मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ येळ अमावस्या—उत्सव हुरड्याचा – सुश्री नीला महाबळ गोडबोले  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ येळ अमावस्या—उत्सव हुरड्याचा – सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

दिवाळीची धांदल मागे पडते.  हैराण करणाऱ्या उकाड्याला मागे सारून थंडीच्या गुलाबी पावलांनी सोलापुरात प्रवेश केलेला असतो….. डिसेंबरच्या धप्प्यानं  वर्षभर कपाटात नाहीतर माळ्यावर लपून बसलेले स्वेटर्स, मफलर, कानटोप्या बाहेर पडतात…

…. अन् त्यांच्याबरोबरच हृदयाच्या चोरकप्प्यात लपून राहिलेल्या  आठवणींच्या रेशमी लडीही  उलगडतात…

या सोनेरी आठवणी असतात धमाल हुरडापार्ट्यांच्या…… 

…. ” यंदा पाऊस आजिबात झाला नाही ” किंवा  ” अति पावसानं  ज्वारी आडवी झाली “…असा सोलापुरातल्या शेतकरीदादांनी कितीही आरडाओरडा  केला, तरी  निसर्ग आपल्या कर्तव्याला चुकत नाही….. सोलापुरातल्या काळ्याशार मातीत ज्वारीचं पीक डौलानं डोलू लागतं नि सोलापूरकरांना  हुरडापार्ट्यांची स्वप्नं पडू लागतात…

हुरडा म्हणजे  हिरवेगार,कोवळे ज्वारीचे दाणे….. ज्वारीनं  मोत्याचं रूप घेण्याआधीची  हिरवीकंच बाल्यावस्था म्हणजे हुरडा….. 

सहकुटुंब,सहपरिवार हुरड्यासाठी शेतात जाणं, निळ्याशार आकाशाखालील हिरव्यागार शेतात पाखरांसारखं बागडणं, किलबिलाट करत हुरड्यावर ताव मारणं नि  ही  मंतरलेली आठवण आयुष्यभर काळजात जपून ठेवणं …

… हा सोलापुरकरांसाठी केवळ एक आनंददायी अनुभव नसतो, तर तो असतो  एक समारंभ…  हिरव्यागार निसर्गाचा उत्सव… 

सोलापूरच्या संस्कृतीचा हा आनंदबिंदू…. या आनंदोत्सवाची सुरुवात ” येळ अमावस्या ”  या शुभदिनी होते…

मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस असतो ” येळ अमावस्येचा ” …. सोलापूरकरांची अन्नदायिनी “ज्वारी”

शेतांतून तरारून आलेली असते…. रसना  हुरड्यासाठी आसुसलेली असते….. पण या अन्नदेची पूजा केल्याशिवाय, ,परमतत्त्वाला नैवेद्य दाखवल्याविना  एकही दाणा तोंडात घालणं ही त्या शक्तीशी प्रतारणा…. म्हणूनच येळ अमावस्येच्या मुहूर्तावर हा नैवेद्याचा विधी संपन्न होतो..

” येळ अमावस्या ” हा  सोलापूरचा सण…. या दिवशी  कॉलेजे, शाळा, ऑफिसे ओस पडलेली असतात..

मायबाप सरकारने सुट्टी दिलेली नसली तरी सोलापूरकरांसाठी ती स्वयंघोषित असते…

या दिवशी प्रत्येक सोलापूरवासीयाला स्वत:च्या नाहीतर दुसऱ्याच्या शेतात जायचे असते… हा दिवस हुकला तर सारे वर्ष निष्फळ ठरते.

येळ अमावस्येच्या आदले दिवशीपासूनच कृषक कुटुंबातील गृहिणींची लगबग सुरू होते.. नातेवाईक,स्नेह्यांना  आमंत्रणे जातात..

हुरड्यासाठी लागणारे राजा-राणीही बनवले जातात… राजा-राणी म्हणजे काय समजलं नाही नं ?…..

हुरड्याबरोबर खाल्ल्या जाणाऱ्या कोरड्या तिखटगोड पदार्थांसाठी ” राजाराणी ” हा  प्रेमाचा  शब्द..

बारीक केलेला गूळ, ओल्या खोबर्ऱ्याचे तुकडे, साखरखोबरं, खारकांचे तुकडे हे गोड घास नाजूक राणीसाठी  नि खोबरं-लसणाची , शेंगादाण्याची, जवस-कारळ्याची चटणी, खारे किंवा मसाल्याचे शेंगदाणे, लसूणपातीचं काळं मीठ हे झणझणीत  पदार्थ रांगड्या राजासाठी…!! राजाराणी हे हुरड्याचे सवंगडी…

येळ अमावस्येदिवशी अगदी पहाटे उठून महिलावर्ग कामाला लागतो… शेंगाकूट, लसूण, कोथिंबीर, सोलापुरी काळा मसाला, लवंगपूड,  याचं मिश्रण भरून झणझणीत वांग्याची भाजी बनते…. 

शेंगाकूट, तीळ, गूळ, वेलची यांचं भरपूर सारण  भरून केलेल्या खमंग  शेंगापोळ्यांची चळत लागते…. 

तगडावर अतिशय पातळ-पातळ पुरणपोळ्या बनतात…. 

शेंगापोळ्या नि पुरण यासाठी चुलीवर घरच्या लोण्याचं  खमंग तूप कढवलं जातं….. 

हळद,मीठ  घातलेल्या नि तिळाने सजलेल्या  बाजरीच्या पातळ पातळ भाक-या  जन्म घेतात….. 

…. पण येळ अमावस्येचे मुख्य कलाकार असतात असतात  ” बाजरीचे उंडे नि भज्जे किंवा गरगट्टा “… 

बाजरीचं पीठ साध्या किंवा उकळत्या पाण्यात घालून त्यात मीठ, हळद ( तीळ, लसूण असा मसालाही घालू शकता..)  घालून भाकरीच्या पिठासारखं मळून त्याचे उंडे किंवा मुटके बनवले जातात. ते मोदकासारखे वाफवले जातात..हेच बाजरीचे उंडे….. या उंड्यांबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी बनवला जातो गरगट्टा किंवा भज्जे..

या दिवसांत भाज्या ,फळं, कोवळी पिकं तरारून आलेली असतात..

निसर्गानं दिलेल्या आहेराची निसर्गाला रिटर्न गिफ्ट द्यायला नको का? त्यासाठी हा ” भज्जे ” चा प्रपंच…

ताज्या-ताज्या, कोवळ्या पालक, चुका, मेथी,अंबाडी, हरबरा, चाकवत,चंदनबटवा या पालेभाज्या,

गाजर, घेवडा, वांगी, टोमॅटो, मटार ,ओले हरबरे, घेवड्याच्या बिया, शेंगादाणे या फळभाज्या, नि बोरं,पेरु यासांरखी फळे कुकरमधे उकडून ती एकजीव केली की त्यात तूर, मूग, मसूर, हरबरा अशा डाळी शिजवून घातल्या जातात. त्यावर  लसूण, मिरची, जिरे-मोहरीची चरचरीत फोडणी नि मीठ  घातलं की जबरदस्त चवीचा नि अतिशय पौष्टिक “गरगट्टा” तयार होतो…. हा गरगट्टा या मोसमात सात-आठवेळा खाल्ला की वर्षभराच्या जीवनसत्त्वांची नि क्षारांची बेगमी होते…

भाकरी म्हटली की ठेचा हवाच…. तोही बनतो..

घरच्या म्हशीच्या दुधाचं घट्ट दही आदले दिवशी विरजलेलं असतं… त्यातलं  डब्यात भरलं जातं.

नि उरलेल्या दह्याचं आलं, मिरची ,कोथिंबीर घालून खुमासदार ताक बनतं नि दुधाच्या बरण्यांत जाऊन बसतं …शेताकडे जाण्यासाठी…

हा  सारा जामानिमा होईपर्यंत सकाळचे  दहा वाजतात…शेताच्या ओढीने आमंत्रित पाहुणे हजर झालेले असतात…

गाड्या शेताकडे निघतात…. शेतातली सुबकशी पायवाट मोठ्या पिंपळ नाहीतर वटवृक्षाच्या पारापाशी  नेते..

पारावर  सतरंज्या अथरलेल्या असतात..

थोड्याशा विसाव्यानंतर देखण्या शेताचं दर्शन घेतलं जातं.

ताजा ऊस दातांनी सोलून चघळला जातो.

हिरवागार डहाळा म्हणजे ओला हरबरा हिशेब न ठेवता रिचवला जातो.

डायरेक्ट झाडावरून पोटात जाणारे पेरू,बोरं पुन्हा बालपणाची सफर घडवतात.

खोल विहीरीचं पाणी गूढतेचा अनुभव देतं .

निसर्गाच्या प्रत्ययकारी नि विशाल रुपांनी विभ्रमित होऊन वाचा बंद होते..

परत पारावर येईपर्यंत शेतातील भूमीपुत्राने  ज्वारीची पाच-सात  कणसं ताट्यांसहीत आणून काळ्या भूमातेवर उभी रचून ठेवलेली  असतात …. या कणसांच्या रुपानं निसर्गदेवता आज इथे अवतरलेली असते.

एरवी शहरात सलवार कमीज किंवा जीन कुर्तीत वावरणारी शेताची मालकीणबाई आज जरीच्या किंवा इरकली हिरव्या साडीत असते…. शेतातलं हे  हिरवं सौंदर्य पाहून शेताचा धनी हरकून गेलेला असतो….. नकळत त्याचे हात परमेश्वराला जोडले जातात..

डोक्यावर पदर घेतलेली लक्ष्मी नि स्वत:च्याच भाग्याचा हेवा करणारा नारायण जोडीनं शेतातील धनाची म्हणजे पिकांची साग्रसंगीत पूजा करतात…. घरात रांधून आणलेल्या सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवला जातो..

” सुजलाम-सुफलाम” असा आशीर्वाद निसर्गाकडून घेऊन  अभ्यागतांच्या खातीरदारीची तयारी सुरू होते..

आगट्या पेटतात …आग्रह करकरून आगटीत भाजलेला कोवळा हुरडा खायला घातला जातो. हुरड्यानंतरची तहान मस्त मसाला ताकाने शमवली जाते.

हुरडा महोत्सवाचा हा शुभारंभ असतो. जडावलेलं पोटं डोळ्यांना बंद होण्याचा आदेश देतं.. पारावरच विकेटी पडतात…. ” थोडी भाकरी घ्या खाऊन “… नाजूक आदेश येतो….

भाकरी-भाजी,उंडे,पुरणपोळ्या ,शेंगापोळ्या  दुधा -तुपासोबत रिचवल्या जातात…

अन्नदात्याला साहजिकच “सुखी भव ” असा पाहुण्यांकडून आशीर्वाद मिळतो..

पाहुणे  समाधानाने आपापल्या घरी परततात..

पुढचे दोन महिने सारं सोलापूर या  हुरड्याच्या  हिरव्या रंगात रंगून जातं……

लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले. 

सोलापूर

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नालंदा… ☆ प्रस्तुती – सुश्री अनिता पारसनीस ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ नालंदा… ☆ प्रस्तुती – सुश्री अनिता पारसनीस ☆

तुर्की शासक बख्तियार खिलजीने भारतावर आक्रमण केले. या दरम्यान खिलजी आजारी पडला. त्याच्या बरोबरच्या हकीमांचं औषध लागू पडेना. मग त्याला नालंदा विश्वविद्यालयातील आयुर्वेद विभागाचे प्रमुख आचार्य – राहुल श्रीभद्र यांचेकडून उपचार करून घ्यावेत, असा सल्ला मिळाला.                                                    

त्याने आचार्यांना बोलावून घेतले आणि दम भरला की, तो कोणतेही हिंदुस्थानी औषध घेणार नाही आणि ठराविक मुदतीत त्याचा आजार बरा झाला नाही तर तो आचार्यांचा वध करेल. आचार्यांनी त्याच्या सवयी जाणून घेतल्या. त्याचे नित्य पठणातील कुराण मागून घेतले आणि ते परत करतांना सांगितले की, खिलजीने रोज किमान एवढी पाने वाचलीच पाहिजेत. तसे केल्यावर खिलजी बरा झाला.                                                       *                                                                          

आचार्यांनी औषधींचा लेप त्या कुराणातील पानांच्या कोप-यात लावून ठेवला होता. खिलजी सवयीने तोंडात बोट घालून, थुंकीने ओले करून, कुराणाचे पान उलटत असे. जेवढी मात्रा पोटात जाणे अपेक्षित होते, तेवढ्याच पानांना लेप लावलेला होता.                                                        *                                                                    

पण या रानदांडग्याला हे कळल्यावर आपल्यापेक्षा हे हिंदु श्रेष्ठ कसे, या वैषम्याने त्याने सर्व गुरूवर्य आणि बौद्ध भिक्षूंची हत्या केली. संपूर्ण नालंदा विश्वविद्यालय जाळून टाकले. तिथले ग्रंथालय एवढे प्रचंड होते की, तीन महिने ते जळत राहिले होते. कृतघ्न खिलजीला प्राणदान मिळाल्याचा मोबदला त्याने असा चुकता केला.

आता आतापर्यंत तिथे मातीचे ढिगारे होते. भारतीय पुरातत्व खात्यातर्फे उत्खनन करायला सुरूवात केल्यावर त्याखाली दडलेले उध्वस्त अवशेष मिळून आले. तिथे गौतम बुद्धाची ८० फूट उंचीची मूर्ति होती, असे चिनी पर्यटक/विद्यार्थी ह्युएन त्संगने लिहून ठेवले होते.            

गुप्त वंशातील कुमारगुप्ताने याची निर्मिती केली. “ नालंदा “ या शब्दाचा अर्थ ->  ना + आलम् + दा :- “ न थांबणारा ज्ञानाचा प्रवाह“.

या अर्थाला जागणा-या आपल्या पंतप्रधानांनी  – श्री.नरेंद्र मोदीजींनी याला पुनर्प्रस्थापित केले. || नमो नमो ||

१९८७ साली कौटुंबिक सहलीदरम्यान तिथे जाण्याचा योग आला, तेव्हा हे सगळे अवशेष पहाण्यात आले होते. 

—जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी हा सूत्रधागा अवश्य पहावा. 👉 https://www.indiaolddays.com/naalanda-vishvavidyaalay-kisane-banavaaya-tha/?amp=1   

संग्रहिका : सुश्री अनिता पारसनीस 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शहीद पांडुरंग साळुंखे… ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ शहीद पांडुरंग साळुंखे… ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

जय हिंद !!

पुण्यातील साळुंके विहार सर्वांना माहीतच असेल पण हे साळुंखे कोण आहेत ? हे कित्येकांना माहीत नाही.

पुण्यातीलच नाही तर साळुंखे विहारमधील देखील कित्येकांना याची माहिती नाही ही खरंतर दुर्दैवाची गोष्ट आहे.

तर चला जाणून घेऊया —

सांगलीमधील मणेराजुरीचा आणि पंधरा मराठा लाईट इन्फंट्रीचा महावीर चक्र विजेता पांडुरंग साळुंखे यांनी बुर्ज जिंकून दिले आणि पंधरा मराठा लाईट इन्फंट्रीला पंजाब थिएटर अवॉर्डसह बरेच काही मिळवून दिले.

सन १९७१ च्या युद्धामध्ये भारताच्या पश्चिमेकडील भागामध्ये, पंजाब सेक्टरच्या उत्तरेकडच्या भागू कमानपासून ते दक्षिणेकडील पुंगापर्यंतच्या महत्वाच्या पट्टयातील भिंडी, अवलक, बेहलाल, तेबूर, मेहरा, छागकला, गोगा, दुसीबंद, फतेहपूर या अत्यंत महत्वाच्या चौक्यांवर पाकिस्तानी फौजांनी अचानक हल्ला केला.

३ डिसेंबर १९७१ रात्री ११.०० वाजता पाकिस्तानी सेनेतील अत्यंत कडवी समजली जाणारी बलुची पठाण रेजिमेंटच्या ४३ व्या बटालियनने प्रचंड संख्याबळाच्या ताकतीने आणि अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, रॉकेट लॉंचर, मशीन गन्स, तोफांनी भारतीय चौक्यांवर बेछूट हल्ला चढविला. त्या तुफानी हल्ल्यासमोर चौक्यांवर तैनात असलेले एइ चे जवान टिकाव धरू शकले नाहीत. आणि पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय चौक्यांवर कब्जा मिळवला. पाकिस्तानी सैन्यांचा कब्जा असलेल्या उंचावरील चौक्या परत मिळविणे मोठे आव्हान होते. त्याठिकाणी डेरेदाखल असलेल्या पंधरा मराठा लाइट इन्फंट्री बटालियनने आव्हान स्वीकारले. चौक्या सोडून आलेल्या “एइ” जवानांच्या मदतीने पंधरा मराठा लाइट इन्फंट्री बटालियनच्या जांबाज सैनिकांनी क्षणाचाही विलंब न करता, कडव्या बलुच पठाणांच्या बलाढ्य सेनेवर मराठा सैनिक तुटून पडले. पंधरा मराठा बटालियनच्या वीरांनी केलेला प्रतिहल्ला (Counter Attack) यशस्वी करुन अनेक चौक्या परत मिळवल्या. आता दोन्हीकडील फौजा समोरासमोर होत्या दुसीबंद, बेहलोक, गोगा, उंचावरील चौक्यांवरून पकिस्तानी फौजांना खदेडणे कठीण काम होते. १५ मराठा खाली मैदानी भागात होती. मदतीला वैजंता  (विजयंता) रणगाड्यांचा ताफा होता. परंतु उपयोग नव्हता. कारण शत्रू उंचावर होता. त्यांचे रणगाडाभेदक रॉकेट लाँचर तैनात होते. भारतीय सेनेसाठी नैसर्गिक वरदान असलेल्या या चौक्या आता पाकी सैन्यांना वरदान ठरत होत्या.

१५ मराठा सैन्यांची नामुश्की पाहून पाकिस्तानी सैन्य जणू जशन साजरा करीत होते. हवेत गोळीबार करुन मराठा सैन्यांना हिणवत होते. आव्हान देत होते. नाचत होते. खाली तैनात असलेल्या १५ मराठा जवानांचे रक्त खवळत होते. पण आदेश मिळत नव्हता. माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. डिसेंबरची सहा तारीख उजाडली. मोहीम प्रमुख मेजर रणवीरसिंग यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला. तेव्हा माघार घेण्याचे संकेत मिळाले. परंतु अंतिम निर्णय मेजरसाहेबांवर सोडण्यात आला. मैदानातून माघार घेतील ते मराठे कसले ? दुसीबंद चौकीवर तैनात असलेले पाकिस्तानचे रॉकेट लाँचरचा मोठा धोका होता. अखेर एकवीस वर्षाचा जवान पांडुरंग साळूंखे याने पुढकार घेतला. मेजर साहेबांना म्हणाला, ‘ सर शत्रूच्या रॉकेट लॉंचरचा मी बंदोबस्त करतो. तुम्ही रणगाडेसह चाल करुन दुसीबंदवर ताबा मिळवा.’ त्याचा हा आत्मघातकी निर्णय कोणालाच पटला नव्हता. माघारही घ्यायची नाही. दुसरा पर्याय नाही.

शेकडो तानाजी, संभाजी अंगात संचारलेला पांडुरंग क्रॉलिंग करत, सापासारखा सरपटत खाचखळग्यातून मार्ग काढत दुसीबुंदच्या दिशेने निघाला होता. शत्रूच्या रॉकेट लाँचरवर कब्जा करायचा एकच ध्यास होता. शत्रूची नजर चुकवत चुकवत पांडुरंग उंचावरील अंतर कापत होता. क्रॉलिंगमुळे पोटावर हातापायावर जखमा झालेल्या. भारतीय सेना एवढ्या उंचावर येऊ शकत नाही अशी खात्री असल्यामुळे बलोची गाफील होते. खाली मराठा सैनिक माघार घेण्याच्या हालचाली शत्रूला जाणवत होत्या. पांडुरंग सरपटत सरपटत वरती पोहोचला. संध्याकाळी पावणेसातची वेळ, थकव्यामुळे डोळ्यावर अंधारी येत होती. थंडीतही घशाला कोरड पडलेली. पाण्याचा घोट घ्यायला वेळ नव्हता. एक एक क्षण महत्वाचा होता. पांडुरंगने संध्याकाळच्या संधीप्रकाशातही शत्रूचे रॉकेट लॉंचरची पोस्ट हेरली. शत्रू काही प्रमाणात गाफील असला तरी रॉकेट लाँचरचा ऑपरेटर सावध होता. अंगात होते नव्हते तेवढे बळ एकवटून पांडुरंगने रॉकेट लाँचरधारी बलोची आडदांड पठाण सैनिकावर प्रहार केला. अचानक झालेल्या प्रहाराने बलोच कोसळला. एक क्षणही वाया न घालवता पांडूरंगने रॉकेट लाँचरचा ताबा घेतला. आणि शत्रुच्याच दिशेने बार उडवला. (धडाम धूम) खाली मेजर साहेबांना हा इशारा होता. वर दुसीबुँद चौकीवर एकच खळबळ माजली. दुसीबुद चौकीवर पाक सैन्यानी पांडुरंगला घेरला. जास्त लोकांनी चौकीवर चढाई केली असावी असा त्यांचा समज झाला. म्हणून बलोची पठाणांची धावपळ चालूच होती. याच संधीचा फायदा घेऊन विजयंता रणगाड्यांचा ताफा दुतर्फा धुरळा उडवत, आग ओकत आगेकुच करीत सुसाट निघाला. पांडुरंगने रॉकेट लाँचर खाली फेकले होते. दुसीबुंद चौकीवर पांडुरंगला पाकिस्तानी सैन्यांनी चारही बाजूने घेरले. एकटा पांडुरंग आणि अनेक पाकिस्तानी सैन्य तुंबळ युद्ध चालू होते. इतक्यात छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी दुसीबुद चौकी हादरुन गेली. १५ मराठा बटालियनचे मावळे दुसीबुंदच्या गडावर पोहोचले. दोन्ही सैन्य समोरासमोर, गुत्तम गुत्तीच्या या लढाईत मराठ्यांच्या प्रतिहल्ल्यासमोर कडव्या बलोची पठाणांनी नांगी टाकली. हत्यारे टाकून पाकिस्तानी सैनिक पळाले. कित्येकांना मराठ्यांनी ठार केले. कित्येक पळता पळता रावी नदीत बुडाले. तर सुमारे दोनशे बलोची पठाणांच्या प्रेतांना वीर मराठ्यांनी रावीच्या पात्रात जलसमाधी दिली. शिवाय दोन ट्रक पाकिस्तानी सैन्यांची हत्यारे, दोन RCL गन माऊंट असलेल्या जीप गाड्या ताब्यात घेऊन, पंधरा मराठा जवानांनी एक विक्रमच केला. इकडे पांडुरंग बाळकृष्ण साळुंखे या अवघ्या एकवीस वर्षीय योध्याच्या शरीराची चाळण झाली होती. अखेरची घटका मोजताना मोहिम फत्ते झाल्याच्या आनंदात छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून पांडुरंग वीरगतीस प्राप्त झाला.

शहीद पांडुरंग साळूंखे यांच्या शौर्याला महावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून सन्माननीय महामहिम राष्ट्रपती यांचे हस्ते हा शौर्य पुरस्कार वीरमाता श्रीमती सुंदराबाई बाळकृष्ण साळुंखे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

तत्कालिन प्रधानमंत्री श्रीमती इंदिराजी गांधी यांनी मणेराजुरी गावात महावीरचक्र विजेता शहिद पांडुरंग साळूंखे यांच्या घरी जाऊन वीरमाता सुंदराबाई यांच्या गळ्यात पडून त्यांचे सांत्वन केले. आज मणेराजुरीच्या चौकात शहीद पांडुरंग साळूंखे यांचा पुतळा बसविला असून दरवर्षी सहा डिसेंबरला मराठा रेजिमेंटचे अधिकारी मिलीटरी बँडसह संचलनाद्वारे शहीद पांडूरंग साळुंखे यांच्या पुतळ्याला महावीर चक्र घालून मानवंदना दिली जाते.

बेळगावला मराठा रेजिमेंटच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरसुद्धा त्यांचा पुतळा आहे. मणेराजुरी येथील शाळा कॉलेजला सुद्धा शहीद पांडुरंग साळूंखे यांचे नाव दिले आहे. या धनघोर युद्धात पंधरा मराठा बटालियनला बुर्ज बटालियन हा किताब मिळाला, तर बेस्ट बटालियन म्हणून सन्मान ट्रॉफीने पंधरा मराठा लाइट इंफन्ट्रीला गौरविण्यात आले. या लढाईत बटालियनचे अकरा जवान शहीद झाले. मेजर रणवीरसिंगसह पाच जवान जखमी झाले.

एक महावीर चक्र, चार वीरचक्र, तीन सेना मेडल, दोन मेशन इन डिस्पॅच, असा पंधरा मराठा बटालियनचा शौर्याचा इतिहास आहे. पाकिस्तानची सर्वात कडवी समजली जाणारी ४३ बलोच रेजिमेंटचा असा दारुण पराभव मराठ्यांनी केला. त्यामुळे पाकिस्तानने ४३ बलोच रेजिमेंट रद्द केली.

जय हिंद !

संग्रहिका : सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दत्त जन्माची कथा… लेखिका – सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ दत्त जन्माची कथा… लेखिका – सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

राजा रविवर्मा प्रेसचे ‘श्री दत्त जन्मा’चे दुर्मिळ चित्र नजरेस पडले. एका चित्रात संपूर्ण दत्त जन्माची कथा सामावली आहे.  कशी ते बघा ! ——

अनसूयेच्या सत्त्वाची परीक्षा पाहायला त्रिदेवींनी आपले नवरे पाठवले. तिने आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यावर तीनही देवांना बाळं करून इच्छाभोजन दिले. त्यामुळे अनसूयेचे सत्त्व राखले गेले, अतिथी धर्म पाळला गेला आणि मातृत्व लाभले. मात्र आपली खेळी आपल्यावर उलटल्याचे पाहून त्रिदेवी अनसूयेला शरण आल्या आणि ‘आमचे पती आम्हाला परत कर ‘ म्हणाल्या. तेव्हा, ‘ घेऊन जा तुम्ही तुमचा पती ‘, हे अनसूया माता सांगत असतानाचा हा चितारलेला क्षण !

असूया शून्य अनसूया, अशी सत्त्वशील अनसूयेचे देहबोली. ऋषीपत्नी म्हणून श्वेत वस्त्र नेसलेल्या अनसूयेच्या चेहऱ्यावर तीनही बाळांना जोजवून झाल्यानंतरचा मातृत्वाचा संतुष्ट भाव खुलून दिसतोय. जगाचा ताप हरण करणारे त्रिदेव बालरुपात आल्यावर निश्चिन्तपणे झोपी गेलेत. आई जवळ असताना कसली काळजी? बरीच वर्षं वाट पाहूनही जे सुख हुलकावणी देत होते, ते सुख तिपटीने पदरात पडल्याचा सोहळा अनसूयेने सुंदर पाळणा बांधून आणि सजावट करून साजरा केला आहे. अत्री ऋषींचा आश्रम असल्याने पायाशी व्याघ्रजीन अंथरले आहे आणि या तीन विश्वसुंदऱ्या आपल्या फजितीने खजील होऊन, आपला नवरा कोणता, हे ओळखण्यात मग्न आहेत. 

पाठमोरी उभी असलेली भरजरी वस्त्र परिधान केलेली अलंकारमंडित लक्ष्मी असावी. बाजूने डोकावणारी लाल साडीतली सावित्री आणि हात दुमडून कुतूहलाने पाहणारी पार्वती असावी. सुखी संसाराचे तेज, सौष्ठव तिघींच्या हातावरून आणि गौरवर्णावरून दिसतेय. एवढे सगळे सुख असूनही अनसूया मातेसमोर तिघी निस्तेज झाल्या आहेत.

तिघी आपापल्या जागी श्रेष्ठ, तरी त्यांना आपल्यापेक्षा कोणी वरचढ असेल ही कल्पना सहन न झाल्याने त्यांनी पतीला तिचे शीलहरण करण्यासाठी पाठवले. त्रिदेवांना अनुसूयेचे सामर्थ्य माहीत होते, पण या तिघींचे गर्वहरण करण्यासाठी तिघांनी जोखीम पत्करली आणि अत्री ऋषी स्नानाला गेल्याची वेळ साधून, वेषांतर करून, ‘आई, इच्छाभोजन  दे, पण विवस्त्र होऊन !  अशी मागणी केली. ‘आई’ अशी हाक ऐकल्याने अनुसूयेला वात्सल्याचा पान्हा फुटला. तिघांना बालरूप केले. भोजन दिले आणि पाळण्यात जोजवले. 

बाळं सगळीच गोड, गोंडस आणि एकसारखी. आपला पती नक्की कोणता, हे ओळखता न आल्याने तिघींनी शरणागती पत्करली आणि अनुसयामातेने तीनही देवांना पूर्ववत केले. तिचा पाळणा मात्र रिकामा झाला. अत्री ऋषी परत आल्यावर त्यांना हकीकत कळली. त्रिदेवांनी सपत्नीक उभयतांची क्षमा मागितली आणि आम्ही तुमच्याच पोटी जन्माला येऊ असे आश्वासन दिले. तो आशीर्वाद फळास आला आणि मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हे त्रिदेव दुर्वास ऋषी, दत्त गुरु आणि चंद्र अशा त्रिगुणात्मक रुपात प्रगट झाले. 

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!

फोटो सौजन्य : श्री दीनानाथ दलाल

लेखिका  – सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ 

संग्राहक – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १२ (अग्नि सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १२  (अग्नि सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १२ ( अग्नि सूक्त )

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – अग्नि 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील बाराव्या सूक्तात मधुछन्दस वैश्वामित्र या ऋषींनी अग्निदेवतेला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त अग्निसूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री

अ॒ग्निं दू॒तं वृ॑णीमहे॒ होता॑रं वि॒श्ववे॑दसम् । अ॒स्य य॒ज्ञस्य॑ सु॒क्रतु॑म् ॥ १ ॥

समस्त देवांचा अग्नी तर विश्वासू दूत

अर्पित हवि देवांना देण्या अग्नीचे हात 

अग्नी ठायी वसले ज्ञान वेदांचे सामर्थ्य

आवाहन हे अग्निदेवा होउनिया आर्त ||१||

अ॒ग्निम॑ग्निं॒ हवी॑मभिः॒ सदा॑ हवन्त वि॒श्पति॑म् । ह॒व्य॒वाहं॑ पुरुप्रि॒यम् ॥ २ ॥

मनुष्य जातीचा प्रिय राजा पवित्र  अनलाग्नी

सकल देवतांप्रती नेतसे हविला पंचाग्नी

पुनःपुन्हा आवाहन करितो अग्नीदेवतेला

सत्वर यावे सुखी करावे शाश्वत आम्हाला ||२||

अग्ने॑ दे॒वाँ इ॒हा व॑ह जज्ञा॒नो वृ॒क्तब॑र्हिषे । असि॒ होता॑ न॒ ईड्यः॑ ॥ ३ ॥

दर्भाग्रांना सोमरसातून काढूनिया सिद्ध

अर्पण करण्याला देवांना केले पूर्ण शुद्ध

हविर्भाग देवांना देशी पूज्य आम्हासी 

सवे घेउनी समस्त देवा येथ साक्ष होशी ||३|| 

ताँ उ॑श॒तो वि बो॑धय॒ यद॑ग्ने॒ यासि॑ दू॒त्यम् । दे॒वैरा स॑त्सि ब॒र्हिषि॑ ॥ ४ ॥

जावे अग्निदेवा होउनिया अमुचे दूत

कथन करी देवांना अमुच्या हवीचे महत्व

झणी येथ या देवांना हो तुम्ही सवे घेउनी

यज्ञवेदिवर विराज व्हावे तुम्ही दर्भासनी ||४||

घृता॑हवन दीदिवः॒ प्रति॑ ष्म॒ रिष॑तो दह । अग्ने॒ त्वं र॑क्ष॒स्विनः॑ ॥ ५ ॥

सख्य करूनीया दैत्यांशी रिपू प्रबळ जाहला

प्राशुनिया घृत हवनाने तव प्रज्ज्वलीत ज्वाला 

अरी जाळी तू ज्वालाशस्त्रे अम्हा करी निर्धोक 

सुखी सुरक्षित अम्हास करी रे तुला आणभाक ||५||

अ॒ग्निना॒ग्निः समि॑ध्यते क॒विर्गृ॒हप॑ति॒र्युवा॑ । ह॒व्य॒वाड् जु॒ह्वास्यः ॥ ६ ॥

स्वसामर्थ्ये प्रदीप्त अग्नी वृद्धिंगत होई 

प्रज्ञा श्रेष्ठ बुद्धी अलौकिक गृहाधिपती होई

चिरयौवन हा सर्वभक्षक याचे मुख ज्वाळांत 

मुखि घेउनी सकल हवींना देवतांप्रती नेत ||६|| 

क॒विम॒ग्निमुप॑ स्तुहि स॒त्यध॑र्माणमध्व॒रे । दे॑वम॑मीव॒चात॑नम् ॥ ७ ॥

अग्नी ज्ञानी श्रेष्ठ देतसे जीवन निरामय

ब्रीद आपुले राखुनि आहे विश्वामध्ये सत्य

यज्ञामध्ये स्तवन करावे अग्नीदेवाचे

तया कृपेने यज्ञकार्य हे सिद्धीला जायचे ||७||

यस्त्वाम॑ग्ने ह॒विष्प॑तिर्दू॒तं दे॑व सप॒र्यति॑ । तस्य॑ स्म प्रावि॒ता भ॑व ॥ ८ ॥

अग्निदेवा तुला जाणुनी  देवांचा दूत

पूजन करितो हवी अर्पितो तुझिया ज्वाळात

यजमानावर कृपा असावी तुझीच रे शाश्वत

रक्षण त्याचे तुझेच कर्म प्रसन्न होइ मनात ||८||

यो अ॒ग्निं दे॒ववी॑तये ह॒विष्माँ॑ आ॒विवा॑सति । तस्मै॑ पावक मृळय ॥ ९ ॥

प्रसन्न करण्या समस्त देवा तुम्हालाच पुजितो

यागामाजी यज्ञकर्ता तुमची सेवा करितो

सकल जनांना पावन करिता गार्हपत्य देवा 

प्रसन्न होऊनी यजमानाला शाश्वत सुखात ठेवा ||९||

स नः॑ पावक दीदि॒वोऽ॑ग्ने दे॒वाँ इ॒हा व॑ह । उप॑ य॒ज्ञं ह॒विश्च॑ नः ॥ १० ॥

विश्वाचे हो पावनकर्ते आवहनीय देवा

यज्ञामध्ये हवी अर्पिल्या आवसस्थ्य देवा

यज्ञ आमुचा फलदायी हो दक्षिणाग्नी देवा

सवे घेउनिया यावे यज्ञाला या समस्त देवा ||१०||

स नः॒ स्तवा॑न॒ आ भ॑र गाय॒त्रेण॒ नवी॑यसा । र॑यिं वी॒रव॑ती॒मिष॑म् ॥ ११ ॥

अग्निदेवा तुमची कीर्ति दाही दिशा पसरली

गुंफुन स्तोत्रांमाजी मुक्तकंठाने गाइली

आशीर्वच द्या आम्हा आता धनसंपत्ती मिळो

तुझ्या प्रसादे आम्हापोटी वीर संतती मिळो ||११||

अग्ने॑ शु॒क्रेण॑ शो॒चिषा॒ विश्वा॑भिर्दे॒वहू॑तिभिः । इ॒मं स्तोमं॑ जुषस्व नः ॥ १२ ॥

प्रज्ज्वलित तुमची आभा ही विश्वाला व्यापिते

हवी अर्पितो समस्त देवांना तुमच्या ज्वालाते

प्रसन्न होउन अर्पियलेले हविर्भाग स्वीकारा

देऊनिया आशीर्वच आम्हा यज्ञा सिद्ध करा ||१२||

हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे. 

https://youtu.be/2_RrKUNjD7s

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ असाही एक विश्वविक्रम – श्री अभय भंडारी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ असाही एक विश्वविक्रम – श्री अभय भंडारी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

गीता जयंती निमित्त एका विश्वविक्रमी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा अपूर्व योग नुकताच आला.

शिक्षण मंडळ, कराड यांच्या वतीने लो.टिळक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी हा विश्वविक्रम साकारला.

सातशे विद्यार्थ्यांनी अवघ्या तीन मिनिटांत श्रीमद् भगवत् गीतेचे सातशे श्लोक सुवाच्य हस्ताक्षरात लिहून काढले.प्रत्येकाने एक श्लोक लिहिला, व नंतर क्रमाने अठरा अध्याय आणि सातशे श्लोकांचे हे हस्तलिखित एकत्र करून अवघ्या पाच मिनिटांत श्रीमद् भगवत् गीतेचा हस्तलिखित ग्रंथ शिक्षकांना प्रदान करण्यात आला.

हा अत्यल्प वेळेत पूर्ण गीता लिहून काढण्याचा विश्वविक्रम आहे.

हा उपक्रम प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणं हा माझ्या जीवनातील एक अत्यंत रोमांचकारक अनुभव होता.

या विद्यार्थ्यांनी गेले दोन महिने यासाठी भरपूर सराव केला होता. त्यांच्या इतकेच कष्ट शाळेच्या शिक्षकांनी, पालकांनी घेतले होते.

‘ इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ ने या एकमेवाद्वितीय उपक्रमाची नोंद घेतली.

या अभिनव उपक्रमासाठी शिक्षण मंडळ, कराडच्या सर्व विश्वस्त, पदाधिकारी,शिक्षक/ शिक्षिका,व सर्व कर्मचारी यांनी अपार परिश्रम घेतले, व त्याला विद्यार्थी आणि पालकांनी सक्रीय साथ दिली, त्यामुळे हा विश्वविक्रम अत्यंत सुनियोजित पद्धतीने साकारला.

— शिक्षण मंडळ कराडच्या सर्व परिवाराचे हार्दिक अभिनंदन. या निमित्ताने सातशे कुटुंबात श्रीमद् भगवत् गीतेचा संस्कार पोहोचला.

— अशा उपक्रमांनी समाजमन संस्कारित होते. सत्य, न्याय, नीति या दैवी गुणसंपदेचा परिचय होऊन समाज सन्मार्गावर वाटचाल करतो.

लेखक : श्री अभय भंडारी, विटा.

संग्राहक : श्री सुहास रघुनाथ पंडित. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “घट्ट नात्याचं घर…” ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ “घट्ट नात्याचं घर…” ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

फोटो कोणी काढला माहीत नाही . पण  हा सुंदर फोटो खूप काही सांगुन जाणारा आहे. 

— फोटो काळा पांढरा आहे . पण या घरातील सुख समाधान व एकजुटीचे सारे रंग दाखवणारा आहे. 

— यात कोणी तरी प्रतिकात्मक आबा आहे. त्याने डोळे वटारले की घर शांत. 

— कोणी तात्या आहे, जो चार चार बैलांचा औत जुंपायचा. 

— कोणी बापू आहे, जो दोन दोन भाकरी वरण्याच्या आमटीत कुस्करून खायचा. 

— कोणी शांताक्का आहे. .पन्नास पोळ्या पटापटा लाटायची. 

— कोणी बनाकाकू आहे, जी चटणी घरात कांडायची. 

— कोणी कुसुम आहे जी उभ्या आडव्या २१ ठिपक्याची रांगोळी काढायची.  

— एक छोट्या आहे. हरणी गाय आहे. 

— घर साधं आहे. पण नात्याच्या एकोप्याचा पाया भक्कम आहे. 

आपली, आपल्या आजोबा – पणजोबांची घरं अशीच होती . आता पोरांना काका माहित नाही. आत्या माहित नाही. ज्या घरात नणंद नाही, दीर नाही, खोकणारा सासरा नाही , गुडघे दुखतात म्हणून कण्हणारी सासू नाही, – अशा घराला नववधूची पसंती आहे. 

— त्यामुळे अशी  भरलेली घरं आता दिसणारच नाहीत. आणि असा सर्वांचा एकत्र फोटोही शक्य नाही..खरंच गेले ते दिवस — राहिल्या त्या आठवणी.  

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

चम्बा रुमालमराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चंबा रुमाल – चंबा, हिमाचल प्रदेश – लेखिका – सुश्री स्वप्ना कुलकर्णी☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

चंबा रुमाल – चंबा, हिमाचल प्रदेश – लेखिका – सुश्री स्वप्ना कुलकर्णी☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

चंबा रुमालाबद्दल माहिती मिळवताना एक सुरेख वर्णन वाचलं, Paintings In Embroidery– हातांनी भरलेले चंबा रुमाल इतके अप्रतिम रंगसंगतीचे आणि नाजूक कलाकुसरीचे असतात की ते कापडावरील रंगवलेलं एखादं चित्रच वाटावं.

सतराव्या शतकातील चंबा राजघराण्यातील राण्या आणि मानाच्या स्त्रिया रेशमी किंवा मलमली कापडावर वैशिष्टय़पूर्ण भरतकाम करत असत. हे मऊसूत कापडाचे रुमाल हात, नाक किंवा तोंड पुसायला नसून राजघराण्याकडून दिल्या जाणार्‍या नजराण्यावर झाकायला, लग्नाला उभ्या असलेल्या मुलीला कलाकुसर जमते हे समजायला (आपल्याकडील रुखवत), किंवा दुसर्‍या राजघराण्याला भेट देताना अशा अगदी खास प्रसंगीच उपयोगात येत असत. सामान्य लोकांपर्यंत ही कला तेव्हा पोहोचली नव्हती.

रेशमी किंवा अत्यंत तलम कापडावर आधी चित्राची काळ्या रंगात आकृती काढायची आणि मग विशिष्ट टाके(Double Satin Stich) वापरून दोन्ही बाजूंना भरायचे. या रुमालांवर कृष्णलीला, पौराणिक, याशिवाय रोजच्या जीवनातील प्रसंग, तसेच निसर्गसौंदर्य भरलेले असत. लाल, निळा, हिरवा, पिवळा, जांभळा, केशरी आणि गडद गुलाबी मुख्य रंग. यातील कृष्ण कायम निळा !!

बौद्ध धर्मातील जातक कथांमध्ये (इसवीसन पूर्व चौथे शतक) या रुमालांचा उल्लेख आहे. पठाणकोट आणि चंबा येथे या पद्धतीचे भरतकाम करत असत असा त्याचा सरधोपट अर्थ. राजा उमेद सिंगने (1748-1768) या भरतकामाला खूप प्रोत्साहन दिले. पुढे राजा भुरी सिंग (1911) यांनी नाजूक भरतकाम केलेले कापड ब्रिटिशांना भेट दिले आणि तेव्हापासून ते ‘ चंबा रुमाल ‘ म्हणून प्रसिद्ध झाले. 

पुढे राजघराणी कमी झाली आणि ही कला हळूहळू सामान्य लोकांपर्यंत पोचली. मध्यंतरी लुप्त होऊ घातलेले हे विशिष्ट भरतकाम आता हिमाचली किंवा पहाडी शाली, स्टोल, जाकिट आणि टोप्यांवर दिसू लागले आहे.

गुरदासपुर येथील गुरुद्वारात एक सुंदर, तलम व रेशमी रुमाल जतन करण्यात आला आहे. हा रुमाल पंधराव्या शतकातील असून बीबी नानकी यांनी आपल्या भावाला, सिख गुरु नानक देव यांना स्वतः भरलेला हा रुमाल लग्नात भेट दिलेला आहे.

कुरुक्षेत्रावरील युद्धप्रसंग भरलेला एक रुमाल, द व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम येथे पहावयास मिळतो.

(आपल्या राष्ट्रातील तिथे असलेल्या अशा ढिगभर वस्तू आपण परत मागितल्या तर ते म्युझियम ओस पडेल)

लेखिका — सुश्री स्वप्ना कुलकर्णी 

संग्रहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆एका ‘निरा’ ची गोष्ट… शब्दांकन – श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ एका ‘निरा’ ची गोष्ट… शब्दांकन – श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास एका कुटुंबाच्या भोवती जाणूनबुजून केंद्रित केला गेला. भारताच्या स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या अनेक व्यक्तींना इतिहासाच्या पानात जाणूनबुजून लुप्त केलं गेलं. आज जेव्हा त्याच कुटुंबांची पुढची पिढी तो इतिहास न वाचता बेताल वक्तव्य करते तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव येते. ब्रिटिश काळात काळ्या पाण्याची शिक्षा काय असते हे माहित नसलेले अनेक जण त्याबद्दल आपल्या अकलेचे तारे तोडत असतात. त्याच अंदमान च्या काळोखी भिंतीत इतिहासाचं एक पान लुप्त केलं गेलं ज्याबद्दल आजही भारतीयांना काहीच माहित नाही. ही गोष्ट आहे एका निरा ची. जिने अपरिमित यातना भोगताना पण देशाशी गद्दारी केली नाही. ही गोष्ट आहे एका निराची जिने देशासाठी आपल्या पतीचे प्राण घ्यायला पण मागेपुढे बघितलं नाही. ही गोष्ट आहे एका निराची जिने भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही पण स्वातंत्र्य भारतात तिच्यावर अक्षरशः झोपडीत राहण्याची वेळ आणली गेली. कारण इतिहासाची अशीच कित्येक सोनेरी पाने एका कुटुंबासाठी जाणून बुजून लुप्त करण्यात आली. 

गोष्ट सुरु होते ५ मार्च १९०२ साली जेव्हा उत्तर प्रदेशातील भागपत जिल्ह्यात निरा आर्या यांचा जन्म झाला. एका सुखवस्तू कुटुंबात जन्माला आलेल्या निरा यांच शिक्षण कोलकत्ता इकडे झालं. लहानपणापासून त्यांच्यात देशभक्ती भिनलेली होती. देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायलाही त्या तयार होत्या. शालेय शिक्षण झाल्यावर देशप्रेमाचे वेड त्यांना स्वस्थ बसू देईना. त्याच ओढीतून त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील झाशीच्या राणी  रेजिमेंट मधे प्रवेश केला. नेताजींनी त्यांच्यावर सरस्वती राजामणी यांच्या सोबत हेरगिरी करण्याची जबाबदारी दिली. त्या देशाच्या पहिल्या गुप्तहेर सैनिक बनल्या. मुलगी बनून तर कधी पुरुष बनून ब्रिटिश अधिकारी आणि ब्रिटिश मिलिट्री कॅम्प मधील गोष्टी त्या आझाद हिंद सेनेला पुरवत राहिल्या. घरच्यांना कळू न देता त्यांच देशकार्य सुरु होतं. 

त्यांच्या या गुप्तहेर कार्याची माहिती नसलेल्या घरच्यांनी त्यांच्यासाठी प्रतिष्ठित अश्या एका ब्रिटिश सेनेतील ऑफिसरशी त्यांचं लग्न जमवलं. त्या ऑफिसरचं नावं  होतं श्रीकांत जय राजन दास. लग्नाचे सोनेरी दिवस सरले तसे त्यांच्या आणि त्यांच्या नवऱ्याच्या विचारांमधील दरी वाढायला लागली. श्रीकांत दास यांना निराच्या वेगळ्या रूपाबद्दल कल्पना आली. निरा ब्रिटिश सत्तेविरुद्ध हेरगिरी करून आझाद हिंद सेनेची मदत करत आहे हे समजल्यावर त्यांनी तिला नेताजींबद्दल विचारण्यास सुरुवात केली. नेताजींचा ठावठिकाणा सांगण्यासाठी तिच्यावर प्रत्येक प्रकारे जबरदस्ती केली पण निरा कशाला दबली नाही. उलट तिने अजून वेगाने स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिलं. एके दिवशी महत्वाची माहिती नेताजींना कळवण्यासाठी एका गुप्त भेटीसाठी निरा निघाली असताना याची माहिती ब्रिटिश अधिकारी श्रीकांत यांना लागली. त्यांनी गुपचूप तिचा पाठलाग केला. नेताजींसोबत भेट होत असताना श्रीकांत यांनी नेताजींच्या दिशेने गोळी झाडली. पण ती गोळी नेताजींच्या ड्रायव्हरला लागली. पुढे काय होणार याचा अंदाज निराला आला. एका क्षणाचाही विलंब न करता आपल्या जवळ असलेल्या चाकूने तिने आपल्या जोडीदाराचा म्हणजे श्रीकांत दास यांचा कोथळा बाहेर काढला. श्रीकांतचा जीव घेऊन तिने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जीव वाचवला. 

एका ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून केल्याप्रकरणी ब्रिटिश सरकारने निरा आर्याला काळ्या पाण्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेसाठी सेल्युलर जेल,अंदमान इकडे पाठवलं. इकडे सुरु झाला एक अत्याचाराचा न संपणारा प्रवास. हाड गोठवणाऱ्या थंडीत छोट्याश्या कारागृहात त्यांच्यावर रोज अत्याचार करण्यात येत होते. साखळदंडात अडकवलेल्या हातापायांच्या बेड्यांनी चामडी सोलून हाड घासत होती. पण ब्रिटिशांचे अत्याचार संपत नव्हते. एक दिवस जेलरने त्यांच्याकडे ऑफर दिली की जर तुम्ही नेताजींचा ठावठिकाणा सांगितला तर तुला आम्ही या जाचातून मुक्त करू. पण यावर निराने एकही शब्द बोलण्यास नकार दिला. नेताजी कुठे असतील तर ते माझ्या हृदयात आहेत. या उत्तराने चवताळलेल्या त्या जेलरने तिचे कपडे फाडले. तिथल्या लोहाराला बोलावून चिमटीने निराचा उजवा स्तन कापायचा आदेश दिला. त्या लोहाराने क्षणाचा विलंब न करता निरा आर्या यांचा उजवा स्तन कापला. पुन्हा मला उलट बोललीस तर तुझा डावा स्तन ही धडावेगळा करेन.  पण त्यावरही निरा यांनी नेताजींचा ठावठिकाणा किंवा त्यांच्याबद्दल एकही शब्द बोलण्यास नकार दिला. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अंदमान कारागृहातून त्यांची मुक्तता करण्यात आली. चुकीचा इतिहास सांगणाऱ्या लोकांनी पद्धतशीरपणे निरा आर्या यांचं बलिदान इतिहासाच्या पानात लुप्त केलं. देशासाठी स्वतःच्या जोडीदाराचा खून करणारी आणि वेळप्रसंगी स्वतःच्या स्तनाचं बलिदान करणारी रणरागिणी भारतीयांच्या नजरेत पुन्हा कधीच आली नाही. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत सरकारी जमिनीवर उभ्या केलेल्या एका अनधिकृत झोपडीत त्यांनी हैद्राबादच्या रस्त्यांवर फुलं विकत आपलं आयुष्य काढलं. देशासाठी आपलं सर्वोच्च बलिदान देणारी निरा आर्या  २६ जुलै १९९८ रोजी अनंतात विलीन झाली. सरकारने त्यांची ती झोपडी पण बुलडोझर चालवून जमीनदोस्त केली. त्यांचा साधा सन्मान करण्याची मानसिकता गेल्या ७५ वर्षात भारत सरकार दाखवू शकलेलं नाही हा एक भारतीय म्हणून आपला पराजय आहे. इकडे टुकार चित्रपटात काम करणारे हिरो आणि तळवे चाटणारी लोकं जेव्हा पद्म पुरस्काराचे मानकरी ठरतात, तेव्हा इतिहासाच्या पानात लुप्त झालेल्या अश्या अनेक अनाम वीरांचा सन्मान करायला आपण आजही विसरतो आहोत याची जाणीव होते. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले काही वाचाळवीर राजकारणी जेव्हा अंदमानमधल्या सेल्युलर जेल, तिथल्या शिक्षेबद्दल बेताल वक्तव्य करतात, तेव्हा त्यांना सांगावसं वाटतं, ज्या स्तनातून दूध पिऊन तुम्ही या जगात आलात त्या स्तनाला स्त्रीच्या शरीरापासून वेगळं करताना काय यातना झाल्या असतील याचा थोडा विचार करा. 

धन्य तो भारत ज्यात निरा आर्यासारख्या स्त्रिया जन्माला आल्या. धन्य ते नेताजी ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणापलीकडे जीव देणारी अशी लोकं आणि आझाद हिंद सेना उभी केली. धन्य ती आझाद हिंद सेना ज्या सेनेत निरा आर्यासारख्या सैनिकांनी आपलं योगदान दिलं. फक्त करंटे आम्ही ज्यांना चुकीचा इतिहास शिकवला गेला. करंटे आम्ही, ज्यांनी ७५ वर्षात अश्या लोकांची कदर केली नाही. करंटे आम्ही ज्यांना भारताचा स्वातंत्र्य लढा कधी समजलाच नाही… 

निरा आर्या यांचा जीवनपट उलगडणारा एक चित्रपट येतो आहे. अर्थात त्यात कितपत खऱ्या गोष्टी दाखवल्या जातील याबद्दल शंका आहे. पण भारताच्या या पहिल्या गुप्तहेर निरा आर्या यांना माझा साष्टांग दंडवत. एक कडक सॅल्यूट…. 

जय हिंद!!!

शब्दांकन श्री विनीत वर्तक   

(फोटो शोध सौजन्य :- गुगल )

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ काश्मीर डायरी १९… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ काश्मीर डायरी १९… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

‘शहादत ही इबादत है’ किंवा ‘हौतात्म्य हीच पूजा’ असं अत्यंत भावस्पर्शी घोषवाक्य असलेलं, श्रीनगर आणि लडाखच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या,   श्रीनगरमधील, लष्कराच्या १५ कॉर्प्स रेजिमेंटने उभं केलेलं म्युझियम बघणं हा एकाच वेळी अभिमानाचा आणि कारुण्याचा विषय होता… आणि त्याचबरोबर तो अनोख्या ज्ञानाचा आणि संतापाचाही विषय होता. कारण तो एक कवडसा होता काश्मीरच्या जन्मापासून आजपर्यंत झालेल्या प्रवासाचा आणि त्याचबरोबर काश्मीरसाठी आणि काश्मीरच्या भूमीवर लढल्या गेलेल्या युद्धांचा… पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या राष्ट्रद्रोही कारवायांचा आणि त्याचबरोबर भव्योदात्त हौताम्याचाही…

२००४ साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. पण आजही ते फारसं कुणाला माहीत नाही! 

श्रीनगरमध्ये जाणारे पर्यटक हे म्युझियम बघत नाहीत किंवा कोणत्याही पर्यटन एजन्सीच्या पर्यटन स्थळांच्या कार्यक्रम पत्रिकेत ते नसतं कारण ते लष्कराच्या बदामी बाग कँटोन्मेंट एरियात आहे. पण आम्ही व्यवस्थित परवानग्या काढून तिथे गेलो आणि वर लिहीलेल्या  सगळ्याच भावनांचा अनुभव आम्ही त्या भव्य म्युझियममध्ये दोन-तीन तास फिरताना घेतला.

या म्युझियममध्ये काश्मीर अस्तित्वात कसं आलं, ‘काश्मीर’ या नावामागची कथा, तिथे आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या राजवटी झाल्या, तिथे कसे कसे संघर्ष झाले, तिथले शूरवीर किंवा वीरांगना कोण, ज्याला ‘काश्मिरीयत’ म्हटलं जातं ती कशी अस्तित्वात आली, तिथली लोक संस्कृती, तिथले कपडे, तिथली भांडी, तिथली वाद्यं हे सगळं तर आहेच पण तिथे बघण्यासारखं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे काश्मीरचा रक्तरंजित इतिहास…. फार प्राचीन काळात जायचं नसलं…. अगदी स्वतंत्र भारताचा विचार केला तरीही १९४७-१९४८ पासून आजतागायत तिथे झालेली युद्धं, त्यात वापरली गेलेली शस्त्रं, रणगाडे, त्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीरांची माहिती, या रेजिमेंटमधील अशोक चक्र, परमवीर चक्र वगैरे सन्मान मिळवलेल्या योद्ध्यांची गाथा, त्यांचे अर्धाकृती पुतळे, त्या युद्धानंतर बदलत गेलेल्या सीमा किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा, ‘युद्धात कमावलं आणि तहात गमावलं’ असं ज्याबाबत म्हणता येतं अशा ‘हाजी पीर’ सारख्या किंवा पाकव्याप्त काश्मीरासारख्या कधीच न मिटणाऱ्या, कायम सलत राहणाऱ्या जखमांची  सर्वांगीण माहिती, हे  सगळं काही बघायला मिळतं.  

काश्मीरमध्ये दहशतवादाचा काळा कालखंड सुरू झाल्यानंतर आजतागायत त्या दहशतवादाची बदलत गेलेली रूपं, दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या एके ४७, एके ५६ रायफली, पिस्तुलं, ग्रेनेड्स, बॉम्ब्स सकट असंख्य शस्त्रांची माहिती, नकाशे, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली बोगस ‘करन्सी’, खंडणी  उकळण्यासाठी त्यांनी छापलेली व आपल्या सशस्त्र दलांनी जप्त केलेली पावती पुस्तकं असंही सगळं बघायला मिळतं. 

आजवर काश्मीरमध्ये चाळीस हजाराच्या वर ‘एके फोर्टी ४७’ आणि पंचवीस हजाराच्या वर ‘एके ५६’ जप्त करण्यात आल्या आहेत. दहशतवादी संघटना तिथे मृत्यूचे थैमान कसे माजवत होत्या त्यांची ही हादरवून टाकणारी माहिती अक्षरशः हलवून टाकते. 

हे म्युझियम आम्हाला ज्याने  फिरून दाखवलं तो हवालदार दिनेश याने तर आम्हाला ‘एके ४७’, ‘एके ५६ ‘वगैरे उघडूनही दाखवल्या आणि ‘एके ४७ ‘ दहशतवाद्यांमध्ये एवढी का लोकप्रिय आहे त्याचीही माहिती दिली.

 त्याने दिलेल्या माहितीनुसार एके ४७ गंजत नाही, बिघडत नाही, अगदी चिखलात किंवा पाण्यात पडली तरी तिची भेदक क्षमता कमी होत नाही. त्यामुळे ती दहशतवाद्यांची लाडकी आहे. 

मात्र या बंदुका नुसत्या प्रदर्शनात का मांडल्या आहेत, आपल्या सैनिकांना त्या दिल्या का जात नाहीत असा प्रश्न आमच्या मनात होता. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या ज्या गोळ्या आहेत त्या अर्थातच पाकिस्तानात बनतात आणि त्याच गोळ्या या रायफल्ससाठी लागतात. आपल्या देशात बनलेल्या गोळ्या त्यात चालत नाहीत. त्यामुळे त्या नुसत्या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.    

या व्यतिरिक्त ग्रेनेडस, क्षेपणास्त्र, बॉम्ब्स यांचे अर्धाकृती छेद तिथे ठेवण्यात आलेले आहेत.

 तिथे मांडण्यात आलेला एक देखावा तर असा आहे की तो बघून भारतीय संस्कृतीचा आणि आपल्या सैन्याचा खूप अभिमान वाटतो.

तो देखावा म्हणजे, ते स्मारक आहे एका पाकिस्तानी सैनिकाचं ! कारगिलच्या युद्धात लढता लढता त्याने एकट्याने ज्या धैर्याने आणि शौर्याने भारतीय सैन्याचा मुकाबला केला ते बघून भारतीय सैन्यालाही त्याचं खूप कौतुक वाटलं. त्याच्या शरीराची भारतीय सैन्याच्या गोळ्यांनी चाळण झाली होती आणि तरीही तो एकटा लढत होता. शेवटी आपली एक गोळी त्याच्या डोक्यात लागली आणि तो मरून पडला. तो जी मशीनगन वापरत होता त्याच मशीनगनवर तो जसा पडला तसंच त्याचं स्मारक या म्युझियममध्ये आहे. त्याच्या बाजुलाच, त्याला कदाचित रसद वगैरे पोहोचवायला आलेल्या एका गावकऱ्याचंही शव दाखवण्यात आलेलं आहे. ही सगळी माहितीही तिथे प्रदर्शित करण्यात आलेली आहे.

या सैनिकाचं शौर्य पाहून भारतीय सेना एवढी खुश झाली की भारताने पाकिस्तानला असं पत्र लिहिलं की त्यांच्या या सैनिकाला त्यांनी ‘निशान ए पाकिस्तान’ हा पाकिस्तानचा सर्वोच्च किताब दिला पाहिजे. 

‘कारगिलमधले सैनिक आपले नाहीत’, ‘पाकिस्तानचा त्यांच्याशी काही संबंध नाही’ अशीच भूमिका पाकिस्तानने सातत्याने घेतली असल्याने पाकिस्तानने हे मानायला नकार दिला. शेवटी भारताने लष्करी इतमामात व इस्लाम धर्माच्या पद्धतीनुसार त्याचे अंतिम संस्कार तर केले. पण भारताने सातत्याने त्याला ‘निशान ए पाकिस्तान’ दिला जावा म्हणून पाकिस्तान सरकारकडे पाठपुरावा केला आणि अखेर भारताच्या प्रयत्नांना यश आलं.  ‘तो आपला सैनिक आहे’ हे अखेर पाकिस्तानने कबूल केलं आणि त्याला मरणोत्तर ‘निशान ए पाकिस्तान’ हा सर्वोच्च किताबही दिला!

‘मरणांतराणी वैराणी’ ही भारतीय संस्कृतीची उदात्त परंपरा आणि शत्रू असला तरी त्याच्या शौर्याचं कौतुक करण्याची भारतीय सैन्याची दिलदारी, उदारता या दोन्हींचं दर्शन या देखाव्यातून घडतं. 

काश्मीरचे शेवटचे महाराजा, राजा हरिसिंग यांनी १९२४-१९२५  मध्ये बांधलेल्या दगडी इमारतीत हे म्युझियम आहे. हवालदार दिनेश कुमार म्हणून तेथे तैनात असलेल्या १५ कॉर्प्सच्या  एका सैनिकाने आम्हाला इथली पूर्ण माहिती अत्यंत आत्मीयतेने दिली. ते सगळं बघत असताना एकाच वेळी अभिमान आणि सैन्याविषयीची कृतज्ञता मनात दाटून येत होती. 

आपल्या सैनिकांच्या हौतात्म्याची ती गाथा लतादीदींनी अमर केलेल्या ‘ए मेरे वतन के लोगो’ या गाण्यातल्या

जब घायल हुआ हिमालय,

खतरे में पडी अजादी

सरहद पर मरने वाला 

हर वीर था भारतवासी ….

या ओळींची आठवण करून देत होती आणि हात आपोआपच कृतज्ञतेने जोडले जात होते!

हे म्युझियम बघायचे असेल तर [email protected] या मेल आयडीवर मेल टाकून प्रयत्न करू शकता. मात्र उत्तर लवकर मिळत नाही. कर्मचारी कमी आणि काम अफाट अशी तिथली स्थिती आहे!

लेखिका : सुश्री जयश्री देसाई 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print