मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “31 जुलै…” – श्री संदीप वेलणकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ “31 जुलै…” – श्री संदीप वेलणकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

३१ जुलै १९९५ रोजी भारतातील मोबाईल सेवा सुरू झाली, या गोष्टीला २८ वर्षे पूर्ण झाली. 

आज जरी प्रत्येकाच्या हातात मोबाइल दिसत असला तरी देशाच्या एकूण लोकसंख्येच्या २४ टक्के लोकांकडे मोबाईल फोन आहे. तर एकूण लोकसंख्येच्या २८ टक्के लोकच इंटरनेटचा वापर करत आहेत. 

ज्या कोलकात्यातून १६४ वर्षांपूर्वी पहिली तार पाठविण्यात आली होती त्याच कोलकात्यातून ३१ जुलै १९९५ रोजी पहिला मोबाईल कॉल लावण्यात आला, ही घटना ऐतिहासिक योगायोगाची. हा कॉल केला होता एका साम्यवादी नेत्याने. ज्योती बसू यांनी. ते तेव्हा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. मोबाइलचे जाळे देशात पहिल्यांदा कोठे अंथरले जाईल तर ते कोलकात्यामध्येच, हा त्यांचा हट्टाग्रह होता. ते सुरू झाले तेव्हा त्यांनी रायटर्स बिल्डींगमधून तेव्हाचे केंद्रीय दूरसंचारमंत्री सुखराम यांना पहिला मोबाईल फोन केला. 

भारतातील पहिली मोबाईल ऑपरेटर कंपनी मोदी टेल्स्ट्रा (आताची स्पाईस) होती. त्याच्या सेवेचे नाव मोबाईल नेट असे होते. व यासाठी नोकिया-२११० हा हॅंडसेट वापरला गेला होता. त्यावेळी फ़क्त मूलभूत सुविधा असलेला मोबाईल तब्बल २५ ते ४५ हजारांना होता. देशातील पहिला मोबाईल कॉल याच नेटवर्कवरून करण्यात आला होता.  मोदी टेल्स्ट्रा ही भारतातील मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियातील टेलिकॉम कंपनी टेल्स्ट्रा यांच्या भागिदारीतून निर्माण झाली होती. तेव्हा देशात एकूण ८ कंपन्या होत्या ज्या सेल्युलर सेवा देत होत्या. 

अन्य देशांच्या तुलनेत भारतात मोबाईल सेवा अधिक लोकांपर्यंत पोहचण्यास वेळ लागला. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे महाग कॉल दर होते.  सुरुवातीच्या काळात एका आऊटगोइंग कॉलसाठी प्रती मिनिटाला १६ रुपये मोजावे लागत.  आऊटगोईंग कॉल्स बरोबरच इनकमिंग कॉल्ससाठी देखील पैसे द्यावे लागत होते. 

जगाचा विचार केला तर पहिला मोबाईल कॉल मोटोरोलाचा कर्मचारी मार्टिन कुपर याने ३ एप्रिल १९७३ रोजी केला होता. भारतात मोबाईल फोन्स यायला ९०चे दशक उजाडावं लागलं होतं.

संदर्भ – इंटरनेट

लेखक : श्री संजीव वेलणकर

पुणे, मो ९४२२३०१७३३

संग्राहक : श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अन्नपूर्णा : दुर्गा भागवत… ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ अन्नपूर्णा : दुर्गा भागवत… ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

अन्न हे पूर्णब्रह्म

साधारण तीस वर्षांपूर्वी ‘कालनिर्णय’ दिनदर्शिकेने काढलेल्या ‘पाकनिर्णय’ या नावाच्या ,बक्षीसपात्र पाककृतींच्या  पुस्तकाला  विद्वान लेखिका, व्युत्पन्न संशोधक, नामवंत समाजशास्त्रज्ञ आणि पाककलानिपुण दुर्गाबाई भागवत यांची  व्यासंगी आणि प्रदीर्घ प्रस्तावना लाभली आहे. त्या सुंदर प्रस्तावनेचा हा परिचय आहे.

दुर्गाबाई लिहितात, ‘अन्नपूर्णेचे राज्य म्हणजे रूप, रस, गंध, स्पर्श यांनी भरगच्च भरलेले समृद्ध आणि रहस्यपूर्ण राज्य! रुचीचा भोक्ता अन्नाला ‘रसवती’ असे लाडके नाव देतो.

ज्याला आपण खातो ते आणि जे आपल्याला खाते ते अन्न’ असे वैदिक काळापासून माहित असलेले सत्यही त्यांनी इथे सांगितले आहे. अन्न हे पूर्णब्रह्म आहेच पण त्याचा अतिरेक माणसाला विनाशाकडे नेतो असा अमूल्य अर्थ त्यात आहे. या प्रस्तावनेत त्यांनी ‘रसवती’बद्दल मनोरंजक, वैविध्यपूर्ण माहिती दिली आहे. दुर्गाबाई लिहितात की, ‘शाकाहार अथवा मांसाहार कुठलाच आहार निषिद्ध नसतो… नसावा. मद्य घेणे ही तर मानवाची प्रकृतीच आहे.  बाणभट्टाने कदंबापासून बनविलेल्या मदिरेचे ‘कादंबरी’ हे नाव गंधर्व राजकन्येला देऊन त्या नावाला अमरत्व दिले.’

१९३८ च्या सुमारास मध्यप्रदेशच्या जंगलातून हिंडताना दुर्गाबाईंनी एकदा बिनभांड्यांचा स्वयंपाक केला. पळसाच्या पानावर कणिक भिजवून त्याचे चपटे गोळे केले. ते रानशेणीच्या अंगारात भाजले. त्यातच वांगी भाजली. भाजलेल्या वांग्यात मीठ घालून त्याचे भरीत केले. झाला बिनभांड्यांचा स्वयंपाक! दुर्गाबाई म्हणतात, मीठ ही अशी वस्तू आहे की एकदा तिची चव कळली की माणसाला ती सोडतच नाही. म्हणून तर श्रीकृष्णाने सत्यभामेला ‘तू मला मिठासारखी आवडतेस’ असे म्हटले आहे.

पुण्यश्लोक नळराजा हा सूपविद्याप्रवीण होता. त्याच्या नावावरील ‘नलपाकदर्पण’ हे संस्कृतमधील लहानसे पुस्तक भारतीय सूप विद्येतील मोलाचा आद्य ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात पिण्याचे पाणी शुद्ध कसे करावे, ते सुवासिक कसे करावे, बर्फ कसा दिवसच्या दिवस जपून ठेवावा ते सांगितले आहे. या ग्रंथात एक मिश्र शिकरण दिलेलं आहे. आंबा, फणस, केळी, संत्री, द्राक्षे वगैरे फळांच्या फोडी करून त्यात नारळाचा रस, गूळ आणि खायचा कापूर घालून करायची ही शिकरण उत्तम लागते असा स्वानुभव दुर्गाबाईंनी सांगितला आहे.

अकबरच्या काळी अबुल फजलने लिहिलेल्या ‘ऐने अकबरी’त २६ शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची नावे व कृती दिली आहे. यात गव्हाच्या चिकाचा हलवा दिला आहे. फा हियान या पहिल्या चिनी प्रवाशाने उत्तर भारतातल्या अनेक पाककृतींचे वर्णन केले आहे. त्यात त्याने कांद्याच्या भज्यांची फार स्तुती केली आहे.

‘भोजन कुतूहल’ या नावाचा ग्रंथ रघुनाथ गणेश नवाथे उर्फ नवहस्ते या रामदासांच्या शिष्याने सतराव्या शतकात लिहिला. रामदासांच्या आज्ञेप्रमाणे तो तंजावरला स्थायिक झाला होता. जिलेबीची कृती देणारा हा पहिलाच ग्रंथ आहे. जिलेबीला ‘कुंडलिका’ असा शब्द त्याने वापरला आहे. मडक्याला आतून आंबट दही चोपडून मग मैदा व तूप एकत्र करून, मडक्यात घालून हाताने घोळून मडके उन्हात ठेवावे. आंबल्यावर कुंडलिका पाडून तुपात तळून साखरेच्या पाकात टाकाव्यात अशी कृती लिहिली आहे.

या ग्रंथात इडली हा शब्द नाही पण कृती आहे. दुर्गाबाई लिहितात की, जात व प्रांत यांची वैशिष्ट्ये, त्या त्या भागात मिळणारे पदार्थ आणि त्यांचा अन्नात केलेला वापर यामुळे तेच पदार्थ वेगवेगळ्या चवीचे बनतात. भोपाळच्या रानभागात प्रवास करताना तिथल्या स्त्रिया उडदाचे पापड पिवळे व लज्जतदार होण्यासाठी मेथीची पुरचुंडी पाण्यात रात्रभर भिजवून ठेवून त्या पाण्यात पापडाचे पीठ भिजवतात असे त्यांनी पाहिले.

दुर्गाबाईंनी माणूस प्राथमिक अवस्थेत पदार्थ बनवायला कसा शिकला याची दोन मनोरंजक उदाहरणे दिली आहेत .दक्षिणेच्या जंगलात अस्वले कवठाचे ढीग गोळा करतात. त्यातील पिकलेली कवठे पायांनी फोडून त्यात मध व सुवासिक फुले घालून ती पायांनी कुटून त्याचा लगदा करतात तेच अस्वली पंचामृत.

माणसाने वानराकडून डिंकाचे लाडू उचलले. गंगेच्या एका बेटावर माकडीण व्याली की नर डिंक गोळा करतो. त्यात बदाम वगैरे घालून गोळे करतो. शिकारी लोक वानरांचे लाडू, अस्वलांचे पंचामृत पळवतात असेही त्यांनी लिहिले आहे.

कुड्याच्या फुलांची थोडे पीठ लावून केलेली ओलसर भाजी फार सुवासिक होते व पोटालाही चांगली असते. शेवग्याच्या शेंगा व पिकलेल्या काजूच्या फळांचे तुकडे यांची खोबरे, वाटलेली मोहरी व मिरच्या घालून केलेली भाजी अगदी उत्तम होते पण फारच क्वचित केली जाते. दुर्गाबाईंनी जायफळाच्या फळांचे लिंबाच्या लोणच्यासारखे लोणचे बनविले. त्याच्या पातळ साली कढीत, सांबारात घातल्या.तसेच त्या फळांच्या गराचा उत्तम चवीचा जॅम बनविला.

१९७४ साली काश्मीरच्या जंगलात फिरताना दुर्गाबाईंना तिथल्या गुजर बाईने चहाबरोबर सकाळीच केलेली मक्याची थंड, पातळ, पिवळसर, खुसखुशीत भाकरी दिली. त्या बाईने सांगितले की, मक्याच्या पिठात थोडेसे लोणी घालून खूप मळायचे आणि हातावर भाकरी फिरवून ती मातीच्या तव्यावर टाकायची. दुर्गाबाई लिहितात की, हातावरची भाकरी आणि तुकड्यांची गोधडी या दोन वस्तू म्हणजे भारतभरच्या सर्व प्रांतातल्या गरीब, अशिक्षित स्त्रियांनी दिलेल्या अत्यंत मौल्यवान देणग्या आहेत. कौशल्य आणि कारागिरी असणाऱ्या या दोन गोष्टींनी भारताचे सांस्कृतिक ऐक्य शाबूत ठेवले आहे.

भारतीय पाकशास्त्र हा विषय अफाट व आगाध आहे. अनादी अनंत आहे. दुर्गाबाई म्हणतात, घरोघरीच्या अन्नपूर्णांचा हा कधीही नष्ट न होणारा वसा आहे.

अनेक विषयात कुतूहल आणि रुची असलेल्या दुर्गाबाईंनी पाकशास्त्राविषयी खूप मनोरंजक माहिती दिली आहे . दुर्गाबाईंमधील अन्नपूर्णेला आदराने नमस्कार.🙏

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अस्ताला न जाणारा सूर्य… नारायण गंगाराम सुर्वे” ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? इंद्रधनुष्य ?

☆ “अस्ताला न जाणारा सूर्य… नारायण गंगाराम सुर्वे” ☆ श्री कचरू चांभारे ☆

१६ ऑगस्ट …. कविवर्य शब्दसूर्य नारायण गंगाराम सुर्वे यांचा स्मृतिदिन. 

गिरणी कामगारांची व्यथा ,वेदना नारायण सुर्वे यांनी दाहकपणे शब्दबद्ध केली. त्यांची कविता म्हणजे कामगारांच्या मनातली खदखद आहे.

रस्त्याच्या कडेला पडलेलं अनाथ बाळ ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा नारायण सुर्वेंचा प्रवास रोमांचकारी आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी आपणास त्यांच्या ‘ ऐसा गा मी ब्रम्ह ‘या काव्यसंग्रहाचा परिचय करून देत आहे.

नारायण सुर्वे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या लेखनातील वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी जे जगलं ,पाहिलं ,अनुभवलं तेच मांडलं. अण्णाभाऊ गद्यातून बोलले अन् नारायण सुर्वे पद्यातून बोलले. कविवर्य सुर्वे यांच्या 

स्मृतिदिनानिमित्त आपण ‘ ऐसा गा मी ब्रम्ह ‘ ची चर्चा करू. या कविता संग्रहात कामगाराचे वर्णन, आईविषयी कृतज्ञतेची कविता व प्रेमकाव्यही आहे. या कवितासंग्रहातील जवळपास सर्वच कविता कोणत्या ना कोणत्या वर्गाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या आहेत किंवा येऊन गेलेल्या आहेत हे विशेषत्वाने सांगायला हवे. 

कामगाराची प्रीतभावना व्यक्त करताना ‘क्षण माघारी गेले‘ या कवितेत कवी सुर्वे म्हणतात ….. 

मलाही वाटते तिला हात धरून न्यावे

निळ्या सागराच्या कुशीत बिलगून बसावे 

विसरावे तिने अन् मीही भोगलेले दुःख

एकमेकां खेटून सारस जोडीने उडावे. 

रात्र संपूच नये अधिकच देखणी व्हावी 

झाडे असूनही नसल्यागत मला भासावी 

तिची रेशीम कुरळबटा गाली झुळझुळावी 

माझ्या बाहूत पडून स्वप्ने तिने पाहावी… 

शब्दांचे ईश्वर‘ या कवितेत कवी, कवी झाल्याची खंत व आनंद अशा दोन्ही भावना व्यक्त करतो.

कवी नसतो झालो तर… असे म्हणताना कवी सुर्वे लिहितात… 

कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते

निदान देणेक-यांचे तगादे तरी चुकविता आले असते… 

… याच कवितेच्या शेवटी कवी म्हणतो ‘ आम्ही कवी झालो नसतो तर तुमचे दुःख कोणी मांडले असते ? बापहो, तुमच्या वेदनांना अमर कोणी केले असते ? ‘ या ओळीत कवीची सामान्य जनांच्या वेदनेविषयी तळमळ दिसून येते.

तोवर तुला मला‘ या कवितेतून कवीने प्रचंड आशावाद व्यक्त केलेला आहे. कवी म्हणतो ….. 

याच वसतीतून आपला सूर्य वर येईल 

तोवर मला गातच राहिले पाहिजे.

नगर वेशीत अडखळतील ऋतू 

तोवर प्रिये जगत राहिले पाहिजे… 

दोन दिवस‘ या प्रसिद्ध कवितेत जगण्याची भ्रांत मांडलेली आहे…… 

दोन दिवस वाट पाहण्यात गेले ;दोन दुःखात गेले 

हिशेब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे 

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली 

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली… 

… जगण्याची दाहकता वरील  कवितेत आहे. 

ऐसा गा मी ब्रम्ह‘ या कवितासंग्रहातील प्रत्येक कविता मनाला चटका लावणारी आहे.

कवी नारायण सुर्वेंविषयी थोडसे …. 

माझे विद्यापीठ ,जाहीरनामा, सनद असे एकाहून एक सरस कवितासंग्रह देणारे नारायण सुर्वे यांची जीवनकथा म्हणजे अक्षरशः चित्तरकथा आहे.

१५ आॕक्टोबर १९२६ ची पहाट होती. मुंबईतल्या लोकांना पहाट ही आकाशाच्या रंगावरून न दिसता हातातल्या घड्याळाच्या वेळेवरूनच ओळखू येते. वुलन मिलमध्ये काम करणारं एक जोडपं गंगाराम कुशाजी सुर्वे व सौ.काशीबाई रोजच्याप्रमाणे कामाला चाललं होतं. पहाटेच्या शांत वातावरणाला  चिरून टाकणारा लहान लेकराचा टाहो, शेजारच्या उकांडासदृश्य कचराकुंडीतून त्या जोडप्याच्या कानी येतो. कारण काही का असेना पण मूल नको असलेल्या कुणीतरी तो मुलगा असलेला कोवळा जीव अंधारगर्भात रस्त्याच्या कडेला फेकला होता. गंगाराम-काशीबाईने ते मूल घरी आणलं .त्यांचे घर आधीही लेकुरवाळे होते. घरात खाणारी तोंडे खूप. पण मातृत्वाच्या ममतेने त्यांनी अजून एक तोंड घरात वाढवलं होतं.हे लहानगं बाळ म्हणजेच नारायण सुर्वे होत. 

तिसरीपर्यंत शिकलेले नारायण गरीबीमुळे पुढे शिक्षण घेऊ शकले नाहीत. ते ही नंतर वुलन मिलमध्येच कामगार म्हणून रूजू होतात. लिहिण्याची व वाचण्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अनेक यशस्वी स्त्रियांमागे पुरूष उभा असल्याचं आपण वाचले आहे ,ऐकले आहे. पण नारायण सुर्वे याला अपवाद आहेत. त्यांच्या पाठीशी त्यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे खंबीरपणे उभ्या राहिल्या म्हणूनच नारायण सुर्वे घडले. या कृष्णामाईसुद्धा एका अर्थाने अनाथच होत्या. फरक एवढाच होता की नारायणरावाच्या ख-या आईवडीलांचा मागमुस दुनियेस नाही व कृष्णामाईच्या आईवडिलांनी ही दुनिया अकाली सोडलेली होती. यासाठी कृष्णाबाई लिखित ‘ मास्तरांची सावली ‘ ही त्यांची आत्मकथा वाचायला हवी. रोजंदारीमुळे शिक्षण सोडलेल्या नारायणरावास सातवी ,जुने डी.एड्. कृष्णाबाईनेच बळेबळेच करायला लावले. त्यामुळेच जिथं शिपाई म्हणून काम केले ,तिथंच नारायण सुर्वेंना अध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पुस्तक लिहिणं व प्रकाशित करणं खर्चिक आहे म्हणून कविवर्य सुर्वे ग्रंथ निर्मितीकडे वळतच नसत. कृष्णाबाईने स्वतःचे मंगळसूत्र मोडून आलेल्या पाचशे रूपयातून ‘ ऐसा गा मी ब्रह्म ‘ लिहून प्रसिद्ध करायला लावले. कृष्णाबाई सुमारे एक वर्षभर बिना मंगळसूत्राच्या होत्या. चाळीतल्या बायाबापड्यांचे टोमणे त्या खातच होत्या, पण एका सधवा स्त्रीला मंगळसूत्र गळ्यात नसल्याची किती वेदना वाटत असेल ? याची कल्पना एक स्त्रीच करू शकते. पुढे बरोबर वर्षभराने ‘ऐसा गा मी ब्रम्ह’ला शासनाचा पुरस्कार मिळाला व पुरस्कारापोटी मिळालेल्या हजार रूपयातून नारायण सुर्वेंनी कृष्णाबाईस मंगळसूत्र व कानातले करून आणले.

रस्त्याच्या कडेला सापडलेलं अनौरस बाळ ,त्या बाळाचा गंगाराम-काशीबाईने केलेला सांभाळ ,गंगाराम सुर्वेंनी दिलेले स्वतःचे नाव ,कृष्णाबाईची भक्कम साथ …  यामुळे जे मराठीतलं अलौकिक सारस्वत उभं राहिलं, त्या सारस्वत सूर्याचं नाव म्हणजे शब्दसूर्य नारायण गंगाराम सुर्वे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित व ज्यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो ,अशी उंची या सारस्वताने निर्माण केली .हाच शब्दसूर्य १९९५ साली परभणी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होता.

… आणि हो ,आनंदाने सांगावेसे वाटते …..  हा सूर्य मी दोनदा जवळून पाहिला होता. 

या शब्दसूर्यास स्मृतिदिनी विनम्र अभिवादन….. 

© श्री कचरू चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्त्री .. एक सिस्टिम… ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ स्त्री .. एक सिस्टिम… ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का ?

– भारतातल्या घराघरात जे सकाळ-दुपार-संध्याकाळ, सोमवार ते रविवार, रोज-रोज, वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी – भाजी – वरण – भात – कोशिंबीर – चटणी – उसळ वगैरे वगैरे, आणि लाडू – चिवडे – मिठाया – पक्वान्न वगैरे वगैरे घडत असतं ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का? 

– फोडणीला तेल किती घेऊ, मोहरी किती, हिंग किती, हळद किती? तेल तापले ते कसं ओळखायचं?

– गॅस किती मोठा, किती लहान, केव्हा कमी – जास्त करायचा, पदार्थ उलथन्याने किती हलवायचा, उलथनं की डाव, का झारा? कढई का पातेलं? 

– पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं?

– एका वेळी ४ पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं?

– ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थाचं नियोजन कसं करायचं?

– प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा, खरकटं, चिकटपणा आवरता कसा घ्यायचा?

– दूध तापत असताना, कुकर शिजत असताना, तेल गरम होत असताना, आपलाच चहा थोडा गार होत असताना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत बाजूला चार भांडी घासणे, एखादी भाजी चिरणे, एखादी यादी करणे, एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणे (किंवा गदागदा हलवून येणे) हा वेळेचा हिशोब कसा करायचा?

– मीठ, तिखट, साखर किती घालायचं?

– पोळी/चपाती/फुलका/पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार, आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार आणि जाडी याची सांगड कशी घालायची?

– उरलेल्या अन्नाचं काय करायचं?

– वातावरण/ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील याचा अंदाज कसा बांधायचा?

किती गोष्टी असतात स्वयंपाक म्हटलं की?

मग लक्षात आलं की आपल्याला फक्त स्वयंपाक नाही तर स्वयंपाकघराचं नियोजन ही शिकायला लागणार आहे  बुद्धिमत्ता, हुशारी याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो महत्त्वाचा गुण म्हणजे 

Involvement…. उगीच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो, स्वयंपाकघर चालत नसतं. 

गणित आणि विज्ञान या माणसाने शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्यात तरबेज होणाऱ्यांना हुषार म्हणणारी आपण माणसं ….  

….. प्रसंगी पूर्ण अशिक्षित असूनही  स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तम हाताळणाऱ्या बायकांच्या  हुशारीला आपण दाद किती वेळा देतो?

निसर्गाने दिलेली अंगभूत हुषारी आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते, पण आपण डिग्री, मार्क, इंग्लिश येणे, असली मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण कानाडोळा करत असतो. 

एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत याची स्वतःला जाणीव करून द्यावी. 

… किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे त्या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड complicated गोष्टींकडे बघावं, दिवसात किमान तीन वेळा मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं मोल ओळखावं. 

खाण्यापूर्वी, दिवसातुन एकदा तरी, निसर्गाने आपल्या घराला सढळहस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेचे आभार मानावेत..

संग्राहिका :  स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा १७ ते २२ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा १७ ते २२— म राठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ३० (इंद्र, अश्विनीकुमार, उषासूक्त)

देवता – १-१६ इंद्र; १७-१९ अश्विनीकुमार; २०-२२ उषा – ऋषी – शुनःशेप आजीगर्ति

 ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तिसाव्या  सूक्तात एकंदर बावीस ऋचा आहेत. या सूक्तात शुनःशेप आजीगर्ति या ऋषींनी इंद्र, अश्विनीकुमार आणि उषा या देवतांना आवाहन केलेली असल्याने हे इंद्र-अश्विनीकुमार-उषासूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिल्या  सोळा ऋचा इंद्राला, सतरा ते एकोणीस  या ऋचा अश्विनिकुमारांना आणि वीस ते बावीस या  ऋचा उषा देवातेला  आवाहन करतात.

या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार  गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी अश्विनीकुमार देवतांना उद्देशून रचलेल्या सतरा ते एकोणीस या ऋचा आणि उषादेवतेला उद्देशून रचलेल्या वीस ते बावीस या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद ::

आश्वि॑ना॒वश्वा॑वत्ये॒षा या॑तं॒ शवी॑रया । गोम॑द्दस्रा॒ हिर॑ण्यवत् ॥ १७ ॥

 अश्वधनुंच्या संगे घेउनी पशुधनाला या

सुंदरशा हे अश्विन देवा आम्हा आशिष द्या

प्रसन्न होऊनी अमुच्यावरती दान आम्हा द्यावे

वैभवात त्या सुवर्ण धेनू भरभरुनी द्यावे ||१७||

स॒मा॒नयो॑जनो॒ हि वां॒ रथो॑ दस्रा॒वम॑र्त्यः । स॒मु॒द्रे अ॑श्वि॒नेय॑ते ॥ १८ ॥

 देवा अश्विनी उभयता तुम्ही राजबिंडे

अविनाशी तुमच्या शकटाला दिव्य असे घोडे

तुम्हा रथाचे सामर्थ्य असे अतीव बलवान

सहजी करितो सागरातही तुमच्यासाठी गमन ||१८||

न्य१घ्न्यस्य॑ मू॒र्धनि॑ च॒क्रं रथ॑स्य येमथुः । परि॒ द्याम॒न्यदी॑यते ॥ १९ ॥

 अजस्त्र अतुल्य ऐशी कीर्ति तुमच्या शकटाची

व्याप्ती त्याची त्रय लोकांना व्यापुनि टाकायाची

अभेद्य नग शिखरावरती चक्र एक भिडविले

द्युलोकाच्या भवती दुसऱ्या चक्राला फिरविले ||१९||

कस्त॑ उषः कधप्रिये भु॒जे मर्तो॑ अमर्त्ये । कं न॑क्षसे विभावरि ॥ २० ॥

 स्तुतिप्रिये हे अमर देवते सौंदर्याची खाण

उषादेवते  सर्वप्रिये तू देदीप्यमान 

कथन करी गे कोणासाठी तुझे आगमन

भाग्य कुणाच्या भाळी लिहिले तुझे बाहुबंधन ||२०||

 व॒यं हि ते॒ अम॑न्म॒ह्यान्ता॒दा प॑रा॒कात् । अश्वे॒ न चि॑त्रे अरुषि ॥ २१ ॥

 विविधरंगी वारू सम तू शोभायमान

तेजाने झळकिशी उषादेवी प्रकाशमान

सन्निध अथवा दूर असो तुझे आम्हा ध्यान

येई झडकरी आम्हासाठी होऊनिया प्रसन्न ||२१||

 त्वं त्येभि॒रा ग॑हि॒ वाजे॑भिर्दुहितर्दिवः । अ॒स्मे र॒यिं नि धा॑रय ॥ २२ ॥

 सामर्थ्याने सर्व आपुल्या ये करि आगमन

उषादेवते आकाशाच्या कन्ये आवाहन

संगे अपुल्या घेउनी येई वैभवपूर्ण धन

दान देई गे होऊनिया आमुच्यावरी प्रसन्न ||२२||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.) 

https://youtu.be/ifGvMF3OiTs

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 30 Rucha 17 to 22

Rugved Mandal 1 Sukta 30 Rucha 17 to 22

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “हरवलेल्या इतिहासाचे आश्चर्यकारक तपशील – झाशीची राणी लक्ष्मीबाई” – लेखक – श्री योगेश अरुण ☆ प्रस्तुती – श्री सदानंद  कवीश्वर☆

श्री सदानंद  कवीश्वर

? इंद्रधनुष्य ?

☆ “हरवलेल्या इतिहासाचे आश्चर्यकारक तपशील – झाशीची राणी लक्ष्मीबाई” – लेखक – श्री योगेश अरुण ☆ प्रस्तुती – श्री सदानंद  कवीश्वर

राणी लक्ष्मीबाईचा ८ वर्षांचा मुलगा दामोदरराव यांच्या पाठीवर कापड बांधून घोड्यावर स्वार होऊन ब्रिटीशांशी लढतानाची राणीची प्रतिमा प्रत्येकाच्या मनात कोरलेली आहे.

दाची गोष्ट म्हणजे, स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला नाही, की ‘ लक्ष्मीबाईंच्या हौतात्म्यानंतर झाशीच्या अल्पवयीन राजपुत्राचे काय झाले ?’

राणीचा मुलगा दामोदरराव आणि त्याच्या पुढच्या ५ पिढ्या इंदूरमध्ये निनावी जीवन जगल्या, ते अहिल्या नगरी राहिले, हे केवळ मोजक्याच लोकांना माहीत आहे.

कोणतीही सरकारी किंवा सार्वजनिक मदत न मिळाल्याने, राणीच्या वंशजांच्या पहिल्या दोन पिढ्यांनी आपले जीवन अत्यंत गरिबीत आणि भाड्याच्या घरात घालवले.   त्यांना शोधण्यासाठी कधीही, कोणीही प्रयत्न केले नाहीत.

खरेतर, राणीचे वंशज २०२१ पर्यंत शहरात राहिले होते. नंतर ते नागपुरात स्थलांतरित झाले, जिथे सहाव्या पिढीतील वंशज आता एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात आणि निनावी जीवन जगणे पसंत करतात.  झांशीवाले हे बिरूद त्यांच्या नावावर जोडून त्यांनी झाशीशी असलेला संबंध आजही जिवंत ठेवला आहे.

लेखक : सॉफ्टवेअर अभियंता योगेश अरुण

प्रस्तुती : सदानंद कवीश्वर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

१६ ऑगस्ट….  भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी …. त्यानिमित्ताने …….. 

अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणातलं एक निर्मळ आणि शुद्ध व्यक्तिमत्व. धर्म, जातपात, भाषा आदींच्या पलीकडे खऱ्या अर्थाने जाऊन अटलजींनी काम केले. राजकारणात ४५ वर्षे घालवून सुद्धा त्यांचे विरोधक देखील एकही आरोप त्यांच्यावर करू शकले नाहीत….. 

मेणाहूनि मऊ आम्ही विष्णुदास, 

कठीण वज्रास भेदू ऐसे. 

भले तरी देऊ कासेची लंगोटी, 

नाठाळाचे माथी हाणू काठी. 

… या तुकाराम महाराजांच्या उक्ती अटलजींच्या व्यक्तिमत्वाचं सार्थ वर्णन करतात. त्यांच्या या स्वभावाचे आणि निष्कलंक चारित्र्याचे मूळ त्यांच्यावर बालपणी झालेल्या सुसंस्कारात आहे. ग्वाल्हेर येथे त्यांचे शिक्षण झाले असले तरी उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बटेश्वर हे त्यांचे मूळ गाव. याच ठिकाणी त्यांचे आजोबा आणि पणजोबा राहत होते. त्यांचे आजोबा आणि पणजोबा हे अत्यंत विद्वान आणि धार्मिक होते. त्याच संस्कारात अटलजींचे वडील कृष्णबिहारी वाढले.अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. कवी, लेखक, पत्रकार, राजकीय नेते असंअष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या अटलजींचा एका छोट्या राजकीय कार्यकर्त्यापासून ते पंतप्रधानपदापर्यंतचा झालेला प्रवास  थक्क करणारा आहे. कृष्णबिहारी संस्कृत,हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांचे उत्तम जाणकार तर होतेच, पण ते प्रख्यात कवीही होते. त्यांचेच काव्यगुण जणू वारशाच्या रूपाने अटलजींमध्ये उतरले. कृष्णबिहारी हे व्यवसायाने शिक्षक होते. त्यांच्या करड्या नजरेखाली अटलजींचे बालपण गेले. 

अटलजींच्या कवितांचं जेव्हा जेव्हा कौतुक केलं जाई, तेव्हा तेव्हा ते त्याचं सारं श्रेय आपल्या वडलांना देत असत. त्यांच्यापुढे मी काहीच नाही असे ते म्हणायचे. अटलजींचं नावही मोठं अर्थपूर्ण आहे. अटलबिहारी या नावातच विरोधाभास आहे. अटल म्हणजे न ढळणारा आणि बिहारी म्हणजे स्थिर नसलेला किंवा भ्रमण करणारा. राजकारणाच्या क्षेत्रातला हा अढळ तारा होता, आणि साहित्याच्या प्रातांत सतत मुशाफिरी करणारे हे व्यक्तिमत्व होते. अटलजींच्या बालपणीच्या आठवणी या त्यांच्या निसर्गरम्य आणि धार्मिक परंपरा लाभलेल्या छोट्याशा बटेश्वर गावाशी निगडित आहेत. आपल्या बालपणीच्या आठवणी जागवताना ते तेथील वातावरणाचा अतिशय रम्य उल्लेख करतात. ‘आओ मनकी गाठे खोले’ या कवितेत ते म्हणतात, 

यमुना तट, टिले रेतीले 

घास फूस का घर डाँडे पर,

गोबर से लीपे आँगन मे, 

तुलसी का बिरवा, घंटी स्वर 

माँ के मुहसे रामायणके दोहे- चौपाई रस घोले !

आओ मनकी गाठे खोले !

अटलजींच्या कवितेत तेथील वातावरण खऱ्या अर्थाने जिवंत होते. वडिलांच्या काव्यगुणांचा वारसा अशा रीतीने त्यांच्याकडे आला. अटलजींना तीन भाऊ आणि तीन बहिणी. त्यांची आई अत्यंत धार्मिक वृत्तीची आणि साध्या स्वभावाची गृहिणी होती. मात्र ती सुगरणही होती. आईच्या हातचे पदार्थ खायला अटलजींना अतिशय आवडत. अटलजी निरनिराळया खाद्यपदार्थांचे चाहते होते. पण तरीही आईच्या हाताची चव त्यांना सगळ्यात जास्त आवडणारी होती. अटलजींचे पुढील शिक्षण ग्वाल्हेरला झाले. ग्वाल्हेरच्या बारा गोरखी येथील गोरखी गावी सरकारी उच्चमाध्यमिक शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले त्यानंतरचे शिक्षण घेण्याकरीता ग्वाल्हेर  मधील व्हिक्टोरिया काॅलेज (आताचे लक्ष्मीबाई काॅलेज) मधे प्रवेश घेतला. हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत विषयांमधे विशेष प्राविण्याने ते उत्तीर्ण झाले.याच सुमारास समर्पित संघ प्रचारक नारायणराव तरटे यांच्या संपर्कात ते आले आणि त्यांच्या प्रेरणेतून अटलजी संघकार्याशी जोडले गेले ते कायमचेच. नारायणराव तरटे हे अटलजींपेक्षा वयाने फार मोठे नव्हते. पण तरीही या दोघांचे गुरुशिष्याचे नाते अलौकिक असे होते. अटलजी त्यांना मामू म्हणत. याच नारायणरावांना अटलजी एक दिवस भारताचे पंतप्रधान होतील असा विश्वास होता. 

नारायणराव यांना अटलजी यांनी षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्ताने एक पत्र पाठवले होते. अतिशय सुंदर अशा या पत्रात अटलजींनी आपले जीवन कसे असावे याचे फार सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात ‘ बम्बई से प्रकाशित नवनीत ने दिवाली अंक के लिये पूछा था की मेरी मनोकामना क्या है ! पता नही आपके बौद्धिक वर्ग के भाव मुझे कैसे स्मरण आ  गये और मैने कह दिया : हसते हसते मरना और मरते मरते हसना यही मेरी मनोकामना है. ‘

य दरम्यान अटलजींवरील संघकार्याच्या जबाबदाऱ्या वाढू लागल्या होत्या. ते एक उत्तम वक्ता आणि कवी म्हणून देखील नावारूपास येत होते.  याच कालावधीत त्यांनी लिहिलेली ‘ हिंदू तनमन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय ‘ ही कविता सगळ्या संघ स्वयंसेवकांना इतकी स्फूर्तिदायक वाटली की ती सर्वत्र म्हटली जाऊ लागली. ते जिथे जात तिथे त्यांना ही कविता म्हणण्याचा आग्रह होऊ लागला. बरेचदा अटलजी संघ कार्यासाठी कॉलेजचे तास बुडवून जात. हे जेव्हा त्यांच्या वडिलांना कळे तेव्हा वडील रागावत. अटलजी त्यांना म्हणत तुम्ही माझे मार्क्स बघा, मग बोला. आणि खरंच अटलजी संघ कार्यासाठी वेळ देऊनही अभ्यासात कुठेही मागे पडत नसत. 

(त्यांच्यावरील हा लेख माझ्या अष्टदीप या पुस्तकातून. या पुस्तकाला तितिक्षा इंटरनॅशनल या संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच मिळाला आहे.)

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आपला तिरंगा 🇮🇳 आपला अभिमान” … ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “आपला तिरंगा 🇮🇳 आपला अभिमान” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

आपल्या देशात दोन प्रमुख राष्ट्रीय दिन साजरे केले जातात. 

१) भारतीय स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट. 

२) भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी.

या दोन्ही दिवशी आपण झेंडावंदन करतो. उंच आकाशात झेंडा फडकवून त्याकडे पाहत असताना आपला ऊर अभिमानाने भरून येतो. परंतु या दोन दिवशी झेंडा फडकविण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे हे किती जणांना माहिती आहे ?

१५ ऑगस्ट रोजी झेंडा फडकवण्याच्या पद्धतीला ध्वजारोहण असे म्हणतात.

इंग्लिशमध्ये फ्लॅग हॉईस्टिंग (Flag Hoisting) असे म्हणतात, परंतु अनेक जण त्याचा उच्चार फ्लॅग होस्टिंग असा करतात. त्या दोन्हीही शब्दांच्या उच्चारामुळे अर्थात जमीन अस्मानाचा फरक पडतो. फ्लॅग हॉईस्टिंग म्हणजे ध्वजारोहण.

आता याला ‘ध्वजारोहण‘ का म्हणतात हे पाहू. १५ ऑगस्ट रोजी आपला देश स्वतंत्र झाला. म्हणजे आधी तो पारतंत्र्यात होता. त्यामुळे त्या दिवशी झेंडा हा ध्वजस्तंभाच्या मध्यभागी अथवा मध्याच्या खाली फोल्ड करून ठेवलेला असतो. १५ ऑगस्टच्या सकाळी तो झेंडा खालून वरच्या टोकापर्यंत चढविला जातो आणि त्यानंतर तो फडकविला जातो. याचा अर्थ असा आहे की आधी हा झेंडा आकाशात नव्हताच आपण पारतंत्र्यात होतो. स्वातंत्र्य मिळाल्यामुळे प्रत्यक्ष आकाशामध्ये असलेला ब्रिटिशांचा झेंडा खाली उतरवून आपला झेंडा वरती चढविला गेला आणि आपल्या झेंड्याचा मान सर्वोच्च झाला. 

२६ जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन, म्हणजे आपला देश स्वतंत्र होताच. फक्त तो प्रजासत्ताक झाला. त्यामुळे या दिवशी झेंडा आधीच ध्वजस्तंभाच्या वरच्या टोकाला घडीबंद करून चढवलेला असतो. फक्त खालून दोरी ओढून तो आकाशात फडकविला जातो. आपला तिरंगा हा आपल्या देशात सर्वोच्च मानाचा झेंडा असून प्रजेमधील प्रत्येकाला त्याकडे अभिमानाने मान उंच करून पाहता यावे म्हणून तो वरती टोकावर असलेला झेंडा फक्त फडकावला जातो. त्याला इंग्लिश मध्ये फ्लॅग अनफरलिंग (Flag Unfurling) असे म्हणतात.

आणखी एक फरक म्हणजे, १५ ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात, तर २६ जानेवारीला फक्त दोरी ओढून राष्ट्रपती तो फडकवतात. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, तेव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच नव्हते हे याचे कारण असावे. 

१५ ऑगस्टला ‘ लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते, तर २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर … राजपथावर झेंडा फडकावला जातो, हा आणखी एक फरक. 

दोन्ही दिवशी ध्वजस्तंभावर झेंडा फडकवण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धतीतला फरक प्रत्येक भारतीयाने जाणून घेणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. जय हिंद ! 

स्वातंत्र्य दिनाचा विजय असो !!

भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो !!!

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ न केलेल्या पापाचे धनी? – भाग-2 ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

न केलेल्या पापाचे धनी? – भाग – 2 ☆ श्री संदीप काळे ☆

(आई, वडील, बहीण या सगळ्यांना मी मुकलो होतो. आता असे वाटते, ही शिक्षा संपूच नाही. आपण इथेच संपून जावे. एवढे सारे कमावले होते, ते एका क्षणात संपवले.’’) – इथून पुढे. 

आपल्या कुटुंबाच्या आठवणी सांगत लक्ष्मण यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बाजूला बसलेली त्यांची दोन्ही मुले ही वाघासारख्या बापाला रडताना पाहून भावुक झाले होते. स्वतःला सावरत लक्ष्मण म्हणाले, ‘‘आम्हाला शिक्षा झाली, आम्ही जेलमध्ये आलो. तेव्हा आम्ही बदला घेण्याची भाषा करत होतो. जसजसे दिवस जायला लागले, तसतसे कळायला लागले की कुणाचा बदला घ्यायचा, कशासाठी, ही आपलीच माणसे. आपण लहान होऊ, मोठ्या मनाने पुढे जाऊ. 

हे सारे बळ इथल्या वातावरणाने दिले. आम्ही इथे नामस्मरणाला लागलो. ध्यान करतो, योगा करतो, ग्रंथ वाचतो, यातूनच माणसाकडे पाहण्याची नजर मिळाली.’’ गळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळावर अष्टगंध, अबीर-बुक्का, डोक्यावर टोपी आणि सतत चांगले बोलणे अशी लक्ष्मण यांची भावमुद्रा होती. बाप तशी मुलेही.

आमच्या बाजूला असलेले संतोष शेळके, अजय गव्हाणे, प्रमोद कांबळे हे तिघेजण विनयभंगाच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये होते. काय तर त्यांनी एका महिलेकडे पाहिले म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली. 

सोबत जे दोन पोलिस होते त्यामधले एकजण सांगत होते, विनयभंग आणि पोक्सो या दोन प्रकरणांमध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. 

आम्ही जेलमध्ये फेरफटका मारत कैद्यांशी बोलत होतो. एक जण ज्ञानेश्वरी वाचत बसले होते. आम्ही जाताच त्यांनी त्यांचे वाचन थांबवले. मला दोन्ही हात जोडत नमस्कार केला आणि म्हणाले, ‘‘बोला माऊली, काय म्हणताय.’’ आम्ही बसलो आणि एकमेकांशी बोलत होतो.   

माझ्यासोबतचे पोलिस सहकारी जांभया देत होते. ते ज्ञानेश्वरी वाचणारे म्हणाले, ‘‘काय माऊली, भूक लागली की काय?’’ 

ते पोलिस म्हणाले, ‘‘होय, आता जेवणाची वेळ झाली आहे ना?’’ 

जे ज्ञानेश्वरी वाचत होते. त्यांचे नाव सचिन सावंत. सचिन बीडचे, त्यांनी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी, तिन्ही मुलींना, पत्नीला खल्लास केले. स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात ते वाचले. मुलीच्या रूपाने असलेला वंशाचा दिवा तर विझलाच होता, पण आता सचिन यांना म्हातारपणात कोणी पाणी पाजायलाही शिल्लक उरले नव्हते. बीडमधले ते सोन्यासारखे वातावरण ते जेलपर्यंतचा सचिनचा सगळा प्रवास ऐकून माझ्या अंगावर काटे येत होते.

बोलता बोलता सचिन म्हणाले, ‘‘मी तुकाराम महाराज तेव्हाच वाचले असते, तर असा राग केला नसता.’’ सचिन आपल्या तिन्ही मुलींनी लावलेली माया, त्यांची आठवण करून हुंदके देत रडत होते.

अहंकाराला घेऊन तुकाराम महाराज काय सांगून गेले हे सचिन आम्हाला अभंगांच्या माध्यमातून सांगत होते. आता रडायचे कुणासाठी, कुणाला माया लावायची. जेलमधून बाहेर जायचे तर कुणासाठी जायचे हा प्रश्न सचिन यांच्यासमोर होता.

कोणालाही भेटा, कोणाशीही बोला, प्रत्येकाची एक वेगळी कहाणी होती. त्या कहाणीला दोन कंगोरे होते. एक म्हणजे, मला विनाकारण आतमध्ये टाकले. माझा दोष नसताना, माझे नाव केसमध्ये घेतले. दुसरे, होय मी गुन्हा केला, पण त्यावेळी तो गुन्हा रागातून आणि द्वेषातून झाला, आता मी सुधारलोय, असे सांगणारे अनेक कैदी होते. 

आम्ही बोलत होतो, तितक्यात ‘नमस्कार साहेब, नमस्कार साहेब’ असा आवाज आला. मी मागे वळून पाहतो तर काय, जाधव आमच्या दिशेने येत होते. अनेक जेलमध्ये जाधव यांनी अधिकारी म्हणून आपल्या सामाजिक कामाची छाप पाडलीय. 

आम्ही जाधव यांच्या कार्यालयाकडे निघालो. जाताना मी जाधव यांना म्हणालो, ‘‘किती गंभीर आहे हे सर्व.’’ 

जाधव म्हणाले, ‘‘तुम्हाला सर्वांनी तसे फार वरवरचे सांगितले असेल, पण परिस्थिती त्याहूनही वाईट आहे. रागाच्या भरात आणि द्वेषातून ही माणसे इथे आलेली आहेत. आपल्या राज्यामध्ये ५४ पेक्षा अधिक कारागृह आहेत. या कारागृहामध्ये ३२ हजारांहून अधिक कैदी आहेत. त्या प्रत्येकाची कहाणी अशीच आहे, इतकीच बिकट आहे.’’

आम्हाला सोडायला आलेले सचिन आकाशाकडे पाहत हात जोडून म्हणाले, ‘‘ही माणसे एक निमित्त आहेत. करणारा करता धरता तो वर बसला आहे.’’

कुणी आईला घेऊन भावनिक होते, तर कुणी बहिणी, मुलांना घेऊन. अनेकांनी आपल्या झालेल्या बाळाचे तोंडही पाहिले नव्हते. जाधव यांच्यासाठी हे नवीन नव्हते. माझ्यासाठी नक्कीच हे नवीन होते. 

मी जाधव यांच्यासमवेत अगदी जड पावलांनी त्यांच्या कार्यालयाकडे निघालो. मी जाधव यांना म्हणालो, ‘‘भाई, हे सर्व थांबणार कधी?’’

जाधव म्हणाले, ‘‘जोपर्यंत चंद्र, तारे, सूर्य आहे तोपर्यंत हे असेच राहणार आहे. फक्त यामध्ये प्रमाण कमी होऊ शकते. जर संस्कार चांगले असतील तर.”

मी जाधव यांना म्हणालो, “ज्यांचा दोष नाहीये, ते या जेलमध्ये आहेत, अनेक जणांनी पैसे भरले नाहीत, कागदपत्रे पूर्ण नाहीत म्हणून जेलमध्ये आहेत, त्यांना कोणी वाली नाही का?”

जाधव अगदी शांतपणे म्हणाले, ‘‘शासन, सामाजिक संस्था या लोकांना पाहिजे तशी मदत करतात, पण सगळ्यांपर्यंत ही मदत जाऊ शकत नाही. त्याला बराच अवधी लागेल.’’ 

मीही त्यांना प्रतिसादाची मान हलवली. मी तिथून निघालो, जेलमधल्या त्या सगळ्या घडलेल्या कहाण्या, त्या सर्व कैद्यांचे सुकलेले डोळे पाहून मीही अगदी उदास झालो होतो. काय बोलावे, कोणासमोर बोलावे आणि कशासाठी बोलावे हे प्रश्न माझे मलाच पडले होते. 

छोट्या छोट्या वादामध्ये माणसांच्या आयुष्याचा सत्यानाश कसा होतो याची अनेक उदाहरणे मी अनुभवून आलो होतो. जेव्हा एखाद्याच्या हातून चूक घडते, तेव्हा आपले कोणीही नसते. जेव्हा कुणाला मदतीची गरज लागते तेव्हा त्याला कोणीही मदत करत नाही. चूक झाल्यावर मोठ्या मनाने माफ करायलाही कोणी पुढे पुढाकार घेत नाही. अशा परिस्थितीत जगणारी माणसे जिवंत आहेत का मेलेली हेच कळत नाही. मागच्या जन्मीचे पाप, नशिबाचे भोग, आई-वडिलांनी केलेले पाप, अशा कितीतरी वेगवेगळ्या शब्दांनी या कैद्यांनी आपल्या मनाचे समाधान करून घेतले. काय माहित या कैद्यांच्या अंधाऱ्या आयुष्यामध्ये कधी प्रकाशाचे किरण दिसणार आहे की नाही?

– समाप्त – 

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ न केलेल्या पापाचे धनी? – भाग-1 ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

न केलेल्या पापाचे धनी? – भाग – 1 ☆ श्री संदीप काळे ☆

माझे मित्र अजित जाधव यांची राज्यातल्या एका जिल्ह्यातील जेलमध्ये मोठे अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. ते नागपूर, मुंबई, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी असताना मला त्यांना भेटता आले नाही. म्हटले आता ते आपल्या जवळच आहेत तर भेटून घ्यावे. मी त्यांच्याशी संपर्क केला. माझा फोन आल्याने तेही आनंदीत झाले. ठरल्याप्रमाणे आम्ही भेटलो. मला भेटताच क्षणी त्यांनी कडाडून मिठी मारली.

त्या जेलमध्ये त्यांनी जे जे काम सुरू केले ते ते मला सांगितले. जेलमधला चांगुलपणा, चालणारे काम, नक्कीच वेगळे, चांगले होते. चित्रपटात जेलला घेऊन काहीही दाखवतात, असा माझा मनातल्या मनात विचार सुरू होता. बराच वेळ आमचे बोलणे झाल्यावर मी जाधव यांना म्हणालो, ‘‘भाई, मला जेलमध्ये काही कैद्यांशी बोलण्यासाठी जाता येईल का?’’ 

जाधव बराच वेळ काहीच बोलले नाहीत. थोड्या वेळाने ते म्हणाले, ‘‘बघू, काय करता येते ते, थांबा. ’’ ते आतमध्ये गेले.

थोड्या वेळाने जेलमध्ये असणारे पोलिस माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘‘तुम्हाला जाधव साहेबांनी आतमध्ये बोलावले आहे. ’’ मी आतमध्ये निघालो.

मी जेलचे सारे वातावरण अगदी डोळ्यात आणि मनात साठवून घेत होतो. जेलमध्ये असणारे जेव्हा बाहेर होते, तेव्हा त्यांना बाहेरच्या जगाविषयी फार कुतुहल वाटायचं नाही, पण आता ते सगळेजण आतमध्ये आहेत, तर त्यांना बाहेर काय चाललेय याचे फार कुतूहल वाटते. वर्तमानपत्रात असलेला शब्द न शब्द ते वाचून काढतात. मोठ-मोठी पुस्तके वाचून संपवतात. चांगले तेव्हढेच बोलायचे. मला हे सारे काही दिसत होते.

 जाधव यांनी काही कैद्यांशी माझी ओळख करून दिली. जाधव मला म्हणाले, ‘‘तुम्ही यांच्याशी बोला, मी जरा फेरफटका मारून येतो. ’’ 

एक एक करून मी अनेकांशी बोलत होतो. माझ्याशी फार कोणी बोलण्यासाठी उत्साह दाखवत नव्हते. काहींना शिक्षा झाली होती. काहींना शिक्षा होणे बाकी होते. काहींची सुटका झाली होती, पण अजूनही कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे ते तिथेच होते. काहींचे शासकीय रक्कम भरण्यावरून अडलेय, तर काहींना वकील लावायला कोणी पुढाकार घेत नाही. असे अनेक जण होते जे केव्हाच या जेलच्या चार भिंतींतून बाहेर पडले पाहिजे होते.

तिथे असणाऱ्या प्रत्येकाची कहाणी वेगळी होती. जसे आपण पिक्चरमध्ये पाहतो अगदी त्याहूनही भयंकर. बोलताना कैद्यांच्या डोळ्यात दिसत होते, तो गुन्हेगार नाही, त्यांच्या हावभावावरून ते लक्षात येत होते, हा चांगल्या घरचा आहे. पण अहंकार आणि रागामुळे त्याच्या हातून जे घडायला नाही पाहिजे होते ते घडून गेले.

जेलमध्ये कोण गरीब आणि कोण श्रीमंत, सगळे बिचारे सारखे. प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये एकच आग बघायला मिळत होती, ती म्हणजे ‘मला सोडवण्यासाठी कोणीतरी बाहेरून येईल आणि मला इथून घेऊन जाईल. ‘

अनेक निरक्षर असणाऱ्या कैद्यांना सतत कोर्टात जाऊन-येऊन कायदे एकदम पाठ होते. वकील चुकले कसे इथपासून ते पोलिसांच्या कागदपत्रांमुळे कसा गोंधळ झाला, इथपर्यंत ही सगळी गणिते, अनुमान या कैद्यांना माहिती होते. हे त्यांच्या बोलण्यावरून दिसत होते.

जाधव यांनी माझ्यासोबत दोन पोलिस दिले होते. ते दोघेही म्हणाले, ‘‘आम्ही पेपरमध्ये, पुस्तकातून तुम्हाला नेहमी वाचतो. ’’ जसेही ते दोन पोलिस मला बोलायला लागले, तसे माझ्यासमोर असलेल्या अनेक कैद्यांची माझ्यासोबत बोलण्याची भाषाच बदलली.

मी अनेक कैद्यांशी बोललो, बऱ्याच जणांनी बोलण्याचा समारोप अश्रूंनी केला होता. कुणी फसले, कुणाला फसवले गेले. अनेकांचा दोष नसताना ते तिथे होते. त्यांनी कधीही न केलेल्या पापाची शिक्षा ते भोगत होते, असे मला वाटत होते.

जेलमधली सगळी माणसे तशीच होती. ‘मला आयते खायला मिळते. मी इथे आरामात आयुष्यभर राहतो’ असे तिथे कुणालाही वाटत नव्हते. मी अनेकांशी बोलत होतो.

लक्ष्मण तुरेराव नगरचे. शेतीच्या वादामध्ये भावाचा खून त्यांच्या हातून झाला. त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलेही जन्मठेपेची शिक्षा भोगतात. लक्ष्मण म्हणाले, ‘‘आमचा मोठा परिवार. चार भाऊ, आई, वडील, आम्ही सगळेजण एकत्रित राहायचो. सर्वात लहान भावाच्या बायकोला वेगळे व्हायचे होते. तिथूनच आमच्या घराचे वासे फिरले. हळूहळू आमच्या घरात फूट पडत गेली. सगळे भाऊ वेगवेगळे झाले. एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असणारे भाऊ छोट्या-छोट्या वादावरून एकमेकांचा जीव घ्यायला लागले. शेतीच्या वाटणीवरून वाद झाले.

मधल्या भावांनी माझ्या जमिनीवर नांगर फिरवला. त्यावरून भांडण इतक्या टोकाला गेले की, भांडणामध्ये त्याच मधल्या भावाचा जीव गेला. रागात सगळे काही घडून गेले. शेतीचे सोडा, कोणाला तोंड दाखवायला आता जागा राहिली नाही.

तो माझ्यापेक्षा लहान होता. तो चुकला असला तरी त्याला समजून सांगायचे. नाही तर त्यांना जे पाहिजे ते देऊन टाकायचे ही भूमिका मी मोठा असल्यामुळे घ्यायला पाहिजे होती, पण तशी भूमिका घेतली गेली नाही. आई, वडील, बहीण या सगळ्यांना मी मुकलो होतो. आता असे वाटते, ही शिक्षा संपूच नाही. आपण इथेच संपून जावे. एवढे सारे कमावले होते, ते एका क्षणात संपवले.’’ 

– क्रमशः भाग पहिला

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print