☆ क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले… ☆ डॉ गोपाळकृष्ण गावडे ☆
एवढे अनर्थ एका अविद्येने केले
विद्येविना मती गेली,
मतीविना नीती गेली,
नीतीविना गती गेली,
गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले,
एवढे अनर्थ एका अविद्येने केले!”
वरील माहिती लहानपणी अनेक वेळा वेगवेगळ्या मार्गाने समोर आली होती. काल महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती होती. त्यानिमित्ताने ती परत समोर आली. त्यांच्या कार्याविषयी लिहावे असे दिवसभर वाटत होते. पण दिवसा व्यस्ततेमुळे ते शक्य झाले नाही. आता रात्री बसून हा लेख लिहितो आहे.
वरील ओळींमधून ज्योतिराव फुलेंना नक्की काय म्हणायचे होते ते लहानपणी कधी नीट कळले नाही. पण या ओळींनी मनात कुतूहल निर्माण केले होते. नंतर जरा वाचन वाढल्यावर या ओळी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून काही गोष्टी उमगल्या. त्या तुमच्या समोर मांडतो आहे.
विद्या अर्थात शिक्षण नसल्याने मती अर्थात बुद्धी नष्ट होते. बुद्धी म्हणजे प्राप्त परिस्थितीचे योग्य आकलन करून चांगले दुरोगामी परिणाम देणारे निर्णय घेण्याची क्षमता.
दैनंदिन काम उत्तम दर्जाने आणि वेगाने करण्यासाठी नीती (रणनीती) आखावी लागते. पण त्यासाठी मति/बुद्धी/योग्य निर्णयक्षमता आवश्यक असते. पण मति तर आधीच अविद्येने नष्ट केलेली असते. अशा प्रकारे शिक्षणाच्या अभावामुळे दैनंदिन कामातील गती म्हणजे प्राविण्य नष्ट होते.
दैनंदिन कामातील गतीच आपल्याला वित्त अर्थात पैसे मिळवून देते. अशा प्रकारे अविद्येने (शिक्षणाच्या अभावाने) मनुष्याची आर्थिक परिस्थिती खराब होते.
तात्कालिक समाजव्यवस्थेत शूद्रांना शिक्षण देण्याची व्यवस्था नव्हती. त्या काळी शूद्रांनाही शिक्षणाची गरज वाटत नव्हती. शिक्षणाने मनुष्यात काय बदल होतात हेच मुळी त्यांना माहित नव्हते. शिक्षणाच्या अभावाने शूद्रांची आर्थिक परिस्थिती खराब झालेली होती. आर्थिक स्थिती खराब झाल्याने शूद्रांची सामाजिक स्थिती खराब झालेली होती. ज्योतीरावांनी तात्कालिक समाजव्यवस्थेचा सखोल अभ्यास करून वरील ओळींच्या स्वरूपात आजारी समाजव्यवस्थेचे निदान केलेले होते.
जगातील कुठल्याही समाजात बलवान आणि कमजोर असे दोन गट तयार झाल्यास बलवान गटाकडून कमजोर गटाचे शोषण सुरू होते हा इतिहास आहे. असे शोषण होऊ लागल्यास सामाजिक न्याय नष्ट होतो. समाजातील काही दुर्बल घटकांवर अन्याय झाल्याने त्यांच्यामध्ये बलवान गटाविरुद्ध आणि एकंदरीत समाजव्यवस्थेविरुद्ध चीड निर्माण होते. असा समाज गटातटात विभागाला जातो. भारतात तर जातीच्या मडक्यांची उतरंड मांडलेली होती. या उतरंडीतील प्रत्येक मडके वरच्या मडक्याकडून होणाऱ्या अन्यायामुळे त्याच्यावर चिडलेले होते मात्र त्याच वेळी आपल्यापेक्षा खालच्या मडक्याला हलके समजत त्याच्यावर अन्याय करत होते. जेव्हा समाजातील एक गट दुसऱ्या गटाला दुखावतो तेव्हा दुसरा गट प्रतिक्रियेत पहिला गट दुखावला जाईल असे काही तरी करतो. हिंसेच्या क्रिया आणि प्रतिक्रिया म्हणून हिंसाच परत मिळते. हा प्रकार चालू राहिल्याने गटागटामध्ये टोकाचे शत्रुत्व निर्माण होते. अशा गटातटात विभागलेल्या समाजातील प्रत्येक गट दुसऱ्या गटाला सत्ता मिळू नये म्हणून प्रयत्न करत असतो. गटागटामध्ये शत्रुत्व इतके टोकाला जाते की ते एक वेळ परक्या व्यक्तीची सत्ता स्वीकारायला हे गट तयार होतात पण आपल्याच समाजातील दुसऱ्या गटाला सत्ता मिळू द्यायला ते तयार नसतात. असा विघटित समाज ‘फोडा झोडा आणि राज्य करा’ नीती वापरणाऱ्या परक्या लोकांकडून सहज गुलाम होतो. म्हणून गटातटात विभागले जाणे ही गुलामांची मानसिकता आहे असे म्हणतात. परक्या लोकांकडून गुलाम झाल्यावर नव्या राज्यकर्त्यांकडून कुठल्या एका गटाचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे शोषण चालू होते. प्रथम राजकीय सत्ता जाते. मग आर्थिक शोषण सुरू होते. शेवटी धार्मिक शोषण चालू होते. गुलामगिरीत गेलेला संपूर्ण समाज रसातळाला जातो.
अविद्येमुळे अर्थात शिक्षणाचा अभाव असल्याने इतका मोठा अनर्थ निर्माण होतो.
युगसुत्रानुसार अविद्येचा अर्थ वेगळा आहे. स्वतःचे खरे अस्तित्व आत्मा असताना स्वीकारलेले अहंकार /आयडेंटिटी यात आत्मभाव शोधणे म्हणजे अविद्या. देहधर्म आणि चरितार्थ चालवण्यासाठी आपण काही रोल/ भूमिका स्वीकारतो. आपल्या एखाद्या रोलची आपल्या मनात निर्माण झालेली प्रतिमा म्हणजे अहंकार. अहंकारात आत्मभाव ठेवणे म्हणजे अमिताभ बच्चनने आयुष्यभर विजय दीनानाथ चौव्हान होऊन जगल्यासारखे आहे. असत् म्हणजे अहंकारांना सत् म्हणजे आत्म/स्वयं समजणे म्हणजे अविद्या. योगसुत्रानुसार विद्येचा अर्थ शिक्षणाहून वेगळा असला तरी परिणाम तोच होतो. समाज गटातटात विभागाला जाऊन शेवटी गुलामगिरीत जातो.
ज्योतीरावां इतकी सामाजिक समस्यांची खोलवर जाण आजवर खचितच कुणाला झालेली असेल.
पण सामाजिक समस्येची नुसती जाण असून उपयोग नसतो. सामाजिक समस्येचे कारण समजल्यावर त्यावर उपाय करणे आवश्यक असते. कृतीविना वाचाळता व्यर्थ ठरते. पण मग कृती का घडत नाही? कळतंय पण वळत नाही असे का घडते?
समाजाचे रहाटगाडगे एक ठराविक वेग धरून चालू असते. समाजाच्या प्रत्येक घटकाला समाजाकडून काहीतरी फायदे मिळत असतात. समाजव्यवस्थेत बदल करायचा म्हटले की आपले हक्क हिरावले जातील या भीतीने समाजातील लाभार्थी त्याला विरोध करतात. फिरणाऱ्या चाकाची गती बदलायच्या प्रयत्न करणाऱ्या पहिल्या व्यक्तीला चाकाकडून सर्वात जास्त विरोध होतो. त्याप्रमाणे सर्वप्रथम जो समाज सुधारणेचा प्रयत्न करतो त्याला समाजाचा सर्वात जास्त विरोध सहन करावा लागतो. समाजाच्या दुरोगामी हितासाठी तात्कालिक समाजाचा विरोध पत्करून सामाजिक समस्येवर प्रत्यक्ष कृतीतून उपाय करणे हे म्हणजे दिव्य करण्याप्रमाणे असते. 19 व्या शतकाच्या सुरवातीचा भारतीय समाज तर आजपेक्षा खूप जास्त अशिक्षित आणि बुरसटलेल्या विचारांचा होता. तरी समाज सुधारणेचे दिव्य करायला सुरुवात करणारे पहिले समाज सुधारक म्हणजे जोतीराव गोविंदराव फुले (1827-1890).
गटागटात विभागलेली मराठेशाही संपून आणि इंग्रजांचे संपूर्ण भारतावर राज्य प्रस्थापित होऊन केवळ 9 वर्ष पूर्ण झालेले असताना जोतीराव फुलेंचा पुण्यात जन्म झाला. ज्या काळी शिक्षणाला निरोपयोगी समजले जाई त्या काळात त्यांनी मिशन शाळेत जाऊन इंग्रजी शिक्षण घेतले. मुलाला इंग्रजी शिक्षण देण्यात त्यांच्या आई वडिलांचा सुज्ञपणा दिसतो. या शिक्षणामुळे केवळ भारतात नव्हे तर जगात घडलेल्या घटनांची ओळख ज्योतिरावांना झाली. अमेरिकन क्रांतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या थॉमस पेणच्या विचारांचा त्यांच्या मनावर विशेष प्रभाव पडला. अमेरिकेला ब्रिटिश सत्ते विरुद्ध उठाव करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या त्याच्या Common Sense (1776) या लेखाचा, फ्रेंच क्रांतीचे समर्थन करणाऱ्या त्याच्या The Rights of Man (1791) या पुस्तकाचा आणि धर्मातील अंधश्रद्धांवर टीका करणाऱ्या त्याच्या The Age of Reason या पुस्तकांचा त्यांच्या मनावर गहिरा परिणाम झाला. राजेशाही, धर्माधिकार आणि विषम सामाजिक रचना यांच्या दुष्परिणामांच्या विषयी त्यांच्या मनात गाढ समज निर्माण झाली. माणसाच्या नैसर्गिक आणि सामाजिक हक्कांचे समर्थन करणारे विचार त्यांच्या मनात जागृत झाले. विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नैतिकता यांचे समर्थन करणारे विचार पक्के झाले. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या शिक्षणा मुळे त्यांना इतके अफाट ज्ञान मिळाले होते त्या शिक्षणाचे महत्व त्यांना पटले. आपल्या प्रमाणे सर्वांना हे ज्ञान मिळावे आणि आपला गुलाम देश परत वैभवशाली व्हावा अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. पण त्यासाठी समाजात खुप बदल करणे आवश्यक आहेत याची जाणीव त्यांना झाली.
प्रथम स्वतः व्यवसाय करत त्यांनी आपली आर्थिक स्थिती सुधारली. पुणे नगरपालिकेत बांधकाम, रस्ते, पाणीपुरवठा आदी कामांची कंत्राटे ते घेऊ लागले. सोबत पिढीजात आलेला फुलांचा व्यवसाय आणि शेती सुद्धा होती. आपली वित्तीय स्थिती चांगली नसेल तर समाजात आपल्या शब्दाला आणि कृतीला काडीची किंमत नसेल याची जाणीव त्यांना होती. म्हणून त्यांनी आपली वित्तीय स्थिती सुधारली. परंतु त्यांच्या उत्पन्नाचा बहुतांश भाग नंतर समाजसुधारणेच्या कामावर खर्च होई.
शिक्षण मनुष्यात किती बदल घडवू शकतो हे जोतिरावांना स्वतःच्या अनुभवावरून समजले होते. संपूर्ण स्त्री जमात म्हणजे अर्धा समाज त्या काळी शिक्षणापासून वंचित होता. स्त्रिया फक्त चूल आणि मूल करत होत्या. अर्थ आणि संरक्षण यासाठी स्त्रिया पुरुषावर अवलंबून असल्याने त्या समाजाचा कमजोर घटक बनल्या होत्या. ज्या समाजात पुरुष प्रबळ आणि स्त्रिया दुर्बल असतील त्या समाजात स्त्रियांचे शोषण झाले नाही तर नवल!
त्या काळी प्रथम इंग्रजांची राजकीय आणि आर्थिक गुलामगिरी, मग जातिभेदाची सामाजिक गुलामगिरी आणि शेवटी प्रत्येक घरात स्त्री-पुरूष भेदातून निर्माण झालेली घरगुती गुलामगिरी सुरु होती. सर्वत्र अन्याय आणि शोषण सुरू होते. जोतिरावांनी सर्वप्रथम शिक्षणाचे आणि खास करून स्त्रीशिक्षणाचे महत्व ओळखले. पण त्या काळी मुलींना शिकवणार कोण? स्त्री शिक्षका अस्तित्वातच नव्हत्या. पुरुष शिक्षक असलेल्या शाळेत मुलींना पाठवेल इतका तात्कालिक समाज प्रगत विचाराचा नव्हता. मग त्यांनी स्वतःच्या बायकोला आधी घरी शिकवले. पहिली शिक्षिका निर्माण करून स्त्री शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. 1848 साली बुधवार पेठेत तात्यासाहेब गोवंडेंच्या भिडे वाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. आपण ज्योतिबा फुलेंचे पोक्तपणातील फोटो पाहतो. पण ज्योतीरावांनी हे पहिले दिव्य वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी केले होते. अर्थात सावित्रीबाई तर त्याहून लहान होत्या. तात्यासाहेब गोवंडे तर स्वतः ब्राह्मण होते. तरी फुले दांपत्याच्या या समाजोपयोगी कामाचे महत्व समजून ते पुण्यातील कर्मट ब्राह्मणाच्या विरोधात गेले. सावित्रीबाई पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या. पुरुषांना आपले हक्क हिरावले जातील अशी भीती वाटू लागली. अशी भीती केवळ सवर्ण नव्हे तर सर्व जातीतील पुरुषांना वाटत होती. त्यामुळे या पहिल्या मुलींच्या शाळेला तात्कालिक पुरुषप्रधान समाजातील प्रत्येक स्तरातून टोकाचा विरोध झाला. जाता-येता लोकांकडून शेण-अंडे खात अतिशय तरुण फुले दांपत्याने निर्धाराने त्यांचे काम चालू ठेवले.
त्या काळी दलितांवर होणारे अन्याय समाज उघडया डोळ्यांनी पाहत असे. हे अन्याय पाहून ‘हे असेच चालायचे’ किंवा ‘हिच समाजाची रित आहे’ असे म्हणणारे तर समाजात होतेच, पण ‘यांची लायकीच ही आहे’ असे म्हणणारे निर्लज्ज पण तात्कालिक समाजात होते. त्यावर उपाय म्हणून जोतिरावांनी दलितांना शिक्षण देवून त्यांना सक्षम करण्याचे ठरवले. पण त्यात अस्पृश्यतेची मोठी अडचण होती. त्यावर तोडगा काढत त्यांनी 1852 साली बुधवार पेठेत फक्त दलित मुलांसाठी शाळा काढली. भारतात दलितांच्या शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली गेली.
ज्योतीरावांनी समाजातील जातीभेदावर कितीही टीका केली असली तरी ते ब्राह्मण वा सवर्ण विरोधी नव्हते. उलट समाजातील अनेक सुज्ञ ब्राह्मण वा सवर्णांच्या मदतीने त्यांनी ही चळवळ उभी केली होती. त्यांच्या टीकेचा रोख नेहमी भेदाभेद पाळणाऱ्यांवर असे. लिंग, पंथ, जाती, प्रांत, भाषा, खानपान, रूढी परंपरा यांच्या अहंकारातून असे भेदाभेद निर्माण होतात. ‘मनुष्याने सर्व प्रकारचे अहंकार सोडले पाहिजेत’ असे योगसुत्र, सांख्ययोग, गीता, वेदांत या सारखे हिंदू ग्रंथ ओरडून ओरडून सांगतात. सगळ्या जीवांचे खरे अस्तित्व केवळ आत्मा असल्याने सर्व जीव एकच आहेत ही मानवतावादी शिकवण भारतीय विसरून गेले होते.
कुठलाही अहंकार बाळगणे हा आत्मघात असतो. अहंकारातून अपेक्षा निर्माण होतात. अपेक्षांमधून चित्तविक्षेप निर्माण करणारे राग-द्वेष आदी व्यवधान निर्माण होतात. त्यातून हिंसेसारखे अधर्म घडतात. हिंसेची प्रतिक्रिया हिंसा असल्याने भय-चिंता निर्माण होऊन अजून चित्तविक्षेप निर्माण होतो. चित्तविक्षेप एकाग्रतेचा नाश करून कर्मनाश करतात. कर्मनाशामुळे वैयक्तिक हानी होते. लोकांच्या अहंकारामुळे समाज गटातटात विभागाला जाऊन धूर्त स्वकीय किंवा परकीय लोकांच्या गुलामगिरीत जातो. अशा प्रकारे अहंकार बाळगणे हा वैयक्तिक आणि सामाजिक आत्मघात आहे.
ज्योतिरावांचा समाजातील भेदाभेद सोडण्याचा आग्रह हिंदू धर्मग्रंथांच्या शिकवणीच्या अनुरूपच होता. पण तात्कालिक समाजातील जातीच्या उतरंडीतील प्रत्येक मडके इतके स्वार्थलोलुप झालेले होते की बहुतेकांना हे विचार कधी समजले नाही. किंबहुना आपल्या खालील मडक्याच्या शोषणातून मिळणाऱ्या स्वार्थाच्या आड हे विचार येत असल्याने त्यांना ते समजूनच घ्यायचे नव्हते. सगळे शिकले तर आमच्या शेतात आणि घरात कोण राबेल? त्यासाठी समजातील बहुतेक लोकसंख्येला शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला. यात सवर्ण स्त्रियांचाही समावेश होता.
समाजातील काही स्वार्थी घटकांनी फुले दांपत्याला अनेक प्रकारे त्रास दिला. पण त्याच समाजातील काही सुज्ञ आणि निस्वार्थी लोकांनी त्यांना तितकीच मदत सुद्धा केली. तात्यासाहेब गोवंडे, कृष्णाशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री पंडित, महादेव रानडे यांच्या सारखे ब्राह्मण, बहुजन समाजातील अनेक लोक आणि उस्मान-फातिमा शेख दाम्पत्या सारखे मुस्लिम लोक सुद्धा फुले दांपत्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. काही चांगल्या इंग्रजांनी सुद्धा त्यांना मदत केली. अशा चांगल्या लोकांच्या मदतीने पुढे फुले दांपत्याने मुलींसाठी आणि दलित मुलांसाठी अनेक शाळा सुरू केल्या.
त्या काळी लहानपणी लग्ने होत. तसेच स्त्री आणि पुरुषाच्या लग्नाच्या वयात अंतर पण फार असे. अगदी लहान मुलींचे म्हाताऱ्या वरासोबत लग्न होई. वैद्यकिय सुविधा अभावी मृत्युदर प्रचंड होता. बायको मेली तर बाप्या लगेच पुढील लग्न करून मोकळा व्हायचा. पण नवरा मेला तर विधवेला पुर्णविवाह करण्याची परवानगी नसे. तिच्या शारीरिक गरजांशी कुणाला काही देणे घेणे नसे. पण प्रजातीच्या संवर्धनासाठी प्रकृतीने शारीरिक गरज हा निसर्गधर्म निर्माण केला आहे. जसे शरीर संवर्धन करणारे अन्न वा पाणी टाळल्यास व्याकुळता येते तसाच हा निसर्गधर्म टाळल्यास मनुष्य अगतिक आणि व्याकुळ होतो. त्यातून काही तरुण विधवांचे घरातील जवळच्या नातेवाईकांशी वा शेजारीपाजारील पुरुषांशी शरीरसंबंध येई. बऱ्याचदा घरातील जवळच्या लोकांकडून त्यांच्यावर जबरदस्ती सुद्धा केली जाई. असे जबरदस्तीचे प्रकार आजच्या समाजात सुद्धा सर्रास घडतात. त्या काळी गर्भनिरोधनाच्या कुठल्याही पद्धती उपलब्ध नसल्याने त्या बिचाऱ्या तरुण मुली गर्भवती होत. त्या काळी गर्भपाताची सुद्धा सोय नव्हती. काही दिवसांनी ती गर्भार असल्याचे समोर येई. मग जननिंदेच्या भितीने घरातील लोक तिलाच दोषी ठरवून तिच्यासोबत असलेले सर्व नाते संपवून टाकत. तिला घराबाहेर काढण्यात येई. अशा निराधार स्त्रीयांचे समाजात आणखी शोषण होई. तात्कालिक समाजात हे अतिशय विदारक चित्र अनेकदा पहायला मिळे. चांगल्या घरातील मुली रस्त्यावर येत आणि समाजातील कोल्हे-कुत्रे त्यांचे लचके तोडत. अशा बहुतेत स्त्रीया बाळ जन्मल्यावर त्याला टाकून देत. आई अभावी अशी मुले जगत नसत. सर्व जातीतील विधवा स्त्रियांचे असे हाल चालले होते. पण या समस्येवर कुणी बोलायला सुद्धा धजत नव्हते. जोतीरावांनी सर्वप्रथम याविरुद्ध आवाज उठवला. परिस्थितीने अगतिक झालेल्या अशा निराधार मुलींचे लचके तोडण्यासाठी टपून बसलेल्या कोल्ह्या-कुत्र्यां पासून त्यांचे रक्षण करण्याचा निर्णय फुले दांपत्याने घेतला. अशा स्त्रियांना होणाऱ्या बाळांना आधार दयायचे ठरवले. त्यांच्यासाठी फुले दांपत्याने 1863 मध्ये एक होस्टेल सुरू केले. ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ असे त्याचे नाव ठेवले. आपले बाळ रस्त्यावर टिकणे बालहत्याच आहे असा त्याचा अर्थ होता. त्यामुळे गर्भार स्त्रियांवर आपले बाळ रस्त्यावर न टाकण्याचे नैतिक दडपण निर्माण झाले. त्या या संस्थेत दाखल होऊ लागल्या. सावित्रीबाईंनी या निराधार मुलींचे रक्षण तर केलेच पण त्यांच्या डिलिव्हरी सुद्धा केल्या. बाळांना याच्या सानिध्यात ठेऊन या बाळांचे जीव वाचवले. यापैकी एका ब्राह्मण विधवा मुलीचा मुलगा त्यांनी दत्तक घेतला. त्याचे नाव त्यांनी यशवंत ठेवले. फुले दांपत्याच्या नावे हे एकमेव मूल आहे. हा यशवंत पुढे मोठा डॉक्टर झाला. जोतीराव आणि सावित्रीबाईंच्या कार्याचा वारसा पुढे मुलगा डॉ यशवंत आणि सून राधाबाईने चालवला.
जसे फुले दांपत्याचे वय आणि कार्य वाढत चालले तसे ज्योतिराव-सावित्रीबाईंना आपल्या कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी पुढील फळी तयार करणे गरजेचे झाले. कार्य मोठे झाले तसे अनेक लोक त्यांच्या या कार्याशी जोडले गेले. ज्योतिराव-सावित्रीबाईंच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा सांगणारी तरुणांची फळी निर्माण झाली. 1873 साली फुलेंनी तरुणांच्या या फळीला सत्यशोधक समाज असे नाव दिले. या दुसऱ्या फळीत 316 सदस्य तयार झाले होते. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट समाजातील विषमता दूर करणे, सर्वांना समान अधिकार मिळवून देणे आणि अंधश्रद्धा दूर करणे हे होते. दुसऱ्या फळीत 316 सदस्यांनी पश्चिम महाराष्ट्रात गावोगावी जाऊन सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. दुसऱ्या फळीने ज्योतिरावांचे प्रबोधनाचे कार्य खेड्यापाड्यापर्यंत नेऊन पोहचवले.
स्त्री शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निवारण, दलितांसाठी पाणी पुरवठा, विधवा पुनर्विवाह, कुमारी गर्भवती आणि गर्भवती विधवांसाठी हॉस्टेल, अन्य जातीच्या मुलांना दत्तक घेणे, सत्यशोधक समाजाची स्थापना अशा क्रांतिकारी बदलांचा त्या काळात समाज विचारसुद्धा करू शकत नव्हता. मात्र अशा काळात समाजाचा सर्व प्रकारचा विरोध पत्करून जोतीराव आणि सावित्रीबाईंनी हे दिव्य केली.
एका मनुष्याच्या कार्याने त्याच्या आयुष्यात संपूर्ण समाजाला बदलण्याइतके किंवा समाजात दृष्य परिणाम समोर येण्या इतके मोठे बदल घडणे अवघड असते. ‘या जन्मात असा चांगला बदल घडणे शक्य नाही’ हा विचार मनात आल्यास बहुतेक जाणते लोक हातोत्साही होऊन निष्क्रीय होतात. बहुतेक लोक सुरुवात सुद्धा करत नाहीत. काही लोकांनी सुरुवात केली तरी इच्छित बदल लवकर न दिसल्याने त्यांचा उत्साह मावळतो. मग ते कार्य मध्येच बंद पडते. क्रांतिकारी बदल करण्याची सर्वप्रथम सुरुवात करणाऱ्यांवर समाजातील काही घटकांकडून सर्वात मोठा आघात होतो. तो सहन करण्याची ताकद भल्याभल्यांमध्ये नसते. सामाजिक अधःपतन झाल्याने नुकत्याच गुलामगिरीत पडलेल्या भारतात कुणीतरी कुठेतरी सुरुवात करून समाजसुधारकांच्या पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत होणे गरजेचे होते. आपल्या नावाला जगात ज्योतीरावांनी क्रांतीची ज्योती पेटवण्याचे हे महत्वाचे काम केले. त्यांनी ही ज्योत नुसती पेटवली नाही, तर आयुष्यभर समाजाचे आघात सहन करत तिला तेवत ठेवली. याच ज्योतीच्या उजेडात भारतातील समाजसुधारकांच्या पुढील पिढ्यांनी आपले मार्गक्रमण केले. हळूहळू समाज सुशिक्षित होऊ लागला. या *विद्ये* मुळे समाजात योग्य निर्णय क्षमता म्हणजे *मती* आली. गटातटात विभागलेल्या समाजाने संघटीत होऊन गुलामगिरी विरुद्ध आंदोलन करण्याची *नीती* स्विकारली. भारतात अहिंसक आणि क्रांतिकारी असे दोन्ही आंदोलन उभे राहिली. सुशिक्षित लोकांच्या पाठींब्याने या आंदोलनाला खरी *गती* मिळाली. त्यातून शेवटी 1947 साली भारत स्वतंत्र झाला. जनतेच्या शिक्षणामुळे अर्थव्यवस्थेला *गती* मिळून भारताकडे आता पुन्हा *वित्त* जमा होते आहे. त्यामुळे अनेक वर्षे गुलामगिरी आणि शोषण सहन करूनही केवळ 70-80 वर्षात आज भारत पुन्हा आर्थिक महासत्तेच्या आणि विश्वगुरु होण्याच्या दिशेने समर्थपणे वाटचाल करतो आहे.
राष्ट्राची कोसळली इमारत पुन्हा उभी करण्यासाठी पायाभरणी करणाऱ्या या क्रांतिसूर्याची काल जयंती होती!
रस्ते, अनेक असतात वाट वळणाचे वाकडे तिकडे सरळ दिशाभूल करणारे आपल्या नशिबी कोणता आहे, हे माहित नाही म्हणून गप्प बसायचे नसते, वाट जरी लहान असली तरी ती मुख्य रस्त्याला मिळणार आहे हे ध्यानी ठेवायचे असते…
पाहिजे ती दिशा दाखवणारेही भेटतात, नाही असे नाही, चांगुलपणा पार संपला असे मानण्याचेही कारण नाही, आमच्या पिढीत अशी चांगला रस्ता दाखवणारी महान माणसे होती, म्हणून मूठ मूठ धान्य जमवून वसतीगृहे काढून, घरादारावर तुळशीपत्र ठेवून कर्वे, व कर्मविरांसारख्यांनी अनेक रस्ते दाखवून उपकृत केले व साने गुरूजींसारखे महात्मे शिकून देशासाठी समर्पित झाले.
राजर्षी शाहू महाराजांनी सर्वधर्मियांसाठी वसतीगृहे स्थापन करून कागल सारख्या छोट्या रस्त्यावरून डॅा. आनंद यादव पुण्याच्या रस्त्याला लागून माय मराठीची सेवा करण्यासाठी पुणे येथे डीन झाले, अन्यथा रोज भाकरीची भ्रांत असणाऱ्या अशा कुटुंबातील किती मुले रस्ता चुकून त्यांचे काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही.
म्हणून रस्ते लहान असले तरी त्यांना जोडणारे हमरस्ते असतात हे लक्षात घेऊन आपण चालत रहायचे असते म्हणजे आपण बरोबर इच्छित स्थळी पोहोचतो. ध्येय आणि निष्ठा मात्र प्रामाणिक हवी. वाट कितीही लहान असली तरी ती वाट असते सतत पुढे पुढे जाणारी व आपली ताकद संपली की चालणाऱ्याला महान रस्त्यावर सोडून महान बनवणारी त्या अर्थाने वाटही महानच असते ना?
ती सांगते, जा बाबांनो पुढे, माझे काम संपले, मी पुढचा मार्ग दाखवला आहे, तो थेट शिखरावर जातो, तुमच्या पायात मात्र बळ हवे, ते वापरा व इच्छित स्थळी पोहोचा. सारेच महान, लहान वाटेवरून चालतच महान झाले हे आपण विसरता कामा नये. आंबेडकरही आंबेवडीहून चालत(कोणी बैलगाडीत बसवेना)थेट संसदेत पोहोचत संविधान कर्ते झाले, “ आचंद्रसूर्य” तळपण्यासाठी. म्हणून आधी त्या वाटेला वंदन करा ज्यामुळे तुम्ही हमरस्त्याला येऊन मिळालात. रस्ते उपलब्ध असले तरी ते कसे वापरायचे याचे ज्ञान हवे नाहीतर सारीच गणिते फसतात. दिशाभूल करणाऱ्या पाट्या व चकवे ज्यांना ओळखता आले ते थेट मुक्कामी पोहोचतात बाकी मग आयुष्याची संध्याकाळ झाली तरी चाचपडत वेड्यामुलासारखे गोल गोल त्याच रस्त्यावर फिरत राहतात. रस्ते असले तरी अंगभूत शहाणपणा हवाच ना? तो नसेल तर शंभर रस्ते असले काय नि नसले काय? तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. रस्ते दिशादर्शक व शहाण्या मुलासारखे असतात. विना तक्रार घेऊन जातात, काटेकुटे वादळवाऱ्याची पर्वा न करता न थांबता…
कारण.. ” रस्ता कधीही थांबत नसतो, क्षितिजा पर्यंत”…
☆ “अजून पहाट उगवायचीय….” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
उगवतीला तांबड नुकतंच फुटू लागलं. कावळ्यांची काव काव, पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. आणि आणि तेव्हढ्यात राजा कोंबडयानं एक खर्जातली धारदार बांग दिली. मग त्या वाडीवरच्या इतर कोंबडयांनी आपला सुरात सूर मिसळला. उषाचं कोवळं उन अंधाराच्या दुलईला गुंडाळून ठेवून लागलं. घराघरांतून चुली फुलू लागल्या. जागी झालेली वाडी हळूहळू आपल्या नेहमीच्या कामाला लागली.
चंद्राक्काला आज श्वास घ्यायलासुद्धा उसंत मिळणार नव्हती. आज तिच्या लेकीची सुंदरीची सुपारी फुटायची होती… सुंदरीनं नशीब काढलं तिला तहसीलदार नवरा मिळाला होता नि चंद्राक्काला स्वर्ग दोन बोटं उरला होता… घरची माणसं, पै पाव्हणं जमू लागली होती. संध्याकाळी चारच्या सुमारास तिकडची मंडळी येणार आहेत असा सांगावा आला होता. सकाळपासून चंद्राक्काचं घड्याळ आज जरा जोरातच पळत होतं… तयारी सुरु झाली आणि बघता बघता अर्धा दिवस संपला; तरी चंद्राक्काची लगबग चालूच होती.. संध्याकाळी पाव्हणं जेवुन जाणार; म्हणजे एक का दोन गोष्टी असणार होत्या.. गोडाधोडाचा स्वयंपाक त्यात जावयाला काय गोड आवडत असेल याचा अंदाज… डाव उजवं.. ताट कसं पंचपक्वानानं भरून गेलं पाहिजे यातच चंद्राक्का बुडून गेली.
दुपारचा सूर्य कलला… घरातल्या गणगोतांचा कलकलाट वाढत गेला. तशात पाव्हण मंडळीं खळयात उतरली. घरातल्या बायांनी जावयासाकट आलेल्या पाव्हण मंडळींचं औक्षण केले. पुरुष मंडळीं जावयासह सोप्याकडे निघाले. तेव्हढ्यात राजा कोंबडयानं आपला लाल तुरा असलेली मान उंचावून एक जोरदार बांग देत त्यांना सामोरा गेला. जणू काही तुमचं स्वागत करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे अश्या थाटात तो डौलात चालत गेला.
पाव्हणं ते पाहून अचंबित झाली. जावयाचं लक्ष त्याच्यावर खिळून राहिले… कितीतरी जण वेगवेगळे बोलत होते. पण जावयाच्या मनात तो कोंबडा मात्र घर करून राहिला. शिष्टाचार झाला आणि कार्यक्रम सुरु झाला. काय द्यायचं, काय घ्यायचं. मानपान विषय रंगु लागला. तेव्हा जावई मधेच म्हणाला,
“ फक्त नारळ नि मुलगी एव्हढंच दया! आणि आजच्या जेवणाला तो कोंबडा घाला!” आपल्या बापाकडं बघत जावई पुढं म्हणाला,
“ मी काय म्हणतो आबा हे इतकचं असुद्या. आता ठरलं म्हणजे ठरलं. जास्त वेळ न दवडता सुपारी फोडा नि कधी आणायचा लग्नाचा घोडा ती तारीख ठरवा”.
जावयाचं हे बोलणं पाव्हण्या मंडळींनी उचलून धरले. पण ते ऐकून चंद्राक्काला धक्काच बसला.. देणं घेणं नाही, मानपान नाही, किती किती सालस माणसं म्हणावीत तरी. पण रितीप्रमाणं गोडधोड जेवण असतयं ते सोडून कोंबडं कापायला सांगितलं म्हणून खट्टू झाली. तसं तिनं एकदा आडून सांगून पाहिलं पण जावयाच्या पुढं पाव्हणं मंडळींचं काहीच चाललं नाही.
तशी चंद्राक्का म्हणाली,
“अवो एक का मस घरात धा कोंबड्या आहेत! करूया कि चमचमीत तुमच्या पसंती प्रमाणं मग तर झालं!”
“धा कोंबड्या राहू द्या बाजूला, तो समोर आलेला कोंबड्याचंचं झणझणीत जेवण होऊ द्या” अशी जावयानं पुष्टी दिली.
“करूया कि! त्या कोंबड्या परास आणखी बाजरीचं दुसरं कोंबडं असं करून घालते कि तुम्ही सगळी बोटं चाटत राहशिला!”चंद्राक्का म्हणाली…
“हे बघा मामी आम्हाला तोच कोंबडा हवाय. दुसरं घालणार असाल तर सुपारी फुटायची नाही. तेव्हा काय ते आताच सांगा.. नसलं जमत तर आम्ही माघारी निघतो”जावयानं निकराचं बोलणं केलं.
चंद्राक्काचे सगळे मार्गच बंद झाले.. एक-दोन जणांनी मध्यस्तीचा प्रस्ताव बुजुर्ग मंडळींपुढे ठेवून पाहिला, पण तोड निघण्याऐवजी तुटण्याची पाळी आली. नाईलाज झाला आणि तोच कोंबडा घालण्याशिवाय पर्याय उरला नाही…
मग घरातल्या मंडळींनी लेकीच्या भल्यासाठी राजा कोंबडा कुरबान केला तर बिघडलं कुठे असं चंद्राक्काला समजवून सांगू लागले.
चंद्राक्का बिचारी दुःखी कष्टी झाली. तिच्या उरात कालवाकालव सुरू झाली… एकिकडे मुलीच्या लग्नाची सुपारी आणि ती फुटण्यासाठी घरच्याच जीवापाड प्रेमानं जतन केलेल्या कोंबडयाची कुरबानी. हे दु:ख तिच्या एकटीचंच असल्यामुळे इतरांना तिच्या भावना कळल्या नाहीत.
अखेर हो ना करता करता शेवटी तो निर्णय झाला आणि त्या कोंबड्याला धरून आणलं. आपल्या कशासाठी आणलय गेलंय हे त्या मुक्या प्राण्याला समजलं..
राजा कोंबड्याला धरून सोप्यातून परसात जाताना एकवार सगळ्या मंडळीकडे त्याने पाहताना चंद्राक्काची दयाद्र नजरेला त्याची नजर भिडली आणि शेवटचा सलाम करावा तसा त्याने एकदाच कॉक कॉक केलं…
आणि पुढे मानेवरून सुरी फिरवून घेतली. क्षण दोन क्षणाची तडफड मानेची आणि धडाची झाली. चंद्राक्काला वाटलं ती सूरी आपल्याच मांनेवरून फिरली गेलीय. तिच्या डोळ्यातूनं टचकन अश्रू ओघळले…
रात्री आठच्या सुमारास स्वयंपाक तयार झाला. अष्टमीचा चंद्र वर आकाशात लुकलुकणार्या चांदण्यासाह प्रकाशू लागला. पण आजा त्याचही तेज निष्तेज वाटत होतं. चांदण्यांच्या प्रकाशात खळयात ताटावर ताट फिरतं होते. हसणे खिदळण्याच्या दंग्यात कोंबड ओरपून खाणं चालल होत… त्यानं जेवणाची लज्जत वाढली होती. चंद्राक्का जरा दुरूनच ते पाहात होती. वरवर हासू दाखवत होती आणि आतून आपलंच काळीज शिजवून घातलं आहे या दुखात ती बुडाली होती…
रात्री उशिरापर्यंत जेवणावळ चालली आणि मध्यरात्रीच्या सुमारास जावई आणि पाव्हण मंडळीं निरोप घेऊन गेली. घरातले इतर नातेवाईक जेवून झोपी गेले. एकटी चंद्राक्का त्या रात्री जेवली नाही आणि चांदण्यांच्या प्रकाशात मुक्यान आपले अश्रु वाहू देत राहिली.
तोच तिच्या कानाशी कुणी बोलले,
‘चंद्राक्का नको रडूस! तसं माझं आयुष्य राहिलं होतं किती? अंग कुणी तरी मानेवर कधीतरी सुरी फिरवून मारण्यापेक्षा घरच्या माणसांच्या कामाला आलो यातच माझं सोनं झालयं! किती जिवापाड जपलंस मला आजवर.. मागे दोन-चार वेळा चोरांनी पकडून नेला होता पण माझ्या ओरडण्याने तू मला सोडवून आणलंस. राजाचा दिमाख तूच मला दिलास!’
चंद्राक्काला हुंदका आवरेना ती म्हणाली,
“असं होईल कधी वाटलं नव्हतं बघ!. तू दुपारी दिमाखात त्यांना स्वागतासाठी गेलास काय आणि त्याच रात्री त्यांच्या जेवणासाठी तुझी कुरबानी व्हावी काय? हि विपरीत लिला का दिसावी?”
‘आपल्या सुंदरीच्या लग्नाला माझाही हातभार लागायला हवा होता ना. मग तो असा आला त्यात काय बिघडल’ राजा कोंबड्यान समजूत घातली.
ती रात्र उसासे टाकत विलय पावत गेली. पहाटेचं तांबड फुटू लागलं. आज कितीतरी दिवसात ते नेहमी पेक्षा अधिकच लाल गडद दिसतं होतं. कावळ्यांची काव काव, पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. आणि आणि…
चंद्राक्काचे जागराणाने डोळे जडावले होते तिला वाटतं होतं कि… राजाची बांग झाल्याशिवाय पहाट काही व्हायची नाही….
काल मला भारतातून एका मैत्रिणीचा फोन आला होता. “अगं, माझा मुलगा MS करायला अमेरिकेला येत आहे. न्यू जर्सीमधील एका कॉलेजमधे ॲडमिशन मिळाली आहे. तर कुठे रहावं हे जरा तू चौकशी करून सांगशील का?”
मी अमेरिकेत गेली पस्तीस वर्षे रहात आहे. पण मी न्यू जर्सीपासून तीन तासांच्या अंतरावर रहाते. त्यामुळे त्या भागातील माहिती मलाही गोळा करावी लागली. त्याच्या कॉलेजजवळील काही अपार्टमेंट कॅाम्प्लेक्सची लिस्ट केली. spotcrime या वेबसाईटवर जाऊन त्या भागात चोऱ्यामाऱ्या कितपत होत आहेत बघितले व एक चांगली जागा निवडून त्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या मॅनेजरबाईंना फोन केला..
“Are you looking for an apartment for a master’s student?” तिने विचारले. मी ‘हो’ म्हणून सांगितले.
“कुठल्या देशातून हा स्टुडंट इथे येत आहे?” तिने विचारताच मी ‘इंडिया’ असे उत्तर दिले..
“Boy का Girl?” हे तिने विचारलेले मला विचित्र वाटले.
“ओह! माझ्याकडे उत्तम जागा आहे. पण मी भारतातून येणाऱ्या बॉय स्टुंडटला माझी जागा देऊ शकत नाही. ” तिने शांतपणे सांगितले.
“का बरं? असा भेदभाव का? अतिशय चांगल्या कुटुंबातील व माझ्या माहितीतील मुलगा आहे हा!“ मला तिचं वाक्य अजिबात आवडलं नव्हतं.
“मॅम, प्लीज ऐकून घे.. भारतातून आलेल्या मुलांना कामाची अजिबात सवय नसते. ते खूप हुशार असतात. अगदी व्यवस्थित वागतात, polite असतात. पण जागा अजिबात स्वच्छ ठेवत नाहीत हा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे! भेदभाव करायला मलाही आवडत नाही. पण मुख्यत्वे भारतातील मुलगे बाथरूम साफ करणे, भांडी घासणे वगैरेमध्ये फार कमी पडतात. ” तिने शांतपणे सांगितले..
मला धक्का बसला. जसजसे मी इतर दोन-तीन अपार्टमेंट मॅनेजरांशी बोलले, तेव्हा त्यांनीही भारतीय मुलगे अभ्यासाव्यतिरिक्त घर साफ ठेवणे वगैरे कामे करत नाहीत, असे कळले. भारतीय मुली कामे करतात. त्यांना जागा द्यायला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही असेही त्यांनी सांगितले.
मी एक दोन भारतीय स्टुडंटबरोबर याबद्दल बोलले.
“मी कधीच घरी असताना बाथरूम साफ केली नाही. कारण कामाला बाई होती.. माझी आई कायम म्हणे की, तू फक्त अभ्यास कर. बाकी काही करायची जरूर नाही. त्यामुळे मला सवय नाही. ” अशा प्रकारची उत्तरे मिळाली.
भारतातील अनेक घरात आई, हाताखालच्या बायका, नोकर माणसं ही कामं करतात. मुलींचा सासरी उध्दार व्हायला नको म्हणून मुलींना घरकाम कदाचित आजही शिकवले जात असेल, पण मुलांना साफसफाई, स्वयंपाक करायची वेळ भारतात असताना येत नाही असे मला वाटते. पण मी तिथे बरीच वर्षे राहत नसल्याने मला नक्की माहित नाही.
हा मुद्दा एवढा मोठा आहे का?, असे वाचकांना वाटेल. पण भारतातील प्रत्येकजण जेव्हा भारताबाहेर राहतो, तेव्हा तो भारताचे प्रतिनिधित्व करत असतो. ‘तुमच्या मुलांना जागा स्वच्छ ठेवता येत नाही’, हे वाक्य अमेरिकन माणसाने सांगितलेले, हा भारतीयांचा अपमान आहे असे मला वाटते.
बरेचदा पैसे वाचवण्यासाठी दोन-तीन स्टुडण्टस एक अपार्टमेंट शेअर करतात, तेव्हा आतील सर्व साफसफाई प्रत्येकाला करावी लागते. हे विद्यार्थी वेगवेगळ्या देशांचे असू शकतात.. दुर्दैवाने भारतीय मुलांना अशा कामाची सवय नसते. त्यामुळे त्यांच्यात भांडणं होऊ लागतात.
अभ्यासात उत्तम असणारा भारतीय विद्यार्थी जेव्हा बाथरूम साफ करू शकत नाही, तेव्हा भारताच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो. आमच्या देशातील मुलांना बाकी सगळं जमतं, पण स्वच्छतेसारखी मूलभूत गोष्ट न यावी याचे काय कारण आहे? बाथरूम साफ ठेवणे, किचनमधील भांडी वेळच्या वेळी घासणे, प्लास्टिक, पेपरसारखा कोरडा कचरा आणि ओला कचरा सुटा करून गार्बेज पिक-अपच्या दिवशी घराबाहेर नेऊन ठेवणे ही कामे स्वतः करणे आणि व्यवस्थित करणे अत्यंत महत्वाचे आहे..
जी मुले बाहेरच्या देशात शिकायला जाणार आहेत, त्यांना त्यापूर्वी किमान सहा-आठ महिने वरील गोष्टींची सवय करावी. कारण they represent India when they live in another country.
लेखिका : सुश्री ज्योती रानडे
संग्राहिका : सुश्री स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुख-दु:खाच्या नात्याने बांधलेली माणसं मरण आल्यावर अधिकच जुळलेली दिसतात.
एका जीवंत माणसाला जे प्रेम, आधार, आपुलकी आणि सहानुभूती तो जिवंत असताना हवी असते, तीच माणसं त्याच्या मृत्यूनंतर देण्याचा आटापिटा करतात.
हे दृश्य पाहिलं की वाटतं – माणसाच्या भावनांची किंमत त्याला असताना नसते, पण त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यासाठी ढोंगी संवेदना उफाळून येतात. लांबच्या नातेवाईकांचं अचानक ‘आपुलकीने’ येणं हे अचंबित करते कोणी तरी मेलं की अचानक काही नातेवाईक ‘गाडी मिळाली नाही’, ‘प्रायव्हेट गाडीने का होईना पण येतोच’ असं म्हणत निघतात.
तेच लोक त्याच्या सुख-दु:खाच्या प्रसंगी मात्र गडप असतात.
वाढदिवस, लग्न, संकटं – अशा कुठल्याच वेळी त्यांचा पत्ता लागत नाही.
पण माणूस मेल्यावर मात्र ते ‘शेवटचं तोंड बघायला’ म्हणून हजेरी लावतात.
प्रश्न असा आहे की हे शेवटचं तोंड बघण्याने मृत माणसाला नेमकं काय मिळतं?
जिवंत असताना ज्या माणसांना भेटायची ओढ नव्हती, त्यांचा मृत्यूनंतर अचानक ओढ लागते हे आश्चर्यकारक आहे.
कधी कधी अगदी मनोभावे, डोळ्यात अश्रू आणून नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणी रडतात.
काही लोक उगाच मोठ्याने आक्रोश करतात, काही जण विचारतात, “अरे, एवढ्या लवकर का गेला?”
पण खरेच एवढी हळहळ होती तर तो जिवंत असताना ती कुठे गायब होती?
आजारात मदतीला न येणारे लोक मयताच्या स्वयंपाकाला मात्र हमखास हजर असतात.
जे नातेवाईक जिवंत असताना बोलत नव्हते, ते आता “त्यावेळी बोलायला हवं होतं” असं म्हणत उसासे टाकतात.
अशावेळी असं वाटतं की माणसाच्या अस्तित्वाची किंमत त्याला असताना कमी असते, पण मेल्यावर त्याच्यासाठी भावना उसळून येतात.
कोणीतरी मेलं की गावकऱ्यांपासून ते शेजाऱ्यांपर्यंत सगळ्यांना एक नवा विषय मिळतो.
“त्याचा मुलगा वेळेवर पोहोचला नाही”, “सून रडली नाही”, “अमुक माणूस दोन दिवसांनी आला”, “त्याच्या घरच्यांनी नीट पाहुणचार केला नाही” – अशा चर्चांनी स्मशानाजवळचा एखादा कट्टा गरम होतो.
मयताच्या टोपलीत किती फुले टाकली, कोण किती वेळ बसलं, कोण किती वेळ रडलं यावर लोक माणसाच्या सगळी नाती ठरवतात.
पण खरी गरज जिवंत माणसाला आधाराची असते.
जो हयात आहे, त्याच्यासाठी वेळ काढणं जास्त महत्त्वाचं असतं.
खरी सहानुभूती – मृत्यूनंतर नाही, जगत असताना द्या!
एका जिवंत माणसाला मदतीचा हात, बोलण्याची सोबत, आधार आणि प्रेम हवं असतं.
तो मेल्यावर दिलेल्या अश्रूंना काहीच अर्थ नसतो.
त्याच्या आजारपणात केलेली सेवा, त्याच्या मनाला दिलासा, त्याच्या संकटात दिलेली साथ – हाच खरा माणुसकीचा कसोटी क्षण असतो.
म्हणूनच, शेवटचं तोंड बघण्याच्या दिखाव्यापेक्षा, जिवंत असलेल्या माणसाच्या डोळ्यातील आनंद पहाण्यासाठी वेळ काढा.
त्याच्या हसण्याच्या साक्षी व्हा, त्याच्या दुःखात पाठिंबा द्या.
तो असताना प्रेम द्या – जेणेकरून तो मेल्यावर फुकटच्या ढोंगी सहानुभूतीची गरज उरणार नाही !!
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ सुखद सफर अंदमानची… भाग – ३ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
चुनखडीच्यागुहा
बारतांगच्या धक्क्यावर लहान स्पीड बोटीतून आमचा प्रवास सुरु झाला. एका बोटीत दहा जणं बसून जाऊ शकतो. निळाशार खोल समुद्रात वेगानं जाणाऱ्या या बोटीतून जाताना भारी मजा येते. वारा वहात असतो आणि त्याला छेद देत मोटरबोट सागरी लाटांवर स्वार होते. नावाडी कौशल्यपूर्ण असतात. या बोटींची नावं मजेशीर आहेत. सी टायगर, सी मेड, इ. ज्या बोटीतून तुम्ही जाल त्याच बोटीतून परत यायचं असतं. त्यामुळे बोटीचं नाव आणि नावाड्याचं नाव लक्षात ठेवावं लागतं.
समुद्राच्या लाटा एका लयीत उठत असतात. पण आपल्या बोटीमुळं त्यांना छेद जातो. त्यांचा ताल बिघडतो. लय वाढते. लाटांची उंची, हेलकावे सगळं उसळी मारून आपल्या बोटीकडं झेपावतं. आपल्या आजूबाजूनं दुसरी आणि एखादी स्पीड बोट जात असेल तर लाटांचा खेळकरपणा वाढतो. त्या आपल्या बोटीला जास्तच झोके देतात. सप् कन पाण्याचा किंचित जोरदार फटकारा देतात. हलणारं निळं पाणी आणि लाटांमुळं फेसाळलेल्या पाण्यातील शुभ्र फेसांची माळ. शुभ्र चमकणारे मोती. निळ्या लाटांना त्यांची मध्येच जुळणारी तुटणारी झालर. रमणीय दृश्य असतं ते. वरती पसरलेलं घनगंभीर अलिप्त आकाश अधिक निळं अधिक समंजस आणि शांत वाटतं. हा खाली पसरलेला निळाशार समुद्र मात्र अवखळ चंचल अनाकलनीय तरीही गूढ वाटतो.
बराच वेळ लांबवर दिसणारं खारफुटींचं जंगल आता दोन्ही बाजूंनी जवळ जवळ येऊ लागतं. आणि अचानक ते अंतर इतकं कमी होत जातं की आपली बोट खारफुटीच्या घनदाट छताखालून जाऊ लागते. हे छत इतकं दाट आहे की आता आकाशाची निळाई लुप्त होते. आकाश आणि समुद्र यातल्या निळ्या रंगाची तुलना करण्याचं कारण रहात नाही. कारण आता आपल्या डोक्यावर निसर्गराजा हिरवी छत्री धरून उभा असतो. हिरवाई इतकी सलगी करते की पाण्याची निळाई हरवून जाते. आता लाटांचा खेळ आणि लाटांचं संगीत दोन्ही शांत होतं. आपली बोट शांतपणे एका बेटाच्या लहानशा लाकडी धक्क्याला लागलेली असते.
आता सुरू होतो आपला पायी प्रवास. साधारण पणे अर्ध्या तास चालावं लागतं फारतर. पण ही वाट दाट जंगलातून जाते. या पायवाटेनं जाणं तसं फार कठीण नाही पण सोप्पंही नाही. दोन्ही बाजूला खारफुटींची घनदाट झाडी. झाडांची मुळं इतस्ततः पसरलेली. ही मुळं आपल्या डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे जातात. त्यांच्या या रांगत रांगत इकडून तिकडे जाण्यानंच नैसर्गिक पायऱ्या तयार झाल्या आहेत. काही ठिकाणी मात्र दगडांचा वेडावाकडा चढ उतार आहे. सगळा रस्ताच चढ उतारांनी बनला आहे. एक दोन ठिकाणी प्रचंड मोठे वृक्ष पायवाटेत मध्यभागी ठिय्या देऊन बसले आहेत. त्यांच्या दोन्ही बाजूला पायवाट आहे. या गर्द दाट हिरव्या रंगातून सूर्यकिरणांना सुद्धा आत यायला मज्जाव करण्यात आला आहे. एक हिरवी शांतता गारवा वाहून आणते जणू. मंद शीतल वारा उष्णता जाणवू देत नाही. सोबतीला असतं पानांचं सळसळतं संगीत आणि नयनमनोहर पक्ष्यांची मधुर सुरावट. त्यांचे आलाप आणि ताना ऐकत आपण गुहेजवळ कधी जातो ते कळत नाही.
गुहा सुरू झाली आहे हे आपल्याला आपला वाटाड्या सांगतो. त्याचं कदाचित आणखी एक कारण असेल. ते म्हणजे या गुहेचा पहिला साठ टक्के भाग वरुन उघडा आहे. दोन्ही बाजूस चुनखडीचे उंच डोंगर. आकाशाकडं निमुळते होत जातात आणि वरच्या बाजूला छतावर ते डोंगर एकमेकांपासून विलग झालेले दिसतात. अर्थात या भागात पुरेसा उजेड आहे. पाय जरा जपून ठेवावा लागतो. खालचा रस्ता खाचखळगेवाला आणि वरखाली करत आतल्या गुहेत नेतो. हा बाहेरचा भाग चुनखडीचा असूनही काळा दिसतो. हवा पाणी यांच्या संपर्कात आल्यानं चुनखडीचा पांढरा रंग बदललेला आहे. इथून पुढे गुहेच्या आतील चाळीस टक्के भाग कमी उजेडाचा आहे. गुहेत आत जाऊ तसतसा काळोख दाट होतो. या गुहेतील पुढचा प्रवास मोबाइल टॉर्चच्या उजेडात करावा लागतो. परंतु इथल्या डोंगराच्या भिंती पांढऱ्या आहेत. या भिंतींना हात लावायचा नाही. हाताचा स्पर्श जिथं झाला आहे तिथं त्या काळ्या झाल्या आहेत.
वाटाड्या दाखवत जातो तसं आपण फक्त बघत आत जायचं. चुनखडीच्या क्षारांचे एकावर एक अनेक थर या भिंतीवर जमले आहेत. दोन्ही बाजूच्या भिंती आकाशाकडं निमुळत्या होत जातात आणि शेवटी एकमेकींना मिळालेल्या दिसतात. काळोख वाढत जातो. चुनखडीचे थर चित्र विचित्र आकार धारण करतात. आपली जशी नजर तसे आकार किंवा आपल्या मनात जो भाव तसा दगड. इथं दगडानं कधी बाप्पाच्या सोंडेचा आकार धारण केला आहे तर कधी फक्त सोंडेचा. कुठं चुनखडीतून पद्म फुललंय तर कुठं कमळपुष्पमाला. कुठं मानवी नाकाचा, चेहऱ्याचा भास तर कुठं मानवी पाठीचा कणा. स्पायनल कॉर्ड. तो इतका हुबेहुब की आ वासून बघतच रहावं. मणक्यांची खरी माळच कुणा प्रवाशानं आणून ठेवली नसावी ना? असा विचार मनात आल्या शिवाय रहात नाही. एके ठिकाणी एक दगड छतातून खालच्या दिशेनं वाढतोय तर त्याखाली दुसरा जमिनीतून छताच्या दिशेने. दोन्हीमध्ये एखादी चपटी वस्तू जाऊ शकेल इतकं कमी अंतर. काही वर्षांनी येणाऱ्या प्रवाशांना एकसंघ खांब दिसला तर नवल नसावं. काही ठिकाणी अजूनही थर बनवण्याचं, क्षार साचण्याचं काम सुरू आहे. त्या जागा ओलसर दिसतात. टपकन एखादा पाण्याचा थेंबही आपल्या अंगावर पडतो. काही थरांमध्ये अभ्रकाचं प्रमाण जास्त आहे. ते अंधारात चांदण्यागत चमकतात.
निसर्गाची लीला अजबच याची पक्की खात्री करून देणाऱ्या या गुहा. नजरबंदी करणाऱ्या नैसर्गिक सौंदर्याचा, निसर्गाच्या अदाकारीचा थाट लेवून उभ्या आहेत. एक गूढ वातावरण घेऊन. रम्य आणि अजब आकारांचं हे निसर्ग दालन किती सजीवांचं आश्रय स्थान होतं कोण जाणे. किंवा अजूनही असेल माहिती नाही. गुहेतून फिरताना समुद्राची गाज कानावर येत राहते. ती गाजच काय तेवढी तिथल्या गूढ शांततेचा भंग करते पण गूढता अधिकच गूढ करते.
या गुहांच्या पलिकडे आणखी गुहा आहेत. ज्या स्तरसौंदर्याच्या खाणी आहेत. परंतु तो रस्ता बंद झाला आहे. शिवाय इथं अंधार लवकर पडतो. बारटांगचं गेट दुपारी तीन वाजता तसंच चार वाजता उघडतं. त्यावेळेत पोचायला हवं. पाय उचलावेच लागतात. गूढ रहस्याचा शोध न लागल्यासारखे आपण परतू लागतो.