कविराज विजय यशवंत सातपुते
(समाज , संस्कृति, साहित्य में ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले कविराज विजय यशवंत सातपुते जी की सोशल मीडिया की टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। आज प्रस्तुत है मोहरली लेखणी साहित्य समुह का विशेष वार्ता कार्यक्रम आठवांच्या हिंदोळ्यावर… काशिराम खरडे सोबत…। किसी भी विशिष्ट व्यक्ति से वार्ता एक कला है। श्री काशिराम खरडे जी वास्तव में इस कला में दक्ष हैं। हम इस विशेष वार्ता के लिए कविराज विजय यशवंत सातपुते जी, मोहरली लेखणी साहित्य समुह एवं श्री काशिराम खरडे जी के हृदय से आभारी हैं ।
☆ मोहरली लेखणी साहित्य समुह प्रस्तुति – आठवांच्या हिंदोळ्यावर… काशिराम खरडे सोबत… ☆
नमस्कार मोहरलीकर…
आज आपण _आठवांच्या हिंदोळ्यावर… काशिराम खरडे सोबत…_ या आपल्या साप्ताहिक उपक्रमाअंतर्गत एका अशा साहित्यिकांशी संवाद साधणार आहोत, जे मागिल तीन दशकांहून अधिक काळ साहित्यसेवा करत आहेत. राज्य शासनाच्या अनुदानातून ज्यांचा काव्य संग्रह रसिकांपर्यंत पोहोचला. शेतीमाती पासून चित्रपटांपर्यंत ज्यांच्या शब्दांनी रसिकमनाला भुरळ घातली. असे जेष्ठ साहित्यिक “कवीराज विजय सातपुते”…
चला तर मग… जाणून घेऊया विजयजींकडून त्यांच्या साहित्यिक प्रवासाबद्दल…
नमस्कार कवीराज
मोहरली लेखणी साहित्य समुहाच्या “आठवांच्या हिंदोळ्यावर.. काशिराम खरडे सोबत… आ उपक्रमात आपले स्वागत..
खरं तर एवढा मोठा साहित्य प्रवास, साहित्याची अस्सल जाण, साहित्यासोबतच पत्रकारीतेच्या क्षेत्रातही नावलौकिक मिळवत शब्दांची नैसर्गिकता जपणं… हे खूप कमी लोकांना जमतं. आपण ‘साहित्य’ या संकल्पनेकडे कसं बघता….
विजय सातपुते – नमस्कार, सर्व प्रथम आपल्याला. आणि समस्त मोहरली करांना.
कथा, कविता, लेख यांची निर्मिती करताना मांडलेले आशय, विषय जितके लोकाभिमुख तितके आपले साहित्य रसिकांना जास्त भावते त्या साठी वाचन, लेखन, चिंतन आणि मनन, यांचा व्यासंग खूप उपयोगी ठरतो असे मला वाटते. साहित्य हे माणूस जीवंत ठेवण्याचे प्रभावी माध्यम आहे असे मला वाटते.
काशिराम खरडे – व्वाह…!!
माणसाचं जिवंतपण साहित्यात दडलेलं आहे हा अतिशय उमदा विचार आपला… बहोत खूब…!
सर, आपण १९८८ पासून लिहिताय, असं आम्हाला कळलं. हा एवढा प्रदीर्घ साहित्यिक अनुभव गाठीशी बांधून साहित्याच्या प्रांगणात वावरत असतांना बऱ्याच आठवणींच्या गाठोड्यातील एखादी अशी आठवण सांगता येईल की ज्यामुळे आपण साहित्याशी जुळले गेलात…?
विजय सातपुते – खरं तर आज मागे वळून बघताना इतका साहित्य प्रवास आपला होईल हे त्या वेळी कुणी भाकीत केले असते तर ते खोटे ठरले असते पण दोन महत्वपूर्ण घटना घडल्या आणि मी साहित्याशी जोडला गेलो.
1992 मध्ये राज्य स्तरीय काव्य संमेलन आणि स्पर्धा चे सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. यावेळी राजा गोसावी, वसंत शिंदे, वसंत बापट आणि जीवन राव कीर्लोस्कर व्यासपीठावर होते. तेव्हा मी केलेले स्वागत गीत आणि मोरपीस कविता सर्वांना अतिशय आवडली. वसंत बापट यांनी सभागृहातून माझ्या वडिलांना व्यासपीठावर बोलावून घेतले. त्यांच्या हातून पुष्पहार अर्पण केला व पेढे दिले आणि त्याच वेळी मला कविराज पदवी बहाल केली. हा आनंद क्षण आणि जगदीश खेबुडकर यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन मला साहित्याचा नावकरी आणि गावकरी बनवून गेले.
ऐन वसंती, बहर संगती
वसंत बापट नाव गाजते
भावनेच्या शिशिरालाही
वसंत वैभव देऊन जाते
धन्य लेखणी नरोत्तमाची
स्वागत करतो तिचे
स्वागतम शुभ स्वागतम सुस्वागतम.
राजा राजा काय चीज ही
वाचून पाहून सांगा मजला
गोष्ट राजा गोसावींची
धन्य धन्य त्या अभिनयाची
स्वागत करतो अभिनयाचे
स्वागतम शुभ स्वागतम सुस्वागतम.
असे त्यातील ददोन कडवी होती.
काशिराम खरडे – खरंच किती भाग्यवान आहात आपण इतक्या उत्तुंग व्यक्तीमत्वांकडून कौतुकाची थाप मिळणं, ही खूप मोठी गोष्ट आहे.
आपल्या एकंदरीत साहित्य प्रवासाबद्दल सांगावं…
विजय सातपुते – साहित्यिक, नाट्य, संगीत, आणि तमाशा कलावंतांना जवळून पाहण्याची संधी या साहित्य प्रवासाने दिली. 1993 ते 2013 पर्यत डिफेन्स अकौंट मध्ये सर्व्हिस केली. अनेक कविता लिहिल्या. 2005 मध्ये पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. अक्षरलेणी या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान मिळाले. अनेक शासकीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले. अक्षरलेणीकार म्हणून ओळख मिळाली. प्रस्तावना कार, मानपत्र लेखन आणि वृत्त पत्र स्तंभलेखन यातून संपूर्ण महाराष्ट्रात मित्रपरीवार रसिक वर्ग निर्माण झाला.
2012 मध्ये अक्षरलेणी संग्रहाची द्वितीय आवृत्ती प्रकाशित झाली. या संग्रहास महाकवी कालिदास पुरस्कार प्राप्त झाला.
आजपर्यंत कवितेच्या प्रत्येक काव्य प्रकारात लेखन केले आहे. विविध काव्य प्रकारात प्रविण्य संपादन करून अनेक पुरस्कार कवितानी मिळवून दिले आहेत. गझल, हायकू, चारोळी, छंदोबद्ध रचना, मुक्त छंद रचना, अभंग ,ओवी, अष्टाक्षरी आणि नवकाव्य प्रकारात आजवर विपुल लेखन केले आहे. कथा लेखन, ललित लेख लेखन दिवाळी अंकासाठी दरवर्षी केले जाते. बालसाहित्य देखील लिहिले आहे. अनेक शाळातून मुलांसाठी काव्य सादरीकरण केले आहे. आकाशवाणी पुणे केंद्रावरून माझ्या जास्तीत जास्त कथांचे अभिवाचन झाले आहे. अनेक काव्य लेखन स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे. अनेक कार्यक्रमांचे निवेदन केले आहे .या प्रवासात वीस हून अधिक संस्थेत विविध पदांवर कार्यरत आहे ही संधी साहित्य क्षेत्राने दिली.
काशिराम खरडे – आजवरच्या वाचनात सर्वात जास्त आडलेली साहित्याकृती….
विजय सातपुते – वाचनाचा वारसा आईकडून मिळाला. माझी आई 1967 सालची जगन्नाथ शंकर शेठ स्काॅलरशीप मिळालेली विदुषी आहे. माझ्या दुप्पट वाचन तिचे आहे. माझे वडील सरकारी कर्मचारी. पण वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी होम सर्व्हिस लायब्ररी भाग्यश्री वाचनालय सुरू केले. त्यामुळे विपुल वाचन केले आहे. छावा कादंबरी, कुसुमाग्रज यांचा विशाखा कविता संग्रह आणि शांता शेळके यांचा रेशीमरेघा कविता संग्रह या आवडत्या साहित्य कलाकृती आहेत. डिटेक्टिव्ह कथा देखील खूप वाचायला आवडतात.
काशिराम खरडे – आपण पुणेकर आहात. पुणे हि खरंतर आपली सांस्कृतिक राजधानी. पण वेगळ्या अर्थाने विचारायचे झाल्यास पुणेरी पाट्या, पुणेरी टोमणे, पुणेरी लहेजा या व अशा इतर तत्सम गोष्टींमधूनही साहित्य डोकावतच असतं. पुण्याला साहित्याचा वारसाही खूप मोठा आहे. पुणेरी साहित्याबद्दल काय सांगाल…?
विजय सातपुते – साहित्य जेव्हा लोकाभिमुख होते तेव्हा प्रांतनिहाय त्याचे वर्गीकरण लोकवैशिष्ट्ये पाहून केले जाते. यात मनोरंजन, प्रबोधन या बरोबरच स्वभाव प्रणित शब्द चित्र, व्यक्ती चित्रण देखील तुम्हाला लोकाभिमुख करतात. पुणेरी पाट्या, पुणेरी टोमणे याबरोबरीने अभिजात साहित्यिक पुण्याने दिले आहेत. वसंत बापट यांनी कित्येक संस्थाची घोषवाक्ये, जाहिराती स्लोगन लिहिलेली आहेत. घेतलेल्या अनुभवांच प्रगटीकरण करताना माणूस माणसाशी जोडला जावा हा लेखन उद्देश मनात ठेऊन आजवर चे लेखन आणि साहित्यिक वाटचाल झाली आहे. अजूनही सुरू आहे.
काशिराम खरडे – कवितेबद्दल काय सांगाल…?
विजय सातपुते – शब्दांचा प्रवास ह्रदयापासून ह्रदयापर्यत होताना होणारी कविता स्वतः जगते आणि आपल्यातल्या माणसाला जगवते . कवितेने मला आजवर जे काही दिले आहे त्यात रसिकांचा आशिर्वाद आणि दैनंदिन लेखन कला व्यासंग माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
जन्मणारी आपली प्रत्येक कलाकृती ही नवजात किंवा नवोदित असते ती रसिकांसमोर स्पर्धा, सादरीकरण या माध्यमातून आली पाहिजे. आपण आता ज्येष्ठ झालो अमुक स्पर्धेत सहभागी होऊ नये हे मला पटत नाही. हा पण पुरस्कार मिळाले की लेखन अधिक जबाबदारीने करावेसे वाटते त्यामुळे लेखन काळजीपूर्वक केले जाते. नाविन्य आणि विविधता लेखनात असावी त्या शिवाय लिखाण समृद्ध होत नाही असे माझे मत आहे. अनेक विषयांवर लेखन आत्ता पर्यंत वृत्त पत्रातून कैले आहे.
काशिराम खरडे – आणखी काय सांगाल…?
विजय सातपुते – निवेदन, वृत्त पत्र लेखन, काव्य लेखन, कथा, कादंबरी, आणि चित्रपट पटकथा लेखन असा साहित्य प्रवास झाला आहे. दक्ष या चित्रपटाची पटकथा व तीन गाणी लिहिली आहेत. मार्च 2020 मध्ये शुटिंग सुरू होईल. जय जवान, जय किसान या विषयावर सदर चित्रपट आहे.
प्रकाश पर्व हा कविता संग्रह जून 2019 मध्ये प्रकाशित झाला आहे. महाराष्ट्र भूषण अष्टपैलू व्यक्ती मत्व म्हणून पुरस्कार डॉ श्रीपाल. सबनीस यांच्या हस्ते आजवरच्या साहित्यिक वाटचालीकरता प्रदान करण्यात आला आहे.
निवेदन, वृत्त पत्र लेखन, काव्य लेखन, कथा, कादंबरी, आणि चित्रपट पटकथा लेखन असा साहित्य प्रवास झाला आहे. दक्ष या चित्रपटाची पटकथा व तीन गाणी लिहिली आहेत. मार्च 2020 मध्ये शुटिंग सुरू होईल. जय जवान, जय किसान या विषयावर सदर चित्रपट आहे.
धन्यवाद विजय सातपुते जी. मोहरली लेखणी साहित्य समुहाला वेळ आणि मुलाखत दिली. आपल्या आगामी साहित्य प्रवासाला अनेक शुभेच्छा
प्रस्तुति – मोहरली लेखणी साहित्य समुह – आठवांच्या हिंदोळ्यावर… काशिराम खरडे सोबत…
साभार – विजय यशवंत सातपुते, यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009., मोबाईल 9371319798.