☆ इंद्रधनुष्य ☆ एम्. विश्वेश्वरय्या ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆
जेव्हा भारतात इंग्रजांची सत्ता होती, त्या वेळची गोष्ट आहे. खचाखच भरलेली एक रेल्वेगाडी चालली होती. इंग्रज प्रवाशांची संख्या जास्त होती. एका डब्यात एक प्रवासी गंभीर चेहरा करून बसला होता. रंगाने सावळा, देहयष्टीने साधारण, पोशाखही सामान्यच! त्यामुळे डब्यातील इतर इंग्रज प्रवासी त्याची कुचेष्टा करत होते; पण कोणाच्याही चेष्टेकडे त्याचे लक्ष नव्हते. अचानक त्याने उठून रेल्वेची साखळी खेचली. वेगात जाणारी रेल्वे तात्काळ काही अंतरावर थांबली. सर्व प्रवासी त्याला ओरडू लागले. थोड्या वेळाने रेल्वेचे सुरक्षा रक्षक तेथे आले व त्यांनी विचारले, ‘साखळी कोणी व का खेचली?’ त्या व्यक्तीने उत्तर दिले, ‘मी खेचली साखळी. माझा अंदाज आहे, साधारण एक फर्लांग अंतरावर रेल्वेचे रुळ उखडले आहेत.’
सुरक्षारक्षकाने आश्चर्याने विचारले, ‘तुम्हाला कसे काय कळले?’ तो म्हणाला, ‘महोदय, मी शांत बसून अंदाज घेत होतो. गाडीच्या गतीमध्ये मला फरक जाणवला. रेल्वे रुळाच्या आवाजातील फरकही मला पुढील धोक्याची सूचना करत होता.’
सुरक्षारक्षकांनी त्याला घेऊन रेल्वे रुळांची पाहणी केली, तर खरोखरच काही अंतरावर रुळांचे नटबोल्ट उखडले होते. इतर प्रवासी आता मात्र या व्यक्तीने एवढ्या मोठ्या अपघातातून सर्व लोकांचे प्राण वाचवले म्हणून त्याचे कौतुक करू लागले.
कोण बरे होते ते? ते होते एक इंजिनीअर. त्यांचे नाव होते ‘मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या.’
वैज्ञानिकांच्या पंक्तीत इंजिनीअर (अभियंते) कसे काय बसू शकतात, असा प्रश्न आपल्याला पडला असेल. खरे म्हणजे स्थापत्य क्षेत्रातही अनेक नवनवीन शोध लागत असतात. त्यामध्ये प्रतिभावान अशा अभियंत्यांचे बौद्धिक योगदान महत्त्वपूर्ण असते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत निर्माण आणि विकास यामध्ये इंजिनीअर तंत्रज्ञांची कुशलता महत्त्वाची ठरली आहे. यामध्ये महत्त्वाचा वाटा होता तो भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रेणादायी वाटचालीचा.
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या म्हणजेच एमव्ही… अभियांत्रिकी, पाणी व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, औद्योगिकीकरण व शिक्षण व्यवस्थापनातील एक अलौकिक असे व्यक्तिमत्त्व! त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी म्हैसूर प्रांतातील मुदेनाहल्ली या गावात झाला. त्यांचे वडील पंडित श्रीनिवास शास्त्री वेदविद्येचे प्रकांड पंडित व आयुर्वेदतज्ज्ञ होते.
असेच एकदा शास्त्रीजी गंगावतरणाची गोष्ट सांगत होते. सात-आठ वर्षांच्या विश्वेश्वरैय्याच्या मनात या गोष्टीने घर केले. भगीरथाच्या प्रयत्नाने गंगा पृथ्वीवर आली, ही गोष्ट त्याने आपल्यासाठी आदर्श मानली. ज्ञान, आत्मविश्वास आणि साधनेच्या बळावर माणूस एखाद्या नदीची दिशा बदलू शकतो, गंगेला भागीरथी बनवू शकतो, हे त्यांना कळले. त्यांनी मन लावून अभ्यास केला. माध्यमिक शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांच्यातील दडलेल्या भगीरथामुळे त्यांनी पुण्याच्या सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १८८३मध्ये इंजिनीअर होऊन सहायक अभियंता या पदावरून त्यांनी श्रीगणेशा केला. पुढे एकेक यशोशिखर पादाक्रांत करत गेले. नदीचा प्रवाह जसा पुढे पुढे जातो, तसे विश्वेश्वरय्या यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. सिंधू नदीवर धरण बांधले. या धरणामुळे दक्षिणेतील पठारी भागात सिंचनाची सोय तर झालीच, शिवाय सक्कर शहराला पाणीपुरवठाही होऊ लागला.
ते पुण्याच्या खडकवासला धरणाचे अभियंता असतानाची एक गोष्ट आहे. त्या काळी पुण्यामध्ये पाण्याची फार टंचाई होती. धरणासाठी ऑटोमॅटिक गेट सिस्टीम म्हणजे ‘स्वयंचलित दरवाजे’ हा एकमेव पर्याय होता; पण ग्रामीण भागात विजेशिवाय स्वयंचलित दरवाजे ही कल्पना म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट होती; मात्र ‘सर एमव्हीं’नी विज्ञानाच्या नियमांचा केवळ अभ्यासच केला नव्हता, तर ते नियम आपल्या रोजच्या जीवनात उतरवले होते. ‘पाण्यात बुडल्यानंतर कोणत्याही पदार्थाचे द्रव्यमान कमी होते,’ या विज्ञानाच्या साध्या नियमाचा त्यांनी खडकवासला धरणाचे दरवाजे बांधताना उपयोग करून घेतला. त्यासाठी त्यांनी दोर, गेट, डक्ट आणि प्रतिवजनाचा आधार घेतला. पाण्याचा दाब वाढला की पाणी डक्टमध्ये येते आणि प्रतिवजन कमी झाल्याने दरवाजे आपोआपच उघडतात. पाणी ओसरले, की प्रतिवजन पूर्वपदावर येते आणि दरवाजे आपोआप बंद होतात. विजेशिवाय चालणारे हे स्वयंचलित दरवाजे म्हणजे धरणक्षेत्रात नवीन क्रांतीच होती. या तंत्राचे पेटंट त्यांच्या नावे झाले; पण देशप्रेम व जनसेवा या गुणांमुळे या पेटंटचे पैसे घेण्यास त्यांनी नकार दिला.
सांडपाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था त्या काळी नसल्याने ते सांडपाणी नदीच्या पाण्यात जाऊन पाणी दूषित होते, ही मोठी समस्या होती. अशा दूषित पाण्यामुळे प्लेग, नारू, अतिसार असे साथीचे रोग फैलावण्याचा सतत धोका असे. यावर उपाय म्हणून ‘सर एमव्हीं’नी बंद पाइपमधून शहराला पाणीपुरवठा करण्याची योजना तयार केली. भारतातील २१ शहरांसाठी पाणीपुरवठ्याच्या योजना त्यांनी आखल्या आणि प्रत्यक्षातही उतरविल्या. सॅनिटरिंग इंजिनीअरिंगमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना ‘सर एमव्हीं’ नी हैदराबाद, कराची आणि दक्षिण आफ्रिकेत एडन शहरासाठी मलनि:सारणाची भूमिगत योजना आखून दिली.
त्या काळी शेतीची सारी मदार पावसावर असे. पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि जलविद्युत निर्मिती ही काळाची गरज होती. ही गरज ओळखून त्यांनी निरा नदीच्या किनारी सिंचनासाठी ब्लॉक व्यवस्थेची सुरुवात केली. या व्यवस्थेमध्ये पाण्याचे वितरण शास्त्रीय पद्धतीने केले गेले. त्यामुळे प्रभागाच्या एक तृतीयांश क्षेत्रात उसाचे व दोन तृतीयांश क्षेत्रात रब्बी आणि खरीपाची पीके घेता येऊ लागली. ही योजना तात्कालिक नव्हे, तर सार्वकालिक ठरली.
सर विश्वेश्वरय्या हे केवळ अभियंताच नव्हते, तर ते एक पर्यावरणतज्ज्ञ आणि हळव्या मनाचे छायावादी कवीही होते. त्याच भावनेतून त्यांनी प्रत्येक धरण आणि जलाशयाच्या आसपास उद्याने व वॉक वे तयार केले. प्रचंड मोठा पाणीसाठा आणि दूरवर पसरलेली हिरवाई! ‘स्वच्छ शहर, हरित शहर’ ही घोषणा बहुधा यातूनच आली असावी. कृष्णराजसागर धरण आणि वृंदावन गार्डन यांमुळेच ‘सर एमव्हीं’ना ‘आधुनिक म्हैसूरचे जनक’ असे म्हटले जाते. विश्वासार्हता, व्यवस्थापन कौशल्य, समर्पण वृत्ती आणि प्रामाणिकपणा या अद्वितीय गुणांमुळे म्हैसूरच्या महाराजांनी १९१२मध्ये त्यांची राज्याच्या दिवाणपदी नियुक्ती केली. दिवाण म्हणून काम करताना त्यांनी उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली.
विकासासाठी, दळणवळणासाठी उत्तम व्यवस्था अपरिहार्य आहे, या विचाराने त्यांनी राज्यात रेल्वे सुविधेचे नवे जाळे विणले. तिरुमाला ते तिरुपती हा रस्तेमार्गही त्यांचीच देणगी. ‘सर एमव्हीं’चे जीवन म्हणजे जणू वाहता प्रवाहच! कुठेही ओंजळीतून पाणी घ्या, ते निर्मळ अमृतासारखेच असणार. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. सातहून अधिक संस्थांची मानद डॉक्टरेट त्यांना मिळाली. सुमारे दोन डझन संस्थांना त्यांचे नाव देण्यात आले आहे. ब्रिटिश सरकारचा सीआयई हा बहुमान त्यांना मिळाला. १९५५मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
आपल्या देशाच्या विकासालाच त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. भारतीय संस्कृती सहकार्य आणि कार्यकौशल्याचे जणू प्रतीक म्हणजे सर एमव्ही. त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी आणि त्यांच्यासारख्या इंजिनीअर्सच्या योगदानाचा गौरव म्हणून १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस सर्वत्र ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. सहायक अभियंता ते भारतरत्न हा सर विश्वेश्वरय्या यांचा अद्भुत प्रवास साधी राहणी व उच्च विचारसरणी हे तत्त्व अधोरेखित करतो.
© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर.
प्राथमिक शिक्षक, जि. प. केंद्र शाळा मसुरे नं. १ (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग)
मोबाइल : ९४२०७ ३८३७५
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈