मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (चौथा माळ) – जीवनाच्या रणात लढतांना… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (चौथी माळ) – जीवनाच्या रणात लढतांना… ☆ श्री संभाजी बबन गायके 

तिच्या चेह-यावर सदा हसू असतं याचं नवल वाटत राहतं. कुणी परस्पर कधी हिशेब मांडलाच तर सुखाच्या बाजूला तशी अगदी किरकोळ जमा दिसायची आणि दु:खानं तर सगळा ताळेबंदच व्यापून टाकलेला होता.

दोन जिवंत माणसं वावरू शकतील एवढ्या जागेत सहा माणसं रहात असलेल्या घरात जन्माला येणं काही तिनं ठरवलेलं नव्हतं. एकवेळ मरण हाती असतं पण जन्म हाती नसतो हे खरंच हे तिला फार लवकर पटलं होतं. नात्यातली माणसं तिच्याघरी यायला नाखुश असतात, त्यांना हिच्या आईला भेटायचं असेल तर ती माणसं हिच्या घरी येण्याऐवजी ‘ तुम्हीच या की घरी आमच्या ’ असं का म्हणायची, हे तिला समजायला वेळ लागला.

आपल्या घराच्या आसपासची सगळी वस्तीच इतरांपेक्षा निराळी आहे, हे ती शाळेत जायला लागली तेंव्हा तिच्या लक्षात आलं. आपल्या शेजारी राहणारी माणसं काही आनंदाने या वस्तीत रहात आहेत, असं नाही हेही तिने विचारांती ताडलं. तिला सख्खा मामा नव्हता. पण मानलेले मात्र मामा होते. तिच्या शेजारच्याच खोपटात राहणारे. त्यांच्या गावी एकदा तिच्या आईने त्यांच्याबरोबर यात्रेला पाठवलं होतं. मामाच्या गावात एका गल्लीत एकाच आडनावाची माणसं राहतात. आणि ही घरं स्वतंत्र भिंतीचीही असतात, स्वच्छतागृहं घरांपासून तशी लांब असतात, हे पाहून तिला आश्चर्य वाटलं. नाहीतर तिचं घर वस्तीत सरकारनं बांधून दिलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहापासून अगदी काही फुटांच्या अंतरावर आहे. ही जागा सरकारने व्यापली नसती तर त्या जागेवर आणखी दहा-बारा झोपड्या सहज उभ्या करता आल्या असत्या. कारण वस्तीला लागूनच नदी किंवा नदीला लागूनच वस्ती होती. आणि आता आणखी लोकांना वस्तीत रहायला यायला वावच राहिला नव्हता. स्वतंत्र भिंती उभारण्याची चैन लोकांना परवडणारी नव्हती. आणि मुळात भिंती अशा नव्हत्याच. होत्या त्या पत्र्याच्या किंवा अशाच काही लाकडी फळ्यांच्या. लोकांनी वस्तीत जागा धरल्या होत्या, आपण पळत जाऊन,गर्दीत घुसून बसमध्ये जागा धरतो ना तशा ! चंदा याच वातावरणाला सरावलेली होती. तिथले आवाज, तिथला वास आणि गरीबीच्या सहवासाची तिला सवय झाली होती. आपल्या त्या एवढ्याशा घरात मागच्या बाजूला पडदा लावून एक आडोसा केलेला आहे, आणि त्यात एक आईस्क्रीमवाला मामा राहतो, त्याला त्याच्या जागेत जायला आपल्याच दारातून जावे-यावे लागते. आपले वडील त्या मामाशी आई सलगीने बोलली की भांडतात, काहीबाही बोलतात आणि बरेचदा तिला मारतात, असेही होई. पण अशा मारामा-या तर वस्तीतल्या ब-याच घरांत होतात, हे चंदाला ऐकून पाहून माहिती झाले होते. लग्न झाले की नवरा बायको असेच वागतात,ही तिची समजूत पक्की होत चाललेली होती. तिच्या शेजारी दोन बापे राहतात, मात्र ते रोज सकाळी बायकांसारखं नटून थटून बाहेर जातात. समोरच्याच झोपडीत एक बाई राहते. समोर म्हणजे हिच्या आणि त्या झोपडीत मुश्किलीने चार हातांचं अंतर असावं. त्या बाईच्या हाता,पायांची बोटं निम्मीच आहेत, ती सकाळी एका म्हाता-या माणसाबरोबर बाहेर पडते. त्या म्हाता-याच्याही हाता-पायांना नेहमी पांढ-या पट्ट्या बांधलेल्या असत आणि त्या पट्ट्यांवर रक्ताचे डाग असतात बहुतेकवेळा. डोळ्यांच्या पापण्याही झडून गेल्यात. रात्री वस्तीत अंधुक उजेड असतो, पण त्यामुळे आपल्याकडे नातेवाईक आलेच तर त्यांना अस्वस्थ का होतं, हे कोडं तिला काही केल्या उलगडत नव्हतं. तिला माहित नव्हतं की तिच्या आईच्या माहेरच्या लोकांना का चांगल्या घरची माणसं म्हणतात. त्यांची घरं आपल्यापेक्षा चांगली म्हणून त्यांना असं म्हणत असावेत, असं तिला वाटून जाई.

मुलीच्या जातीनं लवकर मोठं होणं किती वाईट असतं याची जाणीव तिला लवकरच व्हायला लागली. आई तिला सतत घरात थांब, पावडर लावू नकोस,कुणाशी जास्त बोलू नको असं म्हणायला लागली तेंव्हा तर चंदा खूपच गडबडून गेली. त्यात वस्तीच्या टोकावर रहायला असणा-या एका पोराने तिचा हात धरला आणि माझ्याशी दोस्ती करतेस का? असं विचारल्यापासून तिला भीतीच वाटू लागली होती. तशी तीही चार दोन वेळा त्या मुलाकडे पाहून ओळखीचं हसली होती, नाही असं नाही. पण ते सहजच. दिसायला बरा होता तो सिनेमातल्या हिरोसारखे केस ठेवणारा आणि वस्तीतल्या डबल बारवर व्यायाम करणारा. आईने यासाठी तिलाच का रागे भरले असावे, ह्या प्रश्नाचं उत्तर तिला आजवर नाही मिळालं. दोन्ही धाकटे भाऊ सातवी-आठवीतून शाळा सोडून गवंड्याच्या हाताखाली जाऊ लागले आणि घरात रोज रोख पैसे येऊ लागले होते.

एका दिवशी तिचं लग्नं ठरलं. पदरात निखारा ठेवून कसं जगणार आई? मुलगी मोठी झालीये आणि तिच्याकडे लक्ष द्यायला आपण दिवसा घरी थांबू शकत नाही. घरी थांबलं तर लोकलमध्ये भाजलेल्या, उकडलेल्या शेंगा विकायला कोण जाईल आणि घरात ज्वारीचं पीठ कसं येणार, हे तिचे प्रश्न इतर अनेक गोष्टींपेक्षा मोठे होते.

वस्तीतले लोक म्हणाले पोरगी बिघडली म्हणून तिच्या आईनं तिला उजवलं. चंदाचं लग्न मात्र तिच्या आईच्या सासरच्याकडच्या एका नातेवाईकाच्या मुलाशी झालं. पोरगा ड्रायव्हर, तीन भावांत मिळून तोकडी शेती आणि रूपानं चंदापेक्षा दहा आणे निराळा. आपली बायको आपल्यापेक्षा चांगली दिसते याचा त्या पोराला सुरुवातीला अभिमान आणि लग्नानंतर काहीच दिवसांत हेवा वाटायला लागला. दोन मुलं झाल्यावरही त्याचा जावईपणाचा तोरा काही कमी झालेला नव्हता. तरी बरं चंदाच्या आईनं पै पै साठवून त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी, मनगटात घड्याळ असे लाड केले होते. तुझी वस्ती तशी, तुझं खानदान तसं अशी कारणं भांडणाला पुरेशी ठरू लागली. तुझं आधी वस्तीतल्या एकाशी होतं हे तर त्याने खास शोधून काढलेलं कारण. चंदा कायमची वस्तीत आईकडे रहायला आली. दरम्यान दोन्ही भावांची अशीच लग्नं झाली होती, त्यांच्यापेक्षा गरीब असलेल्या लोकांच्या अल्पवयीन मुलींशी. आता घरात एक नाही तर तीन चंदा होत्या.

वस्तीत पुराचं पाणी शिरलं की वस्तीकरांना सरकारी शाळांच्या ऐसपैस खोल्यांमध्ये रहायला मिळायचं. दोन-तीन दिवसांत पुन्हा वस्ती गजबजून जायची. निवडणुका आल्या की प्रचाराला जायची कामं मिळायची सगळ्यांनाच आणि पैसेही.

वस्तीच्या टोकावर रहात होता, त्या मुलाचेही लग्न झाले होते आणि त्यालाही तीन मुलं होती. पण आताही तो चंदाकडे पहायचा संधी मिळेल तेव्हा. चंदाने सरळ राखी पौर्णिमेला त्याच्या घरी जाऊन राखी बांधून प्रश्न मिटवला.

नवरा परत नेण्याची शक्यता नव्हती आणि चंदाची इच्छाही नव्हती.  भावजया कुरकुरायला लागायच्या आत काहीतरी करायला पाहिजे होतं. थोरला भाऊ आता मंडईत गाळ्यावर कामाला लागला होता, पण हमालांच्या संगतीनं हातभट्टीत रमला आणि घरी पगार कमी आणि आजारपण जास्त यायला लागलं. त्यालाही मुलं झालीच होती जशी वस्तीतल्या इतरांना होत, पटापट. कार्यकर्त्यांच्या बळावर वस्तीत नळ चोवीस तास,लाईट आकडे टाकून सर्रास. वस्तीतल्या घरां-घरांत किरकोळ उत्पादनं होत होतीच, त्यात एका कोप-यात स्वच्छतागृहाच्या बाजूला भट्टी लागायची, तिथूनही भरपूर माल निघायचा. एकूण हाताला कामं होती आणि कामाला भरपूर हात तयार असायचेच.

चंदाची आई मरण्यासारखी नव्हती. पण आजाराच्या साथीत अगदी किरकोळीत गेली. खर्च असा लागलाच नाही तिच्या आजारपणात. माहेरी आलेल्या लेकीचा आधार हरपला. बाप काही लेकीला माहेरी राहू देईल असा नसतोच बहुदा. ज्याची अमानत त्याच्याघरी बरी असं मानणारा पुरूषच तो. झटकलेली जबाबदारी पुन्हा खांद्यावर घ्यायला तो तयार नव्हता. दुसरं लग्न केलं तिनं तरी त्याची ना नव्हती. पण चंदा एकदा हरलेल्या जुगारात पुन्हा पैसे लावायला तयार नव्हती.

तिने आईची शेंगांची टोपली उचलली आणि तडक रेल्वे स्टेशन गाठलं. दोन दिवसांनी भावजयही आली सोबतीला. माणसांच्या गर्दीत आता या दोन तरूण पोरी सराईतपणे आणि लाज घरी ठेवून स्थिरावल्या. चुकून धक्का लागलेल्या माणसांना मनानेच माफ करीत, मुद्दाम धक्के देणा-यांना भाऊ म्हणत त्या या ठेशन पासून त्या ठेशन पर्यंत फिरतात….भुनेला,वाफेला सेंग असा पुकारा करीत. रेल्वेतील टी.टी.,पोलिस, पाकीटमार,किरकोळ विक्रेते, आंधळे भिकारी, फरशीच्या तुकड्यांनी ताल धरीत अनाकलनीय गाणी गात पैसे गोळा करीत फिरणा-या भावांच्या जोड्या त्यांना तोंडपाठ झाल्यात. चंदाने मात्र आपली दोन्ही मुलं दूरवरच्या गावातल्या बोर्डिंग स्कूलमध्ये नेऊन ठेवलीत….त्यांना शिकवायचा तिचा इरादा आहे तिचा. आपल्या मुलांच्या नशिबात येऊ पाहणारी वस्ती तिला आता दूर सारायची आहे. फलाटावरील एखाद्या मोकळ्या बाकावर थकून भागून बसलेली चंदा तिच्या टोपलीतली एखादी जास्त भाजली गेल्यामुळे काळी ठिक्कर पडलेली शेंग सोलते…त्या शेंगेतील शाबूत भाग दातांनी कुरतडून खाते आणि लोकलची वाट पहात राहते. या महिन्यात पैसे साठले की पोरांना अभ्यासाची चांगली पुस्तकं नेऊन द्यायचीत तिला….त्यासाठी कितीही ओरडावं लागलं तरी चालेल….भुनेला, वाफेला सेंग…मूंगफल्ली का सेंग !

चंदासारख्या अशा अनेक अष्टभुजा जीवनाच्या रणात उभ्या असतात लढायला…. आई भवानी त्यांच्या हातांना आणखी बळ देवो.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (तिसरा माळ) – जीवनसंघर्षरत एक दुर्गा ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (तिसरी माळ) – जीवनसंघर्षरत एक दुर्गा ☆ श्री संभाजी बबन गायके 

नव-याला सोडलं असलं तरी कपाळावरचं कुंकू आणि गळ्यातला काळा मणी यांपासून वत्सलामावशींनी फारकत म्हणून घेतली नाही. पदरात एक ना अर्धे…तीन मुलं. त्यात पहिल्या दोन मुली आणि तिसरा कुळाचा कुलदीपक. सासरचं घर सोडताना वत्सलामावशींनी नव-याचा प्रचंड विरोध डावलून मुलाला सोबत आणलं होतं. “ मला तुमचं काही नको…आणि माझ्या मुलांनाही तुमच्या या पापाच्या दौलतीमधला छदामही नको ” असं म्हणून मावशींनी कर्नाटकामधलं ते कुठलंसं गाव सोडलं आणि महामार्गावरून जाणा-या एका मालवाहू वाहनाला हात केला.

“ कित्थे जाणा है, भेन? ” त्या मालट्रकच्या सरदारजी चालकाने वत्सलामावशींना प्रश्न केला. “ दादा,ही गाडी जिथवर जाईल तिथवर ने ! ” असं म्हणून मावशींनी ट्रकच्या क्लिनरच्या हातावर दोन रुपयांची मळकी नोट ठेवली. “ ये नोट नहीं चलेगी ! ” त्याने कुरकुर केली. त्यावर चालकाने “ओय..छोटे. रख्ख !” असा खास पंजाबी ठेवणीतला आवाज दिल्यावर क्लिनरने मावशीची तिन्ही मुलं आणि मावशींना हात देऊन केबिनमध्ये ओढून घेतलं आणि स्वत: काचेजवळच्या फळीवर तिरका बसला. आरशातून तो मावशींना न्याहाळत होता जणू. सरदारजींनी त्याला सरळ बसायला सांगितले आणि ट्रक पुढे दामटला.

वत्सला जेमतेम विवाहायोग्य वयाची होते न होते तोच तिच्या वडिलांनी तिला दूर खेड्यात देऊन टाकली होती. त्यांना नव्या बायकोसोबत संसार थाटायचा होता आणि त्यात वत्सला बहुदा अडसर झाली असती. तरी बरं त्या स्वयंपाकपाण्यात, धुण्याधाण्यात पारंगत झाल्या होत्या, त्यांची आई देवाघरी गेल्यापासूनच्या काही वर्षातच. वत्सलाबाई तशा रंगा-रुपानं अगदी सामान्य म्हणाव्यात अशा. बेताची उंची,खेड्यात रापलेली त्वचा आणि काहीसा आडवा-तिडवा बांधा. पण रहायच्या मात्र अगदी स्वच्छ,नीटस आणि स्वत:चा आब राखून. वत्सलेचे यजमान तिच्यापेक्षा डावे. सर्वच बाबतीत. उंची,रंग आणि मुख्य म्हणजे स्वभाव. त्यांची पहिली पत्नी निवर्तली होती. पण मूलबाळ नव्हतं. कसलासा व्यापार होता त्यांचा. बाकी नावालाच मोठं घर आणि घराणं….संस्कारांची एकही खूण त्या घरात दिसत नव्हती. घरात दिवंगत तरुण माणसांच्या काही कृष्णधवल तसबीरी टांगलेल्या होत्या. पण ती माणसं कशामुळे गेली हे विचारायची सोय नव्हती. एकतर कानडी भाषेचा अडसर होता आरंभी. नंतर सरावाने समजायला लागले…सर्वच. गावातल्या जमीनदाराचा उजवा हात म्हणून दबदबा असलेला नवरा….जमीनदाराच्या सावकारकीचा हिशेब याच्याच चोपडीत लिहिलेला. कर्जाचे डोंगर डोक्यावरून उतरवू न शकणा-या गोरगरीबांच्या जमिनी सावकाराच्या नावे करून घेण्यात सरावाने वाकबगार झालेला माणूस. एखाद्याला बरणीतलं तूप काढून देताना आपल्या हाताला माखलेलं तूप माणूस पोत्याला थोडंच न पुसतो….ते तुपाचे स्निग्ध कण जिभेवर नेण्याची सवय मग अधिकाधिक वाढत गेली आणि कधीही वाल्मिकी होऊ न शकणारा वाल्या उत्पन्न झाला. स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू करून त्यात सर्वमार्गे धनसंपदा घरात येत गेली. घरात माणसांची वानवा नव्हती आणि कामाचीही. वत्सलाबाईंचा ऐहिक संसार इतरांसारखा ठरलेल्या मार्गावरून वाटचाल करू लागला आणि वत्त्सलाबाई घरात प्रश्न विचारण्याएवढ्या मोठ्या आणि धीट झाल्या. तोवर तीन मुलं घातली होती पदरात नियतीने. वत्सलेचे प्रश्न टोकदार आणि थेट होते. यजमानांच्या खात्यावर आता धन आणि काळ्या धनासवे येणारे यच्चयावत अवगुणही जमा होत होते. नव-याने,सासु-सास-यांनी छळ आरंभला आणि त्याची परिणती म्हणून आज तीन मुलांना घेऊन वत्सलाबाई अनोळखी दिशेला निघाल्या होत्या.

कर्नाटकाच्या सीमा ओलांडून ट्र्क मराठी मुलखात शिरला. दुकानांच्या मराठी पाट्या वाचत वाचत मुलं सावरून बसली होती. आपण कुठे निघालो आहोत याची त्यांनाही कल्पना नव्हती. वाटेत सरदारजी काहीबाही विचारत राहिले आणि वत्सलाबाईंनी पंजाबी-मिश्रीत हिंदी अजिबात समजत नसली तरी कर्मकहाणी सांगितली आणि त्या दणकट शरीराच्या पण मऊ काळजाच्या शीखाला समजली…. “ तो ये गल है? वाहेगुरू सब चंगा कर देंगे ! “ त्याने अ‍ॅल्युमिनियमचे चंदेरी कडे घातलेला हात आकाशाकडे नेत म्हटलं.

रात्रीचे आठ वाजत आलेले होते. जकात नाक्याच्या पुढच्या वळणावर सरदारजींनी ट्र्क उभा केला आणि म्हणाले, “ भेनजी…उतर जावो. मैं तो अभी सड्डे ट्रांसपोर्ट ऑफिस जाऊंगा !

वत्सलेने या नव्या भावाकडे असे काही पाहिले की त्याने ट्रकचं इंजिन बंद केलं. सरदारजीचा स्वत:चा ट्र्क होता तो. पंजाबमधून महाराष्ट्रात येऊन स्वत:ची ट्रांसपोर्ट कंपनी काढायची होती त्यांना. औद्योगिक परिसराच्या जवळच एक ट्रक टर्मिनल उभं रहात होतं. त्यातलीच एक मोकळी जागा विकत घेऊन त्यांनी पत्र्याचं शेड ठोकून तात्पुरतं कार्यालय थाटलं होतं. आणि त्याला तो नसताना ते सांभाळणारं कुणीतरी पाहिजे होतं. राहण्याचा जागेचा प्रश्न मिटत होता. मराठी मुलूख होता. वत्सलाबाईंनी होकार दिला.

झाडलोट करणं, ट्रांसपोर्टसाठी आलेल्या मालावर लक्ष ठेवणं आणि बारीक सारीक कामं सुरू झाली. तिस-याच महिन्यात सरदारजींनी दोन नवे ट्रक घेतले. कार्यालय मोठे झाले. त्यांनी वत्सलाबाईंची पत्र्याची खोली आता पक्की बांधून दिली. परिसरात आणखी बरीच ट्रांसपोर्टची कार्यालये, गोदामं उभी रहात होती. चालक,मेकॅनिक,क्लिनर इत्यादी मंडळींचा राबता वाढू लागला. त्या परिसरात राहणारी एकमेव बाई म्हणजे वत्सलाबाई. तिथून जवळची मानवी वस्ती हाकेच्या अंतरावर नव्हती. चहापाण्याला,जेवणाला चालक-क्लिनर लोकांना थेट हायवेवरच्या ढाब्यांवर जावे लागे. सरदारजींना विचारून वत्सलामावशींनी आपल्या खोलीतच चहा आणि अल्पाहाराचे पदार्थ बनवून विकायला आरंभ केला. चव आणि मावशींचे हात यांचं सख्य तर होतंच आधीपासूनचं. माणसं येत गेली, ओळखीची होत गेली.

घरादारांपासून दूर असलेली ती कष्टकरी चालक मंडळी. त्यात त्यांच्या आयुष्यात आलेल्या अपरिहार्य पण अस्विकारार्ह गोष्टी. एकटी बाई पाहून त्यांच्या नजरांत होत जाणं नैसर्गिक असलं तरी वत्सलाबाईंचा अंगभर पदर, कपाळावरचं ठसठशीत कुंकू,गळ्यातला काळा मणी आणि जीभेवरचं आई-बहिणीसदृश मार्दव. वत्सलाबाई आता सगळ्यांच्याच मावशी झाल्या. आणि काहींच्या बहेनजी ! त्या ड्रायव्हर, क्लिनर मंडळींच्या घरची,मुलाबाळांची आवर्जून चौकशी करायच्या. कधी नसले कुणापाशी पैसे तर राहू दे…दे सवडीनं म्हणायच्या. आणि लोकही मावशींचे पैसे कधी बुडवत नसत.

दरम्यान मुली मोठ्या होऊ लागल्या होत्या. त्यांना मात्र मावशींनी सर्वांच्या नजरांपासून कसोशीने दूर ठेवलं. त्याही बिचा-या मुकाट्यानं रहात होत्या. लहानपणी जे काही लिहायला-वाचायला शिकल्या होत्या तेवढ्यावरच त्यांना थांबायला लागले. पण वागण्या-बोलण्यात अगदी वत्सलामावशी. काहीच वर्षांत मावशीच्या दूरच्या नातलगांना मावशींचा ठावठिकाणा लागला. अधूनमधून कुणी भेटायला यायचं.

सरदारजींनी जवळच शहरात प्लॉट घेऊन बंगला बांधला. आपले कुटुंब तिथे आणले. आऊटहाऊस मध्ये मावशींचे घरटे स्थलांतरीत झाले. आता पोरींची शाळा सुरू झाली जवळच्याच नगरपालिकेच्या विद्यामंदिरात. धाकटा लेकही आता हाताशी आला. पण त्या पठ्ठ्याला ड्रायव्हरकीचा नाद लागला आणि त्याने मावशींच्याही नकळत लायसेंस मिळवलं आणि ते सुद्धा अवजड वाहनांचं. मावशींनी मात्र चहा-नाश्त्याचा व्यवसाय सुरूच ठेवला…शरीर साथ देईनासं झालं तरीही.

सरदारजी पंजाबातल्या आपल्या मूळगावी गेले तेंव्हा सारा बंगला मावशींच्या जीवावर टाकून गेले होते…गेल्या कित्येक वर्षांत त्यांनी विश्वास कमावला होताच तेवढा. घर सोडून आल्यानंतर उभं आयुष्य मावशींनी एकटीच्या बळावर रेटलं होतं. स्वाभिमानने जगल्या होत्या. पै न पै गाठीला बांधून ठेवली…लेकी उजवताना लागणार होता पैसा..थोडा का होईना.

दोन्ही मुलींना स्थळं सांगून आली. दोघींची लग्नं एकाच दिवशी होणार होती. मावशींचा इतिहास आडवा नाही आला. इतक्या वर्षांच्या अस्तित्वात मावशींनी चारित्र्यवान वर्तनाची,प्रामाणिकपणाच्या खुणा वाटेवर कोरून ठेवल्या होत्या. विपरीत परिस्थितीत संस्कार सोडले नाहीत,मुलांनाही देण्यात कमी पडल्या नाहीत.

कसे कुणास ठाऊक, पण लग्नाच्या आदल्या रात्री मावशींचे यजमान येऊन थडकले. वाल्याचे पाप कुणीही स्विकारले नव्हते..अगदी जवळच्यांनीही. पैसे,जमीन होती शिल्लक काही, पण कुणाच्या डोळ्यांत डोळे घालून बोलण्याइतपत पत नव्हती राहिली. मावशी काहीही बोलल्या नाहीत.

दिवसभर ट्रांसपोर्ट कंपनीच्या आवारातच कार्य पार पडलं. पंजाब,हरियाणा,केरळ,बंगाल….भारतातल्या प्रत्येक राज्यातील एक न एक तरी व-हाडी हजर होता लग्नाला…अर्थात पुरूषांच्या त्या मेळ्यात एकही स्त्री मात्र नव्हती. मराठी लग्नसोहळा पाहून ती परप्रांतीय माणसं कौतुकानं हसत होती. सरदारजी मालक सहकुटुंब आले होते. त्यांनाही ट्रकच्या रस्त्यात उभं राहून हात करणा-या वत्सलामावशी आठवत होत्या…आणि त्यांच्या सोबतची लहानगी मुलं.

सायंकाळी पाठवणीची वेळ आली. मावशींनी व्यवस्थित पाठवणी केली. एका ट्रकवाल्यानं सजवलेल्या मिनीट्रक मधून दोन्ही नव-या सासरी घेऊन जाण्याची तयारी केली होती…..गाडीभाडं आहेर म्हणून वळतं करण्याच्या बोलीवर ! एकंदरीतच चाकांच्या त्या दुनियेत दोन संसारांची चाकं अग्रेसर होत होती.

मुली निघून गेल्या चिमण्यांसारख्या…भुर्र्कन उडून. त्यांना आता नवी घरटी मिळाली होती हक्काची. व-हाडी आणि इतर मंडळी निघून गेली. मंडप तसा रिकामा झाला. वत्सलाबाईंनी लाडू-चिवड्याच्या पुड्या बाहेर खुर्चीवर बसलेल्या त्यांच्या नव-याच्या हातावर ठेवल्या आणि त्याला वाकून नमस्कार केला. आणि पलीकडे काथ्याच्या बाजांवर बसलेल्या ड्रायवर मंडळींकडे पाहून म्हणाल्या…’ कर्नाटका कोई जा रहा है अभी?’

एक चालक उठून उभा राहिला. मैं निकल रहा हूं मौसी थोडी देर में. त्यावर वत्सला मावशी नव-याकडे हात दाखवून म्हणाल्या…’ इनको लेके जाना1 और हाँ….भाडा नहीं लेना. तुमसे अगली बार चाय-नास्ते का पैसा नहीं लूंगी !’ 

असं म्हणत वत्सलामावशी लग्नात झालेल्या खर्चाच्या नोंदी असलेल्या वहीत पाहण्यात गर्क झाल्या….त्यांच्या यजमानाला घेऊन निघालेल्या ट्र्ककडे त्यांनी साधं मान वळवूनही पाहिलं नाही ! धुळीचा एक हलका लोट उठवून ट्रक निघून गेला…वत्सलाबाईंच्या डोळ्यांत त्यांच्या नकळत पाणी उभं राहिलं….पण आत मनात स्वाभिमानाच्या भावनेनं रिंगण धरलं होतं…एका बाईनं एक लढाई जिंकली होती…एकटीनं !

….. नवरात्रीनिमित्त ही दुर्गा मांडली. चारित्र्य, सचोटी, प्रामाणिकपणा, जिद्द, मार्दव, कर्तृत्व, करारीपणा आणि धाडस ह्या अष्टभुजा उभारून जीवनसंघर्षरत असलेली दुर्गा. संदर्भांपेक्षा संघर्ष केंद्रस्थानी ठेवून लिहिले. 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पडघवली” मधील अंबावहिनी ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ? 

“पडघवली” मधील अंबावहिनी ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

मला आवडलेली गोनीदांच्या “पडघवली” मधील व्यक्तिरेखा – कादंबरी होती गो. नी. दांडेकर लिखित “पडघवली.” हे अप्रतिम पुस्तक आणि आणि मनाली भिडली ती  कादंबरीची नायिका “अंबावहिनी.”…ती एकदम मनात ठसली “पडघवली”  वाचली तेव्हा आवडलं होतं गोनीदांनी केलेलं “पडघवली”चं .. कधीही न पाहिलेल्या कोकणाचं वर्णन.. त्यांची ओघवती भाषा.  

१९५०चं दशक… कोकणपट्टीतील एक गाव. निसर्गाने आपलं वैभव अनंत हस्ते जिच्यावर उधळलंय अशी पडघवली.. घनदाट जंगल झाडी… त्याला नारळी पोफळीची डौलदार झालर. ..अशा या सुंदर गावी आली एक देखणी, गोरीपान आठ वर्षाची पोर.. लग्न म्हणजे काय हे न कळायच्या वयातच लग्न होऊन तिने पडघवलीतील आपल्या घराचा ऊंबरठा ओलांडला. तीच ही अंबा किंवा अंबूवहिनी… तिचं माहेरघर दाभोळ खाडीपासून दहा कोस आत.. पाण्याचं सततचं दुर्भिक्ष. अशा रुक्ष गावातून अंबा आली ते हिरव्यागार पडघवलीमधे. ..अष्टौप्रहर वाहणारा थंड पाण्याचा पन्हाळ बघून ती हरखली. घरी बरोबरीचे नणंद आणि दीर, गणुभावजी… हे तिचे खेळ सवंगडी. सासुबाई आणि मामंजी. अगदी प्रेमळ. वयाच्या दहाव्या वर्षी विधवा होऊन माघारी आलेल्या आतेसासुबाईंची आईविना वाढलेल्या अंबेवर अपार माया होती. अंबेचं घर हे गावकीतलं मुख्य घर. तिचे मामंजी खोत होते या गावचे! घरासमोर अंगण, मागं परसू, भोवताली नारळी-

पोफळीच्या बागा… पावसाळ्याचे चार महिने सोडले तर एरवी सात आठ महिने अंगणात मांडव.. खाली सावली आणि वर वाळवणं. पोफळं, आमसुलं,  कडवे वाल, गरे, आंबोशी, केळ्याचे काप, कडधान्य अन् काय काय… 

पडघवलीतलं प्रत्येक घर असंच खपत असे. अशा या कामसू गावाला त्यांच्या नव्या खोतीणीचा फार आदर होता. अंबावहिनी होतीही तशीच..! मनमिळावू, प्रेमळ, गावाविषयी आत्मीयता असणारी… 

आतेसासूबाईंकडुन शिकलेल्या, झाडपाल्याच्या औषधांनी, तिनं  कितीतरी गाववाल्यांना बरं केलं होतं आणि अनेक बाळंतिणींना सोडवलं होतं. ..

अंबेचा नवरा महादेव, तिची खूप काळजी घ्यायचा. बोलून दाखवलं नाही तरी त्याला अंबेचं कौतुक असावं. मात्र अंबेला जशी गावासाठी कळकळ होती तशी काही त्याला नव्हती. तो स्वार्थी नव्हता पण जरा आपल्या पुरतं पहाणारा होता..अंबेला याचं आश्चर्य वाटे. गावच्या खोताचा मुलगा ना हा ? असा कसा ?

गावकर्‍यांमधे अंबूवहिनीचा आणखी एक भरभक्कम आधार होता. तो म्हणजे गुजाभावजी. गुजा हा अंबूचा नवरा महादेव याचा अगदी जवळचा मित्र… महादेवाबरोबरच अंबूचीही गुजाशी छान मैत्री झाली. गावावरची अपार माया आणि कळकळ हा यांच्या मैत्रीतला दुवा… जिथे नवर्‍याबरोबर चारचौघात दोन शब्द बोलणं म्हणजे अगोचरपणा मानला जाई असा काळ तो. अशा काळी नवर्‍याच्या मित्राशी मैत्री ? अशक्यच..! 

पण “पडघवली” वेगळी होती. गुजाभावजी आणि अंबूवहिनी यांची निर्मळ आणि नितळ मैत्री पडघवलीच्या गावकर्‍यांनाच काय पण खुद्द महादेवाला देखील मान्य होती. त्यांच्या ह्या विश्वासाला तडा जाईल असं वर्तन गुजा आणि अंबू कडून कधी घडलं नाही.

दृष्ट लागावी असं सगळं …. पण.. ती लागलीच, अंबेचा चुलतदीर, व्यंकुभावजीच्या रूपाने… अंबेला माणसांची उत्तम पारख होती. तिला पहिल्यापासूनच व्यंकुच्या कारनाम्यांची शंका यायची. तिचा संशय दरवेळी खरा ठरे पण तिच्या नवर्‍याचं, भावावरील आंधळं प्रेम हेच अंबेचं मोठं दु:ख होतं.  बाहेरख्यालीपणा, गावातील लोकांच्या पैशांच्या अफरातफरी करणं, बेकायदेशीर जंगलतोड करणं.. अशा सगळ्या व्यंकूच्या कारवाया बघूनही आपला नवरा काही करत नाही म्हणून अंबू व्यथित होत असे. नवर्‍याचं नाकर्तेपण तिला असह्य होत असे पण ही व्यथाच तिला दिवसेंदिवस खंबीर बनवत होती… या सगळ्या कोंडमार्‍याचा स्फोट व्हायचा तो झालाच एके दिवशी…

व्यंकूनी सिमेंटचा बांध घालून महादेवाच्या आणि गावातील इतरांच्या बागेचं पाणी अडवलं. .तो बांध फोडायला अंबा स्वतः हातात कुदळ घेवून निघाली. अंबेचा तो अवतार बघून नवरा चरकला पण स्वतः गेला नाही. मात्र तिलाही अडवलं नाही. इतर काही गावकरी मदतीला आले आणि बांध फोडला गेला. अंबेनी सार्‍या गावासाठी पाणी वाहातं केलं. .व्यंकूनी गावकर्‍यांचा वानवळा मुंबईला नेऊन विकला. गावकर्‍यांना बोटी बुडाल्या असं सांगून त्यांचे पैसे हडप केले. हे प्रकरण मात्र महादेवाला खूप लागलं. स्वतःच्या खोत असण्याची त्याला जाणीव झाली. त्यानी जमीनीचा तुकडा विकून गाववाल्यांना नुकसान भरपाई दिली… कोण अभिमान वाटला अंबूला नवर्‍याचा. मनातून ती फार फार सुखावली. महादेवानी मात्र ह्या प्रकरणाचा धसका घेतला आणि त्यातून तो सावरलाच नाही.

महादेवानंतर अंबेनी गुजाभावजीच्या मदतीनी मुलाच शिक्षण केलं… गुजाला अंबेच्या कर्तृत्वाची जाण होती आणि आदरही. त्याच्यासारखा ताकदवान गडी. त्याने कोणा गुरूची दीक्षा घेतली मग तो गावातील चांगल्या कामासाठी देखील त्याच्या ताकदीचा वापर करेनासा झाला. यासाठी अंबा त्याची वेळोवेळी निर्भत्सना करे. 

तिची पडघवलीची ओढ व कळकळ समजून गुजा शेवटी ती सांगेल ते काम करायला तयार होई. अगदी गुरुवचनभंगाचा प्रमाद पत्करुन सुद्धा…

व्यंकूच्या कारवायांनी पडघवलीला उतरती कळा लागलीच होती. तरूणाई नोकरी धंद्याच्या नावाखाली गाव सोडून जात होती. त्यात भर म्हणून की काय महाभयंकर असं वादळ आलं आणि त्या वादळाने पडघवलीची उरली सुरली रया पण घालवली. या वादळात या खोतांच्या दारचं सर्वात जुनं आंब्याचं झाड जमीनदोस्त झालं…हे पाहून तिचा दिर हळहळला.. एरव्ही एवढ्या तेव्हढ्यासाठी जीव पाखडणारी अंबा वहिनी पण तिनी त्याची   समजूत घातली, “काय राह्यलंय त्या जुन्या झाडात ? आंब्यासाठी रडायचं ? सगळं जातंय. जाऊ दे..!” अंबेच्या तोंडचे हे पहिलेच निराशाचे उद्गार..! याच वादळात शेजार्‍यानी मदत न केल्यामुळे गावातल्या वृध्द यादोकाकी आणि त्यांची वासरी यांचा झालेला अंत .. अंबेला गावानी तिच्यावर केलेला हा शेवटचा घावच वाटला आणि तिनं हा गाव सोडायचा ठरवलं.? पण पडघवली सोडून जाणार कुठे ? मुंबईला मुलाकडे ? नाही नाही… अंबेची पराकोटीची घालमेल सुरू झाली.. 

मामंजी- आते सासुबाई- महादेव- यांची पडघवली ? साक्षात पडघवली ? वाडवडीलांनी वसवलेली पडघवली ? माडापोफळांनी झाकलेली पडघवली ? सोडायची ? नाही.. नाही..! अंबेला हे सहन झालं नाही. आणि  पडघवलीला कधीही अंतर द्यायचं नाही हे ठरवून ती माघारी फिरली…

अशी ही गावकर्‍यांशी आणि त्याहूनही जास्त गावाशी एकनिष्ठ असलेली अंबा… ज्या मातीत वाढली त्या मातीशी बेईमानी न करणारी अंबा… परपुरुषाशी निखळ व निर्मळ मैत्री कशी असावी हे दाखवून देणारी अंबा… खेडयातल्या आपल्या जीर्णशीर्ण, कोसळू पहाणार्‍या घरकुलांकडे लक्ष पुरवा हा संदेश देणारी अंबा… 

मला भावली..!!

© सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ देवीचे गायत्रीमंत्र – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ देवीचे गायत्रीमंत्र – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत गायत्रीमंत्र

धूमावती ॐ धूमावत्यै च विद्महे संहारिण्यै च धीमहि तन्नो धूमा प्रचोदयात् ॥

 मराठी भावानुवाद

ॐ 

ध्यान करितो धूमावती संहारिणीचे 

दान देई हे धूमा 

अमुच्या बुद्धीला श्रेष्ठ प्रेरणेचे

संस्कृत गायत्रीमंत्र

दुर्गा ॐ कात्यायन्यै विद्महे कन्याकुमार्यै धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात् ॥

मराठी भावानुवाद

दुर्गा ॐ 

ध्यान करितो कात्यायनी कन्याकुमारीचे

दान देई हे दुर्गे 

अमुच्या बुद्धीला श्रेष्ठ प्रेरणेचे

संस्कृत गायत्रीमंत्र 

ॐ महादेव्यै च विद्महे दुर्गायै च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ॥

मराठी भावानुवाद 

ॐ 

ध्यान करितो महादेवी दुर्गेचे

दान देई हे देवी 

अमुच्या बुद्धीला श्रेष्ठ प्रेरणेचे

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (दुसरा माळ) – १५६३२ फुट उंच पहाडावरची पहिली हिमदुर्गा ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (दुसरा माळ) – १५६३२ फुट उंच पहाडावरची पहिली हिमदुर्गा ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

सियाचिन….जगाचं जणू छतच. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेली युद्धभूमी आहे ही. आणि ह्या बर्फाच्या साम्राज्यावर आपले पाय रोवून उभे राहण्याची फार मोठी किंमत मोजावी लागते आपल्या सैनिकांना. शून्याच्या खाली साठ सत्तर अंश तापमानापर्यंत खाली घसरणारा पारा जगणं हीच मोठी लढाई बनवून टाकतो. एवढं असूनही आपले जवान इथे रात्रंदिवस पहा-यावर सज्ज असतात. यासाठी गरजेची असणारी शारीरिक, मानसिक क्षमता केवळ पुरूषांमध्येच असू शकते, असं वाटणं अगदी साहजिकच आहे. परंतू या समजुतीला खरा छेद दिला तो राजस्थानच्या उष्ण प्रदेशात जन्मलेल्या एका दुर्गेनं…  तिचं नाव शिवा चौहान…अर्थात आताच्या कॅप्टन शिवा चौहान मॅडम. 

१८ जुलै १९९७ रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये जन्मलेल्या शिवाचे तिच्या वयाच्या अकराव्या वर्षीच पितृछत्र हरपले.  राजेंदसिंह चौहान हे त्यांचं नाव. आईने, अंजली चौहान यांनी मग तिच्या आयुष्याची दोरी आपल्या हाती घेतली. घरात त्या तिघी. तिची मोठी बहिण कायद्याचं शिक्षण घेण्याच्या प्रयत्नात आणि शिवा मात्र चक्क सैन्यात जाण्याच्या जिद्दीने पेटून उठलेली. पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचारच मुळात मोठ्या हिंमतीचा म्हणावा लागतो. शिवाने सिविल इंजिनियरींगमधली पदवी मिळवली ती केवळ सैन्यात जाण्यासाठीच.

सैन्यात भरती होण्याच्या कठीण मुलाखतीच्या दिव्यातून शिवा प्रथम क्रमांकाने पार पडल्या, यातूनच त्यांच्या मनातली प्रखर जिद्द दिसून यावी. २०२० मध्ये त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवला आणि पुरुषांच्या बरोबरीने कठीण शारीरिक परीक्षा उत्तीर्ण झाल्या. पुढच्याच वर्षी त्यांना भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी रेजिमेंटमध्ये नेमणूक मिळाली. 

त्यांच्या विभागाचं नावच आहे ‘ फायर अ‍ॅन्ड फ्यूरी सॅपर्स ‘ ….अर्थात ‘ अग्नि-प्रक्षोप पथक.’ .हरत-हेच्या वातावरणात सैन्यासाठी अहोरात्र कार्यरत असणारा विभाग. मागील दोन वर्षांपूर्वी चीनी सीमेवर गलवान खो-यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात भीष्मपराक्रम गाजवलेले कर्नल संतोष बाबू याच विभागाचे शूर अधिकारी होते…त्यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले होते. सैन्य म्हणजे केवळ हाती बंदूक घेऊन गोळीबार करणे नव्हे…सैन्याला अनेक विभाग मदत करीत असतात…अभियांत्रिकी विभाग यात खूप महत्वाचा असतो. आपल्या कथानायिका कॅप्टन शिवा चौहान याच फायर अ‍ॅन्ड फ्यूरीच्या अधिकारी.   

Spade म्हणजे फावडे. याचेच फ्रेंच भाषेतील अपभ्रंशित नाव आहे Sappe…सॅपं ! त्या काळातील युद्धात किल्ले महत्त्वाचे होते. किल्ल्यांवर ताबा मिळवण्यासाठी त्यांच्या भिंतींच्या अधिकाधिक जवळ जाणे गरजेचे असे. अशा वेळी त्यावेळचे अभियंते वरून झाकले जातील असे खंदक खणत आणि मग सैन्य त्या खंदकांतून पुढे पुढे सरकत जाऊन किल्ल्याच्या समीप जाई. यावरून सैन्यात सॅपर ही संज्ञा रूढ झाली ती आजपर्यंत. 

आधुनिक काळात या सॅपर्सचं अर्थात अभियांत्रिकी सैनिकांचं मुख्य काम असतं ते सैन्याला पुढे जाता यावं म्हणून रस्ते बांधणे, पूल बांधणं, भूसुरुंग पेरणं आणि शत्रूने पेरलेले भूसुरुंग शोधून ते नष्ट करणं. या कामांमध्ये अतिशय उच्च दर्जाची तांत्रिक क्षमता आणि अनुभव गरजेचा असतो. आपल्या सैन्यात बॉम्बे सॅपर्स, मद्रास सॅपर्स असे अन्य अभियांत्रिकी विभाग कार्यरत आहेत. 

कॅप्टन शिवा चौहान यांनी अगदी कमी कालावधीत अतिशय कर्तव्यतत्पर आणि शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम अधिकारी म्हणून लौकिक प्राप्त केला. उंच बर्फाळ पहाड चढून जाणे, इतक्या उंचीवर अभियांत्रिकी कामांना अंतिम स्वरूप देणे, इत्यादी कामांत त्या वाकबगार झाल्या. त्यांच्या आधी महिला अधिका-यांना सियाचिन मधल्या १५६३२ फुटांवरील युद्धभूमीच्या खालील ९००० हजार फूट उंचीवर असलेल्या बेस कॅम्पपर्यंतच नेमणूक दिली जाई. उरलेली ६६३२ फूट उंची पार करणं तोपर्यंत एकाही महिलेला शक्य झालं नव्हतं…..  पण शिवा चौहान यांनी खडतर प्रशिक्षणं लीलया पार पाडली. सियाचिन भागात सायकल चालवणारी महिला हे दृश्यच अनेकांना कौतुकाने तोंडात बोट घालायला भाग पाडणारे होते. शिवा चौहान यांनी चक्क ५०८ किलोमीटर अंतर कापणारी सायकल मोहीम हाती घेतली आणि पूर्णही करून दाखवली. कारगिल विजय दिनानिमित्त त्यांनी ही अनोखी मोहिम यशस्वी केली. सियाचिन युद्ध स्मारक ते कारगिल युद्ध स्मारक, अशी ही सायकल यात्रा कॅप्टन शिवा चौहान यांनी इतर पुरूष अधिकारी, सैनिक यांचे नेतृत्व करून पूर्ण केली, त्यामुळे त्यांच्या क्षमतेबद्द्ल कुणाच्याही मनात शंका उरली नाही. 

आणि यानंतर मात्र शिवा चौहान यांनी आणखी ६६६३२ फूट उंचीवर जाण्याचा चंग बांधला…प्रचंड कष्ट घेऊन आवश्यक ती सर्व प्रशिक्षणं पूर्ण केली आणि जानेवारी २०२३ मध्ये त्यांना भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी म्हणून सियाचिनवर प्रत्यक्ष कामावर नेमण्यात आले…एका महिलेसाठी हा एक प्रचंड मोठा सन्मान मानला जावा! 

सैनिक हिमवीरांच्या मधोमध मोठ्या अभिमानाने बसलेल्या कॅप्टन शिवा चौहान ह्या नारीशक्तीच्या प्रतीकच आहेत. त्यांच्यापासून समस्त तरुण वर्ग निश्चितच प्रेरणा घेईल. भगवान शिवाचं वास्तव्य असलेल्या हिमाच्छादित पर्वत शिखरांवर शिवा नावाची पार्वतीच जणू भारतमातेच्या रक्षणासाठी बर्फात पाय रोवून उभी आहे ! 

नवरात्राच्या दुस-या माळेच्या निमित्ताने …..  कॅप्टन शिवा चौहान आपणांस अभिमानाने सल्यूट…जयहिंद ! 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया ! — पहिली माळ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया ! — पहिली माळ ☆ श्री संभाजी बबन गायके  

मला पाहून ती थबकली….जागच्या जागी खिळून राहिली जणू ! अजून अंगाची हळदही न निघालेली ती….दोन्ही हातातील हिरव्या बांगड्या सुमधूर किणकिणताहेत. केसांमध्ये कुंकू अजूनही ताजंच दिसतं आहे. तळहातावरील मेहंदी जणू आज सकाळीच तर रेखली आहे…तळहातांचा वास घेतला तर मेहंदीच्या पानावर अजूनही झुलणारं तिचं मन दिसू लागेल… तिनं केसांत गजराही माळलेला आहे….तिच्या भोवती सुगंधाची पखरण करीत जाणारा. तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिचं लक्ष आधी माझ्या कपाळाकडे आणि नंतर आपसूकच गळ्याकडे गेलं….बांगड्या फोडल्या गेल्या त्यावेळी हातांवर झालेल्या जखमांचे व्रण तिच्या नजरेतून सुटले नाहीत….आणि तिच्या चेह-यावरच्या रेषा सैरावैरा होऊन धावू लागल्या….एकमेकींत मिसळून गेल्या….एक अनामिक कल्लोळ माजला तिच्या चेह-यावर ! 

ती शब्दांतून काहीही बोलली नसली तरी तिची नजर उच्चरवाने विचारत होती….. ही अशी कशी माझ्या वाटेत येऊ शकते? खरं तर हिने असं माझ्यासारखीच्या समोर येऊच नये….उगाच अपशकुन होतो. मी सौभाग्यकांक्षिणी होते आणि आता सौभाग्यवती….सौभाग्याची अखंडित कांक्षा मनात बाळगून असणारी! सौभाग्याची सगळी लक्षणं अंगावर ल्यायलेली. कपाळी कुंकू, नाकात नथ, कानांत कुड्या, दोन्ही हातांत हिरवा चुडा, बांगड्यांच्या मध्ये सोन्याच्या बांगड्या, बोटांत अंगठ्या, केसांमध्ये कुंकवाची रेघ, पायांत जोडवी आणि गळ्यात मंगळसूत्र….त्याचा आणि माझा जीव एका सूत्रात बांधून ठेवणारं मंगळसूत्र. आज घटस्थापनेचा मुहूर्त….आणि त्यात हिचं येणं…काहीच मेळ लागत नाही ! 

मी म्हणाले…तुझ्या कपाळाचं कुंकू माझ्या कुंकवानं राखलंय…माझ्या कपाळीचं पुसून. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कायम रहावं म्हणून तो माझं मंगळसूत्र तोडून निघून गेलाय मला शेवटचही न भेटता. कडेवर खेळणा-या लेकात आणि माझ्या पोटात वाढणा-या बाळात त्याचा जीव अडकला नसेल का?  बहिणींच्या राख्या त्याला खुणावत नसतील का? दिवसभर कमाई करून दिवस मावळताच पाखरांसारखं घरट्यात येऊन सुखानं चार घास खाणं त्याला अशक्य थोडंच होतं..पण त्यानं निराळा मार्ग निवडला…हा मार्ग बरेचदा मरणाशी थांबतो. 

पण मीच कशी पांढ-या कपाळाची आणि पांढ-या पायांची? माझं कपाळ म्हणजे जणू माळरान आहे जन्म-मरणातील संघर्षाचं. इथं मैलोन्मैल काहीही नजरेस पडत नाही. रस्त्यात चिटपाखरू नाही आणि सावलीही. झळा आणि विरहाच्या कळा. मनाचं रमणं आणि मरणं….एका अक्षराचा तर फेरफार ! मन थोडावेळ रमतं आणि बराच वेळ मरतं.

मी सुद्धा अशीच जात होते की सुवासिनींच्या मेळ्यांमध्ये. एकमेकींची सौभाग्यं अखंडित रहावीत  म्हणून प्रत्येकीच्या कपाळी हरिद्रम-कुंकुम रेखीत होतेच की. मग आताच असं काय झालं? कपाळावरचा कुंकुम सूर्य मावळला म्हणून माझ्या वाटेला हा अंधार का? माझ्या कपाळी कुंकू नाही म्हणून का मी दुसरीला कुंकू लावायचं नाही? माझ्याही पोटी कान्हा जन्मलाय की….माझ्या पोटी त्यांची ही एक कायमची आठवण! मी कुणा गर्भार सुवासिनीची ओटी भरू शकत नाही. 

कुणाच्या मरणावर माझा काय जोरा? मरणारा कुणाचा तरी मुलगा,भाऊ,मामा,काका इत्यादी इत्यादी असतोच ना? मग त्याच्या मरणानं मी एकटीच कशी विधवा होते? नव-याच्या आईचा धनी जगात असेल तर तिला कुंकवाचा अधिकार आणि जिने आपले कुंकू देशासाठी उधळले तिच्या कपाळावर फारतर काळ्या अबीराचा टिपका? 

मूळात हा विचार कदाचित आपण बायकांनीच एकमेकींच्या माथी चिकटवलेला असावा, असं वाटतं. आता हा विचार खरवडून काढायची वेळ आलेली आहे…कपाळं रक्तबंबाळ होतील तरीही. मातृभूमीच्या रक्षणासाठी मरण पत्करणा-यांच्या आत्म्यांना अंतिमत: स्वर्ग देईन असं आश्वासन दिलंय भगवान श्रीकृष्णांनी. मग या आत्म्याच्या जीवलगांना देव अप्रतिष्ठेच्या,अपशकूनांच्या नरकात कसं ठेवील…विशेषत: त्याच्या पत्नीला? त्याच्या इतर नातलगांना हा शाप नाही बाधत मग जिने त्याचा संसार त्याच्या अनुपस्थितीत सांभाळला तिला वैधव्याच्या वेदना का? का जाणिव करून देतोय समाज तिला की तु सौभाग्याची नाहीस? सबंध समाजाचं सौभाग्य अबाधित राखण्यासाठी ज्याने सर्वोच्च बलिदान दिले त्याच्या सौभाग्याचं कुंकू असं मातीमोल करून टाकण्याचा अधिकार कुणी का घ्यावा आपल्या हाती?

उद्या पहिली माळ….जगदंबा उद्या युद्धाला आरंभ करेल…दानवांच्या रुधिराच्या थेंबांनी तिचं अवघं शरीर माखून जाईल आणि कपाळ रक्तिम..लाल दिसू लागेल. जगदंबा अखंड सौभाग्यवती आहे…कारण देवांना मृत्यूचा स्पर्श नसतो होत. मग तिच्या लेकींना तरी या पिवळ्या-लाल रंगाच्या रेखाटनाविना कशी ठेवेल ती? 

जगदंबेची लढाई तर केंव्हाच संपून गेली….दानव धुळीस मिळवले तिने. तिच्या देहावरील रक्त केंव्हाच ओघळून जमिनीत मुरून गेलंय. आता आपण अनुभवतो तो स्मरणाचा आणि राक्षसांच्या मरणाचा सोहळा. नवरात्र हे प्रतीक आहे त्या रणाचं. आया-बायांनो,बहिणींनो,सौभाग्यवतींनो..आजच्या पहिल्या माळेला तुम्ही किमान माझ्यासारखीच्या भाळावर तरी हळदी-कुंकवाची दोन बोटं उठवलीत ना तर हुतात्म्यांचे आत्मे तृप्त होतील, सीमेवर लढणारी इतरांची सौभाग्यं आणखी प्राणपणानं झुंजतील. कारण आपल्या माघारी आपल्या  नावाचं सौभाग्य पुसलं जाणार नाही ही जाणीव त्यांना प्रेरणा देत राहील.

स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवरायांनी जिजाऊ मांसाहेबांना शहाजीराजेसाहेबांच्या मागोमाग सती नाही जाऊ दिलं….त्यांच्या चितेच्या समोर हात पसरून उभं राहून त्यांनी आईसाहेबांना रोखून धरलं. राज्याभिषेकातल्या होमातील रक्षा जिजाऊंनी आपल्या कपाळी लावली. जिजाऊ राहिल्या म्हणूनच स्वराज्याच्या कपाळावर स्वातंत्र्याचा कुंकुमतिलक सजू शकला.शूर धुरंधराची स्वाभिमानी पत्नी आणि लाखो कपाळांवरील कुंकू टिकावं म्हणून जीवाचं रान करणा-या शूर सुपुत्राची माता म्हणून जिजाऊसाहेबांचा मान उभ्या महाराष्ट्राने राखला. असाच मान आजही हुतात्म्यांच्या पत्नींना,मातांना,लेकींना मिळावा हे मागणं फार नाही !  

आज मी निर्धारानेच आले आहे आईच्या गाभा-यात…तुम्हां भरल्या कपाळांच्या पावलांवर पाऊल टाकून. .. पण आज मी ठरवलं….देवीसमोर जाऊन तिच्याकडे आणखी काहीतरी मागायचं….एक आठवण आहे सौभाग्याची माझ्या पदरात..त्यांचा लेक….त्यालाही मातृभूमीच्या सेवेत धाडायचं ! 

*************************************  

रास्ते मे विधवा वीर-वधू को देख; 

एक नववधु ठिठक गई !

यह विधवा मेरे रस्ते में; 

क्यों आकर ऐसे अटक गई?

तुम यहां कहां चली ;आई हो भोली !

यह नववधुओं की तीज सखी; 

यह नहीं अभागन की टोली !

यह सुनकर वह वीर पत्नी बोली

मुझको अपशकुनी मत समझो 

मैं सहयोगिनी उसे सैनिक की; 

जो मातृभूमि को चूम गया !

तुम सब का सावन बना रहे; 

वो मेरा सावन भूल गया!

तुम सब की राखी और सुहाग; 

वो मंगलसूत्र से जोड़ गया !

तुम सब की चूड़ी खनकाने; 

वो मेरी चूड़ी तोड़ गया !

मेरी चुनरी के लाल रंग; 

वो ऐसे चुरा गया!

उनकी सारी लालिमा को; 

तुम्हारी चुनरी में सजा गया !

उनकी यादों की मंदिर में; 

मैं आज सजने आई हूं !

मेरा बेटा भी सैनिक हो; 

भगवान को मनाने आई हूं !

विधवा प्रथेला मूठमाती देण्याचा स्तुत्य उपक्रम काही सामाजिक संस्थांनी हाती घेतला आहे. सैनिक आणि त्यांच्या परिवारांसाठी कार्यरत असणा-या जयहिंद फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने हुतात्मा सैनिकांच्या शूर सौभाग्यवतींसाठी आणि इतर भगिनींसाठी विधवा प्रथेला मूठमाती देऊन वीरपत्नींना सन्मानित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यातीलच एका वीर सैनिक – वीर पत्नीची कहाणी वाचून हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. उपरोल्लेखित हिंदी कविता त्यांच्याच लेखात आहे. आज नवरात्रातली पहिली माळ….चला उजाड कपाळांवर सौभाग्याचा सूर्य रेखूया….जयहिंद ! 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ०८ ऑक्टोबर २०२३ – “भारतीय वायुसेना दिन” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ०८ ऑक्टोबर २०२३ – “भारतीय वायुसेना दिन” ☆ सौ राधिका भांडारकर 

भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलाच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे.

भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.

भारतीय वायुसेनेचे ध्येय वाक्य आहे—

।।नभ: स्पृशं दीप्तम्।।

हे वाक्य गीतेतल्या एका श्लोकात आलेले आहे. (भगवद्गीता ११.२४)

भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती राधाकृष्णन्  यांनी हे वाक्य सुचविले. त्याचा अर्थ असा आहे “हे! विष्णो, आकाशस्पर्शी ज्योती सारखा आणि अनेक वर्णयुक्त, उघड्या मुखाच्या आणि प्रज्वलित विशाल नेत्राच्या तुला पाहून भयभीत झालेल्या माझ्यामध्ये धैर्य आणि शांती नाहीशी झाली आहे.”

थोडक्यात ज्या भयभीत झालेल्या अर्जुनातली वीरश्री जागृत करण्याचं काम भगवंताने केले त्याप्रमाणे वायुसैनिकांना हे घोषवाक्य लढण्यास प्रवृत्त करते.

८ ऑक्टोबर १९३२  रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना झाली म्हणून ८ ऑक्टोबर हा भारतीय वायुसेना दिन समजला जातो. सुब्रतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते. 

ब्रिटिशकालीन वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एअर फोर्स असे होते (१२ मार्च १९४५). मात्र स्वातंत्र्यानंतर त्यातले रॉयल जाऊन भारतीय वायुसेना दल असे त्याचे नामकरण केले गेले. 

१९४७ मध्ये विमानांना पिस्टन वर चालणारी इंजिने बसवलेली असत. नंतर वेगवान जेट विमाने आली. नेट, हंटर कॅनबेरा यासारखे ब्रिटिश बनावटीची विमाने वायुसेनेत सहभागी झाली. परराष्ट्रीय धोरणानंतर रशियन हेलिकॉप्टर्स वायुसेनेत दाखल झाली. सध्याच्या काळात रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वाॅरफेअर सी —४—आय संगणकीय सुविधा वायुसेनेकडे आहे. हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूरस्थ शत्रूच्या विमानाची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरच्या शत्रूंच्या तळाचा शोध घेणारी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे भारतीय वायुसेनेत सहभागी आहेत. येत्या काही वर्षात हवाई दलाच्या यादीत २२० एलसीए चा(L C A) ताफा असेल.त्यामुळे भारतीय वायुसेना जगातील सर्वोच्च वायुदल आहे.

भारतीय वायुसेनेचे प्रमुख मिग२९या लढाऊ विमानाचे पायलट  विवेक राम चौधरी हे  आहेत. ते  २७वे एअर चीफ मार्शल आहेत.(३० सप्टेंबर २०२१) ते नांदेडवासी आहेत.महाराष्ट्रासाठी ही गौरवशाली बाब आहे. 

वायुसेना दिनाच्या वेळी भारतीय हवाई दलाचे धाडसी वैमानिक लष्कराच्या विविध विमानांसह एक अप्रतिम एअर शो करतात. विशेष पराक्रम गाजवण्यार्‍या हवाईदल सैनिकांना सन्मानचिह्ने दिली जातात. यावर्षीचा हा ९१ वा वायुसेना वर्धापन दिन आहे. यावर्षीचा फ्लाय पास्ट उत्तर प्रदेश मधील सांस्कृतिक नगरी प्रयागराज इथे होणार आहे.

भारतीय वायुसेना म्हणजे भारताचा अभिमान आणि शान आहे. 

प्राणपणाने भारतीय सीमांचे रक्षण करणाऱ्या या वायुसैनिकांना मानाचा मुजरा !!

वंदे भारत ! 🇮🇳

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘सीडी’ देशमुख !– रिझर्व्ह बॅंकेचे सर्वात तरुण पहिले भारतीय गव्हर्नर… लेखक : श्री संकेत कुलकर्णी ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

सीडी’ देशमुख !– रिझर्व्ह बॅंकेचे सर्वात तरुण पहिले भारतीय गव्हर्नर… लेखक : श्री संकेत कुलकर्णी ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

२ ऑक्टोबर. आज पुण्यतिथी आहे एका थोर माणसाची. ह्या माणसाचा जन्म १४ जानेवारी १८९६ चा – महाडजवळ ‘नाते’ गावात – हा माणूस १९१२ साली मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिक परिक्षेत पहिला आला (तीपण संस्कृतची ‘जगन्नाथ शंकरशेट’ शिष्यवृत्ती मिळवून!) – पुढे उच्च शिक्षणासाठी हा माणूस शिष्यवृत्ती घेऊन केंब्रिजला गेला – १९१५ साली त्याने वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, आणि भूगर्भशास्त्र ह्या तिन्ही विषयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत त्याची पदवी पूर्ण केली – १९१८ मध्ये वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी तो आयसीएस परिक्षेत चक्क पहिला आला – लोकमान्य टिळकांना भेटून त्यांच्याकडे ह्या माणसाने इच्छा व्यक्त केली की सरकारी नोकरी न करता त्याला देशकार्य करायची इच्छा आहे – पण लोकमान्यांनी त्याला सांगितले की ह्या नोकरीचा अनुभव स्वराज्यात कामी येईल – लोकमान्यांची ही विनंती शिरसावंद्य मानून ह्या माणसाने ही सरकारी नोकरी करायचे ठरवले – मध्य प्रांतात महसूल सचिव, वित्त सचिव अशी पदं भूषवली (ह्या पदांवर काम करणारा हा सर्वात तरूण आयसीएस अधिकारी होता!) – 

सुमारे २१ वर्ष ह्या माणसाने सरकारी नोकरी केली – १९३१ मध्ये गांधीजींबरोबर गोलमेज परिषदेला हा माणूस सचिव म्हणून गेला होता – १९४१ मध्ये तो रिझर्व्ह बॅंकेचा डेप्युटी गव्हर्नर बनला – ११ ऑगस्ट १९४३ रोजी बॅंकेचा गव्हर्नर जेम्स टेलरच्या मृत्यूनंतर हा माणूस रिझर्व्ह बॅंकेचा सर्वात तरूण आणि पहिला भारतीय गव्हर्नर बनला – दुसऱ्या महायुद्धाचे चटके जागतिक अर्थव्यवस्थेला बसत होते त्यावेळेस ह्या माणसाने योग्य उपाययोजना करून अर्थव्यवस्थेला योग्य प्रकारे हाताळले – ह्या कामाबद्दल २१ मार्च १९४४ रोजी ह्याला ब्रिटीश सरकारने ‘सर’ पदवीचा बहुमान दिला – बॅंकेच्या नोकरीत असतानाच भारतीय स्वातंत्र्याच्या संक्रमणकाळात हा माणूस व्हाईसरॉयज कौन्सिलवर वित्तप्रमुख म्हणून नेमला गेला – १९४९ मध्ये ह्या माणसाने बॅंकेच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पुन्हा इंग्लंडमध्ये जायची तयारी केली होती (कारण १९२० मध्येच त्याने रोझिना विलकॉक्सशी लग्न केले होते आणि त्यांना १९२२ साली मुलगीही झाली होती – तिचं नाव प्रिमरोझ) – पण नेहरूंनी पुन्हा विनंती केल्याने ह्या माणसाने रिझर्व्ह बॅंकेची धुरा पुन्हा सांभाळली – 

१९५२ साली हा माणूस कुलाबा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढला आणि जिंकलाही (कारण तो ‘कॉंग्रेस’चा सदस्य कधीच नव्हता!) – ह्या माणसाला नेहरूंनी अर्थमंत्री बनवलं – भाषावार प्रांतरचनेच्या मुद्द्यावरून नाराज होऊन ह्या माणसाने पुढे राजीनामा दिला – त्यानंतरही ‘विद्यापीठ अनुदान आयोग’ (युजीसी) चा पहिला अध्यक्ष म्हणून ह्याची नेमणूक झाली – शिक्षणक्षेत्रातही ह्या माणसाने भरपूर योगदान दिलं – आयुष्याच्या उत्तरार्धात हा माणूस हैदराबादला स्थायिक झाला आणि २ ऑक्टोबर १९८२ रोजी ह्याचं निधन झालं – हा माणूस म्हणजे सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख – उपाख्य ‘सीडी’ देशमुख !

त्यांच्या मृत्यूची फारशी दखलही भारतीय सरकारदरबारी घेतली गेली नाही. इतकी पदं भूषवलेल्या सीडींना साधी सरकारी मानवंदनाही मिळाली नाही. सीडींचे देशप्रेम मात्र निर्विवाद होते. आयुष्यभर देशासाठी ते झटले होते. आपली मूळ पाळंमुळं ते कधीच विसरले नव्हते. ह्याचं उदाहरण म्हणजे – सीडींनी इंग्लंडमध्ये एसेक्स परगण्यामध्ये ‘साऊथऐंड ऑन सी’ गावाजवळच्या ‘वेस्टक्लिफ ऑन सी’ गावात एक टुमदार बंगला बांधला होता आणि त्याचं नाव ठेवलं होतं ‘रोहा’ – कारण रायगड तालुक्यातलं रोहा हे सीडींचं मूळ गाव! रोह्याचं नाव इंग्लंडमध्ये ठेवणाऱ्या सीडींच्या जन्मगावात – महाडजवळ ‘नाते’ गावात – जिथे सीडींचा जन्म झाला होता – ते घर आजही बंद आणि पडझड झालेल्या अवस्थेत कसंबसं उभं आहे. देशभक्तांची आणि त्यांच्याशी निगडीत वास्तूंची अशी अनास्था करण्याची आपली सवयही तशी जुनीच आहे. हे चालायचंच !

आज ४१ व्या स्मृतीदिनी सर चिंतामणराव देशमुखांना सादर मानवंदना !

लेखक : श्री संकेत कुलकर्णी (लंडन)

(पहिला फोटो:  १९५२ साली एलिझाबेथ राणीच्या राज्यारोहणास गेलेल्या पाहुण्यात सीडी (सर्वात उजवीकडचे), इंग्रजी राजमुद्रा असणाऱ्या नोटेवर सीडींची गव्हर्नर म्हणून सही.) 

माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता – अध्याय पहिला – (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पहिला — भाग पहिला – (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।

न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे৷৷३१৷৷

न काङ्‍क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।

किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा ॥३२॥

येषामर्थे काङक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।

त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ৷৷३३৷৷

आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।

मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः संबंधिनस्तथा ॥३४॥

एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।

अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ৷৷३५৷৷

निहत्य धार्तराष्ट्रान्न का प्रीतिः स्याज्जनार्दन ।

पापमेवाश्रयेदस्मान्‌ हत्वैतानाततायिनः৷৷३६৷৷

तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान्‌ ।

स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥३७॥

यद्यपेते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।

कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे य पातकम् ॥३८॥

कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम्‌ ।

कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ৷৷३९৷৷

कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।

धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥४०॥

मराठी भावानुवाद !!!!!

सगे सोयरे माझे वधुनी काय व्हायचे कल्याण

मना माझिया खचित जाणवे कृष्णा हे अवलक्षण ॥३१॥

इच्छा नाही विजयाची नको भोगण्या राज्यसुख

स्वजनांचा करूनी निःपात नको राज्य ना आयुख ॥३२॥

ज्यांच्याकरिता राज्याकांक्षा आशा सुख भोगायाची

प्राण-धनाची इच्छा सोडुन उर्मी त्यांना लढण्याची ॥३३॥

गुरुजन पुत्र पितरांसह अमुचे पितामह

मातुल  श्वशुर पौत्र मेहुणे  सगे सोयरे सकल ॥३४॥

शस्त्र तयांनी जरी मारले यांना ना वधिन

त्रैलोक्याचे राज्य नको मज पृथ्वीचे शासन ॥३५॥

हत्या करुनी कौरवांची या काय भले होइल

स्वजना वधुनी अविवेकाने पाप मला लागेल ॥३६॥

नच वधीन मी या स्वजनांना कदापि हे माधवा

कुटिल जरी ते तयासि वधणे दुरापास्त तेधवा ॥३७॥

धार्तराष्ट्र्यांची बुद्धी नष्ट झाली मोहाने

कुलक्षयाचे द्रोहाचे पाप न त्यांच्या दृष्टीने ॥३८॥

कुलक्षयाचा दोष जाणतो आम्ही अंतर्यामी

विन्मुख खचित व्हावे ऐश्या पापापासुन आम्ही ॥३९॥

कुलक्षयाच्या नाशाने कुलधर्माचा हो अस्त

नाशाने धर्माच्या बुडते समस्त कुल अधर्मात ॥४०॥

– क्रमशः भाग पहिला 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘भाषांतर दिन’… लेखक – अज्ञात ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘भाषांतरदिन…’ – अज्ञात ☆ सौ. गौरी गाडेकर

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून भारतातून फारसी भाषेचं महत्त्व कमी होत गेलं. पण त्यापूर्वीच भारतातील असंख्य ग्रंथांची भाषांतरं फारसीत झालेली होती. हीच भाषा होती जिच्यामुळे भारतीय भाषेतल्या साहित्याची मौलिकता पाश्चिमात्त्यांना कळली. ‘सिरीं-ए-अकबर’ या नावानं दारा शिकोहनं पासष्ट उपनिषदांचं फारसीत भाषांतर केलं होतं. त्याच्या प्रस्तावनेत तो म्हणतो, ” ही उपनिषदं म्हणजे अद्वैताची भांडारं होत. मी त्यात काहीही फेरबदल न करता शब्दशः भाषांतर केलं आहे.” 

‘सिरीं ए अकबर’ एका फ्रेंच प्रवाश्याच्या हातात पडलं. त्याचं नाव होतं आंकतिल द्युपेरां. त्यानं ते फ्रेंचमध्ये आणि लॅटिनमध्ये केलं. ते आर्थर शॉपेनहॉअरसारख्या लेखकाच्या हातात पडल्यावर तो आनंदानं वेडा झाला. 

दारा शिकोहनं बरीच पुस्तकं लिहिली. सूफी आणि हिंदू तत्त्वज्ञानातील सामायिकतेचा तो शोध होता. त्यानंच योगवसिष्ठ आणि प्रबोधचंद्रिकेचं भाषांतर केलं. तसेच भगवतगीतेचं भाषांतर ‘मज्मुअल बहरैन’ या नावानं केलं होतं. 

अकबरानं तर भाषांतरासाठी खातंच सुरु केलं होतं. त्याच्या काळात रामायणाची बरीच भाषांतरं झाली. अब्दुल कादर बदायुनी आणि नकीबखाननं केलेल्या भाषांतरांत चक्क मध्यपूर्वेतल्या दंतकथा आणि संदर्भही आले होते. ही भाषांतरं म्हणजे मूळ संहितेची पुनर्कथनं होती. याच काळात मुल्ला मसीह कैरानवीनं स्वतंत्रपणे रामायणाचं भाषांतर केलं. मुल्ला शेरी आणि नकीबखाननं महाभारताचं ‘रज्मनामा’ या शीर्षकानं भाषांतर केलं. ते जयपूरच्या संग्रहालयात पाहता येतं. बदायुनीनंनं सिंहासनबत्तिशी ‘नामां-ए-खिरद अफ़जा’ या नावानं फारसीत नेलं (१५७५). मुल्ला शेरीनं हरिवंशाचंही भाषांतर केलं होतं. बदायुनी, हाजी इब्राहिम आणि फैजी या तिघांनी मिळून अथर्ववेदाचं भाषांतर १५७६ साली केलं होतं. सगळ्यात रोचक म्हणजे यातला फैजी हा सर्जक कवी होता. त्याला नलदमयंती आख्यान अतिशय आवडलं होतं. सोळाव्या शतकाच्या अखेरीला (१५९५) त्यानं ते ‘नलदमयंती’ या नावानं भाषांतरित केलं. 

दक्षिणेत गोवळकोंड्याचा अकबरशहा (१६७२-८७) हा साहित्यप्रेमी होता. (तो गुलबर्ग्याचे संत बंदेनवाज गेसूदराज यांचा वंशज). त्याला तेलुगू, हिंदी, संस्कृत, पर्शिअन, दखनी या भाषा येत. त्यानं ‘शृंगारमंजिरी’ हा ग्रंथ लिहिला. त्यासाठी त्यानं रसमंजिरी, आमोद, परिमल, शृंगारतिलक, रसिकप्रिय, रसार्णव, प्रतापरुदीय, सुंदरशृंगार, दशरूपक या हिंदी-संस्कृत ग्रंथांचा आधार घेतला होता. मूळ ग्रंथ तेलुगूत लिहून त्यानं तो संस्कृतमध्ये नेला. त्याची प्रत तंजावरच्या म्युझियममध्ये पाहता येते. 

भारतात सोळाव्या-सतराव्या शतकांत हजारो फारसी ग्रंथ लिहिले गेले. त्यातल्या काही बखरी आहेत, राज्यकारभाराचे वृत्तांत आहेत. बादशहांची चरित्रं आहेत. प्रवासवर्णनं आहेत. पर्यावरण, औषधीविज्ञान, इतिहास, दास्तां असा त्यांचा विस्तार आहे. 

त्या सगळ्या भाषांतरकर्त्यांचंही आजच्या दिवशी स्मरण….. 

.

शहाजहान आणि दाराशिकोहचं रेम्ब्रांनं केलेलं ड्रॉईंग खाली दिलेले आहे. 

 सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares