☆ विश्वेश्वरैयायांचेवंशज… — लेखक : अज्ञात ☆ श्री सुनील देशपांडे ☆
भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
अभियंता दिनाच्या निमित्ताने आपण भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचं स्मरण करतो.
या निमित्ताने आजवर अनुभवलेल्या.. विश्वेश्वरैया यांच्या काही खास अशा वंशजांची ओळख करून देत आहे.
(१)२०१६ साली कोल्हापुरात डॉ डी. वाय. पाटील यांना भेटायला एक VIP व्यक्ती हेलिकॉप्टरने आली होती. भेट झाल्यावर निघतांना हेलिकॉप्टर काही सुरु होईना. पायलट हेलिकॉप्टर कंपनीच्या टेक्निकल टीमशी बोलले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या VIP नां तत्काळ पुढे निघायचं होतं, त्यात कंपनीच्या टेक्निकल टीमला दुरुस्तीसाठी जागेवर यायला ३ दिवसांचा वेळ लागेल असं कळवलं.
परिसरात दुसरं हेलिकॉप्टरसुद्धा उपलब्ध नव्हतं. मग डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव श्री संजय पाटील यानी कोल्हापुरातील एका कार मिस्त्रीला तिथं बोलावलं. या मिस्त्रीने आयुष्यात कधी हेलिकॉप्टरला हातही लावला नव्हता. पण त्या अवलियाने अर्ध्या तासात हेलिकॉप्टरमध्ये झालेला बिघाड दुरुस्त केला. पायलटने खात्री केल्यावर आलेली VIP मंडळी सुखरूपपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचली. गंमत म्हणजे बेकायदा हेलिकॉप्टर दुरुस्ती केली म्हणून नागरी उड्डान मंत्रालयाने या मिस्त्रीची चौकशी लावली होती.
याच मिस्त्रीने २००६ साली भंगारात गेलेल्या एका कारमध्ये बदल करून ती कोल्हापुरात रंकाळ्याच्या पाण्यावर चालवून दाखविली होती… फिरोजमोमीनहातोअवलिया.
(२) विजार-शर्टातला ITI शिकलेला इचलकरंजीमधला एक तरुण ५० वर्षापूर्वी ४ सीटर इलेक्ट्रिक कार तयार करून शहरातून चालवत होता. सर्वजण कुतूहलाने पहात असतांना.. ” ही कार खंडाळ्याचा घाट चढणार का ?” असा टोमणा त्यातील एकाने मारला.. त्या तरूणाने कार चार्ज केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती कार मुंबईत मंत्रालयासमोर उभी केली.
पुढे त्यांनी किमान जवळपास ५० नवे शोध लावले, प्रत्येकाची एक इंडस्ट्री उभी केली, त्यातील काही कंपन्या जागतिक पातळीवर सुद्धा गेल्या.
१९७६ साली एका प्रख्यात जापनीज कंपनीला आपल्या एका प्रोडक्टच्या निर्मितीसाठी २० सेकंद लागणारं Cycle Time याने इचलकरंजीमध्ये १२ सेकंदात बसवून दाखवलं.
(३) युरोपमध्ये फिरता रंगमंच पाहून “तो मी नव्हेच” या नाटकासाठी तो महाराष्ट्रात बनवायचं स्वप्न घेवून नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर आले होते. बऱ्याच अभियंत्यांना, रचनाकारांना आणि कंपन्यांना भेटून सुद्धा त्यांना हवं तसं डिझाईन मिळत नव्हतं. कोल्हापुरात एकदा प्रयोग संपल्यावर त्यांच्या एका मित्राने पणशीकरांना एका लोहाराच्या पालावर नेलं.. पणशीकरांनी अगदी अनिच्छेने आपली संकल्पना त्याला समजावून सांगितली. त्या लोहाराने दुसऱ्या दिवशी कुंभाराच्या फिरत्या चाकावर पुली आणि लिव्हर गिअर वापरून फिरता बहुमजली रंगमंचाचा मॉडेल चालवून दाखविला, जो पुढे पणशीकर आणि इतर सर्वच नाटककारांनी आपल्या वापरता आणला.
किर्लोस्करांनी डिझेलवर चालणारा जनरेटर मार्केटमध्ये आणला तेव्हा या लोहाराने कोळश्यावर चालणारा जनरेटर बनवला, जो डिझेल जनरेटरच्या दुप्पट कार्यक्षमतेने चालणारा आणि फक्त ३० % किमतीत बनवला होता.
(४)उद्योगाची आणि अभियांत्रिकी शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेला, पाथरवट (वडार समाजातील एक उपजात) समाजातील एक तरुण दगड फोडता-फोडता, धरणाच्या कालवा खुदाईची कंत्राटे घेऊ लागला. पुढे बंधारे, धरण, रस्ते, पाईपलाईनची कामे घेत, वस्त्रोद्योग, ऊर्जा, महामार्ग, बांधकाम यासारख्या क्षेत्रात त्याने आपला उद्योगविस्तार १००० कोटींच्याही पुढे नेला.
(५) सांगली जिल्ह्याच्या पेड गावातील चांभार कुटुंबातील एक युवक, मुंबईतील माझगाव डॉकवर वेल्डरचं काम करणाऱ्या आपल्या मोठ्या भावासोबत शिकाऊ उमेदवार म्हणून रुजू झाला. तिथे काम करता-करता इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. देश-विदेशात काम करून व्यावसायिक अनुभव मिळवला. पुढे स्वतःची कंपनी सुरु केली (त्या कंपनीच्या नावात आपल्या सर्व भावांच्या नावाचा समावेश आहे) जिथे ४५०० लोक काम करतात आणि आजचा टर्नओवर ५०० करोड आहे.
२०१४ ला आपल्या भावाला मिरजेचा आमदार बनवला. बालपणी जाती-व्यवस्थेचे चटके खात ज्या गाव-विहिरीच्या पाण्याला स्पर्श करायला मनाई होती त्याच गावात त्यांनी सार्वजनिक विहीर खोदून दिली.
हेआहेतमुंबईतील DAS Offshore चेश्रीअशोकखाडे….
आणि DAS चाफुल्लफॉर्मआहे – दत्ता, अशोक, सुरेश.
(६) टाटा मोटर्स मध्ये काम करणाऱ्या एका इंजिनीअरने टाटा एस्टीम या गाडीच्या निर्मिती प्रक्रीयेमध्ये आपलं कौशल्य वापरून कंपनीचे २. ५ करोड रुपये वाचविले. त्याच्या बक्षीसापोटी मिळणारं प्रमोशन नाकारून आपल्या गावाकडच्या अल्पशिक्षित तरुण मित्रांना कंपनीत नोकरी देण्यासाठी विनंती केली.
टाटा मोटर्सने ती आनंदाने मान्य केली आणि अल्पावधीत याद्वारे ३०० तरुणांना रोजगार मिळाला. यातूनच २००१ साली सेवा क्षेत्रातील एका नव्या व्यवसायाचा उदय झाला ज्याची मजल आज ७५, ००० लोकांच्या रोजगारापर्यंत येऊन पोचली आहे. पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, संसद भवन, सुप्रीमे कोर्ट, १०० एक महत्वाच्या खाजगी कंपन्या, १५ महत्वाची विमानतळे, ५० महत्वाची मंदिरे आणि अजून बरंच काही…..
२२ राज्यातील ७० शहरात कार्यालये उघडली. सोबत शेती, Life Science, महाराष्ट्र आणि जम्मू मधील १०८ Emergency Medical Service, मेगा फूड पार्क, न्यूक्लिअर सायन्सचे Peace Applications, शहरी कचरा व्यवस्थापन या आणि अशा अजून बऱ्याच क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवली.
आपल्या वयाच्या १९ व्या वर्षी या युवकाने आपल्या देशाच्या विकासाच स्वप्नं पाहून त्याच नावाने कंपनी स्थापन केली होती. आज याची वार्षिक उलाढाल २००० कोटींच्या पुढे आहे.
महाराष्ट्राच्या आजवरच्या प्रगतीत गेल्या ६० वर्षात महत्वाच योगदान दिलेल्या (हयात असलेल्या) ६० व्यक्तींमध्ये यांचं नाव अग्रक्रमावर येतं.
आपल्या व्यवसायामुळे १० कोटी लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले पाहिजेत, १० लाख लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि आपली कंपनी १०० देशात कार्यरत असली पाहिजे या दिव्य स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र झटणारे, मानवता जपणारे आणि जगणारे, अत्यंत संवेदनशील आणि सदैव हसतमुख असणारे, मूळचेरहिमतपूरचेआणि VIT कॉलेजचे Electronics इंजिनिअरअसणारे BVG म्हणजेचभारतविकासग्रुपचेसंस्थापकश्रीहणमंतरावगायकवाड —-
— या सगळ्यांनी आम्हांला प्रेरणा दिली, आमचं जीवन सुखकर केलं आणि देशाच्या निर्मितीत भरीव योगदान दिलं.
सीतामातेला सोडविण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी वानरसेनेच्या साहाय्याने लंकेपर्यंत पोहोचणारा सेतू बांधला म्हणून त्या सेतूला रामसेतू म्हणतात. आधुनिक काळातील एका सीतेनेही असाच एक सेतू उभारला…. त्याला “ सीता सेतू “ म्हणूयात का?
दोन तीन दिवसांपूर्वीची गोष्ट. केरळ राज्यातील वायनाड नावाच्या डोंगराळ भागातील काही गावे त्यांच्या पाठीशी असलेल्या डोंगरांनी आपल्या पोटात घेतली आणि नकाशातून ही सारी गावेच नाहीशी झाली… शेकडो लोक मातीच्या खाली गाडले गेले कायमचे. पावसाचे प्रचंड थैमान सुरु होते. सकाळी ही बातमी इतरांना समजली. सुरालमाला गावाजवळच्या मुन्दाकाई खेड्याच्या आसपासची चार गावे नाहीशी झालेली होती. आणि मुख्य म्हणजे या गावांशी संपर्क करणयासाठी असलेला नदीवरील जुना पूल नष्ट झाला होता. या गावांतील बचावलेल्या नागरीकांना मदत पोहोचवण्यासाठी काहीतरी तातडीने करणे गरजेचे होते. या गावांच्या जवळ पोहोचण्यासाठी पुलाची उभारणी करायला पाहिजे होती. ज्या दिवशी ही दुर्घटना घडली आणि लष्कराला माहिती मिळाली त्याच दिवशी बंगळूरू येथील मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपने आपले सत्तर जवान आणि पुलासाठी अत्यावश्यक सारे साहित्य सुमारे २० गाड्यांमध्ये भरून रवाना केले.
या तुकडीचे नेतृत्व दिले गेले होते या तुकडीतील एकमेव महिला अधिकारी मेजरसीताअशोकरावशेळके या शूर महिलेकडे. या सीता ‘माई ‘ह्या अहमदनगर जिल्ह्यातील केवळ ६०० लोकसंख्या असलेल्या गाडीलगाव या गावात अशोक भिकाजी शेळके या वकिलाच्या पोटी जन्मलेल्या चार अपत्यांपैकी एक. लोणी येथील प्रवरा इंजीनियारींग कॉलेजमधून त्यांनी (मेकॅनिकल)अभियांत्रिकी मधील पदवी प्राप्त केली. त्यांना अंगावर अभिमानाची, अधिकाराची आणि सन्मानाची वर्दी घालायची होती. म्हणून आधी त्यांनी आय. पी. एस. होण्यासाठी प्रयत्न केले. त्याच जोडीला भारतीय लष्करात दाखल होण्याचे प्रयत्न सुरूच होते. तिस-या प्रयत्नात त्या एस. एस. बी. परीक्षेत यशस्वी झाल्या आणि थेट गेल्या त्या चेन्नई मध्ये. ना प्रदेश ओळखीचा ना भाषा. परंतु सीतामाई डगमगल्या नाहीत. त्यांनी अत्यंत नेटाने कठीण लष्करी अभ्यासक्रम पूर्ण केला. व मद्रास इंजीनियरिंग ग्रुप मध्ये अधिकारी झाल्या. २०१२ पासून त्या सेवेत असून मेजर पदावर पोहोचल्या आहेत.
मेजर सीता शेळके यांनी आपल्या जवानांसोबत सतत ३६ तास पावसात, चिखलात उभे राहून काम केले. आपले सारे शिक्षण, ज्ञान, लष्करी प्रशिक्षण पणाला लावले. जवानांना त्या थंबी म्हणजे भाऊ म्हणतात! त्या सर्व भावांना प्रोत्साहित करत केवळ १६ तासांमध्ये हा १९० फूट लांबीचा लोखंडी पूल बांधून घेतला. या कामाच्या वेळी प्रचंड पाउस सुरू होता. पुराचे पाणी वाढत होते. मेजर जनरल व्ही. टी. थॉमस हे प्रमुख अधिकारी होते. मेजर अनिश मोहन कष्ट घेत होते. प्रमुख सर्वत्र चिखल, पुराचे वाढते पाणी, बघ्यांची गर्दी आणि पूल लवकरात लवकर बांधण्याचा ताण. सत्तर पैकी एकाही जवानाने तीन मिनिटांपेक्षा जास्त विश्रांती घेतली नाही, की आपले भिजलेले, चिखलाने माखलेले कपडे बदलण्यात वेळ घालवला नाही. जेवण, झोप हे त्यांच्या शब्दकोशातून त्यादिवशी गायब झाले होते…. निसर्गाशी त्यांची लढाई सुरू होती… Indian army never gives up! … १९० फूट लांबीचा, पुरेशा रुंदीचा, अवजड वाहनांचे वजन पेलू शकणारा मजबूत सेतू तयार झाला होता… मदतकार्य जोमाने सुरू होऊ शकले !
☆ गणपतीच्या आराशीत नाट्यसृष्टीचं मिनिएचर – लेखक – श्री महेश कराडकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
परवा मी आणि आशा शिवाजी मंडईत भाजी आणायला गेलो होतो. तो गणपती उत्सवाचा सहावा दिवस होता. तिथं शिरीष रेळेकर नेहमीप्रमाणे हमखास भेटायचाच. अतिशय शिस्तबद्धपणे आपली ट्रॅव्हल एजन्सी चालवणारा शिरीष आज लवकर शटर ओढून लगबगीने कुठं चाललाय म्हणून मी त्याला टोकलं. तर म्हणाला, संजय पाटलांच्या घरी गणपतीचा देखावा बघायला चाललोय, आम्ही सगळे मित्र. !फेसबुक वर त्यांनी टाकलंय ते बघा…
संजय पाटील म्हणजे कसदार लिहिणारा, उत्तम अभिवाचन करणारा, नाटक चळवळीत अतिशय गांभीर्यानं आणि जबाबदारीनं वावरणारा, आकाशवाणीतून स्वेच्छा निवृत्त होऊन आपल्याला हवंय तसं कलंदर जगणारा आमचा मनस्वी दोस्त! गेली तीन-चार वर्ष तो आणि त्याचा मुलगा सारंग आपल्या घरातल्या गणपतीची आरास खूप वेगळ्या पद्धतीने सजवतात. गेल्या वर्षी त्याने सांगली संस्थानच्या गणपती पंचायतन मंदिराची प्रतिकृती केली होती. त्याच्या आधीच्या वर्षी विठ्ठल आणि तुकाराम हा विषय घेऊन आरास मांडलेली. त्याही आधी कॅमेरा ही संकल्पना घेऊन घरातलं गणपती डेकोरेशन केलेलं. यावेळी नक्कीच काहीतरी खास असणार म्हणून तिथूनच त्याला फोन लावला. म्हटलं, ‘संजयराव सगळा गाव संस्थानच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक बघायला… नाहीतर सार्वजनिक मंडळांचे देखावे बघायला झुंडीने जातो हे माहित होतं. पण ही सगळी गर्दी तुझ्या घराकडे का चालली आहे, बाबा!… तुझी परवानगी असली तर आम्ही पण येतो रात्री.’
रात्री चिन्मय पार्कमधल्या त्याच्या घरातल्या हॉलमध्ये दहा बाय सहाच्या अडीच फूट उंचीच्या त्या स्टेजवर अवघी नाट्यपंढरी साकारलेली पाहिली आणि थक्क झालो. तिथं महाराष्ट्राच्या नाट्य इतिहासातले गाजलेले नऊ रंगमंच दोन टप्प्यात बसवले होते. त्यातील प्रत्येक रंगभूमीवर विष्णुदास भावे यांच्या पहिल्या नाटकाच्या खेळातल्या नांदी पासून मराठी नाटक परंपरेच्या समृद्ध प्रवासात मैलाचा दगड ठरलेल्या नऊ नाटकातले नऊ प्रसंग, त्यातल्या हुबेहूब नेपथ्यासह आणि पात्रांसह मांडलेले होते… आणि हे सगळं प्रत्येकाला नीट समजावं, म्हणून बारा मिनिटांचा एक शो प्रदर्शित होत होता.
सुरुवातीला खोलीत अंधार व्हायचा. आणि फक्त मधला गणपतीची शाडूची मूर्ती असलेला रंगमंच उजळायचा. दीड बाय दोन फुटांच्या त्या बॉक्स मधल्या रंगमंचावर शाडूच्या मूर्तीसमोर संगीत नाटकातली असंख्य पात्रं एकत्रितपणे नांदी म्हणत असलेला प्रसंग डोळ्यासमोर आला. नांदीतील त्या गणेश स्तवनाने क्षणात मन शे-दीडशे वर्षांची संगीत नाटकांची सफर करून आलं. संजय पाटलांच्या निवेदनातून एकेक गुपित उघड व्हावं तसं एक एक नाटक उलगडायचं… आणि तो रंगमंच उजळून निघायचा. तिथल्या प्रवेशानुसार असलेले संवाद ऐकू यायचे. पहिल्या रंगमंचावरील प्रकाश मंद होत बंद व्हायचा आणि दुसरा ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतनचा रंगमंच प्रकाशमान व्हायचा. ‘नटसम्राट’मधील दृश्याबरोबरच श्रीराम लागूंचा पल्लेदार आवाज कानावर यायचा. त्या रंगमंचावरील संवाद संपता संपता तिसरा दामोदर हॉल, मुंबईचा रंगमंच प्रकाशमान व्हायचा आणि सखाराम बाईंडर मधील निळू फुले बोलू लागायचे. त्यानंतर यशवंत नाट्यमंदिर, मुंबईच्या रंगमंचावर ‘गेला माधव कुणीकडे’ दिसू लागायचं. ऐकू यायचं. ते संपता संपता रवींद्र नाट्य मंदिरचा रंगमंच प्रकाशमान व्हायचा… आणि ‘अश्रूंची झाली फुले’मधील काशिनाथ घाणेकर लाल्या होऊन बोलू लागायचे. मग नुकत्याच जळून खाक झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातला पूर्वीचा रंगमंच प्रकाशमान होत श्रीमंत दामोदर पंतांच्या भूमिकेतला भरत जाधव बोलू लागायचा. मग ‘चार चौघी’तला तो जळजळीत डायलॉग कानात शिरत पुण्यातलं बालगंधर्व नाट्यमंदिर उजळून निघायचं. त्यानंतर पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात वाडा चिरेबंदीचा सेट दिसायचा, पात्रं बोलू लागायची. पुढे सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्य मंदिरात प्रा. अरुण पाटील दिग्दर्शित ॲमॅच्युअर ड्रामॅटिक असोसिएशनच्या ‘तू वेडा कुंभार’ या व्यंकटेश माडगूळकरांच्या नाटकातील प्रसंग उभा रहायचा. आणि सगळ्यात शेवटी संजय पाटील यांचा सुपुत्र सिनेमॅटोग्राफर, नेपथ्यकार ज्याला नुकतंच एका शॉर्ट फिल्म साठी जर्मनी येथे होणाऱ्या जागतिक प्रतिष्ठेच्या कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये एका शॉर्ट फिल्मसाठी विशेष अवार्ड मिळालं आहे… अशा सारंग पाटील यांनी केलेल्या व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘वाटसरू’ या नभोनाटयाचं नाट्यमंचीय रूपांतर सादर व्हायचं.
हे सगळंच अद्भुत होतं. जणू अवघी नाट्यसृष्टीच त्या एका छोट्याशा स्टेजवर साकार झाली होती. दीड बाय दोन फुटाच्या प्रत्येक रंगमंचावरची पात्र, त्या पात्रांच्या प्रमाणात असलेल्या रंगमंचावरील
नेपथ्यामधील वस्तू, इमारतींचे भाग… सगळंच अद्भुत! लहानपणी आपण किल्ले करत आलो, त्या किल्ल्यांच्या पलीकडले खूप ॲडव्हान्स्ड, प्रगत असं रूप म्हणजे संजय पाटलांच्या घरात गणपतीच्या आराशीतून काळाच्या पडद्याआड गेलेला पण मिनीएचर सारख्या एका लघु रंगमंचावर प्रसन्नपणे आविष्कृत होणारे ते नऊ देखावे. जणू एखाद्या व्यापारी पेठेतील प्रमुख रस्त्यावरच्या, भव्य-दिव्य सार्वजनिक गणपती मंडळाचा देखावाच त्या दहा बाय सहा च्या घरगुती स्टेजवर साकार झाला होता. संकल्पक सारंग पाटील, नेपथ्यातील वस्तू तयार करणारा त्याचा मित्र आकाश सुतार, स्टेज तयार करणारा राजू बाबर, प्रकाशयोजना करणारा कौशिक खरे आणि सारंग चे आई वडील म्हणजेच संजय पाटील आणि सौ. जाई पाटील हे हौशी आणि प्रयोगशील दांपत्य या सर्वांनीच हा गणपती उत्सव आजच्या घडीला कसा साजरा करायला हवा याचा एक नवा आदर्श धडाच समाजाला घालून दिला आहे… आज गोंगाटात उद्देश हरवून बसलेल्या, विकृतीकडे झुकलेल्या, उत्सवांच्या बदलत्या स्वरूपातून बाहेर पडून तुमच्या आमच्यासारख्यांना दाखवलेला आशेचा समृद्ध असा नवा किरण आहे. त्याबद्दल पाटील परिवाराचे खूप खूप आभार!
☆ समर्थशिष्या- संत वेण्णाबाई – लेखिका : सुश्री विजयश्री तारे जोशी ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
मृणालिनी जोशी यांचे १९८९ साली प्रसिद्ध झालेले दुर्मिळ पुस्तक ‘वेणास्वामी ‘ सज्जन गडावर मिळाले. ताईंनी पुस्तक इतके ओघवत्या भाषेत लिहिले आहे की तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो. रसिक वाचकांनी अवश्य वाचावे. परतल्यावर या वेणा स्वामिनी इतके झपाटून टाकले की शब्दब्रम्ह झरझर मोकळे झाले.
सुमारे पाचशे वर्षांपूर्वी समर्थांचा परीस स्पर्श झालेली ही बालविधवा सौदामिनी सारखी चमकून लुप्त झाली. कोल्हापूरच्या गोपाजीपंत देशपांडे कुटुंबात जन्मलेली ही निरागस कन्या मिरजेच्या जनार्दनपंत देशपांडे कुटुंबाची स्नुषा झाली. अत्यंत देखणे सात्विक रूप आणि कुशाग्र बुद्धी यांचा मिलाफ म्हणजे वेणूबाई. दुर्दैवाने अवघ्या दोनच महिन्यात त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. वयाच्या अकराव्या वर्षी त्या कोवळ्या जिवावर जणू आकाशच कोसळले. प्रथेप्रमाणे सुंदर लांबलचक रेशमी केश संभार कापला गेला आणि लाल अलवणात ( विधवे साठी असलेले एक खास वस्त्र) त्यांचा सुकुमार देह गुंडाळला गेला. एका निरागस कळीच्या पाकळ्या पाकळ्या पडून जणू फक्त देह रुपी विद्रूप देठ शिल्लक राहिला. आता तो देह फक्त राब राबण्यासाठी उपयुक्त होता. वेणूच्या पिताश्रीनी त्यांना बालपणीच काळाच्या पुढे जाऊन अक्षर ओळख करून दिली होती. अनेक ग्रंथांचा अभ्यास त्यांच्या कडून करून घेतला म्हणून त्यांचे जीवन थोडे तरी सुसह्य झाले. वैधव्य आले तरी त्यांचे मन धर्मग्रंथांकडे ओढ घेई आणि त्यात रमून जाई. सक्तीचे ब्रह्मचर्य अनुभवताना हळू हळू मन अंतर्मुख झाले आणि आत अनेक प्रश्न तरंग निर्माण होऊ लागले. देवाने आपल्याला मनुष्य जन्म दिला, ज्ञान साधनेची वाट दाखवली. आपण ज्ञानाचा उपयोग केला नाही तर आपला जन्म व्यर्थ जाईल असे वाटू लागले. आपल्या आत्मारामाची ओळख कोण करून देईल? अशी त्यांच्या जीवाला गुरू भेटीची आस लागून राहिली.
ती तळमळ स्वामी समर्थांना त्यांच्याकडे घेऊन गेली. ‘जय जय रघुवीर समर्थ ‘ अशी आरोळी अंगणात घुमली आणि वेणूबाईंचा आत्मा गुरू दर्शनासाठी तळमळत होता ते गुरू विधिलिखित असल्या सारखे त्यांच्या दारी उभे राहिले. वेणूबाईंचे देह भान हरपले…. आत्मा गुरूचरणी समर्पित झाला. स्वामींच्या कीर्तनात त्या रंगून गेल्या. काळ वेळेचे देखील भान हरपले. अंबाबाईच्या देवळात रात्री कीर्तनाला गेलेल्या वेणू बाई पहाटेची काकड आरती करून परतल्या. माहेरच्या प्रेमाच्या माणसांना देखील विधवा मुलीने केलेला हा प्रमाद सहन झाला नाही. धर्म रक्षण करणाऱ्या नातेवाईक लोकांनी अनेक आरोप प्रत्यारोप करून त्या अश्राप बालिकेचा जीव हैराण करून सोडला. समर्थां सारखा लफंगा संन्यासी तुला काय मोक्ष देणार म्हणून त्यांना हिणवले. विजेचा कडकडाट व्हावा तसे वेणू बाईंनी सगळ्यांचा समाचार घेतला. उद्वेगाने ‘मी काया वाचा आणि मनाने पवित्र आहे कोणती कसोटी लावता?’ असे विचारले. आप्त स्वकीयांनी विष प्राशन करण्याची शिक्षा ठोठावली. मिरेप्रमाणेच रामराया पुढे ठेवलेले विष त्यांनी हसत हसत प्राशन केले. जहाल विषाने रात्रभर तडफड करणारा सुकुमार देह अरुणोदय होताच शांत झाला. माता पिता आक्रोश करू लागले. लोक अंतिम तयारीला लागले. त्याच वेळी अंगणात ‘जय रघुवीर समर्थ ‘ ही गर्जना घुमली. समर्थांनी ‘वेणू बाळा उठ ‘ असे म्हणताच हळु हळू त्या अचेतन शरीरात प्राण परत आले. दूषणे देणारे सगळेच चकित झाले. आता या वेणू बाई आमच्या बरोबर येतील.. कारण आता त्या तुमच्या नाहीत तर फक्त रामरायाच्या आहेत असे समर्थांनी निक्षून सांगितले. मागे वळूनही न पाहता सारे माया पाश तोडून ही योगिनी समर्थ गुरूच्या पावलावर पाऊल टाकून घरा बाहेर पडली. त्या काळात त्यांनी हे धैर्य दाखवले.
चाफळच्या मठात अनेक विधवा तसेच परित्यक्ता अनाथ स्त्रिया मठातील सगळ्या शिष्यांना रांधून घालायचे काम करत होत्या. समर्थ देखील इतके पुरोगामी होते की रामरायाला या अबलानी केलेला नैवेद्य अर्पण करत असत. समर्थांनी प्रत्येक स्त्रीचा पिंड आणि आवड पाहून त्यांना वेगवेगळी उपासना सांगितली. काहिंना फक्त नाम स्मरण करा असे सांगितले.
विष प्राशन केल्यामुळे वेणुबाईंची प्रकृती नाजूक बनली होती. त्यांचा वर्ण देखील काळवंडला होता. वेणूबाई अत्यंत तैल बुद्धीच्या, गोड गळ्याच्या आणि अशक्त प्रकृतीच्या असल्याने समर्थांनी त्यांना ग्रंथ वाचन, पाठांतर करायला लावले इतकेच काय गुरू नेमून गायन देखील शिकायला लावले. एक दिवस या वेणू बाईंना त्यांनी चक्क कीर्तनाला उभे केले. भारत देशातल्या पहिल्या विधवा कीर्तनकार म्हणून त्यांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले. त्यांची रसाळ तेजस्वी वाणी पाहून अनेक पंडित, शास्त्री, कीर्तनकार थक्क झाले.
समर्थांनी त्यांना सर्व प्रकारे उत्तम शिक्षण दिले आणि घडवले. कुटुंबाला नकोशा झालेल्या असंख्य स्त्रियांना समर्थांनी आपल्या विविध रामदासी मठात मानाचा आसरा दिला. वेणू बाई परत माहेरी किंवा सासरी गेल्या नाहीत. सासूबाई निवर्तल्या आणि त्यांचा सासरचा वाडा मोकळा पडला.
समर्थांनी वेणू बाईंना त्यांच्या सासरच्या वाड्यात मिरजेला रामदासी मठ स्थापन करून सन्मानाने मठाधिपती करून टाकले. ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. समर्थांची आणि रामरायाची आज्ञा घेऊन वयाच्या पन्नाशीत या दिव्य स्त्रीने अखेरचे कीर्तन सादर केले आणि स्वेच्छेने सज्जन गडावर देह ठेवला.
त्यांच्या समाधीवर लावलेले चाफ्याचे झाड नंतर बहरले. समर्थांनी देह ठेवल्यावर ते झाड मूकपणे गुरूंच्या समाधीवर फुले वाहू लागले! गुरू शिष्य नाते रामरायाच्या चरणी विलीन झाले…. द्वैत सरले. धन्य ते काळाच्या पुढे असलेले गुरू आणि ती जगावेगळी शिष्या
जय जय रघुवीर समर्थ
लेखिका : विजयश्री तारे जोशी, कोल्हापूर
संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एक सोळा वर्षाचा मुलगा मेडिकलच्या दुकानात जातो. तिथे एक आजोबा कॅन्सरसाठीची औषधे घेत असतात. खरंतर त्यांना ती महागडी औषधे परवडत नसतात पण त्यांच्या पत्नीला कॅन्सर झालेला असल्याने ते कशीबशी पैशांची सोय करून औषधे घ्यायला आलेले असतात. तो मुलगा हे सगळे पहात असतो आणि न राहवून तो आजोबांना त्यांच्याबद्दल विचारतो. सत्य कळल्यावर तो खूप विचारात पडतो की असे हजारो, लाखो लोक या देशात आहेत की त्यांना ही महागडी औषधे परवडत नाहीत. पण तरीही काहीच पर्याय नसल्याने ते इतकी महाग औषधे खरेदी करतात. तो मुलगा आता यावर पर्यायांचा विचार करायला लागतो. यातूनच त्याच्या भावी उद्योगाचा पाया रचला जातो.
हा मुलगा म्हणजे ठाण्यातील वय वर्ष फक्त २२ असलेला ‘अर्जुन देशपांडे’ जो जगातील सर्वात तरुण उद्योजक आहे. त्याने स्थापन केलेल्या ‘जेनेरिक आधार’ या कंपनीचा टर्नओव्हर आहे मात्र पंधराशे कोटी रुपये !
१६ वर्षाच्या अगदी कोवळ्या वयात अर्जुनने ‘जेनेरिक आधार’ कंपनी स्थापन केली. कंपनीचा मूळ उद्देश हाच होता की गरजू आणि गरीब लोकांना अतिशय स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत. त्यासाठी त्यांनी औषधे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना गाठले. तेथून स्वस्तात औषधे खरेदी करून ‘जेनेरिक आधार’ नामक मेडिकलच्या दुकानातून त्याची विक्री सुरू केली. जी औषधे उत्पादकांकडून विकत घेऊन मोठ्या मोठ्या फार्मा कंपन्या स्वतःचे लेबल लावून अतिशय महाग विकतात तीच औषधे जेनेरिक आधार मध्ये अतिशय स्वस्त दरात मिळतात. मध्ये कुठलेही दलाल आणि इतर खर्च नसल्याने ते ही औषधे इतक्या कमी किमती विकू शकतात.
आजच्या घडीला देशभरात ‘जेनेरिक आधार’ ची तीन हजार मेडिकलची दुकाने आहेत. जिथून औषधे खरेदी करून लोकांचे हजारो लाखो रुपये वाचत आहेत.
तसेच अर्जुनने आज दहा हजार पेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगार देऊ केला आहे.
त्याच्या या कर्तुत्वाची दखल रतन टाटा सारख्या दिग्गज व्यक्तीनेही घेतली. रतन टाटांनी त्याला भेटायला बोलवून केवळ प्रोत्साहनच नाही तर त्याच्या कंपनीमध्ये गुंतवणूकही केली. याचे कारण सांगताना अर्जुन सांगतो कि आपल्या देशातील अगदी दुर्गम खेड्यातही औषधे उपलब्ध व्हावीत अशी अर्जुनप्रमाणे रतन टाटांचीही इच्छा आहे. आजपर्यंत अर्जुनला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. वय वर्षे केवळ २२ असलेल्या अर्जुनला आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली तसेच जपान सारख्या अतिप्रगत देशात मानाने बोलवले जाते. त्याचे व्याख्यान ऐकायला लोक गर्दी करतात. जपानने तर त्याला अतिशय स्वस्त दरात मोठे कर्ज दिले आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी तसेच आपल्या देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनीही अर्जुनला भेटायला बोलवून त्याची प्रशंसा केली. द्रौपदी मुर्मुशी तर त्याचे आता आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.
सध्याच्या चंगळवादी तरुणाई मध्ये अर्जुन देशपांडे हा एखाद्या लखलखत्या हिऱ्यासारखा चमकतो आहे. ज्याला आपल्या देशाचा अतिशय अभिमान आहे. त्याला आपल्या भारत देशाला अमेरिका अथवा इंग्लंड न बनवता अभिमानास्पद भारतच बनवायचा आहे.
अशा या लखलखत्या हि-याला, अर्जुनला मानाचा मुजरा !
लेखिका : सुश्री मुक्ता आंग्रे
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “ढोलपथक आणि ती…” – लेखिका : सुश्री सोनाली सुळे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे☆
सणसणीत लाथ हाणली त्याने पोटात. ती भेलकांडली. जीवघेणी कळ उठली. कशीबशी उठली ती. सारी रात्र अशीच तळमळत काढली. सकाळ झाली तसे मनाचे तुकडे अन् दुखणारे शरीर घेऊन कामाला लागली. एक यंत्र बनून गेली होती ती. सहन करायचं फक्त. कधीकधी तोंडातून शब्द निघाला तर अधिकचा मार ठरलेला. त्याला हवी असायची फक्त दारू. अन् हिनेच कमवायचं, राबायचं, घर चालवायचं, घरकामही करायचं. त्याची नोकर बनून सेवा करायची. त्याची प्रत्येक अवास्तव अपेक्षा पूर्ण करायची.
सहा महिने झाले होते फक्त लग्नाला. नोकरी करणारा, शहरात राहणारा नवरा मिळाला म्हणून लगेच होकार दिला तिने. पण महिनाभरात सारं चित्र पालटलं. त्याचं खरं रुप दिसू लागलं. फसवणूक झाली हे कळायला वेळ नाही लागला तिला. परतीचा रस्ताही बंद होता. माहेरी कुणीच नव्हतं. पळून जाणं किंवा सहन करणं, दोनच पर्याय होते. पहिल्यांदा तो दारू पिऊन आला तेव्हा कडाक्याचं भांडण झालं. रात्रभर रडत राहीली. सकाळी हिच्याकडे न पाहताच तो बाहेर पडला. शेजारीण चहा चपाती घेऊन आली.
“तिसरं लग्न आहे हे त्याचं…. ” बोलता बोलता तिने सांगितलं. तिला धक्काच बसला. ” पाहिल्या बायकोने जाळून घेतलं. दुसरी पळून गेली. तू तिसरी. “तिला रडू फुटलं.” असं रडून काय होणार, लढायला शिक. मी जिथे काम करते तिथे लावून घेते तुला. बोलू का मॅनेजरशी सांग. ” तिने लगेच हो म्हटलं. त्यालाही बरच होतं. फुकट पैसा मिळतोय, नाही कशाला म्हणणार?
कष्ट दुपटीने वाढले होते तिचे. पण जगायला कारण सापडलं होतं. तो सुधारणार नव्हताच. आणि तिलाही जायला ठिकाण नव्हतं. घुसमट होत होती. मन मारुन जगू म्हटलं तरी त्यानं केलेला अपमान, खाल्लेला मार आठवून तिच्या जीवाचा संताप होत असे. एकदा कामावरून निघताना तिला ढोल ताशे ऐकू आले. मग रोजच ऐकू येऊ लागले. तिनं त्याबद्दल शेजारणीला विचारलं. ” हे होय? अगं गणपती जवळ आलेत ना. ढोल ताशा पथकात प्रॅक्टिस सुरु असते रोज. ” तिला नवल वाटलं. ” कोण कोण असतं तिकडे?”
” कोणीही जाऊ शकतं. अगदी तू सुद्धा. ” तिचे डोळे विस्फारले, ” खरच?”
” खोटं का सांगु? अगं आउटलेट असते ती. कामाचा ताण, घरचा ताण सगळं विसरून मस्त ढोल वाजवतात. छान वाटतं. ”
दुसऱ्याच दिवशी तिनं ढोल ताशा पथकात नाव नोंदवलं. सकाळीच जास्तीचा स्वयंपाक करून घेत असे ती. तो संध्याकाळी बराच उशीरा येई. ते पण तर्र होऊन. कामावरून परस्पर पथकात जाई ती.
” दम असला पाहिजे ताई वाजवण्यात. जोर लावून वाजव. “
शिकवणारा तिला म्हणत असे. ती आणखी मनापासून वाजवण्याचा प्रयत्न करत असे. त्यादिवशी ढोल वाजवता वाजवता वेळ कसा निघून गेला तिला कळलच नाही. घरी जायला उशीरच झाला होता. नेमका तो तिच्या आधी घरी पोचला. आधीच प्यायलेला, त्यातून ही उशीरा पोचली. त्यानं पट्टा काढला तिच्यावर उगारला. तिनं हिंमत करून तो वरच्यावर झेलला. त्याच पट्ट्याने त्याला झोडपून काढला. उचलला आणि कॉलर धरून फरफटत पोलीस स्टेशनला नेला. सगळी वस्ती बघतच राहीली. पोलिसांनी त्याला लॉक अप मध्ये टाकलं.
आज तिला वाजवताना बघून सगळे थक्क झाले होते. इतक्या दिवसांत साचलेला राग, तडफड सगळी बोटातून बाहेर पडत होती. शिकवणारा दादा तिच्याकडे बघतच राहिला!
☆ जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही… ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे☆
जे. के. राऊलिंग
वयाच्या १७ व्या वर्षी तिला महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले. २५ वर्षांची असताना आईचे आजारपणात निधन झाले. वयाच्या २६ व्या वर्षी ती इंग्रजी शिकवण्यासाठी पोर्तुगालला गेली. वयाच्या २७ व्या वर्षी लग्न झालं, तिचा पती तिच्याशी नेहमी गैरवर्तन करत असे, तरीही त्यांना मुलगी झाली.
वयाच्या २८ व्या वर्षी तिचा घटस्फोट झाला आणि तिला गंभीर आजार असल्याचे निदान झाले. वयाच्या २९ व्या वर्षी ती फुटपाथवर लहान मुलीला सोबत घेऊन जगणारी एक लाचार आणि एकटी आई होती. वयाच्या ३० व्या वर्षी तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला..
पण… तिने तिचे ते काम करण्याचे ठरवले जे ती इतरा पेक्षा चांगले करू शकते आणि तिला लिखाणात ऋची असल्यामुळे तिने लिखाण करण्यास सुरुवात केली.
वयाच्या ३१ व्या वर्षी शेवटी तिने तिचे पाहिले पुस्तक प्रकाशित केले. वयाच्या ३५ व्या वर्षी तिने ४ पुस्तके प्रकाशित केली आणि तिला वर्षातील सर्वोतकृष्ट लेखिका म्हणून गौरविण्यात आले.
वयाच्या ४२ व्या वर्षी, तिने तिचे नवीन पुस्तक लिहिले आणि प्रकाशित झाल्यावर पहिल्याच दिवशी १ कोटी १० लाख प्रती विकल्या गेल्या, ही तीच महिला आहे जिने वयाच्या ३० व्या वर्षी आत्महत्येचा विचार केला होता आणि तिचे नाव आहे जे. के. राऊलिंग.
आज हॅरी पॉटर हा $१५ बिलियन पेक्षा जास्त किमतीचा जागतिक ब्रँड आहे.
सांगायचं तात्पर्य एवढच की आयुष्यात कधीही हार मानू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करण्याची जिद्द असेल तर अशक्य असं काहीच नाही, भले थोडा उशीर झाला तरी चालेल पण विजय हा निश्चित असतो.
☆ ‘पुना गेम’ म्हणजेच आजचे जगप्रसिद्ध ‘बॅडमिंटन’…!!! 🏸 – लेखक श्री अनुराग वैद्य ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
‘बॅडमिंटन’ हा आज जगप्रसिद्ध खेळ आहे. जगभरात हा ‘बॅडमिंटन’ खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो. अगदी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये भारतातील प्रत्येक गल्लीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तसेच निवांत वेळेत ‘बॅडमिंटन’ लोकं रात्री खेळताना आपल्याला बघायला मिळतात. परंतु ‘बॅडमिंटन’ या खेळाची जन्मभूमी कोणती हे फारसे लोकांना माहिती नसते किंवा काळाच्या ओघात लोकं या ‘बॅडमिंटन’ खेळाला परदेशी खेळ समजून मोकळे होतात.
परंतु या ‘बॅडमिंटन’ खेळाचा जन्म हा बाहेरच्या देशातील नव्हे तर ‘बॅडमिंटन’ या खेळाचा जन्म हा ‘पुण्यामध्ये’ झालेला आहे. तसे म्हणायला गेले तर ‘बॅडमिंटन’ हा खेळ ‘पुणेरी’ खेळ आहे. इंग्रजांची सत्ता पुण्यामध्ये स्थापन झाल्यानंतर ‘पुणे’ परिसरामध्ये ‘खडकी’ येथे इंग्रजांची कायमस्वरूपाची छावणी होती. पुण्यातील खडकी येथे ‘ऑल सेंट्स चर्च’ आहे. या ‘ऑल सेंट्स चर्च’ च्या ईशान्य दिशेला ‘फ्रियर रोड’ आहे या ‘फ्रियर’ रस्त्याच्या जागेवर पूर्वी एक मोकळी बखळ होती. हीच बखळ किंवा सध्याचा ‘फ्रियर रोड’ आजच्या जगप्रसिद्ध ‘बॅडमिंटन’ खेळाची जन्मभूमी.
‘खडकी’ येथील छावणीमध्ये इंग्रज सैनिक त्यांना ज्यावेळेस कामामधून निवांत वेळ मिळत असे तेव्हा छावणी मधील सध्याच्या ‘फ्रियर रोड’ येथील मोकळ्या जागेमध्ये दोघे जण किंवा दोन जोड्या एकमेकांच्या समोर उभे राहून वल्ह्याच्या आकाराच्या फळ्या बनवुन ‘बुचाची वर्तुळाकार चकती’ बऱ्याचवेळेस यामध्ये दारूच्या बाटलीचे बुच असायचे. हे हवेत उडवून टोलवून खेळत असे. ही ‘बुचाची चकती’ खाली पडू न देता टोलविणे एवढाच या खेळाचा भाग होता.
जेव्हा ही ‘बुचाची चकती’ वल्ह्यासारख्या फळीने हवेमध्ये उडवून मारली जात असे तेव्हा ही ‘बुचाची चकती’ हवेमध्ये स्पष्ट दिसावी यासाठी स्वतः खाऊन फस्त केलेल्या ‘कोंबड्यांची पिसे’ या ‘बुचाच्या चकतीला’ चिकटवित असत किंवा खोचून ठेवीत असत. या ‘पिसे’ लावलेल्या ‘बुचाच्या चकतीला’ गंमत म्हणून इंग्रज अधिकारी ‘बर्ड’ असे संबोधत असत. तसेच हा हवेमध्ये उडणारा ‘पक्षी’ सतत इकडून तिकडे फिरत असे म्हणून म्हणून त्याला ‘येरझारा करणारा कोंबडा’ किंवा ‘शटल कॉक’ असे म्हणत असे. अश्या प्रकारे ‘बॅडमिंटन’ या खेळाचा जन्म झाला त्याला इंग्रजांनी ‘पुना गेम’ असे नाव दिले.
इ. स १८७० साली काही इंग्रज सैनिक हे जेव्हा आपल्या घरी म्हणजेच ‘इंग्लड’ येथे जाण्यास निघाले तेव्हा मायदेशी जाणाऱ्या या इंग्रज सैनिकांनी ‘बॅडमिंटन’ या खेळाचे साहित्य म्हणजे खास ‘पुणेरी शैलीने’ बनवलेले ‘शटल कॉक’ म्हणजेच मराठी मधला ‘येरझारा करणारा कोंबडा’ आपल्या सोबत ‘इंग्लंड’ येथे घेऊन गेले. संपूर्ण भारतामधून पहिले विदेशात गेलेले ‘क्रीडासाहित्य’ हे पुण्यामधून गेले होते हे विशेष. तसेच भारतीय ‘क्रीडा साहीत्याची’ ही पहिली ‘निर्यात’ होती.
पुणेरी शैलीमध्ये’ बनवलेले ‘शटल कॉक’ हे ‘इंग्लंड’ मध्ये पोहोचले आणि तेथील सैनिकांमध्ये हा ‘पुना गेम’ अधिकाधिक प्रसिद्ध होऊ लागला. तेव्हा ह्या ‘पुना गेम’ बाबत ‘ग्लुस्टरशायर’ या परगण्यात राहणाऱ्या ‘ड्युक ऑफ न्यू फोर्ट’ हा राजघराण्याशी संबंधित असलेला ‘उमराव’ याच्यापर्यंत ह्या ‘पुना गेम’ बाबत बातमी जाऊन पोहोचली. हा ‘उमराव’ क्रीडाप्रेमी होता तसेच हा ‘उमराव’ सतत नवीन क्रीडाप्रकारांच्या शोधात असे.
त्याच्या कानावर जेव्हा ‘पुना गेम’ बद्दल माहिती पोहीचली तेव्हा ज्या इंग्रज सैनिकांना ‘पुना गेम’ बद्दल माहिती होती तेव्हा त्या ‘ग्लुस्टरशायर’ येथील राजघराण्याशी संबंधित ‘उमरावाने’ ‘पुना गेम’ माहिती असलेल्या इंग्रज सैनिकांना आपल्या राहत्या घरी बोलवून घेतले. ‘पुना गेम’ माहिती असलेले इंग्रज सैनिक ‘पुना गेम’ कसा खेळायचा याचे प्रात्यक्षिक दाखवायला ‘ग्लुस्टरशायर’ येथे पोहोचले आणि त्यांनी राजघराण्याशी संबंधित असलेल्या ‘उमरावाला’ आणि आमंत्रित लोकांना जेव्हा ‘पुना गेम’ इतका आवडला की त्याचे सगळ्या ‘इंग्लंड’ देशामध्ये फार कौतुक झाले आणि संपुर्ण ‘इंग्लंड’ देशामध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला.
तसेच या ‘पुना गेम’ बद्दल कसे खेळतात याची प्रात्यक्षिके दाखवली गेली ते ठिकाण म्हणजे ‘ड्युक ऑफ न्यू फोर्ट’ यांचे ‘बॅडमिंटन’ गाव. इंग्लंडमधील ‘बॅडमिंटन’ गावी इंग्रजांनी ‘पुना गेम’ ह्या खेळाचे प्रात्यक्षिक दाखवले गेले म्हणून तेथील लोकांनी या ‘पुना गेम’ या खेळाचे नाव ‘गेम ऑफ बॅडमिंटन’ असे केले. यामुळे पुण्यामध्ये जन्मलेल्या ‘पुना गेम’ हे नाव इंग्रजांनी पुसून टाकले.
परंतु काही वर्षांमध्ये ‘ईस्ट इंडिया कंपनी’ सोबत येणाऱ्या अधिकाऱ्यांनी हा ‘पुना गेम’ म्हणजेच ‘बॅडमिंटन’ इ. स. १८७७ च्या सुमारास इंग्लंड येथून परत भारतामध्ये आणला आणि या ‘पुना गेम’ म्हणजेच आत्ताचे ‘बॅडमिंटन’ या खेळाचे नियम तत्कालीन भारतामधील ‘कराची’ सध्याचे (पाकिस्तान) येथे या ‘पुना गेम’ उर्फ ‘बॅडमिंटन’ खेळाची नियमावली पुस्तिका बनवली गेली. आजपर्यंत या ‘पुना गेम’ म्हणजेच ‘बॅडमिंटन’ याच्या नियमावलीमध्ये फारच थोडे बदल करण्यात आलेले आहेत.
असा हा पुण्यातील ‘खडकी’ येथे जन्म झालेला ‘पुना गेम’ आज जगभर ‘बॅडमिंटन’ या नावाने प्रसिद्ध आहे. परंतु आपल्या भारतामध्ये आणि तो देखील पुण्यामध्ये जन्म घेतलेला ‘पुना गेम’ आपण आजही विदेशी खेळ म्हणून गणला जातो. असा हा पुण्यात जन्माला आलेला ‘पुना गेम’ म्हणजेच ‘बॅडमिंटन’ हा खेळ पुण्याने जगाला दिलेली एक देणगी आहे हे नक्की.
संदर्भग्रंथ:-
१. क्रीडा ज्ञानकोश:- सुरेशचंद्र नाडकर्णी
२. A Journey To The Badminton World:- Zuyan Wang.
३. शहर पुणे एका सांस्कृतिक संचिताचा मागोवा:- सुरेशचंद्र नाडकर्णी, संपादक अरुण टिकेकर, निळूभाऊ लिमये फाउंडेशन, २०००
☆
लेखक : श्री अनुराग वैद्य.
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈