श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ रणी झुंजता झुंजता…! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
जिथे शहाणे पाय ठेवू धजत नाहीत तिथे मूर्ख जाण्याचा प्रयत्न करतात, असं म्हटलं जात. १९४८ पासून हाच मूर्खपणा पाकिस्तान करत आलेलं होतं. आधीच्या तब्बल तीन युद्धांतले लाजीरवाणे पराभव आणि तमाम जागतिक राजकीय मंचावर झालेली छी:थू असा इतिहास असतानाही १९९९ मध्ये पाकिस्ताने पुन्हा भारतीय हद्दीत पाऊल टाकण्याचा मूर्खपणा केलाच. पण यावेळी त्यांनी चोरट्यांचा मार्ग अवलंबला आणि धूर्तपणे भारतीय लष्करी चौक्यांचा अवैध ताबा घेतला. अशी ठिकाणे ताब्यात घेतली की जेथून भारतीय हद्दीतील लष्करी मार्गांवर नियंत्रण मिळवता येईल आणि भारताला गुडघे टेकायला भाग पडेल. एका अर्थाने त्यांनी झोपलेल्या सिंहावरच जाळे टाकण्याचा प्रयत्न आरंभला होता.
प्रचंड बर्फवर्षाव आणि इतर अनुषंगिक गोष्टींचा फायदा उचलत पाकिस्तान्यांनी टायगर हिल आणि लगतच्या सामरीकदृष्ट्या महत्त्वाच्या पर्वतशिखरांवर कब्जा केला होता. यात तोलोलिंग शिखराचाही समावेश होता. यावेळी त्यांची तयारी मोठी होती! काहीशा उशीराने का असेना पण मोक्याच्या वेळी भारतीय सिंह जागा झाले….आणि त्यांनी आधी तोलोलिंग ताब्यात मिळवले. अर्थात यासाठीची किंमत रक्ताने मोजावी लागली. यापुढे रक्त,बलिदान हेच चलन राहणार होते या समरात…आणि शूर रक्ताची, धैर्यवान काळजांची कमतरता भारताकडे कधीच नव्हती आणि नसणार आहे!
१७ हजार ४१० फुट उंची असलेले टायगर हिल ही अतिशय महत्वाची जागा होती. ती ताब्यात घेण्याआधी त्याच्या जवळची दोन ठिकाणे ‘इंडीया गेट’ आणि ‘हेल्मेट’ ही दोन शिखरे ताब्यात घेणे गरजेचे होते. यासाठी सैनिकांच्या अनेक तुकड्या मैदानात उतरवल्या गेल्या होत्या. ८,सीख बटालियन याच कामावर नेमली गेली होती. या बहादुरांनी या पर्वतशिखरांच्या जवळपास पोहोचून टायगर हिलवर तोफांचा भडीमार करण्यासाठी अगदी मोक्याची जागा हेरून तशी तयारी पूर्ण केली होती. सर्व बाजूंनी एकदम निकराचा हल्ला चढवूनच विजय मिळू शकणार होता. खालून वर चढणारे सैनिक पाकिस्तान्यांच्या गोळीबाराच्या,तोफांच्या अगदी अचूक निशाण्यावर येत होते. सत्तर ऐंशी अंश कोनांच्या टेकड्या उभ्या चढून जाणं एरव्हीही कठीण..त्यात आता तर वरून अक्षरश: आग ओकली जात असताना असे साहस करणे फक्त वीरांनाच शक्य होते…आणि असे वीर आपल्याकडे होते!
वरिष्ठ सेनाधिकारी सामरिक डावपेच आखत होते…कुठे यश तर कुठे मृत्यूचा सामना होत होता. सैन्याच्या विविध तुकड्यांना विशिष्ट कामे सोपवली गेली होती…मोठ्या प्रमाणात भारतीय सैनिक धारातीर्थी पडत होते. लीव नो मॅन बहाईंड…अर्थात कुणाही साथीदाराला मागे सोडून यायचं नाही हे सेनेचं ब्रीद. या ब्रीदाला प्रसंगी प्राणांची आहुतीही देऊन जागलं जातं. आपल्या साथीदारांचे रक्ताने माखलेले देह उचलून ते मागे आणण्याची जबाबदारी सुबेदार निर्मल सिंग आणि त्यांच्या सहका-यांना दिली गेली. त्यांचे गणवेश रक्ताने माखले…त्यांच्या दाढीचे केसही रक्ताने लालेलाल झाले होते.
सदैव दाढी राखणे हा तर गुरूंचा आदेश सीख पुरूषांसाठी. कर्तव्यात अडसर ठरू नये म्हणून सीख सैनिक आपली दाढी एका विशिष्ट कापडी पट्टीने बांधून ठेवतात..त्याला ठाठा असं म्हणतात! सुबेदार निर्मलसिंगांचा आपल्या दाढीला लागलेलं रक्त पाहून पारा चढला…त्यांनी प्रतिज्ञा केली….माझ्या साथीदारांच्या हौतात्म्याचा बदला घेतल्याशिवाय मी ठाठा बांधणार नाही…मी दाढी मोकळी ठेवीन….आणि त्यांच्या सोबतच्या सर्वांनीच तशी प्रतिज्ञा घेतली…आणि आसमंतात शीखांची युद्धगर्जना घुमू लागली….जो बोले सो निहाल…सत श्री अकाल !
.. ‘हम चलते है जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं…’ कवीने किती समपर्क शब्दांत लिहिलं आहे….गुहांमध्ये,कातळांआड लपून बसलेल्या पाकिस्तान्यांची काळजं शीखांच्या या आरोळ्यांनी हादरून गेली!
यावेळी त्यांच्या समवेत एक विशी-बावीशीचे तरूण लेफ्टनंट दर्जाचे अधिकारी होते….लेफ्टनंट कणद भट्टाचार्य. ते नुकतेच ८ शीख बटालियनमध्ये रुजू झाले होते. बंगालचा हा वाघ. कराटेमधील ब्लॅक बेल्ट धारक. घराण्यातील पहिलाच सैनिक होण्याचा मान मिळवणारा देखणा गडी. सैन्यात भरती झाल्यानंतर लगेचच युद्धात सहभागी होण्याचे भाग्य लाभलेला अधिकारी. कणद साहेबांच्या बटालियनचे कमांडर कर्नल जयदेव राठोड गोळीबारात जखमी झाल्याने त्यांना उपचारांसाठी मागे न्यावे लागणार होते…पण मग मोहिमेचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न उभा राहिला. लेफ्टनंट दर्जाच्या अधिका-याला सशस्त्र संघर्ष सुरू असताना प्लाटूनचं नेतृत्व करण्याची जबाबदारी देता येत नाही, असा नियम असल्याने राठोड साहेबांनी चक्क युद्धाच्या मैदानातच कणद साहेबांना कॅप्टन पदी बढती दिली…..असं बहुदा प्रथमच घडले असावे. पण युद्ध जारी राहिले पाहिजे…थांबायला वेळ नाही !
मोजके सैनिक हाताशी. प्रचंड बर्फवर्षाव. अंगावर येणारे कडे आणि वरून सातत्याने होणारा गोळीबार,तोफगोळ्यांचा अचूक वर्षाव. यातूनही वर जायचे होते…शत्रूला वर पाठवायला. आता खाली बोफोर्स तोफा तैनात होत्या. खालून वर चढणा-या सैनिकांना कव्हरींग फायर देता यावा म्हणून त्या वरच्या पाकिस्तानी चौक्यांवर आगफेक करीत होत्या. कणद साहेबांनी आपल्या तुकडीची दोन भाग केले आणि दोन्ही बाजूंनी चढाईला आरंभ झाला. भारतीय सैन्य या बाजूने असे अचानक येईल असे पाकिस्तान्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. आपले लोक पाकिस्तान्यांच्या अगदी जवळ पोहोचतात न पोहोचतात तोच त्यांनी वरून तिखट मारा आरंभला. तशाही स्थितीत कणद साहेब आणि एका बाजूने सुबेदार निर्मलसिंग आणि इतर सर्व जवान वर चढाई करीत राहिले. अतिशय निमुळती,घसरडी जागा. शत्रू आरामात निशाणा साधतोय….एवढ्यात वर असलेल्या शत्रूचा निर्मल सिंगांना सुगावा लागला…जीवाची पर्वा न करता ते वर त्वेषाने चढून गेले…शत्रूला संधीही न देता त्यांना दोन जणांना यमसदनी धाडले. खड्ड्यांत लपून राहिलेल्या एका एका शत्रूचा शोध घेत त्यांनी अनेकजण अचूक टिपले. एका क्षणी तर प्रत्यक्ष हातघाईची लढाई झाली….शत्रू मारला जात होता ! अंधार दाटून आला होता. अन्नपाणी घेण्याचीही सवड नव्हती आणि ते फारसे शिल्लकही राहिलेले नव्हते. जखमी अधिका-यांना, साथीदारांना मागे सोडून पाकिस्तानी घुसखोर पळून जात होते. मृतांच्या खिशांत सापडलेल्या ओळखपत्रांवरून शत्रू कुणी मुजाहिदीन घुसघोर नव्हते तर पाकिस्तानच्या नियमित लष्करातील लोक या छुप्या हल्ल्यात सामील होते, हे सिद्ध होत होते.
पण वरून होणारा गोळीबार सावज टिपत राहिला….आपले थोडेथोडके नव्हेत तर तब्बल तीस सैनिक जवान शहीद झाले होते….पण मोहिम फत्ते होत आली होती….इंडीया गेट आणि हेल्मेट शिखरे ताब्यात येणे म्हणजे टायगर हिल पादाक्रांत करणे अशक्य नाही ! ही शिखरे ताब्यात घेणे एकवेळ सोपे पण ती राखणे ही फार मोठी गोष्ट. सारागढी ची याद यावी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानने अगदी कसोशीने ही शिखरे पुन्हा ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली होती. कारण टायगर हिल ताब्यात ठेवायची म्हणजे त्यासभोवतीची महत्त्वाची शिखरेही ताब्यात असायलाच पाहिजेत. सवयीप्रमाणे पाकिस्तानने सकाळी पुन्हा हल्ल्यांमागून हल्ले चढवायला सुरूवात केली. पण कणद साहेब आणि निर्मल सिंग साहेब आणि इतर बहाद्दरांनी त्यांना पुढे येऊ दिले नाही….शेवटची गोळी आणि शेवटचा श्वास शिल्लक असेतोवर हे शक्यही नव्हते….गड्यांनी गड राखले होते ! यात अनेक सिंह कामी आले ! या सिंगांच्या अर्थात सिंहांच्या दाढ्या अजूनही मोकळ्याच होत्या..आताही त्या रक्तातळलेल्या होत्या…यावेळी त्यांच्या स्वत:च्या शरीरातून वहात असणा-या रक्ताने.
गुरू गोविंदसिंग साहेबांनी सांगून ठेवलं आहे…
हे ईश्वरा, मला असा वर द्या की,
शुभ काम करताना माझी पावले मागे सरू नयेत.
युद्धात उतरलो तर माझ्या मनात शत्रूची भीती नको
आणि मीच ते युद्ध जिंकावे.
तुमचे गुणगान गाण्यात माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यता असो
जब आव की अउध निदान बनै अति ही रन मै तब जूझ मरों ॥
आणि जीवनाचा अंत रणभूमीमध्येच होवो….झुंजता झुंजता मृत्यू येवो!
लेफ्टनंट कणद भट्टाचार्य(सेना मेडल),सुबेदार निर्मलसिंग (वीर चक्र) सुबेदार जोगिंदर सिंग (सेना मेडल), नायब सुबेदर कर्नेल सिंग (वीर चक्र), नायब सुबेदार रवैल सिंग (सेना मेडल) आणि इतर ३० जवान या मोहिमेत कामी आले. सर्वांचा नामोल्लेख इथे शक्य नाही. येत्या काही महिन्यांत कारगिल विजयाचा रौप्य महोत्सव येतो आहे….वीरांचे स्मरण अत्यावशयक म्हणून हा प्रयत्न. – – जयहिंद !!!
(यात अनुराधाताई प्रभुदेसाईंनी त्यांच्या लक्ष्य फाऊंडेशनसाठी घेतलेल्या कर्नल जयदेव सिंग राठोड साहेबांच्या मुलाखतीतील माहितीचाही समावेश आहे.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈