ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १७ जून -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
गोपाळ गणेश आगरकर ( १४ जुलै १८७६ – १७ जून १९९५ )
आगरकर महाराष्ट्रातील थोर विचारवंत, समाज सुधारक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ होते.
महाराष्ट्रात समाज जागृतीचे मोठेच काम त्यांनी केले. त्यासाठी सनातन्यांचा रोष पत्करला. सामाजिक प्रबोधनासाठी त्यांनी केसरी , सुधारक, मराठा या वर्तमानपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री – पुरुष समानता, विज्ञानंनिष्ठा, बुद्धीप्रामाण्य ही त्यांची जीवनमूल्ये होती.
आगरकरयांचा जन्म सातारा जिल्हयाती टेंभू या खेड्यात झाला. घराची गरीबी असल्याने, अनेक कामे करून त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे महाविद्यायीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले व डेक्कन कॉलेजमधे प्रवेश घेतला. १८७९ मधे एम. ए. करताना त्यांची टिळकांशी ओळख झाली.
१ जानेवारी १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ‘न्यू इंगलीश स्कूलची’ स्थापना केली. पुढे टिळक आणि आगरकरही त्यांना जाऊन मिळाले. टिळक आणि आगरकर यांनी १८८४मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. संस्थेतर्फे १८८५ मधे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. तिथे ते शिकवू लागले. पुढे ते कॉलेजचे प्राचार्यही झाले.
विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक आणि आगरकर यांनी मिळून केसरी हे वृत्तपत्र १८८१मध्ये सुरू केलं. तसेच मराठा हे वृत्तपत्र इंग्रजीतून चालू केलं. आगरकर हे ‘केसरीचे पहिले संपादक होते. पुढे टिळकांशी झालल्या वैचारिक मतभेदामुळे त्यांनी ‘केसरी’ सोडला व १८८८ मधे ‘सुधारक’ हे वृत्तपत्र सुरू केले. यातून त्यांनी सातत्याने समजा सुधारणेचा आणि परिवर्तनाचा पुरस्कार केला. बालविवाह, अस्पृश्यता, जातीव्यवस्था, चातुर्वर्ण्य, केशवपन, ग्रंथप्रमाण्य, अंधश्रद्धा, यांना त्यांनी विरोध केला. त्यांच्या विचार प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे अधिष्ठान होते.
त्यांचे विचार परंपरावादी सनातनी ब्राम्हणांना पटले नाहीत. त्यांनी कडवा विरोधा केला. विरोध इतका पराकोटीचा काही लोकांनी त्यांची जिवंतपणे प्रेतयात्रा काढली. मुळची नरम प्रकृती आणि सनातन्यांचा विरोध या सगळ्याचा परिणाम असा झाला की अवघ्या ३९व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
आगरकरांबद्दल टिळकांनी लिहिले आहे, ‘ देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्व प्राप्त झाले असेल, तर ते बर्यानच अंशी आगरकरांच्या विद्वत्तेचे आणि मार्मिकतेचे फळ होय, यात शंका नाही.’
आगरकर यांनी लिहिलेले व त्यांच्यावर लिहिलेले साहित्य –
१. आगरकर दर्शन – ऑडिओ पुस्तक
२. आगरकर वाङ्मय – खंड १ ते३
३. आगरकर व्यक्ती व विचार – वी.स. खांडेकर
४. गो. ग. आगरकर – लेखक, संपादक ग. प्र. प्रधान
५. सुधारकातील निवडक निबंध – गो. ग. आगरकर
इ. अनेक पुस्तके त्यांनी लिहिली व त्यांच्यावरही लिहिली गेली आहेत.
सन्मान
१. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समीतीतर्फे ‘सुधारक’कार गो. ग. आगरकर’ या नावाचा पुरस्कार दिला जातो.
२. महाराष्ट्र संपादक परिषद ही संस्था आदर्श पत्रकारीतेसाठी गो. ग. आगरकर’ पुरस्कार देते.
गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्र.के.आत्रे यांनी पुण्यात आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा सुरू केली.
महाराष्ट्रात समाज सुधारणा व्हावी, म्हणून ज्यांनी तळमळीने लेखन व कार्य केले, त्या आगरकरांना त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शतश: वंदन
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अच्युत कोल्हटकर हे लोकमान्य टिळकांचे समकालीन नामवंत पत्रकार होते.बी.ए.एल्.एल्.बी.शिक्षण पूर्ण केल्यावर काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली व नंतर वकिली करण्यास सुरूवात केली.
‘देशसेवक’ या पत्राचे संपादक पद त्यांनी स्विकारले व जहालवादी राजकारणात प्रवेश केला.लो.टिळक यांचा पुरस्कार केल्याबद्दल आणि पुढे सविनय कायदेभंग चळवळीतील सहभागाबद्द्ल त्यांना कारावासही भोगावा लागला होता.
1915 साली त्यांनी ‘संदेश’ या वृत्तपत्राची स्थापना करून वृत्तपत्र सृष्टीचा चेहरामोहरा बदलून टाकला.संदेश मधील अग्रलेख,चटकदार सदरे,आकर्षक मथळे,चित्तवेधक बातम्या यांमुळे हे वृत्तपत्र लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले.पण सरकारी अवकृपेमुळे ते बंद करावे लागले.
त्यानंतर त्यांनी संजय,चाबूक,चाबूकस्वार ही पत्रे काढली.तसेच प्रभात वृत्तपत्रात संपादक मंडळात कामही केले.पण ‘संदेशकार’ हीच त्यांची ओळख कायम राहीली.
श्रृतिबोध व उषा या मासिकांत सहसंपादक म्हणूनही त्यांनी काम केले. लो.टिळकांवरील मृत्यूलेख,मराठी काव्याची प्रभात,शेवटची वेल सुकली,दोन तात्या हे त्यांचे काही गाजलेले लेख होते.त्यांनी स्वामी विवेकानंद,नारिंगी निशाण,संगीत मस्तानी ही नाटके त्यांनी लिहिली.कादंबरीलेखनही केले पण पत्रकार म्हणून त्यांची कारकीर्द लक्षात राहणारी होती.त्यांच्या या कर्तृत्वास आजच्या स्मृतीदिनी सादर प्रणाम!
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १४ जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
गोविंद बल्लाळ देवल
गोविंद बल्लाळ देवल (13 नोव्हेंबर 1855 – 14 जून 1916)हे आद्य मराठी नाटककार होते.
कोकणात जन्म, सांगली जिल्ह्यात बालपण व शालेय शिक्षण बेळगाव येथे झाले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर देवल त्याच शाळेत शिक्षक म्हणून लागले.
बेळगाव येथे देवल प्रख्यात नाटककार व अभिनेते बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संपर्कात आले. त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत अभिनेता व किर्लोस्करांचे सहाय्यक
दिग्दर्शक म्हणून काम केले. किर्लोस्करांच्या निधनानंतर ते दिग्दर्शक म्हणून काम करू लागले.
काही वर्षांनी ते पुणे येथील शेतकी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले.
पुढे त्यांनी पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी ही संस्था स्थापन केली.1913साली ते गंधर्व नाटक मंडळीत गेले.
त्यांनी ‘दुर्गा’, ‘मृच्छकटिक’, ‘विक्रमोर्वशीय’, ‘झुंजारराव’, ‘शापसंभ्रम’, ‘संगीत शारदा’ व ‘संशयकल्लोळ’ ही नाटके लिहिली.
त्यापैकी ‘मृच्छकटिक’,’संगीत शारदा’ व ‘संशयकल्लोळ’ ही नाटके अजरामर झाली.
आज देवलांचा स्मृतिदिन आहे. त्यांना अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १३ जून -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे (13 ऑगस्ट 1898 – 13 जून 1969)
महाराष्ट्रात, जी बहुगुणी, बहुआयामी व्यक्तिमत्वं होऊन गेली, त्यामधे आचार्य प्र. के. अत्रे हे एक महत्वाचे नाव. ते शिक्षणतज्ज्ञ होते. क्रमिक पुस्तकांचे निर्माते होते. कवी-लेखक होते. उत्तम वक्ते होते. खंदे पत्रकार होते. राजकारणी होते. लोकप्रीय नाटककार होते. चित्रपट निर्माते होते. ‘हात लावीन तिथे सोनं’ म्हणता येईल, अशी प्रत्येक क्षेत्रातली त्यांची कारकीर्द होती. त्यांच्याच शब्दात त्यांचं वर्णन करायचं झालं, तर म्हणता येईल, ‘असा महापुरुष गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही आणि पुढची दहा हजार वर्षे होणार नाही.’
आचार्य अत्रे यांची सुरुवातीची कारकीर्द अध्यापनाची आहे. त्यांनी कॅंप एज्यु. सोसायटी हायस्कूलमधे मुख्याध्यापक म्हणून काम केले. ही तळा-गाळातली शाळा त्यांनी नावा-रूपाला आणली. त्यांनी मुलांसाठी राजा धनराज गिरजी हायस्कूल व मुलींसाठी आगरकर हायस्कूल या शाळा काढल्या. प्राथमिक विभागासाठी ‘नवयुग वाचन माला’ व माध्यमिक विभागासाठी ‘अरुण वाचन माला’ ही क्रमिक पुस्तके तयार केली. त्यापूर्वी असलेल्या पाठ्यपुस्तकातून मुलांच्या वयाचा विचार केलेला नसे. अत्रे यांनी मुलांचे वय, आवडी-नावाडी, अनुभव विश्व विचारात घेऊन पाठ्य पुस्तके तयार केली. त्यामुळे ती सुबोध आणि मनोरंजक झाली. शिक्षण क्षेत्राला त्यांचे हे महत्वाचे योगदान आहे.
आचार्य अत्रे यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्व केले. त्यांची वाणी आणि लेखणी दमदार, धारदार होती. त्याला विनोदाचे अस्तर असायचे. त्यामुळे त्यांचे लेखन आणि भाषण दोन्हीही लोकप्रिय झाले. त्यांनी अध्यापन, रत्नाकर, मनोरमा, नवे अध्यापन, इलाखा शिक्षक ही मासिके, नवयुग हे साप्ताहिक, जयहिंद हे सांज दैनिक सुरू केले. १९५६ साली त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते खूपच लोकप्रिय झाले.
आचार्य अत्रे यांच्या चांगुणा, मोहित्यांचा शाप, या कादंबर्या , अशा गोष्टी अशा गमती, फुले आणि मुले हे कथासंग्रह, गीतगंगा आणि झेंडूची फुले हे कविता संग्रह प्रकाशित झालेत. झेंडूची फुले हा कविता संग्रह म्हणजे त्या काळी लिहिल्या गेलेल्या काही सुप्रसिद्ध कवितांची विडंबने आहेत. काव्यक्षेत्रात या कविता म्हणजे त्यांनी चोखाळलेली एक वेगळीच वाट आहे. त्यानंतरही अशा प्रकारचे लेखन क्वचितच कुठे दिसले. ‘मी कसा झालो’ आणि कर्हेहचे पाणी ( खंड १ ते ५) ही त्यांची आत्मचरित्रात्मक पुस्तके. याशिवाय अत्रे यांनी, अत्रेटोला, केल्याने देशातन, दुर्वा आणि फुले, मुद्दे आणि गुद्दे अशी आणखी इतरही पुस्तके लिहिली.
आचार्य अत्रे यांची नाटकेही गाजली. त्यात भ्रमाचा भोपळा, कवडी चुंबक, मोरूची मावशी, साष्टांग नमस्कार यासारखी विनोदी नाटके होती, तर उद्याचा संसार, घराबाहेर, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच, प्रीतिसंगम, डॉ. लागू यासारखी गंभीर नाटकेही होती.
आचार्य अत्रे यांच्या प्रतिभेचा आविष्कार चित्रपट सृष्टीतही झालेला दिसून येतो. नारद-नारदी, धर्मवीर, प्रेमवीर, ब्रॅंडीची बाटली, बेगुनाह ( हिन्दी) इ. चित्रपटांच्या कथा त्यांनी लिहिल्या. नयुग पिक्चर्स तर्फे लपंडाव, श्यामची आई हे चित्रपट काढले. त्यांचे दिग्दर्शन त्यांनी केले. यापैकी श्यामची आईला राष्ट्रपतींच्या हस्ते ‘सुवर्ण कमळ मिळाले. ‘सुवर्ण कमळ मिळवणारा हा पहिलाच मराठी चित्रपट. त्यांच्या चित्रपट सृष्टीच्या झगमगत्या कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोचला गेला.
पुरस्कार, सन्मान, गौरव
विष्णुदास भावे या सांगलीयेथील नाट्यसंस्थेतर्फे त्यांना १९६० साली भावे गौरव सुवर्ण पदक मिळाले. पण अत्रे यांचे वैशिष्ट्य असे की अनेक संस्था अत्रे यांच्या नावे पुरस्कार देतात.
अशोक हांडे, ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ हा अत्रे यांची संगीतमय जीवनकथा सांगणारा कार्यक्रम करत. तर सदानंद जोशी हे ‘मी अत्रे बोलतोय’, हा एकपात्री प्रयोग करत.
अत्र्यांची लोकप्रियता एवढी होती की त्यांच्या निधंनांनंतर त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अनेक गावी अनेक वेगवेगळ्या संस्था काढल्या गेल्या. अत्रे कट्टा, अत्रे संस्कृतिक मंडळ, अत्रे नाट्यगृह, अत्रे कन्याशाळा, अत्रे विकास प्रतिष्ठान, अत्रे सास्कृतिक भवन अशा अनेक संस्था त्यांच्या नावे निघाल्या. वरळी आणि सासवड इथे त्यांचा भाव्य पुतळा उभारलेला आहे.
अत्रे यांच्यावर अनेक पुस्तकेही लिहिली गेली. दिलीप देशपांडे, सुधाकर वढावकर, शिरीष पै, सुधीर मोर्डेकर, आप्पा परचुरे, श्याम भुर्के इ.नी त्यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत.
आज अत्रे यांचा स्मृतीदिन. त्या निमित्त या अष्टपैलू प्रतिभावंताला शतश: अभिवादन!
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १२ जून – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी)
आज १२ जून — “प्रत्येक रसिक मराठी मनावर आपला कायमस्वरूपी ठसा उमटवून गेलेले सर्वांचे लाडके आणि सर्वज्ञात व्यक्तिमत्व म्हणजे श्री. पु . ल. देशपांडे ”, हे विधान खरोखरच वादातीत आहे. आज त्यांचा स्मृतीदिन.
( ८/११/१९१९ – १२/६/२००० )
त्यांच्याविषयी काय काय आणि किती सांगावे ? – हा खरंच फार कठीण प्रश्न आहे. सर्वोत्तम विनोदी लेखक अशी जरी त्यांची प्रथमदर्शनी ओळख सांगितली जात असली तरी, चित्रपटकथा-लेखक, नाटककार, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार , अभिनेता , हजरजवाबी वक्ता, उत्तम संवादिनी – वादक , संगीतातील दर्दी, एकपात्री नाट्यप्रयोग गाजवणारे श्रेष्ठ कलाकार, अशी स्वतःची अनेकांगी ओळख ज्यांनी स्वतःच्या चतुरस्त्र कलागुणांनी निर्माण केली होती असे “ आपले “ पु. ल. ऊर्फ भाई.
त्यांच्यासारखाच त्यांचा विनोदही चौफेर फटकेबाजी करणारा होता. तो विनोद सर्वसामान्यांना खळखळून हसवणारा तर होताच , पण योग्य तिथे अतिशय मार्मिक होता, खटकणाऱ्या गोष्टी आवर्जून अधोरेखित करणारा होता, समाजासाठी बाधक ठरू शकणाऱ्या गोष्टी नेमक्या हेरून त्याकडे लक्ष वेधायला लावणारा होता —- पण तो कायम फक्त निखळ स्वरूपाचाच असायचा, हे फार महत्वाचे, आवर्जून लक्षात घेण्यासारखे आहे. विनोदाच्या माध्यमातून त्यांनी केलेले कुठलेही भाष्य कधी कुणाला थेट दुखवणारे नक्कीच नसायचे. पण ते जिथे पोहोचणे अपेक्षित असायचे तिथे नक्की पोहोचत असणार याची जाणकारांना मनोमन खात्री वाटायची. आणि पु. ल. यांच्या विनोदाचे, त्यांच्या विचारसमृद्धीचे, तसेच वाचा-समृद्धीचे हे खास वैशिष्ट्य होते असे नक्कीच म्हणावेसे वाटते.
आपल्या बहुतेक सर्व प्रकारच्या लिखाणातून त्यांनी वाचकांसाठी हसू आणि आनंद यांची मुक्तहस्ताने सतत उधळण केली, आणि यापुढेसुद्धा कुणीही जेव्हा केव्हा ते लिखाण वाचेल तेव्हा तेव्हा ती उधळण तशीच सतत होत राहील हे निश्चित. या लिखाणात त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा तर जणू इतक्या जिवंत आहेत की वाचतांना वाचक त्यांच्यामध्ये स्वतःलाही काही काळ विसरून जातो— ही त्यांच्या लिखाणाची ताकद आहे.
“इदं न मम“ या भावनेने जोपासलेला त्यांचा दानशूरपणाही आवर्जून लक्षात घेण्यासारखा आहे. आपण समाजाचे नक्कीच काही देणे लागतो हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी एक म्हणजे पु. ल., ही गोष्ट तर सर्वज्ञातच आहे. या हिऱ्याचा हा आणखी एक लकाकता पैलू.
त्यांनी लिहिलेले आणि प्रकाशित झालेले सर्वच साहित्य इतके सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय झालेले आहे, की त्याची यादी इथे देण्यात औचित्य यासाठी राहिलेले नाही की त्यांच्या बहुतेक सगळ्याच पुस्तकांची कित्येक रसिक वाचकांनी अक्षरशः पारायणे केली असतील. किंबहुना असा एकही मराठी रसिक वाचक नसेल, ज्याने त्त्यांचे कुठलेच लिखाण वाचलेले नाही . त्यांचे कुठलेही पुस्तक आधी वाचलेले असले तरी पुनः पुन्हा वाचावेसे वाटते, दरवेळी नव्याने वाचल्यासारखे वाटते आणि दरवेळी तितकेच उत्स्फूर्त हसवून वाचकाला फ्रेश करून टाकते.
अशा चिरस्मरणीय पद्मभूषणपु. ल. यांना आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी अतिशय भावपूर्ण विनम्र आदरांजली.
☆☆☆☆☆
“ भाषातज्ञ “ म्हणून ख्यातनाम झालेले श्री. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा आज स्मृतिदिन.
( ५/१/१८९२ – १२/६/१९६४ )
एम.ए.बी.टी. झालेले श्री कुलकर्णी हे आधी अहमदाबाद येथे आणि नंतर मुंबईमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. पुढे त्यांनी प्राचार्य म्हणून शेवटपर्यंत काम केले. पण विशेष म्हणजे त्याच्या जोडीनेच त्यांनी मराठी भाषेसाठीही भरपूर काम केले. “ मराठी संशोधन मंडळाचे संचालक “, महाराष्ट्र सरकारच्या “ भाषा सल्लागार- मंडळा “चे अध्यक्ष , मराठी शुद्धलेखन समितीचे कार्यवाह, अशा वेगवेगळ्या पदांची जबाबदारी त्यांनी उत्तम तऱ्हेने सांभाळली होती.
१९५२ साली अंमळनेर इथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
त्यांचे वैविध्यपूर्ण प्रकाशित साहित्य पुढीलप्रमाणे —-
ऐतिहासिक पत्रव्यवहार.
कृष्णाकाठची माती – आत्मचरित्र ,
पेशवे दप्तर — ४५ खंड. यासाठी सहसंपादक म्हणून काम .
भाषाशास्त्र व मराठी भाषा .
मराठी भाषा – उद्गम व विकास
मराठी व्याकरणाचे व्याकरण
मराठी व्युत्पत्तिकोश
महाराष्ट्र-गाथा — यासाठी श्री. प्र. के.अत्रे हे सहसंपादक होते .
मुकुंदराजाचा विवेकसिंधू— संपादन.
राजवाडे मराठी धातुकोष —- संपादन .
शब्द : उगम आणि विकास .
Sanskrit drama and dramatists — इंग्लिश पुस्तक.
धर्म : उद्गम आणि विकास – जी. एफ. म्यूर यांच्या “ दि बर्थ अँड ग्रोथ ऑफ रिलिजन “ या ग्रंथाचे भाषांतर.
श्री. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांना आजच्या स्मृतिदिनी मनापासून आदरांजली.
☆☆☆☆☆
संस्कृतचे प्रकांड पंडित असणारे डॉ. केशव रामराव जोशी यांचाही आज स्मृतिदिन.
( ७/३/१९२८ – १२/६/२०१२ )
संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम करत असतांना, एकीकडे डॉ. जोशी यांनी ग्रंथलेखनाचेही खूप काम केले होते. काशीला राहून तिथल्या शास्त्री- पंडितांकडून त्यांनी प्राचीन व अर्वाचीन परंपरांचे अध्ययन केले होते. तसेच एम.ए. झाल्यानंतर संस्कृत विषयातच त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. पुढे नागपूर विद्यापीठात संस्कृत-विभाग प्रमुख, आणि विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या. याव्यतिरिक्त, तत्वज्ञान, वेदाभ्यास, शास्त्राभ्यास, व्याकरण अशा विषयांचाही त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यांना वेगवेगळ्या राज्यांमधून मिळालेल्या वेगवेगळ्या पदव्या हे त्यांच्या या ज्ञानसंपदेचे प्रतीक आहेत. त्या पदव्या अशा होत्या —
“काव्यतीर्थ“–कलकत्ता , “ साहित्याचार्य “– जयपूर , “ साहित्योत्तम “ – बडोदा , “ संपूर्ण दर्शन मध्यमा “ – वाराणसी . अनेकांना त्यांनी पी.एच.डी. साठी मार्गदर्शन केले होते.
ललित लेखनावरही त्यांचे प्रभुत्व होते. संस्कृत प्रचारिणी सभेतर्फे प्रकाशित होणाऱ्या “ संस्कृत भवितव्यं “ या मासिकाचे ते अनेक वर्षं संपादक होते. आपल्या संस्कृत साहित्यातून त्यांनी हुंड्यासारख्या सामाजिक समस्यांचाही उहापोह केला होता.
त्यांची साहित्य-संपदा अशी —
शारीरिक भाष्यावरील विश्लेषण – पुस्तक
“ नीळकंठविजयम‘आणि ‘रहस्यमयी “ या नाटिका.
“ गोष्टीरूप वेदान्त “
“ न्यायसिद्धान्त मुक्तावली “ – संगणक ज्या तर्कशास्त्रावर चालतो, त्या तर्कशास्त्रावर आधारित असलेले आणि खूपच गाजलेले पुस्तक
“ Post independence Sanskrit literature “ हा ग्रंथ
“ Problems of Sanskrit education in non- Hindi states.” हे पुस्तक.
नीलकंठ दीक्षित व त्यांची काव्यसंपदा .
“ संस्कृतत्रिदलम “ —- ललित लेख आणि प्रवासवर्णने .
“ अभिनव शास्त्र त्रिदलम “ – शोध-लेख संग्रह.
काव्यत्रिदलम – काव्यसंग्रह
“ तीरे संस्कृताची गहने “ – याच ओळीने सुरु होणाऱ्या श्री ज्ञानेश्वरीतील एका श्लोकाच्या संदर्भाने लिहिलेला ग्रंथ.
डॉ. जोशी यांना अनेक मानाचे सन्मान प्राप्त झाले होते. —–
“ राष्ट्रपती पुरस्कार “.
“ Man of the year “ – २००५ साली अमेरिकेच्या बायोग्राफिकल इन्स्टिट्यूटने हा पुरस्कार त्यांना त्यांच्या घरी जाऊन सन्मानपूर्वक दिला होता. त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरही अशी अभिमानास्पद दखल घेतली गेली होती.
“ संस्कृत पंडित “ हा महाराष्ट्र सरकारने दिलेला पुरस्कार.
याखेरीज, ज्ञान प्रबोधिनी, पुणे, शृंगेरी पीठ , कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, जयपूरची संस्कृत सेवा परिषद या सर्वांतर्फेही त्यांना गौरवपर पुरस्कार देण्यात आले होते.
डॉ. केशव रा. जोशी यांना आदरपूर्वक श्रद्धांजली.
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ११ जून – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
पांडुरंग सदाशिव तथा साने गुरुजी
खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे या स्वतःच्याच शब्दांप्रमाणे आयुष्यभर ज्यांनी या जगावर प्रेमच केले, उदंड माया दिली, त्या सानेगुरुजींचा आज स्मृतीदिन आहे. 11 जून 1950 ला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण आपले विचार व त्यानुसार प्रत्यक्ष आचरण यांचा मेळ घालून किर्तीरूपी ते अमरच आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या खेड्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब पिढीजात श्रीमंत गावातील खोताचे काम करणारे असले तरी त्यांचे वडिलांचे पिढीपासून त्यांच्या परिस्थितीला उतरती कळा लागली व प्रतिकुल गरीब परिस्थितीतच त्यांचे बालपण गेले. पण आईने केलेल्या संस्कारांची श्रीमंती त्यांना आयुष्यभर पुरली.
इंग्रजी घेऊन एम्. ए. केल्यावर त्यांनी अंमळनेर येथे प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षकाची नोकरी धरली. विद्यार्थी वसतिगृहाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. याठिकाणी त्यांनी स्वतःच्या कृतीतून सेवावृत्तीचे व स्वावलंबनाचे धडे दिले.
साने गुरुजी हे म. गांधीवादी विचारांनी प्रभावित झाले होते. 1930मध्ये त्यांनी नोकरी सोडली व स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यास सुरूवात केली. आयुष्यभर खादीचा वापर केला. सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला. 1942 च्या लढ्यात भूमिगत राहून कार्य केले.समाजातील जातिभेद,अनिष्ट रुढीपरंपरा,बंद व्हाव्यात यासाठीही लढा दिला. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह करून मंदिर सर्वांसाठी खुले केले.
1928 साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक व त्यानंतर ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. पुढे 1948 मध्ये ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले.
राष्ट्र सेवा दलाची स्थापनाही त्यांनीच केली.
स्वातंत्र्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला.भारताची संस्कृती, विविध भाषा समजून घेण्यासाठी त्यांनी आंतरभारती चळवळ सुरू केली. त्यांना हिंदी, इंग्रजी व्यतिरीक्त तमीळी व बंगाली भाषा ही अवगत होत्या.
या सामाजिक व राष्ट्रीय कार्याबरोबरच त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांची सुमारे 80 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मानवतावाद, राष्ट्रभक्ती, समाजसुधारणा, संस्कार, ही सर्व मूल्ये त्यांच्या लेखनातूनही दिसून येतात.
त्यांनी काही पुस्तकांचा अनुवादही केला आहे.
तमिळ कवी तिरूवल्लीवर यांच्या ‘कुरल’या महाकाव्याचे भाषांतरत्यांनी केले आहे. Les miserables या फ्रेंच कादंबरीचे ‘दुःखी’ या नावाने कादंबरीत रूपांतर केले आहे. शिवाय डाॅ. हेन्री थाॅमस यांच्या ‘The story of human race’ चे मानवजातीचा इतिहास या नावाने ग्रंथात भाषांतर केले आहे.
त्यांची काही पुस्तक अशी:
अमोल गोष्टी, आस्तिक, कला आणि इतर निबंध, गीता हृदय, गोड गोष्टी (दहा भाग), गोड निबंध (तीन भाग), भारतीय संस्कृती, मिरी, मुलांसाठी फुले, रामाचा शेला, धडपडणारी मुले, श्याम खंड एक व दोन, श्यामची आई, मोलकरीण, श्यामची पत्रे, स्त्री जीवन, स्वप्न आणि सत्य इत्यादी….
त्यांनी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, म.गांधी, गोखले, गौतम बुद्ध, विनोबाजी, देशबंधु दास, पं.नेहरू, छत्रपती शिवराय (आठ भाग), भगवान श्रीकृष्ण (आठ भाग) या व्यक्तींची चरित्रेही लिहीली आहेत.
श्यामची आई व मोलकरीण या पुस्तकावर त्याच नावाने मराठी चित्रपटही निघाले आहेत.
करील मनोरंजन जो मुलांचे
जडेल नाते प्रभूशी तयांचे ;
बलसागर भारत होवो;
खरातो एकची धर्म यासारखी त्यांची गीते आजही लोकप्रिय आहेत.
संस्कार, संस्कृती, संवेदना, समाजसुधारणा यासाठी आयुष्यभर प्रत्यक्ष व साहित्याच्या माध्यमातून कार्य करून गुरूजी विचारांचा वारसा मागे ठेवून हे जग सोडून गेले. त्यांच्या स्वप्नातील ‘बलसागर भारत’ उभा करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली!
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १० जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
कमलाबाई टिळक
कमलाबाई विष्णू टिळक(26 जून 1905 – 10 जून 1989) या लेखिका होत्या.
त्या पूर्वाश्रमीच्या कमला अनंत उकिडवे. मॅट्रिकला मुलीत पहिल्या आल्या. त्यांना संस्कृतसाठी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती, चॅटफिल्ड, यमुनाबाई दळवी पारितोषिक मिळाले.
इंग्रजी साहित्य घेऊन त्या प्रथम वर्गात एम.ए. उत्तीर्ण झाल्या.
हुजूरपागेच्या मुलींच्या महाविद्यालयाच्या त्या प्राचार्या होत्या. नंतर बनारस येथील मुलींच्या महाविद्यालयात त्या इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या. पुढे त्या तिथे प्राचार्या झाल्या.
निवृत्तीनंतर फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागार समितीवर त्यांनी आठ वर्षे काम केले.
त्यांच्या अनेक कथा ‘रत्नाकर’, ‘मनोहर’, ‘यशवंत’, ‘स्त्री’ वगैरे मासिकांतून प्रसिद्ध झाल्या.
‘हृदयशारदा’, ‘आकाशगंगा’, ‘अश्विनी’, ‘सोन्याची नगरी’ हे कथासंग्रह, ‘शुभमंगल सावधान’ ही कादंबरी, ‘स्त्री-जीवन विषयक काही प्रश्न’, ‘स्त्री-जीवनाची नवीन क्षितिजे’, ‘युधिष्ठिर’ इत्यादी वैचारिक लेखन, तसेच बालवाङ्मय आणि एकांकिका असे बरेच लेखन कमलाबाईंनी केले.
चिंतनशीलता, सूक्ष्म विश्लेषण, तंत्रावरील प्रभुत्व व भाषेचे सहजसौंदर्य ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. स्त्रीला जाणवलेली भिन्नभिन्न स्त्री-रूपे, त्यातील वेगवेगळ्या छटा, गुंतागुंत ही त्यांनी अकृत्रिमपणे व तटस्थपणे उलगडून दाखवली.
त्यांची व बालगंधर्वांची जन्मतारीख एकच. त्या विनोदाने म्हणत, “त्या तारखेचे रूपसौंदर्य बालगंधर्वांनी घेतले. माझ्या वाटणीला काही उरलेच नाही.”
त्यांची ही विनोदी वृत्ती, शिक्षणाने मिळालेली समृद्धी, वैचारिकता, सहृदयतेने स्त्रियांच्या मानसिकतेकडे पाहण्याची व प्रश्नांच्या सर्व पैलूंना स्पर्श करण्याची परिपक्वता, अंतर्मनाच्या गाभ्याला भिडण्याची क्षमता वगैरे गोष्टी कमलाबाईंच्या लेखनातून जाणवतात.
कमलाबाई टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विवेक :महाराष्ट्र नायक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ८ जून – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी)
लेखक, पत्रकार, आणि मराठी विश्वकोशकारम्हणून प्रसिद्ध असलेले श्री गणेश रंगो भिडे यांचा आज स्मृतीदिन.
(६/६/१९०७ – ८/६/८१).
एम.ए. बी. टी. असूनही श्री. भिडे यांनी शिक्षकी पेशा मात्र स्वीकारला नाही. ते प्रभात फिल्म कंपनीत नोकरी करत असतांना “ Household Encyclopedia “ आणि विणकाम, पाकशास्त्र , यावरील पुस्तके पाहून, अशा प्रकारची पुस्तके मराठीत असणे आवश्यक आहे या प्रबळ विचाराने त्यांनी त्यासाठीच काम करण्याचे ठरवले. दोनच दिवसात त्यांनी जवळपास ३५ विषयांची यादी तयार केली. २०/४/३१ रोजी “ व्यावहारिक ज्ञानकोश मंडळा “ची स्थापना झाली, आणि १९३५ साली “ व्यावहारिक ज्ञानकोशा” चा पहिला भाग प्रकाशित झाला. विशेष म्हणजे श्री. भिडे यांनी स्वतः सगळीकडे फिरून त्याची विक्री केली. त्यातले व्यासंगी लेखकांचे उत्तम दर्जाचे लेखन, चित्रे – फोटो यांचा समावेश, सुबक बांधणी, आणि त्यामानाने कमी किंमत, ही या कोशाची वैशिष्ट्ये होती. या कोशाचे एकूण पाच खंड प्रसिद्ध झाले. याचबरोबर “ अभिनव मराठी ज्ञानकोश “ हा स्वातंत्र्योत्तर कालानुरूप नवे ज्ञान देणारा पाच खंडातील कोशही त्यांनी निर्मिला होता. याव्यतिरिक्त त्यांनी “ बालकोश “ ही लिहिला होता. अशा कोशांच्या संपादनाचे मोठेच काम श्री. भिडे यांनी केले होते. त्यांची “ शैक्षणिक कोश “ निर्मितीची योजना मात्र पूर्णत्वास जाऊ शकली नाही.
श्री. भिडे हे १९३२ साली सुरू झालेल्या “ सिनेमासृष्टी “ या मराठीतील पहिल्यावहिल्या सिने-नाट्य विषयक नियतकालिकाचे कर्ता करविता होते. सेवक , पुढारी , उषःकाल, या नियतकालिकांसाठीही त्यांनी काम केले होते. तसेच केसरी आणि त्रिकाल या वृत्तपत्रांचे ते वार्ताहरही होते.
“कलामहर्षी बाबुराव पेंटर“ हे अतिशय गाजलेले चरित्रात्मक पुस्तक, आणि “फोटो कसे घ्यावेत“, “सावरकर सूत्रे“ इत्यादि त्यांनी लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध झाली होती . श्री. पु.ल.देशपांडे यांच्या सहकार्याने त्यांनी “ कोल्हापूर दर्शन “ हे पुस्तकही लिहिले होते.
८ जून १९८१ रोजी कर्करोगाने त्यांचे निधन झाले.
श्री. गणेश रंगो भिडे यांना आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया, महाराष्ट्र टाईम्स.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ६ जून – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
गोपीनाथ गणेश तळवलकर:
ख्यातनाम बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांनी बाल साहित्याबरोबरच प्रौढ साक्षरांसाठीही लेखन केले आहे. कणिका, खंडखाव्य, बालकविता, कादंबरी, आत्मचरित्र असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.काही वेळेला ते ‘गोपीनाथ’ या टोपण नावानेही लेखन करत असत.
आकाशवाणी पुणे केंद्रावर असताना ते बालविभाग प्रमुख होते. तेव्हा त्यांनी बाल श्रोत्यांसाठी ‘बालोद्यान’ हा कार्यक्रम सुरू केला होता. तो अत्यंत लोकप्रिय झाला होता. त्यातील नाना हे प्रमुख पात्र ते स्वतः सादर करत असत.
1906 साली आपटे यांनी सुरू केलेल्या ‘आनंद’ या मासिकाचे ते 35 वर्षे संपादक होते.
गोपीनाथ उर्फ नाना यांचे वयाच्या 73व्या वर्षी 2000 साली निधन झाले. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यांना नम्र अभिवादन !
☆☆☆☆☆
डाॅ.सखाराम गंगाधर मालशे
संपादक, समीक्षक व संशोधनपर लेखन करणारे डाॅ.स.गं.मालशे यांनी,फादर स्टिफन्स यांच्या ‘ख्रिस्तपुराण’ वर विद्यावाचस्पति(डाॅक्टरेट) प्राप्त केली होती. ते काही काळ एस्.एन्.डी.टी. महाविद्यालय व कीर्ती महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख होते. महाराष्ट्र साहित्य परिषदचे मुखपत्र साहित्य पत्रिका चे संपादकही होते. तसेच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व मुंबई साहित्य संघाचे ते अध्यक्ष होते.साहित्यातील संशोधनपर लेखनामुळे त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले होते.
सुरुवातीला त्यांनी व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथा व हसा आणि लठ्ठ व्हा या दोन पुस्तकांचे संपादन केले. लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सहकार्याने समग्र महात्मा फुले साहित्य संपादित केले. नीरक्षीर हा नाट्यविषयक लेखसंग्रह मार्गदर्शक ठरला आहे.
केशवसुतांच्या कवितांचे हस्तलिखित,सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता, लोकहितवादीकृत जातीभेद, स्त्री पुरुष तुलना या संहितात्मक पुस्तिका त्यांनी प्रकाशित केल्या. धनंजय कीर यांच्या सहकार्याने म.फुले कृत शेतक-यांचा आसूड, म. फुले समग्र वाड्मय व अत्रे यांच्या झेंडूची फुले यांचे पुनःप्रकाशन केले.ऑस्टीन वाॅरेन आणि रेने वेलेक यांच्या ‘थिअरी ऑफ लिटरेचर’ या ग्रंथाचे ‘साहित्य सिद्धांत’ या नावाने रूपांतरही केले.
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ६ जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
शांता शेळके
शांता शेळके (12 ऑक्टोबर 1922 – 6 जून 2002) या प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री, लेखिका, अनुवादिका , साहित्यिका , पत्रकार व प्राध्यापिका होत्या.
आचार्य अत्रेंच्या ‘नवयुग’मध्ये 5वर्षे उपसंपादक म्हणून काम केल्यावर त्या अध्यापनाकडे वळल्या. नागपूरमधील हिस्लॉप महाविद्यालय, मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयात त्या मराठीच्या प्राध्यापिका होत्या.
त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले आहे.’कविता स्मरणातल्या’, ‘गोंदण’, ‘तोच चंद्रमा’वगैरेसारखे काव्यसंग्रह, ‘आतला आनंद’, ‘धूळपाटी’ वगैरे ललित लेखसंग्रह,’आंधळी’, ‘ चौघीजणी’, ‘मेघदूत’ वगैरे इंग्रजी/ संस्कृतमधून केलेले अनुवाद, ‘नक्षत्रचित्रे’सारखे व्यक्तिचित्रसंग्रह अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
शांताबाईंनी असंख्य गीते लिहिली.अगदी ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’, ‘खोडी माझी काढाल तर’सारखी बालगीते, ‘गजानना श्री गणराया’सारखी भक्तीगीते, ‘चांदण्या रात्रीतले ते’पासून ‘शारद सुंदर चंदेरी राती’पर्यंत, ‘शालू हिरवा पाच नि मरवा’पासून ‘मध्यरात्रीला पडे तिच्या’पर्यंत, ‘तोच चंद्रमा नभात’पासून ते ‘वादळवारं सुटलं रं ‘पर्यंत विविध प्रकारची, वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारी गीते त्यांनी लिहिली आणि ती सर्व गीते रसिकांच्या पसंतीला उतरली, त्यांच्या ओठांवर रूळली.
1996साली आळंदीला भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद शांताबाईंनी भूषवले होते.
शांताबाईंना गदिमा गीतलेखन पुरस्कार, ‘मागे उभा मंगेश’साठी सूरसिंगार पुरस्कार, केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार ( चित्रपट :भुजंग), साहित्यातील योगदानाबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले.
शांताबाईंच्या सन्मानार्थ शांता शेळके साहित्य पुरस्कार दिला जातो.
☆☆☆☆☆
रामचंद्र दत्तात्रेय रानडे
गुरुदेव रामचंद्र दत्तात्रेय रानडे (3 जुलै 1886 – 6 जून 1957) हे आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत होते.
कर्नाटकातील जमखंडीमध्ये त्यांचा जन्म झाला.
मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी पहिली शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवली.
एम.ए.(तत्त्वज्ञान)च्या परीक्षेत त्यांना ‘परीक्षकापेक्षा परीक्षार्थीला अधिक माहिती आहे’ असा शेरा मिळाला.
फर्ग्युसन व विलिंग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक गंगनाथ झा यांच्या निमंत्रणावरून गुरुदेव रानडे अलाहाबाद विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागात अध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे त्यांनी तिथे अधिष्ठाता व कुलगुरू ही पदेही भूषवली.
गंगनाथ झा यांच्या शब्दांत ‘रानडे लौकिक व पारलौकिक अशा दोन जगात वावरत. म्हणूनच त्यांना ह्याच भौतिक जगात दिव्यानुभूती शक्य झाली.
‘द इव्हॅल्युशन ऑफ माय ओन फिलॉसॉफिकल थॉट्स’चा अपवाद वगळता त्यांनी आपले तत्त्वज्ञान कोठेही न मांडता विविध प्रदेशातील, संस्कृतीतील संतांचे साक्षात्कार अभ्यासून त्यातील साम्यस्थळे दाखवली. ग्रीक व लॅटिन भाषांच्या व्यासंगामुळे व कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश येथील वास्तव्यामुळे मराठी, कानडी, हिंदी साहित्याच्या परिशीलनामुळे त्यांच्या चिंतनाचा परीघ विस्तारला.
गुरुदेव रानडेंनी विपुल लेखन केले. त्यातील बहुतांश इंग्रजीत आहे. ‘द इव्हॅल्युशन ऑफ माय ओन फिलॉसॉफिकल थॉट्स’, ‘ अ कन्स्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ उपनिषदिक फिलॉसॉफी’, ‘द भगवदगीता ऍज अ फिलॉसॉफी अँड गॉड रिअलायझेशन’, ‘ वेदांत :द कल्मिनेशन ऑफ इंडियन थॉट’, ‘ज्ञानेश्वरवचनामृत’, ‘संतवचनामृत’, ‘तुकारामवचनामृत’ इत्यादी अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले.
‘इंडियन फिलॉसॉफीकल रिव्ह्यू’ हे त्रैमासिक सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
त्यांचे निंबाळचे समाधिस्थळ अध्यात्म विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे. अकॅडेमी ऑफ कंपॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलीजन ( बेळगाव) ही संस्था त्यांचे आध्यात्मिक विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
गुरुदेवांवर ‘गुरुदेव रानडे :साक्षात्काराचे तत्त्वज्ञान व सोपान’, ‘गुरुदेव रानडे :ऍज अ मिस्टिक’ वगैरे आठ मराठी/इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
चरित्रकार शं. गो. तुळपुळे यांनी ‘परमार्थाचे पाणिनी’ या शब्दांत गुरुदेवांचा गौरव केला आहे.
शांताबाई शेळके व गुरुदेव रामचंद्र दत्तात्रेय रानडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, मराठी विश्वकोश
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈