मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पानिपत -हृदय द्रावक शोकांतिका – भाग – 1 ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?इंद्रधनुष्य? 

☆ पानिपत -हृदय द्रावक शोकांतिका – भाग – 1 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(श्री. विश्वास पाटील यांच्या “ पानिपत “ या गाजलेल्या कादंबरीचा परामर्श ) 

खूप वर्षांपासूनची  पानिपत वाचण्याची इच्छा पूर्ण झाली.  पण  वाचून झाल्यावर मनात एक हुरहूर,  एक विव्हळ वेदना अंतर्यामी भरून राहिली. डोळे नकळत पाणावले. पानिपतचा रणसंग्राम,मनुष्यहानी आणि निसटता पराभव पाहून मन हळहळते,व्याकूळ होते आपण स्वतःस माफ करू शकत नाही.

‘मराठ्यांचे पानिपत झालं, विश्वास पानिपत मध्ये गेला”– किती सहजपणे म्हणतो आपण. पण दिल्लीचे तख्त सांभाळायला आणि मराठ्यांचा बिमोड करायला निघालेल्या अब्दाली-नजीबशी कडवी झुंज देऊन उपाशी अनुशी माती, झाडपाला खाऊन, निसर्गाच्या प्रतिकूलतेला टक्कर देत उघड्या मैदानातल्या बोचऱ्या थंडीत कुडकुडत, कुठल्याही क्षणी गिलच्यांचा -वैऱ्याचा हल्ला चढेल ही धाकधूक मनात ठेवून पानिपतच्या समरात जिंकू किंवा मरू म्हणत तळहातावर शीर घेऊन प्राणपणे लढणे आणि अस्मिता, स्वाभिमान जिवंत ठेवून भर उन्हात, आगीच्या लोळात प्राणपणे चिवट झुंज देणे म्हणजे खायचं  किंवा तोंडाच्या वाफा दवडण्याइतकं सोपं नाही! केवळ सेनापतीवरील आणि तेही अगदी वसंतातल्या कोवळ्या पानासारखे वय असलेल्या हळव्या पण कणखर मनाच्या भाऊंच्या, ज्यांचे वय फक्त सत्तावीस-अठ्ठावीस (आणि विश्वासरावांचे तर अवघे सतरा-अठराचे ज्या वयात सामान्यजन डोळे मन स्वप्नात रंगतात आणि  पहातात आणि त्याच धुंदीत जगतात!) विश्वासाखातर,प्रेमाखातर. मातीच्या,धर्माच्या,मायमराठीच्या अब्रूच्या रक्षणासाठी संकटाला समर्थपणे तोंड द्यायला शरीर आणि मनही तितक्याच चिवट,कडव्या वेगळ्या मातीचे बनलेले असावे लागते.

सैन्य पोटावर चालते हे खरे असले तरीपण आपल्याला एक दिवस उपवास घडला तर जीवाची घालमेल होते, तिथं महिनोंमहिने कधी अर्धपोटी तर कधी उपाशी अन्न पाण्याविना परक्या मुलुखात कोणत्या जाणिवेने तग धरला असेल ? माती खाऊन,पाणी भरून पोटातली आग शमवत कोणत्या ध्येयाने आणि धैर्याने तग धरून राहिले असतील ? उजाड झालेल्या कोणत्या झाडांचा पाला लाखो सैनिकांची भूक भागवत असेल ? आपल्या मातीपासून ,आपल्या मुलखापासून कोसो दूर रहात, तिकडील न काही हालहवाल न काही खबरबात जाणून घेता ,’ भविष्यात आपलं काय होईल?’ याची तमा न बाळगता शत्रूशी दोन हात करायला थांबलेल्या त्या शूर,बाजींद, कडव्या लढवैय्यांच्या कौतुकास शब्द तोकडे आहेत.इथं फक्त त्यांच्या जिगरीला, शौर्याला,संयमाला,अफाट -अमर्याद इच्छाशक्तीला सलाम करणे इतकेच आपल्या हाती आहे;कारण तोफांचे धमधमे बांधण्यापासून तोफगोळे उडवतानाचा जो त्रास आहे तो मेणाच्या किंवा लेच्यापेच्या माणसाला सहन होणे शक्यच नाही.त्यासाठी लोहचणे पचवलेले पोलादी कणखर तन मन हवे.पोटाची भूक माणसाला काहीही करायला लावते-प्रसंगी चोरी,लबाडी, खूनही.मधल्या आधल्या रस्त्याने सैन्य आपल्या घरी परतू शकले असते,बंड करून आम्ही इथून पुढं येणार नाही आपल्या मुलुखात परत जातो म्हणू शकले असते.पण रणांगणातून पळ काढणे किंवा पाठ लावून पळणे हे मर्दाचे,लढवैय्याचे लक्षण नव्हे,आणि भूषण तर नाहीच.अश्याना पळपुटे म्हणून मराठी मातीने हिणवले असते; उलट रणांगणावर मृत्यू येणे हे वीरांचे भूषण आहे म्हणून लाखो जीव आपले प्राण कुर्बान करायला तयार झाले.

‘तुका म्हणे तेथे जातीचे हवे, येऱ्या गबाळ्याचे ते काम नव्हे’ हीच उक्ती इथं चपखल वाटते. वर्षभर तळ ठोकून उपास घडत महिनोंमहिने युद्धाची कोंडी फुटण्याची वाट पहाणारे लाखो लोक दोनच दिवसात मातीत गाडले गेले.महाभयानक न भूतो न भविष्यती नरसंहार ,पशुसंहार , सैनिकांचे आणि पशूंचे देखील हाल पानिपतच्या मातीने प्रथमच पाहिले असावे आणि तिचेही काळीज फाटले असेल, तिच्याही मनाचा थरकाप उडाला असेल. ‘ युद्ध नको मज बुद्ध हवा ‘ असे तीही म्हणली असेल. भौगोलिक परिस्थिती, हवामान, स्थानिक सरदार यापैकी काहीच अनुकूल नसताना फक्त प्रचंड जिद्दीच्या आणि विजयाच्या आशेने धगधगत राहिलेल्या त्या रणकुंडास दुर्दैवाच्या फटकाऱ्याने क्षणार्धात विझवलेच, पण प्रचंड नामुष्की आणि मानहानीही पत्करावी लागली.

क्रमशः……

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रणरागिणी संजुक्ता पराशर ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ रणरागिणी संजुक्ता पराशर ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

हातात एके 47 घेऊन घनदाट जंगलात शिरल्यावर तब्बल 16 अतिरेक्यांना यम सदनाला पाठवून आणखी 64 अतिरेक्यांना अटक करणाऱ्या संजूक्ता पराशरची कहाणी स्वतःला अबला समजणाऱ्या देशातील प्रत्येक स्त्रीला माहिती व्हायला पाहिजे। 

दिसायला गोरीपान आणि सुंदर अशी संजूक्ता जर कधी आपल्या समोरून गेली तर तिच्या अफाट कर्तृत्वाची आपण कल्पनाही करू शकणार नाही। एक सामान्य स्त्री लाखो सामान्य पुरुषांनाही जमणार नाही असं काम करते तेव्हा तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे सोशल मीडियावर गायले जायला हवेत, पण आम्हाला राजकारण आणि जात, धर्मापलीकडेहि आणखी दुनिया आहे हेच मान्य नसतं। त्यामुळे संजूक्ता पराशरच्या फेसबुक पेजला लाखभरहि लाईक मिळत नाहीत आणि राजकारणी, सिनेनट मात्र करोडोंनी लाईक मिळवतात। 

आसाम सारख्या मागासलेल्या राज्यात शाळेत शिकून नंतर दिल्लीच्या जेएनयु मधून डिग्री घेणारी संजूक्ता 2006 मध्ये आयपीएस देशात 85 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली। युएस फॉरेन पॉलिसी विषयात तीने पीएचडी केल्यामुळे ती डॉक्टर संजूक्ता पराशर म्हणून ओळखली जाते। तिचं लग्न झालं तेही आयएएस अधिकारी पुरू गुप्तांशी। त्यांना 6 वर्षाचा मुलगा आहे। संजूक्ताची आई त्याला सांभाळते। 

संजूक्ताची पोस्टिंग 2014 मध्ये आसाम मधील सोनीतपुर जिल्ह्यात सुप्रिंटेंडंट ऑफ  पोलीस म्हणून झाली आणि अग्निदिव्य म्हणजे काय ह्याची प्रचिती तिला रोजच घ्यावी लागली। बोडो अतिरेक्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता। शेकडो लोकांचे बळी गेले होते। आसामच्या घनदाट जंगलात शिरून त्यांच्याशी मुकाबला करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण। हातात एके 47 घेऊन संजूक्ता सीआरपीएफ च्या जवानांना घेऊन जेव्हा घनदाट जंगलात शिरायची तेव्हा जवानानाही दहा हत्तीचं बळ मिळायचं। अनेक मोहिमा यशस्वी झाल्यामुळे अतिरिकेही संजूक्ताच्या नावाने कापू लागले होते। तिला पत्राद्वारे आणि फोनद्वारे धमक्या येऊ लागल्या होत्या। परंतु शिर तळ हातावर घेऊन फिरणाऱ्या संजूक्तावर कसलाच परिणाम झाला नाही। तब्बल 16 अतिरेकी मारले गेले आणि 64 अटक झाले, तेही तिच्या अवघ्या 18 महिन्यांच्या कारकीर्दीमध्ये। 

आज संजूक्ता पराशर दिल्ली मध्ये कार्यरत आहे। देशातील दहशतवाद पूर्णपणे निपटून काढणं हेच तिचं ध्येय आहे। अशा ह्या खऱ्या खुऱ्या रणरागिणीच्या अफाट कर्तुत्वाला आपण सर्वानीच मानाचा मुजरा करायला हवा। सलाम करायला हवा!

#I_Salute_Sanjukta_Parashar

(सुवर्णमेघ या फेसबुकपेज वरुन साभार)

 

संग्राहक : सुनीत मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सहस्रचंद्रदर्शन शांती ☆ संग्राहक – श्री अशोक काका कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ सहस्रचंद्रदर्शन शांती ☆ संग्राहक – श्री अशोक काका कुलकर्णी ☆

वयाच्या ५० व्या वर्षापासून प्राचीन काळी वेगवेगळ्या शांती सांगितल्या आहेत.

त्या म्हणजे,—–

५० व्या वर्षी वैष्णव शांती, 

५५ व्या वर्षी वारुणी शांती,

६० व्या वर्षी उग्ररथ शांती, 

६५ व्या वर्षी मृत्युंजय महारथी शांती, 

७० व्या वर्षी भौमरथी शांती,

७५ व्या वर्षी ऐन्द्री शांती, 

८० व्या वर्षी सहस्त्र चंद्र दर्शन शांती,

85 व्या वर्षी रौद्री शांती, 

९० व्या वर्षी कालस्वरूप शांती,

९५ व्या वर्षी त्र्यंबक मृत्युंजय शांती 

आणि १०० व्या वर्षी त्र्यंबक महामृत्युंजय शांती. 

सहस्त्र चंद्र दर्शन म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात १००० वेळा पूर्ण चंद्र पहिला आहे. किंवा त्याच्या आयुष्यात १००० वेळा पौर्णिमा येऊन गेल्या. इतके सार्थ आयुष्य खूप कमी लोक जगतात म्हणूनच हे विशेष आहे. आपली मराठी कालगणना चान्द्रवर्षीय आहे म्हणून १००० चंद्र पाहण्याचा सोहळा केला जातो. हे मोजायची पण पद्धत आहे.

ती अशी –

८० वर्षात १२ x ८० म्हणजे ९६०, त्यात २७ अधिक महिने येतात म्हणजे ९६० + २७ = ९८७. म्हणजे ८० वर्षात १००० चंद्र पहिले जात नाही म्हणून ८१ वर्ष पूर्ण झाल्यावर येणाऱ्या १००० व्या पौर्णिमेला हा दिवस साजरा करतात. ह्या मध्ये काही ज्योतिष्यांच्या मते ३२ अधिक मास येतात म्हणून ८१ व्या वर्षातील ८ व्या महिन्यात सहस्त्र चंद्र पूर्ण होतात. पुन्हा ह्यामध्ये खग्रास चंद्र ग्रहण पण जमेस धरावे लागते. यावर शौनक ऋषिच्या विवेचनाच्या आधारे “वयोवस्थाभीधशांतीसमुच्चय:” ह्या पुस्तकात धर्मशास्त्र कोविद श्री नारायण शास्त्री जोशी, यांनी दिले आहे. त्यांच्या मते दरवर्षी सुमारे १२ अशी ७९ वर्षात ९४८ चंद्र दर्शने आणि खग्रास चंद्रग्रहणा नंतर नव्याने होणारे चंद्रदर्शन व असे २४ चंद्रदर्शन एव्हडे मिळून ९४८ + २८ + २४ = १००० चंद्रदर्शन होतात. ८० व्या वर्षानंतर ८ व्या महिन्यात केलेला विधी हा सौर कालगणनेनुसार असतो. म्हणजे वैखानस गृह्य सूत्रानुसार रविवर्षेण असते. शांती साठी देवता आणि हवन सामग्री पण ठरलेली आहे. सहस्त्र चंद्र दर्शनाला देवता आहे चंद्र आणि हवन सामग्री आहे आज्य. ह्या शान्तींच्या वेळी देवतेला हवन अर्पून त्या व्यक्तीच्या आयुरारोग्यासाठी प्रार्थना केली जाते. त्यायोगे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य सुखात जाते.

सामान्यत: एकसष्ठी, पंचाहत्तरी आणि ८१ वर्षानंतर अशा शान्त्या केल्या जातात. आता सहस्त्रचंद्र दर्शनच का सूर्य दर्शन का नाही? तर “चंद्रमा मनसो जात:”– म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे. मला वाटते साठीनंतरच वयस्क लोकांना आपण उपयोगाचे नाही, आपली सद्दी संपली, आपल्याला अडगळीत टाकतील, कोणी विचारणार नाही अशा अनेक शंका घेरून टाकतात. ऐंशी वर्षे म्हणजे फारच जास्त होतात, त्यांचीच मुले साठीला येतात. कधी – कधी जोडीदार पण साथ सोडून जातो. अशा वेळी घरातल्याच लोकांनी त्यांचे मन जाणून घेऊन ते अजून आम्हाला हवे आहेत असे एक सुंदरसा घरगुती का होईना कार्यक्रम करून त्यांना तसे वाटू दिले, त्यांना कपडे किंवा चष्मा, कवळी, चांगली पुस्तके, एखादा छोटासा टीव्ही अशी भेट देऊन, सहस्त्र दिव्यांनी ओवाळले तर त्यांना किती बरे वाटते. आपण अजून हवे आहोत ही भावनाच किती चांगली आहे. म्हणून सहस्त्रचंद्र दर्शन विधी असावा. आता होम करायचा कारण उत्सव मूर्ती ऐंशी वर्षे तंदुरुस्त का राहिली म्हणून कोणी नजर पण लावेल, सगळ्यांच्या नजरा चांगल्या असतात असे नाही. म्हणून होम करून सगळी अरिष्टे दूर करायची.

संग्राहक – श्री अशोककाका कुलकर्णी   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ Not At Home…. ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

 ☆ Not At Home…. ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆ 

खरंतर Not at Home हा परफेक्ट शब्द.

पण लहानपणी मे महिन्यात सगळी भावंडं एकत्र जमलो कि पत्त्यात हा डाव रंगायचा. पण तेव्हा विंग्रजी फार यायचं नाही मग जो तो ज्याला जसं ऐकू आला उच्चार तसं म्हणायचा. नाॅटॅट होम, नाॅटॅ-ठोम काय वाट्टेल ते !! तसंही आपण आपल्याच घरात तरी कुठे असायचो? ते ही Not At Home च. कधीही मित्र मैत्रिणीच्या घरी जाऊन हुंदडायला मिळायचं. येऊ का? वगैरे विचारण्याच्या formalities नव्हत्या. 

“Challenge” ला पण चायलेन्ज, चाॅलेन्ज काय वाटेल ते म्हणायचो.

“लॅडीज” नावाचा खेळ फक्त लेडीजनीच खेळायचा असं आपलं उगीच वाटायचं मला. त्यात एक वख्खई बोलली जायची. लाडूची म्हणजे ३२ कळ्या किंवा अर्धा लाडू १६ कळ्या वगैरे. झब्बू पण असाच एक डाव. झब्बू देताना एक पानी आणि गड्डेरी. मजाच सगळी.

हे सगळे शब्द कुठून आले ?देव जाणे?

काचापाणी, पट, सागरगोटे हे अजून काही प्रकार बैठ्या खेळातले. काचापाणीसाठी भांड्यांच्या काचा जमवायला अगदी कचराकुंडी पण गाठलीय.

सगळेच खेळ आपल्याला जिवंत ठेवायचे. वेगळा असा “स्पोर्टस् डे” नसायचा. रोजच खेळ. शाळा दुपारची असली की दप्तर फेकून ?‍♀️?‍♂️ धावत सुटायचं! कारण उशीरा पोहचलं खेळायला तर “कटाप” करायचे (actually cut off) खेळातून.

तळहातावर थोडसं चाटून “टॅम्प्लीज” (टाईम प्लीज खरा शब्द) करणं, लपंडावात “धप्पा” म्हणणे, “रडीचा डाव खडी”असं चिडवणे, मग समोरच्यानी आपल्याला “जो म्हणतो तोच” असं बोट आपल्यापुढे नाचवत म्हणणे या सगळ्याची मजा काही औरच.

आजच्या मुलांना काय कळणार ती??

लगोरीsss असं सात ठिक-या एकमेकांवर ठेवून त्यावर पाय फिरवणे, तो नाही फिरवला तर लगोरी लागली असं धरत नसत. तसेच “डब्बा ऐसपैस”. पत्र्याचा एक फालतू डबा पण अनन्यसाधारण महत्व मिळालेला.

डालडाचा वनस्पती तुपाचा हिरवं नारळाचं झाड असणारा डबा पण फार महत्त्वाचा. तो कमरेला बांधून विहीरीत धपाधप उड्या मारणे हा रविवार सकाळचा कार्यक्रम. 

“लपंडाव” खेळताना मुलं मुद्दाम एकमेकांचे शर्ट, टी शर्ट बदलून गंडवायचे आणि शर्टाची बाही दिसेल असे लपायचे. मग चुकीचं नाव घेतलं कि धप्पा मिळायचा “राज्य असणा-याला … ?

राज्य असणा-यालाच पकडायला लावायचं हा काय न्याय!! पण अशा नियमांवर अपील नसायचंच.

“जोडसाखळी, रस्सीखेच” म्हणजे नुसती ओढाओढी.

“दगड का माती” म्हटले की जे म्हणेल त्यावर उभं रहायचं. दगडावर उभं रहायचं असेल तर तो सापडेपर्यंत फक्त धावायचं.

“विषामृत”मधे विष म्हणुन स्पर्श करायचा मग विष मिळाले कि स्तब्ध उभं रहायचं. मग कुणी तरी येऊन अमृत द्यायचं…काय एकेक मज्जा !!

पावसाळ्यात घरी बसू असं तर मुळीच नाही. पावसाळ्यात “रूतवणी” हा खेळ. 

एक लोखंडी सळई घेऊन चिखलात रुतवत जायचे. त्याचे पाॅईन्ट्स मोडायचा. सळई पडली की दुसरा खेळायचा. पहिला औट. 

“आबाधूबी” (अप्पा-रप्पी) लई भारी गेम. पाठ शेकुन काढणारा. यात शक्यतो प्लास्टीकच्या बाॅल घेतला जायचा. रबरी ट्यूब कच-यातून, भंगारातून शोधून तिचे तुकडे करून त्याचाही बाॅल केला जायचा.

साबणाचे फुगे करायला कागदाची बारीक सुरनळी करणे, करवंटीचे फोन, काडेपेटीत वाळू भरून टिचकीनी ती उगडून अंगावर उडवणे… what a creativity !!! काही नाही तर बाॅल घेऊन “टप्पा- टप्पा” हा खेळ तरी व्हायचाच. ते मोजले जायचे ते ही सार्वजनिकरित्या, मोठ्याने बोंबलत.

क्रिकेट खेळताना फळकूट पण चालायचं. एखादी बोळ पण चालायची. टीम पाडायच्या. आपणच अनेक नियम बनवायचे. या कंपाउंड बाहेर गेला बाॅल की फोर, तिकडे सिक्स, एक टप्पा औट, रन आऊट चे नियम वेगळे. कुणाच्या खिडकीची काच फोडली तर सार्वजनिक धूम ठोकणे हा अलिखित नियम. मुली, मुलगे एकत्र खेळायचो तेव्हा. सगळेच मुलींचे “दादा”. क्रिकेट; कबड्डी साठी टीम मेंबर कमी असले की  मुलींना डिमांड. 

“टीपी टीपी टीप टॉप”, व्हॉट कलर डू यू वाँट”? काहीतरी भारी रंग सांगायचा. मग नसेल तर औट करायचे. यातही धावायचंच. “ढप, गोट्या” रिंगण आखून जो सांगितला जाई तो ढप किंवा गोटी रिंगणाबाहेर नेम धरून उडवायची–ऑलिंपिक लेव्हलची नेमबाजी.!! मग यात चंदेरी, पाणेरी, काळी, घारी अशी गोट्यांची वर्णनं. 

एक जबराट खेळ होता. टायर्स फिरवणे. जुने टायर्स घेऊन ते काठीने बडवत पळवत नेऊन त्याची शर्यत लावायची. खूप धमाल यायची टायर्स पळवायला! 

”ठिक्कर पाणी” हा फक्त मुलींचा खेळ समजला जायचा. एखादा मुलगा जरी यात आला तर “मुलीत मुलगा लांबोडा, भाजून खातो कोंबडा” ? म्हणुन चिडवायचे. फरशीची खपटी घेऊन त्याला थुंकी लावुन ती रकान्यात फेकायची आणि एका बाजुने लंगडी खेळत जाऊन ती पायानेच सरकावुन चौकटीच्या बाहेर जाईल अशा रितीने फेकायची. रेषेवर पडली तर औट. 

कांदाफोडी, डोंगराला आग लागली पळा पळा पळा, खांब खांब खांबोळी, शिवाजी म्हणतो, दोरीवरच्या उड्या, मामाचं पत्रं हरवलं, शिरा-पूरी भातुकली हे तर सगळे गर्ल्स स्पेशल खेळ. मुलींची monopoly. 

नाव, गाव, फळ, फूल, नाटक/सिनेमा, रंग, प्राणी, पक्षी, वस्तू काय वाटेल ते. वह्याच्या वह्या भरायच्या. 

भातुकली, दो-या बांधून घर घर खेळणं, दाण्याचे लाडू आणि चुरमु-याचा भात एवढाच कायम स्वैपाक असायचा भातुकलीत.

व्यापार, सापशिडी, सागरगोटे, काचापाणी हे दुपारचे खेळ. 

वारा पडलेला असेल तर बॅडमिंटन. 

पण तो श्रीमंती खेळ. जिच्या हाती रॅकेट ती/तो फार भाव खायचे. मग रॅकेट नसणारे एकत्र यायचे आणि बॅडमिंटन पेक्षा बाकी खेळ कसे भारी यावर वादावादी.

कॅरम पण तसाच श्रीमंती खेळ. 

ते नको असायचे. त्यात धांगडधिंगा करता यायचा नाही ना !! 

“पतंग बदवणे” यात जो माहिर, तो सगळ्यात भारी. ?

मुली आपल्या ही काट, ती काट सांगायच्या आणि फिरकी धरायच्या. मग ती काटताना ढील देणे वगैरे प्रकार करावे लागायचे. काटता आली नाही पतंग की मग मांजा नीट नाही, कन्नी नीट बांधली नाही या तक्रारी. 

दिवेलागणी झाली की परवचा म्हणून रात्री जेवणं झाली की अंताक्षरी आणि  भुताच्या गोष्टी.

निव्वळ Nostalgic !!!

समृद्ध, श्रीमंत बालपण होतं आपलं.

करता येईल का तसं आजच्या लहान मुलांचं???

काहीतरी जादू घडावी आणि होऊन जावं आपल्यागत.

नाही का ???

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गेले ते दिवस ☆ संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

? इंद्रधनुष्य ? 

☆ गेले ते दिवस ☆ संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने ☆ 

आज आठवते ना आपल्या लहानपणीची दिवाळी. २५ पर्यंत पाढे पाठांतर, २१ दिवसांचे दहा ओळींचे शुद्धलेखन, कविता पाठांतर, निबंध. दिवाळी सुट्टी अभ्यासासाठी दोनशे पानी वही व शुद्धलेखनासाठी शंभर पानी दुरेघी वही.

गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. इतका दिवाळीतला गृहपाठ करूनसुद्धा आपण दिवाळीत धम्माल करायचो. किल्ले बनवायचो, रांगोळीसाठी अगरबत्तीने ठिपके पाड़ून द्यायचो. मनसोक्त फटाके फोडायचो. सापाची गोळी आठवते ना… टेलिफोनचा फटाका आठवतो का… चिड़ी कुठून कुठे उड़ायची माहित आहे ना… राॅकेट साठी कुठून पण बाटली शोधून आणायचो. रस्त्यावर लावलेला बाण आड़वा होऊन कोणाकोणाच्या ढेंगातून गेला होता आठवतंय ना. कधी कधी बाण कोणाच्या खिडकीतून घरात घुसायचा, मग त्या काकी भडकण्याच्या आधी सगळे तिथून धूम ठोकायचे. 

सगळे फटाके संपल्यावर अर्धवट पड़लेल्या फटाक्यांची दारू पेपरमध्ये जमा करायचो आणि पेपराला सगळ्याबाजूने आग लावल्यानंतर उड़ालेला आगीचा ज्वाळ पहाताना मिळणारा आनंद.

खरंच, दिवाळीच्या दिवसात आम्ही श्रीमंत व्हायचो कारण बाबा, मामा, काका, खिशात पैसे टाकायचे आणि उरलेल्या दिवसात अर्ध्या तासाचे 50 पैसे किंवा तासाचा 1 रुपया  देऊन सायकल भाड़्याने घेऊन फिरायला जायचो ना…

आता फक्त हातात मोबाईल घेऊन त्यातच गर्क असलेली  मुले दिसतात तेव्हा सांगावेसे वाटते, अरे दिवाळी म्हणजे व्हाॅटसअपवरचे मेसेज आणि व्हिड़ीओ नसतात रे….!

असो….  !! ?⭐?

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतातली पहिली महिला सिव्हिल इंजिनियर – शकुंतला भगत ……… सुश्री स्मिता जोगळेकर  ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

? इंद्रधनुष्य ? 

☆ भारतातली पहिली महिला सिव्हिल इंजिनियर – शकुंतला भगत ……… सुश्री स्मिता जोगळेकर  ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ☆ 

(देशातले ६९ पूल आज तिच्यामुळे उभे राहिलेत!) 

देशाची सर्वांगीण प्रगती अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यापैकीच एक घटक म्हणजे त्या देशातल्या सोयीसुविधा किती दूरपर्यंत पोहोचलेल्या आहेत! आजसुद्धा आपल्याकडे अनेक गावे अत्यंत दुर्गम आहेत. तेथे पोहोचायला वाहतुकीची साधने नाहीत, दळणवळणाच्या सुविधा नाहीत. देशात असूनही अशी ‘बेटे’ त्यांच्या दुर्गम स्थानामुळे प्रगतीपासून दूर आहेत. या पार्श्वभूमीवर पूलांचे मोठे योगदान आहे. या पुलांनी गावे एकमेकांना ‘जोडण्याचे’ महत्त्वाचे काम केले आहे; अनेक गावांवरचा दुर्गमपणाचा शिक्का पुसायला मदत केली आहे.                      

शकुंतला भगत यांचे नाव आपल्यापैकी फार कमी लोकांना माहिती असेल. त्या भारतातल्या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनियर. भारतातल्या ६९ आणि जगभरातल्या २०० पुलांच्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे. त्यांनी पूल बांधणीच्या क्षेत्रात केलेले काम आजही भल्याभल्यांना चकित करते. निवडलेल्या कामाची तीव्र आवड असेल तर कुठल्या कुठे पोहोचता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शकुंतला भगत.                        

शकुंतला यांचा जन्म १९३३ मधला. त्या काळाचा विचार करता मुलीने इंजीनियर होणे ही खूपच मोठी गोष्ट होती. वडिलांनी शिकायला प्रोत्साहन दिले. शकुंतला जोशी म्हणून इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवलेल्या या मुलीने इंजिनिअरिंगच्या विषयांमध्ये त्वरित गती पकडली. तिचे वडील स्वतः एक उत्तम अभियंता होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनात ते सहभागी झाले होते. ते विचारांनी इतके पुढारलेले होते की मुलीने आपले इंजिनीअरिंगचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लग्न केले नसते तरी त्यांना चालणार होते. 

१९५३ मध्ये शकुंतला जोशी यांनी मुंबईच्या वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट म्हणजेच व्हीजेटीआय या विख्यात संस्थेतून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आणि त्या भारतातल्या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनियर बनल्या. शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर त्यांनी एका ठिकाणी फॅक्टरी ट्रेनी म्हणून कामाला सुरुवात केली. पण एकदा काम करत असताना छोटासा अपघात होऊन त्या किरकोळ जखमी झाल्या. त्यावेळी त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी पुन्हा एकदा वडिलांनी त्यांना कणखर आधार दिला. त्यांनी त्यांना डिझाईन इंजिनियर म्हणून काम करण्यासाठी जर्मनीला पाठवले. जर्मनीहून त्या १९५७ मध्ये भारतात परतल्या.                    

त्यानंतर त्यांनी अजून एक धाडस केले ते म्हणजे प्रेमविवाह. काळाच्या कितीतरी पुढे जात त्यांनी आपल्या पसंतीचा जोडीदार निवडला. तोही इंजिनीअर नसलेला! अनिरुद्ध भगत यांचे स्वतःचे ऑटोमोबाईल गॅरेज होते. एवढी शिकलेली मुलगी एका गॅरेजमालकावर प्रेम करते हे कळल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या. शकुंतला यांनी मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहात लग्न केले आणि संसारही निभावून नेला. अर्थात त्यासाठी अनिरुद्ध भगत यांची साथ मोलाची ठरली. भगत यांचे उत्पन्न पुरेसे नसल्यामुळे शकुंतला यांनी आर्थिक जबाबदारीही स्वीकारली. त्यांनी १९५९ ते १९७० या काळात आयआयटी, मुंबई येथे सिव्हिल इंजीनियरिंगच्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी केली.                                      

या काळात त्यांनी मध्ये दोन वर्षांसाठी सब्बटिकल (प्राध्यापकांना शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठाकडून मिळणारी भरपगारी रजा) घेऊन युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया इथून मास्टर्स पूर्ण केले. पुढे १९७० मध्ये शकुंतला भगत यांनी आपले यजमान अनिरुद्ध भगत यांच्यासह क्वाड्रीकॉन नावाची पूल बांधणी करणारी कंपनी स्थापन केली. या कंपनीने वेगवेगळी रुंदी आणि विस्तार असलेले पूल अल्प खर्चात तयार केले. त्यासाठी त्यांनी प्री-फॅब्रिकेटेड(आधीच तयार करुन ठेवलेल्या) सुट्ट्या भागांचा वापर केला. तसेच हे भाग एकमेकांना जोडण्यासाठी बिजागऱ्यांसारख्या जोडणीचा वापर केल्यामुळे त्यासाठी कमी स्टील वापरावे लागे. अस्तित्वात असलेला एखादा पूल मोडकळीस आला असेल तर त्याला आधार देण्यासाठी त्यांनी टोएबल ब्रिज या नव्या प्रकारच्या पुलांचे डिझाईन तयार केले. हे पूल नादुरुस्त पुलांखाली वापरून मोडकळीस आलेल्या पुलावरूनदेखील अवजड वाहनांची वाहतूक करणे शक्य होऊ लागले.                            

हा काळ एकंदरच देशाच्या विकासाचा आणि भरभराटीचा होता. हिमालयालगतच्या प्रदेशात बांधल्या गेलेल्या पुलांमुळे त्या प्रदेशाचे चित्र पालटू लागले होते. इतके दिवस भौगोलिक दृष्टीने दुर्गम असलेले भाग क्वाड्रीकॉनने उत्तर आणि ईशान्य भारतात बांधलेल्या ६९ पुलांमुळे आज उर्वरित भारताशी जोडले गेले आहेत. याशिवाय युके, युएस, जर्मनी या देशांमध्येही त्यांनी पूल बांधले आहेत.                          

त्यांच्या मुलांच्या म्हणण्यानुसार त्यांची आई नि वडील दोघांमध्येही प्रचंड इच्छाशक्ती होती. अगदी जेवायला बसल्यावरही त्यांच्यातल्या चर्चा कामाभोवतीच फिरत. कधी त्या चर्चांमधून वादही रंगायचे. पण एकदा का एक निर्णय झाला आणि तो कंपनीच्या हिताचा आहे यावर शिक्कामोर्तब झाले की वाद थांबे. मग जणू काही झालेच नाही अशा थाटात हे नवराबायको खेळीमेळीने संभाषण सुरू करत. आपण उभारलेली संस्था बहरावी म्हणून त्यांनी त्या काळात सर्व प्रकारचे धोके स्वीकारले, पण कंपनीची घोडदौड कायम ठेवली. जेव्हा त्यांच्या कल्पनांमध्ये गुंतवणूक करायला सरकार किंवा खाजगी कंपन्या राजी नव्हत्या तेव्हा त्यांनी पैसा उभा करण्यासाठी स्वतःचे घर गहाण टाकले, दागदागिने विकले, पण स्वप्ने सत्यात उतरवून दाखवली. कधी एखाद्या साइटवर छोटासा जरी अपघात झाला तरी घरात सुतकी वातावरण असे. त्यांच्यासाठी त्यांची कंपनी घराइतकीच जवळची होती. पण म्हणून त्यांचे घराकडे दुर्लक्ष झाले नाही. उलट करिअरची एकेक शिखरे सर करत असताना शकुंतला यांनी कौटुंबिक आघाडीही तितक्याच ताकदीने सांभाळली. एवढे सगळे करूनही जर्मनीत असताना परिचित झालेल्या वेस्टर्न क्लासिकल सिंफनीज ऐकण्यासाठी त्या खास वेळ काढत.                             

त्यांच्या तिन्ही मुलांनी त्यांना अतिशय पद्धतशीरपणे काम करताना पाहिलेले आहे. त्या काळात संगणक नसल्यामुळे वह्यांमध्ये आकडेमोड करणारी, एखादे डिझाईन मनासारखे उतरेपर्यंत वहीत रेखाटने करण्यात गढून गेलेली आई आजही त्यांच्या डोळ्यासमोर आहे. इतरांपेक्षा आपल्या आई नक्कीच वेगळी आहे, जिथे एकही स्त्री नाही अशा क्षेत्रात ती समर्थपणे पाय रोवून उभी आहे याचा अभिमान त्या मुलांना वाटला नाही तर नवलच! त्यांच्या फॅमिली पिकनिक्ससुद्धा बहुतेक वेळा कंस्ट्रक्शन साइटवरच असायच्या. त्यामुळे नकळतच मुलांवर कामाचे संस्कार झाले. मोठमोठ्या स्ट्रक्चर्समधील बारकावे, त्यांची तपशीलवार तपासणी याबद्दल मुलांना आई-वडिलांकडूनच शिकायला मिळाले.

सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पुलांची बांधणी सगळ्यात अवघड मानली जाते. पण याच विषयाला हात घालत, त्याला आपलेसे करत शकुंतला भगत यांनी जी उभारणी केली आहे त्याला तोड नाही.                               

 

– स्मिता जोगळेकर

संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मी मस्त आहे—- ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

? इंद्रधनुष्य ?

☆ इंद्रधनुष्य ☆ मी मस्त आहे—-  ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

(For all senior citizens)

वय झाले अजून मस्ती गेली नाही 

विचार धावतात पण शरीर साथ देत नाही

कळते आहे पण वळत नाही 

कोणावर विश्वास ठेवायचा तेच समजत नाही 

तरी पण मी मस्त आहे—–

 

काय होतय सांगता येत नाही 

दुखतात गुढगे सांगायचे नाही

कुणाकडे जाताही येत नाही 

सावकाश चालायचे हेच आता उरले 

तरी पण मी मस्त आहे—–

 

थकले शरीर जरी 

नजर अजून शाबूत आहे

थकल्या जीवाला 

थोडी उभारी देत आहे

तरी पण मी मस्त आहे—–

 

 आताशा  मोजकेच दात तासून  त्यावर टोप्या ( cap) घातल्यात

तेव्हा कुठे दुःख थांबले 

कुस्करून खाल्ले 

तेव्हां पचायला लागले 

तरी पण मी मस्त आहे—–

 

वाचायला घेतले धुरकट दिसते 

चष्मा लावला तर पाणी सुटते 

डोळे पुसत वाचण्यापेक्षा 

न वाचलेले परवडते 

तरी पण मी मस्त आहे——-

 

लिहायला घेतले तर हात कापतात

शब्दांवरच्या रेषा सरळ कुठे येतात 

साधी स्वाक्षरी पण धड येत नाही 

चेक परत का येतात तेच समजत नाही 

तरी पण मी मस्त आहे——

 

उलटा बनियन तर नेहमीच असतो 

तरी बरे तो आत झाकला जातो .

घरातले हसतातच

तरी पण मी मस्त आहे——

 

कानात हुंकार वाजत असतात 

शब्द अस्पष्ट ऐकू येतात 

अनुभवाने समजून  घेतो 

आणि मगच उत्तर देतो 

 तरी पण मी मस्त आहे——

 

वाचायला घेतले तरी लक्ष लागत नाही 

वाचलेले सुद्धा काही लक्षात रहात नाही 

मित्रांशिवाय कुणाला काही सांगत नाही 

समदुःखाची कथा बाकीच्यांना पटणार नाही 

तरी पण मी मस्त आहे—–

 

बरेच आयुष्य जगून घेतले 

अजून थोडे बाकी आहे 

उरलेले मात्र सुखात जावे 

येवढीच इच्छा बाकी आहे 

तरी पण मी मस्त आहे—–

 

संसाराचे सारे पाश 

आता पूर्ण सोडायचे आहेत

उरलेली पुंजी संपे पर्यंत

आनंदी जगायचे आहे

तरी पण मी मस्त आहे—–

 

आपल्याच धुंदीत जगलो आहे 

पाहिजे ते मिळवले आहे

उपभोगून आयुष्य सारे

गात्रे शिथिल होत आहेत

तरी पण मी मस्त आहे—–

 

आयुष्यात ज्यांनी साथ दिली 

काहींनी मधेच साथ सोडली 

कोणाचेच काही अडलं नाही

तरी सर्वांचा मी आभारी आहे

आणि मी मस्त आहे——

 

भार कोणावर टाकायचा नाही 

झटपट मात्र बोलावणे यावे 

इतरांना हवेहवे वाटतांना 

आपण निसर्गात विलीन व्हावे 

तरी पण मी मस्त आहे—–

—आणि  हे देवा  ,

तिथे पण मी मस्त रहावे——

 

संग्राहक : अस्मिता इनामदार

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तुझी जात कुठली? ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ तुझी जात कुठली? ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

त्याने तिला विचारलं —

“तुझी जात कुठली?”

तिने उलट त्यालाच विचारलं —

एक आई म्हणून, की एक स्त्री म्हणून  ?

तो म्हणाला ठीक आहे, दोन्ही म्हणजे — आई आणि स्त्री म्हणून सांग. 

तिने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले —

“स्त्री” जेव्हा ‘आई’ होते तेव्हा ती जातीहीन असते. 

तो पुन्हा आश्चर्यचकित होऊन

विचारता झाला  “ते कसं काय? “

ती म्हणाली जेव्हा एक आई आपल्या बाळाचं संगोपन करत असते,ती त्याची शी-शु साफ करत असते, तेव्हा ती “शूद्र” जातीची असते.

बाळ जसजसं मोठं होत जातं, तेव्हा आई नकारात्मक गोष्टी आणि अपप्रवृत्तींपासून त्याची रक्षा करते, तेव्हा ती “क्षत्रिय” होते…

जेव्हा मूल आणिक मोठं होत जातं, तेव्हा आई त्याला सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनवित असते; तेव्हा ती “ब्राम्हण” जातीची असते…

आणि शेवटी मुलगा शिकून मोठा होतो, कमावू लागतो, तेव्हा तीच आई त्याच्या मिळकत आणि खर्च ह्या विषयी योग्य ते मार्गदर्शन करुन, जमा – खर्चाचा ताळ- मेळ ठिक करते तेव्हा ती आपला ‘वैश्य धर्म ‘ निभावते…

तर मी काय म्हणते, ते योग्य आहे ना की स्त्री  ‘जाती हीन’ असते. “

हे तिचे उत्तर ऐकून तो “अवाक” झाला. त्याच्या डोळ्यात तिच्या व समस्त स्त्रीयांविषयी आदरयुक्त भावना चमकली, आणि तिला एक आई आणि स्री होण्याचा अभिमान असलेला दिसून आला.

स्त्री आहे म्हणून आपण आहोत.. ती नसती तर आपण नसतो. सर्वांनी हा विचार केला पाहिजे ती कुणाची आई असते, कुणाची बहीण, कुणाची बायको तर कुणाची मुलगी—-

प्रत्येकाने स्त्रीचा सन्मान केलाच पाहिजे.

 

संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ओंकाराचे महत्त्व ☆ संग्राहक – कालिंदी नवाथे

? इंद्रधनुष्य ?

☆ ओंकाराचे महत्त्व   ☆ संग्राहक – कालिंदी नवाथे ☆ 

१] “ॐ” चे उच्चारण केल्याने गळ्यात कंपन होण्यामुळे थायरॉइडचा त्रास दूर होतो.

२] “ॐ” च्या जपाने जीव घाबरणे दूर होते.

३] “ॐ” चा जप केल्याने शरीरात रक्त प्रवाह योग्यरितीने होऊ लागतो

४] “ॐ” चा जप केल्याने रक्तदाब सामान्य होतो आणि ह्रुदय विकाराच्या झटक्या पासून बचाव होतो.

५] “ॐ” चा जप केल्याने पोटात कंपन होते आणि पचन शक्ति मजबूत होते.

६] “ॐ” चा जप केल्याने फुफ्फुसांना अधिक प्राणवायू मिळतो आणि त्यामुळे उत्साहात वाढ होते.

७] “ॐ” चा जप केल्याने थकवा दूर होतो आणि ताजेपणाचा अनुभव होतो.

८] “ॐ” चे उच्चारण झोपण्यापूर्वी केल्याने झोप लगेच आणि शांत लागते.

९] “ॐ” चा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि तणावापासून कायमची मुक्ती मिळते.

१०] “ॐ” चा जप केल्याने पाठीच्या कण्यात कंपन होते आणि त्यामुळे पाठीचा कणा मजबूत होऊन कमरेचा त्रास दूर होतो.

११] “ॐ” चा उच्चार केल्याने मेंदूत कंपन होते आणि त्यामुळे एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती वाढते.

१२] “ॐ” चे उच्चारण अथवा जप केल्याने आपण खूप सगळे विकार दूर करू शकतो.

 

संग्राहक :  कालिंदी नवाथे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुंदर दृष्टांत ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ सुंदर दृष्टांत ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

एक संन्यासी फिरत फिरत एका दुकानावरून जात होता. त्याचे सहज लक्ष गेले त्या दुकानात बरेच लहान मोठे डबे, बरण्या होत्या. 

त्या संन्याशाच्या मनात सहज एक विचार आला आणि त्याने त्या दुकानदाराला एक डबा दाखवून विचारले की “ यात काय आहे? “  दुकानदार म्हणाला, “ त्यात मीठ आहे.”  संन्यासी बुवांनी आणखी एका डब्याकडे बोट दाखवून विचारले, “  यात काय आहे? “ दुकानदार म्हणाला, “ यात साखर आहे.“—असे करत करत बुवांनी शेवटच्या डब्याकडे बोट करून विचारले, “ आणि यात काय आहे? “ दुकानदार म्हणाला, “ यात श्रीकृष्ण आहे.” 

संन्यासी अचंबित झाला आणि म्हणाला, “ अरे या नावाची कोणती वस्तू आहे ? मी तर कधी ऐकली नाही. हे तर देवाचे नाव आहे.” 

 दुकानदार संन्यासीबुवांच्या अज्ञानाला हसून म्हणाला, ” महाराज तो रिकामा डबा आहे, पण आम्ही व्यापारी रिकाम्या डब्याला रिकामा नाही म्हणत.  त्यात श्रीकृष्ण आहे असे म्हणतो.”

बुवांचे डोळे खाडकन उघडले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले. 

ते ईश्वराला म्हणाले,  “अरे कोणत्या कोणत्या रूपाने तू ज्ञान देतोस. ज्या गोष्टीसाठी मी एवढा भटकलो, घरदार सोडून संन्यासी झालो, ती गोष्ट एका दुकानदाराच्या तोंडून मला ऐकविलीस.

परमेश्वरा मी तुझा शतशः आभारी आहे “— असे म्हणून त्याने त्या दुकानदाराला साष्टांग नमस्कार केला.

जे मन-बुद्धी- हृदय,  काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, ईर्षा, द्वेष, चांगले-वाईट आणि सुख-दुःख, अशा लौकिक गोष्टीने भरले आहे, तिथे श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत कसा राहील? जे रिकामे आहे– म्हणजेच एकदम स्वच्छ आहे, अशाच ठिकाणी, म्हणजे अशाच मन, बुद्धी व हृदयात परमेश्वर वास करतो. 

लोकांना दाखवायला गीता व ज्ञानेश्वरी वाचली, किंवा एकादशीला आळंदी-पंढरपूरची वारी केली,  तरी मन-बुद्धी-हृदय जोपर्यंत रिकामे होत नाही– म्हणजे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत परमेश्वर तिथे वास करणार नाही.. 

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print