मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆☆ ||लंकायां शांकरी देवी||… श्री सुजीत भोगले ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ ||लंकायां शांकरी देवी|| श्री सुजीत भोगले ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆

सध्या मार्गशीर्ष मास चालू आहे. मार्गशीर्षातील गुरुवारी लक्ष्मीची शक्तीची उपासना अत्यंत फलदायी असते हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. आज मातेच्या कृपेने एका दुर्मिळ देवस्थानाची आणि एका अज्ञात स्तोत्राची माहिती देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आज एका वेगळ्या आणि आपल्याला अपरिचित देवीबद्दल माहिती देतोय. 

अष्टदशा शक्तीपीठातील प्रथम पीठ “ लंकायां शांकरी देवी.  रावणाच्या लंकेची ग्रामदेवता. जागृत शक्तीपीठ लंकेतील शांकरी देवी. यास्थानी देवी सतीच्या मांडीच्या अस्थी कोसळल्या होत्या अशी वदंता आहे. अर्थात हे एक्कावन शक्तीपीठांच्यापैकी एक पीठ आहे. 

आदि शंकराचार्य विरचित अष्टदशा शक्तीपीठ स्तोत्र आहे. यातील प्रथम नाम लंकायां शांकरी देवीचे आहे. ही देवी अष्टभुजा आहे. या देवीचे दर्शन आचार्यांनी घेतले आहे. या देवीचे मंदिर श्रीलंकेत त्रिंकोमाली शहरात आहे. इथेसुद्धा मूल स्थान पोर्तुगीजांनी उध्वस्त केले. आता जीर्णोद्धार केला आहे. ही देवी म्हणजे अन्य कोणी नसून अष्टभुजा भवानी माता आहे. 

या पोस्टसह जोडलेले स्केच कोणेश्वरम, त्रिंकोमाली इथल्या मूर्तीचे आहे. तिथे तिला मथुमाई अम्मम म्हणतात आणि तिचे स्वरूप हे आपल्या श्री ललिता सहस्त्रानामाच्या दृष्टीने मनोन्मयी देवीचे आहे. या नामाचे विवेचन माझ्या ‘ श्री ललिता सहस्त्रनाम भावार्थ निरुपण ‘ या ग्रंथात केले आहे.   

ज्या शांकरी देवीची उपासना रावणाने आणि आदि शंकराचार्यांनी केली ते देवीचे रूप आणि हे रूप यात भिन्नत्व आहे. परंतु तिचाच अंश म्हणून आज या देवीची उपासना केली जाते. 

देवीच्या अष्टभुजा रुपात तिच्या हातातील शस्त्रे म्हणजे चक्र , दंड, गदा, खड्ग, अक्षमाला, धनुष्य, त्रिशूल आणि अभय मुद्रा.. 

माझा अंदाज चूक नसेल तर आपल्या तुळजाभवानीची मूळ मूर्ती सुद्धा अशीच असणार. 

शांकरी देवीचा ध्यानाचा श्लोक देतोय… खूप सुलभ आणि अर्थपूर्ण आहे.  

रावणस्तुतिसंतुष्टा कृतलंकाधिवासिनी ।

सीताहरणदोषेण त्यक्तलंकामहेश्वरी ।।

सज्जनस्तुतिसंतुष्टा कदंबवनवासिनी ।

लंकायाम् शांकरी देवी रक्षेत्धर्मपरायणा ।।

अर्थ : रावणाच्या स्तुतीने संतुष्ट झालेली लंकेची ग्रामदेवता, जिच्या उपासनेने रावणाच्या सीताहरण दोषाचे निराकरण झाले. जी सज्जनांच्या स्तुतीने प्रसन्न होते. जी कदंबवनात निवास करते. अश्या लंकेच्या शांकरी देवीला मी नमन करतो. तिने मला धर्मरक्षणाची प्रेरणा प्रदान करावी आणि मला धर्मपरायण वृत्तीला अंगी धारण करण्याचे सामर्थ्य प्रदान करावे. 

आदि शंकराचार्य विरचित  

|| अष्टादश शक्तिपीठ स्तोत्रम् ||

लंकायां शांकरीदेवी कामाक्षी कांचिकापुरे ।

प्रद्युम्ने शृंखलादेवी चामुंडी क्रौंचपट्टणे ॥ १ ॥

 

अलंपुरे जोगुलांबा श्रीशैले भ्रमरांबिका ।

कॊल्हापुरे महालक्ष्मी मुहुर्ये एकवीरा ॥ २ ॥

 

उज्जयिन्यां महाकाली पीठिकायां पुरुहूतिका ।

ओढ्यायां गिरिजादेवी माणिक्या दक्षवाटिके ॥ ३ ॥

 

हरिक्षेत्रे कामरूपी प्रयागे माधवेश्वरी ।

ज्वालायां वैष्णवीदेवी गया मांगल्यगौरिका ॥ ४ ॥

 

वारणाश्यां विशालाक्षी काश्मीरेतु सरस्वती ।

अष्टादश सुपीठानि योगिनामपि दुर्लभम् ॥ ५ ॥

 

सायंकाले पठेन्नित्यं सर्वशत्रुविनाशनम् ।

सर्वरोगहरं दिव्यं सर्वसंपत्करं शुभम् ॥ ६ ॥

इति अष्टादशशक्तिपीठस्तुतिः ।

लेखक : – श्री सुजीत भोगले

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मेरा देश सहीमे बदल रहा है… लेखक – श्री हेमंत केळकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ मेरा देश सहीमे बदल रहा है… लेखक – श्री हेमंत केळकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

आज भुसावळ ते गोवा जातांना रेल्वे मध्ये आलेला सुखद अनुभव..

अचानक मित्राच्या 2 वर्षाच्या मुलाला ताप आला.. जवळ कसल्याही औषधी नाहीत.. डेस्टिनेशन मडगाव पोहचायला 7 तास अवधी.. विचार आला पुढच्या स्टेशन ला उतरू आणि एकदा डॉक्टरला दाखवू मग पुढचा प्रवास बाय रोड करू.. सहज म्हणून ट्रेन मध्ये सामान विकणाऱ्याला म्हटलं आम्हाला काही औषधी हव्या आहेत.. पुढच्या स्टेशन ला व्यवस्था करून दे, तुला खर्च पाण्याला 500 रुपये देतो.. तो विक्रेता म्हणाला काही गरज नाही TC ला भेटा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.. TC ला लगेच भेटलो.. सरकारी नोकरांची तत्परता उभ्या आयुष्यात मी इतकी कधीच अनुभवली नव्हती.. हातातलं काम सोडून त्याने समोर फोन लावला.. आमचा सीट नंबर आणि मेडिकल कंडिशन नोट केल्यात आणि आम्हाला सीट वर जायला सांगितलं… समाधानाची अपेक्षा नव्हती.. पुढच्या स्टेशन वर उतरून माझ्या मित्राच्या मुलाला दवाखान्यात दाखवून बाय रोड च आम्ही प्लॅन केलाच होता.. आम्हाला वाटल एखादा मुलगा येईल पेपर मध्ये गुंडाळून गोळ्या देईल..पण पुढच्या स्टेशन ला अक्षरशहा डॉक्टर त्यांचा असिस्टंट सोबत आमच्या सीट वर हजर.. सोबत TC सुद्धा होते.. तपासल्या नंतर लगेच त्यांनी Assistant ला आम्हाला काही सिरप च्या बॉटल द्यायला लावल्या.. कसं घ्यायचं हे सांगून लगेच TC ला सांगितलं कि ह्यांना पॅन्ट्री मधून मीठ पाठवा.. TC ने लगेच फोन लावला.. मिठाच्या पाण्याच्या पट्टी कपाळावर फिरवायला सांगितलं आणि निघून गेले.. आम्ही आवाज देऊन किती पैसे झाले म्हणून विचारलं तर हे सगळं विनामूल्य होतं..आश्चर्य च्या धक्क्यातच सीट वर पोहचलो तोपर्यंत पॅन्ट्री  वाला मीठ घेऊन हजर..

मेरा देश सहीमे बदल रहा है..

काय करायचं राव — त्या पेट्रोलला काय पिऊन घ्यायचं का…… 

अशी होत असलेले  सुधारणा हे मिडीया / पेपर वाले दाखवत नाही. बदल होत आहे.आपणसुद्धा आपल्या नातेवाईकांना व मित्रमंडळींना कळवावे. वेळ लागेल, पण आपण झालेला व होत असलेला बदल अनुभवत आहोत.

लेखक :  हेमंत केळकर

संग्राहक : माधव केळकर. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आठवणीतील सांस्कृतिक पुणे… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ आठवणीतील सांस्कृतिक पुणेलेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुमारे ३५-४० वर्षांपूर्वी, किंबहुना त्यापेक्षाही अगोदरपासूनच्या कालखंडात पुणे हे एक छोटेखानी पण टुमदार, आटोपशीर गाव होतं…” पुणे शहर ” झालेलं नव्हतं….

सदाशिव, शनिवार, नारायण, शुक्रवार वगैरे पेठांमध्ये वाडे एकमेकांना चिकटून, जणू एकमेकांच्या हातात हात घालून उभे होते. चोर-पोलीस खेळतांना सहज एका वाड्यातून दुसऱ्या वाड्यात जाता येत असे. किंबहुना शेजारच्यांच्या घरात घुसून बिनदिक्कत कॉटखाली वगैरे लपता येत असे. लाकडी जिन्यातून कुणी भरभर खाली उतरलं की अक्षरशः ढगांच्या गडगडाटाचा आवाज येत असे. चौकात संध्याकाळी डबडा ऐसपैसचा नाहीतर इस्टॉपाल्टीचा डाव रंगत असे. फार दमायला झालं, किंवा धो धो पाऊस पडला, तर कुठे तरी वाड्यात वळचणीला बसून गाण्यांच्या भेंड्या रंगत असत. मग एक तरी सुरेल गाणारी तिखट चिमुरडी “आ जा सनम मधुर चांदनीमें हम….” हे गाणं म्हणतच असे. 

किंवा देशांच्या राजधान्या ओळखणे, चेरापुंजी कशासाठी प्रसिद्ध आहे?? वगैरे “जनरल नॉलेज” च्या गप्पा होत होत,

” तुला माहितीये का ?? पाकिस्तानकडे शंभर ऍटम बॉम्ब आहेत…”  किंवा ” माझे बाबा एकदा अमावास्येला शनिवारवाड्याच्या जवळून रात्री येत होते, तेव्हा त्यांनी ‘ काका मला वाचवा….’ असा आवाज ऐकला होता ” 

अशा स्वरूपाच्या दंतकथा रंगत. एखादा शी – शू विहार मधला गडी मग तिथेच रडू लागे. आणि मग 

” ए … कशाला रडवता रे त्याला?? ” असा सज्जड दम एखादी आई देई.

शाळांच्या पटांगणात रात्री ” गीत रामायण,” “ जाणता राजा ” यासारख्या कार्यक्रमांची रेलचेल आणि मेजवानी असे. मग रात्री भारावलेल्या वातावरणात शांत झोपी गेलेले वाडे बघत बघत घरी पायी, नाही तर सायकलवर वाटचाल करायची. क्वचित थंडीत स्वेटर, शाल, चादर पांघरून कुडकुडत घरी जायचं….. गोदरेजचं कुलूप उघडून जाड लोखंडी साखळी असलेला दरवाजा उघडायचा….. काळ्या बटनावर लागणारा पिवळा साठचा बल्ब लावायचा…. कुणाकडे हातात सेलची बॅटरीही असायची…. 

पुण्याचं तेव्हाचं सांस्कृतिक केंद्र म्हणजे ” भरत नाट्य मंदिर “…. मध्यंतरात भजी खायची… चहा प्यायचा…. आणि अंधारात चाचपडत येऊन आपली सीट पकडायची….

भरत नाट्य बाहेर मधू आपटे हे ज्येष्ठ अभिनेते खुर्ची टाकून बसलेले असायचे…..

कुणी नाटकानंतरही “गुडलक” “पॅराडाईज” “रीगल” वगैरे इराणी हॉटेलात तळ देत…. किंवा वाड्याच्या दारातच मध्यरात्रीपर्यंत कुडकुडत गप्पा छाटायच्या……

तेव्हाचं पुणं मध्यमवर्गीय, साधं…..पेरूगेट, नु.म.वि., अहिल्यादेवी, विमलाबाई गरवारे, हुजूरपागा या संस्कारकेंद्रांभोवती विणलेलं….. “स्वामी”… “छावा”…. “नाझी भस्मासुराचा उदयास्त”…… इत्यादि साहित्यविश्वात रमणारं होतं…… भीमसेन जोशींना अगदी समोर बसून ऐकता येत होतं किंवा भेटता येत होतं…..

ना. ग. गोरे… एस. एम. जोशी अशी थोर नेतृत्वं होती…

खरोखरच तेव्हाचं पुणं हे त्यावेळच्या पहाटेच्या सुंदर धुक्यासारखं एक गोड सांस्कृतिक स्वप्न होतं…..

सुंदर स्वप्नातून जागं झाल्यावरही त्या स्वप्नाची आठवण दिवसभर मनात रेंगाळत रहावी, तसं हे तेव्हाचं सुंदर पुणं मनात सदैव रेंगाळत राहतं……….!!!

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “साठीमधला म्हातारा …” – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ “साठीमधला म्हातारा …” – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

खूप टिकाऊ मासा जसा – चवीला नेहमीच खारट असतो,

तसाच…. साठीमधला म्हातारा थोडा जास्तच चावट असतो !

 

उजेडाचा त्रास होतो म्हणून गॅागल वापरत असतो,

काळ्याभोर काचेमागून ” निसर्गसौंदर्य ” न्याहाळीत असतो !

शेजारीण आली घरी की आनंदाने हसत असतो,

बायकोला चहा करायला लावून स्वत: गप्पा मारत बसतो—

कारण…. साठीमधला म्हातारा थोडा जास्तच चावट असतो !

 

पाय सतत दुखतात म्हणत घरच्या घरी थांबत असतो,

बाकी सगळ्या दिवशी मात्र मित्रांबरोबर भटकत असतो !

चार घास कमीच खातो असं घरात सांगत रहातो

भजी समोसे मिसळपाव बाहेर खुशाल चापत असतो

कारण …. साठीमधला म्हातारा थोडा जास्तच चावट असतो !

 

औषधाचा डोस गिळतांना घशामध्ये अडकत असतो,

पार्टीत चकणा खाता खाता चार चार पेग रिचवत असतो

अध्यात्माच्या गप्पा मोठ्या चारचौघात झोडत असतो

मैत्रिणींच्या घोळक्यात मात्र रंगेल काव्य ऐकवत असतो

कारण ….. साठीमधला म्हातारा थोडा जास्तच चावट असतो !

 

साठीमधला म्हातारा आता निवृत्तीत गेलेला असतो

विरंगुळ्याला जुन्या जुन्या आठवणीत रमत असतो

काम नसतं हातामध्ये, किंमत नसते घरामध्ये ! …. 

म्हटलं तर ज्येष्ठ असतो, तरी बराच तरूण असतो

संपून गेलेलं तारुण्य पुन्हा आणू पहात असतो

 

कारण ….. खूप टिकाऊ मासा जसा चवीला नेहेमीच खारट असतो

तसाच ….. साठीमधला म्हातारा थोडा जास्तच चावट असतो !

 

रचना – अनामिक

संग्राहक – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ९ (इंद्र सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ९ (इंद्र सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ९ ( इंद्र सूक्त )

ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र : देवता – इंद्र : छंद – गायत्री

मधुछन्दस वैश्वामित्र ऋषींनी पहिल्या मंडळातील नवव्या सूक्तात इंद्र देवतेला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त इंद्रसूक्त म्हणून ज्ञात आहे. याच्या गीतरूप भावानुवादाच्या नंतर दिलेल्या लिंकवर क्लिक केले म्हणजे हे गीत ऐकायलाही मिळेल आणि त्याचा व्हिडीओ देखील पाहता येईल. 

मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री. 

इन्द्रेहि॒ मत्स्यन्ध॑सो॒ विश्वे॑भिः सोम॒पर्व॑भिः । म॒हाँ अ॑भि॒ष्टिरोज॑सा ॥ १ ॥

सिद्ध करू आम्ही तुजसाठी जेव्हा सोमयाग 

सत्वर येऊनी स्वीकारी तुमचा हविर्भाग

अमुच्या हविला प्राशन करुनी अता करा पावन

अपुल्या सामर्थ्याने करावे अमुचे संरक्षण ||१||

एमे॑नं सृजता सु॒ते म॒न्दिमिन्द्रा॑य म॒न्दिने॑ । चक्रिं॒ विश्वा॑नि॒ चक्र॑ये ॥ २ ॥

देवांचा हा राजा असतो सदैव मोदभरा 

सोमरसाने वृद्धिंगत त्या आनंदाला करा 

तोची या विश्वाचा कर्ता त्याला अर्पण करा

प्रसन्नता देईल सोमरस समर्थ या देवेंद्रा  ||२||

मत्स्वा॑ सुशिप्र म॒न्दिभि॒ स्तोमे॑भिर्विश्वचर्षणे । सचै॒षु सव॑ने॒ष्वा ॥ ३ ॥

दिव्यकिरीटधारी हे इंद्रा दिव्यदृष्टि देवा 

गातो स्तोत्र  प्रमोदकारी प्रसन्न होई देवा

अर्पण करतो आम्ही तुम्हाला हवि येथ देवा

साक्ष होऊनी वास्तव्याला इथेच राही देवा ||३||

असृ॑ग्रमिन्द्र ते॒ गिरः॒ प्रति॒ त्वामुद॑हासत । अजो॑षा वृष॒भं पति॑म् ॥ ४ ॥

गातो जरी मी स्तवने तुमची इथे वैखरीने

त्याही आधी तुमच्या चरणी येती आर्त मनाने

तुम्ही तयांचे स्वामी असता समर्थ भगवंता

पूर्ण कामना करी  तयांच्या हे स्तोत्रांच्या नाथा ||४||

सं चो॑दय चि॒त्रम॒र्वाग्राध॑ इन्द्र॒ वरे॑ण्यं । अस॒दित्ते॑ वि॒भु प्र॒भु ॥ ५ ॥

तू तर असशी स्वामी धनाचा जयासी न सीमा

अती अलौकिक अतीव स्पृहणीय असे तुझी माया

प्रसन्न होऊनि आम्हावरती दान अम्हा देई

अलौकीक अन् अमाप ऐसे धन आम्हा देई ||५|| 

अ॒स्मान्सु तत्र॑ चोद॒येन्द्र॑ रा॒ये रभ॑स्वतः । तुवि॑द्युम्न॒ यश॑स्वतः ॥ ६ ॥

देई प्रेरणा धनार्जनाची वैभव प्राप्तीस्तव

अमुच्या कष्टांना असुद्यावे आशीर्वच हे तव

सहस्रकांति सुरेन्द्रराजा कृपा असोद्यावी

यशोवंत करी आम्हासी अता प्रसन्नता यावी ||६||

सं गोम॑दिन्द्र॒ वाज॑वद॒स्मे पृ॒थु श्रवो॑ बृ॒हत् । वि॒श्वायु॑र्धे॒ह्यक्षि॑तम् ॥ ७ ॥

गोधन आदी वैभव यांनी समृद्ध आम्ही

प्रचंड सामर्थ्याने विजिगिषु अजेय हो आम्ही

आरोग्यमयी दीर्घायूषी सुखी जीवनी आम्ही 

अशीच कीर्ती होवो अमुची कृपा करावी तुम्ही ||७||

अ॒स्मे धे॑हि॒ श्रवो॑ बृ॒हद्‍द्यु॒म्नं स॑हस्र॒सात॑मं । इंद्र॒ ता र॒थिनी॒रिषः॑ ॥ ८ ॥

तव वरदाने अपार वैभव अम्हा प्राप्त होवो

आरूढ व्हाया देवा, दारी अश्वशकट तो राहो 

कीर्ती अमुची शाश्वत व्हावी दिगंत पसरावी

अखंड आम्हावरी सुरेंद्रा कृपादृष्टी ठेवावी ||८|| 

वसो॒रिन्द्रं॒ वसु॑पतिं गी॒र्भिर्गृ॒णन्त॑ ऋ॒ग्मियं॑ । होम॒ गन्ता॑रमू॒तये॑ ॥ ९ ॥

आळवावया देवेंद्राला विविध स्तोत्र गाऊ

किती छंदांतुनी त्याच्या स्तुतीला स्तवन गीत गाऊ

साद घालता तयासी तो तर झणी साक्ष होतो

रक्षण करण्या अमुचे त्याला आवाहन करितो ||९||

सु॒तेसु॑ते॒ न्योकसे बृ॒हद्बृ॑ह॒त एद॒रिः । इन्द्रा॑य शू॒षम॑र्चति ॥ १० ॥

सोमयाग होता संपन्न इंद्र साक्ष होतो

प्रसन्न करण्या त्याला भक्त स्तोत्रे अर्पण करितो 

उच्च स्वरातून बृहत् सुराने स्तवन पठण करतो

स्तुतिगीते ही प्रसन्न करण्या देवेंद्रा अर्पितो ||१०||

https://youtu.be/8nF29OhpJnE

©️ डाॅ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ झंडू बाम… ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर

? इंद्रधनुष्य ? 

झंडू बाम… ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆

जावईबापूंच्या डोक्याचा ताप कमी करण्यासाठी भटजींनी झंडू बाम बनवला…..!!!!

१५० वर्षांपूर्वीची गोष्ट…… 

तो इंग्रजी राज्यसत्तेचा काळ होता. गुजरातच्या काठियावाड प्रांतात जामनगर संस्थानमध्ये राजवैद्य होते विठ्ठल भट. आयुर्वेदाचे ते मोठे अभ्यासक होते. त्यांचा हातगुण चांगला होता. त्यांची प्रसिद्धी पंचक्रोशीत पसरलेली होती.

त्यांच्या मुलाचं नाव करुणाशंकर भट. पण त्याला झंडू भटजी म्हणून ओळखायचे. हे झंडू भटजीदेखील आयुर्वेदाचार्य होते. वैद्य विठ्ठल भट यांच्या हाताखाली ते तयार झाले होते. बापसे बेटा सवाई अशी त्यांची ख्याती झाली होती. स्वतःची औषधे तयार करण्यासाठी त्यांना रसशाळा सुरू करायची होती.

जामनगरचे महाराज जामसाहेब हे झंडू भट्जी यांच्या ज्ञानावर प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या संस्थानात रंगमती नदीच्या किनाऱ्यावर थोडीशी जमीन झंडू भटजींना बहाल केली. येथेच १८६४ साली झंडू भट्जींनी आपली आयुर्वेद रसशाळा स्थापन केली—- आणि झंडू ब्रॅण्डचा जन्म झाला. झंडू भटजींची औषधे फक्त जामनगर नाही तर अख्ख्या काठियावाड मध्ये फेमस होती. दूरदूरहून लोक त्यांच्याकडे आपल्या रोगाचे निदान होईल या आशेने येत असत. झंडू भटजींची रसशाळा भारतभर गाजू लागली होती.

या भट कुटुंबाच्या ज्ञानाला आधुनिक रुपात आणायचे श्रेय मात्र त्यांचा नातू जुगतराम वैद्य यांना जाते.

झंडू यांचे नातू जुगतराम वैद्य यांनी केमिस्ट्री व फिजिक्सचे आधुनिक शिक्षण घेतले होते. त्यांनी राजकोटमधील ब्रिटिश प्रोफेसर ली यांच्या लॅबमध्ये काम केलं होतं. आपली पारंपरिक औषधे जर आधुनिक रुपात आणली तर ती जगभरात पोहचवता येतील हे जुगतराम वैद्य यांच्या लक्षात आलं. पण आजोबा झंडू भटजी यासाठी तयार होत नव्हते.

एवढंच काय त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांना साथ देत नव्हतं. फक्त एकजण तयार झाला —- झंडू यांचा जावई प्रभाशंकर पट्टानी. 

हे प्रभाशंकर पट्टानी भावनगरच्या राजाचे पंतप्रधान होते. खरंतर त्यांचंदेखील आडनाव भट्ट होतं. सुरवातीला त्यांची परिस्थिती गरिबीची होती. त्याकाळी डॉक्टर व्हायचं म्हणून ते मुंबईला गेले, पण ते जमलं नाही. राजकोटला परत आल्यावर त्यांनी मास्तरकी सुरू केली. झंडू भटजींच्या मुलीशी त्यांचं लग्न झालं होतं, पण सासरकडच्या कोणीतरी त्यांचा डॉक्टर न झाल्यावरून अपमान केला व प्रभाशंकर यांनी पट्टानी हे आडनाव धारण केल.

प्रभाशंकर मुळात हुशार होते. राजकोटमध्ये शिकायला आलेल्या भावनगरचा राजकुमार भावसिंग याला त्यांची खाजगी शिकवणी लावण्यात आली. हा भावसिंग कायम डोकेदुखीने त्रस्त असायचा. त्यामुळे चिडचिड होऊन स्वभाव रागीट बनला होता. त्याच्या प्रकृतीचा पट्टानी यांच्या डोक्याला ताप होऊन बसला होता. त्याला बरे करण्यासाठी प्रभाशंकर यांनी आपल्या सासऱ्यांना सांगून बनवलेलं एक खास बाम आणून दिल.

ते बाम लावल्यावर राजकुमाराची डोकेदुखी पळून गेली.—– तेच ते आजचे सुप्रसिद्ध झंडू बाम.

त्यानंतर भावसिंग यांचा प्रभाशंकर यांच्यावरचा विश्वास वाढला. पुढे ते जेव्हा भावनगरच्या राजेपदी आले तेव्हा या आपल्या गुरूला त्यांनी पंतप्रधान बनवलं. प्रभाशंकर पट्टानी यांनी पुढची तीस चाळीस वर्षे काटेकोरपणे राज्यकारभार चालवला. भारताच्या राजकीय वर्तुळात त्यांचे मोठे वजन होते. महात्मा गांधीजींचेही ते खास मित्र होते.

अस सांगितलं जातं की जेव्हा असहकार आंदोलनावेळी चौरीचौरा प्रकरण घडलं, तेव्हा पट्टानी यांनी ‘ तुमच्या आंदोलनात हिंसा होत आहे ‘ असं सांगून गांधीजींचे कान धरले व त्याचाच परिणाम गांधीजींनी ब्रिटिश सत्तेविरुद्धचं असहकार आंदोलन मागे घेतले.

ज्या जावयाचा झंडू भटजींच्या कुटूंबाने अपमान केला, त्याचीच मदत घ्यायची वेळ त्यांच्या नातवावर आली.

पण मनात कोणताही पूर्वग्रह न बाळगता प्रभाशंकर यांनी जुगतराम वैद्य यांना राजाकडून सर्वतोपरी साहाय्य मिळवून दिले व या दोघांनी मिळून १९१० साली झंडू फार्मसिटीकल कंपनीची स्थापना केली.

अगदी काही काळातच झंडू बाम तुफान फेमस झाले. डोकेदुखीपासून अंगदुखीपर्यंत प्रत्येक गोष्टीवरील रामबाण उपाय म्हणून त्याला पाहिलं गेलं.

पुढच्या ९ वर्षात ही कंपनी शेअर बाजारात देखील आली.

झंडू भटजींनी रसशाळा सुरू केली त्याला जवळपास १५० वर्षे झाली. या कंपनीचा विस्तार शेकडो कोटींचा बनला आहे. आता या कंपनीची मालकी झंडू भटजींच्या कुटुंबाकडे राहिली नाही. पण फक्त भारतातच नाही तर परदेशातही त्यांची उत्पादने पोहचली आहेत.

‘दबंग ‘  मधली मलायका अरोरा देखील ‘  झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए ‘ जेव्हा म्हणते तेव्हा या आयुर्वेदिक औषधीचा सबंध भारतीय समाजावर झालेला परिणाम दिसून येतो.

डॉक्टरच्याआधी मदतीला येणारा, प्रत्येक घरात हमखास दिसणारा झंडू भटजींचा ‘ झंडू बाम ‘  १५० वर्षांचा झाला तरी त्याचा इफेक्ट कमी झाला नाही हे नक्की.

संग्राहिका : आनंदी केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हयातीतच मृत्यूची बातमी ????… लेखिका  : सुश्री मानसिंगराव कुमठेकर ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? इंद्रधनुष्य ?

हयातीतच मृत्यूची बातमी ????लेखिका  : सुश्री मानसिंगराव कुमठेकर ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

ब्रेकिंग न्यूज देण्याच्या घाईत, शहानिशा न करता एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीच्या निधनाची बातमी देण्याचा उतावीळपणा करण्याची परंपरा तशी जुनीच आहे. अभिनेते विक्रम गोखले यांच्या मृत्यूच्या बाबतीत गेले काही दिवस विविध माध्यमांनी केलेला उतावीळणा चर्चेचा विषय बनला आहे. 

मात्र, असा प्रकार आत्ताच घडतोय असे नाही. घाईगडबडीत कोणतीही चौकशी न करता निधनाची बातमी देण्याची परंपरा जुनीच असल्याचे आढळते. अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या ख्यातनाम वृत्तपत्राने ८ जुलै १९२२ च्या अंकात, मिरजेचे सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विल्यम वॉनलेस हयात असताना, त्यांच्या निधनाची बातमी अशाच पद्धतीने कोणतीही शहानिशा न करता दिली होती. 

या बातमीमुळे त्यावेळी भारतासह अमेरिकेत मोठी खळबळ माजली होती. मात्र डॉक्टर वॉन्लेस हयात असल्याचे समजताच न्यूयॉर्क टाइम्सने १३ जुलै १९२२ रोजी पुन्हा खुलासावजा बातमी प्रसिद्ध केली.– ‘ डॉ. वॉन्लेस अजूनही हयात आहेत ‘ (डॉ. वॉन्लेस स्टील अलाइव्ह)— अशा मथळ्याची खुलासा करणारी बातमी छापण्याची नामुष्की न्यूयॉर्क टाईम्सवर आली. डॉक्टर वॉन्लेस हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धन्वंतरी होते. मूळचे अमेरिकेचे असलेल्या वॉन्लेस यांनी मिरजेमध्ये मिशन इस्पितळ नावाची मोठी संस्था उभी केली. दक्षिण महाराष्ट्रातील राजे राजवाड्यांसह अनेक गोरगरीब लोक त्यावेळी मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत असत. डॉक्टर वॉन्लेस यांनी निरपेक्ष भावनेने केलेल्या रुग्णसेवेमुळे ते देशातच नव्हे तर जगभर वाखाणले गेले. तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांना ‘ कैसर ई हिंद ‘ आणि ‘ सर ‘ या मानाच्या पदव्या बहाल केल्या. पुढे ३ मार्च सन १९३३ रोजी त्यांचा मृत्यू झाला. मात्र तत्पूर्वीच सन १९२२ मध्ये त्यांच्या हयातीतच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी तत्कालीन न्यूयॉर्क टाइम्स या सुप्रसिद्ध दैनिकात प्रसिद्ध झाली होती .कोणतीही शहानिशा न करता सदर दैनिकाने ही बातमी छापली. मात्र चहूबाजूनी टीका झाल्यानंतर पाच दिवसांनी न्यूयॉर्क टाइम्सने आपली चूक सुधारत डॉक्टर वॉन्लेस हयात असल्याची बातमी खुलासाच्या स्वरूपात छापली होती. पुढे डॉ. वॉन्लेस दहा वर्षे हयात होते.

लेखिका  : सुश्री मानसिंगराव कुमठेकर

मो – 9405066065

संग्राहिका – माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कचऱ्यातून सोने – सुश्री स्नेहल गोखले ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ कचऱ्यातून सोने – सुश्री स्नेहल गोखले ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

मंडळी, नुकताच दसरा अगदी जोरदार साजरा केला असणार.

झेंडू फुले जी त्यादिवशी अगदी १०० रुपये किलो दराने आणली ती दुसऱ्या दिवशी आपण फेकून देणार ,हो न? आपण याचे अनेक उपयोग करू शकतो. नक्की वाचा आणि एखादा तरी उपयोग करून बघा. 

.काल तोरणासाठी आणि पूजेसाठी आणलेले झेंडू दोन दिवसात कचऱ्यात जातील, ही झेंडूची फुलं वाळवली तर रोप तयार करता येतील. 

. झेंडूची फुलं ही कडू वासाची असल्याने चुरडून कुंडीमध्ये टाकली तर कीटकांना परावृत्त करतात. 

. लिंबू ,संत्री सालींपासून जसे बायो एन्झाईम बनवतात तसेच झेंडूच्या फुलांपासून देखील बनवता येते. 

ते कीटकनाशक म्हणून वापरता येते.

(फुले ,गूळ आणि पाणी यांचे प्रमाण ३:१:१०)

. फक्त झेंडूच्या फुलांचे कंपोस्ट देखील करू शकता. अशा प्रकारच्या कंपोस्टमध्ये फुलझाडे लावली तर कीटकनाशक घालायची गरजही कमी भासते.

. झेंडू फुले वाळवून त्याचा प्राकृतिक रंग देखील बनवतात.

. तोरणामध्ये लावलेली आंब्याची पाने काढून फेकून न देता ती मिक्सरमधून काढून किंवा बारीक चुरडून      पाण्यामध्ये घालून तीन दिवस ठेवावी, आणि असे पाणी डायल्युट करून झाडांवर फवारल्यास मुंग्या कमी होतात. 

(ही मलाही नवीन कळलेली गोष्ट आहे. मी पण करून बघणार आहे, तुम्हीही करून बघा आणि रिझल्ट शेअर करा.)

लेखिका : सुश्री स्नेहल गोखले

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मित्रलक्षणे….समर्थ रामदासस्वामी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ मित्रलक्षणे….समर्थ रामदासस्वामी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर  ☆

आपल्या परंपरेत पूर्वी वेगळे दिन वगैरे साजरे केले जात नसत …. परंतू तरीही खूप पूर्वी श्री रामदास स्वामींनी आवर्जून सांगितलेली मित्र लक्षणे मात्र, आज “फ्रेंडशिप डे“ आवर्जून साजरा करतानाही नक्कीच ध्यानात ठेवावीत अशी आहेत ——

 

मित्र तो पाहिजे ज्ञानी। विवेकी जाणता भला।

                             श्लाघ्यता पाहिजे तेथे। येहलोक परत्रहि॥

 

उगाचि वेळ घालाया। नासके मित्र पाहिले ।

                             कुबुद्धि कुकर्मी दोषी। त्यांचे फळ भोगावया॥

 

सारीचे मित्र नारीचे। चोरीचे चोरटे खवी।

                             मस्तीचे चोरगस्तीचे। कोटके लत पावती॥

 

संगदोषे महादुःखे। संगदोषे दरिद्रता।

                             संगतीने महद्भाग्य। प्राणी प्रत्यक्ष पावती॥

 

संग तो श्रेष्ठ शोधावा। नीच सांगात कामा नये।

                              न्यायवंत गुणग्राही। येत्नाचा संग तो बरा॥

 

रचना : श्री समर्थ रामदासस्वामी महाराज

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “छोटीशी मदत…” ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ “छोटीशी मदत…” ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

एकदा मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या ट्रेनमध्ये ड्युटीवर असलेल्या टीटीईने (ट्रेन तिकीट परीक्षक) सीटखाली लपलेल्या एका मुलीला पकडले.  ती सुमारे 13 किंवा 14 वर्षांची होती. टीटीईने मुलीला तिकीट काढण्यास सांगितले.  तिच्याकडे तिकीट नसल्याचे उत्तर मुलीने संकोचून दिले. टीटीईने तरुणीला ताबडतोब ट्रेनमधून उतरण्यास सांगितले.

तेवढ्यात मागून आवाज आला “मी तिच्यासाठी पैसे देईन”.  पेशाने कॉलेज लेक्चरर असलेल्या श्रीमती उषा भट्टाचार्य यांचा तो आवाज होता. श्रीमती भट्टाचार्य यांनी मुलीच्या तिकिटाचे पैसे दिले आणि तिला तिच्याजवळ बसण्याची विनंती केली. तिने तिला तिचे नाव काय विचारले.

“चित्रा”, मुलीने उत्तर दिले.

“तू कुठे जात आहेस?”

“मला कुठेही जायला नाही.”  मुलगी म्हणाली..

“मग चल माझ्यासोबत.”  श्रीमती भट्टाचार्य यांनी तिला सांगितले.  बंगळुरूला पोहोचल्यानंतर श्रीमती भट्टाचार्य यांनी मुलीला एका एनजीओकडे सोपवले.  नंतर श्रीमती भट्टाचार्य दिल्लीला स्थलांतरित झाल्या आणि दोघींचा एकमेकांशी संपर्क तुटला.

सुमारे 20 वर्षांनंतर श्रीमती भट्टाचार्य यांना सॅन फ्रान्सिस्को (यूएसए) येथे एका महाविद्यालयात व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. ती एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होती. ते संपल्यानंतर तिने बिल मागितले, परंतु तिला सांगण्यात आले की बिल आधीच भरले आहे. जेव्हा ती मागे वळली तेव्हा तिला एक स्त्री तिच्या पतीसह तिच्याकडे पाहून हसताना दिसली.  श्रीमती भट्टाचार्य यांनी जोडप्याला विचारले, ” तुम्ही माझे बिल का भरले? “

त्या तरुणीने उत्तर दिले, ” मॅडम, मुंबई ते बंगळुरू या रेल्वे प्रवासासाठी तुम्ही माझ्यासाठी जे भाडे दिले होते, त्या तुलनेत मी भरलेले बिल खूपच कमी आहे…… दोन्ही महिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

“अरे चित्रा… ती तूच आहेस..!! ”  सौ. भट्टाचार्य आनंदाने आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या. 

एकमेकींना मिठी मारताना ती तरुणी म्हणाली, ” मॅडम माझे नाव आता चित्रा नाही. मी सुधा मूर्ती आहे. आणि हा माझा नवरा आहे… नारायण मूर्ती “.

— अचंबित होऊ नका. इन्फोसिस लिमिटेडच्या अध्यक्षा श्रीमती सुधा मूर्ती आणि लाखो कोटींची इन्फोसिस सॉफ्ट वेअर कंपनी स्थापन करणारे श्री नारायण मूर्ती यांची सत्यकथा तुम्ही वाचत आहात.

— होय, तुम्ही इतरांना दिलेली छोटीशी मदत त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते !

” कृपया संकटात असलेल्यांचे चांगले करणे थांबवू नका, विशेषत: जेव्हा ते करण्याचे सामर्थ्य  तुमच्यात  असते.” 

—अक्षता मूर्ती या जोडप्याची मुलगी आहे आणि ऋषी सुनक यांच्याशी तिने लग्न केले आहे, जे यूकेचे पंतप्रधान बनले आहेत…!!

प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print