मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विठ्ठल माऊली — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ विठ्ठल माऊली — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

– – विठ्ठल हा असा एकमेव देव ज्याच्या हातात शस्त्र नाही

– – असा देव ज्याचा अवतार नाही अवतार नाही म्हणून जन्मस्थळ नाही 

– – जन्मस्थळ नाही म्हणून पुढल्या कटकटी नाहीत, वाद तंटे नाहीत.

– – असा देव ज्याला अमुक पद्धतीने पुजलं पाहिजे असं बंधन नाही.

– – असा देव ज्याला माऊली म्हटलं जातं….. देव आई असण्याचं हे उदाहरण दुर्मिळ.

– – असा देव जो शाप देत नाही, कोपत नाही, हाणामारी करत नाही.

– – कोणतीही विशिष्ट व्रतवैकल्य नाहीत.

– – कोणताही विशिष्ट नैवेद्य नाही.

– – कोणतीही आवडती फुले नाहीत.

– – कोणताही आवडता पोशाख नाही.

– – – जशी आई आपल्या मुलाचा राग, रुसवा, नाराजी, दुःख.. सगळं सहन करते तसा हा विठुराया आपल्या भक्तांचे राग, रुसवा, नाराजी, आणि दुःख सगळं सहन करतो. आणि म्हणूनच कदाचित – – – त्याला पुरुष असूनही माऊली म्हणत असावेत.

राम कृष्ण हरी.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “संविधान निर्मितीचा इतिहास – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ “संविधान निर्मितीचा इतिहास – –☆ श्री जगदीश काबरे ☆

(संविधान दिनाच्या निमित्ताने )

  1. A) भारतीय राज्यघटना तयार करताना असलेल्या समित्या एकंदर २२ समित्या होत्या. त्यापैकी प्रमुख समित्या खालीलप्रमाणे

१)संचलन, कार्यपद्धती, वित्त, स्टाफ आणि राष्टरध्वज या पाच समित्यांचे अध्यक्ष होते राजेंद्रप्रसाद.

२)संघराज्य, संविधान या समित्यांचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू.

३) प्रांतिक संविधान, अल्पसंख्याक व अनुसूचित जातीजमाती या समित्यांचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल.

४)मूलभूत अधिकार या समितीचे अध्यक्ष होते आचार्य कृपलानी.

५) मसुदा समितीचे अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकर.

  1. B) राज्यघटना तयार करताना खालील देशातील राज्यघटनेचा अभ्यास करून काही गोष्टी घेण्यात आल्या.
  • इंग्लंडमधील घटनेतून घेतलेल्या गोष्टी…

१)पार्लमेंटरी पद्धत 

२)एकल नागरिकत्व 

३)कायद्याचे राज्य 

४)कायदे तयार करण्याची प्रक्रिया 

  • अमेरिकेतील घटनेतून घेतलेल्या गोष्टी…

१) फेडरल स्ट्रक्चर 

२) न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य 

३)पार्लमेंट, न्यायसंस्था व सरकार यांचे स्वतंत्र अधिकार 

४)तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुख राष्ट्रपती 

  • ऑस्ट्रेलियातील घटनेतून घेतलेल्या गोष्टी…

राज्यात व देशात व्यापाराचे स्वातंत्र्य 

  • फ्रेंच घटनेतून घेतलेल्या गोष्टी…

स्वतंत्र्य समता व बंधुत्व 

  • कॅनडाच्या घटनेतून घेतलेल्या गोष्टी…

१) मजबूत केंद्र सरकार 

२) केंद्र व राज्य यांच्या आधिकाराची विभागणी 

  • रशियाच्या घटनेतून घेतलेल्या गोष्टी…

१) नियोजन मंडळ व पंचवार्षिक योजना

  1. C) संविधान निर्मितीकरिता २२ समित्या निर्माण केल्या होत्या. प्रत्येक समितीस काही कामे वाटून दिली होती. उदा. हिंदी भाषांतर समिती, उर्दू भाषांतर समिती, वृत्तपत्रे प्रेक्षागृह समिती इ. अश्या समितीचा घटना निर्मितीशी त्यांचा तितकासा थेट संबंध नव्हता.

“मसुदा समिती” ह्या समीतीलाच घटनेचा मसुदा(प्रारूप) निर्माण करण्याचे काम सोपवले होते. मसुदा समितीच्या अध्यक्ष स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विराजमान होते. मसुदा समितीत केवळ ७ लोक सदस्य होते. त्या प्रत्येक सदस्यांनी वेगवेगळ्या कारणामुळे घटनेचे प्रारूप किंवा मसुदा निर्माण करण्याचे काम मध्यात सोडले त्यामुळे घटनेचा मसुदा निर्माण करण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडली. अशी शासकीय दस्तऐवजी नोंद आहे.

मसुदा समितीचे एक सभासद टी. टी. कृष्णम्माचारी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, “मसुदा समितीवर ज्या सात सदस्यांची नियुक्ती केली होती त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला म्हणून त्यांच्या जागी दुसऱ्यांना नियुक्त करण्यात आले नाही. एका सदस्याचा मृत्यू झाला आणि ती जागा रिकामीच राहिली. एक सदस्य दूर अमेरिकेत निघून गेले त्यांचीही जागा भरली गेलीच नाही दुसरे एक सदस्य राज्याच्या राजकारणात व्यस्त होते, गुंतलेले होते आणि त्या प्रमाणात पोकळी निर्माण झाली होती. एक किंवा दोन सदस्य दिल्लीपासून फार दूर होते आणि कदाचित प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी बैठकीत भाग घेतलाच नाही. याचा अंतिम परिणाम असा झाला की, संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डॉ. आंबेडकर यांच्यावर आली आणि त्यांनी हे महत्वपूर्ण कार्य नि:संशय अत्यंत समर्थपणे पूर्ण केले यात तिळमात्र शंका नाही. याकरिता आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत. “

समितीतील प्रत्येक सदस्याचे कार्य महत्वाचे आहेच. ते नाकारता येणार नाही. परंतु सर्व सदस्यांनीच आंबेडकराना घटनेचे सर्वात जास्त श्रेय दिले आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकराना घटनेचे शिल्पकार म्हणण्यात काहीही वावगे नाही.

घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले, “या खुर्चीत बसून घटना समितीच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करीत आलो आहे. विशेषतः या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे. ” 

(संदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ, पृष्ठ क्र. १०, प्रकाशक: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन)

☘️☘️

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १७ — श्रद्धात्रयविभागयोगः — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १७ — श्रद्धात्रयविभागयोगः — (श्लोक ११ ते २0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

अफलाकाङ्क्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते । 

यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः ॥ ११ ॥

*

शास्त्रोक्त यज्ञ कर्तव्य निष्काम कर्म बुद्धीने

सात्विक तो यज्ञ संपन्न समाधानी वृत्तीने ॥११॥

*

अभिसन्धाय तु फलं दम्भार्थमपि चैव यत्‌ । 

इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम्‌ ॥ १२ ॥

*

प्रयोजन फलप्राप्तीचे अथवा केवळ दिखाव्याचे

ऐश्या यज्ञा भरतश्रेष्ठा राजस म्हणून जाणायाचे ॥१२॥

*

विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम्‌ । 

श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते ॥ १३ ॥

*

नाही विधी ना अन्नदान, मंत्र नाही दक्षिणा

श्रद्धाहीन यज्ञा ऐशा तामस यज्ञ जाणा ॥१३॥

*

देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम्‌ । 

ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ॥ १४ ॥

*

देव ब्राह्मण गुरु ज्ञानी यांची पवित्र आर्जवी पूजा

ब्रह्मचर्य अहिंसा आचरत हे शारीरिक तप कुंतीजा ॥१४॥

*

अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्‌ । 

स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ॥ १५ ॥

*

प्रिय हितकारक यथार्थ क्लेशहीन भाषण

वेदपठण नामस्मरण हे तप वाणीचे अर्जुन ॥१५॥

*

मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः । 

भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥ १६ ॥

*

प्रसन्न मन शांत स्वभाव आत्मनिग्रह मौन

पवित्र मानसे भगवच्चिंतन मानस तप जाण ॥१६॥

*

श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः । 

अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते ॥१७॥

*

निष्काम वृत्ती श्रद्धाभावे आचरण ही त्रयतप

जाणुन घेई धनंजया तू हेचि सात्विक तप ॥१७॥

*

सत्कारमानपूजार्थं तपो दम्भेन चैव यत्‌ । 

क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्‌ ॥ १८ ॥

*

इच्छा मनी सत्काराची सन्मानाची वा स्वार्थाची

तप पाखंडी हे राजस प्राप्ती क्षणभंगूर फलाची ॥१८॥

*

मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः । 

परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्‌ ॥ १९ ॥

*

मन वाचा देहाला कष्टद मूढ हेकेखोर तप

दूजासि असते अनिष्ट जाणी यासी तामस तप ॥१९॥

*

दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे । 

देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम्‌ ॥ २० ॥

*

दानात नाही उपकार कर्तव्यास्तव दान

देशा काला पात्रा दान तेचि सात्त्विक दान ॥२०॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नामा म्हणे आता लोपला दिनकर.. ।। ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘नामा म्हणे आता लोपला दिनकर.. ।।‘ – लेखक : संत नामदेव  

नामा म्हणे आता लोपला दिनकर.. ।। 

*

देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर । 

जातो ज्ञानेश्वर समाधीसी ॥१॥

*

नदीचिया माशा घातलें माजवण । 

तैसें जनवन कलवलें ॥२॥

*

दाही दिशा धुंद उदयास्ताविण । 

तैसेंचि गगन कालवलें ॥३॥

*

जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी । 

पुढें ज्ञानेश्वरी ठेवियेली ॥४॥

*

ज्ञानदेव म्हणे सुखी केलें देवा । 

पादपद्मीं ठेवा निरंतर ॥५॥

*

तीन वेळां जेव्हां जोडिलें करकमळ । 

झांकियेले डोळे ज्ञानदेवें ॥६॥

*

भीममुद्रा डोळा निरंजनीं लीन । 

जालें ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥७॥

*

नामा म्हणे आता लोपला दिनकर । 

बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ॥८॥

— समाधीचे अभंग (६७)

 संत श्रीनामदेव महाराज

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प. पू. श्री सद्गुरू निवृत्तीदादा☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ प. पू. श्री सद्गुरू निवृत्तीदादा ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

प. पू. श्री सद्गुरू निवृत्तीदादा,

शिरसाष्टांग प्रणिपात !!!

दादा, आज अनेक वर्षांनी तुला पत्र लिहीत आहे. त्यामुळे खरं सांगायचं तर पत्रात नक्की काय लिहावे हे ठरवता येत नाही. तरीही तुला माझ्या मनातील भाव कळलेच असतील, कारण तू माझा निव्वळ दादा नाहीस तर माझा सद्गुरूही आहेस. आईबाबांच्या पाठीमागे तूच आमचा पालक झालास. त्यामुळे जसं आईला आपल्या लेकराच्या मनातील कळत, तसं तुला कळणे स्वाभाविकच आहे…..

आज अनेकजण अनेक ठिकाणी त्यांच्या मतीगतीनुसार ‘संजीवनीसमाधी’ दिन सोहळा साजरा करीत आहेत. विठूमाऊलींचा जयघोष होत आहे, हरिनामाचा जयजयकार होत आहे, नामसंकीर्तन चालू आहे, काही ठिकाणी ज्ञानेश्वरी सप्ताह सुरू आहे. हे सर्व पाहून मी आज खूप कृतार्थ आहे. तू नेमून दिलेलं कार्य काही अंशी तरी पार पाडता आले, याचे मला अतीव समाधान आहे. गुरुआज्ञेचे पालन करणे किती कठीण आहे याची जाणीव मला खचितच आहे, तरीही गुरूआज्ञा पालन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आणि आपल्या कृपेने यामध्ये मला प्रचंड यश लाभलं… ! ‘हरिनामाचा प्रसार’ आणि गीतेची ओळख जगाला करून देण्याचा अल्पसा प्रयत्न मी केला आणि आपल्या कृपेने हे कार्य आजही अनेकजण करीत आहेत. अरे दादा, भावार्थदीपिका ही ज्ञानेश्वरी आहेच, परंतु त्याहून जास्त ती विज्ञानेश्वरी आहे. आपणच हे आपल्या तरुण बंधू भगिनींना आज पुन्हा सांगायला हवे, म्हणून हा पत्र प्रपंच केला आहे. अर्थात, हे सर्व आपल्या कृपेचे फळ आहे.

भागवत धर्माची पताका आपण माझ्या खांद्यावर दिलीत… ! आजपर्यंत सुमारे सातशे वर्षे ही परंपरा आपल्या भगवद्भक्त भारतीयांनी, हरिदासांनी चालू ठेवली आहे. यामागे विठूमाऊलीचे आशीर्वाद आहेत. हे कार्य निरंतर चालू राहावे असा आशीर्वाद आपण मला द्यावा. मागे मागितलेले ‘पसायदान’ आपण द्यायला तत्पर असालच, परंतु ते घेण्याची पात्रता प्रत्येक *हरिदासात यावी अशी कृपा आपण करावी. ‘आई’कडे हट्ट केलेला चालतो, हट्ट करावा म्हणून हे सर्व हट्टाने मागत आहे. चि. सोपान आणि माझी मुक्ताई यांना अनेक आशीर्वाद… !

आपले विहित कर्तव्य पूर्ण झाले की स्वतःहून निजधामास जायचे असते हे सामान्य जनांना कळावे म्हणून मी आपल्या परवानगीने ‘संजीवन समाधी’ घेतली…. ! आपले शरीर पंचमहाभूतात विलीन करणे इतकाच याचा हेतू… ! 

दादा, आज आई बाबांची पुन्हा आठवण झाली आणि माझ्या डोळ्यांच्या कडा पुन्हा ओल्या झाल्या….. ;

आता निरोप घेतो…. !

आपल्या चरणी पुन्हा एकदा साष्टांग दंडवत.

आपला चरणदास,

‘ज्ञाना’

 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आगळं वेगळं — ☆ माहिती संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ आगळं वेगळं — ☆ माहिती संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

एक आटपाट नगर होतं. तिथे एक श्रीमंत ब्राह्मण राहत होता…

… चमकलात ना वाचून?

कारण आपण आत्तापर्यंत सर्व कथाकहाण्यांमध्ये “तिथे एक गरीब ब्राह्मण रहात होता” हेच शब्द ऐकत-वाचत आलो आहोत. त्यामुळे “श्रीमंत ब्राह्मण” हे विरोधाभासी शब्द कानांना देखिल नाही म्हटलं तरी खटकतातच !!

🤣🤣

“नावडतीचं मीठ अळणी” ही मराठीतील म्हण किंवा वाक्प्रचार आपण अनेक वेळा ऐकलाय. पण हीच म्हण खूप जुन्या मराठी गोष्टींमध्ये वेगळ्या प्रकारे वापरली गेलेली तुम्ही वाचली आहे कां?

आवडतीचं मीठ गोड आणि नावडतीचं मीठ अळणी

किंवा

आवडतीचं मीठ गोड आणि नावडतीची साखर खारट

🤣

एका डांसानं डांसीपासून डायव्होर्स घेतला, कारण ती अंगाला ओडोमस लावून झोपायची !!

😗

बहुतेक सर्व खेडेगावांचे दोन भाग पाडलेले असतात. “खुर्द आणि बुद्रुक”.

यातला बुद्रुक हा शब्द व्यवहारांत साधारणपणे दुय्यम दर्जाचा, किरकोळ, दुबळा, हडकुळा, मरतुकडा या अर्थी वापरला जातो, कारण त्याचा उच्चारही तसाच, म्हणजे काहीसा दळिद्रीच आहे! त्यामानाने खुर्द हा शब्द थोडा ठसकेबाज आहे.

पण प्रत्यक्षातले अर्थ मात्र पूर्णपणे उलटे आहेत! खुर्द म्हणजे खुर्दा, चिल्लर. आणि बुद्रुक म्हणजे महान, मोठा, महत्वाचा.

😗

चपल-अचपल हे शब्द सुद्धा असेच. चपल म्हणजे चटपटीत, गतिमान. अचपल म्हणजे संथ, स्थिर, स्थाणु. हे शब्द देखील कधी कधी उलट अर्थी वापरले जातात. समर्थांनी सुद्धा चपळ याअर्थी अचपळ हा शब्द वापरलेला दिसतो.

“अचपल मन माझे नावरे आवरीता”.

🤔

अडगुलं मडगुलं,

सोन्याचं कडगुलं,

रुप्याचा वाळा,

तान्ह्या बाळा

तीऽऽट लावू…

तान्ह्या बाळाच्या कपाळावर, गालावर काजळाची गोल तीट लावतांना त्याची आई नेहमी या ओळी गुणगुणते. ही तीट गोल कशी हवी? आडासारखी, माडासारखी, कड्यासारखी, वाळ्यासारखी. मूळच्या ओळींचा अपभभ्रंश होऊन वरच्या ओळी निर्माण झाल्या. मूळच्या ओळी अशा :-

आड (विहीर) गोल

माड (नारळाचं झाड) गोल

सोन्याचं कडं गोल

रुप्याचा (चांदीचा) वाळा (गोल)

 

तान्ह्या बाळा तीट लावू..

😗

पां, पै, बा, गा, भो, जी…

ही आणि अशी इतर काही निरर्थक एकाक्षरे आपल्याकडच्या संतांनी, कवींनी त्यांच्या ओवी, अभंग, काव्यांमध्ये वापरलेली दिसतात, ती केवळ मात्रा दोष सुधारण्यासाठी. अन्यथा त्या अक्षरांना काहीच अर्थ नसतो.

“भो” म्हणे “जी” आपणिकासी

नेत्री पाणियाच्या रासी

 

पृथ्वी दाहे करोनि जाळिली

तोडिली झाडली “पै” भूती

 

संकष्ट चतुर्थी व्रत सदा

न सोडी मी जाण “पां”

 

कां “गा” तुला माझा

न ये जिव्हाळा “बा”

🤔 🤔 🤔 🤔

शोधक, संग्राहक : सुहास सोहोनी

रत्नागिरी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हरवलेली माणसं… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हरवलेली माणसं… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

एक म्हातारा मीठवाला यायचा. त्याचे ‘मीऽऽठ’ हे शब्द इतके हळू असायचे की कोणालाच ते ऐकू जायचे नाहीत. पण त्याची येण्याची वेळ ठरलेली होती. सकाळी अकराची त्याची वेळ कधी चुकली नाही. त्यामुळे त्या वेळात लोक त्याला बघायचे आणि हाक मारायचे. त्याच्या मोठ्या टोपलीत पुठ्ठ्याने दोन भाग केलेले असत. एका भागात खडे मीठ आणि दुसऱ्यात बारीक मीठ. त्याच्याकडे मीठ मोजून द्यायचं मापच नव्हतं. आपण जी बरणी समोर ठेवू ती गच्च भरून तो मीठ द्यायचा आणि बरणीचा आकार बघून पैसे सांगायचा. गिऱ्हाईकांनाही त्यात काही गैर वाटायचं नाही. तो सांगेल ते पैसे लोक देत असत. तोही अवास्तव पैसे सांगत नसे.

एखाद्याने जर सांगितलं की मला अर्धीच बरणी मीठ हवं आहे तरी तो बरणी गच्च भरूनच मीठ द्यायचा. “अरे, अर्धी बरणी सांगितली होती, ” असं म्हटलं तर म्हणायचा, “मला कुणाची बरणी रिकामी ठेवलेली आवडत नाही. मग आपल्याला आयुष्यात अर्धंच सुख मिळतं. तुम्ही पैसे अर्ध्या बरणीचेच द्या. ”

तो खरंच ह्या भावनेने बरणी भरत होता का त्याला माहित होतं की बरणीभर मीठ घेतल्यावर कुणीच अर्ध्या बरणीचे पैसे देत नसत. पुरे पैसेच देत. त्यामुळे त्याच्या वृत्तीचा अंदाज लागत नसे. पण मिठासारखी जेवणातली सर्वात महत्त्वाची जेवणाला चव देणारी गोष्ट तो आम्हाला घरबसल्या मोठ्या आपुलकीने पुरवत होता हे नक्की.

* * * *

हातगाडीवर केळ्यांचे खूप घड रचून एक केळीवाला यायचा. हिरवी आणि वेलची अशी दोन्ही केळी असायची. अजिबात ओरडायचा नाही. कॉलनीत आला की एका इमारतीच्या सावलीत गाडी उभी करायचा आणि दोन्ही हातात मावतील तेवढी पाच-सहा डझन केळी घेऊन प्रत्येक इमारतीच्या पाचही मजल्यांवर फिरायचा. मजल्यावर गेल्यावर ‘केऽऽळीवाला’ अशी हाक द्यायचा. दाराशी केळी आल्यामुळे खूप जण केळी घ्यायचे. खूप खप व्हायचा. तो असा फिरत असताना गाडीची राखण करायला कुणीही नसायचं. ती बेवारशीच उभी असायची. पण केळीवाल्याला त्याची काळजी नसायची.

मी एकदा त्याला म्हटलं, “ गाडी अशी इथे टाकून जातोस. दोन-चार डझन केळी जर कुणी चोरली तर तुला कळणारही नाही. ”

तो म्हणाला, “नाही ताई. ह्या कॉलनीत कुणी केळी चोरणार नाही ह्याचा मला विश्वास आहे. फुकट कोणी केळी उचलणार नाही. आम्ही पण माणसं ओळखतो. आणि ताई, कुणी उचललीच तर तो वरचा बघतो आहे. तो चोरणाऱ्याला ती पचून देणार नाही. ” देवावरची श्रद्धा आणि माणसांच्या चांगुलपणावर विश्वास, ह्यावर त्यावेळी व्यवसाय चालत होते. विकणारा आणि विकत घेणारा ह्या दोघांची मनं स्वच्छ होती बहुतेक.

* * * *

फुलांची मोठ्ठी टोपली डोक्यावर घेऊन फुलवाला यायचा. मोगरा, जाई, सायली अशी हाराला उपयोगी पडणारी फुलं तो प्लॅस्टिकच्या पिशवीत वेगवेगळी बांधून आणायचा. खूप लोक हारासाठी ती सुटी फुलं घ्यायचे. बाकी सर्व टोपली लांब देठांच्या, विविध रंगांच्या, विविध जातींच्या, विविध आकारांच्या फुलांनी भरलेली असायची. त्याला फुलांचा बुके बनवता यायचा नाही पण आपल्याला हवी ती आणि परवडतील ती फुलं त्याला निवडून दिली की तो टोपलीच्या तळाशी ठेवलेली पानं बाहेर काढायचा आणि त्या निवडलेल्या फुलांची सुंदर रंगसंगती साधून ती पानं लावून, दोऱ्याने बांधून सुबक गुच्छ तयार करायचा. फुलदाणीत तो गुच्छ फार छान दिसायचा. घरी आलेला प्रत्येक जण त्या गुच्छाचं कौतुक करायचा.

मी त्याला म्हटलं, “असं उन्हातान्हात दारोदार फिरण्यापेक्षा तू दुकान का टाकत नाहीस?”

तो म्हणाला, “ताई, दुकानाची फार कटकट असते. त्याचं भाडं मला परवडत नाही. म्युन्सिपाल्टीचे वेगवेगळे नियम पाळावे लागतात. हप्तेही वसूल केले जातात. ते झंझट मागे लागण्यापेक्षा मला हेच बरं वाटतं. दाराशी येत असल्यामुळे गिऱ्हाईकं खूप मिळतात. दगदग होते पण धंदा बरा होतो. खूप ओळखीही होतात. माणसं जोडली जातात. मध्यंतरी माझ्या मुलीचं ऑपरेशन होतं तेव्हा कॉलनीतीलच लोकांनी मला पैशांची मदत केली. मी पैसे बुडवणार नाही हा त्यांना विश्वास होता. दुकानावर गिऱ्हाईकांशी इतकी जवळीक होत नाही. ”

प्रत्येकाचं धंद्याचं गणित वेगळं असलं तरी एकमेकांवरचा विश्वास हेच त्यामागचं खरं सूत्र होतं.

* * * *

आंब्याच्या दिवसांत पाट्या घेऊन चार-पाच आंबेवाले यायचे. पण रघु पाट्या घेऊन येईल त्या दिवशी ते धंदा न करता सरळ बाहेर पडायचे. ह्याचं कारण म्हणजे रघु इतरांपेक्षा स्वस्त आंबे द्यायचा. त्यामुळे तो येईल त्या दिवशी इतरांचा धंदा होत नसे. रघु पोरसवदा आणि अगदी काटकुळा होता. तो येईल तेव्हा पाच पाट्या घेऊन यायचा. झाडाच्या सावलीत पण वॉचमनच्या जवळपास पाट्या ठेवायचा आणि एक पाटी घेऊन इमारतीत शिरायचा. बहुतेक वेळा त्याला त्यापूर्वीच एखाद्या ब्लॉकमधून हाक यायची. तो तिथे हमखास पाटी विकूनच यायचा.

त्याचे आंबे बाजारभावापेक्षा स्वस्त असायचे. तरी त्याच्याशी खूप घासाघीस करावी लागायची. तो पाटीचे तीनशे रुपये म्हणाला की माहितगार गिऱ्हाईक दीडशे म्हणायचा. मग तो खूप वेळ आपले आंबे कसे चांगले आहेत आणि भावही कसा रास्त आहे त्याचं वर्णन करायचा. शेवटी दोनशेला सौदा ठरायचा. तो भाव अर्थातच बाहेरपेक्षा स्वस्तच असायचा. आंबेही चांगले असायचे. दोन-तीन तासांत त्याच्या पाचही पेट्या संपायच्या, मग आठवडाभर तो दिसायचा नाही.

“बाजारभावापेक्षा स्वस्त आंबे तू कसे विकतोस? तुझं नुकसान होत नाही का?” शेजारणीने एकदा त्याला विचारलं.

तो म्हणाला, “ताई, कोकणात आमच्या आंब्याच्या बागा आहेत. आम्ही आंबा विकत घेऊन विकत नाही. मोठा धंदा आहे आमचा. क्रॉफर्ड मार्केटमध्ये दुकान आहे. मी हाच धंदा पुढे करणार आहे. पण वडील म्हणतात एकदम गल्ल्यावर नाही बसायचं. धंद्याची गणितं स्वतः शिकायची. गिऱ्हाईकांना कसं पटवायचं, माणूस कसा ओळखायचा, मेहनत कशी करायची हे शिकत मग धंद्यात यायचं. वडील मला पाच पेट्या देतात. घरोघरी जाऊन विकायला सांगतात आणि येणारे पैसे तूच घे सांगतात. मला घरचा खर्च नसल्याने तेवढे पैसे मला पुरतात पण धंद्याची गणितंही कळतात. दोन वर्षांनी वडील मला स्वतंत्र गाळा घेऊन देणार आहेत. मग मला माझा वेगळा धंदा सुरु करता येईल.”

खरंच धंद्याची गणितंच वेगळी असतात. ‘वेष बावळा तरी अंतरी नाना कळा’ असा तो आंबेवाला होता.

* * * *

जस्ताची भली मोठी पेटी घेऊन खारी बिस्कीटवाला यायचा. त्याच्या ह्या मोठ्या पेटीत अनेक चौकोनी भाग होते. ते सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या बिस्किटांनी भरलेले असत. ही बिस्किटं स्वस्त आणि वजनाला हलकी असल्याने भरपूर यायची. त्यामुळे बिस्कीटवाला आला की मुलं एकदम खूश असत. तो माणूस अगदी म्हातारा आणि अशक्त होता पण जिद्दीने कॉलनीभर फिरून पेटी रिकामी करूनच परत जायचा.

“दादा, एवढी पेटी घेऊन दारोदार फिरण्यापेक्षा एक बेकरी का उघडत नाही? थोडं कर्ज काढायचं आणि बेकरी सुरु झाल्यावर हळूहळू फेडायचं, ” मी सहज एकदा म्हटलं.

“कर्ज?” तो एकदम उसळून म्हणाला. “ताई जमिनीच्या तुकड्यासाठी माझ्या बापाने कर्ज काढलं आणि अचानक तो दगावला. कर्ज माझ्या डोक्यावर आलं. उमेदीची सारी वर्षं कर्ज आणि संसार ह्या दोन्हींच्या ओढाताणीत संपली. कर्ज फिटल्यावर कळलं तो सारा लबाडीचा मामला होता. ती जमीनही हातात आली नाही. आम्ही सारेच अशिक्षित. म्हणून ठरवलं, मुलांना शिकवायचं. जाताना त्यांच्यासाठी पैसा नाही ठेवून जाणार पण कर्जही नाही ठेवून जाणार. बेकरी टाकली तर मुलांना हाच व्यवसाय पुढे करावा लागेल. ते बंधनही मी ठेवणार नाही. त्यांना हवं ते त्यांनी त्यांच्या मनाने स्वतंत्रपणे करावं. मनासारखं आयुष्य जगावं. माझ्यासारखं आधीची ओझी उचलत जगायला नको. ”

मी थक्क झाले. आयुष्यात एवढं सोसलेल्या माणसाशी आपण मात्र तो पाच रुपये म्हणाला तर चार रुपयांना दे म्हणून घासाघीस करत राहतो. अशिक्षित असूनही मुलांच्या भविष्याचा त्याने एवढा विचार केला होता. रोज पाहत असलेल्या त्या माणसात मला वेगळाच माणूस दिसू लागला.

लेखिका : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझे गाव कापडणे… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? इंद्रधनुष्य ?

☆ माझे गाव कापडणे… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

माझे गाव कापडणे…

मंडळी, आपले स्वातंत्र्यवीर कसे जीवावर उदार होऊन फिरत होते ते आपण वाचले. किती किती अभिमान दाटून येतो हो या वीरांविषयी मनात नि मला तर खूप धन्य वाटते की देशासाठी झगडणाऱ्या एका क्रांतिवीराच्या पोटी मी जन्म घेतला व ध्यानी मनी नसतांना त्यांच्या कार्यकर्तृत्वावर “ चला कापडण्याला” नावाचे पुस्तक २०२१ साली लिहून मी त्यांच्या ऋणातून थोडेफार उतराई होण्याचा प्रयत्न केला. 

तसे तर आई वडीलांचे ऋण कधीही न फिटणारेच असतात. आणि शिवाय आता “ आपला महाराष्ट्र”धुळे, कपोले साहेबांच्या आग्रहास्तव “ माझे गाव कापडणे”ही मालिका मी दर रविवारी लिहिते आहे.आणि

महत्वाचे म्हणजे तुमचा तिला भरभरून प्रतिसाद आहे. खरे सांगते तुम्हाला, मोबाईल हातात घेईपर्यंत मी आज काय लिहिणार आहे हे मला मुळीच माहित नसते. पण एकदा का बोट ठेवले की तुम्ही जणू माझ्याकडून लिहवून घेता असेच मला वाटते. कारण त्या आधी मी एकदम ब्लॅंक असते. पण अचानक कोणी तरी सांगितल्या प्रमाणे लिहू लागते.तुम्ही सारे ते गोड मानून घेताच. बायाबापड्या, भाऊ वहिनी साऱ्यांचेच मला फोन येत असतात. भरभरून बोलतात मंडळी. मला ही छान वाटते. आपल्या लिखाणाचे चीज झालेले पाहून. असो..

आता, चला.. चले जाव कडे …

मंडळी .. 

ह्या चिमठाणा प्रकरणाच्या आधी पासूनच म्हणजे १९४२ पासूनच ह्या क्रांतीकारकांनी गावोगावी ब्रिटिशांना सतावणारे नाना उद्योग सुरू ठेवले होते. ब्रिटिशांना भारतात काम करणेच मुश्किल करून टाकायचे.. सहकार्य तर नाहीच पण अडचणीच निर्माण करायच्या या उद्देशाने पूर्ण खानदेश पेटून उठला होता. त्यामुळे सरकारी कचेऱ्या जाळणे .. तारा यंत्राच्या तारा तोडणे.. जेणेकरुन संदेशवाहन यंत्रणाच बंद पडून पोलिस खाते अडचणीत यावे अशा प्रकारची धाडसी व जोखीम पत्करणारी कामे जीवावर उदार होऊन ही देशभक्त मंडळी करत होती. ते स्वत: क्रांतीकार्यात असल्यामुळे पैशांची वानवा होती. बंदी असतांनाही ही मंडळी सरकारी कचेऱ्यांवर झेंडा फडकवत होती.

नामदेव संपत पाटील यांनी साक्री कचेरीवर जाऊन झेंडा फडकवला. सवाई मुक्टी, पाष्टे येथील तरूणांनी शिंदखेडा मामलेदार कचेरीवर झेंडा लावण्याचा प्रयत्न केला.अटक व्हायला हे देशभक्त जरा ही डगमगत नसत .जाळपोळीचे सत्र चालूच होते.

याच वेळी खानदेश मधील काही देशभक्तांनी एकत्र येऊन प.खानदेशमधील सरकारी विश्रांती गृहे जाळण्याचा कार्यक्रम ठरविला. श्री.विष्णू सीताराम पाटील यांनी चिमठाण्याचा(शिंदखेडा),श्री.व्यंकटराव धोबी यांनी बोराडीचा(शिरपूर), श्री.रामचंद्र पाटील यांनी धुळ्याचा,देऊरच्या नेत्यांनी साक्रीचा बंगला जाळायचे ठरवले.या कामी अप्रत्यक्षपणे मदत करणारे अनेक देशभक्त होते.यांचे काम रॅाकेलचे डबे पुरवणे , काळे पोषाख  पुरवणे,पोलिसांवर नजर ठेवणे,पोलिस कारवाईची माहिती देशभक्तांना देणे अशी जोखमीची कामे इतर मंडळी करत असत..

समाजातील दानशूर लोक अशा क्रांतिकार्याला पैसे पुरवत असत. या कार्यक्रमासाठी श्री.रामेश्वर शेठ पोतदार धुळे, यांनी प्रथम ७००/- रूपये श्री. विष्णू सीताराम पाटील,कापडणे यांना दिले.” मुंबईहून अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांनी २००० रूपये पाठवले. “ या शिवाय अनेक सामान्य लोक देशभक्तांना विविध मार्गांनी मदत करत होते….

पुढे … विष्णूभाऊंनी चिमठाण्याचा बंगला जाळला …कसा ….? ते पाहू या पुढे.

२६ सप्टेंबर १९४२ रोजी तळोदा येथील रेस्टहाऊस पेटविण्यात आले.तेथल्या वॅाचमनला लोकांनी बांधून ठेवले. रेस्टहाऊसच्या मुख्य हॅालमध्ये रॅाकेल शिंपडून ते पेटविण्यात आले. त्या मुळे रेस्टहाऊसचा मुख्य हॅाल पूर्ण जळून गेला. ८००/- रुपयांचे नुकसान झाले.वॅाचमनने लोकांच्या मदतीने स्वत:ची सुटका करून घेतली.त्यानंतर त्याने रेस्ट हाऊसची आग विझवली.

श्री.विष्णू सीताराम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १३ ॲाक्टोबरला चिमठाण्याचा सरकारी बंगला जाळला.एका खोलीत बंगल्यातील सारे फर्निचर एकावर एक रचून ठेवले.त्यावर रॅाकेल शिंपडले आणि नंतर बंगला पेटवून दिला. त्यामुळे विश्रांतीगृहाचे छप्पर पूर्णपणे खाली कोसळले.२५०० /- रूपयांचे नुकसान झाले.(१९४४ सालातील) हा बंगला जाळतांना रॅाकेल शिंपडण्यासाठी डांगुर्णे येथील …..श्री.कैलासगीर गोकुळगीर महाराज यांच्याकडील धान्य मोजण्याचे माप अधेली (आदलं) देशभक्तांनी नेले होते. बंगला पेटवून देशभक्त परत येतांना त्यांना एकदम या भांड्याची आठवण झाली.कारण त्या भांड्यावर श्री.कैलासगीर महाराजांचे नाव होते. हे भांडे जर तसेच तेथे राहिले तर पोलिसांना आपला सुगावा लवकर लागेल,आणि आपण पकडले जाऊ हा विचार करून……

मग…

अर्ध्या रस्त्यातून … श्री.विष्णूभाऊ पाटील आणि श्री.गंगाधर पाटील हे मागे फिरले. भडकलेल्या आणि अग्नीज्वाळांनी लपेटलेल्या हॅालमध्ये त्यांनी प्रवेश केलाआणि मोठ्या मुष्किलीने ते भांडे त्यांनी परत आणले.

केवढे हे अग्नीदिव्य… डोळ्यांसमोर प्रसंग आणून पहा .. आणि हे सारे  “ गुलामगिरीत सापडलेल्या आपल्या मातृभूमीला मुक्त करण्यासाठी …. ही मंडळी प्रसंगी आगीशीही खेळत होती.”

चिमठाणा बंगला जाळण्यात ….श्री रामचंद्र गोविंद पाटील,श्री.नरोत्तमभाई पटेल, श्री.यशवंत पाटील, जुनवणे, श्री.बाबुराव गुरव शिंदखेडा, श्री. माणिकलाल छाजेड(धुळे),श्री.नामदेवराव पाटील,पोलिस पाटील डांगुर्णे, गंगाराम पाटील डांगुर्णे,श्री.राजाराम पाटील डांगुर्णे,श्री.रामदास भील,डांगुर्णे,व विष्णूभाऊ पाटील कापडणे अशा १० व्यक्तिंनी  भाग घेतला. मुख्य सहभाग कापडण्याचे विष्णुभाऊ पाटील यांचा होता. नेतृत्वही त्यांचेच होते.

चिमठाणा बंगला जाळल्यामुळे पोलिसखाते हैराण झाले.शेजारच्या गावावर त्यांचा मोठा रोष झाला.त्यांनी दडपशाही सुरू केली.सामान्य जनतेला धमक्या देणे सुरू झाले. तरीही पोलिसांना कोणी माहिती देण्यास तयार झाले नाही.एवढी निष्ठा खानदेशच्या जनतेच्या हृदयात निर्माण झाली होती. डिसेंबरच्या २८

तारखेला नंदुरबारच्या क्रांतिवीरांनी तेथील  हिल बंगल्यास पेटविले.त्यामुळे रेव्हेन्यू खात्याच्या या इमारतीचे बाथरूम आणि छप्पर पूर्ण जळाले.सुमारे ६००/-रुपयांचे नुकसान झाले. बोराडीचे रेस्टहाऊस श्री.व्यंकटराव धोबी यांनी २९ मे १९४३ रोजी जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात बोराडीच्या बंगल्याचे सुमारे १५००/- रूपयांचे नुकसान झाले. 

मंडळी.. 

आज ह्या रकमा आज आपल्याला किरकोळ वाटत असल्यातरी तो १९४२ चा काळ आहे हे लक्षात घ्या म्हणजे त्याचे मूल्य लक्षात येईल. खानदेश पूर्ण पेटून उठला होता.जिकडे तिकडे जाळपोळ  करून ब्रिटिश सरकारला या ना त्या प्रकारे कोंडीत पकडण्याचे प्रयत्न चालू होते.. व जीवावर उदार होऊन तरूण पिढीने

या धगधगत्या स्वातंत्र्ययज्ञात झोकून दिले होते . देशभर “चले जाव” आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत होता व ब्रिटिश सरकार चवताळून उठले होते, व  आपले वीर बिलकूल घाबरत नव्हते.

बरंय मंडळी, राम राम . जयहिंद.. जय महाराष्ट्र..

आपलीच,

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “काळीज-दगडावरची रेघ !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

काळीज-दगडावरची रेघ ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्याचे घर तसे आणखी बरेच दूर होते. दोन डोंगर चढून उतरुन झालेले होते.. पण तेव्हढेच आणखी शिल्लक होते. भारतीय सैन्यातील एक तरुण कनिष्ठ अधिकारी आणि एक जवान त्याच्या पलटणीमधल्या एका सैनिकाच्या घरी निघाले होते. त्यांच्यापाशी असलेल्या पिशवीतला ऐवज तसा हलका होता पण त्यांच्या मनावरचं ओझं प्रचंड मोठं होतं. युद्धात कामी आलेल्या योद्ध्याच्या घरी जाऊन त्याच्या माता-पित्यांना ती अतीव दु:खद वार्ता सांगायला मोठी हिंमत गोळा करावी लागते. तो अधिकारी तसा जड पावलांनीच चढण चढत होता. त्याच्यासोबत असलेल्या जवानाची अवस्थाही काही निराळी नव्हती. लढाईत त्याचाच जवळचा सहकारी गमावला गेला होता. आणि त्याचं घर दाखवायची जबाबदारी अधिका-यांनी त्याच्याच खांद्यावर दिली होती. एरव्ही मृत्यूला वाकुल्या दाखवणारे हे सैनिक अशा प्रसंगी भावुक होणं साहजिकच… किती केलं तरी माणसंच शेवटी. उद्या आपल्याही घरी कुणी असाच निरोप घेऊन जाऊ शकतं… हा विचारही येत असावा त्यांच्या मनात!

त्या पहाडावरून चार दोन माणसं खाली येत होती. सैनिकी गणवेशातील या दोघांना पाहून त्यातील एकाने विचारलेच… ” साब, किसके घर जा रहे हैं?” या साहेबांनी एक नाव सांगितले. प्रश्न विचारणा-या त्या माणसाने एकदा साहेबांकडे नीट पाहिले आणि तो काहीसा विचारात पडला. दिवंगत सेवानिवृत्त सैनिकांच्या घरी कशाला कोण येईल सांत्वन करायला? आणि तेही इतक्या दुरून? यांच्या पलटणीतला हा असा तसा सामान्य आणि सेवानिवृत्त सैनिक वारला, ही बातमी पलटणीपर्यंत कशी पोहोचली?

त्या ग्रामस्थाने शेवटी हिंमत करून विचारलेच… ” साब, आपको कैसे पता चला की यह फौजी बहादूर गुजर गये? ”

… त्यावेळच्या संदेशवहनाच्या व्यवस्थेनुसार ती बातमी तिथपर्यंत पोहोचणे तसे अशक्यच होते. आता विचारणारा आणि उत्तर देणारा असे दोघेही बुचकाळ्यात पडले.

“ हम तो उनके बेटे की शहादत की खबर लेके उसके घर जा रहे हैं !” साहेबांनी कसेबसे सांगितले. ते ऐकून त्या चौघांच्या चेहऱ्यावरची रया गेली. अर्थात त्या भागात अशा बातम्या येण्याची ही काही हजारावी वेळ असावी… पण तरीही धक्का बसतोच.

“वैसे कब गुजरे उनके पिताजी?” सेना अधिका-यांनी विचारले.

“ आज ग्यारह दिन हो गये, साब ! हम उनके घर से उनकी पत्नी को मिलकर वापस जा रहे थे!.. चलिये, साब… हम आपको लिये चलते हैं… ” असे म्हणत ते चारही जण पुन्हा पहाड चढू लागले.

“ म्हणजे ज्या दिवशी बाप गेला त्याच दिवशी लेकाने हे जग सोडले तर ! किती विचित्र योगायोग म्हणावा 

हा !” साहेबांच्या मनात हा एकच प्रश्न घुटमळू लागला होता. लेकाच्या मृत्यूची खबर देताना आई-बापाशी सांत्वनार्थ काय बोलायचे याची त्याने इथपर्यंत येतांना हजारदा उजळणी केलेली होती… आणि आता तर एक नव्हे.. दोन मरणांची गोष्ट होती… त्याच्या डोक्यावर आता दोन दोन पहाड होते ! मनात योजलेली कोणतीही वाक्ये आठवेनात त्यांना. खूप कठीण असतं अशा आई-बापांना सामोरे जाताना.

आधीच जडावलेली पावले… ते घर जवळ आल्यावर आणखीनच मंद झाली.

ती तिच्या घराच्या अंगणात उन्हात उभी होती… तिथे थंडी असतेच नेहमी.. सूर्य दिवसाही त्यांच्या गावावरून जायचा कंटाळा करतो. हे दोघे पुढे झाले. दोघांनीही तिला सल्यूट केला.. वीरमाता होती ती !

“ साब, आपको कैसे पता चला की… मेरे साहब गुजर गये?”.. तिला वाटले… तिच्या नव-याच्या मृत्यूबद्दल सांत्वन करायला ते अधिकारी आले आहेत इतक्या दूर. तिचा नवरा होताच तसा लढवय्या. तीन तीन लढाया गाजवून आला होता परत.. जखमी होऊन… पण अभिमानाने. थोरल्या पोरालाही त्याने त्याच्याच पलटणीत धाडले होते.

क्षणभर एकदम स्मशान शांतता पसरली. स्वत:ला सावरून साहेब म्हणाले, ” माताजी, क्षमा चाहता हूं ! आपके बेटेने देश के लिये अपना बलिदान दिया है ! उनकी युनिफॉर्म ले के आया हूं ! ”

केवळ अकरा दिवसांपूर्वी दु:खाचं वादळ सोसलेलं ते म्हातारं होत चाललेलं काळीज हा तडाखा कसं सहन करेल?

… ती क्षणभर गप्प उभी राहिली आणि मटकन खाली बसली. मोठ-मोठ्याने शोक करण्याची त्यांच्यात पद्धत नव्हती. त्या पहाडांना अशा बातम्या ऐकण्याची सवय होऊन गेली असावी… ते पहाड काही उगाच शांत भासत नाहीत. आजची काही पहिली वेळ नव्हे. पहिल्या आणि दुस-या महायुद्धात परकीय भूमीवर लढायला गेलेले कित्येक तरुण जीव परतलेच नव्हते.. आणि त्यांच्या बातम्याही अशाच उडत उडत समजल्या होत्या. काहींच्या तर बातम्याही आल्या नाहीत. सैन्य, सैन्याला आदेश देणारे अधिकारी बदलले… पण आदेश प्राणापेक्षाही जास्त मोलाचे मानणारे बदलले नव्हते. जगण्यासाठी लढत होते की लढण्यासाठी जगत होते कुणास ठाऊक? आणि ही परंपरा राखण्यात खंड नाही पडला कधी.

“कसं मरण आलं माझ्या लेकराला? वीरमरण आलं ना… माझी खात्रीच आहे ! ” गालावरचे अश्रू तसेच खाली ओघळू देत तिने विचारले !

“जी, माताजी. बहादूर था आपका बेटा. आखिरी सांस तक हार नहीं मानी ! ” असं म्हणत साहेबांनी गणवेश आणि त्याच्या काही वस्तू तिच्या हातात सन्मानाने ठेवल्या. काही चलनी नोटा असलेलं एक कागदी पाकीट ठेवलं. वरिष्ठ अधिकारी ते सर्वांत कनिष्ठ शिपाई अशा सर्वांचे एक दिवसाचे वेतन जमा करून ते पैसे कामी आलेल्या सैनिकाच्या घरी देण्याची त्यावेळी पद्धत होती… पेन्शन आणि इतर भरपाई हातात मिळेपर्यंत या पैशांचा चांगला उपयोग होत असे. त्या अधिका-याने आणि सोबत आलेल्या जवानाने तिला पुन्हा सल्यूट बजावला. तिने तिच्या नव-याच्या फोटोकडे एकदा नजर टाकली…. आसवं टपकत होतीच.

तेवढ्यात तिचा धाकटा लेक डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन अंगणात पोहोचला. “ साब, हमारे लिये क्या खबर लायें हैं आप?” त्याने विचारले. आणि त्याची नजर त्याच्या आईच्या आसवांकडे गेली.

“ जा.. इनके लिये तू चाय बना के ला दो कप. दूर से चलते हुये आहे हैं… हमारे लिये. ” तो मुलगा बिचारा निमुटपणे आत गेला आणि चार मिनिटांत बाहेर आला… हातात चहाचे कप होते. अधिकारी आणि जवान यांना त्या चहाकडे पाहण्याची हिंमत होईना.

“ बेटा, तेरा भाई भी गया तेरे पिता के साथ. अब उनकी जगह तुझे लेनी है. सेनाही हमारा परिवार है.. उससे रिश्ता बरकरार रहना चाहिये ! ”

त्यावर पोरगा खूप वेळ शांत राहिला… आणि म्हणाला… ” मग आई, तुझं एकटीचं कसं निभावेल, या घरात. कुणीच नाही तुझ्यासोबत !”

त्यावर ती म्हणाली, ” तुझ्या वडिलांविना कित्येक वर्षे काढलीच की मी एकटीनं. तुम्ही तर लहान लहान होतात. जखमी होऊन तुझे वडील घरी आले तेंव्हा कुठे आमचा खरा संसार सुरु झाला… जा. तू… बिनघोर !”

असं म्हणत त्या विधवा आणि आता पुत्रवियोगाने क्षत-विक्षत झालेल्या आईने लेकाचा गणवेश मोठ्या प्रेमाने तिच्या फडताळात ठेवला…. साहेब आणि जवान कितीतरी वेळ दगड झाल्यासारखे तिथेच उभे होते…..

पहाड उतरून जाता जाता त्यांना किती तरी वेळा मागे वळून पाहण्याची इच्छा झाली.. पण हिंमत नाही झाली ! अगदी पायथ्याशी आल्यावर त्या दोघांनीही त्या पहाडाकडे पाहून कडक सल्यूट केला आणि ते पलटणीकडे निघाले.. पलटणमधून एक कमी झाला होता… त्याची जागा लवकरच भरून निघणार होती !… पहाड शांतच होते… नेहमीसारखे !

(जगाचा इतिहास युद्धांचा आहे. या युद्धांत पडणा-या सा-याच आहुती मोजल्या जात नाहीत. पूर्वी सैनिकांचे मृतदेह त्यांच्या घरी पोहोचवण्याची पद्धतही नव्हती ! वरील कहाणी अगदी खरी… अशा माता आणि अशी लेकरं….. रणभूमीला रक्ताची ददात कधी पडू देत नाहीत. आपण त्यांच्याच कृपेने अस्तित्वात आहोत. जय हिंद !)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ – संकटे : अडथळा नाही.. संधी… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ – संकटे : अडथळा नाही.. संधी… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

 परमेश्वर संकटं अशाच व्यक्तीना देतो ज्यांच्यात त्या संकटांचा सामना करायची ताकत आहे.. त्याला खात्री आहे की कितीही वाईट परिस्थिती आली तरी तुम्ही त्यावर मात करू शकता, कोणत्याही बिकट प्रसंगातून ही स्वतःला सावरून योग्य मार्ग निवडू शकता ह्याची त्या ईश्वराला खात्री असते आणि म्हणूनच तो तुमच्या सोबत संकटांची मालिका सुरु करतो.. कोळशाला पैलू पाडले जात नाहीत तर तावून सुलाखून निघतो तो हिरा.. हिऱ्यावर पैलू पाडले जातात त्यालाच घाव सोसावे लागतात पण तरीही तो चमकतोच…! तसच आपलं ही आहे कितीही वाईट प्रसंग, संकट का येईना आपली नीतिमत्ता, स्वतःवरील विश्वास, परमेश्वरावरील श्रद्धा ह्याच्या जोरावर आपण मात करुच ही खात्री त्या विधात्याला ही असतेच आणि म्हणूनच तो आपली परिक्षा घेत असतो… सभोवती कितीही चिखल असला तरी कमळ निर्लेप, बेदाग राहतं, नाजूक राहतं.. गुलाबाला ही काटे सहन करावे लागतात, मोगरा, जाई, जुई, प्राजक्त ह्याना ही अल्प आयुष्य लाभतं पण त्यातही ते सभोवती सुगंधच पसरवतात.. ईश्वरचरणी अर्पित केली जातात…कागदी फुलं कितीही आकर्षक दिसली तरी ती ईश्वर चरणी नाही अर्पिली जाऊ शकतं.. संकटांचा सामना करणारे, त्यातून योग्य मार्ग काढणारेच ईश्वराचे खास असतात तो भलेही कठीण कठीण प्रसंग आणतं असेल तुमच्यावर पण तुमची साथ कधी सोडत नाही तो कोणत्या ना कोणत्या रुपात आपल्या पाठीशी असतोच असतो.. यश भलेही उशिरा मिळेल पण ते मिळवताना झालेल्या चुकांमधून आपण बरचं काही नकळत शिकत असतो.. होऊ देत चुका पण लढणं थांबवून परिक्षा अर्धवट सोडून देण्यापेक्षा चुका घडून त्यातून धडा घेणं महत्वाचं.. तेंव्हा संकटांची मालिका सुरु झाली की समजून जा आपण कोणी ऐरे गैरे नथु खैरे नाही आहोत तर आपण त्या ईश्वराचे खास आहोत तो आपल्या सदैव सोबत आहे आणि वादळ जरी त्यानेच आणलं असलं तरी आपल्याला पैलतीरी पण तोच नेणार आहे.. जो खुद्द परमेश्वराचा खास आहे त्याला संकटांची तमा बाळगण्याची गरजच काय ना… 

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares