मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १७ (इंद्रवरुण सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १७ (इंद्रवरुण सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १७ (इंद्रवरुण सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – अग्नि 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील सतराव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी इंद्र देवतेला आणि वरूण देवतेला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त इंद्रवरुण सूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद : 

इंद्रा॒वरु॑णयोर॒हं स॒म्राजो॒रव॒ आ वृ॑णे । ता नः॑ मृळात ई॒दृशे॑ ॥ १ ॥

राज्य करिती जे जगतावरती इंद्र आणि वरुण

त्यांच्या चरणी करुणा भाकत दीन आम्ही होउन 

शरण पातता त्यांच्या चरणी सर्व भाव अर्पुन

सर्वसुखांचा  करीत ते वर्षाव होउनि प्रसन्न ||१||

गन्ता॑रा॒ हि स्थोऽ॑वसे॒ हवं॒ विप्र॑स्य॒ माव॑तः । ध॒र्तारा॑ चर्षणी॒नाम् ॥ २ ॥

उभय देवता इंद्र वरुण येताती झणी धावत

अमुच्या जैसे भक्त घालती साद तुम्हाला आर्त 

त्या सर्वांचे रक्षण तुम्ही सदैव हो करिता

अखिल जीवांचे पोषणकर्ते तुम्ही हो दाता ||२||

अ॒नु॒का॒मं त॑र्पयेथा॒मिंद्रा॑वरुण रा॒य आ । ता वा॒ं नेदि॑ष्ठमीमहे ॥ ३ ॥

तृप्ती करण्या आकाक्षांची द्यावी धनसंपत्ती

हे इंद्रा हे वरुणा अमुची तुम्हाठायी भक्ती

उदार व्हावे सन्निध यावे इतुकी कृपा करावी

अमुची इच्छा प्रसन्न होऊनि देवा पूर्ण करावी ||३||

यु॒वाकु॒ हि शची॑नां यु॒वाकु॑ सुमती॒नां । भू॒याम॑ वाज॒दाव्ना॑म् ॥ ४ ॥

कृपाकटाक्षासाठी  तुमच्या कष्ट करू आम्ही 

श्रेष्ठ करोनी कर्म जीवनी पात्र होऊ आम्ही 

सामर्थ्याचा लाभ होतसे कृपादृष्टीने तुमच्या  

काही न उरतो पारावार भाग्याला अमुच्या ||४||

इंद्र॑ः सहस्र॒दाव्नां॒ वरु॑णः॒ शंस्या॑नां । क्रतु॑र्भवत्यु॒क्थ्यः ॥ ५ ॥

सहस्रावधी दानकर्मे श्रेष्ठ इंद्र करितो

सकल देवतांमाजी तो तर अतिस्तुत्य ठरतो

वरुणदेवते त्याच्या संगे स्तुती मान मिळतो

या उभयांच्या सामर्थ्याची आम्ही प्रशंसा करितो  ||५||

तयो॒रिदव॑सा व॒यं स॒नेम॒ नि च॑ धीमहि । स्यादु॒त प्र॒रेच॑नम् ॥ ६ ॥

कृपा तयाची लाभताच संपत्ति अमाप मिळे

त्या लक्ष्मीचा संग्रह करुनी आम्हा मोद मिळे

कितीही त्याने दिधले दान त्याच्या संपत्तीचे

मोल कधी त्याच्या खजिन्याचे कमी न व्हायाचे ||६||

इंद्रा॑वरुण वाम॒हं हु॒वे चि॒त्राय॒ राध॑से । अ॒स्मान्त्सु जि॒ग्युष॑स्कृतम् ॥ ७ ॥

हे देवेंद्रा वरुण देवते ऐका अमुचा धावा

धनसंपत्ती सौख्यासाठी आम्हाला हो पावा

प्रसन्न होऊनी अमुच्यावरती द्यावे वरदान 

अमुच्या विजये वृद्धिंगत हो तुमचाची मान ||७||

इंद्रा॑वरुण॒ नू नु वां॒ सिषा॑सन्तीषु धी॒ष्वा । अ॒स्मभ्यं॒ शर्म॑ यच्छतम् ॥ ८ ॥

इंद्रा-वरुणा सदैव आम्ही चिंतनात तुमच्या

भविष्य अमुचे सोपविले आहे हाती तुमच्या 

सदात्रिकाळी जीवनामध्ये होवो कल्याण

कर ठेवूनिया शीरावरी द्यावे आशीर्वचन ||८||

प्र वा॑मश्नोतु सुष्टु॒तिरिंद्रा॑वरुण॒ यां हु॒वे । यामृ॒धाथे॑ स॒धस्तु॑तिम् ॥ ९ ॥

सुरेंद्र-वरुणा तुम्हासि अर्पण स्तुती वैखरीतुनी

प्रोत्साहित झालो आम्ही मोहक तुमच्या स्मरणानी

सुंदर रचिलेल्या या स्तुतिने तुमची आराधना  

प्रसन्न होऊनी स्वीकारावी अमुची ही प्रार्थना ||९||

हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे. 

https://youtu.be/j7qWOqc8gp8

Attachments area

Preview YouTube video Rugved 1 17

Rugved 1 17

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “गणपतीचे तीन अवतार…” ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ “गणपतीचे तीन अवतार…” ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !

चौदा विद्या चौसष्ठ कलां’चा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव आज होत आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ‘श्रीगणेशजयंती’ म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो.

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. तर माघी गणेशोत्सवात गणपतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते.

भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढ्या  मोठय़ा सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो, त्या तुलनेत माघी गणेशोत्सवाचे महत्त्व कमी आहे. काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात. तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो.

गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला, असे म्हटले जाते. 

  • पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते.
  • दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेशचतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्याप्रति कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते.
  • तिसरा दिवस (वेळ) म्हणजे माघ शुक्ल जयंती. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे.

– त्याबाबत, स्कंद पुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून, ही माघी गणेश जयंती (माघी गणेशोत्सव) म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात. एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते.

!! ॐ गं गणपतये नम: !!

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भविष्यातील ऊर्जा स्त्रोत : अणु संमीलन ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ भविष्यातील ऊर्जा स्त्रोत :  अणु संमीलन  ☆ श्री राजीव गजानन पुजारी

अनादी काळापासून मनुष्याला त्याच्या विविध कार्यांसाठी ऊर्जेची गरज भासत आली आहे. आपण जे अन्न सेवन करतो त्याचे रासायनिक प्रक्रियेद्वारे कायिक ऊर्जेत रूपांतर होते. वादळाच्या वेळी झाडाच्या दोन फांद्या एकमेकांवर घासून पेट घेतलेले मानवाने बघितले, त्यावरून दोन गारगोट्या एकमेकांवर घासून मानवाने अग्नि निर्माण केला. त्याचा उपयोग मनुष्य अन्न शिजविण्यासाठी करू लागला. बाष्प शक्तीचा शोध लागल्यावर औद्योगिक क्रांती झाली, दळणवळण वेगाने सुरू झाले. त्यानंतर जीवाश्म इंधन वापरून मानवाने प्रगतीचा पुढचा टप्पा गाठला. धरणाद्वारा पाणी अडवून त्या पाण्याचा वापर करून मानवाने वीज निर्माण केली. जीवाश्म इंधनांचा साठा संपत आला आहे तसेच जीवाश्म इंधनामुळे पर्यावरणाची हानी होते हे लक्षात आल्यावर मानवाने ऊर्जा निर्मितीसाठी इतर पर्यायांचा विचार करायला सुरुवात केली. त्यात सौरऊर्जा, पवन ऊर्जा, अणुभंजनाद्वारे निर्मिलेली ऊर्जा, आदींचा समावेश होतो. सौर ऊर्जा व पवन ऊर्जा मिळवणे जरी पर्यावरणास अनूकूल असले तरी त्यांची कार्यक्षमता हवामानावर अवलंबून असते; तर अणुभंजनामुळे ऊर्जा निर्माण होताना सयंत्रात काही अडचण आली तर किरणोत्सर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. दुसरे म्हणजे अणूभंजन झाल्यावर जे अवांतर पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावणे महत्त्वाचे असते. त्यामुळे स्वच्छ व मुबलक ऊर्जा मिळवण्यासाठी अणुसंमीलनाचा वापर कसा करता येईल याविषयी जगभरातील शास्त्रज्ञ गेली अनेक दशके विविध प्रयोग व चाचण्या करत होते. या प्रयोगांच्या फलस्वरूप पाच डिसेंबर २०२२ रोजी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील द लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरी (LLNL) ला अणू संमीलन करण्यास प्रायोगिक पातळीवर यश मिळाले. हा प्रयोग एल.एल.एन.एल.च्या नॅशनल इग्निशन फॅसिलिटीमध्ये करण्यात आला. प्रयोगादरम्यान एका सेकंदाच्या शंभर ट्रिलीलनव्या भागापेक्षा कमी काळ टिकणाऱ्या एका क्षणात २.०५ मेगाज्यूल ऊर्जा म्हणजे अंदाजे एक पौंड टीएनटीच्या समतुल्य ऊर्जेचा हायड्रोजनवर भडीमार करण्यात आला. त्यामुळे न्यूट्रॉन कणांचा पूर आल्यासारखी स्थिती झाली. हा फ्युजनचा परिणाम होता. त्यातून सुमारे ३.१५ मेगाज्यूल ऊर्जा बाहेर पडली. म्हणजे १.१ मेगाज्यूल उर्जा वाढली. मानवाने आतापर्यंत सामना केलेल्या अत्यंत अवघड वैज्ञानिक आव्हानांपैकी हे एक आव्हान होते अशी प्रतिक्रिया या प्रयोगशाळेचे संचालक किम बुदिल यांनी दिली आहे.  हे अत्यंत उल्लेखनीय यश असून राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि स्वच्छ उर्जेसाठी याचा निश्चितपणे फायदा होईल असे अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने म्हटले आहे.

या प्रयोगामध्ये केंद्रस्थानी एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन असणारे हायड्रोजनचे समस्थानिक ( isotopes ) ड्यूटेरियम, हे केंद्रस्थानी एक प्रोटॉन व दोन न्यूट्रॉन असणाऱ्या ट्रिटीयम या हायड्रोजनच्या दुसऱ्या समस्थानिकाशी सांधण्यात (fusion) आले. या क्रियेमुळे केंद्रस्थानी दोन प्रोटॉन्स व दोन न्यूट्रॉन्स असणारे हेलियम हे दुसरे मूलद्रव्य तयार झाले. तयार झालेल्या हेलियमचे वस्तुमान हे ड्यूटेरियम व ट्रीटीयम यांच्या संयुक्त वस्तुमानापेक्षा कमी भरले. उर्वरित वस्तुमान ऊर्जेच्या स्वरूपात परिवर्तित झाले. ही मुक्त झालेली ऊर्जा अणू संमिलन घडवून आणण्यासाठी वापरण्यात आलेल्या ऊर्जेपेक्षा जास्त होती. LLNL प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी १९२ अति शक्तिशाली लेसर्सचा रोख हायड्रोजन समस्थानिकांनी भरलेल्या अंगठ्याएवढ्या आकाराच्या कुपीच्या दिशेने करत त्यांचा मारा केला व प्रयोग सिद्ध केला. सूर्य व इतर तार्‍यांमध्ये न्युक्लिअर फ्युजन द्वाराच ऊर्जेची निर्मिती केली जाते. हलके हायड्रोजन अणू एकत्र येऊन हेलियम हे मूलद्रव्य तयार होते. या प्रक्रियेत प्रकाश आणि उष्णतेच्या स्वरूपात अफाट ऊर्जा बाहेर पडते.

अमर्यादित ऊर्जा निर्मितीसाठीच्या प्रयोगातले हे पहिले यश आहे. या ऊर्जेची औद्योगिक पातळीवर निर्मिती करून त्याचा प्रत्यक्ष उपयोग करण्यासाठी अद्याप बराच पल्ला गाठावा लागणार आहे, असे एल.एल.एन.एल.या प्रयोगशाळेने स्पष्ट केले आहे. 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल –  [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दगडांना बोलतं करणारा माणूस ! – लेखक : श्री अभिजित घोरपडे  ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆  ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ दगडांना बोलतं करणारा माणूस ! – लेखक : श्री अभिजित घोरपडे  ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सासवडजवळ काहीतरी वेगळं पाहण्यासाठी चाललो होतो. आम्ही दोघेच होतो. मी आणि डॉ. शरद राजगुरू. पुण्यावरून मोटारसायकलवरून निघालो. दिवे घाट चढून माथ्यावर पोहोचलो. तसेच पुढे सासवड गाठले. या ऐतिहासिक गावाला वळसा घातला आणि पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याच्या दिशेने निघालो. तिथले प्रसिद्ध संगमेश्वर आणि त्यानंतर वटेश्वर ही मंदिरे ओलांडली. पुरंदरच्या रस्त्याने जात असताना डाव्या बाजूला कोरडं पात्र असलेला एक ओढा समांतर जात होता. काही अंतर गेल्यावर सरांनी थांबायला सांगितले आणि ते ओढ्यात उतरण्यासाठी वाट शोधू लागले.

त्या वाटेने काही अंतर गेल्यावर त्यांनी एक दगड उचलला. तो पाहून त्यांचा चेहरा उजळला आणि मलासुद्धा ते काहीतरी वेगळे असल्याचे जाणवले. ‘हा जांभा आहे…’ राजगुरू सरांचे शब्द. ते पाहून मी अतिशय रोमांचित झालो. कारण आतापर्यंत जांभा खडकाचा संबंध किनारपट्टीवरील कोकण आणि धो धो पाऊस पडणाऱ्या घाटमाथ्यांशीच लावला जात होता. त्यामुळे माझ्या मनात स्वाभाविक प्रश्न होता- जांभा इथं कसा?

तो दगड जाता-येता कदाचित कोणी टाकून दिलेला होता का?… तसेही नव्हते. कारण त्या ओढ्याच्या पात्रात आतमध्ये घट्ट रोवून बसलेले काही गोटे सापडले. ते सुद्धा गोल गरगरीत आणि गुळगुळीत. याचा अर्थ ते त्या ओढ्याच्या पात्राचा भाग होते. वरच्या बाजूला कुठेतरी त्यांचा मूळ स्रोत होता आणि ते तिथून निघून पाण्यासोबत वाहत वाहत इथवर पोहोचले होते. पण या ओढ्याचा उगम फार दूरवर नव्हतो, तर तो पुरंदर किल्ल्याच्या जवळपासच होता. म्हणजे त्या परिसरातच जांभा खडक तयार झाला होता. या खडकाची निर्मिती होण्यासाठी भरपूर काळ धो धो पाऊस पडावा लागतो. पण ज्या परिसरात आता हा जांभा सापडला, तो तर कोरड्या हवामानाचा भाग आहे. याचाच अर्थ पूर्वी त्या भागात भरपूर पावसाचे आर्द्र हवामान होते… राजगुरू सरांकडून हे समजून घेणं हे अतिशय आनंददायी असे. कारण त्यांच्या बोलण्यात, समजावण्यात, वावरण्यात कमालीचा साधेपणा असे. म्हणूनच मोठ्या अभ्यासकापासून ते विद्यार्थी आणि सर्वसामान्य माणूससुद्धा त्यांच्याशी सहजपणे जोडला जाईल.

त्यांच्यासोबत जांभा पाहिला, तशी वीस-पंचवीसच वर्षांपूर्वी कऱ्हेच्या पात्रातील ज्वालामुखीची राख पाहिली. दिवे घाटाच्या माथ्यावर सापडणारी आदिमानवाने तयार केलेली छोटी-छोटी दगडी हत्यारं (सूक्ष्मास्त्र / Microliths) पाहिली. त्यांचा अर्थ समजून घेतला… असा हा खडकांना बोलायला लावणारा, त्यांचा अर्थ शोधणारा आणि तो इतरांपर्यंत पोहोचवणारा माणूस!

त्यांचे वेगळेपण म्हणजे, त्यांनी भूविज्ञान (Geology) आणि पुरातत्त्वविज्ञान (Archaeology) या दोन विषयांची उत्तम सांगड घातली. त्यामुळेच भूविज्ञानातील काही गोष्टी वापरून पुरातत्त्वविज्ञानातील काही घटनांचा अर्थ लावला किंवा उलटे सुद्धा! याचे उदाहरण म्हणजे आपल्याकडे मोरगाव आणि बोरी या ठिकाणी नद्यांच्या पात्रात सापडणारी इंडोनेशियामधील ज्वालामुखीची राख (Tephra). ही राख इथे कधी येऊन पडली याची कालनिश्चिती करण्यासाठी या थराच्या खाली सापडलेल्या दगडी हत्यारांचा उपयोग झाला. हे करणाऱ्या टीमध्ये राजगुरू सरांचा प्रमुख वाटा होता. अशी अनेक उदाहरणे आहेत.

सरांनी वयाची ऐंशी ओलांडली तरी त्यांचा उत्साह प्रचंड होता. कोणतीही नवी गोष्ट पाहिली, त्याबाबत ऐकले किंवा काही वाचले तरी ते समजून घेण्याचे कुतूहल एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे असे. कोविडच्या काळात बाहेर पडणे कमी झाले, अन्यथा ते फिल्डवर जाण्यासाठी सदैव तत्पर असत. गेल्याच महिन्यात त्यांनी वयाची नव्वदी पार केली होती. त्या वेळी शंभरी गाठणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, ती पूर्ण झाली नाही. काल सायंकाळी त्यांचे निधन झाले.

योगायोग असा की दगडांची भाषा ऐकवणारी आणि त्यांचा अर्थ लावणारी  #Wonders_of_Geology# ही तीन दिवसांची इको-टूर ‘भवताल’च्या वतीने उद्यापासून सुरू होत आहे. ज्यांच्यामुळे खूप पूर्वी कधीतरी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे बीज मनात पेरले गेले, त्यापैकी एक म्हणजे डॉ. शरद राजगुरू. त्यामुळे त्यांचे आता जाणे ही अतिशय दु:खद बाब.

त्यांना व्यक्तिश: तसेच, “#भवताल” तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

लेखक : श्री अभिजित घोरपडे 

संग्रहिका : सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शिक्षण महर्षी, कृषीरत्न डॉ. पंजाबराव देशमुख… – माहिती संकलन – श्री सुनिल हटवार ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ शिक्षण महर्षी, कृषीरत्न डॉ. पंजाबराव देशमुख… – माहिती संकलन – श्री सुनिल हटवार ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

शिक्षण महर्षी, कृषीरत्न डॉ. पंजाबराव देशमुख..

(जन्म : २७ डिसेंबर १८९८- पापळ, अमरावती, महाराष्ट्र. मृत्यू : १० एप्रिल १९६५– दिल्ली) 

‘भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा ‘ हे ब्रीदवाक्य असणारे डॉ.पंजाबराव  ऊर्फ भाऊसाहेब देशमुख यांचे चरित्र आणि कार्य हिमालयापेक्षा उत्तुंग आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. देशातील शेतकरी आणि महाराष्ट्रातील शिक्षणाची अवस्था भाऊसाहेबांनी अनुभवली होती.

शेतकरी कुटुंबात जन्मास आलेल्या पंजाबरावांचे इयत्ता ३ री पर्यंतचे शिक्षण पापड या गावीच झाले. ४था वर्ग नसल्याने एक वर्ष पुन्हा ३ ऱ्याच वर्गात शिक्षण घ्यावे लागले. पुढे चांदूर रेल्वेच्या प्राथमिक शाळेत चौथा वर्ग पूर्ण केला.

माध्यमिक शिक्षण (कारंजा) लाड येथे तर matric चे शिक्षण अमरावतीच्या हिंदू हायस्कूल मधून पूर्ण केले.

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मधून इंटरमिडीएटचे शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी भाऊसाहेब इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी ‘वेद वाड:मयातील धर्माचा उद्गम आणि विकास’ (१९२०) मध्ये OXFORD विद्यापीठाची डॉक्टरेट (पी.एच.डी.)  ही पदवी संपादन केली. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रकांड पांडित्य संपादन करणारे भाऊसाहेब कधीच पोथीनिष्ठ नव्हते, तर ते होते कृतीनिष्ठ. बहुजनांचे दु:ख दूर करणारे डॉक्टर व अन्याय दूर करण्यासाठी झगडणारे ते Barrister होते.

महाराष्ट्राच्या शिक्षणाचे शिल्पकार म्हणजे दोन भाऊ– भाऊसाहेब पंजाबराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील.  देशातील सर्वात मोठ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना भाऊसाहेबांनी १९३१ मध्ये अमरावती येथे केली.  यानंतर विदर्भाचा ‘शैक्षणिक विकास– भारतीय शेती– शेतकरी– आणि बहुजन उद्धाराची चळवळ’ हे भाऊसाहेबांच्या जीवनाचे ध्येय ठरले. बहुजनांच्या शिक्षणातील अडचण ही प्रतिगाम्यांची मनुवादी विचारधारा आहे. ही मनुवादी विचारधारा नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. शोषितांचे उद्धारकर्ते आणि कृषकांचे कैवारी असलेल्या भाऊसाहेबांनी “जगातील शेतकऱ्यांनो संघटीत व्हा” हा मंत्र दिला. देशाचे कृषिमंत्री असताना १९५९ ला त्यांनी शेतकऱ्यांसाठी “जागतिक कृषि प्रदर्शनाचे” आयोजन केले. तसेच जपानी भातशेतीचा त्यांचा प्रयोग उल्लेखनीय आहे. ते कृषि विद्यापीठाच्या कल्पनेचे जनक आहेत.

बहुजनांच्या शिक्षणाचे शिल्पकार आणि कृषिक्रांतीचे अग्रदूत म्हणून ओळखले जाणारे डॉ. पंजाबराव देशमुख उच्च शिक्षण घेऊन  स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. इ.स. १९३६ च्या निवडणुकीपश्चात ते शिक्षणमंत्री झाले. स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषी मंत्री होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,०००च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करून त्या संस्था शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहेत.

शिक्षण, शेती, सहकार, अस्पृश्यांचा उद्धार, जातीभेद निर्मूलन, धर्म इ. विविध क्षेत्रात त्यांनी अवाढव्य कार्य केले. ग्रामीण समाज पोथीनिष्ठ आणि परंपरानिष्ठ असल्याने त्यांच्यात अज्ञान, अंधश्रद्धा, दैववाद, अवैज्ञानिकता, देवभोळेपणा खच्चून भरल्यामुळेच हा समाज शिक्षणापासून वंचित राहिला हे त्यांना ठाऊक होते. वर्णवर्चस्ववाद हा ग्रामीण बहुजन समाजाला पद्धतशीरपणे शिक्षणापासून दूर ठेवण्यासाठीचा प्रयत्न होता असे त्यांचे मत होते. 

जुलै १९२६ नंतर भारतात परत आल्यावर चातुर्वर्णप्रणीत जातीव्यवस्था , अश्पृश्यता, अज्ञान, दारिद्र्य, पारतंत्र्य यासाठी त्यांनी स्वत:ला पूर्णत: वाहून घेतले. १९२७ सालच्या मोशीच्या हिंदुसभेच्या अधिवेशनाचा डॉ.पंजाबराव देशमुखांनी ताबा घेतला व आपल्या ओजस्वी भाषणातून सबंध श्रोतावर्ग काबीज केला. चातुर्वर्ण, अश्पृश्यता,जातीभेद याचा 

निषेध-ठराव वामनराव घोरपडे यांनी मांडला व भाऊसाहेब याला अनुमोदन देताना म्हणाले, “आमची गुलामगिरी नष्ट करण्याकरिता अस्पृशता निवारणासारख्या सुधारणांच्या चिठ्ठ्या हिंदूधर्माला जोडून आम्ही त्याची भोके बुजविण्याचा प्रयत्न करीत आहोत. चातुर्वर्ण व्यवस्थेचा रांजण दुरुस्त झाला नाही तर तो रांजणच फोडून टाकण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही.” — 

डॉ.पंजाबराव देशमुखांच्या बहुजन उद्धाराच्या कार्यावर चिडलेल्या मनुवाद्यांनी त्यांच्या खुनाचाही प्रयत्न केला. पण भाऊसाहेब डगमगले नाहीत, पुढे त्यांनी २६ नोव्हेम्बर १९२७ रोजी सोनार कुटुंबात जन्मलेल्या कु. विमल वैद्य या युवतीशी आंतरजातीय विवाह करून मराठा-सुवर्णकार नातेसंबंध जुळवून आणले. १९३२ मध्ये त्यांनी  हिंदू देवस्थान संपत्ती बिल आणले. भाऊसाहेबांनी डॉ. बाबासाहेबांसोबत १९२७ मध्ये अमरावती येथील अंबादेवी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. मंदिर प्रवेशामागे ईश्वर भक्तीचा त्यांचा उद्देश नव्हता. भाऊसाहेबांचा देवावर विश्वासच नव्हता. ते म्हणत ,” मूर्तीत देव असेल तर मूर्तीत देव घडविणारा कारागीर हा देवाचा बापच ठरेल.”

त्यांचे कार्य —-

खरोखरच आजही डॉ. भाऊसाहेबांचे कार्य शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक, संस्थाचालक, शिक्षणतज्ञाना तसेच बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे.

१९२७- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी ‘महाराष्ट्र केसरी’ हे वर्तमानपत्र चालविले.

— वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास’ या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.

१९३३ – शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारiत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.

१९२६ – मुष्टिफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.

१९२७ – शेतकरी संघाची स्थापना.

१८ ऑगस्ट १९२८ – अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .

१९३० – प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री

१९३२ – श्री. ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना.

 – ग्रामोद्धार मंडळाची स्थापना.

१९५० – लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रूपांतर झाले.

१९५५ – भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने ‘राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.

१९५६ – अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.

— लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.

१९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. भारताचे पहिले कृषिमंत्री.

— देवस्थानची संपत्ती सरकारने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देशाने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.

— प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.

१९६० – दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.

पंजाबराव देशमुखांच्या जीवनावर आधारित  “ सूर्यावर वादळे उठतात “ हे नाटक, बाळकृष्ण द. महात्मे यांनी लिहिले आहे. 

माहिती संकलन : श्री सुनिल हटवार

.. ब्रम्हपुरी, चंद्रपूर – मो 9403183828    

संग्राहक : विनय मोहन गोखले    

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सेवा परमो धर्म: – लेखक – श्री विनीत वर्तक ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ सेवा परमो धर्म: – लेखक – श्री विनीत वर्तक ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

१४ जानेवारी २०२३ चा दिवस होता. एकीकडे देश मकरसंक्रांती साजरी करण्याची तयारी करत होता. तर तिकडे मेघा इंजिनिअरिंग इंडस्ट्री लिमिटेडचे कामगार झोझीला बोगद्याचे काम करत होते. संध्याकाळी साधारण ५:४० च्या सुमारास अचानक हिमस्खलन झालं, त्यासोबत तिकडे काम करणारे तब्बल १७२ कामगार त्यात अडकले. त्यांचा संपूर्ण जगाशी संपर्क तुटला. 

हे हिमस्खलन इतकं भीषण होतं की सुटकेचा कोणताच मार्ग दिसत नव्हता. परिस्थितीचं गांभीर्य आणि तब्बल १७२ लोकांच्या जीवाची जबाबदारी ओळखून मेघा इंजिनिअरिंग इंडस्ट्री लिमिटेडच्या प्रोजेक्ट इंजिनिअरने तात्काळ भारतीय सेनेशी संपर्क साधला. समोर आलेल्या प्रसंगाची व्याप्ती लक्षात घेऊन भारतीय सेनेने तात्काळ प्रशिक्षित सैनिकांची एक तुकडी रवाना केली. त्या भीषण परिस्थितीत संपूर्ण बर्फातून आपल्या जीवाची तमा न बाळगता त्यांनी रात्रीच्या अंधारात त्या १७२ लोकांना बर्फातून शोधून काढलं. त्यांना शांत करून भारतीय सेना आपल्या  ‘सेवा परमो धर्म:’ या आपल्या कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही, असं सांगून आश्वस्त केलं. 

१५ जानेवारीचा सूर्य उगवताच भारतीय सेनेच्या आसाम रायफल्स रेजिमेंटने त्या अडकलेल्या कामगारांना सोडवण्यासाठी युद्ध पातळीवर मिशन हाती घेतलं. अश्या वातावरणाची सवय असलेले प्रशिक्षित स्पेशल कमांडो, हत्यारे आणि प्रशिक्षित कुत्रे त्यांनी या मिशनसाठी रवाना केले. त्याशिवाय यात अडकलेल्या लोकांच्या तब्यतेची काळजी घेण्यासाठी मेडिकल टीमही पाठवण्यात आली. 

भारतीय सेनेने एकाही कामगाराला इजा न होऊ देता तब्बल १७२ कामगारांची त्या भीषण परिस्थितीतून सुखरूप सुटका केली. एकीकडे देश जिकडे संक्रांतीचा सण साजरा करत होता, तिकडे दुसरीकडे भारतीय सेनेने १७२ जणांच्या जीवावर आलेल संकट दूर केलं होतं. 

भारतीय सेनेच्या त्या अनाम वीर सैनिकांना माझा कडक सॅल्यूट… 

जय हिंद!!!

लेखक – श्री विनीत वर्तक

( फोटो शोध सौजन्य :- गुगल )

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बाण स्तंभ ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ बाण स्तंभ ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

इतिहास हा फार चकवणारा विषय आहे. आणि इतिहासाचा मागोवा घेता घेता आपण एखाद्या अश्या जागी येऊन उभे राहतो की मन अक्षरशः थक्क होऊन जाते. हे असं शक्य आहे का, या विषयी मनात गोंधळ उडतो. दीड हजार वर्षांपूर्वी हे इतकं प्रगत ज्ञान आपल्यापाशी होतं यावर विश्वासच बसत नाही.

गुजराथच्या सोमनाथ मंदिरापाशी येऊन आपली अशीच परिस्थिती होते. मुळात सोमनाथ मंदिराचा इतिहासच विलक्षण. बारा ज्योतिर्लिंगातील हे एक देखणं, वैभवशाली शिवलिंग. इतकं समृध्द की उत्तर पश्चिमेतून येणाऱ्या प्रत्येक आक्रमकाचं लक्ष सोमनाथकडे गेलं आणि अनेकवार सोमनाथ लुटल्या गेलं. सोनं, नाणं, चांदी, हिरे, माणकं, रत्न.  सर्व गाडे भरभरून नेलं. आणि इतकी संपत्ती लुटल्या जाऊनही दर वेळी सोमनाथचं शिवालय परत तश्याच वैभवानं उभं राहायचं.

मात्र फक्त ह्या वैभवासाठी सोमनाथ महत्वाचं नाही. सोमनाथचं मंदिर भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर आहे. विशाल पसरलेला अरबी समुद्र रोज सोमनाथाचे पादप्रक्षालन करत असतो. आणि गेल्या हजारो वर्षांच्या ज्ञात इतिहासात ह्या सागराने कधीही सोमनाथाचा उपमर्द केलेला नाही. कोणत्याही वादळामुळे सोमनाथाचे गौरवशाली मंदिर कधी उध्वस्त झाले नाही. 

मंदिराशी संबंधित सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यात स्थित असलेला बाण स्तंभ. हा स्तंभ मंदिराच्या आवारातच बसवला असून त्यावर संस्कृतमध्ये श्लोक लिहिलेला आहे. अबाधित ज्योतिमार्ग, म्हणजे स्तंभ आणि समुद्राच्या पलीकडे थेट दक्षिण ध्रुव, यांच्यामध्ये जमिनीचा एक तुकडाही नाही. या स्तंभापासून ते अंटार्क्टिकापर्यंत अधे-मधे जमिनीचा थोडाही भाग नाही, असा या श्लोकाचा सोप्या शब्दात अर्थ आहे. 

संग्राहक – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १६ (इंद्र सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १६ (इंद्र सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १६ (इंद्र सूक्त )

ऋषी – मेधातिथि कण्व: देवता – इंद्र 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील सोळाव्या  सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी इंद्रदेवतेला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त इंद्रसूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद : 

आ त्वा॑ वहन्तु॒ हर॑यो॒ वृष॑णं॒ सोम॑पीतये । इंद्र॑ त्वा॒ सूर॑चक्षसः ॥ १ ॥

पर्जन्याची तूच देवता वृष्टी तू करीशी 

सोमरसाला तुला अर्पितो स्विकारुनिया घेशी

करीत दर्शन सूर्याचे यावे या यज्ञासी

हरिद्वर्ण तव अश्व रथातून घेउनी यावे तुजसी ||१||

इ॒मा धा॒ना घृ॑त॒स्नुवो॒ हरी॑ इ॒होप॑ वक्षतः । इंद्रं॑ सु॒खत॑मे॒ रथे॑ ॥ २ ॥

ज्या इंद्राचे हिरवे वारू घेऊन येत तयांना

हविर्भाग हे सिद्ध ठेविले प्रसन्न करण्या त्यांना 

घृतात ओथंबुनिया धानी तुम्हास्तवे सज्ज

स्वीकारुनिया झणी तयांना राख अमुची लाज ||२||

इंद्रं॑ प्रा॒तर्ह॑वामह॒ इंद्रं॑ प्रय॒त्यध्व॒रे । इंद्रं॒ सोम॑स्य पी॒तये॑ ॥ ३ ॥

प्रभात समयी मंजुळ गातो इंद्रस्तोत्र आम्ही

यज्ञाचा आरंभ होतसे यावे झडकरी तुम्ही

आवाहन हे आर्त होऊनी सुरेन्द्रास करितो

सोमरसाच्या सेवनासि देवेद्रा पाचारितो ||३||

उप॑ नः सु॒तमा ग॑हि॒ हरि॑भिरिंद्र के॒शिभिः॑ । सु॒ते हि त्वा॒ हवा॑महे ॥ ४ ॥

सोमरसाला सिद्ध करोनी पाचारण तुम्हा 

आगमनाची तुमच्या आहे आर्त प्रतिक्षा आम्हा  

रथयानाला अश्व जोडूनी रथावरी आरुढ व्हा

होऊनिया साक्षात प्राशुनी घ्या या सोमरसाला ||४||

सेमं न॒ स्तोम॒मा ग॒ह्युपे॒दं सव॑नं सु॒तम् । गौ॒रो न तृ॑षि॒तः पि॑ब ॥ ५ ॥

भक्तीभावाने आळवितो तुम्हास ही प्रार्थना

ऐकुनिया तिज अपुली मानुन आम्हा धन्य करा ना

यज्ञी येउन सोमरसाला घावे  स्वीकारुनी

मृगासारखे तृषार्त होउनि घ्यावे त्या प्राशुनी ||५||

इ॒मे सोमा॑स॒ इन्द॑वः सु॒तासः॒ अधि॑ ब॒र्हिषि॑ । ताँ इ॑न्द्र॒ सह॑से पिब ॥ ६ ॥

सोमरसाचा मान राखण्या दर्भ इथे मांडिले 

सोमरसाने भरुनी कलशा दर्भावर ठेविले

काये तुमच्या आगमनाचे होत फार क्लेश 

परिहारार्थ त्याच श्रमांच्या प्राशी सोमरस ||६|| 

अ॒यं ते॒ स्तोमो॑ अग्रि॒यो हृ॑दि॒स्पृग॑स्तु॒ शंत॑मः । अथा॒ सोमं॑ सु॒तं पि॑ब ॥ ७ ॥

अती मधुर ही स्तवने गातो तुमच्या आवाहना

अंतर्यामी भावुक होवो तुमच्या अंतःकरणा

प्रसन्न व्हावे अशा स्तुतीने देई या दाना

सोमरसाला प्राशुन घेण्या यावे या यज्ञा ||७||

विश्व॒मित्सव॑नं सु॒तमिंद्रो॒ मदा॑य गच्छति । वृ॒त्र॒हा सोम॑पीतये ॥ ८ ॥

सोमरसाचे प्राशन करण्या साऱ्या यज्ञात

रिपुसंहारी इंद्र जातसे मोठ्या मोदात

सोमरसाची अवीट गोडी देवेन्द्रा आहे

यज्ञामध्ये भक्तगणांच्या कल्याणा पाहे ||८||

सेमं नः॒ काम॒मा पृ॑ण॒ गोभि॒रश्वैः॑ शतक्रतो । स्तवा॑म त्वा स्वा॒ध्यः ॥ ९ ॥

समर्थ हे इंद्रा आम्हाला देई रे वैभव

धेनु अश्व अन् धनास देण्या आम्हासी तू पाव 

अमुच्या साऱ्या आकाक्षांना स्वरूप मूर्त दे

तुझ्याच स्तवनासाठी बुद्धी जागृत राहू दे ||९||  

(हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.) 

https://youtu.be/KjGbB_bQX7k

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 16 :: ऋग्वेद मंडळ १ सूक्त १६

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मार्ग शोधताना ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ मार्ग शोधतांना — ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

माजी अमेरिकन टेनिसपटू आंद्रे आगासी तुम्हां सगळ्यांना आठवत असेल. आंद्रे आगासीची एक मुलाखत नुकतीच माझ्या पाहण्यात आली. त्यात आगासीने एक जबरदस्त किस्सा सांगितला… 

तेव्हा जर्मनीच्या बोरीस बेकरने आगासीला सलग तीन सामन्यांमध्ये हरवले होते. बोरीस बेकर ज्याप्रमाणे सर्विस करायचा ती भेदणे जवळपास अशक्य होतं. आणि यावर मात कशी करायची यासाठी आगासी जंग जंग पछाडत होता. त्याने बोरीस बेकरच्या अनेक व्हिडिओ कॅसेट्स सारख्या बघितल्या. केवळ एकाच नव्हे तर अनेक वेगवेगळ्या अँगलने पण बघितल्या. 

खूप बारीक अभ्यास करत असताना आगासी ला बेकरची एक सवय लक्षात आली. प्रत्येक वेळी सर्व्हिस करत असताना बेकर आपली जीभ बाहेर काढत असे. आणि गमतीची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी बेकरच्या सर्व्हिस ची दिशा आणि जिभेची दिशा एकच असायची. आगासीने वारंवार अनेक कॅसेट्स बघितल्या. प्रत्येकवेळी बेकरची जीभ त्याच्या मनात काय चाललं आहे हे आधीच सांगायची. मुख्य म्हणजे बेकरच्या नकळतच हे घडत होतं.

एकदा ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आगासीला बेकरची सर्व्हिस भेदणें फार कठीण गेले नाही. मात्र बोरिस बेकरला संशय येऊ नये म्हणून आगासी मुद्दामच थोड्या चुका करत राहिला. कारण आपल्याला प्रतिस्पर्ध्याची सर्व्हिस कळली आहे हे आगासीला लपवून ठेवायचे होते.

त्यानंतर सलग पुढचे ९ सामने आगासीने जिंकले. अचानक हा बदल कसा झाला हे बोरिस बेकरला शेवटपर्यंत कळले नाही. अखेरीस बोरिस बेकर निवृत्त झाल्यानंतर आगासीने बोरिसला याबद्दल सांगितले. ते ऐकून बोरिस जवळजवळ खुर्चीतून पडलाच !

बोरिस म्हणाला प्रत्येक वेळी तुझ्याबरोबर सामना हरल्यानंतर मी माझ्या पत्नीला म्हणायचो की “ हा माणूस माझं मन वाचतोय असं मला वाटतं आहे….” पण हे कसं ते कळत नव्हतं !!

मित्रांनो, स्पर्धा कितीही मोठी आणि स्पर्धक कितीही तगडा असला तरी आपण न डगमगता निकराने सामना केला पाहिजे. कुठेतरी काहीतरी मार्ग सापडतोच. पण तो मार्ग शोधण्यासाठी अभ्यास, मार्ग मिळेपर्यंतचा ध्यास आणि मी जिंकेनच हा आत्मविश्वास या तीनही गोष्टी अंगी असल्या पाहिजेतच !!

आंद्रे आगासीच्या या गोष्टीतून आपल्याला हीच शिकवण मिळते. 

संग्राहक : माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हिंदुत्व म्हणजे… ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ हिंदुत्व म्हणजे… ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

हा किस्सा आहे थोर संत स्वामी चिन्मयानंदजींचा.

एकदा, इतर साऱ्या धर्मांसमोर हिंदुत्वाला अगदी क्षुल्लक समजणाऱ्या, एका तथाकथित ‘सेक्युलर’ स्त्री पत्रकारानं स्वामीजींना विचारलं :  

पत्रकार : “इस्लामचा संस्थापक कोण आहे?”

स्वामीजी :  “मोहम्मद पैगंबर”

पत्रकार :   “आणि ख्रिस्ती धर्माचा?”

स्वामीजी :   “येशु ख्रिस्त.”

पत्रकार :   “आणि हिंदु धर्माचा संस्थापक?”

आपण स्वामीजींना निरुत्तर केलं आहे, असा तिचा समज झाला होता. ती विजयी स्वरात पुढे म्हणाली.. :

” या धर्माचा कुणीच संस्थापक नाही आणि म्हणूनच हिंदुत्व हा धर्म नाही, हेच सिद्ध होतं.”

स्वामीजी म्हणाले :

“अगदी बरोबर.!”

” हिंदुत्व हा धर्म नाहीच मुळी ! हिंदुत्व म्हणजे निखळ विज्ञान आहे. मानवी जीवन जगण्याचा सत्य मार्ग आहे.”

— त्या महिला पत्रकाराला काहीच कळलं नाही…. 

आता, स्वामीजींनी तिला प्रश्न विचारायला सुरूवात केली.

स्वामीजी : ” भौतिक शास्त्राचा संस्थापक कोण? “

पत्रकार : ” कुणाही एका व्यक्तीचं नाव नाही सांगता येणार.”

स्वामीजी :-  ” बरं, रसायनशास्त्राचा संस्थापक कोण? “

पत्रकार : ” इथंही कुणा एका व्यक्तीचं नांव, नाही सांगता येणार.”

स्वामीजी : ” प्राणिशास्त्राचा संस्थापक कोण?”

पत्रकार : “अर्थातच, कुणा एका व्यक्तीचं नांव नाही सांगता येणार. अनेक शास्त्रज्ञांनी, तसंच वेगवेगळ्या काळात; ह्या शास्त्रांबद्दलच्या ज्ञानात आपापल्या परीनं वेळोवेळी भर घालून, ही शास्त्रे समृद्ध केली आहेत.”

यावर स्वामीजी बोलले – 

“आधुनिक शास्त्रज्ञांनी मानवाच्या भौतिक गरजांचा विकास करण्यासाठी, वैज्ञानिक संशोधन केले आहे.  त्याप्रमाणे,

हिंदूधर्मही विज्ञानच आहे— 

‘ ऋषी ‘ या शब्दाचा अर्थ ‘शास्त्रज्ञ’ ! त्यांनी मानवाचा मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास करण्यासाठी संशोधन करून, लोक जागृती केली. अनेक ग्रंथ लिहून मार्गदर्शन केले आणि शतकानुशतकं त्याचा विकास  होत आलेला आहे. अनेक थोर संतमहंतांनी, ऋषिमुनिंनी यावर वेळोवेळी संस्कार करून आणि आपल्या संशोधन आणि अनुभवांद्वारे समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य अव्याहतपणे सुरूच ठेवलेलं आहे.—- इस्लामचा अभ्यास करायला एकच ग्रंथ – कुराण – पुरेसा आहे. ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करायला एकच ग्रंथ – बायबल – पुरेसा आहे.—— 

— पण हिंदुत्व म्हणजेच ‘ मानव जीवन मार्गाचा ‘ अभ्यास करण्यासाठी, अनेक ग्रंथालयांत जाऊन शेकडो पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल. कारण हिंदू धर्म हा संपूर्णपणे विज्ञानाधिष्ठित धर्म आहे.  तो एकाच कोणी व्यक्तीने स्थापन केलेला धर्म नाही.  मानवाच्या जीवन विकासाकरिता आणि मानवाचे जीवन सुखी आणि संपन्न होण्याकरिता जो मार्ग भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम, अनेक ज्ञानी ऋषी, मुनी आणि संतांनी दाखवला आहे; त्या सत्य महामार्गालाच ‘ सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म ‘ असे म्हणतात.”

— यावर ती महिला पत्रकार निरुत्तर झाली.

आज हिंदू धर्मीय लोकांनाही त्यांच्या धर्माबाबत अज्ञान आहे, कारण ते धर्मग्रंथांचा अभ्यास करत नाहीत. म्हणूनच म्हणतात, की जर ग्रंथ समजले तर संत समजतील, आणि संत समजले तर भगवंत समजेल; तसेच धर्म ही समजेल.

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print