श्री सुहास रघुनाथ पंडित
इंद्रधनुष्य
☆ भारुड: कळणारी भाषा आणि पेलणारे तत्त्वज्ञान.. – लेखिका : डॉ अपर्णा बेडेकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
काट्याच्या अणीवर वसले तीन गाव ।
दोन ओसाड एक वसेचिना ॥
वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।
दोन थोटे एका घडेचिना ॥
घडेचिना त्याने घडली तीन मडकी ।
दोन कच्ची एक भाजेचिना ॥
भाजेचिना त्यांत रांधले तीन मूग ।
दोन हिरवे एक शिजेचिना ||
शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे ।
दोन रुसले एक जेवेचिना ॥
ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।
सद्गुरूवाचुनि कळेचिना ||
एक बारीकसा बाभळीसारखा काटा.. त्याचं अणुकुचीदार टोक ते केवढंसं.. त्यावर तीन गावं वसली म्हणे..! त्या गावांची नावं सत्त्व,रज,तम.. किंवा त्रिगुणात्मक प्रकृती. खरं पाहिलं तर एका वेळी, एका ठिकाणी या तिघांपैकी एकच गुण राहू शकतो. तिघांचं असं गुण्यागोविंदाने एकत्र राहणं केवळ अशक्य. त्यामुळे खरं तर ही गावं वसणं केवळ अशक्य!
माउली म्हणतात.. या गावात पुढे तीन कुंभार आले, मडकी घडवायला! त्या कुंभारांची नावं… ब्रह्मा, विष्णू आणि महेश! हे तीन देव म्हणजे सृष्टी घडवणारे कुंभार! पण उत्पत्ती करणाऱ्याकडे पालनाचा विषय नाही आणि पालन, संहार करणाऱ्याला उत्पत्तीचं ज्ञान नाही. दोन थोटे आहेत आणि एक काही घडवत नाही म्हणून मातीला घटाचा आकार मिळण्याची शक्यताच नाही.
या न वसलेल्या गावात, न आलेल्या कुंभारांकडून न घडलेल्या मडक्यात तीन मूग रांधले….दोन कच्चे, एक शिजेचिना…स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह रूपी तीन मूग रांधले. त्यापैकी विषयसुख आणि काम क्रोधाने लिंपलेले रज-तम हे कायमच हिरवे, अपरिपक्व राहणार आणि सत्व मूळचा परिपक्व असल्याने शिजण्याचा प्रश्नच येत नाही.
काहीच शिजत नाही अशा गावात तीन पाहुणे आले… म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य असे तीन काळ आले.
भूतकाळ हा नेहमीच असमाधानी, वर्तमान हव्यासात मग्न आणि भविष्य नेहमीच अनिश्चित.. म्हणून हे पाहुणे जेवलेच नाहीत.. त्यांचं समाधान कधी झालंच नाही.
थोडक्यात, न वसलेली गावं, थोटे कुंभार, न घडलेली मडकी, त्यात न शिजलेले मूग, आणि न जेवलेले पाहुणे या सगळ्या अशक्य वाटणाऱ्या अशा गोष्टी रंगवत रंगवत ही कथा पुढे जाते.
सुजनहो!
मग, प्रश्न असा येतो, की कशा कळाव्यात या गोष्टी? सर्वसामान्य बुद्धीला न पेलणाऱ्या, न झेपणाऱ्या गोष्टी अशक्य म्हणून सोडून देता येतीलही.
पण आत्मज्ञान ही अशीच अशक्य वाटणारी गोष्ट मात्र सद्गुरुकृपा असेल तर शक्य होऊ शकते असं माउलींना अखेरीस सांगायचंय.
ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।
सद्गुरूवाचुनि कळेचिना ||
‘आत्मज्ञान ही सहजसाध्य गोष्ट नव्हे; आणि म्हणून हे आत्मज्ञान गुरुकृपेशिवाय मिळणं केवळ अशक्य..’ अध्यात्मशास्त्रातील हा महत्वाचा सिद्धांत मांडण्यासाठी माउली हे भारुड रचतात; सर्वसामान्यांना ‘पेलणारे’ तत्त्वज्ञान ‘कळणाऱ्या’ भाषेत सांगतात…
भारुड शब्दाची व्युत्पत्ती:
भारूड या शब्दाच्या दोन व्युत्पत्ती सांगतात. भारुंड नावाचा दोन तोंडांचा पक्षी आहे. भारुड देखील असे ‘द्विमुखी’ असते. सध्या सोप्या लोकवाणीतून बोलणारे, पण वस्तुतः काही शाश्वत सत्य सांगणारे! त्याच्या या द्व्यर्थी स्वभावामुळे, त्याला या दुतोंडी भारुंड पक्षावरून ‘भारुड’ हे नाव मिळालं असावं असं म्हटलं जातं.
भारुड हा शब्द ‘बहु-रूढ’ या शब्दाचा अपभ्रंश असावा असंही म्हणतात. ’बहुजनांमध्ये रूढ’ असणाऱ्या विषयांवर आधारित रचना किंवा ‘जनसमुदायावर आरूढ असणारे लोकगीत’ म्हणजे भारुड अशीही या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते.
भारूडांचा उगम आणि लोकभूमिका:
गावगाड्यात रुजलेल्या परंपरागत सर्वमान्य व्यक्तिरेखा हे भारुडाचे उगमस्थान आहे. गावात पहाटेच्या प्रहरी ‘वासुदेव’ येतो. हा वासुदेव ‘जागे व्हा’ असे सांगताना नुसतेच डोळे उघडा असे सांगत नाही, तर ज्ञानदृष्टीने जगाकडे पाहण्यास शिकवतो. ‘बये दार उघड’ म्हणणारा ‘पोतराज’ देवीकडे प्रार्थना करतो, हातातल्या पट्ट्याने जणू विकारांवर फटके मारतो. ‘गोंधळी’ हातात संबळ घेऊन जगदंबेचा भक्तिमार्ग रुजवतो. ‘जागल्या’ रात्री गस्त घालतो तेंव्हा नेहमी जागृत राहा, सतर्क रहा याचीच आठवण करून देत असतो. ज्ञानाची दिवटी पेटवणारा आणि अज्ञानाचा अंध:कार नाहीसा करणारा ‘भुत्या’ लोकभाषेत काही सांगत असतो….
मध्ययुगीन काळात, यासारख्या असंख्य लोकभूमिका महाराष्ट्रात वावरत होत्या. जोशी, वाघ्या मुरळी, कोल्हाटी, पांगुळ, सरवदा, दरवेशी, मलंग, भालदार, चोपदार….अशा असंख्य…! महाराष्ट्रीय संतानी या लोकभूमिकांचा समाज प्रबोधनासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला. या प्रतीकात्मक भूमिकातून रूपकात्मक काव्याची पेरणी केली…यातूनच ‘भारुड’ ही फार मोठी लोकपरंपरा उभी राहिली.
भारूड म्हटल्यावर सर्वात प्रथम आठवतात नाथमहाराज आणि त्यांचं हे भारूड…
‘अग ग ग ग ग विंचू चावला…
विंचू चावला हो…
काम क्रोध विंचू चावला..
तेणे माझा प्राण चालला..’
माणसाला विंचू चावला, तर अत्यंतिक वेदना होतात, हा झाला या ओळीचा सरळ आणि समाजमान्य अर्थ.
पण, काम क्रोध आदी षड्रिपूंनी विंचवाप्रमाणे दंश केला, तर त्या वेळेपुरती वेदना तर होईलच, पण आयुष्यभर या विंचवाची नांगी यातना देत राहिल… असा मूळ अर्थाला बाधा न आणता अधिक अर्थ पुढे उलगडत जातो.
एकनाथ महाराज पुढे म्हणतात, ‘…या विंचवाला उतारा.. सत्वगुण लावा अंगारा…’
विंचू म्हणजे भौतिक लालसा! यात गुंतलेल्या जीवाला सत्त्वगुणाचा अंगारा लावा, म्हणजेच त्याला परमार्थाकडे न्या.. असे सूचित करणारी, मूळ शब्दाचा केवळ वाच्यार्थ नाही, तर त्यापलीकडील गूढार्थ सांगणारी.. अशी ही बहुअर्थ प्रसवणारी भारुडं!
भारुडात संतकवींची काव्यप्रतिभा खरोखरच बहरला येते. मुळातच, संतकाव्याला मराठी सारस्वतात अभिजात काव्याचा मान आहे. त्यात, संतांनी रचलेली भारुडे म्हणजे, या अभिजात काव्याला नृत्य, नाट्य, संवाद, विनोद, संगीत, निरुपण या सर्वांची कलात्मक आणि रसात्मक जोड! या सर्वामुळे भारुड हा काव्यप्रकार संतकाव्यात एखाद्या मानबिंदूप्रमाणे शोभून दिसला.
‘आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक..’
सेना महाराजांच्या भारूडातील न्हावी म्हणतोय…अशी हजामत करू, की अविवेकाची शेंडी खुडून टाकलीच समजा…!
‘त्रिगुणाची मूस केली, ज्ञानाग्नीने चेतविली..’
समर्थांच्या भारूडातील जातिवंत सोनाराने, चार पुरुषार्थांच्या विटा लावल्यात, त्रिगुणांची मूस केलीय. सोनार ज्याप्रमाणे अशुद्ध सोने मुशीत घालून तापवतो, त्याप्रमाणे, समर्थांच्या या सोनाराने सर्व कर्मे ब्रह्मार्पण करून मुशीत घातली… ती ज्ञानाग्नीने चेतविली.. लौकिक रुपकाला अलौकिकाचा स्पर्श झाला….
‘सासरा माझा गावी गेला, तिकडंच खपवी त्याला
भवानीआई रोडगा वाहीन तुला….’
एकनाथ महाराजांच्या भारुडात जीवरूप नारी साकडं घालते भवानीआईला.. तो अहंकाररूपी सासरा खपूदे तिकडेच.. त्या कल्पनारूपी सासूलाही मूठमाती दे. ममतारुपी नणंदेचं द्वेष नावाचं कार्टं किरकिर करतंय…खरुज होऊदे त्याला.. भवानीआई सोडव मला.. रोडगा वाहीन…
हे वाचतांना सहज मनात आलं, श्रीखंड पुरीचा श्रीमंती नैवेद्य नाही अर्पण केला आपल्या लोककवींनी… सर्वसामान्य जनांची जाडी भाकरी, रोडगा… तोच दिला आपल्या आईला…. खरंच … भारूड अभिजनांपेक्षा, बहुजनांच्या सोबत अधिक राहिलं…अधिक रमलं…
किती लिहावं भारुडाबद्दल..? एकट्या नाथांचेच भारुडाचे दीडशे विषय आणि भारुडांची संख्या साडेतीनशे! यावरून आपल्याला संतसाहित्यातील या अमोलिक काव्यप्रकाराची व्याप्ती समजून यावी!
पेलणारं तत्वज्ञान कळणाऱ्या भाषेत रुजवणाऱ्या सर्व संतकवींचे, विशेषतः एकनाथ महाराजांचे आणि त्यांच्या भारुडांचे स्मरण.. आजच्या नाथषष्ठीच्या पुण्यदिनी!
लेखिका : डॉ अपर्णा बेडेकर
संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈