मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता – अध्याय दुसरा – (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पहिला — भाग दुसरा – (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि । 

धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ ३१ ॥ 

वीर क्षत्रिया त्यजी भया जाणूनिया स्वधर्मासी

युद्धाहुनी श्रेष्ठ भला दुजा नसे धर्म क्षत्रियासी ॥३१॥

यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम्‌ । 

सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्‌ ॥ ३२ ॥ 

भाग्यवान क्षत्रियासी युद्धाने केवळ लाभते

आपोआप मुक्त स्वर्गद्वार होणे नशिबी प्राप्त ते ॥३२॥ 

अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि । 

ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ ३३ ॥ 

यद्यपि विन्मुख होशी या धर्मयुद्धा 

गमावशील स्वधर्म तथा कीर्तिसुद्धा

संचय न होई  यत्किंचित पुण्याचा

होशील धनी तू केवळ  पापाचा ॥३३॥

अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम्‌ । 

सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ ३४ ॥ 

अपकीर्ति मग पसरेल तुझी पार्था या जगती

मरणापरीस अधिक दुःसह मनुष्यास ती दुष्कीर्ति ॥३४॥

भयाद्रणादुपरतरं मंस्यन्ते त्वां महारथाः । 

येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्‌ ॥ ३५ ॥ 

आदर करिती तुझा आजवर महारथी जाणुनी

म्हणतील भ्याड फिरला मागे  भिउनी रणांगणी ॥३५॥ 

अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः । 

निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्‌ ॥ ३६ ॥ 

निंदक वैरी तुझे निंदतिल अश्लाघ्य वचने

यापरी  दूजे काही नाही जीवनात दुखणे ॥३६॥

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्‌ । 

तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ ३७ ॥ 

मृत्यू येता स्वर्गप्राप्ती  जिंकलास भोगी धरणी

उठि कौन्तेया निश्चय करुनी युद्धासी तू रणांगणी ॥३७॥ 

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । 

ततो युद्धाय युज्यस्य नैवं पापमवाप्स्यसि ॥ ३८ ॥ 

सुख-दुःख हानी-लाभ जित-जेता समान 

युद्ध करी रे नाही पाप रणांगणातील रण ॥३८॥

एषा तेऽभिहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु । 

बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥ ३९ ॥ 

ज्ञानयोगाचे हे ज्ञान कथिले पार्था मी तुजला

ऐक कर्मयोग नष्ट करण्या कर्मबंधनाला ॥३९॥ 

नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते । 

स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्‌ ॥ ४० ॥ 

बीजाचा  ना होतो नाश  नाही फलदोष यात

कर्मयोगाचा धर्म जननमरण भय रक्षण  करित ॥४०॥ 

बीजाचा  ना होतो नाश  नाही फलदोष यात

जननमरण भय रक्षण  कर्मयोग धर्म करित ॥४०॥ 

– क्रमशः भाग दुसरा 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (दहावी माळ) – न केलेले ‘सीमोल्लंघन‘… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (दहावी माळ) – न केलेलेसीमोल्लंघन‘… ☆ श्री संभाजी बबन गायके 

“ राजा बोले अन दल हाले “ ही पहिल्यापासूनची रीतच म्हणायची. मानवी वर्चस्ववादाच्या संघर्षात एकमेकांचा नाश करणे अपरिहार्य झाले, तसे प्रत्येक समुदायाने स्वत:ची सैन्यदले उभारली. राजाने निश्चित केलेल्या शत्रूचा समाचार घेण्यासाठी त्याचा जीव घेणे आणि या प्रयत्नात स्वत:चा जीव देण्याची तयारी 

ठेवणे , हा रणबहाद्दरांचा स्थायीभाव बनून गेला. 

असंख्य राजे-रजवाड्यांचा आणि त्यांनी वेळोवेळी केलेल्या युद्धांचा देश..  ते आताचा स्वतंत्र, सार्वभौम लोकशाही गणराज्य असलेला देश ..  म्हणून आपल्या भारत देशाची जगाला ओळख आहे. 

स्वत:हून आक्रमण करायचं नाही असं तत्व उराशी बाळगून असलेला आणि ते तत्त्व हरत-हेची किंमत मोजून पालन करणारा देश म्हणून भारत उभ्या जगाला माहित आहे आणि आदर्शवतही आहे.

सैन्य पोटावर चालत असले तरी या चालणाऱ्या सैन्याला अतिशय सक्षम नेतृत्वाची अनिवार्य गरज असते. भारताच्या सुदैवाने सुमारे पंचेचाळीस वर्षांची दैदिप्यमान कारकीर्द गाजवणारा एक रणधुरंधर सेनापती स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतात निर्माण झाला….. गुजरात प्रांतातील वलसाड येथे वैद्यकीय व्यवसाय करीत असलेले  Hormizd Manekshaw हे आपली गरोदर असलेली पत्नी Hilla, née Mehta..  हीला मेहता यांना घेऊन त्यावेळच्या लाहौर येथे निघाले होते. तेथे वैद्यकीय व्यवसाय थाटावा असा त्यांचा मनसुबा होता. रेल्वेप्रवासात प्रकृती बिघडल्यामुळे हीला यांना पुढे प्रवास करणे अशक्य झाल्याने हे दाम्पत्य अमृतसर स्टेशनवरच उतरले. तेथील स्टेशनमास्टरच्या सल्ल्यानुसार हीला यांना हर्मिझ यांनी स्थानिक रूग्णालयात दाखल केले. तेथे त्या अगदी बऱ्या झाल्या. अगदी थोड्या दिवसांच्या वास्तव्यात ह्या माणेकशा दाम्पत्याला अमृतसर शहर खूप भावले आणि त्यांनी तेथेच कायम वास्तव्य करण्याचे ठरवले. डॉक्टरसाहेबांनी थोड्याच कालावधीत या नव्या शहरात वैद्यकीय व्यवसायात आपला जम बसवला. 

एका दशकाच्या अवधीत या पती-पत्नींनी सात अपत्यांना जन्म दिला. सॅम हे एकूणातले पाचवे अपत्य. दोघे भाऊ इंजिनियर व्हायला परदेशात गेले. साहेबांना डॉक्टर व्हायचं होतं, पण वडिलांनी ‘ हा खर्च झेपण्यासारखा नाही ‘ असं बजावलं. मग साहेब काहीसा बंडात्मक पवित्रा अनुसरून थेट सैन्यात भरती झाले. पाठचा भाऊ जॅम डॉक्टर बनून त्यावेळच्या हवाई दलात रुजू झाला. सॅम साहेब मात्र त्यावेळच्या ब्रिटिश सेनेत स्थिरावले. हिंदी, इंग्लिश, गुजराती, पंजाबी, उर्दू भाषांवर उत्तम पकड असल्याने त्यांना 

‘हायर स्टॅन्डर्ड आर्मी इंटरप्रीटर ‘ म्हणून जबाबदारी मिळाली होती. अत्यंत निर्भीड असलेल्या सॅम साहेबांनी त्यांना गोळ्या घालण्याची धमकी दिलेल्या पंजाबी सैनिकालाच आपल्या तंबूबाहेर रात्री पहाऱ्यावर नेमून इतर सैनिकांच्या मनात आदर निर्माण केला होता. सैनिकांची ते अत्यंत आस्थेने काळजी घेत.

जपान्यांशी लढताना एका मोहिमेत त्यांनी शौर्य गाजवले. मोहिम यशस्वी झाली खरी, पण मोहिम संपता संपता त्यांच्या पोटात सात गोळ्या लागून मूत्रपिंड,यकृत, फुप्फुस यांना गंभीर इजा होऊन ते कोसळले. ही लढाई पाहणाऱ्या मेजर जनरल कोवान यांनी त्यांना स्वत:ला मिळालेला मिलिट्री क्रॉस बॅज त्यांना बहाल केला….हा सन्मान प्रत्यक्षात स्वीकारायला ते काही जगणार नाहीत असे त्यांना वाटले होते. जखमी सॅम साहेबांना त्यांचे सहाय्यक मेहर सिंग यांनी चौदा किलोमीटर अंतर खांद्यावर वाहून नेऊन इस्पितळात पोहोचवले…. यांचा जीव वाचणे शक्य नाही असे म्हणून डॉक्टरांनी उपचारास नकार दिला होता….पण मेहर सिंग यांनी कडक पवित्रा घेतल्यावर डॉक्टर तयार झाले…त्यांनी साहेबांना विचारले तुम्हाला अशा जखमा कशा झाल्या.. त्यावर तशाही गंभीर परिस्थितीत सॅम मस्करीत उत्तरले….’ मला एका खेचराने ठोकरले ! ‘ उपचार मिळाले आणि सॅम बहादूर बचावले, हे पुढे स्वतंत्र भारतीय सैन्याचे नशीब म्हणावे लागेल. 

स्वतंत्र भारतात त्यांची कारकीर्द बहरली. मात्र सैन्याच्या कारभारात राजकारणी लोकांचा हस्तक्षेप त्यांना मान्य नसे. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांना सेनेतील नोकरी जवळजवळ सोडण्याची पाळी आली होती. त्यांच्याविरुद्ध लष्करी न्यायालयात खटला सुरू असतानाच १९६२ मध्ये चीनने आक्रमण केले. खटल्याचा निकाल न लागल्याने या युद्धात सॅम साहेबांना भाग घेता आला नाही. चीनकडून पराभव झाल्याने भारतीय सैनिकांचे मनोबल खच्ची झाले होते. अशा स्थितीत सॅम साहेबांकडे सैन्याचे नेतृत्व सोपवले गेले. त्यांनी सैन्याला आक्रमक होण्याचे आदेश दिल्याने सैन्याचे मनोबल उंचावले गेले. त्यांनी सैन्याच्या सुविधा वाढवण्यावर भर दिला. त्यामुळे भारतीय सैन्य हे केवळ प्रतिकार करणारे सैन्य नव्हे, तर प्रसंगी आक्रमण करू शकणारे सैन्य बनले. १९६४ मध्ये सॅम साहेबांना नागालॅन्ड भागात नेमण्यात आले. तेथे त्यांनी नागालॅन्डमधील बंडखोरी मोडून काढली..याबद्दल त्यांना पदमभूषण किताब प्रदान करण्यात आला.  

सन १९७१ मध्ये सीमांवर खूप धामधुम सुरू होती. परंतु या दरम्यान झालेल्या घटना सॅम माणेकशा यांचा करारी बाणा, निर्भीडता, निर्णयक्षमता आणखी ठळकपणे अधोरेखित करणा-या आहेत. 

त्यावेळच्या पाकिस्तानात घडलेल्या राजकीय, तसेच लष्करी घटनांमुळे लाखो निर्वासित भारतात घुसले होते. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. शेजारील देशातील अशांतता भारताला त्रासदायक ठरू पाहत होती. अशा परिस्थितीत देशाच्या नेतृत्वाने पाकिस्तानमधून फुटून स्वतंत्र बांगलादेश निर्माण करण्याच्या त्या लोकांच्या प्रयत्नांना सक्रीय पाठिंबा देण्याचे धोरण स्वीकारले होते. पण यातून भारताचे आणि पाकिस्तानचे जोरदार युद्ध सुरू होण्याची शक्यता होती. एप्रिल १९७१ मधल्या एका सकाळी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी या विषयावर एक तातडीची बैठक बोलावली. सॅम माणेकशा त्यावेळी लष्करप्रमुख म्हणून उपस्थित होते. बराच उहापोह झाल्यानंतर सॅम माणेकशा यांना “ तुम्ही युद्धास तयार आहात का? ” असा प्रश्न विचारण्यात आला. आणि अर्थातच राजकीय नेतृत्वाला सकारात्मक उत्तराची अपेक्षा होती. 

परंतु अनुभवी, बेधडक निर्णय घेण्यात वाकबगार असलेले आणि हाडाचे सैन्याधिकारी असलेले फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांनी अत्यंत स्वच्छ, स्पष्ट शब्दांत असे घाईघाईने सीमोल्लंघन करण्यास नकार दिला. या नकारामागे अत्यंत सूक्ष्म अभ्यास होता साहेबांचा. देशात सुगीचा हंगाम सुरू आहे. रेल्वेने धान्याची वाहतूक सुरू आहे. आपले सैन्य देशाच्या विविध भागांतून सीमेवर आणायला रेल्वेगाड्या लागतील आणि त्यामुळे धान्य वाहतुकीसाठी रेल्वे उपलब्ध राहणार नाहीत. देशात अन्नाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. पावसाळा फार दूर नाही. सीमेवर पावसामुळे दलदल, पूरस्थिती असेल, त्यात अडकून राहावे लागेल. साहेबांनी अभ्यासपूर्ण परिस्थिती स्पष्टपणे विशद केली. तरीही आग्रह धरला जाऊ लागताच त्यांनी स्पष्ट सांगितले की, ‘ आता आपण युद्धात उतरलो तर आपला पराभव शंभर टक्के निश्चित आहे.’  यावरून त्यांनी राजीनामाही देण्याची तयारी दाखवली होती… आणि अर्थातच ही सोपी गोष्ट नाही.

अगदी नेमकेपणाने परिस्थिती समजावून सांगितल्याने नेतृत्वाला सॅम साहेबांचे म्हणणे पटले. सॅम साहेबांनी पुढील योग्य काळात युद्ध केले जाईल आणि ते खात्रीने जिंकले जाईलच याची हमी दिली. नेतृत्वाचा आग्रह डावलून फिल्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशा साहेबांनी हे न केलेले सीमोल्लंघन पुढील विजयादशमीसाठी किती महत्त्वाचे ठरले, हा इतिहास आहे ! 

साहेबांनी अतिशय योजनाबद्धरित्या पावले उचलली. बंगाली स्वातंत्र्ययोद्ध्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. आपल्या सैन्याला सर्वांगाने सिद्ध केलं आणि तीन डिसेंबरला सुरू झालेलं युद्ध सोळा डिसेंबरला संपुष्टात आणून पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले.   

दुस-या महायुद्धात जपानने शरणागती पत्करल्यानंतर त्यांच्या साठ हजार युद्धकैद्यांची सारी व्यवस्था करण्याचे काम सॅम साहेबांनी अतिशय शिस्तबद्ध रीतीने पार पाडले. १९७१ मध्ये शरण आलेल्या सुमारे ब्याण्णव हजाराच्या आसपास पाकिस्तानी सैनिकांची व्यवस्था करताना त्यांना हा अनुभव कामी आला. शरणागतीच्या आधी त्यांनी पाकिस्तानी सैन्यासाठी एक रेडिओ संदेश प्रसारीत केला होता…. “ आमच्या सैन्याने तुम्हाला चारही बाजूंनी पुरते घेरले आहे. तुम्हाला कुठूनही मदत मिळणे अशक्य आहे. तुम्ही केलेल्या अनन्वित अत्याचारांचा बदला घेण्यासाठी मुक्ती वाहिनीचे लोक टपून बसलेले आहेत. तुमचे जीव कशाला वाया घालवता…तुम्हांला घरी जाऊन तुमच्या बायका-पोरांना भेटायचे नाहीये का? एका सैनिकाने एका सैनिकापुढे हत्यारे म्यान करण्यात काहीही कमीपणा नसतो. आम्ही तुम्हांला एका सैनिकाला द्यावी तशीच सन्मानाची वागणूक देऊ !” …. या संदेशाचा खूप मोठा प्रभाव पडला यात नवल नाही.

(फिल्ड मार्शल सॅम ‘बहादूर’ माणेकशा यांच्या आयुष्यावर बेतलेला एक हिंदी चित्रपट डिसेंबरात येऊ घातलेला आहे. या ख-याखु-या बहादूर सेनानीची माहिती नव्या पिढीला व्हावी असा विजयादशमीच्या निमित्ताने सुचलेल्या या लेखाचा उद्देश आहे. संदर्भ, माहिती अपुरी असण्याची शक्यता दाट आहे. दिलगीर आहे. परंतु सेनाधिका-यांचे योग्य निर्णय देशासाठी काय करू शकतात याचे उदाहरण म्हणजे सॅम साहेबांचे त्यावेळी ‘ न केलेले सीमोल्लंघन ‘ होय, असे म्हणता येईल.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पिंडी ते ब्रम्हांडी – ब्रम्ह ऊर्जा… भाग-१ ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆ पिंडी ते ब्रम्हांडी – ब्रम्ह ऊर्जा… भाग-१ ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

प्रोटॉन-न्युट्रॉनने बनलेले अणुकेंद्रक आणि सभोवताली वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन मिळून एक अणू (Atom) तयार होतो. जसे, सर्वात लहान अणुमध्ये म्हणजे हायड्रोजनमध्ये अणूच्या केंद्रकात एक   प्रोटॉन असतो आणि त्याच्याभोवती एक इलेक्ट्रॉन कक्षेमध्ये फिरत असतो. कुठलीही गोष्ट फिरवायला ऊर्जा लागते. म्हणजे प्रत्येक अणुमध्ये उर्जा असते. ही उर्जाच इलेक्ट्रॉन, न्युट्रॉन, प्रोटॉन वा स्वतः अणुचे वागणे (गुणधर्म) ठरवते. कुणाकडून काय कार्ये करून घ्यायची याबाबत ऊर्जेला ज्ञान असते. अशाप्रकारे प्रत्येक अणुमध्ये ठराविक ज्ञान साठवलेले असते. 

एकाच प्रकारचे अणू  एकत्र येवून एक पदार्थ बनतो. पदार्थाच्या घटक अणुमधील माहिती आणि ऊर्जेनुसार तो पदार्थ कसा वागेल हे ठरते. त्यानुसार त्या पदार्थाचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म ठरतात. वेगवेगळे अणू एकत्र येवून रेणू (Molecule) तयार होतात. एका प्रकारचे रेणु एकत्र येऊन जटिल पदार्थ तयार होतो. त्या जटिल पदार्थाचे गुणधर्मही त्यातील घटक रेणूमधील ऊर्जा ठरवते. 

वेगवेगळे अणु-रेणू एकत्र येवून पेशीचा एक अवयव बनतो. शरीराच्या प्रत्येक पेशीला केंद्रक (nucleus), रायबोझोम, लायझोझोम, मायटोकोन्ड्रीया असे वेगवेगळे अवयव असतात. पेशीच्या प्रत्येक अवयवाचे कार्य तिच्या घटक अणु-रेणुमध्ये साठवलेली ऊर्जाच करत असते. पेशीच्या अनेक अवयवापासून एक पुर्ण पेशी बनते. पेशीचे गुणधर्म आणि कार्य तिच्या घटक अवयवांमध्ये साठवलेली उर्जा ठरवते. 

अनेक पेशी एकत्र येवून समुद्रातील एखाद्या साध्या बहुपेशीय जीवाचे संपुर्ण शरीर तयार होते. वेगवेगळी कामे करणाऱ्या पेशी एकत्र येऊन उन्नत जीवाच्या शरीराचा एखादा अवयव तयार होतो. उदा- हृदय, फुफ्फुस, लिव्हर, किडनी, आतडे, इत्यादी. घटक पेशींच्या कार्यानुसार त्या अवयवाचे गुणधर्म आणि कार्य ठरलेले असते. उदा- हृदयाचे स्नायू आकुंचन प्रसरण पावून रक्त पंप करतात. त्यामुळे रक्ताभिसरणाचे कार्य घडते. फुफ्फुसांमध्ये हवेतील आणि रक्तातील आॕक्सिजन तसेच कार्बन डायऑक्साइड यातील आदलाबदल होण्याचे कार्य घडते. 

अनेक अवयव एकत्र येवून एक जटील शरीर संस्था निर्माण होते. शरीर संस्थेच्या अवयवांमधील घटक पेशींमध्ये असणाऱ्या अणुरेणुंमध्ये साठवलेल्या ऊर्जेच्या माध्यमातून होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांमुळे शरीर संस्था वेगवेगळे कार्य पार पाडत असते. उदा – तोंड, अन्न नलीका, जठर, लिव्हर, स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे मिळून पचन संस्था तयार होते. पचनसंस्था अन्न पचनाचे कार्य करून शरीराला आवश्यक पोषणतत्वे शोषून घेते. 

अनेक शरीर संस्था एकत्र येऊन मानवी शरीरासारखे एक महाजटील शरीर तयार होते. विविध शरीर संस्थांच्या कार्यांत समन्वय निर्माण होत त्यानुसार शरीराचे कार्य चालते. मेंदूतील पेशींमध्ये चालू असलेल्या रासायनिक उर्जेच्या खेळातून विद्युत करंट (Action potential) निर्माण होतात. ते मेंदूच्या पेशींमधून ठराविक मार्गाने फिरले की ठराविक विचार निर्माण होतात. विचारांमधून मानवी मन तयार होते. मनाचे कार्य या विचारांवर अवलंबून असतात.

अणु-रेणु एकत्र येवून मानवी शरीरासारखी एक किचकट मशीन तयार होते. कुठलेही मशीन उर्जेवर चालते. ATP सारख्या अणुरेणूंमध्ये साठवलेल्या उर्जेवर शरीररूपी मशीन चालते. अणूपासून संपूर्ण शरीरापर्यंत प्रत्येक घटकामध्ये नेमके कुठले कार्य घडवून आणायचे याचे ज्ञान असलेली ऊर्जा कार्यरत आहे. ब्रह्म म्हणजे ज्ञान. ज्ञानाने संपन्न या जीवनउर्जेला ब्रम्हउर्जा असे म्हणता येईल. ही ब्रम्हऊर्जाच आपल्या अस्तित्वाचे मूळ कारण आहे. आपले अस्तित्व या ज्ञानउर्जेमुळेच शक्य झाले आहे. 

मानवी जीवनास कारणीभूत ठरणाऱ्या ब्रम्हउर्जेचे एक जटिल स्वरूप म्हणजेच अनुवंश. तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत होत असतो. मागील अनेक जन्मांपासून अनुवंश चालत आला आहे आणि पुढे अनेक जन्म तो चालत राहणार आहे. आता अनुवंश म्हणजे नक्की काय ते पाहू. मानवी शरीर ३७ लाख कोटी पेशींनी बनलेले आहे. प्रत्येक पेशीमध्ये एक केंद्रक (Nucleus) असते. या केंद्रकामध्ये ४६ गुणसुत्र म्हणजे chromosomes असतात. त्या ४६ गुणसुत्रांपैकी 23 गुणसुत्र आईकडून तर 23 वडिलांकडून आलेले असतात. हे गुणसुत्र म्हणजे दुसरे तिसरे काही नसून DNA चा एक बंडल असतो. हा DNA एक प्रकारचा दोरीसारखा लांब जटिल रेणू आहे. प्रत्येक मानवी पेशीमध्ये एकुण 2.2 मीटर लांबीचा DNA असतो. एवढा मोठा DNA सूक्ष्म पेशीच्या अतिसूक्ष्म केंद्रकात कसा मावणार? त्यासाठी DNA चा एक एक तुकडा स्वतःभोवती गुंडाळून गुंडाळून एका गुणसुत्राच्या रूपाने आकाराने अतिसूक्ष्म केला जातो. DNA चे ४६ बंडल म्हणजे आपले ४६ गुणसुत्र. ते इतकी कमी जागा व्यापतात की पेशीकेंद्रक या 10 micro meter इतक्या लहान जागेत सर्व ४६ गुणसुत्रे मावतात. 

DNA मध्ये अनुवांशिक माहिती जीन्सच्या स्वरूपात साठवलेली असते.  एक ठराविक प्रथिन (Protein) तयार करण्याची माहिती लांबलचक DNA च्या एका ठराविक तुकड्यात कोडच्या स्वरूपात साठवलेली असते.  ठराविक प्रथिनं तयार करणाऱ्या DNA च्या त्या ठराविक तुकड्याला एक जनुक वा जीन असे म्हणतात. प्रत्येक जनुकामधील कोडनुसार एक प्रथिन तयार होते. ते प्रथिन शरीरात ठराविक काम करते. आपले संपूर्ण शरीर आणि त्याला नियंत्रित करणाऱ्या यंत्रणा या मुख्यत्वे प्रथिनांपासून बनलेल्या असतात. अशा प्रकारे DNA मधील अनुवंशाचे  शरीर आणि मनाच्या कार्यावर पूर्ण नियंत्रण असते. मनुष्याचे दिसणे, विचार करणे, बोलणे, वागणे इत्यादी सर्व अनुवंशानुसार घडते. DNA पासून प्रथिने तयार होण्याची प्रक्रिया रसायनांमध्ये साठवलेल्या ब्रम्हउर्जेशिवाय शक्य नाही. पुढे प्रथिने ब्रम्हउर्जेचाच उपयोग करून शरीरातील विविध कार्य पार पाडतात. 

— क्रमशः भाग पहिला 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (नववी माळ) – तृतीय पुरूषार्थ ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (नववी) – तृतीय पुरूषार्थ ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

ती आता दोन जीवांची होती. तिचा आहे हाच जीव तिला नीट सांभाळता येत नव्हता तर तिथं तिच्या पोटातल्या जीवाची काय कथा? जीव राखायला चित्त था-यावर असावं लागतं. किंबहुना चित्तावरच तर देहाचा डोलारा उभा असतो अन्यथा चित्ताशिवाय देह म्हणजे केवळ भास. प्राणवायूचे उपकार वागवणारे श्वास यायला-जायला कुणाची परवानगी विचारत नाहीत. त्यामुळे काया आपल्या अस्तित्वाची पावलं जीवनाच्या मातीवर उमटत पुढे चालत असते. आणि मागे राहिलेल्या पाऊलखुणा पुसट पुसट होत जातात. त्यांचा कुणीही माग काढत येऊ नये म्हणून. चालणारा कुठल्या दिशेला जातो आहे, याचं वाटेला कुठं सोयरसुतक असतं म्हणा !

तिचे नात्या-गोत्यातले तिला आणि ती स्वत:ला विसरून कित्येक वर्षे उलटून गेली असावीत. देहाचे धर्म तिच्या देहाला समजत नव्हते तरीही ती मोठी झाली होती. हाडा-मांसाच्या गोळ्याला निसर्गाने दिलेली आज्ञा पाळत फक्त वाढण्याचं माहीत होतं, आणि निसर्ग आपली कामं करून घेण्यात वाकबगार. तो देहाची आणि बुद्धीची फारकत झालेली असली तरी त्या तनूच्या मातीतून अंकूर फुलवू शकतोच.

नऊ महिने उलटून गेलेले असले तरी नऊ दिवस शिल्लक होते, नवरात्रीतल्या नऊ दिवसांसारखे. पण या नऊ दिवसांत गर्भघटातल्या मातीत निसर्गानं पेरलेलं बीज फळाचं रूप धारण करून प्रकट व्हायला उतावीळ झालेलं असतं. नववा संपला की बाईच्या हाती काही उरत नाही…आता सुटका होण्याची प्रतीक्षा करीत दिवस ढकलायचे !

बाईची आई होण्याचे क्षण नजीक आलेले असताना ती अंधारात एकाकी होती. काया रया गेलेली..  वस्त्रं आपले कर्तव्य पार पाडून स्वत:च गलितगात्र झालेली…  त्यात स्त्रीचं शरीर…झाकावं तरी किती त्या फाटक्या चिंध्यांनी ! पोटात भुकेनं दुखत असेल नेहमीसारखं असं तिला वाटत असावं म्हणूनच ती निपचित पडून राहिली होती. आपल्या पोटात कुणाच्या तरी देहांची आसुरी भूक मांसाचा जिवंत गोळा बनून लपून बसली आहे, हे तिच्या गावीही नव्हतं…तिला मागील कित्येक महिन्यांपासून नेहमीपेक्षा जास्त भूक लागायची याचा अर्थ तिला समजण्यापलीकडचा होता.

इथं देह हाच धर्म मानून माणसं देव विसरून जातात हे तिला उमगायचं काही कारण नव्हतं. कुणी कधी फसवून, तर कधी कुणी भाकरीची लालूच दाखवून तिच्याशी जवळीक साधत होतं….आणि पुन्हा कधीही जवळ करीत नव्हतं. उष्ट्या पत्रावळीवरची शितं वेचून झाल्यावर कावळे पुन्हा त्या पत्रावळीकडे एकदाही वळून पहात नाहीत, अगदी तसंच … .

आजची रात्रही अंधाराचीच होती. नेहमी गजबजलेला उड्डाणपूल आता थोडी उसंत अनुभवत होता. त्याच्याखाली शहराची अनौरस पिलं आस-याला जमा झालेली होती. इथं उजेडाची अडचण होते सर्वांना.

त्या दहा जणी दिवस संपवून आपल्या वस्तीकडे निघालेल्या होत्या. त्यातल्या एकीच्या कानांनी एक ओळखीचा आवाज टिपला. तिच्या पाठच्या भावाच्या वेळी तिच्या आईने ओठ दातांत दाबून धरून रोखून धरलेला आणि तरीही उमटणारा आवाज…आई ! काय असेल ते असो…आई नसली तरी ओठांवर आई कायम रहायला आलेली असते. ती लगबगीने अंधाराकडे धावली. तिच्या सख्या तिच्यामागे झपझप गेल्या. “आई होईल ही….कधीही !” तिने त्यांना खुणावलं.

शृंगार बाईचा असला तरी शरीरं राकट असलेल्या त्यातील दोघी-तिघींनी तिच्या अंगाचं गाठोडं उचललं आणि तिथून दीडशे पावलांवर असलेल्या माणसांच्या इस्पितळाकडे धावायला सुरूवात केली. अपरात्री घराकडे पळणारी श्रीमंत वाहने यांनी हात दाखवून थांबणार नव्हतीच आणि पैशांसाठी माणसं वाहणारी वाहनं यांच्याकडून काही मिळेल की नाही या शंकेने थांबली नाहीत.

इस्पितळ बंद आहे की काय असा भास व्हावा असं वातावरण. लालसर पण जणू मतिमंद उजेड विजेच्या दिव्यांचा. एक रूग्णवाहिका थकून-भागून झोपी गेल्यासारखी एक कोपरा धरून उभी होती. रखवालदार पेंगत होते आणि कुठल्या कुठल्या खाटांवरून वेदनांची आवर्तनं उठवणारे ध्वनीच तेवढे शांतता भंग करीत होते.

त्यांनी तिथलंच एक स्ट्रेचर ओढून घेतलं आणि तिला त्यावर आडवं निजवलं…  मामा, मावशी, दीदी, डॉक्टरसाहेब असा पुकारा करीत त्या आत घुसल्या. दरम्यान रखवालदारांनी डोळे उघडले होते. या कधी आपल्या इस्पितळात येत नाहीत ..  सरकारी आणि मोफत असलं तरी…  आणि आज आल्यात तर एकदम दहाजणी? त्यांच्यातलीच कुणी मरणपंथावर निघाली की काय? आधी एक परिचारिका आणि पाचेक मिनिटांनी डॉक्टर तिथं आले. इथं काहीही होणार नाही….मोठ्या दवाखान्यात न्या…  त्यांनी फर्मावले. त्यांच्या हातापाया पडून अ‍ॅम्ब्यूलन्स मिळवली. त्या आयुष्यात प्रथमच अ‍ॅम्ब्यूलन्समध्ये बसलेल्या होत्या. घाईगडबडीत दुसरं हॉस्पिटल गाठलं. कागदी सोपस्कार तिथल्या एका रूग्णाच्या नातेवाईक पोराने पूर्ण करून दिले. तोपर्यंत आई होणारी शुद्धीवर आलेली दिसत होती. “ काय घाई होती? हिला डिलीवर व्हायला अजून दहा-पंधरा दिवस जातील !” तिथल्या डॉक्टरांनी थंडपणे सांगितले. एका रूग्णाचे असे एवढे नातेवाईक, तेही सारखे दिसणारे त्या डॉक्टरांनी पहिल्यांदाच असे एकत्रित पाहिले असावेत. “ घरी घेऊन जा ! आणि पुढच्या वेळेस एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये न्या !” असं म्हणून डॉक्टरसाहेबांनी केस तात्पुरती हातावेगळी केली. अ‍ॅम्ब्यूलन्स निघून गेली होती.

घरी न्यायचं म्हणजे पुलाखाली? त्यांच्यातल्या प्रमुख दिसणारीने काहीतरी ठरवलं आणि त्यांनी इस्पितळाबाहेर रिक्षेत झोपलेल्या चालकाला हलवून उठवलं…पैसे देईन…म्हणत त्याला इस्पितळात आणलं. स्ट्रेचरवरच्या देहाला रिक्षेत टाकलं आणि रिक्षेत बसतील तेवढ्या जणी त्यांच्या घराकडे निघाल्या. बाकीच्या येतील तंगडतोड करीत…रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसदादांचा ससेमिरा चुकवीत चुकवीत.

ती कितीतरी वर्षांनी घर नावाच्या जागेत आली होती. तिला अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या जीवनावश्यक गोष्टी पहिल्यांदाच एकत्रित मिळाल्या होत्या…आणि त्या थंडीच्या दिवसांत ऊबही….ती विवाहिता नव्हती तरीही तिला माहेर मिळालं होतं….आणि नको असलेलं मातृत्व !

सकाळ झाली. आज कुणीही पोटामागे घराबाहेर पडणार नव्हतं तसंही…त्यांना त्यांच्या देवीचा कसलासा विधी करायचा होता म्हणून त्या सा-या घरातच होत्या. बिनबापाचं लेकरू म्हणून जन्माला येऊ घातलेल्या तिच्या पोटातल्या बाळाने डॉक्टरांची दहा-पंधरा दिवसांची मुदत आपल्या मनानेच अवघ्या बारा तासांवर आणून ठेवली बहुदा ! दुपारचे बारा-साडेबारा वाजले होते….आणि त्या आईसह त्या दहाही जणींनी निसर्गाच्या नवसृजनाचा सोहळा अनुभवला. तिला वेदना झाल्याच इतर कोणत्याही स्त्रीला होतात तशा, पण तिच्या भोवती राठ शरीराची पण आत ओलाव्याच्या पाणथळ जागा असलेली माणसं होती….मुलगी झाली,,,अगदी नैसर्गिक प्रसुती ! या दहाजणींपैकी कुणी आजी झालं, कुणी मावशी तर कुणी आत्याबाई ! त्यांची स्वत:ची बारशी दोनदा झालेली..एक आईवडिलांनी ठेवलेली पुरूषी नावं आणि तिस-या जगात नियतीने बहाल केलेली बाईपणाच्या खुणा सांगणारी नावं…पुरुषपणाच्या पिंज-यात अडकून पडलेली पाखरं !

घरात ढोलक वाजले. नवजात अर्भकाच्या स्वागताची गाणी झाली आणि बाळाची अलाबला घेण्यासाठी वीस हात सरसावले. त्या प्रत्येकीला आई झाल्याचा आनंद झाला जणू ! स्त्री की पुरुष या प्रश्नाच्या जंजाळात अडकून पडलेल्यांच्या हातून एक स्त्री जन्माला आली होती.

घरातल्या कुणालाही नवजात अर्भकाला सांभाळण्याचा अनुभव असणे शक्य नव्हते… त्यांनी तिला घेऊन तडक इस्पितळ गाठले…एकीने दोघा-चौघांना विचारून एका समाजसेवी संस्थेशी संपर्क साधला. कालचे दहा-पंधरा दिवस मुदतवाले डॉक्टर तिथेच होते. आश्चर्यचकीत होत त्यांनी जच्चा-बच्चा उपचारांसाठी दाखल करून घेतले. बाळ-बाळंतीण सुखरूप.

जन्मसोहळा पार पडला आणि आता भविष्याची भिंत आडवी आली. पुढे काय करायचं? कुणी पोलिसाची भीती घातली होतीच. कुठे जाणार ह्या मायलेकी…त्यात ही आई मनाने अधू ! कुणी म्हणालं आता ही सरकारी केस झाली. सरकार ठरवेल यांना आता कुठं ठेवायचं ते.

दहा जणींपैकी एक म्हणाली, ” डॉक्टरसाहेब….ही पोर आम्हालाच देता का? दत्तक घेऊ आम्ही हिला. वाढवू,शिकवू !” 

“ कायदा आहे. सरकारकडे अर्ज करावा लागेल !” त्यांना सांगितले गेले.

त्या निघाल्या….सा-या जणींचे डोळे पाणावलेले ! स्त्री-पुरूषत्वाच्या द्विधावस्थेत भटकणा-या त्या दहाही जणींनी सहज सुलभ अंत:प्रेरणेनं तृतीय’पुरूषा’र्थ गाजवला मात्र होता.

आपल्याकडे बघून पोटासाठी टाळी वाजवणा-या या दशदुर्गांसाठी आपले तळहात जोडले जावेत…टाळ्यांसाठी आणि नमस्कारासाठीही !

( त्रिपुरा राज्यातील गोमती जिल्ह्यातल्या उदयपूर-बंदुआर येथे मागील एका महिन्यापूर्वी घडलेल्या या अलौकिक सत्यघटनेचे हे कथारूपांतर…कथाबीज अस्सल…पदरच्या काही शब्दांची सावली धरली आहे या बीजावर. धड पुरूषही नाही आणि धड स्त्रीही नाही अशा देवमाणसांनी सिद्ध केलेल्या या पुरूषार्थास नवरात्रीनिमित्त नमस्कार. )

लेखक : संभाजी बबन गायके. 

            ९८८१२९८२६०

नवरात्राच्या दुस-या माळेच्या निमित्ताने …..  कॅप्टन शिवा चौहान आपणांस अभिमानाने सल्यूट…जयहिंद ! 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (aathawi माळ) – ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (सातवी माळ) – जन्मदात्री सैन्याधिकारी….लेफ़्टनंट श्वेता शर्मा ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

मुजफ्फरपुर एक्सप्रेस आपल्या सुसाट वेगात धावते आहे. दुसरे स्टेशन येण्यास आणखी बराच वेळ लागणार होता….आणि एकीच्या पोटातलं बाळ आत्ताच जन्म घ्यायचा यावर हटून बसलं. रेल्वेच्या त्या डब्यात बहुसंख्य पुरूषांचाच भरणा आणि ज्या महिला होत्या त्या भांबावून गेलेल्या. त्या फक्त धीर देऊ शकत होत्या. प्रसुतिकळांनी जीव नकोसा वाटू लागलेली ती आकांत मांडून बसलेली. अवघड या शब्दाची प्रचिती यावी अशी स्थिती….!

त्याच रेल्वे गाडीत प्रवासात असलेल्या लेफ़्ट्नंट श्वेता शर्मा यांचेपर्यंत हा आवाज पोहोचला ! आणि अशा प्रसंगी काय करायचं हे श्वेता यांना अनुभवाने आणि प्रशिक्षणामुळे माहीत होतं.

श्वेताजींचे आजोबा बलदेवदास शर्मा आणि पणजोबा मुसद्दी राम हे दोघेही भारतीय लष्करात सेवा बजावून गेलेले. वडील विनोदकुमार शर्मा आय.टी.बी.पी अर्थात इंडो तिबेट बॉर्डर पोलिस मध्ये डेप्युटी कमांडत पदावर कार्यरत आहेत. म्हणजे मागील तिन्ही पिढ्या देशसेवेत.  श्वेता यांनी काहीही करून याच क्षेत्रात जायचं ठरवलं. भारतीय सेना एक महासागर आहे. इथं ज्याला खरंच इच्छा आहे, तो हरतऱ्हेने देशसेवा करू शकतो. आणि प्रत्येक सेवेकऱ्यास गणवेश आणि सन्मान आहे.

वैद्यकीय सेवा हा या सेनेमधला एक मोठा आणि महत्त्वाचा विभाग आहे. डॉक्टर म्हणून तर सेनेत खूप महत्त्वाची जबाबदारी दिली जाते. आपल्या मराठी माणसांचा अभिमान असणाऱ्या डॉ.माधुरी कानिटकर मॅडम तर लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोहोचल्या होत्या. पण ज्यांना डॉक्टर होणं काही कारणांमुळे शक्य होत नाही, अशा महिला नर्सिंग असिस्टंट म्हणूनही कमिशन्ड होऊ शकतात. पुरूषांनाही ही संधी असतेच. आणि नर्सिंग असिस्टंट अर्थात वैद्यकीय परिचारिका साहाय्यकांनाही सन्मानाची पदे मिळतात.

घराण्याचा लष्करी सेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी श्वेता शर्मा यांनी मग परिचर्येचा मार्ग निवडला. मागील वर्षी मार्च २०२२ मध्ये त्यांना ‘सोल्जर नर्सिंग असिस्टंट’ म्हणून नेमणूक मिळाली आणि त्यांनी लष्करी गणवेश परिधान केला. बारावी शास्त्र शाखा आणि रसायनशास्त्र, जीवशास्त्र यांसारख्या विषयातील उत्तम गुण, उत्तम शारीरिक पात्रता, या गोष्टी तर गरजेच्या आहेतच. परंतु भारतभरातून या पदासाठी मोठी स्पर्धा असते. यातून पार पडावे लागते. मेहनत तर अनिवार्य. श्वेता यांनी २०१७ मध्येच यासाठीची आवश्यक पात्रता प्राप्त केलेली होती. त्या सध्या हमीरपूर हवाईदल केंद्रात कार्यरत आहेत.असो.

लेफ्टनंट श्वेता यांनी त्यावेळी रेल्वेत घडत असलेल्या त्या परिस्थितीचे गांभीर्य ताबडतोब ओळखले. डब्यातील गर्दी हटवली. ज्यांना मदत करण्याची इच्छा आहे त्यांना सूचना दिल्या. महिलांना मदतीला घेतले. आणि हाती काहीही वैद्यकीय साधनं नसताना केवळ अनुभव, वैद्यकीय कौशल्य आणि कर्तव्य पूर्तीची अदम्य इच्छा, या बळावर धावत्या रेल्वेगाडीत एका महिलेची सुखरूप सुटका केली…एका महिलेचा आणि बाळाचा जीव वाचवला ! एका सैनिक अधिका-याच्या हस्ते या जगात पदार्पण करणारे ते बालक सुदैवीच म्हटले पाहिजे. बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहेत !

एका सैनिक मुलीस अशा प्रकारे हा पराक्रम करण्याची संधी मिळाली आणि तिने ती यशस्वीही केली. होय, त्या परिस्थितीत हे कार्य करणे याला पराक्रमच म्हटले पाहिजे. नवरात्राच्या या दिवसांत माता दुर्गाच सुईण बनून धावून आली असे म्हटले तर वावगे ठरेल काय?

नर्सिंग ऑफिसर लेफ्टनंट श्वेता शर्मा…आम्हांला आपला अत्यंत अभिमान वाटतो. परिस्थिती गंभीर तर सेना खंबीर याची तुम्ही प्रचिती आणून दिलीत. नारीशक्तीला सलाम. …. आपल्यामुळे देशातील असंख्य तरुणी प्रोत्साहित होतील आणि देशसेवेच्या याही मार्गाचा अवलंब करतील अशी आशा आहे.

(नवरात्रीत नऊ कथा कशा लिहायच्या ही चिंता नाही. अशा अनेक दुर्गा आहेत आसपास…त्यांच्याबद्द्ल लिहायला अशा शेकडो नवरात्री अपु-या पडतील. सकारात्मक गोष्टी सर्वांना समजायला हव्यात म्हणून हा अट्टाहास.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगल्या कर्मांची फळे… संकलन : ह. भ. प. किसन महाराज जगताप ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगल्या कर्मांची फळे… संकलन : ह. भ. प. किसन महाराज जगताप ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात…!!

एक स्त्री दररोज रोजच्या  स्वयंपाकातील एक चपाती गरजू माणसाला देत असते. एका पायाने जरा लंगडा असलेला माणूस रोज तिच्या दारात येऊन तिच्याकडून चपाती घेऊन जात असे, पण जाताना तो एक वाक्य नेहमी  म्हणत असे… “ तुमचं वाईट कर्म तुमच्यापाशीच राहील,आणि तुम्ही केललं चांगलं  कर्म तुमच्याकडे परत येईल ” तिला वाटायचं चपाती मिळाल्याबद्दल आभार मानायचं सोडून हा भलतचं काय तरी म्हणतोय. तिने वैतागून ठरवलं… याला धडा शिकवलाच पाहिजे. तिने एके दिवशी चपातीत विष कालवले आणि त्या लंगड्या मनुष्याला ती चपाती द्यायला निघाली.  त्याक्षणी तिला वाटले… ‘ हे मी काय करतेय? ‘ असे मनाला म्हणत ती माघारी फिरली व तिने ती चपाती चुलीत फेकून दिली व दुसरी चपाती करून त्या लंगड्या मनुष्याला दिली. नेहमीप्रमाणे तो पुन्हा तसाच पुटपुटला, ” तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहील. आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल “.आणि तो चपाती घेऊन गेला.

तिचा मुलगा बाहेरगावी होता . ती त्याच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची. खूप दिवसापासून त्याची खबर नव्हती.एक दिवस तो अचानक आला. दारात मुलाला बघून तिला आश्चर्य वाटलं. कपडे फाटलेले  होते. त्याला भूक लागली होती. आईला बघताच मुलगा म्हणाला, ” आई मी इथं पोहोचलो एका  लंगड्या बांबांच्यामुळे , मी चक्कर येऊन पडलो होतो .कित्येक दिवस पोटात अन्न नव्हते . माझा जीवच गेला असता. पण तेथे  बाबा आले. मी त्यांना खाण्यासाठी मागितले . त्यांनी मला एक चपाती खायला दिली. तो बाबा  म्हणाला ” रोज मी हेच खातो, आज तुला देतो. कारण याची गरज माझ्यापेक्षा तुला आहे “ … हे  ऐकताच आईचा चेहरा रडवेला झाला. तिला सकाळची विष कालवलेली चपाती आठवली. ती चपाती तिने चुलीत टाकली नसती तर… तिच्या मुलाने ती खाल्ली असती आणि त्याचा जीव गेला असता. 

आता तिला लंगड्या बाबाच्या शब्दांचा अर्थ कळला.’ तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहतं आणि तुम्ही केललं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येतं ‘.

चांगल्या कर्माचा परतावा… नेहमी चांगलाच मिळतो कुणी चांगले म्हणावे म्हणून काम करू नका.! आपण करीत असलेल्या कामाने अनेकांचे भले होणार असल्यास, ते काम सोडूच नका.!! जर आपला हेतुच शुध्द आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्व नसते.!! चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात.

!! राम कृष्ण हरी!!

संकलन – ह भ प किसन महाराज जगताप वलांडीकर

मो ९४२१३४७१२१

संग्राहिका – सुश्री मृदुला अभंग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (सातवी माळ) – देणारे हात … ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (सातवी माळ) – देणारे हात … ☆ श्री संभाजी बबन गायके 

मी बाई ! माझं नावच बाई. बाईचं नाव बाईच ठेवायचं आईबापाला का बरं सुचलं असावं हे काही सांगता यायचं नाही मला. लग्न झालं तेव्हा तशी लहानच होते मी म्हणायचं. कारण काहीही समजत नव्हतं संसारातलं. पण ‘ संसार काय आपोआप होतच राहतो… परमार्थ करावा लागतो‘.. असं आई म्हणायची. 

तसे मला दोन आईबाप. एक जन्म दिलेले आणि दुसरे पंढरीतले. सासरची शेती रग्गड आणि ती कसायला माणसं कमी पडायची. घामाच्या धारांनी शिवारं पिकायची..  पण माझं पोटपाणी पिकलंच नाही…पदरी एक तरी लेकरू घालायला पाहिजे होतं विठुरायानं. पण त्याच्या मनातलं जिथं रखुमाईला ओळखता येत नाही तिथं माझं म्हणजे ..  पायीची वहाण पायी बरी अशातली गत. तक्रार नव्हती आणि मालकांनी सवत आणली तिचा दु:स्वासही नाही. देवाच्या दोन्ही भार्यांची एकमेकींत धुसफूस होत असेलही, मात्र आम्ही एका जीवाने राहिलो. पण दैवाने मालकांना भररस्त्यातून माघारी बोलावलं आणि आमच्या दोघींच्याही कपाळांवरचे सूर्य मावळून गेले. जमलं तसं रेटलं आयुष्य. राहता वाडा ऐसपैस होता आणि माझ्यासाठी वाडयातल्या आतल्या खोल्या पक्क्या करायचं हाती घेतलं होतं. पण ते राहून गेलं आणि आता तर मला त्यात काही राम वाटत नाही. विठ्ठलच नाही राऊळात तर ते राऊळ सजवायचं तरी कशाला?

सवयीने शेतात जात राहिले, धान्य घरात येऊन पडत राहिलं. पण या सर्वांत लक्ष कुठं लागतंय. ‘ देव भक्तालागी करू न दे संसार ‘असं तुकोबारायांनी म्हणून ठेवलं आहेच. त्यांना तरी कुठं नीट रमू दिलं होतं त्यानं. इथं तर माझा तुकोबा वैकुंठाला निघून गेला होता आणि कुणासाठी कमवायचं, कुणासाठी स्थावर जंगम माघारी ठेवून जायचं हा प्रश्न होताच. भाकरीच्या दुरडीतली जास्तीची भाकरी देतोच की आपण, मग ही जास्तीची कमाई आपला जीव आहे तोवर ज्याची त्याला दिलेली काय वाईट? पण द्यायची तरी कुणाला आणि का म्हणून? लोक देवाकडं धाव घेतात. देवाशिवाय माणसांनी दुसरीकडं कुठं जाऊच नये, असं मला सारखं वाटत राहतं. देवाला द्यायचं म्हणते खरं मी, पण देवाला कुठं कशाची कमी असते. देवस्थानं म्हणजे दवाखानेच की जणू. शरीराला बरं करणारे दवाखाने पुष्कळ असतील आणि असायला पाहिजेत. पण मनालाही बरं करायलाच पाहिजे की. म्हणून मी ठरवलं .. जमतील त्या देवस्थानांना काही न काही द्यायचं.  आधी धान्य पाठवून देत होते. अक्कलकोटच्या स्वामी महाराजांच्या प्रसादासाठी लाखो लोक येतात कुठून कुठून. प्रसादाच्या स्वयंपाकाला आणखीन चांगली भांडी पाहिजेतच की…दिली मला जमली तेव्हढी. द्यायला लागले तसं देण्याची सवय वाढायला लागली. मंदीरांचे कळस झाले, रंगरंगोटी झाली, बांधकामं झाली, ती मी दिलेल्या खारीच्या वाटयातून झालेली या डोळ्यांनी पाहिली. 

वय झालंय आता…देहाचा भरवसा नाही. कधी जाईल काही नेम नाही. सवतीच्या वाटचं तिचं तिला मिळालेलं आहेच की. तिचं गणगोत आहे, त्यांची ती कष्ट करून खाताहेत…..त्यांचा त्यांना संसार आहेच.  माझ्या माघारी माझं उरेल त्यावरून कुणी तंडायला नको. म्हणून गंगेतून भरून घेतलेली ओंजळ, तहान भागल्यावर उरलेलं तीर्थ इकडं तिकडं शिंपडून न टाकता परत गंगामायला अर्पण केलेलं काय वाईट? आता माझा पैसा…माझ्या मालकानं माझ्यासाठी मागे ठेवलेला मला देवाला द्यावासा वाटतो त्यात कुणाचं काय जातं? 

एकटीच्या पोटाला लागतीय तेवढी जमीन हातात ठेवली आणि बाकीची देऊन टाकली. पैशांतलं काही कळत नाही. पण नातू आहेत चांगले..कागदाची कामं करून देतात. नाहीतर एवढे लाखा-लाखाचे व्यवहार मला अंगठा बहादरणीला कसं जमलं असतं,तुम्हीच सांगा ! 

मी म्हणलं…मला माझ्या बापाला सोन्याचा करदोडा घालायचाय….आईला मंगळसूत्र घालायचंय. बाप म्हणजे विठोबा आणि आई म्हणजे रखुमाई माझी. होऊन गेलं हातून…हिशेब अठरा लाखावर गेलाय म्हणतात. कुणी म्हणतंय आजवर पन्नास लाख गेले असतील म्हातारीच्या हातून. जाईनात का ! 

हे फेसबुक का काय म्हणतात,त्यामुळे मी माहिती झाले सर्वांना. तशी खरं तर गरज नव्हती. देवानं मला एवढं भरभरून दिलं तेव्हा कुठं सर्वांना तो सांगत सुटला? लोकांना माहित नव्हतं तेच बरं होतं. कुणी म्हणतं या पैशांतून दुसरं बरंच काहीबाही करता आलं असतं. लाख तोंडं आणि त्यांची मतं. पण मी म्हणते माझ्या बुद्धीनुसार मला वाटलं ते मी केलं .. आणि आणिक करणार आहेच शेवटपर्यंत. मला काळ्या दगडातला विठोबा सगुण साकार वाटतो, त्याच काळ्या दगडातली गोरी रखुमाई आवडते…त्यांना सजवायला नको? मी काही कुठं बाहेर देवाला जात नाही…पण दुस-या मुलखातल्या देवांची श्रीमंती ऐकून आहे की मी. होऊ द्या की आपलेही देव ऐश्वर्यवान…अहो, पंढरीश…पंढरीचा राजाच आहे नव्हे का? राजासारखाच दिसला पाहिजे माझा बाप. 

आता देवस्थानांनी भक्तांसाठी काय काय करायचं हे सांगायला जाणती माणसं आहेतच की जागोजाग.  त्यांनी सांगावं आणि देवस्थानांनी ऐकावं म्हणजे झालं. माझ्यासारख्या अडाणी बाईचा हा अडाणी विचार. .. मी माझं माझ्या देवाला देते आहे…तो तुम्हांलाही देईलच.

देवाच्या दयेने माझे हात देणारे आहेत…आणि माझ्या देवाच्या हातात झोळी नाही…मी त्याच्या चरणाशी वाहते ते त्यानेच माझ्या हवाली केलेलं….देणा-याने देत रहावे ! 

(बाई लिंबा वाघे….मराठवाड्यातल्या एका खेड्यातली शेतकरी वृद्धा…मनाने, विचाराने, वर्तनाने देवभक्त.  त्यांनी त्यांच्या पदरात असलेलं दान पुन्हा देवाच्या पायाशी ठेवलं. आपण त्यांना नमस्काराशिवाय काय देऊ शकतो. जुन्या पिढीच्या रक्तात अजूनही विठूचा अंश आहे…तो असाच कायम रहावा, देवस्थानांनी आणखी लोकाभिमुख व्हावं, अशी प्रार्थना त्या देवस्थानांच्या आराध्य देवतांकडे करूयात का? या नवरात्रात ही एक सातवी माळ अशी श्रीमंत ठरली.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता – अध्याय पहिला – ( श्लोक ४१ ते ४७) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पहिला — भाग पहिला – ( श्लोक ४१ ते ४७) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।

स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः ৷৷४१৷৷

संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।

पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः৷৷४२৷৷

दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः ।

उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः৷৷४३৷৷

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।

नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ৷৷४४৷৷

अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम्‌ ।

यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ৷৷४५৷৷

यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।

धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्‌ ৷৷४६৷৷

संजय उवाच

एवमुक्त्वार्जुनः सङ्‍ख्ये रथोपस्थ उपाविशत्‌ ।

विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ৷৷४७৷৷

मराठी भावानुवाद ::::  

कुलावरी वर्चस्व  अधर्म प्रदूषित कुलस्त्रिया 

वर्णसंकरा प्रसूत करती वाममार्गी त्या स्त्रिया ॥४१॥

वर्णसंकरे पिंडदान तर्पणादी खंड होत 

पितरादींची अधोगती नाश कुलाचा होत ॥४२॥

कुलघातक हा वर्णसंकर अतिघोर दोष

जातिधर्म कुलधर्मही जात पूर्ण लयास ॥४३॥

लुप्त जाहले कुलधर्म  नाही त्यासी  काही थारा

जनार्दना रे ऐकुन आहे नरकवास त्या खरा ॥४४॥

राज्यसुखाच्या मोहाने युद्धसिद्ध जाहलो

हाय घोर या पापाच्या मार्गाला  भुललो ॥४५॥

शस्त्र न धरी मी हाती काही करीन ना प्रतिकार 

मृत्यूला स्वीकारिन मी झेलुनिया कौरव वार ॥४६॥

कथित संजय 

छिन्नमने कथुनी ऐसे त्यजुनी तीरकमान

शकटावरती शोकमग्न तो  बसला अर्जुन ॥४७॥

– क्रमशः भाग पहिला 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (सहावी माळ) – मुक्ता ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (सहावी माळ) – मुक्ता ☆ श्री संभाजी बबन गायके 

धृतराष्ट्र आंधळा म्हणून गांधारीने उसनं आणि राजस अंधत्व मिरवलं, तसं मुक्ताबाईंना करून चालणार नव्हतं. लेकीने बापाच्या घरी रहायचं नसतं, ती परक्याची अमानत असते हे तिने लहानपणापासून ऐकलं होतंच. त्यामुळे तिच्या बालमैत्रिणींसारखं तिचंही लग्न ठरलं तेव्हा तिला वेगळं असं काही वाटलं नाही. मात्र लग्नात घरात खूप आनंदी वातावरण असतं याचा अनुभव तिने मोठया बहिणींच्या लग्नात घेतला होताच. त्या बहिणी माहेरी आल्यावर तिकडचं जे वर्णन करायच्या ते मुक्ताबाईच्याही कानांवर यायचंच. माहेरवाशिणी आणि आईचा संवाद म्हणजे ओल्या काळजांचं एकमेकांना दिलेलं मऊ आलिंगनच असतं जणू. सासरच्या गोष्टींचा भला मोठा भारा बांधून आणलेला असतो लेकीने, त्यातील एक एक काडी ती उलगडत राहते अगदी मध्यरात्रीपर्यंत. उबदार गोधडीत आईच्या मऊ हातांवर डोकं ठेऊन तिच्याशी हितगुज करण्यातलं सुख इतर कुणाच्याही वाट्याला येणार नाही. या संभाषणात आईला तिचं स्वत:चं माहेर आठवत असतं. ती वरवर हं हं म्हणत असते आणि लेकीच्या कपाळावरून उजवा फिरवत फिरवत तिला थोपटत असते, तिला एखादा कानमंत्रही देत असते आणि जिवलग मैत्रीण असल्यागत मधूनच फिदीफिदी हसतही असते. मुक्ता पलीकडच्या गोधडीत शिरलेली असली तरी तिचे कान जागे असायचे.

मुक्ताला लग्नात नवरा मुलगा तसा स्पष्ट दिसलाच नव्हता. मुक्ता ठेंगणीशी आणि तो तिच्यापेक्षा जवळजवळ दुपटीने उंच. भटजींनी अंतरपाट दूर केल्यावर तर लज्जेने त्याच्याकडे पाहणे झालेच नाही. हार घालतानाही थोडी नजर वर केली पण जुन्या जमान्यातल्या कागदी झिरमुळ्यांचं बाशिंग…नवरदेवाचं कपाळ मात्र उठून दिसलं. आणि तासाभरात व-हाडाच्या बैलगाड्या घुंगरं वाजवीत निघाल्या.

मुक्ता एकूणात तिसरी मुलगी. आधीच्याच लग्नातली आचा-याची, मांडववाल्याची देणी अजून बाकी होती.  त्यातच नात्यातल्या एकाने मुक्तासाठी त्याच्या दूरच्या नात्यातलं एक स्थळ सुचवलं. नवरदेवाच्या वडिलांचं नुकतंच निधन झालंय, वर्षात लग्न नाही केलं तर पुढे आणखी तीन वर्षे थांबावं लागेल, म्हणून त्यांना घाई आहे. खातंपितं शेतक-याचं घर आहे, मोठं खटलं आहे. मुक्ता संपादून जाईल त्या घरात. सांगणा-याने काही तपशील वगळून तर काही पदरचा घालून त्या स्थळाचं वर्णन केलं. आणि मुक्ताच्या वडिलांनी या स्थळामध्ये डोकं देण्याचं मनावर घेतलं. आणखी एक वावर विकलं तरी फारसं बिघडणार नव्हतं. कारण एकच लेक होता. मुक्ताच्या पाठीवर असलेल्या मुलाच्या लग्नात नाहीतरी सर्व वसुली करण्याची संधी मिळणार होतीच.

सकाळी सुपारी खेळण्याच्या वेळी मुक्ताने नव-याकडे पाहिलं आणि ती पहातच राहिली. नवरा मुलगा मात्र तिच्याकडे डोळे बारीक करून पहात हसतोय असं तिला वाटलं. तेवढ्यात मुक्ताला समोरच्या हळदी-कुंकवाच्या पाण्याने भरलेल्या ताटात अंगठी हाताला लागली. हा खेळ मुक्ता जिंकली होती….पण जिंकण्याचा आनंद तिला तसा झालाच नाही. महिपती नाव होतं नव-याचं. मैत्रिणींनी सांगून ठेवलेल्या उखाण्यांपैकी मुक्ताला एकही उखाणा आठवला नाही .. किंवा तिला आठवायचा नव्हता ! तिने कसाबसा एक साधा उखाणा घेतला. पण या उखाण्यात महिपतीरावांच्या नावाआधी आईवडिलांचा मान राखण्यासाठी मी हा विवाह केला आहे,असा आशय व्यक्त करायला ती विसरली नाही… ‘ चांदीच्या ताटात मोहरा आणि माणिक मोती…माहेरची लाज सारी लेकीच्या हाती…महिपतराव माझे शंकर आणि मी त्यांची पार्वती ! ‘

दुस-या दिवशी नव-यामुलीची पहिल्यांदा माहेरी पाठवणी झाली. रात्री आईच्या गोधडीत शिरलेल्या मुक्ताला तिला काहीही सांगावंसं वाटलं नाही. गोधडीतला अंधार तिला जास्त जवळचा वाटू लागला होता. दोन दिवसांनी मुक्ताला सासरी पाठवताना वडिलांनी मुक्ताला घट्ट जवळ घेतलं…पोरी महिपतराव डोळ्यांनी अधू आहेत…आंधळे नाहीत. देवभोळा साधा माणूस आहे. तू त्याचे डोळे हो ! मुक्ता बैलगाडीत बसली तेव्हा वडील हात हलवत होते..  पण त्यांचे पाण्याने भरलेले डोळे खाली पहात होते.

संसार सुरू झाला. पहिला मुलगा होईपर्यंत मुक्ताबाई आणि महिपतीरावांचा उघड संवाद झालाच नाही…त्याकाळी असं होणं अगदी सर्वमान्य होतं. जाऊबाईंना आपल्या अशा दीराला इतकी नीटस बायको मिळाली याचा आनंद कमी आणि हेवा अधिक वाटत होता. महिपतराव नजर अधू असूनही वाचणारे होते. कागदाला जवळजवळ पापण्यांचा स्पर्श होईल इतक्या जवळ त्यांना कागद धरावा लागायचा. पण वाचनाचा कंटाळा अजिबात नव्हता. मुक्ताबाईंनी माहेरी अभ्यासाचा कंटाळाच केला होता तसा. इथं महिपतराव मुक्ताबाईंची शाळा झाले.

महिपतरावांकडे शेतीतल्या काबाडकष्टांचा जणू मक्ताच दिला होता थोरल्याने. याचं काही लग्नं होणार नाही, त्यामुळे आपल्या मुलाला आपल्या माघारी मिळणार असलेल्या जमिनीत कुणी वाटेकरी नसणार हे तो गृहीत धरून चालला होता. सारा रोखीचा व्यवहार त्याच्याकडेच आणि घरातल्या किल्ल्यांचा जुडगा त्याच्या बायकोकडे.

मुक्ताबाई पुढे पुढे धीट झाल्या. व्यवहारात लक्ष घालू लागल्या. नवरा बैलगाडी घेऊन निघाला की कासरा आपल्या हाती धरू लागल्या…बैलगाडी गाववाल्यांच्या नजरेच्या टप्प्यापलीकडे गेल्यावर. महिपतरावांची नजर हळूहळू धूसर होत जाणार होती. दैवाने त्यांच्यासाठी मुक्ताबाईंचे दोन सुंदर, टपोरे डोळे पाठवून दिले होते. आणि आता तर हे डोळे अक्षरं वाचू लागले होते.

नावाचा महिमा असेल कदाचित, पण महिपतरावांच्या तशा तापट स्वभावावर त्यांनी प्रेमाने फुंकर घातली होती. आंधळा म्हणून हिणवणारा गाव, व्यवहारात फसवणारा थोरला भाऊ, यांच्याबद्द्ल असणारी नाराजी महिपतरावांच्या शब्दांतून आणि कधी कधी कृतीतूनही व्यक्त होई. पण मुक्ताबाईंनी त्या क्रोधाला संयमाची झालर लावून टाकली.

बापजाद्यांपासून चालत आलेल्या जमिनीच्या वादाच्या न्यायालयीन खटल्यांना कित्येक वर्षे लोटून गेली होती. निकाल काही लागत नव्हता. थोरले भाऊजी या बाबतीत तसे उदासीन होते. मुक्ताबाईंनी स्वयंपाकघरातून हळूहळू ओसरीवर प्रवेश मिळवला. कधी घरी सल्लामसलतीसाठी येणा-या वकिलांशी बोलण्याचं, त्यांना काही विचारण्याचं धाडस मिळवलं.

खटल्यातून यशस्वी माघार घेणं फायद्याचं आहे, असं सर्वांना पटवून दिलं. आणि वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या खटल्यातून सर्वांचीच सुटका केली. वाद तर चुलत घराशीच होता. ती मंडळीही मुक्ताची चाहती झाली. एकादशी, भजन करणारी, पहाटे उठून सडा रांगोळी घालणारी, तुळशीला पाणी घालणारी, जात्यावर दळण दळताना जनाबाई होणारी मुक्ता महिपतरावांच्या घराची लक्ष्मी झाली होती. मुक्ताबाईंना दोन मुलगे झाले. मुलगी हवी होती पण नाही पडली पदरात. मुलांची शिक्षणं व्यवस्थित होतील याकडे त्यांचं लक्ष असायचंच. थोरला शहरात नोकरीस लागला आणि धाकट्याने शेतीत लक्ष घातले. आता पैशांची कमतरता नव्हती. म्हणून गरजू आणि मुक्ताबाईंचं घर अशी जोडी ठरून गेली.

महिपतरावांची आई आणि मुक्ता जणू मैत्रिणीच बनल्या होत्या. म्हातारीची खूप सेवा केली मुक्ताबाईंनी. ‘माझ्या आंधळ्या लेकाचा संसार तुच कडेपतोर नेशील गं माझे बाये !’ असं म्हणून म्हातारी मुक्ताच्या गालांवरून हात फिरवायची आणि तिच्या स्वत:च्या डोक्याच्या उजव्या बाजूवर बोटं ठेवून कडाकडा मोडायची….हा आवाज मुक्ताला टाळ्यांच्या कडकडकटासारखा भासायचा. मुक्ताबाई माहेर तसं विसरूनच गेली होती.

महिपतरावांची दृष्टी आता जवळजवळ गेल्यातच जमा होती. अगदीच प्रयत्नांती त्यांना थोडंफार दिसायचं.  पण बाकी सर्व व्यवहार अंदाजेच. माळकरी असले तरी महिपतरावांना पंढरी काही घडली नव्हती. गावात होणाऱ्या कीर्तनांना, काकड्याला मात्र ते नियमित हजेरी लावत. अनेक अभंग त्यांना मुखोदगत होते. मुक्ताबाईंनाही त्यांनी विठूचा छंद लावला. सूरदास, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांची चरित्रे मुक्ताबाईंना खूप जवळची वाटली.

एके दिवशी पंढरीला जायचा हट्टच धरला मुक्ताबाईंनी महिपतरावांपाशी, आणि त्यांनी मुलांना सांगून तशी व्यवस्थाही करवून घेतली. देवापुढे उभी राहिली ही जोडी तेव्हा तेथील रखवालदारांनीही घाई केली नाही..मुक्ताई महिपतरावांना आपल्या डोळ्यांनी देव दाखवत राहिल्या…देवाचिये द्वारी क्षणभर उभं राहून. चारी मुक्ती त्या साधू शकणार नव्हत्या…पण पदरी पडलेलं त्यांनी पवित्र मात्र करून घेतलं होतं.

आज महिपतराव आणि मुक्ताबाई हयात नाहीत. पण प्राप्त परिस्थितीमध्ये जीवनाला सामोरे जाण्याची जिद्द दाखवणाऱ्या मुक्ताबाई स्त्रीशक्तीचं प्रतीकच बनून राहिल्या ..  किमान त्या गावात तरी. नवरात्रात अशा द्विभुज देवींची आठवण येते, यात नवल नाही.

परिस्थितीमुळे, गरीबीमुळे, परंपरांमुळे असे संसार स्वीकारावे लागणाऱ्या अनेक मुक्ताबाई आधीच्या पिढीने अनुभवल्या आहेत. त्या लढाऊ दुर्गांना या सहाव्या माळेच्या निमित्ताने नमस्कार.

(लेखातील नावे काल्पनिक आहेत. आयुष्य मात्र खरे.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (पाचवी माळ) – पंगत ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (पाचवी माळ) – पंगत ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

लग्नाच्या पंगतीत आज तिने केटरींगवाल्याच्या मागे लागून मसालेभात वाढण्याचं काम मिळवलं. एरव्ही कायम आचाऱ्यासमोर बसून भाज्या चिरून देण्याच्या, काकड्या खिसून देण्याच्या, पु-या लाटून देण्याच्या कामाला ती वैतागली होती. पंगतीत सुंदर सुंदर साड्या, दागदागिने घालून बसलेल्या आणि झकपक मेकअप करून बसलेल्या बायका -मुली तिला बघायच्या होत्या. झालंच तर नवरा-नवरीचं ताट वाढायला मिळालं तर चार दहा रुपये बक्षिसीही पदरात पडण्याची शक्यता होतीच. शिवाय वाढप्यांसाठी असणारा बऱ्यापैकी नीटनेटका ड्रेस घालण्याची संधी तर होतीच होती.

आचा-याच्या हाताखाली अल्पवयीन मुलांना काम करण्यास तसेही कायदा नाही म्हणतो. पण त्याचं हे नाही म्हणणं कुणाच्या कानांवर जात नाही सहसा. आणि भुकेच्या आवाजापुढे अन्य सर्व आवाज क्षीण पडतात. आपल्या ताटांमध्ये आलेले जिन्नस कुणाकुणाच्या कष्टांच्या निखाऱ्यांवरून आलेले आहेत, हे माहित करून घेण्याची गरज लक्षातही येणार नाही अशीच आहे. कुणी काही म्हटलंच तर ‘ ही लहान मुलगी त्या आज्जींची नात आहे, आज त्यांना बरं नाही म्हणून मदतीला आली आहे,’ असं सांगून वेळ मारून न्यायला केटरींगवाल्यांना जमतेच.

भांड्यांच्या टेम्पोत दाटीवाटीनं बसायचं, कामाच्या ठिकाणी जायचं आणि सगळी तयारी होण्याआधी आचा-याने घाईघाईने आणि काहीशा नाखुशीने बनवलेला सांबार भात भराभरा खाऊन मोकळं व्हायचं. आता सर्व उरकल्यावरच हातातोंडाची गाठ पडणार. त्यात निघताना प्रत्येकाचीच घाई. स्वयंपाकातील उरलेले पदार्थ खाऊन खाऊन त्यांचा कंटाळा आलेला असतो, पण घरी न्यावेच लागतात…घरात त्या अन्नाची वाट पाहणारी काही उपाशी पोटं असतात.

रोशनी आठवी इयत्तेत जाऊन शिकण्याचा प्रयत्न करते. चार सोसायट्यांमध्ये धुणी-भांडे करून घर चालवणारी आई आणि तीन भावंडं आहेत. रोशनी सर्वांत थोरली म्हणून तिची जबाबदारीसुद्धा थोरलीच. वडील वस्तीतील दुस-यांची मारामारी सोडवायला गेलेले असताना जीवाला मुकलेले. वस्तीतली झोपडी भाड्याने घेतलेली. भाडं थकलं की दुसरी झोपडी बघायला लागण्याच्या भीतीने, जे पैसे येतील ते भाड्याच्या रकमेसाठी बाजूला ठेवणं क्रमप्राप्तच होते. रोशनी केटरींगच्या कामाला जाते हे शाळेत तिने माहित होऊ दिले नव्हते. कामाच्या ठिकाणाहून रात्री आणलेले पदार्थ ती डब्याला घेऊन जात नसे. परंतु मेजवान्या रोज रोज थोड्याच असतात? आणि असल्या तरी त्या आपल्या कंत्राटदाराला मिळायला पाहिजेत, आणि कंत्राटदाराने आपल्याला कामाला नेलं तर पाहिजे !

चांगल्याचुंगल्या पदार्थांवरून मात्र रोशनीचं मन उडालं होतं. केटरिंगवाला उरलेले पदार्थ वाढप्यांत वाटून द्यायचा. खास चवदार बनवलेलं, भरपूर तेल-तूप, मसाला घातलेलं ..  ते रोशनीच्या घरी एरव्ही येण्याचा प्रश्नच नव्हता. आणि हे अन्न नेहमी नेहमी घरी नेलं तर घरच्यांना त्याची सवय लागेल आणि नेहमीच्या खाण्याकडे वाकड्या तोंडाने बघितलं जाईल, हे रोशनीला माहित होतं. त्यामुळे ती सहसा उरलेलं अन्न घरी घेऊन जायचीच नाही. कधीकधी चार गुलाबजाम, जिलेबी असं काहीबाही मात्र न्यायची..  इतर वाढप्यांनी फारच आग्रह केला तर.

रोशनीला हे काम आवडायचं नाही मनातून. लोकांनी जेवून ठेवलेली ताटं, त्यांच्या नटून थटून आलेल्या, हास्यकल्लोळ सुरू असलेल्या गर्दीतून घेऊन जायची, खरकट्या वाट्या, चमचे ड्रमातून वेचून काढायच्या आणि धुवायला बसायचं हे नको वाटायचं. शिवाय गर्दीतल्या कुणाकडे चोरट्या नजरेने पाहून घ्यायचं. कुणाला धक्का लागता कामा नये. पंगतीत एखादी शाळेतली भेटली म्हणजे? पोटात गोळा यायचा. पण रिकाम्या पोटात आलेला गोळाही भुकेला असायचा.

“ रोशनी, अगं चाल पटापट पुढं. ही आख्खी लाईन वाढून व्हायचीय अजून.”  असं केटरींगवाल्यानं टाळी वाजवून म्हणताच रोशनीने हातातील मसालाभाताचं भांडं एका हातावर पेलत पेलत काळजीपूर्वक वाढायला सुरुवात केली. सवय नव्हती…वेळ लागत होता…वाढून न झालेल्या पानांवर बसलेली मंडळी हात आखडून घेऊन बसली होती. ‘वदनी कवळ घेता‘ म्हणायची प्रतीक्षा करणारी अनुभवी मंडळी…’आवरा लवकर’ म्हणत रोशनीच्या वेगात आणखीनच व्यत्यय आणत होती.

निम्मी पंगत वाढून झाल्यावर का कुणास ठाऊक रोशनी थबकली. तिने भाताचं भांडं टेबलावरच ठेवलं आणि दुस-या वाढप्याला नजरेनेच इशारा केला आणि ती मागच्या मागे आचा-याच्या खोलीकडे जवळजवळ पळतच गेली. त्याने विचारले…” काय गं? काय झालं? “ त्यावर रोशनी म्हणाली, “ काय नाही…हात भाजायला लागला गरम भातानं.”  त्यावर तो म्हणाला…” तुला तर मोठी हौसच नाही का वाढपी व्हायची. एवढासा जीव तुझा…चालली वाढायला !”

आणखी काही पंगती झाल्या. लोक हात धुवायला नळापाशी गेले. नवरा-नवरीची पानंही वाढून झाली. त्यांच्या पानांभोवती फुलांची सजावट. त्यांना वाढणा-यांना नवरीमुलीकडच्या लोकांनी खुशीने काही रुपये दिले. रोशनीला मिळू शकले असते त्यातले काही, पण ती तिथं नव्हती. मेजवानी आटोपायच्या शेवटच्या टप्प्यात वाढपे, आचारी, त्यांच्या सोबतच्या माणसांची पंगत हॉलमधल्या अगदी कोप-यातल्या साध्या टेबलवर बसली. रोशनीचं लक्ष काही जेवणात लागणार नव्हतं. त्यांच्यातलाच एक जण सर्वांना जेवण वाढत होता. तितक्यात किचनमधून मसालेभाताचं पातेलं घेऊन मिरजकर बाई आल्या आणि त्यांनी पहिल्यांदा रोशनीला भात वाढला. बाईंना बघून रोशनी गडबडून गेली. बाईंनी इतरांनाही भात वाढला आणि त्या बाहेर जाऊन थांबल्या. केटररसाठी ही गोष्ट नवी होती…लग्नघरच्या मंडळींपैकीच कुणी तरी मोठ्या मनाच्या बाई असाव्यात, असं सर्वांना वाटून गेलं. रोशनीनं पटापटा चार घास गिळले आणि ती लगबगीनं बाई जिथं बसल्या होत्या तिथे त्यांच्यापाशी जाऊन उभी राहिली.

“ कामाची कसली लाज बाळगायची, रोशनी? तू मला पंगतीत बसलेले पाहूनच मागे फिरलीस ना? ” बाईंच्या या प्रश्नावर, एरव्ही वर्गात पटापट उत्तरे सांगणारी रोशनी आता मात्र शांत आणि मान खाली घालून उभी होती. तिच्या मागोमाग केटरींगवाला आला…म्हणू लागला…” काही चुकलं असंल मॅडम तर सॉरी म्हणतो. पुन्हा नाही मी लहान पोरींना कामावर लावणार !”

“अहो, तसं काही नाही हो दादा. ही रोशनी माझ्या वर्गात आहे. उलट मी तिचं कौतुकच करायला तिला बाजूला घेऊन आलीये. तुम्ही जा तुमच्या कामाला ! “ त्या दोघींकडे एकवार कटाक्ष टाकून तो बिचारा निघाला.

“ रोशनी, ठीक आहे. तुझी घरची परिस्थिती अशी आहे की तुला कोणतं न कोणतं काम हे करायलाच लागेल. तुला आवडत नसलं तरी. पण मग मिळालेलं काम आवडून घेतलंस तर सोपं होऊन जाईल, नाही का? ”

“ हो,मॅडम. स्वयंपाक करायला आवडतं मला. वेगवेगळ्या रेसिपी बनवून बघायला मज्जा येते. माझे पोहे, उपीट सगळ्यांनाच आवडतं ” रोशनी उत्तरली.

“ हो तर, स्वयंपाक तर आलाच पाहिजे प्रत्येकाला !” बाईंच्या या बोलण्यावर रोशनी गोड हसली.

“ पण हे असं वाढप्याचं काम किती दिवस करणार आहेस गं तू?” या प्रश्नावर मात्र ती गडबडून गेली.

“ माहित नाही बाई. पण शिक्षण पूर्ण होईपर्यंत तर करावंच लागेल !”तिने सांगितले.

बाई म्हणाल्या, ” हे बघ, आवडीच्या क्षेत्रात करीअर करायच्या खूप संधी आहेत आजकाल. तू केटरींगमध्ये जरी नीट लक्ष घातलंस ना तरी खूप चांगले पैसे मिळवू शकशील. पण आधी शिक्षण नीट पूर्ण कर बाई !” 

बाईंनी तास सुरू केला. त्या नेहमीच मुलींना भविष्याची स्वप्नं दाखवयच्या. त्या स्वत:सुद्धा गरीबीतून शिकल्या होत्या. त्यांच्या आई खानावळ चालवायच्या. त्यांनाही केटरिंगमध्ये गोडी होती. हॉटेल मॅनेजमेंट करायचं असं त्यांनाही शाळेत असताना कधीतरी वाटून गेलं होतं.

रोशनी दुस-या दिवशी शाळेत उशीराच पोहोचली, रात्री सर्व आवराआवरी करायला बराच उशीर झाला होता. “ मधल्या सुट्टीत मला स्टाफ रूममध्ये येऊन भेट,रोशनी !” मिरजकर बाईंनी रोशनीला असं म्हटल्यावर वर्गातल्या पोरींना वाटलं की आता रोशनीचं काही खरं नाही.

रोशनी मधल्या सुट्टीत स्टाफ रूमबाहेर घुटमळली आणि ते पाहून मिरजकर बाईच बाहेर आल्या आणि “ चल,हेडबाईंकडे !” म्हणत पुढे चालू लागल्या. ‘ आता हे काय वाढून ठेवलं असेल आपल्या पानात ‘ या विचाराने रोशनी हळूहळू हेडबाईंच्या खोलीकडे चालू लागली.

“ बाई,ही रोशनी माझ्या वर्गातली. हाताला खूप चव आहे हिच्या. आपल्या बारीक सारीक कार्यक्रमाचं केटरींग आपण हिला देऊयात का? ” मिरजकर बाई आणि हेडबाई यांच्यात यावर काही बोलणं झालं. त्यानंतर शाळेतल्या छोट्या समारंभांवेळी लागणारे खाद्यपदार्थ आणि रोशनी असं समीकरण होऊन गेलं. आणि मोठ्या जेवणाचं काम रोशनी ज्याच्याकडे कामाला जाते त्याच केटररला मिळालं…रोशनी आता त्याची मॅनेजर होती. मिरजकरबाईंच्या नातेवाईकांच्या घरच्या स्वयंपाकांची कामेही रोशनीला दिली जाऊ लागली.

हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी काय करायचं आणि कसं करायचं याची मिरजकर बाईंना माहिती होतीच.

……. 

आज रोशनीचं लग्न. सेवानिवृत्त झालेल्या मिरजकर बाईंना खास आणि आग्रहाचं आमंत्रण होतंच. त्याही त्यांच्या यजमानांना घेऊन गावावरून लग्नाला आल्या. जेवणाचा मोठा थाट होता. कधीकाळी त्याच्याकडे वाढपी म्हणून असलेल्या रोशनीच्या लग्नात केटररने स्वत:हून सर्व व्यवस्था केली होती. रोशनीचा स्वत:चा केटरींगचा छोटासा व्यवसाय सुरू होऊन बरीच वर्षे उलटून गेली होती…व्यवसाय प्रगतीपथावर होता. तिच्याकडे अनेक रोशनी काम करीत होत्या आणि रोशनी त्यांना कायम वाढपी राहू देणार नव्हती.

तिचे अनेक ग्राहक आज तिच्या लग्नातले खास आमंत्रित होते. तिच्या हॉटेल मॅनेजमेंटचा काही स्टाफही होता. मिरजकर बाई आणि त्यांचे यजमान पंगतीत बसले. वाढप सुरू झालं. मिरजकर बाई यजमानांशी बोलण्यात मग्न होत्या. त्यांच्या पानात मसालेभात वाढणारा हात त्यांना दिसला…मेहंदी लावलेला…हिरवा चुडा भरलेला…बोटात अंगठी असलेला ! रोशनी होती मसालेभाताचं भांडं हातात घेऊन, आणि सोबत तिचा नवरा !

“बाई, मागच्या वेळी वाढायचा राहून गेलेला मसालेभात आता वाढलाय !” 

कुणीतरी वदनी कवळ घेताचा गजर केला आणि मिरजकर बाईंनी आपल्या पानातील मसालेभाताचा एक छोटा घास रोशनीला भरवला !…… 

(नवरात्रीत अशा लढाऊ महिलांच्या कर्तृत्वाचं स्मरण म्हणून ही लेखमाला. यातील ही पाचवी माळ )

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print