मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझे पाय जमिनीवरच आहेत… ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी 

? इंद्रधनुष्य ? 

माझे पाय जमिनीवरच आहेत… 🖋️ ☆ डॉ. माधुरी जोशी 

— ओपरा विनफ्रे 

माझे पाय जमिनीवरच आहेत…

 मी आता फक्त छान बूट घालते” 

मला मुलाखती फार आवडतात.प्रत्यक्ष समोर,यू ट्युबवर,दिवाळी अंकातल्या, साहित्य संमेलनाच्या,प्रासंगिक….स ग ळ्या…..मग कलाकार, साहित्यिक,लेखक,शास्त्रज्ञ, नाटककार, संगीतकार, शैक्षणिक क्षेत्रातले…अगदी वडापाव विकणाऱ्यापासून बिल्डर पर्यंत कुणीही व्यावसायिक..कुणीही असो….कारण प्रत्येकाचे आर्थिक, सामाजिक , सांस्कृतिक, कौटुंबिक, शैक्षणिक, मानसशास्त्रीय प्रश्न वेगळे…उत्तरं वेगळी….मार्गही वेगळे..‌.

मला आठवतं पूर्वी नॅशनल टी व्ही वर कमलेश्वर मुलाखती घ्यायचे…मजूर बायका,मोलकरणी,रस्ते झाडणाऱ्या ,बोहारणी,भाजीवाल्या..‌..अशा कुणाच्यातरी…अत्यंत सह्रदयतेनी सहज बोलून एक आगळंच विश्व उलगडायचे …त्यांना बोलकं करंत अगदी अनोळखी जग दाखवायचे….हे सारं आपल्या देशातलं…

पण वेगळीच संस्कृती,मग वेगळाच लढा,वेगळेच प्रश्न … सगळ्यांना तोंड देत निराशेच्या गर्तेतून अत्युच्च शिखरी जाणारी परदेशी माणसं पाहिली मुलाखतीत….मग आपली अडचण अगदीच क्षुल्लक वाटायला लागली..निराशेवर मात करायचं बळ मिळालं… आपल्याकडच्या सारखेच ते लढतांना पाहिले…दोन्हींनी मन थक्क झालं.‌.त्यांचा लढा, चिकाटी,यश पाहून.

तर एका मुलाखतीत भेटली आफ्रिकन अमेरिकन महिला…ओपरा विनफ्रे नाव तिचं…‌‌पहा हं ..‌जगातला सर्वोत्तम टॉक शो तिच्या नावावर..दोन दशकं Top rating मुलाखतींचा कार्यक्रम घेणारी….२०११ मधे “विशेष ऑस्कर पुरस्कार”मिळवणारी..‌‌.जगातल्या १०० विशेष व्यक्तींपैकी एक..‌.. २०१३ मधे ओबामांकडून “सर्वश्रेष्ठ नागरी सन्मान” मिळवणारी….आणि हे ठळक … अजून बरंच बरंच काही….कुणी म्हणेल एका व्यक्तीच्या आयुष्यात एवढं?तर कुणी म्हणेल असे किती तरी आहेत….होय खरं आहे….पण या गौरवाच्या यशाच्या मालिकेबरोबरंच कमाल आहे संघर्ष लढ्याची आणि सकारात्मकतेची…..

कोण होती ही ओरपा? होय होय ओरपाच होतं तिचं नाव …पण लोक ओपरा असंच बोलवत…मग तिनं तेच नाव स्विकारलं….तिची आई लोकांकडे मोलकरणीचं काम करी..काबाडकष्ट….१५व्या वर्षीच तिला ही मुलगी झाली.Single Mother …म्हणजे अजून झगडा….ती सदैव कामात.या मुलीकडे लक्ष द्यायला तिला वेळंच नव्हता.दारीद्र्य पाठी लागलेलं..‌इतकं काम करूनही जेमतेम दोन घास पोटात…मग चिमुकली पोर दिसेल मिळेल ते ऊष्टमाष्टं खाई,…कचऱ्यातंच खेळ मांडी..‌‌वळण वगैरे कोण लावणार?…,नव्हतंच कुणी…कसंबसं ६व्या वर्षांपर्यंत आईनं सांभाळलं आणि हे गाठोडे आपल्या आईकडे पाठवून दिलं….तिथेही फारसा फरक नव्हता….पण वेळेवर दोन घास पोटात जात.आजी मायेनं काळजी घेई.न्हाउमाखू घाली.स्वच्छ ठेवी…रविवारी चर्चमध्ये नेई.बायबल कानावर पडे…गोष्टी सांगे.थोडंफार शाळेत जाणं होई.मग अक्षर ओळख झाली.पण पैसा दुर्मिळच….सभोवती बऱ्या घरातली मुलं असंत.आपला कमीपणा झाकण्यासाठी ती घरातच पैसे चोरायला लागली‌.आजीनं हे मान्य करणं शक्यच नव्हतं…..परत रवानगी आईकडे झाली.ती मोठी होत होती.मग गल्लीतल्या पासून नातेवाईक,भाऊ,मित्र साऱ्यांनी अत्याचार केले.त्यातून एक मूल झालं.पण अशक्त असल्यानं ते जगलं नाही.ते सुटलं आणि ती पण…..ती शाळेत जात होती खरी पण सोबतची श्रीमंत मुलं पाहून तिला न्यूनगंड वाटे…पुन्हा चोऱ्या…खोटे आभास….तेच दुष्टचक्र…..दुःख,दारीद्र्य,दैन्य,,वेदना ,यातना, अत्याचार हाच शब्दकोश जगण्याचा…त्या चोऱ्यांनी आई वैतागली आणि तिला सावत्र बापाकडे टेनेसीत दिलं पाठवून..

पण हा Turning point ठरला…जीवनाचा स्वरंच बदलला.तो फार चांगला “माणूस ” होता.तिथे शिस्त होती.नियम होते… सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगणं सुरक्षित होतं.‌.‌मोजकं पण समाधानी होतं.परिस्थितीनं गांजलेली ही मुलगी हुषार आहे.बुद्धीमान आहे.तिला संधी हवी.ज्ञान हवं.दिशा हवी.तिच्या आत्मविश्वासावरची धूळ झटकायला हवी हे सारं सारं त्यानं जाणवलं.ती खरंच हुषार बुद्धीमान होती.. वाह्यात,मवाली,चोरटी,टारगट ही तिची ओळख संपली,मिटली आणि ती एक” ब्रिलियंट स्टुडंट ” झाली.ओल्या मातीचा गुणांनी भरलेला घट झाला.तिच्या बोलण्यात वेगळंच कौशल्य जाणवे.. नाटकात ती फार छान अभिनय करी…. अशाच एका नाटकाच्या रिहर्सलला एका व्यक्तीला तिचे गुण जाणवले आणि आपल्या रेडिओ चॅनल वर त्यानं तिला न्यूज रीडरची पोस्ट दिली…हा उज्वल भविष्याचा देखणा दरवाजाच होता.पहिलं दार होतं ते राजरस्त्याकडे उघडणारे…‌‌

ती ऑफर तिनं स्विकारावी…पण अभ्यास सोडला नाही…नोकरी करत करत स्कॉलरशिपचा अभ्यास केला …ती मिळवली पण….. कॉलेज अक्षरशः गाजवलं….ती दोन ब्युटी कॉंटेस्ट जिंकली….Miss Tenesi आणि Miss Black National Beauty……आता तिला बाल्टीमोर टी व्ही वर न्यूज रीडरची नोकरी मिळाली…मग ती मेरीलॅंडला गेली.असं काम करणारी ती “पहिली आफ्रिकन अमेरिकन महिला ” ठरली.हे खूपच ग्रेट होतं.मोठा गौरव होता तिचा…..

ती फारच सेन्सिटिव्ह होती. बातमी कोरडेपणानी बा त मी न करता त्यातला इमोशनल आस्पेक्ट पहावा असं तिचं मत होतं.पण अत्यंत प्रॅक्टिकल मालकाला हा इमोशनल व्ह्यू नको होता…आणि या वादात जॉब गेला.परत निराशा…..पण यावेळी अनुभव, आत्मविश्वास,शिक्षण सोबत होतं . आणि एक रस्ता बंद झाला की नवे अनेक उघडतात असं म्हणतात तसंच झालं.. “People are talking ” अशा Talk show ची ती होस्ट झाली.ती लोकांना सहजपणे बोलकं करी…लोकही मोकळेपणाने बोलत.हा कार्यक्रम फारच लोकप्रीय झाला.( माझ्या मनात कमलेश्वर आणि आमीर खान चे कार्यक्रम उमटून गेले.)मग शिकागोचा Morning Show मग Oprah Show रांगच लागली.. दोन दशकं म्हणजे २० वर्ष हे शो Top rating show म्हणून गाजले आणि Oprah होस्ट म्हणून….ती सर्वात श्रीमंत ,पैसे मिळवणारी कलाकार होती.

ती श्रीमंत झाली पण तो जुना काळ ती कधीच विसरली नाही आणि Oprah Winfrey Leadership Academy चा जन्म झाला.तो तिच्या कर्तुत्वातला समाज कारणाचा कळस मानला पाहिजे.जे आपण सोसलं ते इतरांना सोसायला लागायला नको म्हणून तिनी अनेकांना मदत केली.दिशा दिली.मार्ग दाखवले … नाही तर ते निराशेने संपले असते किंवा गुन्हेगारीकडे वळले असते.

२०११ मधे तिला विशेष ऑस्कर पुरस्कार दिला गेला.Times,Forbes सारख्या जगद्विख्यात मासिकांच्या कव्हर पेजवर तिला मानाचं स्थान मिळालं.२०१३ मधे ओबामांनी तिला ” सर्वश्रेष्ठ नागरी सन्मान ” प्रदान केला.

कुठून कुठे आलं जीवन?एका दरिद्री गलिच्छ वस्तीत अपमानित असुरक्षित जगणारी Oprah किती उंचीवर पोहोचली.झगडत यशस्वी झाली.

तिची मतं ठाम होती.त्यानुसार तिनं कुणाची कॉपी केली नाही.स्वतःच्या विचारांनी ती Authentic झाली.तिनी फक्त यश हे ध्येय मानलं नाही..‌ती नवनवे मार्ग शोधत राहिली.ती फार ईमानदार, प्रामाणिक होती.समोरच्याची अडचण ओळखून तिनं योग्य सुंदर दिशा दिली.मदतीचा हात देत ग्रहदशाच बदलली म्हणा ना….अनेक घरं तिच्यामुळे सुखी झाली.तिनं आधाराचा हात सोडला नाही आणि अशा ६८,०००/ लोकांना तिनं हात दिला.

तिचा भूतकाळ भयंकर होता.पण तो मागे सोडून तिनं भविष्य घडवलं.भूतकाळ विसरा आणि जीवन नव्यानं Design करा असं म्हणते ती.. आणि तसं तिनं केलंही…

कुणी म्हणेल हे मिळणं तिच्या दैवात असणार…बरोबर आहे..‌‌दैवाची साथ हवीच…‌पण दैवात लढा पण असतो तो आपण पहायचा आणि शिकायचं….कारण प्रयत्नांचं मोल कधीच कमी होत नाही ‌..केवळ ३२ व्या वर्षी १२०चॅनल्सवर तिला १०लाख लोक पहात होते. संकटात आतल्या आत ती अनेकदा तुटली असेल….पण लढाई सोडली नाही.हार मानली नाही..‌परिस्थिती इतकी पालटली की तिनं तिच्या चॅनलचं नाव ठेवलं “HARPO” अगदी तिच्या “OPRAH ” नावाच्या उलटं.‌ कमाल आहे ना!!

म्हणूनच वाटतं… असं काही पाहिलं ऐकलं की मनात येतं

“कितीही निराश असा….हे जगणं पहात रहा

मात करा अडचणींवर,

मग आशेचे किरण बोलावतीलंच पहा

जगणं त्यांचं देईलच दिशा,,,

कमीत कमी लढायचा तरी

घेऊया वसा!!”

आणि हो …एवढ्या यशानंतर तिच्या त्या वाक्याने तर मी हाललेच आत…ती म्हणते….

“माझे पाय जमिनीवरच आहेत

फक्त मी आता छान बूट वापरते !!!”

 सलाम!!!! हॅट्स ऑफ खरंच !!!

 

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “गंधर्व स्मरण” – लेखक : श्री नंदन वांद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “गंधर्व स्मरण …” – लेखक : श्री नंदन वांद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

“नाना”, बालगंधर्व  ह्यांचं एक नाटक “संत कान्होपात्रा” – ह्या नाटकावर त्यांचा अतिशय लोभ होता. त्यातील कान्होपात्रा ह्या भूमिकेत ते अंतर्बाह्य रंगत असत. जेव्हा हे नाटक प्रथम रंगभूमीवर आले, तेव्हा त्यातील शेवटचा – पंढरपूरच्या पंढरीनाथाच्या देवालयातील प्रवेश, म्हणजे श्री विठ्ठलाची मूर्ति आणि त्यालगतचे गर्भगृह, हे पडद्यावर दाखवत असत.

बालगंधर्व ह्यांनी त्यांच्या नाटकातील मंडळींना पंढरपूर येथे पाठवले. तिथली छायाचित्रे आणवली अन् रंगभूमीवर तसेच्या तसे सर्व उभे केले. ह्यासाठी सावंतवाडी येथील ‘भावजी’ ह्या नावाचा कसबी कलाकार नानांनी गाठला. सुतारांच्या सोबत हे कलाकार काम करू लागले. भावजी ह्यांनी विठ्ठलमूर्तिकरता शिरसाचे लाकूड मुद्दाम निवडून आणले, अन् त्या मूर्तीचे काम प्रचंड जीव ओतून केलं. मंदिराचा सेट आणि मूर्ति, सर्व घडवण्यासाठी २ वर्षं काळ गेला. अतिशय देखणी मूर्ति घडवली, ज्याने लोक तासंतास तिच्याकडे बघत बसत. दुर्दैवाने ती व्यक्ती पुढं मानसिक संतुलन बिघडून बसली, पण नानांनी त्यांच्या कलागुणांना जाणून त्यांची अखेरपर्यंत  काळजी घेतली. त्यांस अंतर दिले नाही. पुढं हा मंदिराचा देखावा अन् मूर्ति प्रथम मुंबईत ‘रॉयल ऑपेरा हाऊस’मधे दाखवले गेले, जे पाहण्यास प्रचंड गर्दी लोटली.

त्यानंतर नाना कंपनीला घेऊन पंढरपूर येथे गेले. कान्होपात्रा प्रयोग लावला. मंदिराचा सेट अन् विठ्ठलाची मूर्ती उभी राहिली. प्रयोग रंगला. थिएटर प्रचंड गर्दीने भरून गेले होते. नाटक पाहताना सर्व थिएटर स्तब्ध होते, डोळे लावून तो थाट अन् अभिनय बघत होते. नाटकाच्या शेवटी पांडुरंगाच्या पायांवर डोके ठेवून कान्होपात्रा देह ठेवते, ह्या प्रसंगानंतर पडदा पडून प्रयोग संपला. रसिक त्या प्रयोगाने इतके प्रचंड भारावून गेले. त्यांना भान राहिले नाही. सर्व रसिकांनी स्टेजवर येऊन कल्लोळ केला. सर्वांचे म्हणणे, ‘आम्हाला कान्होपात्रा ह्यांचे दर्शन पाहिजे’!!

ही गर्दी स्टेज मॅनेजरला पांगवता आली नाही. काय करायचं  त्यास समजेना. एवढा कसला गलबला झाला म्हणून बालगंधर्व मेकअप न उतरवता स्टेजवर आले, तेव्हा काय विचारावे? लोकांनी त्यांच्या पायावर आपली डोकी टेकवून नमस्कार केला. गर्दी कमी होता होईना. सर्वांना दर्शन घ्यायचेच होते आणि नाना मात्र, “अरे देवा! हे काय करता? माझ्या काय पाया पडता?” म्हणत लोकांना विनंती करत होते, “असे नका करू, असे नका करू!!!” सर्व प्रेक्षकांचे दर्शन घेऊन झाले. “झाले आमचे काम”, असे म्हणत सर्व प्रेक्षक निघून गेले.

त्याच वेळी योगायोगाने एकादशी आली. नानांच्या मनात पांडुरंगाला महापूजा, अभिषेक करण्याची प्रचंड इच्छा जागी झाली. पंचामृत स्नानासाठी त्यांनी तयारी केली. कोऱ्या दुधाच्या घागरी आणल्या, त्यातील अनेक घागरींमधील दुधाचे विरजण लावून पंचामृतस्नानासाठी श्री पांडुरंगाची महापूजा सिद्धता झाली.श्री विठ्ठलाला भरजरी पोशाखही तयार करून घेतला. एकादशी दिवशी भल्या पहाटे नानांनी चंद्रभागेत स्नान केले, सोवळे नेसून आत गाभाऱ्यात जाऊन पंचामृत स्नान आणि पूजन केले. हा सोहळा गाजला. ही बातमी समजली म्हणून हे सर्व बघायला पंढरपूरच जणु तिथं लोटले होते. पूजा झाल्यावर अतिशय आपुलकीने प्रेमाने सर्वांना पंचामृत तीर्थ, प्रसाद वाटला…  ही त्यांच्यामधील मुरलेल्या ‘कान्होपात्रा’ची खरी आणि ‘नाना’ ह्या व्यक्तीची खरी भक्ती!!!

बालगंधर्व हे निरपेक्ष स्नेहाचे, निःस्वार्थ प्रेमाचे लोभी होते. उत्कट प्रेमाचे तंतू जपून ठेवणारे अतिशय हळवे व्यक्तिमत्त्व!! जीवन हे सौंदर्य आस्वादासाठी अन् त्यातून प्राप्त होणारा दिव्य आनंद अनुभवण्यासाठीच आहे. नानांनी आयुष्यभर जणु हाच प्रसाद स्वतःच्या कलेतून, गायनातून भरभरून सर्वांना दिला. त्यास अनुभवून तर त्यांच्या काळास “गंधर्वयुग”  म्हणून मानले जाते!!

ह्या गंधर्वयुगाची सुरूवात २६ जून १८८८ ला नानांच्या जन्माने झाली, त्यास काल १३६ वर्षे झाली!! 

दोन दिवसांवर आषाढीवारीसाठी ज्ञानेश्वरमहाराज पालखी प्रस्थान आहे पंढरपूरकडे आणि कालच नानांचा जन्मदिवस झाला, म्हणून हा लेख ! हा एक योगायोगच! 

© श्री नंदन वांद्रे

पुणे

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डार्क वेब : भाग – 6 ☆ श्री मिलिंद जोशी ☆

श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 6 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

(ही अतिशय महत्वपूर्ण माहिती देणारी लेखमाला दर सोमवारी आणि मंगळवारी प्रकाशित होईल) 

मागील भागात डार्कवेब चांगल्या कामासाठी कोण आणि का वापरते याबद्दल चर्चा केली. आज मात्र डार्कवेबच्या अनुचित वापराबद्दल बोलणार आहे. यातील सगळ्यात वाईट गोष्ट ही की डार्कवेबचा ७०% ते ८०% वापर अनुचित गोष्टींसाठीच केला जातो. 

डार्कवेबवर त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात ज्याला सभ्य समाज मान्यता देत नाही. किंवा त्या त्या देशाचे कायदे अटकाव करतात. इथे तुम्हाला हत्यारांची खरेदीविक्री, माणसांची खरेदी विक्री, लहान मुलांच्या अश्लील फिल्म, आतंकवाद्यांचे परस्परातील व्यवहार या सगळ्याच गोष्टी येतात. कारण यावर कोणत्याही देशाच्या सरकारला किंवा सुरक्षा यंत्रणाना नियंत्रण ठेवणे शक्य होऊ शकत नाही. ज्यावेळी एखादी गोष्ट पूर्णतः बंद करणे शक्य नसते त्यावेळी त्या गोष्टीचा समाजासाठी चांगला वापर कसा करता येईल हेच बघणे जास्त फायदेशीर असते. आणि तेच अनेक देशांच्या सुरक्षा यंत्रणा करतात.

याचे एक उदाहरण देतो. अमीर खानचा एक चित्रपट आला होता. ‘सरफरोश’ नावाचा. त्यात दोन पात्र दाखवले आहेत. एक आहे इन्स्पेक्टर ‘सलीम’ आणि दुसरा आहे ‘फटका’ ( जो मुंबईच्या अशा भागात राहतो जिथे अपराधिक गोष्टी केल्या जातात. ) इन्स्पेक्टर सलीम कायम त्या ‘फटका’ला पैसे देऊन त्याच्याकडून वेगवेगळी माहिती मिळवत असतो. आता जर तो अधिकारी त्या भागात ये जा करत असेल तर त्याला ते बंद करता येणे शक्य नाहीये का? उत्तर मिळते, ‘नाही’. कारण त्याने एका ठिकाणी धाड टाकली तर तो व्यवसाय दुसऱ्या ठिकाणी चालू होईल. दुकान बंद करता येईल पण पण मानसिकता कशी बदलणार? त्यापेक्षा त्या गोष्टी तशाच चालू द्यायच्या, फक्त त्यातून समाजाचा समतोल ढळणार नाही याची काळजी घ्यायची. अगदी त्याच प्रमाणे अनेक सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी आपली ओळख लपवून डार्कवेबवर वावरत असतात. आणि त्या ठिकाणी जी माहिती मिळेल त्यातून समाजाचे कमीत कमी नुकसान होईल याचा प्रयत्न करतात. 

आता काहींना असाही प्रश्न पडेल की नुसते वावरल्याने माहिती कशी मिळते? डार्कवेबवर कायम वेगवेगळे समूह बनवले जातात. जे अगदी काही दिवसांपुरते किंवा अनेकदा तर काही तासांपुरते सक्रीय असतात. ज्या सदस्यांना अशा समुहात सामील व्हायचे असते त्यांना एक लिंक पाठवली जाते ज्याच्या आधारे ते त्या समूहात सभासद बनतात. ( whatsapp चा वापर करणाऱ्या माणसाला हे लगेच लक्षात येऊ शकेल. कारण त्याचे बरेचशे कार्य डार्कवेबसारखेच असते. ) त्या समूहाच्या माध्यमातून संदेश दिले घेतले जातात. किंवा मग एखादी खरेदी विक्री केली जाते. एकदा का त्याचा उद्देश पूर्ण झाला की तो समूह बंद केला जातो. आणि हेच कारण आहे की जोपर्यंत सुरक्षा यंत्रणा अशा समूहातील गोष्टी डिकोड करतात, समूह बंद केलेला असतो किंवा त्या सदस्यांनी आपले स्थान बदललेले असते. मग कसे कुणाला पकडता येईल?

तुम्हाला हे whatsapp चे उदाहरण यासाठी दिले कारण मध्यंतरी एका मित्राशी चर्चा करताना त्याने हा प्रश्न उपस्थित केला होता की, whasapp ला डार्कवेब म्हणता येईल का? इथेही सगळे संदेश एनकोड करून पाठवले जातात. इथे कधीही समूह तयार करता येतो, कधीही बंद करता येतो. इथे कोणकोणते समूह आहेत हे कुणालाही कुणी सांगितल्याशिवाय समजत नाही. तुम्हालाही हा प्रश्न पडला का? या प्रश्नांचे उत्तर आहे, ‘whatsapp ला डार्कवेब म्हणता येत नाही.’ याला दोन कारणे आहेत. पाहिले कारण म्हणजे इथे तुम्ही तुमच्या फोन नंबर किंवा इमेल आयडी वरून लॉगीन होतात. या दोन्ही गोष्टी तुमची ओळख असतात. म्हणजेच इथे तुम्ही आपली ओळख लपवू शकत नाहीत. आणि दुसरे कारण म्हणजे तुम्ही whasapp वर जे समूह बनवतात त्याचा डेटा जरी एनकोड केलेला असला तरी तो एका सर्व्हरवर साठवलेला असतो. आणि जर सुरक्षा यंत्रणानी सबळ कारण देऊन मागणी केली तर तो त्यांना मिळू शकतो.     

आता अजून एक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. नेटवर्क जर सर्व्हर आणि क्लाईंट मिळून तयार होते तर इथेही सर्व्हर असणार ना? हो असतोच. पण कोणत्याही सरकारचे त्यावर नियंत्रण नसते. सरकारला त्यावर का नियंत्रण ठेवता येत नाही हे मात्र पुढील भागात. 

– क्रमशः भाग सहावा 

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डार्क वेब : भाग – 5 ☆ श्री मिलिंद जोशी ☆

श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 5 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

खरे तर या भागात मी डार्कवेब वरील ‘रेड रूम’ याबद्दल भाष्य करणार होतो, पण मागील दोन भागात काही जणांनी विचारणा केली होती, ‘जर डार्कवेब इतके भयंकर असते तर लोक ते का वापरतात?’ किंवा ‘डार्कवेबचा वापर फक्त हॅकरच करतात का?’

एखाद्याला हे प्रश्न खूप बाळबोध वाटतील, पण हे प्रश्न बिलकुल बाळबोध नाहीत. कारण या प्रश्नांची उत्तरे आपल्या मनातील अनेक प्रश्नांचे निरसन करतात. त्यामुळे आजचा लेख याच प्रश्नांची उत्तरे काही प्रमाणात देणारा आहे. ‘काही प्रमाणात’ हा शब्दप्रयोग यासाठी केला, कारण इथे येणारा माणूस कोणत्या मानसिकतेचा असतो हे कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. अनेकदा माणसाची मानसिकता त्याला कुणी ‘ओळखत असते’ त्यावेळी वेगळी, आणि ‘ओळखत नसते’ त्यावेळी वेगळी असू शकते.

पहिल्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे झाले तर डार्कवेबचा वापर अनेक जण वेगवेगळ्या कारणासाठी करतात. त्यातील काही लोकांचा उद्देश चांगला असतो तर काहींचा वाईट.

ज्यावेळी कुणी डार्कवेबचा वापर करतो त्यावेळी ९९% त्याला त्याची ओळख लपवायची असते. डार्कवेब वापरण्यासाठी उपयोगात आणले जाणारे टोर ब्राउजर हेच काम करते. नव्वदच्या दशकात अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट आला होता. नाव होते शहंशाह. त्या चित्रपटात नायक पोलीस असतो. पण चित्रपटातील खलनायकांशी सामना करताना त्याला त्याचा गणवेश आड येणार असतो. कायद्याच्या चौकटीत राहून खलनायकांशी सामना करणे त्याला अवघड असते. त्यासाठी तो एक युक्ती योजतो. दिवसा लाचखोर पोलीस बनतो आणि रात्री शहंशाह बनून त्याच गुंडांना शिक्षा करतो. ज्यावेळी तो आपली ओळख बदलतो त्यावेळी आपोआपच त्याच्या मर्यादा कमी होतात. हीच गोष्ट इथेही असते. आपल्याला जर हे माहिती असेल की आपल्यावर कुणाचेतरी लक्ष आहे, किंवा कुणीही आपल्याला ओळखू शकतो, तर आपल्यावर अनेक मर्यादा येतात. तेच ज्यावेळी आपल्याला कुणी ओळखणार नाही अशी आपली खात्री पटते, आपले धारिष्ट्य वाढते. 

ज्यावेळी आपण इंटरनेटचा वापर करत असतो त्यावेळी आपली ओळख असते आपल्या कॉम्प्युटरचा आयडी. जो एकमात्र असतो आणि तो कधी बदलता येत नाही. आता काहींच्या मनात असाही प्रश्न निर्माण होईल, जर आयडी बदलता येत नाही तर टोर ब्राउजर आपली ओळख कशी बदलते? याचे उत्तर आहे मास्किंग. थोडक्यात नवीन मुखवटा चढवणे. ज्यावेळी तुम्ही एखादा मुखवटा चढवतात त्यावेळी तुम्ही बदलत नाहीत, तर तुम्ही दुसरेच कुणी आहे असा भास निर्माण होतो. तो एक प्रकारचा बनाव असतो. ‘बदलणे’ आणि ‘बदलला आहे’ असे वाटणे यात फरक असतो. टोर ब्राउजर तुमच्या खऱ्या आयपीवर दुसऱ्याच एखाद्या आयपीची लेअर चढवते. अशा अनेक लेअर चढल्यावर तुम्ही इतरांशी जोडले जातात. त्यामुळे तुम्ही खरे कोण हे शोधणे अवघड होऊन बसते. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. मी इथे ‘अवघड होते’ हा शब्द वापरला आहे, ‘अशक्य होते’ असे म्हटलेले नाही. कारण मी पहिल्यांदाच सांगितले आहे, टोर ब्राउजर आयपी बदलत नाही तर असलेल्या आयपीवर वेगळ्या आयपीची लेअर चढवते. जर एखाद्याने एकेक करून शेवटपर्यंत जायचेच ठरवले तर शेवटचा आयपी हा खराच असणार आहे. तो शोधण्यात जो वेळ लागेल त्या वेळात माणूस स्वतःला वाचविण्याचा वेगळा उपाय शोधतो. 

डार्कवेबचा वापर चांगल्या कामासाठी देशाच्या सुरक्षा यंत्रणा, सैन्य तसेच पोलीस यंत्रणा यांच्याकडून केला जातो. यामागील उद्देश म्हणजे समजा अशा ठिकाणाहून एखादी माहिती लिक झाली तरी त्यावर सहसा विश्वास ठेवला जात नाही. आपोआपच लोकांचा अविश्वास हे एक प्रकारे त्यांच्यासाठी सुरक्षाकवच म्हणून काम करते. काही पत्रकार देखील गोपनीय माहिती मिळविण्यासाठी किंवा ती उघड करण्यासाठी डार्कवेब वापरतात. त्याच प्रमाणे हॅकिंग क्षेत्रात करिअर करणारे लोकही नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी, त्याचे प्रयोग करण्यासाठी डार्कवेबचा वापर करतात. डार्कवेबसाठी वापरले जाणारे टोर ब्राउजर हे दर दिवसांनी नवीन अपडेट घेऊन येते. यावर कोणत्या जाहिराती नसतात, ते वापरायलाही फुकट आहे, तरीही याचे अपडेट येतात म्हणजे कुणीतरी त्यावर कायम काम करत असणार ना? मग त्यांना पैसा कोण देत असेल? याचा विचार केलाय कधी? अनेकांचा विश्वास बसणार नाही पण यासाठी फंडिंग करणारे अमेरिकन सरकार तसेच गुगल इंजिन सारख्या कंपन्या आहेत. 

डार्कवेबच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक मोठमोठे घोटाळे उघड झालेले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी अनेक अप्रिय घटना वेळेआधीच रोखण्यात यश मिळवले त्याचे कारणही हे डार्कवेब हेच आहे. ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू याच्या अगदी विरुद्ध आहे. छापा सोबत काटा असतोच ना. तो तर निसर्गनियम आहे. त्याला डार्कवेब तरी अपवाद कसे असणार? पण ते मात्र पुढील भागात. 

क्रमशः भाग पाचवा. 

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘पाऊसवेडे कवी…’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पाऊसवेडे कवी…’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

जीवघेण्या ग्रीष्म ऋतूची काहिली पृथ्वीचे अंग प्रत्यंग जाळतेय. जागोजागी भेगा पडून विच्छिन्न झालेली ही वसुंधरा जणू भग्न मूर्तीसारखी भकास बघतेय एकटक आसमंताकडे! या कोमलांगी प्रेयसीला समीराचे उष्ण श्वास अंतर्बाह्य पोळत आहेत, त्यावर ‘चंदनाची चोळी’ देखील शीतलता प्रदान करायला असमर्थ आहे! नजरेत प्राण एकवटून तिच्या अंतरीची आस वाट बघतेय, कुठं दिसतोय का ‘शामलवर्णीय मेघदूत’ अन त्याची चंचल खट्याळ सखी विद्युल्लता! कारण या दूताने ग्वाही दिल्याशिवाय तिचा प्रियतम अवतरतच नाही. अन एक दिवस या जीवघेण्या प्रतीक्षेचा अंत होतो. श्यामवर्णी मेघांच्या सेनेची अति जलद गरुडभरारी आसमंतात दृष्टिपथास येते! एका बाजूने आक्रमण करीत करीत संपूर्ण नीलाकाशाला व्यापून टाकीत युद्ध जिंकल्याच्या आनंदात त्यांचे गडगडाटी हास्य पृथ्वीला तिच्या प्रियकराची चाहूलच वाटते. मेघाच्या संगती त्याची प्रेयसी विद्युलता आपले चपलांगी हास्य करीत मेघांना रुपेरी रंगाने सजवते. हा जामानिमा तयार झाला की येतो पाऊस. आपल्या प्रेयसी वसुंधरेला कोवळ्या नाजूक सरींच्या स्पर्शाने हलकेच गोंजारून मग मात्र आवेगाने तिचे अंग अंग आपल्या सहस्रबाहू जलधारांनी कवेत घेत बरसतो! या प्रणयाचे साक्षीदार असतात वृक्षलता, आनंदाने आपला पिसारा फुलवून नर्तन करणारे मयूर आणि पावसाच्या एका थेंबानेच तृप्त होणारा चातक!

मंडळी, पाऊस म्हटला की सामान्यजनांना सय येते ती वाफाळलेल्या अदरक घातलेल्या कडक मीठी चाय अथवा जायफळ घातलेल्या धुंद वाफेने गंधाळलेल्या कॉफीची, सोबतीला गरमागरम कांद्याची किंवा तत्सम भजी असली तर ब्रम्हानंदी टाळी लागलीच म्हणून समजा आमची! पण या ‘कवी’ नामक फुलपाखरी गिरकी घेत पावसाचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तींची जातकुळीच वेगळी हो! आपण त्यांच्या शब्दभ्रमाच्या भुलभुलैयात मस्तपैकी जाणून बुजून बंदिस्त होऊन मज्जा मज्जा करीत ‘अंगे भिजली जलधारांनी’ असा अनुभव घ्यायचा!      

या मनोहर हिरवाईने लगडलेल्या, रंगीबेरंगी सुमनांच्या ताटव्याने बहरलेल्या वर्षाऋतूचा देखणा नायक असतो ‘पाऊस’! मराठी माणसाच्या मनांमनांत रुजलेले हिरवेजर्द काव्य म्हणजे बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांचे ‘बालभारती’ त प्रस्थापित ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे । क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ।।’ ही आद्य पाऊस कविता! कितीही वेळा वाचा, हिची सर्वकालीन हिरवीकंच हिरवाई कधीच कोमेजत नाही. या बहुप्रसवी भूमीचे सृजन याच पावसाने फुलते. उन्हाने त्रासलेल्या मानवाला तर हा पाऊस म्हणजे आनंदच नव्हे तर नवसंजीवनी देणारा ठरतो. म्हणून तर पावसाळा हा ‘ऋतू हिरवा ऋतू बरवा’ (कवयित्री-शांताबाई शेळके) आहे.   

‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा, 

पाचूचा वनी रुजवा

युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा’

लहान मुलांची (त्यांच्या लहानपणापासूनच) अन पावसाची गट्टी अश्शी घनदाट असते, की ‘ये रे ये रे पावसा रुसलास का माझ्याशी गट्टीफू केलीस का’ (कवयित्री-वंदना विटणकर) असे ती त्यालाच विचारतात. उत्तर मिळाले नाही तर मग ही मुले पाऊसदादाला सरळ एका ढब्बू पैशाचे आमिष द्यायलाही कमी करत नाहीत.  म्हणून तर अखिल बालक  मंडळी पहिल्या पावसाची एंट्री व्हावी म्हणून ‘ये रे येरे पावसा तुला देतो पैसा’, असे घोकत असतात. गोड छकुल्याने असा पैसा दिला की, गहिवरलेला आज्ञाधारक पाऊस लगेच हजर झालाच म्हणून समजा!  

आता बाळ थोडं मोठं झालं की त्याला अवचितच शाळा नामक खलनायिका भेटते. मग काय आता कवितेचा रागरंगच बदलतो. ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?’ (कवी-मंगेश पाडगावकर) असे म्हणत शाळेला वैतागलेली पोरं मग डायरेक्टली भोळ्या शंकरालाच साकडे घालतात. बघा कशी गंमत आहे, धो धो पाऊस अंगणात अन रानावनात कोसळतोय अन ही आई नावाची बाई मुलाला घरात कोंडून ठेवतेय! किती हा हिचा जाच! मग तिची विनवणी अन लांगूल चालन करावे लागणारच ना. ‘ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे’ (आमच्या अति लाडक्या कवयित्री-वंदना विटणकर) अन एकदाचं बाहेर पडलं की धुमशान पळतंय कसं बघा पोरगं पावसाच्या सरी झेलायला, अन गम्माडी गंमत करायला, दोस्तांबरोबर फेर धरत गाणी हवीच- ‘पिरपिर पिरपिर पावसाची, त्रेधा तिरपिट सगळ्यांची’ (परत वंदनाताईच हो!) किंवा झालंच तर ‘अग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ । ढगाला उन्हाची केवढी झळ । थोडी न् थोडकी लागली फार । डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ।।’ (कवी- संदीप खरे)

मैत्रांनो, आता जाऊ या तिथं, जिथं राधा अधीर होऊन म्हणतेय ‘रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे, पाणिच पाणी चहूकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे?’ (जनकवी पी. सावळाराम) निसर्ग कवी बा. भ. बोरकरांची ‘सरींवर सरी आल्या ग’ ही सदा प्रफुल्लित कविता आठवते कां? गोकुळात बरसणारा पाऊस, हिरवेगार कदंब वृक्ष, यौवनाच्या उंबरठ्यावर थबकलेल्या वेली, मेघांची गर्जना, विजेची पैंजणे आणि कृष्णधुन आळवणारी त्याची वेणू, यांच्या तालासोबत मनमोहक रंगांनी सजलेले आपले पिसारे फुलवीत मिरवणारे मयूर! त्यांच्यासोबत दुग्धधारांसारख्या भासणाऱ्या धवल जलधारांत सचैल न्हालेल्या गोपींचे कृष्णाशी एकरूप होण्याचे वर्णन बोरकरांनीच करावे! (ही समग्र कविता ऐकावी यू ट्यूब वर पु ल देशपांडेंच्या स्वरात!) 

☆ सरिंवर सरी: सरिंवर सरी… ☆

सरिंवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग

गोपी झाल्या भिजून-चिंब, थरथर कापती निंब-कदंब

घनांमनांतुन टाळ-मृदंग, तनूंत वाजवी चाळ अनंग

पाने पिटिती टाळ्या ग, सरिंवर सरी आल्या ग

मल्हाराची जळांत धून, वीज नाचते अधुनमधून

वनांत गेला मोर भिजून, गोपी खिळल्या पदी थिजून

घुमतो पावा सांग कुठून? कृष्ण कसा न उमटे अजून?

वेली ऋतुमति झाल्या ग, सरिंवर सरी आल्या ग

हंबर अंबर वारा ग, गोपी दुधाच्या धारा ग

दुधात गोकुळ जाय बुडून, अजून आहे कृष्ण दडून

मी-तू-पण सारे विसरून, आपणही जाऊ मिसळून

सरिंवर सरी आल्या ग, दुधात न्हाणुनि धाल्या ग

सरिंवर सरी: सरिंवर सरी….

कवी ग्रेस यांची ‘पाऊस कधीचा पडतो’ ही कविता मेघांनी आच्छादलेल्या आकाशासारखी गूढरम्य आहे. जणू विरहाचे दुःख डोळ्यांच्या पापण्यांतच थिजल्यासारखे वाटते!  

‘पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने

हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने’

मंडळी या निसर्गराजाच्या वर्षाऋतूत भावानुरागी कवीचे मन बरसणाऱ्या जललहरीं सोबत थुई थुई नाचत असते. या पावसाचे नखरेल रुप विविधरंगी आणि बहुढंगी! कधी कोमल हलकेच थेंबाथेंबाने अंगण भिजवणारा रोमांचकारक शिडकावा जणू स्मितहास्याची हळुवार लकेर, वा मंद शीतल समीराची झुळुकच, अथवा रसरंगात दंग असलेल्या मैत्रिणींच्या अंगांवर शिंपडलेले तजेलदार गुलाबपाणी समजा! या पावसाचा मूड पण वेगवेगळा असतो बरं कां! एखाद्या मैफिलीत जाणत्या शास्त्रीय गायकासारखा इंद्रधनुष्याच्या किनारीने नटलेली निलाकाशी शाल पांघरून कधी द्रुत तर कधी विलंबित तालात तो गायनी कला दर्शवतो, तर कधी हाच पाऊस नद्या, नाले, तडाग इत्यादींची तृष्णा एकाच वेळी भागवण्याकरता रसरसून अतिवेगाने अविरत बरसत असतो. 

ग्रीष्म ऋतूच्या गर्मीत तिष्ठत असलेल्या विराणी धरेला पहिल्याच भेटीत हळुवारपणे कवेत घेत तिच्यावर मृदगंधाची पखरण करणारा हा पहिला पाऊस तर कवीला अतिप्रिय, त्याच्या प्रणयिनीची आठवण करून देणारा! मंगेश पाडगावकर यांच्या प्रणयधुंद कवितेतील या ओळी पहिल्या ओलेत्या भेटीचे अत्तर शिंपीत येतात.  

‘भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।

धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।।

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ।

ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली ।

श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची ।।’

मैत्रांनो, या रमणीय वर्षा ऋतूचा अनुभव घेतल्यानंतर आता लेखाच्या अंती याच पावसाचे रौद्ररूप देखील स्मरण्याची वेळ आलीय! आकाश भयावह काळ्याकभिन्न राक्षससदृश मेघांनी संपूर्णपणे आच्छादलेले, त्यातच मध्ये मध्ये आपली समग्र शक्ती एकवटत सुरु असलेले विजेचे भीषण तांडव, नदी नाल्यांचा जीवानिशी मांडलेला आकांत ऐकणारे कुणीच नाही. ‘घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा’ (कवी- ग. दि. माडगूळकर) असा प्रलयंकारी घनघोर पाऊस वेड्यासारखा मुसळधार कोसळतोय. इतके दिवस पेरणी करून आकाशात डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी थिजले. अन आता त्याच पिकाची नासाडी करीत त्याच्या कमकुवत खोपट्याकडे तुच्छ नजरेने पाहणाऱ्या मस्तवाल पावसाला शेतकऱ्याची कारभारीण शिवी घालतेय, ‘आरं गाभ्रीच्या पावसा!’ (कवी – स्वप्निल प्रीत) 

‘आरं गाभ्रीच्या पावसा! आता कशी दया आली 

कवतिक नाही तुजं, जवा तहान आटली ।।धृ।।

ओली ठिगळाची चोळी, वर छप्पर गळते

कागदाच्या होडीवानी माजं खोपटं बुडते ।।१।।

आला पडशाचा ताप, कशी जाऊ मी कामाले

तुझा नाचणारा मोर, घास देतो का पोटाले ।।२।।

रित्या पोटी बाप ग्येला, डोळं होतं आभायाला

फक्त आईच्या डोयांत, तवा पाऊस पाह्यला ।।३।।

त्याच दुष्काळात माझं, सारं सपान सुकलं

आता नको तुझी माया, मन तुले उबगलं ।।४।।

प्रिय वाचकांनो, वरील लेखाकरता मी मुद्दामच बहुतेक गेय कविता निवडल्या आहेत. तुम्हाला भावणारी पावसाची नटरंगी रूपे एन्जॉय करतांना वाफाळत्या ‘चाया गरम’ बरोबर यू ट्यूबवर या कवितांचा आशयघन आस्वाद घ्यायला मात्र विसरू नका बरं कां! धन्यवाद! 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सर्वात श्रीमंत असलेला गरीब… – संकलन : प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ सर्वात श्रीमंत असलेला गरीब… – संकलन : प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

शाळेने पत्रक काढलं – यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल !

आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे, खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक विजार, एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात.

गरीब मुलगा शोधायचा कसा ? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण गरीब; तेही सर्वात गरीब म्हणून? मोठीच अडचण होती. तीन – चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे; पण लहान मुलांमधे अडचणीचं. शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं, जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची. 

मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफरचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं, “मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब…….?”

क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले, “सर आपल्या वर्गातला तो ज्ञानेश्वर आहे नं, तो सर्वात गरीब आहे. आम्ही सगळे त्याला माऊली म्हणतो. त्याची स्थिती फार खराब आहे.”

मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता. “कशावरून म्हणता?”

“सर. त्याचा सदरा दोन- तीन ठिकाणी तरी फाटलाय. त्याने शिवलाय; पण फाटलेला शर्ट घालतो. त्याची खाकी पँट तर नीट बघा, मागून दोन ठिगळं लावलेली आहेत. चपला त्याला नाहीतच. मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो. तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो. सर,ती भाकरीही कालचीच असते. भाजी कुठली सर? गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो,तो सर्वात गरीब आहे. शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी.”

मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली. पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते. ज्ञानेश्वर एवढा गरीब असेल? की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत? कारण, ज्ञानेश्वर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ, मोकळं होतं. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे. एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं, “पाहिलंस ! हे सातवीतल्या मुलाचे अक्षर. असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते. उत्तराला सुबक परिच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे………”

वह्यांचे गठ्ठे आणायला ज्ञानेश्वर सर्वात आधी धावत यॆई. माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे…… 

असा ज्ञानेश्वर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये, या गोष्टीचीच मला खंत वाटली. जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो…… अरेरे!…

मी खूप कमी पडतोय. ज्ञानेश्वर, गेल्या सहलीला आला नव्हता. अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती; पण त्याचं नाव यादीत नव्हतं. आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही. 

सहलीला आलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या ज्ञानेश्वरची मला आठवणही झाली नव्हती. केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे नॅशनल पार्क बघण्याचे राहून गेले. एका छान अनुभवाला मुकला होता तो. हा आनंद मी हिरावला होता. यादीत ज्ञानेश्वरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? ज्ञानेश्वर स्वत:हून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात ज्ञानेश्वरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता!

शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो. खरंच आहे, मुलांनी सुचवलेलं नाव. आर्थिक मदत, तीही भरघोस मदत ज्ञानेश्वरला मिळायलाच हवी. आता शंकाच नव्हती. त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि ज्ञानेश्वरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देऊन टाकले– ‘ज्ञानेश्वर पावसे, सातवी अ, अनुक्रमांक बेचाळीस’.

डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले, “खात्री केलीये ना सर? कारण थोडीथोडकी रक्कम नाही. या विद्यार्थ्याची वर्षाची फी, त्याचे शालेय शिक्षण साहित्य, गणवेश… इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे.”

मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं, “सर, त्याची काळजीच करू नका. वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर- ज्ञानेश्वर पावसेच आहे!”

एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो. ज्ञानेश्वरला मिळणारी मदत, त्यामुळे त्याचे आर्थिकदृष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही. 

दुसऱ्या दिवशी शाळेत लवकरच गेलो. देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फळा सजवला होता. त्यावर ‘गरीब असूनही आदर्श’ असं म्हणून ज्ञानेश्वरचं नाव होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो. इतक्यात खोलीच्या दाराशी ज्ञानेश्वर उभा दिसला. 

त्याच्या चेहऱ्यावरचा भाव समजत नव्हता. राग आवरावा तसा करारी चेहरा… “सर, रागवू नका; पण आधी त्या फळ्यावरचे माझे नाव पुसून टाका.”अरे, काय बोलतोयस तुला समजतय का?”चुकतही असेन मी. वाट्टेल ती शिक्षा करा; पण ते नाव… !!”

त्याच्या आवळलेल्या मुठी, घशातला आवंढा, डोळ्यातलं पाणी…… मला कशाचाच काही अर्थ लागेना. मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत, तो असा….. ?

“सर, मला मदत कशासाठी? गरीब म्हणून? मी तर श्रीमंत आहे.”

त्याची रफू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती. येतानाच त्याचे अनवाणी पाय पाहिले होते. शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली होती. 

“अरे पण…. ?”

“सर,विश्वास ठेवा. मी श्रीमंत आहे. कदाचित सर्वात श्रीमंत असेन… सर, मी गरीब आहे हे ठरवले कोणी? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला; पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज.”

अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले. त्याला उठवत मी म्हणालो, “ठीक आहे. तुला नकोय ना ती मदत, नको घेऊस; पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय?”

“सर, माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा, कुठल्याही विषयाच्या…. त्या पूर्ण आहेत. पुस्तकं मी सेकंडहँड वापरतोय… खरयं ! पण मजकूर तर तोच असतो ना? मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का? 

सर, माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी पहिल्या तीनात असतो. गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत. 

सर… सर,सांगा ना, मी गरीब कसा?”

ज्ञानेश्वर मलाच विचारत होता आता मघाचचं दु:खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं. 

“खरंय ज्ञानेश्वर. पण तुला या पैशाने मदतच…….”

“सर, मदत कसली? माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल. शाळाच फी देतीये म्हटल्यावर, मी वडिलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन! “

“म्हणजे?”

“वडील घरांना रंग द्यायचे काम करतात. कॉन्ट्रेक्टर बोलावतो तेव्हाच काम मिळते. तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात. चार पैसे मला मिळतात, ते मी साठवतो. सर, संचयिका आहे ना शाळेची, त्यातलं माझं पासबुक बघा. पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात… 

मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले दिसते….. 

म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं. पण सर, मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे. घरातले सगले काम करतात. काम म्हणज कष्ट. रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात. आई धुणं-भांडी करते. मोठी बहीण दुसरी-तिसरीच्या शिकवण्या घेते. सर, वेळ कसा जातो, दिवस कसा संपतो ते कळतच नाही…. शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत. तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी. सर, माझ्या घरी याच तुम्ही, माझ्याकडे पु. ल. देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे. …….. सर, आहे ना मी श्रीमंत?”

आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता. सर, शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो. रात्री देवळात होण्याऱ्या भजनात मीच पेटीची साथ देतो. भजनीबुवा किती छान गातात! ऐकताना भान हरपून जातं.”

त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता. अभावितपणे मी विचारलं,”व्यायामशाळेतही जातोस?”

“सर, तेवढी फुरसत कुठली? घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो.”

अंगावर एक थरार उमटला… कौतुकाचा. 

“ज्ञानेश्वर मित्रा, मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा..”

“म्हणूनच म्हणतो सर…… !”

“हे नाव ज्या कारणासाठी आहे, त्यात तू नक्कीच बसणार नाहीस. आमची निवड चुकली; पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल. शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून, हे पारितोषीक तरी………”

“सर, एवढ्यात नाही. त्याला वर्ष जाऊ द्या. मी अब्राहम लिंकन यांचं चरित्र वाचलं, हेलन केलर, विवेकानंद, आइन्स्टाईन यांचं चरित्र वाचलं. सर, हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट करून मोठी झाली. माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या, योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा; पण सर, नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल. जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल… सर….. प्लीज….. !”

वाचनानं, स्पर्धांतल्या सहभागानं, कलेच्या स्पर्शानं, कष्टानं……. त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती, संस्कारामुळे नम्रतेची झालर होती. आता मला माझ्या समोरचा ज्ञानेश्वर पावसे स्पष्ट दिसतही नव्हता. त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते. 

शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता. परिस्थिती पचवून,परिश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा ! श्रीमंत!

संकलन : प्रा. माधव सावळे 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १० — विभूतियोगः — (श्लोक ३१ ते ४२) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १० — विभूतियोगः — (श्लोक ३१ ते ४२) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम्‌ । 

झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी ॥ ३१ ॥

*

पावनकर्त्यात पवन  श्रीराम मी शस्त्रधाऱी

नक्र मी जलचरातील सरितेत गंगा सुरसरी ॥३१॥

*

सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन । 

अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्‌ ॥ ३२ ॥

*

विद्येमधील ब्रह्मविद्या मी तत्ववादही मी

सृष्टीचा समस्त आदी मध्य अंतही मी ॥३२॥

*

अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च । 

अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥ ३३ ॥

*

अक्षरगणातील अकार समासातील द्वंद्व समास मी

अक्षयकाल तथा विराटपुरुष धारणपोषणकर्ता मी ॥३३॥

*

मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम्‌ । 

कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥ ३४ ॥

*

कारण सर्वोत्पत्तीचे सर्वविनाशक मृत्यूचे पार्था मी

नारी कीर्ति लक्ष्मी वाणी स्मृती मेधा धृती क्षमा मी ॥३४॥

*

बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्‌ । 

मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ ३५ ॥

*

गेय वदांतील बृहत्साम छंदातील गायत्री मी

मासातील मी मार्गशीर्ष ऋतुश्रेष्ठ वसंत मी  ॥३५॥

*

द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्‌ । 

जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम्‌ ॥ ३६ ॥

*

कुटिलांमधील मी द्यूत प्रभावी पुरुषांचा प्रभाव

जेत्याचा विजय मी सात्त्विकांचा सात्विक भाव ॥३६॥

*

वृष्णीनां वासुदेवोऽस्मि *पाण्डवानां धनञ्जयः । 

मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥ ३७ ॥

*

वृष्णींमधील वासुदेव मी पांडवांतील धनंजय

मुनींमधील वेदव्यास मी कवींमधील शुक्राचार्य ॥३७॥

*

दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम्‌ । 

मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्‌ ॥ ३८ ॥

*

शास्त्याचा मी दंड विजीगीषूची नीती मी

गुह्याचा मी मौन ज्ञानीयांचे तत्वज्ञान मी ॥३८॥

*

यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन । 

न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम्‌ ॥ ३९ ॥

*

सजीवोत्पत्ती कारण मजला जाणून घे अर्जुना

चराचरात कोणी ही  वसूनी नसते माझ्याविना ॥३९॥

*

नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप । 

एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥ ४० ॥

*

मम विभुतींना वा मम तेजाला नाही अंत परंतपा

तुझ्यास्तवे मी सांगितला चरुनीया संक्षिप्त रूपा ॥४०॥

*

यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा । 

तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसम्भवम्‌ ॥ ४१ ॥

*

कांती शक्ती ऐश्वर्यपूर्ण जे वसते विश्वात

मम तेजाचा अंश तेथ झालासे अभिव्यक्त ॥४१॥

*

अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन । 

विष्टभ्याहमिदं कॄत्स्नमेकांशेन स्थितो जगत्‌ ॥ ४२ ॥

*

केवळ अंशाने माझ्या धारियले  विश्व समस्त

जाण इतुके चिकित्सका पार्था हेचि ज्ञान समस्त ॥४२॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी विभूतियोग नामे निशिकान्त भावानुवादित दशमोऽध्याय संपूर्ण॥१०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ देवर्षी नारद… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

 कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ देवर्षी नारद – –… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

 अहो देवर्षिधन्योऽयं  यत्कीर्ति शार्ङ्गधन्वन: |

गायन्माद्यन्निदं तंत्र्या रमयत्त्यातुरं जगत् ||

अहो! हे देवर्षी नारद धन्य आहेत. जे आपली वीणा वाजवीत भगवत-  गुणगायनात तल्लीन होतात व संसारदुःखाने तप्त जीवांना सदा आनंदित करतात.

नर=पाणी. जलदान, ज्ञानदान आणि सर्वांना तर्पण अर्पण करण्यात पारंगत असल्यामुळे त्यांना नारद म्हणतात. ते वेद, उपनिषदांचे पारखे, देवांचे उपासक, पुराणांचे पारखी, आयुर्वेद आणि ज्योतिष शास्त्राचे महान अभ्यासक, संगीत तज्ञ आणि प्रभावी वक्ता आहेत.

आद्य पत्रकार, महागुरू व एकमेव देवर्षी असे नारद मुनी  .देवर्षी नारद हे भगवान विष्णूंचे महान भक्त आहेत. ते विश्वाचे निर्माते ब्रम्हा आणि विद्येची देवी माता सरस्वती यांचे पुत्र आहेत. भारतातील ऋषीमुनींपैकी फक्त नारदमुनींनाच  देवर्षी ही पदवी मिळालेली आहे कारण देवत्व आणि

ऋषीत्व या दोन्हीचा समन्वय त्यांच्यात होता. त्यांना ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाले आहे. त्यामुळे ते  आकाश, पाताळ ,पृथ्वी या तीनही लोकात भ्रमण करून  देव ,संत महात्मे ,इंद्रादी शासक आणि जनमानसाशी थेट संवाद साधू शकत. त्यांची सुखदुःखे जाणून घेत अडचणी निवारण्याचा प्रयत्न करत म्हणूनच ते देवांना जेवढे प्रिय होते तेवढेच ते राक्षस कुळामध्येही प्रिय होते. पृथ्वी आणि पाताळ लोकातील माहिती देवांपर्यंत पोहोचवण्याचे काम देवर्षी नारद करत म्हणूनच त्यांना आद्य पत्रकार म्हटले जाते. ते सडेतोड पत्रकार होते.  उन्हाळ्यात जल व्यवस्थापनाचा संदेश देताना नारद मुनींनी वाटसरूंसाठी रस्त्यावर ठिकठिकाणी पाणपोयी उभारण्याची कल्पना सर्वप्रथम राबवली. त्यांनी अनेक स्मृती रचून त्यात दंड विधान निश्चित करण्याचे काम केले. दंडाच्या भयाने तरी मानवाने गुन्हेगारी वृत्तीकडे वळू नये असा त्यांचा हेतू होता. त्यांच्या एका हातात वीणा असते तर दुसऱ्या हातात चिपळ्या. त्याद्वारे ते भक्तीचा प्रसार करत. कीर्तन भक्तीचे श्रेय नारद मुनींनाच आहे. नारद मुनी जगाला भक्तीचा सोपा मार्ग दाखवणारे, भक्तीरसाचा सुगंध देणारे मुनी आहेत .भक्ती म्हणजे काय हे जगाला पटवून सांगणारे देवर्षी नारद धर्मशास्त्रामध्ये पारंगत आहेत. त्यांनी नारद पुराणाची रचना केली. ते स्वतः उत्तम वक्ते आणि श्रोताही आहेत .भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, राजा अंबरीश अशा महान व्यक्तिमत्त्वांना भक्ती मार्गावर त्यांनी नेले. नारद पुराण हे मानवाच्या सहिष्णुवृत्तीचे आदर्श उदाहरणच आहे. सर्व विषयात पारंगत नारद मुनी संगीताचे महागुरू आहेत. वीणा हे त्यांचे प्रिय वाद्य .सनत्कुमार कुलगुरू असलेल्या सर्वात पहिल्या विद्यापीठात नारदांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी सर्व विषयातील त्यांचे प्रभुत्व पाहून सनत्कुमार थक्क झाले होते. गॉड पार्टिकल किंवा ईश्वरीय कणाची संकल्पना त्यांनीच प्रथम मांडली. त्यांनी ज्योतिष विज्ञानाच्या व्यावहारिक  वापराविषयी खगोलीय परिणाम सांगून रचना स्पष्ट केल्या. अतिसूक्ष्म परमाणूंपासून अतिविशाल विष्णू या कर्त्याच्या रूपात भ्रमण करत विश्वाला प्राणवायू प्रदान केला जातो .विष्णू म्हणजे विश्व+ अणु अशी व्याख्या त्यांनी केली.

नारद मुनींनी भृगु कन्या लक्ष्मीचा विवाह विष्णूशी लावून दिला. इंद्राची समजूत घालून ऊर्वशी आणि पुरुरवा यांचे सूत जमवले. महादेवांकडून जालंधरचा विनाश करवला. कंसाला आकाशवाणीचा अर्थ समजावला. इंद्र, चंद्र, विष्णू, शंकर ,युधिष्ठिर, राम,कृष्ण यांना उपदेश देऊन कर्तव्याकडे वळवले. ते ब्रह्माजींकडून संगीत शिकले .ते अनेक कला व विषयांत पारंगत आहेत. ते त्रिकालदर्शी आहेत. वेदांतप्रिय, योगनिष्ठ ,संगीत शास्त्री, औषधी ज्ञाता, शास्त्रांचे आचार्य व भक्ती रसाचे प्रमुख मानले जातात. ते श्रुती- स्मृती, इतिहास, पुराण, व्याकरण, वेदांग, संगीत, खगोल- भूगोल, ज्योतिष ,व योग यासारख्या अनेक शास्त्रांचे प्रचंड गाढे विद्वान आहेत.

त्यांनी पंचवीस हजार श्लोकांचे प्रसिद्ध नारद पुराण रचले. नारद संहिता हा संगीताचा उत्कृष्ट ग्रंथ रचला. नारद के भक्तिसूत्र, बृहन्नारदीय उपपुराणसंहिता,

नारद- परिव्राज कोपनिषद व नारदीय शिक्षेसह अनेक स्तोत्रे देखील त्यांनी रचलेली आहेत.

काही कारणामुळे प्रजापती दक्षाने त्यांना शाप दिला की दोन मिनिटापेक्षा जास्त काळ ते कुठेही राहू शकणार नाहीत. त्यामुळे नारद सतत भ्रमण करत असतात. ब्रह्माजींच्या शापामुळे ते आजीवन अविवाहित राहिले. त्यांच्या नावावर नारदभक्तिसूत्रे, नारद स्मृती, नारदपंचरात्र, संगीत मकरंद, राग निरूपण, पंचसारसंहिता, दत्तील नारदसंवाद असे ग्रंथ आहेत.

कळलावे आणि कलहप्रिय अशी त्यांची ख्याती आहे. पण या दोन्हींतून ते चांगल्याच गोष्टी करत होते.

नारद मुनींच्या काही मिनिटांच्या सत्संगाने वाल्याचा वाल्मिकी झाला. ते महर्षी वेद व्यासांचे गुरु होते.

नारदमुनी अमर आहेत. त्यांना कोटी कोटी प्रणाम.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘सावरकरांचा हास्यविनोद करतानाचा फोटो !’… लेखिका : श्रीमती नीलकांती पाटेकर ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘सावरकरांचा हास्यविनोद करतानाचा फोटो !’… लेखिका : श्रीमती नीलकांती पाटेकर ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सावरकरांचा हास्यविनोद करतानाचा फोटो ! … मी प्रथमच असा बघितला.

खूप वर्षांपासून शोधत होते.त्यांचा कुठलाच फोटो असा नाहीये.आणि मला तर असा फोटो बघायचाच होता.म्हणून मी चित्रा, माझी मैत्रीण,तिला म्हटलं, “मला त्यांना हसताना बघायचं आहे.”

हा तिने आत्ता पाठवला. बघितल्यावर कित्येक वर्षांची कोंडी फुटली.

सश्रम कारावासाच्या २ जन्मठेप शिक्षा….

११वी मध्ये कविता होती… ‘जयोस्तुते…’ नंतर नाटक वाचलं – ‘संन्यस्त खड्ग’.नंतर…

जिथं मिळेल तिथं वाचणं.

त्यांचं साहित्य वाचून वाटायचं, ‘किती प्रगल्भ, बुद्धिमान व्यक्ती ही!आणि त्यांनी सश्रम कारावास भोगला, अख्खं तारुण्य त्यात गेलं. साधं स्वस्थ आयुष्य कधी जगले असतील ते? काही हलकेफुलके क्षण असतील का त्यांच्या वाट्याला? अनेक क्षणी अनेक विचार.

शिवाजीपार्क मध्ये रहात होते, तेव्हा शेजारच्या मधुकरनी,आत्ताच्या उद्यान गणेशच्या मागची त्यांची बसायची जागा दाखवली.

समोरच सावरकर स्मारक आहे. आता “ते पार्काकडे तोंड करून, कित्येक तास बसायचे”… म्हणाला तो. आपल्याला स्वातंत्र्य मिळून बरीच वर्षं झाली होती.कदाचित हा मोकळा श्वास, त्याची आस, कसं समजणार मला हे? पार्काला फेरी मारताना, मला त्या जागी उगाचच जाणवायचे. गोल भिंगातले घारे तीक्ष्ण डोळे, कित्येक वर्षांच्या सश्रम कारावासाचा थकवा शरीरावर असावा. पण डोळ्यातली भेदकता तितकीच तीव्र असावी. त्यातच कधीतरी त्यांना हसरं बघायची इच्छा झाली मला.वाटलं, असेल की कुठं एखादा फोटो पण आज ५४ वर्ष झाली त्याला. 

हल्लीच चित्राला म्हटलं, बघायचं आहे त्यांना, हसताना. मध्ये काही दिवस गेले आणि आज अचानक हा फोटो पाठवला तिनं. एरवी एकच स्टँडर्ड फोटो बघितला आहे. योगायोग कसा बघा. आज सकाळी, कुठला तरी जुना पेपर हाती आला. लता मंगेशकर, हृदयनाथ आणि ब. मो. पुरंदरे दिसले फोटोत. उत्सुकतेनं लेख वाचला, शिव कल्याण राजा. राज्याभिषेकाला साडे तीनशे वर्षे झाली शिवाजी महाराजांच्या ! ५० वर्षांपूर्वीची LP त्यात सावरकरांची कविता घेतली होती. हृदयनाथांनी लिहिलेला लेख तो.रमून गेले पार मी. त्यात असलेलं प्रत्येक गाणं – ते त्यात का समाविष्ट झालं, त्याचं प्रयोजन… हृदयनाथांना भेटले नाही कधी पण दीदीच्या  संदर्भातली  गाण्याची प्रत्येक गोष्ट त्यांच्या तोंडून ऐकताना राजसूय यज्ञात, यज्ञवेदीच्या रक्षेत लोळून, सोनेरी झालेल्या मुंगुसाप्रमाणे होते स्थिती माझी. ती हुरहूर जागवते, आत खोल जागवते निष्ठा आणि बरंच काही…

त्या LP मधले कवी दिग्गज.त्यात सावरकरही…पुन्हा तीच ओढ, त्यांना हसताना बघायचं.

आणि नोटीफिकेशनचा टोन वाजला.

बघितलं तर फोनच्या डोक्यावर लिहून आलं, चित्रा फडके. मी सगळं सोडलं हातातलं आणि उघडलं पेज, तर हा फोटो, म्हटलं तिला लगेच, ” व्वा ! किती छान वाटलं बघूनच ! डोळे निवले. बाकीचे दोघेही आहेत. पण मला दिसलं, त्यांचं हसू…” कुणाला वाटेल, काय वेडेपणा!

एव्हढी काय ती तगमग! हो. तगमगच. इतक्या वर्षांच्या सश्रम कारावासात, हरवलं तर नाही ना, हसू त्यांचं…? आयुष्यातली इतकीशी, इवलीशी गोष्ट हरवली आणि ज्या आमच्यासाठी त्यांनी कारावास भोगला, त्या आम्हाला साधी जाणीवही नाही ? आणि ओढ लागली त्यांचा हसरा चेहेरा बघायची, इतकंच…

लेखिका : श्रीमती नीलकांती पाटेकर 

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य –  इंद्रधनुष्य ☆ झाशीवाली शौर्य शालिनी ! – भाग – २ – लेखिका : मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी (नि.) ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ झाशीवाली शौर्य शालिनी ! – भाग – २  – लेखिका : मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी (नि.) ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

किल्ल्याला वेढा देत इंग्रजांनी २५ मार्च १८५८ रोजी झाशी किल्ल्यावर प्रत्यक्ष आक्रमण केलं. मेजर जनरल हयू रोज समोर मोठं आव्हान होतं. त्यावेळी त्यांना रसद उपलब्ध होऊ नये म्हणून भोवती गवताचं पातंही शिल्लक न रहाण्याची खबरदारी तिनं घेतली होती अशी नोंद सर हयू रोज करून ठेवतो. तोफा आग ओकत होत्या. चकमकी वाढत होत्या. रातोरात पडलेल्या भिंती उभ्या करून राणी सैन्याला सतत प्रेरित करत होती. जखमी,आश्रितांची व्यवस्था, दारुगोळा, अन्नछत्र अशा विविध पातळ्यांवर राणी अहोरात्र झुंजत होती. मदतीला येणारे तात्या टोपेही तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत हे ऐकून राणीचे सरदार निराश झाले तेव्हा ही झाशीवाली त्यांच्यावर कडाडली! स्वबळावर ही लढाई सुरूच ठेवण्यासाठी तिनं त्यांचं मन वळवलं. ३ एप्रिल रोजी किल्ल्याची भिंत फोडून इंग्रज आत शिरले तेव्हा राणीनं आत्माहुती न निवडता मोठंच धाडस दाखवलं. अशाही परिस्थितीत स्थिर चित्तानं पुढची निरवानीरव करत ११/१२ वर्षांच्या दामोदरला घेऊन ती बाहेर पडली. अंगात चिलखत,कमरेला विशाचं पाणी दिलेला जंबिया, एक मजबूत तलवार साथीला. आता पुन्हा कधी झाशीचं दर्शन!

झाशीतली भीषण लढाई, पाठलाग करणाऱ्या वॉकरशी झालेलं द्वन्द्व यानंतर अन्नपाण्याविना राणी लक्ष्मीई सलग १०२ मैल (१६४ किलोमीटर्स) एवढी घोडदौड करत मध्यरात्री काल्पी इथे पोहोचली. हे प्रचंड अंतर आहे. आज चांगल्या रस्त्यावरून,गाडीनं कमीत कमी अडीच-तीन तास लागणारं हे अंतर तेव्हा डोंगराळ असताना, रात्रीच्या गडद अंधारात, प्रचंड तणावाखाली राणीनं कसं पार केलं असेल? मुळात हाच घोडदौडीचा, आत्यंतिक धाडसाचा तिचा पराक्रम भारतीय इतिहासात नोंदवलेला आहे. काल्पीला पोहोचताक्षणीच घोड्यानं अंग टाकलं पण रजस्वला अवस्थेत पोहोचलेल्या राणीनं तशातही मोठंच बळ एकवटलं. पुन्हा हिंमत बांधली.

एवढ्या कडक सुरक्षेतून राणी निघून गेली हे कळताच सर हयू रोज संतापला. राणीचे वडील मोरोपंत तांबे यांना ५ एप्रिल रोजी भर दुपारी सर हयू रोजनं झाशीच्या राजवाड्यासमोर जाहीरपणे फासावर चढवलं. झाशीची प्रचंड लूट सुरू झाली. मोठा नरसंहार झाला. प्रत्यक्ष तिथे असलेला डॉ. थॉमस लिहितो, “Death was flying from house to house with mercurial speed, not a single man was spared. The streets began to run with blood.”

हे ऐकल्यावर राणीची काय अवस्था झाली असेल? त्यातूनही ती पुन्हा उभी राहिली! दुर्मिळातल्या दुर्मिळ अशा स्त्री मधल्या अद्वितीय शौर्याला प्रकट करणारं राणीचं एकेक धाडस वंदनाला पात्र आहे. रावसाहेब पेशव्यांच्या पायावर तलवार ठेवत या रणरागिणीनं त्यांना पूर्वजांच्या पराक्रमाचं स्मरण करून दिलं. पेशवे, नवाब यांच्या साथीनं राणीनं १५ में रोजी काल्पीजवळ मोठाच लढा दिला. वीजेसारखी तिची समशेर शत्रूसंहार करत चौफेर फिरली.

काल्पी इंग्रजांच्या हाती लागल्यावर पुनश्च हरि ॐ! छत्रपतींचा आदर्श डोळ्यांसामोर ठेवत ग्वाल्हेरचा किल्ला घेण्याचा आग्रह तिनं धरला. इंग्रजांची साथ देत पेशव्यांवर चालून आलेल्या जयाजीराव शिंदेंचा चोख बीमोड केल्यावर त्यांच्या सैन्यातली मराठी अस्मिता जागवून आपल्या बाजूनं वळवण्याचं मोठं काम राणीनं केलं. केवळ साधनांवर युद्धं जिंकली जात नाहीत तर त्यासाठी पराक्रम हवा हे राणी लक्ष्मीबाईनं पुन्हा पुन्हा सिद्ध केलं.

आता मात्र अंतिम लढाई! १७ जून १८५८. इंग्रजांचा तळ ब्रिगेडियर स्मिथच्या नेतृत्वाखाली कोटा की सराई इथे उभारण्यात आला होता. एक नव्या शुभ्र घोड्यावर स्वार झालेली राणी घोड्यावरून फिरत, सैन्यरचना करत होती, योजना समजावत होती. ते तिचं स्वतःचं सैन्य नसून ठिकठिकाणचं एकत्र झालेलं विस्कळीत सैन्य होतं. ती त्यांचा मनापासून गौरव करत होती, त्यांचं मनोबल उंचावत होती. इंग्रजांच्या ९५ व्या पायदळ तुकडीनं रेन्स या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली धावा पुकारला. भोवती कोरडे तसंच पाणी असणारे ४-५ फुट खोलीचे मोठे नाले, उंचसखल भाग कशाची तमा न बाळगता राणी सैन्य समुद्राला भिडली! राणी, तात्या, नवाब,सगळं सैन्य यांच्यात स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची एक अभूतपूर्व अशी उंच लाट उसळली होती! राणी दिवसभर अथकपणे लढली.

लढाईचा दुसरा दिवस. राणीच्या घोड्याला मोठा नाला ओलांडता न आल्यानं तो संथ झाला आणि तेवढ्यात राणीच्या मस्तकावर मागून आघात झाला. मागचा भाग विच्छिन्न झाला. समोरून सपासप वार झाले. डोळा बाहेर आला. छातीवर, अंगावर मोठ्या जखमा होऊन रक्तबंबाळ लक्ष्मीबाई कोसळली. अखेरचा श्वासही स्वातंत्र्य देवतेला अर्पण करून ती अनंतच्या प्रवासाला निघून गेली. आकाशानं टाहो फोडला. रामचंद्र देशमुखांनी राणीनं सांगून ठेवल्याप्रमाणे तिचा देह शत्रूच्या हाती लागू दिला नाही. एका कुटीजवळ नेऊन त्यांनी शिताफीनं तिला अग्नी दिला. तात्यां टोपेनच्या टोपेंची मनू त्यांच्या पुढे निघून गेली!

राणीबरोबर प्रत्यक्ष लढलेला स्वतः सर हयू रोज अंतर्मुख होऊन राणीविषयी लिहितो – “Although a lady, she was the bravest and best military leader of the rebels. A man among the mutineers.”

स्वा. सावरकरांचे शब्द जणू प्रत्येक भारतीयाच्या मनातला राणी लक्ष्मीबाईविषयीचा गौरव प्रकट करतात- “जातीने स्त्री, वयाने पंचविशीच्या आत, रूपाने खूबसूरत,वर्तनाने मनमोहक, आचरणाने सच्छील,राज्याचे नियमनसामर्थ्य, प्रजेची प्रीति, स्वदेशभक्तीची जाज्वल्य ज्वाला, स्वातंत्र्याची स्वतंत्रता,मानाची माननीयता, रणाची रणलक्ष्मी ! ‘लक्ष्मीराणी आमची आहे’ हे म्हणण्याचा मान मिळणे परम दुष्कर आहे. इंग्लंडच्या इतिहासाला तो मान अजून मिळालेला नाही! इटलीतील राज्यक्रांती इतकी वीररसयुक्त असतांनाही तसल्या उदात्त प्रसंगातही इटलीच्या गर्भात राणी लक्ष्मीसारखा गर्भसंभव नाही!लक्ष्मीच्या अंगात जे रक्त खेळत होते ते रक्त, ते बीज, ते तेज आमचे आहे’ ही यथार्थ गर्वोक्ती करण्याचे भाग्य, हे भारतभू, तुझे आहे!”

— समाप्त —

लेखिका : मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)

प्रस्तुती : जुईली केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares