मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ऐक परमार्थाचे साधन… ☆ विवेचन : श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ऐक परमार्थाचें साधन… ☆ विवेचन : श्री संदीप रामचंद्र सुंकले 

ऐक परमार्थाचें साधन । जेणें होय समाधान । तें तूं जाण गा श्रवण । निश्चयेंसीं ॥

(दास.०७.०८.०१)

सरळ अर्थ :-

श्रीसमर्थ म्हणतात की, आता परमार्थाचे साधन सांगतो, ते ऐका. ज्या साधनाच्या योगे निश्चितपणे समाधान प्रास होते ते साधन म्हणजे श्रवण होय, हे तू जाणून घे.

विवेचन:- 

श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्ये नमः ।। श्री गुरुवे नमः ।।

जन्माला आलेला जीव सर्वप्रथम श्रवण करायला शिकतो, म्हणून भक्तीच्या नऊ प्रकारांमध्ये श्रवण भक्तीस पहिले स्थान प्राप्त झाले असावे. मूल जन्माला आले की त्याच्या कानाशी टिचकी वाजवून त्याला ऐकायला येते कीं नाही याची खात्री पूर्वीच्या काळी सुईणी करीत असत. मनुष्य सर्वप्रथम ऐकायला शिकतो, अर्थात मनुष्य श्रवण प्रथम करतो आणि कालांतराने बोलू लागतो. काही मुलांची जीभ जड असते. काही मुलं मुकी असतात. पण शास्त्र असे सांगते की ज्याला ऐकायला येते तोच बोलू शकतो. त्यामुळे ज्याला ऐकायला येते, तो लगेच बोलू शकला नाही, तरी नंतर बोलू शकतो.

शब्द श्रवण करायचा असतो. विद्वानाला बहुश्रुत म्हणतात; कारण त्याने खूप श्रवण केलेले असते. ग्रंथांचे वाचन हे एक प्रकारचे श्रवणच असते. अर्थात शब्द वाचणे आणि कोणाच्या तोंडून ऐकणे यात फरक राहणारच. ज्याला परमार्थ साधन करावयाचे आहे, त्याने एखादा सर्वमान्य संत-ग्रंथ घ्यावा आणि तो मनापासून, सावकाश, अनेक वेळा वाचावा. अशा प्रकारे ग्रंथांचे वाचन-मनन केल्यास श्रवणभक्ती घडते. श्रवणाने अनेक संशय फिटतात, भाव स्थिरावले जातात आणि भगवंतांचे प्रेम मिळते.

ज्ञानेश्वरी मधील नवव्या अध्यायातील पहिली ओवी

“तरी अवधान एकले दीजें । मग सर्व सुखासि पात्र होईजे । हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ।।  (ज्ञा. 9.1)

श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात, *’अहो श्रोते हो, तुम्ही एकवेळ श्रवणाकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका.

“ज्ञाना’चे ईश्वर म्हणता येईल अशी आपली ज्ञानेश्वर माऊली कळकळीने आपल्याला सांगत आहेत की श्रोते जनहो अवधान देऊन ऐका. अवधान द्या म्हणजे लक्ष देऊन ऐका. एकदा चित्रपट पाहिला की अनेकांची चित्रपटातील गाणी पाठ झालेली आपण पाहिली असतील. परंतु अभ्यासाची कविता असो किंवा मनाचे श्लोक असो. ते पटकन पाठ होत नाहीत किंवा प्रवचन कीर्तन ऐकताना अनेकांवर निद्रादेवी प्रसन्न होत असते. मनुष्य मनापासून, त्यात रस घेऊन, एकाग्रतेने ऐकत नाही, अर्थात अवधान देऊन ऐकत नाही हेच खरे!!

*मनुष्य लक्षपूर्वक ऐकायला शिकला तर त्याच्या जीवनातील ५०% समस्या कमी होतील असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. या श्रवण भक्तीच्या अभ्यासाच्या निमित्ताने आपण आजपासून ‘ऐकायला’ आणि ‘ऐकून घ्यायला’ सुरुवात करू.

जो मनुष्य पूर्ण एकाग्र होऊन संतांच्या ग्रंथाचे श्रवण करतो, त्याच्या मनाचा तळ आणि मनाच्या तळाशी असलेला मळ दोन्हीही अगदी स्वच्छ होऊ शकते. उत्तम श्रोता असलेला मनुष्य कोणताही विषय सहज समजून घेऊ शकतो आणि त्यामुळे त्याची  लौकिक आणि पारलौकिक जीवनात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते.

श्रवण करणे याचा आणखी एक अर्थ आहे कृती करणे. उदा. एखाद्या मनुष्याला दुसऱ्याने पाणी आणून दे असे सांगितले. त्याने ते नीट ऐकले. दोनचार मिनिटे अशीच गेली. दुसऱ्याने त्याला पुन्हा आठवण केली. तरी तो ढीम हलला नाही. शेवटी थोड्या त्राग्याने दुसऱ्याने पुन्हा विचारले की मी बोललो ते ऐकलस ना. तर तो हो म्हणाला. मग पाणी का देत नाहीस ? तेव्हा तो म्हणाला की तेवढंच करायचं राहिलं. लौकिक जीवनांत अथवा पारलौकिक जीवनात अनेक लोकं बरेंच काही ऐकतात, कधीकधी तर अगदी तल्लीन होऊन ऐकतात. परंतु त्यांच्या हातून योग्य ती कृती घडत नाही. अशा प्रकारचे लोकं लौकिक अथवा पारलौकिक जीवनात यशस्वी होणे अवघड आहे. म्हणून ज्याला साधक व्हायचे आहे, त्याने आधी ऐकायला शिकावे. काय ऐकायचे ?  कसे ऐकायचे ? कोणाचं ऐकायचे याचा विचार आपण पुढील लेखांत करू. जाता जाता एक वाक्यावर आपण चिंतन करू. ‘समोरचा मनुष्य जे बोलतो ते ऐकायलाच हवे परंतु तो जे बोलू शकत नाही ते सुद्धा ऐकता यायला हवे.’

जय जय रघुवीर समर्थ!!

विवेचन : श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बालगंधर्वांची अखेर..!! – लेखक : श्री वसंत शा. वैद्य ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ बालगंधर्वांची अखेर..!! – लेखक : श्री वसंत शा. वैद्य ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले 

*१४-१५ वर्षांपूर्वी स्वत: पाहिलेली विलक्षण घटना..!!*

त्या दिवशी नेमका मी पुण्यात होती. दुपारच्या जेवणाची वेळ..!! मी नारायण गेटाजवळच्या माझ्या घरून पान खाण्यासाठी बाहेर आलो होतो. गेटजवळच्या पानाच्या दुकानाकडे वळणार, इतक्यात माझ्या अगदी समोर चार-सहा फुटांच्या अंतरावर एक प्रेतयात्रा येताना दिसली. मी त्वरेने मागे धावलो. रस्त्याच्या कडेला उभे राहून बघू लागलो..!! बघतो तो काय..!! त्या प्रेतयात्रेत मोजकीच माणसे सामील झालेली ..!! चौघांनी प्रेताची ताटी खांद्यावर घेतलेली, एकाने पुढे विस्तव धरलेला, आणि बाकीची शेलकीच माणसे भरधाव वेगात जात असलेली ‌‌..!! ती जवळ-जवळ सर्वच माणसे परिचित चेहर्‍यांची ..!! पुण्याच्या नाट्य-क्षेत्रात प्रत्यही दिसत असलेली. नाट्य-क्षेत्रातील सभा-संमेलनात माझे नेहमी जाणे-येणे असायचे. त्यावेळी तेथे दिसणारी प्रमुख माणसे, त्या प्रेत-यात्रेत दिसली. मी तशा स्थितीतही शेवटून जाणाऱ्या एका परिचितांना हळूच विचारून घेतले..!!*

‘कोण ..??’*

न थांबता त्यांनी कुजबुजत्या स्वरात सांगितले…. “अहो ..गंधर्व ..बालगंधर्व” ..!!*

साक्षात बालगंधर्वाची प्रेतयात्रा ..!! अणि ती देखील इतक्या थोड्या माणसांच्या उपस्थितीत ..??*

*-बालगंधर्व ..* .. *- सौभद्र ..*.. *- स्वयंवर ..*.. *- मृच्छकटिक ..*  *-एकच प्याला ..*..  *”जोहार मायबाप जोहार .. अन्नदाते मायबाप हो ..!!”*…. हे सारे क्षणात डोळ्यांपुढे उभे राहिले. पान खाण्याची इच्छा पार मावळून गेली ..!!*

ओंकारेश्वराच्या समोरील नदीच्या किनाऱ्यावरल्या बंदिस्त आवारात, प्रेत खाली ठेवण्यात आले. कुणीतरी त्वरेने पुढे झाले. लाकडे रचण्यात आली. प्रेत नदीच्या पाण्यात भिजवून आणले. प्रेताचा गोरा-पान चेहरा तशा अचेतन अवस्थेतही देखणा दिसत होत. प्रेत ठेवल्यावर सरणाच्या फटी सगळीकडून बंद करण्यात आल्या. मडके धरून आणणार्‍याने अग्नीचे चार निखारे सरणावर टाकले. दुसर्‍या बाजूने रॉकेल ओतण्यात आले. कुणीतरी काडी ओढून ती सरणावर टाकली. आग भडकली. पाहता पाहता आगीच्या ज्वाळा गगनाला भिडल्या. आतून तडतड असे आवाज येऊ लागले. पाहता पाहता जळून गेलेली धगधगती लाकडे चोहीकडून राखेच्या स्वरूपात खाली गळून पडू लागली. एक भलामोठा आवाज झाला. त्यावर कुणीतरी उदासपणे म्हणाले, ‘संपलं सगळं ..!! चला आता ..’!!

घरी आलो. चार वाजून गेले होते ..!! बालगंधर्वांची प्रेतयात्रा ,अशा घाईगडबडीने आणि पुण्यासारख्या त्यांच्या कर्मभूमीत, कसलाही गाजावाजा न करता, गुपचूपपणे का उरकून घेण्यात आली ..?? त्याचे कारण दुसरेतिसरे काही नसून स्वत: बालगंधर्व नारायणराव राजहंस यांचा लहरीपणा आणि त्यातून उद्भवलेले त्यांचे दुर्दैव हेच आहे ..!!

गोहरबाईसारख्या एका रूपवती नटीशी त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात विवाह केला व तिच्या पायावर तन-मन-धन सर्वस्व वाहून टाकले. तिच्यासाठी नारायणरावांनी मुसलमान धर्म स्वीकारला. मुंबईला माहीम भागातील तिच्या वसतीस्थानात नारायणराव राजी-खुषीने राहायला गेले. गोहरबाईने महाराष्ट्राच्या या लाडक्या गंधर्वाला जवळ केले ..!! त्यावेळी वास्तविक पाहता या गंधर्वाची सारी पिसे गळून गेलेली होती. त्याची गंधर्व नाटक मंडळी कधीच भूतकाळात जमा झाली होती. सारी नट-मंडळी त्याला सोडून आपापल्या वाटेने उडून गेली होती. उरला होता तो एक म्हातारा .. पिसे गळालेला राजहंस ..!!

कुणीही केली नसती अशी सेवा, या गोहरबाई नावाच्या वेश्येने केली ..!! त्याचे लुळेपण तिने भक्तिभावाने जोपासले. कसल्याही सुखाची अपेक्षा न करता ..!! कारण एकच .. त्याच्या गळ्यावरील तिचे भक्ति-युक्त प्रेम ..!! …. *जे प्रेम राधेने कृष्णावर केले ..!!* …. *अहिल्येने प्रभू रामावर केले .‌.!!* ….. तसेच प्रेम गोहरने या सुरेल राजहंसावर केले ..!! त्याला त्याच्या अखेरच्या लुळ्या-पांगळ्या अवस्थेत सांभाळले. मायेची पाखर दिली आणि स्वत: ही मुसलमान साध्वी, अगोदर अहेवपणाचे लेणे कपाळावर मिरवत, दिक्कालापलीकडे निघून गेली. उरला तो आणखीनच विदीर्ण झालेला राजहंस ..!! त्यावेळी त्याच्या रसिक-जनांनी व भगत-गणांनी त्याच्याकडे पाठ फिरवली होती. त्याने गोहरबाईसारख्या एका मुसलमान बाईचा घरोबा स्वीकारला. त्यासंबंधी टीकेची हत्यारे त्याच्यावर परजीत, पुण्याचे सर्व नाटकी सज्जन त्याला विसरून जाण्याच्या तयारीत होते ..!!

*असा हा एकेकाळचा नटसम्राट बालगंधर्व ..!!* …. मुसलमान झालेला ..!; आपल्या पूर्वीच्या साऱ्या प्रेमिकांना अव्हेरून, त्याने आपण होऊन माहीमचा रस्ता धरलेला होता. अर्थांतर तर झालेच होते .. आता धर्मांतरही झाले ..!! त्यानंतर पहिले काही दिवस, अंगात त्राण होते तोपर्यंत, गावो-गांवच्या जुन्या भगत-गणांना बोलावून त्यांच्याकडून सत्कार करवून घ्यायचे, थैल्या घ्यायच्या. एका हाताने घ्यायच्या व दुसऱ्या हाताने देणेकऱ्याच्या स्वाधीन करायच्या असलेही उद्योग या राजहंसाने केले ..!!

एक प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. प्रसंग सोलापूरचा ..!! ह्याच सोलापूरने पूर्वी बालगंधर्वांना भरभरून लोकप्रियता दिली ..!! पैशांच्या राशी त्यांच्या पावलावर ओतल्या. ‘मेकॉनकी थिएटर’ म्हणजे बालगंधर्वांचे जणू माहेरच ..!! ‘तिथं नाटक करताना जणू इंद्रपुरीत नाटक करतो, असे वाटते’ असं बालगंधर्व नेहमीच म्हणायचे. पण आयुष्याच्या शेवटच्या प्रहरी, जुन्या गिरणीच्या पाठीमागे बांधलेल्या तमाशाच्या थिएटरात या राजहंसाला कबुतराच्या खुराड्यात राहिल्याप्रमाणे रहावे लागले ..!! नाटके लावता येत नव्हती ..!! पण सोलापूरचे वेडे भक्त रुंजी घालायला तयारच होते. एका भोळ्या-भाबड्या बाईने पुढाकार घेऊन गंधर्वांना थैली देण्याचा घाट घातला. तिच्या एकटीच्या पाय-पिटीने हजार अकराशेची रास जमा झाली. त्याच तमाशाच्या थिएटरात थैली अर्पण करण्याचा समारंभ झाला. राजहंसाला दोन माणसांनी उचलून रंगमंचावरील खुर्चीत आणून बसवले. भाषणे झाली. उजवीकडच्या विंगेत एक परिचित चेहऱ्याचा व्यापारी आशाळभूत मुद्रेने चुळबूळ करीत उभा दिसला. थैली अर्पण करण्यात आली… तो चुळबुळ्या व्यापारी चक्क रंगमंचावर येऊन थैली घेऊन गेला ..!!*

 गंधर्वाचे भाषण सुरू झाले …. “अन्नदाते ..!! मायबाप हो ..!! तुम्हीच मला मोठे केलेत. तुम्हीच आता मला जगवा ..!! तुमच्या उष्ट्याचा मी महार” ..!!*

असे अनेक थैली-समारंभ सोलापूरपासून जळगाव भुसावळपर्यंत ..!! चौकोनी कोडी असतात त्याप्रमाणे, उभी, आडवी, तिरपी कशीही बेरीज केली तरी, उत्तर येईल शून्य ..!! गंधर्वांना मिळालेल्या अनेक थैल्यांची बेरीज होती शून्य ..!! जमेला होते ते एक गोहरबाईचे नितांत प्रेम. तिने आपल्या ‘गळ्याचा’ व्यवसाय सोडून पतीची वार्धक्यातली सेवा करण्याचा पतिव्रताधर्म स्वीकारला ..!! परंतु बिचारीचे नशीबच खोटे ..!! ती तरी त्याला काय करणार ..?? बाल-गंधर्वांभोवती, त्यांच्या चलतीच्या काळात रुंजी घालणारे कपोत-पक्षी त्याच्याजवळून उडून गेले, आणि साऱ्या महाराष्ट्रात, ‘गोहरबाईने गंधर्वाचा सत्यानाश’ केला अशी हाकाटी करीत राहिले ..!! वास्तविक पाहता, सत्यानाश तिने करून घेतला होता तो स्वत:च्या कला-जीवनाचा मृच्छ-कटिकातल्या वसंतसेनेची तिने केलेली एक भूमिका मी पाहिली होती. ‘माडीवरी चल ग सये’ हे गाणे ती अशा ढंगात म्हणायची की त्याचे वर्णन करणे मुष्किल आहे ..!!

ज्या काळात मराठी रंगभूमीवर अद्यापही पुरुष नट स्त्री-भूमिका करायचे व त्यांचे ‘कसेही’ दिसणे प्रेक्षक गोड करून घ्यायचे त्या काळात, मराठी रंगभूमीवर गोहर नावाच्या गोड गळ्याच्या व भावपूर्ण डोळ्यांच्या एका जातिवंत नटीने गान-नृत्यही करून, एक आगळा साक्षात्कार घडविला होता ..!! तो काळ दृष्टीसमोर आणा, म्हणजे माझ्या म्हणण्याची सत्यता पटेल. त्या काळात ज्योत्स्ना भोळे अद्याप चमकायच्या होत्या. हिराबाई बडोदेकर एखाद्या नाटकात काम करायच्या. परंतु हिराबाई म्हणजे केवळ श्रुति-माधुर्य. त्यांचे गाणे ऐकावे ते डोळे मिटून ..!! हिराबाईंच्या गान-माधुर्याबद्दल आणि त्यांच्या सालस स्वभावाबद्दल संपूर्णपणे आदर बाळगून मला असे बिनदिक्कत म्हणावेसे वाटते की हिराबाई या गायिका आहेत, नटी नाहीत ..!! मराठी रंगभूमीवरील पहिली अभिनय-कुशल आणि नृत्य-गान-कुशल अशी स्त्री म्हणजे गोहरच होय.  जाति-धर्माच्या अभिमानापलीकडे न जाणाऱ्या आपल्या मध्यमवर्गीय नाट्य-समीक्षकांनी, आजपर्यंत गोहरला न्याय दिलाच नाही असे खेदाने म्हणावे लागते ..!! नारायणराव राजहंसानी तिच्यातले नाट्यगुण जाणले होते आणि त्यामुळेच ते तिच्याशी एकरूप झाले ..!!

दोन जातिवंत कलावंतांचे हे त्यांच्या जीवनाच्या उत्तर काळातले मीलन, गंधर्वांच्या हिंदू चाहत्यांना रुचणारे नव्हते. पृथ्वीच्या पोटातून निघणारे सुवर्ण किंवा लोह हे केवळ आपल्याच उपभोगासाठी आहे असे मानून, त्याचे कोड-कौतुक करणार्‍या मानवजाती प्रमाणेच गंधर्व हे फक्त आमचेच आहेत, आमच्यासाठीच आहेत, असा भ्रामक समज त्यांच्या अवती-भोवती वावरणाऱ्या हिंदू रसिकांनी करून घेतला होता. पृथ्वीच्या गर्भात लोह-भस्म आणि सुवर्ण-भस्म जे दडलेले असते, त्यामुळे जमिनीचा कस वाढत असतो व पृथ्वीच्या अंतर्भागात होणारे प्रचंड उत्पात त्यामुळे टळत असतात ..!!

सोने किंवा लोखंड हे माणसांसाठी निर्माण करून दिलेले पदार्थ नाहीत. माणसाने आपली बुद्धी वापरून ते स्वत:च्या वैभवासाठी व उन्नतीसाठी वापरले ही गोष्ट वेगळी ..!! त्याचप्रमाणे नारायणराव बालगंधर्व यांचे दैवी गायन हे काही फक्त चार हिंदू रसिकांपुरतेच नव्हते. त्यांच्या आवाजात जी आर्तता होती ती साऱ्या मानव-जातीकरता होती. परधर्मातील गोहर उगीच नाही त्या आर्ततेवर भुलून स्वत:चे सर्वस्व त्या राजहंसाच्या पायावर वाहायला तयार झाली ..!! तिचे व बालगंधर्वांचे मीलन, हिंदू रसिकांना न रुचल्याने, त्यांच्यावर जी हीन पातळीवरील टीका व निंदा-नालस्ती झाली त्यामुळे, ती गोहर नावाची ‘अस्मानी परी’ मनोमन कष्टी असे ..!! ती कुरूप होती, हिडीस होती, चेटकीण होती असे नाना प्रकारचे आरोप तिच्यावर गंधर्वांचे संगतीत काही काळ राहिल्याचे भूषण मिरविणारे, अद्याप करीत असतात. गंधर्वांच्या नाट्यकंपनीत पोट फुटेपर्यंत खाल्लेली पंच-पक्वान्ने अद्यापही या तथाकथित गंधर्व-भक्तांच्या अंगावर उठून बाहेर येत आहेत. गंधर्व कंपनीत म्हणे, ‘काळी साळ’ नावाचा सुवासिक तांदूळ आणि शुभ्र लोणकढे तूप खायला मिळायचे ..!! ती काळी साळ आणि तुपाची लोणकढी आता चेहऱ्यावर येऊन बसली आहे व रात्री-अपरात्री अश्‍वत्थाम्यासारखी भ्रमंती करायला लावीत आहे ..!! गोहरला ‘चेटकीण’ म्हणणारे हे महाभाग, कदाचित गोहरच्या तारुण्यात तिचा उपभोग घ्यायलाही गेले असतील आणि नकार घेऊन परत आले असतील, कुणी सांगावे ..?? कारण, बालगंधर्वांची नि तिची प्रेमभेट होण्यापूर्वी ती तर विजापूरची कलावंतीणच होती ना ..!!

ते काहीही असो .. मला मात्र राहून राहून एका गोष्टीची रुखरुख वाटते ती म्हणजे, गोहरच्या आणि गंधर्वांच्या शरीर-संबंधातून एखादा अंकुर निर्माण झाला असता, तर तो गायनाची पताका दिगंत घेऊन जाणारा झाला असता ..!! दोन अस्सल कलावंतांच्या मीलनातून परमेश्वराने का नाही तिसरा जीव निर्माण केला ..??*

ह्या रुखरुखीबरोबर पुण्याच्या जहांगीर नर्सिंग होममध्ये अखेरचे क्षण मोजीत पडलेला गंधर्वांचा म्लान चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत आहे ..!! ….  *’गंधर्व अत्यवस्थ’ ..!!* .. अशी सिंगल कॉलममधील ती बातमी ‘सकाळ’च्या कोपऱ्यात आली होती ..!! ती वाचून, मी आणि माझा एक मित्र वसंत जोशी दुपारचे जहांगीर नर्सिंग होममध्ये गेलो होतो. एका खोलीत स्वच्छ पांढऱ्या चादरीवर अर्ध्या चड्डीतला गंधर्वांचा गोरापान कमनीय देह पडला होता. जवळपास कुणीही नव्हते. फक्त एक बगळ्याच्या रंगाच्या पोषाखातली परिचारिका डोळ्यांतली कबुतरे उडवीत उभी होती. त्या क्षणी माझ्या मनात आलेली कल्पना अद्याप मी विसरू शकत नाही. परी गेली नि परिचारिका उरली. ही ती कल्पना ..!!

आणि प्रारंभी वर्णन केलेली ती सहा माणसांची भेसूर स्मशानयात्रा आठवली की, आजही अंगावर शहारे येतात ..!!

*आयुष्यभर ज्याने कला, नाट्य वैभव, मित्रपरिवार ह्या शिवाय दुसरे काही नाही केले, त्याच्या अंत्ययात्रेला एखादाही श्रीमंत उल्लू रसिक उपस्थित नव्हता ..!! गंधर्वांशी आज मैत्री सांगणारा एखादाही मित्र नव्हता ..!!* होते ते एका हौशी नाट्य-संस्थेचे पदाधिकारी आणि माझ्यासारखा एक कलंदर ..!!

एखाद्या कलाकाराची अंत्ययात्रा अशीच असायची, असा विधिलिखित संकेतच असतो की काय, कुणास ठाऊक ..!! मानवजातीला तृप्त करणाऱ्याला मात्र अखेरीस  ‘प्यासा’ रहावे लागते ..!!  एक शापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा, ह्यांचे हाल आणि दैना आम्ही पाहिली ..!!

गंधर्वांचे भाग्य थोर ..!! त्यांच्यावर आता पुस्तके लिहिली जात आहेत ..!! 

…. *पण अप्सरेचा मानवी अवतार, तिच्या अखेरच्या श्‍वासाबरोबरच संपला ..!!*

लेखक :  श्री वसंत शा. वैद्य. 

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कांचनगंगा… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ कांचनगंगा… ☆ श्री सुनील शिरवाडकर

हिमाचल प्रदेशातल्या  बलजीत कौरने आज एक मोठा पराक्रम केला.एकाच मोसमात तिने चार शिखरांवर चढाई केली. ती सर्व शिखरे आठ हजारांवर उंचीवरची होती.यात एव्हरेस्ट आणि कांचन गंगा या शिखरांचाही समावेश आहे.

यावरून आठवली ती कांचन गंगा ची पहिली मोहीम.१९८७-८८ घ्या आसपास ही मोहीम आखली गेली.यापुर्वी असा प्रयत्न झाला होता..पण केवळ सरकारी किंवा लष्करी पातळीवर.

आठ हजारांवर उंचीवर असलेल्या शिखरावर चढाई करण्याची ही मोहीम नागरी होती‌.या मोहीमेच्या तयारीसाठीच दोन वर्षे लागली.

यासाठी खर्च होता साधारण पंचवीस लाख रुपये.आणि एवढी रक्कम गोळा करणं सोपं नव्हतं.या खर्चाची जुळवणी करण्यासाठी मग या टीमने समाजातील मान्यवरांना पत्रे पाठवली.त्यात एक पत्र पाठवले होते जेआरडी टाटांना.

जेआरडींनी त्यांना भेटायला बोलावले. मोहीमेचा नेता वसंत लिमये आणि दिलीप लागु भेटायला गेले.जेआरडी टाटा त्यांच्या हनीमून साठी दार्जिलिंगला गेले होते.. तेव्हा तिथून त्यांना कांचनगंगाचे शिखर दिसले होते.त्यावेळी त्यांना काय वाटलं यांचं त्यांनी रसभरीत वर्णन केलं.तासभर गप्पा झाल्यावर त्याचं फलित काय..तर मोहिमेला अर्धा खर्च टाटा समूहाच्या कंपन्यांकडून उचलला गेला.

या मोहिमेत चोवीस जण असणार होते.त्या सर्वांना सर्वोत्तम दर्जाचे गिर्यारोहण साहित्य लागणार होते..जे भारतात कुठेही उपलब्ध नव्हते.परदेशातुन मागवण्यासाठी आयात परवाना गरजेचा होता.

मग केंद्र सरकारशी संपर्क साधुन स्पेशल लायसन मिळवले, आणि दहा लाख रुपयांचं साहित्य मागवलं गेलं.

मोहीमेचा कालावधी होता साडेतीन महीन्यांचा.यामध्ये ‘8 man day’ असे शिध्याचे खोके बनवले गेले.म्हणजे..आठ माणसांना एका दिवसासाठी लागु शकणार्या शिधासामुग्रीचा एक खोका.त्यामुळे प्रत्यक्ष मोहीमेच्या काळात वाहतूक करणं खुप सोयीचं गेलं.या सामानाची बांधाबांध करण्यासाठीच दोन महिने लागले.

मोहीमेच्या आधी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्व गिर्यारोहकांना आमंत्रित केले…आणि कांचनगंगा वर रोवण्यासाठी तिरंगा प्रदान केला.

मोहीम सुरु झाली.एक महीन्याच्या प्रयत्नानंतर सर्व जण बेसकॅंपवर पोहोचले.मजल दरमजल करत अजुन उंचीवर जाऊन लागले.उणे तापमान.. प्रचंड थंडी..हिमवादळे..यांना तोंड देत सर्वांची आगेकूच सुरू होती.

पण त्यांना यश मिळाले नाही.कांचनगंगा पासुन अवघ्या पाचशे फुटांपर्यंत उदय कोलवणकर पोहोचला होता.. पण हिमबाधेमुळे त्याला पुढचा प्रयत्न सोडावा लागला.चारुहास जोशी पण जवळपास पोहोचला होता..पण त्यालाही हिमदंशामुळे माघार घ्यावी लागली.

लौकिकार्थाने ही मोहीम जरी यशस्वी झाली नाही..तरी त्यातुन खुप गोष्टी साध्य झाल्या.याच अनुभवाच्या जोरावर नंतर १९९८  साली ह्रषिकेश जाधव आणि सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्ट वर पाऊल ठेवले‌.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १० — विभूतियोगः — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १० — विभूतियोगः — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीभगवानुवाच 

भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः । 

यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १ ॥

कथित श्री भगवान

महावीरा कौन्तेया ऐक तुला  परम वचन सांगतो

तुझ्या हितास्तव प्रभावी ऐसे रहस्य तुला कथितो ॥१॥

*

न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः । 

अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥ २ ॥

*

उत्पत्ती माझी न जाणती महर्षि ना देव

त्या सकलांचे आदीकारण मीच महादेव ॥२॥

*

यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम्‌ । 

असम्मूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ३ ॥

*

अजन्मा अनादी लोकेश्वर ऐसे माझे सत्यस्वरूप

ज्ञान जयाला झाले तो ज्ञानी होई मुक्तपाप ॥३॥

*

बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः । 

सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ ४ ॥ 

*

अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः । 

भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ ५ ॥

*

गुणवैविध्य भूतांचे बुद्धी ज्ञान मूढता

मनेंद्रियनिग्रह क्षमाशीलता तथा सत्यता

अहिंसा भयाभय सुखदःख दानवीरता

उत्पत्ती-प्रलय विद्या साधना कीर्ति-दुष्कीर्ति मुदिता

तप ज्ञान आदी सारे भूतांठायी वसयी पृथग्भाव

सकलांचा या माझ्यापासुनच होतसे उद्भव ॥४,५॥

*

महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा । 

मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ ६ ॥

*

संसारातील समस्त मनुज जनता उद्भवली ज्यांच्या बीजाने

चतुर्सनकादिक सप्तर्षि चतुर्दश मनू उद्भवले मम संकल्पाने ॥६॥

*

एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः । 

सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ ७ ॥

*

जाणी जो तत्वतः मम विभूतीला योगशक्तीला 

खचित पावे तो स्थैर्य होऊन युक्त भक्तियोगाला ॥७॥

*

अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते । 

इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥ ८ ॥

*

जाणुनी मजला कारण जगदोत्पत्तीचे क्रियेचे

श्रद्धेने  भक्तीने पूजन करती माझे परमेशाचे ॥८॥

*

मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम्‌ । 

कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥ ९ ॥

*

माझीया ठायी चित्त तसेच लाविती प्राण

चर्चा बोध करित सदैव माझ्यातच रममाण ॥९॥

*

तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्‌ । 

ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १० ॥

*

प्रेमाने भजती मजला मग्न होउनी ध्यानी

बुद्धियोग मी तयांसि देतो सार्थ मम मीलनी ॥१०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हाफ पोलिस – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

हाफ-पोलीस…… नितीन महादेव यादव

? इंद्रधनुष्य ?

☆ हाफ पोलिस – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

हाफ-पोलीस… — गुन्हेगारांचं परफेक्ट स्केच काढणारा आपला माणूस….!

आज आपण पोलीस खात्यातील एका अशा कर्तबगार माणसाला भेटणार आहोत जो पोलीस नसूनही गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतो.

CID मालिकेत तुम्ही अनेकदा स्केच आर्टिस्टला पाहिलं असेल पण आज भेटूया एका खऱ्याखुऱ्या स्केच आर्टिस्टला.

हाफ-पोलीस…… नितीन महादेव यादव

हे गेल्या ३० वर्षांपासून पोलिसांसाठी गुन्हेगारांचे स्केच काढून देण्याचं काम करत आहेत. त्यांनी आजवर काढलेल्या स्केचेसमधून तब्बल ४५० स्केचेसच्या आधारे गुन्हेगारांना यशस्वीपणे पकडण्यात आलं आहे. आज जाणून घेऊया पोलीस खात्याचा अविभाज्य भाग असलेल्या नितीन महादेव यादव यांच्याबद्दल.

कुर्ल्याच्या साबळे चाळीत राहणारे नितीन यादव हे त्यांच्या मित्रपरिवारात हाफ-पोलीस म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कामाची लिस्ट जर बघितली तर त्यांची कर्तबगारी पोलिसांपेक्षा कमी नाही. गेल्या २५ वर्षांपासून ते एक रुपयाही न घेता पोलिसांसाठी गुन्हेगारांची चित्रे काढत आहेत. या कामात त्यांचा हातांना विलक्षण देणगी लाभली आहे.

नितीन यादव यांचा प्रवासाला सुरुवात झाली ती त्यांच्या लहानपणी. कामगारांच्या ज्या संपाने मुंबईचा चेहरामोहरा बदलला त्याचा मोठा फटका हा नितीन यादव यांच्या कुटुंबालाही बसला होता. ७ वी इयत्तेत असतानाच त्यांना शाळा सोडावी लागली होती. पोटापाण्यासाठी ते नंबर प्लेट्स, बॅनर, इत्यादी रंगवण्याचं काम करायचे.

एकेदिवशी पोलीस स्टेशनमध्ये ते चौकीचा बोर्ड आणि नावाच्या पाट्या रंगवत होते. त्याचवेळी पोलीस स्टेशन मध्ये एक केस आली. GSK हॉटेल मध्ये हत्या झाली होती. हॉटेलच्या वेटरनेच फक्त चहा देताना गुन्हेगाराचा चेहरा पाहिला होता. नितीन यादव पोलिसांकडे गेले आणि त्यांनी म्हटलं, ‘’जर तुम्ही वेटरला बोलतं केलंत तर मी त्याच्या वर्णनावरून खुन्याचं चित्र काढू शकतो.’’ पोलिसांनी मंजुरी दिली. नितीन यादव यांच्या स्केचच्या आधारे गुन्हेगार केवळ ४८ तासात पकडला गेला. त्यावेळी ते १० वीत शिकत होते.

लहान वयात त्यांच्या हातांनीच त्यांचा पुढचा मार्ग शोधला होता. या कर्तबगारीनंतर त्यांचा प्रवास सुरु झाला. आजवर अनेक महत्वाच्या गुन्ह्यांच्या तपास कामात त्यांनी मदत केली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर २०१३ चं शक्तीमील बलात्कार प्रकरण, पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट अशा महत्वाच्या केसेसमध्ये त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.

त्यांचा कामातील हातखंडा दाखवणारा एक किस्सा पाहा. ज्यावेळी अजमल कसाबवर खटला चालू होता तेव्हा फोटोग्राफर्सना कोर्टात येण्यास बंदी होती. एका पत्रकाराने त्यांना गाठून त्यांना कोर्टरूमचं वर्णन ऐकवलं. या वर्णनावरून त्यांनी कोर्टरूम मधला हुबेहूब प्रसंग चितारला होता. हे स्केच वर्तमानपत्रातही छापून आलं होतं.

नितीन यादव यांच्या कामाचा खरा कस लागतो तो संवेदनशील प्रकरणांमध्ये. बलात्कार पिडीत मुलीकडून गुन्हेगाराची माहिती काढून घेणे हा काहीसा क्रूर पण अपरिहार्य भाग असतो. अशा केसेस मध्येही नितीन यादव यांनी सफाईने माहिती काढून घेतली आहे. ‘’काहीवेळा चित्र एवढं ‘परफेक्ट’ असतं की पीडीत मुलीला अश्रू अनावर होतात’’ असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते..

१० वर्षापूर्वी कॅन्सरसाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि ते नुकतेच बरे होत होते तेव्हा एक बलात्काराची केस त्यांच्याकडे आली. या केसमध्ये मुलगी कर्णबधीर आणि मुकबधीर होती. तिच्याकडून माहिती काढणं हे जवळजवळ अशक्य होतं. यावर त्यांना एक मार्ग सुचला. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शरीराच्या भागाचे जसे की चेहऱ्याचे, केसांचे, त्वचेच्या रंगाचे, जेवढे म्हणून चित्रांचे नमुने होते ते पिडीत मुलीच्या समोर ठेवले. मुलीने नमुन्यातील एकेक गोष्टींची निवड केली आणि गुन्हेगाराचा चेहरा तयार झाला. तो गुन्हेगार पुढील ७२ तासांच्या आत पोलिसांच्या ताब्यात होता.

त्यांच्या कामासाठी त्यांना मुंबई पोलीस खाते व शैक्षणिक खात्याचे मिळून १६४ पुरस्कार मिळाले आहेत. पोलिसांना मदत करण्यासोबत ते चेंबूर येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. पोलीस खात्याशी निगडीत सगळ्यांनाच जीवे मारण्याची धमकी ही येतेच. याला नितीन यादवही अपवाद नाहीत. पण कोणताही अडथळा त्यांना त्यांच्या कामापासून लांब ठेवू शकला नाही.

२५ वर्षांपासून त्यांनी कामासाठी एक रुपयाही घेतलेला नाही पण मागील काही वर्षापासून पोलीस खाते स्वतःहून त्यांना पैसे देऊ करते.

बलात्काराच्या गुन्ह्याच्या बाबतीत त्यांची एक अट असते. एकदा का गुन्हेगार पकडला गेला की ते त्याला एक सणकून कानाखाली देणार. त्यांची ही अट पोलिसांनी चक्क मान्यही केली आहे.

तर मंडळी अशा या पडद्यामागच्या हिरोचं कौतुक करू तेवढं कमीच आहे. फक्त एवढंच म्हणू शकतो की ‘तुमच्या कामाला प्रणाम !!’… 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे  श्लोक आणि REBT… – भाग-२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे  श्लोक आणि REBT… – भाग-२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

(म्हणून घडणाऱ्या घटनेकडे बघताना आपण आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित केले तर आपण त्या घटनेकडे  तटस्थपणे बघू शकू.) — इथून पुढे .. 

सर्वसाधारणपणे मनुष्य आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे आपापल्या नजरेने बघत असतो. त्यामध्ये तो आपले पूर्वसंस्कार, श्रद्धा आणि पूर्वानुभव मिसळून त्या घटनेकडे बघत असतो. त्यामुळे त्या घटनेपासून त्याला दुःख होण्याची शक्यता जास्त असते. Rebt मनुष्याला विवेक अर्थात विचार करायला सांगते. त्या विशिष्ट घटनेकडे बघताना आपण कोणताही पूर्वलक्षी प्रभाव न ठेवता त्या घटनेकडे वस्तूनिष्ठपणे पाहायला शिकविते. जेव्हा आपण कोऱ्या मनाने, शांत मनाने कोणत्याही घटनेकडे बघतो तेंव्हा मनुष्य अधिक सजगतेने त्या घटनेकडे बघू शकतो. आणि जेव्हा ‘मी’ विरहीत होऊन निर्णय घेतला जातो तेव्हा तो जास्तीत जास्त अचूक असतो. 

Rebt आपल्याला आपल्या समजुती (beliefs)  बदलायला सांगते.  कोणतीही घटना आपल्याला कमीअधिक प्रमाणात भावनावश करते. भावना समजून घेतल्याचं पाहिजेत पण भावना बदलणे अवघड आहे म्हणून भावना बदलण्याच्या प्रयत्न न करता आपण आपले विचार बदलले तर घडणाऱ्या घटनेचे परिणाम बदलू शकतात. भावनांच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय बरेच वेळा घातक ठरण्याची शक्यता जास्त असते. विचारानुसार होणारी कृती ही अधिक  लाभदायी ठरण्याची शक्यता जास्त असते. 

आपले विचार सर्वस्वी हवामानावर अवलंबून नसतात. तसं असतं तर कडाक्याच्या थंडीत सर्वजण कामधंदा न करता घरात बसून राहिले असते. पण तसे तर होतं नाही. याचाच अर्थ आपले विचार हे बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतात. ते बहुतांशी स्वतंत्र असतात. खरंतर ते आपल्याच हातात असतात. बाहेरच्या वातावरणाचा किती परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा हे सुद्धा आपल्याच हातात असते. आपण ठरवलं तर आपले विचार आपण खात्रीपूर्वक बदलू शकतो.  तसेच मोकाट विचारांना काबूत आणणे हे सुद्धा आपल्याला प्रयत्नांती नक्कीच शक्य आहे. भरकटणाऱ्या विचारांना थांबविणे म्हणजेच स्वतःला सावरणे होय. मनुष्य अस्वस्थ होतो तो त्याच्या विचारांमुळेचं आणि शांत होतो तो सुद्धा त्याचा विचारांमुळेचं.  कोणते विचार निवडायचे याचे स्वातंत्र्य मनुष्याला असते. प्रत्येक वस्तूची निर्मिती प्रथम विचारात होते आणि मग भौतिक रुपात. आजवर आपण जे पाहिले त्याची निर्मिती प्रथम विचारात झाली आहे नि मग प्रत्यक्षात झाली आहे. आपले अंतर्मन बघू शकत नाही पण आपण जी दृश्ये त्यास दाखवितो ती ते खरी मानते आणि तशी स्थिती ते आपल्या मनात निर्माण करीत असते. आपण जे विचार पेरीत असतो तेच अनंत पटीने वाढून परत येत असतात. एक फळात किती बिया आहेत हे आपण सांगू शकतो पण एका बीमध्ये किती फळ आहेत हे सांगणे कठीण असते. फक्त योग्य विचार निवडणे, ते प्रसारित करणे आणि त्यानुसार आचरण करणे जर मनुष्याला जमले तर आपण सर्व समस्यांवर मात करु शकतो. हे जग जसे आहे तसे आपल्याला दिसत नाही तर जसे आपले विचार असतात तसे ते आपल्या नजरेस दिसत असते. 

समर्थ आपल्याला हेच ‘मानसशास्त्र’ थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगतात. समर्थांची मांडणी त्या काळानुरूप म्हणजे थोडी अध्यात्मिक स्वरुपाची आहे. मनुष्य भक्तिमार्गात चालू लागला की त्याच्या अंतरंगात नकळत बदल होण्यास सुरुवात होते. विशुद्ध जाणिवेतून मनाच्या शोधाला रामनामातून आरंभ होतो. सद्गुरुकृपेमुळे मन अधिक सजग व्हायला सुरुवात होते. मनाला विवेकाचे अधिष्ठान लाभते. मनाला चांगल्या वाईटाची जाणीव होऊ लागते. ते स्वतःशी संवाद करु लागते. खरंतर त्याचे स्वतःशी द्वंद्व करु लागते. मनात चांगल्या वाईट विचारांची घुसळण सुरु होते. आणि मग विवेकाने मनुष्य चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायला सुरुवात करु लागतो. मनाच्या श्लोकांचा अभ्यास करुन मनुष्य नुसता विवेकी होत नाही तर मनुष्यत्व ते देवत्व असा प्रवास करण्यास उद्युक्त होतो. हा प्रवास बहुतांशी अंतर्गत असतो. कारण मूलभूत बदल मनातच होत असतात आणि तेच गरजेचं असतं. बरेच वेळेस अंतरंगातील बदल बाह्यरूपात प्रतिबिंबित होतातच असे नाही. मनाच्या श्लोकात उत्तम भक्त (अर्थात उत्तम पुरुषाची) लक्षणे सांगितली आहेत. तसेच व्यक्तिमत्व विकास, उत्तम व्यवस्थापन कौशल्ये आणि दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारी अनेक सूत्रे सुद्धा अगदी सोप्या भाषेत सांगितलेली आढळतात. ‘

मनुष्याला नेहमी सुख मिळावे असे वाटत असते. पण त्याला सुख मिळतेच असे नाही किंवा खरे सुख म्हणजे काय हे त्याला कळतेच असे नाही. समर्थानी सांगितलेले ह्याचे एकमेव कारण म्हणजे देहबुद्धी. ही देहबुद्धी नष्ट करण्यासाठी ‘विवेका’ची कास धरण्याची समर्थ शिकवण देतात. ‘विवेक’ म्हणजे विचारांच्या प्रक्रियेला लाभलेली विचारांची खोली. विचाराला स्वच्छ जाणिवांची खोली लाभली की विवेक जन्मतो. विवेक जगण्याची धारणा देतो. विवेकाने क्रिया पालटते. ‘विवेक’ आणि ‘प्रयत्न’ हे  समर्थांचे  विशेष आवडते शब्द आहेत. मनाच्या श्लोकांत त्यांनी ‘विवेक’ हा शब्द अनेक वेळा वापरला आहे. ‘विवेके सदा सस्वरूपी भरावे'( १०,१४५) ‘विवेके देहबुद्धी सोडून द्यावी'(१२), ‘विवेके कुडी कल्पना पालटीजे'(४०), ‘विवेके तजावा अनाचार हेवा'(६९),  ‘विवेके क्रिया आपली पालटावी'(१०५),  ‘विवेके  मना आवरी स्थानभ्रष्टा'(१०६),  ‘विवेके अहंभाव याते जिणावें'(११०), ‘विवेके अहंभाव हा पालटावा'(११५), ‘विवेके तये वस्तूची भेटि घ्यावी'(१७०), ‘विवेके विचारे विवंचुनी पाहे'(१७३), इ. अशा प्रकारे विविध पद्धतीने समर्थ आपल्याला विचार करायला सांगतात. 

(* कंसातील क्रमांक हे मनाच्या श्लोकांचे आहेत)

मनुष्याने कितीही प्रगती केली तरी जोपर्यंत नितीमूल्यांची प्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत त्या प्रगतीस काही अर्थ नाही. मनाचे श्लोक मनुष्याला सामान्य मनुष्य ते देव, अर्थात रामाच्या पंथाकडे नेतात. मनाच्या श्लोकांचा अभ्यास केला नि त्याप्रमाणे आचरण केले तर मनुष्य देवत्वास नक्की पोहचू शकेल यात शंका नाही. समर्थ शेवटच्या श्लोकांत तसे अभिवचन देत आहेत.

मनाची शते ऐकता दोष जाती।

मतीमंद ते साधना योग्य होती॥

चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी।

म्हणे दास विश्वासता मुक्ति भोगी॥२०५।।

अर्थात, मनाच्या श्लोकांच्या अभ्यासाने मनुष्याची अंशतः का होईना उन्नतीच होते असे फलश्रुती वाचल्यावर आपल्या लक्षात येते.

आतापर्यंत आपण दोन्ही पद्धती स्थूलमानाने अभ्यासल्या आहेत. पण प्रत्येक मानसोपचार पद्धतीची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक जाणकार त्याची प्रतवारी वेगवेगळी करु शकेल. सामान्य मनुष्याने मनाच्या श्लोकांकडे पारंपरिक आणि धार्मिक भावनेने न बघता एक विचारपद्धती अर्थात software म्हणून बघितले तर ते अधिक उपयुक्त (user friendly) होईल असे वाटते. तसेच rebt पद्धती ही सुद्धा योग्य प्रकारे आचरणात आणली गेली तर ती सुद्धा उपयुक्त अशीच आहे. आज सारे जग त्याचे चांगले परिणाम अनुभवत आहे. REBT पद्धती अधिकाधिक लोकप्रिय होताना दिसत आहे. 

इथे एक गोष्ट थोडी परखडपणे सांगावीशी   वाटते की आपल्या संस्कृतीतील गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम आदि ग्रंथ हे मनुष्याचा आत्मिक विकास साधण्यासाठी निर्माण झालेले प्रमाण ग्रंथ आहेत. संतांनी स्वतः ती उच्चस्थिती प्राप्त केली आणि अखिल मानवजातीचे कल्याण व्हावे असा शुद्ध हेतू उरात ठेऊन ह्या सर्व ग्रंथाची निर्मिती केली आहे.  त्या ‘पोथ्या’ नाहीत. आपण त्यांना वस्त्रात गुंडाळून कोनाड्यात ठेवले ही आपली घोडचूक आहे. ‘जीवन जगण्याची कला’ शिकविणारी पाश्चात्य लेखकांची अनेक पुस्तके आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील सर्व तत्वज्ञान आपल्या गीतेमधील, ज्ञानेश्वरीमधील आणि  दासबोधातीलच आहे. असे असूनही आजच्या तरुणपिढीला आपण मनाचे श्लोक, गीता, दासबोध वाचायला शिकवीत नाही आणि प्रवृत्तही करीत नाही. सध्या समाजात हे सर्व ग्रंथ साठीनंतर वाचायचे असतात असा गोड गैरसमज बेमालूमपणे पसरविला जात आहे. एकीकडे आपण अशा ग्रंथांची पारंपरिक पद्धतीने पारायणे करतो पण त्या ग्रंथातील ‘खरे ज्ञान’ अथवा ‘मर्म’ आत्मसात करुन पुढील पिढीस ते आचारण्यास उद्युक्त करीत नाही. ही खरी शोकांतिका आहे. कोणतेही तंत्र/ शास्त्र वापरात आले तर त्याचा खरा उपयोग आहे. ज्याप्रमाणे नदी म्हटली की वाहतीच असणार तसे आपले सर्व धार्मिक ग्रंथ हे लोकजीवन समृद्ध होण्यासाठी अमलात/ आचरणात आणण्याचे ग्रंथ आहे. ‘नराचा नारायण’ करण्याची क्षमता ह्या सर्व ग्रंथांमध्ये आहे असे सर्व संतांनी सांगितले आहे. तेव्हा अधिक सजग होऊन हे ग्रंथ तरुणपिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य आपल्याला हाती घ्यावे लागेल. 

वरील चिंतनातून साधकांनी / अभ्यासार्थीनी मनाचा अभ्यास अधिक तरलतेने करावा आणि अनंताच्या पंथाकडे सुरु झालेल्या जीवनप्रवासाचा ‘आनंद’ घ्यावा अशी शुभेच्छा व्यक्त करुन माझ्या लेखनास विराम देत आहे.

– समाप्त –

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

(साधकाने समर्थांच्या विचारांच्या साहायाने आपल्या मनाचे संश्लेषण….अर्थात संधारणा कशी करावी? हे नित्यपाठाने होऊ शकेल की आधुनिक मानसशास्त्रात ‘विवेकनिष्ठ उपचार पद्धती… REBT उपचाराला पूरक म्हणून त्याचा उपयोग करावा? .. हा प्रश्न एकाने विचारला.. आणि त्या अनुषंगाने… मनाचे नुसते विश्लेषण नको तर संश्लेषणही करण्याचे तंत्र साधकाला समजावे हा या लेखाचा उद्देश आहे.) 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे  श्लोक आणि REBT… – भाग-१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे  श्लोक आणि REBT… – भाग-१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

मन म्हणजे काय ? ‘मन’ कसे असते ? ते खरंच असते का ? ते असते तर नक्की कुठे असते ? मनाचे कार्य काय असते ? मनुष्याला मनाचा नक्की काय उपयोग होतो ? मन इंद्रिय आहे की नाही ? असे अनेक प्रश्न मन हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात येऊ शकतात. सामान्य मनुष्यापासून संतांपर्यंत, अरसिकांपासून रसिकांपर्यंत, बद्धापासून सिद्धापर्यंत प्रत्येकजण आपापल्या परीने मनाचा अभ्यास करतो आहे. पण यातील प्रत्येकाला मनाचा थांगपत्ता लागला आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. अनेक संत, कवी, लेखक, तत्त्ववेत्ते, अभ्यासू वक्ते आदींनी ‘मना’वरील आपले विचार विविध प्रकारे शब्दबद्ध केले आहेत. आपल्याला हत्ती आणि चार आंधळे यांची गोष्ट ज्ञात आहे. त्यातील प्रत्येक आंधळा त्याच्या मतीगतीनुसार हत्तीचे वर्णन करतो. त्याचप्रमाणे इथेही प्रत्येकाने आपापल्या परीने मनाचे वर्णन केले आहे. त्याच्या त्याच्या परीने ते योग्य असेलही पण म्हणून ते पूर्ण आहे असे आपण नाही मानू शकत. ज्याप्रमाणे भगवंताचे पूर्णपणे वर्णन करणे कोणालाही शक्य झालेले नाही तसेच मनाचे देखील असावे. कारण गीतेमध्ये भगवंत श्रीकृष्ण म्हणतात की मीच ‘मन’ आहे.

सर्व प्राणिमात्रांत भगवंताने मनुष्याला ‘मन’ आणि ‘व्यक्त होण्याची कला’ विशेषत्वाने प्रदान केली आहे. एका अर्थाने मनुष्याचे मन हेच मनुष्याचे प्रेरणास्त्रोत आणि त्याचवेळी शक्तीस्रोत देखील आहे.

“मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो:”

मनुष्याचे मनच त्याच्याकडून सर्व काही करवून घेत असते आणि त्याचे बरेवाईट परिणाम मात्र शरीराला भोगावे लागतात. सर्व संतांनी मनाचा अभ्यास केलेला आहे. पण श्री समर्थांनी मनाचा केलेला अभ्यास अधिक सुस्पष्ट, सखोल आणि सूत्रबद्ध आहे असेच म्हणावे लागते. याला एकमेव कारण म्हणजे  समर्थांनी लिहीलेले मनाचे श्लोक !!  मनाचे श्लोक लिहिण्याआधी देखील समर्थांनी करुणाष्टकात मनाचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे.

‘अचपळ मन माझे नावरे आवरीता।’ 

 ‘चपळपण मनाचे मोडीता मोडवेना।’

मनाच्या श्लोकांइतके मनाचे  सूत्रबद्ध आणि वस्तुनिष्ठ विवेचन खचितच कोणत्या अन्य ग्रंथात केले गेले असावे. म्हणून मनाचे श्लोक’ हा प्राचीन आणि आधुनिक मानसशास्त्राचा संदर्भग्रंथ ( handbook ) ठरावा. मानवाने प्रगती केली ती प्रामुख्याने भौतिकस्तरावरील आहे. मनुष्याच्या अंतरंगात बदल करणे तर दूर पण मनुष्याच्या अंतरंगाची  वस्तूनिष्ठपणे मांडणी करणे किंवा त्याचा सर्वांगीण अभ्यास करणे हे सुद्धा मनुष्याला पुर्णपणे शक्य झालेले नाही. मनाच्या श्लोकांची निर्मितीकथा तशी रंजक आहे. ती आपल्याला ज्ञात देखील असेल. पण ते एक निम्मित झाले असावे असे वाटते. समर्थांसारखा विवेकी संतमहात्मा कोणतीही गोष्ट प्रतिक्रियात्मक करेल हे काही मनाला पटण्यासारखे नाही.

मनाचा विषय आहे तर ‘मन’ म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघूया. जरी मन मनालाही उमजत नसले तरीही मन म्हणजे एक सुजाणीव आहे असे आपण म्हणू शकतो. ज्यातून मानवी व्यक्तित्व प्रतिबिंबित होईल अशी जाणीव. मन म्हणजे व्यक्तित्वाचा सुघटित आकार आचारणात आणणे. कांद्याचा पापुद्रा काढता काढता कांदा संपतो. त्याचे ‘कांदेपण’ डोळ्यांतील पाण्यातून जाणवते. तसेच मनाच्या पापद्र्यांतून सर्वात शेवटी जी विशुद्ध निराकार जाणीव उरते, त्याला मन असे  म्हणता येईल. ह्या काही मोजक्या व्याख्या आहेत. प्रतिभावंत लेखक ‘मन’ आणखी विविध प्रकारे मांडू शकतात.

मन ह्या विषयावर किंवा त्याच्या अभ्यासावर काही तज्ञांचे मतभेद असतील किंवा नसतीलही पण एक गोष्ट मात्र सर्व संतमहंतांनी आणि आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी एकमुखाने मान्य केली आहे ती म्हणजे जर मनुष्याला खरे सुख प्राप्त करायचे असेल तर त्याचा मुख्य रस्ता हा त्याच्या मनातूनच जातो. अर्थात मन प्रसन्न केल्याशिवाय मनुष्य सुखी समाधानी होऊ शकत नाही. मग ज्येष्ठ कवी भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी सहज म्हणून जातात.

“रण जिंकून नाही जिंकता येत मन।

मन जिंकल्याशिवाय नाही जिंकता येत रण।।”

(*वरील अवतरण अनुवादित आहे)

मनुष्याला कोणतेही सुख प्राप्त करायचे असेल, जीवन आनंदात जगायचे असेल त्याने प्रथम मन राजी करणे, मनाला जिंकणे अपरिहार्य ठरते. मनाला सोडून कोणतीही गोष्ट करणे शक्य नाही. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज देखील म्हणतात,

“मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।”.

‘मन’ हा शब्द संतांनी फक्त मनुष्यापुरता संकुचित ठेवलेला नाही. मानवीमन, समाजमन, राष्ट्रमन असे विविध आयाम त्यांनी या मनास जोडले. भारतीय संतांनी मनाची व्यक्तिशः जडणघडण करण्याचा प्रयत्न तर केलाच पण समाजमन कसे खंबीर होईल आणि पर्यायाने राष्ट्र बलवान कसे होईल याकडेही त्यांनी लक्ष वेधले आणि त्याप्रमाणे समाजाकडून कृती देखील करवून घेतली. ज्यांच्या मनाची ‘माती’ झाली आहे अशा लोकांच्या मने  चैतन्याने भारुन, त्यांच्यात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवून त्यांच्याकडून गौरवशाली कार्य करवून एका अर्थाने इतिहास घडविण्याचा चमत्कार अनेक संतांनी आणि राजेमहाराजांनी केल्याचे वर्णन इतिहासात आहे. शालिवाहनाने ‘माती’तून  सैनिक उभे केल्याचे वर्णन आहे. छत्रपतींनी सामान्य मावळ्यांमधून कर्तव्यनिष्ठ आणि स्वाभिमानी स्वराज्यसेवक निर्माण केले. ही दोन्ही उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत.

समर्थांनी विपुल साहित्य लिहून ठेवले आहे. पण समर्थांची ‘प्रस्थानत्रयी’ म्हणून ज्याचा गौरव केला जातो त्या तीन ग्रंथांमध्ये ‘मनाचे श्लोक’, ‘दासबोध’ आणि ‘आत्माराम’ यांचा समावेश आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे समर्थांच्या अध्यात्माच्या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर प्राथमिक शाळेचा अभ्यासक्रम म्हणून ‘मनाचे श्लोकच’ असतील यात बिलकुल संदेह नसावा. श्री. सद्गुरु गोंदवलेकर महाराज, श्री सदगुरु श्रीधरस्वामी आणि अनेक समकालीन संतांनी मनाच्या श्लोकांचा यथोचित गौरव केला आहे. आदरणीय विनोबाजी तर मनाच्या श्लोकांना ‘सोन्याची तिजोरी’ असे म्हणतात. ह्यातील कौतुकाचा आणि श्रद्धेचा भाग सोडला आणि आचरण सूत्रे म्हणून जरी ह्या मनाच्या श्लोकांकडे पाहिले तरी मनुष्याच्या अंतरंगात आणि बहिरंगात बदल करण्याचे सामर्थ्य यामध्ये निश्चित आहे.

एकूण मनाचे श्लोक २०५ आहेत. शेवटचा आणि पहिला मंगलाचरणाचा श्लोक सोडला तर उरलेल्या २०३ श्लोकांत समर्थांनी फक्त मनाला उपदेश केला आहे. तसं पाहिलं तर मनाचे श्लोकाचे मर्म पहिल्याच श्लोकात सांगून संपले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही असे मला वाटते.

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।

मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा।

नमू शारदा मूळ चत्वार वाचा।

गमू पंथ आनंत या राघवाचा।।१।।

वरील श्लोकाच्या शेवटच्या ओळीतच सर्व पुढील श्लोकांचे सार आले आहे. अनंत राघवाच्या मार्गावर चालणे याचा अर्थ ‘मनुष्यत्वाकडून देवत्वा’कडे प्रवास सुरु करणे असाच आहे. पण मानवी मनाचे अनेक कंगोरे साधकांना समजावेत म्हणून समर्थांनी या श्लोकांचा विस्तार केलेला असावा असे म्हणायला जागा आहे. उपलब्ध संतसाहित्यातील वर्णनाप्रमाणे मनुष्याचा जीवनप्रवास ‘मनुष्यत्व ते पशुत्व’ (राक्षसत्व) किंवा ‘मनुष्यत्व ते देवत्व’ असा होत असतो. मनुष्य जन्माचे मुख्य उद्दिष्ट हे जीवाला परमात्म्याची भेट घडवून देण्यातच आहे असे सर्व संत सांगतात. पण मनुष्य स्वभावतः स्खलनशील प्राणी आहे. म्हणून मनुष्याला जर देवत्वाकडे न्यायचे असेल तर विशेष प्रयत्न करावे लागतात. आणि त्यासाठी एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे मानवी मनाला शिकवण देणे. एकदा का मन कह्यात आले की जगातील कोणतीही गोष्ट मनुष्याला असाध्य नाही.

ज्याप्रमाणे भारतीय संतांनी, तत्ववेत्त्यांनी मानवी मनाचा अभ्यास केला तसा पाश्चात्य चिंतकांनी देखील मानवी मनाच्या एकूणच पसाऱ्याचा अभ्यास केला. यामध्ये सिगमंड फ्रॉइड आणि अल्बर्ट एलिस या प्रमुख मानसशास्त्रज्ञांचा उल्लेख करावा लागेल. सध्या जगभर प्रचलित असलेली मान्यताप्राप्त मानसोपचार पद्धती म्हणून  विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र पद्धती ( Rational Emotive Behavioral Therapy ) प्रसिद्ध आहे. आयुष्य हे एक मर्यादित घटनांची मालिका असते. घटना घडत असतात आणि त्या घडतच राहणार. पण सामान्य मनुष्य घडणाऱ्या छोट्यामोठ्या घटनांना समस्येचं लेबल चिकटवून टाकतो. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक घटनेला समस्या मानणं हीच खरी आणि मूळ समस्या आहे. आपल्या आयुष्यात घटना घडू लागल्यावर आपल्याला वाटते की त्या घटनेतच समस्या आहे. परंतु समस्येचं वास्तव्य आपल्याच डोक्यात असते. या मूळ गोष्टीपासून मात्र सर्व अनभिज्ञ असतात. म्हणून घडणाऱ्या घटनेकडे बघताना आपण आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित केले तर आपण त्या घटनेकडे  तटस्थपणे बघू शकू.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रणी झुंजता झुंजता…! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

रणी झुंजता झुंजता…! ☆ श्री संभाजी बबन गायके 

जिथे शहाणे पाय ठेवू धजत नाहीत तिथे मूर्ख जाण्याचा प्रयत्न करतात, असं म्हटलं जात. १९४८ पासून हाच मूर्खपणा पाकिस्तान करत आलेलं होतं. आधीच्या तब्बल तीन युद्धांतले लाजीरवाणे पराभव आणि तमाम जागतिक राजकीय मंचावर झालेली छी:थू असा इतिहास असतानाही १९९९ मध्ये पाकिस्ताने पुन्हा भारतीय हद्दीत पाऊल टाकण्याचा मूर्खपणा केलाच. पण यावेळी त्यांनी चोरट्यांचा मार्ग अवलंबला आणि धूर्तपणे भारतीय लष्करी चौक्यांचा अवैध ताबा घेतला. अशी ठिकाणे ताब्यात घेतली की जेथून भारतीय हद्दीतील लष्करी मार्गांवर नियंत्रण मिळवता येईल आणि भारताला गुडघे टेकायला भाग पडेल. एका अर्थाने त्यांनी झोपलेल्या सिंहावरच जाळे टाकण्याचा प्रयत्न आरंभला होता. 

प्रचंड बर्फवर्षाव आणि इतर अनुषंगिक गोष्टींचा फायदा उचलत पाकिस्तान्यांनी टायगर हिल आणि लगतच्या सामरीकदृष्ट्या महत्त्वाच्या पर्वतशिखरांवर कब्जा केला होता. यात तोलोलिंग शिखराचाही समावेश होता. यावेळी त्यांची तयारी मोठी होती! काहीशा उशीराने का असेना पण  मोक्याच्या वेळी भारतीय सिंह जागा झाले….आणि त्यांनी आधी तोलोलिंग ताब्यात मिळवले. अर्थात यासाठीची किंमत रक्ताने मोजावी लागली. यापुढे रक्त,बलिदान हेच चलन राहणार होते या समरात…आणि शूर रक्ताची, धैर्यवान काळजांची कमतरता भारताकडे कधीच नव्हती आणि नसणार आहे! 

१७ हजार ४१० फुट उंची असलेले टायगर हिल ही अतिशय महत्वाची जागा होती. ती ताब्यात घेण्याआधी त्याच्या जवळची दोन ठिकाणे ‘इंडीया गेट’ आणि ‘हेल्मेट’ ही दोन शिखरे ताब्यात घेणे गरजेचे होते. यासाठी सैनिकांच्या अनेक तुकड्या मैदानात उतरवल्या गेल्या होत्या. ८,सीख बटालियन याच कामावर नेमली गेली होती. या बहादुरांनी या पर्वतशिखरांच्या जवळपास पोहोचून टायगर हिलवर तोफांचा भडीमार करण्यासाठी अगदी मोक्याची जागा हेरून तशी तयारी पूर्ण केली होती. सर्व बाजूंनी एकदम निकराचा हल्ला चढवूनच विजय मिळू शकणार होता. खालून वर चढणारे सैनिक पाकिस्तान्यांच्या गोळीबाराच्या,तोफांच्या अगदी अचूक निशाण्यावर येत होते. सत्तर ऐंशी अंश कोनांच्या टेकड्या उभ्या चढून जाणं एरव्हीही कठीण..त्यात आता तर वरून अक्षरश: आग ओकली जात असताना असे साहस करणे फक्त वीरांनाच शक्य होते…आणि असे वीर आपल्याकडे होते! 

वरिष्ठ सेनाधिकारी सामरिक डावपेच आखत होते…कुठे यश तर कुठे मृत्यूचा सामना होत होता. सैन्याच्या विविध तुकड्यांना विशिष्ट कामे सोपवली गेली होती…मोठ्या प्रमाणात भारतीय सैनिक धारातीर्थी पडत होते. लीव नो मॅन बहाईंड…अर्थात कुणाही साथीदाराला मागे सोडून यायचं नाही हे सेनेचं ब्रीद. या ब्रीदाला प्रसंगी प्राणांची आहुतीही देऊन जागलं जातं.  आपल्या साथीदारांचे रक्ताने माखलेले देह उचलून ते मागे आणण्याची जबाबदारी सुबेदार निर्मल सिंग आणि त्यांच्या सहका-यांना दिली गेली. त्यांचे गणवेश रक्ताने माखले…त्यांच्या दाढीचे केसही रक्ताने लालेलाल झाले होते. 

सदैव दाढी राखणे हा तर गुरूंचा आदेश सीख पुरूषांसाठी. कर्तव्यात अडसर ठरू नये म्हणून सीख सैनिक आपली दाढी एका विशिष्ट कापडी पट्टीने बांधून ठेवतात..त्याला ठाठा असं म्हणतात! सुबेदार निर्मलसिंगांचा आपल्या दाढीला लागलेलं रक्त पाहून पारा चढला…त्यांनी प्रतिज्ञा केली….माझ्या साथीदारांच्या हौतात्म्याचा बदला घेतल्याशिवाय मी ठाठा बांधणार नाही…मी दाढी मोकळी ठेवीन….आणि त्यांच्या सोबतच्या सर्वांनीच तशी प्रतिज्ञा घेतली…आणि आसमंतात शीखांची युद्धगर्जना घुमू लागली….जो बोले सो निहाल…सत श्री अकाल ! 

.. ‘हम चलते है जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं…’ कवीने किती समपर्क शब्दांत लिहिलं आहे….गुहांमध्ये,कातळांआड लपून बसलेल्या पाकिस्तान्यांची काळजं शीखांच्या या आरोळ्यांनी हादरून गेली! 

यावेळी त्यांच्या समवेत एक विशी-बावीशीचे तरूण लेफ्टनंट दर्जाचे अधिकारी होते….लेफ्टनंट कणद भट्टाचार्य. ते नुकतेच ८ शीख बटालियनमध्ये रुजू झाले होते. बंगालचा हा वाघ. कराटेमधील ब्लॅक बेल्ट धारक. घराण्यातील पहिलाच सैनिक होण्याचा मान मिळवणारा देखणा गडी. सैन्यात भरती झाल्यानंतर लगेचच युद्धात सहभागी होण्याचे भाग्य लाभलेला अधिकारी. कणद साहेबांच्या बटालियनचे कमांडर कर्नल जयदेव राठोड गोळीबारात जखमी झाल्याने त्यांना उपचारांसाठी मागे न्यावे लागणार होते…पण मग मोहिमेचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न उभा राहिला. लेफ्टनंट दर्जाच्या अधिका-याला सशस्त्र संघर्ष सुरू असताना प्लाटूनचं नेतृत्व करण्याची जबाबदारी देता येत नाही, असा नियम असल्याने राठोड साहेबांनी चक्क युद्धाच्या मैदानातच कणद साहेबांना कॅप्टन पदी बढती दिली…..असं बहुदा प्रथमच घडले असावे. पण युद्ध जारी राहिले पाहिजे…थांबायला वेळ नाही ! 

मोजके सैनिक हाताशी. प्रचंड बर्फवर्षाव. अंगावर येणारे कडे आणि वरून सातत्याने होणारा गोळीबार,तोफगोळ्यांचा अचूक वर्षाव. यातूनही वर जायचे होते…शत्रूला वर पाठवायला. आता खाली बोफोर्स तोफा तैनात होत्या. खालून वर चढणा-या सैनिकांना कव्हरींग फायर देता यावा म्हणून त्या वरच्या पाकिस्तानी चौक्यांवर आगफेक करीत होत्या. कणद साहेबांनी आपल्या तुकडीची दोन भाग केले आणि दोन्ही बाजूंनी चढाईला आरंभ झाला. भारतीय सैन्य या बाजूने असे अचानक येईल असे पाकिस्तान्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. आपले लोक पाकिस्तान्यांच्या अगदी जवळ पोहोचतात न पोहोचतात तोच त्यांनी वरून तिखट मारा आरंभला. तशाही स्थितीत कणद साहेब आणि एका बाजूने सुबेदार निर्मलसिंग आणि इतर सर्व जवान वर चढाई करीत राहिले. अतिशय निमुळती,घसरडी जागा. शत्रू आरामात निशाणा साधतोय….एवढ्यात वर असलेल्या शत्रूचा निर्मल सिंगांना सुगावा लागला…जीवाची पर्वा न करता ते वर त्वेषाने चढून गेले…शत्रूला संधीही न देता त्यांना दोन जणांना यमसदनी धाडले. खड्ड्यांत लपून राहिलेल्या एका एका शत्रूचा शोध घेत त्यांनी अनेकजण अचूक टिपले. एका क्षणी तर प्रत्यक्ष हातघाईची लढाई झाली….शत्रू मारला जात होता ! अंधार दाटून आला होता. अन्नपाणी घेण्याचीही सवड नव्हती आणि ते फारसे शिल्लकही राहिलेले नव्हते. जखमी अधिका-यांना, साथीदारांना मागे सोडून पाकिस्तानी घुसखोर पळून जात होते. मृतांच्या खिशांत सापडलेल्या ओळखपत्रांवरून शत्रू कुणी मुजाहिदीन घुसघोर नव्हते तर पाकिस्तानच्या नियमित लष्करातील लोक या छुप्या हल्ल्यात सामील होते, हे सिद्ध होत होते.  

पण वरून होणारा गोळीबार सावज टिपत राहिला….आपले थोडेथोडके नव्हेत तर तब्बल तीस सैनिक जवान शहीद झाले होते….पण मोहिम फत्ते होत आली होती….इंडीया गेट आणि हेल्मेट शिखरे ताब्यात येणे म्हणजे टायगर हिल पादाक्रांत करणे अशक्य नाही ! ही शिखरे ताब्यात घेणे एकवेळ सोपे पण ती राखणे ही फार मोठी गोष्ट. सारागढी ची याद यावी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानने अगदी कसोशीने ही शिखरे पुन्हा ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली होती. कारण टायगर हिल ताब्यात ठेवायची म्हणजे त्यासभोवतीची महत्त्वाची शिखरेही ताब्यात असायलाच पाहिजेत. सवयीप्रमाणे पाकिस्तानने सकाळी पुन्हा हल्ल्यांमागून हल्ले चढवायला सुरूवात केली. पण कणद साहेब आणि निर्मल सिंग साहेब आणि इतर बहाद्दरांनी त्यांना पुढे येऊ दिले नाही….शेवटची गोळी आणि शेवटचा श्वास शिल्लक असेतोवर हे शक्यही नव्हते….गड्यांनी गड राखले होते ! यात अनेक सिंह कामी आले !  या सिंगांच्या अर्थात सिंहांच्या दाढ्या अजूनही मोकळ्याच होत्या..आताही त्या रक्तातळलेल्या होत्या…यावेळी त्यांच्या स्वत:च्या शरीरातून वहात असणा-या रक्ताने. 

गुरू गोविंदसिंग साहेबांनी सांगून ठेवलं आहे…

हे ईश्वरा, मला असा वर द्या की,

शुभ काम करताना माझी पावले मागे सरू नयेत.  

युद्धात उतरलो तर माझ्या मनात शत्रूची भीती नको 

आणि मीच ते युद्ध जिंकावे. 

तुमचे गुणगान गाण्यात माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यता असो 

जब आव की अउध निदान बनै अति ही रन मै तब जूझ मरों ॥

आणि जीवनाचा अंत रणभूमीमध्येच होवो….झुंजता झुंजता मृत्यू येवो! 

लेफ्टनंट कणद भट्टाचार्य(सेना मेडल),सुबेदार निर्मलसिंग (वीर चक्र) सुबेदार जोगिंदर सिंग (सेना मेडल), नायब सुबेदर कर्नेल सिंग (वीर चक्र), नायब सुबेदार रवैल सिंग (सेना मेडल) आणि इतर ३० जवान या मोहिमेत कामी आले. सर्वांचा नामोल्लेख इथे शक्य नाही. येत्या काही महिन्यांत कारगिल विजयाचा रौप्य महोत्सव येतो आहे….वीरांचे स्मरण अत्यावशयक म्हणून हा प्रयत्न. – – जयहिंद !!! 

(यात अनुराधाताई प्रभुदेसाईंनी त्यांच्या लक्ष्य फाऊंडेशनसाठी घेतलेल्या कर्नल जयदेव सिंग राठोड साहेबांच्या मुलाखतीतील माहितीचाही समावेश आहे.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सखी मंद झाल्या तारका… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ सखी मंद झाल्या तारका… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

नुकताच आलेला ‘स्वरगंधर्व’ पाहिला.. आणि बाबुजींचा एक जुना किस्सा आठवला. वरळीच्या ‘रेडीओवाणी’ या स्टुडिओत काही गाण्यांचं रेकॉर्डिंग सुरु होतं. एक गाणं झालं.. मध्ये थोडा वेळ होता, म्हणुन बाबुजी चहा घेण्यासाठी खाली आले.ते एक छोटं रेस्टॉरंट होतं.

‘एक कप चहा.. एक रुपया ‘ असा बोर्ड होता. चहा आला..तो पूर्ण कपभर नव्हता.. थोडा कमी होता. बाबुजींनी वाद घालायचा सुरुवात केली. प्रश्न पैशाचा नव्हता.. तत्वाचा होता..वाद वाढला,पण तेवढ्यात रेस्टॉरंटचा मालक आला. त्याने बाबुजींना ओळखले.. पूर्ण कप भरुन चहा दिला.. इतकंच नाही तर लोणी लावलेली एक स्लाईसही दिली.. बाबुजी खुश झाले..नंतरचं रेकॉर्डिंग पण झकास झालं.

ते गाणं होतं….. ‘ सखी मंद झाल्या तारका.’ 

या गाण्याच्या खुप आठवणी आहेत. श्रीधर फडके एअर इंडियामध्ये अधिकारी होते. एअर इंडियाचं एक गेस्ट हाऊस होतं.. लोणावळ्याला. तेथे अधुनमधून तो पिकनिक ॲरेंज करायचा. अशीच एक पिकनिक ठरली. सुधीर फडके..राम फाटक.. सुधीर मोघे..श्रीकांत पारगावकर..उत्तरा केळकर अशी बरीच मंडळी होती. बाबुजींनी ठरवलं.. त्यांच्या काही गाण्यांच्या तालमी तेथेच करायच्या. लोणावळ्याच्या रमणीय परिसरात.. तरुण मंडळींच्या सहवासात तालमी छान रंगतील याची सर्वांना खात्री होती.

तर ‘सखी मंद झाल्या तारका ‘या गाण्याची तालीम सुरू झाली. गाण्याचे संगीतकार होते राम फाटक. त्यांचा आणि बाबुजींचा वाद सुरु झाला.

… ‘सखी मंद झाल्या तारका.. आता तरी येशील का..यानंतर पुन्हा एकदा’..येशील का’ असा एक खटका आहे.तो बाबुजींना मान्य नव्हता. राम फाटक म्हणाले..त्या खटक्यामधेच खरी गंमत आहे.पण बाबुजी ऐकायला तयार नव्हते.

शेवटी राम फाटक म्हणाले…. “या गाण्याचा संगीतकार मी आहे “

त्यावर बाबुजी म्हणाले…. “मग मी हे गाणं गाणार नाही असं म्हटलं तर?”

राम फाटक म्हणाले…. “हा तुमच्या मर्जीचा भाग आहे.  ‌म्हणणार नसाल तर आत्ताच सांगा, म्हणजे मला दुसरा आवाज शोधायला सोईचं होईल.”

बाबुजींनी वाद थांबवला. खेळीमेळीच्या वातावरणात रेकॉर्डिंग पार पडलं..गाणंही पुढे खुप गाजलं.

मुळात हे गाणं जन्माला आलं कसं?तो ही एक किस्सा आहे.

१९६७-६८ मधली गोष्ट.राम फाटक नुकतेच पुणे आकाशवाणीवर रुजु झाले होते.त्यांनी एक कार्यक्रम बसवला..’स्वरचित्र’ हे त्याचं नाव.दर महीन्याला एक नवीन गाणं सादर करण्याचा हा कार्यक्रम होता.१९८० पर्यंत हा कार्यक्रम सुरु होता.

या कार्यक्रमात राम फाटकांनी खुप सुंदर सुंदर गाणी सादर केली.एखादं नवीन गीत शोधायचं.. त्याला चाल लावायची.. आणि एखाद्या गायकाकडुन ते गाऊन घ्यायचं अशी या कार्यक्रमाची संकल्पना.

राम फाटक यांनी या कार्यक्रमात पं‌.भीमसेन जोशी यांच्याकडून अनेक गीते गाऊन घेतली.ती गाणी म्हणजे एक अलौकिक ठेवा आहे.

तीर्थ विठ्ठल.. क्षेत्र विठ्ठल..

अणुरणिया थोकडा..

पंढरी निवासा सख्या पांडुरंगा..

नामाचा गजर..

ज्ञानियांचा राजा ..

काया ही पंढरी..

ही सर्व गीते म्हणजे बावनकशी सोनंच आहे..पण ही सर्व गीते अभंग या प्रकारात येतात.राम फाटक यांच्या मनात एकदा आलं की भीमसेन जोशींकडुन एखादं भावगीत गाऊन घ्यावं.त्यादृष्टीने राम फाटक एखादं गाणं शोधु लागले.तोच कवी सुधीर मोघे आले.फाटक यांना एक मुखडा सुचला होता.तो होता..

‘सखी तारका मंदावल्या….. 

गाण्याची संकल्पना फाटक यांनी सुधीर मोघे यांना सांगितली..बरीच चर्चा झाली.. आणि कवी राजांनी थोडासा बदल करून पहिली ओळ लिहिली..

सखी मंद झाल्या तारका……. 

दुसरे दिवशी सुधीर मोघे पुर्ण कविता घेऊन आले.ते एक उत्कृष्ट काव्य होतं.उर्दू शायरीच्या धाटणीचे.राम फाटक यांनी अप्रतिम चालीत ते गुंफले.. यथावकाश पं.भीमसेन जोशी यांच्या आवाजात ते ध्वनीमुद्रीत झालं. काव्य..चाल..गायन या सगळ्यांचीच उत्तम भट्टी जमली.. आणि एका अजरामर गीत जन्माला आलं.

कवी.. संगीतकार..गायक.. आणि अर्थातच समस्त मराठी रसिकांना या गाण्याने सर्व काही दिलं..

या गीतातच म्हटल्याप्रमाणे..

जे जे हवेसे जीवनी .. ते सर्व आहे लाभले.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ९ — राज विद्या राज गुह्यः योग — (श्लोक २१ ते ३४) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ९ — राज विद्या राज गुह्यः योग — (श्लोक २१ ते ३४) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालंक्षीणे पुण्य मर्त्यलोकं विशन्ति ।

एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥२१॥

*

भोगत स्वर्गलोकासी जोवरी पुण्य संचयात

लय होताचि पुण्याचा  परतुनी भूवरी  येत 

सकामकर्मी पालनकर्ते आचरण त्रिवेदांचे

भोगलालसीयांच्या पदरी फल द्यु-मृत्युलोकाचे॥२१॥

*

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥२२॥

*

अनन्यभावे चिंतन करुनी  जो मजला भजतो

योगक्षेम त्याचा धुरा घेउनी मीच सांभाळतो ॥२२॥

*

येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ।

तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्‌ ॥२३॥

*

श्रद्धेने जे भजती पार्था अन्य देवतांना

नसेल जरी ती विधिपूर्वक ममही आराधना ॥२३॥

*

अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।

न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते ॥२४॥

*

मीच भोक्ता मीच दाता स्वामी सर्व यज्ञांचा

या तत्वा जाणे ना त्या ना लाभ मम प्राप्तीचा ॥२४॥

*

यान्ति देवव्रता देवान्पितृन्यान्ति पितृव्रताः ।

भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्‌ ॥२५॥

*

पितरांसी पूजिताती त्या प्राप्त पितृलोक

भूतांसी पूजिताती त्या प्राप्त भूतलोक

देवांना पूजिताती त्या प्राप्त देवलोक

मम पूजिता प्राप्त मम परमात्मस्वरूप ॥२५॥

*

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।

तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥२६॥

*

भक्तीने अर्पिले पत्र सुमन जल जे ही मजला

समस्त अर्पण स्वीकारुन मी वृद्धिंगत मम तोषाला ॥२६॥

*

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्‌ ।

यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्‌ ॥२७॥

*

भक्षण करिशी हवन करिशी कर्म तुझे नी दान

तपस्या तुझी हे कौंतेया करी रे मजला समर्पण ॥२७॥

*

शुभाशुभफलैरेवं मोक्ष्य से कर्मबंधनैः ।

सन्न्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥२८॥

*

आचरणासी अशा आचरी जीवनात सर्वदा

मुक्त होउनी कर्म बंधने शुभ अथवा अशुभा

कर्मफलांच्या सन्यासाने होशील तू युक्तात्मा

मुक्त होउनी पावशील मज होशील परमात्मा ॥२८॥

*

समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ।

ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्‌ ॥२९॥

*

प्रिय ना अप्रिय कोणी सारे समान मजला असती

त्यांच्या ठायी मी माझ्या हृदयी जे भक्ती अर्पिती ॥२९॥

*

अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्‌ ।

साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥३०॥

*

दुराचारी मम भक्तीमध्ये अनन्य जर जाहला

साधु तयालाही जाणावे मम भक्तीते रमला ॥३०॥

*

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति ।

कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥३१॥

*

मम भक्ता ना अधोगती शाश्वत शांती प्राप्ती

धर्मात्मा होई तो सत्वर जाण माझी उक्ती ॥३१॥

*

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्यु पापयोनयः ।

स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्‌ ॥३२॥

*

नारी वैश्य शूद्र अन्य नीचकुल तरी पावती परमपदाला

अनन्य भावे होतील समर्पण जर ते पावन मम पदाला ॥३२॥

*

किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।

अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम्‌ ॥३‌३॥

*

पुण्यशील द्विज वा राजर्षी मम भक्त

तयांसी सहजी होय सद्गती मोक्ष प्राप्त ॥३३॥

*

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।

मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण: ॥ ३४॥

*

भक्त होउनिया माझा  करी रे माझे पूजन  

निरुद्ध करुनी तव चित्ता मज करी रे नमन 

मजठायी होऊन परायण करिता योगक्षेम 

विलीन होशिल माझ्या ठायी मोक्षाचे वर्म  ॥३४॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्री कृष्णार्जुनसंवादे राजविद्यायोगो नाम नवमोऽध्यायः ॥९॥

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी राजविद्यायोग नामे निशिकान्त भावानुवादित नवमोऽध्याय संपूर्ण॥९॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares