मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य– ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य– ☆ श्री राजीव गजानन पुजारी 

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाईच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडूजी निमसे पाटील होते. १८४० साली  महात्मा ज्योतिराव फुले या थोर समाजसुधारकांसोबत, सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी त्यांचे वय नऊ वर्ष तर, ज्योतिरावांचे वय तेरा वर्षे होते. त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतः एक महान विचारवंत, कार्यकर्ते, समाज सुधारक, लेखक, तत्त्वज्ञ, संपादक आणि क्रांतिकारक होते.

सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावसआत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले.     सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ मनुवादी समाजाच्या विरोधाला न जुमानता सावित्रीबाईंनी विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या.    तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. (यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. 

सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला फक्त सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी –  ” धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. मनुवादी सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. पण असे अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही, अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत… जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.

केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे, अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली.  सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.

इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला. स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळावा हेही त्यांचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले.

इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या भयंकर साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. आणि दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेगमुळेच  दि. १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे दु:खद निधन झाले.

© श्री राजीव गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नाग वासुकी मंदिर, प्रयाग… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

(फोटो मोठा करून पाहिल्यास त्यातील सौंदर्य स्पष्ट दिसू शकेल.)

☆ नाग वासुकी मंदिर, प्रयाग… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

वरील चित्रातली ही मूर्ती एकाच दगडात कोरून बनवलेली आहे असे सांगितले तर कदाचित खरे वाटणार नाही. ती कशी बनवली गेली हे एक तो देव, नाहीतर तो मूर्तिकारच जाणे असे आश्चर्याने म्हटले जाते.

हे आहे “ नाग वासुकी मंदिर ” प्रयाग. 

पाहिल्यापाहिल्या हा एक वटवृक्ष आहे असेच वाटते. पण नाही. हे सर्व नक्षीकाम भल्यामोठ्या दगडावर कोरून केले गेलेले आहे. 

आपल्या भारतात प्राचीन काळातल्या अशा अनेक सुंदर आणि आश्चर्यकारक वाटणाऱ्या गोष्टी अजूनही बघायला मिळतात, ज्या पाहून, त्या कशा बनवल्या असतील याचे आश्चर्यमिश्रित कौतुक बघणाऱ्या प्रत्येकालाच वाटल्याशिवाय रहात नाही. पण त्या कशा बनवल्या असतील हा प्रश्न एखाद्या न सुटणाऱ्या कोड्यासारखा वाटत रहातो. 

अशी अविश्वसनिय कलाकारी बघायची असेल तर अशा स्थळांना आवर्जून भेट द्यायला हवी. 

लेखक : अज्ञात 

माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पुण्याचे वैभव महात्मा फुले मंडई…” – ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “पुण्याचे वैभव महात्मा फुले मंडई…” – ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

पुण्याचे वैभव समजली जाणारी ‘ महात्मा फुले मंडई ‘ ही १४२ वर्षे पूर्ण होऊन १४३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. 

इ. स. १८८० साली पुण्याची लोकसंख्या ९०,००० होती.  पुण्यात बंदिस्त जागेत एक मोठी मंडई उभी झाली पाहिजे, म्हणून सन १८८२ साली पुणे नगर पालिकेत एक ठराव झाला.  त्याला महात्मा फुले व चिपळूणकरांनी विरोध केला होता. पण बहुमताच्या जोरावर तो ठराव पास झाला. 

सरदार खासगीवाले यांची बाग-वजा ४ एकर जागा ही ४०,०००रुपयांना खरेदी केली गेली होती  व त्यावेळेचे बांधकाम अभियंते वासुदेव बापूजी कानिटकर यांनी केले होते. या कामासाठी ३ लक्ष रुपये खर्च आला होता. 

या कामासाठीचा  वाहतूक खर्च कमी व्हावा म्हणून पिंपरी चिंचवड येथून सिमेंट, चुना, बेसॉल्ट दगड आणले गेले होते. ह्यावरील खांबांवर ग्रीक पानांची नक्षी आहे. रोमन शैलीमध्ये हे बांधकाम केले गेले. ते अष्टकोनी असून मध्यभागी कळस आहे, जो ८० फूट उंचीचा आहे. 

१ ऑक्टोबर १८८६ रोजी  मुंबईचे गव्हर्नर जनरल रे यांच्या हस्ते या मंडईचे उद्घाटन झाले होते. त्यांच्याच नावावरून या मंडईला तेव्हा “ रे मार्केट “ हे नाव दिले गेले होते. पुढे सन १९३९/४० मध्ये आचार्य अत्रे यांनी तिचे “ महात्मा फुले मंडई “  असे नामकरण केले.

मंडईला ‘ मंडई विद्यापीठ ‘ हे नाव काकासाहेब गाडगीळ यांनी दिले,  कारण इथे खरेदी करायला येणारा असो की व्यवसाय करणारा असो,  कुणीच कधीच व्यवहारात चुकत नाही, अशी तेव्हा या मंडईची ख्याती होती. नंतर बऱ्याच वर्षांनी ही इमारत अपुरी पडायला लागल्याने या मूळ इमारतीच्या शेजारीच आणखी एक मोठी जागा घेऊन तिथेही भाजी बाजार भरायला सुरुवात झाली, ज्याला सुरुवातीला ‘ नवी मंडई ‘ असे म्हटले जात असे. 

या जागेला लागूनच असलेल्या एका प्रशस्त जागेत गेली अनेक वर्षे सार्वजनिक मंडई मंडळाचा गणपती ठेवला जातो. आणि श्री शारदेसह झोपाळ्यावर बसलेली ही मोठी गणेश मूर्ती हे अनेक पुणेकरांचे एक श्रद्धास्थान आहे, जिथे गणेशोत्सवात दर्शनासाठी पुणेकर प्रचंड गर्दी करतात. 

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता – अध्याय पहिला – ( श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पहिला — भाग पहिला – ( श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

अर्जुन उवाचः

हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।

सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ৷৷२१৷৷

यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान्‌ ।

कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे ৷৷२२৷৷

योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।

धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ৷৷२३৷৷

एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।

सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्‌ ৷৷२४৷৷

भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्‌ ।

उवाच पार्थ पश्यैतान्‌ समवेतान्‌ कुरूनिति ||२५||

तत्रापश्यत्स्थितान्‌ पार्थः पितृनथ पितामहान्‌ ।

आचार्यान्मातुलान्भ्रातृन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ||२६||

श्वशुरान्‌ सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि |

तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्‌ बन्धूनवस्थितान्‌ ||२७||

दृष्टेवमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्‌ ৷৷२८৷৷

सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति।

वेपथुश्च शरीरे में रोमहर्षश्च जायते ৷৷२९৷৷

गाण्डीवं स्रंसते हस्तात्वक्चैव परिदह्यते ।

न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ৷৷३०৷৷

मराठी भावानुवाद :: 

कथिले अर्जुनाने..

श्रोकृष्णासी तेव्हा कथिता झाला पार्थ

दो सैन्यांच्या मध्ये घेउनी जाई माझा रथ ॥२१॥

कोण उपस्थित झाले येथे करावयासी युद्ध 

अवलोकन मी करीन त्यांचे होण्यापूर्वी  सिद्ध

दुर्योधनासी त्या अधमासी साथ कोण करतो 

कोणासी लढणे मज प्राप्त निरखुनिया पाहतो ॥२२, २३॥

कथिले संजयाने 

धनंजयाने असे बोलता श्रीकृष्णाला धृतराष्ट्रा

मधुसूदनाने नेले दोन्ही सैन्यांमध्ये उत्तम शकटा ||२४||

अवलोकी हे पार्था तुझ्या शत्रूंच्या  श्रेष्ठ योद्ध्यांना 

भीष्म द्रोणासवे ठाकल्या महावीर बलवानांना ||२५||

अपुल्या आणिक शत्रूच्या सैन्यावरती नजर फेकली पार्थाने 

विद्ध जाहला मनोमनी तो अपुल्याच सग्यांच्या दर्शनाने ||२६||

शस्त्रे अपुली सोयऱ्यांवरी विचार येउनी मनी 

विषण्ण झाला कणव जागुनी अतोनात मनी

अयोग्य अपुले कर्म जाणुनी  पाहुनी स्वजनांना 

खिन्न होऊनी वदला अर्जुन मग त्या श्रीकृष्णा ||

युद्धाकरिता सगेसोयरे शस्त्रसज्ज पाहुनिया ॥ २७, २८॥

गलितगात्र मी झालो जिव्हेला ये शुष्कता

देह जाहला कंपायमान कायेवरती काटा ॥२९॥

गळून पडले गाण्डीव दाह देहाचा  होई

त्राण सरले पायांमधले भ्रमीत माझे मन होई ॥३०॥

– क्रमशः… 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नदाव बन येहुदा … लेखक : श्री मनीष मोहिले ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

☆ नदाव बन येहुदा … लेखक : श्री मनीष मोहिले ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

आजच व्हॉटसअप वरती एक पोस्ट वाचनात आली. इस्राएलचा चोवीस वर्षीय युवा गिर्यारोहक नदाव बन येहूदा ह्याने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट अर्थात सागरमाथा सर करायला फक्त तीनशे मीटर बाकी राहीले असताना देखील शिखर सर करण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि तरीही आज जगात ही बातमी वाचलेल्या सर्वांच्या कौतुकाचा विषय तो बनून राहिला असेल हे नि:संशय.

कारण नदावने दुसऱ्या एका गिर्यारोहकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या वैयक्तिक विक्रम, कीर्ती, उपलब्धि ह्या गोष्टीना दुय्यम स्थान देत मूल्य आणि मूल्य संस्कार ह्याना श्रेष्ठ मानत “योग्य” गोष्ट केली.

त्याच्याच शब्दात सांगायचे तर “एव्हरेस्ट वरील माझ्या चढाईच्या मार्गात मला दोन मृतदेह दिसले की जे गिर्यारोहक नुकतेच मृत झाले असावेत. मी ज्या दोराच्या आधाराने चढत होतो त्यालाच ते लटकलेले होते. अंगातील त्राण संपल्यामुळे आहे तिथेच स्वतःला anchor करून ते तिथे थांबले आणि कदाचित कोमात जाऊन मृत झाले. त्यांना पार करून सर्व पुढे जात होते. आणि नंतर मला तो दिसला – तुर्कस्तानचा आयदिन इरमाक. आम्ही खाली कॅम्पमध्ये भेटलो होतो आणि आता तो हेल्मेट नाही, ऑक्सिजन मास्क नाही, ग्लोव्हज नाहीत, अशा परिस्थितीत शेवट होण्याची वाट पहात होता. इतर काही गिर्यारोहक त्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेले. मात्र मी दुर्लक्ष करू शकलो नाही, आणि मी वैयक्तिक विक्रम आणि दुसऱ्या एका मनुष्याचे प्राण ह्यात दुसऱ्या गोष्टीची निवड केली.”

नदावने हा निर्णय घेतला खरा; पण तो अमलात आणणे हे तितकेच कठीण काम होते. बेशुद्ध पडलेल्या आयदिनला उचलून खाली आणणे कर्मकठीण होते, कारण त्याचे आणि स्वत:चे दोघांचे ओझे सांभाळत उतरायचे होते. आयदिन बेशुद्ध असल्यामुळे जास्त भारी वजनाचा भासत होता. अधूनमधून त्याला शुद्ध यायची, पण त्यात तो वेदना असह्य होऊन ओरडायचा. अशा परिस्थितीत खाली येताना नदावचा स्वतः चा ऑक्सिजन मास्क फाटला. ग्लोव्हज काढावे लागले. त्यामुळे त्याला स्वतः ला बोटांना हिमदंश झाला. वाटेत त्याला अजून एक मलेशियन गिर्यारोहक भेटला की जो सुद्धा मरण्याच्या मार्गावर होता. वर जाणाऱ्या काही climbers कडून नदावने त्या दोन अत्यवस्थ climbers साठी ऑक्सिजन सिलिंडर मिळवली आणि नऊ तासांच्या भगीरथ प्रयत्नानंतर त्या दोघांना घेऊन कॅम्पपर्यंत पोचण्यात तो यशस्वी झाला. तेथून हेलिकॉप्टरने त्यांना काठमांडू येथे नेऊन इस्पितळात दाखल केले आणि उपचार सुरू झाले. दोन जीव वाचवण्यात नदाव यशस्वी झाला.

जीवनात काही असे परीक्षेचे क्षण येतात जिथे तुम्ही कशा प्रकारचे मनुष्य आहात, तुमची मूल्य व्यवस्था कशी आहे आणि त्या मूल्यांसाठी तुम्ही किती मोठा त्याग करू शकता वा किंमत देऊ शकता हे स्वतः शीच नक्की करावं लागतं. अशा परीक्षेच्या क्षणी नदावने, एव्हरेस्ट सर करणारा सर्वात कमी वयाचा इस्रायली गिर्यारोहक ह्या सन्मान व कीर्तीचा त्याग करत मानवतेच्या सर्वोच्च मूल्याला प्राथमिकता दिली आणि जगासाठी एक धडा दिला. गिर्यारोहणाच्या धाडसी खेळातील अत्युच्च मूल्य ओळखून त्याप्रमाणे वागत एक अनोखे धैर्य दाखवले. 

एकीकडे मानसन्मान, वैयक्तिक महत्वाकांक्षेची पूर्तता, सर्वोच्च शिखर सर करण्याची वैयक्तिक स्वप्नपूर्ती हे सारे, आणि दुसरीकडे दुसऱ्या मनुष्याचा जीव वाचवण्याचा अशक्यप्राय प्रयत्न ज्यात वरील मानसन्मान, कीर्ती, स्वप्नपूर्ती, महत्त्वाकांक्षापूर्ती ह्या गोष्टींच्या त्यागावरोबरच एक अजून भयंकर शक्यता होती आणि ती म्हणजे स्वतः चा जीव गमावण्याची. पण नदाव नियतीने पुढे वाढून ठेवलेल्या अती कठीण परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि with flying colors he passed.

आज भले नदावला सागरमाथा सर करता आला नसेल. भविष्यात तो हे लक्ष्य गाठेल किंवा नाही गाठू शकणार. मात्र तो कायम स्वतः ला ताठ मानेने आरशात बघू शकेल, त्याच्या कुटुंबियांना, मित्रांना डोळ्याला डोळा भिडवून भेटू शकेल आणि दुसऱ्याचा जीव वाचवण्याचे जे अलौकिक समाधान आहे ते कायम त्याच्या उराशी असेल.

आज सागरमाथा सर न करता सुद्धा, “ नदाव बन येहुदा “ सर्व जगातील लोकांच्या मनात सर्वोच्च शिखरावर विराजमान झाला असेल ह्यात शंका नाही.

लेखक : श्री मनीष मोहिले

प्रस्तुती : माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अथर्वशीर्ष म्हणजे काय…?  ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? इंद्रधनुष्य ?

अथर्वशीर्ष म्हणजे काय…? ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

थर्व म्हणजे  हलणारे आणि 

अथर्व म्हणजे ‘ न हलणारे ‘ शीर्षम् ‘ !!

सुलभ भाषेत सांगायचं म्हणजे अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी असलेलं मस्तक…!! 

 

अथर्वशीर्षाचं पठण केलं, की बुद्धी आणि मन स्थिर होतं. स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेलं काम हे नेहमी यशस्वी होतं. आत्मविश्वास वाढू लागतो, माणूस नम्र होतो. अथर्वशीर्ष पठणामुळं मन एकाग्र होतं. 

आपल्या मनाची ताकद वाढविणं, हे आपल्याच हातात असतं. माणसाचं मन ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. 

शरीराबरोबरच मन कणखर असलं तर मग आपण संकटांवर मात करू शकतो. 

 

तुम्ही कधी अथर्वशीर्षाचा पाठ म्हटला आहे का ? एकदा तरी अनुभव घेण्यास हरकत नाही.

तुम्ही श्रद्धाळू असाल, तर माझं हे म्हणणं तुम्हाला नक्कीच पटेल. जर तुम्ही श्रद्धाळू नसाल,आणि प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत असाल, तरीही अथर्वशीर्ष तुम्हाला नक्कीच आवडेल. 

कारण अथर्वशीर्षामध्ये गणेश म्हणजे या विश्वातील निसर्ग…!! पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाशक्तीच आहे, असे म्हटले आहे. 

हा निसर्ग म्हणजेच ईश्वर हे म्हणणं तुमच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला नक्कीच पटेल. या निसर्गाला आपण जपलेच पाहिजे. तरच निसर्ग आपणास जपेल असेही म्हणता येईल.

 

अथर्वशीर्षाचा अर्थ         

मूळ श्रीगणपती अथर्वशीर्ष संस्कृतमध्ये आहे.  आपण आज त्याचा मराठी अनुवाद पाहू या. 

‘हे  देवहो, आम्हांला  कानांनी शुभ ऐकायला मिळो. डोळ्यांनी चांगलं पाहावयास मिळो. 

सुदृढ अवयवांनी आणि शरीरांनी देवानं (निसर्गानं) दिलेलं आयुष्य देवाच्या (निसर्गाच्या) स्तवनात व्यतीत होवो. 

सर्वश्रेष्ठ इंद्र आमचं रक्षण करतो. ज्ञानवान सूर्य आमचं कल्याण करतो. 

संकटांचा नाश करणारा गरूड आमचं कल्याण करतो. बृहस्पती आमचं कल्याण करतो.

सर्वत्र शांती नांदो…!! 

ॐकाररूपी गणेशाला नमस्कार असो.

..  तूच  ब्रह्मतत्त्व आहेस. तूच सकलांचा कर्ता(निर्माता) आहेस. तूच सृष्टीचे धारण करणारा, पोषण करणारा आहेस. तूच सृष्टीचा संहार करणाराही आहेस. हे सर्व ब्रह्मस्वरूप खरोखर तूच आहेस. तूच नित्य प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहेस. 

मी योग्य तेच बोलतो, 

मी खरं तेच बोलतो. तू माझे रक्षण कर.

तुझ्याबद्दल बोलणाऱ्या माझं, तू रक्षण कर. तुझे नांव श्रवण करणाऱ्या माझं तू रक्षण कर.

दान  देणाऱ्या अशा माझं तू रक्षण कर. उत्पादक अशा, माझं तू रक्षण कर.

 तुझी उपासना करणाऱ्या शिष्याचं रक्षण कर.    

 

माझं पश्चिमेकडून रक्षण कर.

माझं पूर्वेकडून रक्षण कर. 

माझं उत्तरेकडून रक्षण कर. 

माझं दक्षिणेकडून रक्षण कर.

माझं वरून रक्षण कर. 

माझे खालून रक्षण कर. 

सर्व बाजूनीं, सर्वप्रकारे तू माझं रक्षण कर. 

 

तू वेदादी वाड॒.मय आहेस. 

तू चैतन्यस्वरूप आहेस. 

तू ब्रह्ममय आहेस. 

तू सत् , चित् , आनंदस्वरूप, अद्वितीय आहेस. 

तू साक्षात ब्रह्म आहेस. 

तू ज्ञानविज्ञानमय आहेस. 

 

हे सर्व जग तुझ्यापासूनच निर्माण होतं. हे सर्व जग तुझ्या आधारशक्तीनेच स्थिर राहातं. 

हे सर्व जग तुझ्यातच लय पावतं,

हे सर्व जग पुन्हा तुझ्यापासूनच उत्पन्न होतं. 

पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश ही पंचतत्त्वे तूच आहेस.

तसेच परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी या चार वाणी तूच आहेस. 

 

तू सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांपलीकडचा आहेस. 

तू स्थूल, सूक्ष्म आणि आनंद या तीन देहांपलीकडचा आहेस. 

 

तू भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांच्या पलीकडचाआहेस. 

तू सृष्टीचा मूल आधार म्हणून स्थिर आहेस.          

 

तू उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही शक्तींच्या पलीकडचा आहेस. 

योगी लोक नेहमी तुझं ध्यान करतात. 

 

तूच ब्रह्मा, तूच विष्णू, तूच रुद्र, तूच इंद्र, तूच भूलोक, 

तूच भुवर्लोक, तूच स्वर्लोक आणि ॐ .. हे सर्व तूच आहेस. 

 

गण शब्दातील आदि ‘ ग् ‘ प्रथम उच्चारून नंतर ‘अ ‘चा उच्चार करावा. 

त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार करावा. तो अर्ध चंद्राप्रमाणे असावा. 

तो तारक मंत्रानं ॐ कारानं युक्त असावा. हा संपूर्ण मंत्र ‘ॐगं ‘ असा होतो. 

 

हे तुझ्या मंत्राचं स्वरूप आहे… 

‘ ग् ‘ हे मंत्राचे पूर्व रूप आहे. 

‘ अ ‘ हा मंत्राचा मध्य आहे.

अनुस्वार हा मंत्राचा कळस आहे.

अर्धचंद्राकार बिंदू हे उत्तर रूप आहे. 

या गकारादी चारांपासून एक नाद तयार होतो. हा नादही एकरूप होतो. ती ही गणेशविद्या होय. 

 

या मंत्राचे ऋषी ‘ गणक ‘ हे होत. 

‘निचृद् गायत्री ‘ हा या मंत्राचा छंद होय. 

गणपती ही देवता आहे. 

 

‘ॐ गंं ‘ ह्या मंत्ररूपानं दर्शविल्या जाणाऱ्या गणेशाला माझा नमस्कार असो. 

आम्ही त्या एकदंताला जाणतो. त्या वक्रतुण्डाचं ध्यान करतो. म्हणून तो गणेश आम्हाला स्फूर्ती देवो. 

 

ज्याला एक दात असून पाश, अंकुश व दात धारण केलेले तीन हात आणि वर देण्यासाठी चौथा हात आहे. ज्याचे उंदीर हे वाहन आहे. ज्याच्या शरीराचा रंग लाल असून पोट मोठे आहे, कान सुपासारखे आहेत, ज्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत, अंगाला लाल चंदन लावले आहे, ज्याची लाल रंगाच्या फुलांनी पूजा केली आहे, भक्तांविषयी पूर्ण दया असलेला, अविनाशी, सृष्टीच्या आधी निर्माण झालेला, प्रकृतिपुरुषाहून वेगळा असलेला,अशा गणेशाचे जो ध्यान करतो, तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होय.

 

व्रतधारिणांच्या प्रमुखांना, व्रातपतीस नमस्कार असो. देवसमुदायांच्या अधिपतीला नमस्कार असो,

शंकरगण समुदायाच्या अधिपतीला प्रमथपतिला  नमस्कार असो, 

लंबोदर, एकदंत, विघ्ननाशी, शिवपुत्र, वरदमूर्ती अशा गणपतीला माझा नमस्कार असो.         

 

.. हजारो वर्षांपूर्वी रचलेल्या या गणपती अथर्वशीर्षाचा हा मराठी अनुवाद जरी वाचला, तरी त्या रचनाकाराच्या बुद्धिमत्तेचं आश्चर्य वाटतं आणि बरोबरच त्यालाही नमस्कार करण्यासाठी आपले हात सहजपणानं, आदरानं जोडले जातात…!!

संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पूर्वीचे तंत्रज्ञ… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ पूर्वीचे तंत्रज्ञ… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

पूर्वीचे तंत्रज्ञ (Technicians) 

पूर्वी एखाद्या वस्तू मध्ये थोडासा बिघाड झाला तर ती वस्तू दुरुस्ती करून घेऊन वापरण्याकडे लोकांचा कल होता. त्याचे कारण म्हणजे घरबसल्या लोकांना या वस्तू दुरुस्त करून मिळायच्या.

पूर्वी तांबे-पितळेची भांडी लोक वापरत असत. कधी कधी जास्त वापर झाला की भांडी गळायला लागत. मला आठवतंय माझी आजी माझ्या आईला सांगायची, “जा ग, जरा पातेल्याला ‘चाती’ बसवून आण.” लहानपणी ते काही कळायचे नाही. पण मला आठवतेय पूर्वी दारावर अशा दुरुस्त्या करणारी माणसे यायची. त्यांच्या ठराविक आरोळ्या असत. बहुतेक दुपारच्या वेळात हे लोक यायचे. ‘बंबाला, पिंपाला  डाग देणार, फुटकी भांडी नीट करणार.’ 

ही माणसे घरी येऊन म्हणजे वाड्यातच गळणारे बंब, पिंप, गळणारी पातेली, तपेली सगळ्यांना डाग देऊन किंवा चाती बसवून दुरुस्त करायचे. त्यांच्या जवळ दुरुस्तीचे सगळे सामान असायचे.

अजून एक म्हणजे, ‘डबे बनवणार, झाकणे बनवणार, चाळणी बनवणार’ असे ओरडत काही लोक यायचे. पूर्वी ‘डालडा’चे डबे मिळायचे. त्याला खूप लोक झाकणे बनवून वापरायचे. किंवा तेलाचे मोठे डबे मिळत. त्याचेही गोल डबे किंवा त्यालाच पत्र्याची झाकणे बनवून घेत. 

त्या माणसाच्या खांद्यावर एक लोखंडी पेटी असे, त्यात पत्रा कापण्याची मोठ्या दांड्याची कात्री व अन्य बरेच काय-काय सामान असे. आणि ते डबे, झाकणे बनवताना बघायला खूप मजा वाटायची. मग वाड्यातल्या सगळ्या लहान मुलांचा तेवढा वेळ तिथेच त्याच्या भोवती मुक्काम असायचा. अगदी थोड्या वेळात सफाईदारपणे डबे, डब्यांची झाकणे अंगणात बसून तयार व्हायची. त्याच्या जवळ पत्रा पण असायचा, जरुरी प्रमाणे त्याचाही वापर करायचा व हे सारे थोडक्या पैश्यातच व्हायचे.

‘छत्री दुरुस्ती’, छत्रीच्या काड्या बदलणे, छत्रीचे कापड नीट करणे इत्यादी दुरुस्त्या करणारे कारागीर यायचे. मोडक्या छत्र्या थोडक्या पैश्यात घरी दुरुस्त करून मिळायच्या. त्याच्या खांद्यावर एक पिशवी व त्यात एक चपटा चौकोनी लोखंडी डबा असायचा त्यात दुरुस्तीला लागणारे खूप सारे सामान असायचे. पिशवीत छत्रीच्या काड्याही असायच्या.

‘नांव घालायची, भांड्यावर नांव.’ अशी एक आरोळी देत धोतर, शर्ट व टोपी घातलेला माणूस यायचा. त्याच्या कानावर नांव घालण्याचे  साधन-पंच ठेवलेले असे व एका कानावर हात ठेवून तो आरोळी द्यायचा. ते ‘नांव’ असं म्हणण्याच्या ऐवजी, ‘नामु घालायची नामू’, असेच काहीसे ऐकू यायचे. 

घरी येऊन त्याच्या जवळच्या लहानशा हातोडी आणि High Carbon Steel पंचने ठोकून, तो भांड्यांवर सुबक नांवे घालून द्यायचा. हल्ली मशीनने नांव घालतात. अगदी डझनाच्या हिशोबाने भांडी असायची. दुपारी  पाठीवर पोते घेऊन तांबे, पितळेची मोड घेणारा माणूससुध्दा दारावर यायचा. पूर्वी पितळी Stove वापरायचे खूप लोक. ते सुध्दा दुरुस्त करणारा माणूस दारावर यायचा. 

तसेच, तांबे पितळेच्या भांड्यांना ‘कल्हई’ करणारी माणसे तर ‘कल्हईची भांडी कल्हई’ अशीही आरोळी असायची. पितळी ताटे, वाट्या, पातेली अशा सगळ्या भांड्यांना कल्हई करत, लगेच त्यांचे रुप एकदम पालटत असे. भांड्यांना कल्हई म्हणजे एक मोठा कार्यक्रमच असायचा घरी ! कल्हई करताना बघताना खूप मजा वाटायची. एक वेगळाच वास यायचा – नवसागराच्या धुराचा. नवीन कल्हई केलेल्या भांड्यात जेवताना खुप छान वाटायचे. हे सगळे करत असताना माझी आजी व आई त्यांच्याशी पैसे ठरवताना घासाघीस पण करायच्या.

फार पूर्वी पिंजारी देखील दारोदारी येत. त्यांच्या खांद्यावर भलेमोठे धनुष्य-सदृश्य – तुणतुणे वाटेल – असे अवजार असे. कापसाच्या जुन्या गाद्यांमध्ये वापराने गोळे पुंजके होत. पिंजारी तो जुना कापूस पिंजून झकास reconditioned उशा-गाद्या बनवून देई.

सुया फणी पोत असे म्हणून डोक्यावर भली मोठी दुर्डी घेऊन दारोदारी हिंडून ह्या गोष्टी विकणारी जमात मात्र आजही अस्तित्वात आहे..

तर असे होते हे दारावर येणारे तंत्रज्ञ ! अगदी घरीच थोड्या वेळात, थोड्या पैश्यात अगदी डोळ्यासमोर दुरुस्ती व्हायची. कुठे हेलपाटे नाहीत, धावपळ नाही, की काही नाही. लहानपणी हे घराच्या अंगणात बसून बघताना खूप मजा वाटायची. हळूहळू सगळे बदलले व या कसबी जमाती गायब झाल्या. नामशेष झाल्या.

‘कालाय तस्मै नम:….

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सोंड नसलेला गणपती… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

सोंड नसलेला गणपती !…  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेले पहायला मिळते.

गणपतीच्या अन्य रुपाची कुणी कल्पनाही करू शकत नाही.

मात्र, दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे, मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे. मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते. तामिळनाडूमध्ये कुथनूरपासून जवळ तिलतर्पणपुरी इथे हे मंदिर आहे. 

आदी विनायक असे या मंदिराचे नाव आहे. 

गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदी गणपती संबोधले जाते. याला “ नरमुख विनायक “ असेही म्हटले जाते. 

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ही विकृती आली कुठून?… लेखिका : डॉ. वृषाली राऊत ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

ही विकृती आली कुठून?… लेखिका : डॉ. वृषाली राऊत ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

जेव्हा Netflix चा CEO मानवी झोपेला त्याचा सर्वात मोठा स्पर्धक मानतो यावरूनच मानवी जीवनात झोपेचे महत्व अधोरेखित होते. गेलेल दशक हे माध्यमांच होत, कधीच विचार न केलेल्या प्रकारचं मनोरंजन २४ तास आपल्या सोबत राहू लागलं. 

आपल्या मेंदू मध्ये न मावेल एवढी माहिती त्याच्यावर आदळायला सुरवात झाली. ह्या माहितीला process करण्यासाठी मेंदू तयारच नव्हता. Netflix भारतात २०१६ पासून सुरू झाले. भारतात जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने जगातील नामांकित कपन्यांनी भारतीय लोकांसाठी मनोरंजाचे कार्यक्रम बनवायला सुरवात केली जे मानवी मेंदू साठी प्रमाणाबाहेर होत. जस high calories वाल अन्न खाऊन लठ्ठपणा वाढतो तसेच अति प्रमाणात information calories खाऊन मेंदूवर चरबी चढते कारण एवढी माहिती मेंदू पचवू शकत नाही. Binge eating प्रमाणे binge watching ने शरीराची व मनाची वाट लावायला सुरवात केली. भारतीयांनी दिवस व रात्र स्क्रीन वर घालवायला सुरुवात केली. झोपेविना रात्री व झोपाळू दिवस यांना सहन करण्यासाठी म्हणजे तरतरीत राहण्यासाठी कॉफी, चहा, दारू, तंबाखू, सिगरेट, पान मसाला, गुटखा व आणखी असेच पदार्थ खाण्यात वाढले, ही व्यसन व त्यातून येणारे शारिरीक व मानसिक आजार पण वाढले, औद्योगिक राष्ट्र म्हणून प्रगती करणारा आपला देश हळूहळू आजारी देश बनत चालला.

हे सगळे त्रस्त मेंदु अनेक बदमाश लोकांसाठी लवकर पटणारी ग्राहक होती. कुठल्याही औद्योगिक देशातील कामगारांप्रमाणे भारतातील working class पाशी पैसा होता पण सोबतीला कामाचा ताण, कर्जाचे हफ्ते, नात्यातील चढ उतार असे त्रास पण होतेच.

इंटरनेटने ह्या सगळ्या त्रासलेल्या मेंदूना एक सोपा मार्ग दिला जेणेकरून रोजच्या जगण्यातून दोन घटका करमणूक पण होईल, ताण हलका होईल व कुणाला कळणार पण नाही. खोटी ओळख निर्माण करून काहीही केलेलं कुणालाच कळणार नव्हतं मात्र इंटरनेट हेच सगळ्यात मोठं व्यसन ठरलं. Social media, पॉर्न, गेमिंग, ऑनलाइन डेटिंग, ह्या सगळ्यातून मेंदूत आनंदाचं रसायन डोपामाईन निर्माण होतं. जे लोक मनाने कमकुवत असतात ते रसायन परत परत मिळवण्यासाठी या आभासी दुनियेत हरवून आनंद शोधत व्यसनी होतात.

हे सगळं सुरू असताना अनेक हुशार मेंदू इंटरनेट वापरणाऱ्यांच्या  वागणुकीवर लक्ष ठेवून होती. जी लोक दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद मिळवितात, त्यांना त्या कामाचे पैसे मिळाले.  अशांसाठी तर cyber bullying, trolling हे आवडते उद्योग ठरले. Social media वर अशी असंख्य तोल गेलेली टाळकी कामाला आहेत, जी द्वेष व दुजाभाव पसरवण्याचे काम आनंदाने करतात कारण असं काम त्यांच्या मनाला आनंद देतं..

ह्या लोकांचे गट आहेत

-पैसे घेऊन खरी ओळख दाखवून करणारे

-खरी ओळख न दाखवता व पैसे न घेता करणारे

-पैसे घेऊन खरी ओळख न दाखवता करणारे 

अचानकपणे एवढी राष्ट्रभक्ती कुठून आली ? लोक वेड्यासारखे एकमेकांशी भांडायला का लागलीत ? आमच्या सारखा विचार नाही केला तर तुम्ही आमचे दुष्मन ही भाषा का ऐकू येत आहे? यातील लोकांना वेगळेच मानसिक त्रास आहेत पण त्याच्यावर उपाय न करता लोकांवर इंटरनेट वर येऊन भडास काढणे सुरू आहे. गेल्या काही वर्षात बलात्कार व शारीरिक हिंसा प्रचंड वाढली आहे. भाषा सुद्धा हिंसक आहे, काव्य, सोज्वळपणा, साधेपणा हद्दपार झाला आहे, आयुष्य एक crime thriller असल्यासारखी लोक एकमेकांवर उगीच संशय घेत भांडण ओढवून घेत आहेत, नाती तुटत आहेत.

गेल्या ६ महिन्यातील घटना बघितल्या तर असं जाणवतंय की लोक हिंसा बघून आनंदित होताहेत, किंवा त्यांना  त्याचं  काहीच वाटत नाही आहे. कोणीही सर्वसाधारण मानसिकता असलेली व्यक्ती दुसऱ्यावर हिंसा ( शारीरिक व मानसिक) सहन करू शकत नाही व बघू पण शकत नाही.  पण Netflix, Prime सारख्या लोकांनी हिंसेचं  व लैंगिक विकृतीचं supermarket उघडून ठेवलं आहे, त्याच्या सोबतीला बाकीच्या विकृत गोष्टी आहेतच.

हे अनैसर्गिक व अमानवीय वर्तन हे अचानक आलेलं नाही. वेगवेगळे न्युज चॅनेल्स ज्या पद्धतीने ब्रेकिंग न्युज दाखवितात त्या अवैज्ञानिक आहेत. मानवी मेंदू विचार करायला वेळ घेतो. मेंदूतील भावनिक केंद्र ज्याला amygdala म्हणतात ते आपल्या मानवी उत्क्रांतीची देणगी आहे, amygdala हे भीतीवर काम करते व cortex हा मेंदूतील भाग तर्कशुद्ध विचार करतो. Amygdala ला भीती जाणवली (मानसिक किंवा शारीरिक) तर तो शरीराला संदेश देतो की आता स्वतःचे रक्षण करायला हवं, मग त्यानुसार मानवी शरीर एक तर त्या भीती वाटणाऱ्यापासून दूर जातं  किंवा भीती वाटणाऱ्याशी दोन हात करायला सज्ज होतं , ह्याला flight/fight असं  नाव आहे. शरीर ह्या भय अवस्थेत ताण अनुभवत असते. Breaking news मनात भीतीची भावना सतत जागृत ठेवतात. तार्किक विचार करायला मेंदूला वेळच मिळत नाही कारण 24*7 वेगवेगळी माध्यमं  व त्यातून येणारी अखंड माहिती मेंदूत ट्रॅफिक जॅम करते. हे सगळं खूप कठीण आहे पण आपण सगळेच यातून जात आहोत. ह्या सगळ्या गोष्टी माणसातील पशूला जाग करण्याचं काम करतात व तो पशू  शांत करणं जवळजवळ अशक्य आहे.

सगळ्यांची डोकी जाणूनबुजून “तापवली” गेली आहेत, तेव्हा सारासार विचार करणं कठीण आहे, पण अशक्य नाही. मेंदूवर किती ताण द्यायचा व किती माहिती वाचायची व तिची शहानिशा करूनच पुढे जायचं हे आपल्या हातात आहे. समोरच्याने कितीही घाण बोललं तरीपण लगेच उत्तर देणे, पोस्ट upload करणे, त्यापेक्षा घाण बोलणे हे अविचारीपणाचं  लक्षण आहे. 

हे एक मानसिक युद्ध आहे. ह्यात जिंकायचं असेल तर हिंसा, लैगिंक विकृती असलेल्या गोष्टी न बघणे, रोज 7-8 तास झोप घेणे, झेपेल असा व्यायाम व सकारात्मक विचार करणे हे उपाय आहेत.

दुसऱ्याला कसलाही प्रकारचा त्रास देणारा कुणीच खूश व आरोग्यदायी राहूच शकत नाही. तुम्ही पण विकृत मानसिकतेचे आहात का ह्याचा नीट विचार करा व जबाबदारीने वागा.

लेखिका : डॉ वृषाली रामदास राऊत, औद्योगिक मानसशास्त्रज्ञ

संग्राहक : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक नरश्रेष्ठ भारतीय सैनिक ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ एक नरश्रेष्ठ भारतीय सैनिक ☆ श्री संभाजी बबन गायके 

(डावीकडील छायाचित्रात नायक बिष्णू श्रेष्ठ दिसत आहेत. दुसरे छायाचित्र गोरखा सैनिकाचे प्रातिनिधीक छायाचित्र आहे.)

…अर्थात Once a soldier, always a soldier! Saving dignity of a woman! 

त्याने झटकन आपल्या पोटपाशी लटकावलेली खुखरी तिच्या म्यानातून उपसली आणि त्याच्यावर झेप घेतली! खुखरी एकदा का म्यानातून बाहेर काढली की तिला अजिबात तहानलेली ठेवायची नसते. त्याने सपकन आडवा वार केला आणि त्याचं नरडं कापलं. खुखरीच्या जिभेला शत्रूच्या गरम रक्ताचा स्पर्श झाला आणि तिची तहान आणखी वाढली….समोर आणखी एकोणचाळीस शत्रू होते…कुणाच्या नरडीचा घोट घ्यावा? 

तो सकाळीच आपल्या सैनिक मित्रांचा निरोप घेऊन घरी निघाला होता आपल्या पलटणीतून. का कुणास ठाऊक, पण त्याला आता घरापासून दूर राहण्याचा कंटाळा आलेला होता. घरी जाऊन वडिलोपार्जित शेती करावी,मुला-बाळांत रमावं असं वाटू लागलं होतं. त्याने मुदतपूर्व सेवानिवृत्ती मागितली तेंव्हा वरिष्ठही चकित झाले होते. बरं, वयही फार नव्हतं. फक्त पस्तीशीचा तो शिपाईगडी. त्यादिवशी त्याने साहेबांना कडक सल्यूट बजावला. जय महाकाली…आयो गोरखाली हा त्याचा सैन्यनारा मनात आठवला आणि आपला लष्करी गणवेश उतरवला….खुखरी मात्र गळ्यात घातलेल्या पट्ट्यात तशीच राहू दिली. खुखरी आणि गोरखा सैनिक म्हणजे जीवाभावाचं नातं…तिला दूर नाही करता येत. शीख बांधव जसं कृपाण बाळगतात सर्वत्र तसंच खुखरीचं आणि गोरखा सैनिकांचं. गुरखा किंवा गोरखा. इंग्लिश आमदनीत गुरखा असा उच्चार असायचा, तो स्वतंत्र सार्वभौम भारतात ‘गोरखा’ असा मूळच्या स्वरूपात केला जाऊ लागला.

त्याचा घरी जाण्याचा मार्ग झारखंड राज्यातून जात होता. रेल्वेप्रवास अपरिहार्य होता. तिकीट आरक्षित केलं होतंच. प्रवास सुरू झाला. सहप्रवाशांना प्रवासात लक्षात आलंच होतं की हा शिपाई गडी आहे. त्याच्या शेजारी बसलेल्या आणि आपल्या आई-वडिलांसोबत प्रवास करीत असलेल्या अठरा वर्षीय तरूणीने तर त्याच्याशी अगदी आदराने ओळख करून घेतली. रात्र झाली आणि सर्वजण आपापल्या बर्थवर झोपी गेले. जंगलातून जाणारा रेल्वेमार्ग. रात्रीचे बारा-साडेबारा झाले असतील. करकचून ब्रेक्स लागल्यासारखी गाडी मध्येच थांबली. बाहेर काळामिट्ट अंधार. मात्र बहुसंख्य प्रवासी झोपेत असल्याने त्यांना काही जाणवले नाही. आपला शिपाईगडीही गाढ झोपेत होता. अचानक रेल्वे डब्यात बाहेरून वीस-पंचवीस जण घुसले…हातातली धारदार हत्यारं परजत. डब्यात आधीच प्रवासी म्हणून बसलेले त्यांचे साथीदार तयार होतेच. त्यांनी प्रत्येकाला हत्यारांचा धाक दाखवून त्यांच्याकडची चीजवस्तू,पैसे,मोबाईल ओरबाडायला आरंभ केला. अर्थवट जागे झालेल्या प्रवाशांना काही समजेनासे झाले होते. चोरट्यांच्या धाकाने कुणाच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. दरोडेखोरांनी आपल्या शिपाई गड्याला हलवून जागे केले. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून त्यानेही जवळचे सर्वकाही त्यांना देऊन टाकले…खुखरी सोडून! मी एक आर्मीवाला आहे हे त्याने त्याही परिस्थितीत ओरडून सांगितले. त्यांची हत्यारे,त्यांची संख्या आणि आपण एकटे…अशा स्थितीत धाडस करणे परवडणार नाही…असा त्याचा विचार! 

तेवढ्यात त्या हरामखोरांची नजर जवळच्याच बर्थवर अंगाचे मुटकुळे करून,थरथरत बसलेल्या त्य तरूणीवर पडली. त्यांच्या डोळ्यांत आता निराळेच भाव दिसू लागले. एकाने तिच्या अंगावर कापड फाडले आणि तिला खेचले. तिने जोरात आकांत केला आणि आपल्या सैनिक बांधवाकडे पाहिले…वाचवा! 

आता मात्र या शूर गोरख्याचा संयम संपला. आपण शत्रूच्या समोर उभे आहोत आणि तो आपल्यावर चाल करून येतो आहे,असा त्याला भास झाला. जय महाकाली…आयो गोरखाली असं हळू आवाजात पुटपुटत त्याने खुखरी उपसली आणि त्या मुलीची अब्रू लुटू पाहणा-या दरोडेखोरांपैकी पहिल्याचा गळा चिरला! त्या एवढ्याशा जागेला आता युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले. तिथे प्रचंड आरडाओरडा सुरु झाला. चाळीस पैकी एक दरोडेखोर आपल्या सैनिकाच्या हातात होता…बाकीचे एकोणचाळीस धावून येऊ लागले. आपल्या बहादूराने त्या दरोडेखोराच्या देहाची ढाल केली आणि तो पुढे सरसावला. त्यांच्या हातातली धारदार शस्त्रे आणि याच्या हातातली खुखरी….खुखरी अचूक चालू लागली…त्यांनी गोळी झाडली पण नेम चुकला. खुखरीचा मात्र नेम चुकू शकतच नाही. इतक्या वर्षाचे अघोरी वाटेल असं प्रशिक्षण…खुखरी आणि खुखरी चालवणारा कसा विसरेल? खुखरीने आणखी तीन जणांच्या कंठातून रक्त प्यायले…..त्या दुष्टांना खरोखरीचे कंठस्नान घातले. उण्यापु-या दहा-पंधरा मिनिटांचा हा थरार…तीन धराशायी आणि आठ-नऊ दरोडेखोर खुखरीच्या वारांनी पुरते घायाळ. या झटापटीत डब्यातील प्रवासी थरथरत निमुटपणे बसलेले होते. मुलीच्या गळ्याला थोडीशी दुखापत झाली होती. एवढ्यात जवानाच्या हातातली खुखरी खाली पडली…एका दरोडेखोराने तीच उचलून जवानाच्या हातावर वेगाने वार केला..खोलवर जखम झाली.रक्ताची चिळकांडी उडाली आणि जवान खाली कोसळला…पण हा पुन्हा उठून आपला जीव घेईल अशी त्यांना साधार भीती वाटली…ते डब्यातून उतरून जंगलात पळून गेले….नायक बिष्णू श्रेष्ठ,(सेवानिवृत्त्त) (गोरखा रायफल्स,भारतीय सेना) गंभीर जखमी होते…ट्रेन एव्हाना सुरू झाली होती..इतरांना या डब्यात नेमके काय घडलं होतं त्याचा तपास नव्हता…पुढच्या स्टेशनवर पोलिस,डॉक्टर्स तयार होते. डब्यात पडलेली तीन प्रेतं आणि एक जखमी मनुष्य…म्हणजे आपले बहादूर विष्णू श्रेष्ठ. अंगावर सिवीलीयन कपडे. पोलिसांना वाटले हा ही दरोडेखोरच! पण त्या तरूणीने आणि तिच्या आई-वडिलांनी सारी हकीकत सांगितली, हे नशीब! विष्णूजींना रूग्णालयात हलवण्यात आले. पूर्ण बरे होण्यास त्यांना तब्बल दोन महिने लागले यावरून त्यांना झालेल्या गंभीर दुखापतीची कल्पना यावी! यथावकाश पोलिसांनी सहा दरोडेखोरांना जेरबंद करून आणले. त्यांच्याकडून दहा हजारांपेक्षा जास्त रोख  रक्कम,तेहतीस मोबाईल फोंस, काही घड्याळे, दोन पिस्टल्स,जिवंत काडतुसं हस्तगत केली! भारतीय सैन्याने या शूरवीराला सेना मेडल आणि उत्तम जीव रक्शा पदकाने सन्मानीत केलं. चांदीचं पाणी दिलेली नवी कोरी खुखरी भेट दिली. पोलिसांनी दरोडेखोरांच्या डोक्यावर असलेलं रोख इनामही विष्णूजींना दिलं. सामुहिक बलात्काराच्या मोठ्या संकटातून आपल्या लेकीची, तळहातावर प्राण ठेवून सुटका करणा-या विष्णूजींना त्या मुलीच्या आई-वडिलांनी मोठी रक्कम बक्षिस म्हणून देऊ केली…..तेंव्हा नायक बिष्णू श्रेष्ठ म्हणाले….देशाच्या शत्रूंना ठार मारणं हे सैनिक म्हणून कर्तव्य होतं. तसंच नागरीकांचं रक्षण करणं हे माणूस म्हणून कर्तव्य होतं..ते मी निभावलं ! याचं बक्षिस कशाला? 

(दोन सप्टेंबर,२०१० रोजी हातिया-गोरखपूर मौर्या एक्सप्रेस मध्ये पश्चिम बंगाल मधील चित्तरंजन स्टेशनजवळ ही चित्तथरारक सैनिक-शौर्य कथा मध्यरात्री घडली. Once a soldier, always a soldier…ही म्हण प्रत्यक्षात आली ! मूळचे नेपाळचे असलेले आणि भारतीय सैन्यातील ७, गोरखा बटालीयनच्या ८,गोरखा रायफल्स पथकामधून निवृत्त होऊन घरी निघालेल्या नायक बिष्णू श्रेष्ठ यांनी हे अचानक हाती घेतलेलं ‘ऑपरेशन रक्षाबंधन’ आपले प्राण पणाला लावून यशस्वी केले होते. जय महाकाली..जय गोरखाली…भारत माता की जय…जय जवान…जय हिंद असा घोष तुमच्याही मनात जागवेल अशी ही कहाणी…इतरांनाही सांगा. कथा खरी. तपशिलातील उणिवांची जबाबदारी माझी.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares