मराठी साहित्य – विविधा ☆ “अभ्यास कसा करावा, ह्याचाच अभ्यास” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? विविधा  ?

☆ “अभ्यास कसा करावा, ह्याचाच अभ्यास” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

“त्याचं नेमकं काय चुकतं, हेच कळत नाही. “

“ही घरी सगळं व्यवस्थित करते, पण ऐन परीक्षेत त्याच त्या चुका. ” 

“हजारदा सांगितलं तरी अजूनही वेळापत्रक करणं जमतच नाहीय. “

“शाळेत आणि क्लास मध्ये सगळं समजतं, पण घरी आल्यावर लक्षातच राहत नाही असं म्हणतो. “

“नुसत्या वह्या पूर्ण केल्या की अभ्यास होतो का? तुम्हीच सांगा. पण हिला ते पटतच नाही. “

“दिवसभर नुसती लिहीतच असते. पण तरीही मार्कांमध्ये फरक नाहीच. ” 

“लिखाणात असंख्य चुका.. ” 

“अर्धा ताससुद्धा एका जागी बसत नाही, आणि लगेच अभ्यास झाला म्हणतो. आता दहावीच्या वर्षात असं चालतं का?” 

“प्रॅक्टिस करायला नाहीच म्हणतो. मी तुम्हाला मार्क मिळवून दाखवीन असं म्हणतो. पण अभ्यास करताना तर दिसत नाही. ” 

” परीक्षेत वेळच पुरत नाही असं म्हणते. निम्मा पेपर सोडूनच येते. ” 

” नियमितपणाच नाही, शिस्त नाही. उद्या परीक्षा आहे म्हटलं की आज रात्र रात्र बसायचं. आणि वरुन पुन्हा आम्हालाच म्हणायचं की, बघा मी कसं मॅनेज केलं. ” 

“अभ्यासाचं महत्वच वाटत नाही हिला. सारखा मोबाईल हातात. ” 

“दहावीत चांगले मार्क मिळाले. पण अकरावी आणि बारावीत गाडी घसरली. गेल्या दहा बारा टेस्ट मध्ये फक्त एक आकडी मार्क्स मिळालेत. कुठून मिळणार मेडिकल ला ॲडमिशन?” 

“इंस्टाग्राम वर दिवस दिवस वेळ घालवल्यावर मार्क कुठून मिळणार?”

“हिच्या आळशीपणाचा, न ऐकण्याचा आणि अभ्यास न करण्याचा आम्हाला इतका कंटाळा आला आहे की, आता आम्ही तिच्याशी बोलणंच सोडून दिलं आहे. “

“हाच म्हणाला म्हणून सायन्स ला ॲडमिशन घेतली, आता ते जमतच नाही असं म्हणतो. तीन लाख रुपये फी भरली आहे हो आम्ही. आता काय करायचं?”

“सर, मागे तुमच्याकडे ॲप्टिट्यूड टेस्ट केली होती, तेव्हां तुम्ही स्पष्ट सांगितलं होतं की, त्याला सायन्स झेपणार नाही. पण माझ्याच मित्राचं ऐकून मी त्याला सायन्स ला पाठवलं. आता बारावीत तीनही विषयात नापास झालाय. कॉलेज नको म्हणतो, क्लास नको म्हणतो. अभ्यासच नको म्हणतो. आता कसं करावं?”

आणखी लिहीत राहिलो तर यादी आणखी खूप मोठी होईल. आपली मुलं आणि त्यांचा अभ्यास हा पालकांसमोरचा यक्षप्रश्न झाला आहे. मार्कांची स्पर्धा एवढी वाढली आहे की, त्यात मुलांचा टिकाव लागावा यासाठी पालकांची सर्वतोपरी धडपड सुरू असते.

“मार्क म्हणजे सर्वस्व नाही” हे म्हणणं सोपं असलं तरीही मार्कांशिवाय काही होत नाही हेही तितकंच खरं आहे. पुढचे प्रवेश मिळवताना मार्कलिस्ट भक्कम नसेल तर खिशाला कशी भोकं पडतात, हे अनेकांच्या उदाहरणातून आपण पाहिलंसुद्धा असेल.

प्रवेश परीक्षा आणि त्यासाठी आवश्यक असणारं मेरिट हा प्रश्न सुटणार कसा? आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती अपेक्षेनुसार झाली नाही तर पुढं कसं होणार? आणि करिअर कसं होणार? ही चिंता पालकांना आहेच. म्हणूनच, बहुतांश पालक “आपण पालक म्हणून कुठंही कमी पडता कामा नये” या प्रयत्नात असतात. ते मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र खोली देतील, लॅपटॉप देतील, मुलांच्या खोलीला एसी बसवतील, सगळी स्टेशनरी आणि स्टडी मटेरियल उत्तम दर्जाचं आणून देतील, त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतील, ब्रँडेड क्लासेस लावतील, पर्सनल कोचिंग लावतील, परीक्षेच्या वेळी तयारीसाठी महिनाभर रजा काढून घरी थांबतील. पण मूळ समस्या वेगळीच आहे, हेच त्यांच्या लक्षात येत नाही..

जसजशा वरच्या इयत्तेत आपलं मूल जाईल तसतसा अभ्यास अधिकाधिक व्यापक आणि वाढत जाणार. अभ्यासासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आणि अभ्यासाचं आकलन सुद्धा चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करावे लागणार, हे समजून घेणं गरजेचं असतं. पण प्राथमिक शाळेत असताना आपलं मूल जसा आणि जेवढा अभ्यास करत होतं, तेवढाच अभ्यास आता दहावी-बारावीच्या वर्षातही करत असेल तर ते कसं चालेल? शैक्षणिकदृष्ट्या महत्वाच्या वर्षांच्या काळात अभ्यासाचा अतिरेक नको, पण अभ्यासाविषयी गांभीर्य तर गरजेचंच आहे.

आपली मुलं अभ्यास करतात, म्हणजे नेमकं काय करतात? हे जरा लक्ष देऊन पाहिलं की, अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात. पुष्कळ मुलामुलींना अभ्यास कसा करायचा असतो, हेच ठाऊक नसतं. एखाद्या प्रश्नाचं नेमकं मुद्देसूद आणि अचूक उत्तर कसं लिहावं, हे त्यांना माहितीच नसतं. आता जे त्यांना ठाऊकच नाही, ते परीक्षेत कसं जमेल? कितीतरी मुलांना प्रश्नपत्रिकेत नेमका कसा प्रश्न विचारला आहे आणि त्याचं उत्तर कसं लिहावं लागेल, हेही जमत नाही. “मी कितीही लिहिलं तरीही मार्क्स मिळत नाहीत” अशी तक्रार करणाऱ्या मुलांच्या उत्तरपत्रिका पहा. मोठं उत्तर लिहिण्याच्या नादात अनावश्यक लिखाण केल्याचं आपल्याला दिसेल.

“सराव केल्याशिवाय आपल्याला अचूकता साधणार नाही” हे न पटणारी अनेक मुलं आहेत. अतिआत्मविश्वास आणि आळस या दोन दोषांमुळे त्यांचं वारंवार नुकसान होतच असतं. पण तरीही त्यांना सुधारणा करणं जमत नाही.

एकूणच, आपल्या मुलांना अभ्यासाची आणि परीक्षेची कौशल्यं शिकणं, ती आत्मसात करणं हे नितांत आवश्यक आहे. उत्तम अभ्यास कसा करावा, याची कौशल्ये वेगळी असतात आणि उत्तम परीक्षार्थी कसं व्हावं यासाठी वेगळी कौशल्ये आत्मसात करावी लागतात. हा फरक आपण सर्वांनीच समजून घेतला पाहिजे.

“जेव्हां अभ्यास करायचा असतो तेव्हां विद्यार्थी आणि जेव्हां परीक्षा असते तेव्हां परीक्षार्थी” हा तोल प्रत्येकाला साधता यायला हवा. हा समन्वय जी मुलं साधू शकतात, त्यांना यश मिळवणं सहज शक्य होतं.

याच महत्वाच्या मुद्द्याला समोर ठेवून “साधना” या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. हे या कार्यक्रमाचं १९ वं वर्ष आहे. शहरापासून दूर, खऱ्या अर्थानं समृद्ध निसर्गाच्या सानिध्यात चार दिवसांचं हे निवासी प्रशिक्षण असतं. सातवी ते बारावीपर्यंतच्या वयोगटासाठी “साधना” आहे.

“अभ्यास कसा करावा, ? ह्याचाच अभ्यास” हेच “साधना” चे ब्रीद आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी अभ्यासाची योग्य पद्धत विकसित व्हावी आणि त्यांना उत्तम शैक्षणिक यश मिळावं, ह्या उद्दिष्टानेच ‘साधना’ ची आखणी करण्यात आली आहे. आजवर या कार्यशाळेत देशभरातून तसेच परदेशातूनही अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

आपल्याला अनेकदा असं वाटत असतं की, अभ्यास करणं ही एक वैयक्तिक गोष्ट आहे आणि त्याच्या पद्धती व्यक्तीनुसार बदलत असतात. ज्याची त्याची सवय वेगळी, पद्धत वेगळी. ती प्रत्येकालाच जशीच्या तशी लागू होणं कठीण असतं. आपलं वाटणं अगदी बरोबर आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर, प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्याची पद्धतही वेगवेगळी असते. सगळ्याच विषयांसाठी एकाच पद्धतीनं अभ्यास करणं प्रभावी ठरत नाही.

पालकमित्रांनो, उत्तम अभ्यास करणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं कर्तव्यच असतं असं आपल्याला वाटत असतं. पण तुम्हाला अपेक्षित असणारा उत्तम अभ्यास ही एक कला आहे. आपली मुलं कोणत्याही इयत्तेत शिकत असोत, त्यांना ही उत्तम अभ्यासाची कला अवगत होणं अतिशय आवश्यक आहे.

अभ्यासातलं यश हे केवळ मुलांची बुद्धिमत्ता आणि त्यांचे कष्ट यांच्यावरच अवलंबून नसतं. तर, अभ्यासाच्या तंत्रशुद्घ पद्धतींवर सुध्दा अवलंबून असतं. मुलांना अभ्यासाची योग्य पद्धत अवगत झाली तर त्यांच्या अभ्यासात लक्षणीय बदल होतो, अभ्यास अधिक प्रभावी होतो, तो अधिक काळ स्मरणात राहतो आणि त्याची गुणवत्ता पूर्वीपेक्षा कितीतरी पटींनी अधिक सुधारते.

कित्येक बुद्धिमान मुलांना अभ्यासात म्हणावं तितकं यश मिळत नाही, परिक्षेत गुण मिळत नाहीत, अशा विद्यार्थ्यांची स्थिती खरोखरच फार कठीण असते. सगळेच त्यांना हुशार म्हणत असतात, पण अभ्यासात मात्र त्यांची हुशारी दिसून येत नाही, हीच मोठी समस्या असते. पण त्यांच्या तुलनेत सामान्य विद्यार्थी सुध्दा अभ्यासाच्या बाबतीत चांगलं यश मिळवून पुढं जातात. असं का होत असेल? याचं मूळ अभ्यासाच्या तंत्रांमध्ये दडलेलं आहे.

“अभ्यास कर”, “अभ्यास कर” असा आग्रह सगळेच धरतात, पण “नेमका अभ्यास कसा करावा?” याचं शिक्षण मात्र मिळत नाही.

“साधना” ही कार्यशाळा ह्याच समस्येला डोळ्यांसमोर ठेवून सुरु करण्यात आली. गेली अठरा वर्षे ही कार्यशाळा दरवर्षी होते. ही चार दिवसांची कार्यशाळा निवासी असून केवळ ३० विद्यार्थ्यांसाठीच असते.

“साधना” कार्यशाळेत विद्यार्थ्यांना प्रभावी अभ्यास करण्याची २३ तंत्रे शिकवली जातात. ही तंत्रे परदेशांतील अनेक संशोधकांनी विकसित केलेली असून अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये शिकवली जातात. हीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमाणित तंत्रे विद्यार्थ्यांना शिकवली जातात. “साधना” मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी देखील एक स्वतंत्र सेशन असते, जे अतिशय उपयुक्त आणि महत्वाचे असते.

इयत्ता सातवी पासून पुढचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात. महाविद्यालयीन विद्यार्थी देखील सहभागी होऊ शकतात. तसेच सीए, सीएस, स्पर्धा परीक्षा, इंजिनिअरिंग व मेडिकल प्रवेश परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी देखील सहभागी होऊ शकतात.

(आपली नोंदणी लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. ३० जागा भरल्यावर नोंदणी थांबवण्यात येते. नोंदणी करण्याकरिता 8905199711 किंवा 8769733771 (सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत) या क्रमांकावर संपर्क साधावा.) 

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सोळा सहस्त्र एक शतक वरमाला!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“सोळा सहस्त्र एक शतक वरमाला! ☆ श्री संभाजी बबन गायके 

ही तर मोठी दिवाळी!

जन्मदात्री धरित्री आपल्याला कधीही मृत्युशय्येवर निजवणार नाही, याची त्याला पुरेपूर खात्रीच होती. मरेन तर तिच्याच हातून… अन्यथा नाही असा त्याचा प्रण होता. आणि ब्रम्हदेवांकडून तसा वर पदरात पडताच तो स्वर्गातील देवांनाही वरचढ ठरला आणि पृथ्वीवर साक्षात ‘नरक’ अवतरला!

त्याचे अपराध शंभरात नव्हे तर सहस्र संख्येने गणले जाऊ लागले होते… सोळा सहस्र आणि वर एक शतक अधिकचे! त्याचा ‘शिशुपाल’ करण्याची घटिका समीप आली होती. मुरा नावाच्या अधमाला लीलया मातीत घालून तो ‘मुरारी’ झाला! पण नरक अजूनही नांदताच होता… ब्रम्हदेवाच्या वरदानाची कवचकुंडले परिधान करून रणात वावरत होता… चिरंजीव असल्याच्या आविर्भावात. इकडे ही सत्याचे भाम म्हणजे प्रकाश अंगी मिरवणारी रणात निघाली होती आपल्या सुदर्शनचक्रधारी भ्रतारासोबत.. तिला रण अनुभवयाचे होते… आपल्या स्वामींना शत्रूशी झटताना आणि विजयश्री प्राप्त करताना याचि देही.. याचि डोळा तिला पहावयाचे होते! ती फक्त दर्शक म्हणून आली होती… पण प्रत्यक्ष युद्धभूमीत तिच्या स्वामींनी चिरपरिचित नीतीने, ‘माये’च्या रीतीने तिला हाती आयुध घ्यायला उद्युक्त केले! तो पृथ्वीचा पुत्र… रावणाची चिता विझून गेल्यावर जणू त्याचाच कुमार्ग अनुसरण्यासाठी मातेला भार म्हणून जन्मास आलेला. पण ही तर स्वत:च पृथ्वीचा अवतार… म्हणजे त्याची आई…. आणि त्याचे अपराध उदंड झालेले… त्याला दंड दिलाच पाहिजे. तसा तिने तो दिलाही! त्यामुळे तिच्यावरचाच भार गेला.

खेळ तो येणेचि खेळावा.. सारे खेळ त्याचेच.. खेळाडूही तोच.. आपण फक्त दर्शक. स्वामींनी सत्यभामेकडून खेळ खेळवून घेतला!

सोळा हजार शंभर अभागी जीव आता स्वतंत्र झाले होते… नव्हे त्यांना प्रत्यक्ष देवाने सोडवले होते त्या नरकातून. पण मानवी जीवनात मानवाला अतर्क्य घटनांना सामोरे जावे लागते… देव असले म्हणून काय… मानव अवतारात अवतारी देवही अपवाद नव्हते! भगवान श्रीरामांनी संसाराचे भोग भोगले होतेच की. कुणा एकाचे बोल ऐकून प्राणप्रिय पत्नी वनात धाडली होती… रामायणानंतर आणखी एक रामायण घडले होते.

नरक तर आईच्या मृत्यू पावून तसा मुक्त झाला होता… पण त्याच्या बंदिवासातील सोळा हजार शंभर स्त्रिया आता विनापाश झालेल्या होत्या. ज्याने स्त्री संकटातून मुक्त केली त्याचे त्या स्त्रीने दास्य पत्करावे असा संकेतच होता तेंव्हा. त्या म्हणाल्या… देवा… आता आम्ही सर्वजणी तुमच्या आश्रित झालेल्या आहोत… जगाचे आणि आमचे आजवर एकच नाते होते… शरीराचे. आणि आम्ही स्त्री जातीत जन्मलो एवढेच काय ते आमचे पातक. जन्मदात्यांनी आम्ही विटाळलो म्हणून आमचे नाव टाकले… आम्ही कुणाच्याही बहिणी उरलो नव्हतो, कुणाच्या पत्नी होऊ शकत नव्हतो… निसर्गनियमाने आई झालोच तरी कुणाचे नाव सांगायचे बाळाचा पिता म्हणून? तो असुर असला तरी त्याचे नाव तरी होते आमच्या नावात… आमच्या इच्छेविरुद्ध. पण आता आम्ही कुणाच्या नावाने जगावे.. पती म्हणून कुणाला कपाळी रेखावे?

धर्माच्या पुनरुत्थानार्थ संभवलेल्या भगवंतापुढे असे धर्मसंकट यावे? या जीवांना आश्रय देणे तर कर्तव्याच. पण त्यांचा प्रश्न? त्याला व्यवहाराने उत्तर देणे अपरिहार्य होते. स्वत: देव यशोदासूत होते तसे देवकीनंदनही होतेच. वासुदेव होते तसेच नंदलालही होतेच!

“तुम्ही आता या क्षणापासून आमच्या, अर्थात द्वारकाधीश श्रीकृष्ण यांच्या धर्मपत्नी आहात! आणि अखिल जगत या नात्याचा सन्मान करेल.. अशी आमची आज्ञा राहील!

 राजयाची कांता काय भीक मागे.. मनाचिये योगे सिद्धी पावे.. अशी त्या सा-या आत्म्यांची गत झाली. एवढी वर्षे नरक भोगला… पण भगवत्कृपा झाली आणि पावित्र्य अंगा आले. आता प्रत्यक्ष देवाच्या नावाचे कुंकू लेवून जगायचे आणि अहेव जायचे! राजाची मुद्रा उमटवलेले साधे कातडे जरी असले तरी ते व्यवहारात सुवर्णमुद्रेसारखे चालून जाते.. मग आम्ही तर जिवंत देह आहोत.. आमचा धनी, आमचा स्वामी एकच… श्रीकृष्ण! जगताच्या दृष्टीने हे विवाह असतील… या संस्कारातून कामवासनेचा गंध येईलही एखाद्या घ्राणेन्द्रीयास! सर्व भोगांच्यामध्ये राहूनही नामानिराळा राहणारा हा… लांच्छन बरे लावून घेईल? रुक्मणि, जाम्बवन्ती, सत्यभामा, कालिन्दी, मित्रबिन्दा, सत्या, भद्रा और लक्ष्मणा अशा आठ सर्वगुणसंपन्न भार्या असणारा राजस सुकुमार मदनाचा पुतळा आमच्या सारख्या चुरगळलेल्या फुलांची माला का परिधान करेल? देवाच्या चरणावर वाहिलेली फुले कायमची सुगंधी होऊन राहतात.. त्यांचे निर्माल्य नाही होत!

आम्हा सर्वजणींचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याची त्याची हे कृती न भूतो न भविष्यती! मानव्याच्या दृष्टीने ही अलौकिक कृती म्हणजे विश्वाने उदरात सामावून घेतलेल्या सहस्र आकाशगंगाच म्हणाव्यात.

भोगी म्हणून अज्ञानी जीव उपहास करु शकतील हे काय त्यांना ज्ञात नसेल? पण कर्मसिद्धांत सांगणारे हृद्य फलाची चिंता का वाहील? देवाने ज्याला आपले मानले त्याचे इह आणि परलोकीही कल्याणच होते! त्याची “मी स्वामी पतितांचा” ही उक्ती सिद्ध करणारी ही कृती म्हणूनच वंदनीय आणि अनुकरणीय!

मानव की परमेश्वर? या प्रश्नाने त्या युगातही काही शंकासूर ग्रस्त होते आणि या युगातही आहेतच! पण ज्याला कीर्तीचा मोहच मुळी नाही… आम्हा पतितांचे रुदन तो केवळ ऐकत स्वस्थ बसू शकणा-यांपैकी खचितच नव्हता. कर्तव्यासाठी कलंक साहण्याचे सामर्थ्य अंगी असणारा तो एक समर्थ होता. आम्हां पतितांना संजीवन देण्यासाठी त्याने कलंक आदराने ल्याला… हलाहल प्राशन करून देवेश्वर झाला… ज्याने बाल्यावस्थेत धेनू राखल्या… त्याचे हृदय वत्सल धेनूसम असावे, यात नवल ते काय?

कौरवांच्या सभेत याच द्वारकाधीशाने एका द्रौपदीला वस्त्रे पुरवली यात म्हणूनच आश्चर्य वाटत नाही!

(दीपावली दरम्यान येणारी चतुर्दशी लहान दिवाळी म्हणून उल्लेखिली जाते. खरे तर हाच दिवस ख-या दिवाळीचा मानला जावा, असे वाटून जाते. अशी अलौकिक घटना या दिवशी श्रीकृष्णावतारात घडली… समाजबहिष्कृत थोड्याथोडक्या नव्हे, तब्बल सोळा हजार शंभर स्त्रियांना एका सर्वशक्तीमान दैवी अवतारीपुरुषाने पत्नी म्हणून स्विकारणे ही घटना सर्वार्थाने असामान्य! देवाचा माणूस झाला किंवा माणसाचा देव झाला या चर्चेपेक्षा माणसातले देवत्व कर्मातून सिद्ध करणारा मनुष्य देवच! भगवान श्रीरामांचे चरित्र व्यवहारात अनुसरण्यायोग्य आहे, पण भगवान श्रीकृष्ण चरित्र प्रत्यक्षात अनुसरणे केवळ अशक्य आहे, असा मतप्रवाह आहे. पण श्रीकृष्ण परमात्याची पतितोद्धाराची कृती अनुकरणीय नाही का? असो. अधिकाराविना बरेच लिहिले आहे. महान गीतगोविंदकार कवी मनोहर कवीश्वर यांनी ‘माना मानव वा परमेश्वर’ हे खरोखर अप्रतिम रचनेतून प्रत्यक्ष श्रीकृष्ण चारित्र्य नजरेसमोर उभे केले आहे. हे विचार लिहिताना त्यांच्याच शब्दांचा आधार घेतला आहे, हे लक्षात येईलच. यात इदं न मम अशी भावना आहे. जय श्रीकृष्ण.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ऋणानुबंधाच्या गाठी…’ भाग – २ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘ऋणानुबंधाच्या गाठी…’ भाग – २ ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

(आता उजव्या हातांनी लेखन करणे अशक्य झाल्यावर त्यांनी आपल्या संपादकत्वाचा राजिनामा दिला.) इथून पुढे —- 

आपल्या शिक्षकी पेशातून किती तरी वर्षांपूर्वी अण्णा निवृत्त झाले होते. पण पुढे कित्येक वर्षे अध्यापन, लेखन त्यामुळे ते खर्‍या अर्थाने निवृत्त झाले नव्हतेच. या दुखण्याने मात्र त्यांना निवृत्त केलं. आता ते इतके रिकामे रिकामे झाले,  की मनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. बोलता येईना,  त्यामुळे संवाद थांबला. लिहिता येईना, त्यामुळे लेखन थांबलं. लोकसंपर्कही हळूहळू कमी झाला. आपल्यामुळे कुणाला कसला त्रास होऊ नये, म्हणून अण्णा विलक्षण जागरुक असायचे. पण या काळात अण्णांना नेमके काय हवे,  कशाची गरज आहे, हे लक्षात घेऊन ती गरज भागविण्यासाठी उज्ज्वला आपणहून पुढे आली. वहिनी अर्थात होत्या. पण त्या घर, स्वयंपाक-पाणी, अण्णांचं पथ्यपाणी यात गुंतलेल्या. त्यात त्यांचं वयही सत्तरीच्या जवळपास.

वर्षातून एकदा लांबचा प्रवास करून यायचा, असा अण्णा-वहिनींचा गेल्या ३०-३५ वर्षातील शिरस्ता. मागे एकदा कन्याकुमारीला भेट दिली, तेव्हा विवेकानंद स्मारकाचा विकास झालेला नव्हता. पुन्हा त्या भागात जाऊन ते स्मारक बघून येण्याची इच्छा दोघांच्याही मनात निर्माण झाली. आता अण्णांनी पंचाहत्तरी गाठलेली. वहिनी अडुसष्ठच्या पुढे. त्यात अण्णांची बोलण्याची, लिहिण्याची, घास गिळण्याची समस्या. उज्ज्वलाने यावेळी पुंडलिकाची भूमिका बजावत वयाने वृद्ध पण मनाने तरुण असलेल्या दांपत्याला, शरिराने काही प्रमाणात विकलांग, पण मनाने निरामय असलेल्या आपल्या गुरुला आणि गुरुपत्नीला दक्षिण भारताची मुशाफिरी व विवेकानंद स्मारकाचे दर्शन घडवले.

प्रवासाला गेलं की तिथली माहिती समजून घ्यायची. टिपणे काढायची आणि नंतर अत्यंत रोचक व माहितीपूर्ण प्रवासवर्णन लिहायचं,  हाही अण्णांचा नित्याचा प्रघात. यावेळी उजव्या हाताच्या बोटांना पकड नव्हती. त्यांनी हळूहळू डाव्या हाताने लिहिण्याचा सराव केला. अजून व्यवस्थित लेखन होत नव्हतं,  पण वाचून कळेल इतपत लिहायला जमू लागलं. लेखनाची उर्मी अशी उदंड की लेखन केल्याशिवाय राहवेना. प्रवास संपवून मंडळी घरी आली. अण्णांनी रोज थोडं थोडं जमेल तसं वेड्या-वाकड्या अक्षरात लेखन केलं. उज्ज्वलाने इतरांना समजेल, अशा अक्षरात त्याची मुद्रण प्रत तयार केली. दक्षिण भारताचे सुंदर प्रवास वर्णन पुढे प्रसिद्ध झाले. साधु वासवानी यांच्या विचारांचा इंग्रजीवरून मराठी अनुवाद त्यांनी केला. शालेय मुलांना उद्बोधक अशी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या पाश्चात्य कर्तृत्ववान व्यक्तींचा परिचय करून देणारे माहितीपूर्ण लेखन त्यांनी ‘ मानवतेचा दीपस्तंभ ‘ या दोन भागात केले. या सार्‍या लेखनाला वाचनीय अक्षरांचे रूप देण्याचे काम उज्ज्वलाने केले आणि नंतर ती प्रकाशित झाली.

उज्ज्वला अशी मुलीसारखी घरी येत राहिली. मुलीसारखी वहिनींना घरकामात, अण्णांना लेखनात मदत करत राहिली. अण्णांना क्वचित बाहेर त्यांच्या समवयस्क मित्रांकडे घेऊन जाऊ लागली. अण्णांना अर्धांगाचा झटका आल्यापासून वहिनींनी स्वत:च्या जेवणाची आबाळ करायला सुरुवात केली. आपण सवाष्णपणे या जगाचा निरोप घ्यायचा, असा त्यांचा मनोनिग्रहच होता जणू. दवाखान्यातून आल्यावर अण्णांची प्रकृती सुधारली. कारण वहिनी त्यांचे पथ्यपाणी नीट सांभाळत होत्या. वहिनींची प्रकृती मात्र खालावत गेली,  कारण त्यांनी आपल्या प्रकृतीची फारच हेळसांड केली. जुन्या संस्काराचा मनावर पगडा असलेल्या वहिनींनी अहेवपणी जाण्याचा नियतीशी जणू हट्टच धरला. आणि अखेर ती शर्यत जिंकली. त्या १९८९ च्या जुलैमध्ये कालवश झाल्या.

वहिनी गेल्या. नंतर अण्णांची काळजी घेणारे घरात कुणी उरले नाही. त्यांचे धाकटे भाऊ होते  पण ते स्वत:च थोडे अपंग होते. धाकटा मुलगा चाळीशीचा असला, तरी थोडा लाडावलेला. थोडा गतिमंद. त्या दोघांचीही अर्थात लग्ने झालेली नव्हती. मोठा मुलगा नोकरीनिमित्त इंदौरला. तो किती राहणार? यावेळी उज्ज्वलाच आण्णांच्या घरी रहायला आली. अण्णांचे पथ्य सांभाळले. पातळ जेवण करून,  मिक्सरमधून काढून ती ते चमच्याने अण्णांना भरवू लागली. त्यांना गिळता येत नसे. झोपवून चमच्याने ते पातळ जेवण थेट घशात सोडावं लागे. अण्णांची आई बनून तिने त्यांना जेवू घातले.

वर्षभर सगळं ठाक-ठीक चाललं. अण्णांचं जेवण, पातळ खीर, अंबील, मिक्सरमधून पोळी काढून त्यात दूध घालून केलेली पोळीची पेस्ट असं सगळं करून ती शाळेत जाई. हे घर तसं मध्यवर्ती होतं. तिचं स्वत:चंही घर शाळेपासून जवळ होतं. तिला शाळेतून येताना घरी डोकावता येत असे. तिचा मुलगा-मुलगी,  आई-वडील,  भाऊ यांना भेटून येता येत असे. मुलीचे लग्न झाले होते. तिला एक नातही होती. या सार्‍यांची ख्याली-खुशाली विचारून,  घरचं हवं – नको पाहून ती संध्याकाळी अण्णांकडे येऊ शकत असे. पुढे वाड्याचं अपार्टमेंट करायचं ठरलं. बिल्डरने दिलेली पर्यायी जागा उज्ज्वलाच्या दृष्टीने खूप लांब होती. तिला दोनदा बस बदलून शाळेत जावं लागणार होतं. अण्णा तिला म्हणत, ‘वाडा सोडला, की तू आपल्या घरी जा. साडी, चोळी, बांगडी देऊन माहेरवाशिणीची पाठवणी करतो.’  आण्णा म्हणायचे,  म्हणजे लिहून दाखवायचे. ती म्हणायची, ‘ मग तुमचं कोण करणार? ‘  ते म्हणायचे, `मी दूध वगैरे पेय घेऊन राहीन. बाकीचे नेहमीप्रमाणे डबा आणतील. तू इतक्या लांब येऊ नकोस. तुझी खूप ओढ होईल.’  पण ती म्हणायची,  ‘ मी वहिनींना वचन दिलय,  शेवटपर्यंत तुमची काळजी घेईन. मीही तुम्हा सर्वांबरोबर तिकडच्या घरी येणार !’

उज्ज्वला आता इतकी घरातली झाली होती की आम्ही भाच्या-पुतण्या आण्णांना भेटायला गेलो की तिला इतका आनंद होई, माहेरवाशिणींचं किती कौतुक करू आणि त्यांच्यासाठी घरात काय काय करू, नि काय काय नको, असं तिला होऊन जाई. अण्णांना मुलगी असती, तर तिने तरी त्यांच्यासाठी इतकं  केलं असतं की नाही कुणास ठाऊक? कदाचित् ती देखील आमच्यासारखी आपल्या संसारात गुरफटून गेली असती.

आण्णांचा मोठा मुलगा नोकरीच्या निमित्ताने दूर गावी होता. तो आण्णांना सारखा `तिकडे चला’  म्हणायचा. पण अण्णांना पुणं सोडून कुठेच जायचं नव्हतं. ‘नेत्रदान केलंय.. देहदान केलंय…’ वगैरे सबबी ते सांगायचे. खरी गोष्ट अशी होती की त्यांना अखेरच्या दिवसात, आपली वास्तु,  जी त्यांच्या पत्नीची स्मृती होती आणि आपली कर्मभूमी या गोष्टी सोडून कुठेही जायचं नव्हतं,  हेच खरं. या स्थितीत त्यांच्याजवळ होती,  त्यांची एके काळची विद्यार्थिनी, जी गुरु-ऋण मानून आपलं शिक्षण संपल्यावरही, त्यांच्या गरजेच्या काळात,  त्यांची काळजी घेण्यासाठी आपलं घर,  आई-वडील,  भाऊ,  मुलगा या सार्‍यांपासून दूर आपल्या गुरुजवळ राहिली. आता अण्णा जाऊनही किती तरी वर्षे झाली. पण तिने त्यांच्यासाठी जे केले त्याला खरोखरच तोड नाही. त्या  `ऋणानुबांधाच्या गाठी ‘ होत्या हेच खरं !

– समाप्त –

©  सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ऋणानुबंधाच्या गाठी…’ भाग – १ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘ऋणानुबंधाच्या गाठी…’ भाग – १ ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

‘आण्णा, आज संध्याकाळी येताना आंबे घेऊन येते बरं का ! ‘ उज्ज्वला घड्याळाचा पट्टा बांधून, टेबलावरची पर्स उचलत, पायात चपला सरकवता सरकवता म्हणाली. नकारार्थी मान हलवत हाताने आण्णांनी `नको’ अशी खूण केली. याचा अर्थ `आंबे नकोत’, असा नसतो. `तू एवढा त्रास घेऊ नकोस’, असा असतो. गेल्या पंध्रा-वीस वर्षांच्या परिचयाने, सहवासाने, त्यांच्या नकारामागील मतितार्थ पुष्पाला नेमका कळतो. ती म्हणते,

`आण्णा मला कसला आलाय त्रास? आज काही शाळा नाही. आज मी घरून निघेन आणि मंडईत उतरेन. आंबे आले असले, तर घेईन, आणि तिथेच कॉलनीची बस करीन. ‘

आण्णांनी `ठीक आहे. ‘ अशा अर्थाने मान हलवली. कुणाही अपरिचिताला वाटेल, की हा संवाद, जो एका बाजूने शाब्दिक आणि दुसर्‍या बाजूने खाणा-खुणांच्या सहाय्याने चाललाय, तो बाप-लेकीतला, किंवा भावा-बहिणीत चालू असणार. किंवा निदान काका –पुतणी, मामा-भाची अशा अगदी जवळच्या नात्यातल्या व्यक्तींमध्ये चालू असणार. प्रत्यक्षात हा संवाद चालू असतो, गुरु-शिष्यामध्ये.

कधी काळी गुरूच्या आश्रमात गुरूची सेवा करत विद्यार्थी विद्या संपादन करत असत, असं आपण सगळ्यांनी वाचलय. आज एकविसाव्या शतकात गुरुजनंविषयी अलिप्ततेने, इतकेच नव्हे, तर तुच्छतेने, हेटाळणीने बोललं जाणार्‍या जमान्यात, गुरूविषयीच्या कृतज्ञतेने त्याच्या शारीरिकदृष्ट्या आपत्काळात, मुलगी, बहीण, आई होऊन त्यांची सेवा करणारी उज्ज्वला ही जगावेगळीच म्हणायला हवी. विशेषत: आयुष्यात दु:ख, कष्टच वाट्याला आल्यानंतर, विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर, सुखाचे चार घास आता कुठे निवांतपणे खाण्याची शक्यता असताना आपला सुखाचा जीव सेवाव्रताच्या तप:साधनेत व्यतीत करणार्‍या उज्ज्वलाबद्दल बोलावं तेवढं थोडंच!

आण्णांनी आपल्या आयुष्यातील ४७ वर्षे शिक्षण क्षेत्रात काढली. आण्णा म्हणजे गो. प्र. सोहोनी. पुण्यातील कॅम्प विभागातील कॅम्प एज्यु. सोसायटी व त्याच संस्थेच्या सर राजा धनराज गिरजी हायस्कूल या दोन शाळांमधून त्यांनी अध्यापन केले. दोन्ही शाळा तशा तळा- गाळातल्या म्हणाव्या आशा. या शाळांमधून त्यांनी जवळ जवळ 35 वर्षे मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळली. निवृत्तीनंतर 5 वर्षे फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये त्यांना बोलवण्यात आले. त्यानंतर सरकारच्या विनंतीवरून सासवड येथे कंडेन्स कोर्ससाठी ते सासवडला गेले. स्वत: उत्कृष्ट शिक्षक होते, पण उत्कृष्ट अध्यापन एवढीच त्यांची खासियत नव्हती. ते आदर्श शिक्षक होते. आपल्या विद्यार्थ्यांवर वर मुलाप्रमाणे प्रेम करणारे होते. सेवानिवृत्तीनंतर सरकारच्या विनंतीवरून त्यांनी सासवड येथील कस्तुरबा विद्यालयाचा कारभार पाच वर्षे सांभाळला. इथे बहुतेक सर्व विषयांचे अध्यापन ते करीत. मुख्याध्यापक आणि वसतिगृहाचे रेक्टर याही जबाबर्‍या त्यांच्यावर होत्या. रुढार्थाने आपल्याला परिचित असलेल्या शाळांसारखी ती शाळा नव्हती. शालांत परीक्षेपर्यंत ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही, अशा असहाय्य, परित्यक्ता, विधवा स्त्रियांसाठी सरकारने हा अभ्यासक्रम सुरू केला होता. शाळा कोणत्याही इयत्तेत सोडलेली असली, तरी इथे दोन वर्षात दहावी-अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाई. आणि दुसर्‍या वर्षी शालांत परीक्षेला बसवलं जाई. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, प्रश्नपत्रिका अन्य शालेय विद्यार्थ्यांच्याप्रमाणेच असत. विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची सोय होती. विद्यार्थिनींच्या राहण्या-जेवण्याचा सारा खर्च सरकार करत असे. आण्णा सुपरिंटेंडेंट म्हणून काम पाहत असत. त्यांची सहकुटुंब राहण्याची सोयही तिथेच केलेली होती. आण्णा आणि वहिनींच्या रुपाने शाळेत शिक्षण घेणार्‍या आणि वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थिनींना आई-वडलांचे छत्र लाभले होते. आर्थिक भार सरकारने उचलला असला, तरी मानसिक आधार, उमेद, उत्साह आण्णा-वहिनींनी त्या वेळच्या विद्यार्थिनींमधे वाटला.

आर्थिक कारणाने सरकारने सासवड येथे चालवलेली ही शाळा ७२ साली बंद केली. मग आण्णा-वहिनी पुण्याला त्यांच्या घरी आले. त्यानंतर त्यांच्या सासवडच्या किती तरी विद्यार्थिनी, कधी मुला-बाळांना घेऊन, कधी नवर्‍याला घेऊन आण्णांकडे यायच्या. उज्ज्वलाचे वडीलही पुण्यालाच राह्यचे. त्यामुळे एस. एस. सी. ची परीक्षा झाल्यावर, तीदेखील पुण्याला आली. उज्ज्वला काळे पुण्यातच होती. त्यामुळे तिचे येणे वारंवार घडू लागले. कधी मुलांना घेऊन, कधी वडलांना, कधी भावाला. असं होता होता, उज्ज्वला आणि तिचा परिवार आण्णांच्या गोतावळ्यात कधी मिसळून गेला, कुणालाच कळलं नाही.

आण्णा तिला एकदा म्हणाले, ‘नुसता एस. एस. सी. चा काय उपयोग? तू डी. एड. हो. ‘ नुसती सूचनाच नाही. तिच्या मागे लागून तिला डी. एड. ला प्रवेश घ्यायला लावला. तिचा अभ्यास करून घेतला. मग यथावकाश प्राथमिक शाळेत नोकरी, कायम होणं, हे सारं घडून गेलं. उज्ज्वलाचा संसार मार्गी लागला. हे सारं होईपर्यंत एखाद्या डोंगरासारखे आण्णा तिच्या मागे उभे राहिले. आण्णांचे हे ऋण उज्ज्वला नेहमीच मानते. ती म्हणते, `आण्णा नसते, तर लोकांच्या घरी धुणं-भांडी करून मला मुलांना वाढवावं लागलं असतं. ‘

उज्ज्वला मराठा समाजातली. वडील चांगले पदवीधर. पण समाजाची म्हणून एक रीत-भात असते. चाकोरी असते. तिचं लग्नं लवकरच, म्हणजे बाराव्या-तेराव्या वर्षी झालं. दोन मुले झाली आणि पठोपाठ वैधव्याच्या दु:खाला सामोरे जायची वेळ आली. आपघर उध्वस्त झाल्यावर बापघर जवळ करणं आलं. तिथे आसरा, तात्पुरता आधारही मिळाला. पण कुटुंब मोठं. मिळवता एकटा. आसरा मिळाला तरी आपल्या पिलांच्या चारा-पाण्याची व्यवस्था तरी आपल्याला बघायला हवी. त्यासाठी शिक्षण हवे. आईने मुलांना संभाळायचे मान्य केले आणि उज्ज्वला सासवडला राहिली. दोन वर्षात शालांत परीक्षा ती उत्तीर्ण झाली.

बुद्धिमान माणसे आपल्या कर्तृत्वावर पुढे जातात. सामान्य वकुब व कुवत असलेल्या व्यक्तींमध्ये चैतन्याची, जिद्दीची ज्योत पेटवावी लागते. `तू ही गोष्ट निश्चितपणे करू शकशील, असा आत्मविश्वास जागवावा लागतो. ‘ आण्णांनी उज्ज्वलाच्या बाबतीत नेमके हेच केले. उज्ज्वला सामान्य बुद्धीची मुलगी असली, तरी कष्टाळू होती. `परीक्षेत पास होणे मुळीच अवघड नाही’ असा विश्वास त्यांनी तिच्यात निर्माण केला. तिचा अभ्यास घेतला. तिला मार्गदर्शन केले. म्हणूनच ती म्हणते, `आण्णांमुळेच मी आज शिक्षिका म्हणून उभी आहे. एरवी मला इतरांच्या घरची धुणं-भांडी करून मुलांना वाढवावं लागलं असतं.

१९७७मध्ये आण्णांना अर्धांगाचा झटका आला. महिना-दीड महिना हॉस्पिटलमध्ये काढल्यावर आण्णा घरी आले. आपण कुणावर भार होऊ नये, असं आण्णांना सारखं वाटायचं. उजव्या हाताला पकड नव्हती आणि गिळण्याची क्रिया जवळ जवळ थांबली होती. पण प्रयत्नपूर्वक जेवणाच्या व्यतिरिक्त सर्व गोष्टी ते स्वत:च्या स्वत:च करू लागले. हा आघात त्यांची वाणी आणि त्यांची लेखणीही घेऊन गेला. उजव्या हाताची शक्तीच नाहीशी झाली. `महाराष्ट्र एज्युकेशन जर्नल’ या इंग्रजीतून प्रकाशित होणार्‍या नियतकालिकाच्या संपादनाचे काम ते गेले २५ वर्षे करत होते. इतकंच नव्हे, तर त्यातील लेखनही बव्हंशी ते एकटाकी करत होते. आता उजव्या हातांनी लेखन करणे अशक्य झाल्यावर त्यांनी आपल्या संपादकत्वाचा राजिनामा दिला.

 – क्रमशः भाग पहिला 

©  सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १६ — दैवासुरसम्पद्विभागयोगः— (श्लोक ११ ते २३) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १६ — दैवासुरसम्पद्विभागयोगः— (श्लोक ११ ते २३) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः । 

कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः ॥ ११ ॥

*

चिंता अपरिमित जन्मभराची ओझे वाहत जगती

विषयभोग आनंद श्रेष्ठतम मानुनि जीवन जगती ॥११॥

*

आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः । 

ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान्‌ ॥ १२ ॥

*

पाशांनी आशांच्या बद्ध बाधा कामक्रोधाची

अर्थसंग्रह करित अन्याये तृष्णा विषयभोगाची ॥१२॥

*

इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम्‌ । 

इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम्‌ ॥ १३ ॥

*

प्राप्त जाहले जे मजला करण्या मनोरथ पूर्ती

धनी मी विपुल धनाचा होईल पुनरपि धनप्राप्ती ॥१३॥

*

असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि । 

ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी ॥ १४ ॥

*

वधिले शत्रूंना मी माझ्या आणखीनही वधेन मी

सिद्धीप्राप्त ईश्वर भोक्ता बलदंड मी सदा सुखी मी ॥१४॥

*

आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया । 

यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः ॥ १५ ॥ 

*

अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः । 

प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ॥ १६ ॥

*

धनवान मी कुलवान मी मजसम ना येथे कोणी

यज्ञ करूनी दाना देइन जीवन जगेन आनंदानी

मोहाच्या या जाळ्यात अडकले अज्ञानाने भ्रांतचित्ती

कामाच्या भोगात गुंतुती महाऽपवित्र नरकात गती ॥१५, १६॥

*

आत्मसम्भाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः । 

यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम्‌ ॥ १७ ॥

*

धनमान मदाने होउनी गर्विष्ठ उन्मत्त

पाखंडी शास्त्रविधीहीन यज्ञासी करतात ॥१७॥

*

अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः । 

मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः ॥ १८ ॥

*

अहंकार बल दर्प कामना संतापाने ग्रस्त

परनिंदेच्या आनंदात दंग होउनी स्वस्थ

देहस्थ आपुल्या इतरांच्या माझी ना जाण

सदैव माझा द्वेष करती धनञ्जया तू जाण ॥१८॥ 

*

तानहं द्विषतः क्रूरान्संसारेषु नराधमान्‌ । 

क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु ॥ १९ ॥

*

क्रूर द्वेषी त्या पाप्यांना कृपा माझी ना लाभे 

माझ्याकरवी संसारीं त्यां योनी आसुरी लाभे ॥१९॥ 

*

आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि । 

मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्‌ ॥ २० ॥

*

ऐशा मूढा मी न प्राप्त हो जन्मोजन्मांतरी

प्रतिजन्मी त्यां जन्म लाभतो योनी आसूरी 

सदैव त्यांना अधःपात होउनिया नीचगती

घोर नरक त्यांच्या वाटे जाणी रे तनयकुंती ॥२०॥ 

*

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः । 

कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्‌ ॥ २१ ॥

*

काम-क्रोध-लोभाची त्रिविध द्वारे नरकाला

नाश करूनी अधोगतीला नेती आत्म्याला

प्राप्त करण्यासी सद्गती विवेक जागवुनी

त्याग करा या तिन्ही गुणांचा सद्गुण जोपासुनी ॥२१॥

*

एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः । 

आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम्‌ ॥ २२ ॥

*

नरक कवाडे मुक्त जाहला कल्याणाच्या आचरणे

प्राप्त तयासी परम गती ममस्वरूपी विलीन होणे ॥२२॥

*

यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः । 

न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्‌ ॥ २३ ॥

*

स्वैर जयांचे असे आचरण शास्त्रविधी त्यागुनी

सुखही नाही सिद्धी नाही परमगती ना कोठुनी ॥२३॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसंपद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः ॥१६॥

*

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी दैवासुरसंपद्विभागयोग नामे निशिकान्त भावानुवादित षोडशोऽध्याय संपूर्ण ॥१६॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ यो मां पश्यति सर्वत्र। ☆ श्री हेरंब देऊळकर ☆

श्री हेरंब देऊळकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ यो मां पश्यति सर्वत्र। ☆ श्री हेरंब देऊळकर ☆

यो मां पश्यति सर्वत्र l

सर्वं च मयि पश्यति ll

…. श्रीमद्भगवद्गीतेमधल्या श्लोकाचा अर्धा चरण.

सिद्धावस्था प्राप्त झालेल्याची स्थिति या चरणात भगवंतांनी सांगितली. अखिल चराचराशी एकरुपता, अभिन्नत्व, ऐक्याचे म्हणा, वर्णन यात आले.

देवाचे नि प्रसन्नपणे l 

जे जे घडेल बोलणे l 

ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे l 

या नांव प्रासादिक ll

….. अशा ज्या संतांनी प्रत्यक्ष परमेश्वराशी संवाद साधला व ज्यांनी प्रासादिक वाणीने आपल्यासारख्यांच्या आत्यंतिक हितासाठी (श्रेयस् ) कमीत कमी व सोप्या शब्दात जो उपदेश केला तो आपल्यापुढे ठेवावा म्हणून हा लेखनप्रपंच.

अवघी भूते साम्या आली l 

देखिली म्यां कै होती l

विश्वास तो खरा मग l 

पांडुरंग-कृपेचा ll

*

माझी कोणी न धरू शंका l 

ऐसे हो कां निर्द्वंद्व l 

तुका म्हणे जे जे भेटे l 

ते ते वाटे मी ऐसे ll

…… सर्व भूते एकरूप आहेत असे माझ्या डोळ्यांना जेंव्हा दिसेल, तेंव्हाच माझ्यावर पांडुरंगाची कृपा झाली असे मी समजेन. माझ्याविषयी कोणालाही जरासुद्धा शंका, भय वाटू नये अशी द्वंद्वरहित स्थिती झाली पाहिजे. आपल्या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात जी जी वस्तू दिसेल ती ती माझेच रूप आहे असे वाटले पाहिजे. समर्थ हेच सांगतात…..

कदा ओळखीमाजी दुजे दिसेना l

मनी मानसी द्वैत कांही वसेना l 

बहुता दिसा आपुली भेटी झाली l

विदेहीपणे सर्व काया निमाली ll

एकदा तुकाराम महाराज ज्ञानोबांच्या दर्शनासाठी जात असताना वाटेत शेतात झाडाखाली पक्षी दाणे टिपत होते. महाराजांना पाहून सर्व पक्षी उडाले. तुकारामांना वाईट वाटले, त्यावेळी त्यांच्या मुखातून हा अभंग निघाला. जो पर्यंत पक्षी पुन्हा अंगावर येऊन बसत नाहीत तोपर्यंत महाराज प्राणायाम करून निश्चल उभे राहिले. शेवटी महाराजांचा प्रेमभाव, विश्वात्मक भाव प्रकट झाला.. म्हणजेच किंबहुना चराचर आपणचि झाला असे झाले हे ओळखून सर्व पक्षी पुन्हा खांद्यावर बसले व झाडावर नि:शंक होऊन जसे खेळतात तसे खेळू लागले, तेंव्हा महाराजांचे समाधान झाले.

संत एकनाथ यांचे गाढवाला पाणी पाजणे, संत नामदेवांचे कुत्र्याने चपातीची चवड नेली असता त्यांच्या मागोमाग तुपाची तामली घेऊन धावत जाणे हा समदर्शी भाव झाला. गाढव, कुत्रा आपण म्हणतो, त्यांना त्यांतील चैतन्य दिसले. माऊलींनी निर्जीव भिंत चालवणे, ध्रुवाने प्राणायाम केल्यावर विश्वाचा श्वास थांबणे, कृष्ण गाई- वासरांना रानात नेत असताना वाटेत काटे-कुटे दगड धोंडे टोचत असता त्याचे दु:ख गोपीना होणे … हे सर्व चराचरात्मक भाव जागृत झाल्याचे द्योतक आहे. भगवद्गीता हेच प्रतिपादन करते…

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनी l 

शुनि चैव श्वपाके च पण्डिता: समदर्शिन: ll

सिद्धावस्था अजूनही प्राप्त न झालेल्या साधकाचे मनोरथ सांगून थांबतो……

गंगातीरे हिमगिरीशिला बद्धपद्मासनस्य

ब्रह्मज्ञानाभ्यसनविधिना योगनिद्रां गतस्य l 

किं तैर्भाग्यं मम सुदिवसै: यत्र ते निर्विशंका:

कण्डूयन्ते जरठ हरिणा श्रुंगमंके मदीये ll

….. गंगेच्या तीरी हिमालयाच्या सान्निध्यात बसून पद्मासन इ. आसने सिद्ध करून घेतली, ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करता करता योगनिद्रा प्राप्त झाली. पण माझ्या जीवनात तो सुदिन केंव्हा येईल जेव्हा हिमालयातील हरिणे निर्भय होउन आलेली खाज कमी करण्यासाठी आपली शिंगे माझ्या मांडीवर घासतील …. तो मंगलदिन.

© श्री हेरंब देऊळकर

बेळगाव 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सिंह सेखों – मूळ हिन्दी व इंग्रजी लेखक : अनामिक ☆ मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

? इंद्रधनुष्य ?

☆ फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सिंह सेखों – मूळ हिन्दी व इंग्रजी लेखक : अनामिक ☆ मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे

फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सिंह सेखों.

परमवीर चक्र…. भारतीय हवाई दल.

निर्मलजित सिंह सेखों यांचा जन्म १७ जुलै १९४३ रोजी पंजाब मधील लुधीयाना जिल्ह्यातील रुरका इसेवाल या गावात सेखों जाट सिख परिवारात झाला होता. त्यांचे वडिल वारंट ऑफीसर (ऑनररी फ्लाइट लेफ्टिनेंट) त्रिलोक सिंह सेखों हेही भारतीय हवाई दलात नोकरीस होते व आई हरबंस कौर या गृहिणी होत्या.

४ जून १९६७ रोजी निर्मलजित सिंह सेखों हे भारतीय हवाई दलात पायलट म्हणून अधिकारी पदावर नियुक्त झाले.

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते भारतीय वायुसेनेच्या “द फ्लाइंग बुलेट” या अठराव्या स्क्वाड्रन मध्ये कार्यरत होते.

१४ डिसेंबर १९७१ रोजी श्रीनगर विमानतळावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी हवाई दलाच्या एफ-86 जेट विमानांनी 26वे स्क्वाड्रन पीएएफ बेस पेशावर येथून उड्डाण केले.

सुरक्षा तुकड़ी चे नेतृत्व सांभाळत फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सिंह तेथे १८व्या नेट स्क्वाड्रन वर तैनात होते.

भारतीय हवाई दल स्थानकावर हल्ला होताच निर्मलजित सिंह सेखों आपल्या विमानासह तयार झाले. तोपर्यंत फ्लाईट लेफ्टनंट घुम्मन ही कंबर कसून तयार झाले होते. थंडीचे दिवस असल्याने अगदी पहाटे च्या वेळी विमानतळावर खूपच धुके होते. त्यामुळे सर्वत्र अंधुक दिसत होते.

सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी चेतावनी मिळाली की शत्रूने आक्रमण केले आहे. निर्मलजितसिंह व घुम्मन यांनी लगेच आपण उडण्यास तयार असल्याचे सांगितले आणि उत्तराची दहा सेकंद वाट बघून मग विमानाचे उड्डाण करण्याचा निर्णय घेतला. बरोबर आठ वाजून ४ मिनिटांनी दोन्ही अधिकारी शत्रूचा सामना करण्यासाठी आपापल्या विमानांसह आकाशात होते.

त्यावेळी शत्रूचे पहिले F-86 सायबर जेट भारतीय विमानतळाभोवती चक्कर मारण्याच्या तयारीत होते. धावपट्टीवरुन घुम्मन यांच्या विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर निर्मलजित सिंह च्या नेट विमानाने उड्डाण करताच धावपट्टीवर त्यांच्या बरोबर मागे एक बाॅम्ब येऊन पडला.

घुम्मन स्वतः त्यावेळी एका सायबर जेट चा पाठलाग करत होते. निर्मलजित हवेत उडताच दोन सेबर जेट विमानांना सामोरे गेले. यापैकीच एका विमानाने विमानतळावर बाॅम्ब टाकला होता. बाॅम्ब पडल्यामुळे सेखों व घुम्मन यांचा विमानतळावरील संपर्क कक्षाशी संपर्क तुटला होता. बाॅम्ब च्या स्फोटामुळे संपूर्ण विमानतळ धूर व धुळीने व्याप्त झाले होते त्यामुळे दूरपर्यंत काहीच दिसत नव्हते. तेव्हड्यात फ्लाइट कमांडर स्क्वाड्रन लिडर पठानिया यांच्या नजरेत शत्रूची दोन विमाने हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे दिसले. घुम्मन यांनी ही निर्मलजीत सिंह यांच्या मदतीस जाण्यासाठी तेथे पोहोचण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. तेवढ्यात रेडियो संदेशावर निर्मलजीत सिंह यांचा आवाज़ ऐकू आला… “मी दोन सेबर जेट विमानांच्या मागावर आहे. मी त्यांना परत जाऊ देणार नाही…. “

त्यांनंतर काही क्षणांत नेट च्या हल्याचा आवाज़ आकाशात ऐकू आला आणि आगीने पेटलेले एक सायबर जेट जमीनीवर पडतांना दिसले. तेव्हड्यात निर्मलजीत सिंह सेखों यांनी आपला संदेश पाठविला… “मी लढत आहे व मला खूप मजा येत आहे. माझ्या आजूबाजूला शत्रूंची दोन सेबर जेट आहेत. मी एकाचा पाठलाग करत आहे. दुसरे माझ्या बाजूनेच उडत आहे. “

या संदेशाच्या उत्तरात स्क्वाड्रन लिडर पठानिया यांनी निर्मलजित सिंह यांना सुरक्षेसंबंधी काही सुचना दिल्या. त्यानंतर नेट विमानातून अजून एक राॅकेट उडाले. त्याबरोबरच शत्रूचे सेबर जेट उध्वस्त झाल्याचा आवाज ही आला. त्यांनी अजून एक निशाणा साधला आणि जोरात आवाज करत शत्रू चे अजून एक सेबर जेट ध्वस्त झाले.

थोड्या शांततेनंतर फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों यांचा संदेश पुन्हा ऐकायला आला. ते म्हणाले… “बहुतेक माझे नेट ही शत्रूच्या निशाण्यावर आले आहे. घुम्मन, आता तुम्ही मोर्चा सांभाळा. “

हा निर्मलजीत सिंह यांचा शेवटचा संदेश होता आणि देशाच्या रक्षणार्थ शत्रूच्या विमानांना धूळ चारत वयाच्या सव्विसाव्या वर्षी त्यांना वीरगती प्राप्त झाली.

फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों यांच्या या अतुलनीय शौर्य व साहसामुळे आणि देशरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिल्याने भारत सरकार ने वर्ष १९७२ मध्ये युद्धकाळातील सर्वोच्च सन्मानाचे पदक, ‘परमवीर चक्र’ (मरणोपरांत) देउन त्यांचा सन्मान केला.

देशाला त्यांच्यावर गर्व आहे.

— — — — — हे वीर जवान, तुझे सलाम! ! ! ! !  🇮🇳

हिंदी व इंग्रजी लेखक- अनामिक

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रांगोळी आणि मेंदूचा विकास…  लेखिका : डॉ. ईशा खासनीस☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? इंद्रधनुष्य ?

रघुनायका, मागणे हेचि आता☆ श्री अनिल वामोरकर ☆

 

 ५ ) इंद्रधनुष्य — 

 “ रांगोळी आणि मेंदूचा विकास “

 लेखिका : डॉ. ईशा खासनीस

 प्रस्तुती : अनिल वामोरकर 

बुचकळ्यात पडलात ना.. रांगोळी आणि मेंदुचा विकास ह्यांचा दूरदूरपर्यंत तरी काही संबंध असू शकेल का ? एक फक्त डेकोरेशनचा विषय आणि दुसरा चक्क न्यूरोलॅाजी सारखे क्लिष्टसायन्स — पटत नाहीये ? 

एक सांगू का ? सनातन हा धर्म नसून एक विशिष्ट जीवन प्रणाली, एक विचार प्रणाली आहे. आणि आपल्याला लावून दिलेल्या ह्या सगळ्या गोष्टींमागे खूप गर्भित अर्थ आहे. शास्त्र आहे. मेंदूचा विकास होताना त्यातील दोन न्यूरॉन्स मधील कनेक्शन्स तयार होऊन विकास होत असतो. जितके जास्त हे मज्जातंतूचे जाळे तीव्र व गुंतागुंतीचे होत जाईल तितका जास्त मेंदूचा विकास होत जातो. ज्याला interneuronal connections असे म्हणतात. पण हे conncections वाढतात कुठल्या कुठल्या गोष्टीने ? तर जितका मेंदू तुमचा ऍक्टिव्हली एंगेज राहील. म्हणजे TV, mobile, screen, reels बघताना तुमचा मेंदू passively एंगेज असतो. ज्याने मेंदूचा विकास तर सोडाच पण मेंदू थकतो. परंतु जितके लहान मुल वेगवेगळ्या परिस्थितींना expose होईल तितके हे neuronal connections वाढत जातात आणि मेंदूचा विकास होत जातो.

—- पण मग जसे जसे वय वाढत जाते तसे तसे age related brain atrophy नावाचा प्रकार सुरु होतो. म्हणजे वृद्धापकाळामुळे मेंदू सुकणे किंवा आकार कमी होणे. त्यामुळे विसरायला होणे, गोंधळ वाढणे, आत्मविश्वास कमी होणे, काहि काळापुरते एकदम सगळं ब्लँक वाटू लागणे अशा समस्या उद्भवतात. हे होऊ नये असे वाटत असेल तर मेंदूला चालना देणारे काम सतत करत राहिले पाहिजे नाहीतर स्मृतिनाश झपाट्याने सुरू होतो.

 

आता ह्या सगळ्याशी रांगोळीचा संबंध काय ? खरे तर ज्याने कुणी ह्या पारंपरिक रांगोळीचा शोध लावला तो मोठा सायंटिस्ट म्हणावा लागेल. (अर्थात आपले ऋषी मुनी हे सायंटिस्टच होते आजच्या परिभाषेत सांगायचे तर ) 

 

पारंपरिक रांगोळ्या बघा – ठिपक्यांच्या, कासव, षट्कोनी, त्रिकोणी, ठिपके वाढवत जाणे कमी करत जाणे, दक्षिणेकडे तर कोलम प्रकारातल्या कठीण रांगोळ्या,             ज्ञानकमळासारख्या क्लिष्ट रांगोळ्या.

१. जेव्हा ते ठिपके, त्या रचना काढायला तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला एकाग्रता लागते, 

२. तसेच ते विशिष्ट प्रकारे कसे काढावे ह्यास आकलन शक्ती लागते,

३. कुठून कुठे ठिपके जोडावे ? ह्यात ते लक्षात ठेवणे – ह्यास स्मरण शक्ती लागते.

४. रंगसंगती, वेगळ्यावेगळ्या रचना कशा तयार करता येतील यास कल्पनाशक्ती लागते.

म्हणजेच एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलनशक्ती, कल्पकता वाढीस लागणे हे सगळे होणे म्हणजे तुमच्या CEREBRUM (मोठ्या मेंदूचा ) विकास होय 

ठिपके सरळ रेषेत काढणे, रेष बारीक आणि सरळ काढणे ह्या सगळ्यात तुमचे motor skills तयार होतात हे म्हणजे तुमच्या छोट्या मेंदूचा (cerebellum ) चा विकास होय.

आणि ह्या सगळ्याचे प्रशिक्षण लहानपणापासून मुलांना घरातूनच मिळावे म्हणून घरासमोर रोज आईने रांगोळी काढण्याची प्रथा.. त्यात मुलाचा विकास आणि ह्या सवयीने नंतरही अगदी उतार वयातही मेंदूला चालना कायम मिळत राहणार. म्हणजे अल्झायमर सारख्या स्मृतिभ्रंशाच्या आजाराला निमंत्रण नाही.

दाक्षिणात्य कोलम आणि ज्ञानकमळासारख्या रांगोळ्या तुम्ही खरंच काढून बघा, “it’s a brain game ” हे जाणवेल तुम्हाला. मी नुकतंच माझ्या मुलीला ज्ञानकमलाची रांगोळी शिकवली ती म्हणाली “आई हे खूप challenging आहे आणि interesting सुद्धा. अर्थात लहान असल्याने तिला एकदा शिकवताच लगेच काढता आली. परंतु ही रांगोळी परंपरा खूप शास्त्रीय आहे आणि brainstorming सुद्धा हे मात्र खरे. माझ्या एका अमेरिकन डॅाक्टर मित्राने एकदा मला विचारले कि “This your rangoli art is very beautiful but why to waste so much so colour and material daily and also the daily hard work of making designs & rubbing it next day? Instead, why don’t you make the paintings which are permanent. ” I replied,”Dr. Eric, as You are a doctor, you are a science person, you can definitely understand it, it’s not waste, it’s investment in your brain health ” हे ऐकल्यावर त्यानी खूप आश्चर्याने विचारले “But how? ” मग अर्थातच पुढचे स्पष्टीकरण ऐकल्यानंतर त्यांना ते मनोमन पटले “It’s amazing then”!

लेखिका : डॉ. इशा खासनीस, MD 

बंगलोर

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लखलखता हिरा.. अर्जुन देशपांडे – लेखिका : सुश्री मुक्ता आंग्रे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ लखलखता हिरा.. अर्जुन देशपांडे – लेखिका : सुश्री मुक्ता आंग्रे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

एक सोळा वर्षाचा मुलगा मेडिकलच्या दुकानात जातो. तिथे एक आजोबा कॅन्सरसाठीची औषधे घेत असतात. खरंतर त्यांना ती महागडी औषधे परवडत नसतात पण त्यांच्या पत्नीला कॅन्सर झालेला असल्याने ते कशीबशी पैशांची सोय करून औषधे घ्यायला आलेले असतात. तो मुलगा हे सगळे पहात असतो आणि न राहवून तो आजोबांना त्यांच्याबद्दल विचारतो. सत्य कळल्यावर तो खूप विचारात पडतो की असे हजारो, लाखो लोक या देशात आहेत की त्यांना ही महागडी औषधे परवडत नाहीत. पण तरीही काहीच पर्याय नसल्याने ते इतकी महाग औषधे खरेदी करतात. तो मुलगा आता यावर पर्यायांचा विचार करायला लागतो. यातूनच त्याच्या भावी उद्योगाचा पाया रचला जातो.

हा मुलगा म्हणजे ठाण्यातील वय वर्ष फक्त २२ असलेला ‘अर्जुन देशपांडे’ जो जगातील सर्वात तरुण उद्योजक आहे. त्याने स्थापन केलेल्या ‘जेनेरिक आधार’ या कंपनीचा टर्नओव्हर आहे मात्र पंधराशे कोटी रुपये !

१६ वर्षाच्या अगदी कोवळ्या वयात अर्जुनने ‘जेनेरिक आधार’ कंपनी स्थापन केली. कंपनीचा मूळ उद्देश हाच होता की गरजू आणि गरीब लोकांना अतिशय स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत. त्यासाठी त्यांनी औषधे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना गाठले. तेथून स्वस्तात औषधे खरेदी करून ‘जेनेरिक आधार’ नामक मेडिकलच्या दुकानातून त्याची विक्री सुरू केली. जी औषधे उत्पादकांकडून विकत घेऊन मोठ्या मोठ्या फार्मा कंपन्या स्वतःचे लेबल लावून अतिशय महाग विकतात तीच औषधे जेनेरिक आधार मध्ये अतिशय स्वस्त दरात मिळतात. मध्ये कुठलेही दलाल आणि इतर खर्च नसल्याने ते ही औषधे इतक्या कमी किमती विकू शकतात.

आजच्या घडीला देशभरात ‘जेनेरिक आधार’ ची तीन हजार मेडिकलची दुकाने आहेत. जिथून औषधे खरेदी करून लोकांचे हजारो लाखो रुपये वाचत आहेत.

तसेच अर्जुनने आज दहा हजार पेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगार देऊ केला आहे.

त्याच्या या कर्तुत्वाची दखल रतन टाटा सारख्या दिग्गज व्यक्तीनेही घेतली. रतन टाटांनी त्याला भेटायला बोलवून केवळ प्रोत्साहनच नाही तर त्याच्या कंपनीमध्ये गुंतवणूकही केली. याचे कारण सांगताना अर्जुन सांगतो कि आपल्या देशातील अगदी दुर्गम खेड्यातही औषधे उपलब्ध व्हावीत अशी अर्जुनप्रमाणे रतन टाटांचीही इच्छा आहे. आज पर्यंत अर्जुनला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. वय वर्षे केवळ २२ असलेल्या अर्जुनला आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली तसेच जपान सारख्या अतिप्रगत देशात मानाने बोलवले जाते. त्याचे व्याख्यान ऐकायला लोक गर्दी करतात. जपानने तर त्याला अतिशय स्वस्त दरात मोठे कर्ज दिले आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी तसेच आपल्या देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनीही अर्जुनला भेटायला बोलवून त्याची प्रशंसा केली. द्रौपदी मुर्मुशी तर त्याचे आता आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.

सध्याच्या चंगळवादी तरुणाई मध्ये अर्जुन देशपांडे हा एखाद्या लखलखत्या हिऱ्यासारखा चमकतो आहे. ज्याला आपल्या देशाचा अतिशय अभिमान आहे. त्याला आपल्या भारत देशाला अमेरिका अथवा इंग्लंड न बनवता अभिमानास्पद भारतच बनवायचा आहे.

अशा या लखलखत्या हि-याला, अर्जुनला मानाचा मुजरा !

लेखिका : सुश्री मुक्ता आंग्रे

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ क्विक हील – Quick Heal… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ क्विक हील – Quick Heal… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री. कैलास काटकर

दहावीनंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं दोन हजार कोटींची QUICK HEAL आयटी कंपनी उभी केली.

नाव कैलास काटकर. गाव मूळचे सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूर. राहायला पुण्याच्या शिवाजीनगर मधल्या नरवीर तानाजीवाडी मध्ये. वडील फिलिप्स कंपनीमध्ये हेल्पर, आई घरकाम करणारी. एक लहान भाऊ आणि एक बहिण. असं हे पाच जणांचं कुटुंब नतावाडीतल्या एका छोट्याशा खोलीत राहायचं.

कैलाश सगळ्यात थोरला. त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा त्याच्याकडूनच. घरची परिस्थिती कशीही असली तरी त्याला शाळेत घातलेलं. पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत, फी भरायला पैसे नाहीत. कसंबसं रडतखडत दहावी पर्यंत पोहचला. पण दहावीनंतर पुस्तकी शिक्षणाला रामराम ठोकला आणि खऱ्या शिक्षणाला सुरवात केली. आयुष्य शिकवत असलेलं व्यावहारिक शिक्षण.

तसं कैलासला लहानपणापासूनच घरातल्या बिघडलेल्या वस्तू सोबत खटपट करायची आवड होती. वडिलांचं बघून बघून सहावीमध्ये असतानाच रेडियो दुरुस्त करायला सुरवात केली होती. त्याबद्दलचा एक महिन्याचा कोर्ससुद्धा केला होता. काही तरी करू असा आत्मविश्वास होता. दहावीच्या निकालाची वाट न बघता नोकरी शोधायला सुरवात केली.

एक दिवस त्याला पेपर मध्ये एक जाहिरात दिसली. एका कंपनीमध्ये कॅलक्युलेटर दुरुस्त करणाऱ्याची आवश्यकता होती. कैलासने आयुष्यात कधी कॅलक्युलेटर बघितला सुद्धा नव्हता. तरी त्याने अप्लाय केले. नशिबाने मुलाखतीसाठी आलेल्या पंचवीस जणांमधून त्याची निवड झाली. अंगभूत खटपटेपणा कामी आला. त्या कंपनीत कॅलक्युलेटर दुरुस्तीचं काम तर शिकलाच, शिवाय बँकांमधल लेजर पोस्टिंग मशीन, फॅसेट मशिन, अशा वेगवेगळ्या मशिनरी दुरुस्त करायला यायला लागल्या.

किती जरी झालं तर खटपट्या माणूस नोकरीत किती दिवस शांत बसेल? नोकरी सोडली आणि मंगळवार पेठेत स्वतःचं दुरूस्तीचं दुकानं सुरु केलं. सोबत एक हरकाम्या मुलगा सुद्धा ठेवला. त्यांची दिवसभर वेगवेगळ्या मशीन सोबत झटापट चालायची. पैसे बऱ्यापैकी मिळू लागले. 

एक दिवस कैलासला एका बँकेत एक नवीनच मशीन दिसलं. त्याने चौकशी केली, कोणी तरी सांगितलं, ”याला कॉम्प्युटर म्हणतात. आता येणार युग कॉम्प्यूटरचं असणार आहे.”

कैलास विचारात पडला. येणारं युग जर कॉम्प्युटरचं आहे तर आपल्याला शिकून घेतलं पाहिजे. पण शिकायचं कुठे हा सुद्धा प्रश्न होता.

नव्वदच्या दशकातला तो काळ. कॉम्प्यूटरने नुकताच भारतात चंचू प्रवेश केला होता. त्याच्या येण्यानं आपल्या नोकऱ्या जातील म्हणून डाव्या-उजव्या संघटना एकत्र लढा देत होत्या. कॉम्प्यूटर प्रचंड महाग होते आणि फक्त मोठ्या ऑर्गनायझेशनमध्येचं दिसायचे. कैलाशला कोणी कॉम्प्यूटरच्या जवळ देखील येऊ देत नव्हत.

एकदा चान्स मिळाला. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर टाईम्स ऑफ इंडियाचं ऑफिस आहे. त्यांचे तीन प्रिंटर बंद पडले होते. दुरुस्तीला आलेल्यांनी सांगितलं ते फेकुनच द्यायच्या लायकीचे उरले आहेत. ऑफिसवाल्यांनी तशीच तयारी केली होती. पण योगायोगाने कैलाश तिथे आले होते. त्यांनी पैजेवर ते मशीन दीड तासात दुरुस्त करून दाखवले. 

टाईम्स ऑफ इंडियानं फक्त प्रिंटरचं नाही तर कैलाशच्या हातात आपले कॉम्प्यूटरसुद्धा देऊन टाकले. दोन वर्षाचा दुरुस्तीचा करार केला. कैलाशच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट ठरला. टाईम्स ऑफ इंडियाचं बघून बाकीच्या कंपन्या, बँकादेखील त्यांना काम देऊ लागल्या. पुण्यात कॉम्प्यूटर हार्डवेअर दुरुस्तीमध्ये कैलाश काटकर हे नाव प्रसिद्ध झालं.

स्वतःचं शिक्षण अर्धवट सुटलं पण कैलाश यांनी आपल्या भावाबहिणीच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीच तडजोड केली नाही. धाकटा भाऊ संजयसुद्धा हुशार होता. त्याला त्यांनी मॉडर्न कॉलेजमध्ये कॉम्प्यूटर इंजिनियरिंगला प्रवेश घ्यायला लावला. तो देखील दिवसभर कॉलेज करून संध्याकाळी भावाच्या कामात मदत करत होता.

त्याकाळी व्हायरस हे प्रकरण नव्यानेचं उदयास आले होते. साथीच्या रोगाने जसे माणसे आजारी पडतात त्याप्रमाणेच कॉम्प्यूटरदेखील एखाद्या विशिष्ट प्रोग्रॅमचा प्रादुर्भाव झाला तर आजारी पडतात. मग ते आजारी पडू नयेत यासाठी असत रोगप्रतिबंधकारक औषधं. यालाच म्हणतात अँटी व्हायरस.

या व्हायरसच्या साथीची लागण झालेले बरेच कॉम्प्यूटर पुण्यात दुरुस्तीला कैलाश यांच्याच दुकानांत यायचे. लोक सांगायचे की तुम्हीच याला दुरुस्त करा. पण हा विषय होता सॉफ्टवेअरचा. हार्डवेअर वाले त्यात काय करणार. काहीतरी करून कैलाश ते कॉम्प्यूटर सुरु करून द्यायचे. त्यांच्या धाकट्या भावाने, संजयने सारख्या सारख्या लागण होणाऱ्या व्हायरसवर उपाय म्हणून एक टूल बनवले होते. जे त्यांच्या कस्टमरला खूप आवडले.

त्याचवेळी कैलास काटकर यांच्या बिझनेस माइंडमध्ये आयडिया आली की हा अँटी व्हायरसचा धंदा बराच पैसा कमावणार. त्यांनी भावाला एक स्पेशल कॉम्प्यूटर घेऊन दिला. नतावाडीमधल्या त्या वस्तीतल्या एका खोलीच्या घरात संजय काटकर अँटी व्हायरस बनवायच्या मागे लागला. दीड वर्षे लागली पण मराठी माणसाच स्वतःचं अँटी व्हायरस तयार झालं. त्याला नाव देण्यात आलं.क्विक हील.

वर्ष होतं १९९५. संजयनी स्वतःच या अँटी व्हायरसचा लोगो डिझाईन केला, पॅकेजिंग तयार केलं. कैलास काटकर कंपन्यांच्या दारोदारी फिरून आपलं प्रोडक्ट खपवू लागले. कॉम्प्यूटरमधल्या डाटाची नासाडी करणाऱ्या व्हायरसवर उतारा असलेला अँटी व्हायरस असणं किती गरजेचे आहे हे पटवून सांगेपर्यंत त्यांना नाकी नऊ यायचे पण त्यांनी जिद्द सोडली नाही.

त्याकाळात पुण्यात बऱ्याच आयटी कंपन्या सुरु होत होत्या. आयटी पार्क उभं राहत होतं. अशा सगळ्या नव्या जुन्या कंपन्यांना परदेशी अँटी व्हायरस पेक्षा चांगलं आणि स्वस्त असलेलं हे देशी अँटी व्हायरस पसंतीस पडलं. क्विकहिल अँटी व्हायरस बरोबर अनेक कंपन्यांनी वर्षाचे करार केले.

अजून मोबाईल फोन देखिल आले नव्हते. अशा काळात आफ्टर सर्विसला देखील भरपूर महत्व होतं. कैलाश काटकर यांनी मेहनतीने आपले ग्राहक सांभाळले. पुण्याबरोबर नाशिक, मुंबई येथे देखील आपली टीम उभी केली. वेगवेगळ्या शहरात जाण्याचाही त्यांना फायदा झाला. 

क्वालिटीच्या जीवावर स्पर्धेच्याकाळातही क्विकहिल मोठी झाली. मंगळवर पेठेत असणाऱ्या ऑफिसमधून कधी एक लाख स्क्वेअर फुट च्या ऑफिसमध्ये रुपांतर झाले कळले देखील नाही.

आज क्विकहिल हे भारतीय आहे, पुण्यात तयार झालंय, यावर कोण विश्वास ठेवणार नाही. तिथं तेराशेच्या वर कर्मचारी काम करतात. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांचे ऑफिसेस उघडलेले आहेत. आज ऐंशीहून अधिक देशातल्या कॉम्प्यूटरमध्ये हे देशी अँटी व्हायरस बसवलेलं दिसेल. 

…. आणि हे सगळं साम्राज्य उभं केलंय, दहावीनंतर शाळा सोडलेल्या एका मराठी मुलानं.

विशेष माहिती : हा उद्योजक मराठी माध्यमातून शिकला होता. हे आजकालच्या पालकांनी लक्षात घ्यावे.

लेखक – अनामिक.

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print