मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “तळ्यातला गणपती” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “तळ्यातला गणपती” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

सारसबागेतील गणपती मंदिराला आज २४० वर्षे पूर्ण झाली. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात बांधलेले हे मंदिराला तळ्यातला गणपती या नावाने प्रसिद्ध आहे. सारस बागेतील…. ‘तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ आहे. 

नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे ‘विद्येचे माहेरघर’ मानले जाते. परंतु नवसाला पावणाऱ्या ‘तळ्यातला गणपती’ ने पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अगदी आत्तापर्यंत हे ठिकाण “तळ्यातला गणपती” याच नावाने ओळखले जायचे. 

पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होते. पुण्याची वाढती पाण्याची गरज पाहून श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी १७५४ साली आंबील ओढ्याच्या प्रवाह बदलून मोठे तळे बांधले. या तलावाचे काम १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. या तलावात ‘सारस पक्षी’ सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग – बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेचे काव्यात्मक ‘सारस बाग’ असे नामकरण केले. 

हैदरअली वर स्वारी करायला जाण्यापूर्वी येथील तळ्यात श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारस बाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली. 

स्वातंत्र्यपूर्व काळात १८६१ च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकेकडे देण्यात आल्या. त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. मंदिराची सर्व व्यवस्था देवदेवेश्वर संस्थान पाहते. सारसबाग हे उद्यान व तेथील गणपती पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण आहे.

माहिती संकलक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हर्क्युलस विमानाचा पराक्रम… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हर्क्युलस विमानाचा पराक्रम… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

भारतीय सैन्याने आपल्या दोन दिवसांच्या धाडसी  कामगिरीमुळे  आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविली,  युगांडामध्ये इस्रायलने पूर्वी केलेला पराक्रम व भारताने आता केलेला पराक्रम हा सारखाच आहे.  

 भारतीय वायुसेनेच्या या कृतीने जग आश्चर्यचकित झाले आहे आणि भारताच्या उदयाचे कौतुक करत आहे.  भारतीय युगाची ही सुरुवात आहे असे जग  म्हणू लागले आहे.

सुदान मध्ये घडलेली ही घटना खूप धक्कादायक आणि थरारक होती .  भारतीय हवाई दलाच्या विमानांनी युक्रेन आणि काबूलमधील भारतीयांची सुटका करणे ही फार मोठी गोष्ट नव्हती कारण ते नेहमीच्या औपचारिकतेसह योग्य विमानतळांवर दिवसा उजेडी घडलेल्या होत्या.  

सुदानमध्ये तसे झाले नाही,  सुदानची हवाई हद्द बंद आहे आणि कोणत्याही विमानाला उड्डाण करण्याची परवानगी नाही, फक्त अमेरिकेने आपल्या राजदूतांना वाचवण्यासाठी आपले हेलिकॉप्टर धाडसाने पाठवले आहेत. इतर सर्व देश तेथे ठप्प आहेत, विमानतळावरील लढाईमुळे उड्डाणे अशक्य होतात आणि इतर अनेक मार्गक्रमण  अशक्य होते.    

121 भारतीय देखील असेच अडकले होते आणि त्यांना वाचवणे हे मोठे आव्हान होते

पंतप्रधान मोदींनी भारतीय हवाई दलाला पूर्ण अधिकार दिले आणि भारतीय गुप्तचर सेवा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासहीत  भारतीय हवाई दल उत्साहाने मैदानात उतरले.

विदेशी विमाने सुदानमध्ये उडू शकत नाहीत आणि उड्डाण केल्यास दोन्ही बाजूंनी भीतीपोटी हल्ला होऊ शकतो, याशिवाय मुख्य विमानतळ जीर्ण आहे, अशा परिस्थितीत सुदानच्या परवानगीशिवाय भारतीयांची सुटका करावी लागणार आहे. हे आव्हान त्यांच्यासमोर होते. 

भारतीय गुप्तचरांनी सुदानची चौकशी केली आणि राजधानीच्या पलीकडे 50 किमी अंतरावर एक मानवरहित, बंद विमानतळ शोधला. तेथे विमान उतरविता येईल पण अनेक अडचणी आहेत.  

सर्व प्रथम, त्या विमानतळावर  कोणीही नाही, वीज नाही, दिवे नाहीत, हवाई वाहतूक नावाचे कोणतेही मार्गदर्शन नाही, येथे विमान लँडिंग किंवा टेक ऑफ करणे असो, धोका जास्त आहे.

विमान आले तरी  सुदानुना  चुकवून येणे अवघड आहे.   तसे पाहिले तर भारतीय विमानांना उड्डाणासाठी पेट्रोलमुक्त मार्ग नाही.  त्यामुळे अनेक समस्या या कार्यात आहेत. 

प्रथम, भारतीय हवाई दलाने आपल्या कमांडोसह एक मोठे विमान सौदी जेद्दाहला पाठवले, तेथून ते सुदानच्या बाजूने होते, जेणेकरून एकच इंधन भरणे पुरेसे होते.

भारतीय हवाई दलाने अत्यंत गुप्ततेत सनसनाटी कामगिरी  पार पाडली  १२१ लोकांना  संध्याकाळी शांतपणे  मानवरहित विमानतळाजवळ गुपचुप आणून लपवून ठेवले.  

त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या हर्क्युलस विमानाचा पराक्रम सुरू झाला. 

विमानात दिवे न लावता  अंधारात उड्डाण केले त्यामुळे कोणाच्याही नजरेस न पडता विमान ईप्सित स्थळी पोहोचले . हे उड्डाण करताना त्यांनी  नाईट व्हिजन अटॅक उपकरणे वापरली आणि उपग्रहाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विमानाने अंधारात उत्तम प्रकारे उड्डाण केले.

वैमानिकांनी रात्री विमान सुरक्षितपणे उतरवले आणि इंजिन चालूच ठेवले.  

विमानाचा दरवाजा उघडला आणि भारतीय कमांडो धावत आले आणि विजेच्या वेगाने विमानात १२१   जणांना घेऊन गेले. या गोष्टीस सात मिनिटे लागली.   सौदी अरेबियातील जेद्दाह येथे विजेच्या वेगाने जाणारे विमान उतरल्यानंतर भारतीय मायदेशी परतले. 

या घटनेचे जागतिक स्तरावर तीव्र पडसाद उमटत आहेत.  इस्त्राईल वगळता इतर कोणत्याही देशाने असे आव्हान स्वीकारले नाही आणि भारताने ते यशस्वी केले आहे.  हे ऑपरेशन खूप आव्हानात्मक होते , जर विमान अडकले किंवा लढाऊ विमानांनी  घेरले गेले असते  तर फार मोठा धोका होता. शनिवार २९.४.२०२३ रोजी हे घडले. 7 मिनिटांत सुदानमधून भारतीयांची सुटका झाली. 

प्रत्येक प्रकल्प सावधपणे परंतु धैर्याने संकल्पित केला जातो आणि आव्हान असतानाही तो कार्यान्वयीत केला जातो.  हा पराक्रम करणाऱ्या पायलट आणि क्रू चीफचे तपशील अद्याप जाहीर झालेले नाहीत. 

त्यांच्या नावांची पुरस्कारांसाठी घोषणा केव्हा होईल हे नक्की कळेल. 

भारतीय हवाई दलाने मोठी कामगिरी केली असून प्रत्येक भारतीयाने छाती उंच करून अभिमानाने अभिवादन करण्याची वेळ आली आहे.

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : अमोल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हा माणूस परका ? – लेखक – श्री महेश कुलकर्णी ☆ संग्रहिका – सुश्री सुलु साबणेजोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ हा माणूस परका ? – लेखक – श्री महेश कुलकर्णी ☆ संग्रहिका – सुश्री सुलु साबणेजोशी ☆

सिगफ्रीड वुल्फ

हा माणूस परका ?

तर लेखासमवेत असेलला फोटो पाहून तुम्ही म्हणाल, “काय हे, आजच्या दिवशी परक्या माणसाचा फोटो टाकतोय?” पण त्यामागे कारणच तसे आहे. फोटोमधील माणसाचे नाव आहे Mr. Siegfried Wolf. Mr.Wolf हे Universität Heidelberg मध्ये प्राध्यापक आहेत. तर त्यांच्याबद्दल लिहिण्याचे कारण असे की, २०१४ मध्ये आम्ही German भाषा शिकत होतो. भाषेवर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळवले होते. वीर सावरकर ह्यांच्या ऐतिहासिक उडीबद्दल काही जुने लेख आणि छायाचित्र त्या काळी German वृत्तपत्रांमध्ये झळकली होती, असे आमच्या ऐकिवात होते. ती इंटरनेटवर मी German भाषेत शोधत होतो आणि ते शोधत असताना मला एक  PDF मिळाली. तर ती pdf होती वीर सावरकर ह्यांच्यावर लिहिलेली जवळ जवळ ७०० German पाने आणि लेखक होते हे Mr.Wolf.  Mr.Wolf ह्यांच्या पुस्तकाचे PHD च्या विषयाचे नाव खालीलप्रमाणे: Thesis:  ‘The Construction of a Collective Identity in India: Vinayak Damodar Savarkar and his Hindutva-Concept’, final grade : Magna Cum Laude.

त्यांचा PHD चा विषय पाहून आणि ७०० German पानांचे पुस्तक पाहून मी थक्क झालो. मी त्यांना लगेच ईमेल पाठवून धन्यवाद दिले.

एखादा परकीय माणूस आयुष्याची ६ वर्षं वीर सावरकर ह्यांच्यावर PHD करण्यात घालवतो आणि आपण साधे त्यांचे विचार on to the last man पोहोचवू शकत नाही, ह्याची मला तर शरम वाटते. आम्ही Germany मध्ये असताना ह्या सदगृहस्थांना भेटता आले नाही, पण भविष्यात त्यांना आम्ही नक्की भेटू. वीर सावरकर ह्यांना ‘भारतरत्न’ सन्मान मिळावा म्हणून Germany मधून काही हालचाली करता येतील का? अशा आशयाचे पत्र मी त्यांना आता पाठवणार आहे.

वीर सावरकर अमर रहे… अखंड भारत अमर रहे.!! 

लेखक : श्री महेश कुलकर्णी

प्रस्तुती : सुश्री सुलु साबणे-जोशी.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दासबोधातील समर्थ बोध… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

दासबोधातील समर्थ बोध… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

दासबोधातील समर्थ बोध

मुख्य हरिकथा निरूपण । दुसरें तें राजकरण । तिसरें तें सावधपण । सर्वविषईं ॥ ४ ॥

सरळ अर्थ :- 

लोकसंग्रह करणाऱ्याच्या अंगी कोणती लक्षणे हवीत, ते येथे सांगत आहेत. त्याला उत्तम प्रकारे हरिकथा आणि अध्यात्मनिरूपण करता आले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अंगी मुसद्दीपणा हवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वच बाबतीत सावधपणा हवा. 

विवेचन:-

समर्थांचे जीवन चरित्र या ओवीत सामावले असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. समर्थांच्या चरित्राचा ढोबळमानाने अभ्यास केला तर आपल्या असे लक्षात येईल की पहिली बारा वर्षे ते घरी होते, नंतरची बारा वर्षे टाकळी येथे त्यांनी साधना केली. त्यानंतर बारा वर्षे देशाटन करून त्यांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला. त्यानंतर पुढील ३६ वर्षे त्यांनी राष्ट्राचे पूनरूत्थान करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.  

उदंड जाहालें पाणी । स्‍नान संध्‍या करावया । जप तप अनुष्‍ठानें । आनंदवनभुवनीं ।।३६।।

(आनंद वनभुवनी)

वरील ओवी त्याच्या राजकीय आणि धार्मिक कार्यातील यशस्वीतेची ग्वाही देते असे म्हणता येईल.

समर्थ एका ठिकाणी म्हणतात,

“अखंड सावधान असावे | दुश्चित कदापी नसावे | तजविजा करीत बैसावे | येकान्त स्थळी||”

आज आपण जे सुरक्षितता (safety) या विषयाबद्दल बोलतो, लिहितो त्याबद्दल हा विलक्षण आगळावेगळा संत सुमारे चारशे वर्षांपूर्वी लिहून गेला आहे, असे आपल्या लक्षात येईल.

समर्थांनी आधी हरिकथा केली, अर्थात स्वतःला सिद्ध केले. त्यानंतर मिळवलेली विद्या, ज्ञान देशभर भ्रमंती करून तपासून पाहिले आणि त्यानंतर महाराष्ट्रात त्याचा यशस्वी प्रयोग केला…!

समर्थांचे काही आवडते शब्द आहेत. त्यामध्ये विवेक, प्रयत्न आणि सावधान किंवा सावधानता यांचा क्रम खूप वरचा आहे. 

मनुष्याने कोणतेही कार्य करताना आपले विहित कार्य ( अर्थात हरिकथा)  सोडू नये असे समर्थ आपल्याला सांगत आहेत. व्यवहारात असो परमार्थात मनुष्याने अत्यंत सावधान असले  पाहिजे. अन्यथा त्याला कोणीही लुबाडेल.

मनुष्य प्रापंचिक असो किंवा पारमार्थिक त्याने वरील ओवी कायम लक्षात ठेवावी आणि तसे आचरण करण्याचा प्रयत्न करावा असे समर्थ आपल्याला सांगत असावेत.

जय जय रघुवीर समर्थ 

(तळटीप :  या निमित्ताने समर्थांचे चरित्र प्रत्येक वाचकाने वाचावे असे मी आपल्याला सुचवीत आहे.) 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तस्वीर तेरी दिल में… जिस दिन से उतारी है! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

तस्वीर तेरी दिल में… जिस दिन से उतारी है! ☆ श्री संभाजी बबन गायके 

तस्वीर तेरी दिल में… जिस दिन से उतारी है! 

… (शार्लटची चारूलता होताना !) 

स्वीडन या संपन्न देशातल्या एका राजघराण्यातली ही गोंडस,सुंदर,देखणी राजकन्या….शार्लट ! तिच्या नावाचं इंग्लिश भाषेतील स्पेलिंग Charlotte असं काहीसं तिरपागडं आणि आपल्याला चार्लेट असा उच्चार करायला उद्युक्त करणारं. युरोपातले पालक आपल्या मुलीचं नाव ठेवायचं झाल्यास याच नावाला पसंती देतात. .. या नावाचा एक अर्थ ‘नाजुक’ असाही होतो. आणि ती होतीही तशीच. सडपातळ आणि सिंहासारखी कटी असलेली….जणू एखादी नाजूक वेल,लता !  हीच शार्लट चारूलता कशी झाली याची ही हृदयंगम कहाणी.

शार्लट अठरा-एकोणीस वर्षांची असेल. मनानं कलावंत असलेली शार्लट सातत्याने कलेची उपासना करण्यात दंग असे. तिला माणसांत आणि माणसांच्या चित्रांमध्ये खूप रस होता. रेषा आणि रंगांनी कागदावर साक्षात माणूस चितारता येतो याची तिला खूप गंमत वाटे. लंडन येथील एका कला महाविद्यालयात ती चित्रकला शिकत होती.  व्यक्तिचित्रं साकारू शकणाऱ्या सर्वोत्तम कलाकाराच्या शोधात ती होती…तिलाही हे तंत्र शिकून घ्यायचं होतं. 

ही कला अंगी असणारा एक अवलिया माणूस तिच्या घरापासून ९७०० किलोमीटर्सवर आहे, हे तिला माहीत झाल्यापासून ती त्याला भेटायला उतावीळ झाली. आणि आपल्या व्हॅनमधून त्याच्याकडे निघाली सुद्धा. लंडनवरून तब्बल बावीस दिवसांनी ती दिल्लीत पोहोचली….तिला हवा असणारा कलाकार इथेच तर होता. प्रद्युम्नकुमार त्याचं नाव. महानंदिया हे कुलनाम. ओरिसातल्या अत्यंत दुर्गम भागात जन्मलेला हा तरूण पुस्तकी अभ्यासापेक्षा निसर्गामध्ये, रंगांमध्ये जास्त रमतो याची त्याच्या पोस्टमनची नोकरी करीत असलेल्या वडिलांना अतिचिंता होती. त्याचे ग्रह काय म्हणताहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रद्युम्नची पत्रिका एका ज्योतिषाला दाखवली….’ हा मोठा कलावंत तर होईलच पण याचं लग्न दूरवरच्या एखाद्या सुंदर,श्रीमंत मुलीशी होईल…तिची राशी वृषभ असेल ! आणि तीच याला शोधत येईल ! ‘ 

– आपले वडील आणि ते ज्योतिषी यांच्यातला हा संवाद छोटा प्रद्युम्न चोरून ऐकत होताच….त्या लहान मुलाला तोवर लग्न वगैरे विषय माहीत नव्हता…पण आपल्या पत्नीची राशी वृषभ असेल हे त्याने पक्के ध्यानात ठेवले ! 

प्रदयुम्न प्रचंड जातीयवाद,गरीबी,अवहेलना यांना तोंड देत देत शेवटी चित्रकलेच्या शिक्षणासाठी दिल्लीत पोहोचला. शिकताना उदरनिर्वाहाचा प्रश्न त्याने लोकांची पोर्टेट्स काढून देऊन सोडवला. भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे हुबहू पोर्टेट काढून प्रदयुम्न यांनी सर्वांची वाहवा मिळवली. एक दर्जेदार कलाकार म्हणून प्रदयुम्न आता दिल्लीत प्रसिद्धीस आले आणि याच जोरावर त्यांनी दिल्ली प्रशासनाकडून कनॉट प्लेसमधील प्रसिद्ध आणि पवित्र कारंज्याजवळ पोर्टेट काढून देण्यासाठी बसण्याची परवानगी मिळवली.

गोष्ट आहे १९७५ मधली. प्रद्युम्न असेच त्या कारंज्याजवळ बसून लोकांची पोर्टेट्स काढून देण्यात मग्न होते. शार्लट त्यांच्यासमोर उभी राहिली…’ माझं पोर्टेट काढून द्याल?’ तिच्या प्रश्नाने ते भानावर आले आणि आपल्यासमोर प्रत्यक्षात जणू एक चित्रच उभे असल्याचं त्यांनी पाहिलं…चार्लट ! ती त्यांच्यासमोर बसली. त्यांनी तिच्या डोळ्यांत पाहिले….निळेशार डोळे! कुणीही हरवून जावे असे. इथपर्यंत प्रद्युम्नसाठी ती एक कलाकार विद्यार्थिनी, त्याची ग्राहक एवढंच होती. कितीतरी वेळ ती त्यांच्यासमोर स्तब्ध बसून होती. त्यांना वेगळं सुंदर व्यक्तिचित्र काढण्याची गरजच नव्हती….तिचं सौंदर्य कुंचला आणि रंग यांच्या माध्यमातून आपसूकपणे कागदावर चितारलं जात होतं. बघता बघता चित्र पूर्ण झालं आणि ते चित्र बघता बघता चार्लट मंत्रमुग्ध झाली. प्रद्युम्न यांनी तिला अचानकपणे विचारलं,” तु वृषभ राशीची आहेस का?” तिने हो म्हणताच प्रद्युम्न नकळत म्हणून गेले….”मग तु माझी पत्नी होशील!” हे ऐकताच सुरुवातीला चार्लट भांबावूनच गेली असावी….मग ते पुढे भेटत राहिले. आता प्रद्युम्न तिचं चित्र कागदावर नव्हे तर त्याच्या हृदयाच्या पटावर रेखाटू लागले….चार्लटचा राजकुमाराचा शोध संपला होता….ते दोघेही हिंदू रितीरिवाजानुसार रीतसर विवाहबद्ध झाले…चि.सौ.कां.चार्लट आता सौ.चारूलता प्रदयुम्न महानंदिया झाली होती. 

“आपण आता स्वीडनला जाऊयात!” एके दिवशी चारूलता त्यांना म्हणाली. “नको, माझा अभ्यासक्रम पुरा होऊ देत. आणि मला तुझ्या खर्चाने तिकडे यायला नको आहे. मी माझ्या हिंमतीवर येईन. मग त्यासाठी वाटेल ते करावं लागलं तरी बेहत्तर.” त्याचा हा विचार तिला सुखावून गेला…स्वाभिमानी आहे हा राजकुमार..तिनं मनात म्हटलं. आणि ती मायदेशी निघून गेली. त्याकाळी पत्र हे मोठं माध्यम होतं संवादाचं. इतक्या दूरवर पत्रं पोहोचायला उशीर लागायचा…पण संदेश या हृदयापासून त्या हृदयापर्यंत वायूवेगानं पोहोचायचा. ‘ तस्वीर तेरी दिल में..जिस दिन से उतारी है…फिरू तुझे संग लेके, नये नये रंग लेके…सपनों की महफिल में…तुफान उठायेगी दुनिया मगर…रुक न सकेगा दिल का सफर !.’….असं झालं असेल! 

मध्ये बरेच दिवस,महिने गेले. राजकुमार त्याच्या ऐटबाज घोड्यावर बसून आपल्याकडे येईल या वाटेकडे चार्लट…चारू डोळे लावून बसली होती. पण राजकुमार फक्त कलेच्या राज्यातील राजकुमार. खिशात दाम नव्हता. मग जवळच्या साऱ्या  चीजवस्तू विकून टाकल्या…बाराशे रुपये आले. साठ रुपयांची एक जुनी वापरलेली सायकल विकत घेतली. ब्रश,रंग,कागद,कॅनव्हासची पिशवी पाठीला अडकवली आणि राजकुमार मोहिमेवर निघाले. रस्त्यात लोकांची चित्रं काढून दिली आणि अन्न,निवारा मिळवला. काही दिवस सलग दोन-तीन दिवस उपवाशी रहावे लागले. विरोध,संशय,मानहानी सहन करावी लागली. दिल्लीतून अमृतसर. तिथून अफगणिस्तान, इराण,तुर्की,बुल्गेरीया,युगोस्लोव्हाकीया,जर्मनी,ऑस्ट्रीया…डेन्मार्क ! किती दूरचा प्रवास…किती कष्ट. नशिबाने त्यावेळी आंतरराष्ट्रीय सीमांवरील नियम काहीसे सोपे असावेत. कारण प्रद्युम्न यांना कुठल्या सीमेवर फार थांबावे लागले नाही. उलट या माणसाच्या सहनशक्तीपुढे,त्याच्या उद्देशामुळे तिथले अधिकारीही स्तंभित झाले. खरी अडचण आली ती डेन्मार्कच्या सीमेवर. पाच महिने आणि बावीस दिवसांनी प्रद्युम्न स्वीडनच्या सीमेवर पोहोचले…..

आपल्या देशातल्या राजघराण्यातली एक सुंदर कन्या भारतातल्या एका गरीब माणसाच्या प्रेमात पडूच कशी शकते,लग्न कशी करू शकते याचं त्यांना नवल वाटणं साहजिकच होतं. आणि हा माणूस चक्क सायकलवर एवढा प्रवास करून येथे पोहोचतो! प्रद्युम्न यांच्याजवळ त्यांच्या विवाहाची काही छायाचित्रे होती. अधिका-यांनी चार्लटशी संपर्क साधला….ती धावत निघाली…तिचा राजकुमार पोहोचला होता. प्रदयुम्न यांनी तिच्या शहरापर्यंतचा प्रवास मग रेल्वेतून केला…..वधू वराला घ्यायला सहकुटुंब आली होती….हे खरं रिसेप्शन ! प्रेम सिद्ध झाल्यावर जगाचा विरोध मावळत जातो. इतर रंगाच्या,वंशाच्या माणसांनी जवळपास राहूही नये अशी समाजव्यवस्था असणाऱ्या त्या ठिकाणच्या उमद्या मनाच्या लोकांनी हा भारतीय जावई मनापासून स्विकारला ! 

भावनेच्या भरात अनेक विवाह होतातही. पण ते प्रदीर्घ काळापर्यंत टिकणे महत्त्वाचे असते. चारूलता आणि प्रद्युम्न यांचा विवाह सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या आसपास पोहोचतो आहे. चारूलतेच्या संसार वेलीवर फुले उमलली आहेत. स्वीडनच्या कला विश्वात प्रद्युम्न यांना मानाचे स्थान मिळाले आहे. ओरिसातील एका विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे. 

चार्लट आणि प्रद्युम्न कुमार महानंदिया (Mahanandia) आपल्या महान इंडियाचं परदेशात,जगात प्रतिनिधित्व करत आहेत,असं म्हणल्यास वावगे ठरणार नाही. 

या हृदयस्पर्शी प्रेमकथेवर चित्रपट निघणार नाही,असे होणार नाही. चित्रपटातून काय,कसे दाखवले जाईल, काय नाही..हे ठाऊक नाही. पण हे वाचून तुमच्याही मनाच्या कॅनव्हासवर एक व्यक्तिचित्र निश्चितच रेखाटले गेले असावे…फक्त या व्यक्तिचित्रात एक नव्हे तर दोन व्यक्ती आहेत…चार्लट-चारूलता आणि प्रद्युम्न ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पायविहीर, दर्यापूर —  लेखक – श्री एकनाथ वाघ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

पायविहीर, दर्यापूर —  लेखक – श्री एकनाथ वाघ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध गडकिल्ले, वास्तू आहेत. त्या पुरातन वास्तूंशी सातवाहनांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांचे नाते आहे. त्यापैकी एक म्हणजे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील महिमापूरची सातमजली पायविहीर आहे. ही विहीर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे.

यादवकालीन आणि बहामणी कालीन असे दोन मतप्रवाह या विहिरीच्या इतिहासाबाबत आहेत. महिमापुर या गावाच्या मधात ही विहीर आहे. या विहिरीचे संपूर्ण बांधकाम मध्य प्रदेशात आढळणाऱ्या तांबूस रंगाच्या दगडांचे आहे. चौकोनी आकाराची ही विहीर ऐंशी फूट खोल आहे. या विहिरीची रुंदी 40 मीटर इतकी आहे. जिल्ह्यात असणाऱ्या विविध पौराणिक आणि ऐतिहासिक स्थळांपैकी दर्यापूर तालुक्यात महिमापुर या गावातील विहीर ही संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. तळघरात जणू किल्ला बांधला असावा असाच थाट या विहिरीचा पाहायला मिळतो. अनेक पर्यटक इतिहास तसेच स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासकांसाठी ही विहीर नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरत आली आहे.

विहिरीचे वैशिष्ट्य: — 

तळघरात सात मजल्यांची असणाऱ्या या विहिरीत उतरण्यासाठी 88 पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरताना आपण एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारातूनच जात आहोत की, काय असा अनुभव येतो. प्रवेशद्वारांवर दगडात कोरलेली दोन फुलंही सर्वांचे लक्ष वेधतात. पायऱ्यांद्वारे विहिरीत खाली उतरताना विश्रांतीसाठी काही टप्पे आहेत. या विहिरीच्या आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूंनी फिरता येईल बसता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विहिरीच्या तळाशी चारही बाजूंनी मोठ्या समान रचना करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातून तांबूस दगड : —- 

तांबूस रंगाच्या दगडासह काही ठिकाणी या विहिरीच्या बांधकामात काळा दगड देखील वापरण्यात आला आहे. तांबूस दगड हा मध्य प्रदेशातून या ठिकाणी आणण्यात आला. ही संपूर्ण विहीर कातीव दगडात बांधलेली असून नैसर्गिक झऱ्यांसाठी विहिरीला जागोजागी छिद्र सोडण्यात आली आहेत. या विहिरीत अनेक कमानी छोट्या खोल्या सुरक्षित कोणाकडे मागच्या आणि वरच्या बाजूस राहता येईल अशी दालने आहेत. या दालनांमध्ये जाण्यासाठी स्वतंत्र पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पातशाहीत सैन्याच्या पडावाचे ठिकाण:— 

मध्ययुगीन कालखंडामध्ये हसन गंगू उर्फ बहामणशहा याने बहामनी राज्याची स्थापना केली होती. हसन गंगूच्या नंतर विस्तारलेल्या बहामणी साम्राज्याची शकले पडली. 1446 ते 1590 या 144 वर्षाच्या कालखंडात बहामणी साम्राज्याच्या पाच शाह्या निर्माण झाल्या. यामध्ये विजापूरची आदिलशाही, गोवळकोंडाची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, अचलपूरची इमादशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच शाह्या निर्माण झाल्या. या पाचही शाह्या एकमेकांशी सतत भांडत असत.

विहीरीचा प्रमुख हेतू:—- 

अचलपूरची निमाजशाही आणि हैदराबादच्या गोवळकोंडाची कुतुबशाही यांच्या मधल्या प्रवासाच्या दोन मार्गांपैकी एक मार्ग हा अमरावती जिल्ह्यातील सावळापूर कोल्हापूर महिमापूर येथून हैदराबादकडे जायचा. दुसरा मार्ग अचलपूर ह्या राजधानी तून पाथर्डी माहूर चंद्रपूर आणि मध्य प्रदेशातील बैतूल पर्यंत जायचा. या मार्गाने सुलतान आणि त्याचे सैन्य जात असताना सैन्याचा पडाव असणाऱ्या ठिकाणी अनेक विहिरी बांधण्यात आल्या त्यापैकी एक विहीर ही महिमापूरची आहे. अशी माहिती इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर संतोष बनसोडे यांनी दिली. सैन्याला सहजपणे पाणी उपलब्ध होणे हा प्रमुख हेतू या विहिरी मागे होता. त्या काळात सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक विहिरीत तैनात असायचे. यामुळेच या विहिरीत झोपण्यासाठी राहण्यासाठी व्यवस्था केली असल्याचे आढळते.

विहीर 900 वर्षे जुनी :—- 

खरंतर महिमापुर येथील विहीर नेमकी यादवकालीन की, बहामणी कालीन असे इतिहास अभ्यासकांचे दोन मतप्रवाह आहेत. काही इतिहासकारांच्या मते महिमा पुर येथील विहीर 800 ते 900 वर्ष जुनी आहे. देवगिरीच्या यादवांच्या काळातील ही विहीर असल्याचे काही संशोधकांचे मत आहे. देवगिरीच्या यादवांच्या राजधानीचे ठिकाण हे दौलताबाद होते. त्यांच्या राज्याची सीमा सातपुडा पर्वतरांगेपासून तापी नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरली होती. यादवांच्या काळात देवगिरी ते अचलपूर पर्यंत बारा विहिरी बांधण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक विहीर ही महिमापुर येथील पायविहीर असल्याचे काही इतिहास अभ्यासकांचे मत आहे.

इतिहासकारांच्या मते महिमा पुर येथील विहीर 800 ते 900 वर्ष जुनी आहे. यादवांच्या काळात देवगिरी ते अचलपूर पर्यंत बारा विहिरी बांधण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक विहीर ही महिमापुर येथील पायविहीर आहे.

विहिरीचे पाणी औषधीयुक्त:—-

या विहिरीचे बांधकाम केल्यामुळे कालांतराने विहिरीच्या परिसरात लोक वस्ती निर्माण झाली. आज जवळपास 100 घर महिमापूर या गावात आहेत. आता उन्हाळ्यात ही विहीर कोरडी पडली असली तरी, सात मजल्यांच्या या विहिरीत पूर्वी पाण्याची पातळी ही दुसऱ्या मजल्यापर्यंत होती. परिसरातील ग्रामस्थ याच विहिरीतून पाणी भरत असत. या विहिरीत बाबर नावाची वनस्पती होती, या वनस्पतीमुळे विहिरीचे पाणी औषधीयुक्त बनले होते. त्यामुळे या विहिरीचे पाणी पिल्याने डायरिया, पोटाचे आजार यासारखे कोणतेही विकार होत नव्हते. मात्र कालांतराने या विहिरीतील पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेल्यामुळे, या विहिरीतील वनस्पती नष्ट झाल्या. या विहिरीचे ऐतिहासिक महत्त्व फार मोठे आहे. आज देखील ही भव्य विहीर आपली ओळख जपून आहे. यामुळेच या विहिरीला भेट देण्यासाठी वर्षभरात देशभरातून अनेक पर्यटक तसेच इतिहास आणि स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी भेट देतात.

लेखक : श्री एकनाथ वाघ

संग्राहक : अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ऐक परमार्थाचे साधन… ☆ विवेचन : श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ऐक परमार्थाचें साधन… ☆ विवेचन : श्री संदीप रामचंद्र सुंकले 

ऐक परमार्थाचें साधन । जेणें होय समाधान । तें तूं जाण गा श्रवण । निश्चयेंसीं ॥

(दास.०७.०८.०१)

सरळ अर्थ :-

श्रीसमर्थ म्हणतात की, आता परमार्थाचे साधन सांगतो, ते ऐका. ज्या साधनाच्या योगे निश्चितपणे समाधान प्रास होते ते साधन म्हणजे श्रवण होय, हे तू जाणून घे.

विवेचन:- 

श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्ये नमः ।। श्री गुरुवे नमः ।।

जन्माला आलेला जीव सर्वप्रथम श्रवण करायला शिकतो, म्हणून भक्तीच्या नऊ प्रकारांमध्ये श्रवण भक्तीस पहिले स्थान प्राप्त झाले असावे. मूल जन्माला आले की त्याच्या कानाशी टिचकी वाजवून त्याला ऐकायला येते कीं नाही याची खात्री पूर्वीच्या काळी सुईणी करीत असत. मनुष्य सर्वप्रथम ऐकायला शिकतो, अर्थात मनुष्य श्रवण प्रथम करतो आणि कालांतराने बोलू लागतो. काही मुलांची जीभ जड असते. काही मुलं मुकी असतात. पण शास्त्र असे सांगते की ज्याला ऐकायला येते तोच बोलू शकतो. त्यामुळे ज्याला ऐकायला येते, तो लगेच बोलू शकला नाही, तरी नंतर बोलू शकतो.

शब्द श्रवण करायचा असतो. विद्वानाला बहुश्रुत म्हणतात; कारण त्याने खूप श्रवण केलेले असते. ग्रंथांचे वाचन हे एक प्रकारचे श्रवणच असते. अर्थात शब्द वाचणे आणि कोणाच्या तोंडून ऐकणे यात फरक राहणारच. ज्याला परमार्थ साधन करावयाचे आहे, त्याने एखादा सर्वमान्य संत-ग्रंथ घ्यावा आणि तो मनापासून, सावकाश, अनेक वेळा वाचावा. अशा प्रकारे ग्रंथांचे वाचन-मनन केल्यास श्रवणभक्ती घडते. श्रवणाने अनेक संशय फिटतात, भाव स्थिरावले जातात आणि भगवंतांचे प्रेम मिळते.

ज्ञानेश्वरी मधील नवव्या अध्यायातील पहिली ओवी

“तरी अवधान एकले दीजें । मग सर्व सुखासि पात्र होईजे । हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ।।  (ज्ञा. 9.1)

श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात, *’अहो श्रोते हो, तुम्ही एकवेळ श्रवणाकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका.

“ज्ञाना’चे ईश्वर म्हणता येईल अशी आपली ज्ञानेश्वर माऊली कळकळीने आपल्याला सांगत आहेत की श्रोते जनहो अवधान देऊन ऐका. अवधान द्या म्हणजे लक्ष देऊन ऐका. एकदा चित्रपट पाहिला की अनेकांची चित्रपटातील गाणी पाठ झालेली आपण पाहिली असतील. परंतु अभ्यासाची कविता असो किंवा मनाचे श्लोक असो. ते पटकन पाठ होत नाहीत किंवा प्रवचन कीर्तन ऐकताना अनेकांवर निद्रादेवी प्रसन्न होत असते. मनुष्य मनापासून, त्यात रस घेऊन, एकाग्रतेने ऐकत नाही, अर्थात अवधान देऊन ऐकत नाही हेच खरे!!

*मनुष्य लक्षपूर्वक ऐकायला शिकला तर त्याच्या जीवनातील ५०% समस्या कमी होतील असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. या श्रवण भक्तीच्या अभ्यासाच्या निमित्ताने आपण आजपासून ‘ऐकायला’ आणि ‘ऐकून घ्यायला’ सुरुवात करू.

जो मनुष्य पूर्ण एकाग्र होऊन संतांच्या ग्रंथाचे श्रवण करतो, त्याच्या मनाचा तळ आणि मनाच्या तळाशी असलेला मळ दोन्हीही अगदी स्वच्छ होऊ शकते. उत्तम श्रोता असलेला मनुष्य कोणताही विषय सहज समजून घेऊ शकतो आणि त्यामुळे त्याची  लौकिक आणि पारलौकिक जीवनात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते.

श्रवण करणे याचा आणखी एक अर्थ आहे कृती करणे. उदा. एखाद्या मनुष्याला दुसऱ्याने पाणी आणून दे असे सांगितले. त्याने ते नीट ऐकले. दोनचार मिनिटे अशीच गेली. दुसऱ्याने त्याला पुन्हा आठवण केली. तरी तो ढीम हलला नाही. शेवटी थोड्या त्राग्याने दुसऱ्याने पुन्हा विचारले की मी बोललो ते ऐकलस ना. तर तो हो म्हणाला. मग पाणी का देत नाहीस ? तेव्हा तो म्हणाला की तेवढंच करायचं राहिलं. लौकिक जीवनांत अथवा पारलौकिक जीवनात अनेक लोकं बरेंच काही ऐकतात, कधीकधी तर अगदी तल्लीन होऊन ऐकतात. परंतु त्यांच्या हातून योग्य ती कृती घडत नाही. अशा प्रकारचे लोकं लौकिक अथवा पारलौकिक जीवनात यशस्वी होणे अवघड आहे. म्हणून ज्याला साधक व्हायचे आहे, त्याने आधी ऐकायला शिकावे. काय ऐकायचे ?  कसे ऐकायचे ? कोणाचं ऐकायचे याचा विचार आपण पुढील लेखांत करू. जाता जाता एक वाक्यावर आपण चिंतन करू. ‘समोरचा मनुष्य जे बोलतो ते ऐकायलाच हवे परंतु तो जे बोलू शकत नाही ते सुद्धा ऐकता यायला हवे.’

जय जय रघुवीर समर्थ!!

विवेचन : श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बालगंधर्वांची अखेर..!! – लेखक : श्री वसंत शा. वैद्य ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ बालगंधर्वांची अखेर..!! – लेखक : श्री वसंत शा. वैद्य ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले 

*१४-१५ वर्षांपूर्वी स्वत: पाहिलेली विलक्षण घटना..!!*

त्या दिवशी नेमका मी पुण्यात होती. दुपारच्या जेवणाची वेळ..!! मी नारायण गेटाजवळच्या माझ्या घरून पान खाण्यासाठी बाहेर आलो होतो. गेटजवळच्या पानाच्या दुकानाकडे वळणार, इतक्यात माझ्या अगदी समोर चार-सहा फुटांच्या अंतरावर एक प्रेतयात्रा येताना दिसली. मी त्वरेने मागे धावलो. रस्त्याच्या कडेला उभे राहून बघू लागलो..!! बघतो तो काय..!! त्या प्रेतयात्रेत मोजकीच माणसे सामील झालेली ..!! चौघांनी प्रेताची ताटी खांद्यावर घेतलेली, एकाने पुढे विस्तव धरलेला, आणि बाकीची शेलकीच माणसे भरधाव वेगात जात असलेली ‌‌..!! ती जवळ-जवळ सर्वच माणसे परिचित चेहर्‍यांची ..!! पुण्याच्या नाट्य-क्षेत्रात प्रत्यही दिसत असलेली. नाट्य-क्षेत्रातील सभा-संमेलनात माझे नेहमी जाणे-येणे असायचे. त्यावेळी तेथे दिसणारी प्रमुख माणसे, त्या प्रेत-यात्रेत दिसली. मी तशा स्थितीतही शेवटून जाणाऱ्या एका परिचितांना हळूच विचारून घेतले..!!*

‘कोण ..??’*

न थांबता त्यांनी कुजबुजत्या स्वरात सांगितले…. “अहो ..गंधर्व ..बालगंधर्व” ..!!*

साक्षात बालगंधर्वाची प्रेतयात्रा ..!! अणि ती देखील इतक्या थोड्या माणसांच्या उपस्थितीत ..??*

*-बालगंधर्व ..* .. *- सौभद्र ..*.. *- स्वयंवर ..*.. *- मृच्छकटिक ..*  *-एकच प्याला ..*..  *”जोहार मायबाप जोहार .. अन्नदाते मायबाप हो ..!!”*…. हे सारे क्षणात डोळ्यांपुढे उभे राहिले. पान खाण्याची इच्छा पार मावळून गेली ..!!*

ओंकारेश्वराच्या समोरील नदीच्या किनाऱ्यावरल्या बंदिस्त आवारात, प्रेत खाली ठेवण्यात आले. कुणीतरी त्वरेने पुढे झाले. लाकडे रचण्यात आली. प्रेत नदीच्या पाण्यात भिजवून आणले. प्रेताचा गोरा-पान चेहरा तशा अचेतन अवस्थेतही देखणा दिसत होत. प्रेत ठेवल्यावर सरणाच्या फटी सगळीकडून बंद करण्यात आल्या. मडके धरून आणणार्‍याने अग्नीचे चार निखारे सरणावर टाकले. दुसर्‍या बाजूने रॉकेल ओतण्यात आले. कुणीतरी काडी ओढून ती सरणावर टाकली. आग भडकली. पाहता पाहता आगीच्या ज्वाळा गगनाला भिडल्या. आतून तडतड असे आवाज येऊ लागले. पाहता पाहता जळून गेलेली धगधगती लाकडे चोहीकडून राखेच्या स्वरूपात खाली गळून पडू लागली. एक भलामोठा आवाज झाला. त्यावर कुणीतरी उदासपणे म्हणाले, ‘संपलं सगळं ..!! चला आता ..’!!

घरी आलो. चार वाजून गेले होते ..!! बालगंधर्वांची प्रेतयात्रा ,अशा घाईगडबडीने आणि पुण्यासारख्या त्यांच्या कर्मभूमीत, कसलाही गाजावाजा न करता, गुपचूपपणे का उरकून घेण्यात आली ..?? त्याचे कारण दुसरेतिसरे काही नसून स्वत: बालगंधर्व नारायणराव राजहंस यांचा लहरीपणा आणि त्यातून उद्भवलेले त्यांचे दुर्दैव हेच आहे ..!!

गोहरबाईसारख्या एका रूपवती नटीशी त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात विवाह केला व तिच्या पायावर तन-मन-धन सर्वस्व वाहून टाकले. तिच्यासाठी नारायणरावांनी मुसलमान धर्म स्वीकारला. मुंबईला माहीम भागातील तिच्या वसतीस्थानात नारायणराव राजी-खुषीने राहायला गेले. गोहरबाईने महाराष्ट्राच्या या लाडक्या गंधर्वाला जवळ केले ..!! त्यावेळी वास्तविक पाहता या गंधर्वाची सारी पिसे गळून गेलेली होती. त्याची गंधर्व नाटक मंडळी कधीच भूतकाळात जमा झाली होती. सारी नट-मंडळी त्याला सोडून आपापल्या वाटेने उडून गेली होती. उरला होता तो एक म्हातारा .. पिसे गळालेला राजहंस ..!!

कुणीही केली नसती अशी सेवा, या गोहरबाई नावाच्या वेश्येने केली ..!! त्याचे लुळेपण तिने भक्तिभावाने जोपासले. कसल्याही सुखाची अपेक्षा न करता ..!! कारण एकच .. त्याच्या गळ्यावरील तिचे भक्ति-युक्त प्रेम ..!! …. *जे प्रेम राधेने कृष्णावर केले ..!!* …. *अहिल्येने प्रभू रामावर केले .‌.!!* ….. तसेच प्रेम गोहरने या सुरेल राजहंसावर केले ..!! त्याला त्याच्या अखेरच्या लुळ्या-पांगळ्या अवस्थेत सांभाळले. मायेची पाखर दिली आणि स्वत: ही मुसलमान साध्वी, अगोदर अहेवपणाचे लेणे कपाळावर मिरवत, दिक्कालापलीकडे निघून गेली. उरला तो आणखीनच विदीर्ण झालेला राजहंस ..!! त्यावेळी त्याच्या रसिक-जनांनी व भगत-गणांनी त्याच्याकडे पाठ फिरवली होती. त्याने गोहरबाईसारख्या एका मुसलमान बाईचा घरोबा स्वीकारला. त्यासंबंधी टीकेची हत्यारे त्याच्यावर परजीत, पुण्याचे सर्व नाटकी सज्जन त्याला विसरून जाण्याच्या तयारीत होते ..!!

*असा हा एकेकाळचा नटसम्राट बालगंधर्व ..!!* …. मुसलमान झालेला ..!; आपल्या पूर्वीच्या साऱ्या प्रेमिकांना अव्हेरून, त्याने आपण होऊन माहीमचा रस्ता धरलेला होता. अर्थांतर तर झालेच होते .. आता धर्मांतरही झाले ..!! त्यानंतर पहिले काही दिवस, अंगात त्राण होते तोपर्यंत, गावो-गांवच्या जुन्या भगत-गणांना बोलावून त्यांच्याकडून सत्कार करवून घ्यायचे, थैल्या घ्यायच्या. एका हाताने घ्यायच्या व दुसऱ्या हाताने देणेकऱ्याच्या स्वाधीन करायच्या असलेही उद्योग या राजहंसाने केले ..!!

एक प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. प्रसंग सोलापूरचा ..!! ह्याच सोलापूरने पूर्वी बालगंधर्वांना भरभरून लोकप्रियता दिली ..!! पैशांच्या राशी त्यांच्या पावलावर ओतल्या. ‘मेकॉनकी थिएटर’ म्हणजे बालगंधर्वांचे जणू माहेरच ..!! ‘तिथं नाटक करताना जणू इंद्रपुरीत नाटक करतो, असे वाटते’ असं बालगंधर्व नेहमीच म्हणायचे. पण आयुष्याच्या शेवटच्या प्रहरी, जुन्या गिरणीच्या पाठीमागे बांधलेल्या तमाशाच्या थिएटरात या राजहंसाला कबुतराच्या खुराड्यात राहिल्याप्रमाणे रहावे लागले ..!! नाटके लावता येत नव्हती ..!! पण सोलापूरचे वेडे भक्त रुंजी घालायला तयारच होते. एका भोळ्या-भाबड्या बाईने पुढाकार घेऊन गंधर्वांना थैली देण्याचा घाट घातला. तिच्या एकटीच्या पाय-पिटीने हजार अकराशेची रास जमा झाली. त्याच तमाशाच्या थिएटरात थैली अर्पण करण्याचा समारंभ झाला. राजहंसाला दोन माणसांनी उचलून रंगमंचावरील खुर्चीत आणून बसवले. भाषणे झाली. उजवीकडच्या विंगेत एक परिचित चेहऱ्याचा व्यापारी आशाळभूत मुद्रेने चुळबूळ करीत उभा दिसला. थैली अर्पण करण्यात आली… तो चुळबुळ्या व्यापारी चक्क रंगमंचावर येऊन थैली घेऊन गेला ..!!*

 गंधर्वाचे भाषण सुरू झाले …. “अन्नदाते ..!! मायबाप हो ..!! तुम्हीच मला मोठे केलेत. तुम्हीच आता मला जगवा ..!! तुमच्या उष्ट्याचा मी महार” ..!!*

असे अनेक थैली-समारंभ सोलापूरपासून जळगाव भुसावळपर्यंत ..!! चौकोनी कोडी असतात त्याप्रमाणे, उभी, आडवी, तिरपी कशीही बेरीज केली तरी, उत्तर येईल शून्य ..!! गंधर्वांना मिळालेल्या अनेक थैल्यांची बेरीज होती शून्य ..!! जमेला होते ते एक गोहरबाईचे नितांत प्रेम. तिने आपल्या ‘गळ्याचा’ व्यवसाय सोडून पतीची वार्धक्यातली सेवा करण्याचा पतिव्रताधर्म स्वीकारला ..!! परंतु बिचारीचे नशीबच खोटे ..!! ती तरी त्याला काय करणार ..?? बाल-गंधर्वांभोवती, त्यांच्या चलतीच्या काळात रुंजी घालणारे कपोत-पक्षी त्याच्याजवळून उडून गेले, आणि साऱ्या महाराष्ट्रात, ‘गोहरबाईने गंधर्वाचा सत्यानाश’ केला अशी हाकाटी करीत राहिले ..!! वास्तविक पाहता, सत्यानाश तिने करून घेतला होता तो स्वत:च्या कला-जीवनाचा मृच्छ-कटिकातल्या वसंतसेनेची तिने केलेली एक भूमिका मी पाहिली होती. ‘माडीवरी चल ग सये’ हे गाणे ती अशा ढंगात म्हणायची की त्याचे वर्णन करणे मुष्किल आहे ..!!

ज्या काळात मराठी रंगभूमीवर अद्यापही पुरुष नट स्त्री-भूमिका करायचे व त्यांचे ‘कसेही’ दिसणे प्रेक्षक गोड करून घ्यायचे त्या काळात, मराठी रंगभूमीवर गोहर नावाच्या गोड गळ्याच्या व भावपूर्ण डोळ्यांच्या एका जातिवंत नटीने गान-नृत्यही करून, एक आगळा साक्षात्कार घडविला होता ..!! तो काळ दृष्टीसमोर आणा, म्हणजे माझ्या म्हणण्याची सत्यता पटेल. त्या काळात ज्योत्स्ना भोळे अद्याप चमकायच्या होत्या. हिराबाई बडोदेकर एखाद्या नाटकात काम करायच्या. परंतु हिराबाई म्हणजे केवळ श्रुति-माधुर्य. त्यांचे गाणे ऐकावे ते डोळे मिटून ..!! हिराबाईंच्या गान-माधुर्याबद्दल आणि त्यांच्या सालस स्वभावाबद्दल संपूर्णपणे आदर बाळगून मला असे बिनदिक्कत म्हणावेसे वाटते की हिराबाई या गायिका आहेत, नटी नाहीत ..!! मराठी रंगभूमीवरील पहिली अभिनय-कुशल आणि नृत्य-गान-कुशल अशी स्त्री म्हणजे गोहरच होय.  जाति-धर्माच्या अभिमानापलीकडे न जाणाऱ्या आपल्या मध्यमवर्गीय नाट्य-समीक्षकांनी, आजपर्यंत गोहरला न्याय दिलाच नाही असे खेदाने म्हणावे लागते ..!! नारायणराव राजहंसानी तिच्यातले नाट्यगुण जाणले होते आणि त्यामुळेच ते तिच्याशी एकरूप झाले ..!!

दोन जातिवंत कलावंतांचे हे त्यांच्या जीवनाच्या उत्तर काळातले मीलन, गंधर्वांच्या हिंदू चाहत्यांना रुचणारे नव्हते. पृथ्वीच्या पोटातून निघणारे सुवर्ण किंवा लोह हे केवळ आपल्याच उपभोगासाठी आहे असे मानून, त्याचे कोड-कौतुक करणार्‍या मानवजाती प्रमाणेच गंधर्व हे फक्त आमचेच आहेत, आमच्यासाठीच आहेत, असा भ्रामक समज त्यांच्या अवती-भोवती वावरणाऱ्या हिंदू रसिकांनी करून घेतला होता. पृथ्वीच्या गर्भात लोह-भस्म आणि सुवर्ण-भस्म जे दडलेले असते, त्यामुळे जमिनीचा कस वाढत असतो व पृथ्वीच्या अंतर्भागात होणारे प्रचंड उत्पात त्यामुळे टळत असतात ..!!

सोने किंवा लोखंड हे माणसांसाठी निर्माण करून दिलेले पदार्थ नाहीत. माणसाने आपली बुद्धी वापरून ते स्वत:च्या वैभवासाठी व उन्नतीसाठी वापरले ही गोष्ट वेगळी ..!! त्याचप्रमाणे नारायणराव बालगंधर्व यांचे दैवी गायन हे काही फक्त चार हिंदू रसिकांपुरतेच नव्हते. त्यांच्या आवाजात जी आर्तता होती ती साऱ्या मानव-जातीकरता होती. परधर्मातील गोहर उगीच नाही त्या आर्ततेवर भुलून स्वत:चे सर्वस्व त्या राजहंसाच्या पायावर वाहायला तयार झाली ..!! तिचे व बालगंधर्वांचे मीलन, हिंदू रसिकांना न रुचल्याने, त्यांच्यावर जी हीन पातळीवरील टीका व निंदा-नालस्ती झाली त्यामुळे, ती गोहर नावाची ‘अस्मानी परी’ मनोमन कष्टी असे ..!! ती कुरूप होती, हिडीस होती, चेटकीण होती असे नाना प्रकारचे आरोप तिच्यावर गंधर्वांचे संगतीत काही काळ राहिल्याचे भूषण मिरविणारे, अद्याप करीत असतात. गंधर्वांच्या नाट्यकंपनीत पोट फुटेपर्यंत खाल्लेली पंच-पक्वान्ने अद्यापही या तथाकथित गंधर्व-भक्तांच्या अंगावर उठून बाहेर येत आहेत. गंधर्व कंपनीत म्हणे, ‘काळी साळ’ नावाचा सुवासिक तांदूळ आणि शुभ्र लोणकढे तूप खायला मिळायचे ..!! ती काळी साळ आणि तुपाची लोणकढी आता चेहऱ्यावर येऊन बसली आहे व रात्री-अपरात्री अश्‍वत्थाम्यासारखी भ्रमंती करायला लावीत आहे ..!! गोहरला ‘चेटकीण’ म्हणणारे हे महाभाग, कदाचित गोहरच्या तारुण्यात तिचा उपभोग घ्यायलाही गेले असतील आणि नकार घेऊन परत आले असतील, कुणी सांगावे ..?? कारण, बालगंधर्वांची नि तिची प्रेमभेट होण्यापूर्वी ती तर विजापूरची कलावंतीणच होती ना ..!!

ते काहीही असो .. मला मात्र राहून राहून एका गोष्टीची रुखरुख वाटते ती म्हणजे, गोहरच्या आणि गंधर्वांच्या शरीर-संबंधातून एखादा अंकुर निर्माण झाला असता, तर तो गायनाची पताका दिगंत घेऊन जाणारा झाला असता ..!! दोन अस्सल कलावंतांच्या मीलनातून परमेश्वराने का नाही तिसरा जीव निर्माण केला ..??*

ह्या रुखरुखीबरोबर पुण्याच्या जहांगीर नर्सिंग होममध्ये अखेरचे क्षण मोजीत पडलेला गंधर्वांचा म्लान चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत आहे ..!! ….  *’गंधर्व अत्यवस्थ’ ..!!* .. अशी सिंगल कॉलममधील ती बातमी ‘सकाळ’च्या कोपऱ्यात आली होती ..!! ती वाचून, मी आणि माझा एक मित्र वसंत जोशी दुपारचे जहांगीर नर्सिंग होममध्ये गेलो होतो. एका खोलीत स्वच्छ पांढऱ्या चादरीवर अर्ध्या चड्डीतला गंधर्वांचा गोरापान कमनीय देह पडला होता. जवळपास कुणीही नव्हते. फक्त एक बगळ्याच्या रंगाच्या पोषाखातली परिचारिका डोळ्यांतली कबुतरे उडवीत उभी होती. त्या क्षणी माझ्या मनात आलेली कल्पना अद्याप मी विसरू शकत नाही. परी गेली नि परिचारिका उरली. ही ती कल्पना ..!!

आणि प्रारंभी वर्णन केलेली ती सहा माणसांची भेसूर स्मशानयात्रा आठवली की, आजही अंगावर शहारे येतात ..!!

*आयुष्यभर ज्याने कला, नाट्य वैभव, मित्रपरिवार ह्या शिवाय दुसरे काही नाही केले, त्याच्या अंत्ययात्रेला एखादाही श्रीमंत उल्लू रसिक उपस्थित नव्हता ..!! गंधर्वांशी आज मैत्री सांगणारा एखादाही मित्र नव्हता ..!!* होते ते एका हौशी नाट्य-संस्थेचे पदाधिकारी आणि माझ्यासारखा एक कलंदर ..!!

एखाद्या कलाकाराची अंत्ययात्रा अशीच असायची, असा विधिलिखित संकेतच असतो की काय, कुणास ठाऊक ..!! मानवजातीला तृप्त करणाऱ्याला मात्र अखेरीस  ‘प्यासा’ रहावे लागते ..!!  एक शापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा, ह्यांचे हाल आणि दैना आम्ही पाहिली ..!!

गंधर्वांचे भाग्य थोर ..!! त्यांच्यावर आता पुस्तके लिहिली जात आहेत ..!! 

…. *पण अप्सरेचा मानवी अवतार, तिच्या अखेरच्या श्‍वासाबरोबरच संपला ..!!*

लेखक :  श्री वसंत शा. वैद्य. 

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कांचनगंगा… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ कांचनगंगा… ☆ श्री सुनील शिरवाडकर

हिमाचल प्रदेशातल्या  बलजीत कौरने आज एक मोठा पराक्रम केला.एकाच मोसमात तिने चार शिखरांवर चढाई केली. ती सर्व शिखरे आठ हजारांवर उंचीवरची होती.यात एव्हरेस्ट आणि कांचन गंगा या शिखरांचाही समावेश आहे.

यावरून आठवली ती कांचन गंगा ची पहिली मोहीम.१९८७-८८ घ्या आसपास ही मोहीम आखली गेली.यापुर्वी असा प्रयत्न झाला होता..पण केवळ सरकारी किंवा लष्करी पातळीवर.

आठ हजारांवर उंचीवर असलेल्या शिखरावर चढाई करण्याची ही मोहीम नागरी होती‌.या मोहीमेच्या तयारीसाठीच दोन वर्षे लागली.

यासाठी खर्च होता साधारण पंचवीस लाख रुपये.आणि एवढी रक्कम गोळा करणं सोपं नव्हतं.या खर्चाची जुळवणी करण्यासाठी मग या टीमने समाजातील मान्यवरांना पत्रे पाठवली.त्यात एक पत्र पाठवले होते जेआरडी टाटांना.

जेआरडींनी त्यांना भेटायला बोलावले. मोहीमेचा नेता वसंत लिमये आणि दिलीप लागु भेटायला गेले.जेआरडी टाटा त्यांच्या हनीमून साठी दार्जिलिंगला गेले होते.. तेव्हा तिथून त्यांना कांचनगंगाचे शिखर दिसले होते.त्यावेळी त्यांना काय वाटलं यांचं त्यांनी रसभरीत वर्णन केलं.तासभर गप्पा झाल्यावर त्याचं फलित काय..तर मोहिमेला अर्धा खर्च टाटा समूहाच्या कंपन्यांकडून उचलला गेला.

या मोहिमेत चोवीस जण असणार होते.त्या सर्वांना सर्वोत्तम दर्जाचे गिर्यारोहण साहित्य लागणार होते..जे भारतात कुठेही उपलब्ध नव्हते.परदेशातुन मागवण्यासाठी आयात परवाना गरजेचा होता.

मग केंद्र सरकारशी संपर्क साधुन स्पेशल लायसन मिळवले, आणि दहा लाख रुपयांचं साहित्य मागवलं गेलं.

मोहीमेचा कालावधी होता साडेतीन महीन्यांचा.यामध्ये ‘8 man day’ असे शिध्याचे खोके बनवले गेले.म्हणजे..आठ माणसांना एका दिवसासाठी लागु शकणार्या शिधासामुग्रीचा एक खोका.त्यामुळे प्रत्यक्ष मोहीमेच्या काळात वाहतूक करणं खुप सोयीचं गेलं.या सामानाची बांधाबांध करण्यासाठीच दोन महिने लागले.

मोहीमेच्या आधी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्व गिर्यारोहकांना आमंत्रित केले…आणि कांचनगंगा वर रोवण्यासाठी तिरंगा प्रदान केला.

मोहीम सुरु झाली.एक महीन्याच्या प्रयत्नानंतर सर्व जण बेसकॅंपवर पोहोचले.मजल दरमजल करत अजुन उंचीवर जाऊन लागले.उणे तापमान.. प्रचंड थंडी..हिमवादळे..यांना तोंड देत सर्वांची आगेकूच सुरू होती.

पण त्यांना यश मिळाले नाही.कांचनगंगा पासुन अवघ्या पाचशे फुटांपर्यंत उदय कोलवणकर पोहोचला होता.. पण हिमबाधेमुळे त्याला पुढचा प्रयत्न सोडावा लागला.चारुहास जोशी पण जवळपास पोहोचला होता..पण त्यालाही हिमदंशामुळे माघार घ्यावी लागली.

लौकिकार्थाने ही मोहीम जरी यशस्वी झाली नाही..तरी त्यातुन खुप गोष्टी साध्य झाल्या.याच अनुभवाच्या जोरावर नंतर १९९८  साली ह्रषिकेश जाधव आणि सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्ट वर पाऊल ठेवले‌.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १० — विभूतियोगः — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १० — विभूतियोगः — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीभगवानुवाच 

भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः । 

यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १ ॥

कथित श्री भगवान

महावीरा कौन्तेया ऐक तुला  परम वचन सांगतो

तुझ्या हितास्तव प्रभावी ऐसे रहस्य तुला कथितो ॥१॥

*

न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः । 

अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥ २ ॥

*

उत्पत्ती माझी न जाणती महर्षि ना देव

त्या सकलांचे आदीकारण मीच महादेव ॥२॥

*

यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम्‌ । 

असम्मूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ३ ॥

*

अजन्मा अनादी लोकेश्वर ऐसे माझे सत्यस्वरूप

ज्ञान जयाला झाले तो ज्ञानी होई मुक्तपाप ॥३॥

*

बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः । 

सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ ४ ॥ 

*

अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः । 

भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ ५ ॥

*

गुणवैविध्य भूतांचे बुद्धी ज्ञान मूढता

मनेंद्रियनिग्रह क्षमाशीलता तथा सत्यता

अहिंसा भयाभय सुखदःख दानवीरता

उत्पत्ती-प्रलय विद्या साधना कीर्ति-दुष्कीर्ति मुदिता

तप ज्ञान आदी सारे भूतांठायी वसयी पृथग्भाव

सकलांचा या माझ्यापासुनच होतसे उद्भव ॥४,५॥

*

महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा । 

मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ ६ ॥

*

संसारातील समस्त मनुज जनता उद्भवली ज्यांच्या बीजाने

चतुर्सनकादिक सप्तर्षि चतुर्दश मनू उद्भवले मम संकल्पाने ॥६॥

*

एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः । 

सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ ७ ॥

*

जाणी जो तत्वतः मम विभूतीला योगशक्तीला 

खचित पावे तो स्थैर्य होऊन युक्त भक्तियोगाला ॥७॥

*

अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते । 

इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥ ८ ॥

*

जाणुनी मजला कारण जगदोत्पत्तीचे क्रियेचे

श्रद्धेने  भक्तीने पूजन करती माझे परमेशाचे ॥८॥

*

मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम्‌ । 

कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥ ९ ॥

*

माझीया ठायी चित्त तसेच लाविती प्राण

चर्चा बोध करित सदैव माझ्यातच रममाण ॥९॥

*

तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्‌ । 

ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १० ॥

*

प्रेमाने भजती मजला मग्न होउनी ध्यानी

बुद्धियोग मी तयांसि देतो सार्थ मम मीलनी ॥१०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print