मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गणपतीच्या आराशीत नाट्यसृष्टीचं मिनिएचर – लेखक – श्री महेश कराडकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ गणपतीच्या आराशीत नाट्यसृष्टीचं मिनिएचर लेखक – श्री महेश कराडकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

परवा मी आणि आशा शिवाजी मंडईत भाजी आणायला गेलो होतो. तो  गणपती उत्सवाचा सहावा दिवस होता. तिथं शिरीष रेळेकर नेहमीप्रमाणे हमखास भेटायचाच. अतिशय शिस्तबद्धपणे आपली ट्रॅव्हल एजन्सी चालवणारा शिरीष आज लवकर शटर ओढून लगबगीने कुठं चाललाय म्हणून मी त्याला टोकलं. तर म्हणाला, संजय पाटलांच्या घरी गणपतीचा देखावा बघायला चाललोय, आम्ही सगळे मित्र. !फेसबुक वर त्यांनी टाकलंय ते बघा…

संजय पाटील म्हणजे कसदार लिहिणारा, उत्तम अभिवाचन करणारा, नाटक चळवळीत अतिशय गांभीर्यानं आणि जबाबदारीनं वावरणारा, आकाशवाणीतून स्वेच्छा निवृत्त होऊन आपल्याला हवंय तसं कलंदर जगणारा आमचा मनस्वी दोस्त! गेली तीन-चार वर्ष तो आणि त्याचा मुलगा सारंग आपल्या घरातल्या गणपतीची आरास खूप वेगळ्या पद्धतीने सजवतात. गेल्या वर्षी त्याने सांगली संस्थानच्या गणपती पंचायतन मंदिराची प्रतिकृती केली होती. त्याच्या आधीच्या वर्षी विठ्ठल आणि तुकाराम हा विषय घेऊन आरास मांडलेली. त्याही आधी कॅमेरा ही संकल्पना घेऊन घरातलं गणपती डेकोरेशन केलेलं. यावेळी नक्कीच काहीतरी खास असणार म्हणून तिथूनच त्याला फोन लावला. म्हटलं, ‘संजयराव सगळा गाव संस्थानच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक बघायला… नाहीतर सार्वजनिक मंडळांचे देखावे बघायला झुंडीने जातो हे माहित होतं. पण ही सगळी गर्दी तुझ्या घराकडे का चालली आहे, बाबा!… तुझी परवानगी असली तर आम्ही पण येतो रात्री.’

रात्री चिन्मय पार्कमधल्या त्याच्या घरातल्या हॉलमध्ये दहा बाय सहाच्या अडीच फूट उंचीच्या त्या स्टेजवर अवघी नाट्यपंढरी साकारलेली पाहिली आणि थक्क झालो. तिथं महाराष्ट्राच्या  नाट्य इतिहासातले गाजलेले नऊ रंगमंच दोन टप्प्यात बसवले होते. त्यातील प्रत्येक रंगभूमीवर विष्णुदास भावे यांच्या पहिल्या नाटकाच्या खेळातल्या नांदी पासून मराठी नाटक परंपरेच्या समृद्ध प्रवासात मैलाचा दगड ठरलेल्या नऊ नाटकातले नऊ प्रसंग, त्यातल्या हुबेहूब नेपथ्यासह आणि पात्रांसह मांडलेले होते… आणि हे सगळं प्रत्येकाला नीट समजावं, म्हणून बारा मिनिटांचा एक शो प्रदर्शित होत होता.

सुरुवातीला खोलीत अंधार व्हायचा. आणि फक्त मधला गणपतीची शाडूची मूर्ती असलेला रंगमंच उजळायचा. दीड बाय दोन फुटांच्या त्या बॉक्स मधल्या रंगमंचावर शाडूच्या मूर्तीसमोर संगीत नाटकातली असंख्य पात्रं एकत्रितपणे नांदी म्हणत असलेला प्रसंग डोळ्यासमोर आला. नांदीतील त्या गणेश स्तवनाने क्षणात मन शे-दीडशे  वर्षांची संगीत नाटकांची सफर करून आलं. संजय पाटलांच्या निवेदनातून एकेक गुपित उघड व्हावं तसं एक एक नाटक उलगडायचं… आणि तो रंगमंच उजळून निघायचा. तिथल्या प्रवेशानुसार असलेले संवाद ऐकू यायचे. पहिल्या रंगमंचावरील प्रकाश मंद होत बंद व्हायचा आणि दुसरा ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतनचा रंगमंच प्रकाशमान व्हायचा. ‘नटसम्राट’मधील दृश्याबरोबरच श्रीराम लागूंचा पल्लेदार आवाज कानावर यायचा. त्या रंगमंचावरील संवाद संपता संपता तिसरा दामोदर हॉल, मुंबईचा रंगमंच प्रकाशमान व्हायचा आणि सखाराम बाईंडर मधील निळू फुले बोलू लागायचे. त्यानंतर यशवंत नाट्यमंदिर, मुंबईच्या रंगमंचावर ‘गेला माधव कुणीकडे’ दिसू लागायचं. ऐकू यायचं. ते संपता संपता रवींद्र नाट्य मंदिरचा रंगमंच प्रकाशमान व्हायचा… आणि ‘अश्रूंची झाली फुले’मधील काशिनाथ घाणेकर लाल्या होऊन बोलू लागायचे. मग नुकत्याच जळून खाक झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातला पूर्वीचा रंगमंच प्रकाशमान होत श्रीमंत दामोदर पंतांच्या भूमिकेतला भरत जाधव बोलू लागायचा. मग ‘चार चौघी’तला तो जळजळीत डायलॉग कानात शिरत पुण्यातलं बालगंधर्व  नाट्यमंदिर उजळून निघायचं. त्यानंतर पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात वाडा चिरेबंदीचा सेट दिसायचा, पात्रं बोलू लागायची. पुढे सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्य मंदिरात प्रा. अरुण पाटील दिग्दर्शित ॲमॅच्युअर ड्रामॅटिक असोसिएशनच्या ‘तू वेडा कुंभार’ या व्यंकटेश माडगूळकरांच्या नाटकातील प्रसंग उभा रहायचा. आणि सगळ्यात शेवटी संजय पाटील यांचा सुपुत्र सिनेमॅटोग्राफर, नेपथ्यकार ज्याला नुकतंच एका शॉर्ट फिल्म साठी जर्मनी येथे होणाऱ्या जागतिक प्रतिष्ठेच्या कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये एका शॉर्ट फिल्मसाठी विशेष अवार्ड मिळालं आहे… अशा सारंग पाटील यांनी केलेल्या व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘वाटसरू’ या नभोनाटयाचं नाट्यमंचीय रूपांतर सादर व्हायचं.

हे सगळंच अद्भुत होतं. जणू अवघी नाट्यसृष्टीच त्या एका छोट्याशा स्टेजवर साकार झाली होती. दीड बाय दोन फुटाच्या प्रत्येक रंगमंचावरची पात्र, त्या पात्रांच्या प्रमाणात असलेल्या रंगमंचावरील

 नेपथ्यामधील वस्तू, इमारतींचे भाग… सगळंच अद्भुत! लहानपणी आपण किल्ले करत आलो, त्या किल्ल्यांच्या पलीकडले खूप    ॲडव्हान्स्ड, प्रगत असं रूप म्हणजे संजय पाटलांच्या घरात गणपतीच्या आराशीतून काळाच्या पडद्याआड गेलेला पण मिनीएचर सारख्या एका लघु रंगमंचावर प्रसन्नपणे आविष्कृत होणारे ते नऊ देखावे. जणू एखाद्या व्यापारी पेठेतील प्रमुख रस्त्यावरच्या, भव्य-दिव्य सार्वजनिक गणपती मंडळाचा देखावाच त्या दहा बाय सहा च्या घरगुती स्टेजवर साकार झाला होता. संकल्पक सारंग पाटील, नेपथ्यातील वस्तू तयार करणारा त्याचा मित्र आकाश सुतार, स्टेज  तयार करणारा राजू बाबर, प्रकाशयोजना करणारा कौशिक खरे आणि सारंग चे आई वडील म्हणजेच संजय पाटील आणि सौ. जाई पाटील हे हौशी आणि प्रयोगशील दांपत्य या सर्वांनीच हा गणपती उत्सव आजच्या घडीला कसा साजरा करायला हवा याचा एक नवा आदर्श धडाच समाजाला घालून दिला आहे… आज  गोंगाटात उद्देश हरवून बसलेल्या, विकृतीकडे झुकलेल्या, उत्सवांच्या बदलत्या स्वरूपातून बाहेर पडून तुमच्या आमच्यासारख्यांना दाखवलेला आशेचा समृद्ध असा नवा किरण आहे. त्याबद्दल पाटील परिवाराचे खूप खूप आभार!

लेखक – श्री महेश कराडकर

प्रस्तुती : श्री अमोल केळकर 

#माझी_टवाळखोरी 📝

poetrymazi.blogspot.in,

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

kelkaramol.blogspot.com 

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ समर्थशिष्या- संत वेण्णाबाई – लेखिका : सुश्री विजयश्री तारे जोशी ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

समर्थशिष्या- संत वेण्णाबाई  लेखिका : सुश्री विजयश्री तारे जोशी ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

मृणालिनी जोशी यांचे १९८९ साली प्रसिद्ध झालेले दुर्मिळ पुस्तक ‘वेणास्वामी ‘ सज्जन गडावर मिळाले. ताईंनी पुस्तक इतके ओघवत्या भाषेत लिहिले आहे की तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो. रसिक वाचकांनी अवश्य वाचावे. परतल्यावर या वेणा स्वामिनी इतके झपाटून टाकले की शब्दब्रम्ह झरझर मोकळे झाले.

सुमारे पाचशे वर्षांपूर्वी समर्थांचा परीस स्पर्श झालेली ही बालविधवा सौदामिनी सारखी चमकून लुप्त झाली. कोल्हापूरच्या गोपाजीपंत देशपांडे कुटुंबात जन्मलेली ही निरागस कन्या मिरजेच्या जनार्दनपंत देशपांडे कुटुंबाची स्नुषा झाली. अत्यंत देखणे सात्विक रूप आणि कुशाग्र बुद्धी यांचा मिलाफ म्हणजे वेणूबाई. दुर्दैवाने अवघ्या दोनच महिन्यात त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. वयाच्या अकराव्या वर्षी त्या कोवळ्या जिवावर जणू आकाशच कोसळले. प्रथेप्रमाणे सुंदर लांबलचक रेशमी केश संभार कापला गेला आणि लाल अलवणात ( विधवे साठी असलेले एक खास वस्त्र) त्यांचा सुकुमार देह गुंडाळला गेला. एका निरागस कळीच्या पाकळ्या पाकळ्या पडून जणू फक्त देह रुपी विद्रूप देठ शिल्लक राहिला. आता तो देह फक्त राब राबण्यासाठी उपयुक्त होता. वेणूच्या पिताश्रीनी त्यांना बालपणीच काळाच्या पुढे जाऊन अक्षर ओळख करून दिली होती. अनेक ग्रंथांचा अभ्यास त्यांच्या कडून करून घेतला म्हणून त्यांचे जीवन थोडे तरी सुसह्य झाले. वैधव्य आले तरी त्यांचे मन धर्मग्रंथांकडे ओढ घेई आणि त्यात रमून जाई. सक्तीचे ब्रह्मचर्य अनुभवताना हळू हळू मन अंतर्मुख झाले आणि आत अनेक प्रश्न तरंग निर्माण होऊ लागले. देवाने आपल्याला मनुष्य जन्म दिला, ज्ञान साधनेची वाट दाखवली. आपण ज्ञानाचा उपयोग केला नाही तर आपला जन्म व्यर्थ जाईल असे वाटू लागले. आपल्या आत्मारामाची ओळख कोण करून देईल? अशी त्यांच्या जीवाला गुरू भेटीची आस लागून राहिली.

ती तळमळ स्वामी समर्थांना त्यांच्याकडे घेऊन गेली. ‘जय जय रघुवीर समर्थ ‘ अशी आरोळी अंगणात घुमली आणि वेणूबाईंचा आत्मा गुरू दर्शनासाठी तळमळत होता ते गुरू विधिलिखित असल्या सारखे त्यांच्या दारी उभे राहिले. वेणूबाईंचे देह भान हरपले…. आत्मा गुरूचरणी समर्पित झाला. स्वामींच्या कीर्तनात त्या रंगून गेल्या. काळ वेळेचे देखील भान हरपले. अंबाबाईच्या देवळात रात्री कीर्तनाला गेलेल्या वेणू बाई पहाटेची काकड आरती करून परतल्या. माहेरच्या प्रेमाच्या माणसांना देखील विधवा मुलीने केलेला हा प्रमाद सहन झाला नाही. धर्म रक्षण करणाऱ्या नातेवाईक लोकांनी अनेक आरोप प्रत्यारोप करून त्या अश्राप बालिकेचा जीव हैराण करून सोडला. समर्थां सारखा लफंगा संन्यासी तुला काय मोक्ष देणार म्हणून त्यांना हिणवले. विजेचा कडकडाट व्हावा तसे वेणू बाईंनी सगळ्यांचा समाचार घेतला. उद्वेगाने ‘मी काया वाचा आणि मनाने पवित्र आहे कोणती कसोटी लावता?’ असे विचारले. आप्त स्वकीयांनी विष प्राशन करण्याची शिक्षा ठोठावली. मिरेप्रमाणेच रामराया पुढे ठेवलेले विष त्यांनी हसत हसत प्राशन केले. जहाल विषाने रात्रभर तडफड करणारा सुकुमार देह अरुणोदय होताच शांत झाला. माता पिता आक्रोश करू लागले. लोक अंतिम तयारीला लागले. त्याच वेळी अंगणात ‘जय रघुवीर समर्थ ‘ ही गर्जना घुमली. समर्थांनी ‘वेणू बाळा उठ ‘ असे म्हणताच हळु हळू त्या अचेतन शरीरात प्राण परत आले. दूषणे देणारे सगळेच चकित झाले. आता या वेणू बाई आमच्या बरोबर येतील.. कारण आता त्या तुमच्या नाहीत तर फक्त रामरायाच्या आहेत असे समर्थांनी निक्षून सांगितले. मागे वळूनही न पाहता सारे माया पाश तोडून ही योगिनी समर्थ गुरूच्या पावलावर पाऊल टाकून घरा बाहेर पडली. त्या काळात त्यांनी हे धैर्य दाखवले.

चाफळच्या मठात अनेक विधवा तसेच परित्यक्ता अनाथ स्त्रिया मठातील सगळ्या शिष्यांना रांधून घालायचे काम करत होत्या. समर्थ देखील इतके पुरोगामी होते की रामरायाला या अबलानी केलेला नैवेद्य अर्पण करत असत. समर्थांनी प्रत्येक स्त्रीचा पिंड आणि आवड पाहून त्यांना वेगवेगळी उपासना सांगितली. काहिंना फक्त नाम स्मरण करा असे सांगितले.

विष प्राशन केल्यामुळे वेणुबाईंची प्रकृती नाजूक बनली होती. त्यांचा वर्ण देखील काळवंडला होता. वेणूबाई अत्यंत तैल बुद्धीच्या, गोड गळ्याच्या आणि अशक्त प्रकृतीच्या असल्याने समर्थांनी त्यांना ग्रंथ वाचन, पाठांतर करायला लावले इतकेच काय गुरू नेमून गायन देखील शिकायला लावले. एक दिवस या वेणू बाईंना त्यांनी चक्क कीर्तनाला उभे केले. भारत देशातल्या पहिल्या विधवा कीर्तनकार म्हणून त्यांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले. त्यांची रसाळ तेजस्वी वाणी पाहून अनेक पंडित, शास्त्री, कीर्तनकार थक्क झाले.

समर्थांनी त्यांना सर्व प्रकारे उत्तम शिक्षण दिले आणि घडवले. कुटुंबाला नकोशा झालेल्या असंख्य स्त्रियांना समर्थांनी आपल्या विविध रामदासी मठात मानाचा आसरा दिला. वेणू बाई परत माहेरी किंवा सासरी गेल्या नाहीत. सासूबाई निवर्तल्या आणि त्यांचा सासरचा वाडा मोकळा पडला.

समर्थांनी वेणू बाईंना त्यांच्या सासरच्या वाड्यात मिरजेला रामदासी मठ स्थापन करून सन्मानाने मठाधिपती करून टाकले. ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. समर्थांची आणि रामरायाची आज्ञा घेऊन वयाच्या पन्नाशीत या दिव्य स्त्रीने अखेरचे कीर्तन सादर केले आणि स्वेच्छेने सज्जन गडावर देह ठेवला.

त्यांच्या समाधीवर लावलेले चाफ्याचे झाड नंतर बहरले. समर्थांनी देह ठेवल्यावर ते झाड मूकपणे गुरूंच्या समाधीवर फुले वाहू लागले! गुरू शिष्य नाते रामरायाच्या चरणी विलीन झाले…. द्वैत सरले. धन्य ते काळाच्या पुढे असलेले गुरू आणि ती जगावेगळी शिष्या 

जय जय रघुवीर समर्थ 

लेखिका : विजयश्री तारे जोशी, कोल्हापूर

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘लखलखता हिरा.. अर्जुन देशपांडे’… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘लखलखता हिरा.. अर्जुन देशपांडे’… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

एक सोळा वर्षाचा मुलगा मेडिकलच्या दुकानात जातो. तिथे एक आजोबा कॅन्सरसाठीची औषधे घेत असतात. खरंतर त्यांना ती महागडी औषधे परवडत नसतात पण त्यांच्या पत्नीला कॅन्सर झालेला असल्याने ते कशीबशी पैशांची सोय करून औषधे घ्यायला आलेले असतात. तो मुलगा हे सगळे पहात असतो आणि न राहवून तो आजोबांना त्यांच्याबद्दल विचारतो. सत्य कळल्यावर तो खूप विचारात पडतो की असे हजारो, लाखो लोक या देशात आहेत की त्यांना ही महागडी औषधे परवडत नाहीत. पण तरीही काहीच पर्याय नसल्याने ते इतकी महाग औषधे खरेदी करतात. तो मुलगा आता यावर पर्यायांचा विचार करायला लागतो. यातूनच त्याच्या भावी उद्योगाचा पाया रचला जातो.

हा मुलगा म्हणजे ठाण्यातील वय वर्ष फक्त २२ असलेला ‘अर्जुन देशपांडे’ जो जगातील सर्वात तरुण उद्योजक आहे. त्याने स्थापन केलेल्या ‘जेनेरिक आधार’ या कंपनीचा टर्नओव्हर आहे मात्र पंधराशे कोटी रुपये !

१६ वर्षाच्या अगदी कोवळ्या वयात अर्जुनने ‘जेनेरिक आधार’ कंपनी स्थापन केली. कंपनीचा मूळ उद्देश हाच होता की गरजू आणि गरीब लोकांना अतिशय स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत. त्यासाठी त्यांनी औषधे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना गाठले. तेथून स्वस्तात औषधे खरेदी करून ‘जेनेरिक आधार’ नामक मेडिकलच्या दुकानातून त्याची विक्री सुरू केली. जी औषधे उत्पादकांकडून विकत घेऊन मोठ्या मोठ्या फार्मा कंपन्या स्वतःचे लेबल लावून अतिशय महाग विकतात तीच औषधे जेनेरिक आधार मध्ये अतिशय स्वस्त दरात मिळतात. मध्ये कुठलेही दलाल आणि इतर खर्च नसल्याने ते ही औषधे इतक्या कमी किमती विकू शकतात.

आजच्या घडीला देशभरात ‘जेनेरिक आधार’ ची तीन हजार मेडिकलची दुकाने आहेत. जिथून औषधे खरेदी करून लोकांचे हजारो लाखो रुपये वाचत आहेत.

तसेच अर्जुनने आज दहा हजार पेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगार देऊ केला आहे.

त्याच्या या कर्तुत्वाची दखल रतन टाटा सारख्या दिग्गज व्यक्तीनेही घेतली. रतन टाटांनी त्याला भेटायला बोलवून केवळ प्रोत्साहनच नाही तर त्याच्या कंपनीमध्ये गुंतवणूकही केली. याचे कारण सांगताना अर्जुन सांगतो कि आपल्या देशातील अगदी दुर्गम खेड्यातही औषधे उपलब्ध व्हावीत अशी अर्जुनप्रमाणे रतन टाटांचीही इच्छा आहे. आजपर्यंत अर्जुनला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. वय वर्षे केवळ २२ असलेल्या अर्जुनला आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली तसेच जपान सारख्या अतिप्रगत देशात मानाने बोलवले जाते. त्याचे व्याख्यान ऐकायला लोक गर्दी करतात. जपानने तर त्याला अतिशय स्वस्त दरात मोठे कर्ज दिले आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी तसेच आपल्या देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनीही अर्जुनला भेटायला बोलवून त्याची प्रशंसा केली. द्रौपदी मुर्मुशी तर त्याचे आता आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.

सध्याच्या चंगळवादी तरुणाई मध्ये अर्जुन देशपांडे हा एखाद्या लखलखत्या हिऱ्यासारखा चमकतो आहे. ज्याला आपल्या देशाचा अतिशय अभिमान आहे. त्याला आपल्या भारत देशाला अमेरिका अथवा इंग्लंड न बनवता अभिमानास्पद भारतच बनवायचा आहे.

अशा या लखलखत्या हि-याला, अर्जुनला मानाचा मुजरा !

लेखिका : सुश्री मुक्ता आंग्रे

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ढोलपथक आणि ती…” – लेखिका : सुश्री सोनाली सुळे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “ढोलपथक आणि ती…” – लेखिका : सुश्री सोनाली सुळे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे 

सणसणीत लाथ हाणली त्याने पोटात. ती भेलकांडली. जीवघेणी कळ उठली. कशीबशी उठली ती. सारी रात्र अशीच तळमळत काढली. सकाळ झाली तसे मनाचे तुकडे अन् दुखणारे शरीर घेऊन कामाला लागली. एक यंत्र बनून गेली होती ती. सहन करायचं फक्त. कधीकधी तोंडातून शब्द निघाला तर अधिकचा मार ठरलेला. त्याला हवी असायची फक्त दारू. अन् हिनेच कमवायचं, राबायचं, घर चालवायचं, घरकामही करायचं. त्याची नोकर बनून सेवा करायची. त्याची प्रत्येक अवास्तव अपेक्षा पूर्ण करायची.

सहा महिने झाले होते फक्त लग्नाला. नोकरी करणारा, शहरात राहणारा नवरा मिळाला म्हणून लगेच होकार दिला तिने. पण महिनाभरात सारं चित्र पालटलं. त्याचं खरं रुप दिसू लागलं. फसवणूक झाली हे कळायला वेळ नाही लागला तिला. परतीचा रस्ताही बंद होता. माहेरी कुणीच नव्हतं. पळून जाणं किंवा सहन करणं, दोनच पर्याय होते. पहिल्यांदा तो दारू पिऊन आला तेव्हा कडाक्याचं भांडण झालं. रात्रभर रडत राहीली. सकाळी हिच्याकडे न पाहताच तो बाहेर पडला. शेजारीण चहा चपाती घेऊन आली.

“तिसरं लग्न आहे हे त्याचं…. ” बोलता बोलता तिने सांगितलं. तिला धक्काच बसला. ” पाहिल्या बायकोने जाळून घेतलं. दुसरी पळून गेली. तू तिसरी. “तिला रडू फुटलं.” असं रडून काय होणार, लढायला शिक. मी जिथे काम करते तिथे लावून घेते तुला. बोलू का मॅनेजरशी सांग. ” तिने लगेच हो म्हटलं. त्यालाही बरच होतं. फुकट पैसा मिळतोय, नाही कशाला म्हणणार? 

कष्ट दुपटीने वाढले होते तिचे. पण जगायला कारण सापडलं होतं. तो सुधारणार नव्हताच. आणि तिलाही जायला ठिकाण नव्हतं. घुसमट होत होती. मन मारुन जगू म्हटलं तरी त्यानं केलेला अपमान, खाल्लेला मार आठवून तिच्या जीवाचा संताप होत असे. एकदा कामावरून निघताना तिला ढोल ताशे ऐकू आले. मग रोजच ऐकू येऊ लागले. तिनं त्याबद्दल शेजारणीला विचारलं. ” हे होय? अगं गणपती जवळ आलेत ना. ढोल ताशा पथकात प्रॅक्टिस सुरु असते रोज. ” तिला नवल वाटलं. ” कोण कोण असतं तिकडे?”

” कोणीही जाऊ शकतं. अगदी तू सुद्धा. ” तिचे डोळे विस्फारले, ” खरच?” 

” खोटं का सांगु? अगं आउटलेट असते ती. कामाचा ताण, घरचा ताण सगळं विसरून मस्त ढोल वाजवतात. छान वाटतं. ” 

दुसऱ्याच दिवशी तिनं ढोल ताशा पथकात नाव नोंदवलं. सकाळीच जास्तीचा स्वयंपाक करून घेत असे ती. तो संध्याकाळी बराच उशीरा येई. ते पण तर्र होऊन. कामावरून परस्पर पथकात जाई ती.

” दम असला पाहिजे ताई वाजवण्यात. जोर लावून वाजव. “

शिकवणारा तिला म्हणत असे. ती आणखी मनापासून वाजवण्याचा प्रयत्न करत असे. त्यादिवशी ढोल वाजवता वाजवता वेळ कसा निघून गेला तिला कळलच नाही. घरी जायला उशीरच झाला होता. नेमका तो तिच्या आधी घरी पोचला. आधीच प्यायलेला, त्यातून ही उशीरा पोचली. त्यानं पट्टा काढला तिच्यावर उगारला. तिनं हिंमत करून तो वरच्यावर झेलला. त्याच पट्ट्याने त्याला झोडपून काढला. उचलला आणि कॉलर धरून फरफटत पोलीस स्टेशनला नेला. सगळी वस्ती बघतच राहीली. पोलिसांनी त्याला लॉक अप मध्ये टाकलं.

आज तिला वाजवताना बघून सगळे थक्क झाले होते. इतक्या दिवसांत साचलेला राग, तडफड सगळी बोटातून बाहेर पडत होती. शिकवणारा दादा तिच्याकडे बघतच राहिला!

लेखिका : सुश्री सोनाली सुळे

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे 

पाषाण, पुणे  मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “स्वा. सावरकर रचित श्री गणेश प्रार्थना” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “स्वा. सावरकर रचित श्री गणेश प्रार्थना” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

हे सदया गणया तार, तुझ्यावरी भार

तू मायबाप आधार ॥ धृ ॥

*

किती देशशत्रू भूतली

हृच्छत्रु सहाही परी

शापें वा सुशरे जाळी

तो ब्राम्हण आता खाई परक्या लाथांचा बा मार ॥१॥

*

देशावर हल्ला आला

पुरुष तो लढोनी मेला

स्त्री गिळी अग्नीकाष्ठाला

रजपूत्त परी त्या परवशतेचे भूत पछाडी, तार ॥२॥

*

अटकेला झेंडा नेला

रिपु कटका फटका दिधला

दिल्लीचा स्वामी झाला

तो शूर मराठा, पाही तयाचे,

खाई न कुत्रे हाल ॥३॥

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही… ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे 

जे. के. राऊलिंग

वयाच्या १७ व्या वर्षी तिला महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले. २५ वर्षांची असताना आईचे आजारपणात निधन झाले. वयाच्या २६ व्या वर्षी ती इंग्रजी शिकवण्यासाठी पोर्तुगालला गेली. वयाच्या २७ व्या वर्षी लग्न झालं, तिचा पती तिच्याशी नेहमी गैरवर्तन करत असे, तरीही त्यांना मुलगी झाली.

वयाच्या २८ व्या वर्षी तिचा घटस्फोट झाला आणि तिला गंभीर आजार असल्याचे निदान झाले. वयाच्या २९ व्या वर्षी ती फुटपाथवर लहान मुलीला सोबत घेऊन जगणारी एक लाचार आणि एकटी आई होती. वयाच्या ३० व्या वर्षी तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला..

पण… तिने तिचे ते काम करण्याचे ठरवले जे ती इतरा पेक्षा चांगले करू शकते आणि तिला लिखाणात ऋची असल्यामुळे तिने लिखाण करण्यास सुरुवात केली.

वयाच्या ३१ व्या वर्षी शेवटी तिने तिचे पाहिले पुस्तक प्रकाशित केले. वयाच्या ३५ व्या वर्षी तिने ४ पुस्तके प्रकाशित केली आणि तिला वर्षातील सर्वोतकृष्ट लेखिका म्हणून गौरविण्यात आले.

वयाच्या ४२ व्या वर्षी, तिने तिचे नवीन पुस्तक लिहिले आणि प्रकाशित झाल्यावर पहिल्याच दिवशी १ कोटी १० लाख प्रती विकल्या गेल्या, ही तीच महिला आहे जिने वयाच्या ३० व्या वर्षी आत्महत्येचा विचार केला होता आणि तिचे नाव आहे जे. के. राऊलिंग.

आज हॅरी पॉटर हा $१५ बिलियन पेक्षा जास्त किमतीचा जागतिक ब्रँड आहे.

सांगायचं तात्पर्य एवढच की आयुष्यात कधीही हार मानू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करण्याची जिद्द असेल तर अशक्य असं काहीच नाही, भले थोडा उशीर झाला तरी चालेल पण विजय हा निश्चित असतो.

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुनील देशपांडे 

पाषाण, पुणे  मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘पुना गेम’ म्हणजेच आजचे जगप्रसिद्ध ‘बॅडमिंटन’…!!! – लेखक श्री अनुराग वैद्य ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

पुना गेम’ म्हणजेच आजचे जगप्रसिद्ध ‘बॅडमिंटन’…!!! 🏸 – लेखक श्री अनुराग वैद्य ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

‘बॅडमिंटन’ हा आज जगप्रसिद्ध खेळ आहे. जगभरात हा ‘बॅडमिंटन’ खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो. अगदी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये भारतातील प्रत्येक गल्लीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तसेच निवांत वेळेत ‘बॅडमिंटन’ लोकं रात्री खेळताना आपल्याला बघायला मिळतात. परंतु ‘बॅडमिंटन’ या खेळाची जन्मभूमी कोणती हे फारसे लोकांना माहिती नसते किंवा काळाच्या ओघात लोकं या ‘बॅडमिंटन’ खेळाला परदेशी खेळ समजून मोकळे होतात.

परंतु या ‘बॅडमिंटन’ खेळाचा जन्म हा बाहेरच्या देशातील नव्हे तर ‘बॅडमिंटन’ या खेळाचा जन्म हा ‘पुण्यामध्ये’ झालेला आहे. तसे म्हणायला गेले तर ‘बॅडमिंटन’ हा खेळ ‘पुणेरी’ खेळ आहे. इंग्रजांची सत्ता पुण्यामध्ये स्थापन झाल्यानंतर ‘पुणे’ परिसरामध्ये ‘खडकी’ येथे इंग्रजांची कायमस्वरूपाची छावणी होती. पुण्यातील खडकी येथे ‘ऑल सेंट्स चर्च’ आहे. या ‘ऑल सेंट्स चर्च’ च्या ईशान्य दिशेला ‘फ्रियर रोड’ आहे या ‘फ्रियर’ रस्त्याच्या जागेवर पूर्वी एक मोकळी बखळ होती. हीच बखळ किंवा सध्याचा ‘फ्रियर रोड’ आजच्या जगप्रसिद्ध ‘बॅडमिंटन’ खेळाची जन्मभूमी.

‘खडकी’ येथील छावणीमध्ये इंग्रज सैनिक त्यांना ज्यावेळेस कामामधून निवांत वेळ मिळत असे तेव्हा छावणी मधील सध्याच्या ‘फ्रियर रोड’ येथील मोकळ्या जागेमध्ये दोघे जण किंवा दोन जोड्या एकमेकांच्या समोर उभे राहून वल्ह्याच्या आकाराच्या फळ्या बनवुन ‘बुचाची वर्तुळाकार चकती’ बऱ्याचवेळेस यामध्ये दारूच्या बाटलीचे बुच असायचे. हे हवेत उडवून टोलवून खेळत असे. ही ‘बुचाची चकती’ खाली पडू न देता टोलविणे एवढाच या खेळाचा भाग होता.

जेव्हा ही ‘बुचाची चकती’ वल्ह्यासारख्या फळीने हवेमध्ये उडवून मारली जात असे तेव्हा ही ‘बुचाची चकती’ हवेमध्ये स्पष्ट दिसावी यासाठी स्वतः खाऊन फस्त केलेल्या ‘कोंबड्यांची पिसे’ या ‘बुचाच्या चकतीला’ चिकटवित असत किंवा खोचून ठेवीत असत. या ‘पिसे’ लावलेल्या ‘बुचाच्या चकतीला’ गंमत म्हणून इंग्रज अधिकारी ‘बर्ड’ असे संबोधत असत. तसेच हा हवेमध्ये उडणारा ‘पक्षी’ सतत इकडून तिकडे फिरत असे म्हणून म्हणून त्याला ‘येरझारा करणारा कोंबडा’ किंवा ‘शटल कॉक’ असे म्हणत असे. अश्या प्रकारे ‘बॅडमिंटन’ या खेळाचा जन्म झाला त्याला इंग्रजांनी ‘पुना गेम’ असे नाव दिले.

इ. स १८७० साली काही इंग्रज सैनिक हे जेव्हा आपल्या घरी म्हणजेच ‘इंग्लड’ येथे जाण्यास निघाले तेव्हा मायदेशी जाणाऱ्या या इंग्रज सैनिकांनी ‘बॅडमिंटन’ या खेळाचे साहित्य म्हणजे खास ‘पुणेरी शैलीने’ बनवलेले ‘शटल कॉक’ म्हणजेच मराठी मधला ‘येरझारा करणारा कोंबडा’ आपल्या सोबत ‘इंग्लंड’ येथे घेऊन गेले. संपूर्ण भारतामधून पहिले विदेशात गेलेले ‘क्रीडासाहित्य’ हे पुण्यामधून गेले होते हे विशेष. तसेच भारतीय ‘क्रीडा साहीत्याची’ ही पहिली ‘निर्यात’ होती.

पुणेरी शैलीमध्ये’ बनवलेले ‘शटल कॉक’ हे ‘इंग्लंड’ मध्ये पोहोचले आणि तेथील सैनिकांमध्ये हा ‘पुना गेम’ अधिकाधिक प्रसिद्ध होऊ लागला. तेव्हा ह्या ‘पुना गेम’ बाबत ‘ग्लुस्टरशायर’ या परगण्यात राहणाऱ्या ‘ड्युक ऑफ न्यू फोर्ट’ हा राजघराण्याशी संबंधित असलेला ‘उमराव’ याच्यापर्यंत ह्या ‘पुना गेम’ बाबत बातमी जाऊन पोहोचली. हा ‘उमराव’ क्रीडाप्रेमी होता तसेच हा ‘उमराव’ सतत नवीन क्रीडाप्रकारांच्या शोधात असे.

त्याच्या कानावर जेव्हा ‘पुना गेम’ बद्दल माहिती पोहीचली तेव्हा ज्या इंग्रज सैनिकांना ‘पुना गेम’ बद्दल माहिती होती तेव्हा त्या ‘ग्लुस्टरशायर’ येथील राजघराण्याशी संबंधित ‘उमरावाने’ ‘पुना गेम’ माहिती असलेल्या इंग्रज सैनिकांना आपल्या राहत्या घरी बोलवून घेतले. ‘पुना गेम’ माहिती असलेले इंग्रज सैनिक ‘पुना गेम’ कसा खेळायचा याचे प्रात्यक्षिक दाखवायला ‘ग्लुस्टरशायर’ येथे पोहोचले आणि त्यांनी राजघराण्याशी संबंधित असलेल्या ‘उमरावाला’ आणि आमंत्रित लोकांना जेव्हा ‘पुना गेम’ इतका आवडला की त्याचे सगळ्या ‘इंग्लंड’ देशामध्ये फार कौतुक झाले आणि संपुर्ण ‘इंग्लंड’ देशामध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला.

तसेच या ‘पुना गेम’ बद्दल कसे खेळतात याची प्रात्यक्षिके दाखवली गेली ते ठिकाण म्हणजे ‘ड्युक ऑफ न्यू फोर्ट’ यांचे ‘बॅडमिंटन’ गाव. इंग्लंडमधील ‘बॅडमिंटन’ गावी इंग्रजांनी ‘पुना गेम’ ह्या खेळाचे प्रात्यक्षिक दाखवले गेले म्हणून तेथील लोकांनी या ‘पुना गेम’ या खेळाचे नाव ‘गेम ऑफ बॅडमिंटन’ असे केले. यामुळे पुण्यामध्ये जन्मलेल्या ‘पुना गेम’ हे नाव इंग्रजांनी पुसून टाकले.

परंतु काही वर्षांमध्ये ‘ईस्ट इंडिया कंपनी’ सोबत येणाऱ्या अधिकाऱ्यांनी हा ‘पुना गेम’ म्हणजेच ‘बॅडमिंटन’ इ. स. १८७७ च्या सुमारास इंग्लंड येथून परत भारतामध्ये आणला आणि या ‘पुना गेम’ म्हणजेच आत्ताचे ‘बॅडमिंटन’ या खेळाचे नियम तत्कालीन भारतामधील ‘कराची’ सध्याचे (पाकिस्तान) येथे या ‘पुना गेम’ उर्फ ‘बॅडमिंटन’ खेळाची नियमावली पुस्तिका बनवली गेली. आजपर्यंत या ‘पुना गेम’ म्हणजेच ‘बॅडमिंटन’ याच्या नियमावलीमध्ये फारच थोडे बदल करण्यात आलेले आहेत.

असा हा पुण्यातील ‘खडकी’ येथे जन्म झालेला ‘पुना गेम’ आज जगभर ‘बॅडमिंटन’ या नावाने प्रसिद्ध आहे. परंतु आपल्या भारतामध्ये आणि तो देखील पुण्यामध्ये जन्म घेतलेला ‘पुना गेम’ आपण आजही विदेशी खेळ म्हणून गणला जातो. असा हा पुण्यात जन्माला आलेला ‘पुना गेम’ म्हणजेच ‘बॅडमिंटन’ हा खेळ पुण्याने जगाला दिलेली एक देणगी आहे हे नक्की.

संदर्भग्रंथ:-

१. क्रीडा ज्ञानकोश:- सुरेशचंद्र नाडकर्णी

२. A Journey To The Badminton World:- Zuyan Wang.

३. शहर पुणे एका सांस्कृतिक संचिताचा मागोवा:- सुरेशचंद्र नाडकर्णी, संपादक अरुण टिकेकर, निळूभाऊ लिमये फाउंडेशन, २०००

लेखक : श्री अनुराग वैद्य.

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १३ — क्षेत्रक्षेत्रज्ञ योग — (श्लोक २१ ते ३४) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १३ — क्षेत्रक्षेत्रज्ञ योग — (श्लोक २१ ते ३४) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह ।पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान् गुणान् ।

कारणं गुणसंगोऽस्य सदसद्योनिजन्मसु ॥ २१ ॥

*

अधिष्ठित होऊन प्रकृतीत पुरुष गुणा भोगितो

गुणसंयोग अनुसार योनीत भिन्न जन्म घेतो ॥२१॥ 

*

उपद्रष्टाऽनुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः ।

परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः ॥ २२ ॥

*

पुरुष भिन्न प्रकृती भिन्न पुरुष श्रेष्ठ परमात्मा

देहरूपी क्षेत्रात बद्ध प्रकृती कार्य साक्षात्मा

क्षेत्राचे करुनीया पोषण सुखदुःखा भोगितो

प्रकृतीच्या या क्रीडेचा सूत्रधार तो असतो ॥२२॥

*

य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह ।

सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ॥ २३ ॥

*

पुरुष निर्गुण सगुण प्रकृती जया जाहले ज्ञान

कर्म करी वर्तमानात तया पुनरपि ना जन्म ॥२३॥

*

ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना ।

अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ॥ २४ ॥

*

ध्यानाद्वारे योगी पाहत हृदयांतरी आत्मा

ज्ञानयोगे वा कर्मयोगेही प्राप्त होत आत्मा ॥२४॥

*

अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वाऽन्येभ्य उपासते ।

तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः ॥ २५ ॥

*

नसेल ज्यांच्या ठायी याचे कसलेही ज्ञान

तरती मृत्यू उपासनेने श्रवण करोनी ज्ञान ॥२५॥

*

यावत्संजायते किंचित्सत्त्वं स्थावरजङ्गमम् ।

क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात्तद्विद्धि भरतर्षभ ॥ २६ ॥

*

स्थावर-जंगम वा काही निर्मिती जगात

क्षेत्र-क्षेत्रज्ञ संयोगाने जाणुनी घे भारत ॥२६॥

*

समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्र्वरम् ।

विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥ २७ ॥

*

अंतरी सर्व भूतांच्या वास समान परमेश

नाश जाहला भूतांचा तरी तयाचा न नाश

या तत्वाला जो जाणी तोचि खरा ज्ञानी

प्रज्ञा त्याची जागृत झाली तोची ब्रह्मज्ञानी ॥ २७॥

*

समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् ।

न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥ २८ ॥

*

समप्रज्ञेने जाणतो सर्वत्र ईश्वर समान व्यापितो

आत्मघात ना होतो त्यासी श्रेष्ठ गतीला तो पावतो ॥२८॥

*

प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः ।

यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति ॥ २९ ॥

*

प्रकृती समस्त कर्मांची कर्ता आत्मा हा अकर्ता

ऐसे ज्ञान जया जाहले तत्वज्ञानाचा तो ज्ञाता ॥२९॥

*

यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति ।

तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा ॥ ३० ॥

*

भिन्न भूतांची रूपे एक तयांचा आत्मा

ज्ञानाने ऐश्या होई प्राप्त तयासी ब्रह्मात्मा ॥३०॥

*

अनादित्वान्निर्गुणत्वात् परमात्माऽयमव्ययः ।

शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते ॥ ३१ ॥

*

आदि न अंत निर्गुण तथा निर्विकारी हा परमात्म

देहस्थ जरी तो कौन्तेया अकर्मी गुणांपासुनी अलिप्त ॥३१॥

*

यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते ।

सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते ॥ ३२ ॥

*

सूक्ष्मत्वाने चराचरात जरी आकाश कुठे ना लिप्त

तद्वत् समस्त देह व्यापूनी आत्मा गुणासि ना लिप्त ॥३२॥

*

यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः । 

क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशति भारत ॥ ३३ ॥

*

रवि एक प्रकाशितो विशाल समस्त या जगताला

एक क्षेत्रज्ञ प्रकाशितो अगणित साऱ्या क्षेत्राला ॥३३॥

*

क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा ।

भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम् ॥ ३४ ॥

*

ज्ञानचक्षुने अवलोकिले क्षेत्र-क्षेत्रज्ञामधील भेद

भूतप्रकृती मोक्ष जाणुनी प्राप्त तयासी परमपद ॥३४॥

*

॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ‘ क्षेत्रक्षेत्रज्ञयोगो ‘ नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३॥

*

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी क्षेत्रक्षेत्रज्ञयोग नामे निशिकान्त भावानुवादित त्रयोदशोऽध्याय संपूर्ण ॥१३॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गौरी… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? इंद्रधनुष्य ?

☆ गौरी… ☆ सौ. वृंदा गंभीर

गौरी, महालक्ष्मी तीन दिवस येतात आणि चैतन्य निर्माण करून जातात. 

गणपती बाप्पा त्यांना माहेरी घेऊन येतात. माहेर हे तीन दिवसाचं असतं हेच सुचवलं आहे गौराईने त्यांची आरास पूजा नैवेद्य रमुन जातो चार पाच दिवस तो उत्साह, आनंद ओसंडून वाहत असतो सुवासिनी येतात हळदीकुंकू समारंभ होतो भेटीगाठी होतात विचारांची देवाणघेवाण होते नवीन कल्पना सुचतात आणि दरवर्षी नवीन करण्याची प्रेरणा मिळते.

गावं बदलले कि प्रथा बदलतात, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रथा असतात कुलाचार वेगळे असतात. स्वयंपाक, नैवेद्य वेगळे असतात गौराई सगळीकडे जाऊन तृप्त होते आणि आशीर्वाद देऊन जाते.

एकदा सुरु केलेला उत्सव बंद करता येत नाही. काही अडचण आली तर दुसऱ्याकडून करून घेता येत. वृद्धी असेलतरीही दुसऱ्याकडून करून घेता येत वृद्धी म्हणजे गोड विटाळ मानला जातो. सुतक असेलतर मात्र काहीच करता येत नाही. मग काय करायचं तर बऱ्याच ठिकाणी म्हणतात आत्ता नाही तर नवरात्रात गौरी बसवता येतात हे कुठल्या आधारावर सांगितलं जातं काही कळत नाही.

पंचांग मध्ये ही अफवा आहे असं सांगितलं आहे मग कोण जोतिषकार आहे जे वेदांच्या पलीकडे सांगतात.

गौरी अहवान वर्षातून एकदाचं होते त्याच वेळी पूजा होते. तशी लक्ष्मी रोजच घरात असते ना ती आहे म्हणून आपण आहोत पण तिला मान तीन दिवसाचा आहे. रोज ती आई म्हणून पाठीशी असते.

नवरात्री हा सोहळा त्या तिघींचा आहे ” महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी ” महिषसुराचा वध करण्यासाठी देव देवीला शक्ती प्रदान करण्यासाठी घटी बसतात सात दिवस युद्ध सुरु असतं आठव्या दिवशी देवी होमातून निघून नव्यादिवशी वध करते. नवरात्रीत नऊ दिवसाचा उपवास असतो मग गौरीची पूजा नवरात्रात केल्यावर तिला नैवेद्य कशाचा दाखवणार ती युद्ध सोडून एक दिवस तुमच्याकडे कशी येणार महत्वाचं म्हणजे देव घटी बसले असताना देवी जेवण तरी कसं करणार एकादशी असली तरी अन्नदान किंवा गाईला घास देता येत नाही तिथे नवरात्रीत महालक्ष्मी कशी उभी करणार हा एक प्रश्नच आहे आणि याचे उत्तर ही अफ़वा पसरणाऱ्याकडेच असेल असं वाटतं.

देव म्हणजे श्रद्धा, भक्त, उपासना, देव म्हणजे प्रेम दया होय.

जे काही आहे ते त्याचाच आहे आपण त्याला देणारे कोण, तो करून घेत असतो त्याला हवं त्याच्याकडूनच दोन हात जोडतो ते सुद्धा त्यानेच दिलेले आहेत फुल, उदाबत्ती, नारळ जे काय आहे ते त्याचाच त्याला अर्पण करतो देवाला पोहचतो तो फक्त भक्ती भाव म्हणून परंपरा, कुळधर्म, कुलाचार हे पारंपरिक पद्धतीनेच व्हायला हवेत, , , , ,

पाडव्याची गुढी दीपावली ला उभारली आणि लक्ष्मी पूजन पाडव्याला केलं तर चालेल का तसंच गौरी अहवान एकदाचं होत हेच खरं आहे.

श्री स्वामी समर्थ 

© दत्तकन्या (सौ. वृंदा पंकज गंभीर)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नियतीने खास निवडलेला.. मुस्तफा ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ नियतीने खास निवडलेला.. मुस्तफा ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

‘सगळ्या जगापेक्षा तब्बल नऊ महिने आधी त्याची आणि माझी ओळख झाली पण भेट मात्र नऊ महिन्यांनीच झाली. त्याआधी त्याचा आणि माझा संवाद व्ह यचा तो आंतरिक स्पर्शामधून. तो पोटात असताना मला झोके घ्यायला आवडू लागलं होतं. घराचे नको नको म्हणताना मी एखादा तरी झोका घ्यायचीच आणि मग यांनी घरातच छानसा झोपाळा आणून बांधला… बसा माय लेक झुलत. आणि एकेदिवशी म्हणजे १४ मे १९९५ रोजी तो आला! गोंडस.. गोड आणि लाघवी रुपडं घेऊन. सर्वांनीच म्हटलं… मुस्तफा नाव ठेवा. मुस्तफा म्हणजे खास… विशेष… अगणित लोकांमधून निवडला गेलेला! आणि होताही तसाच मुस्तफा. अभ्यासात हुशार आणि खेळांत चपळ. खेळण्यांमध्ये हेलिकॉप्टर जास्त आवडीचं होतं मुस्ताफाचं. आमच्या घरावरून लढाऊ विमानं वेगाने निघून जायची… पण हेलिकॉप्टर आलं की मुस्तफा चपलाईने घराच्या छपरावर जायचा आणि ते नजरेआड होईतोवर त्याकडे पहात राहायचा. त्याचे अब्बू गल्फमध्ये नोकरीला गेले तर याने सुट्टीवर येताना हेलिकॉप्टरच आणा असा हट्ट धरला होता! काय होतं पोराच्या मनात तेव्हा समजलं नाही. तसं आमच्यातलं तोवर कुणीही फौजेत गेलेलं मला तरी माहीत नव्हतं. आणि तो असं काही करेल असं स्वप्नातही आलं नव्हतं कधी आम्हा नवरा बायकोच्या. त्याचे बाबा झकिउद्दीन दूर आखातात नोकरी करायचे आणि मुस्तफा बहुदा तिकडेच गेला असता नोकरी किंवा व्यवसायासाठी. पण वृत्तीने अतिशय धार्मिक होता. त्यामुळे तिकडेही वळायची शक्यता होतीच. मला काहीही चालणार होतं. त्याच्यानंतर झालेली आलेफिया.. तिचं लग्न करून दिलं की मुस्ताफाच्या डोक्यावर सेहरा बांधला की आम्ही दोघं म्हातारा-म्हातारी मोकळे होणार होतो! 

राजस्थानातील उदयपूर जवळचं खेरोडा हे अगदी लहान गाव. पण मुस्ताफाची हुशारी पाहून आम्ही उदयपूर मध्ये राहयाला गेलो. मुस्तफा तिथल्या सेंट पॉल कॉलेजात जायला लागला. कधी त्याने एन. डी. ए. ची प्रवेश परीक्षा दिली, कधी पास झाला ते समजेपर्यंत बेटा खडकवासल्याला निघूनही गेला होता. तिथं आपल्यातलं कुणी नसेल ना रे? मी काळजीने म्हणाले होते.. त्यावर म्हणाला…. अम्मी… याह इंडियन आर्मी है… यहां सिर्फ एक धरम… देश और एक जात… फौजी! तुम देखना इतनी इज्जत कमाउंगा की जितनी कोई दुसरी नौकरी नहीं दे सकती! त्याची पत्रं यायची आणि कधी कधी फोनवर बोलणं व्हायचं. म्हणायचा…. जीवनात एक ध्येय सापडल्या सारखं वाटतं आहे… अम्मी! 

पासिंग आऊट परेडला आम्ही तिघेही गेलो होतो… मी, हे आणि धाकटी आलेफिया. तो पूर्ण गणवेशात समोर आला तेंव्हा झालेला आनंद अवर्णनीय असाच होता. त्याच्या मित्रांनी जेव्हा त्याला त्यांच्या खांद्यांवर उचलून घेतलं होतं तेंव्हा तर भारी वाटलं होतं. मुस्तफा एअर विंग निवडणार हे तर स्वच्छ होतं… त्याला आकाशात भरारी घ्यायला आवडू लागलं होतं… आंता त्याच्या हाती ख-याखु-या हेलिकॉप्टरची कमान असणार होती आणि तेही साधंसुधं प्रवासी हेलिकॉप्टर नव्हे… चक्क लढाऊ हेलिकॉप्टर! 

दोनच वर्षात तो फायटर पायलट म्हणून तरबेज झाला. त्याचे त्या युनिफॉर्ममधले फोटो पाहून डोळ्यांवर विश्वासच बसायचा नाही… एवढंसं होतं पोरगं… त्याचे हात चक्क आभाळाला टेकू लागलेत की! एखाद्या मिशनवर निघाला की फक्त त्याच्या अब्बुला कळवायचा… मला नाही! मी खूप जास्त काळजी करते अशी त्याची तक्रार असायची. दिवस निघून चालले… आता सूनबाई आणावी हे बरे. ठरवून टाकलं लग्न…. दोन तीन महिन्यांत बार उडवून द्यायचा होता.

दोन दिवस झाले… भूक लागत नव्हती… आणि डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले आपोआप. का अस्म व्हावं? तसं काही कारणही नव्हतं. ना कुठली लढाई चालू होती ना मुस्तफा कुठे मोहिमेवर निघाला होता. चीनच्या सीमेवर तैनात होता हे माहीत होतं… पण तिथं तर त्याचं काम सैनिकांना मदत करणं होतं… त्यासाठी कितीही उड्डाणे करायला तो सदैव असायचा… वजनाला हलके पण अत्यंत शक्तिशाली हेलिकॉप्टर त्याच्या हातातलं जणू आवडीचं खेळणं बनलं होतं. नंतर समजलं… त्याने त्यादिवशी मोहिमेवर जाण्याआधी त्याच्या अब्बुला फोनवरून कल्पना दिली होती. फक्त मोहीम काय आहे… हे नव्हतं सांगितलं.. नियमानुसार. फक्त म्हणाला जवळचा मित्र आहे सोबत…. मेजर विकास भांबु नावाचा. कामगिरी फत्ते करून हे दोघे आणि आणखी तीन सहकारी माघारी निघाले होते. अरुणाचल प्रदेशातील अपर सियांग येथील मिमिंग गावावर ते उडत होते… आणि अचानक त्याच्या हेलिकॉप्टरला मागील बाजूस आग लागली… ते वेगाने जमिनीकडे झेपावू लागले. खाली मोकळे मैदान दिसत होते… तिथे उतरणे सोपे होते… पण खाली आजूबाजूला लोकवस्ती होती आणि मुख्य म्हणजे तिथेच लष्कराचा दारूगोळा साठवण्याची जागा होती. हेलिकॉप्टर नियंत्रणात नव्हतं फारसं… काहीच सेकंद होते निर्णय घ्यायला… मेजर भांबु आणि मेजर मुस्तफा यांनी निर्णय घेतला… गावापासून दूर जायचं हे जळतं कफन घेऊन.. भले आपण जाळून जाऊ पण गाव आणि दारूगोळा वाचला पाहिजे. बलिदानाला काही प्रत्येक वेळी युद्धच असावं असं कुठं काय असतं? सैनिक म्हणजे प्रत्येक क्षण युद्धाचा प्रसंग. त्यांनी जवळच्या जंगलाच्या दिशेने आपले हेलिकॉप्टर वळवले… आणि व्हायचे तेच झाले… काही क्षणांमध्ये दाट झाडीत ते कोसळले…. सर्वजण मृत्यूच्या खाईत कोसळले…. मुस्तफाही त्यात होता! दैवाने या बलिदानासाठी त्याचीच निवड केली होती… नावासारखाच मुस्तफा… खास निवडला गेलेला… the chosen one! 

दोन दिवसांपूर्वी डोळ्यांतून विनाकारण वाहू लागलेल्या आसवांचा अर्थ त्यादिवशी ध्यानात आला! मुस्तफा कदाचित आणखी एका मोहिमेवर निघून गेला असावा… अशी मनाची समजूत काढत दिवस ढकलते आहे. पोरं आईपासून कधीच दूर जात नाहीत…. नदी सागराला जाउन मिळाली तरी उगमापासून तिचे पाणी तुटत नाही. हुतात्मे अमर असतात.. असे ऐकले होते… मुस्तफाही असाच अमर आहे… तो जवळ असल्याचा भास होतो… भास नव्हे… तो जवळच असतो नेहमी! 

तो दिवाळीचा दिवस होता. पण त्या रात्री एक दिवा नाही लावला गेला की एक फटाका नाही वाजला. चुली बंद होत्या… सा-या शहराने, गावाने मुस्तफाच्या देहावर एक एक मूठ माती घातली…. या मातीचे ऋण फेडून तो कायमचा मातीत मिसळायला निघाला होता! आता मी आणि माझे पती एका सामान्य मुलाचे नव्हे तर एका हुतात्मा सैनिकाचे आईबाबा झालो होतो… राष्ट्रपती महोदया सुद्धा आम्हांला सन्मानित करताना गहिवरल्या होत्या… मुस्तफाच्या नावाचे मरणोत्तर शौर्य चक्र स्वीकारताना दोन भावना होत्या…. गमावल्याची आणि कमावल्याची! मुलगा गमावला आणि अभिमान कमावला! आणि हा अभिमान उरी बाळगून उरलेलं आयुष्य काढायचं आहे! मुस्तफा.. अलविदा… बेटा ! ‘ 

(२१ ऑक्टोबर, २०२२ रोजी मेजर मुस्तफा बोहरा, मेजर विकास भांबु क्रू मेंबर्स हवालदार बिरेश सिन्हा, नाईक रोहिताश्व कुमार आणि क्राफ्टसमन के. व्ही. अश्विन यांनी एका हवाई मोहिमेत आपल्या प्राणांचे बलिदान दिले. मेजर मुस्तफा बोहरा साहेबांच्या मातोश्री श्रीमती फातिमा बोहरा यांनी मोठ्या धैर्याने या दु:खाला तोंड दिले. १५ ऑगस्ट, २०२३ रोजी मा. राष्ट्रपती महोदयांनी दिवंगत मेजर मुस्तफा बोहरा यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर केले. त्यांच्या सोबत असलेले मेजर विकास भांबु यांनाही मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले. मेजर भांबु हे सुद्धा राजस्थानचे सुपुत्र होते आणि याआधीही सेना मेडलने त्यांना गौरवण्यात आलेले होते. दिनांक ८ ऑगस्ट, २०२४ रोजी हा शौर्य चक्र प्रदान करणयाचा कार्यक्रम झाला. यानंतर झालेल्या मुलाखती मध्ये श्रीमती फातिमा बोहरा यांनी मोठ्या शौर्याने आपल्या लेकाच्या आठवणी सांगितल्या… त्या आणि तशा अनेक मुलाखती, बातम्या, विडीओस वर आधारीत हा लेख आहे… फातिमा यांच्या भूमिकेत जाऊन लिहिलेला.. जय हिंद… जय हिंद की सेना !🇮🇳)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares