श्री मयुरेश उमाकांत डंके
इंद्रधनुष्य
☆ || याजसाठी आम्ही करितो अट्टाहास || ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
साधारण दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका वर्षी आम्हीं श्री क्षेत्र महाबळेश्वर ते प्रतापगड असा दोन दिवसांचा ट्रेल अनुभूती मध्ये आखला होता. आता प्रतापगडावर अगदी दरवाजापर्यंत पक्का रस्ता झाला आहे. त्यामुळं, प्रतापगड हे किती दुर्गम आणि परीक्षा बघणारं ठिकाण आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. पण हे जावळी प्रकरण आजही तसं भीतीदायकच आहे. आपण जावळीत घुसलो की, कुठं ना कुठं तरी प्रसाद मिळतोच. अंग ठेचकाळतं, करवंदाच्या जाळ्या ओरबाडून काढतात, पायात बोट-बोटभर काटे घुसतात. एकूण काय तर, जावळी आहेच दुर्गम..
महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण असलं तरी ते कुणासाठी? पर्यटकांसाठी.. पायी भ्रमंती करणाऱ्या ट्रेकर्सना घामाच्या धारा लागणं स्वाभाविक आहे. आम्ही असे चढून वाट काढत काढत गडावर गेलो. देवळाच्या बाहेरच्या पायऱ्यांवर टेकलो आणि क्षणांत झोपेच्या आधीन झालो. सहसा प्रतापगडावर येणारे पर्यटक इतके थकले-भागलेले पाहण्याची गडकऱ्यांना सुद्धा सवय राहिलेली नाही. त्यामुळं, आमच्यापैकी एकाला जाग आली तेव्हा समोरुन एक पोरगं पळत पळत आलं अन् आमची जुजबी माहिती घेऊन पळून गेलं. आमच्यापैकी कुणाच्याच अंगात त्राण नव्हतं, हे कुणालाही अगदी सहज समजत होतं. काहीजण अजून झोपले होते, काहीजण उठून बसले होते. पाच मिनिटांत दोन मुलं पाण्याची कळशी घेऊन आली. सोबत पाण्याचे दोन चार पेले होते.
“घ्या पानी. च्या आनू का?” दोघांपैकी एक पोरगं बोललं.
“आरं, भज्याचं इचार की. पंधरा वीस लोकं हायेत. पाचशे रुपयाची भजी तर अशीच हानतील गपागप.. ” दुसरं पोरगं त्याच्या कानात सांगत होतं. मी त्यांच्या मागंच पडलो होतो. त्यामुळं मला सगळं ऐकू येत होतं. “आण चहा सगळ्यांसाठी. पण साखर कमी टाक. फार गोड करु नको. ” असं त्याला सांगितलं. दोघांनी भराभर माणसं मोजली अन् पळाले. थोड्या वेळानं चहा आला.
“भजी आनू का?”
“नको रे. आधी जरा गड फिरुन येतो. मग खाऊ भजी. ” मी म्हटलं.
“पन नक्की खानार नव्हं?” त्यानं खुंटा बळकट करण्यासाठी पुन्हा चाचपणी केली.
“हो रे बाबा. खाणार भजी. ” असं म्हणून आम्ही वर निघालो.
आमच्या गटात एक पाचवीत शिकणारा मुलगा होता. वयानं तो सगळ्यात लहान. पण चांगला काटक होता. दहाच्या दहा दिवस तो मला चिकटलेला असे. आम्ही बालेकिल्ला चढत होतो, दरवाजातून आत गेलो. प्रतापगडावर आता मोठं शॉपिंग मार्केट उभं आहे. भरपूर दुकानं आहेत. महाराजांच्या पुतळ्याकडे जाण्याच्या वाटेवर ती दुकानं लागतात. त्यापैकी एका दुकानात एक मुलगा आणि मुलगी थांबले होते. बहुधा खरेदी करत असावेत.
ऐन मे महिन्याचे दिवस. मुलीने फारच कमी कपडे घातले होते. (बहुधा जितके आखूड कपडे तितकं ऊन कमी लागत असावं) मी त्या जोडीकडं पाहिलं होतं आणि मी त्यांना पाहिलंय, ते ह्यानं पाहिलं होतं.
“ओ दादा, ह्यांना जरा गड दाखवा की. ” दुकानदारानं हाक मारुन सांगितलं. मी हातानंच खूण करुन ‘चला’ असं म्हटलं. ते दोघे आमच्यासोबत आले. मुलगा मुलीची पर्स सांभाळत चालत होता. मुलगी हातात कोल्ड्रिंक चा कॅन घेऊन आमच्यासोबत फिरत होती. आम्हीं तटावरून फिरत होतो. दूरवरून दिसणाऱ्या वेगवेगळ्या घाटवाटा दाखवत होतो.
हा सगळा मुलूख मुळातच माझ्या आवडीचा आहे. अन् विशेषतः कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मशाली अन् पलोत्यांच्या पिवळ्या तेजाळ प्रकाशात प्रतापगड जो विलक्षण देखणा दिसतो, त्याला तोड नाही.
आम्ही गड पाहिला आणि अन् पुन्हा बालेकिल्ल्याच्या दरवाजापाशी आलो. तोवर विविध ठिकाणी जोडीचे भरपूर फोटो काढून झाले होते. सोशल मीडियावर पोष्टूनही झाले होते. आमची मुलं हे सगळं बघत होती, पण मीच काही बोललो नाही म्हणून कुणीच काही बोललं नाही. त्यांचा निरोप घेताना मात्र या छोट्या मुलानं वार काढलाच.
“आपको अब तक पता चल गया होगा की, यह किला किसने बनाया और यहां क्या क्या हुआ है?” त्यानं थेट विचारलं.
“हां हां.. सब मालूम हो गया. आपके सर ने सब कुछ अच्छे से बताया. ” तो मुलगा म्हणाला.
“तो आपको यह भी समझ आया होगा की, यह किला हमारे लिए बहुत पवित्र जगह है. ”
“हां. मालूम हो गया. “
“आप मंदिर जाते हो, तब ऐसेही कपडे पहन कर जाते हो?”
“नहीं तो. ऐसे मंदिर कैसे जा सकते हैं?”
“तो यहां पर कैसे आये?”
“हम तो महाबळेश्वर आये थे, तब कॅब वाले ने बोला की यहां पर किला है, तो हम आ गये. ”
ज्या पद्धतीनं हा मुलगा त्या दोघांना तासत होता, ते बघून सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. दोन्हीं हातात पट्टे चढवलेला पट्टेकरी जसा पट्टे फिरवत असतो, तसा हा छोटा मावळा त्या दोघांची पिसं काढत होता. गडावरच्या आजूबाजूच्या आयाबाया आवाज ऐकून तिथं जमल्या होत्या.
हा बहाद्दर त्या दुकानदाराला ही म्हणाला, “तुम्ही गडावर येणाऱ्या लोकांना असे कपडे घालून अशा ठिकाणी यायचं नाही असं का सांगत नाही?” दुकानदार गप्प उभा.
“लेकिन यह मंदिर नहीं है, सिर्फ एक किला ही तो हैं” ती मुलगी म्हणाली.
“आपके लिए किला होगा, हमारे लिये मंदिर ही है. आगे से किसी भी किले पर जाओगे तो पुरे कपडे पहन कर जाईये” त्यानं जोरदार ठणकावलं.
सॉरी म्हणून दोघेही तिथून भराभर खाली उतरुन चालायला लागले. अन् इकडं आमच्या ह्या मावळ्याचं गडभर कौतुक. एका आजीबाईंनी सगळ्यांना ताक दिलं. दुकानदारानं त्याला महाराजांचं चित्र असलेला एक टीशर्ट अन् एक छोटीशी मूर्ती भेट म्हणून देऊ केली. ह्यानं माझ्याकडं पाहिलं. मी मान डोलावली. त्यानं मूर्ती घेतली पण शर्ट घेतला नाही.
“महाराजांचं चित्र असं शर्टवर छापणं योग्य आहे का? लोकं हेच शर्ट घालून तंबाखू खातात, इकडं तिकडं थुंकतात, गडावर कचरा करतात. असे शर्ट विकू नका. ” एखाद्या मोठ्या माणसासारखा तो बोलला. सणकन कानफटात बसावी तसे सगळे एक क्षणभर गप्प झाले.
“एवढा माल संपल्यावर पुन्हा नाही विकणार” दुकानदार म्हणाला. पोरांनी टाळ्या वाजवल्या.
संध्याकाळचे चार वाजून गेले होते. आम्हाला पुढं शिवथरघळीत मुक्कामाला पोचायचं होतं. मी सगळ्यांना चला चला म्हणत होतो.
पुन्हा खाली मंदिरापाशी आलो. वरची धुमश्चक्रीची बातमी खाली कळली होती. ती दोन लहान मुलं खाली आमची वाटच पाहत होती.
“दादा, भजी आनू ना?”
“आण आण” मी सांगितलं. दोघं टणाटण उड्या मारत पळाले.
जरा वेळात झकास कांद्याची अन् बटाट्याची गरमागरम भजी आली. सगळ्यांच्या पोटात भूक पेटलेली.. पाच मिनिटांत भज्यांचा फन्ना उडाला. मग पुन्हा एकदा भजी आली. नंतर चहा आला. खाऊन झाल्यावर मी पैसे विचारले. पोरं काही बोलेनात. वरुन त्यांच्या आजीनं ओरडून सांगितलं, “पैशे नाही घेनार. तुमच्या पोरांनी आज गड लई गाजवला. म्हनून आमची खुशी समजा. ”
मी नको नको म्हणत वर गेलो. आजींना पैसे घ्यायचा आग्रह केला. तेव्हां त्या म्हणाल्या, “माजी जिंदगी गेली ओ गडावर. आता लोकं कशे बी येत्यात. कशेबी कपडे घालत्यात. लाजच नसती. कोन कुनाला बोलनार ओ? आज तुमचं ते पोरगं बोललं. मला बरं वाटलं. माज्या नातवाचीच उमर असंल त्येची. म्हनून माज्यातर्फे भेट समजा. पन पैशे घेनार नाय. ”
असली माणसं भेटली की, अंगावर काटा फुलतो. त्यांची वाक्यं काळजावर कोरली जातात. ज्या व्यक्तीला शंभर माणसं सुद्धा ओळखत नाहीत, त्या अतिशय सामान्य माणसाच्या भावना कशा असतात, हे अशा प्रसंगांमधून दिसतं. त्यांच्या माणूस म्हणून जगण्याच्या कल्पना आजघडीला मूक असल्या तरी तितक्याच ठाम आहेत. त्या भावना जपण्यासारखं वातावरण आता या जुन्या गडकऱ्यांना दिसतच नाही. आता खिशात पैशांचा खुर्दा खुळखुळणारी माणसंच जास्त दिसतात. त्यांना खुणावणारी जीवनशैलीच निराळी असते. म्हणून, असा एखादा अपवाद दिसला की, या जुन्या माणसांच्या बुजलेल्या झऱ्यांना पुन्हा पाझर फुटतात.
“अनुभूती” मधून मुलांना नेमकं काय मिळतं, याचं उत्तर हे असं आहे. प्यायला पाणी घेताना सुद्धा मागून घेतील, ते पाणी जितकं हवं आहे तितकंच घेतील, पानात एक घाससुद्धा अन्न वाया घालवणार नाहीत, विनाकारण वीज वाया घालवणार नाहीत. कारण त्यांना या गोष्टींची खरी किंमत कळलेली असते. जेव्हा आपल्या पूर्वजांनी अभिमानानं जपलेल्या गोष्टींची टिंगल उडवण्याचा उद्योग उडाणटप्पू लोकं करतात, तेव्हा त्यांचे कान उपटण्याचं कामसुद्धा ही मुलं अगदी व्यवस्थित करतात. कारण एकच आहे – योग्य काय आणि अयोग्य काय, याची नेमकी जाणीव होणं.
यश, सत्ता, संपत्ती या फार वेगळ्या गोष्टी आहेत. पण सगळ्यात आधी महत्त्वाची आहे ती आपल्या मुलांची योग्य जडणघडण. त्यातला खारीचा वाटा निभावण्याचा प्रयत्न आम्ही अनुभूती च्या माध्यमातून करतो. मशागत व्यवस्थित केली की, त्याची फळं उत्तमच मिळतात. तसंच अनुभूतीचं आहे. स्वामी विवेकानंदांनी समाजाकडे मागितलेले शंभर युवक तयार करण्यासाठी जे जे शक्य होईल ते ते आम्हीं करतो आहोत..
यंदा ७ मे, २०२५ रोजी “अनुभूती” चा शुभेच्छा समारंभ आहे, आणि ८ मे, २०२५ रोजी रात्री ब्राह्म मुहूर्तावर यंदाच्या मोहिमेचा नारळ वाढणार आहे… ! तुम्हां सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हवेतच.. !
|| भारत माता की जय ||
(अनुभूती २०२५ – ८ मे, २०२५ ते १९ मे, २०२५ – (संपर्क – 9135329675)
(यंदा अनुभूतीला वीस-बावीस मुलं-मुली घेऊन जातोय. गडोगडीच्या डोंगरदऱ्या, वाड्या, वस्त्या, मेटी सगळं दाखवायला.. माणसांचा परिचय करून द्यायला आणि खरंखुरं आयुष्य जगायला शिकवायला..
पुढच्या पिढीत माणूसपण रूजलं पाहिजे, आस्था-आपुलकी अंकुरली पाहिजे, त्यांची संवेदनशील मनं बहरली पाहिजेत, यासाठी गेली १९ वर्षं हा खटाटोप मांडतो आहे. आम्ही केवळ निमित्तमात्र, पण सह्याद्रीसारखा इतिहासपुरूष या सगळ्यांना नक्की बाळकडू पाजेल, याची आम्हाला खात्री आहे. – – –मयुरेश डंके.)
© श्री मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
8905199711, 87697 33771
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈