1

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लाईफ मॅनेजमेंट ☆ संग्राहक – सुश्री मानवी केळकर/श्री माधव केळकर

🌈इंद्रधनुष्य🌈 

☆ लाईफ मॅनेजमेंट ☆ संग्राहक – सुश्री मानवी केळकर/श्री माधव केळकर ☆ 

लाइफ मॅनेजमेंट 🎯

प्रोफेसरने भांड्यात पाणी टाकून त्यामध्ये बेडूक टाकला, यानंतर ते भांडे तापायला ठेवले, पाणी गरम झाल्यानंतर बेडकाचे काय झाले, प्रोफेसरने असे कां केले ???——–

एका कॉलेजमध्ये “फिलॉसफीचे” एक प्रोफेसर शिकवायचे…ते वेगवेगळ्या पध्दतींनी विद्यार्थ्यांना आयुष्यातील लहान-लहान गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करायचे…

एक दिवस प्रोफेसरने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बोलावले आणि म्हणाले की, आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वपूर्ण गोष्ट समजावणार आहे.

सर्व विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत व बघत होते.

प्रोफेसरने पाण्याने भरलेले एक भांडे घेतले आणि त्यामध्ये बेडूक टाकला. पाण्यात जाताच बेडूक आरामात पोहू लागला. यानंतर प्रोफेसरने ते भांडे तापायला ठेवले.

भांड्यातील पाणी हळुहळू गरम होत होते. भांड्यामध्ये जो बेडूक होता तो पाण्याच्या वाढत्या तापमानानुसार स्वतःला अॅडजस्ट करत होता. हळुहळू पाणी जास्त गरम होत होतं, पण बेडकाला काहीच फरक पडत नव्हता. तो स्वतःला तापमानानुसार तयार करत होता.

काही वेळानंतर पाण्याचे तापमान खूप वाढले आणि पाणी उकळू लागले. तेव्हा बेडकाचीहि सहनशक्ती संपली. त्याला त्या भांड्यात थांबणे कठीण झाले. तेव्हा बेडकाने उडी मारुन भांड्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला.

बेडकाने पूर्ण शक्ती लावूनहि त्याला त्या भांड्यातून बाहेर पडता आले नाही. प्रोफेसरने तात्काळ त्या बेडकाला बाहेर काढले. प्रोफेसरने विद्यार्थ्यांना विचारले की, बेडूक भांड्याबाहेर उडी कां मारु शकला नाही ???

सर्वांनी वेगवेगळी उत्तरे दिली.

तेव्हा प्रोफेसर म्हणाले – बेडूकाची इच्छा असती तर तो पाणी तापायला ठेवल्याबरोर बाहेर येऊ शकत होता. पण बेडूक स्वतःला वातावरणानुसार ऍडजेस्ट करण्याचा प्रयत्न करत होता. जेवढे तो सहन करु शकत होता, तेवढे त्याने केले.

पण जेव्हा त्याला वाटले की, जीव वाचवण्यासाठी बाहेर पडावेच लागेल, तेव्हा तो उडी मारु शकला नाही, कारण अॅडजस्ट होण्याच्या प्रयत्नात त्याची सर्व एनर्जी नष्ट झाली होती. जर मी त्याला बाहेर काढले नसते, तर बेडूक मरुन गेला असता.

लाइफ मॅनेजमेंट 🎯

प्रोफेसरने आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवले – 

सर्व लोकांसोबत असेच होते. आपण नेहमी आपल्या परिस्थितीशी जुळवून घेतो. पण त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. पण जेव्हा आपण पूर्णपणे परिस्थितीमध्ये अडकतो तेव्हा आपल्याला वाटते की, मी योग्य वेळी बाहेर पडायला पाहिजे होते. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते.

 बोध—— योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला म्हणजेच जीवन जगण्याची कला होय.

संग्राहक – सुश्री मानवी केळकर/श्री माधव केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆  स्टोव्ह ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर

🌈इंद्रधनुष्य🌈 

☆ स्टोव्ह  ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆ 

स्टोव्ह मध्ये राॅकेल भरायला नरसाळे, पत्र्याची नळी असलेला पंप,पुढे काही वर्षांनी प्लॅस्टिकचा फुग्याचा व काॅक असलेला पंप आल्यावरचा आनंद विसरणे शक्य आहे का ? 

जमिनीवर थोडेफार सांडलेल्या राॅकेलचा वास अजूनही चांगला आठवतो आहे.

स्वयंपाक करताना अन्नाला राॅकेलचा वास येऊ नये म्हणून घेतलेली काळजी.

आईचे आपल्या कुटुंबावर किती प्रेम आहे, हे आता जाणवते.

स्टोव्ह पेटवण्यासाठी काकडा व तो बुडवण्यासाठी बिटको काला दंत मंजन च्या छोट्या रिकाम्या झालेल्या काचेच्या बाटलीत राॅकेल भरून ठेवायचे. 

काडेपेटी व ती ठेवण्यासाठी हिंगाची रिकामी झालेली पत्र्याची डबी असा सगळा थाट असायचा. 

पीन करणे एक कौशल्याचे काम होते. हात अगदी सरळ धरून. पीन वाकडी होणार नाही याची काळजी घ्यावी लागत असे जर पीन निपलमधे तुटली तर सगळाच खोळंबा व्हायचा. त्याकरीता निप्पल पाना, सायकलची तार, कातडी वायसर इत्यादी हत्यारे घरीच ठेवलेली असायची. 

स्टोव्हची टाकी गळत असेल तर तिथे लावण्यासाठी  501 नं.चा साबण बार. 

स्टोव्ह बिघडल्यावर घरातली होणारी चिडचिड तर विचारूच नका आणि दुरूस्त करून आणल्यावर आईची प्रसन्न मुद्रा, ओसंडून वाहणारा आनंद पाहिला की घरातली माणसे अगदी खूष व्हायची. 

स्वयंपाक झाल्यावर आईने सोडलेला सुस्कारा जितका मनाला शांत करतो ना अगदी तसाच शांतपणा स्टोव्हची चावी सोडल्यावर येणारा स्सूsssssss आवाजही खूप मनाला प्रसन्न करणारा होता.

मित्रांनो कोणाकोणाच्या आठवणी जाग्या झाल्या?

 

संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ऋणानुबंध ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ ऋणानुबंध ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

गेल्या आठवड्यात एका आजींच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहोळ्याला गेले होते. या आजींना दोन मुलगे, पैकी एक डॉक्टर (अस्थीरोगतज्ञ) आणि दुसरा चार्टर्ड अॅकाउंटंट. दोन्ही मुलगे सुना व उच्चशिक्षित नातवंडे या सर्वांनी मिळून एका पंचतारांकित हॉटेल  मधे थाटात सोहळा आयोजित केला होता. आजींच्या दोन्ही मुलांनी अगदी थोडक्यात जी आजींची जीवनकहाणी आम्हा उपस्थितीतां समोर मांडली, आणि त्यातून ऋणानुबंध कसे असतात, ते ऐकून आमच्या अनेकांच्या डोळ्यांमधून पाणी वाहिले.

आजींचे हे दोन्ही मुलगे जुळे. हे मुलगे दोन वर्षांचे असताना आजींवर वैधव्याची कु-हाड कोसळली. एकत्र कुटुंबात या आजींना केवळ आश्रीत हा दर्जा मिळाला. “आम्ही तीन खाणारी तोंडे पोसतो” असे उद्गार ऐकवले जाऊ लागले.

सांगली जवळच्या छोट्या खेड्यात पंचवीस माणसांच्या कुटुंबा साठी राब-राब राबून पहाटे पाच ते रात्री आकरा वाजे पर्यंत कामे करून पण शिव्या खाणेच आजींच्या नशीबात आले.

एक दिवस मुले पाच वर्षांची झाल्यावर पहाटे अगदी चुपचापपणे आजी दोन्ही मुलांना घेऊन बाहेर पडल्या आणि पुण्याला आल्या. दोन दिवस चुलतबहिणी कडे राहून लगेच त्यांनी सदाशिव पेठेत भाड्याची खोली एका वाड्यात घेतली. आजींनी पोळपाट लाटणे हाती घेऊन स्वैंपाकाची कामे मिळवली. हाताला अत्यंत चव होती त्यामुळे कामे भरपूर मिळू लागली. मुलांना नू. म. वि. शाळेत घातले.

मुले अत्यंत गुणी. परिस्थिती समजून कधीही आईजवळ कोणताच हट्ट केला नाही.

आजी डेक्कन वर डॉ. बापट यांच्या घरी स्वैपाकाचे काम करायच्या. अत्यंत विश्वासू व सुगरण बाई बापट कुटुंबियांना भलतीच आवडली. त्यांची मुले पण आजींच्या मुलांच्या बरोबरीची होती व हे डॉक्टर पतीपत्नी दिवसभर कामात असल्यामुळे त्यांना घर व मुलांकडे बघायला विश्वासू माणसाची गरज होती. म्हणून त्यांनी आजी व त्यांच्या मुलांना बंगल्यात आऊटहाऊस मधे रहायला जागा दिली. आजींच्या रहाण्याची सोय झाली सज्जन माणसांचा पाठिंबा मिळाला.

दोन्ही मुले अतिशय हुशार. चौथी व सातवीची पण शिष्यवृत्ती मिळवून पुढे गेली. आजींच्या कष्टाळू वृत्ती मुळे बापट कुटुंबियांना पण सोयीचे झाले. “माझी मुले उच्चशिक्षित झालीच पाहिजेत” हा आजींनी ध्यास घेतला होता. दहावीला मुलांनी मेरिटलिस्ट मधे नाव मिळवले आणि पेपर टाकणे, दुधाच्या पिशव्या टाकणे करत करत पुढील शिक्षण चालू केले. बापट कुटुंबियांनी पण दोन्ही मुलांच्या शिक्षणाला आर्थिक हातभार लावला.

मग आजींनी केलेल्या बचतीतून तसेच बापट मंडळी यांच्या मदतीने कोथरूडला अगदी छोटासा फ्लॅट घेतला, पण बापट यांचे काम मात्र त्या करतच होत्या. दोन्ही मुले उच्चशिक्षित होऊन गुणी सुना घरात आल्या. बापटांची मुले अमेरिकेत स्थायिक होऊन Greencard Holder झाली, आणि अमेरिकन पत्नी दोघांनी शोधली. बापट पती-पत्नी पण वृद्ध झाली आणि Problem म्हणजे त्यांच्या मुलांना भारतात येऊन आईवडील यांची काळजी घ्यायला पण वेळ नाही.

Knee-Replacement Operation, Spinal cord Operation सारखी मोठी Operations होऊनही मुलांनी साधी चौकशी पण केली नाही. मात्र आजींच्या डॉक्टर मुलाने तर स्वतः ऑपरेशन होताना त्याच्या सहकार्यां बरोबर लक्ष घालून खूप काळजी घेतली आणि दुस-या मुलाने पण दर वेळी खूप मदत केली.

आजींच्या सोहळ्याला बापट पतीपत्नी आले होते पण स्वतः श्री. बापट तर Wheel Chair वरून आले होते.

आता शेवटी असे समजले की, आजींच्या दोन्ही मुलांनी मिळून जो कोथरूडला मोठ्ठा बंगला बांधला आहे, त्या मधे वरच्या दोन खोल्यां मधे त्या दोन्ही मुलांनी बापट पतीपत्नी यांना आणले. आणि आजींची दोन्ही मुले त्यांची उतकृष्ट काळजी घेतात. बंगल्यातील तळमजल्यावर आजींचे कुटुंब जणू गोकुळ नांदते आहे. आजींची नातवंडे बापट पतीपत्नी यांना पण “आजीआजोबा” असेच म्हणतात.

सकाळसंध्याकाळ वरती ताजा स्वैपाक जातो. बापट काकाकाकू पण आयुष्याच्या संध्याकाळी समाधानी जीवन जगत आहेत.

“ऋणानुबंध

म्हणतात ते हेच असावेत ना ?

सत्य घटना… आपल्या पुण्यातली. डोळे भरून वाचावी अशी.

संग्रहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझ्या गाडीला व्हेनीला आईसक्रीम आवडत नाही ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

🌈इंद्रधनुष्य🌈 

☆ माझ्या गाडीला व्हेनीला आईसक्रीम आवडत नाही .. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

पियाँटिक ह्या जनरल मोटर्स च्या शाखेला एके दिवशी एक तक्रार आली.

——” माझ्या गाडीला व्हेनीला आईसक्रीम आवडत नाही.”

जनरल मोटर्स ने साहजिकच ह्या तक्रारीकड़े दुर्लक्ष केले. 

काही दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तीने हीच तक्रार केली. 

यावेळी जनरल मोटर्स ने त्याची चौकशी करायची ठरवले. त्यांनी त्या व्यक्तीला त्याची तक्रार व्यवस्थित सांगणयास सांगितले.

—–व्यक्तीने उत्तर दिले की तो, त्याची पत्नी आणि मुले रोज जेवण केल्यावर आईसक्रीम खायला जातात. रोज वेगवेगळे फ्लेवर घेतात. पण ज्या दिवशी ते व्हेनीला फ्लेवर घेतात त्या दिवशी त्यांची गाड़ी सुरु होत नाही.

जनरल मोटर्सने ‘ असे होउच शकत नाही ‘ असा दावा केला आणि दुर्लक्ष केले. इतर लोकांनी आणि कंपन्यानीसुद्धा त्या व्यक्तीची चेष्टा केली.

——काही दिवसांनी त्या व्यक्तीने परत हीच तक्रार केली. आता मात्र जनरल मोटर्सपुढे त्याची चौकशी करण्याशिवाय पर्याय नव्हता.

त्यांनी आपला एक इंजीनिअर त्या व्यक्ती कड़े पाठवला. इंजीनिअरने गाड़ी चेक केली. सगळे व्यवस्थित  असल्यामुळे नाईलाजाने त्याला त्या व्यक्तीसोबत रहावे लागले. रात्री आईसक्रीम खायला जाताना इंजीनिअर पण सोबत गेला. आईसक्रीम खाऊन सगळे घरी आले. दुसऱ्या दिवशी परत आईसक्रीम खायला गेले. व्यक्तीने व्हेनीला आईसक्रीम आणले —- आणि काय आश्चर्य त्या व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे गाड़ी सुरुच झाली नाही. 

——-इंजीनिअरने परत गाड़ी चेक केली पण सगळे नीट होते. शेवटी त्याने कंपनीला कळवले की व्यक्तीने सांगितलेली तक्रार खरी आहे.

कंपनीने इंजीनियर ला तिथेच राहून नीट लक्ष देण्यास सांगितले. त्याप्रमाणे इंजीनिअरने प्रत्येक गोष्टीची पाहणी करायला सुरवात केली. रोज त्या व्यक्तीबरोबर आईसक्रीम खायला गेल्यावर काही दिवसानंतर इंजीनिअरच्या लक्षात आले की ती व्यक्ती  जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते, तेव्हा त्याला गर्दीमुळे वेळ लागतो. पण व्हेनीला फ्लेवरला जास्त मागणी असल्यामुळे त्याच्यासाठी वेगळे काउंटर होते आणि सर्विस पण तत्पर होती.  त्यामुळे तो ते घेऊन लवकर येतो. आणि नेमकी हीच गोष्ट इंजीनिअरला पाहिजे होती. त्याने त्या गोष्टीवर खुप अभ्यास केला. तेव्हा लक्षात आले की ती व्यक्ती  जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते,  तेव्हा त्याला यायला वेळ लागतो. तोपर्यन्त गाडीचे इंजिन थोड़े गार होते, आणि गाड़ी पुन्हा लगेच चालू होते. पण ती व्यक्ती  जेव्हा व्हेनीला फ्लेवर घेते,  तेव्हा तो लगेच परत येतो. त्यामुळे गाडीच्या इंजिनला गार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे इंजिन मधील पेट्रोलचे इव्हेपरेशन होते आणि ते ब्लॉक होते व परत चालू होत नाही. 

——आणि मग गाडीच्या इंजिनला गार करण्यासाठी लागणारे संशोधन सुरु झाले. जगातील अग्रमानांकित कंपनी मर्सेडीज़ने कार्ल बेंझ व विलिअम मेयबैकच्या मदतीने 1901 साली आपल्या ‘मर्सेडीज़ 35’ साठी पहिला रेडिएटर बसवला, जो आजही इंजिनचा अविभाज्य भाग आहे.

——–एकादी फालतु वाटणारी गोष्टसुद्धा जगाला किती पुढे घेऊन जाते हेच यातून सिद्ध होते.

म्हणून—दृष्टिकोन बदला….. परिस्थिती बदलेल…… ! 👍👍

 

संग्राहक – श्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तुरटी जवळ ठेवा !! ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर

🌈इंद्रधनुष्य🌈 

☆ तुरटी जवळ ठेवा !!  ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆ 

माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला.

ती सांगत होती,

“आत्ताच तासभर योगासनं करून आले आणि तुला फोन केला.”

फोनवर ती बरेच काही बोलत होती. बोलता बोलता ती म्हणाली,

“पंधरा- वीस वर्षांपूर्वी एक मैत्रीण मला वाकडं बोलली ते अजून मनातून जात नाही.”

मला हसूच आलं.

आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा- वीस वर्षांची जळमटे मनात शाबूत ठेवतो. हा गलथानपणा बरेचजण वेळोवेळी करत असतात.

खरंतर आपल्या लक्षात ठेवण्यासारख्या कितीतरी गोष्टी असतात , पण आपण आपल्या मेंदूत वाईट गोष्टींचा भरणा भरपूर करत असतो.

कधी कधी माणसं मनात नसतानाही सहज काही बोलून जातात.  आपल्या मनाला ते लागतं.  आपण वेळीच ते झटकून टाकत नाही. अंगावर झुरळ आलं, की आपण ते लगेच झटकून टाकतो.  आपल्याला झुरळाची किळस वाटते.

तसंच, आपल्याबाबत कुणी किळस वाटणारे शब्द वापरले, तर तेही झुरळासारखे झटकून टाकता आले पाहिजेत.  आपला मेंदू म्हणजे काही गोडाऊन नाही की, वाटेल त्या गोष्टी आपण साठवून ठेवाव्यात…

जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आपला मेंदू आहे. आपलं लहानपण, आपलं तरुणपण, त्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी मेंदू जपतो. वेळोवेळी आपल्याला तो स्मरण करून देतो. आपण त्या स्मरणरंजनात रमून जातो. कधी आपल्या डोळ्यात पाणी येतं तर कधी ओठांवर हसू.

जगताना आपल्याला एवढा चांगला आधार देणारा मेंदू आपण नको त्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतो.

आपण आपल्या मेंदूवर सतत अन्याय करतो.

मेंदूला वाचा नसते.  तो मुका असतो. त्याला काही कळत नाही. पण हृदयाला मन असते.  त्याला तरी ते कळले पाहिजे.

काही माणसं स्पर्धेसाठी आपल्याशी शत्रुत्व घेतात ती गोष्ट वेगळी. अशावेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लढले पाहिजे.

पण ९०-९५ टक्के गोष्टी अशा असतात, की त्या आपल्या आयुष्यात फारशा गंभीर नसतात. त्या वेळीच सोडता आल्या पाहिजेत.

मेंदू सृजनशील आहे, त्यातच त्याला गुंतवून ठेवले पाहिजे.

ज्या गोष्टी सृजनशील गोष्टींशी निगडीत नाहीत, त्यांना वर्तुळाबाहेर ठेवले पाहिजे.

आपलं मन आनंदी असणं, आपलं घर, आपले कुटुंबीय, आपले जवळचे मित्र आनंदी असणं, हेच तर आयुष्य आहे.

या पलीकडे काय असू शकते?

लहानपणी माझी आई सांगायची, पाणी गढूळ झाले, की त्यात तुरटी फिरवावी. गाळ खाली बसतो. स्वच्छ पाणी मिळते——

———–मन गढूळ करणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. अशावेळी त्या मनाच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवता आली पाहिजे..

 

संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जाने कहा गये वो दिन.. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

🌈इंद्रधनुष्य🌈 

☆ जाने कहा गये वो दिन.. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

वेळ रात्री नऊ साडेनऊची. घराघरांमधल्या हॉलमधे टिव्ही, मालिकांचे घाणे टाकत असतो. बथ्थड डोक्याच्या मठ्ठ मराठी मालिका.. कपिल शर्माचा कॉमेडी शो, हवा येऊ द्या.. असं काही तरी चाललेलं असतं. माणसं बायकांचं, बायका माणसांचं सोंग घेऊन प्रेक्षकांचं मन रमवण्याचा प्रयत्न करत असतात. ढॅण– ढॅण  करत जाहिराती अंगावर येऊन कोसळत असतात. त्या सगळ्या गचक्यात जेवणं उरकणं चालू असतं. कोणी एकीकडे मोबाईलमधे डोकं खूपसून दूर कोणाशी तरी चॅट करत असतं. त्या नादात ताटात काय चाटतोय त्याचं भान नसतं. हे झालं आताच्या काळातलं चित्र.

 —— साधारण पन्नासएक वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय घरांमधे रात्रीचं चित्र कसं असायचं बरं?

 ——-सुट्टीत, उन्हाळ्यात किंवा असंच कोणी टूम काढली की तिन्हीसांजेला मुलांची अंगत पंगत व्हायची. आपापल्या घरून ताटं घेऊन मुलं कोणाच्या तरी अंगणात किंवा गच्चीत जमायची. हसत खेळत पाखरांची पंगत उठायची. कधी जेवणानंतर लगेच मामाचं पत्र सुरू व्हायचं. नदी की पहाड… डबा ऐसपैस.. अरिंग मिरिंग लोंगा तिरिंग…गाई गोपी उतरला राजा… भोज्जा…

नऊ साडेनऊ म्हणजे तर झोपायची वेळ असायची.. आठ साडेआठलाच अंथरूणं टाकणे नावाचा कार्यक्रम सुरू व्हायचा. गाद्या घालून झाल्या की मच्छरदाण्या लावणे. पण त्या आधी मुलांच्या कोलांटउड्या व्हायच्या. हा कार्यक्रम साधारणपणे कोणी मोठ्या माणसाने डरकाळी वजा इशारा देईपर्यंत चाले. मग मच्छरदाणी प्रकरण सुरू होई.  मच्छरदाण्यांची ठराविक दोरी ठराविक खिळ्यांनाच बांधावी लागायची. त्यामुळे ज्याचं काम त्यालाच करावं लागायचं. असं कोणीही आलं आणि मच्छरदाणी बांधली असा मामला नसायचा. मच्छरदाणी बांधली की आपलं सगळं सामानसुमान घेऊन मच्छरदाणीत शिरावं लागायचं. मग सारखं आत बाहेर करता यायचं नाही. कारण मग डास आत घुसायचे. तरी झोपण्यापूर्वी एखादा डास शिरलेलाच असायचा. मग प्रत्येक जण आपापल्या मच्छरदाणीत रांगत टाळ्या पिटतोय असं दृष्य दिसायचं. 

पण रात्रीची खरी मजा तर उन्हाळ्यात असायची.. गच्चीवर झोपण्याची. रोडच्या कडेला असलेल्या ओट्यावर पण बिनधास्तपणे झोपायचे लोक. अंगणातही झोपायचे. पण गच्चीवरचा मामला काही औरच. ब-याचदा माळवदाची घरे असत. जिना वगैरे असेलच असंही नसायचं. एखादी मोडकीशी शिडी असायची. मोठाली पोरं अंथरूणं वर न्यायची. बारकाली पोरं त्यांना मदत करायची. मोठी माणसं–महिला वर्ग खालचं कडीकुलपं बघून शेवटाला येत. तोपर्यंत वर अंथरूणं पडलेली असत. कधी पोरं संध्याकाळीच अंथरूणं घालून ठेवत. रात्रीपर्यंत ती गार पडलेली असत. ट्रांझिस्टर्स तेव्हा नवीनच आलेले होते. मग ठराविक स्टेशनं लावली जात. विविध भारतीवर, सिलोनवर जुन्या गाण्यांचा कार्यक्रम,भुले बिसरे गीत, बेलाके फूल वगैरेअसायचे.. रफीचा मधाळ आवाज, ‘खोया खोया चांद’ म्हणत आकाशातल्या चांदला थबकायला भाग पाडायचा. किशोर… सुधा मल्होत्रा, ‘कश्तीका खामोश सफर’ घडवायचे. त्या काळच्या निवेदकांच्या आवाजातही वेगळाच खानदानी ठहराव असायचा..शब्दांची लडिवाळ नाजूक बोटं जणू  झोपेची जादू करताहेत असे त्यांचे निवेदन असायचे.  वातावरणातल्या शांततेचा लहेजा सांभाळून त्यांचं ऩिवेदन चालायचं.. गाणी ऐकता ऐकता कधी निद्रादेवी कवळायची कळायचं पण नाही.

आता रफी, रेडीओ, खोया खोया चांद.. कश्तीका खामोश सफर.. सगळंच खामोशीच्या पडद्याआड गेलं. गच्चीवर झोपणं. अंथरूणं घालणं. तांब्या भांडं, ओडोमॉस घेऊन…  ट्रांझिस्टर घेऊन वर जाणं. आकाशाकडे बघत पूरवैया अनूभवत  रेडिओ ऐकणं, व्याधाचं नक्षत्र शोधणं.. चंद्राच्या डागांमधे ससा-हरीण शोधणं… सगळं वेडगळपणाचं वाटावं इतकं विज्ञानाने लोकांना शहाणं करून सोडलं. 

नवनवीन शोधांनी माणसाची आयुष्याची लांबी वाढली पण त्यातली खोली हरवली.  लोकसंख्या भरभर वाढली.अंगण तेवढंच राहिले आणि त्याचे हकदार वाढले. 

ऐंशीच्या दशकात आधी टिव्ही ने माणसं गिळली. नंतर मोबाईलने.  दोघांनी मिळून मुलांचं तर बालपणच खाऊन टाकलं. सुरुवातीला टिव्हीचा एकच चॅनल होता– तोही संध्याकाळी पाचला सुरू व्हायचा.  पण आख्खा वाडा, बिल्डींग त्याच्यासमोर एकवटायची. तल्लीन व्हायची. आता शेकडो चॅनल्स आले, तरीही मन रमत नाही. रिमोट घेऊन, ‘घे पुढं.. घे मागं’..असं तासभर करावं तरी दर्जेदार म्हणावं असं काही सापडत नाही. सज्जन लोकांऐवजी दुर्जन पात्रांची चलती आली. परोपकारी लोकांना कोणी विचारेनासं झालं आणि ज्याच्या अंगी जास्त उपद्रव- मूल्य त्याला दहशतीपोटी का होईना.. जास्त मान, अशी वेळ आली…सगळ्यांमधे एकप्रकारचं चिंबावलेपण आलं. जुन्या शांत जगरहाटीचा ठहराव सगळा वाहून गेला. 

चटणी भाकरी जाऊन पिझ्झा पास्ता आला. घरी आयाबायांनी निगुतीनं केलेल्या शेवया गेल्या आणि ‘टू मिनिट नुडल्स’ आल्या. दिवाळी दस-याला घर माणसांनी भरायचं. आता प्रत्येकाला नियतीने वेगवेगळ्या खुंटीवर टांगून टाकलं.  पैसा खूप आला, पण सुख समाधान मात्र हरवलं. जाहिरातींनी माणसं हावरट बनवली. शोभेच्या वस्तू… सामानाने घरं भरली..पण कोठीची खोली रिकामी झाली. स्पर्धा, अहंकार ह्यांनी माणुसकी.. जगण्यातला आनंद हिरावून घेतला. चंद्राला भाऊ मानणा-या बायका आणि चंद्राला मामा म्हणणारी पोरं हळू हळू नामशेष झाली. त्याच चंद्रावर आता प्लॉट्सची विक्रीपण सुरू झाली. काळाने सगळ्यांमधली हळवी नाती पुसून टाकली. आणि निव्वळ चौकस चिकित्सक पिढी जन्माला आली. मार्कांच्या शर्यतीत माहितीचा पूर आला.. ज्ञान मात्र कुठे तरी तोंड लपवून बसलं. पैसे कमवायला शिकवणारे कारखाने उभे राहिले,  पण जगणं शिकवणारं कोणी राहिलं नाही..  

यंत्रयुगाने माणसाचा वेळ वाचेल अशी यंत्रे तर दिली,  पण जगण्यातली फुरसतच हरवून गेली——

——–अशा वेळी आपसूकच मनात येतं—- “ दिल ढुंढता.. है.. फिर वही… फुरसतके रातदिन…”

—–ज्या कुणी लिहिलंय –फार सुंदर व वास्तव आहे 

 

संग्राहक – श्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 
मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठीची कमाल बघा तर.. ☆ संग्रहिका – सुश्री मीनल केळकर

🌈इंद्रधनुष्य🌈 

☆ मराठीची कमाल बघा तर.. ☆ संग्रहिका  – सुश्री मीनल केळकर ☆ 

मराठीची कमाल बघा तर—-

 

अडीच अक्षरांचा कृष्ण,अडीच अक्षरांची लक्ष्मी

अडीच अक्षरांची श्रद्धा,अडीच अक्षरांची शक्ती!

 

अडीच अक्षरांची कान्ता,अडीच अक्षरांची दुर्गा

अडीच अक्षरांची ईच्छा,नी अडीच अक्षरांचा योध्दा!

 

अडीच अक्षरांचे ध्यान,अडीच अक्षरांचा त्याग

अडीच अक्षरांचेच कर्म,नी अडीच अक्षरांचाच धर्म!

 

अडीच अक्षरांत भाग्य,अडीच अक्षरांत व्यथा

अडीच अक्षरांतच व्यर्थ,बाकी सारे मिथ्या!

 

अडीच अक्षरांत सन्त,अडीच अक्षरांचा ग्रंथ

अडीच अक्षरांचा मंत्र,नी अडीच अक्षरांचे यंत्र!

 

अडीच अक्षरांची तुष्टी,अडीच अक्षरांचीच वृत्ती

अडीच अक्षरांतच श्र्वास,नी अडीच अक्षरांतच प्राण!

 

अडीच अक्षरांचा मृत्यू,अडीच अक्षरांचाच जन्म

अडीच अक्षरांच्याच अस्थि,नी अडीच अक्षरांचाच अग्नि!

 

अडीच अक्षरांचा ध्वनी,अडीच अक्षरांचीच  श्रुती

अडीच अक्षरांचा शब्द,अडीच अक्षरांचाच अर्थ!

 

अडीच अक्षरांचा शत्रू,अडीच अक्षरांचा मित्र

अडीच अक्षरांचेच सत्य,अडीच अक्षरांचेच वित्त!

 

जन्मापासुन मृत्युपर्यंत,अडीच अक्षरांत बांधले..

आयुष्य हे मानवाचे,

नाही कुणा उमगले..!!

नाही कुणा उमगले..!!——–

 

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रामाचे दर्शन ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे

🌈इंद्रधनुष्य🌈

☆ रामाचे दर्शन ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

“श्री.तुलसीदासांना” एकदा एका भक्ताने विचारले की…

“महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता, तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का ?”

तुलसीदास म्हणाले :- “हो”

भक्त :- मला पण दर्शन घडवाल का ???

तुलसीदास :- “हो नक्की”

★ तुलसीदासांनी त्याला खूप समर्पक उत्तर दिलं, जे एखाद्या गणिती तज्ञाला ही लाजवेल !!!

तुलसीदास म्हणाले:- “अरे हे खूप सोप्पं आहे !!!  तू रामाचे दर्शन तुझ्यातच घेऊ शकशील.”

प्रत्येकाच्या नावांत देखील शेवटी आपल्याला रामाचेच दर्शन घेता येईल—-त्यासाठी मी तुला एक सूत्र श्लोक  सांगतो. त्याप्रमाणे कोणाच्याही नावाला ते सूत्र लागु होईल!!!

भक्त :-“कोणते सूत्र ?”

तुलसीदास :- हे ते सूत्र —–

||”नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासां द्विगुण प्रमाण || 

|| तुलसी अष्ट सोभाग्ये अंत मे शेष राम ही राम || “

वरील सूत्राप्रमाणे

★ आता कोणाचेही नांव घ्या, त्याची अक्षरे माेजा…

१) त्याला (चतुर्गुण) ४ ने गुणा.

२) त्यात (पंचतत्व मिलन) ५ मिळवा.

३) त्याची (द्विगुण प्रमाण) दुप्पट करा.

४) आलेल्या संख्येला (अष्ट सो भागे) ८ ने भागा.

पुर्ण भाग जात नाही!!!

दरवेळेस बाकी २ शिल्लक राहतेच …

ते दोन म्हणजेच “राम” ही दोन अक्षर होय…

★ विश्वासच बसत नाही ना???

उदा. घेऊ… कोणाचेही नाव निवडा, अक्षर कितीही असोत !!!

★ उदा. ..निरंजन…४ अक्षरे

१) ४ ने गुणा ४x४=१६

२) ५ मिळवा १६+५=२१

३) दुप्पट करा २१×२=४२

४) ८ ने भागा ४२÷८= ५ पुर्णांक, बाकी मात्र २ !!!

बाकी नेहमी दोनच अक्षरे उरतील ती म्हणजे – “राम” !!!

विशेष म्हणजे सूत्रश्लोकातील संख्यांना सुद्धा तुलसीदासांनी फार महत्व दिलं आहे!!!

1) चतुर्गुण म्हणजे ४ पुरुषार्थ :- धर्म, अर्थ, काम,मोक्ष !!!

2) पंचतत्व म्हणजे पंचमहाभौतिक :- पृथ्वी, जल, अग्नि, वायु , आकाश!!!

3) द्विगुण प्रमाण म्हणजे माया व ब्रह्म असे दोन !!!

4) अष्ट सो भागे म्हणजे आठ  दिशांनी ( चार दिशा :-पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण , चार उपदिशा – आग्नेय,नैऋत्य, वायव्य, ईशान्य,  आठ प्रकारची लक्ष्मी (आग्घ, विद्या, सौभाग्य, अमृत, काम, सत्य, भोग आणि योग लक्ष्मी )

★आता प्रत्येकाने स्वतःच्या नावाने हे तपासून पहा …

विस्मयकारक वाटेल पण बाकी नेहमी २ च येईल…

यात तुलसीदासांच्या बुद्धिचातुर्याची व अतुट रामभक्तीची ओळख पटते !!!

जय श्रीराम

संग्रहिका – सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

medhasahasrabuddhe@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दया.. ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित

🌈इंद्रधनुष्य🌈

☆ दया.. ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित ☆ 

भाजीवाली रोजच्या सारखी दुपारी दारात आली आणि ओरडून विचारले, “भाजी घ्यायची का मावशी?”

आई आतून नेहमी सारखी ओरडली, “काय आहे भाजीला?”

“गवार हाय, तंबाटी, पालक,….” एवढे बोलताच आई म्हणाली, “थांब आले”

दारात येऊन आईने भाजीवालीच्या डोक्यावरचा भारा पाहिला आणि विचारले, “पालक कसा?”

“रुपयाची गड्डी” – भाजीवाली

“पन्नास पैशाला दे, चार घेते” – आई

“नाय जमणार मावशी “- भाजीवाली

“मग राहू दे”  – आई

भाजीवाली पुढे गेली आणि परत आली. “बारा आण्याला दीन” – भाजीवाली

“नको. पन्नास पैशाला देणार असशील तर घेते” – आई

“नाय जमणार” – भाजीवाली

.. आणि पुन्हा गेली

थोडे पुढे जाऊन परत आली. आई दारातच उभी होती. तिला माहीत होते की भाजीवाली परत येईल. आता भाजीवाली पन्नास पैशाला द्यायला तयार झाली. आईने भारा खाली घ्यायला मदत केली, नीट निरखून परिक्षण करुन चार गड्ड्या घेतल्या आणि दोन रुपये दिले. भाजीवाली भारा उचलायला लागताच तिला चक्कर आली. आईने काळजीने विचारले, “जेवली का नाही?”

“नाय मावशी. एवढी भाजी विकली की दुकानात सामान घेऊन , मग सैपाक, मग जेवण” – भाजीवाली. 

“थांब जरा. बस इथं. मी आले” म्हणत, आईने दोन चपात्या आणि भाजी, चटणी एका ताटात तिला आणून दिली. नंतर थोडा वरणभात दिला. जेवण झाल्यावर एक केळं दिले. पाणी पिऊन भाजीवाली गेली.

मला राहवलं नाही. मी आईला विचारले, “तू  एवढ्या निर्दयपणे किंमत कमी केली पण नंतर जेवढे पैसे वाचवले त्यापेक्षा जास्त तिला खायला दिले.”*

आई हसली आणि जे म्हणाली ते आयुष्यभर मनात कोरले गेले…

—-“ व्यापार करताना दया करु नये आणि दया करताना व्यापार करु नये”…. 

 

संग्राहक : स्मिता पंडित 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फक्त प्रेम करा ! ☆ संग्राहक – सुश्री माधुरी परांजपे

🌈 इंद्रधनुष्य 🌈 

☆ फक्त प्रेम करा ! ☆ संग्राहक – सुश्री माधुरी परांजपे ☆

 

सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी मैत्रीण

सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी 

नेमकं काय असतं हे ” सख्ख प्रकरण ? ” 

सख्खा म्हणजे आपला 

सख्खा म्हणजे सखा

सखा म्हणजे जवळचा

जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही, केंव्हाही, काहीही सांगू शकतो 

त्याला आपलं म्हणावं, त्याला सख्ख म्हणावं !

 

ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो  

मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा  काळजातलं दुःख सांगून स्फुंदु स्फुंदु रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं, त्याला आपलं म्हणावं !

 

ज्याच्याकडे गेल्यानंतर 

आपलं स्वागत होणारच असतं 

आपल्याला पाहून त्याला हसू

येणारच असतं

अपमानाची तर गोष्टच नसते 

फोन करून का आला नाहीस अशी तक्रारही नसते !

 

पंढरपूरला गेल्यावर 

विठ्ठल म्हणतो का…..

या या फार बरं झालं !

 

माहूर वरून रेणुका मातेचा 

किंवा कोल्हापूर वरून महालक्ष्मीचा किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ?

या म्हणून !

मग आपण का जातो ?

 

कारण भक्ती असते, शक्ती मिळते आणि संकट मुक्तीची आशा वाटते….म्हणून !

हा ही एक प्रकारचा ” आपलेपणाच !”

 

लौकिक अर्थाने, वस्तूच्या स्वरूपात देव आपल्याला कुठे काय देतो ? 

किंवा आपण नेलेले तो काय घेतो ?

काहीच नाही.

 

रुक्मिणी काय पाठीवरून हात फिरवून म्हणते का, 

किती रोड झालीस ? कशी आहेस ? 

सुकलेला दिसतोस, काय झालं ? 

नाही म्हणत.

 

मग दर्शन घेऊन निघतांना वाईट का वाटतं ?

पुन्हा एकदा मागे वळून का पहावं वाटतं ?

प्रेम, माया, आपुलकी, विश्वास

म्हणजेच ” आपलेपणा !”

हा आपलेपणा काय असतो ?

 

आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ

भेटल्या नंतर बोलण्याची ओढ 

बोलल्या नंतर ऐकण्याची ओढ

निरोप घेण्या आधीच पुन्हा

भेटण्याची ओढ !

 

ज्याला न बोलताही आपलं दुःख कळतं 

त्याला आपलं म्हणावं 

आणि चुलत, मावस असलं तरी

सख्ख म्हणावं !

 

मी त्याचा आहे आणि तो माझा

आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे…..

म्हणजे ” आपलेपणा ! “

 

एक शब्दही न बोलता ज्याला पाहिल्या पहिल्या डोळे भरून येतात 

आणि निःसंकोचपणे गालावरून ओघळू लागतात 

तो आपला असतो, 

” तो सख्खा असतो !”

 

लक्षात ठेवा, 

 

ज्याला दुसऱ्या साठी ” सख्ख ” होता येतं

त्यालाच कुणीतरी सख्ख असतं, 

बाकी फक्त परिचितांची यादी असते 

नको असलेल्या माणसांची गर्दी असते !

 

तुम्हीच सांगा…..

 

फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्ख म्हणायचं का ?

ज्याला तुमच्या दुख्खाची जाणीवच नाही त्याला सख्ख म्हणायचं का ? 

 

आता एक काम करा 

 

करा यादी तुम्हाला असणाऱ्या

सख्ख्या नातेवाईकांची 

झालं न धस्सकन 

होतयं न धडधड 

नको वाटतंय न यादी करायला….

रडू नका, पुसून टाका डोळ्यातलं पाणी 

आणि मानायला लागा सर्वांना आपलं 

कोणी कितीही झिडकारलं तरी 

कारण…….

राग राग आणि तिरस्कार करून काहीच हाती लागत नाही 

जग फक्त प्रेमानेच जिंकता येतं 

म्हणून फक्त प्रेम करा 

फक्त प्रेम करा !!

 

संग्राहक : सुश्री माधुरी परांजपे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈