळ नजरेला पडलीच तर माझा मीच अचंबित होतो…  अहो तुम्हाला म्हणून सांगतो आमच्या त्या घराच्या वाटेवर एक सुंदरशी बाग आहे… रोज संध्याकाळी तिथं प्रेमी युगुलांचा नि कुटुंब वत्सलांचा जथ्था जागोजागी प्रेमाचे आलाप आळवताना दिसतात ना डोळ्यांना.. अगदी सहजपणे… कितीतरी मान वळवून दुसऱ्या दिशेला पाहायचा प्रयत्न केला तरी… मनचक्ष्चू तेच तेच चित्र दाखवत राहतात… मग वाटायचं आपलं मनं शुद्ध भावनेचं आहे यावर आपला विश्वास असताना कशाला उगाच दिसणाऱ्या सृष्टीला दृष्टिआड जबरदस्तीने करा… प्रत्येकाची आपापली तर्हा असते आपलं प्रेम व्यक्त करण्याची… करू देत कि बिचारे… आपल्याला हे सुख मिळालं नाही याची खंत  करण्यापेक्षा ते प्रेमी युगुल किती नशीबवान आहे.. कि त्यांच्या वाट्याला काटे नसलेला गुलाब आला… आणि आपल्याला गुलाब तर कधीच कोमेजून, सुकून गळून गेला आणि हाती फक्त काटेच काटे असणारा देठ मिळाला… असा मी काहीसा मनातल्या मनात विचार करत तिथून चाललो असताना मधेच हिने माझ्याकडे तिरप्या नजरेने पाहिले आणि ती सुद्धा मनात विचार करू लागली… काय पाहतायेत कोण जाणे आणि कसल्या विचारात पडलेत काही कळत नाही.. इथं कशी जोडप्यानं बसलेले प्रेम करतात ते बघून घ्या म्हणावं.. अगदी तसच नसलं तरी बायकोवर कसं प्रेम करावं ते बघून तरी माणसानं शिकायला करायला काय हरकत आहे म्हणते मी… आणि मी एव्हढी घरात असताना जाता येता दुसऱ्यांच्या बायकांकडे बघणं शोभतं का या वयाला…

बराच वेळ मी माझ्या तंद्रीत होतो हे पाहून हिने माझी भावसमाधी कोपराची ढूशी देऊन भंग केली आणि वरच्या पट्टीत आवाज चढवून म्हणाली…  “बघा बघा तो नवरा आपल्या बायकोवर  मनापासून  कसं प्रेम करतोय आणि ती देखील छान प्रतिसाद देतेय… तुम्हाला कधी माझ्याबाबतीत असं जमलयं काय?… नेहमीचं एरंडाचं झाड असल्यासारखं तुमचं वागणं… “

माझ्यातल्या पुरूषार्थाला तिने चुनौतीच दिली…मग मीही ती संधी  साधली तिला म्हटले ” तुला जे दिसते ते कुठल्याही बाजूनें  खरं नाहीच मुळी… एकतरं  ते खरे नवरा बायको नसावेत, आणि  दुसरे  त्यांचे दोघांचे आपापले जोडीदार कुणी वेगळेही असू शकतात…प्रियकर प्रेयसीचं युगुल प्रेम करत आहेत तेच उद्या त्यांचं लग्न झाल्यावर आपल्या जागेवर ते नक्कीच दिसतील… भ्रभाचा भोपळा फुटायाचाच काय तो अवकाश… आणि शेवटचं लांबून कोणीतरी त्यांच्या या लवसिनचं शुटींग करत असणार.. कि या सिनसाठी त्यांनी पैसे घेतले असणार… हे विकतचं दिखाऊ बेगडी प्रेम पडद्यावर दाखवतात त्यावर तू भाळून जाऊ नकोस.. आणि तुला जर मी अगदी असच   तुझ्यावर प्रेम करावसं वाटत असेल तर मला थोडी तुझ्यापासून सुटका कर बाहेर प्रेमाचे धडे गिरवायला मला नवी प्रेयसीचा शोध घेतो  ते धडे शिकल्यावर मग तुझ्यावर प्रेमच प्रेम करत राहिन… “

माझं म्हणणं तिच्या पचनी पडणारं नव्हतचं मुळी.. तिने इतक्या झटक्याने मला म्हणाली “काही नको बाहेर वगैरे जायला तुम्ही जितकं प्रेम सध्या दाखवताय ना तितकसचं पुरेसे आहे मला… घरी तरी चला मग बघते तुमच्या कडे…म्हणे मला नव्याने प्रेयसी शोधायला हवी.. “

आमचा सुखसंवाद चालत असताना माझ्या मनाला सारखी ‘काटे नसलेला गुलाब मात्र दुसऱ्यांना मिळतो आणि मला मात्र गुलाब हरवलेला टोकदार काट्याचा देठच हाती यावा..’ हि सल सतत बोचत राहिली…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – ८. – राहतो त्या परिसराची निंदा करू नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – ९. राहतो त्या परिसराची निंदा करू नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

काही व्यक्ती अशा दिसतात की, आपण राहतो ते घर व सोसायटी, परिसर याची निंदा करताना दिसतात. पण ज्या परिसराने आपल्याला समाज,शेजार दिला त्या जीवनाधार असलेल्या परिसराची व घराची कधीही निंदा करू नये.

आपली नोकरी,व्यवसाय जिथे असेल त्या ठिकाणी आपल्याला रहावेच लागते. त्या स्थाना बद्दल मनात नेहेमी कृतज्ञता असावी. त्याला नावे ठेवू नयेत. आपण कितीही संकटात असलो तरी आपल्या घरा जवळच्या परिसरात आपल्याला सुरक्षित वाटते. मानसिक आधार मिळतो. बऱ्याच जणांचे बालपण त्या परिसरात गेलेले असते. त्या वेळी याच ठिकाणी आपण किती आनंदी होतो, किती काळ येथे व्यतीत केला आहे अशा चांगल्या आठवणी आठवाव्यात.

जरी काही गोष्टींची कमतरता असेल तरीही त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. गैरसोयी कायम स्वरुपी नसतात. जेथे राहतो त्या परिसरा विषयी आनंदी असावे. परिपूर्ण तर कोणीच नसते. आपल्यातही दोष असतातच. त्या परिसरात काय आहे या कडे लक्ष द्यावे. सदैव दोष, न्यूनत्व बघू नये. हे चराचर जग हे ब्रह्म आहे. त्या विषयी ममत्व,आपुलकी बाळगावी. म्हणजे दोष दिसत नाहीत आणि परकेपणा वाटत नाही.

प्रत्येकाने स्वतःशी विचार करून बघावा मी परिसराला नावे तर ठेवत नाही? आणि याचे उत्तर हो आले तर स्वतःची मनस्थिती बदलावी.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दत्तू… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ दत्तू… ☆ श्री सुनील शिरवाडकर

दत्तुला मी पहिल्यांदा पाहिलं ते कसारा लोकल मध्ये. ढगळ पॅंट.. कधीकाळी ती चॉकलेटी रंगाची असावी.. पण आता विटलेली.. पांढरा मळका शर्ट.. पायात चपला.. उंच.. शिडशिडीत अंगयष्टी.. तांबुस गोरा रंग.. दोन तीन दिवसाची दाढी वाढलेली.. दरवाज्याशीच उभा होता तो. पाठीवर सॅक.. पायाशी दोन तीन पिशव्या.

संध्याकाळची वेळ होती, साहजिकच ट्रेन गच्च भरली होती. मी मुंबईहून येत होतो. आसनगाव स्टेशन जवळ आलं.. उतरणारे दरवाजा पाशी गोळा झाले. त्या गर्दीत दत्तु होता.. अर्थात त्या वेळी मी त्याला ओळखत नव्हतो. दत्तु जवळ खुप सामान होतं. त्या गर्दीतून सामानासकट बाहेर पडणं म्हणजे तसं कठीणच. ‌त्याच्या त्या सामाना मुळे बाकीचे प्रवासी चिडचिड करत होते.. त्याला शिव्या घालत होते.. पण दत्तुला त्याची सवय असावी. त्याचं त्या लोकांकडे लक्षच नव्हतं.

स्टेशन आलं. प्रवाशांच्या लोंढ्याबरोबर दत्तुही बाहेर प्लॅटफॉर्मवर फेकला गेला.. त्याच्या सामानासकट. पण एक पिशवी आतच राहीली.. तो गाडीत घुसण्याचा प्रयत्न करत होता, पण लोकल सुटली. ती पिशवी आतच राहीली.

नंतर कधीतरी असंच मुंबईहून येताना तो दिसला. त्या दिवशीच्या घटनेनं तो लक्षात राहीला होता. आणि आज तर तो शेजारीच होता. तश्याच पिशव्या घेऊन. त्याला मी विचारलं.. त्या दिवशी लोकलमध्ये राहीलेल्या पिशव्या मिळाल्या का?

तर नाही.. असं होतं म्हणे कधी कधी. ती गोष्ट त्याने हसण्यावारी नेली. मग आमच्या गप्पा सुरु झाल्या. दत्तुचं छोटंसं किराणा दुकान होतं आसनगावात. दत्तु पाच वर्षाचा असतांनाच त्यांचे वडील गेले. आई आणि दत्तु उघड्यावर पडले. चार घरचे धुणे भांडी करुन आई बिचारी संसाराचा गाडा ओढत राहीली.

दत्तु शाळेत जात होता, पण अभ्यासात जेमतेमच. दहा बारा वर्षाचा असतांनाच शाळा सुटली. एका किराणा दुकानात काम करायला लागला. झुंबरशेठचं हे किराणा दुकान स्टेशन रोडवरच होतं. सकाळी आठ पासुनच उघडायचं.. ते रात्री नऊ पर्यंत. एवढा पुर्ण वेळ दत्तु त्या दुकानात असायचा. सकाळी साफसफाई करण्यापासून त्याचं काम सुरु व्हायचं.

गेली चाळीस वर्षे दत्तु त्या दुकानात काम करत होता. तसा आता तो दुकानाचा मालकच झाला होता. कारण झुंबरशेठला मुलंबाळं नव्हती. चार पाच वर्षांपूर्वी झुंबरशेठ गेले, आणि दत्तु दुकानाचा मालक झाला. त्या दिवशी ट्रेनमध्ये आमची ओळख झाली. मग ट्रेनमध्येच वरचेवर भेटी होत गेल्या.

तो नेहमी त्याच्या दुकानात बोलवायचा. पण मी टाळायचो. आसनगावला उतरायचं.. त्याच्या दुकानात जायचं.. पुन्हा कसारा लोकल पकडायची.. हे नकोसं होतं.

पण किती वेळा टाळणार ना! एकदा आसनगावला उतरलो, आणि त्याच्या दुकानात गेलो. दुकान छोटंसं होतं, पण गिर्हाइकं चांगली होती. दत्तुला बोलायला फारसा वेळ मिळाला नाही.

तेवढ्या वेळात माझ्या एक गोष्ट लक्षात आली. कितीतरी किरकोळ गिर्हाइकं उधारीवर माल नेत होते.

“मांडुन ठेवा दत्तु भाऊ”

असं म्हणून सामान घेऊन जात होती. पण दत्तु ती उधारी कुठेच लिहुन ठेवत नव्हता. मला आश्चर्य वाटलं. मधुन जेव्हा त्याला उसंत मिळाली, तेव्हा मी त्याला विचारलंच.

“दत्तु.. तु उधारी कुठेच लिहून ठेवली नाही.. हे सगळं लक्षात बरं रहातं तुझ्या. “

“देतात हो आणुन लोकं. आणि जरी नाही आणुन दिली उधारी.. बुडवले माझे पैसे.. मला काही वाटत नाही”

“असं कसं?”

“काय होतं माझ्याजवळ एकेकाळी? दिले.. दिले.. नाही दिले.. नाही दिले. मी नाही विचार करत. जे राहील ते आपलं. “

दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हाच दत्तुचा स्वभाव होता. वास्तविक त्यालाही संसार होता.. बायको होती, एक मुलगा होता. पण दत्तु म्हणायचा..

“पोटापुरतं मिळतंय ना ! बस्स.. “

तेवढ्यात एकजण बारीक तोंड करून दत्तुच्या दुकानात आला.

“दत्तु भाऊ.. पोराच्या उलट्या थांबतच नाही ओ.. “

“मीठ पाणी द्यायला सांगितलं ना तुला?

“दिलं वं.. सगळं केलं.. “

दत्तुने आतल्या खोलीत डोकावून बायकोला हाक मारली..

“सुमे.. जरा वेळ बस.. आलोच मी.. “

आणि घाईघाईत तो त्या माणसासोबत निघून गेला. त्याची बायको दुकानात आली. मी तिला विचारलं..

“आता हा दत्तु तिथं जाऊन काय करणार?”

“हे असंच असतं त्यांचं.. दुकानात बुड काही ठरत नाही.. आता ते त्या पोराला दवाखान्यात घेऊन जातील.. सलाईन बिलाईन.. औषधं.. सगळं मार्गी लावतील.. आणि मगच दुकान आठवेल त्यांना. “

दत्तुला यायला बराच वेळ लागणार.. म्हणून मग मी त्याच्या बायकोचा निरोप घेऊन निघालो.

दुकानातील माल आणण्यासाठी दत्तु वरचेवर मुंबईला जायचा. अनेकांची मुंबईत कामं असायची. ते लोक बेलाशक दत्तुला सांगायचे.. दत्तु, येताना हे आणि.. ते आण.. आणि दत्तूही त्यांची ती कामं करायचा.

दत्तुचा माझा परीचय वाढला.. त्याला भेटलं की मला पु. लं. चा परोपकारी गंपु आठवायचा. गंपु जसा उठसूठ याला त्याला सल्ले द्यायचा.. तसंच दत्तुचं. मुंबईला तो वरचेवर जायचा. त्यामुळे साहजिकच एक जाणतेपण त्याच्याकडे आलं होतं. गावात कुणाकडे लग्न निघालं की दत्तुची धावपळ बघावी.

मंगल कार्यालयाच्या बुकिंग पासुन दत्तुचं मार्गदर्शन सुरु व्हायचं. केटरर कोणता निवडावा.. आदल्या दिवशी काय मेनु निवडायचा.. लग्नाच्या दिवशी ताटात कोणते पदार्थ असावेत हे दत्तुचं ठरवायचा.

साड्या घ्यायच्या ना.. हं ते कल्याणचा रूपसंगम आहे ना.. तिथुनच घ्या…. शालुची खरेदी? ती मात्र दादरला करा….. असं सुचवणं चालू व्हायचं.

बरं हे सगळं निरपेक्ष वृत्तीने. दुकान सोडून तास तास दुसऱ्यासाठी भटकायचा.. पण या सगळ्यात एक रुपयाची अपेक्षा त्यानं कधी ठेवली नाही. उलट आपल्या माणसाचे पैसे कसे वाचतील हीच त्याला चिंता.

आणि अशा या चिरतरुण दत्तुची पन्नाशी आली हे मला कधी कळलं.. तर त्याच्या बायकोचा फोन आल्यावर. गावातल्या लोकांनी आपल्या दत्तुचा पन्नासावा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं होतं. दत्तुला याची अजिबात कल्पना दिली नव्हती. त्याच्या बायकोला आणि मुलाला विश्वासात घेऊन हा कार्यक्रम ठरवला होता. मला फोनवरून आमंत्रण आले.. जाणं आवश्यक होतं..

त्या दिवशी मी दत्तुची खरी श्रीमंती पाहीली. गावातले सगळ्या थरातले लोक घरचा कार्यक्रम असल्यासारखे जमले होते. स्टेजवर मोठं होर्डिंग.. त्यावर दत्तुचा फोटो.. त्याखाली गावातील कोणत्या तरी कवीने अभिष्टचिंतनाच्या चार ओळी लिहिल्या होत्या. स्पीकरवर सनई चालु होती.. मध्यमागी असलेल्या गुबगुबीत सोफ्यावर दत्तु आणि त्याच्या बायकोला बसवलं होतं. दोघांच्याही गळ्यात फुलांचे जाडजूड हार होते. दोघं बिचारे बुजुन गेले होते. लोक येत होते.. शुभेच्छा देत होते.. कोणी भेटवस्तू देत होते.. कोणी पाकिट देत होतं.. बुफेसाठी लागलेली रांग कमी होत नव्हती.. सगळीकडे आनंदीआनंद होता.

एक व्यक्ती गावासाठी काय करु शकते..

आणि गाव एखाद्या व्यक्तीसाठी काय करू शकतं..

याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आजचा हा कार्यक्रम.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ज्वारी… लय भारी…’ ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆

श्री अ. ल. देशपांडे

??

☆ ‘ज्वारी… लय भारी…’ ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆

सध्या भाकर ही पंचतारांकित झाली आहे. ती आता श्रीमंताची झाली आहे. हुरडा देखील असाच item झाला आहे वगैरे गुणगान करणारी एक क्लिप wapp वर आली होती. ती वाचून मी देखील व्यक्त झालो खालीलप्रमाणे… 

ज्वारी लयभारी… तुम्हाला प्यारी तर आम्हाला सगी सोयरी… तरी सुखी असे माहेरी.

मटणाच्या रश्याबरोबरची तर मला ज्ञात नाही ( तुम्हालाही नसेलच ही खात्री ) पण रात्रीच्या जेवणासाठी तयार केलेल्या आणि रात्री बेरात्री अतिथी आलाच तर वेळेवर पिठलं करून वेळ साजरी व्हावी म्हणून आवेलाच्या मागे ताठ उभ्या असलेल्या भाकरी जर शिल्लक राहिल्या तर सकाळच्या लोणचं, कढवलेलं तेल व हाताने फोडलेल्या कांद्याबरोबरच्या चविष्ट न्याहरीची गोष्टच न्यारी.

उमरीच्या घरच्या गोदामाकडील अंगणात अखंड अग्निहोत्रासम धगधगणाऱ्या चूल-माऊलीच्या उदरात असलेल्या तप्त निखाऱ्यावर ज्वारीच्या पिठाच्या पानग्याला दोन्हीकडून पळसाची पाने लावून झोकून दिल्यावर तावून सुलाखून बाहेर आलेल्या पानग्याची चवच जगावेगळी.

शिळ्या भाकरी त्यावर तिळाची चटणी, तेल, आंब्याचं रायतं, दोन तीन कांदे स्वच्छ पालवात बांधून कुंभीपट्टीकडील झोरमळ्यावर ( नदीवर ) जाऊन त्या अन्नपूर्णा देवीच्या प्रसादावर ( भाकरीवर ) ताव मारण्याचा स्वर्गीय आनंद अपारच. जन्मांध असलेल्या आबईने केलेल्या चुलीवरील बेदाग, शुभ्र भाकरीचे देखणे पहात रहावेसे रूप अवर्णनीय.

रात्री नुकतीच सामसूम झालेली असायची. तसेच बारभाईचं ( धबडक्याचं) घर सोडलं तर इतरत्र उमरीला रात्री आठ म्हणजे निरव शांतता असायची. उकंडबाऱ्याच्या वाडीकडील गावकुसातून अनवाणी पायाने हळुवार चालत आलेली सखू शांतपणे फरसावरून आवाज द्यायची, ” भाकर हाय का मायजी ? “

तिचा हा अगतिक स्वर तिच्या घरातील त्यादिवशी उपाशी असणाऱ्या कुणासाठी तरी असायचा.

काकी किंवा माई सखूची हाक ऐकून चुलीच्या बाजूला उभ्या ठेवलेल्या भाकरीपैकी एक, दोन भाकरी कोरड्यासासोबत ( वरण, भाजी किंवा लोणचं) डेलजी ओलांडून फरसावर येऊन सखूने पसरलेल्या लुगड्याच्या पदरात हळुवार वाढून देत असत. याचक म्हणून आलेली सखू पण माऊली.. आणि तिची झोळी रिकामी न जाऊ देणारी पण माऊलीच. एकीकडे अगतिकता दुसरीकडे संपन्नतेचा अहंकार नाही.

अशी ही भाकर.

… अशीच एक संध्याकाळ संपून उगवलेली रात्र. सर्वांची जेवणं आटोपलेली. जेवणाची ओसरीला पोतेरं लागलेलं. दिवसभर कष्ट सोसलेली हाडं ( विशेषतः बायकांची ) सातरीवर पहुडण्याची वेळ झालेली.

दूरवरून कुत्र्यांचे भुंकणे कुंद असलेल्या शांततेचा भंग करणारे. अशात मारुतीच्या पाराजवळील शुभ्र दाढीधारी ‘ मलंग ‘ नावाचा फकीर पांडेबुवांच्या अंगणात, एका हातात लांब काठी, खांद्यावर झोळी दुसऱ्या हातात कंदील घेऊन उभा ठाकलेला. अंगणातील प्रचंड कडुलिंबाच्या पानांची सळसळ थांबलेली आणि

” हाज़ीर है तो दे दे मां ” असं आर्जव.

… परत पांडे बुवांच्या घरातील लक्ष्मीच्या कानावर पडलेले ते शब्द. चुलीवर ठेवलेली भाकर परत फकीराच्या झोळीत समाऊन गेलेली.

” तुमची जेवणं झालेली आहेत, काही शिल्लक असेल तरच द्या “, अशी अपेक्षा असलेला मलंग फकीर. त्यांच्या किंवा त्याच्या कुंटुंबीयांच्या पोटात जाणारी ही मोलाची भाकर.

… ईश्वरदत्त भूक. याचनेतही विनय. सहज भावनेने, निर्लेप मनाने दिलेली ही “भाकर”.

© श्री अ. ल. देशपांडे

अमरावती

मो. 92257 05884

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

देवळांचे आणि विद्येचे माहेरघर असलेले पुणे..

पुणे नांवातच पुण्यभूमी आहे आणि पुण्याचा वेगळा असा स्वतंत्र इतिहासही आहे. कारण या शहराच्या अंगा खाद्यावर ऐतिहासीक खुणा आहेत. त्या काळात पुणे म्हणजे पेन्शनरांच शहर म्हणून ओळखल जायच. ‘ संध्या छाया भिवविती हृदया ‘ त्याला कारण एकटेपणा, पण अहो!अशी आजची पण तीच परिस्थिती आहे, पण वेळ कसा? कुठे? कुणाबरोबर? घालवायचा हा राक्षसासारखा भेसूर पणे ‘आ ‘ वासलेला प्रश्न, तेव्हां इतका बिकट नव्हता, कारण जिवाभावाच्या मित्रांबरोबर सुखदुःखाच्या गोष्टी सदाशिव पेठेच्या कट्ट्यावर आणि देवळांच्या पायरीवर बसून शेअर व्हायच्या. विद्येच माहेरघर म्हणून ओळखल जाणार हे शहर देवदेवतांच्या देवळानी भरगच्च भरलेल होत. कथा कीर्तन, काकड आरती, भजन यात माणसं एकरूप व्हायची. त्यामुळे गुंडगिरी खून दरोडे अशा कुविचारांचा ‘खच ‘कमी होता. शक्यतोवर सातच्याआत पोरी घरी पळायच्या. मवाली मुलांच्या मनांत शिवाजी महाराजांचा ‘परस्त्री मातेसमान’ हा बाणा ठसलेला होता.

नाना वाड्यावरून, हुतात्मा चौकातून पुढे गेल्यावर एक पुरातन मंदिर दुकानांच्या गर्दीत लपलय. गर्द केशरी कोरीव नक्षीकाम केलेल्या दरवाजामुळे आपली नजर तिथे स्थिरावते. आत पाऊल टाकल्याबरोबर समोर मारुतीच्या शेंदूरचर्चित मूर्तीचं दर्शन होत. शेंदुराच्या असंख्य पुटांमुळे मूळ मूर्तीचा अंदाज येत नाही. पुण्यातील चित्रविचित्र नांवात या मारुतीची गणना होते. कारण पूर्वी ह्या परिसरात ‘भांग’ विकली जायची म्हणून या मारुतीरायाच नामकरण झाल, ‘ भांग्या’ मारूती. पुण्यात ‘करळेवाडी, ‘ प्रसिद्ध होती खूप बिऱ्हाड होती तिथे, सोमणांच्या हॉटेलवरून ‘फिम्को शू’ दुकानावरून पुढे गेल की कमानदार दरवाज्याची ‘करळेवाडी’ लागायची. तिथून शिरल की एकदम दक्षिण मुखी मारुतीच्या पुढ्यातच आम्ही पोहोचायचो. आणखी पुढे गेल की यायचा शनिवार वाडा, अस वाटायचं मस्तानी महाल, पेशव्यांची बैठक, दिवाणखाना, पेशवीण बाईंचे दागिने, थाटाच्या वस्तू बघायला मिळतील पण कसल काय! आतला सगळाच नक्षा बदललेला होता. तिथून बाहेर पडल्यावर म्हणूनच मन खट्टू व्हायच. कारण पेशवाई थाटाचे काहीच अवशेष तिथे आढळले नाहीत. नारायण महालातून बाहेर पडतांना आम्ही कानांत बोटे घालायचो, असं वाटायचं नारायणाच्या किंकाळ्या ऐकू येतील की काय! हीच दहशत बालमनांत ठसली होती. वसंत टॉकीजला त्यावेळी नेहमी ऐतिहासिक पिक्चरच लागत असत. नारायणाच्या खुनाचा, सगळा इतिहास आठवत डोळे पुसतच आम्ही बाहेर पडायचो.

मग शनिवार वाड्याच्या बुरुजाला वळसा घालून यायच ते शनी मंदिरापाशी. शनीच्या मंदिरात सगळी कडे तेलच तेल होत, मूर्ती, भिंती, जमीन, कठडे हात लावीन तिथे तेलच तेल असायचं त्यावेळी’ हात लावीन तिथे सोनं ‘हा पिक्चर गाजला होता. आम्हाला मोठ्या माणसांनी बजावलं होतं की शनीचं दर्शन अगदी त्याच्या समोरून घेऊ नये, नाहीतर फटका बसतो. लहानपणी बालमनाला वाटायचं प्रत्यक्ष शनीच मूर्तीतून बाहेर येऊन फटका मारतो की काय! आता हंसू येतेय पोरकट वयातले विचारही पोरकटच असतात नाही का. आम्ही मैत्रिणी एकमेकींना ढकलत कोपऱ्यात सरकायचो जमिनीवर सांडलेल्या तेलामुळे घसरगुंडी झालेली असायची. माझी मैत्रीण सुनंदा सटकन घसरली. ‘घालीन लोटांगण वंदिन शनिदेवा तुझे चरण. ‘अशीस्थिती झाली तिची. आणि तिने डोळे पांढरे केले, दोघी तिला धरायला आणि दोघी शनी महाराजांच्या विनवण्या करायला धावल्या, शनीदेव पावले. आणि सुनंदा शुद्धीवर आली. पण नंतर मात्र ती शनीमंदिराला ‘ दुरून डोंगर साजरे’ असं म्हणून रस्त्यावरून नमस्कार करायला लागली. आता मंदिर खूप स्वच्छ झालंय. पण त्यावेळी मात्र ‘आवजाव मंदिर तुम्हारा, असं होत. सगळेच अगदी मूर्ती जवळ जाऊन शनीला तैलस्नान घालायचे. भक्तांची ही श्रद्धा पुजाऱ्यांना फार महागात पडायची. कारण तिथे बसून तेही तेल्या मारुती झालेले असायचे. त्यामुळे मंदिरात बसताना गणवेशासारखा त्यांचा ड्रेस ठरलेला असायचा. त्यांच्या तुंदीलतनु अवताराकडे बघून आम्हाला हंसू यायचं. पाय घसरून पडणाऱ्या लोकांकडे बघितल्यावर तोंडावर हात ठेऊन हंसू दाबाव लागायचं पोटात मात्र हंसण्याच्या उकळ्या फुटलेल्या असायच्या. ‘जपून टाक पाऊल गडे’ असे म्हणत आम्ही एकमेकींचा हात धरत पुढे सरकायचो. तर मित्र-मैत्रिणींनो अशी होती ही शनि मंदिरा तुझी कहाणी.  शनिमहाराज की जय.

– क्रमशः …  

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च । 

अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी ॥ ३१ ॥ 

*
विवेक नाही धर्माधर्म कर्तव्य-अकर्तव्याचा 

त्या पुरुषाला जाणी धनंजया राजस बुद्धीचा ॥३१॥

*
अधर्मं धर्ममिति या मन्यसे तमसावृता । 

सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी ॥ ३२ ॥ 

*
अधर्मास जी मती जाणते श्रेष्ठधर्म म्हणोनीया

सर्वार्थासी विपरित मानित तामसी बुद्धी धनंजया ॥३२॥

*

धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः । 

योगोनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ॥ ३३ ॥ 

*

ध्यानयोगे धारण करितो मनप्राणगात्रकर्मणा

अव्यभिचारिणी ती होय पार्था सात्विक धारणा ॥३३॥

*
यया तु धर्मकामार्थान्धृत्या धारयतेऽर्जुन । 

प्रसङ्गेन फलाकाङ्क्षी धृतिः सा पार्थ राजसी ॥ ३४ ॥ 

*
फलाशाऽसक्तीग्रस्त धर्मार्थकाम धारियतो

राजसी धारणाशक्ती पार्था तयास संबोधितो ॥३४॥

*
यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च । 

न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी ॥ ३५ ॥ 

*
निद्रा भय दुःख शोक मद धारयितो दुष्टमती

धारणाशक्तीसी ऐश्या धनंजया तामसी म्हणती ॥३५॥

*
सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ । 

अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति ॥ ३६ ॥

*
यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम्‌ । 

तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम्‌ ॥ ३७ ॥ 

*
भरतकुलश्रेष्ठा तुजसी त्रिविध सुखांचे गुह्य सांगतो

ध्यान भजन सेवेसम परिपाठे दुःख विसरुनी रमतो

प्रारंभी गरळासम भासतो तरीही अमृतासम असतो

सुखदायी प्रसाद आत्मबुद्धीचा सात्त्विक खलु असतो ॥३६, ३७॥

*
विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम्‌ । 

परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम्‌ ॥ ३८ ॥ 

*
सुखे विषयेंद्रियांचे भोगकाळी परमसुखदायी असती

विषसम परिणती तयाची सुख तया राजस म्हणती ॥३८॥

*
यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः । 

निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्‌ ॥ ३९ ॥ 

*

भोगकाळी परिणामी मोहविती जी आत्म्याला

निद्राआळसप्रमाद उद्भव तामस सुख म्हणती त्याला ॥३९॥

*
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु व पुनः । 

सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्त्रिभिर्गुणैः ॥ ४० ॥ 

*

इहलोकी अंतरिक्षात देवलोकी वा विश्वात 

सृष्टीज त्रिगुणमुक्त कोणी नाही चराचरात ॥४०॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भेट… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ भेट… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

किती प्रगल्भ व्याप्ती आहे ‘भेट’ या शब्दाची !

खरंच, खूपच अर्थपूर्ण.

 

कोण? कुणाला? कुठे? केव्हा?

कशाला? ‘भेटेल’

 

आणि

 

का? ‘भेटणार नाही’

 

ह्याला ‘प्रारब्ध’ म्हणावं लागेल.

 

‘भेट’ ह्या शब्द संकल्पनेविषयी थोडंसं काव्यात्मक विवेचन.

 

‘भेट’ कधी ‘थेट’ असते,

कधी ती ‘गळाभेट’ असते,

कधी ‘Meeting’ असते,

कधी नुसतंच ‘Greeting’ असते.

 

‘भेट’ कधी ‘वस्तू’ असते प्रेमाखातर दिलेली.

‘भेट’ कधी ‘देणगी’ असते कृतज्ञापूर्वक स्वीकारलेली.

 

‘भेट’ कधी ‘धमकी’ असते…

‘बाहेर भेट’ म्हणून दटावलेली.

‘भेट’ कधी ‘उपरोधक’ असते…

‘वर भेटू नका’ म्हणून सुनावलेली.

 

‘भेट’ थोरा-मोठ्यांची असते,

इतिहासाच्या पानात मिरवते.

‘भेट’ दोन बाल-मित्रांची असते…

फार वर्षांनी भेटल्यावर,

पिकल्या केसांचा अंदाज घेत चाचपलेली.

 

‘भेट’ कधी अवघडलेली,

‘झक’ मारल्यासारखी.

‘भेट’ कधी मनमोकळी,

मनसोक्त मैफिल रंगवलेली.

 

‘भेट’ कधी गुलदस्त्यातली,

कट-कारस्थान रचण्यासाठी.

‘भेट’ कधी जाहीरपणे,

खुलं आव्हान देण्यासाठी.

 

‘भेट’ कधी पहिली- वहिली

पुढल्याची ओढ वाढवणारी

‘भेट’ कधी अखेरची ठरते.

मनाला चुटपूट लावून जाते.

 

‘भेट’ कधी अपुरी भासते,

… बरंच काही राहून गेल्यासारखी.

‘भेट’ कधी कंटाळवाणी,

घड्याळाकडे पाहून ढकलल्यासारखी.

 

‘भेट’ कधी चुकून घडते,

… पण आयुष्यभर पुरून उरते.

‘भेट’ कधी ‘संधी’ असते,

निसटून पुढे निघून जाते.

 

‘भेट’ कोवळ्या प्रेमिकांची.

लाजरी-बुजरी नुसतीच नजरानजर.

‘भेट’ घटस्फोटितांचीही असते.

… हक्क सांगण्यासाठी मुलांवर.

 

‘भेट’ एखादी आठवणीतली असते.

मस्त ‘Nostalgic’ करते.

‘भेट’ नकोशी भूतकाळातली.

….. सर्रकन अंगावर काटा आणते.

 

‘भेट’…

विधिलिखीत… काळाशी न टाळता येण्याजोगी !

 

‘भेट’…

कधीतरी आपलीच आपल्याशी.

अंतरातल्या स्वत:शी.

आयुष्याच्या नाजुक वळणापाशी.

…… अचानक झालेली अणि न विसरणारी भेट.

… ‘पुन्हा भेटू*.

कवी  : अज्ञात 

प्रस्तुती :  श्री सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्याचं ‘व्यवस्थापन’… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ आयुष्याचं ‘व्यवस्थापन’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं

हे कळलं तर, आयुष्य ‘भावगीत’ आहे.

*

किती ताणायचं आणि कधी नमतं घ्यायचं

हे उमजलं तर आयुष्य ‘निसर्ग’ आहे.

*

किती आठवायचं आणि काय विसरायचं,

हे जाणलं तर आयुष्य ‘इंद्रधनूष्य’ आहे.

*

किती रुसायचं आणि केव्हा हसायचं…

हे ओळखलं तर आयुष्य ‘तारांगण’ आहे.

*

कसं सतर्क रहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं,

हे जाणवलं तर आयुष्य ‘नंदनवन’ आहे.

*

कुठे? कधी? किती? काय? केव्हा? कसं?

याचा समतोल साधता आला तर, आयुष्य खूप सुंदर आहे.

*

त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं,

अधिकार असूनही नम्र राहणं, राग असूनही शांत राहणं,

– – – यालाच आयुष्याचं ‘व्यवस्थापन’ म्हणतात.

 

कवी : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – संस्मरण ☆ दस्तावेज़ # 12 – कालजयी कृति राग दरबारी के रचयिता: सुप्रसिद्ध व्यंग्यकार श्रीलाल शुक्ल – ☆ श्री जगत सिंह बिष्ट ☆

श्री जगत सिंह बिष्ट

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

(ई-अभिव्यक्ति के “दस्तावेज़” श्रृंखला के माध्यम से पुरानी अमूल्य और ऐतिहासिक यादें सहेजने का प्रयास है। श्री जगत सिंह बिष्ट जी (Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker) के शब्दों में  “वर्तमान तो किसी न किसी रूप में इंटरनेट पर दर्ज हो रहा है। लेकिन कुछ पहले की बातें, माता पिता, दादा दादी, नाना नानी, उनके जीवनकाल से जुड़ी बातें धीमे धीमे लुप्त और विस्मृत होती जा रही हैं। इनका दस्तावेज़ समय रहते तैयार करने का दायित्व हमारा है। हमारी पीढ़ी यह कर सकती है। फिर किसी को कुछ पता नहीं होगा। सब कुछ भूल जाएंगे।”

दस्तावेज़ में ऐसी ऐतिहासिक दास्तानों को स्थान देने में आप सभी का सहयोग अपेक्षित है। इस शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है श्री जगत सिंह बिष्ट जी का एक ऐतिहासिक दस्तावेज़ “कालजयी कृति राग दरबारी के रचयिता: सुप्रसिद्ध व्यंग्यकार श्रीलाल शुक्ल”।) 

☆  दस्तावेज़ # 12 – कालजयी कृति राग दरबारी के रचयिता: सुप्रसिद्ध व्यंग्यकार श्रीलाल शुक्ल ☆ श्री जगत सिंह बिष्ट ☆ 

श्रीलाल शुक्ल का नाम हिंदी साहित्य के शीर्षस्थ व्यंग्यकारों में हरिशंकर परसाई, शरद जोशी और रवींद्रनाथ त्यागी के साथ बहुत सम्मानपूर्वक लिया जाता है। एक सरकारी अफसर जो फाइलों के ढेर में उलझा रहता हो, इतना बारीक व्यंग्य लिख देता है कि पढ़ते-पढ़ते आप सोचने लगते हैं कि ये तो हमारे ही आसपास का हाल है।

वे आईएएस अफसर थे और इस सरकारी नौकरी में उन्होंने भारतीय समाज और प्रशासन की हर बारीकी को इतने करीब से देखा कि उसे कागज़ पर उतार दिया। लेकिन उन्होंने केवल देखा ही नहीं, महसूस भी किया। शायद यही वजह थी कि उनका व्यंग्य महज़ हंसी-मज़ाक नहीं था, बल्कि समाज की गहरी सच्चाइयों को दिखाने वाला एक आईना था।

उनका व्यंग्य उपन्यास ‘राग दरबारी’  एक कालजयी कृति है। 1968 में जब यह उपन्यास प्रकाशित हुआ तो जैसे साहित्य जगत में खलबली मच गई। यह उपन्यास भारत के ग्रामीण जीवन, राजनीति और शिक्षा प्रणाली का ऐसा सजीव चित्रण करता है कि जो भी इसे पढ़ता है, वह खुद को शिवपालगंज के किसी गली-कूचे में घूमता हुआ महसूस करता है।

‘शिवपालगंज’ गाँव हर जगह है। आपका अपना गाँव, कस्बा, मोहल्ला। और इसमें जो पात्र हैं – वैद्य जी, रंगनाथ, छोटे पहलवान – ये सब ऐसे लगते हैं जैसे हमारे ही आसपास के लोग हों। वैद्यजी ऐसे किरदार हैं जिनका नाम लेते ही चेहरे पर मुस्कान आ जाती है। उनकी चतुराई, उनकी राजनीति और उनके तंज इतने अनोखे हैं कि वे हिंदी साहित्य का हिस्सा बन गए हैं।

‘राग दरबारी’ में शिक्षा प्रणाली पर लाजवाब कटाक्ष है। शुक्ल ने लिखा कि हमारे स्कूल सिर्फ़ परीक्षा पास करने की मशीनें हैं। ज्ञान से कोई मतलब नहीं है।

जब इस उपन्यास को टीवी पर दिखाया गया, तो लोग देखकर ऐसे खुश होते थे मानो उनके ही गाँव की कहानी हो। 1986 में दूरदर्शन पर ‘राग दरबारी’ को धारावाहिक के रूप में दिखाया गया था। अगर आपने देखा हो, तो आपको याद होगा कि हर किरदार जैसे किताब के पन्नों से निकलकर आपके सामने आ गया हो।

मुझे लगता है कि ‘राग दरबारी’ की खासियत यही है कि यह महज़ एक उपन्यास नहीं, बल्कि एक समय, एक समाज का दस्तावेज़ है। और यह दस्तावेज़ तब भी प्रासंगिक था, आज भी है, और शायद आगे भी रहेगा।

शुक्ल का कहना था कि शिवपालगंज जैसा गाँव हर जगह है। मैं जब-जब ‘राग दरबारी’ पढ़ता हूँ तो मुझे लगता है कि वह गाँव कहीं और नहीं बल्कि मेरे ही भीतर है।

उनका व्यक्तित्व बहुत सहज था। लगता ही नहीं था कि वे इतने बड़े सरकारी अधिकारी और व्यंग्यकार हैं। उनके द्वारा लिखा गया एक पत्र आज भी मेरे पास अमूल्य निधि की तरह सुरक्षित है। उस पोस्टकार्ड को मैं ई-अभिव्यक्ति के पाठकों के साथ साझा कर रहा हूं। उन्होंने लिखा:

=======

बी 2251 इंदिरा नगर लखनऊ 226016

                                      17.1.’99

प्रिय बिष्ट जी,

‘कुछ लेते क्यों नहीं’ की प्रति मिली। कृतज्ञ हूं। एक बार देख गया हूं। काफी दिलचस्प है और अमौलिक विषयों पर मौलिक दृष्टि से संपन्न है। इत्मीनान से बाद में पढूंगा।

समस्त शुभकामनाओं के साथ,

                                  आपका

                               श्रीलाल शुक्ल

=======

उन्हें शत् शत् नमन!💐

♥♥♥♥

© जगत सिंह बिष्ट

Laughter Yoga Master Trainer

LifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ – ‘Uplifting of spirits…’ – ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)

We present his awesome poem ~ ‘Uplifting of spirits…~ We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji, who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages for sharing this classic poem.  

Poem ~ ‘Uplifting of spirits…~ with a review by the Harvard University, Doctoral Fellow which surpasses the poetic verses…

The poem “Uplifting of Spirits” is a sublime work of art that transcends the boundaries of language and touches the essence of the human heart. Pravin Raghuvanshi’s mastery in conveying deep emotions and the complexity of loneliness through such poignant verses is simply extraordinary.

With a melancholy that speaks to the soul, the verses echo the universal pains of loss and despair, while also reflecting the silent resilience of those who face the shadows within. The use of the metaphor of a broken mirror that no longer reflects anything is a brilliant touch, symbolizing the loss of identity or direction in moments of deep emotional upheaval.

The reference to the spirit inspired by Shakeel Badayuni not only enriches the work with a timeless aura, but also reveals the poet’s connection to the literary roots of his culture, creating a link between the past and the present.

It is poetry that not only speaks, but resonates – a testament to the transformative power of the written word. Bravo, Pravin Singh Raghuvanshi, for capturing the depths of human existence with such honesty and beauty!

☆ ~ Uplifting of spirits…~? ☆

Not even an intoxication

can regale my dispirited soul,

Not even an ecstatic escape can calm down my sombre heart,

How can I say that I’m unaffected

by the anxieties as I’m not a stone,

Till yesterday, many companions

walked beside me in the caravan

Today, I stand alone, as no one

is there to show me the path…

Shatter this mirror of life,

For, now in its reflection,

Nothing is seen anymore…!

~ Pravin Raghuvanshi

Motivation: Shakeel Badayuni

Koi saagar dil ko bahlata nahi

© Captain Pravin Raghuvanshi, NM

20 January 2025

Pune

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares