मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खुलभर दुधाची कहाणी – भाग – 1 …. प्रस्तुती श्री सुनील इनामदार ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ खुलभर दुधाची कहाणी – भाग – 1 …. प्रस्तुती श्री सुनील इनामदार ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

(एक पेला दुधामुळे सुरू झाली चक्क एक बँक आणि एक विद्यापीठ !!)

खुलभर दुधाची कहाणी तुम्ही सगळ्यांनीच वाचली असेल. पाऊस पडावा म्हणून राजा प्रजेला घरात असलेलं सर्व दूध देवळाच्या गाभार्‍यात ओतायला सांगतो. गाभारा भरला की पाऊस येणार हे नक्की असतं. घरातली मुलंबाळं उपाशी ठेवून गावकरी गाभार्‍यात दूध टाकत राहतात. पण गाभारा भरत नाही. संध्याकाळी एक आज्जी घरातल्या लेकरांना आणि गाईच्या वासरांना दूध पाजून नंतर खुलभर दूध घेऊन गाभार्‍यात अर्पण करते आणि काय आश्चर्य !! गाभारा दुधाने भरून वहायला लागतो. या कथेचे पौराणिक तात्पर्य काही असो, आजच्या काळातले तात्पर्य असं आहे की विकासाच्या गाभार्‍यात प्रत्येकाने खुलभर दूध टाकले तर समृध्दीचा लोट वाहायला वेळ लागत नाही. फक्त त्याआज्जीबाईसारखं कोणीतरी मार्गदर्शन करायला हवं ! अशीच एक पेला दूधाची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत !

ही कथा आहे तोन्से माधव अनंत पै यांची. कर्नाटकातल्या एका छोट्या गावात यांचा जन्म झाला. १९२० साली हा तरूण बंगळूरला डॉक्टर व्हायला गेला. मुळात अत्यंत हुशार असलेल्या माधव अनंत पैंचं शिक्षण लवकरच आटपलं. त्यांच्या मालपे या गावात त्यांनी दवाखाना सुरु केला.  खरं सांगायचं तर या छोट्या गावातल्या डॉक्टरकीत त्यांना रस नव्हता. त्यांना जपानला जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं होतं. त्याला आईवडीलांनी मोडता घातला होता. नाईलाजाने मन मारून माधव अनंत पैंनी आपला दवाखाना त्या छोट्या गावात चालू ठेवला होता.

मालपे हे छोटंसं मच्छीमारांचं गाव होतं. सर्दी-खोकला-हगवण-उलट्या हे वर्षभर छळणारे रोग त्या गावातही होते. पण डॉक्टर पै यांना मात्र व्यवसायात काही केल्या आर्थिक यश मिळत नव्हतं. तुटपुंज्या कमाईवर दवाखाना कसाबसा चालत होता. एकीकडे उच्च शिक्षण घेण्याची संधी हुकली होती आणि दुसरीकडे पुरेशी कमाईपण नव्हती. अशावेळी इतर तरुणांचे होते तेच झाले ! त्यांना अत्यंत नैराश्याने ग्रासले. 

अशाच चिंतेत असताना एक दिवस त्यांच्या लक्षात आले की त्यांचे उत्पन्न न वाढण्याचं कारण त्यांच्याकडे येणारे गरीब पेशंट आहेत.  मग साहजिकच गरीबांचा डॉक्टर गरीबच राहणार ! थोडं निरीक्षण केल्यावर त्यांच्या हे लक्षात आलं की गावात पुरुष फक्त मच्छीमारी करायचे. मासे विकणे आणि पैसे मिळवणे हे काम बायका करायच्या. बायकांच्या हातात पैसे आले की खर्च वगळता राहिलेली जमा पुरुष दारुत खर्च करायचे. डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणार्‍या बायकांना त्यांची बचत किती हे विचारल्यावर त्या हातात असलेली चिल्लर दाखवायच्या. त्या चिल्लरीतून डॉक्टरांनी चार आणे स्वत:कडे जमा करायला सुरुवात केली. 

दोन चोपड्यांवर हा बचतीचा कारभार सुरु झाला. एक चोपडी डॉक्टरांकडे, तर दुसरी खातेधारकाकडे !

सुरुवातीला येणारे नकार, नकाराची कारणं मोडून डॉक्टरांनी गावातल्या बायकांना बचतीची सवय लावली. काही दिवसांतच काही हजार रुपये जमा झाले. आजच्या काळात हजार म्हणजे फार मोठी रक्कम नाही, पण १९२० साली ही रक्कम फारच मोठी होती. असा जन्म झाला एका बचतीच्या सवयीचा, ज्याला नंतरच्या वर्षांमध्ये नाव मिळालं- ‘ पिग्मी डिपॉझिट स्कीम ‘. इथे या कथेचा पहिला भाग संपला. बायकांना बचतीची  सवय लागली. पैसे जमा झाले. पण पुढे काय?  इथे सुरु झाला या कथेचा दुसरा अध्याय !

क्रमशः….

—डॉ. तोन्से माधव अनंत  पै

प्रस्तुती :-सुनील इनामदार

संग्राहक : – श्री सुनीत मुळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लेखक, संशोधक पं. महादेवशास्त्री जोशी ..केशव साठ्ये ☆ संग्रहिका – सुश्री सुलु साबणेजोशी

?इंद्रधनुष्य? 

☆ लेखक, संशोधक पं. महादेवशास्त्री जोशी ..केशव साठ्ये ☆ संग्रहिका – सुश्री सुलु साबणेजोशी ☆

आज “धायरी” पुण्यातील एक विकसित होणारे उपनगर म्हणून ओळखले जाते. पण एकेकाळी ते गावाबाहेरचे निर्जन ठिकाण होते. धायरी या नावाला ओळख दिली ती महादेवशास्त्री जोशी यांनी. गोवा ही जन्मभूमी आणि पुणे ही कर्मभूमी असलेल्या जोशी यांचा १२ डिसेंबर हा स्मृतीदिन. त्या निमित्त या लेखक-संशोधक महादेवशास्त्री यांना ही आदरांजली!

बापाविना पोरे वाढवणाऱ्या थोर मातांच्या कहाण्या आपल्याला नेहेमीच वाचायला  मिळतात. पण आई स्वातंत्र्यलढ्याच्या निमित्ताने तुरुंगात गेलेली आणि इकडे बाप मुलांना वाढवतो. डॉक्टर – संशोधक करतो. आईविना मुलांना वाढवताना आपले सामाजिक सांस्कृतिक योगदान देण्यात हे पिताश्री कोठेही कमी पडत नाहीत, हे वाचले की, निर्धार आणि कष्ट एकत्र आले की कुटुंबाचा काय कायापालट होतो हे समजते. महादेवशास्त्री यांचा  जन्म गोव्याचा. पण नाव  काढायचे, मोठे व्हायचे म्हणून ते पुण्यात आले आणि पुणेकरच  झाले.

भिक्षुकी, पूजा, ज्योतिष या पिढीजात पेशापासून प्रयत्नपूर्वक दूर राहात त्यांनी लेखन हाच आपल्या आयुष्याचा श्वास आणि ध्यास केला. भाषेवर प्रभुत्व होते आणि कल्पनाशक्तीही अचाट होती. योगायोगाने एका मासिकात उपसंपादक म्हणून नोकरीही मिळाली. मोठ्या हिमतीने त्यांनी स्वतःची ज्ञानराज प्रकाशन ही संस्था सुरु केली. स्वतःमधील लेखकाचा सन्मान करण्यासाठी केलेला हा प्रयोग कालांतराने यशस्वीही झाला. 

या संघर्षमय आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारे एक आव्हान समोर ठाकले. १९५५ मध्ये गोवा-मुक्ती संग्रामाची धामधूम सुरु झाली. यांना पुण्यात स्वस्थ बसवेना. या स्वातंत्र्य-यज्ञात उडी घ्यायचीच, असा निर्धार त्यांनी केला. कुठे मच्छरदाणी शिव, बांगड्या वीक, असे करत संसाराचा गाडा ओढायला मदत करणारी पत्नी पुढे आली आणि म्हणाली – “ तुमच्यावर संसाराची, उदरनिर्वाहाची जबाबदारी आहे, तुम्ही नका भाग घेऊ, मी जाते.” शेवटी हे तयार झाले आणि सुधाताई जोशी यांनी या  संग्रामात बेधडक उडी घेतली. थोडीथोडकी नव्हे १३ वर्षांची त्यांना शिक्षा झाली. पण ४ वर्षातच त्यांची सुटका झाली. 

हा त्यांचा त्याग अतुलनीय आहेच, पण महादेवशास्त्री यांनी सुधाताई यांच्याशिवाय कच्च्याबच्यांचा सांभाळ केला आणि ते करताना आपली साहित्यसेवाही सुरु ठेवली. पत्नीशी झालेल्या ताटातुटीनंतर “भारतीय संस्कृती कोश”सारखा ग्रंथ त्यांनी निर्माण केला. १० खंडात भारतीय संस्कृतीची सांगोपांग चर्चा करणारे साहित्य निर्माण करण्याचा त्यांनी चंग बांधला. किती वर्षे लागतील, किती पैसा लागेल याची तमा न बाळगता महादेवशास्त्री यांनी या कामात स्वतःला बुडवून घेतले. 

शास्त्रीबुवांच्या लेखनात आणखी एक पैलू होता – तो म्हणजे कथालेखकाचा. “कन्यादान” हा चित्रपट, अतिशय गाजलेला “मानिनी” हा सिनेमा त्यांच्याच लेखणीतून पडद्यावर अवतरला. “थांब लक्ष्मी कुंकू लावते”, “जिव्हाळा”, “वैशाख वणवा” या लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या चित्रपटांच्या श्रेयनामावलीत लेखक म्हणून यांचे नाव कोरलेले आहे. हे असे काम पुढेही मिळणे सहज शक्य होते. पैसाही चांगला मिळाला असता. पण “संस्कृतीकोश” हे ध्येय त्यांनी डोळ्यासमोरून ढळू दिले नाही. 

आज आपण विकिपीडिया सर्रास वापरतो. ५० वर्षांपूर्वी हा कोशही एक प्रकारचा विकिपीडियाच होता. १० खंड लिहिणे म्हणजे काय, हे जे लिहिणे जाणतात, त्यांनाच कळेल. एवढे करून ते थांबले नाहीत. मुलांसाठीही चार खंडात भारतीय संस्कृती त्यांनी रसाळपणे नोंदवली. “आत्मपुराण” हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक गाजले. 

धायरीचे गावकरी त्यांना खूप मानत असत. त्यांचे अंत्यसंस्कारही धायरीतच झाले. तिथेच मोठी श्रद्धांजली सभाही झाली. तेव्हा एका गावकऱ्यांनी   काढलेले उद्गगार शास्त्रीबुवा किती थोर होते, याची साक्ष देणारे आहेत. जोशी यांच्याच मुलाने ते एका लेखात सांगितले आहेत. 

गावकरी म्हणाला, “शास्त्रीबुवा म्हंजी लई मोठा मानूस. मोठा म्हंजी किती मोठा? तर असं बघा, त्यांनी एव्हढी बुकं लिहिली. ती बुकं जर येकावर येक, येकावर येक ठेवली, तर त्यांची उंची बाबांच्या उंचीपेक्षा जास्त होईल. एवढा मोठा मानूस होता हा.’’

महादेवशास्त्री जोशी यांना विनम्र अभिवादन !

– केशव साठये

संग्राहिका : सुश्री सुलु साबणे-जोशी.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विलक्षण  मराठी  भाषा…… छंदश्रीमंत ….. ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ विलक्षण  मराठी  भाषा…… छंदश्रीमंत ….. ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆

रस्ता – मार्ग

* जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता.

* जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.

खरं – सत्य

* बोलणं खरं असतं.

* सत्याला सोबत पुरावा जोडावा लागतो.

घसरडं – निसरडं

* पडून झालं की घसरडं.

* सावरता येतं ते निसरडं.

अंधार – काळोख

* विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार.

* निसर्गात जाणवतो तो काळोख.

पडणं – धडपडणं

* पडणं हे अनिवार्य.

* धडपडणं हे कदाचित सावरणं.

पहाणं – बघणं

* आपण स्वत:हून पाहतो ते पहाणं

* दुसऱ्यानं सांगितल्यावर होतं ते बघणं.

पळणं – धावणं

* पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं.

* ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं.

झाड – वृक्ष

* जे माणसाकडून लावलं जातं ते झाड.

* जो आधीपासूनच असतो तो वृक्ष.

खेळणं – बागडणं

* जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं.

* जे मुक्त असतं ते बागडणं.

ढग – मेघ

* जे वाऱ्याने ढकलले जातात ते ढग.

* जे नक्की बरसतात ते मेघ.

रिकामा – मोकळा

 * वेळ जो दुसऱ्याकडे असतो तो रिकामा. 

* आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ.

निवांत – शांत

*कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा.

* काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा.

आवाज – नाद

* जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज.

* जो घ॔टेचा होतो तो नाद.

झोका – हिंदोळा

* जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका. 

* जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा.

स्मित – हसणं

* मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसतं ते स्मित.

* जे लोकां समोर दाखवावं लागतं ते हसणं.

अतिथी – पाहुणा

* जो यावा यावा असा वाटतो तो अतिथी.

* जो आला की कधी जाईल असं मनात येतं तो पाहुणा.

घोटाळा – भानगड

* जो अचानक नकळत होतो तो घोटाळा.

* जी नियोजनबद्ध पद्धतीने होते ती भानगड.

आभाळ- आकाश 

* भरून येतं  ते आभाळ.

* निरभ्र असतं ते आकाश.

प्रस्तुती : – आनंदी केळकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आजची दुर्गाच…विनीत वर्तक☆ संग्राहिका – सुश्री स्नेहलता गाडगीळ

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

परिचय – सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

शिक्षण –  मास्टर ऑफ सायन्स 

पती आणि दोन्ही मुलगे इंजिनियर. त्यांनी १९७७ नो्हेंबर ला हेम इले्ट्रॉनिक्स ह्या नावे उद्योग सुरू केला.

त्यांना १९९१ साली पुरस्कार: व्यवसायातील अतिशय प्रतिष्ठीत जी एस पारखे पुरस्कार त्यांच्या एका उपकरणास मिळाला.

स्नेहलता गाडगीळ ना २०१८ साली महिला उद्योजक राज्य परिषदे कडून संजीवनी पुरस्कार त्यांच्या इंजिनिअरिंग मधील योगदान साठी देण्यात आला.

तसेच २०१९ साली लोकमत सखी मंच कडून नवदुर्गा हा पुरस्कार त्यांच्या  इंजिनिअरिंग क्षेत्रात केलेल्या कार्य बद्दल प्रदान करण्यात आला.

स्नेहलता गाडगीळ गेल्या १० वर्षा पासून सांगली मिरज एम आय डी सी च्या डायरेक्टर आहेत .

त्या श्री शिल्प चिंतामणी हौ सोसायटीच्या  डायरेक्टर आहेत.  त्याना नाटकात काम करण्याची आवड आहे. त्यांनी ए डी ए ह्या नाट्य संस्थेतून राज्यं नाट्य स्पर्ध मध्ये भाग घेतला होता. वाचन आणि भरपूर प्रवास करायची ही आवड .

? इंद्रधनुष्य ? 

☆ आजची दुर्गाच…विनीत वर्तक☆ संग्राहिका – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆ 

कधी कधी कर्तृत्वाची उंचीच इतकी असते की सन्मानाचं वजन त्यामुळे वाढते. काहीसा हाच अनुभव २०१८ वर्षीच्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या सुभासिनी मिस्त्रीमुळे पद्मश्री सन्मानाला आला आहे. सुभासिनी मिस्त्री वय वर्ष ७५, जेव्हा अगदी साध्या साडीत आणि स्लीपर घालून राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांच्याकडून पद्मश्री पुरस्कार स्वीकारत होत्या, तेव्हा पूर्ण भारतच काय, पूर्ण जग अवाक होऊन बघत होतं. कारण एक स्त्री ठरवलं तर काय करू शकते ह्याचं  मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुभासिनी मिस्त्री.

अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेल्या सुभासिनीचं  लग्न अवघ्या १२ व्या वर्षी झालं. १२ वर्ष संसार आणि ४ मुलं खांद्यावर असताना त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. ह्या अकाली मृत्यूला कारण होतं ते म्हणजे वेळेवर न मिळालेले उपचार. अतिशय गरीब आणि पैसे नसल्याने वेळेवर नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये प्रवेश नाकारला गेला. त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला. त्याच क्षणी सुभासिनी मिस्त्रीनी आपलं आयुष्याचं  ध्येय निश्चित केलं, ते म्हणजे आपण हॉस्पिटल काढायचं— असं हॉस्पिटल जिकडे सगळ्या गरजूंचे उपचार होतील. एकही माणूस उपचार नाही मिळाले म्हणून मृत्युमुखी पडणार नाही. ‘ ज्या गावात आपल्या नवऱ्याला मरण आलं तिकडे मी हॉस्पिटल काढेन ‘ असं त्यांनी निक्षून सांगितलं. लोक त्यांच्यावर हसले, समाजाने त्यांची टिंगल उडवली. एक २३ वर्षाची स्री,  अंगावर ४ मुलं- ज्यात सगळ्यात मोठा ८ वर्षाचा तर लहान ४ वर्षाचा, अशिक्षित आणि गरीब असताना, “ हॉस्पिटल काढायचं तर सोड पण स्वतःच घर नीट करून दाखव “ अशी लोकांनी तिची अवहेलना केली.

हरेल तर ती भारतीय स्री कुठली…. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सुभासिनी मिस्त्रीनी आपल्या लक्षाकडे वाटचाल सुरु केली. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी लोकांच्या घरी काम करायला सुरवात केली. ५ लोकांच्या घरी धुण्याभांड्याची कामं  करून त्यांना महिन्याला १०० रुपये मिळायला लागले. आपल्या मुलाला त्यांनी अनाथाश्रमात ठेवलं आणि बाकीच्यांची जबाबदारी घेत भाजी विकायचा व्यवसाय सुरु केला. त्यांनी बँकेत आपलं खातं सुरु केलं. आपल्या मुलांची शिक्षणं  आणि खर्च करून जे काही पैसे वाचले ते त्या बँकेत बचत करत गेल्या. तब्बल २० वर्ष हे प्रामाणिकपणे करत राहिल्या. 

१९९२ साल उजाडलं . सुभासिनी मिस्त्री यांनी हन्सपुकुर ह्या गावात १०,००० रुपयांना जमीन खरेदी केली. हे तेच गाव होतं जिकडे त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता. २० वर्षात बरचं पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. त्यांच्या सगळ्यात लहान मुलाने आईच स्वप्न पूर्ण करण्याचं निश्चित केलं होतं. त्यासाठी आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने कोलकत्ता मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरची पदवी मिळवली होती. जी लोकं २० वर्षापूर्वी तिच्या स्वप्नावर हसली होती, त्याच गावातील लोकांना आपण ही जमीन हॉस्पिटलसाठी दान देत आहोत हे सांगताना गावकऱ्यांनी ह्या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी आपलं योगदान द्यावं, असं आवाहन त्यांनी गावातील लोकांना केलं. आपल्याच लोकांसाठी ह्याचा फायदा होईल हे बघून गावातील लोकं येत गेले आणि कारवा बनता गया. पुढील २-३ वर्षात ह्यूमॅनिटी हॉस्पिटल ने २५० लोकांना वैद्यकीय मदत दिली होती. ही सगळी मदत एकही रुपया न घेता तिथल्या डॉक्टरांनी केली होती. ज्यात सुभासिनी मिस्त्री ह्यांचा डॉक्टर मुलगा अजय मिस्त्री ह्यांचा समावेश होता.

ह्यूमॅनिटी हॉस्पिटल हे नाव आजूबाजूच्या गावात पसरलं. त्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी अनेक लोक आणि संस्था पुढे आल्या. एका वर्षाच्या आत ह्यूमॅनिटी हॉस्पिटल ट्रस्टकडे १० पट पैसा जमा झाला, जो हॉस्पिटल उभारणीच्या पहिल्या टप्प्यात गरजेचा होता. आज हे हॉस्पिटल पूर्णतः अद्ययावत असून ह्यात ऑपरेशन थिएटर, सोनोग्राफी, एक्स रे अश्या, तसेच इतर विविध उपकरणांनी सुसज्ज आहे. ह्या हॉस्पिटलचं  एक युनिट त्यांनी प्रथारप्रतिमा, सुंदरबन इकडे सुरु केलं. ज्याचा उद्देश प्रत्येक माणसाला वैद्यकीय सेवा देणं हाच आहे.

अशिक्षित, गरीब आणि वयाच्या ऐन उमेदीच्या काळात ४ मुलांची आई असून पण समाजातील प्रत्येकाला वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील एक एक पैसा वाचवून ह्यूमॅनिटी हॉस्पिटलचं स्वप्न बघून ते प्रत्यक्षात उतरवणं, हे शब्दात व्यक्त करता येणार नाही इतकं मोठं काम त्यांनी केलं. भारताचा ४ था सगळ्यात मोठा नागरी सन्मान पद्मश्री मिळाल्यावर त्यांचे शब्द होते—

“I am very happy to get the award, but I would like to request all hospitals in the world, please don’t refuse a patient who needs immediate medical attention. My husband died because he was refused admission and I don’t want anyone else to die in a similar way.”

पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना सुद्धा अगदी साध्या वेशात आणि स्लिपर वर सुभासिनी मिस्त्री राष्ट्रपती भवनात गेल्या होत्या. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यावर पण गर्वाचा एक लवलेश सुभासिनी मिस्त्री ह्यांच्या बोलण्यात नव्हता. त्यांच्या मते माझ्या कामाचा पुरस्कार मला तेव्हाच मिळाला जेव्हा आमच्या हॉस्पिटलमधून पहिला रुग्ण बरा होऊन घरी गेला. तेव्हा माझं स्वप्न पूर्ण झालं. 

सुभासिनी मिस्त्री ह्यांना पद्मश्री देऊन सरकारने त्यांचा गौरव नाही केला– तर त्या सन्मानाची शान वाढवली आहे. गरीब, अशिक्षित, उमेदीच्या काळात विधवा होऊन ४ मुलांची जबाबदारी वयाच्या २३ वर्षी असणारी एक स्त्री एक स्वप्न बघते की आपण हॉस्पिटल काढायचं, आणि ह्या समाजात एकाही व्यक्तीचा मृत्यू हा वैद्यकीय मदतीशिवाय होता कामा नये– ते पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्याची सगळी पुंजी त्यांनी हॉस्पिटल काढण्यासाठी लावून नुसतं हॉस्पिटल काढून न थांबता आपल्या मुलाला डॉक्टर करून समाजाच्या सेवेसाठी रात्रंदिवस कार्यरत राहण्याचे संस्कार त्यांनी केले. स्त्रीने ठरवलं तर तिला काहीच अशक्य नाही, आणि कोणाच्या आधाराशिवाय ती आपली स्वप्नं  पूर्ण करू शकते हा आत्मविश्वास भारतात आणि जगातील सगळ्याच स्त्रियांना आपल्या विनम्र वागणुकीतून देणाऱ्या दुर्गाशक्ती पद्मश्री सुभासिनी मिस्त्री ह्यांना माझा दंडवत. त्यांना माझा कडक सॅल्यूट. 

जय हिंद!!!  

आजची दुर्गाच —–

— शब्दांकन (विनीत वर्तक) 

संग्राहिका – सुश्री स्नेहलता गाडगीळ

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मेरा देश बदल रहा है.. ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ मेरा देश बदल रहा है… ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर ☆ 

केंद्र सरकारकडून नुकताच ‘ पद्म पुरस्कार वितरण समारंभ ‘ संपन्न झाला . यंदा अनेक सामान्य व्यक्तींना त्यांच्या कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यांच्यापैकीच एक नाव म्हणजे पर्यावरणवादी तुलसी गौडा. तुलसी गौडा यांना देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित केले .

तुलसी गौडा यांना त्यांच्या झाडे व वनस्पतींच्या अफाट ज्ञानामुळे  ‘एनसायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट’ असे म्हटले जाते.

72 वर्षीय तुलसी गौडा मागील अनेक दशकांपासून जंगल संवर्धनाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी कार्य करत आहेत. गौडा या कर्नाटकच्या होनाल्ली गावातील आहेत. हलाक्की आदिवासी कुटुंबात वाढलेल्या तुलसी यांनी एकटीने राज्यात लाखो झाडे लावली आहेत.

त्यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. मात्र त्यांना झाडे आणि औषधी वनस्पतीचे अफाट ज्ञान आहे. वनविभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वनीकरणाच्या कार्यक्रमात देखील त्या सहभागी होतात व स्वतः लावलेले झाड वाढत नाही तोपर्यंत त्याची काळजी घेतात.

अश्या या महान समाजसेविकेच्या चरणी लक्ष लक्ष प्रणाम —-

 

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ☆ हँग ग्लायडिंग — सुश्री शुभा गोखले  ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ हँग ग्लायडिंग — सुश्री शुभा गोखले  ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

(मेजर विवेक मुंडकुर आणि बाणेर टेकडीवरचं हँग ग्लायडिंग):-

२४ मे १९८१ हा रविवारचा दिवस उत्साही पुणेकरांच्या स्मरणातून कधीही जाणं शक्य नाही ! या दिवसाच्या साधारण 8-10 दिवस आधीपासून पुण्याच्या सगळ्या वर्तमानपत्रांमधून सामान्य पुणेकरांना नवा शब्द कळला होता –” हँग ग्लायडिंग..”. म्हणजे छोट्या त्रिकोणी आकाराच्या धातूच्या फ्रेमवर ताणलेल्या, रंगीबेरंगी  पॅराशूटच्या कापडानी बनवलेल्या मिनी-विमानानी (याला इंजिन नसतं) वाऱ्याच्या सहाय्याने पक्ष्यासारखं उडायचं !

CME, दापोडी मधल्या मेजर विवेक मुंडकुर या अद्वितीय व्यक्तीने  हा आगळा छंद जोपासला आणि काही सहकाऱ्यांच्या मदतीने समस्त पुणेकरांना या छंदाशी परिचित करायचा घाट घातला. 

आता हवेवर आकाशात उडायचं म्हणजे उंचावरची मोकळी जागा हवी… म्हणून निवडली होती बाणेरची टेकडी ! या टेकडी वर एक देऊळ होतं, पण बाकी फारसा झाड-झाडोरा नसून मोकळी जागा होती.  त्या काळात पुणे विद्यापीठाच्या गेटजवळ औंध आणि पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या मधे एक अर्धा-कच्चा रस्ता बाणेर टेकडीकडे जात असे. त्या दिवशी सकाळपासून चतु:शृंगी जत्रेला नसेल,एवढी शाळा-कॉलेजच्या मुलांपासून अनेक तरुणांची आणि त्यांच्या पालकांची अलोट गर्दी बाणेर टेकडीकडे लोटली होती. कुणी स्कूटर-मोटरसायकलवरून,  कुणी गावापासून सायकली हाणीत, तर बरेचसे  विद्यापीठ गेटपर्यंत बसनी आणि पुढे चालत, असे आलेले होते.  तिथे पोहोचल्यावर मात्र वेगळंच वातावरण होतं ! संपूर्ण लष्करी तळाचा थाट होता. टेकडीच्या वाटेवरच  मिलिटरीचे असंख्य ट्रक उभे होते, टेकडीच्या पायथ्याच्या मैदानात अत्यंत सुबक लष्करी पद्धतीचे शामियाने आणि त्यात बसायला आरामदायी खुर्च्या वगैरे होत्या… पण अर्थातच हा जामानिमा आमच्यासारख्या आम-जनतेसाठी नव्हता, तर लष्करी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी होता ! आम्ही सगळे जण टेकडीचा चढ तुडवत वर पोहोचलो होतो. आमची टाळकी सोबतच्या फोटोत दिसत असण्याची शक्यता नाकारता येत नाही ! 

आम्ही टेकडीच्या माथ्याजवळ असल्याने उडण्याच्या तयारीत असलेली हँग ग्लायडर आणि त्यांचे चालक जवळून दिसत होते. हा संपूर्ण खेळ वाऱ्यावर अवलंबून असल्याने वाऱ्याची दिशा आणि वेग पाहूनच उड्डाणे होऊ शकत होती. वारा पडला की आमची तोंडही पडत होती ! 

मेजर मुंडकुर स्वतः हातात छोटा पवन-मापी घेऊन हवेचा अंदाज सतत घेत होते, आणि परिस्थिती चांगली असेल तर उड्डाणाला परवानगी देत होते. अर्थातच ही उड्डाणे फक्त त्यांच्या प्रशिक्षित सहकाऱ्यांंनाच करायची परवानगी होती ! जम्प सूट, हेल्मेट असा त्या लोकांचा पेहराव होता. हँग ग्लायडरच्या दांड्याला पकडून काही पावलांचा स्टार्ट घ्यायचा आणि टेकडीवरून स्वतःला झोकून द्यायचं, असा कार्यक्रम होता. एकदा जमीन सोडली की टेकडीखालच्या दरीतून येणाऱ्या वाऱ्यानी ग्लायडरला वरच्या दिशेनी जोर मिळायचा आणि दरीत लुप्त झालेलं ते  रंगीत गारुड परत टेकडीच्याहून उंच तरंगताना दिसायचं. वारा साथ देईपर्यंत दरीवर घिरट्या मारून 5-7 मिनिटांनी छान वळणदार गिरकी घेऊन खाल्री शामियान्यांसमोर आखलेल्या गोलात लँडिंग करणं, हे एक अचाट कौशल्य तिथे पाहायला मिळालं.

या सगळ्या सोहळ्याने भारून गेलेल्या कित्येकांनी नंतर हँग ग्लायडिंग, पॅरा ग्लायडिंगचं प्रशिक्षण घेतलं. मेजर मुंडकुर हे प्रशिक्षण देणाऱ्यात अग्रणी मानले जातात. 

पुढच्या तीस वर्षांत अर्थातच या साहसी खेळाला जगभरात खूप लोकप्रियता मिळाली, पण १९८१ साली या खेळाशी तोंडओळख होण्याचं भाग्य (माझ्या मते भारतात प्रथमच) पुण्याला मिळालं, यासाठी निवृत्त लेफ्टनंट कर्नल विवेक मुंडकुरांचे सदैव ऋणी राहावं लागेल.

— सुश्री शुभा गोखले 

संग्राहिका :- सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्वामी ललितराम दास….सुश्री मंजुषा जोगळेकर ☆ संग्राहक – सुश्री वीणा छापखाने

? इंद्रधनुष्य ? 

☆ स्वामी ललितराम दास….सुश्री मंजुषा जोगळेकर ☆ सुश्री वीणा छापखाने☆

हे आहेत स्वामी ललितराम दास महाराज. केदारनाथ धाम येथे गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ हे तप साधना करीत आहेत. हा यांचा या दोन तीन दिवसांतीलच फोटो आहे. जेव्हा केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले जातात, तेव्हा हे तिथे येणार्‍या यात्रेकरूंची सेवाही करतात. या वर्षी ८००० पेक्षा जास्त यात्रेकरूंना यांच्यातर्फे मोफत भोजन दिलं गेलं. ५००० भाविकांची रात्रीच्या मुक्कामाची सोय केली गेली. तसेच, ६० पेक्षा अधिक निराधार पशूंचीही यांनी सेवा केली. जेव्हा येथे यात्रा येतात तेव्हा यांच्या आश्रमाचं हे कार्य सुरू असतं. त्यामुळे येथे येणारा कोणीही उपाशी रहात नाही. आणि रात्री उघड्यावर राहण्याची कोणावरही वेळ येत नाही. आश्रमाची गोशाळाही आहे. आता केदारनाथ मंदिर बंद झालं आणि आता हे महाराज इथे बसून तपस्या करीत आहेत. काही दिवसांनी इथले फोटो येतील तेव्हा त्यांच्या मानेपर्यंत बर्फाचं साम्राज्य दिसेल आणि मग या पांढर्‍या विश्वात त्यांचे फक्त काळे केस दिसतील. अशा तपसाधना करणार्‍या सर्वांना माझा नमस्कार, या सर्वांच्या तपश्चर्येची स्पंदने या जीवसृष्टीसाठी वरदान आहेत.

— मंजुषा जोगळेकर

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ परत येण्याची वेळ ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ परत येण्याची वेळ ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

आपण आयुष्याचे 40/50 वर्षे पुर्ण केली असल्यास, “परत फिरण्याची” तयारी सुरू करा….आपल्याकडे असलेल्या, जमा केलेल्या सर्व गोष्टी आपल्यासाठी निरुपयोगी होण्याअगोदर ! 

‘ का आणि कुठे परत फिरावे आणि कसे परत फिरावे ?’ —-

जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी, आणि परत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी मला टॉलस्टॉयची प्रसिद्ध कथा आठवते—

* परत येणे ….. कधीच सोपे नसते *

एक माणूस राजाकडे गेला. म्हणाला “ मी गरीब आहे, माझ्याकडे काहीही नाही, मला मदतीची आवश्यकता आहे. “   

राजा दयाळू होता. त्याने विचारले:” कोणत्या मदतीची आवश्यकता आहे?”

माणूस म्हणाला:” कसायला थोडी जमीन द्या.” 

राजा म्हणाला: “ उद्या सकाळी सूर्योदयानंतर ये. तू चालू शकशील, धावू  शकशील तो संपूर्ण प्लॉट तुझा होईल. पण  लक्षात ठेव, जिथुन धावणे सुरू करशील तिथेच सूर्यास्तापर्यॅत तुला परत यावे लागेल, अन्यथा काहीही मिळणार नाही ! “ 

माणूस खूश झाला. तो सूर्योदय होताच पळायला लागला — पळत राहिला. सूर्य माथ्यावर चढला होता—पण माणूस धावायचं थांबला नाही—अजून थोडी मेहनत– मग संपूर्ण आयुष्यभर विश्रांती ! 

संध्याकाळ होणार होती आणि त्या माणसाला आठवलं, त्याला परत यावं लागेल, नाहीतर त्याला काही मिळणार नाही ! त्याने पाहिले की तो खूप दूर आला आहे— आता परत यायचे होते– सूर्य पश्चिमेकडे वळला होता– तो थकला होता. परत पोहोचायचे होते–पण वेळ वेगाने निघून जात होती —अजून थोडी मेहनत–न थांबता तो पूर्ण वेगाने धावू लागला –पण आता श्वास घेणं कठीण झालं होतं. तो खाली पडला— आणि अखेर त्याने शेवटचा श्वास सोडला ! 

राजा हे सर्व पहात होता. तो त्याच्या सहकाऱ्यांसह तिथे पोहोचला. त्याने काळजीपूर्वक त्या मृतदेहाकडे पाहिले आणि म्हणाला:—-

* याला फक्त सात फुट जमीन हवी होती. बिचारा काही कारण नसताना  इतका पळत होता ! *

—–आता आपण त्या माणसाच्या जागी स्वत:ला ठेवून विचार करा. आपण तीच चूक करीत नाही ना ? आपल्या गरजा मर्यादित आहेत, परंतु आपल्या इच्छा असीम आहेत ! आम्ही जास्त मिळवण्याच्या मोहात परत येण्याची तयारी करत नाही. आणि जेव्हा आम्ही ती करतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो—-मग आपल्याकडे काहीही शिल्लक राहत नाही.

मी जीवनाच्या शर्यतीत सामील होतो..आजपर्यंत मी कुठे पोचलो? मला कुठे जायचे आहे आणि मला किती दिवसात पोहोचायचे आहे? जर मी असेच चालत राहिलो तर मी कोठे व किती काळात पोहोचेन?  हे सगळे प्रश्न एकदा निवांतपणे स्वत:ला विचारुन बघा! 

सूर्यास्ताची वेळ लक्षात घेतल्याशिवाय आपण सर्व जण पळत आहोत. अभिमन्यूलाही परत जाण्याविषयी माहिती नव्हती. आम्ही सर्व अभिमन्यूच आहोत. आम्हालाही कसे परत फिरावे  हे माहित नाही—- 

थोडं थांबा, आजूबाजूला पहा. धावता धावता प्रवासाचा आनंद लुटायचा राहून गेलाय. किमान आज या एका क्षणापुरतं तरी खूश व्हा. 

काळजी घ्या—आनंदी रहा—सुरक्षित रहा. 

 

संग्राहक : – सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गूगल मॅप ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य? 

☆ गूगल मॅप ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

आपण कार चालवत असताना गुगल मॅप वापरतो. गुगल मॅपने चालताना जर ड्रायव्हर मॅपप्रमाणे वळण न घेता पुढे गेला, तर गुगल मॅपचा निवेदक रागवत नाही. चुकीवर बोलत बसत नाही.  तर मॅप  “रिरुट”  करतो.  पुन्हा योग्य आणि जवळचा मार्ग गुगल मॅप सांगतो.

जीवनातील असंच एखादं वळण चुकलं, तर त्याची चूक काढत बसण्यापेक्षा 

आपणही स्वतःला किंवा आपल्या संपर्कातील लोकांना  “रिरुट”  करायला शांतपणे आणि सहजपणे “भाग” पाडले पाहिजे.

 झालेल्या चुकांवर भर देऊन निराशाजनक वातावरण तयार करण्यापेक्षा 

“रिरूट ” करून आशादायी वातावरण तयार करणे कधीही चांगले…

संग्राहक –  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भुलभुलैया… ☆ संग्राहक – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

?इंद्रधनुष्य? 

☆ भुलभुलैया… ☆ संग्राहक – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

१३ ऑक्टोबर.. !

इतिहासातल्या ज्या ज्या घटनांनी जग बदललं, त्यातली एक घटना 1846 साली या दिवशी घडली होती.   

अनॅस्थेशीयाच्या शोधाअगोदर कोणतीही शस्त्रक्रिया करायची असेल तर एकतर त्या रुग्णाला चार दणकट माणसं धरुन ठेवत किंवा त्याच्या डोक्यात मारून त्याला बेशुद्ध केलं जाई. किंवा त्याला भरपूर दारू/अफू/मँड्रेक दिलं जाई.. पण हा सगळा मामला बेभरवशाचा असे. मध्येच शुद्धीवर येऊन रुग्ण गुरासारखा ओरडत असे. भुलीची अशी ‘खौफनाक’ परिस्थिती असल्याने त्याकाळी ऑपरेशन्स पण मर्यादित होत असत. अगदी जीवावर बेतल्याशिवाय कोणीही स्वतःवर सर्जरी करून घेत नव्हतं.. पण इतिहासातल्या या दिवशी ही परिस्थिती बदलली..

होरॅस वेल्स यांच्यानंतर ‘विल्यम थॉमस ग्रीन मॉर्टन’ असं लांबलचक नाव असलेल्या एका माणसानं तब्बल दोन वर्षे केलेल्या अनेक प्रयोगांनंतर मॅसेच्युसेटच्या जनरल हॉस्पिटलमध्यल्या बुल्फिन्च अँफीथिएटरमध्ये जाहीर डेमोन्स्ट्रेशन ठेवलं. ( त्याकाळी ऑपरेशन्स जाहीररित्या अँफी थिएटरमध्ये होत असत. म्हणून त्याला तेव्हा ‘ऑपरेशन थिएटर’ असं म्हणलं जात असे. तेव्हापासून आजतागायत ऑपरेशनच्या खोलीला ‘ऑपरेशन थिएटर’च म्हटलं जातं). त्या दिवशीचा तो भुलेचा जाहीर प्रयोग यशस्वी झाला.. तो दिवस होता १६ ऑक्टोबर १८४६…. आणि या दिवसापासून वैद्यकशास्त्रातील या नव्या पर्वाला सुरुवात झाली. We have conquered pain ! अशा अर्थाच्या हेडलाईन्सनी दुसऱ्या दिवशीचे सगळे न्यूजपेपर भरून गेले.. नंतर लंडन, पॅरिस, बर्लिन, पीटर्सबर्ग अशा अनेक ठिकाणी ‘इथर’ वापरून शस्त्रक्रिया झाल्या, आणि अनॅस्थेशियाच्या शोधावर शिक्कामोर्तब झाले.  

आणि मानवाने वेदनेवर विजय मिळवला !!

पुढे जसजसा खात्रीलायक भुलेच्या औषधांचा शोध लागला आणि हे शास्त्र विकसित होत गेलं, तसतशी सर्जरीने पण गरुडझेप घेतली.. आज अत्यंत गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया लीलया पार पडतात याचे श्रेय निश्चितच, खात्रीलायक असलेल्या आणि जास्तीत जास्त अचूकतेकडे गेलेल्या अनेस्थेशीयाला आहे..

भूलतज्ञ होण्यासाठी MBBS नंतर 3 वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (MD) आहे. यात रुग्ण ऑपरेशन थिएटरमध्ये आणल्यापासून ते बाहेर काढेपर्यंत त्याच्या हृदयाचे ठोके कमी जास्त करणे, त्याचा बीपी कंट्रोल करणे, त्याचे मेंदू/किडनी/लिव्हर यांच्या कामाचे रेकॉर्ड ठेवणे, सगळ्या सिस्टिम्सची काळजी घेणे आणि त्यांचे कार्य कंट्रोलमध्ये ठेवणे, याचं अत्यंत क्लिष्ट शिक्षण अंतर्भूत आहे. त्यात Critical care आणि Pain management ही आहे.. 

रुग्णाच्या बेशुद्धावस्थेत त्याचा श्वास बंद पडलेला असतो, तेव्हा भूलतज्ञच कृत्रिम श्वास देऊन त्याच्या जीवनरथाचा सारथी बनलेला असतो. आणि रुग्णाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी झगडत असतो. पण रुग्णांच्या लेखी तो ‘गुमनाम’च असतो.. कित्येकांना आपलं ऑपरेशन कोणत्या डॉक्टरनं केलं त्यांचं नाव तर माहीत असतं, पण भूल कोणत्या डॉक्टरांनी दिली होती, हे मात्र बऱ्याच जणांना सांगता येत नाही.. मला सांगा, किती जणांना आपल्या भूलतज्ञाचं नाव माहिती आहे.?  आणि ऑपरेशननंतर कितीसे पेशंट ” मला ऑपरेशनच्या वेदना जाणवू न देणाऱ्या भूलतज्ञाचे आभार ” अशा शब्दांत भावना व्यक्त करतात बरं.?! 

आपण आपल्यासाठी अन्न निर्माण करणाऱ्या बळीराजाबद्दल कृतज्ञ असतो, सीमेवर आपलं रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल हळवे असतो, पण आपल्याला ऑपरेशनदरम्यानच्या जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती देणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानायचे असतात, याबाबतीत मात्र एकंदरीत समाजातच उदासीनता दिसून येते.. यावर वर्तमानपत्रात ना कुणाचे लेख येतात.. ना कुठे भूलतज्ञाचा सत्कार होतो.. ना इतर डॉक्टरांसारखी प्रसिद्धी कोणा भूलतज्ञाच्या नशिबी असते..

मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा देखील भूलशास्त्र विषय घेण्याकडे ओढा तसा कमीच असतो. कारण एकतर प्रसिद्धी मिळत नाही, त्यामानाने मोबदलाही मिळत नाही, पण उलट रिस्कचे आणि स्वतःवर येणाऱ्या स्ट्रेसचे प्रमाण खूपच जास्त असते !!

पण काहीही असलं तरी एक मात्र खरं की, इतर सगळे डॉक्टर्स हे जरी पेशंटला ‘ आजारातून बरं करणारे ‘ असले तरी, – भुलेदरम्यान जगण्या- मरण्याच्या सीमारेषेवर असणाऱ्या पेशंटला सहजगत्या ठीक ठेवणारे– वेळ आली तर पेशंटला मरणाच्या दारातून खेचून आणू शकणारे.. आणि पदोपदी पेशंटच्या आणि साक्षात यमाच्यामध्ये उभे राहणारे मात्र, फक्त आणि फक्त ‘ भूलतज्ञ ‘च असतात.. 

अशा या पडद्यामागच्या हिरोंचे आभार मानण्याचा आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे..

या जागतिक भूलदिनाच्या सर्व मानवजातीला शुभेच्छा !!

 

संग्राहक : श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print