मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डोळ्यासंबंधी बरंच काही… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ डोळ्यासंबंधी बरंच काही ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे 

(25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर यादरम्यान आपल्या देशामध्ये नेत्रदान पंधरवडा पाळला जातो यानिमित्ताने नेत्रदान व डोळ्याचे आरोग्य याविषयी हा लेख अवश्य वाचा)

नेत्र, ज्याला आपण मराठीमध्ये डोळे म्हणतो हिंदीमध्ये आँख म्हणतो इंग्लिश मध्ये EYE म्हणतो संस्कृतमध्ये नेत्र किंवा चक्षू म्हणतो तेच ते डोळे.

शरीराचा प्रत्येक अवयव महत्वाचा आहे, पण डोळ्यांशिवाय माणूस नुसता अपूर्णच नाही तर शून्यवत होऊन जातो. डोळ्यां विना अस्तित्व या गोष्टीची कल्पना सुद्धा ज्यांना डोळे आहेत त्यांना करता येत नाही.

 

डोळ्याच्या बाहेरील भागात एक पारदर्शक पडदा असतो. त्यातून प्रकाश किरण आपल्या डोळ्यात शिरतात. या पडद्याला नेत्रपटल किंवा पारपटल तर इंग्लिश मध्ये व तांत्रिक भाषेत ‘कॉर्निया’ ( CORNEA ) असं म्हणतात. आपण सोयीसाठी कॉर्निया हाच शब्द वापरू. काही कारणामुळे जेव्हा कॉर्नियाचा पारदर्शकपणा नाहीसा होऊन तो पांढरट होतो, धुरकट होतो त्यावेळी डोळ्यातून प्रकाश किरण आत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे माणूस दृष्टिहीन बनतो. आंधळा म्हणण्यापेक्षा दृष्टिहीन म्हणणं हे जास्त योग्य. कारण कॉर्निया बदलल्या नंतर तो परत डोळस होऊ शकतो. पण हा कॉर्निया बदलायचा कसा ?

इसवी सन १९०५ पर्यंत याबाबतीत कुणी कल्पनाही करू शकलं नव्हतं.

सन १९०५ मध्ये झेक रिपब्लिक या देशात एडवर्ड जर्म व रॅमन कॅस्ट्रोविजो या दोघांनी जगातली पहिली नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी रीतीने पार पाडली. त्यानंतर अंधांना दृष्टी देण्यासाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला. परंतु दुर्दैवाने याबाबतची जनजागृती आज शंभर पेक्षाही जास्त वर्षे झाली तरी अपेक्षित प्रकारे झाली नाही. जनप्रबोधन ही प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने जाणारी आहे. परंतु गेल्या पंधरा वीस वर्षांमध्ये याला चांगली गती प्राप्त झाली आहे. सध्या अनेक मध्यम शहरांमध्ये सुद्धा नेत्रपेढ्या आहेत. त्यामुळे इच्छुकांचे नेत्रदान करणे सध्या सहज शक्य आहे. बहुतेक कोणत्याही गावापासून काही तासांच्या अंतरावर नेत्रपेढीची उपलब्धता असल्यामुळे तीन चार तासांमध्ये किंवा त्यापेक्षा कमी वेळात नेत्रपेढी ची टीम मृतदेहापर्यंत पोहोचू शकते आणि यशस्वीपणे कॉर्निया काढून घेता येतात. मृत्यूनंतर साधारणपणे सहा तासांच्या आत कॉर्निया काढून घेणे आवश्यक असते. म्हणजे ते चांगल्या स्थितीमध्ये राहू शकतात व त्याचे प्रत्यारोपण यशस्वीपणे करणे शक्य होते.

ज्यांना आपल्या घरी मृत झालेल्या नातेवाईकाच्या नेत्रांचे दान करायचे असेल त्यांनी काही गोष्टी करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम ज्याचा मृत्यू झाला आहे आणि नेत्र काढून घ्यायचे आहेत अशा व्यक्तीचे स्थानिक डॉक्टर ने दिलेले मृत्यूचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्वरित मिळवणे आवश्यक आहे, ज्यामध्ये मृत्यूचे कारण व वेळ नमूद केलेली असली पाहिजे. त्यानंतर त्वरित जवळच्या नेत्रपेढी ला फोन करावा, म्हणजे नेत्रपेढी ची टीम योग्य त्या वेळेत मृतदेहा पर्यंत पोहोचू शकेल. देह जमिनीवर झोपलेल्या स्थितीत असावा, पापण्या उघड्या असतील तर त्या बंद कराव्यात. डोक्याखाली उशी द्यावी ज्यायोगे डोके शरीरापासून साधारण सहा इंच वरच्या स्तरावर राहील. त्यानंतर डोळ्यावर ओल्या पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. पंखा चालू असेल तर तो बंद करावा. वातानुकूलन (A. C. ) चालू असेल तर मात्र ते चालूच ठेवावे. नेत्रपेढी ची टीम येईपर्यंत वरचेवर पाण्याच्या पट्ट्या बदलाव्यात. कॉर्निया सुकणार नाहीत याची काळजी घ्यावी.

नेत्र प्रत्यारोपण करीत असताना जमलेल्या व्यक्तींना बाहेर जाण्यास सांगावे. ज्यांना ते पाहता येणे असह्य होणार नाही अशा एखाद दुसऱ्या व्यक्तीला तेथे राहण्यास हरकत नाही. ही प्रक्रिया साधारणपणे अर्ध्या तासात पार पडते. ही टीम आल्यानंतर त्यांच्यासाठी कोमट पाणी आणि हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था आणि एकदे डस्टबिन जवळ असू द्यावे.

फक्त बुडून मृत्यू झाला असेल तर त्या मृतदेहाचे डोळे उपयोगी पडत नाहीत.

कॉर्नियामध्ये रक्तवाहिन्या नसतात त्यामुळे रक्तगट जुळण्याचा प्रश्न नसतो.. कोणाचाही कॉर्निया कोणालाही बसवता येतो. परंतु काही विशिष्ट संसर्गजन्य रोगग्रस्तांचे कॉर्निया बसवता येत नाही. उदाहरणार्थ कावीळ, एड्स, कॅन्सर आणि शरीरभर पसरलेले सेप्टिक अशा अनेक संसर्गजन्य रोगांमुळे मृत्यू झालेली व्यक्ती बाधित असेल तर अशा व्यक्तीच्या डोळ्यापासून ज्याला डोळे बसविले जातील त्याला त्या संसर्गाचा धोका असतो. म्हणून अशा रोगांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीचे नेत्रदान होऊ शकत नाही. नेत्र काढून घेतल्यानंतर मृतदेहातून थोडासा रक्ताचा नमुना काढून घेण्याची पद्धत असते, ज्यायोगे मृत शरीरामध्ये यापैकी कोणती लक्षणे नाहीत ना याची चाचणी करता येते. कोणत्याही वयाची व्यक्ती नेत्रदान करू शकते. परंतु कधीकधी अति वयस्कर व्यक्तींचे नेत्र रोपणाच्या उपयोगाचे नसू शकतात. अशा वेळेला अशा नेत्रांचा उपयोग मात्र संशोधनासाठी होऊ शकतो. त्यामुळे प्रत्यारोपणासाठी योग्य नसतील तर नेत्रदान करू नये अशा पद्धतीचा विचार मृत व्यक्तीचे नातेवाईक करतात. हे ही योग्य नाही. कारण संशोधन ही सुद्धा गरजेची गोष्ट आहे. संशोधनामुळे काय फायदा होतो याचं एक उदाहरण देता येईल. नेत्रा वरील संशोधनामध्ये अलीकडे असे आढळून आले आहे की कॉर्निया मध्ये दोन थर असतात. त्यामुळे एका कॉर्नियाचे दोन कॉर्नियामध्ये रूपांतर करता येते. त्यामुळे एका मृत व्यक्तीच्या नेत्रदानामुळे पूर्वी दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकत होती पण आता चार व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. याचा अर्थ नेत्रदानाची गरज निम्म्यावर आली आहे. त्यापुढेही या विषयावर संशोधन झाले आहे आणि आता अजून क्रांतिकारी संशोधन येण्याची शक्यता आहे. हा संशोधनाचा किती मोठा फायदा आहे ? त्यामुळे जरी प्रत्यारोपणासाठी नेत्र उपयुक्त नसतील तरी नातेवाइकांनी संशोधनासाठी असे नेत्र वापरण्याचा आग्रह धरून नेत्रदान नक्की करावे. डोळ्याची संरचना ही सगळ्यात गुंतागुंतीची आहे. मेंदूच्या रचने नंतर दुसरा नंबर डोळ्याच्या रचनेचा लागतो. डोळ्यावर खूप मोठे संशोधन करणे आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी परवानगी दिल्यास संपूर्ण डोळा म्हणजेच आयबॉल सुद्धा काढून घेऊन जाता येतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी संपूर्ण डोळा काढून घेण्याची परवानगी दिल्यास संशोधनासाठी आणि नेत्र प्रत्यारोपण प्रशिक्षणासाठी सुद्धा संपूर्ण डोळा म्हणजेच आयबॉल याची आवश्यकता असते. अजूनही रेटिना च्या अंधत्वावर उपाय सापडलेला नाही. ज्यावेळेस संपूर्ण डोळा म्हणजेच आयबॉल काढून घेतला जातो त्यावेळेस त्या खोबणी मध्ये दुसरा कृत्रिम आयबॉल बसवला जातो, आणी पापण्या बंद केल्या जातात. त्यामुळे चेहऱ्यावर कोणतीही भेसूरता किंवा विद्रूपपणा येत नाही. म्हणूनच संशोधनाच्या उपयुक्तते साठी संपूर्ण डोळा सुद्धा द्यावा अशी शिफारस करण्यास हरकत नाही. जगातील एकूण अंध व्यक्तींपैकी 25% अंध व्यक्ती भारतामध्ये आहेत. २०१८ च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये एकूण ५२ लाख अंध व्यक्ती होत्या. (आणि दरवर्षी त्यात सूमारे ३५ हजार नवीन अंधांची भर पडतेच आहे. ) त्यातील ४६ लाख अंध व्यक्ती कॉर्निया मुळे अंध झालेल्या आढळल्या. त्यांचे अंधत्व नेत्रदानाने नक्कीच दूर होऊ शकते. परंतु दुर्दैवाने आपल्या देशात वर्षभरात साधारणपणे १० ते १५ हजार व्यक्तींचेच नेत्रदान होते.

नेत्र रोपण शस्त्रक्रिया ही अनेक वर्षांच्या यशस्वीतेने आणि अनुभवाने सिद्ध झालेली शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियांचा यशस्वीतेचा दर हा 90 टक्के आहे. त्यामुळे बहुतेक सर्व नेत्रदाने, यशस्वीरित्या इतरांना दृष्टी देण्यासाठी रोपण करता येतात.

नेत्रदानाचा संकल्प करणे म्हणजे नेत्रदानाच्या संकल्पपत्रावर सही करणे एवढाच अर्थ घेतला जातो. परंतु ही प्रक्रिया अपुरी आहे. नेत्रदान यशस्वी व्हायचे असेल तर संकल्प पत्रावर सही केल्यानंतर किंवा संकल्प पत्र न भरता सुद्धा आपण आपल्या मनात निश्चय केल्यानंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांना, आपल्या वारसदारांना या गोष्टीबाबत पूर्णपणाने सजग करणे आवश्यक आहे. त्यांना नेत्रदानाची संपूर्ण माहिती देणे ही गरजेची गोष्ट आहे. त्यांचे संपूर्ण समाधान झाल्यानंतर, आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान झाले पाहिजे याची जबाबदारी तुमची आहे आहे याची त्यांना जाणीव करून दिल्यानंतरच, नेत्रदान यशस्वी होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. त्यामुळे संकल्पपत्र भरण्या बरोबरच आपल्या कुटुंबातल्या सर्व व्यक्तींना याबद्दल माहिती देणे आणि त्यांना त्यासाठी तयार करणे हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.

आपल्या देशात नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी फक्त एक टक्के व्यक्तींचेच प्रत्यक्ष नेत्रदान होते. याचाच अर्थ संकल्पपत्र भरणे या कृती पेक्षा प्रत्यक्ष नेत्रदान घडवून आणण्यासाठी कुटुंबातल्या लोकांना जागृत करणे हीच सगळ्यात महत्वाची व आवश्यक गोष्ट आहे.

कोणत्याही वयाची व्यक्ती नेत्रदान करु शकते. कुठल्याही प्रकारचा डोळ्याचा नंबर असेल किंवा मोतीबिंदू वा काचबिंदू शस्त्रक्रिया झाली असेल किंवा मधुमेह आणि रक्तदाब असेल अशी कोणतीही व्यक्ती मृत्यूनंतर नेत्रदान नक्कीच करू शकते. अपघातात व्यक्ती मृत झाली असेल तर स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीने कायदेशीरपणे नेत्रदान होऊ शकते, ते पोस्टमॉर्टेम करण्यापूर्वी करता येते. ज्यांचे कॉर्निया चांगले आहेत परंतु इतर काही दोषांमुळे ज्यांना अंधत्व आले आहे अशा अंध व्यक्ती सुद्धा नेत्रदान करु शकतात. जवळच्या नेत्रपेढीचे क्रमांक आपल्या घरात कॅलेंडरवर किंवा कुठेतरी लिहून ठेवणे आवश्यक आहे. या बाबतीत आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीच्या व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर तसेच बॅंका, पोस्ट ऑफिस वगैरे ठिकाणी खाजगी हॉस्पिटलच्या बाहेरच्या बाजूस जवळच्या नेत्र बँकेचे फोन नंबर एका बोर्डवर लिहून ठेवणे आवश्यक आहे. तसे झाल्यास नेत्रपेढीचा क्रमांक शोधण्यासाठी कोणाला ऐनवेळी धावपळ करायला लागणार नाही.

तसेच राष्ट्रीय क्रमांक १९१९ हा टोल फ्री क्रमांक असून या क्रमांकावर फोन केल्यास आणि आपले ठिकाण सांगितल्यास त्यांचेकडून आपल्या जवळच्या नेत्र बँकेचा क्रमांक आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे ऐन वेळेस नेत्र बँकेचा नंबर शोधण्याची धावपळ करावी लागणार नाही. नेत्रदान केल्यानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना ते डोळे कुणाला बसले आहेत हे कधीही सांगितले जात नाही परंतु त्या डोळ्यांचा उपयोग रोपणासाठी झाला आहे किंवा नाही एवढीच माहिती मिळू शकते.

प्रत्येक व्यक्तीने जिवंतपणी आपल्या डोळ्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, ज्यायोगे मृत्यूनंतर आपले डोळे एखाद्या नेत्रहीनाला उपयोगी पडतील.

डोळ्याचे महत्त्वाचे भाग म्हणजे बाहेरील भागात पारपटल म्हणजेच कॉर्निया (पारपटल) त्यानंतर नेत्रमणी म्हणजेच लेन्स, त्यानंतर महत्त्वाचा भाग हा नेत्रपटल म्हणजेच रेटिना. नेत्रमणी व नेत्रपटल याच्यामध्ये एक द्रवपदार्थ असतो. या द्रवपदार्थाचा दाब योग्य तऱ्हेने नियंत्रित केला गेलेला असतो. परंतु काही कारणामुळे तो दाब जर वाढला तर डोळ्याचे विकार होतात. त्यामुळे मुख्यत्वे काचबिंदू हा विकार उद्भवू शकतो. आजकाल मधुमेहाच्या रुग्णांमध्ये काचबिंदूचे प्रमाण जास्त आढळते. त्यासाठी तरुणांनी वर्षदोनवर्षातून एकदा आणि पन्नाशीनंतर दर सहा महिन्यातून एकदा डोळ्यांची संपूर्ण तपासणी करून घेणे आवश्यक आहे. म्हणजेच योग्य वेळेस जर एखाद्या व्याधीचे निदान झाले तर त्यावर उपचार करून त्या व्याधींपासून मुक्तता मिळू शकते. प्रत्येक जिवंत व्यक्तीने स्वतःच्या डोळ्यांची योग्य ती काळजी अवश्य घेतली पाहिजे.

नेत्रदानच नव्हे तर एकूणच अवयवदाना याविषयी विविध धर्मांचा विरोध नसल्याबद्दलचा उहापोह अवयवदान आणि धर्म याविषयीच्या लेखामध्ये मी केला आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माचा विरोध नेत्रदानाला नाहीच हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे नेत्रदान हे एक पवित्र आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे या भावनेने प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प केला पाहिजे. नेत्रदान हे एक मानवतेचे कार्य आणि राष्ट्रकर्तव्य आहे.

© श्री सुनील देशपांडे

पाषाण, पुणे  मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लेखन ‘कला’… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ लेखन ‘कला’… ☆ श्री सुनील शिरवाडकर

ना. सी. फडके

अप्पांनी रात्रीच मनाशी जुळवाजुळव करून कादंबरीचा आराखडा डोक्यात तयार करून ठेवला होता. पांढऱ्याशुभ्र कोऱ्या.. गुळगुळीत कागदांचा गठ्ठा.. पेन जागेवर आहे ना हे पाहीलं. त्यांनी विजयला सांगितले.. आज लेखनाला बसायचे आहे. आपल्या ‘दौलत’ बंगल्याच्या पश्चिमेकडे तोंडात करून असलेल्या खिडकीजवळचे टेबल म्हणजे त्यांची लिहीण्याची जागा.

स्नान वगैरे करुन.. शुचिर्भूत होऊन अप्पा आपल्या रिव्हॉलवींग चेअरवर बसले. बाजुला लेखनिक म्हणून त्यांचा मुलगा विजय.

हे अप्पा.. म्हणजेच जुन्या पिढीतील लोकप्रिय लेखक ना. सी. फडके. ते ज्या खुर्चीत बसले होते ती त्यांना भेट म्हणुन मिळाली होती. त्यांच्या पन्नासाव्या कादंबरीच्या.. ‘कुहु!कुहु!’ च्या प्रकाशन सोहोळ्यात.

तर अप्पांनी मजकूर सांगायला सुरुवात केली. अत्यंत वेगात. तो लिहुन घेतांना विजयची धांदल होई. ऱ्हस्व.. दीर्घ सांभाळायचे आणि अक्षरही सुंदर काढायचे यावर अप्पांचा कटाक्ष. चतकोर आकाराची १५-१६ पानं लिहुन झाली की अप्पा थांबत.

‘छान लिहिलं आहेस’ या अप्पांच्या शाबासकीसाठी विजय थांबुन राही. त्यांनी तसं म्हटल्यावर त्याचं हात दुखणं वगैरे पळुन जाई.

आप्पांच्या तोंडातून निघालेला शब्द अंतिम असे. सगळा पुर्ण विचार करुनच ते कथन करायला बसत. रात्री जेवण झाल्यावर पुन्हा एकदा ते आपल्या टेबलपाशी येत. लिखाणातल्या शुद्धलेखनाच्या चुका शोधून काढत. बाजूला असलेल्या समासात दुरुस्त्या लिहून ठेवत.

अशी फायनल झालेली कॉपी बघत रहावी अशी असायची. शिस्तबध्द.. नेटकेपणा.. आणखी देखणेपण लगेच नजरेत भरे.

अप्पांचे चिरंजीव विजय फडके सांगतात..

“आप्पा त्यांच्या खोलीत नसताना त्यांची फाईल उघडून ती बघावीशी वाटे. कागदावरच्या मार्जिनमध्ये आप्पांनी त्यांच्या झोकदार अक्षरात लिहीलेल्या शुध्दलेखनाच्या चुका बघाव्याशा वाटत. शाळेतल्या शिक्षकांनी शिकवलेलं शुध्दलेखन माझ्या लक्षात नाही.. पण अप्पांच्या हाताखाली काम करता करता आपोआप लेखन शुद्ध होत गेलं. “

शेकड्यांनी कादंबऱ्या लिहिणारे सिध्दहस्त लेखक ना. सी. फडके. आणि त्यांचे लेखनीक म्हणुन काम करणारे त्यांचे चिरंजीव विजय फडके. दोघेहि ग्रेटच. आजच्या कॉम्प्युटर टायपिंगच्या जमान्यात तर ते अधिक मोठे वाटतात.

या महान लेखकाला ही एक आदरांजली !!

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १३ — क्षेत्रक्षेत्रज्ञ योग — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १३ — क्षेत्रक्षेत्रज्ञ योग — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीभगवानुवाच

इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते ।

एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ १ ॥

कथित श्रीभगवान 

देहासी या कौन्तेया क्षेत्र नाम जाण

क्षेत्राचे ज्या ज्ञान त्यासी म्हणती क्षेत्रज्ञ ॥१॥

*

क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत ।

क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम ॥ २ ॥

*

समस्त क्षेत्रांमध्ये भारता मीच जाण क्षेत्रज्ञ

ऋतज्ञान जे जाण देते क्षेत्र तथा क्षेत्रज्ञ ॥२॥ 

*

तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकारि यतश्र्च यत् ।

स च यो यत्प्रभावश्र्च तत्समासेन मे शृणु ॥ ३ ॥

*

ऐक अर्जुना तुला सांगतो क्षेत्र प्रकार विकार कार्य

क्षेत्रज्ञ कोण प्रभाव त्याचा काय तयाचे कार्य ॥३॥

*

ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ।

ब्रह्मसूत्रपदैश्र्चैव हेतुमद्भिर्विनिश्र्चितैः ॥ ४ ॥

*

बहुत ऋषींनी बहुछंदांतुन पदांतुनी गाईले

कार्यकारणरूप तयांचे ब्रह्मसूत्रे दाविले ॥४॥

*

महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च ।

इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥ ५ ॥

*

इच्छा द्वेषः सुखंदुःखं संघातश्र्चेतना धृतिः ।

एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् ॥ ६ ॥

*

महाभूते अहंकार मति यांनी झाले साकार

दशैकिंद्रिये पञ्चेंद्रियासी पञ्चविषय गोचर

द्वेष कामना सुखदुःख चेतना इंद्रिय संतुलन धैर्य 

उपांग तयांचे विकार समस्त एकत्रित ते क्षेत्र ॥५, ६॥

*

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् ।

आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥ ७ ॥

*

इंद्रियार्थेषु वैराग्यमनहङ्कार एव च ।

जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥ ८ ॥

*

असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु ।

नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु ॥ ९ ॥

*

मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी ।

विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥ १० ॥

*

अभिमान विरहित स्पर्श ना दंभाचा

क्षमाशीलता अहिंसा सरळ स्वभावाचा

गुरुसेवा अनुष्ठान निग्रह मनाचा

स्थैर्य शुचिर्भूतता विरक्त इंद्रियांचा

अहंकारहीन लीन अनासक्त मनाचा

विरक्त जीवन न गुंता संसारमोहाचा

दोष जननमरणाचा व्याधीचा वार्धक्याचा

इष्टानिष्ट प्राप्ती समता चित्ताची 

अढळ भक्ती अनन्यभावाची

जीवनी आचरण एकान्तवासाचे ॥७-१०॥ 

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पद्मविभूषण शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? इंद्रधनुष्य ?

☆ “पद्मविभूषण शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

जय भवानी •••जय शिवाजी••• म्हणताना उर जसा अभिमानाने भरून येतो ना, शिवाजीचे कर्तृत्व आठवून रक्तामध्ये एक अनोखी शक्ती निर्माण होऊन, एक जोष निर्माण होतो ना••••

तसाच •••किंबहुना त्याहुनही जास्त जोष, किमान सर्व पुरंदरे यांच्या अंगी येतो•••• तो म्हणजे शिवचरित्र, शिवाजी महाराज, घरोघरी पोहोचविणाऱ्या, पद्मविभूषण, शिवशाहीर, श्री बाबासाहेब पुरंदरे हे नाव उच्चारले की••• हे आदरणीय व्यक्तिमत्त्व समोर दिसले की, आत्ताच 98 व्या वर्षी काढलेले उद्गार आठवतात ••• त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना ते म्हणतात, मी माझ्या मनात एक आठ – नऊ वर्षाचे मूल जपलेआहे. त्यामुळे त्यांचे भाव हे मला चिरतरुण, दीर्घायू करायला मदत करत आहेत.

असेच छान छान उद्गार, छान छान विचार, आमच्या कानावर सतत पडत असल्याने, एक अभिमान वाटावा, असा आदर्श समोर आला••• अगदी ठरवलेले नसले तरी, त्यांची कृती, विचार, वागणे, बोलणे, रहाणे, हे सगळे नकळत मनावर बिंबवले गेले••• नव्हे मनात रुजले गेले आहे••• आणि हेच बीज अंकुरून आता कुठे तरी त्यांची पाऊलधूळ मला स्पर्श करण्याचे सामर्थ्य आले आहे असे वाटते.

विचारणारे विचारतात श्री बाबासाहेबांकडून तुला हा वारसा मिळाला आहे का? तर नक्कीच, अगदी अभिमानाने, ‘हो’ असे उत्तर येईल••• पण मुळात, पुरंदरे हा इतिहासच एवढा रोमांचक आहे की, त्यातून पुरंदरे नसणाऱ्यांना सुद्धा स्फूर्ती येईल•••

मी आता इतिहास म्हटले तो म्हणजे किती तरी पिढ्यानुपिढ्या आलेले रक्तातून रक्तात आलेले संस्कार हा पुरंदर इतिहास सुद्धा मला वाटतं बाबासाहेब यांच्यात संशोधनातून पुढे आला आहे पुरंदरे दप्तर यामध्ये असलेली रंजक माहिती ती पुन्हा नवीन पुरंदरे दप्तर यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेली आहे पण म्हणतात ना गेल्या दहा पिढ्या बद्दल जास्त नाही सांगता आले तरी आज श्री बाबासाहेब पासून आमची मुले किंवा त्यांची नातवंडे अशा पिढ्यांमध्ये श्री बाबासाहेबांचा आदर्श घेतला जातो आहे त्यांच्याकडे बघून आम्ही बाबासाहेबांचे पुरंदरे या नात्याने वंशज आहोत आणि त्यांच्या कर्तुत्वाचा बोलण्याचा आणि खाण्याचा प्रचंड प्रभाव पडल्यामुळे आज मी जे काही थोडेफार लिखाण करू शकते ते शक्य झाले.

माझे वडील, सासवडचे श्री नानासाहेब पुरंदरे, एक अनोखे साहित्यप्रेमी, साहित्य रसिक होते••• त्यांनी फार जास्त लिखाण केले नसले तरी, श्री बाबासाहेबांसह अनेक साहित्यिक आमच्या घरी यायचे, राहायचे, साहित्यिक चर्चा व्हायच्या••• हे सगळे संस्कार, मनावर होत गेले••• आणि ज्या मातीत आपण रुजले गेलेलो असतो त्या मातीचे संस्कार, शिकवावे लागत नाहीत•••तर ते आपोआप होतात••• त्याप्रमाणे पुरंदर्‍यांचे संस्कार हे आपोआप झाले.

श्री बाबासाहेबांची चालणारी शिवचरित्र व्याख्यानमाला, ही आठवडाभराची पर्वणी असायची•• ती व्याख्याने प्रत्यक्ष ऐकली जायची, पण त्या काळात घरी असलेला मुक्काम •••त्यात नामवंत लोकांबरोबर झालेल्या चर्चा •••यातून त्यांचे बारकाईने निरीक्षण होत होते •••त्याची छाप कुठेतरी मनावर खोल पडली गेली. •••

त्यामुळे स्वाभिमानी, पण नम्रपणा हा आपोआप गुण आला असावा••• लहानपणी त्यांच्या भाषणातूनच या बाबासाहेबांची ओळख झाली •••हे आपले काका आहेत हे सांगताना होणारा आनंद अवर्णनीय असायचा••• पण त्यांचे लहानपण मात्र आम्ही मोठे झाल्यावरच कळले.

सासवडच्या राहणाऱ्या मोरेश्वर पुरंदरे यांच्या कुटुंबात 29 जुलै 1922 रोजी या सुपुत्राचा जन्म झाला •••आणि हौसेने या बालकाचे नाव, ‘बळवंत’ ठेवले गेले••• तेच हे ब. मो. तथा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे•••

यांना लहानपणापासून त्यांच्या वडिलांमुळे गड किल्ल्याची आवड निर्माण झाली. वडील छान गोष्टी सांगायचे, तशी गोष्टी सांगायची आवड निर्माण झाली; आणि वयाच्या आठव्या वर्षी एक कीर्तनकार न आल्यामुळे, नरसिंह अवताराची गोष्ट त्यांना सांगायला लागली.

निर्भीडपणे सर्व लोकांमध्ये त्यांनी सांगितलेली ही कथा सगळ्या गावकऱ्यांना आवडल्यामुळे हेच त्यांच्या वक्तृत्वाचे मोठे कारण झाले.

याच गोष्टीचे साधर्म्य, शिवबांनी अफजल खानाचे पोट फाडले••• या कथेशी वाटून, त्यांना शिवचरित्राचा ध्यास लागला; आणि याच नादातून, ध्येयातून, त्यांनी शिवचरित्राची निर्मिती केली.

शिवचरित्र लिहून झाल्यावर, ते छापायला पैसे नसल्याने, भाजीपाला विकूनही त्यांनी ही रक्कम जमवली.

याच कथेतून, ध्येयासक्ती कशी असावी •••, पैसे नसले तरी कष्ट करण्याची तयारी असणे•••, आणि त्यासाठी पडतील ते कष्ट घेतले पाहिजेत •••आणि सगळ्यात महत्वाचे मनात जिद्द असावी••• असे अनेक गुण त्याचे महत्त्व हे न सांगता मनावर बिंबले गेले •••आणि यातूनच आपणही काही लिहावे •••कष्टाला डगमगू नये••• जिद्द धरावी हे गुण आले आहेत असे वाटते•••

श्री बाबासाहेबांच्या लिखाणाचा प्रभाव इतका पडला की, अलीकडे मी शिवाजीच्या दहा-बारा कथा पावसाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे •••त्यातील काही कथा मी माझ्या फेसबुक वरूनही प्रसारित केल्या आहेत.

बाबासाहेब हे कधीच प्रसिद्धी, कीर्ती, यांच्या मागे धावले नाहीत••• तर, शिवाजीच्या प्रेमापोटी, इतिहासाच्या ध्येया पोटी, आणि काहीतरी करून दाखवायची जिद्दीपोटी, ते आपले काम निस्वार्थीपणे करत राहिले••• आहेत •••आणि राहतीलही•••यात शंकाच नाही! त्यामुळेच, यातून झालेल्या परिणामामुळे, हा परिणाम फक्त बाबासाहेबां पुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्रात, भारतात, नव्हे तर••• विदेशातही जाणवू लागला••• आणि मग, त्यांची कृती इतकी सुंदर, ते खरोखर महान आहेत •••हे आपल्या कार्याने दाखवून दिल्यावर, वयाच्या 95 व्या वर्षी, त्यांना ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार मिळाला.

यापूर्वी त्यांना असंख्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे पण आवर्जून सांगावेसे वाटणारी पुरस्कार म्हणजे, महाराष्ट्रभूषण, पुण्यभूषण, पद्मविभूषण, आणि पुरंदर्‍यांचे भूषण ठरलेले हे पुरंदरे भूषण!!!!!

त्यांचे मोठेपण सांगायचे झाले तर, त्यांचा धाडसी बाणा, लेखन शैली, स्मरणशक्ती, वक्तृत्व, आत्मविश्वास, आणि जिद्द••• हे वैशिष्ट्य, त्यांचे अनुकरण जे करु इच्छीतात, नियमितपणे त्यांचे लेखन वाचतात, ऐकतात, त्यांना आपोआप आशीर्वादाने मिळतोच; नव्हे हे सगळ्यांनी घ्यावे अशी त्यांची इच्छा आहे.

अशा शिवशाहीर बाबासाहेबांची, वारसदार म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे •••त्यांच्याबद्दल एवढेच म्हणेन•••

श्री मंत सरदार,

बा वन कशी शिवाजी अभ्यासक,

बा णा शिवाजी धारक,

सा धी रहाणी उच्च विचारसरणी अंगीकारक,

हे रंब, भवानी उपासक,

हुमान अनेक संपादक,

पु ण्यनगरी चे रहिवासक,

रं ध्रोरंध्री शिवाजी ठासक,

र महाराष्ट्रीयास प्रेरक,

रे शमी बोलीतून मनोवेधक,

पुरंदरे भूषण, महाराष्ट्रभूषण, पुण्यभूषण, पद्मविभूषण, शिवशाहीर, श्री बाबासाहेब पुरंदरे, आपणास आरोग्यमयी, उमेद देणारे, शांतीचे, समाधानाचे, राजा शिवछत्रपती गुणगौरव करणारे, प्रदीर्घ आयुष्य लाभलेले ••• आपली आशिष छत्रछाया, अशीच सगळ्यावर राहो••• हीच प्रार्थना •••

आणि बाबासाहेबांनी दिला, आत्मविश्वास, जिद्द, अभिमानाचा वसा,

आम्ही चालवू हा पुढे वारसा••• हे मुख वचन•••

 

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा ! – भाग-२ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा ! – भाग-२  ☆ श्री संभाजी बबन गायके 

सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा !

… अर्थात गिरीशिखरांच्या भाळी श्वासगंध रेखताना…! 

श्री. योगेश चिथडे आणि सौ. सुमेधा चिथडे यांनी सियाचीन मधील सैनिकांसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारून देण्यासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्नांची कहाणी!

(पण सत्य संकल्पाचा दाता नारायण या उक्तीनुसार जनता-जनार्दनाने मदतीचे अनेक हात पुढे केले. आणि अथक प्रयत्नांतून आवश्यक रक्कम उभी राहिली. ) – इथून पुढे)

या कामासोबतच प्रशासन, सेनादल यांचेशी समन्वय साधणे, विविध परवानग्या मिळवणे इत्यादी कामे अतिशय चिकाटीने आणि ध्यासाने पूर्ण केली! हत्ती जाईल पण शेपूट जाणार नाही अशी लूप-होल्स सर्वच ठिकाणी अनुभवाला येतातच. यावर जिद्द आणि आपल्या कामावरील विश्वास हाच उपाय! 

ऑक्सिजन निर्मिती संयंत्र जर्मनीहून आणले. त्यासाठी सर्व सोपस्कार, औपचारीकता पूर्ण केल्या. यंत्रसामग्री सियाचीन परिसरात पोहोचवणे मोठे कठीण! विमानात चढवलेले साहित्य कैक वेळा खराब हवामानामुळे पुन्हा उतरवून खाली ठेवावे लागत होते. यात चिथडे साहेबांनी सियाचीन परिसरात अनेक वेळा प्रवास आणि मुक्काम केला. तेथील हवामानाचा प्रतिकुल परिणाम चिथडे साहेबांच्या प्रकृतीवर झालाच. पण चिथडे दांमप्त्य आपल्या वीर जवानांसारखे परिस्थितीला तोंड देत राहिले. मध्येच कोरानाचे संकट उभे ठाकले, आर्थिक गणिते जुळेनात, शिवाय देणगीतील रक्कम फक्त आणि फक्त यंत्रणा खरेदीच्याच कामासाठी वापरण्याचे, वेतनावर खर्च होईल म्हणून कोणीही पगारदार साहाय्यक न नेमण्याचे, कार्याची अंमलवजावणी करण्याचा खर्च कटाक्षाने स्वकमाईच्या पैशांनी करण्याचे तत्व अंगिकारलेले असल्याने सियाचीनवरील हवामानासारखीच अनेक आव्हाने चिथडे पती-पत्नी आणि त्यांचे सहकारी यांच्यासमोर होती पण ते डगमगले नाहीत! शिवाय स्वत:वर होणारा खर्च अत्यंत अत्यावश्यक गरजेपुरताच राहील असा यांचा कटाक्ष तर प्रारंभापासूनच आहे.

या त्यागाचे, नियोजनाचे, कार्यक्षमतेचे, चिकाटीचे, ध्यासाचे फळ म्हणूनच सियाचीन मध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट अर्थात प्राणवायू निर्मिती संयंत्र उभारले गेले आणि कार्यांन्वयितही झाले. ही तारीख होती ४ ऑक्टोबर, २०१९! सियाचीन परिसरातील सैनिक, नागरीक, पर्यटक, गिर्यारोहक अशा आजपर्यंत ३५ हजार लोकांसाठी प्राणरक्षक ठरलाय हा ऑक्सिजन प्लांट! हनुमंतरायाने जणू संजीवनी बुटीसाठी सबंध द्रोणागिरी पर्वत उचलून आणण्यासारखा हा प्रकार नव्हे काय? हा प्लांट आतापर्यंत एकदाही बंद पडलेला नाही आणि ऑक्सिजन निर्मिती क्षमता आहे मिनिटाला २२४ लिटर्स! यामुळे कितीतरी जवानांचे, नागरीकांचे प्राण वाचवले जाऊ शकले! कोरोना काळात तर या प्लांटचा सर्वांनाच खूप उपयोग झाला.

दुस-या महायुद्धाच्या काळात, १९४० मध्ये डंकर्क या ठिकाणी इंग्लंड आणि दोस्त राष्ट्रांचे सैन्य शत्रूसैन्याच्या वेढ्यात अडकून पडले असताना इंग्लंडच्या जनतेने सैन्यास उत्स्फूर्त साहाय्य करून सोडवून आणले होते! यापेक्षाही चिथडे दांमप्त्याने लोकसहभाग मिळवून भारतीय सैन्याला दिलेले हे साहाय्य मोठे म्हणावे लागेल! ही तर जनतेचे प्राण वाचवणा-या सैनिकांना जनतेकडून मिळालेली फार मोठी भेट म्हणता येईल. किंबहुना हा जागतिक पातळीवरील अलौकीक विक्रमच असावा! पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी योगेशजी आणि सुमेधाजी चिथडे यांच्या कामाची वैय्यक्तिक पातळीवर दखल घेऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटीत चर्चाही केली आणि कौतुकही केले! सैन्यदल प्रमुख जनरल दिवंगत हुतात्मा बिपिनजी रावतसाहेब, मधुलिका रावत मॅडम यांनी योगेशजी आणि सुमेधाजींच्या कार्याची प्रशंसा केली होती! सेनाध्यक्ष जनरल श्री. मुकुंद नरवणेसाहेब आणि अशा अनेक दिग्गजांनी या कार्याचे कौतुक केले आहे… मुख्य म्हणजे सीमेवर लढणा-या सैनिकांचे, सियाचिन परिसरातील हजारो नागरीकांचे आशीर्वाद या कार्याला लाभले आहेत!

पण एका ऑक्सिजन प्लांटने गरज भागलेली नाही… देशाच्या इतर सीमांवर असे अजून किमान दोन प्लांट उभारण्याची चिथडे दांमप्त्याची योजना आहे कारण तशी गरजही आहे… अर्थातच यासाठी अजून मोठा पैसा लागणार आहे! वैय्यक्तिक समस्या बाजूस सारून योगेशजी आणि सुमेधाजी आता दुसरा ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारून देण्याच्या कामात व्यग्र झालेले आहेत. आता जनतेने मागे राहून चालणार नाही. सुमारे १४० कोटी नागरीकांच्या या महाकाय देशात जनतेला काय अशक्य आहे? फक्त सहृदय लोकांनी पुढे आले पाहिजे. चिथडे साहेब, सुमेधाताई यांच्या मनात आणखी बरेच उपक्रम आहेत. कर्तव्यावर असताना जखमी झाल्याने अपंग झालेले, निवृत्त झालेले सैनिक यांच्यासाठी निवासी संकुल, वीरपत्नींसाठी रोजगाराभिमुख उपक्रम, त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहाय्य इत्यादी खूप योजना आहेत. कामात आर्थिक, प्रशासकीय पारदर्शकता हे चिथडे दांमप्त्याने स्थापन केलेल्या ‘सिर्फ’ संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे! देणगीतील प्रत्येक पै ज्यासाठी देणगी दिली गेली आहे, त्याच कामासाठी खर्च केली जाते! 

पडद्यामागील हुतात्मे!

देशाचे रक्षण म्हणजे सैनिक, देशरक्षणासाठी युद्धभूमीवर मृत्यू पावणे म्हणजे हौतात्म्य असी सामान्यजनांची समजूत असते. परंतू काही देशप्रेमी नागरीकही आपल्या नागरी जीवनात राहून सैनिकाची भूमिका बजावत असतात आणि प्रसंगी आपल्या कर्तव्यासाठी आपल्या जीवाचीही पर्वा करीत नाहीत! 

पुण्यातील योगेश चिथडे हे असेच एक नागरीक-माजी सैनिक. योगेशजींनी काही वर्षे भारतीय हवाई दलात सेवा बजावली. त्यांना सैनिक जीवनातील समस्या, आव्हाने जवळून पाहता आली. सियाचिनसारख्या जगातील सर्वाधिक उंचावर असलेल्या युद्धभूमीवर लढताना सैनिकांना अक्षरश: श्वास कमी पडतो. या सैनिकांसाठी कृत्रिक श्वास अर्थात ऑक्सिजन प्लांंट उभारण्याची अलौकिक कल्पना योगेशजींना सुचली. यासाठीचा खर्च संपूर्णपणे जनतेतूनच उभारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांच्या पत्नी सुमेधाजींनी आपल्या पतीच्या या भगीरथ प्रयत्नांमध्ये तनमनधनाने साथ दिली. आणि देशात विविध ठिकाणी कोट्यवधी रूपये मूल्य असलेले ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प स्थापित झाले. कोरोनाच्या काळातही काम सुरू होते. निधी संकलनासाठी योगेशजी आणि सुमेधाजी यांनी शेकडो व्याख्याने दिली. आणि विशेष म्हणजे या सर्व कार्यासाठी स्वत:चा पैसा वापरला. जमा झालेल्या पैशांतून एकही पैसा त्यांनी कार्याच्या खर्चसाठी वापरला नाही. योगेशजींनी प्रत्यक्ष सियाचिन परिसरात कित्येक दिवस राहून ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी अभ्यास केला. प्रत्यक्ष प्लांट कार्यान्वित करण्यासाठी विविध संस्थांशी संपर्क साधला. या सर्व खटाटोपात सियाचिनमधील अतिथंड वातावरणाचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झालाच. पण त्याची पर्वा न करता या माजी सैनिकाने आपले कर्तव्य पार पाडले. वयाच्या अवघ्या ६१व्या वर्षी योगेशजींनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या भगीरथ प्रयत्नांची दखल देशाच्या पंतप्रधानांनीही घेतली होती आणि संरक्षणदलांनीही. योगशजींंच्या मनात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठीच्या अनेक योजना होत्या आणि त्यापैकी काही त्यांनी प्रत्यक्षातही आणल्या. पण अजूनही खूप काही करायचे होते. आता यापुढे सुमेधाताईंवर सारा भार असेन. आपणही त्यांच्या कार्यात सहभागी होणे गरजेचे आहे. या पडद्यामागच्या सैनिकाला आणि त्यांच्या त्यागाला शतश: वंदन आणि भावपूर्ण श्रद्धांजली… जय हिंद योगेश साहेब! हा देश आपले योगदान कधीही विसरणार नाही. आपल्या आत्म्यास सद्गती लाभेलच कारण हुतात्मा सैनिकांच्या आत्म्यांना ती लाभतेच.

(… या कार्याला प्रत्येक भारतीय देशप्रेमी नागरीकाचा हातभार लागणे गरजेचे आहे… कारण आपल्या सैनिकांना श्वास देणे म्हणजे आपलेच श्वास जपण्यासारखे आहे ! संपर्कासाठी लॅन्डलाईन टेलिफोन क्रमांक (020-25656831) मोबाईल क्रमांक योगेशजी चिथडे (9764294291) सुमेधाजी चिथडे (9764294292) 

ईमेल:- cyogeshg@rediffmail. com, cnborole@gmail. com 

Bank of Maharashtra A/c 60273878996 (IFSC-MAHA0000243) (MICR:-411014034) 

… देशसेवेचे आव्हान आहे म्हणूनच हे आवाहन आहे. वाचकांनी निश्चितपणे विचार करावा, ही विनंती.) 

– समाप्त –

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा ! – भाग-१ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा ! – भाग-१ ☆ श्री संभाजी बबन गायके 

सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा !

… अर्थात गिरीशिखरांच्या भाळी श्वासगंध रेखताना…! 

श्री. योगेश चिथडे आणि सौ. सुमेधा चिथडे यांनी सियाचीन मधील सैनिकांसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारून देण्यासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्नांची कहाणी!

सियाचीन या जगातील सर्वाधिक उंचावर असलेल्या युद्धभूमीमध्ये आणि लगतच्या शेकडो किलोमीटर्स परिसरात श्वास दुर्लभ आहे. सपाटीवर मुबलकतेचा अंगरखा पांघरून वा-यासवे पिंगा घालणारा प्राणवायू शिखरावर चढता-चढता अगदी मलूल झालेला असतो. खोल डोहात बुडी मारून तळावर पहुडलेला एखादा शिंपला वर आणावा तसा प्रत्येक श्वास सैनिकांना आसमंतातून कुडीत ओढून घ्यावा लागतो…. शिंपल्यातून मोती मिळवावा तसा! 

सैनिक देहाच्या माळावर श्वासांचं शिंपण करतात ते सीमांचं रक्षण करण्यासाठी…. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत! ह्या श्वासांचं आयुष्य वाढवायला हवं हा विचार छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा पुण्य-प्रभाव असलेल्या एका सहृदय दांमप्त्याच्या हृदयावर कोरला गेला तो परमवीर चक्र विजेते ऑनररी कॅप्टन श्री. बानासिंग यांच्या एका वाक्यामुळे!

श्री. योगेशजी चिथडे भारतीय हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रात तर सौ. सुमेधाताई चिथडे या त्यांच्या सहधर्मचारीणी पुणे शहरात शिक्षिका म्हणून कार्यरत. चिथडे दांम्पत्याचे एकुलते एक चिरंजीव देशाच्या सीमेवर भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. प्रवाहपतिताप्रमाणे जीवन जगणे योगेशजींना आणि सुमेधाताईंना पसंत नाही. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे ‘देहातून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो आणि आपण या देशाचे काही देणे लागतो’ हे सुमेधाताईंच्या मनात रूजलेले वाक्य! अंगावर लष्करी गणवेश नसला तरी देशसेवा बजावता येते हे सुमेधाताईंनी योगेशरावांच्या साथीने अंगिकारलेल्या कार्यातून दाखवून दिले. हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचे, वीरपत्नींचे अश्रू पुसण्याचा वसा या दोघांनी घेतला आणि प्रत्यक्षात गावा-गावात जाऊन काम सुरू केले. सणावाराला या वीरपत्नींना, वीरमातांना आपल्या घरी माहेरपणाला आणणे, त्यांच्या घरी सणासुदीचे खाद्यपदार्थ पोहोचवणे, आर्थिक नियोजन करण्यात जमेल ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्य हे दांमप्त्य केवळ स्वबळावर आणि स्वयंस्फूर्तीने करीत होतेच. यानिमित्ताने त्यांचा सैनिकीसेवेमधील अनेकांशी निकटचा संबंध आला. शूरवीरांचा सन्मान करण्याच्या अशाच एका उपक्रमात परमवीर चक्र विजेते ऑनररी कॅपन बानासिंग साहेब यांचे चिथडे कुटुंबात येणे झाले आणि ‘आम्ही सैनिकांसाठी आणखी काय करू शकतो?’ या सुमेधाताईंच्या प्रश्नावर बानासिंग साहेबांनी उत्तर दिले होते… जवानों की सांसों के लिए कुछ कर सकते है तो किजिए…. सैनिकांच्या श्वासांसाठी काही करता आले तर करा!” 

ह्या एका वाक्याने चिथडे पती-पत्नींना एक वेगळीच दिशा दाखवली. त्यांनी तत्परतेने या दिशेला आपला मोर्चा वळवला. सियाचीन आणि आसपासचा परिसर ऑक्सिजनच्या कमतरतेसाठी कुप्रसिद्ध आहे. सीमांचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्याला सियाचीन आणि परिसरात मोठ्या प्रमाणात जवान तैनात ठेवावे लागतातच. एका आकडेवारीनुसार सियाचीन या जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या युद्धभूमीवर आणि परिसरात आज पर्यंत सुमारे अकराशे सैनिक देशरक्षणाच्या कर्तव्यावर असताना हुतात्मा झालेले असून यातील सर्वाधिक बळी हिमप्रपात, हिमस्खलन आणि विशेषत: श्वसनासंबंधींच्या आजारांनी घेतलेले आहेत! म्हणजे येथील सर्वांत मोठा शत्रू म्हणजे हवामान… इथल्या वातावरणातील ऑक्सिजनचा कमालीचा तुटवडा आणि जीवघेणी थंडी! 

High Altitude Pulmonary Oedema, Acute Mountain Sickness, Frost Bite Chilblains, Hypothermia, Snow Blindness हे सियाचीन मध्ये तैनात सैनिकांना आणि परिसरातील नागरीकांना भेडसावणारे जीवघेणे आजार. या आजारांवरील सर्वांत महत्त्वाचा उपचार म्हणजे रूग्णाला कृत्रिम ऑक्सिजन देणे! 

सियाचीन जवळ परतापूर येथे भारतीय लष्कराचे विशेष रूग्णालय कार्यरत आहे… याला सार्थ नाव आहे… Siachen Healer… to heal म्हणजे बरे करणे! या रूग्णालयात केवळ सैनिकच नव्हेत तर आसपासचे नागरीक, पर्यटक, गिर्यारोहक यांनाही आरोग्यसेवा पुरविल्या जातात. इतर ठिकाणांहून ऑक्सिजनचा पुरवठा नियमितपणे करणे सियाचीनमधील लहरी हवामानामुळे कठीण असते. म्हणून या ठिकाणी कृत्रिमरित्या ऑक्सिजन निर्मितीची गरज असते आणि तशी सुविधाही भारतीय लष्कराने उपलब्ध करून दिली आहे. बाणासिंग साहेबांच्या सोबत झालेल्या संभाषणातून ह्या यंत्रणेला अत्याधुनिकतेची जोड देण्याची गरज आहे हे चिथडे दांम्पत्याने ओळखले आणि चिकित्सक अभ्यास सुरू केला. १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्याने मोठा पराक्रम गाजवला होता, पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांना दाती तृण धरून शरण येण्यास भाग पाडले होते. या अलौकीक पराक्रमाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष जवळ येऊन ठेपले होते. यानिमित्त भारतीय सैनिकांना अभिवादन म्हणून भारतीय जनतेच्या स्वयंस्फूर्त आर्थिक सहभागातून ‘ऑक्सिजन निर्मितीचा अत्याधुनिक, सुसज्ज प्लांट भेट म्हणून देण्याची कल्पना श्री. योगेश चिथडे आणि सौ. सुमेधाताई योगेश चिथडे यांना सुचली! ही एक खरोखर अभूतपूर्व कल्पना होती! सरकार, सैन्य तर आपल्या सैनिकांच्या कल्याणाची तजवीज कायमच करीत असते, पण नागरीकांचाही यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा असतो. देश आपल्यासाठी काय करतो, यापेक्षा आपण देशासाठी काय करतो असा प्रश्न प्रत्येकाला खरा तर पडलाच पाहिजे!

 खरं तर हे काम म्हणजे स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणण्यासारखे मोठे काम होते. भरपूर संशोधन केल्यानंतर चिथडे साहेबांनी जर्मनीतील एक कंपनी ऑक्सिजन यंत्रणा पुरवू शकेल हे शोधून काढले. पण ही यंत्रणा विकत घेणे, वाहतूक करणे, यंत्रणा प्रत्यक्ष कार्यांन्वयित करणे यासाठी सुमारे अडीच कोटी इतका मोठा खर्च येणार हेही दिसले! शिवाय विविध प्रशासकीय परवानग्या मिळवणे, विविध यंत्रणांशी संपर्क साधणे, त्यांना योजना समजावणे इत्यादी आव्हाने तर होतीच. पण चिथडे पती-पत्नींनी हे शिवधनुष्य स्वत: पुढाकार घेऊन पेलण्याचा प्रण केला! पैशांचं सोंग आणणे अशक्यच असते. देशप्रेमी लोकांकडून आर्थिक सहाय्य मिळवणे हा एकमेव मार्ग होता. गरज अडीच कोटी रूपयांची होती! सुमेधाताईंनी आपल्या अंगावर असलेले सुवर्णालंकार विकले आणि त्यातून आलेले एक लाख पंचवीस हजार आठशे पंधरा रूपये ‘सिर्फ’ मध्ये जमा केले आणि ऑक्सिजन प्लांट साठी निधी संकलनाच्या कार्याचा सुवर्ण-शुभारंभ केला! ‘सिर्फ’ म्हणजे आकड्यांनंतर लिहिला जाणारा ‘फक्त’ या अर्थाचा शब्द नव्हे! योगेशराव आणि सुमेधाताई खूप आधी पासूनच सैनिकांसाठी, वीरपत्नींसाठी, त्यांच्या मुलांसाठी, वीरमाता-पित्यांसाठी अगदी ग्रामीण भागात जाऊन काम केलेले आहे! त्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन ‘Soldiers’ Independent Rehabilitation Foundation(SIRF) अर्थात ‘सिर्फ’ ही सामाजिक संस्था स्थापन केली आहे. आधी केले आणि मग सांगितले या उक्तीनुसार कार्यास सुरूवात केल्यामुळे योगेशराव आणि सुमेधाताईंना या अभूतपूर्व उपक्रमासाठी निधी देण्याचे आवाहन इतरांना करण्याचे नैतिक बळ प्राप्त झाले. योगेशजी आणि सुमेधाजी आपापल्या नोक-या सांभाळून निधी-संकलनाच्या कार्याला लागले. सियाचीनची, तिथल्या भौगोलीक, हवामान-विषयक, आरोग्यविषयक बाबींची माहिती मिळवली, मूळ समस्या, तिच्यावरील उपाय याचा सविस्तर विचार केला. यावर आधारीत पीपीटी प्रेझेंटेशन तयार केले आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातील हजारो लोकांना दाखवले आणि सैनिकांच्या श्वासांसाठी सामान्य जनतेच्या भावनांना साद घातली. निधी-संकलनाच्या यानिमित्ताने चिथडे पती-पत्नींना आलेल्या ब-या-वाईट अनुभवांचे तर एक पुस्तकच तयार होईल! वृद्धाश्रमात राहणारी आणि तिच्या लेकाने खाऊसाठी दिलेले वीस रूपये सैनिकांसाठी देणारी एक माता, माझा वर्षभराचा पगार घ्या असे म्हणणारी एक मोलकरीण भगिनी, बोहनी झालेली नसतानाही गल्ल्यातील एकावन्न रूपये काढून देणारा गरीब भाजी विक्रेता, आमच्या काही महिन्यांच्या पेन्शनची रक्कम या कार्यासाठी घ्या असे म्हणणा-या वीरपत्नी, आपले खाऊचे पैसे देणारी एक आठ-नऊ वर्षांची बालिका असे ‘नाही रे’ गटातील एका बाजूला आणि ‘आहे रे’ गटातील काही कंजुष श्रीमंत एका बाजूला! आपल्या विचाराच्या प्रचारासाठी सुमेधाताईंनी तेरा दिवस तेरा घरांमध्ये जाऊन प्रबोधन करण्याचे व्रतही पार पाडले! योगेशजींच्या समवेत चार हजारांहून अधिक कुटुंबांशी, अनेक संस्था, व्यक्ती यांचेशी संपर्क साधला. स्वत:चे वैय्यक्तिक आयुष्य, सणसमारंभ, कौटुंबिक समारंभ दूर ठेवले. तरीही पुरेशी रक्कम जमा होत नाहीये असे पाहून स्वत:चे राहते घरही विकण्याची तयारी केली. पण सत्य संकल्पाचा दाता नारायण या उक्तीनुसार जनता-जनार्दनाने मदतीचे अनेक हात पुढे केले. आणि अथक प्रयत्नांतून आवश्यक रक्कम उभी राहिली.

– क्रमशः भाग पहिला.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मोक्ष… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ मोक्ष… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आज मी एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट म्हटले की कसे सावरून बसतो, कान टवकारून ऐकतो. आणि माहिती, भाषण म्हटले की सतरंजीचे दोरे काढतो. आता सध्याच्या काळात हे दोरे म्हणजे अंगठ्याने भरकन पुढे ढकलणे (सोप्या भाषेत म्हणजे स्क्रोल करणे).

 श्रावण महिना सुरु झाला की अनेक सण, उत्सव यांना सुरुवात होते. उपास, व्रतवैकल्ये यांना सुरुवात होते. त्यात श्रावणी सोमवार या दिवसाचे खास महत्व असते. कित्येक मंडळी बाकी काही नाही तरी श्रावणी सोमवार आवर्जून करतात. आपल्याला वाटले असेल मी आता श्रावण महिन्याचे महत्व सांगणार की काय? पण तसे नाही हो! हे सगळे तर सर्वांना माहितच आहे. आणि आपल्या कडे शंकराची मंदिरे पण खूप आहेत.

तर माझे पण असेच होते श्रावण महिना आला की मी पण अत्यंत भाविक होते. आणि कोणत्या शंकर मंदिरात दर्शनासाठी जाता येईल, अशी संधी व मैत्रिणी शोधत असते. मागच्या वर्षी असेच मैत्रिणी मिळून ओतुरच्या कपर्दिकेश्वर येथील मंदिरात दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. तिथले वैशिष्ठ्य लहानपणी पासून ऐकून होतो. त्या वेळी मोठ्या माणसांच्या बरोबर दर्शन घेतले होते. पण ते नंतर विस्मरणात गेले. म्हणून श्रावणी सोमवारी जाण्याचे ठरवले. जायचे म्हणजे थोडीफार माहिती असावी म्हणून आपल्या गुगल बाबांना विचारले तर त्यांनी सचित्र इतिहास समोर ठेवला की! अगदी नावा पासून माहिती सांगितली.

ऐतिहासिक वारसा असणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक पुरातन अशी शिवमंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील काही मंदिर ही शेकडो वर्षे जुनी आहेत. त्यातीलच एक शिवमंदिर म्हणजे पुणे शहराच्या उत्तरेला जुन्नर तालुक्यातील ओतूर शहरामधील मांडवी नदीच्या तीरावर असणारे कपर्दिकेश्वर मंदिर आहे. या शिवमंदिराला 900 वर्ष जुना इतिहास आहे. या मंदिरामध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी महादेवाची मोठी यात्रा भरते.

तांदळापासून बनवलेल्या आणि एका लिंबावरती उभ्या असणाऱ्या पिंडी’ हे तेथील वैशिष्ठ्य.

या ठिकाणी शिवलिंगावर कोरड्या तांदळापासून बनवलेल्या आणि एका लिंबावर उभ्या असणाऱ्या तांदळाच्या पिंडी भाविकांचे प्रमुख आकर्षण असते. म्हणूनच या ठिकाणी प्रत्येक श्रावणी सोमवारी जवळपास 1 लाखाहून जास्त भक्त दर्शनासाठी येत असतात. या सोबतच श्रावणी सोमवारच्या यात्रेनिमिताने या ठिकाणी कुस्त्यांचा देखील आनंद आपल्याला घेता येतो. सोबतच मंदिराशेजारीच संत तुकाराम महाराज यांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांचे समाधी मंदिर आहे. महाराष्ट्रातील प्रमुख तीन संजीवन समाधीपैकी ही एक आहे तसेच जगभर प्रसिद्ध असणाऱ्या ‘राम कृष्ण हरी’ या मंत्राचे हे उगमस्थान आहे.

मंदिराचा इतिहास-

श्री बाबाजी चैतन्य महाराज हे या मांडवी नदी तीरावर अनुष्ठानासाठी बसले असता त्यांनी एक वाळूचे शिवलिंग तयार केले होते. शिवलिंग तयार करताना त्यांना त्या वाळूत एक कवडी मिळून आली त्या कवडीत एक शिवलिंग सापडले. संस्कृतमध्ये कवडीला कपर्दीक असे म्हणतात त्यावरून या शिवलिंगाचे कपर्दीकेश्वर असे नामकरण करण्यात आलं आणि सन 1200 च्या शतकात शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. चंद्राकार मांडवी नदी तीरावर निसर्गरम्य परिसरात हे पुरातन भव्य मंदिर वसलेले आहे. शिवलिंगाच्या स्थापनेपासूनच येथील पुजारी यांनी प्रत्येक वर्षी याच शिवलिंगावर कोरड्या तांदळाच्या पिंडी बांधण्यास सुरुवात केली. ती परंपरा आजही सुरू आहे.

सगळे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात –

  1. पवित्र श्रावण महिन्यातील सर्व सोमवार
  2. महाशिवरात्री
  3. त्रिपुरारी पौर्णिमा
  4. मंदिराजवळ असणाऱ्या बाबाजी चैतन्य महाराजांचा समाधी सोहळा.

ज्या ठिकाणी जायचे त्याची माहिती आधीच घ्यावी आणि तिथे जाऊन आल्यावर आपले अनुभव सांगावेत. असे वाटते.

कपर्दिकेश्वर मंदिराची पूर्ण माहिती घेऊन आम्ही श्रावणी सोमवारी सकाळी लवकर ओतूर येथे पोहोचलो. तेथील जत्रा, मंदिर, तांदुळाच्या पिंडी सगळे बघण्याची उत्सुकता होतीच. जत्रा पण खूप लहानपणी बघितली होती. असे वाटत होते, लवकर पोहोचलो आहोत. एक तासात दर्शन घेऊन लगेच परत येता येईल. गाडीत तर हे पण ठरवत होतो की दर्शन घेतल्यावर अजून कुठे जाता येईल? पण प्रथम मोक्ष दात्याच्या दर्शनाची ओढ होती. म्हणून तिथे पोहोचलो.

तेथे गाडी पार्किंग साठी मोठीच व्यवस्था होती. आणि पार्किंग ते मंदिर हे जवळच साधारण दीड ते दोन किलोमीटर होते. आणि त्या दरम्यान सगळी जत्रा! सगळी दुकाने इतकी मोहात पाडणारी होती. विशेषत: स्त्रियांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. निरनिराळी ज्वेलरी, स्वयंपाकाची विविध भांडी, पिशव्या, हेअर पिन, क्लिप्स अगदी काय बघू आणि काय नको असे झाले होते. विविध खाद्य पदार्थ होतेच. पण अगदी निग्रहाने सगळी कडे मनावर दगड ठेवून दुर्लक्ष केले. एकमेकींचे हात धरुनच जावे लागले. कारण गर्दीच इतकी होती. आणि त्यात एकमेकींना सांगत होतो, प्रथम दर्शन घेऊ आणि येताना खरेदी करु. कारण पुढे काय होते माहितीच नव्हते.

सगळ्या गर्दीतून वाट काढत कसे बसे मंदिरा जवळ पोहोचलो. साधारण आपण मंदिराच्या आत प्रवेश करताच चप्पल काढतो. आम्ही पण काढणार होतो. पण एकूण गर्दी पाहून दर्शन रांग कुठे आहे ते पहावे म्हणून पुढे गेलो. तर काय सांगावे… दर्शना पूर्वीच मंदिराला प्रदक्षिणा घालावी लागली. आणि चप्पल न काढण्याचा शहाणपणाचा निर्णय योग्य ठरला. आणि जागोजागी चप्पल काढा आणि इथे ठेवा असा दुकादारांचा आग्रह टाळला याचेही समाधान वाटले. मंदिराच्या मागच्या बाजूने ३०/४० दगडी पायऱ्या चढून जायचे होते. तेथेही चप्पल कुठे काढावी ही चिंता होतीच. शेवटी माझी नेहमीची युक्ती कामी आली. चप्पल काढून एका पिशवीत ठेवून ती आपल्या जवळच ठेवावी हे सर्वांनाच पटले आणि तसेच केले. त्या मुळे एक चिंता तर मिटली.

इतके गोल फिरून आल्यावर वाटले आता दर्शन होणार! एका छोट्या दरवाज्यातून आत प्रवेश केला. आणि देव किती दूर आहे याची थोडी कल्पना आली. कारण आत बऱ्याच बांबूच्या काठ्या लावून गोल गोल ओळी फिरवल्या होत्या. सगळ्या ओळी फिरत फिरत २/३ तास फिरलो तरी त्या रांगा संपेचनात. आणि पायात काही नसल्याने खडे चांगलेच टोचत होते. थोडे पुढे गेल्यावर त्याचे गुपित कळले. बरीच माणसे त्या बांबूच्या मधून रांगेत मधे मधे शिरत होती. मग आमचा नंबर कसा लागावा? अशा रांगेत फार गमती अनुभवल्या.

त्या रांगेत शेजारी भेटले. जुन्या मैत्रिणी भेटल्या. छोटी मुले तर मस्त इकडून तिकडून फिरण्याचा आनंद घेत होती. काही चतुर महिला आपली छोटी मुले पुढे पाठवून ( बांबूच्या खालून ) त्या मुलाच्या निमित्ताने पुढे पुढे जात होत्या. आमच्या मनात एकच विचार येत होता. मोक्षदात्याच्या दर्शनाला थोडे कष्ट तर होणारच! असे सहज दर्शन होणार नाही. आणि ती मानसिकता असल्या मुळे सगळ्याचा आनंद घेत होतो. त्यात एक सात्विक महिला भेटली. तिथले झाड त्याची महती, दर्शनाने मोक्षप्राप्ती कशी होते. रांगेत मधे शिरू नये. देवाच्या दारी थोडे कष्ट सोसावे. आपल्या शरीराला कष्ट सोसावे लागले, पायाला खडे टोचले, तहान भूक सहन केली तर ते दर्शन मोक्षाप्रद नेते. तिने स्वतः कोणकोणती ठिकाणे किती शारीरिक कष्ट सोसून पहिली व दर्शन घेतले हे अगदी रंगवून रंगवून सांगितले. तिच्या त्या मोक्षाचा रस्ता दाखवण्या मुळे आम्ही फारच भारावून गेलो. आणि आता तिच्या पाया पडावे अशा विचारात होतो. तेवढ्यात आमचे लक्ष विचलित झाले. थोड्या वेळाने आम्ही मोक्ष दर्शनाचा मार्ग दाखवणाऱ्या महिलेला शोधू लागलो. अचानक ती कुठे गेली कळेचना! काही वेळाने ती महिला आम्हाला कष्ट घेऊन केलेल्या दर्शनाने कसा मोक्ष मिळतो हे पटवून स्वतः मात्र बांबूच्या मधून सगळ्या रांगा ओलांडून ७/८ रांगा पुढे मोक्षदात्याच्या दर्शनाला बरीच पुढे निघून गेली होती.

बऱ्याच रांगा ओलांडल्यावर, बरेच खडे पायात टोचवून घेतल्यानंतर त्या मोक्षदात्याच्या समोर दर्शनाला उभे राहिलो. आणि तो सोहळा, त्या जगप्रसिद्ध तांदुळाच्या पिंडी बघून ४/५ तासाच्या सर्व कष्टाचे सार्थक झाले.

इतके तास तिथे उभे राहिल्या नंतर ती जत्रा, खरेदी सगळे दुर्लक्षित झाले. त्यात एक बरे होते, आपण रस्ता चुकू अशी शक्यता व चालण्याचे कष्ट नव्हते. कारण गर्दीच आम्हाला ढकलून ते काम करत होती. आपण फक्त एकमेकींचे हात धरून उभे राहायचे. पार्किंग पर्यंत गर्दीने आपोआप आणून सोडले. आणि इतके तास झाल्या नंतर इतर ठिकाणी जाण्याचा प्रश्नच नव्हता.

असे मोक्षदात्याचे दर्शन व ती छोटी सहल अगदी अविस्मरणीय झाली.

©  सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मॉम… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ मॉम… ☆ श्री सुनील शिरवाडकर

वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यानं आपल्या पुस्तकांच्या विक्रीचा आढावा घेतला.. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आत्तापर्यंत आपल्या पुस्तकांच्या जवळपास चार कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत.

मानधनातुन अफाट पैसा कमावणारा हा अब्जाधिश लेखक..

सॉमरसेट मॉम..

आपल्या लेखणीच्या बळावर समाजातील उच्च समजली जाणारी मंडळी त्याच्या स्नेहात होती‌. त्याच वर्तुळात त्याचा वावर होता… भारतात जेव्हा तो आला होता.. तेव्हा तर व्हाईसरॉयचा खास पाहुणा म्हणूनच आला होता. आपल्या प्रचंड इस्टेटीतला काही भाग काढून त्यानं सॉमरसेट मॉम प्रतिष्ठान सुरु केलं. अनेक होतकरु लेखकांना पैसा उपलब्ध करुन दिला..

त्याचं लेखन अतिशय शिस्तशीर.. सकाळी नऊ ते दुपारी एक ही त्याची लिहीण्याची वेळ.. अगदी रोजच्या रोज.. सुट्टी नाही.. सण नाही.. वार नाही.. रविवार पण नाही.. प्रवासात असलं तरीही खाडा नाही..

रोजच्या रोज काय सुचणार? पण नाही.. तो टेबलपाशी जाऊन बसायचाच.. ती एक शिस्तच लावून घेतली होती त्यानं.. काहीच सुचलं नाही तर कागदावर सही करून परत परत गिरवायचा.

मुळचा तो लघुकथा लिहिणारा.. पण त्याने अनेक कादंबऱ्या लिहिल्या.. नाटकं लिहिली.. चित्रपट लेखन केलं.. लेखक म्हणून त्याची प्रतिमा तेजस्वी होती.. पण..

.. पण त्याच्या आयुष्याला एक दुसरीही बाजू होती.

सॉमरसेट मॉम बोलताना अडखळत बोलायचा.. तोतरा.. त्यामुळे त्याच्या मनात न्युनगंड निर्माण झाला होता.. सगळ्यांपासून दुर दुर रहायचा.. खास करुन स्त्रियांपासून..

आणि यातूनच त्याच्यात लैंगिक विकृती निर्माण झाली होती.. त्यानं चार लग्न केली.. पण ती टिकली नाहीत.. सगळेजण आपल्या वाईटावर आहेत असंच त्याचं म्हणणं असायचं.. सगळ्यांबद्दल मनात संशय.. त्यामुळे भांडणं.. ‌मग अवहेलना..

त्याला एक मुलगीही होती. सायरा तिचं नाव.. तिच्याशी तर त्याचं अजिबात पटलं नाही.. तिच्यावर त्यानं नाही नाही ते आरोप केले. ती कशी लबाड आहे.. वाईट चालीची आहे हे तो वारंवार सांगु लागला. एका अमेरिकेन मासिकात त्यानं सायराचं चारित्र्यहनन करणारी लेखमालाच लिहिली.

पण लोकांना ते आवडलं नाही.. त्याच्या नेहमीच्या प्रकाशकांनी पण ते ग्रंथरूपात आणण्यास नकार दिला.

त्याची एक आजी होती.. ती पण थोडंफार लेखन करायची. लहान मुलांसाठी तिनं अनेक छोटी छोटी पुस्तकं तिनं लिहिली होती.. वाटायचं तिला आपल्या नातवानं पण ती वाचावी.

पण सॉमरसेटनं ती कधीच वाचली नाही.. तो तिला भेटतही नसे.. खुप दुस्वास करायचा. आपल्या अगोदर आपल्या घराण्यात कुणी लेखन केलंय याच गोष्टीचा राग त्याच्या मनात कायम होता.

वयोमानानुसार आजी म्हातारी झाली.. अनेक व्याधी तिला जडल्या.. पण मरतेसमयी तिच्या जवळ फुटकी कवडीही नव्हती. ‌पैशाच्या अभावी ती उपचार घेऊ शकली नाही. नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेली ॲन आजी वाट पाहु लागली.. नातवाची..

.. पण मॉमने तिची घोर उपेक्षा केली. तो तिला भेटायला आलाच नाही.. बेवारस मरणच तिच्या नशिबी होतं.

सॉमरसेट मॉमची ही दोन रुपं. वयाच्या पंचाहत्तरीत त्यानं लेखन थांबवलं.. आणि वयाच्या नव्वदीत आल्यावर त्याला जाणवलं….

…. काय मिळवलं मी? माझं सगळंच चुकत गेलं.. माझं सगळं आयुष्य फुकट गेलं..

आत्महत्येचे विचार त्याच्या मनात चोळु लागले.. पण ती वेळच आली नाही.. ऐश्वर्यसंपन्न असलेला सॉमरसेट मॉम वयाच्या ब्याण्णव्या वर्षी एकाकी अवस्थेत हे जग सोडून गेला.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मॅरेथॉन – एक सत्यकथा’ – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘मॅरेथॉन – एक सत्यकथा’ – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

लता भगवान करे 

मॅरेथॉन – एक सत्य कथा

हॉस्पिटलातील कोपऱ्यातल्या बाकावर मिनमिनत्या दिव्याखाली विमनस्क अवस्थेत ती बसलेली असते.

वय वर्षे 65, नांव लता…

रात्र बरीच उलटलेली असते. वर्तमान पत्राच्या कागदात गुंडाळलेली नोटांची पुरचुंडी ती पुन्हा सोडते आणि पैसे मोजत राहते पण काही केल्या 2000 रूपयांच्या वर आकडा जात नाही. नकळत ती आपल्या गळ्यावरून हात फिरवते नंतर दोन्ही कान चाचपते व पुन्हा हिशोब करते आता रोख रक्कम, गळ्यातले मंगळसूत्र आणि कानातल्या बुगड्या धरून सगळी गोळा बेरीज साधारण 25000 रूपयां पर्यत जाते. तिची गरज आणि उपलब्ध रक्कम यात खूपच तफावत असते असते. हे अंतर कस मिटवायचं याचा विचार करून करून ती थकते आणि त्या ग्लानीतच कधीतरी तिचा डोळा लागतो.

अचानक अंब्युलन्सच्या सायरनचा आवाज होतो तशी ती दचकून जागी होते. कुणाचीतरी डेड बॉडी अंब्युलन्समध्ये घातली जाते आणि काळाकुट्ट धुुर ओकत ती अंब्युलन्स अंधाराच्या कुशीत हरवून जाते. कुठतरी गावठी कुत्र भेसूर रडतं तस तिच्या छातीत धस्स होत. धावतच ती ICU च्या दरवाजापाशी येते आणि त्यावर लावलेल्या काचेतून आत डोकावते. पांढऱ्याशुभ्र बेडवर तिचा नवरा जीवन-मृत्यूच्या उंबरठ्यावर पहुडलेला असतो. क्षणभर ती पांडुरंगाला हात जोडते “देवा, माझं उरलंसुरलं सार आयुष्य माझ्या नवऱ्याला लाभू दे रे!” अशी आर्त प्रार्थना करत रिसेप्शन काऊंटरकडे धावते. समोरच्या नर्सला पुन्हा विचारते “मॅडम, नक्की किती खर्च येईल ह्यांच्या उपचाराला?”. तिच्या रोजच्या प्रश्नाला नर्स शांतपणे तेच उत्तर देते…

“हे बघा आजी, सरकारी योजनेतून त्यांच ऑपरेशन केलं तरी त्यासाठी किमान लाख ते सव्वा लाख रूपये खर्च येईल आणि डॉक्टर म्हणालेत की, हे ऑपरेशन पंधरा दिवसात झालं तर ठीक नाही तर… ” 

पुढचं काही ऐकण्यासाठी ती तिथ थांबतच नाही आणि इतकी मोठी रक्कम आणायची कुठून या विवंचनेत अडकून राहते.

खाजगी कंपनीतून रिटायर झालेल्या तिच्या नवऱ्याची आयुष्याची सारी पुंजी संसाराच्या रहाटगाडग्यात आणि त्यांच्या तीन मुलींच्या लग्नात केंव्हाच संपलेली असते आणि जावयांच्या पु़ढे हात पसरण तिच्या स्वाभिमानी मनाला पटत नसतं.

सगळीकडून फाटलेल्या आकाशाला आयुष्यभर ठिगळं लावता लावता हतबल झालेली ती पुन्हा कोपऱ्यातल्या बाकावर मिनमिनत्या दिव्या खाली येऊन बसते वर्तमान पत्राच्या कागदात गुंडाळलेली नोटांची पुरचुंडी पुन्हा सोडते आणि पैसे मोजत राहते अचानक तिच लक्ष त्या वर्तमान पत्रातल्या जाहिरातीकडे जाते…

शरद मॅरेथॉन स्पर्धाः 

पहिले बक्षिसः रोख रूपये एक लाख…

सकाळ होताच ती तडक चालू लागते. पत्ता शोधत शोधत स्पर्धेच्या आयोजकाच ऑफीस गाठते आणि त्या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेते.

स्पर्धा सुरू होते रोज सराव करणारे हौसे, गवसे, नवसे  स्पोर्ट शूज, कॅप, टी शर्ट आणि बरच काही घालून सज्ज असतात. त्यामध्ये नऊवारी लुगडे नेसलेली “ती”  अनवाणी पायाने उभी असते. सगळा जीव गोळा करून फडफडणाऱ्या झेंडयाकडे पहात असते. कुठेतरी शिट्टी वाजते, हिरवा झेंडा खाली पडतो तशी ती बेभान होऊन वाऱ्याच्या वेगाने धावत सुटते. आता तिच्यापुढे ICU मध्ये जीवन-मृत्यूच्या उंबरठ्यावर शुन्यात नजर हरवून बसलेला तिचा नवरा आणि त्याच्या ऑपरेशनसाठी लागणारी रक्कम एव्हडचं दिसत असतं.

कुठेतरी फट्ट असा आवाज होऊन आडवी बांधलेली लाल रंगाची रिबन ताडकन तुटली जाते तशी ती भानावर येते इकडे-तिकडे पहाते तर तिच्या मागे-पुढे कोणीच नसते आणि समोरची विजयाची कमान फटाक्यांच्या आतषबाजीत तिच स्वागत करत असते…

शरद मॅरेथॉन स्पर्धा तिनं प्रथम क्रमांकान जिंकलेली असते.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील.. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या लता करे आणि भगवान करे या जोडप्याची ही प्रेरणादायी कथा…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १२ — भक्तियोग — (श्लोक ११ ते २0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १२ — भक्तियोग — (श्लोक ११ ते २0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः । 

सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्‌ ॥ ११ ॥

*

असाध्य तुजला असतील अर्जुना ही सारी साधने

मतीमनाचा जेता होउनी त्याग कर्मफलाचा करणे ॥११॥

*

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाञ्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते । 

ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम्‌ ॥ १२ ॥

*

अजाण अभ्यासाहुनिया खचित श्रेष्ठ ज्ञान

ज्ञानापरिसही अतिश्रेष्ठ परमेशरूप ध्यान

तयापरीही श्रेष्ठतम जाणी त्याग कर्मफलांचा 

त्वरित प्राप्ती परम शांतीची लाभ असे त्यागाचा ॥१२॥

*

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च । 

निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥ १३ ॥ 

सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः । 

मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १४ ॥

*

निस्वार्थी अद्वेष्टी दयावान प्रेमळ क्षमाभाव

ममत्व नाही निरहंकार सुखदुःखसमभाव

योगी सदैव संतुष्ट दृढनिश्चयी आत्मा जयाचा

मतीमनाने अर्पण मजला भक्त मम प्रीतिचा ॥१३, १४॥

*

यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः । 

हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १५ ॥

*

कुणापासुनी नाही पीडा कोणा ताप न देय

मोद मत्सर नाही भय उद्वेग मला भक्त प्रिय ॥१५॥

*

अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः । 

सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १६ ॥

*

निरपेक्ष मनी चतुर तटस्थ शुद्ध अंतर्बाह्य 

दुःखमुक्त निरभिमानी भक्त असे मजसी प्रिय ॥१६॥

*

यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति । 

शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ १७ ॥

*

हर्ष ना कधी शोकही नाही ना थारा द्वेषा इच्छेला

शुभाशुभ कर्मांचा त्याग भक्तीयुक्त तोची प्रिय मला ॥१७॥

*

समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः । 

शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥ १८ ॥

*

शत्रू असो वा मित्र मान  असो अपमान अथवा

विचलित होई ना मनातुनी  जोपासे समभावा

शीतउष्ण सुखदुःख असो समान ज्याची वृत्ती

साऱ्यापासून अलिप्त राही कसलीच नसे आसक्ती ॥१८॥

*

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्‌ । 

अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १९ ॥

*

निंदा कोणी अथवा वंदा मनातुनीया स्थित

प्राप्त तयात निर्वाह करूनी सदैव राही तृप्त 

निकेताप्रती उदासीनता कशात ना आसक्त

अतिप्रिय मजला जणुन घ्यावे स्थिरबुद्धी भक्त ॥१९॥

*

ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते । 

श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॥ २० ॥

*

धर्मामृत सेवन करती निष्काम प्रेमभावना 

श्रद्धावान मत्परायण भक्तप्रीती मन्मना ॥२०॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥

 

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी भक्तीयोग नामे निशिकान्त भावानुवादित द्वादशोऽध्याय संपूर्ण ॥१२॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print