मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आई अंगाई गातांना ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ आई अंगाई गातांना ☆ सौ.मंजिरी येडूरकर

(आपण बाळांना नेहमीच अंगाई म्हणून झोपवतो. पण खरंच त्या बाळाला अंगाई ऐकताना काय वाटत असेल?)

 गोड गळ्यातील सूर लघवी

लोभस माया झोका हलवी

स्वर्ग सुखाची जाणीव काना

आई अंगाई गाताना सूर  लाघवी

*

चंद्र, चांदण्या, काऊदादा अन् चिऊताई

कोण आले, कोण गेले, नाही कळले बाई

आपणही मग घेते ताना ——-

*

ठाऊक नाही गाईचे ते हंबरणे

मनी माऊचे लपलप दूध पिणे

विसरुनी जातो भूक हा तान्हा ——

*

तिन्हीसांजेला दिवा लाविता आई

भिती काळजातली दूर ही जाई

बोचे गादी, न रुचे पाळणा ——

*

आकांत मी करते, रडू कोसळते

उचलुनी घेता आपसूक हसते

ही तर जादू स्पर्शाची ना ——–

*

म्हणे लबाडा, लटक्या रागे, मांडीवर घेता

आणि कळते, खरेच आई, थकली आता

म्हणूनच झोपी जाई हा राणा ———-

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ५ – संत कान्होपात्रा…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ५ – संत कान्होपात्रा… ☆ सौ शालिनी जोशी

पंढरपूर जवळील मंगळवेढा हे संतांच गाव. संत दामाजी, संत चोखामेळा या मंगळवेढ्याचे होते. येथेच १५ व्या शतकात शामा गणिकेचे पोटी कान्होपात्रेचा जन्म झाला. चिखलात उमललेले कमळच हे. अप्रतिम लावण्य आणि गोड गळा तिला लाभला होता. साहजिकच आपलेच काम आपल्या मुलीने करावे अशी तिच्या आईची इच्छा होती. पण पूर्व पुण्याईने कान्होपात्रेला लहानपणापासूनच विठ्ठलाची ओढ होती. तिला नृत्य, गायन शिकवणारे गुरुजीही भजने शिकवत असत. त्यामुळे सतत हरिनामात दंग राहणे हाच तिचा छंद झाला. सौंदर्यामुळे मोठमोठ्या सावकारांच्या तिला मागण्या येत असत, पण ती नकार देत असे. त्यामुळे तिचा छळही झाला.

शामा नायकिणीने चिडून तिला अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवले. पण विठ्ठलाच्या कृपेने तिच्यासाठी तो एकांत ठरला. ती अखंड नामस्मरणात गुंतली. एकादशीचा दिवस होता. वारकऱ्यांचे अभंग ऐकून तिला स्वस्त बसवेना. तिने खिडकीतून उडी मारली आणि वेश बदलून वारीत सामील झाली. हातात वीणा घेऊन वारकऱ्यांबरोबर पंढरीला पोहोचली. चंद्रभागेत स्नान करून, नामदेव पायरीचे दर्शन, घेऊन राऊळी धावली. देहभान विसरून, विठ्ठलाचे अनुपम रूप तिने डोळ्यात साठवले. चरणाला मिठी मारली. नामभक्ती सांगताना ती म्हणते,

घ्यारे घ्यारे मुखी नाम l अंतरी धरोनिया प्रेम ll

माझा आहे भोळा बाप lघेतो ताप हरोनी ll

कान्होपात्रीने मंगळवेढ्याहून पंढरपूरला दर्शनासाठी येण्याचे धाडस केले. ती परत मंगळवेढाला गेली नाही. उलट तीच विठुरायाला प्रश्न करते,

‘पतित पावन म्हणविसी आधी l

मग भक्ता मागे उपाधी कां बरे लावतो?ll’

नामस्मरणातून सुरू झालेल्या कान्होपात्रेचा प्रवास अनुभूती पर्यंत पोहोचला. पांडुरंगाच्या चरणी ती आनंदाने विसावली. कान्होपात्राचे अप्रतिम सौंदर्य बिदरच्या बादशहाच्या कानावर गेले होते. ती लावण्यवती आपली अंकित असावी, अशी ईर्षा बादशहाच्या मनात निर्माण झाली. कान्होपात्रा पंढरपूरला आहे हे कळतात तिला नेण्यासाठी बादशहाचे शिपाई आले. कान्होने मंदिराचा आश्रय घेतला. सरदार शिपायानी मंदिरापर्यंत तिचा पाठलाग केला. मंदिराच्या व्यवस्थापकांना मंदिर ताब्यात घेण्याची धमकी दिली. तेव्हा मंदिर उध्वस्त होण्यापेक्षा मी यवनांसोबत जाते. अशी तयारी कान्होपात्रेने दर्शविली. आणि शेवटचे म्हणून विठ्ठलाच्या चरणावरती डोके ठेवले. तिच्या शुद्ध, अनन्य भावभक्तीला भगवंत पावला. तिची आळवणी ऐकून तिला सगुण रूपात दर्शन दिले. निर्भय केले. पाहता पाहता कान्होपात्रा अदृश्य झाली. दोन चैतन्ये एक झाली. उरले ते शुष्क कलेवर. भक्तीत अडसर आणणाऱ्या यवनाला हात हलवत जावे लागले. त्याप्रसंगी तिने केलेला विठ्ठलाचा धावा,

नको देवराया अंत आता पाहू l प्राण हा सर्वथा जाऊ पाहेll१ll

हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले l मजलागी झाले तैसे देवा ll२ll

मोकलून आस झाले उदास l घेई कान्होपात्रेस हृदयांतरी ll३ll.

तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी l धावे हो जननी विठाबाई ll ४ll

आपल्या अनन्य भक्ताची आळवणी भगवंतापर्यंत पोहोचली. भगवंताने आपले ब्रीद खरे केले. पंढरपूरच्या मंदिराच्या दक्षिण दरवाजात तिला पुरण्यात आले. तेथे एक तरटीचा वृक्ष उगवला. कानोपात्रीच्या भक्तीची व संतत्वाची ग्वाही तो देतो. त्या झाडाखाली तिची छोटीशी मूर्ती आहे. मंगळवेढा गावात तिचे छोटेसे देऊळ आहे.

अशाप्रकारे कान्होपात्रेचे आयुष्य अनेक नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले होते. तिचा शेवटही तसाच थरारक. जन्मजात प्राप्त झालेले उपभोग्य म्हणून जगणे तिने नाकारले. तिने स्वतःची वारकरी संप्रदायातील स्त्रीभक्त, अभंग रचनाकार अशी नवी ओळख निर्माण केली. तिच्या नावे ३३ अभंग आहेत. वारकरी संप्रदायाने तिला मान दिला. कान्होजी संत कान्होपात्रा झाली. कुणी गुरु नाही, काही परंपरा नाही, भक्तीचे वातावरण नाही. तरीही केवळ भक्तीने तिने ईश्वराजवळ स्थान मिळवले. तोच तिचा सखा, मायबाप, बंधू, भगिनी आणि तारणहार झाला. ‘दिनोद्धार ऐसे वेदशास्त्रे गर्जती बाही’ दिनोद्धार करावा असे वेदच सांगतात. त्यामुळे मी कुळहीन असले तरी मला भक्तीचा अधिकार आहे. भक्ती मधून स्वतःचा उद्धार करावा असे वेदांत सांगितले आहे. अशी भूमिका घेऊन कान्होपात्रेने भक्ती करण्याचा अधिकार प्राप्त करून घेतला. पतीताना पावन करणाऱ्या विठ्ठलावर सर्व भाग टाकून निष्काम भावनेतून भक्ती केली. भक्तीचे बळ यवन बादशाहालाही कळलं.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ राजवैद्य — भाग-२ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ राजवैद्य — भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(शिर्के साहेब मुंबईला जाताना बरोबर त्या गोळ्या घेऊन गेले आणि नियमित घेऊ लागले. त्यांची इतर पत्ते चालू होतीच.) – इथून पुढे —- 

दर दोन महिन्यांनी शिर्के साहेब आपल्या डॉक्टर कडे तपासून घेत असत. नेहमीप्रमाणे शिर्के साहेबांनी लिव्हरची सोनोग्राफी केली आणि सर्व पॅथॉलॉजी मध्ये जाऊन लिव्हर टेस्ट केल्या.

डॉक्टर मोटवानी लिव्हर वर उपचार करणारे डॉक्टर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होते. शिर्के साहेब नेहमी त्यांचे कडून तपासून घेत असत. नवीन केलेली सोनोग्राफी आणि लिव्हर टेस्ट घेऊन शिर्के साहेब मोटवानी ना भेटायला गेले. डॉक्टर मोटवानी सोनोग्राफी चे रिझल्ट पाहायला लागले आणि आश्चर्यचकित झाले, तसेच त्यांनी पॅथॉलॉजी मधील केलेल्या लिव्हर टेस्ट बघितल्या, त्यांच्या आश्चर्याचा धक्का बसला.

डॉ मोटवानी – मिस्टर शिर्के, धिस इज मिराकल, your bilrubin reched normal level, युवर सोनोग्राफी टेस्ट अल्सो शोज युवर युवर लिव्हर इज नियर टू नॉर्मल. हाऊ दिस हॅपेंड?

शिर्के साहेबानं खूप खूप आनंद झाला, सर्व डॉक्टर नी त्यांच्या लिव्हर च्या रिकव्हरी बद्दल नकारघंटा लावली होती, आणि आपले पाहुणे आनंदराव यांच्या शब्दाखातर आपण राजवैद्यना रिपोर्ट दाखवले, आणि राजवैद्य आणि मोठे आश्चर्य आपल्या बाबतीत घडवले. असे वैद्य अजून आहेत यावर आपला विश्वास नव्हता. राजवैद्य आणि ही जादू केली आहे.”

“डॉक्टर, मी कामानिमित्त एका शहरात गेलो होतो, माझ्या एका नातेवाईकाने त्यांच्या संस्थांच्या राजवैद्ययाना बोलावून घेतले आणि माझे रिपोर्ट्स दाखवले. या राज्यवैद्ययांचे आजोबा 60 70 वर्षांपूर्वी राजांच्या पदरी होते. त्यांच्याकडे अजूनही काही आश्चर्यकारक औषध आहेत. ते त्याचा फारसा प्रसार करत नाहीत. ‘

डॉ मोटवानी – मिस्टर शिर्के, या अशा जादू सारख्या औषधांचा इतर लोकांना पण फायदा व्हायला पाहिजे. तुम्ही जर या राजवाड्यांचा पत्ता मला दिलात तर इतरही पेशंटसाठी मी ते औषध त्यांचे कडन घेऊ शकतो. हे आपल्या समाजाचे काम आहे. जास्तीत जास्त पेशंट बरे व्हायला पाहिजेत. “

शिर्के साहेबांनी त्यांना आनंदरावांचा आणि राजवैद्य यांचा पत्ता दिला. शिर्के साहेब बाहेर जातात डॉक्टर मोटवानी यांनी बेंगलोर मधील जया ड्रग कंपनीचे मालक नियाज शेख यांना फोन लावला. जया ड्रग कंपनी ही आयुर्वेद मधील भारतातील पहिल्या तीन आतली कंपनी होती. डॉक्टर मोटवानी त्यांचे एक डायरेक्टर होते.

जया ड्रग कंपनीचे मालक मियाज शेख शक्यतो कुणाचा फोन घेत नसत, पण डॉक्टरमोटवानी हे त्यांच्या कंपनीचे डायरेक्टरच होते म्हणून त्यांनी फोन घेतला.

डॉक्टर मोटवानींनी मियात शेख यांना सांगितले माझ्याकडे एक शिर्के नावाचा पेशंट गेली दहा वर्षे येत आहे. त्याची लिव्हर पूर्ण खराब झाली होती. इंग्लंड मधून येणाऱ्या औषधावर तो जगत होता. परंतु आज तो तपासणीला आला तेव्हा त्याची लिव्हर जवळजवळ रिकव्हर झाली आहे. मला याचे आश्चर्य वाटले आणि मी चौकशी केल्यानंतर कळले महाराष्ट्रात एका शहरात एका माजी संस्थांनाचे राज्य वैद्य राहतात. ही त्यांची तिसरी पिढी आहे. त्या त्या राजवैद्याने शिर्के साहेबांना हे औषध दिले. मला वाटते लिव्हरच्या उपचारासाठी ही एक जादू आहे. आपण जर ते औषध मिळवले तर आपलं सबंध भारतभर धंदा करू शकतो, या औषधाला सध्या तरी स्पर्धा नाहीये. त्यामुळे कोणी ते औषध मिळवण्याआधी आपण ते औषध मिळवायला हवे. यासाठी तातडीने हालचाल करायला हवी ‘.

डॉक्टर मोटवानी ही बातमी देतात, नियाज शेखचे डोळे चमकले, त्याच्या तीन पिढ्या या व्यवसायात मोठया झाल्या, डॉक्टर मोटवानी हे मुंबईतील मोठे प्रस्थ, लिव्हर समस्येवर मुंबई मधील विशेषतःज्ञ्, त्यांचा अंदाज आणि मत चुकीचे ठरणार नाही. हे आयुर्वेदिक औषध लिव्हर समस्येवर जादू आहे हे शेखने जाणले.

त्याने तातडीने हालचाल सुरु केली. सर्व डायरेक्टर्सना बोलाविले, मोटवानींनी कळवलेल्या माहितीबद्दल सर्वांना सांगितले. हे आयुर्वेदिक औषध आपल्याला मिळाले तर आपण भारतात नंबर वन वर पोहोचू असा विश्वास सर्वांना दिला. याकरिता ते औषध आपल्याला मिळायला हवी. त्या वैद्य राजा पर्यंत पोहोचण्यासाठी चांगला माणूस हवा होता. त्यांच्या एका डायरेक्टरनी त्यांच्या कंपनीच्या पुन्हा विभागाचा मुख्य ज्ञानेश सबनीस याचे नाव सुचवले. सर्वांनी ज्ञानेश च्या नावाला एकमताने संमती दिली.

ज्ञानेश ला बेंगलोरला बोलवले गेले. त्याला सर्व माहिती आणि वैद्य राजांचा पत्ता दिला गेला. हवे तेवढे पैसे खर्च करण्याची मुभा दिली गेली. ज्ञानेश्वर मराठी असल्याचा त्यांना फायदा होता. वैद्य राजांबरोबर बोलू शकणार होता. शिवाय त्याला महाराष्ट्रातील सर्व माहिती होती.

ज्ञानेश त्या शहरात आला आणि एका मोठ्या हॉटेलात उतरला, त्याच संध्याकाळी तो बापूसाहेबांना भेटायला गेला.

ज्ञानेश – बापूसाहेब मी ज्ञानेश सबनीस जया ड्रग कंपनीचा सेल्स मॅनेजर, तुम्हाला माहिती असेलच आमची कंपनी भारतातील अग्रगण्य आयुर्वेदिक कंपनी आहे. आमच्या कंपनीचा विस्तार भारतभर आहे. मुंबईचे जे शिर्के नावाचे एक लिव्हर पीडित पेशंट तुमच्याकडे आले होते, ते मुंबईच्या डॉक्टर मोटवानी चे पेशंट होते. तुमच्याकडचे औषध घेतल्यानंतर त्यांचा आजार जवळजवळ संपला. हे एक मोठे आश्चर्य घडले. मोटवानीने चौकशी करता करता शिर्के म्हणाले या शहरातील आयुर्वेदाचार्य राजवैद्य बापूसाहेब यांच्या औषधाने हा चमत्कार झाला. तुम्ही जी वनस्पती या आजारासाठी वापरलात ती जर आमच्या कंपनीला दिलीत तर कंपनी तुम्हाला त्याचे योग्य मोबदला देईल.

बापूसाहेब – शिर्के साहेबांची लिव्हर बरी झाली याचे श्रेय माझे नव्हे. माझा एक जंगलात राहणारा मित्र आहे, जो शेळ्या मेंढया राखतो, त्याचे हे ज्ञान आहे. त्याच्या आज्यानं ही विद्या त्याला दिली आहे.

ज्ञानेश – मग बापूसाहेब, तुमच्या त्या मित्राला बोलवाल तर बरं होईल. त्यांनी जर त्या वनस्पतीची माहिती आम्हाला दिली तर त्यांना आम्ही मोबदला देऊच पण तुम्हाला पण देऊ.

बापूसाहेब – ज्याचं श्रेय माझं नाही, त्याचा मोबदला मी कसा घेऊ? पण केरबाला जर तुम्ही पैसे देणार असाल तर त्याने ते घ्यावे. म्हणजे त्याचे दारिद्र्य मिटेल.

बापूसाहेबांनी त्यांचा मुलगा दिलीप याला बोलावून केरबा धनगर ला आणायला सांगितले. दिलीप केरबायला भेटायला गेला आणि येताना गाडीतून त्याला घेऊन आला.

आता बापूसाहेबांच्या घरात ज्ञानेश सबनीस, बापूसाहेब आणि केरबा समोरासमोर बसले होते.

बापूसाहेब – केरबा, तु जी झाडाची मुळी मला दिली होतीस, मी ती माझ्या औषधास मिसळून मुंबईच्या शिर्के साहेबांना दिले. त्यामुळे त्यांची लिव्हर एकदम बरी झाली. त्या औषधाच्या शोधात हे एका औषध कंपनीचे माणूस माझ्याकडे आले आहेत. ते औषध जर तू त्यांना दाखवलं, तर तुला ते दोन कोटी रुपये द्यायला तयार आहेत. त्यांचं म्हणणं आहे, या औषधामुळे अजून अनेक लिव्हरच्या पेशंटला फायदा होईल. त्यामुळे तू त्याचा विचार करावा.

केरबा –असल्या पैशावर थुंकतो मी बापूसाब, मी हाय तो झोपड्यात बरा हाय. या मुळीचा मी बाजार करणार न्हाई, माज्या आज्यान मोठया विश्वासन माझ्याकडं ही मुळी दावली, तेचा व्यापार करू? न्हाई जमायचं.

ज्ञानेश – केरबा कंपनी तुम्हाला शहरात घर देईल. तुमच्या मुलाला नोकरी देईल.

केरबा –अरे हट, मान कापली तरी मुळी दवणार न्हाई. मला तुमच पैस नग, घर नग. नोकरीं नग. माझा शेळ्या मेंढया विकायचा धंदा हाय तो बरा हाय. बापुसो, मी चाल्लो.’

म्हणत केरबा निघून गेला.

बापूसाहेब पण गप्प बसून होते. बापूसाहेबांना पण मनातल्या मनात समाधान वाटत होतं. पैशाला न बोलणारी अजून माणसे आहेत याचे त्यांना समाधान वाटले. ज्ञानेश गप्प बसून होता. पण तो मनातल्या मनात पुढची आखणी करत होता. कंपनीने त्याच्यावर मोठी जबाबदारी दिली होती. आणि ती पुरी करण्याची त्याची जबाबदारी होती.

– क्रमशः भाग दुसरा

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रंगछटा… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ रंगछटा… ☆ प्रस्तुती – सुश्री नीला महाबळ गोडबोले

“बाबा, किती जुनं दिसतय आपलं घर..! ! बदलून टाकायचं का? “

लेकीनं एखादा कपडा किंवा चपला बदलून टाकायच्या सहजतेनं विचारलं..

आम्हाला ते सहज पचणारं नसलं तरी तिचं वय आणि तिची पिढी विचारता घेता ते फारसं अयोग्य नव्हतं.

मधला मार्ग म्हणून आम्ही घर रंगवायचं ठरवलं..

रंगाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली.

 

लेकीनं जांभळा, पिवळा, हिरवा असे व्हायब्रंट रंग निवडले..

मी पांढरा, आकाशी, क्रीम अशा मंद रंगांना पसंती दिली..

नव-याला रंगाशी देणंघेणं नव्हतं..

“मला रंगातलं काही कळत नाही ” म्हणत तो मोकळा झाला..

त्याला फक्त काम लवकर नि चांगलं व्हायला हवं होतं..

“घर रंगवायचय की वृद्धाश्रम.. का मंदिर..? ” म्हणत लेकीनं पांढरा रंग निकालात काढला..

“संपूर्ण घराला एकच रंग लावूया म्हणजे घर मोठं दिसतं नि घराला कंटिन्युटी येते.. “

या पेंटरच्या सल्ल्यावर कशी कुणास ठाऊक पण आम्हा दोघींत एकवाक्यता झाली..

नि एक फिकटसा रंग आम्ही फायनल केला..

 

एका शुभदिनी रंगकामाला सुरुवात केली..

घरातल्या सा-या सामानानं आपापल्या जागा सोडून एखाद्या सभेला हजेरी लावावी त्याप्रमाणे दिवाणखान्यात गर्दी केली..

उड्या मारत, धडपडत, ठेचाकाळत चालावं लागू लागलं..

आमचा एककक्षीय (एका खोलीतला) संसार सुरू झाला..

 

“तुम्ही दोघी खाटेवर झोपा, मी खाली झोपतो.. ” म्हणत नव-याने जमिनीवर पथारी पसरली..

 

घरातल्या समस्त उशा, पांघरुणे, बेडशीट्स खाटेवर मुक्कामाला आल्याने आम्ही दोघी अंग चोरून कशाबशा झोपलो होतो..

मध्यरात्री लेक सरळ झाली नि तिची मला धडक बसली..

मी थेट खाली कोसळले ते नव-याच्या अंगावर..

त्याच्या किंचाळण्याने गल्ली जागी झाली..

पण वाचला बिचारा..

अडचण एवढी की मला उठता येईना.. ना त्याला..

शेवटी लेकीनं मला ओढून कसंबसं वर काढलं..

या प्रकरणाचा तिने एवढा धसका घेतला की 

“आता इंटर्नशिप करायला हवी ” म्हणत रंगकामाची पुरस्कर्ती लेक सुट्टीतही काढत्या पायाने पुण्यास रवाना झाली..! !

टुथपेस्ट सापडली तर ब्रश न सापडणं, पावडर सापडेपर्यंत कंगवा गायब होणं..

वरणभात आणि पिठलंभाकरी सोडून इतरही पदार्थ असतात, याचा विसर पडणं..

कधीही घराकडे ढंकुनही न पहाणारी पाहुणे मंडळी नेमकी या काळात टपकणं..

पेंटरबाबुंची रोजची पैशाची मागणी..

मालाच्या एस्टिमेटची पानफुटीप्रमाणे होणारी अखंड वाढ आणि पैशाचा बाहेरच्या दिशेने वाहणारा अखंड झरा…

यामुळे आम्ही दोघे नवरा-बायको रोज

“कुठून या नस्त्या फंदात पडलो.. नि सुखातला जीव दु:खात घातला.. “

या मंत्राचा अखंड जप करू लागलो..

मला तर स्वप्नंही रंगकामाची पडू लागली होती..

एखाद्या भिंतीचा रंग सगळा खराब झालाय…

असलं काहीतरी बेकार स्वप्न पडून मी ओरडत उठत असे नि झोपमोड केल्याबद्दल नव-याच्या शिव्याही खात असे..

याच काळात पेंटरमामांची आजी वारली, वडिलांना दवाखान्यात अॅडमिट करावं लागलं, त्यांचे किती दोस्त आणि शेजारी मयत झाले.. याला तर गणतीच नाही..

” आता तुम्ही स्वत: मयत व्हायच्या आधी आमचं काम पूर्ण करा.. “.

अशी आम्ही त्यांना विनंती केली..

तेंव्हा कुठे दहा दिवसात पूर्ण होणारं आमचं रंगकाम दीड महिन्यांंनी पूर्ण झालं..! !

रंगकामाचं घोडं एकदाचं गंगेत जाऊन न्हालं…!!

रोडावलेल्या बॅंकबॅलन्समुळे नव-याचं वजन चार-पाच किलोंनी घटलं असलं तरी मी मात्रं खुशीत होते..

नवीन फर्निचरचे, शोपिसेसचे बेत डोक्यात घोळत होते..

पैसे कमी झाले असले तरी उगीचच शेजारणींपेक्षा आपण श्रीमंत झाल्यासारखं वाटत होतं..

“संक्रांतीचं हळदीकुंकु करून सगळ्या शेजारणींना बोलवायचं नि त्यांना जळवायचं. “.

अशी कल्पना जेंव्हा मनात जन्मली तेंव्हा झालेला सगळा त्रास विरून गेला आणि मनमोर. नुसता थुईथुई. नाचू लागला..! !

याच आनंदात मी नवीन रंग पहायला खोल्याखोल्यांतून हिंडू लागले..

आणि लक्षात आलं की प्रत्येक खोलीतला रंग वेगवेगळा दिसतोय…

नव-याला बोलावलं..

“प्रत्येक खोलीतला रंग वेगळा दिसतोय.. बघ नां..! ! “

“सुरू झाली का तुझी किरकिर.. कितीही पैसा खर्च करा.. त्रास सहन करा.. या बाईला समाधान म्हणून नाही.. रंग वेगळा कसा दिसेल?” माझ्यावरच करवादत घालवलेले पैसे मिळवायला नवरोबा तडक निघून गेले.

“तुला प्रत्येक खोलीतले रंग वेगळे दिसतायत का बघ गं.. ” कामवाल्या सुमनला मी विचारलं..

“बाई, तुम्ही इथं लाल न्हाईतर पिवळाजर्द रंग द्यायला पायजे हुता.. आमच्या जावेच्या भैनीकडं तसलाच दिलाय.. कसला भारी दिसतुय.. तुमास्नी रंगातलं कळत न्हाई बगा..”

सुमननं नेहमीप्रमाणे ती कशी हुशार… आणि मला कसं काही कळत नाही.. हे दाखवायची नि मला डिप्रेस करायची, हिही संधी सोडली नाही..

दुपारी पुन्हा एकदा पाहणी केली..

आता तर रंग आणखी वेगळा वाटत होता..

अन् रात्री दिव्यांच्या प्रकाशात अजूनच वेगळा..

स्वयंपाकघरातला डार्क, हॉलमधला फिकट, बेडरूम्समधला थोडासा डल्…

आता मात्रं मी चक्रावून गेले.

सकाळी उठल्याबरोबर पेंटरकाकांना फोन केला..

“पैसे घेऊन जायला लगेच या.. “

पैशाच्या लालचेने पेंटरकाका दहा मिनिटांत हजर झाले..

“काका, आपण सगळीकडे एकच रंग वापरायचं ठरवलं होतं नं.. मग प्रत्येक खोलीतला रंग वेगळा कसा दिसतोय?”

पेंटरकाका थोडं गूढंसं हसले..

“ताई, रंग एकच आहे सगळीकडं..

पण प्रत्येक खोलीचा आकार वेगळा आहे. भिंतीच्या पोतात फरक आहे..

आणि मुख्य म्हणजे प्रत्येक खोलीत येणारा प्रकाश वेगवेगळा आहे..

स्वयंपाकघरात एकच खिडकी आहे.. हॉलमधे चार खिडक्या आहेत..

शिवाय स्वयंपाकघर लहान आहे.. हॉल मोठा आहे.. म्हणून हॉलमधे रंग फिकट आणि ब्राईट वाटतोय.. तर स्वयंपाकघरात डार्क..

बेडरूमच्या बाहेर झाडं आहेत.. प्रकाशच येत नाही.. म्हणून तिथला रंग डल् वाटतोय..

शिवाय खोलीतल्या फर्नीचरच्या रंगाच्या रिफ्लेक्शननं भिंतीचा रंग वेगळा दिसतो..

ताई, रंगाच्या छटा त्याच्या मुळच्या रंगावर अवलंबून असतातच पण त्यापेक्षाही इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतात..

या सा-या गोष्टी सारख्या करा.. मग रंगही समान दिसेल..!!

अजून काही महिन्यांनी बघा.. रंग अजूनच वेगळा दिसेल..

शिवाय पहाणा-याच्या नजरेवरसुद्धा रंगाचं आकलन अवलंबून असतं..

साहेबांना नाही वेगळेपणा जाणवला..

तुम्हाला जाणवला.. कारण तुमचा जीव या भिंतीत आहे.. या घरात आहे..! !

मी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते..

त्या अशिक्षीत माणसाकडून केवढं मोठं तत्त्वज्ञान मला समजलं होतं.. रंगाच्या निमित्ताने..!!

माणसाचंही असच आहे नाही..

खरंतर प्रत्येक माणूस सारखाच…

पंचमहाभुतापासूनच बनलेला..

पण प्रत्येकाचा रंग.. म्हणजे स्वभाव, वागणूक, मन, बुद्धी, आचार, विचार किती वेगळं..

मग आपण. लावून टाकतो..

हा चांगला..

ती वाईट

ती उदार

तो कंजुष

तो दुष्ट

ती दयाळु

ती हुशार

तो मठ्ठ

तो कोरडा

ती प्रेमळ

अशी अनंत लेबलं..

 

तो माणुस जन्मत:च असा आहे, असं आपण ठरवूनच टाकतो..

आणि तो असा बनायला सभोवतालच्या कितीतरी गोष्टी जबाबदार आहेत, याचा आपल्याला विसर पडतो..

तो उद्या बदलेल.. हे मानायला आपण तयारच होत नाही..

निसर्गाकडून मिळालेलं शरीर, बुद्धी, बालपणीचे संस्कार, मिळालेलं प्रेम किंवा तिरस्कार, वाट्याला आलेली गरिबी किंवा लाभलेली श्रीमंती, लाड किंवा भोगावे लागलेले अत्याचार..

किती किती गोष्टींच्या प्रभावामुळे बनलेली अनंत छटांची अनंत व्यक्तीमत्त्वे…

काळी, पांढरी, करडी, हिरवट, पिवळी, निळी नि गुलाबी…!!

यातल्या कुणाला चांगलं म्हणत कौतुक करणं.. नि कुणाला वाईट म्हणत हेटाळण्यापेक्षा..

जाणीवेच्या शोभादर्शकातून पाहिलं तर रंगीबेरंगी नक्षीचं नयनसुख मिळेल..

नि सारं जग सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखं सुरेख होऊन जाईल…!!

 

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ – देशात विदेशी??? – ☆ सुश्री अश्विनी अभ्यंकर ☆

सुश्री अश्विनी अभ्यंकर

??

☆ – देशात विदेशी??? – ☆ सुश्री अश्विनी अभ्यंकर ☆

परदेशात गेलं ना, की त्यांच्या चलनातील नाणी किंवा नोटा पटापट उलगडत नाहीत. रक्कमेची जुळवाजुळव करायला वेळ लागतो. डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतीमुळे आपल्या देशातील नागरिकांना देखील स्वतःच्या देशात हा अनुभव मिळेल, असं वाटतं. माझ्यासारखीला, जिला याची फारशी सवय नाही, तिला तर हे अजबच वाटतं.

हैदराबादमध्ये मला, याचा प्रकर्षाने अनुभव आला. पण, मला याची खात्री आहे की, देशातील सर्वच महानगरांमध्ये हेच चित्र असणार.

हैदराबादला मागच्या वेळेस गेले, तेव्हा मला झटकाच बसला होता. मी रडकुंडीला आले होते. एक टॅक्सी चालक तर म्हणाला, “पाच रुपयांचं नाणं चालत नाही इथे. महाराष्ट्रातून आल्या आहात वाटतं. मी ठाण्यात काम करत असतानाची काही नाणी माझ्याजवळ आहेत. ती तुम्हालाच देतो.” 🙉

या वेळेस मात्र, मी तयारीनिशी गेले होते. पोरीनेही मुद्दामहून फ़ोन करून आठवण करून दिली होती. सुटे पैसे घेऊन गेले होते. मनाची तयारी ही करून गेले होते कि, वरचे २-४ रुपये सोडून द्यावे लागतील. झालं ही तसंच.

पुन्हा एकदा कसोटीचा क्षण आला. एका प्रख्यात कॉफ़ीशॉपमधे मी पाच रुपयांचं नाणं पुढे केलं. काऊंटरच्या पलीकडच्या मुलीने एखादी अज्ञात वस्तू असावी तसं ते नाणं उलट सुलट करून पाहिलं. परदेशात गेल्यावर त्यांच्या नाण्यांकडे पाहताना जो कावराबावरा भाव माझ्या चेहऱ्यावर येत असावा ना, अगदी तसाच तिच्या चेहऱ्यावर होता. आधी, मनातल्या मनात मी कपाळावर हात मारला आणि मग, मला हसूच फुटलं. एक क्षण वाटलं, आपला उद्धार करून (पुन्हा) नाणं परत करेल. पण, घेतलं तिने ते. त्यावरून असा विचार आला, उद्या हिला पन्नासची नोट कोणती, शंभरची कोणती, हे पण कळेनासं होईल कदाचित.

पुण्यामुंबईकडे याचं लोण आज इतकं पसरलेलं दिसत नसलं तरी, उद्या येईलच की. हम कहाँ किसीसे कम है?

मग, कामाच्या ठिकाणी नोटांचा एक तक्ता लावायला लागेल. माझ्यासारखा एखादा ग्राहक तिकडची वाट चुकला तर आणि, माझ्याकडून नगद पैसे घ्यायची वेळ आली तर…

 © सुश्री अश्विनी अभ्यंकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मध्यरात्रीचे सूर्य…” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? इंद्रधनुष्य ?

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मध्यरात्रीचे सूर्य…” – भाग – १  ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी वाहिलेले पहिले “प्रशिक्षण व रोजगार केंद्र”)

ज्या स्वप्नाचा गेली दहा वर्षे जीव खाऊन पाठलाग केला, जे स्वप्न पाहताना कधी झोप आलीच नाही, ज्याने गेल्या दहा वर्षात खूप रडवले, थकवले, हरवले अशा नुकत्याच साकार होऊ पाहणाऱ्या त्या स्वप्नाची हि कथा… माऊली आपल्या सर्वांसमोर सादर… कारण हे स्वप्न पाहण्याची शक्ती तुमच्याच मुळे मिळाली आहे… फक्त तुमच्यामुळे!!!

तर, आयुष्याच्या सुरुवातीला भीक मागणाऱ्या आजोबांनी मदत केली होती; त्यांच्या मदतीमधून उतराई व्हायचे, त्यांच्या उपकाराचे कर्ज डोक्यावर होते त्यातून उतराई व्हायचे, या भावनेतून, भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेतील महाराष्ट्र प्रमुख म्हणून असलेली नोकरी 2015 साली सोडून काम सुरू केले.

आमच्या या भीक मागणाऱ्या समाजाला वैद्यकीय सेवा, स्वयंरोजगार आणि पुनर्वसन तसेच भिक मागणाऱ्या मुलांचे शिक्षण असे एका मागोमाग एक अनेक प्रकल्प सुरू झाले. हे सर्व काम भीक मागणारे लोक जिथे असतात, तिथेच म्हणजे रस्त्यावर, उकिरडा किंवा गटारा जवळ, भर गर्दीतल्या फुटपाथ वर चालते.

दीडशे किलोचे साहित्य मोटर सायकल गाडीवर आणि बॉडीवर वागवताना या दहा वर्षात अनेक छोटे-मोठे एक्सीडेंट झाले. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळी हाडे मोडून घेतली. हरकत नाही, चूल पेटवायची म्हटल्यानंतर लाकडं जाळावीच लागतात…! भिक्षेकर्‍यांच्या घरात चूल पेटावी, म्हणून मी हाडं घातली..!

तर, याचना करणाऱ्या लोकांनी स्वयंरोजगार करावा, सन्मानाने नागरिक म्हणून जगावे यासाठी त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या मार्गांनी काम करण्यासाठी प्रवृत्त करायला सुरुवात केली. हळूहळू तुम्ही सर्वजण मला भेटत गेलात… माझा हूरूप वाढला… तुम्हीच माझे आई बाप झालात…!

माझ्या आई बापाने जन्म दिला, तुम्ही कर्म दिले!

तर, हे सर्व करत असताना लक्षात आले; की जन्मल्यापासून ते आतापर्यंत शिक्षण किंवा कोणत्याही स्किल्स भिक्षेकरी वर्गाकडे नाहीत. आणि म्हणून नोकरी, धंदा – व्यवसाय यांच्यापासून हे लोक खूप दूर आहेत. यांनी नोकरी धंदा व्यवसाय करावा म्हणून, यांना काहीतरी शिकवायचे म्हटले तर, कुठेतरी बसवून यांना काहीतरी प्रशिक्षण द्यावे लागेल याची जाणीव झाली.

यानंतर भीक मागणाऱ्या लोकांसाठी एखादे प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र उभे करून तिथे व्यवसायाभिमुख स्किल्स देऊन यांना यांच्या पायावर उभे करावे हा विचार डोक्यात आला, परंतु त्यासाठी एखादी जागा ताब्यात असणं गरजेचं होतं मग सरकारी, निमसरकारी, बिगर सरकारी अशा सर्व यंत्रणांना “आम्हाला जागा देता का? जागा…?” म्हणत झोळी घेऊन फिरलो. “अनेक माणसं भिंती वाचून, छपरापासून, इतरांच्या माये वाचून, माणूस होण्याचा प्रयत्न करत, रस्त्या रस्त्यात भीक मागत आहेत… यांना माणूस बनवण्याचा प्रयत्न करत आहे… जिथून कोणी उठवणार नाही; अशी भाड्याने का होईना पण जागा देता का? जागा….?” गावकरी होण्यासाठी झटणाऱ्या, या “सम्राटांसाठी मी नट झालो… ” 

मी जिथे जायचो त्या सर्व ठिकाणी माझ्या कामाचे कौतुक व्हायचे…. परंतु जागा द्यायचा विषय आल्यानंतर, आमच्या जागेत हे गलिच्छ लोक येणार? किती घाण करतील हे लोक? असा विचार होऊन आम्हाला कायम नकार मिळत गेले. पुण्यातील अनेक बिल्डिंग मधल्या सोसायटी मधील चेअरमन साहेबांचे पाय धरून त्यांचा हॉल रीतसर भाड्याने मागितला, पण अत्यंत प्रेमाने, प्रत्येकाने ‘शेजारच्या बिल्डिंगमध्ये विचारा’, असा सल्ला दिला. शेजारच्या बिल्डिंग वाल्यांनी, त्यांच्या शेजारच्या बिल्डिंगचा रस्ता दाखवला…. आम्ही रस्त्यावरचे, शेवटी रस्त्यावरच राहीलो, यांच्यासाठी प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र काढण्याचे स्वप्न दरवेळी भंगत गेले…!

ज्यांना भीक मागणे सोडायचं आहे, ज्यांना आमच्या केंद्रात काम करायचे आहे, असा वर्ग, दरवेळी मला भेटला; की विचारायचा, ‘सर मिळाली का जागा आपल्याला?’ अनेक हितचिंतक विचारायचे, ‘डॉक्टर तुम्हाला जागा मिळत नाही म्हणजे काय? समाजाचे काम करणाऱ्याला, दानशूर लोक दोन-चार एकर जागा सहज देतात… तुम्हाला चार-पाचशे स्क्वेअर फुटाची जागा मिळेना? अहो काय हे…??’ ”इतके पुरस्कार आणि सत्कार होतात, पण तुम्हाला कोणी जागा का देत नाही???’ या

सर्वांच्या प्रश्नामुळे माझ्या जखमेवर आपोआप मीठ पडायचे… डोकंच चालायचं नाही…!

खूप वेळा काम झाल्यानंतर, अंगावरचा apron काढून भिक्षेकऱ्यांमध्येच बसून मी काय करावं, कोणाशी बोलावं, कसा मार्ग काढावा? याचा डोक्याला हात लावून विचार करत असे… असा भिक्षेकऱ्यांमध्ये बसलेलो असताना, सहानुभूतीने, भिकारी समजून, माझ्या पुढ्यात भीक म्हणून खूप लोक पैसे टाकायचे… ‘धडधाकट आहे, अंगावर कपडे पण चांगले आहेत; तरी भीक मागतोय बघ कसा नालायक… ‘ अशी माझ्या माघारी, माझ्याच विषयी झालेली कुजबुज सुद्धा मी कितीतरी वेळा ऐकली. हे ऐकून, डोळ्याच्या वाटेने अश्रू ओघळायचे… प्रचंड राग यायचा… खूप वेळा वाटायचं, शासनाला किंवा इतर कोणालाच या कामाची गरज वाटत नाही… तर मला तरी ती गरज का वाटावी? मरू दे…. सोडून देतो उद्यापासून हे सर्व…! मी पूर्णतः हरून फ्रस्ट्रेट होऊन जायचो…

मी उठणार इतक्यात, मामा मामा, म्हणत चार-पाच वर्षाचं मूल मांडीवर येऊन बसतं… ‘तु का ललतो मामा, तुला भूक लागली?’ महिनाभर आंघोळ न केलेलं, काळकुट्ट एक बाळ माझ्या गालाचा मुका घेत विचारतं…. भीक मागण्यात व्यस्त असलेली त्याची आई मागून बोलते, ‘हा मामाला भूक लागली आसंल, म्हणून मामा रडतो…! ‘ 

भूक हेच आमच्या लोकांसाठी अंतिम सत्य…! भुकेच्या पलीकडे काही नाहीच…! भुकेसाठी लढायचं…. भुकेसाठी मरायचं…! जन्माला येऊन एवढं एकच करायचं…! ! ! या भुकेची शिसारी आली आहे आता मला…! “भूक”… मग ती कसलीही असो…. माणसाला वाकायलाच लावते…!

यानंतर ते बाळ त्याच्याकडे एकमेव शिल्लक असलेला वडापाव माझ्या तोंडापुढे धरतो आणि म्हणतो, ‘तू खा मामा, माजं पोट भरलंय… ‘ ज्याच्याकडे खूप काही आहे, त्याने देणं आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याने देणं… यात खूप फरक आहे. प्रश्न एकच, खरा श्रीमंत कोण??? 

आत्तापर्यंत सावकाशपणे वाहणारे अश्रू नकळतपणे मग महापूर होतात… भावनेच्या भरात, त्या नागड्या पोराला मी घट्ट मिठी मारतो… तेवढ्यातूनही तो ‘मामा मामा’ म्हणत मला घास भरवतो… माहित नाही कसा, पण तो बाळकृष्ण होतो आणि मी सुदामा होऊन जातो…!

यानंतर मला माझीच लाज वाटायला लागते… हि नागडी पोरं अशीच नागडी जगणार, मोठी होणार, भूक भूक करत नागडी आणि बेवारस म्हणूनच मरणार… स्वतःकडे काही नसताना ज्याने तुला वडापाव खाऊ घातला, त्याला तू आयुष्यभर उपाशी ठेवणार? ज्यांनी तुला मामा म्हटलं, काका म्हटलं, बाळा, सोन्या म्हणत नातू, मुलगा मानलं, ज्यांनी तुझ्याकडे आशेने डोळे लावले… त्यांना असंच रस्त्यावर बेवारस मरायला सोडून देणार? ‘सोडून देतो सर्व म्हणताना, लाज वाटत नाही का रे तुला?’ मीच हा माझा मलाच प्रश्न विचारायचो…

डोक्यात प्रचंड गदारोळ उठायचा… पण या आणि अशा प्रकारच्या अनेक प्रसंगांनी मला फ्रस्ट्रेशन मधून बाहेर काढलं, लढण्याचं सामर्थ्य दिलं. यानंतर हात वर करून शरणागती पत्करलेला मी, पुन्हा पुन्हा सज्ज व्हायचो…! हे असं…. एक नाही, दोन नाही, पाच नाही, तर तब्बल दहा वर्षे, म्हणजे आजपर्यंत सुरूच आहे. दहा वर्षे मी या गोष्टीची दाहकता भोगतो आहे…

मधल्या काळात तुम्हा सर्वांसारखाच… एक मोठ्या मनाचा… मनाची गडगंज श्रीमंती असणारा भला माणूस निसर्गाने माझ्या झोळीत टाकला. त्यांचे नाव दानिशभाई शहा! ! ‘हातात पुरस्कार आणि कपाळावर नकार’ अशा माझ्यासारख्याच्या पाठीवर त्यांनी हात ठेवला.

बिबवेवाडी परिसरात त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या सोयी करता त्यांची मालकी हक्काची बिल्डिंग आहे. त्यापुढील साधारण दोन हजार स्क्वेअर फुट जागा पार्किंग साठी त्यांनी शिल्लक ठेवली होती. ही मोकळी जागा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी त्यांनी मोफत वापरण्यास आपल्याला देऊ केली आहे. त्यांनी पाठीवर ठेवलेल्या हातामुळे माझी दहा वर्षाची घुसमट एका क्षणात थांबली.

काही माणसं असे दैवी हात घेऊन जन्माला येतात आणि एखाद्याच्या आयुष्याचं भलं करून जातात… वर ‘आपण काहीच केलं नाही’ या अविर्भावात नामा निराळे होतात…!

मला या माणसाचा हेवा वाटतो…! ! ! ते फक्त जागा देऊन थांबले नाहीत, स्वतःच्या घरचं कार्य आहे असं समजून चारही बाजूंनी पत्र्याचे शेड आणि डोक्यावर छप्पर करून दिले… दरवेळी मला ते या जागेवर बोलावून विचारायचे ‘डॉक्टरसाहेब आणखी काय करूया?’ दरवेळी मी घुम्यागत त्यांच्या पायांकडे पाहत राहायचो… काही मागायला माझी जीभ उचलायची नाही…

मी बोलत नाही असे पाहून… ते इकडे तिकडे, जागेकडे पाहत, मागे हात बांधून फिरत राहायचे… फिरता फिरता स्वतःशीच बोलत राहायचे, ‘ उन्हाळ्यात उकडणार… मोठे पंखे लागतील… थंडीच्या दिवसात लवकर रात्र होते, लवकर अंधार होईल…. चांगल्या लाईट इथे लागतील… ‘ प्रत्येक वाक्यानंतर लाईट आणि पंख्यांची ऑर्डर दिली जायची.

पुढच्या वेळी असंच हात मागे बांधून फिरता फिरता मला विचारायचे, ‘डॉक्टर साहेब, तुम्ही काहीतरी बोला ना, तुम्ही काहीच बोलत नाही… ‘ 

त्यांच्या इतक्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला मी…. भिजलेल्या मांजरागत भेदरून जायचो… मी काय बोलणार? 

पुन्हा स्वगत म्हणायचे, ‘आपल्या कडे आपल्या जागेत आता रोज पाहुणे येणार, त्यांचे सामान ते कुठे ठेवणार…?’ डाव्या तळहातावर उजव्या हाताच्या बोटांनी ताल धरत, गाणं म्हणाल्यागत ते बोलत राहायचे… ‘काय करूया…? अजुन काय करूया…? काय काय करूया….???’ म्हणत पुन्हा ते कोणालातरी फोन लावायचे, यापुढे लोखंडी कपाट आणि लॉकरची ऑर्डर, सीसीटीव्हीची ऑर्डर, रेडीमेड टॉयलेट ची ऑर्डर जायची… त्यांनी तळ हातावर धरलेला तो ताल होता; की माझ्या हृदयाची धडधड… हे मात्र मला कधी समजलं नाही…!

माझ्या या लोकांना, इतर लोक भिकारी म्हणतात, मी त्यापुढे जाऊन त्यांना भिक्षेकरी किंवा याचक म्हणतो… हा देव माणूस याही पुढे जाऊन माझ्या लोकांना “पाहुणे” म्हणतो…!

भीक मागणाऱ्या समाजात मी उठतो बसतो, त्यांच्याबरोबर माझं नातं तयार झालंय, म्हणून मला त्यांच्याविषयी जिव्हाळा आणि प्रेम वाटणे स्वाभाविक आहे, पण दानिश भाईंचं काय? त्यांना या लोकांबद्दल का जिव्हाळा वाटत असावा? मी यावर खूप विचार करत असे.

पाऊस पडून गेल्यानंतर मागे एक आल्हाददायक वातावरण तयार होते… मातीतून एक सुगंध यायला लागतो… पाऊस पडून गेला तरी मागे त्या पावसाच्या पाऊलखुणा उरतात…!

दया, क्षमा, शांती, सहानुभूती, करुणा, माया, प्रेम या सर्वांचं मिश्रण असणारे अनेक महापुरुष आपल्याकडे होऊन गेले… या महापुरुषांनी आपले अवतार संपवताना आपल्या पाऊलखुणा मागे ठेवल्या…. यातलीच एक पाऊलखुण म्हणजे दानिश भाई शहा असावेत!

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वजनकाटा ठेवला झाकून… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ वजनकाटा ठेवला झाकून – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

उन्हाळ्याच्या सुरुवातीला खायची ओल्या काजूची उसळ….

चव बदलायला कधी तरी लागते मग मिसळ….

रसरशीत बिटक्या चोखताना तोंड जातंय माखून…

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

 

कैरीची डाळ आणि झकास पन्हं थंडगार….

रात्री पण आइस्क्रीमचा मारा चाललाय फार…..

व्यायाम करायचा निश्चय केलाय सोमवार पासून…

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

 

करवंद जांभळे कलिंगड

खावी ताव मारून….

फणसाचे गरे आणि सांदण जरा थोडी जपून…

रिचवावा पायरीचा रस आणि हापूस थोडा कापून…

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

 

आमरस पुरीचं जेवून करतो थोडा आराम…

वजन कमी करण्यासाठी

कोणते करू मी व्यायाम…

हाताची बोटं पायांच्या बोटाला टेकतात अजून वाकून..

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

कवी: अज्ञात

प्रस्तुती: सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “द कारगिल गर्ल” – लेखिका : सुश्री गुंजन सक्सेना – अनुवाद :सुश्री शुचिता नांदापूरकर-फडके ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “द कारगिल गर्ल” – लेखिका : सुश्री गुंजन सक्सेना – अनुवाद :सुश्री शुचिता नांदापूरकर-फडके ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक :  द कारगिल गर्ल 

लेखक : गुंजन सक्सेना 

अनुवाद : शुचिता नांदापूरकर-फडके 

मुखपृष्ठ फोटोग्राफ – लेफ्टनंट कर्नल अनुपकुमार सक्सेना आणि अगंग गुणवान, अनस्प्लॅश

मुखपृष्ठ रचना – नीरज नाथ

पृष्ठे:२१६

मूल्य : ३६०₹ 

फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना (निवृत्त) फ्लाइंग ब्रँचमध्ये कमिशन प्राप्त करणाऱ्या पहिल्या मोजक्या स्त्री अधिकाऱ्यांपैकी त्या एक असून, भारतीय स्त्रीवर पडलेला छाप पुसून टाकण्यासाठी त्यांनी नेटाने लढा दिला आहे. हेलिकॉप्टर उड्डाणासाठी निवडण्यात येणाऱ्या स्त्री अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणसत्रासाठी त्यांची निवड होऊन त्यांना चित्ता/चेतक (ऑलवीट III) या युनिटमध्ये उधमपूर इथे पाठवण्यात आलं. फॉरवर्ड एअरकंट्रोल हे त्यांचं मुख्य काम होतं. युद्धाच्या धामधुमीत त्या हेलिकॉप्टरमधून हवाई मदत (बॅटलफिल्ड एअर स्ट्राइक – युद्धभूमीवर हवाई हल्ला) आणि निकट हवाई साह्य देत होत्या. तसंच, युद्ध करणाऱ्या विमानांना आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन करणं, हा त्यांच्या कामाचा भाग होता.

भारतीय वायुसेनेत (इंडियन एअरफोर्स) अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं, हे गुंजन यांनी या पुस्तकात अतिशय उत्तम प्रकारे समजावून सांगितलं आहे. कारगिल युद्धात क्लासिक बीएएस पद्धतीने हल्ला करण्याऐवजी, जीपीएसच्या आधारे बॉम्बहल्ला करण्याची मुख्य पद्धत अमलात आली असताना, बॉम्ब लक्ष्यावर नेमके कुठे पडत आहेत, या संदर्भात गुंजनच्या युनिटने अत्यंत महत्त्वाची माहिती पुरवली होती.

सीझफायर झाल्यानंतर १०८ स्क्वॉड्रनच्या अधिकाऱ्यांना टार्गेट भागापर्यंत नेणं, तसंच जिथे ३ आणि ८ डिव्हिजन हेडक्वार्टर्सचं काम सुरू होतं तिथे भेट देणं, ही कामगिरी गुंजनवर सोपवण्यात आली होती.

गुंजन यांना ‘द कारगिल गर्ल’ ही यथायोग्य उपाधी प्राप्त झाली. युद्धभूमीवर प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या त्या भारतीय सेनेच्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. त्यांच्यासारख्या स्त्री अधिकाऱ्यांची भारतीय वायुसेनेला आवश्यकता आहे. इतर तरुण स्त्रियांना प्रत्यक्ष युद्धात भाग घेऊन आपल्या देशाची सेवा करण्याचं स्वप्न पाहण्याची प्रेरणा अशा अधिकारी स्त्रिया नक्कीच देऊ शकतात.

“पूर्ण भरलेली ‘इन्सास’ असॉल्ट रायफल आणि एक रिव्हॉल्वर माझ्या हेलिकॉप्टरमध्ये नेहमी असे. माझं हेलिकॉप्टर जर शत्रूच्या सीमेत कोसळलं, तर मला युद्धबंदी केलं जाईल, या शक्यतेची जाणीव मला सतत होई. तरीसुद्धा, मी जे करायला हवं, ते मी करत राहिले. युद्धाचा गोंधळ तुम्हाला अति विचार करूच देत नाही.” – – गुंजन सक्सेना

सन १९९४ मध्ये वीस वर्षांची गुंजन सक्सेना म्हैसूर इथे जाणाऱ्या रेल्वेत बसली. चौथ्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (स्त्रियांकरता) पायलट कोर्सच्या निवडप्रक्रियेकरता उपस्थित राहण्यासाठी ती निघाली होती. प्रशिक्षणाचे खडतर चौऱ्याहत्तर आठवडे पार पाडल्यानंतर गुंजन सक्सेना दुन्डिगल इथल्या एअरफोर्स अॅकॅडमीतून उत्तीर्ण होऊन पायलट ऑफिसर म्हणून बाहेर पडली.

दि. ३ मे १९९९ रोजी कारगिल भागात पाकिस्तान्यांनी शिरकाव केल्याची बातमी स्थानिक धनगरांनी आणली. मे महिन्याच्या मध्यापर्यंत हजारो भारतीय तुकड्या त्या घुसखोरांना घालवून देण्याच्या उद्दिष्टाने पर्वतांवरच्या भीषण युद्धात गुंतल्या. भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन सफेद सागर’चा पुकारा केला. प्रत्येक पायलट त्यासाठी हजर होता. तोवर युद्ध सुरू असलेल्या भागात स्त्री पायलटला कधी पाठवण्यात आलं नसलं तरी वैद्यकीय स्तरावर जखमींना उचलून आणणं, रसद पुरवठा आणि इतर कामांसाठी त्यांना तैनात केलं जाई.

सक्सेनासाठी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची हीच वेळ होती. द्रास आणि बटालिक प्रांतात लष्करी उतारू घेऊन जाणं, सुरू असलेल्या युद्धातून जखमींना उचलून आणणं, ही कामं ती करत होतीच. शत्रूच्या स्थानाबद्दल आपल्या वरिष्ठांना ती अतिशय तंतोतंत माहितीही देत होती. तिच्या एका उड्डाणादरम्यान पाकिस्तानी रॉकेट मिसाइलपासून ती अगदी काही इंचांनी वाचली होती. या सर्वांतून निडरपणे आपलं कर्तव्य पार पाडत सक्सेनाने ‘द कारगिल गर्ल’ ही उपाधी प्राप्त केली.

तिची ही प्रेरणादायक कथा तिच्याच शब्दांत…

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #272 ☆ चुनौतियाँ व प्रतिकूल परिस्थितियाँ… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख चुनौतियाँ व प्रतिकूल परिस्थितियाँ। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 272 ☆

चुनौतियाँ व प्रतिकूल परिस्थितियाँ… ☆

‘चुनौतियाँ व प्रतिकूल परिस्थितियाँ हमें आत्म-साक्षात्कार कराने आती हैं कि हम कहाँ हैं? तूफ़ान हमारी कमज़ोरियों पर प्रहार करते हैं। फलत: हमें अपनी असल शक्ति का आभास होता है’ उपरोक्त पंक्तियाँ रोय टी बेनेट की प्रेरक पुस्तक ‘दी लाइट इन दी हार्ट’ से उद्धृत है। जीवन में चुनौतियाँ हमें अपनी सुप्त शक्तियों से अवगत कराती हैं कि हम में कितना साहस व उत्साह संचित है? हम उस स्थिति में प्रतिकूल परिस्थितियों का सामना करने में कितने सक्षम हैं? जब हमारी कश्ती तूफ़ान में फंस जाती व हिचकोले खाती है; वह हमें भंवर से मुक्ति पाने की राह भी दर्शाती है। वास्तव में भीषण आपदाओं के समय हम वे सब कर गुज़रते हैं, जिसकी हमने कल्पना भी नहीं की होती।

सो! चुनौतियाँ, प्रतिकूल परिस्थितियाँ, तूफ़ान व सुनामी की विपरीत व गगनचुंबी लहरें हमें अपनी अंतर्निहित शक्तियों प्रबल इच्छा-शक्ति, दृढ़-संकल्प व आत्मविश्वास का एहसास दिलाती हैं; जो सहसा प्रकट होकर हमें उस परिस्थिति व मन:स्थिति से मुक्त कराने में रामबाण सिद्ध होती हैं। परिणामतः हमारी डूबती नैया साहिल तक पहुंच जाती है। इस प्रकार चिंता नहीं, सतर्कता इसका समाधान है। नकारात्मक सोच हमारे मन में भय व शंका का भाव उत्पन्न करती है, जो तनाव व अवसाद की जनक है। यह हमें हतोत्साहित कर नाउम्मीद करती है, जिससे हमारी सकारात्मक ऊर्जा नष्ट हो जाती है और हम अपनी मंज़िल पर नहीं पहुंच सकते।

दक्षिण अफ्रीका के पूर्व राष्ट्रपति नेल्सन मंडेला के अनुसार ‘हिम्मतवाला वह नहीं होता, जिसे डर नहीं लगता, बल्कि वह है; जिसने डर को जीत लिया है। सो! भय, डर व शंकाओं से मुक्त प्राणी ही वास्तव में वीर है; साहसी है, क्योंकि वह भय पर विजय प्राप्त कर लेता है।’ इस संदर्भ में सोहनलाल द्विवेदी जी की यह पंक्तियां सटीक भासती हैं ‘लहरों से डर कर नौका पार नहीं होती/ कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।’ यदि मानव अपनी नौका को सागर के गहरे जल में नहीं उतारेगा तो वह साहिल तक कैसे पहुंच पायेगा? मुझे स्मरण हो रही हैं वैज्ञानिक मेरी क्यूरी की वे पंक्तियां ‘जीवन देखने के लिए नहीं; समझने के लिए है। सकारात्मक संकल्प से ही हम मुश्किलों से बाहर निकल सकते हैं’– अद्भुत् व प्रेरक है कि हमें प्रतिकूल परिस्थितियों व चुनौतियों से डरने की आवश्यकता नहीं है; उन्हें समझने की दरक़ार है। यदि हम उन्हें समझ लेंगे तथा उनका विश्लेषण करेंगे तो हम उन आपदाओं पर विजय अवश्य प्राप्त कर लेंगे। सकारात्मक सोच व दृढ़-संकल्प से हम पथ-विचलित नहीं हो सकते और मुश्किलों से आसानी से बाहर निकल सकते हैं। यदि हम उन्हें समझ कर, सूझबूझ से उनका सांगोपांग विश्लेशण करेंगे; हम उन भीषण आपदाओं पर विजय प्राप्त कर सकेंगे।

यदि हमारे अंतर्मन में सकारात्मकता व दृढ़-संकल्प निहित है तो हम विषम परिस्थितियों में भी विचलित नहीं हो सकते। इसके लिए आवश्यकता है सुसंस्कारों की, घर-परिवार की, स्वस्थ रिश्तों की, स्नेह-सौहार्द की, समन्वय व सामंजस्य की और यही जीवन का मूलाधार है। समाजसेवी नवीन गुलिया के मतानुसार ‘सागर की हवाएं एवं संसार का कालचक्र हमारी इच्छानुसार नहीं चलते, किंतु अपने समुद्री जहाज रूपी जीवन के पलों का बहती हवा के अनुसार उचित उपयोग करके हम जीवन में सदैव अपनी इच्छित दिशा की ओर बढ़ सकते हैं।’ नियति का लिखा अटल होता है; उसे कोई नहीं टाल सकता और हवाओं के रुख को बदलना भी असंभव है। परंतु हम बहती हवा के झोंकों के अनुसार कार्य करके अपना मनचाहा प्राप्त कर सकते हैं। सो! हमें पारस्परिक फ़ासलों व मन-मुटाव को बढ़ने नहीं देना चाहिए। परिवार व दोस्त हमारे मार्गदर्शक ही नहीं; सहायक व प्रेरक के दायित्व का वहन करते हैं। परिवार वटवृक्ष है। यदि परिवार साथ है तो हम विषम परिस्थितियों का सामना कर सकते हैं। इसलिए उसका मज़बूत होना आवश्यक है। समाजशास्त्री कुमार सुरेश के अनुसार ‘परिवार हमारे मनोबल को बढ़ाता है; हर संकट का सामना करने की शक्ति प्रदान करता है; हमारे विश्वास व सामर्थ्य को कभी डिगने नहीं देता।’ जीवन शैली विशेषज्ञ रचना खन्ना सिंह कहती हैं कि ‘परिवार को मज़बूत बनाने के लिए हमें पारस्परिक मतभेदों को भूलना होगा; सकारात्मक चीज़ों पर फोक़स करना होगा तथा नकारात्मक बातों से दूर रहने का प्रयास करना होगा। यदि हम संबंधों को महत्व देंगे तो हमारा हर पल ख़ुशनुमा होगा। यदि बाहर युद्ध का वातावरण है, तनाव है और उन परिस्थितियों में नाव डूब रही है, तो सभी को परिवार की जीवन-रक्षक जैकेट पहनकर एक साथ बाहर निकालना होगा।’ पद्मश्री निवेदिता सिंह के विचार इस तथ्य पर प्रकाश डालते हैं कि संकल्प के साथ प्रार्थना करें ताकि वातावरण में सकारात्मक तरंगें आती रहें, क्योंकि इससे माहौल में नकारात्मकता के स्थान पर सकारात्मक ऊर्जा प्रवेश पाती है और सभी दु:खों का स्वत: निवारण हो जाता है।

जीवन में यदि हम आसन्न तूफ़ानों के लिए पहले से सचेत रहते हैं; तो हम शांत, सुखी व सुरक्षित जीवन जी पाते हैं। स्वामी विवेकानंद जी के शब्दों में ‘यदि तुम ख़ुद को कमज़ोर समझते हो तो कमज़ोर हो जाओगे। यदि ख़ुद को ताकतवर सोचते हो, ताकतवर हो जाओगे।’ सो हमारी सोच ही हमारे भाग्य को निधारित करती है। परंतु इसके लिए हमें वक्त की कीमत को पहचानना आवश्यक है। योगवशिष्ठ के अनुसार ‘संसार की कोई ऐसी वस्तु नहीं है, जिसे सत्कर्म एवं शुद्ध पुरुषार्थ द्वारा प्राप्त नहीं किया जा सकता।’

हमारा मस्तिष्क बचपन से ही चुनौतियों को समस्याएं मानना प्रारंभ करने लग जाता है और बड़े होने तक वे अवचेतन मन में इस प्रकार घर कर जाती हैं कि हम यह विचार ही नहीं कर पाते कि ‘यदि समस्याओं का अस्तित्व न होगा तो हमारी प्रगति कैसे संभव होगी? उस स्थिति में आय के स्रोत भी नहीं बढ़ेंगे।’ परंतु समस्या के साथ उसके समाधान भी जन्म ले चुके होते हैं। यदि सतही तौर पर सूझबूझ से समस्याओं से उलझा जाए; उन्हें सुलझाने से न केवल आनंद प्राप्त होगा, बल्कि गहन अनुभव भी प्राप्त होगा। नैपोलियन बोनापार्ट के शब्दों में ‘समस्याएं भय व डर से उत्पन्न होती हैं। यदि डर का स्थान विश्वास ले ले; तो वही समस्याएं अवसर बन जाती हैं। वे स्वयं समस्याओं का सामना विश्वास के साथ करते थे और उन्हें अवसर में बदल डालते थे। यदि कोई उनके सम्मुख समस्या का ज़िक्र करता था तो वे उसे बधाई देते हुए कहते थे कि आपके पास समस्या है; तो बड़ा अवसर आ पहुंचा है। अब इस अवसर को हाथों-हाथ लो और समस्या की कालिमा में सुनहरी लीक खींच दो।’ समस्या का हल हो जाने के पश्चात् व्यक्ति को मानसिक शांति, अर्थ व उपहार की प्राप्ति होती है और समस्या से भय समाप्त हो जाता है। वास्तव में ऐसा उपहार अर्थ व अवसर हैं, जो मानव की उन्नति में सहायक सिद्ध होते हैं।

चुनौतियाँ व प्रतिकूल परिस्थितियाँ हमें कमज़ोर बनाने नहीं; हमारा मनोबल बढ़ाने व सुप्त शक्तियों को जाग्रत करने को आती हैं। सो! उनका सहर्ष स्वागत-सत्कार करो; उनसे डर कर घबराओ नहीं, बल्कि उन्हें अवसर में बदल डालो और  डटकर सामना करो। इस संदर्भ में मदन मोहन मालवीय जी का यह कथन द्रष्टव्य है–’जब तक असफलता बिल्कुल छाती पर सवार न हो बैठे; दम न घोंट डाले; असफलता को स्वीकार मत करो।’ अरस्तु के शब्दों में ‘श्रेष्ठ व्यक्ति वही बन सकता है, जो दु:ख और चुनौतियों को ईश्वर की आज्ञा स्वीकार कर आगे बढ़ता है।’ जॉर्ज बर्नार्ड शॉ का मत भी कुछ इसी प्रकार का है कि ‘यदि आप इस प्रतीक्षा में रहे कि लोग आकर आपकी मदद करेंगे, तो सदैव प्रतीक्षा करते रह जाओगे।’ भगवद्गीता में ‘कोई भी दु:ख संसार में इतना बड़ा नहीं है, जिसका कोई उपाय नहीं है।’  यदि मनुष्य जल्दी से पराजय स्वीकार न करके अपनी ओर से प्रयत्न करे, तो वह दु:खों पर आसानी से विजय प्राप्त कर सकता है। जब मन कमज़ोर होता है, परिस्थितियाँ समस्याएं बन जाती हैं; जब मन स्थिर होता है, चुनौती बन जाती हैं और जब मन मज़बूत होता है; वे अवसर बन जाती हैं। ‘हालात सिखाते हैं बातें सुनना/ वरना हर शख़्स फ़ितरत से/ बादशाह होता है।’ इन्हीं शब्दों के साथ अपनी लेखनी को विराम देती हूं।

●●●●

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ पुरस्कृत लघुकथा – पाप… ☆ श्री हरभगवान चावला ☆

श्री हरभगवान चावला

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री हरभगवान चावला जी की अब तक पांच कविता संग्रह प्रकाशित। कई स्तरीय पत्र पत्रिकाओं  में रचनाएँ प्रकाशित। कथादेश द्वारा  लघुकथा एवं कहानी के लिए पुरस्कृत । हरियाणा साहित्य अकादमी द्वारा श्रेष्ठ कृति सम्मान। प्राचार्य पद से सेवानिवृत्ति के पश्चात स्वतंत्र लेखन।) 

आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा – पाप)

☆ पुरस्कृत लघुकथा – पाप… ☆ श्री हरभगवान चावला ☆

(कथादेश अखिल भारतीय लघुकथा प्रतियोगिता-2024 में प्रथम पुरस्कार प्राप्त लघुकथा)

कन्या पैदा हुई। घर के सब लोग एकदम ख़ामोश थे। कन्या के गले में तम्बाकू रख दिया गया, कन्या हिचकी भी नहीं ले पाई। दो मर्दों ने, जिनमें से एक कन्या का पिता था, गड्ढा खोदा और निरासक्त भाव से उसे धरती के अँधेरे में पहुँचा दिया। दफ़न के वक्त कन्या के पिता ने कन्या से कहा, “जा, जहाँ से आई थी, आगे अब भैया को भेजना।”

कन्या का पिता कन्या को दफ़न करने और पुजारी जी को सीधा पहुँचाने के बाद कन्या की माँ के पास आ बैठा। वह रो रही थी। कन्या के पिता ने कहा, “रोती क्यों हो? वंश तो बेटे से ही चलेगा न!”

“हमारा अंश थी वह! दुनिया मे आई और आँख खोलने से पहले चली भी गई। भारी पाप लगेगा हमें।”

“पाप क्यों लगेगा, हमने कौन सी गऊ हत्या की है?

©  हरभगवान चावला

सम्पर्क – 406, सेक्टर-20, हुडा,  सिरसा- 125055 (हरियाणा) फोन : 9354545440

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares