मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारावून टाकणारे धैर्य !! ☆ संग्राहक – श्री मिलिंद वेर्लेकर

 ☆  इंद्रधनुष्य : भारावून टाकणारे धैर्य !! : – संग्राहक – श्री मिलिंद वेर्लेकर

धन्य ती लाईबी! आणि धन्य ते गुणग्राहक मुख्यमंत्री!!

कुठून आणतात, या साध्यासुध्या भारतीय महिला हे अदभूत धैर्य, कमालीचा कणखरपणा, अतुलनीय चिकाटी आणि स्वयंस्वीकृत काम सक्षमपणे निभावून नेण्यासाठी कंबर कसून घेतलेली पराकोटीची जिगरबाज मेहनत अंगात…….

लाईबी ओइनम, मणिपूर मधल्या इंफाळमधली एक साधीशीच, गरीब पण अफाट जिद्दी पन्नाशीतली भारतीय कर्तुत्ववान स्त्री….

३१ मे २०२० चे संध्याकाळचे पाच वाजलेले.

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने आणि काही म्हणजे काहीच सुरु नसल्याने गिर्हाईकचं नसल्याने, दोन वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत असलेली लाईबी ही पाच सीटर ऑटो रिक्षाचालक रस्त्याच्या शेजारीच सुकवलेल्या खाऱ्या माश्यांचा छोटासा ढीग गोणपाटावर टाकून गिऱ्हाइकांची वाट बघत बसली होती.

गेली दहा वर्षे इंफाळमध्ये पहिली रिक्षाचालिका म्हणून कष्ट करून कुटुंबाचे कसेबसे उदरभरण करणारी लाईबी तिच्या दोन मुलं आणि डायबेटिक दारू पिणारा नवरा असलेल्या घरातली कमावणारी एकमेव सदस्य.

आणि त्यामुळेच लॉक डाऊन असल्याने आणि रिक्षा व्यवसाय बंदच असल्याने खारवलेले मासे विकत कशीबशी दोन वेळची चूल घरात पेटायची तिच्या.

तितक्यात एक वयस्कर आणि प्रचंड थकलेले म्हातारे गृहस्थ चिंताक्रांत चेहऱ्याने तिच्या जवळ त्याचं चौकात येऊन बराच वेळ काही शोधल्यासारखे करू लागले.

बराच वेळ त्या चौकात उभं राहून सुद्धा कुणाचीच काहीच हालचाल दिसेना म्हणून शेवटी त्या गृहस्थांनी रस्त्याकडेला मासे विकत बसलेल्या या लाईबीला विचारलं कि त्या वेळी तिथं एखादी कॅब मिळेल का जी तिघांना  तातडीने इंफाळपासून तब्बल १४० किलोमीटर लांब असलेल्या कामजोंग या पर्वतरांगांनी वेढलेल्या ठिकाणी नेऊन सोडेल.

“सगळं बंद आहे साहेब. आत्ता कॅब मिळणं अशक्य आहे आणि तुम्ही म्हणताय ते अंतर सुद्धा इथून खूप लांब, अशक्य अवघड पर्वतरांगांनी वेढलेलं आणि प्रचंड वाईट नागमोड्या रस्त्यांनी भरलेलं आहे आणि तातडीने म्हणत असाल तर आत्ता त्या ठिकाणी खाली उतरलेले खूप दाट ढग असणार आहेत त्यामुळे आत्ता इथे कुणी मिळालाच कॅबवाला जरी चुकूनमाकून तरी तो जीव धोक्यात घालून आत्ता तिथे पोचायला कॅब घालेल याची मला अजिबातच खात्री वाटत नाही साहेब.” लाईबी खरं ते म्हणाली.

म्हातारे गृहस्थ आता मात्र खचून रडकुंडीला आले.

“तुम्ही सांगताय ते सगळं मला ठाऊक आहे. गेले दोन तास मी सिव्हील हॉस्पिटलपासून इथे भटकत भटकत शोधत शोधतच आलोय कॅब मिळतेय का म्हणून पण मला सगळ्यांनी हेच सांगितलं आहे.

काही कॅंब चालक मला वाटेत भेटले पण कोणीच यायला तयार नाहीये पण आम्हांला तिघांना आत्ताच कामजोंगला जायचंच आहे. कॅंब चालकांनी स्पष्ट नकार दिलाय कारण माझ्यासोबत माझी कोलकात्यात नर्स असलेली आणि कोरोना वार्डात वैद्यकीय सेवा देताना कोरोना पोझीटीव्ह झालेली पण उपचारानंतर पूर्ण बरी झालेली आणि आता कोरोना निगेटिव्ह झालेली माझी मुलगी आहे.

त्यांच्या मते अवघड रस्त्यांसोबत कोरोना पेशंट हा देखील एक धोकाचं आहे आणि दुर्दैवाने कुणीच तो धोका पत्करू इच्छित नाहीयेत.

गेले पंधरा दिवस माझी मुलगी इथे उपचार घेतीये आणि कोरोनाशी दोन हात करताना प्रचंड थकून गेली आहे. बरी झाल्यावर आता डॉक्टरांनी तिला सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितलंय आणि म्हणून आता सक्तीचा डिस्चार्ज मिळाल्यावर आम्हांला तिला घेऊन तातडीने कामजोंगला आमच्या गावी पोचायचं आहे.

कारण कोरोना केस असल्याने इथं कुठलंच हॉटेल सुद्धा आम्हाला ठेवून घ्यायला तयार नाहीये ही प्रचंड अडचण आहे. आणि आता माझ्या मुलीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह झाल्याने आणि बेड्स कमी असल्याने हॉस्पिटलने आता माझ्या मुलीला कंपल्सरी डिस्चार्ज दिला आहे”

रडवेल्या आवाजात तो एक म्हातारा असह्हाय गांगरलेला गांजलेला गरीब बाप, शेजारीच एका टपरीत थकून बसलेल्या आपल्या अशक्त मुलीकडे हात दाखवत आपलं गाऱ्हाणं कळवळून सांगत होता.

आता मात्र त्या लोकांची ती प्रचंड अडचणीची परिस्थिती नीट जाणवलेली लाईबी आत्मविश्वासाने म्हणाली,” बाबा तुम्हाला चालणार असेल तर मी माझ्या पाच सीटर रिक्षातून तुम्हाला कामजोंगला सोडू शकते.”

आश्चर्यचकित झालेले ते म्हातारे गृहस्थ आणि त्यांचे भाऊ असे दोघेही रस्त्यावर खाली बसून अगदी थोडेसेच मासे विकणाऱ्या त्या गरीब बाईकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहू लागले.

आता मात्र त्यांचे शंकाग्रस्त चेहरे वाचून झटक्यात पन्नास वर्षीय लाईबी उभी राहिली आणि शेजारीच जरा अंतरावर उभ्या असलेल्या आपल्या रिक्षाकडे हात करून तिनं आपल्या खिशातला रिक्षा चालक परवाना त्यांना काढून दाखवला.

“चिंता करू नका साहेब. माझी कॅब नाहीये पण ही पाच सीटर रिक्षा आहे आणि गेली दहा वर्षे मी या शहरात ही बऱ्यापैकी जड रिक्षा चालवते आहे. त्यामुळे कामजोंग पर्यंतच्या नागमोड्या डोंगराळ रस्त्यांवर जरा प्रयत्न करून ही रिक्षा मी नीट चालवू शकेन यावर तुम्ही विश्वास ठेवा.

पहिलं म्हणजे तुमच्या मुलीला कोरोना झालाय तो वैद्यकीय सेवा देताना झालाय.

दुसरं म्हणजे आत्ता इथे इम्फाळ मध्ये तुम्हाला कुणीच मदत करू शकणार नाही असा माझा इथला अनुभव आहे. त्यामुळे जर मी आत्ता तुम्हाला ही मदत नाही केली तर तुम्ही रात्रभर आणि कदाचित किती वेळ इथंच रस्त्यावर भयानक थंडीत पडून राहाल हे सांगणं सुद्धा अवघड आहे.

माणुसकीच्या दृष्टीकोनातून तिला आणि तुम्हाला मदत करणं हे मी माझ कर्तव्य समजते आहे.

माझा नवरा माझ्या सोबत येईल म्हणजे तुम्हाला सोडून रातोरात आम्हाला इथे परत यायला सोपे जाईल. तुम्हाला चालणार असेल तर मी हे करायला तयार आहे.” लाईबी प्रचंड आत्मविश्वासाने म्हणाली.

त्या संकटाच्या अडचणीच्या वेळी दुसरं काहीच करता येण्याजोगं नसल्याने म्हातारे गृहस्थ आणि काका इम्फाळ पासून कामजोंग पर्यंतचा अशक्य अवघड रस्ता माहित असताना देखील पोटच्या मुलीसाठी या अफाट दिव्याला तयार झाले.

रिक्षा स्वच्छ साफ करून, आवश्यक ती कागदपत्र घेऊन, डीझेल भरून, स्थानिक वेष बदलून शर्ट आणि पॅन्ट हा रिक्षा चालकाचा गणवेश घालून लाईबी आणि परतीच्या प्रवासात सोबत म्हणून तिचा नवरा असे दोघे थोड्याच वेळात तिथे दाखलं झाले.

जाऊन येऊन २८० किलोमीटरचे रिक्षाचे पाच हजार रुपयांचं भाडं ठरलं जे परिस्थितीने गरीब असलेल्या वडलांनी कामजोंगला एका स्वयंसेवी संस्थेशी फोनवर बोलून विनंती करून ठरवलं आणि सोमिचांग चीठून ही बावीस वर्षीय तरुण नर्स स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजाला देत असलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल आणि हे करत असतानाच तिला कोरोना संसर्ग झाल्याबद्दल तिच्या विषयी कृतज्ञता म्हणून ते भाडं देण्याचं त्या स्वयंसेवी संघटनेनं लगोलग मान्य केलं.

संध्याकाळी ठीक सहा वाजता लाईबीने रिक्षा सुरु करून बाहेर काढली आणि देवाचे नाव घेऊन ही पाच सीटर रिक्षा आता सोमिचांग चीठूनला, तिच्या वृद्ध वडील आणि काकांना आणि लाईबीच्या नवऱ्याला घेऊन आवश्यक त्या वेगाने एका अत्यंत अवघड आणि दाट धुक्याने वेढलेल्या नागमोड्या डोंगररस्त्यावरून दूरवरच्या कामजोंगकडे धावू लागली.

“माझ्या आयुष्यातला तो सर्वात भयावह प्रवास होता. मला ते रस्तेही अजिबात सवयीचे नसल्याने सोमिचांग मला तिच्या त्या अशक्त अवस्थेतही पुढील रस्त्यांबद्दल मार्गदर्शन करत होती आणि अत्यंत जबाबदारीने रिक्षा चालवत सोमिचांगला त्रास होणार नाही अश्या काळजीने मी रिक्षा चालवत होते.

दिवसासुद्धा ज्या रस्त्यावर कॅब चालक मोठी गाडी घालायला भितात अश्या अशक्य नागमोड्या खालीवर असलेल्या घाटरस्त्यांवर दाट धुक्यात लहानश्या रिक्षाच्या अंधुक दिव्यात एका अशक्त मुलीला आणि दोन म्हाताऱ्या माणसांना घेऊन जबाबदारीने रिक्षा चालवत नेणे आणि ते ही सतत न थांबता आठ तास हे माझ्यासाठी एक प्रचंड मोठे दिव्य होते.” लायबी सांगत होती.

प्रवासाला सुरुवात केल्यावर तासाभरातचं सातच्या सुमारास अंधारातच तो भयावह डोंगररस्ता सुरु झाल्याने खांद्यावर घेतलेले काम किती जोखमीचे आहे याची कल्पना लाईबीला येऊ लागली. तरीही नेटाने आणि जिद्दीने ते थोडंथोडकं नव्हे तर तब्बल १४० किलोमीटरचे ते अशक्य धोकादायक अंतर या जिगरबाज महिलेने पुढील सलग आठ तसं अजिबात न थांबता कापून पूर्ण केलं आणि पहाटे अडीच वाजता कामजोंगला पोचून या तिघांनाही तिने त्यांच्या घरात सुखरूप सोडलं.

घरात पोचल्यावर गदगदून आलेल्या अशक्त सोमिचांग चीठूनने, परिस्थितीचे गांभीर्य माणुसकीने समजून घेऊन स्वतःचा जीव शब्दशः धोक्यात घालून त्या सर्वांना कामजोंगला सुखरूप आणून सोडल्याबद्दल लाईबीचे अक्षरशः पाय धरत पुन्हा पुन्हा आभार मानले.

पण यावेळी लाईबी मात्र सोमिचांगला कोरोनामुळे अवघडलेलं वाटू नये म्हणून मुद्दामून त्याकडे लक्ष न देता इम्फाळचे हॉस्पिटल कसे आहे, कोरोना उपचार नेमके काय असतात, सोमिचांगने त्या सर्व काळात धैर्य कसे टिकवले आणि काय काय केले असले प्रश्न विचारत सोमिचांग चीठूनला पोटच्या मुलीप्रमाणे, आता ती पूर्ण बरी आहे हे जाणून कोरोनामुळे अजिबात घाबरून न जाता आईच्या मायेने जवळ घेतले.

खांद्यावर घेतलेलं काम पूर्ण केल्यावर आता मात्र दिवसाची घरची कामे लाईबीला समोर दिसायला लागली आणि त्यामुळे चहापाणी झाल्यावर सोमिचांग आणि कुटुंबीय तेव्हा तिथेच थांबून सकाळी निघाचा आग्रह करत असूनसुद्धा लाईबी आणि तिचा नवरा आता तडक रातोरातच इम्फाळकडे निघाले.

तोच सगळा अवघड रस्ता त्या पहाटेच्या बेफाम गारठ्यात संपवून पुन्हा दुपारी एकच्या सुमारास इंफाळला ते दोघं घरी पोचले.

दुसऱ्या दिवशी ही बातमी सोमिचांगला प्रवासाचे पाच हजार रुपये देणाऱ्या स्वयंसेवी संघटनेमुळे मणिपूर राज्यात सर्वदूर पसरली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा पोचली.

लाईबी ओइनम या आपल्या राज्यातल्या या गरीब पण झुंझार महिलेचा तातडीने सत्कार करायचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यासाठी लाईबीला घरी आपल्या मुख्यालयात बोलावून राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी यथोचित गौरव करून शाल आणि १,१०,१००० रुपयांचे रोख पारितोषिक हातात ठेवले.

“अतुलनीय धैर्य, पराकोटीची माणुसकी आणि कोरोनासारख्या संकटाच्या काळात एका साध्या भारतीय स्त्रीने दाखवलेली ही जिद्द केवळ मणिपूरलाच नव्हे तर देशातल्या सर्वच महिलांना अनुकरणीय आहे आणि म्हणून मी श्रीमती लाईबी यांचा मी माझ्या राज्याच्या वतीने सन्मान करत आहे.” असे प्रशंसेचे उद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

लाईबी ओइनमला कॉलेजात जाणारी दोन मुले आहेत. दहा वर्षांपूर्वी तोडकेमोडके पैसे साठवून नवऱ्याच्या साथीने तिने ही रिक्षा घेतली आणि जिथे गरीब स्त्रिया रोजगारावर शेतात काम करतात अश्या मणिपूरमध्ये स्थानिक लोकांच्या त्यावेळच्या रोषाची आणि टिंगलटवाळीची मुळीच पर्वा न करता योग्य तो परवाना काढून, रिक्षा चालवायला शिकून, चालवून आणि मणिपूर मधली पहिलीच रिक्षाचालक होवून, कुटुंबाचा चरितार्थ चालवायला लाईबीने सुरुवात केली.

२०१५ साली या जिद्दीच्या लाईबीवर ‘ऑटो ड्रायव्हर’ या नावाची एक छोटेखानी डॉक्युमेंटरी सुद्धा निघाली आहे जी त्यावेळी फार गाजली.

कष्ट करेन पण भिक मागणार नाही या जिद्दीतून समाजाच्या विरोधात जाऊन रिक्षा चालवून आणि वेळेला रस्त्याकडेला बसून खारे मासे विकून कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या आणि तशीच आणीबाणीची वेळ आल्यावर माणुसकीने विचार करून एका कोरोना योद्धा नर्सलाच कोरोनाने गाठले असताना तिच्या मदतीला मागचापुढचा विचार अजिबात न करता आईच्या मायेने कंबर कसून उभ्या राहिलेल्या धीरोदात्त लाईबी ओइनमला टीम भारतीयन्स’चा मानाचा जय हिंद.

संग्राहक –मिलिंद वेर्लेकर

मूळ लेख – न्यु इंडियन एक्सप्रेस कडून साभार

‘टीम भारतीयन्स’,  ‘फील फ्री टू शेअर’

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुरीनाम देश ☆ संग्राहक – श्री माधव केळकर

☆ इंद्रधनुष्य : सुरीनाम देश – संग्राहक – श्री माधव केळकर ☆

सुरीनाम हा देश कुठे आहे हे अनेक जणांना माहिती नसेल. पण तिथे घडलेल्या सत्तांतरानंतर ह्या देशाबद्दल जाणून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे.

सुरीनाम हा देश दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीवर, ब्राझील देशाच्या अगदी डोक्यावर आहे. इथे पूर्वी डचांची वसाहत होती. इंग्रज आणि डच यांच्यात झालेल्या करारानुसार हजारो भारतीयांना इंग्रजांनी सुरीनामला कामगार म्हणून पाठवले. त्यांची गरज संपल्यावर त्यांना २ पर्याय दिले गेले १. स्वखर्चावर मायदेशी परतणे २. मोबदला म्हणून जमीन/थोडे पैसे स्विकारुन सुरीनाम मध्येच स्थायिक होणे. बहुतांश मजुरांनी दुसरा पर्याय निवडला आणि ते कायमचेच सुरीनामीज झाले. आज तिथे एकूण लोकसंख्येच्या जवळपास ३०% लोक भारतीय वंशाचे आहेत आणि हिंदुस्तानी ही प्रचलित भाषा आहे.

नुकत्याच आलेल्या निवडणूक निकालानंतर Chandrikapersad Santokhi यांनी सुरीनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. (भारतात अजून पर्यंत फक्त रिपब्लिक चॅनलने ह्या घटनेची दखल घेतली आहे.) कारण सांतोखी यांनी वेद ग्रंथांवर हात ठेवून संस्कृत मध्ये शपथ घेतली. हे खरंच interesting (किंवा विरोधाभासी) आहे. कारण, सुरीनाम मधील ह्या ऐतिहासिक घटनेच्या काही महिने अगोदर म्हणजे देशव्यापी Lockdown घोषित होण्याच्या एक आठवडा आधी भारतीय संसदेच्या वरच्या गृहात काँग्रेस, MDMK आणि इतर विरोधी पक्षांनी संस्कृत भाषेला “dead language” म्हणत सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला तीव्र विरोध केला होता. पहिली Central Sanskrit University स्थापन करण्यासाठी सरकारने २०१९ मध्ये एक विधेयक आणले होते. त्यावरील चर्चेत काँग्रेसने संस्कृत भाषेला “dead” घोषित केलं.

भारताच्या समृद्ध वारशाची जाण भारताला इतर राष्ट्रांनी करुन द्यावी लागते हेच भारतीयांचे (वैचारिक & otherwise) दारिद्र्य आहे.

बाकी, सुरीनाम मध्ये खनिज संपत्ती मुबलक आहे आणि ह्या क्षेत्रात भारतातून गुंतवणूक यावी अशी तेथील सरकारची इच्छा आहे. आपल्याला economic opportunities आहेत हे ह्यातून वेगळं सांगायलाच नको. एक बर्याच जणांना माहिती नसलेली गोष्ट म्हणजे सुरिनाम मधील ह्या पूर्वीचं सरकार सुद्धा भारताला अत्यंत अनुकूल होतं. एवढं की तिथले ह्या आधीचे उप-राष्ट्रप्रमुख अश्र्विन अधिन हे चक्क रा.स्वं.संघाचे स्वयंसेवक होते (किंवा आहेत). इतकंच नाही तर २०००-२०१० च्या दरम्यान त्यांनी संघाच्या शिक्षा वर्गाचे तृतीय वर्ष पण पूर्ण केले आहे. २०१५ च्या प्रवासी भारतीय दिनाचे ते प्रमुख पाहुणे होते. मोदी आणि अधिन ह्यांच्या भेटी नंतर काही दिवसांतच PIO (Person of Indian Origin) आणि OCI (Overseas Citizen of India) चे नियम बदलण्यात आले होते ज्यामुळे फिजी, मॉरिशस, USA आणि सुरीनाम सारख्या बहुतांश भारतीय असणाऱ्या देशांशी भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्यात मदत झाली आहे.

  • संग्राहक-माधव केळकर

 

Please share your Post !

Shares
image_print