मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कृष्णं वंदे जगद्गुरुम् ☆ श्री हेमंत तांबे ☆

श्री हेमंत तांबे 

? इंद्रधनुष्य ?

☆ कृष्णं वंदे जगद्गुरुम् ☆ श्री हेमंत तांबे 

भगवान कृष्णाने छोट्या करंगळीनंच गोवर्धन पर्वत का उचलला ?

तसंही आपण सर्व जाणतोच की, इंद्राचा गर्व हरण करण्यासाठी श्रीकृष्णानं करंगळीनं गोवर्धन उचलला.

दुसऱ्या बाजूने सुध्दा या प्रसंगाचा विचार करता येईल.

जेव्हा कृष्णानं इंद्राच्या रागा पासून गोकुळ वासियांचं संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वतच आपल्या बोटानं उचलण्याचं ठरवलं, तेव्हा कृष्ण आपल्या हाताच्या बोटांना विचारतो, मी कोणत्या बोटानं पर्वत उचलू ?

सर्वात आधी अंगठा म्हणाला, मी सर्वात ताकदवान आहे, पुरुष आहे, बाकीच्या तर स्त्रिया आहेत, आपण पर्वत उचलण्यासाठी माझाच वापर करावा !

नंतर तर्जनी म्हणते, भगवान, कधी कुणाला चुप बस असं सांगताना मिच कामास येते.आणि आपण जे काम करणार आहात ते इंद्राला चुप करण्याचंच आहे.म्हणून आपण माझा वापर करावा, हे उत्तम !

यानंतर मध्यमा म्हणाली, सर्वात उंच होण्यासोबतच मी ताकदवान सुध्दा आहे.म्हणून या कामासाठी आपण माझाच विचार करावा !

अनामिकेला खात्री होतीच, तरीही ती म्हणाली, भगवान, सर्व पवित्र कामं माझ्यामुळं संपन्न होतात. सर्व मंदिरांत मीच देवतांना टिळा लावते.

आता कृष्णानं फक्त छोट्या करंगळीकडे पाहिलं, तिच्या डोळ्यात पाणी होतं, ती म्हणाली, ” भगवान, एक तर मी सगळ्यात छोटी आहे.माझ्यात असा कोणताच असामान्य गुण नाही.

माझा कुठं उपयोग सुध्दा होत नाही. माझ्याकडे एवढी शक्ती सुध्दा नाही, की मी पर्वत उचलू शकते. मला फक्त याची खात्री आहे की, मी तुझी आहे !” छोट्या करंगळीचं म्हणणं ऐकून भगवान प्रसन्न झाले आणि म्हणाले, “ कनिष्ठे तुझी विनम्रता पाहून मी आनंदी झालो आहे. जर काही उच्च मिळवायचं असेल तर विनम्र होणं आवश्यक आहे.” ….. आणि कनिष्ठेच्या सन्मानासाठी भगवंतानं करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला !”

कृष्णं वंदे जगद्गुरुम् 

© श्री हेमंत तांबे

पाटगाव. 

मो – 9403461688

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एआय – मदतनीस की स्पर्धक… भाग – 1 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ एआय – मदतनीस की स्पर्धक… भाग – 1 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे  ☆

इंजिनिअर या नात्याने मी गेली ४० वर्षे ऑटोमेशन क्षेत्रात काम करतो आहे. या वाटचालीत मी ऑटोमेशन क्षेत्रातली प्रगती जवळून बघितली. त्या वाटचालीतला काही अंशी वाटा उचलला आहे. या चाळीस वर्षात अगदी साध्या manual मशीन पासून ते आजच्या ए-आयपर्यंतचा काल मी बघतोय. कमीतकमी मानवी श्रमामध्ये क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेणे हे ऑटोमेशनचे सुरवातीचे उद्देश. पुढे केवळ मानवी श्रम कमी करणे हा उद्देश राहिला नाही तर या ऑटोमेशनच्या माध्यमातून कमीतकमी वेळात आणि श्रमात जास्तीत जास्त उत्पादन घेणे हे शक्य झाले आणि मशीन्स त्या उद्देशाने डिझाईन होऊ लागली. टकळी चरखा वापरून सुत काढणे यापेक्षा इलेक्ट्रिक मोटारवर चालणारी मोठमोठी स्पिनिंग मशीन हे सुत काढू लागली आणि कापडाचे उत्पादन प्रचंड वाढले. मी म्हणेन की ऑटोमेशनने कापड स्वस्त केले आणि चांगल्या गुणवत्तेचे कापड सामान्य माणसाच्या आवाक्यात आले. महात्मा गांधींचा चरखा-माग वापरून जर इतक्या लोकसंख्येला कापड पुरवायचे म्हणले तर निम्मा देश आज गांधींसारखा उघडा राहिला असता आणि एक चतुर्थांश देश जाडेभरडे हरक आणि मांजरपाट कापड वापरत असता. या कापडाचे प्रकार आजच्या पिढीला माहित देखील नाहीत. जसजसा काळ गेला ऑटोमेशनचा उत्पादन क्षमता वाढवणे या पलीकडे  आता वस्तूची गुणवत्ता आणि अचूकता वाढवणे हा झाला. कारण मानवाला अशक्य जमणारी गुणवत्ता आणि अचूकता मशीन सहज देऊ लागली. वर मी कपड्यांचे उदाहरण दिले. पण इतर अनेक क्षेत्रात ऑटोमेटेड मशीनने प्रवेश केला. जसे की, प्लास्टिक, घातु प्रक्रिया, शेती आणि एक ना अनेक. आज कोणतेही क्षेत्र ऑटोमेशन शिवाय नाही. ऑटोमेशनमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादकता, अचूकता आणि गुणवत्ता देऊन मानवी जीवन सुकर करण्याऱ्या वस्तू सामान्य माणसाच्या आर्थिक आवाक्यात आणून दिल्या. यात अगदी गृहिणींच्या स्वयंपाकघरातील वस्तूंपासून वाहनापर्यंत अनेक गोष्टी सामन्यांच्या आवाक्यात आल्या. ऑटोमेशनमुळे आलेली गुणवत्ता ठीक आहे पण उत्पादकता आता राक्षसी होऊ लागली आहे. उत्पादकता वाढली तशी कॉस्ट कमी होऊ लागली आणि किंमती सामन्यांच्या आवाक्यात आल्या हे जरी खरे असले. उत्पादकता मानवी मर्यादेच्या पलीकडे जाऊ लागली तसा याचा परिणाम निसर्गावर होऊ लागला. जास्त उत्पादन करण्यासाठी लागणारे रॉ मटेरीअल निसर्गातून मिळवणे अपरिहार्य असल्याने निसर्ग ओरबाडला जाऊ लागला. नवीन तयार होणारा माल बाजारात प्रचंड प्रमाणात येऊ लागल्याने यातून use and throwवृत्ती वाढली आणि प्रचंड प्रमाणात कचरा निर्मिती होऊ लागली. मानवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट ही कचरा निर्मितीचे पाहिले पाउल ठरू लागले. वस्तू गरजेतून घेण्यापेक्षा स्टेट्स सिम्बॉल म्हणून घेण्याची वृत्ती वाढू लागली. ऑटोमेशनच्या पुढच्या टप्प्यात जसे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल आणि software आधारित वस्तू आल्या तसे एकाच वस्तूंचे नवनवीन प्रकार (versions) आणि वैशिष्ठ्य (features) बाजारात येऊ लागले तसे वस्तूचे आपल्याकडील असलेले व्हर्जन जुने वाटू लागले. जुने टाकून नावे घ्या ही होड सुरु झाली. वस्तू टाकून देण्यासाठी ती निकामी होण्याची गरज राहिली नाही version जुने झाले out dated (obsolescence ) झाले, old fashioned झाले, हे वस्तू टाकून देण्याचे महत्वाचे कारण होऊ लागले. दर २ वर्षांनी बदलता मोबाईल, तीन वर्षांनी बदलती कार हे अभिमानाचे विषय होऊ लागले. हे घड्याळ माझ्या वडिलांनी १० वर्षे वापरले मग मी १५ वर्षे वापरले किंवा मी स्कूटर गेली १५ वर्षे उत्तम मेंटेन करून अजून वापरतोय असे अभिमानाने सांगणारी माणसे हास्यास्पद ठरू लागली.

ही सगळी प्रस्तावना करायचे कारण म्हणजे आता ए-आय येऊ घातले आहे नव्हे दारात उभे आहे. आजपर्यंत जे ऑटोमेशन घडत होते ते वस्तू उत्पादकता, वस्तू गुणवत्ता आणि अचूकता यासाठी घडत होते. मी या क्षेत्रात काम करताना उत्पादकता,गुणवत्ता आणि अचूकता या कारणांबरोबर एक सुप्त पण महत्वाचे आणि जास्त जाहीर चर्चा न केलेले कारण म्हणजे मनुष्यबळ कमी करणे हे हमखास असायचेच. एखादे ऑटोमेशन करण्याचे ठरवताना किती माणसे ते काम करत आहेत त्यातील किती कामगार कमी करता येतील किंवा दुसऱ्या कामावर वळवता येतील हा विचार करून ऑटोमेशन बजेट आणि आमचे कोटेशन मंजूर केले जाई. मनुष्यातले काही स्वभावतः असणारे दुर्गुण, भावनिक मूडवर असलेले अवलंबित्व  आणि बदलती परिस्थिती यातून हे ऑटोमेशन वाढत गेले. जिथे माणूस काम करणे शक्य आहे अशी कामे देखील यंत्रे करू लागली. वाढती मनुष्यबळ कॉस्ट, सततच्या आर्थिक मागण्या, कामचुकारपणा, अनाठायी सुट्ट्या घेणे, काही अवास्तव कामगार कायदे इत्यादीमुळे उत्पादन प्रक्रियेतील मनुष्यबळ काढून तिथे automated machine ने काम करून घेण्याकडे व्यवस्थापनाचा कल वाढू लागला. यातून NC/CNC/VMCमशीन्स, रोबोट, SPMs हे सर्रास येऊ लागले या मशीन्सची उत्पादकता मानवापेक्षा जास्त होतीच पण अचूकता आणि गुणवत्ता हा मोठा फायदा व्यवस्थापनाला आणि पर्यायाने ग्राहकाला मिळू लागला. उत्पादन क्षेत्रात ऑटोमेशन वाढले तसे softwareने ऑफिस ऑटोमेशन क्षेत्रात अचूकता, वेळेची बचत आणली. वेगवेगळ्या व्यवसायात घडणाऱ्या प्रत्येक activity चे dataस्वरुपात documentation होऊ लागल्याने प्रचंड data तयार होऊ लागला. हा data व्यवसायाची पुढील दिशा (Strategy) ठरवण्यास उपयुक्त ठरू लागला. निर्णय प्रक्रियेतला महत्वाचा घटक झाला. मानवी अनुभवला फारशी किंमत उरली नाही. त्यामुळे केवळ वयाच्या आणिअनुभवाच्या जोरावर प्रमोशन देणे. १९८४ साली मी फिलिप्स कंपनीत असताना word processorनावाचे electronic टायपिंग मशीन फिलिप्सच्या डायरेक्टरच्या केबिनमध्ये आले. ते फक्त डायरेक्टर आणि त्यांची सेक्रेटरी वापरत असे. साधे पत्र लिहिण्याचे मशीन पण आम्हाला ते वापरण्याची परवानगी नसल्याने त्याचे फार अप्रूप. हे मशीन वापरणारी त्यांची सेक्रेटरी लई भाव खायची याचा आमच्या मनात मत्सर होता. आता कॉम्पुटर ऑफिस ऑटोमेशनचा भाग झाल्याने सेक्रेटरीच्या भाव खाण्याचे आणि आमच्या जळण्याचे हसू येते. फिलिप्सच्या प्रत्येक मॅनेजरच्या केबिन बाहेर त्याची सेक्रेटरीचे टेबल आणि टाईप रायटर असे. आता कॉम्प्युटरमुळे मॅनेजरच राहिले नाहीत.

मशीन ऑटोमेशनमुळे उत्पादकता वाढली त्यामुळे काही कामातील मनुष्यबळ कमी झाले असले तरी बेकारी फारशी वाढली नाही कारण या वाढत्या उत्पाद्कतेमुळे नवी क्षेत्रे तयार होत होती आणि मनुष्यबळ तिकडे वळवले गेले. आर्थिक व्यवहार प्रचंड वाढले. या वाढीव आर्थिक व्यवहारांना सहजपणे तोंड देईल अशी बँकिंग प्रणाली विकसित झाली. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री श्रीकांत कुलकर्णी

मो ९८५००३५०३७ 

Shrikaant.blogspot.com;  Shrikantkulkarni5557@gm

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

पुणे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चिमणी वाचवा … ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ चिमणी वाचवा … ☆ श्री प्रसाद जोग

जगभरात २० मार्च हा दिवस ‘ चिमणी वाचवा दिवस ‘ म्हणून साजरा केला जातो.

चिमणी आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग. अगदी जन्माला आल्यावर आई आपल्याला भरवते तेंव्हा सुद्धा ती एक घास चिऊचा म्हणून देते आणि त्या चिमणीची आठवण काढत आपण जेवतो. जरा मोठं झालं की झोपण्यापूर्वी एक गोष्ट सांग हा लहान मुलांचा लकडा असतो ,तेंव्हा सुद्धा चिऊताई हजर असायची आणि मग कावळेदादा येऊन म्हणायचा “चिऊताई चिऊताई दार उघड” , पुढची गोष्ट आपण साऱ्यांनी लहानपणापासून ऐकली आहेच.

जंगले निर्माण करण्यामध्ये चिमण्यांचे मोठे योगदान आहे.त्यांनी खाल्लेल्या वेगवेगळ्या बिया त्याच्या विष्ठेमधून पुन्हा जमिनीत रुजतात आणि त्यातून वृक्ष निर्माण होत असतात.मानवाने शहरीकरण झपाट्याने वाढवले त्या मुळे जंगले नष्ट होऊ लागली आणि आहे त्या शेतीत जादा पीक घेण्याच्या हव्यासापायी कीटक नाशकांचा वापर अवाच्या सव्वा वाढला आणि तोच या चिमण्यांच्या जीवावर देखील उठला. कीटक नाशके फवारल्यावर ते धान्य खाऊन चिमण्या मरून जाऊ लागल्या.रोज अंगणात बागडणाऱ्या चिमण्या हळू हळू दिसेनाशा होऊ लागल्या आहेत. चिमण्यांची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे,याच चिमण्या पिकावरील कीड/ आळ्या खाऊन टाकतात व शेतातले पीक वाचवतात.

दिवसेंदिवस पर्यावरणाचा तोल देखील ढासळायला लागला आहे,उष्णता वाढायला लागली आहे ,ही उष्णता ही गर्मी चिमण्यांना असह्य होते, त्यावर इलाज म्हणजे पसरट मातीच्या भांडयांमधे थोडे पाणी भरून ठेवा मग पहा भर दुपारी चिमण्या त्या मध्ये डुंबतील, पाणी पितील,जवळ ठेवलेले अन्नाचे कण खाऊन तृप्त होतील, तेंव्हा आपल्याला मिळणारे समाधान लाखमोलाचे असेल. अशी हजारो वर्षे मानवाला सोबत करणाऱ्या या चिमण्यांना वाचवायची जबाबदारी आपलीच आहे .त्या साठी फार काही करायची सुद्धा गरज नाही.

अशी ही चिमणी सकाळ झाली की किलबिलाट करून आपल्याला जागे करत असते.तिच्यासाठी जर शक्य असेल तर बागेमध्ये पुठ्ठयाचे किंवा लाकडी घरटे टांगून ठेवा. मोठ्या शहरामध्ये रहात असाल तर फ्लॅटच्या गॅलरीमध्ये रोजच्यारोज थाळीमध्ये पाणी ठेवा अगदी चार दाणे जरी तिला खाऊ घातले तरी मला खात्री आहे सगळ्यांना मोठा आनंद होईल.

चिमणीचा आवाज

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य  ☆ सनातन संस्कृतीमधील काही ऋषिका — ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ सनातन संस्कृतीमधील काही ऋषिका — ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

1) लोपामुद्रा

2) रोमशा

3) नदय

4) शश्वती अंगीरसी

5) अपला

6) विभावरी

7) सूर्या

8) काक्षिवती

9) वसूक्रपत्नी

10) यमी वैवस्वती

11) उर्वशी

12) इंद्रनी

13) पौलोमी

14) सरमा देवशुनी

15) जुहू

16) रात्री

17) सर्प रादांनी

18) श्री

19) लाक्षा

20) इंद्रमातर 

वरील नावे आपल्या सनातन संस्कृतीमधील काही महिला ऋषींकाची आहेत, ज्यांनी वेदांचे सूक्त व मंत्राच्या व्याख्या तयार करण्यामध्ये मौलाची कामगिरी केली आहे.

ब्रह्मवादिनी गार्गी,सर्वात मोठं नाव,तपस्विनी गार्गी

मैत्रेयी,याज्ञवल्क्य पत्नी

वाचक्नवी

सुलभा

वडवा 

प्रातिथेयी

काशकृत्स्नी (मीमांसा दर्शनावर काशकृत्स्नी ग्रंथकर्ती)

ब्रह्मवादिनी ऋता

स्वयंप्रभा

जया,सुप्रभा या दोघीही दक्ष कन्या आणि कृशाश्व ऋषिंच्या पत्नी, यांनी.अस्त्र संशोधन केलं होतं

स्वतः सीता वेदविद्याविभूषित

तसेच अरुंधती, वसिष्ठ पत्नी

अशी बरीच नावं आहेत, अनेक ऋषिका, ब्रह्मवादिनी, संशोधिका आहेत ज्या उच्च विद्याविभूषित आहेत,

ह्यापैकी किमान पाच नावाची आपण पुढील वर्षभरात ओळख करून घ्यावी. म्हणजे महिला दिन साजरा केल्याचे पुण्य आपल्याला लाभेल.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आजची सावित्री –  डॉ. रीना कैलास राठी”… शब्दांकन. . . ममता प्रितेश पोफळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “आजची सावित्री –  डॉ. रीना कैलास राठी”… शब्दांकन. . . ममता प्रितेश पोफळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

शुक्रवार दिनांक 23/2/2024 ची ती काळ रात्र !

काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण सिद्ध करणारी रात्र !

नाशिक येथील सुयोग हॉस्पिटल मध्ये  नेहमीप्रमाणे पेशंट व नातेवाईक यांची ये जा सुरू होती. हॉस्पिटलमध्ये कर्तव्यदक्ष डॉक्टर कैलास राठी व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर रीना राठी हे नेहमीप्रमाणे आपले राऊंड घेत होते. डॉक्टर रीना आपल्या बाल रुग्णांची तपासणी करावयास निघून गेल्या. राउंड संपवून त्या परत डॉक्टर कैलास राठी यांच्या केबिन कडे येत असताना त्यांना ‘ती’ व्यक्ती पळताना दिसली. अरे ही व्यक्ती अशी का पळत असावी एवढा क्षणभर विचार मनात येईपर्यंत मागून कर्मचाऱ्यांचा पकडा ! पकडा त्याला त्याने सरांना मारले ! असा आरडाओरडा सुरू झाला. हे ऐकताच रीनाच्या डोक्यात त्याने हातापायी केली असेल असेच आले, परंतु त्यांनी डॉक्टर कैलास यांच्याकडे धाव घेतली. पाहते तर काय ? सगळीकडे जणू रक्ताचा सडा पडला होता. तिचा जीवन साथी खाली पडला होता. तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

क्षणभर डोळ्यापुढे अंधारी आली, पण क्षणभरच! पुढच्या क्षणी ही सावित्री यमाशी दोन हात करायला सज्ज झाली. आपल्या वैद्यकीय क्षेत्राच्या प्रदीर्घ अनुभवाने व समय सूचकतेने तिने सगळे उपचाराचे चक्र फिरवले. हॉस्पिटलचा सगळा स्टाफ आपल्या लाडक्या सरांना सावरायला पुढे सरसावला व डॉक्टर रीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू झाले.

परंतु त्या क्रूर, विकृत व्यक्तीने कोयत्याचे एवढे वार केले होते की रक्त कुठून येत आहे हेच कळेना! डॉक्टर कैलास यांच्या डोक्यावर व मानेवर एवढे जीव घेणे वार केले होते की कुठल्या घावावर प्रथम उपचार करावा असे झाले. परंतु डॉक्टर राठी यांच्या मार्गदर्शनाखाली सराईत झालेला स्टाफ व डॉक्टर रीना यांच्या सूचनेनुसार अजिबात वेळ न घालवता उपचार सुरू झाले. एखादा सामान्य व्यक्ती अशा हल्यानंतर कुठलाच नसता पण हे डॉक्टर कैलास राठी, खरोखरच लढवैये व जबरदस्त इच्छाशक्तीचे धनी ! संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले असताना आपल्या पत्नीस काय उपचार द्यावे ही सूचना देत होते! जातीचे डॉक्टर ते !

पतीवर उपचार करताना डोक्यात फक्त त्यांना वाचवण्यासाठी काय काय करावे लागणार हेच विचार चक्र रीना यांच्या डोक्यात सुरू होते व त्या अन्वये त्या स्टाफला बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन सूचना देत होत्या. आपल्या सगळ्या भावना बाजूला जाऊन एक डॉक्टर बनवून त्यांनी एक ना अनेक बाबी लक्षात घेऊन डॉक्टर कैलास यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये ताबडतोब हलवण्याचा निर्णय घेतला व आपली समय सूचकता दाखवली. हा हा म्हणता ही वार्ता सगळीकडे पसरली. नातेवाईक, मीडिया, राजकारणी, समाजकारणी, शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर, विविध स्तरातील व्यक्ती अपोलो हॉस्पिटलच्या बाहेर जमा झाली. डॉक्टर राठी यांच्यावर झालेल्या प्राण घातक हल्ल्याचा निषेध होऊ लागला.

आयसीयू मध्ये अपोलो हॉस्पिटलचे निष्णात डॉक्टर्स व सुयोग हॉस्पिटलच्या तज्ञांची टीम यांनी आपले शर्थीचे प्रयत्न सुरू केले व डॉक्टर राठी यांच्यावर उपचार सुरू झाले.

आता या सावित्रीच्या, रीनाच्या लढाईचा दुसरा पर्व सुरू झाला. कैलास राठी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ती खरोखरच भयानक रात्र होती डॉक्टर रीना यांनी प्रण केला की सकाळचा स्कॅन होईपर्यंत मी पाण्याचा घोट ही घेणार नाही! इकडे राठी कुटुंबातील व्यक्तींच्या जीवाची घालमेल काय सांगावी ? घरी त्यांची आई  लेकाच्या जीवासाठी देवाला साकडे घालत होती. डॉक्टर राठी यांचे अपत्य वृंदा  व राम दोघांना तर धक्क्यातून सावरणे अवघड झाले होते. परंतु आई-वडिलांनी दिलेली सकारात्मक दृष्टी व विचारसरणी त्यांना सांगत होती आमचे वडील यातून हमखास सुखरूप बाहेर पडतील! सकाळी ही वृंदा, सावित्रीची लेक सहा वाजताच पोहोचली आपल्या आई-वडिलांकडे ! सात वाजता स्कॅन चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर या सुकन्याने आपल्या आईला प्यायला पाणी दिले रात्रभर नाना  विचारांचे काहूर मनात असलेल्या व अस्वस्थ मन झालेल्या सगळ्यांना आशेचा किरण दाखवण्यासाठी ही हिम्मतवान सावित्री उभी राहिली. आपल्या डोळ्यातील अश्रू कुठेतरी आत लपवून, आत्मविश्वासाने भरलेल्या  डॉक्टर रीनाने सगळ्यांना एकच सांगितले बी पॉझिटिव. . कैलास शंभर टक्के बाहेर पडणारच आहे, नव्हे त्याला यातून बाहेर पडावेच लागेल. तुम्ही सगळे फक्त देवाचे नामस्मरण करा व विश्वास ठेवा की कैलास सुखरूप आहे ! सुखरूप आपल्यासमोर येतील ! काय हा विश्वास !काय तो देवावर भरोसा! सगळे काही प्रशंसनीय ! चोहो बाजूने देवाचा धावा सुरू झाला. डॉक्टर आपल्या विज्ञानाने व परिवार आपल्या प्रार्थनेने कैलास यांच्यावर उपचार करू लागले. इथे प्रत्ययास आले देव तारी त्याला कोण मारी?

डॉ. कैलास उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत होते. परंतु हे डॉ कैलास पेशंटच्या भूमिकेत येतच नव्हते. त्यांच्यातला डॉक्टर सजक होता. आपले औषध उपचार ते सजक पणे करून घेत होते.

आय सी यु मध्ये  डॉक्टर रीना यांच्या बरोबरीने डॉ. प्राजक्ता ही आपल्या सरांच्या उपचारासाठी डोळ्यात तेल टाकून रात्रीचा दिवस करत होती. डॉ. राठी यांना वाचण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

यातच डॉ. कैलास यांच्या प्रकृती च्या काळजीने त्यांना मुंबई येथे हलवावे असे सांगण्यात येऊ लागले. परंतु, सगळी परिस्थिती पाहता, सगळे निष्णातडॉक्टर वरच्या विश्वासाने डॉ रीना यांनी खूप नम्रपणे हे नाकारले व स्वतःच्या जबाबदारीवर डॉक्टर कैलाश यांचे सर्जरी पुण्यभूमी नाशिकमध्ये डॉक्टर एखंडे व डॉक्टर बिर्ला यांच्याकडून करण्याचे निश्चित केले. त्यांच्या निर्णय क्षमतेला सलाम ! 

सर्जरी करावयाचे ठरल्यापासून विविध स्तरातील लोकांकडून प्रार्थना होऊ लागली. इथे जात पात, धर्म भेद कुठल्या कुठे पळाला! उगवच्या मुस्लिम बांधवांनी त्यांच्यासाठी नमाज अदा केली! बोहरी समाजाकडून त्यांच्यासाठी पवित्र जल आले! हिंदू समाजात विविध धार्मिक विधी सुरू झाल्या ! राठी कुटुंबांनी माणूस कमावल्याची ही साक्ष होती. राठी दाम्पत्यांनी कधी कोणाचे वाईट चिंतले नाही. आपल्या परिने ते सर्वांना नेहमीच मदत करत आले त्यांच्या सत्कर्माचा त्यांनी केलेले संचितकर्माचे फळ म्हणजे डॉक्टर कैलास यांचे ऑपरेशन सुखरूप पार पडले.

आजपर्यंत हजारो बालकांना डॉक्टर रिना यांनी व अनेक पीडित रुग्णांना डॉक्टर कैलास यांनी प्राण दान दिले आहे. ते त्यांचे कर्तव्य जरी असले तरी देवाने त्यांचे प्राण वाचवून त्यांच्या सत्कर्माचे फळ त्यांना दिले. ह्या लढ्यात रिनाला खंबीर पाठिंबा होता तो वसू दीदी, पिटू दीदी, उगाव येथील राठी परिवार, सातपूर चा मुंदडा परिवार मालेगाव चा कलंत्री परिवार व तिचा सर्व मित्र परिवार ज्यांच्या शुभेच्छा मुळे ती ही लढाई जिंकु शकली. र्डॉक्टर रीना राठी या सावित्रीने एका आईसाठी त्यांचा मुलगा, बहिणींसाठी भाऊ व मुलांसाठी वडील, सुयोग हॉस्पिटलचा कुटुंबप्रमुख व आपले सौभाग्य आपल्या जिद्दीने, समय सूचकतेने व सकारात्मक विचाराने परत आणले ! व्हेंटिलेटर निघेपर्यंत अन्नाचा दाणाही न खाणाऱ्या रीनाला व तिला साथ देणाऱ्या तिच्यासाठी उभ्या असलेल्या तिच्या परिवाराला माझे त्रिवार वंदन !

शब्दांकन. . . ममता प्रितेश पोफळे

प्रस्तुती : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य  ☆ हे दिनमणि व्योमराज… ☆ श्री श्रीनिवास बेलसरे ☆

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ हे दिनमणि व्योमराज… ☆ श्री श्रीनिवास बेलसरे 

मानवी संस्कृतीच्या वाटचालीत टारझनची अगदी प्राथमिक हुंकाराची भाषा ते कविकुलगुरू कालिदासांनी ज्या हिरे, माणके, पाचूनी  नटलेल्या भाषेत लिहिले ती देववाणी संस्कृत हा किती हजार वर्षांचा, कदाचित काही लाख वर्षांचा प्रवास असेल! किंवा अलीकडचे उदाहरण घ्यायचे झाल्यास ग्रीक, लॅटीन, जर्मनमधील काही शतके पूर्वीचे साहित्य, शेक्सपियर, होमर,  ख्रिस्तोफर मार्लोव्हची किंवा मराठीतील गडकरी, कानेटकर, कुसुमाग्रज यांची नाटके, माडगूळकर, खेबुडकर, शांता शेळके यांच्या कविता हा प्रवास पाहीला तरी चकित व्हायला होते.

किती ढोबळ, ओबडधोबड प्रकारचा संवाद करत करत माणूस किती सूक्ष्म भावना दोन बोटात पकडणा-या भाषेपर्यंत पोहोचलाय ते विस्मयकारक आहे. दुर्दैवाने अलीकडे मात्र माणसाच्या या आतल्या प्रगतीकडे  क्वचितच पाहिले जाते. ‘भाषा म्हणजे केवळ संदेश-वहनाचे साधन आहे’ इतका उथळ, सवंग विचार करणारे लोक मोठमोठे विचारवंत म्हणून मिरवतात !

हल्ली नेहमी चर्चा होते ती केवळ भौतिक आणि तंत्रवैद्यानिक प्रगतीची! या प्रगतीचा विचार केला तर डोळ्यासमोर काय येते? या प्रगतीचे पुरावे म्हणजे केवळ लहानमोठी अगणित यंत्रे आणि अनिर्बंध उपभोगाच्या वस्तू! पण माणसाच्या ‘मनाच्या आत’ घडणा-या अतितरल, सूक्ष्म, अमूर्त, अदृश्य गोष्टींबद्दल, त्यांच्या अभिव्यक्तीसाठी अनेक पिढ्यांनी कल्पकतेने निर्माण केलेले शब्द, व्याकरण, भाषा, अनेक सृजनशील संकल्पना यात साधलेल्या प्रगतीबद्दल कुठे चकार शब्द ऐकू येत नाही. बाहेरचे जग अधिकाधिक सुंदर, आकर्षक, सोयीचे आणि उपभोग्य करण्यासाठी धडपडणा-या माणसाला त्याची ‘आतली धडधड’ अगदीच नगण्य वाटू लागली आहे का?

दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असेच द्यावे लागते. कारण ७/८ हजार वर्षाच्या नोंदीकृत इतिहासात कोणत्याही संस्कृतीचे संरक्षण, संवर्धन आणि पुढील पिढीकडे संवहन करण्याच्या कामात अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडणा-या भाषेकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष! जागेच्या अभावामुळे आपण या विषयावर फार सखोल विचार करणार नाही तरी आज साहित्य प्रामुख्याने ज्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचते ती मनोरंजनाची क्षेत्रेसुद्धा भाषेच्या संवर्धनाबाबत काय चित्र उभे करत आहेत? मग त्यात सिनेमा आला, नाटके आली, कथा-कादंब-या  आल्या, नितांत सुमार दर्जाच्या पण मोठ्या समुदायावर प्रभाव टाकणा-या टीव्ही मालिका आल्या! सगळीकडचे चित्र चिंताजनकच आहे. या सर्वांनी कोणतीच भाषा शुद्ध ठेवली नाही. मानवी मनोव्यापाराच्या नेटक्या अभिव्यक्तीचे साधन किती खीळखिळे करून ठेवले आहे!

उत्तम मराठी शब्द असताना त्यांना हटवून तिथे इंग्रजी किंवा हिंदी  शब्द घुसवणे, मराठीचे व्याकरण नष्ट करून तिथे हिंदी आणि इंग्रजीचे व्याकरण लादणे किंवा एकंदर व्याकरणच नष्ट करून टाकणेही जोरात सुरु आहे. नाही म्हणायला परवाच गुलजारजींना दिलेले ज्ञानपीठ पारितोषिक हा भाषाप्रेमींसाठी एक दिलासा म्हणता येईल. हिंदी आणि उर्दू भाषेच्या सौंदर्याचा जो परिचय  गुलजार यांनी कोट्यावधी भारतीयांना करून दिला त्याला तोड नाही!

अशा वेळी आज मराठी सिनेमातली गाणी चक्क आई-बहिणीवरील शिव्यांनी (‘आईचा घो’…) सजवणारे बेछूट दिग्दर्शक तेजीत आहेत. हिंदीत तर चक्क हॉटेलमधील एखाद्या भुरट्या गुंडाने दिलेली ऑर्डरच गाण्याची ओळ बनते आहे (‘ए गणपत, चल दारू ला…(चित्रपट : ‘शूट आउट अॅट लोखंडवाला’)

त्या पार्श्वभूमीवर पुन्हा आठवतात ती अभिजात मराठीतली नाटके, जुनी गाणी! या लेखकांनी, गीतकारांनी चिरेबंदी वाड्यापासून थेट रस्त्यावरच्या माणसातही उच्च साहित्यिक अभिरुची निर्माण केली होती.

असेच एक नाटक होते ‘कट्यार काळजात घुसली.’ वर्ष १९६७. लेखक आणि गीतकार पुरुषोत्तम दारव्हेकर. या संगीत नाटकात एकापेक्षा एक अशी ८ गाणी होती. सर्वश्री पंडीत प्रसाद सावकार, जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, भार्गवराम आचरेकर यांनी गायलेली ही गाणी अतिशय लोकप्रिय झाली.

‘कट्यार’मधले एक गाणे म्हणजे सूर्यदेवाची स्तुती होती. दारव्हेकर मास्तरांनी ते इतक्या उच्च मराठीत लिहिले की त्याला गाणे म्हणण्यापेक्षा ‘सूर्याचे स्तोत्र’ म्हणायला हवे!  राजकवी भा.रा.तांबे यांनी सूर्यास्ताचे हुरहूर लावणारे वर्णन करताना ‘सायंकाळची शोभा’ या कवितेत म्हटले होते ‘कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा’  आमच्या दारव्हेकर मास्तरांनी मात्र राजकवींना परवडू शकणारा महागडा धातू न वापरता सूर्य चक्क लोखंडाचा कल्पलेला होता! ते सूर्याला तेजाचे भांडार  असलेला, कमालीचा तप्त झाल्याने प्रकाशमान बनलेला ‘लोहाचा गोल’ म्हणतात.

सूर्यदेवाची स्तुती करताना ते म्हणतात, ‘तू तर आकाशाचा राजा आहेस. तुझ्या दिव्य तेजाने अवघे अवकाश उजळले आहे. तू दिवसाला प्रकाशित करणारे दिव्य रत्नच आहेस.’ –

‘तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज,

दिव्य तुझ्या तेजाने, झगमगले भुवन आज.

हे दिनमणि व्योमराज, भास्कर हे गगनराज.’

सूर्य उगवला की क्षणार्धात त्याचे अब्जावधी किरण सगळीकडे पसरतात. त्यातून जणू अग्निबाणच फेकले जात आहेत असे वाटते.  पण हा अग्नी विनाशकारी नाही. उलट तो जणू अमृताचे थेंब बनून संपूर्ण सृष्टीतील अणुरेणूंना प्रकाशमान करतो!

यातील ‘अमृताचे कण’ ही कवीने दिलेली केवळ सुंदर उपमाच नाही तर ते जीवन-साखळीमागचे वैज्ञानिक सत्यही आहे! पृथ्वीवरील जीवसृष्टीला जिवंत ठेवणारे अन्न फक्त वनस्पती पुरवतात! आणि वनस्पतींचे जगणे आणि वाढ शक्य होते ती ‘फोटो-सिंथेसिस’ या फक्त सूर्यप्रकाशातच शक्य होणा-या प्रक्रियेमुळे!

‘कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती.

अमृतकण परि होउन अणुरेणु उजळिती.

तेजातच जनन मरण, तेजातच नविन साज.

हे दिनमणि व्योमराज, भास्कर हे गगनराज.’

हैड्रोजन वायूवर  होणा-या अण्विक प्रक्रियेतून हेलियम तयार होऊन त्याच्या अमर्याद उर्जेतून सूर्य प्रकाशित होत असतो. ही प्रक्रिया अविरत सुरु असते म्हणून कवीने म्हटले, ‘तेजातच जनन मरण, तेजातच नवीन साज.’  किती यथार्थ वर्णन!

‘पॅराडाईस लॉस्ट’मधल्या जॉन मिल्टनसारख्या शैलीत कवी पुढे जबरदस्त विराट प्रतिमासृष्टी उभी करतो. आपल्याला दिसू लागते की आकाशाचा राजा सूर्य त्याच्या सिंहासनावर विराजमान झाला आहे. सगळे ग्रह, म्हणजे त्याचे मंत्री, त्याच्या दिव्य सभागृहात आसनस्थ झाले आहेत. कवी पुढे म्हणतो-

‘हे तेजोनिधी, तुझा प्रकाश भलेही प्रखर आहे, दाहक आहे, पण तोच तर रोज सर्व सृष्टीला संजीवन देतो. तुझी कृपा आम्हावर अशीच राहू दे. आम्ही जिला ‘भूमाता’ म्हणतो त्या पृथ्वीवर जीवसृष्टी अशीच वाढत राहू दे. तूच तिची लाज राख कारण तूच या सृष्टीचा अधिपती आहेस.’

‘ज्योतिर्मय मूर्ति तुझी, ग्रहमंडळ दिव्यसभा,

दाहक परि संजीवक तरुणारुण किरणप्रभा,

होवो जीवन विकास, वसुधेची राख लाज.

हे दिनमणि व्योमराज, भास्कर हे गगनराज.’

असे साहित्य वाचताना, ऐकताना कल्पनेची केवढी भव्यता अनुभवता येते, केवढा स्वर्गीय आनंद वाटतो! पण पाठोपाठ विचार येतो आज मराठी मनातील न्यूनगंडामुळे किती पिढ्या अमृताशी पैजा जिंकणारी ही ज्ञानदेवांची भाषा सोडून इंग्रजी माध्यमात शिकली त्यांना यातले किती शब्द कळतील आणि किती अडतील? केवढ्या आनंदाला ही  मुले कायमची मुकली आहेत!  शेवटी ‘कालाय तस्मै महा:’ म्हणावे की ‘राजा कालस्य कारणम’ ते कळत नाही !

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्रीनिवास बेलसरे.

मो 7208633003

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक कविता दिवस… २१ मार्च ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ जागतिक कविता दिवस… २१ मार्च… ☆ श्री प्रसाद जोग

 

जे न देखे रवी ते देखे कवी असे म्हटले जाते.

शीघ्र काव्य रचायची प्रतिभा असणाऱ्या  कवी साधुदासांच्या कवितेची गंमत वाचा …

त्यांच्या शिघ्र कवित्वाबद्दल कै.कवी रेंदाळकर यांना शंका होती.म्हणून एके दिवशी अचानक ते साधुदासांच्या घरी पोचले ,आणि त्यांना म्हणाले तुमचं शिघ्र कवित्व म्हणजे ढोंग आहे, जर खरेच आपण शिघ्र कवी असाल तर मला अत्ताच्या अत्ता कविता करून दाखवा.या वर साधुदास त्यांना म्हणाले मला विषय तरी सांगा, कशावर कविता करू ते.तर रेंदाळकर म्हणाले, कवितेवर कविता करून दाखवा बघू.

क्षणभर हाताची हालचाल करून ते म्हणले,”हं घ्या लिहून आणि त्यांनी ही कविता  सांगितली … 

*

कवीने कविता मज मागितली

करण्या बसल्या समयी कथिली

*

कविता मज पाहुनिया रुसली

तरि आज करू कविता कसली

*

कविता स्वच काय विण्यामधले

म्हणून मज छेडूनी दावू भले

*

कविता गुज बोल मनापुरता

प्रिय तू बन मी करितो कविता

*

कविता मधुराकृती का रमणी

म्हणुनी तिज पाहू तुझ्या नयनी

*

कविता करपाश जिवाभवता

मृदू तू बन मी करितो कविता

*

कविता वद काय वसंत-रमा

म्हणुनी तुज दावू तिची सुषमा

*

कविता द्युती-लेख मतीपुरता

पटू तू बन मी करितो कविता

*

कविता वद काय कारंजी-पुरी

म्हणुनी करुनी तुज देऊ करी

*

कविता मकरंद फुलपुरता

अली तू बन मी करितो कविता

*

कविता सखया न गुलाब कळी

तुज की मृदू गंध तिचा कवळी

*

कविता कवी -चंदन- धूप- बली

बन मारुत तू कविता उकली

….. 

आणि आता ही दुसरी कविता केली आहे कवियत्री संजीवनी मराठे यांनी. कविता स्फुरते कशी  म्हणून सुंदर कविता त्यांनी केली आहे.

*

कशी अचानक जनी प्रकटते मनांतली उर्वशी

मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी

*

कुंभ रसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गौळणी

नजरेपुढतीं ठुमकत येती रुपवती कामिनी

*

हंसती रुसती विसावती कधी तरंगती अंबरी

स्वप्नसख्या त्या निजाकृतीचा वेध लाविती उरी

*

त्याच्या नादे करु पाहते पदन्यास मी कशी

मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी

*

हे स्वरसुंदर जीवनमंदिर कुणी कसे उभविले

मी न कुणाला दावायची शिलालेख आंतले

*

समयीमधली ज्योत अहर्निश भावभरे तेवते

तिच्या प्रकाशी कुणापुढे मी हितगुज आलापिते

*

कशी नाचते कीर्तनरंगी हरपुन जाते कशी

मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी.

तेंव्हा आनंद घ्या या दोन्ही कवितांचा आजच्या कविता दिनी …… 

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सहावा — आत्मसंयमयोग — (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सहावा — आत्मसंयमयोग — (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

सुखमात्यन्तिकं यत्तद्‍बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम्‌ ।

वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥ २१ ॥

*

अनंत आनंद इंद्रियातीत ग्रहण होतो सूक्ष्म प्रज्ञेस

अवस्थेत निग्रह करून योगी परमात्म स्वरूपास ॥२१॥

*

यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।

यस्मिन्‌ स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥ २२ ॥

*

हा लाभ होता तयासी प्राप्त 

त्यापरी दुजा तो नाही मानत

अवस्थेत अशा योगी निग्रही 

विचलित ना होत अतिदुःखानेही ॥२२॥

*

तं विद्याद्‌ दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम्‌ ।

स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥ २३ ॥

*

दुःखी संसाराचा नाही संयोग

तयासी नाव दिधले आहे योग

नको निरुत्साह अथवा उबग

धैर्य उत्साह निग्रहे आचरा योग ॥२३॥

*

सङ्कल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः ।

मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥ २४ ॥

*

शनैः शनैरुपरमेद्‍बुद्ध्या धृतिगृहीतया ।

आत्मसंस्थं मनःकृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत्‌ ॥ २५ ॥

*

संकल्पोद्भव कामना सर्वस्वी त्यागून

सर्वेंद्रियांचे मनाने नियमन करून 

क्रमेक्रमे अभ्यासे उपरती व्हावी 

मना परमात्मे शाश्वत स्थिती मिळावी ॥२४, २५॥

*

यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम्‌ ।

ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत्‌ ॥ २६ ॥

*

अधीन होउन विषयांच्या चंचल मानस भरकटते 

आवरुनीया ते पुनःपुन्हा स्थिर करावे ब्रह्म्याते ॥२६॥

*

प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम्‌ ।

उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्‌ ॥ २७ ॥

*

शांतमानसी किल्मिष रहित रजोगुण जयाचा शांत

सहज साध्य अद्वैत योग्याला  श्रेष्ठ मोद होई प्राप्त  ॥२७॥

*

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः ।

सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥ २८ ॥

*

निरंतर साधतो ब्रह्म्याशी अद्वैत योगी पापरहित

परब्रह्म प्राप्तीच्या आनंदाची अनुभूती तया येत ॥२८॥

*

सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।

ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥२९॥

*

आत्मा ज्याचा स्थितअनंतात त्याची सर्वत्र समदृष्टी

आत्म्यात सर्वभूतात सर्वभूतासि आत्म्यात तया दृष्टी ॥२९॥

*

यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।

तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥३० ॥

*

पाही जो सर्वभूतात सर्व जीविता माझ्यात 

दर्शन माझे तया सदैव ना होत मी अस्तंगत ॥३०॥

– क्रमशः भाग तिसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दुःखद सुख… लेखक – श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ दुःखद सुख… लेखक – श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

तंत्रज्ञान, बदलत्या प्रथा यामुळे बरच  बदलून जातं आणि अनेक गोष्टी, धंदे, माणसं हरवून जातात कालौघात. परवा काही कारणाने आळंदीला गेलो होतो तेंव्हा तिथे वासुदेव दिसला घाटावर. तसंही शहरात तो पूर्वी फार दिसायचा असं नाही पण धूमकेतूसारखा अधून मधून दिसायचा. पोलिसाचा किंवा इतर कुठला वेष घेऊन येणारे बहुरूपी तर आता दुर्मिळ झाले. सगळं खोटं आहे हे माहीत असलं तरी त्यांच्या मागून हिंडायला मजा यायची. वासुदेवाच्या टोपीत ती धूळ खालेल्ली मोरपिसं तो बदलतो कधी की तो मुगुट तो तसाच धुतो असा मला प्रश्न पडायचा. श्रावणात ‘आsssघाडा, दुर्वा, फुलं’ अशी हाक भल्या पहाटे यायची. ‘सुया घ्ये, पोत घ्ये, मनी घ्ये, फनी घ्ये’ अशी -हिदम असलेली हाळी तर किती वर्षात ऐकलेली नाही. आपल्या अंगणात फतकल मारून बसून गोधडी शिवून देणा-या बायका गायब झाल्या. 

अप्पा बळवंतला एका लाकडी फळीवर रेमिंग्टन, गोदरेजचे टाईपरायटर ठेवून वन प्लस फोर अशा कॉप्या काढणारे कधीच अस्तंगत झाले. त्यांची कडकट्ट चालणारी बोटं आणि कागद वर सरकवून परत पहिल्या जागी मशीन घेऊन यायचा स्पीड मी बघत बसायचो. स्टुलावर बसून मान पाठ एक करून कडेच्या कागदात डोकावत किंवा आधी मॅटर काय ते समजून घेऊन टाईप करून द्यायचे ते. कुठे गेले असतील, काय काम केलं असेल नंतर त्यांनी. लहानपणी मला कंडक्टर झालो तर खूप पैसे मिळतील असं वाटायचं. असतात एकेकाच्या विक्षिप्त कल्पना, मला कुठलाही धंदा बघितला लहानपणी की वाटायचं, हे काम जमेल का आपल्याला, यात साधारण श्रीमंत होण्याएवढे पैसे मिळत असतील का? जाकीट घालून रस्त्यात मिळेल त्या जागी बसून आपल्या कळकट्ट भांड्यांना ब्युटी पार्लरमधे नेऊन आणल्यासारखे कल्हई करणारे कल्हईवाले गायब झाले. लहानपणी चाळीत तो फकीर यायचा रात्री, हातातल्या धुपाटण्यावर ती उद आणि धुपाची पावडर फिसकारली त्याने की जो पांढरा धूर आणि वास येतो तो अजून विसरलेलो नाही.

रात्री दहाच्या सुमारास एकजण पान विकायला यायचा. मस्स्स्साला पान दहा पैसे, स्पेशल मस्स्साला पंधरा पैसे. जेमतेम अर्ध पान, चुना, काताचा, सुपारीचा तुकडा, बडीशेप, स्पेशल मधे गुलकंद अत्तर लावल्यासारखं असायचा. एकजण तळलेले पापड विकायचा. सणसणीत मोठे पापड असायचे, दहा पैशाला एक, पाच पैसे दिले तर अर्धा पापड. चोपटण्याने अंगण करण्यात मजा होती. एसटी स्टँडवर तांब्याची कानकोरणी घेऊन फिरणारे दिसत नाहीत आता. काय तन्मयतेने ते काम करायचे. भुयारातून काहीतरी नक्की निघणार अशा आशेवर असलेल्या इतिहास संशोधकासारखे ते कानात डोकवायचे. रस्त्यात कुठल्या तरी झाडाखाली मोठी पेटी घेऊन सायकल दुरूस्तीवाले बसायचे. दोन्ही बाजूला एकेक दगड ठेऊन तो हवा भरायचा पंप उभा ठेवलेला असायचा. एकेकाळी पीसीओच्या त्या चौकोनी ठोकळ्याबाहेर लोक रांग लावून उभी रहायचे. आतल्याचं बोलणं लवकर संपावं आणि माझ्यानंतर बाहेर कुणाचाही नंबर असू नये हे प्रत्येकाला वाटायचं.  

शाळेच्या बाहेर एक म्हातारी बसायची वाटे लावून, चिंचा, चन्यामन्या, बोरं, काळी मैना, भाजके चिंचोके, पेरू, बाहुलीच्या गोळ्या असायच्या. एक काला खट्टा, रिमझिम, ऑरेंज, लेमन, वाळा अशी सरबताची गाडी असायची. बर्फाचे गोळे विकणारे क्वचित दिसतात अजून. छत्री दुरुस्त करणारे कुठे गेले काय माहीत. एखादी टेकस मारली चपलेला तर पैसे न घेणारे पूर्ण पिकलेले चप्पल दुरुस्तीवाले आजोबा तर कधीच गेले. चार आणे तास मिळणारी सायकलची दुकानं गायब झाली. आपल्याला नको असलेले कपडे घेऊन चकचकीत भांडी देणा-या बार्टर सिस्टीम फॉलो करणा-या बोहारणी कुठे गेल्या असतील? सीताहरणाला कारण ठरलं म्हणून अंगात चोळी न घालता आपल्या पाटा, वरवंटा, जात्याला टाकी लावून द्यायच्या त्या वडारणी दिसणं शक्य नाही. कडेवर एक पोर आणि डोक्यावर विक्रीसाठी पाटा वरवंटा असायचा. त्या वरुटा म्हणायच्या त्याची मजा वाटायची. काही शब्द पण गायब झाले याची खंत वाटते. मायंदाळ, वळचण, हाळी, बैजवार, औंदा, बक्कळ असे अनेक शब्द असतील. मूळ विषय तो नाही, त्यावर परत कधी. 

‘बाई, तुझं मन चांगलं आहे, तू देवभोळी आहेस, मनात पाप नाही, दानी आहेस पण तुला यश नाही’ अशी पाठ केलेली कॅसेट लावणारे कुडमुडे ज्योतिषी कंटाळवाणी दुपार हसरी करायचे. चाळीत तुम्हांला सांगतो, वल्ली असायच्या एकेक. एका ज्योतिषाला ‘लग्न कधी होईल सांगा’ म्हणत दोघींनी हात दाखवला, त्याने पण सहा महिन्याच्या आत पांढ-या घोड्यावर बसून राजकुमार येईल एवढं सोडून सगळा सोनसळी भविष्यकाळ रंगवला. घसघशीत दक्षिणा मिळणार म्हणजे अजून घरं फिरायची गरज नाही हे त्याच्या चेह-यावर दिसत होतं. ‘तुझा मुडदा बशीवला भाड्या’ म्हणत त्यांनी आजूबाजूला खेळणारी आपापली पोरं दाखवली आणि त्याला हुसकवून लावलं. दक्षिणा बुडली त्यापेक्षा आपलं ढोंग उघडकीला आलं याचा राग त्याने मार बसणार नाही इतपत शिव्या देऊन काढता पाय घेतला. बाबाजी का बायोस्कोप मधे ‘मेरा नाम जोकर’मधे दिसला तेंव्हा आठवला. क्षणिक खेळ असायचा पण डोळ्यांभोवती दोन्ही हात धरून त्या नळकांड्यात डोकावण्यात अप्रूप होतं.   

फक्त दिवाळीला पोस्त मागणारे गुरखे नाहीसे झाले. रात्री फिरताना क्वचित दिसायचे. क्वचित येणारं कार्ड देणारे आमचे पोस्टमन इंदोंस अशी हाक मारायचे. आमचा पत्त्यातला चाळ नंबर कितीही चुकीचा टाकलात तरी पत्र यायचंच आमच्याकडे. त्यांनी कधीही आमच्याकडे पोस्त मागितली नव्हती. सायकलच्या मधल्या दांड्याला ग्राईंडिंग व्हील लावून मागच्या कॅरिअरवर बसून पेडल मारत चाकू, सुरे, कात्र्यांना धार लावणारे गायब झाले. आता भंगार कच-यात टाकतो पण आधी भंगारवाले यायचे, द्याल ते घायचे. प्लास्टिक बाटल्या, बरण्या, पत्र्याचे डबे, ते देतील ती किंमत. स्टोव्ह रिपेअरवाले एक वेगळीच गंमत असायची. दुरुस्तीत फार रॉकेल संपू नये ही काळजी असायची बाईला आणि हा बाब्या फारफार पंप मारून बर्नर तापवून लालबुंद करायचा. आतली काजळी काढून बर्नर फिट करून हवा भरून पिन मारली की बोर्नव्हिटा प्यायल्यासारखा स्टोव्ह झळाळता पेटायचा पण त्याचा आनंद अल्पकाळ साजरा व्हायचा आणि महिनाभर रॉकेल पुरवायला हवं या काळजीने ती बाई किल्ली सोडून पहिल्यांदा स्टोव्ह बंद करायची.       

या सगळ्यात रात्री दारोदार फिरून ‘अन्न वाढा हो माय’ म्हणणारे भिकारी नाहीसे झाले याचा मला आनंद आहे खूप. सगळे काही उपाशी मेले नसतील, जगण्यासाठी, पोटाची आग भागवण्यासाठी त्यांनी काहीतरी तजवीज केली असेलच. पण ती हाक बंद झाली ते बरं झालं. आम्ही चाळीत रहायचो तिथे रात्री साधारण नऊनंतर एक बाई यायची. तुम्ही द्याल ते ती घ्यायची. ती कुणाच्या दरवाज्यासमोर उभी रहायची नाही, सर्वसमावेशक अशी ती हाळी द्यायची, मग ज्याच्याकडे उरलं असेल तो तिला हाक मारून ते द्यायचा. पोळी, भाकरी, भातासाठी एकच पिशवी असायची. भाजी, आमटी जे काही असेल ते सगळं ती एकाच वाडग्यात घ्यायची. संतमहात्म्यांचे किस्से आपण ऐकतो की ते सगळं अन्न एकत्र करून खायचे पण इथे चव काय आहे यापेक्षा भुकेची आग मोठी होती. कालौघात काही गोष्टी नष्ट होतात ते बरच आहे. चांगल्या गोष्टी नाहीशा होतात या दुःखापेक्षा वाईट गोष्टी संपतात त्याचा आनंद जास्त असतो. 

ही किंवा आत्ता लगेच न आठवलेली माणसं हरवली म्हणून अडून काहीच राहिलं नाही पण गतायुष्याचा ती एक भाग होती. मागे वळून पहाताना काही नेमकं आठवतं तसंच भारंभार संदर्भ नसलेलं ही आठवत राहतं. त्या प्रत्येक गोष्टीशी काही ना काही तरी चांगली वाईट आठवण जोडलेली असते. माणसाला अमरत्व नाही हे वरदान आहे. किती गर्दी झाली असती नाहीतर. आयुष्याच्या प्रवासात अशा अनेक गोष्टी हरवतात. माणसं हरवतात ते वाईट. 

प्रत्येकजण या प्रवासात उतरून जाणार मधेच कधीतरी हे माहित असतं, काहीजण काही न सांगता घाईने उतरून जातात, काही लपून बसतात, काही दिसतात पण आपण त्यांना हाक मारू शकत नाही. न सांगता उतरून गेलेल्या, सोडून गेलेल्या, दुरावलेल्या, हरवलेल्या माणसांच्या आठवणींनी मन सैरभैर होतं. डोळ्यात नकळत पाणी दाटतं. अशावेळी काय करायचं? प्रवासात करतो तेच करायचं. खिडकीतून बाहेर बघायचं, हलकेच डोळे पुसायचे आणि दिसतंय त्यात हरवून जायचं. आपणही कुणाच्या तरी विश्वात त्यांच्या दृष्टीने हरवलेले असू शकतो या वाटण्यात पण एक दुःखद सुख आहे. 

आपल्यासारखंच कुणाच्या डोळ्यात पाणी असतंच की, माणसं काही फक्त आपलीच हरवत नाहीत.  

लेखक –  श्री जयंत विद्वांस

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सयाजीराव गायकवाड :: ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ सयाजीराव गायकवाड :: ☆ श्री प्रसाद जोग

जन्म: ११ मार्च, १८६३.

(महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव गोपाळराव काशीराव गायकवाड.) 

१८७५ ते १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. बडोदे संस्थानाचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कारकीर्द – १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.

बडोद्याचे लोकप्रिय महाराज खंडेराव यांचे निधन झाल्यावर त्यांचे बंधू मल्हारराव गादी सांभाळू शकले नाहीत, कारण त्यांच्यावर बंधूंच्या हत्येचा कट केल्याचा आरोप होता आणि त्या साठी त्यांना अटक देखील झाली होती. खंडेराव महाराजांची मुले लहान वयात निवर्तली असल्याने त्यांच्या विधवा पत्नी महाराणी जमानाबाईसाहेब यांनी कुटुंबातील अन्य मुलांचा दत्तक घेण्यासाठी शोध सुरु केला. नाशिक जवळील कौळाणे येथील काशीराव त्यांच्या तीन मुलांना १)आनंदराव २)गोपाळराव ३) संपतराव याना घेऊन बडोद्याला आले. तिथे तिघांचीही परीक्षा घेण्यात आली, त्यांना विचारले की ‘तुम्हाला इथे का आणले आहे माहीत आहे का?गोपाळराव म्हणाले मला इथे राज्य करण्यासाठी आणले आहे त्या उत्तराने संतुष्ट होऊन त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.

दिवाण, सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजी रावांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाय योजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणा सुरळीत केली, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३), न्याय व्यवस्थेत सुधारणा केल्या, . ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता  ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली;. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली. भारतामध्ये सर्वप्रथम आपल्या राज्यामध्ये अनेक ग्रंथालये स्थापन केली. त्यांनी स्वतः ग्रंथालय शात्राचे शिक्षण घेतले. खऱ्या अर्थाने ते भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक आहेत.

सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरीही मोठी आहे. पडदा पद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्या विक्रय बंदी, मिश्र विवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यता निवारण, विधवा विवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).

बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू. लक्ष्मीविलास राजवाडा, वस्तुसंग्रहालय, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत, (कमाठी बाग) सयाजी उद्यान., सुरसागर तलाव, खंडेराव मार्केट, वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे.

प्रजेची पाण्याची गरज भागवण्यासाठी त्यांनी अजवा या ६२ दरवाज्यांच्या धरणाची निर्मिती केली. त्या वेळी बडोद्याची लोकसंख्या एक लाख होती तरी पुढचा अंदाज घेऊन तीन लाख लोकांना पुरेल एवढा पाणीसाठा करण्याची दूरदृष्टी त्यांनी दाखवली.

त्यांना प्रवासाची अत्यंत आवड होती व त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लो. टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हटले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले.

‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले आहे. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

प्रजाहितदक्ष राजा हा शब्द सार्थ ठरवणाऱ्या महाराजा सयाजीराव (तिसरे) याना मानाचा मुजरा.

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print