श्री उद्धव भयवाळ

☆ विविधा ☆ जन्मकुंडली आणि विवाहयोग ☆ श्री उद्धव भयवाळ ☆
ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक या नात्याने “जन्मकुंडली आणि विवाहयोग” यासंबंधीची माहिती मी खाली देत आहे.
कोणत्याही युवा व्यक्तीच्या जीवनात विवाहसंस्कार हा सर्व संस्कारात श्रेष्ठ आणि आवश्यक असतो. वैवाहिक जीवनाची सफलता पतीपत्नीच्या एकमेकांवरील विश्वासावर आणि वचनबद्धतेवर अवलंबून असते. प्रत्येकाला आपले वैवाहिक जीवन सुखी, समाधानी, समृद्ध आणि सफल असावेसे वाटते आणि त्यात गैर काहीच नाही. भावी जोडीदारासोबत आपले वैवाहिक जीवन कसे असेल याची प्रत्येकाने विवाहापूर्वीच दोघांच्या कुंडलीद्वारे माहिती करून घेतली तर वैवाहिक जीवन नक्कीच सफल होईल. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातसुद्धा ज्योतिषशास्त्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याद्वारे व्यक्तीच्या सुखद, सुसंस्कृत आणि सफल वैवाहिक जीवनाच्या शक्यतांचे आकलन होते. जेणेकरून भावी जीवनाविषयीचा अंदाज बांधता येतो.
खरे तर ज्योतिषीय दृष्टीकोनाचा अंगीकार करूनच आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम, सौहार्द, संस्कार आणि संवेदनशीलता निर्माण होण्याची आशा आपण करू शकतो.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनास प्रभावित करणाऱ्या ग्रहांची दिशा आणि दशा यावरूनच विवाहयोग जुळून येतील किंवा नाही हे समजू शकते. जन्म तिथि, जन्म वेळ आणि जन्म स्थान यावर आधारित कुंडलीचे गुणमेलन करूनच वैवाहिक जीवनातील सफलतेविषयी माहिती मिळते.
पुष्कळदा असे पहावयास मिळते की, एखादी मुलगी सर्वगुणसंपन्न असूनसुद्धा तिचा विवाह जमण्यात खूप अडथळे येतात किंवा विवाहास विलंब होतो किंवा अनुरूप जीवनसाथी मिळत नाही. काही लोक तर असे पहावयास मिळतात की त्यांच्या करिअरमध्ये ते खूप यशस्वी असले तरी वैवाहिक जीवनात मात्र असफल होतात किंवा त्याच्या जीवनात लवकरच वैवाहिक संबंध तोडण्याची वेळ येते. पुष्कळदा करीअरच्या बाबतीत यशोशिखरावर पोचलेल्या लोकांनासुद्धा अविवाहित राहण्याची पाळी येते. अशा वेळी वैदिक ज्योतिषानुसार बनलेल्या कुंडलीतील सकारात्मक प्रभाव असणाऱ्या ग्रहांची गतिशीलता ओळखून नकारात्मक प्रभाव असणाऱ्या ग्रहांचा दोष दूर करणे भाग पडते.
ज्योतिष शास्त्रानुसार उत्तमविवाहयोगासाठी कुंडलीच्या दुसऱ्या, पाचव्या, सातव्या, आठव्या आणि बाराव्या घरातील ग्रहांच्या स्थितीवर ध्यान द्यावे लागते. यामध्ये विशेषत: मंगळ, शनी, सूर्य, राहू आणि केतु या ग्रहांच्या स्थितीचा अभ्यास करावा लागतो. या आधारावरच विवाहासाठीची योग्य वेळ ठरवणे सोपे जाते. कारण विवाहाचे योग तर पंचांगात अनेकदा दिसतात. पण प्रत्यक्ष विवाह केव्हा होईल हे पाहणे महत्त्वाचे असते. पुरुषासाठी विवाहाचा कारक ग्रह शुक्र आहे तर स्त्रीसाठी गुरू हा कारक ग्रह आहे. हे कारक ग्रहच दुसऱ्या ग्रहांच्या प्रभावाखाली येऊन विवाहासाठी अनुकूल किंवा प्रतिकूल स्थिती निर्माण करतात.
स्त्रीच्या कुंडलीतील आठवे स्थान तिच्या भाग्याचे निदर्शक आहे तर स्त्री आणि पुरुष या दोघांच्या कुंडलीतील बारावे स्थान सुखद वैवाहिक जीवनाचे अर्थात यौनसंबंधाचे निदर्शक आहे. यानुसारच पतीपत्नीच्या मनात एकमेकांविषयीचे आकर्षण निर्माण करणारी भावना जागृत होते.
कुणीही व्यक्ती स्वत:च्या कुंडलीतील सातव्या स्थानावरील ग्रहस्थिती पाहून आपला आयुष्याचा जोडीदार कसा असेल आणि आपले वैवाहिक जीवन कसे राहिल याचा अंदाज घेऊ शकते. सातव्या स्थानाचा कारक ग्रह शुक्र आहे. पण या स्थानात शनि बलवान असेल आणि गुरू कमजोर असेल तर उत्तम विवाहयोगसुद्धा प्रभावित होऊन अनिष्ट फळे मिळू शकतात. सातव्या स्थानात रवी असल्यास घटस्फोटाची स्थिती निर्माण होऊ शकते. जर सातव्या स्थानात मंगळ असेल तर मांगलिक योग बनतो. मंगळाची कुंडली किंवा मांगलिक योग म्हणजे काय तर कुंडलीमधील प्रथम स्थानी, चतुर्थ स्थानी, सप्तम स्थानी, अष्टम स्थानी किंवा द्वादश स्थानी म्हणजेच बाराव्या घरात मंगळ असल्यास तो मंगळ सदोष असतो आणि ती मंगळाची कुंडली समजली जाते. या स्थानातील मंगळामुळे विवाहास विलंब होणे, वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत कलह किंवा घटस्फोट होण्याइतकी स्थिती बिघडणे असे प्रकार घडू शकतात. ज्या व्यक्तीची कुंडली मंगळाची आहे, त्या व्यक्तीचा विवाह साधारणपणे वयाच्या २७, २९, ३१, ३३, ३५ किंवा ३७ व्या वर्षी होण्याची शक्यता असते.
पण कुंडलीत प्रथमदर्शनी सदोष दिसणारा मंगळ विशिष्ट ग्रहस्थितीमध्ये निर्बली होतो आणि ती कुंडली मंगळाची गणली जात नाही. हेसुद्धा लक्षपूर्वक पाहणे जरुरीचे ठरते. मंगळाची कुंडली असलेल्या व्यक्तीस मांगलिक योग असलेलाच जोडीदार पाहिजे असे मात्र नाही. जोडीदाराच्या कुंडलीत सदोष मंगळ नसला तरी विशिष्ट ग्रहस्थिती असेल तर ती कुंडली मंगळाच्या कुंडलीशी जमते. याव्यतिरिक्त सातव्या स्थानावर बुध निर्बली होऊन जातो. पती आणि पत्नी या दोघांच्या कुंडलीत सातव्या स्थानी जर राहू किंवा केतू असेल तर विवाहानंतर वर्षभरातच घटस्फोटासारखी स्थिती उत्पन्न होते. सातव्या स्थानातील राहूच्या उपस्थितीमुळे जीवनसाथीपासून विभक्त होण्याची इच्छा किंवा विरक्तीचे भाव निर्माण होतात आणि दोघांमधील दुरावा वाढत जातो. त्याचप्रमाणे तिथे केतू असल्यास पतीपत्नी आयुष्यभर अलग अलग राहण्यासाठी विवश होतात. अशा स्थितीमध्ये दोघांमधील वैचारिक मतभेदही खूप वाढत जातात. वास्तविक काही धार्मिक विधी करून अनिष्ट ग्रहांची तीव्रता कमी करण्यासाठी उपाय योजता येतात हेही तेवढेच खरे.
कुंडलीमध्ये सातव्या स्थानाचा स्वामी जर सातव्या स्थानातच असेल तर अशी व्यक्ती सफल वैवाहिक जीवन व्यतीत करते. त्या व्यक्तीच्या उन्नतीमध्ये कुठलीही बाधा येत नाही. तसेच पतीपत्नीचे संबंध अगदी मधुर बनलेले असतात. याचप्रकारे कुंडलीतील सातव्या घरात जर शुक्र असेल तर अशा व्यक्तीच्या विवाहाचा योग लवकर येतो.
विवाहास विलंब होण्याचे मुख्य कारण म्हणजे कुंडलीत मंगळ षष्ठस्थानी असणे. विवाहासाठी गुणमेलन करण्याआधी स्त्रीच्या कुंडलीत गुरू आणि पुरुषाच्या कुंडलीत रवि यांची स्थिती पाहणे गरजेचे आहे. याशिवाय सुखी आणि समृद्ध वैवाहिक जीवनाचे विश्लेषण करण्यासाठी चतुर्थ स्थानाचे अध्ययन केले जाते. अर्थात विवाहाचा संपूर्ण निर्णय हा कुंडलीतील सातव्या स्थानाव्यतिरिक्त चौथ्या, पाचव्या आणि अकराव्या स्थानातील ग्रहांच्या स्थितीवर घेतला जातो.
© श्री उद्धव भयवाळ
१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९
मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈