मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अद्भुत मंदीरे… संकलन :- सतीश अलोणी ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

?इंद्रधनुष्य?

अद्भुत मंदीरे… संकलन :- सतीश अलोणी ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆ 

जाणून घेऊ या, या काही अदभुत मंदिरांची माहिती.

भारत हा एक असा देश आहे, जिथे लोक विविध रितीभातींना मानतात आणि आपल्या धर्म आणि आस्थानुसार ते मंदिरांत पूजा-पाठ करतात.

अशाच एका मंदिरा बद्दल सांगत आहोत, जिथे देवाची नाही तर प्राण्यांची पूजा करतात. या मंदिरात लोक प्राण्यांना श्रद्धाभाव ने पाहिले जाते. त्यामागे काही आख्यायिका देखील आहे. येथे असणारे प्राणी देखील लोकांना नुकसान पोहोचवत नाही. चला तर मग जाणून घेऊ या, या काही मंदिरांची माहिती.

१) डॉग टेम्पल, कर्नाटक-

हे डॉग टेम्पल कर्नाटकाच्या रामनगर जिल्ह्याच्या चन्नापटना मध्ये स्थित आहे. या मंदिराची निर्मिती वर्ष २०१० मध्ये एक व्यवसायिका द्वारे केली गेली. हा व्यवसायिकाने केम्पम्मा मंदिराची निर्मिती केली , हे मंदिर ग्रामदेवी केम्पम्मा यांना समर्पित आहे.एका आख्यायिकेनुसार, मंदिराची स्थापना होत असताना ग्राम देवी केम्पम्मा यांनी दोन कुत्र्यांना शोधण्याचा आदेश ग्रामस्थांना केला होता, जे पूर्वी गावातून गायब झाले होते, जेणे करून मंदिराला वाईटापासून वाचवता येईल.

ग्रामीणांना ते कुत्रे मिळाले नाही, म्हणून त्यांनी एक मंदिर बनवले आणि मंदिरात दोन कुत्र्यांच्या मुरत्या स्थापित केल्या. एका आख्यायिकेनुसार, ग्रामस्थांनी या डॉग टेंम्पल मंदिराचा निर्माण करून कुत्र्यांची माणसांच्याप्रति एकनिष्ठेच्या भावनेला समर्पित केले आहे.

२) भालू मंदिर –

छत्तीसगढ़- छत्तीसगढ़ मध्ये चंडी माता मंदिर आहे. हे मंदिर बऱ्याच गोष्टींसाठी विशेष आहे. छत्तीसगडच्या या महासमुंदाच्या या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की, या मंदिरात आरतीच्या वेळी काही भालू (अस्वल) येतात आणि इथल्या पुजाऱ्याकडून प्रसाद घेऊन खातात. आणि या मंदिराच्या नऊ प्रदक्षिणा लावून परत निघून जातात. विशेष म्हणजे की, या मंदिरात येणारे भालू कधीही कुणाला त्रास देत नाही. या मंदिरात येणाऱ्या भालूंच्या उपस्थितीमुळे या चंडी माता मंदिराला भालू मंदिर म्हणून देखील ओळखले जाते.

३) मंकी मंदिर –

जयपुर- राजस्थानच्या जयपूरच्या टेकड्यांमध्ये गलताजी यांचे मंदिर आहे. इथे भाविक पवित्र पाण्यात स्नान करण्यासाठी येतात. या परिसरात रामगोपालजी नावाचे मंदिर आहे, या मंदिरात माकड मोठ्या संख्येने येतात. मंदिरात माकडांच्या उपस्थितीमुळे या मंदिराला माकडाचे मंदिर किंवा बंदर मंदिर म्हटले जाते. माकडाला मारुती(हनुमानाचे) रूप मानतात, म्हणून लोक या माकडांना सन्मान देतात.

४) मन्नरसला नागराज मंदिर –

 हरिपद,केरळ -केरळच्या हरिपद येथे मन्नरसला नागराज मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन आहे आणि हे मंदिर नागदेवाला समर्पित आहे. हे मंदिर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. हे मंदिर भारताच्या केरळ राज्यात आपले एकमेव मंदिर आहे. या मंदिरात सुंदर सापाच्या मुरत्या नक्काशी केलेल्या आहेत. मन्नरसाच्या मंदिराच्या वाटेवर आणि झाड्यांवर सापाच्या १००००० नक्काशी कोरलेल्या आहे.

या मंदिराच्या भेटीला दूरवरून भाविक येतात. पण अपत्य प्राप्तीची इच्छा करणारे दाम्पत्य येथे आवर्जून भेट देतात. आणि अपत्यप्राप्तीसाठी पूजा करतात. अपत्यप्राप्ती झाल्यावर ते बाळाला घेऊन येथे येतात आणि सापांच्या मुरत्या इथे प्रसाद स्वरूपात अर्पण करतात.

संकलन : सतीश अलोणी

संग्राहक : स्मिता पंडित 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ किर्तीमुख.. ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ किर्तीमुख.. ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

देवळात गाभाऱ्याचे दरवाजावर किर्तीमुख कितीजणांना माहीत आहे?”

एकदा पार्वतीच्या सौंदर्याची स्तुती ऐकून महा शक्तिशाली जलंधर राक्षसाने पार्वतीस लग्नाची मागणी घालण्यास राहूला आपला दूत म्हणून पाठवले. राहू कैलासावर गेला,त्याने जलंधरासाठी पार्वती ला मागणी घातली, हे  ऐकून संतापलेल्या भोलेनाथांच्या तिसऱ्या डोळ्यातून एक भीषण राक्षस निर्माण झाला,आणि राहूवर धावून गेला.त्या राक्षसाचे महाभयंकर रूप बघून राहू गर्भगळीत झाला,त्याने शिवाच्या पायावर लोळणंच घेतली.भोलेनाथांनी दूत बनून आलेल्या राहूला माफ आणि तिथून काढता पाय घेतल्यावर महादेव परत ध्यानस्थ झाले. पण इकडे त्या भयंकर राक्षसाची भूक वाढतच होती. त्याने भोलेनाथांना विचारले, की मी काय खाऊ?ध्यानात मग्न होत असलेल्या महादेवांनी सांगितले,की खा स्वतःलाच.देवाधिदेव महादेवाची आज्ञा शिरसावंद्य मानून राक्षसाने स्वतःला पायापासून खायला सुरवात केली आणि खात खात त्याचे फक्त डोकेच उरले.

तरीही त्याची भूक भागली नाही.महादेवाचे ध्यान संपल्यानंतर त्याला दिसले ते फक्त राक्षसाचे डोके.त्या राक्षसाच्या आज्ञा पालनावर  भोलेनाथ प्रचंड खुश झाले. त्यांनी त्या डोक्याला नाव दिले कीर्तिमुख.

ह्या जगात कधीही न संपणारी गोष्ट म्हणजे मनुष्याचे पाप.

अमर्याद अशी भूक असलेल्या किर्तीमुखाला देवाने काम दिले भक्तांची पापं खाण्याचे पंढरपूरचा विठ्ठल असो,  कोल्हापूरची अंबाबाई,किंवा तुळजापूरची भवानी,ह्या महाराष्ट्राच्या देवतांच्या मागे जी चांदीची महिरप किंवा कमान असते,त्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही.त्या कमानीवरच विराजमान असते हे किर्तीमुख.दक्षिण भारतात शिवमंदिरांच्या शिखरावर ही किर्तीमुखे कोरलेली असतात जी शिवभक्तांची पापे गिळत असतात.शिवाचा मनुष्याच्या पापे करण्याच्या क्षमतेवर पुरेपूर विश्वास.म्हणून किर्तीमुखाला आजही पोटभर खायला मिळते

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चूको मत चौहान….भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ चूको मत चौहान – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(आणि घौरी आपल्या उच्च आसनावर विराजमान झाला !) इथून पुढे —-

चंद बरदाईच्या निर्देशानुसार सात मोठ्या लोखंडी तव्यांना ठराविक दिशेने व अंतरावर ठेवण्यात आले होते…. पृथ्वीराजांचे डोळे काढून आंधळे करण्यात आले असल्याने त्यांना चंद बरदाई च्या साहाय्याने दरबारात आणले गेले. घौरीला “शब्दभेदि बाणाचे दृश्य” नीट पाहता यावे म्हणून त्याच्या उच्च स्थानासमोरील मोकळया जागेत पृथ्वीराजांच्या बसण्याची सोय करण्यात आली होती… ते स्थानापन्न झाल्यावर त्यांच्या हातात धनुष्य आणि बाण देण्यात आले…

चंद बरदाई घौरीला म्हणाला,”खाविंद, माझ्या राजांचे साखळदंड आणि बेड्या काढण्यात याव्यात, जेणेकरून त्यांना आपल्या या अद्भुत कलेचे प्रदर्शन करता येईल” 

घौरीला त्यात काहीच धोका वाटलं नाही कारण, एक तर पृथ्वीराज डोळ्याने ठार आंधळा… चंद बरदाई सोडला तर त्याचा कोणी सैनिक नाही… आणि माझे सारे सैन्य माझ्याजवळ दरबारात उपस्थित आहे! त्याने लगेच पृथ्वीराजांना मोकळे साकारण्याचे फर्मान सोडले. 

चंद बरदाईने आपल्या परमप्रिय राजाला चरणस्पर्श करून सावध राहण्याची विनंती केली… त्याने आपल्या राजाचे गुणगान करणाऱ्या बिरुदावल्या म्हंटल्या… आणि त्याच बिरुदावलीच्या माध्यमातून चंद बरदाईनेआपल्या राजाला संकेत दिला….. 

“चार बांस, चौबीस गज, अंगुल अष्ठ प्रमाण।

ता ऊपर सुल्तान है, चूको मत चौहान।“

अर्थात् चार बांस, चोवीस गज आणि आठ वित एव्हढ्या उंचीवर सुल्तान बसला आहे…. तेव्हा राजे चौहान… कोणतीही चूक न करता तू नेम साधून आपले लक्ष्य साध्य कर!

या सांकेतिक बिरुदावलीतून पृथ्वीराजांना मोहम्मद घौरीच्या बसण्याच्या अंतराचा अचूक अंदाज आला. 

चंद बरदाईने घौरीला पुन्हा विनंती केली,” महाराज, माझे राजे हे आपले बंदी आहेत, त्यामुळे आपली आज्ञा झाल्याशिवाय ते शस्त्र चावणार नाहीत, तेव्हा आपण स्वतः त्यांना ऐकू जाईल एव्हढ्या उच्चरवाने माझ्या राजांना बाण चालवण्याची आज्ञा द्यावी”

घौरी या प्रशंसेने भारावून गेला आणि त्याने मोठ्याने उद्घोषणा केली, “चौहान चलावो बाण!… चौहान चलावो बाण!!…. चौहान चलावो बाण!!!”

घौरीचा आवाज ऐकल्या बरोबर पृथ्वीराज चौहान यांनी आपल्या धनुष्यावर चढवलेल्या बाणाची प्रत्यंचा ओढली आणि गौरीच्या आवाजाच्या दिशेने बाण सोडला नि त्या बाणाने अचूकरित्या घौरीच्या छातीचा वेध घेतला! 

काय होतंय हे कळायच्या आत, “या अल्लाह! दगा हो गया” अशी किँकाळी फोडत मोहम्मद घौरीचा देह सिंहासनावरून खाली कोसळला! 

दरबारात एकाच गोंधळ उडाला…. सारे सरदार हादरून गेले… तीच संधी साधून चंद बरदाई धावत आपल्या प्राणप्रिय राजाच्या जवळ आला… त्याने घौरी मृत होऊन कोसळल्याची बातमी आपल्या राजाला सांगितली… आपल्या बहादूर राजाला वंदन केले… दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले… चंद बरदाई आणि पृथ्वीराजांना याची कल्पना होती कि, घौरी चा मृत्यू झाल्यावर त्याचे सैन्य आपल्याला छळ-छळ करून ठार मारणार… त्यामुळे आधीच ठरल्याप्रमाणे दोघांनी एकमेकांवर वार करून वसंत पंचमीच्या शुभ दिवशी माता सरस्वतीला आपल्या प्राणांचे अर्घ्य दिले!

पृथ्वीराज चौहान आणि कवी चंद बरदाई यांची हि आत्मत्यागाची शौर्य गाथा आपल्या भारतीय मुलांना अभिमानाने कथन करणे, त्यांच्यापर्यंत पोचणे आवश्यक आहे, म्हणून आज आपल्यासमोर आणली आहे. आपण देखील ही शौर्यगाथा आपल्या मुलांसोबत शेअर कराल हीच अपेक्षा. धन्यवाद!

समाप्त 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चूको मत चौहान….भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ चूको मत चौहान – भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

अफगाणिस्तानातील काबूलच्या अंधार कोठडीत एक नर-सिंह उद्विग्नपणे येरझाऱ्या घालीत होता…. ज्या हातांतील तलवारीने शत्रूंच्या टोळधाडीला पळता भुई थोडी करून चारीमुंड्या चीत केले होते तेच हात साखळदंडांनी करकचून बांधले गेले होते… पळत्या घोड्यावर मांड ठोकणाऱ्या पायात भारी भक्कम बेड्या टाकून त्यांना जायबंदी केले गेले होते…. त्याच्या फोडल्या गेलेल्या डोळ्याच्या खोबणीत आजही प्रतिशोधाचा अंगार प्रज्वलित होता… अशा या बहाद्दर वीराचे नाव होते “हिंदशिरोमणी पृथ्वीराज चौहान”!

अजयमेरूच्या (अजमेर) या राजपूत वीराने परदेशी इस्लामिक आक्रमक मोहम्मद घौरी ला सोळा वेळा पराभूत केले होते आणि प्रत्येक वेळी उदारपणा दाखवत त्याला जिवंत सोडले, परंतु सतराव्या वेळेस त्यांचा पराभव झाला, तेव्हा मोहम्मद घौरी ने त्यांना सोडले नाही. त्याने त्यांना बंदिवान करून काबुल-अफगाणिस्तानात नेले. सोळा वेळेस पराभूत झाल्यावर ज्या घौरीने दया म्हणून प्राणाची भीक मागितली तोच घौरी बंदी केलेल्या पृथ्वीराजांवर आसूड ओढत होता आणि इस्लाम स्वीकारण्यासाठी अनन्वित छळ करीत होता. “प्राण गेला तरी बेहत्तर पण इस्लाम स्वीकारणार नाही” असे म्हणून डोळ्यास डोळा भिडवणाऱ्या पृथ्वीराजांचे डोळे फोडण्यात आले होते! 

पृथ्वीराजांचा इमानी राजकवी “चंद बरदाई”, आपल्या राजाला, पृथ्वीराजांना भेटायला थेट काबूलला पोहोचला! तेथील कैदेत असताना पृथ्वीराजांची दयनीय अवस्था पाहून चंद बरदाईच्या मनाला तीव्र धक्का बसला… आपल्या राजाचे असे हाल करणाऱ्या घौरीचा त्याने सूड घेण्याचे ठरवले… आपली योजना त्याने आपल्या राजांना सांगितली आणि विनंती केली कि, “हे राजा, आपण या घौरीला इतकेवेळा माफ केले, पण आता या सापाच्या अवलादीचा वध करण्याची वेळ आली आहे!” 

चंद बरदाई घौरीच्या दरबारात आला…. त्याने घौरीला सांगितले की, “आमचा राजा एक महाप्रतापी सम्राट आहे… तो एक महावीर योद्धा तर आहेच पण माझ्या राजाची तुला अवगत नसलेली एक खासियत म्हणजे, आमचे राजे ध्वनी-लक्ष-भेदनात प्रवीण आहेत! नुसत्या आवाजाच्या रोखाने बाण चालवून अचूक सावज टिपण्यात ते तरबेज आहेत!  जर तुमची इच्छा असेल तर आपण त्याच्या शब्दभेदी बाणांची अद्भुत कामगिरी स्वतः पाहू शकता! 

यावर घौरीचा विश्वासच बसेना, तो म्हणाला, “अरे, मी तर तुझ्या राजाचे दोन्ही डोळे फोडले आहेत… मग तो आंधळा कसा काय धनुष्यबाण चालवणार?”

चंद बरदाई अदबीने उत्तरला, “खाविंद, तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष ही विद्या पाहू शकता… माझ्या राजांना इथे दरबारात बोलवा… काही अंतरावर लोखंडाचे सात तवे ठेवा…. आणि त्यांचा आवाज करायला सांगा…. माझे राजे आपल्या धनुष्यबाणाने त्या सातही तव्यांचे भेदन करतील!” 

घौरी कुत्सितपणे हसला नि म्हणाला, “तू तर फारच प्रशंसक आहेस तुझ्या राजाचा! पण एक लक्षात ठेव…. जर का तुझा राजा हि कला दाखवू शकला नाही, तर त्याच दरबारात मी तुझे आणि तुझ्या राजाचे डोके उडवून लावीन!” 

चंद बरदाईने घौरीची अट मान्य केली आणि बंदिगृहात आपल्या लाडक्या राजांच्या भेटीला आला. तिथे त्याने पृथ्वीराजांना घौरीसोबत झालेली बातचीत सांगितली, दरबाराची सविस्तर मांडणी विशद केली आणि दोघांनी मिळून आपली योजना आखली….

ठरल्याप्रमाणे घौरीने दरबार भरवला आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी आपल्या राज्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना आमंत्रित केले…. भालदार चोपदार यांनी मोहम्मद घौरी दरबारात येत असल्याची वर्दी दिली…. आणि घौरी आपल्या उच्च आसनावर विराजमान झाला! 

 क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री उप्पिलियाप्पन कोविल….सुश्री मानसी घाणेकर ☆ संग्राहक – सुश्री वीणा छापखाने

? इंद्रधनुष्य ? 

☆ श्री उप्पिलियाप्पन कोविल….सुश्री मानसी घाणेकर ☆ सुश्री वीणा छापखाने☆

तमिळनाडूला गेलो होतो तेव्हा कुंभकोणम्ला एका मंदिरात दर्शनाला गेलेलो… ‘श्री उप्पिलियाप्पन कोविल’. याची गोष्ट गंमतीशीर आहे. श्री मार्कंडेय ऋषींनी भूदेवी—लक्ष्मीदेवी आपली मुलगी म्हणून जन्माला यावी यासाठी घनघोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन श्री लक्ष्मीदेवी त्यांच्या आश्रमासमोरच्या तुळशीवृंदावनाखाली लहान बालिकेच्या रूपानं प्रकट झाली. मार्कंडेय ऋषींनी अगदी प्रेमळ बापाच्या जिव्हाळ्यानं काळजीकाट्यानं तिला लहानाची मोठी केली. इतकी वर्षं श्री लक्ष्मीदेवीचा विरह भगवान विष्णूंना अजिबात सहन होईना. ते मार्कंडेय ऋषींकडे साधंसुधं रूप घेऊन गेले. पौंगडावस्था आणि तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या श्री लक्ष्मीदेवीचा हात मागण्यासाठी. त्यांना मार्कंडेय ऋषींनी ओळखलं नाही. ऋषी म्हणाले, ‘ अहो, माझी गोडुली मुलगी अजून किती लहान आहे ! तुम्ही किती मोठे आहात…छे छे..ते काही जमणार नाही…तिला अजून काहीच दुनियादारी येत नाही…तापत्रय असलेल्या संसाराचा भार ती कशी सांभाळेल? अहो…तिला अजून पदार्थ शिजवताना मीठ किती टाकावं याचाही अंदाज नाही…! ‘ त्यावर भगवान श्रीमहाविष्णू म्हणाले, ‘ नका काळजी करू…मी सांभाळून घेईन तिला संसारात…अजिबात अंतर देणार नाही…तिला जेवण बनवताना मिठाचा अंदाज येत नाही ना….काही हरकत नाही…मी आजपासून बिनामिठाचं भोजन करेन! ‘

आणि मग तिथे श्री महाविष्णू—लक्ष्मीदेवीचं लग्न झालं. तेव्हापासून त्या मंदिरात बिनामिठाचा नैवेद्य दाखवला जातो !!

’ उप्पू (मीठ) + इल्लेया (नाही) + अप्पन (स्वामी) म्हणजे मीठ न खाणारा देव ‘  असं श्री महाविष्णूंना बिरूद दिलं गेलं.

अतिशय चवदार आणि अफलातून प्रसाद आहे तिथला  !!!

परिपूर्ण पुरूष !!!

 

— मानसी घाणेकर

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्मिता अशोक झगडे – श्री सुहास मुकुंद मोरे ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

 

? इंद्रधनुष्य ? 

☆ स्मिता अशोक झगडे – श्री सुहास मुकुंद मोरे ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे ऑफिसची गाडी बंद पडली. त्यामुळे संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर कालिना ते सायन स्टेशनपर्यंत ऑटोने यावे लागले.

पावसाची रिपरिप थोडीशी चालूच होती. तोंडावर मास्क, त्यामुळे डोळ्यावर असलेल्या चष्म्यावर धुकं जमलेलंं… घाईघाईत ऑटोतून उतरतानाच टॅक्सी स्टँडवर असलेल्या एका टॅक्सीकडे हात दाखवत सवयीप्रमाने मोठ्याने विचारले, “बरकत अली नाका चलोगे क्या?”

त्याच वेळी ड्रायव्हर सीटच्या बाजूचा दरवाजा उघडत एक हसऱ्या डोळ्यांचा चेहरा बाहेर डोकावत बोलला, “कुठे…?”

तोवर माझ्या चष्म्याची काच क्लीअर झाली होती. आता मला स्पष्ट दिसले… ती एक महिला होती !

मी थोडा गोंधळलो…मागे फिरणारच होतो, इतक्यात पुन्हा प्रश्न आला, “कुठे जायचेय?”

मी गोंधळलेल्या चेहऱ्याने कसेतरी हसत (मास्कमुळे न दिसलेले) मराठीत बोललो, “बरकत अली नाका, वडाळा.”

त्या म्हणाल्या, “बसा सर.”

मी आणि आझे एक सहकारी दोघे आत बसलो. नवीकोरी टॅक्सी, कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून पुढच्या आणि मागच्या सीटमध्ये प्लास्टीकचा पारदर्शक पडदा.

टॅक्सी स्टार्ट करून त्यांनी विनंती केली, ” सर, मला रस्ता गाईड करा प्लीज.” मी हो म्हणालो.

असे विचारणारा ड्रायव्हर नवा असतो हे सांगायला नको.

सरदार नगर, सायन कोळीवाडा येथे माझे सहकारी उतरले.

महिला टॅक्सी ड्रायव्हर, विशेष म्हणजे आपली मराठी महिला, असलेल्या टॅक्सीत मी प्रथमच प्रवास करत होतो…

त्यांच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा झाली. त्यांचा प्रतिसाद कसा असेल याचा विचार करत होतो.

बरकत अली नाक्यापर्यंत प्रवासात त्यांच्याशी बोलावे म्हणून विचारले,

” किती वर्षं झाली टॅक्सी चालवता? “

” एक महिना झाला..”

त्यांचे उत्तर आणि माझे प्रश्न असा प्रवास चालू होता..

काळाचौकी येथे राहणाऱ्या या धाडसी महिलेचे नाव स्मिता अशोक झगडे.

लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटलेली…..चिंचपोकळी येथील प्रसिद्ध शोरूम लॉकडाऊनकाळात बंद असल्याने तिथली नोकरी नसल्यातच जमा……  कुटुंबाची जबाबदारी, वाढत्या महागाई मध्ये पती पत्नी दोघेही कमावते असले तरच निभाव लागेल अशी परिस्थिती….  हाताला काम नाही….

ड्रायव्हींग लायसन्स २०१२ ला बनवून घेतले होते.

मग डोक्यात विचार आला, खचून न जाता नव्या क्षेत्रात धाडस करायचे.

एका महिलेने टॅक्सी चालवणे हा विचार तसा सहजासहजी कोणालाही न पटणाराच.

पाय ओढणाऱ्या आपल्याच लोकांचा नेहमीचा बुरसटलेला प्रश्न तयार होताच,

” लोकं काय म्हणतील??”

पण हे अपेक्षित होतेच.

काठावर बसून बुडणाऱ्याची मजा पाहणाऱ्या लोकांची पर्वा न करता स्वाभिमानाने जगण्यासाठी स्वत:च्या आवडीचे क्षेत्र निवडता येणे हीच मोठी गोष्ट.

स्मिता झगडे यांनी घरातल्यांच्या पाठबळावर टॅक्सी चालवायचा निर्णय घेतला…!

स्मिता झगडे यांना रोज वेगवेगळे अनुभव येतात. पण इतरांना वाटते तशी आमची_मुंबई वाईट नाही याचा त्यांना विश्वास वाटतो.

ड्रायव्हिंग करत असताना मुंबईच्या रस्त्यांची पुरेशी माहिती नसते, तेव्हा प्रवाश्यांनाच  विनंती करण्याची त्यांची तयारी असते. प्रवाश्यांशी वागताना सौजन्य हा महत्त्वाचा गुणधर्म त्यांच्या अंगी जाणवला. विशेष म्हणजे त्यांनी भाडे नाकारले नाही. (भाडे नाकारणे हा इथल्या टॅक्सीचालकांचा जन्मसिध्द अधिकार आहे की काय असे वाटते.)

प्रवाश्यांच्या प्रतिक्षेत असताना ड्रायव्हर सीटवर महिला पाहून कधी कधी लोकं न विचारताच पुढे जातात. बरेचदा लोकांना कुतुहल वाटते. महिलांना असे काही वेगळे करताना पाहण्याची सवय नसल्याचा हा परिणाम असेल.

स्मिता झगडे यांच्याशी बोलताना एक गोष्ट सतत मनात येत होती…यांच्या धाडसाची दखल माध्यमांनी घेतली पाहीजे. महिला सबलीकरणाच्या फक्त गप्पा मारून चालणार नाही. अशा वेगळ्या वाटा निवडणाऱ्या हिरकणींना प्रोत्साहन दिलेच पाहीजे. स्मिता झगडेसारखी परिस्थितीवर मात करू पाहणारी स्त्री इतर स्त्रियांसाठी उदाहरण असते.

कोणतेच काम लहान मोठे नसते.  तुमची मानसिकता आणि स्वत:ला स्वयंप्रकाशित करण्याची जिद्द  तुमच्या कामाचा दर्जा ठरवते. परिस्थितीपुढे हतबल होणारे, खचून जाणारे समाजाचे आदर्श होऊ शकत नाहीत. समाजाचे खरे आदर्श असतात ते स्मिता झगडे यांच्यासारखी सामान्यांतली असामान्य माणसं !

अशा धाडसाला हवी असते ती प्रोत्साहनाची शाबासकी, आत्मविश्वास वाढवणारे दोन शब्द. त्यांची लढाई ते लढत असतात. आपण फक्त लढ म्हटले तरी त्यांना हत्तीचे बळ मिळते.

मी असेच त्यांच्या धाडसाला प्रोत्साहन दिले. बरकत अली नाका आल्यावर एक फोटो काढू का विचारले तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला. मास्क घातलेला एक फोटो क्लिक केल्यावर त्यांनीच मास्क बाजूला करून दुसरा फोटो काढायची परवानगी दिली. नंतर माझा मोबाईल नंबर मागून घेतला. त्यांचे नाव पत्ता दिला.

मुंबई सारख्या ठिकाणी २५-३० मिनिटांच्या प्रवासातल्या ओळखीत आपल्यावर कोणी असा विश्वास दाखवते, ते ही एक महिला, तेव्हा एक सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी नक्कीच वाढलेली असते.

स्मिता अशोक झगडे यांची मुंबईतल्या प्रवासात कधी कुठे भेट झाली तर त्यांना प्रोत्साहन द्यायला विसरू नका…!

Don’t Underestimate The Power Of Women !

 

– सुहास मुकुंद मोरे

संग्राहक –  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मी कसा आहे..? ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ? 

☆ मी कसा आहे..? ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

आपल्याच देशातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपतींची ही कहाणी आहे. एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाले होते. तेवढ्यात त्यांच्यासमोर घरमालक येऊन उभा राहिला. “आज कसं येणं झालं..?” उद्योगपतींनी त्या माणसाला विचारले. कामाच्या नादात ते विसरून गेले होते की, समोर त्यांचा घरमालक उभा आहे. घरमालक विनम्रपणे म्हणाला,” मी भाडं वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवता. यावेळेला कामाच्या गडबडीत राहून गेलेलं दिसतं.”

उद्योगपती वरमले आणि म्हणाले, ” हे घ्या तुमचं घरभाडं. उशीर झाल्याबद्दल क्षमा करा.” एवढे बोलून उद्योगपतींनी खिशात हात घालून पैसे काढले व घरमालकाला दिले. घरमालक   उद्योगपतींना म्हणाला,” तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता, याचे मला आश्चर्य वाटते.” यावर उद्योगपती हसले व म्हणाले, ” मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व आहे. माझ्या काही तत्त्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो.” घरमालक काही समजला नाही. तो भाडे घेऊन निघून गेला.

हा प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्रायव्हर पाहत होता. उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेश प्रवासासाठी तिकीट काढायला एका एअरलाईनच्या ऑफिसात गेले. तिथे बरीच गर्दी होती. उद्योगपती एखाद्या सामान्य माणसासारखे रांगेमध्ये उभे राहिले.. तेवढयात एअरलाईनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले, ते घाईने पुढे आले आणि म्हणाले,” सर, तुम्ही रांगेत का उभे आहात..? आम्ही तुमचे तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा. तुम्ही रांगेत उभे राहून आम्हाला लाजवू नका.”

उद्योगपती म्हणाले, ” आत्ता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही, तुम्ही एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. ‘ उद्योगपती ‘ हे माझ्या नावासमोर लावलेले विशेषण आहे. मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे? हे अधिक महत्त्वाचे आहे. ”  एअरलाईनचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला. 

तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिसकडे निघाले. रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावतपळत आपापल्या कार्यालयाकडे जाताना दिसली. त्यांना लाज वाटली की, आपण एवढ्या आलिशान गाडीमधून एकटे प्रवास करीत आहोत. सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली. लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचे.

एके दिवशी हे उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले होते. त्या दिवशी एक प्रसंग घडला. हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून पेय पडले. त्यामुळे ती घाबरली. तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला. ती त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची क्षमा मागितली. तिला भीती वाटत होती की, या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार.. उद्योगपतींनी तिच्याकडे पाहिले व तिला विचारले, ” तू माझ्या अंगावर काय सांडलेस ?”  हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली, “माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला, मला क्षमा करा.” उद्योगपती हसले व म्हणाले, ” पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा, व्हिस्की सांड “. उद्योगपतींचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुदुकन हसली. तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला.

असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायव्हरने पाहिले होते. त्याची उत्सुकता चाळवली गेली. तो उद्योगपतींना म्हणाला, ” साहेब, तुम्हाला इतके साधे राहणे व वागणे कसे काय जमते..? आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगता ??”

उद्योगपती म्हणाले, ” अरे, मी लहान असताना फार उद्दाम होतो. मला सांभाळायला एक दाई होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते की, त्यांनी मला बदडून काढले. ते मला म्हणाले होते, ” तू कोण आहेस हे बिलकूल महत्त्वाचे नाही; पण.. ‘ तू कसा आहेस ‘ हे फार महत्त्वाचे आहे. आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा .”—–

—” तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे. मला हे पटले आहे की, ‘ खरोखरच आपण कोण आहोत ‘ हे महत्त्वाचे नसतेच. ‘आपण कसे आहोत ‘ यावर आपली किंमत ठरते. जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले, सगळे साधेच होते.”

या उत्तुंग उद्योगपतीचे नाव—रतन टाटा…

खरंच, जगात जेवढी उत्तुंग माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला, वागायला अत्यंत साधी—कुठलीही गुंतागुंत नसलेली— अशीच होती. .

खरेतर—-साधे राहणे हेच कठीण असते. अशा  व्यक्तींच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे…

म्हणूनच, ” तुम्ही कोण आहात . ”  हे महत्वाचे नाही—- ” तुम्ही कसे आहात ”  हे महत्वाचे आहे—-

विचार जरूर करा—

संग्राहक : – श्री सुनीत मुळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खुलभर दुधाची कहाणी – भाग – 2 …. प्रस्तुती श्री सुनील इनामदार ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ? 

☆ खुलभर दुधाची कहाणी – भाग – 2 …. प्रस्तुती श्री सुनील इनामदार ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

(बायकांना बचतीची  सवय लागली. पैसे जमा झाले. पण पुढे काय?  इथे सुरु झाला या कथेचा दुसरा अध्याय !) इथून पुढे ——

त्यांच्या दवाखान्यात येणार्‍या बायकांना त्यांनी त्यांची मुलं वारंवार आजारी पडतात याचं कारण समजावलं. त्यांच्या आहारात रोज एक ग्लास दूध मुलांना द्यायला सांगितलं. पुन्हा एकदा बायकांनी तक्रार केली,  ” पैसे खायला पुरत नाहीत, दूध आणायचे कुठून? “. यावेळी डॉक्टरांचे उत्तर तयार होते. ” घरी गाय पाळा “. हा उपाय तर बायकांनी हसण्यावारीच नेला. ” एक पेला दुधाचे पैसे जवळ नाहीत, तर गाय कुठून आणणार? ” डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, ” मी कर्ज देतो. त्यातून गाय घ्या “.  पुढचा प्रश्न होता कर्ज परत करायचे कसे? यावर डॉक्टरांनी त्यांना एक योजना समजावून सांगितली.  ” बघा तुमच्या जमा पैशांतूनच मी कर्ज देतो. तुम्ही घरापुरते दूध ठेवून बाकीचे मला विका. त्यातून जे पैसे येतील त्यातून कर्ज फेडता येईल “.

लक्षात घ्या हा १९२०-३० चा काळ होता. बायकाच काय, पण पुरुषही निरक्षर -अडाणी होते. ही योजना त्यांचा गळी उतरायला वेळ लागला. पण एका बाईंनी हे कर्ज घेतले, दूध विकायला सुरुवात केली.  त्यानंतर ‘मी पण – मी पण ‘ असं म्हणत सगळ्या बायकांनी गायी घेऊन दूध विकायला सुरुवात केली. हळूहळू कर्ज फिटायला लागले, घरातल्या पोराबाळांना दूध मिळायला लागले, बचत वाढायला लागली. काही वर्षांतच ही योजना इतकी यशस्वी झाली की या योजनेतून सहकारी दूध संस्था उभी राहिली.

दुसरीकडे डॉक्टरांच्या बचत योजनेत इतके पैसे जमा व्हायला लागले की त्यांनी चक्क एक बँक सुरु केली. तिचं नाव होतं- “ कॅनरा इंडस्ट्रीअल अँड बॅकींग सिंडीकेट लिमिटेड.”  १९२५ साली या बँकेची पहिली शाखा कर्नाटकात उडूपी इथे सुरु झाली. १९३७ साली मुंबईच्या चेक क्लीअरींगमध्ये या बँकेची नोंदणी झाली. याच दरम्यान मणिपाल येथे डॉक्टरांनी महाविद्यालयांची सुरुवात केली. काही वर्षांतच मेडिकल -इंजीनिअरींगची कॉलेजेस पण सुरु झाली. आज जगातल्या काही उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये गणल्या जाणाऱ्या यादीत असलेल्या मणिपाल विद्यापीठाची स्थापना अशी झाली.  डॉक्टरांनी सुरु केलेल्या बँकेला आज आपण सिंडीकॅट बँक म्हणून ओळखतो.

एका छोट्या प्रयत्नातून अस्तित्वात आलेल्या सिंडीकेट बँकेची ही कथा आहे. डॉक्टर टी. एम. ए. पै यांची ही प्रेरणादायक कथा आहे. डॉक्टर टी. एम. ए. पै यांच्या आयुष्यातली आणखी एक घटना सांगितल्याशिवाय हा लेख अपूर्णच राहील.

डॉक्टर टी. एम. ए. पै हे नेहेमी व्यवसाय वाढवायच्या प्रयत्नात असायचे. अशाच एका कामासाठी जात असताना त्यांचीओळख एका गुजराती व्यापार्‍याशी झाली. त्या व्यापार्‍याला यार्नचे लायसन्स हवे होते. पण त्याची ओळख कमी पडत होती. डॉक्टर टी. एम. ए. पै यांनी त्यांच्या ओळखीचा वापर करून ते लायसन्स मिळवून दिले. त्या घटनेनंतर भारतीय उद्योगात एका नव्या कंपनीचा जन्म झाला. तिचं नाव आहे- रिलायन्स इंडस्ट्रीज आणि तो व्यापारी म्हणजे धीरुभाई अंबानी. धीरुभाई अंबानी डॉ. पैंनी केलेली मदत कधीच विसरले नाहीत. डॉ. पै असेपर्यंत रिलायन्सच्या बोर्डावर त्यांच्या कुटुंबापैकी एक सदस्य कायम असायचा. आजही रिलायन्सचा मुख्य बँकर सिंडीकेट बँकच आहे. 

महिन्याभरापूर्वी सिंडीकेट बँकेचे कॅनरा बॅकेत विलीनीकरण झाले.  पण दुधाच्या एका ग्लासमधून निर्माण झालेली ही बँक कधीच विस्मरणात जाणार नाही.

 समाप्त

—डॉ. तोन्से माधव अनंत  पै

प्रस्तुती :-सुनील इनामदार

संग्राहक : – श्री सुनीत मुळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खुलभर दुधाची कहाणी – भाग – 1 …. प्रस्तुती श्री सुनील इनामदार ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ खुलभर दुधाची कहाणी – भाग – 1 …. प्रस्तुती श्री सुनील इनामदार ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

(एक पेला दुधामुळे सुरू झाली चक्क एक बँक आणि एक विद्यापीठ !!)

खुलभर दुधाची कहाणी तुम्ही सगळ्यांनीच वाचली असेल. पाऊस पडावा म्हणून राजा प्रजेला घरात असलेलं सर्व दूध देवळाच्या गाभार्‍यात ओतायला सांगतो. गाभारा भरला की पाऊस येणार हे नक्की असतं. घरातली मुलंबाळं उपाशी ठेवून गावकरी गाभार्‍यात दूध टाकत राहतात. पण गाभारा भरत नाही. संध्याकाळी एक आज्जी घरातल्या लेकरांना आणि गाईच्या वासरांना दूध पाजून नंतर खुलभर दूध घेऊन गाभार्‍यात अर्पण करते आणि काय आश्चर्य !! गाभारा दुधाने भरून वहायला लागतो. या कथेचे पौराणिक तात्पर्य काही असो, आजच्या काळातले तात्पर्य असं आहे की विकासाच्या गाभार्‍यात प्रत्येकाने खुलभर दूध टाकले तर समृध्दीचा लोट वाहायला वेळ लागत नाही. फक्त त्याआज्जीबाईसारखं कोणीतरी मार्गदर्शन करायला हवं ! अशीच एक पेला दूधाची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत !

ही कथा आहे तोन्से माधव अनंत पै यांची. कर्नाटकातल्या एका छोट्या गावात यांचा जन्म झाला. १९२० साली हा तरूण बंगळूरला डॉक्टर व्हायला गेला. मुळात अत्यंत हुशार असलेल्या माधव अनंत पैंचं शिक्षण लवकरच आटपलं. त्यांच्या मालपे या गावात त्यांनी दवाखाना सुरु केला.  खरं सांगायचं तर या छोट्या गावातल्या डॉक्टरकीत त्यांना रस नव्हता. त्यांना जपानला जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं होतं. त्याला आईवडीलांनी मोडता घातला होता. नाईलाजाने मन मारून माधव अनंत पैंनी आपला दवाखाना त्या छोट्या गावात चालू ठेवला होता.

मालपे हे छोटंसं मच्छीमारांचं गाव होतं. सर्दी-खोकला-हगवण-उलट्या हे वर्षभर छळणारे रोग त्या गावातही होते. पण डॉक्टर पै यांना मात्र व्यवसायात काही केल्या आर्थिक यश मिळत नव्हतं. तुटपुंज्या कमाईवर दवाखाना कसाबसा चालत होता. एकीकडे उच्च शिक्षण घेण्याची संधी हुकली होती आणि दुसरीकडे पुरेशी कमाईपण नव्हती. अशावेळी इतर तरुणांचे होते तेच झाले ! त्यांना अत्यंत नैराश्याने ग्रासले. 

अशाच चिंतेत असताना एक दिवस त्यांच्या लक्षात आले की त्यांचे उत्पन्न न वाढण्याचं कारण त्यांच्याकडे येणारे गरीब पेशंट आहेत.  मग साहजिकच गरीबांचा डॉक्टर गरीबच राहणार ! थोडं निरीक्षण केल्यावर त्यांच्या हे लक्षात आलं की गावात पुरुष फक्त मच्छीमारी करायचे. मासे विकणे आणि पैसे मिळवणे हे काम बायका करायच्या. बायकांच्या हातात पैसे आले की खर्च वगळता राहिलेली जमा पुरुष दारुत खर्च करायचे. डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणार्‍या बायकांना त्यांची बचत किती हे विचारल्यावर त्या हातात असलेली चिल्लर दाखवायच्या. त्या चिल्लरीतून डॉक्टरांनी चार आणे स्वत:कडे जमा करायला सुरुवात केली. 

दोन चोपड्यांवर हा बचतीचा कारभार सुरु झाला. एक चोपडी डॉक्टरांकडे, तर दुसरी खातेधारकाकडे !

सुरुवातीला येणारे नकार, नकाराची कारणं मोडून डॉक्टरांनी गावातल्या बायकांना बचतीची सवय लावली. काही दिवसांतच काही हजार रुपये जमा झाले. आजच्या काळात हजार म्हणजे फार मोठी रक्कम नाही, पण १९२० साली ही रक्कम फारच मोठी होती. असा जन्म झाला एका बचतीच्या सवयीचा, ज्याला नंतरच्या वर्षांमध्ये नाव मिळालं- ‘ पिग्मी डिपॉझिट स्कीम ‘. इथे या कथेचा पहिला भाग संपला. बायकांना बचतीची  सवय लागली. पैसे जमा झाले. पण पुढे काय?  इथे सुरु झाला या कथेचा दुसरा अध्याय !

क्रमशः….

—डॉ. तोन्से माधव अनंत  पै

प्रस्तुती :-सुनील इनामदार

संग्राहक : – श्री सुनीत मुळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लेखक, संशोधक पं. महादेवशास्त्री जोशी ..केशव साठ्ये ☆ संग्रहिका – सुश्री सुलु साबणेजोशी

?इंद्रधनुष्य? 

☆ लेखक, संशोधक पं. महादेवशास्त्री जोशी ..केशव साठ्ये ☆ संग्रहिका – सुश्री सुलु साबणेजोशी ☆

आज “धायरी” पुण्यातील एक विकसित होणारे उपनगर म्हणून ओळखले जाते. पण एकेकाळी ते गावाबाहेरचे निर्जन ठिकाण होते. धायरी या नावाला ओळख दिली ती महादेवशास्त्री जोशी यांनी. गोवा ही जन्मभूमी आणि पुणे ही कर्मभूमी असलेल्या जोशी यांचा १२ डिसेंबर हा स्मृतीदिन. त्या निमित्त या लेखक-संशोधक महादेवशास्त्री यांना ही आदरांजली!

बापाविना पोरे वाढवणाऱ्या थोर मातांच्या कहाण्या आपल्याला नेहेमीच वाचायला  मिळतात. पण आई स्वातंत्र्यलढ्याच्या निमित्ताने तुरुंगात गेलेली आणि इकडे बाप मुलांना वाढवतो. डॉक्टर – संशोधक करतो. आईविना मुलांना वाढवताना आपले सामाजिक सांस्कृतिक योगदान देण्यात हे पिताश्री कोठेही कमी पडत नाहीत, हे वाचले की, निर्धार आणि कष्ट एकत्र आले की कुटुंबाचा काय कायापालट होतो हे समजते. महादेवशास्त्री यांचा  जन्म गोव्याचा. पण नाव  काढायचे, मोठे व्हायचे म्हणून ते पुण्यात आले आणि पुणेकरच  झाले.

भिक्षुकी, पूजा, ज्योतिष या पिढीजात पेशापासून प्रयत्नपूर्वक दूर राहात त्यांनी लेखन हाच आपल्या आयुष्याचा श्वास आणि ध्यास केला. भाषेवर प्रभुत्व होते आणि कल्पनाशक्तीही अचाट होती. योगायोगाने एका मासिकात उपसंपादक म्हणून नोकरीही मिळाली. मोठ्या हिमतीने त्यांनी स्वतःची ज्ञानराज प्रकाशन ही संस्था सुरु केली. स्वतःमधील लेखकाचा सन्मान करण्यासाठी केलेला हा प्रयोग कालांतराने यशस्वीही झाला. 

या संघर्षमय आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारे एक आव्हान समोर ठाकले. १९५५ मध्ये गोवा-मुक्ती संग्रामाची धामधूम सुरु झाली. यांना पुण्यात स्वस्थ बसवेना. या स्वातंत्र्य-यज्ञात उडी घ्यायचीच, असा निर्धार त्यांनी केला. कुठे मच्छरदाणी शिव, बांगड्या वीक, असे करत संसाराचा गाडा ओढायला मदत करणारी पत्नी पुढे आली आणि म्हणाली – “ तुमच्यावर संसाराची, उदरनिर्वाहाची जबाबदारी आहे, तुम्ही नका भाग घेऊ, मी जाते.” शेवटी हे तयार झाले आणि सुधाताई जोशी यांनी या  संग्रामात बेधडक उडी घेतली. थोडीथोडकी नव्हे १३ वर्षांची त्यांना शिक्षा झाली. पण ४ वर्षातच त्यांची सुटका झाली. 

हा त्यांचा त्याग अतुलनीय आहेच, पण महादेवशास्त्री यांनी सुधाताई यांच्याशिवाय कच्च्याबच्यांचा सांभाळ केला आणि ते करताना आपली साहित्यसेवाही सुरु ठेवली. पत्नीशी झालेल्या ताटातुटीनंतर “भारतीय संस्कृती कोश”सारखा ग्रंथ त्यांनी निर्माण केला. १० खंडात भारतीय संस्कृतीची सांगोपांग चर्चा करणारे साहित्य निर्माण करण्याचा त्यांनी चंग बांधला. किती वर्षे लागतील, किती पैसा लागेल याची तमा न बाळगता महादेवशास्त्री यांनी या कामात स्वतःला बुडवून घेतले. 

शास्त्रीबुवांच्या लेखनात आणखी एक पैलू होता – तो म्हणजे कथालेखकाचा. “कन्यादान” हा चित्रपट, अतिशय गाजलेला “मानिनी” हा सिनेमा त्यांच्याच लेखणीतून पडद्यावर अवतरला. “थांब लक्ष्मी कुंकू लावते”, “जिव्हाळा”, “वैशाख वणवा” या लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या चित्रपटांच्या श्रेयनामावलीत लेखक म्हणून यांचे नाव कोरलेले आहे. हे असे काम पुढेही मिळणे सहज शक्य होते. पैसाही चांगला मिळाला असता. पण “संस्कृतीकोश” हे ध्येय त्यांनी डोळ्यासमोरून ढळू दिले नाही. 

आज आपण विकिपीडिया सर्रास वापरतो. ५० वर्षांपूर्वी हा कोशही एक प्रकारचा विकिपीडियाच होता. १० खंड लिहिणे म्हणजे काय, हे जे लिहिणे जाणतात, त्यांनाच कळेल. एवढे करून ते थांबले नाहीत. मुलांसाठीही चार खंडात भारतीय संस्कृती त्यांनी रसाळपणे नोंदवली. “आत्मपुराण” हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक गाजले. 

धायरीचे गावकरी त्यांना खूप मानत असत. त्यांचे अंत्यसंस्कारही धायरीतच झाले. तिथेच मोठी श्रद्धांजली सभाही झाली. तेव्हा एका गावकऱ्यांनी   काढलेले उद्गगार शास्त्रीबुवा किती थोर होते, याची साक्ष देणारे आहेत. जोशी यांच्याच मुलाने ते एका लेखात सांगितले आहेत. 

गावकरी म्हणाला, “शास्त्रीबुवा म्हंजी लई मोठा मानूस. मोठा म्हंजी किती मोठा? तर असं बघा, त्यांनी एव्हढी बुकं लिहिली. ती बुकं जर येकावर येक, येकावर येक ठेवली, तर त्यांची उंची बाबांच्या उंचीपेक्षा जास्त होईल. एवढा मोठा मानूस होता हा.’’

महादेवशास्त्री जोशी यांना विनम्र अभिवादन !

– केशव साठये

संग्राहिका : सुश्री सुलु साबणे-जोशी.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares